लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6
क्रमशः भाग 26 ते 30
क्रमशः भाग 26
तेचतेच वातावरण असल्यामुळे हल्ली क्रमशः काय लिहाव हा प्रश्न पडत होता पण श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले तसं पुन्हा नव्याची नवलाई डोकावू लागली मग माझी लेखणी पण सज्ज झाली . तसेच आॕगस्ट महिन्याची सुरुवात लाॕकडाऊन वाढदिवसाने म्हणजेच यांच्या 2 आॕगस्टच्या वाढदिवसाने झाली . नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा इडली-चटणी-सांबार बेत झाला . इकडे श्रावण महिना असल्यामुळे बाहेर जरी सगळं बंद असले तरी घरात मंगळागौर व शुक्रवार याची धामधुम सुरु होती तर 15 दिवसानंतर बँका उघडल्या होत्या व पहिला आठवडा त्यामुळे बँकेत पण प्रचंड गर्दी होती मला उसंतच नव्हती . आता 5 आॕगस्टनंतर जिल्हाबंदी उठली तर मिरजेला जाऊन यावे असे कीर्तीला वाटत होते ते बरोबरही होते . कारण आई-बाबांची भेट होऊन पाच महिने झाले होते तेही लग्नानंतर लगेचच . त्यामुळे जिल्हाबंदी उठण्याची वाट न पहाता ई-पास काढून जाऊन यावे अशी चर्चा झाली व 6 तारखेला पास काढला आणि आता मात्र कीर्तीला आनंदी आनंद झाला . इतके दिवस इलाजच नाही म्हणून तीने संयम ठेवलेला होता . कारण मागच्या महिन्यात जायचं गाजलं व पुन्हा कॕन्सल झालं मग सगळ्यांचाच मूड गेलेला म्हणून पक्क ठरेपर्यंत शांत रहायचं असं तिने ठरवलेलं पण आता पक्के झाल्यावर मात्र 8 तारीख केव्हा येते व मी मिरजेला कधी पोहोचते असे तिला झालेलं . आता घरच्या घरी का होईना पण कीर्तीला माहेरी मंगळागौर , श्रावणी शुक्रवार मिळणार होता .
सध्या सगळीकडे कोरोनानं भीषण रुप घेतलं आहे त्याला बार्शी आपवाद नाही पण सगळीकडेच नियम मात्र शिथिल केले आहेत त्यामुळे हे पण परांड्याला दोनतीन दिवस गेले होते काका-काकींची औषधे , घरात कमीजास्त पाहून आले . आता आकांक्षाचा क्लासपण रिशेड्युल झालाय . 31 जानेवारीला संपणार फेब्रुवारी अखेर तिचे पुर्ण होऊन जाईल .
8 तारखेला सकाळी लवकरच आशिष-किर्ती मिरजेला गेले . 4/5 महिन्यांच्या सवयीमुळे घर मात्र एकदमच शांतशांत वाटू लागलं . आणि मिरजेत आनंद ओसंडून वहात होता . खूप दिवसांनी भेटी झाल्या होत्या . फोटो , स्टेटस आणि फोनवरुन मिरजेतील मंगळागौर , शुक्रवार अगदी उत्साहात पार पडलेले समजत होते . ठरवल्याप्रमाणे शुक्रवारी कीर्तीने पुरणाचा स्वयंपाक करुन आई-बाबांना चकित केलं . केतकी पण चार महिने झाले आली नव्हती त्यामुळे घरात दोघेच राहून तेही कंटाळले होते मुख्य म्हणजे केतकीची काळजी करुन करुन आई बेजार झाली होती . तेही खरंच होतं कारण उत्साहाच्या भरात केतकीचं काम चालू होतं . रोज नविन नविन अनुभव आम्हांला पण ऐकायला मिळत होते पण रोजची तीची ड्युटी कोव्हीड पाॕजिटीव्ह वार्डमध्ये होती . कितीही काळजी घेतली तरी विस्तवाशी खेळ होतोय तो त्यामुळे तिच्या आईच्या जिवाला चैन नव्हती . आधीच केतकीची तब्बेत नाजूक , जेवायला व्यवस्थित मिळत नाही परवाच कावीळ झाली त्यानंतर दोनदा आजारी पडली त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालीय . असे उलटसुलट विचार करुन अस्वस्थ झालेल्या मनाला आशिष-किर्तीच्या जाण्यांने थोडासा दिलासा मिळाला , बदल झाला , मुलं आल्यावर ते जरा रिफ्रेश झाले . आठवडाभर राहून आशिष-किर्ती रविवारी बार्शीला निघाले . पण येण्याआधी केतकी आजारी पडली होती तिला ताप येत होता व टाईफाईड झाल्याचे निदान झाले . पुन्हा कोरोनाची टेस्ट केली होती त्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या काळजीत भर पडली होती . भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसं झालं . बार्शीला येताना रस्त्यातच केतकी कोरोना पाॕजिटीव्ह निघाल्याचे समजले.......पुन्हा सगळे चलबिचल झाले पण केतकी मात्र फर्म होती . हे होणारच होतं असे तिचे म्हणणे होते . एकदोन दिवसांत ताप कमी झाला होता पण औषधांमुळे थकवा जास्त आला होता . गोळ्यांनी पोट भरते म्हणायची . तिची चिडचीड वाढली होती आणि सहनशक्ती उरली नव्हती त्यामुळे फोनवर बोलायचं म्हणलं की तिला रडायला येत होतं ती आईबरोबर तर बोलायचीच नाही पण कीर्तीसोबत बोलायची मग मी पण बोलत होते . पिळून निघाली होती , फोन झाला की कीर्ती खूप अस्वस्थ व्हायची पण आम्ही 4/5 जण असल्यामुळे वातावरण लगेचच बदलायचं . आता केतकीला काहीच होत नव्हते पण दहा दिवस अॕडमीट रहावं लागणार होतं . नंतर सात दिवस क्वारंटाईन ! मग यानंतर मिरजेला आणायचं ठरलं . पण केतकी जाम वैतागली . असेच काळजीत दोनतीन दिवस गेले नंतर केतकी फोनवर व्यवस्थित बोलू लागली मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं .
आता बार्शीला आल्याआल्या शेवटची मंगळागौर व पोळा ( आशिषचा तिथिने वाढदिवस ) एकाच दिवशी आला त्यामुळे पुरण व दुसरेच दिवाशी म्हणजे 19 आॕगस्टला आशिषचा तारखेनी लाॕकडाऊन वाढदिवस आला . किर्तीने आधीच गीफ्ट मागवून ठेवलं होतं तर आकांक्षाने सुंदरसा लाॕकडाऊन क्राऊन तयार केला होता . केक झाला व रात्री त्याच्या आवडीचे उडीदवडे केले .
आता लगेचच हरितालिका , गौरी-गणपती येणार , सगळ्यात मोठा सण ! प्रवास करता येत होता मग यांनी पण परांड्याला जाऊन काका-काकींना बार्शीला आणलं . ब-याच दिवसांनी ते आले होते .आता घर माणसांनी भरलं वातावरण सगळं छान वाटतेय पण कोरोनामुळे बाहेरचं वातावरण तसं गंभीरच आहे . पण बाप्पाच्या आगमनाने घरात चैतन्य आलं . जोडीला निरनिराळे पदार्थ खायला मिळत होते मग सगळे अगदी खूशच ! कामाला कोणीच नाही त्यामुळे तो ताण जरा जास्तच येतोय म्हणून गौरीची तयारी जरा लवकरच सुरु केली . त्यामुळे घरात धामधूम सुरु झाली . उभ्या लक्ष्म्याचं कीर्ती ऐकून होती त्यामुळे कसं असणार सगळं याविषयी तिला खूप उत्सुकता होती . तसही गौरीला दोन दिवस ती येणार हे गृहित होतं पण कोरोनामुळे पाडव्यापासून तिचे सगळे सणवार बार्शीत अगदी शिस्तीत होत होते . अगदी जुन्या जमान्यांसारखं तिचे सासरी रहाणं पडलं आहे . वरचा मजला बांधल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतेय . पण सगळं खुशीत चालू आहे , मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिची प्रवृत्ती व करण्याची धडपड माझा उत्साह वाढवत होती . तिला बरोबरीने वेळेप्रमाणे आकांक्षा जोडीला होतीच त्यामुळे उत्साह अगदी ओसंडून वहात होता . अगदी मंडप घालणे , पडदे घालणे गौरीच्या साड्या नेसवणे , थोडथोडच पण सगळं फराळाचं त्यात रव्याचे लाडू , बेसन लाडू , करंज्या , फुलोरा सगळं या दोघींनी विचारत विचारत पहिल्यांदा केलं . फक्त माझ्या देखरेखीखाली व नियोजनबद्ध पद्धतीने सगळं चाललं होतं . एक दिवस आधीच सगळी तयारी या दोघींना हवी होती कारण त्यादिवशी त्यांना स्वतःला नटायचं होतं . दुपारची जेवणं झाली की या तयारीला लागल्या मस्तपैकी साडी , मेकअप ट्रेडीशनल लुकमध्ये तयार ! जणू चालत्या बोलत्या जेष्ठा कनिष्ठाच !! मला पण नऊवारीचा आग्रह मग काकींना पण सेमीपैठणी नेसायला लावली . आणि गौराईच्या स्वागताला तीन पिढ्या तयार झालो . वाजतगाजत थाटामाटात आनंदाने गौराईचं आगमन दोरे घेणं , फराळांनी पोटं भरणे तर पुजेची तयारी ताटात हळदीकुंकू पंचामृत , गंध , अत्तर , हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या , आघाडा , दारातली जास्वंदीची लाल फूलं , बाकी रंगीबेरंगी फूलं , पांढरीशुभ्र पण हळदी-कुंकवाने रंगवलेली टपोरी माळावस्त्र , भिजवलेल्या वातींचा जुडगा हे सगळं 16-16 गौरीसाठी , 8-8 बाळांसाठी तर 21-7 गणपती व जिवातीसाठी अशी तीन दिवसांची तीन ताट त्यात दुसरे दिवशी फक्त साळी-डाळी वहायच्या आणि हे सगळे क्षण वैविध्यपुर्ण पद्धतीने कॕमे-यात टिपण्याची आशिषची कला व ते पाहून आकांक्षा-कीर्तीचं हरखून जाणं ! नवदांपत्याकडून गौरीची शोषडशोपचारे पूजा ! बाकी फारशी आरास न करता समोर फळं , पाणी भरुन तांब्या-भांडं , तांदूळ व हरभरा डाळीच्या राशी , असोल्या नारळाने ओटी , दक्षणा मग सगळ्यांनी मोठ्या आवाजात सात आरत्या धूप-कापराचा सुवास मंद लाईटींग व त्यात प्रसन्न मुद्रेने गौराई ! आणि मग पुढचे दोन दिवस अगदी धामधुमीत कसे गेले समजले नाही . लहानपणापासून आकांक्षाची लुडबूड असते पण यावर्षी तिने पण जबाबदारीने अंगावर घेत काम केलं . दुसरे दिवशी कीर्तीने स्वयंपाकघरात एन्ट्री तर सकाळी लवकरच घेतली विचारुन विचारुन सगळं काम चालू होतं . लक्ष्म्याचा स्वयंपाक तसा चिकटच असतो पण त्यात मी ब-यापैकी सुटसुटीतपणा आणला आहे .कोणताही आती काटेकोरपणा ठेवला नाही . एकत्र करुन एकूण दोनच भाज्या एकएकच चटणी व कोशींबीर , विकतचं श्रीखंड बासुंदी आणि थोडासा साखरभात , खीर आणि भरपूर पुरण हे पंचपक्वान्न तर पडवळाची कढी , मिरचीच पंचामृत , कटाची आमटी तळणात आळू , घोसावळ , मिरची व पालक भजी , वडे , कुरडया हे मात्र यथासांग करत असते कारण सगळेजण आवडीने खातात विशेषतः काका-काकी . मुख्य म्हणजे पाडवा , वैशाखीला ते नव्हते . आणि वयपरत्वे स्वतः करुन खाणे जमत नाही . मग सगळं निरिक्षण करत करत हे काय ते काय असं विचारात यातला मोठा पुरणाचा भाग कीर्तीने उचलला व बाकी मी केल . हिरवी भाजी , केशरी साखरभात , पांढरा भात , भजी असा रंगीबेरंगी स्वयंपाक हिरव्यागार केळीच्या शेंड्याच्या पानावर नैवेद्याचं पान सजलं . सगळं मजेत हसतहसत चालू होतं त्यामुळे जरी दगदग खूप झाली असली तरी फारसा थकवा जाणवला नाही . या सगळ्यामध्ये आव्याहतपणे न सांगता यांची खूप मदत नेहमीच असते . जमेल तसं हातभार लावण्याची आशिषची तयारी होती . मुख्य म्हणजे दिवसातून सहावेळा चहा ! काकांचीपण काहीना काही हालचाल सुरु होती . विडे लावणे , भाज्या-दुर्वा निवडणे काकींच्या मदतीने करत होते . नव्याची नवलाई , प्रौढत्व आणि परिपक्व अशा तीन पिढ्या हा सण एकत्रितपणे साजरा करत होत्या . हे दोनतीन दिवस मात्र आकांक्षा-कीर्ती-आशिष फोटो स्टेटस यात अगदी तल्लीन होते . या सगळ्याचं कीर्तीच्या माहेरी , आजी , आत्त्या , मावशा , मैत्रिणी सगळ्यांना खूप कौतुक होतं . तर इकडे आमचा पंचकन्या परिवार , काका-काकी , आत्या , मैत्रिणी , माझे सासर माहेरचे सगळे ग्रुप अगदी कौतुकाने मेसेजेस फोन करत होते . नविन सुनबाईसोबत व वयस्कर सासुबाईंबरोबर सगळ्यांना छान वाटत होतं . पिढ्यानपिढ्या हे सण तितक्याच उत्साहाने , श्रद्धेने मनापासून करण्याची रीत आहे लहानपणी माहेरच्या आंगणात आईच्या शिस्तीत मायेच्या उबीत तर लग्न झाल्यावर सासरी थोडंस जबाबदारीने सासूबाईंच्या पद्धतीने घरोघरी हा सण साजरा केला जातो . त्याच परंपरेत नाविण्यपुर्ण पद्धतीने नविन पिढीला अलगदपणे सामावून घेणं , वसा देणं त्यापासून मिळणारं समाधान नव्या पिढीला आधोरेखीत करणं ही आपली जबाबदारी आहे , संस्कृती आहे . तीची जपणूक तर व्हायलाच हवी ! आजकाल कामं तर सगळ्यांना आहेत वेळ नसतो पण वेळ राखीव ठेऊन हे सगळं जसं रुचेल आणि पचेल व झेपेल असं केलं तर उर्जा मिळते हे तर स्वानुभवानेच सिद्ध होते !! आता सध्या सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती असते . अनंतचतुर्दशीला आमच्याकडे बाप्पाचे विसर्जन असते . आता नवरात्रोत्सवापर्यंत थोडंस शांत आहे . माझ्या माहेरी जेष्ठी पौर्णिमेला बेंदूर असतो तर मी लहानपणी आईकडून खूपवेळा ऐकलं आहे
" बेंदूर न लागलं सणाचं लेंडूर
दिवाळी न सण ओवाळी "
खरंच आहे हे . यावर्षी मात्र कोरोनामुळे कुटुंबातील माणसं एकत्र राहिली आहेत व सणांमध्ये किती उत्साह असतो याची पुनश्च प्रचीती आली आहे !!!!
क्रमशः भाग 27
आज अनंत-चतुर्दशी , गणपती बाप्पाचे विसर्जन !
गेले दहा दिवस बाप्पाच्या सहवासात , धामधुमीत कसे गेले समजले नाही . नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात पुढच्यावर्षी येण्याचे आमंत्रण देऊन बाप्पाला निरोप दिला .
आज आशिष-किर्तीला सुट्टी होती पण मला बँक होती . त्यामुळे मी बँकेतुन आले की आम्ही चहा घेत बसलो होतो तेव्हा कीर्ती म्हणाली
" आमच्या खिडकीत पक्षाने घरटं केलंय आणि त्यात चार अंडी घातली आहेत ."
हे ऐकलं मात्र पण ते केव्हा एकदा पहाते याची मला खूप उत्सुकता लागली .
पटकन चहा घेतला आणि लगबगीने वरती गेलो . तोपर्यंत अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊन गेले .
" नेमकं कोणत्या पक्षाचं घरटं असेल . आत्तापर्यंत चिमणीचं घरटं पाहिलय पण कीर्तीने अंड्याच्या व घरट्याच्या केलेल्या वर्णनांवरुन तर ते चिमणीचं तर नसणार मग कोणता पक्षी असेल नेमका तो ? "
तोवर आम्ही वर पोहोचलो . मागोमाग आकांक्षा पण आली . पडदा बाजूला सरकवला तसा पक्षी उडून गेलेला दिसला . मग हळूंच काच सरकवली तर इतकं सुंदर असे बाहेरुन जाड्या भरड्या काड्या वापरुन द्रोणासारखं पण थोडंस अंडाकृती आणि आतून मऊसुत गवत वापरुन अगदी वार्तुळाकार गोल केलेलं घरटं आणि त्यात अतिशय चमकदार जांभूळाच्या बियाच्या रंगाची व आकाराने पण तेवढीच चार अंडी ! मुख्य म्हणजे ते घरटं पाहून क्षणभर असं वाटलं ना पट्टी , ना टेप , ना कुठलं हत्यार कसं केलं असेल ? ते तयार करताना या पक्षांनी वास्तूशास्त्र आणि विज्ञान याचा अभ्यास केला की काय ? कारण इतकं खोपचात ते आहे की पाऊस आला तर तो लागणार नाही पण सुर्याची कोवळी किरणे त्यावर नक्कीच पडणार ! ग्रीलच्या आत पण काचेच्या बाहेर , बरोबर स्लाईडींगच्या तीन चॕनलवर अगदी अलगद बनवलेलं आणि त्यात ती अंडी घातलेली ! परमेश्वराची लिला अगाध आहे . कोणत्या विद्यापीठात घेतली पदवी त्यांनी ? ते सगळं पाहून इतकं हरकायला झालं . हे घरटं किंवा अंडी चिमणीचं नाही , हा तर सुगरणीचा खोपा पण नाही मग कोणाचं असेल ? अशी आम्ही चर्चा करत होतो तर एक चिमणीपेक्षा मोठा पण डोक्यावर तुरा असलेला लांब शेपटाचा काळा पक्षी खिडकीत येऊन इतका जोरात कलकलाट करुन गेला की क्षणभर तो पक्षी आत आला की काय असेच वाटले . पण तो आम्हांला रागवून गेला होता . असं वाटलं की तो म्हणतोय ,
" हा इलाका माझा आहे . माझं इथे घरटं आहे थोड्याच दिवसात इथे पिल्लू येणार आहे . मला इथे तुमची लुडबूड आजिबात चालणार नाही ".
मग आम्ही हळूच काच बंद केली काचेतून बाहेरचं दिसत होतं . थोड्याच वेळात पक्षीण येऊन घरट्यात बसून गेली . वाटलं जणू काही सगळं अलबेल आहे ना हे पहाण्यासाठी ती येऊन गेली असावी .
हे सगळं पाहून आम्हांला इतका आनंद झाला की त्याचे फोटो काढून आम्ही स्टेटस टाकले होते . तोपर्यंत पक्षी कोणता याची शोधाशोध सुरु होती . बाहेर जाऊन खिडकीखाली बसले व घरट्याभोवती घिरट्या घालणाऱ्या पक्षाचे निरिक्षण करत बसले . बुलबुल असावा असा तर्क चालू होता तेवढ्यात माझ्या स्टेटसला एका मैत्रिणीकडून
" व्वा बुलबुलचं घरटं !"
असा रिप्लाय आला . मग आम्ही गुगलवर
" बुलबुल पक्षाचे घरटे "
शोधले आणि अगदी आमच्या खिडकीतल्या घरट्याप्रमाणे अंड्यासहीत घरटी दिसली . मग ते घरटं आणि अंडी बुलबुलची आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.
मला खूप काळजी वाटतेय त्या अंड्यांची . खूप उंचीवरआहे ते घरटं , त्या पक्षांच्या जोडगोळीला त्या खिडकीतच दाणापाणी ठेवावे का ? का तांदूळ ठेवले तर ते खायला इतर पक्षी येतील ? आणि माणसाची चाहूल लागते म्हणून हे पक्षी अंड्याकडे फिरकलेच नाहीत तर ??
छे छे ! असं होता कामा नये म्हणून मी मुलांना खिडकी उघडूच नका म्हणून सांगितले ! पण डोळ्यासमोरुन ते घरटं आणि अंडी हालतच नव्हती . खरं तर हे सगळं नैसर्गिक आहे . त्याची एवढी चिंता करण्याची गरजच नाही . किती पक्षी आणि किती घरटी असतील पण ते अगदी घरातच आल्यामुळे एवढी उत्सुकता वाढली हे खरं ! सकाळी उठल्या बरोबर आधी पक्षी घरट्यात येऊन बसल्याची कीर्तीकडून खात्री करुन घेतली आणि जीव भांड्यात पडला आणि आता त्याला अजिबात विचलीत करायचं नाही असे ठरविले आहे . पुन्हा संध्याकाळी आतूनच पक्षी आहे का खात्री केली . कीर्ती म्हणाली
" दिवसभर दिसत होता पक्षी मधूनमधून चक्कर मारुन यायचा पण आहे . "
बरं वाटलं चला म्हणजे आपला त्याला डिस्टर्ब नाही होत तर . मग मी गच्चीत गेले . तिथुन मात्र पक्षी उडाले की स्पष्ट दिसत होते बुलबुलचंच प्रेमी युगूल होतं ते . मधुनच आंब्याच्या , रामफळाच्या , चिक्कूच्या झाडावर फेरफटका मारुन परत घरट्यात येऊन बसत होते ते .
" अच्छा असं आहे तर . सगळ आलबेल आहे की यांच चालूदे आता आपला त्यांना काही त्रास होणार नाही न ?"
फक्त हे पहायचं मी ठरवलं . मला एकदम हलकं हलकं वाटलं , प्रसन्न वाटलं . सुमन कल्याणपूरकरचं गाणं गुणगुणावासं वाटलं.
" पक्षीणी ,
प्रभाती चारियासी जाये
पिलू वाट पाहे उपवासी "
हे चित्र दिसू लागलं
मग खाली येतांना सगळ्यांना सक्त ताकीद देऊनच खाली आले . खरं तर हा सगळा कोरोनाचा परिणाम आहे . ब-याच वर्षांनी प्रदूषण नाही , गर्दी नाही , कलकलाट नाही त्यामुळे निसर्ग मात्र खूष आहे . शांततेमुळे पक्षी प्राणी मनसोक्त विहार करु लागले आहेत .
यावरुन मला माझे कॉलेजचे दिवस आठवले . माझी शेवटची दोन वर्षे सांगोल्यात झाली . तेव्हा मी आत्त्याकडे रहायला होते . आत्या , त्यांचे यजमान त्यांना आण्णा म्हणत असत दोघेही म्हातारे झाले होते . त्यांची मुलगी मंगल , नातू अतुल व मी रहायचो . खूप जुना धाब्याचा दगडी वाडा होता तो ! वाड्यात पाच भाडेकरु होते. हे जुने भाडेकरु होते मग त्यांच्यात वाद होता त्यामुळे जागा सोडत नव्हते म्हणून घरमालकांनी यांची लाईट बंद केली होती . वाड्यात अगदी कोपऱ्यात तीन फूट रुंदीच्या आंधा-या लंबुळक्या बोळातून गेलं की आत्याच्या घरात प्रवेश व्हायचा ! दोन अंधाऱ्या खोल्या आत स्वयंपाक घर कोपऱ्यात न्हाणीघर बाहेरची एक खोली त्यात पण शेतमालाची पोती असायची . पावसाळ्यात ओल यायची . दिवसा वाचायचं असेल तरी उजेडासाठी समोरच्या दारात किंवा सवण्याखाली बसाव लागायचं व रात्रीचा अभ्यास तर कंदिलावर ! घेरडीत सगळ्या सुखसोई होत्या पण शिक्षणाची सोय नव्हती आणि मुलींना बाहेर एकटं ठेवणे त्या जमान्यात मान्य नव्हते मग आम्ही पण काहीच तक्रार करत नव्हतो शिकायला मिळतं हाच आनंद होता . मायडीपासून शिकायला बाहेर गेलो आम्ही . सुरुवातीला तायडीकडे किर्लोस्करवाडीला व पुढे आत्याकडे सांगोल्याला . आत्त्याचा वाडा मोडकळीस आलेला होता व भरपूर कपारी होत्या त्यामुळे पक्षी बरेच असायचे . कधी कधी पिल्लं पण दिसायची . खूपदा वाड्यात साप पण निघायचे आणि घर शेणानं सारवलेलं असायचं व भिंती पण सारवायच्या होत्या उंदीर असायचे त्यामुळे घरात बीळं व्हायची आणि मग धग वाढली की विंचू निघायचे . रोज दुपारी बीळं बुजवाचं काम आत्त्या करायच्या . त्यांच्या घरात सगळ्यांना ती सवय झाली होती मला मात्र ते नविन होतं . विंचू निघाला की आण्णा किंवा मंगल तो कातडी चप्पलने मारत असत . मी मात्र धूम ठोकायची विंचू मारल्याची खात्री झाली की मग घरात यायचे तर लगेच आण्णा नाकातून मोठा आवाज काढत म्हणयचे
" उंदीर म्हणती माझे घर
पाल म्हणती माझे घर
ढेकूण म्हणती माझे घर
विंचू म्हणती माझे घर "
माझी मात्र बोबडी वळलेली असायची .
आण्णा हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व होते . पंचाहत्तरी ओलांडलेले पण स्वभावाने तापट होते देवाची पूजा करत नसत पण दोनवेळा संध्या चुकत नसे त्यांची . सारखं पद्मासनात बसून डोळे मिटलेले आणि गुंईई असा आवाज सुरु असायचा . प्राणायाम , शिरसासन पण करायचे . शेतात चार किलोमीटर चालत जाऊन यायचे . फारसं कोणाशी बोलत नसायचे पण त्यांच्या मनात बोलायचं असलं की समोर बसायला लावायचे मग इंग्रजीत बोलायचे , ग्रामर विचारुन भांबेरी उडवायचे मधूनच कोणतही स्तोत्र म्हणायचे व मागे म्हणायला लावायचे . एकश्लोकी रामायण व एकश्लोकी महाभारत त्यांनीच पाठ करुन घेतलं . खूप वेळ सोडलं नाही की आत्त्या येऊन म्हणायच्या
" तिला तासाला जायचंय
बाहेर तिची मैत्रीण आलीय ".
मग माझा जीव भांड्यात पडायचा ते फक्त आत्याकडे तिरके डोळे करुन पहायचे .
" केलीत का सुटका , पळा "
एवढं म्हणायचा आवकाश मी लगेच पळ काढायची .
एकदा रात्री मी कंदिलाच्या ऊजेडात अभ्यास करत बसले होते मार्च महिना असल्यामुळे गरम होत होतं . मंगल जवळ येऊन बसली व म्हणाली
" शरे , चल वर , धगाटा जास्त आहे , यायचा एखादा विंचू . वर मागच्या भिंतीला लागून लाईटचा पोल आहे , उजेड येतोय तिथं आभ्यास कर , वाड्यातले सगळेजण वर येतात झोपायला , ऐक माझं गार हवेत बैस ."
विंचवाचं नाव निघालं की मी घाबरले पटकन उठून उभी राहिले आणि आता दप्तर उचलायची पण भिती वाटू लागली . असला वहीखाली विंचू तर ? मग गयावया करत मी मंगलला मदत मागितली . आणि भित्यापाठी राक्षस म्हणतात तसं पसरलेल्या दप्तराखाली मोठा विंचू होता . माझी पळता भुई थोडी झाली . वर गेलेली सकाळीच खाली आले .
अशा या प्राणी , पक्षी , किटक असलेल्या वाड्यात दोन वर्षे राहिले होते मी . आणि कंदिलात व रोड लाईटवर अभ्यास केला . पण आमच्या आत्त्या खूप प्रेमळ होत्या . जसं आहे त्यात ताज ताज खायला करुन द्यायचा त्यांचा अटापीटा असायचा . त्यांचा स्वयंपाक चुलीवर असे . मला यायला एक वाजतो म्हणून साडेसातला काॕलेजला जाताना खाऊनच जायचं हा आग्रह असायचा त्यांचा . जोडगहू भरडून गुळ घालून केलेला गोड सांजा किंवा लाल तिखट शेंगदाणे हळद घालून केलेला तिखटाचा सांजा , थालीपीठ , गरम भाकरी हे ठरलेले पदार्थ आसायचे त्यांचे . थंडीच्या दिवसात गरमगरम खायला मजा यायची . मी येईपर्यंत सगळं काम व्हायचं त्यांच आणि दुपारी वाड्याच्या दारात येऊन वाट पहात बसायच्या त्या . वाड्यातल्या शेजा-यांना कौतुकाने सांगायच्या
" आमच्या भावाचं घर खेड्यात आहे पण फरशी आहे तिथं . श्रीमंत बापाची लेक आहे ही . एका निमित्ताने राहिलीय आमच्याकडे "
आणि मी घेरडीला गेले की शेणानं सारवण्याचं काम उरकून घ्यायच्या .माहेरचा , भावाचा , भाच्यांचा एवढ्या म्हातारपणी सुद्धा इतका अभिमान !!!
एका बुलबुलच्या घरट्याने काॕलेज जीवनातील पक्षी , प्राण्यांच्या सहवासातील गोड , भितीदायक प्रसंगाची आठवण झाली . सध्या या पक्षांचा गोड आवाज आता प्रकर्षाने जाणवतो . वाढलाय असे वाटतेय . आता ही पिल्ल कधी होतील , कशी आसतील , किती दिवस त्यांचा मुक्काम आमच्या खिडकीत असेल याविषयी मात्र उत्सुकता लागली आहे हे खरं !!
क्रमशः भाग 28
आशिष-किर्तीला बार्शीला येऊन सहा महिने पुर्ण झाले . येतांना अगदी हो-नाही करत आले होते आणि आलं की परत जाणेच झाले नाही त्यामुळे घरात कायकाय झालं असेल , नुकतच फर्निचर केलय धूळ कितपत झाली असेल , पेपरचा ढीग पडला असेल काय , फ्रीजची परिस्थिती कशी आहे हे सगळे प्रश्न सतावत होते . त्यात दोघांच्याही कंपनीने आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोवर WFH च करावे असे सांगितले . आता प्रवास पण सहजासहजी करता येत होता त्यामुळे पुण्याला एखादी चक्कर मारुन आलेल बरंच होईल म्हणत भाज्या आणि आठवडाभरासाठी लागणारं सगळं सामान गाडीत टाकून आजच ते दोघं पुण्याला गेले आणि घर एकदमच रिकामं रिकामं वाटायला लागलं . घरात काही कामच नाही आणि असलं तरी करावसं वाटेना .
आज जवळजवळ तीन आठवडे झाले आमचं आख्ख कुटुंब बुलबुलभोवती रुंजी घालत होत . काल पिल्लं घरट्यातून उडाली आणि बुलबुल प्रकरणावर पडदा पडला . बुलबुल पक्षी एवढंच माहिती होतं . तसं बुलबुलला इतक्या जवळून न्याहाळण्याचा पहिलाच प्रसंग ! त्यामुळे त्यांच्या सवयी किंवा त्यांच्याविषयी काहीही माहिती नव्हती . पण या 15/20 दिवसात सतत त्यांचा वेगवेगळ्या मुडमधला किलबीलाट ऐकून त्यांचा आवाज ओळखीचा झाला होता . सकाळ संध्याकाळ ते ऐकण्यासाठी माझे तर कान आसुसलेले असायचे त्यांच निरिक्षण करण्यात मन रमायचं . त्यांच उडणं , पिल्लांना भरवणं , पिल्लांच्या रक्षणासाठी माणसं किंवा मांजर दिसलं तर जोरजोरात कलकलाट करणं आणि आवडता खाऊ मिळाला तर आनंदाने किलबील करणं प्रत्येक आवाज न्याराच असायचा . पुन्हा एकदा खात्री पटली की परमेश्वराची लीला अगाध आहे ! निसर्ग भन्नाट आहे ! त्याचा पण आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे .
सुरुवातीला घरट्यात अंडी पाहिल्यानंतर 1/2 दिवस फक्त खिडकी उघडून पाहिली होती मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून पुन्हा मात्र त्यांना आम्ही काचेतूनच पहात होतो . पण हळूहळू त्यांना पण आमची सवय झाली होती . सुरवातीला पडदा थोडासा जरी हलला तरी उडून जाणारी ती आता आमचा आवाज आला तरी आरामात घरट्यात बसून रहायची . 2/3 दिवस तर एखादी चक्कर मारायची नाहीतर सतत घरट्यातच बसलेली असायची . आणि 9 तारखेला सकाळी आम्हांला थोडीशी किलबील जाणवली आम्ही आतूनच आंदाज घेत होतो . बहुतेक पिल्लु झालंय असे वाटत होते . मग दुपारी ती उडून गेल्यावर या मुलांनी हळूच खिडकी उघडून डोकावलं तर डोळे बंद असलेलं एकदम छोटंस एक लाल पिल्लु दिसलं . आशिषने शिळ घातली तसं लालबुंद चोच उघडून आ केलं की त्याची मान लकलक हलत होती आणि असा भास होत होता की जणूकाही ते म्हणतंय
" मला खाऊ , मला खाऊ "
एका सेकंदात तर लगेच त्याचं मुटकुळ झालं पण त्याच्या उघडलेल्या चोचीचं दृष्य इतकं लोभसवाणं दिसत होतं की हरकायला होत होतं .त्या दोघांचेही अथक परिश्रम सुरु होते . चोचीत चारा घेऊन यायचं त्याला भरवायचं पुन्हा चारा आणायला जायचं . पण एकावेळी ते दोघे बाहेर जात नसत . एकजण ग्रीलवर , पाईपवर बसलेला असायचं . चारा घेऊन एकजण आलं की दुसरा जायचा . मधुनच बुलबुल पिल्लाला उब देण्यासाठी घरट्यावर पंख पसरुन बसून रहायची . पुन्हा संध्याकाळी किलबील जराशी वाढल्या सारखी जाणवत होती मग संध्याकाळी मी घरी गेल्यावर ती नाही असे पाहून पुन्हा एकदा हळूच काच सरकवली व शिळ घातली तर दोन पिल्लांनी चोच उघडून मान वर केली . दोन अंडी अजून तशीच होती . इतक गोड दृश्य दिसत होतं ते पटकन फोटो , video काढला तोवर बुलबुल जोरात आवाज करत ग्रीलजवळ येऊन गेली . जणू ती आम्हांला रागवतेय असे वाटले मग आम्ही लगेच काच बंद केली . त्यानंतर आम्ही छोटीशी सफरचंदाची फोड हळूच घरट्याजवळ ठेवून काच बंद केली तर लगेचच बुलबुल येऊन बसली स्वतः 3/4 वेळा फोड चाखून पाहिली जणूकाही तिने खात्री केली की
" माझ्या पिल्लांना हे चालेल न "
मग दोन्ही पिल्लांना तिने आनंदाने आळीपाळीने भरवले व फोड चोचीत घेऊन उडून गेली . बराच वेळ ती परतच आली नाही मग उगाचच शंकेची पाल चुकचुकली
" काय झालं बाबा ? आपण पिल्लाला खायला घालतो असे तर तिला वाटले नसेल ? आणि परत आलीच नाही तर ? "
अंगावर काटाच आला , तिथंच बसले तर जवळजवळ पाऊण तासांनी बुलबुल परत ग्रीलवर येऊन बसली . तिला पाहून मला खूप आनंद झाला . आंम्ही जवळच गप्पा मारत बसलेलो होतो तर तिने काचेवर चोचीने टकटक केले . गेल्या आठदहा दिवसांत कधीच हा अनुभव आला नव्हता मग आम्ही आंदाज बांधला तिला सफरचंद हवे आहे . मग पुन्हा फोड ठेवली तर पुन्हा तोच अनुभव आला ती थोड खायची थोडंस पिलांना भरवायची व फोड घेऊन उडून जायची असे दोन तीन वेळा झाले .
दुसरे दिवशी सकाळी पिलांचा किलबीलाट जरा आणखीनच वाढला होता पुन्हा पाहिलं तर तीन पिल्लं दिसली . अजून एक पिल्लू दिसायला हवं होतं आम्ही वाट पहात होतो . आता मात्र चारा भरवण्यासाठी त्या दोघांचे खूप हेलापाटे होत आहेत असं वाटायच मग आम्ही पण जरा सफरचंदाच्या जास्तच फोडी ठेऊ लागलो . पुन्हा एकदा मोसंबीची फोड ठेवली तीने ती चाखून पाहिली पण पुन्हा तोंड लावलं नाही पिलांना पण भरवलं नाही ती फोड तशीच ठेवली मग आम्ही पण ती काढून टाकली पुन्हा सफरचंदाचीच ठेवली तर स्वतः खाऊन पिल्लांना भरवून फोड घेऊन ती उडत जायची तोच अनुभव सारखा येत होता . ती फोड कुठे नेऊन ठेवते याचं आम्हांला कोडं पडत होतं . मग मी गच्चीत जाऊन पाहिलं तर ती मागे शेतात बदामाच्या झाडावर जात होती . आता त्यांना आमची सवय झाली होती ते घरट्यात नाहीत असे पाहून आम्ही जरी खिडकी उघडली तरी फारसा दंगा करत नसत . पिल्लं मात्र शिट्टी वाजवली की तोंड वर करुन चोच उघडून किलबील आवाज करायची पण डोळे बंदच होते . पहिलं पिल्लू दोनच दिवसात मोठ वाटू लागलं तर तिसरे दिवशी त्यांच्या अंगावर काळे केस दिसू लागले . घरट्यात तळाशी बसलेली पील्लं वरवर येतात असे वाटू लागले . चार दिवासात तर पंख दिसु लागले . जागच्या जागी ती भरपूर हलचाल करायची चौथं पिल्लू मात्र दिसलं नाही . या तीनमध्ये पण एक जरासं मोठं दिसायचं व दुसरी दोन लहान वाटायची . त्या द्रोणाएवढ्या घरट्यातसुद्धा मोठं पिल्लू या छोट्यांना आत ढकलून स्वतः वर यायचं ! आम्हांला भारी मजा वाटायची पहायला , पण भिती पण वाटायची हे जर बाहेर आलं तर खालीच पडेल म्हणून . मुख्य म्हणजे त्यांना पंख फुटले की ते गोजिरवाणे दिसेनात काळे काळे पीस दिसत होते पण शेवटी परमेश्वराची लिला ती ! असणारच काहीतरी असे वाटायचे .
पाच दिवसाची पिल्लं मात्र चांगलीच मोठी वाटू लागली छोटे छोटे पंख दिसत होते . अगदी कोंबडीच्या जन्मलेल्या छोट्याशा पिलाएवढी ती दिसू लागली . घरट्याच्या काठापर्यंत पिल्लं दिसू लागली . दाटीवाटीने एकमेकांना ढकलून शिट्टी वाजवली की तिन्ही पिल्लं चोच उघडून गोड आवाजात किलबील करायची . तासंनतास रमायला व्हायचं . मी तर एवढ्या गडबडीत पण सकाळी 10/15 मिनीटं आणि संध्याकाळी एक तास वरच असायची . आता 1/2 दिवसात ही चालत बाहेर येतील की काय असं वाटत होतं . सहावे दिवशी मात्र मला संध्याकाळी उशीर झाल्यामुळे पहाता आलं नाही . पण आज मात्र डोळे उघडले होते , शिटी वाजवली की डोळे उघडून पहायचे व लगेच डोळे झाकून निवांत झोपायचे तर फक्त त्यांची आई आली तरच चोच उघडायचे . आज घरट्यातच पंख पसरुन जागेवर उडी मारल्या सारखे करत होते . हे सगळे अपडेट्स मला घरी गेले की मिळाले . सहाच दिवसांत कित्ती शहाणपण ते ! असे मला वाटले अजून आठदहा दिवस तर नक्कीच रहातील इथे ग्रीलवरृ उड्या मारायला जागा आहे फक्त खाली पडायला नको . असा विचार करत मी झोपले . रात्रभर गडगडाटासह खूप पाऊस झाला . झोपेतच ती पिल्लं मला डोळ्यांसमोर दिसू लागली . पाऊस तिरका असेल तर भिजलं असेल का घरटं ? असा विचार करत मी सकाळी पिल्लांना पहायला गडबडीने वरती गेले तर घरट्यात दोनच पिल्लं ! बापरे पडलं की काय एक पिल्लू असं वाटलं . खाली जाऊन खिडकीखाली पाहिलं पण तिथेही पिल्लू दिसलं नाही . नेलं का काय दुसरीकडे ? पण कसं नेलं असेल . माझी अस्वस्थता वाढली विचार करतच मी बँकेत आले तर मुलांनी अर्ध्या तासातच मला मेसेज केला की घरटं रिकामं आहे पिल्लं नाहीत . मुलं पण पिल्लं पडली असावीत म्हणून खाली बोळात पळत गेली तर दोन पिलांना ते दोघे उडायला शिकवत होते व ती पील्लं मस्त उडत होती . बोळात मात्र कोणालाच येऊ देत नव्हती प्रचंड कलकलाट करत तोंडाजवळून जात होती . आता मात्र घरट्यात येतील का नाही याची शंका होती . मग मुले पण त्यांना विचलीत करायला नको म्हणत घरात आली . एकदोन तासात बोळातला आवाज बंद झाला पाहिलं तर सर्वजण उडून गेले होते . दुपारी दोनतीनवेळा बुलबुल मात्र घरट्यात येऊन सफरचंद घेऊन गेली . घरट्यात तळाशी एक अंड तसंच राहिलं होतं . त्यासाठी येत होती का काय माहित नाही . आता मात्र एकएक गोष्टीचा उलगडा होत गेला नक्कीच यांनी कुठेतरी पिलांसाठी घरटं बनवलं असणार . जसं मांजर पिलांची जागा बदलते तसं पक्षी पण बदलत असणार . निसर्गाची किमयाच न्यारी आहे त्याचा ठाव घेण इतकं सोपं नाही. सगळ्यांना खूपच सुनसुनं वाटत होतं . संध्याकाळी मी गच्चीत जाऊन बसले तर ते दोघेही आंब्याच्या झाडावर दिसत होते मधूनच लांबच्या बदामाच्या झाडावर जात होते आवाज ओळखायला येत होता . नक्कीच त्यांच पिलांसाठीच नवं घरटं बदामाच्या झाडावर असणार . कारण अजून त्यांना निवा-याची गरज आहे असे मला वाटते आहे . आकाशात भरारी घेण्याइतपत पंखात बळ आलं की पील्लं ते घरटं सोडून आपोआपच जातील हे नक्की !
आज मात्र पील्लं घरट्यात नाहीत म्हणून थोडीशी हूरहूर , थोडीशी चुटपूट लागली पण त्यांनी भरारी घेण्यासाठी पहिला धडा गिरवला याचा पण आनंद आहे . मुख्य म्हणजे जवळून पहाण्याचा आनंद आम्हाला मिळाला त्याचे अनेक फोटौ व video संग्रह करता आला हेही नसे थोडके
!!!
क्रमशः भाग 29
परवाच आठ दिवसांसाठी आशिष-किर्ती पुण्याला जाऊन घरातील थोडी स्वच्छता करुन आले . एकूणच पुण्यातील वातावरणात व बार्शीच्या वातावरणातील बदल त्या दोघांनाही प्रकर्षाने जाणवला . पुण्याच्या मानाने बार्शी जरा जास्तच सुरक्षित वाटलं . तसेच मोठ जीघर , मोकळं आंगण , मुख्य म्हणजे घरात असल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॕनेज होऊ शकतात याची पुनश्च प्रचिती आली !
इकडे आम्हांला पण अगदीच सुनंसुनं वाटत होतं . हे दोघे आल्यावर पुन्हा घर भरल्यासारखे वाटले . साधारणपणे तीन आठवडे वेड लावून बुलबुलने तिच्या पीलांसह मागच्या आठवड्यात पलायन केले होते . तेही पचनी पडायला जरा जडच गेलं .
पक्षांच्या निरिक्षणाचा जरा नादच लागल्यासारखं झालं होतं मला . दोनतीन दिवस तर बँकेतून घरी गेल्यावर मी त्या खिडकीजवळ जाऊन बसायची सफरचंदाची फोड ठेऊन आता येईल बुलबुल म्हणत उगाच वाट पहात ....... पण पुन्हा काही ते फिरकले नाही....... पहिल्या दिवशी तर मी गच्चीत जाऊन बसले . झाडावर बुलबुलची जोडी दिसली . उगाचच मला वाटलं हीच ती असावी .......
थोड्या वेळानं छोटी पीलं उडतांना दिसली . आपल्यात होती तीच असतील का ? येईल का पिलांना घेऊन खिडकीत ती ? अशी मनाची घालमेल झाली .
पण पुन्हा मनाची खात्री पटली आकाशात स्वच्छंदी विहार करणारे जीव आहेत हे ! असे थोडीच घरात रमतील ते ? यांनी असंच बागडावं आणि आपण फक्त आनंद लुटावा . पण उगाचच अस्वस्थता , चुटपूट मात्र लागत होती .
दुसरे दिवशी सकाळी अगदी उजाडत असतांनाच बाहेर कट्ट्यावर जाऊन बसले . पक्षांचा इतका किलबीलाट , चिवचिवाट ऐकायला येत होता . हे निसर्गाचे खरं रुप अनुभवायला खूप मस्त वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होत .
सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही या घरात रहायला आलो त्यावेळी या परिसरात पक्षांचा खूपच वावर होता . पोपट तर थव्यांने येत असत . झाडांवर निरनिराळ्या रंगाचे पक्षी दिसायचे . एकदा चिमणीनं घरटं केलं होतं . तेव्हाही असाच नाद लागला होता . पण हळूहळू माणसांची वर्दळ वाढत गेली . पाऊसमान कमी होत गेलं . वाहनं वाढली प्रदूषण वाढलं आणि नकळत पक्षांचा वावर कमी होत गेला . तुरळक प्रमाणात पक्षी दिसायचे .
यावर्षी कोरोनामुळे माणसाचे जगणं मुश्कील झालं आहे पण निसर्ग खुलला आहे . पक्षी , प्राणी यांना जणू पर्वणी लाभल्यासारखं झालं आहे . त्यांचा मुक्त वावर , मुक्त संचार अनेक ठिकाणी दिसून येतोय . पाऊस तर जूनला जो सुरु झालाय तो अजून थांबलेला नाही . प्रत्येक नक्षत्राचा व्यवस्थित पाऊस आहे . ओढेनाले भरुन वहाणं , रस्ते बंद होणं हे प्रकार आलीकडे बंद झाले होते , ऐकीवात येत नव्हते . पण सध्या चित्र बदललंय पावसाचं वातावरण अगदी चाळीस वर्षापूर्वी प्रमाणे झाल्यासारखे वाटत आहे .
परवाच जवळजवळ चाळीस वर्षांनी घेरडीत प्रचंड पाऊस झाला . मारुतीच्या पायरीला पाणी लागलं . शेताचे बांध तुडूंब भरले होते . गावाचा संपर्क तुटला होता त्या पावसाचे राखीने केलेलं वर्णन , फोटो , व्हीडीओ पाहून मला आमच्या लहानपणीची आठवण झाली . त्याहीवेळी मारुतीच्या पायरीला पाणी लागले होते . त्या काळात ब-याचदा असा पाऊस होत असे मग सगळीकडे पाणी पाणी व्हायचं . आमचं धाब्याचं घर असल्यामुळे माडीवर एकदोन महिन्यात गवत वाढायच . मग गवत काढणं झालं नाही की मुळं पाणी धरायची मग घर गळायला लागायचं . वाड्यातल्या मधल्या अंगणात पाणी साठायचं थोडासा पाऊस आला की वहायला लागायचं मग आम्ही त्यात कागदी होड्या सोडायचो त्या एकमेकांना धडकल्या की कल्ला करायचो . खूप पाऊस झाला की पा-याचं तळं भरायचं मग तळ्याची सांड सोडली जायची ते पाणी ओढ्यात यायचं मग ओढ्याचा पूर जरी ओसरला तरी पुढे बरेच दिवस पाणी वहातं रहायचं . उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी , विद्या अशा वाड्यातल्या सगळ्यांबरोबर ओढ्याला धुणं घेऊन जायला मजा वाटायची . ओढ्याच्या काठावर खरबरीत दगड मांडलेले असायचे दगड पकडायचा आणि धुणं धुवायचं . लांब कपडे किंवा साडी धुवायची आणि एका बाजूला पकडून वहात्या पाण्यात सोडून ती चुन्या करताना ओढायची हे तर धुण्याचं काम न वाटता तो खेळ वाटायचा .
पा-याच तळं हा एक आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता . दरवर्षी शाळेची सहल गाजून गाजून एकतर बनाळीला जायची नाहीतर तळ्यावर जायची . 1972 च्या दुष्काळात बांधलेले हे तळं आहे . पारे गावापासून जवळच आलीकडे हे तळं आहे . घेरडीपासून पाच किलोमीटरवर असेल . आम्ही मुली रोज जाणाऱ्या बसने जायचो एखादे सर बरोबर असायचे मुलं सायकलवर यायची . सगळ्यांनी तळ्यावर एकत्र भेटायचं ! अशीच एकदा जतहून येणारी बस खूपवेळ आली नाही नंतर ती पंक्चर झाल्याचे समजले तर वाट न पहाता सरळ चालत परत यायचं सरांनी ठरवलं त्याप्रमाणे आम्ही चालत आलो मात्र पाय खूप दुखले .
साधारणपणे दिवाळी झाली की सहल ठरायची आपापला जेवणाचा डबा व पाणी घेऊन जायच . तळ्याच्या काठावर उंच टेकडीवर टुमदार कौलारु गेस्ट हाऊस आहे . गेल्याबरोबर आख्खा परिसर फिरुन यायचं . खूप पाणी असेल तर सांडवा सोडलेला असायचा त्याचं पाणी घेरडीच्या ओढ्यात मिळायचे . तळ्यात छोट्या छोट्या मासळ्या असायच्या . पक्षांचे थवे पाण्यावर उतरतांना पहायला मजा यायची . हे करत असतांना भरपूर दंगामस्ती व्हायची मग थकून भागून गोलाकार बसायचं . जेवणं व्हायची मग थोडावेळ बसूनच गाणी-भेंड्या मग खेळ व्हायचे मग सगळ्यांना ओळीनं बसवून प्रत्येकवेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही भाग वाईकर सर अगदी जोशात कथाकथन स्वरुपात सादर करत असत . ते ऐकताना अगदी स्फुरण आल्यासारखे होई . मग संध्याकाळी परत घरी यायचं . कधीकधी वाड्यातील व भजनी मंडळातील सगळ्या बायका जायच्या . त्यांच्याबरोबर आम्हांला जायला मिळत असे . यावेळी आई सगळ्यांना पुरेल एवढा मोठा डबा भरुन तिचा स्पेशल रावणभात घ्यायची . सगळे अगदी खूश असायचे .
पुर्वी अगदी आषाढ महिन्यातच धुव्वादार पावासाला सुरुवात होत असे त्यामुळे सगळीकडे हिरवळ असायची . दिंडी हाही घेरडीत एक आनंददायी सोहळा असे . आषाढी एकादशीसाठी कर्नाटकमधून पंढरपूरला निघालेल्या दिंडीचा घेरडीत एक मुक्काम असे . दिंडी आली की पहिल्यांदा ती आमच्या वाड्याच्या बाहेरच्या चौकात यायची . दिंडीचे मानकरी डोंगरे होते त्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा वाडा होता . दोन दिवस आधीच वाड्याची आसपासची स्वच्छता होई . डोंगरे वाड्यात आडाजवळ एक मोठा दगडी हौद होता तो धुऊन भरण्यासाठी एक गडी दिवसभर असायचा . वारक-यांची मुक्कामाची सोय शाळेत केली जायची त्यामुळे त्यादिवशी सकाळीच शाळा भरायची व आकरा वाजता सुटायची दुपारी दोन वाजल्यापासूनच दिंडीतले काही लोक स्वयंपाकासाठी पुढे आलेले असायचे . मग आसपासच्या घरातून तवा-परात , पोळपाट लाटणं घेऊन जायचे ते कन्नड बोलत असत मग खूणेनेच हवी ती भांडी मागायचे आम्ही मुद्दाम काहीतरी बोलायचो तर ते पण कन्नडमध्ये बोलायचे . दोघांनापण एकमेकांच्या भाषा समजायच्या नाहीत मग ते हसत हसत निघून जायचे . भात-पिठलं भाकरी ते दगडाच्या चुली मांडून करत आणि गावाक-यांकडून त्यांच्यासाठी लाप्शी केली जायची . त्यासाठी मोठा चर खांदला जाई बैलगाडीतून मोठाली लाकड आणून त्यात टाकली जायची व जवळजवळ दहा फुटाचा घेर असलेली तीन फुट उंचीची काईल त्या चरावर चढविली जाई व त्याच्यावर आधण ठेवलं जायचं . भरडलेले गहू पोत्यात असायचे व गुळाच्या ढेपा असायच्या . काईल चढवतांना , आधणात पोत्यांनी भरड ओततांना मोठ्यांदा विठूनामाचा जयजयकार व्हायचा तो लांबपर्यंत ऐकायला यायचा . हे पाच वाजेपर्यंत झालेलं असे तोवर पायी दींडी आलेली असायची . स्वागतासाठी गावातलं भजनी मंडळ तयार आसायचं . चार वाजल्यापासून आम्हा मुलांचे दिंडीच्या आवाजाचा वेध घेत दिंडी कुठंपर्यंत आली हे पहायला हेलपाटे असायचे . समोरच्या बोळात दिंडी दिसली की आनंदीआनंद होई . ताईआत्त्याच्या कट्ट्यावर आम्ही वाड्यातले सगळे तर गावातले लोक बोळातल्या घरांवर , कट्ट्यावर जशी जागा मिळेल तसे दाटीवाटीने उभे रहायचो . दुतर्फा रांगेत मोठ्या दिमाखात दिंडीचं आगमन व्हायचं सुरवातीला त्यांचे स्वयंसेवक त्यांच्यामागे डोक्यावर तुळशीवृंदावन , तुळशीचा हार घातलेल्या मुर्ती घेऊन काही बायका मग विविध वाद्य वाजवत भजन करत येणारं मंडळ आणि मागे वारकरी आसायचे . चौकात मोठा गोल करुन हे मंडळ आणि मुख्य वारकरी उभे रहायचे आणि स्थानीक मंडळ आणि दींडीचं मंडळ गोलाकार उभे रहायचे टाळाच्या ठेक्यावर नाचत आतबाहेर पावलं टाकत तल्लीन होऊन भजन चाले . असा तो नेत्रदिपक सोहळा पार पडत असे . मग आर्ध्या तासांनी आसपासच्या घरांमधून कळशा भरुन चहा यायचा . त्याचं सगळ्या वारक-यांना वाटप व्हायचं . थोडावेळ इकडेतिकडे झालं की पंगत बसायची तयारी सुरु व्हायची इकडे लाप्शीचा घमघमाट सुटलेला असायचा . कधीकधी प्रसाद म्हणून त्याची चव पण घेतली आहे . आम्ही उगाचच इकडूनतिकडे जणू काही घरचं कार्यच आहे अशा थाटात फिरायचो . पुर्ण बोळात काठ्या पुरुन लाईटची व्यवस्था केली जायची . दुतर्फा पंगत बसायची . दोनतीन पंगतीत त्यांची जेवणं व्हायची . जेवलेले लोक झोपायला पटकन निघून जायचे . रात्री सगळं संपायला दहा आकरा व्हायचे . नेलेली भांडी ते लोक रात्रीच परत आणून द्यायचे . अशात पाऊस आला की फजिती व्हायची . सगळ्यांची झोपायची सोय शाळेत केली जायची कधी कधी जागा पुरली नाही तर कोणाच्याही ओसरीवर त्याच्यातले मुख्य वारकरी येऊन झोपायचे . पहाटे तर दिंडी गेलेली असायची . असा तो दिंडी सोहळा पार पडायचा .
क्रमशः भाग 30
चैत्री पाडव्यापासून अगदी श्रावण महिन्यापर्यंत असे वाटायचे की आशिषचे नविन लग्न झालंय कोरोनामुळे बरेचसे सण मिळाले आणि आता तोंडावर आलेले पण बरेचसे सण आहेत . कंपनीने बोलावलं तर जावं तर लागणारच पण पुन्हा सणासाठी येता येईल का ? रजा मिळेल का ? असे प्रश्न पडायचे . पण बघत बघत गौरी-गणपती झाले , नवरात्र-दसरा झाला आणि आता दिवाळी आली . यामध्ये सगळ्या सणांबरोबर नृसिंहाचं व देवीचं नवरात्र कुलधर्म कुलाचार पण पाहण्यात आला ह्याचं समाधान वाटलं . गेल्या आठ महिन्यांपासून सगळे एकत्र रहातोय . पाहुणे मंडळी बोलावता आली नाही पण घरच्याघरी का असेना सगळे सण अगदी यथासांग पार पडले . साग्रसंगित स्वयंपाक आणि छानपैकी आवरणे हे दोन अगदी अलिखीत नियम झाले होते . माझं बँकेत जाणे आणि काही कामिनिमीत्त यांच बाहेर जाण याव्यतिरीक्त सुरुवातीला सहा महिने कोणी घराबाहेर पडलेच नाही . अगदी सुरुवातीला कलिंगडाच्यावेळी शेतात जायचं असे आमचे ठरले होते पण तेव्हा तर लाॕकडाऊनचे एकदम कडक नियम लागू झाले . आणि मार्चपासून अनेकदा शेतात जायचा आम्ही प्लॕन करायचो आणि काही न काही कारणांमुळे जाणं कॕन्सलच व्हायचं . एकवेळेस तर पहाटे उठलो पण पावसाचा इतका जोर होता की परत कॕन्सल करावं लागले . परवाच्या रविवारी मात्र खूप दिवसांपासून ठरवत असलेला प्लॕन यशस्वी ठरला . आकांक्षाचं शेड्यूल बीझी असल्याने ती आली नाही मग आम्ही चौघेजण निघालो . बरोबर आल्याचा चहा घेऊन सकाळी सव्वासहाला आम्ही घरातून बाहेर पडलो कारण आशिषला गावाबाहेर छान हिरवळ असेल तिथे सुर्योदयाच्यावेळी थांबायचे होते . कॕमेरा घेऊन तो सज्जच होता . मग आम्हीपण पाऊण तास ती सकाळ उगवता सुर्य न्याहाळत अगदी रोडवर घालवली . थंडी होतीच त्यामुळे गरमागरम चहा प्यायला मजा आली . निसर्गाच्या सानिध्यात आमचे पण फोटो आले ! रमत गमत आम्ही साडेसातला शेतात पोहोचलो . वाटेकऱ्याची बायको सुनिता तिची चूल पेटलेली होती तिने लगेच चहा केला . सकाळी जरी हवेत गारठा वाटत असला तरी दहाच्यापुढे ऊन चांगलंच तावत होतं त्यामुळे आम्ही शेतात लवकर फिरायचं ठरवूनच निघालो होतो . यावर्षी पाऊस खूपच झाला होता त्यामुळे तूर खूपच जोमाने वाढलीय आणि पिवळ्या धमक फुलांनी बाहरलीय हे यांच्याकडून ऐकून होतो . सुनिता म्हणाली थंडीत सकाळच्या वेळी तूरीत दव फार असतं , तुम्ही जरा तासाभरांनी जावा . तसं आशिष पटकन ऊठला आणि म्हणाला
" तीच तर मजा अनुभवायची आहे , निघुया आपण चला "
मग आम्ही सगळेच निघालो आणि पहिल्यांदा तूरीच्या शेतात जायचं ठरवलं .
आमच्या शेतातून चाळीस वर्षापुर्वी कॕनाॕल गेला आहे त्याला फार पुर्वी चांदणी तलावाचं पाणी सोडत असायचे म्हणे पण मी पहाते तसं या तीस वर्षात कधी पाणी नव्हतं हा भाग वेगळा ! पण कॕनाॕल आहे व पलीकडे जाण्यासाठी त्यातूनच पायवाट आहे पावसाळ्यात तिथे गवत वाढतं मग पलिकडे जाता यावं म्हणून कॕनाॕलवर साधारण एक फूट रुंदीचा व वीस फूट लांबीचा सिमेंटचा पोल आहे . आता आम्हांला पोलवरुनच पलिकडे जावे लागणार होते आणि आपल्यासाठी ती कसरत असते . कीर्तीसाठी तर हे नविन होतं सातआठ फूट खोल असलेल्या कॕनाॕलच्या पोलवरुन आम्ही पलिकडे गेलो . मी पण बऱ्याच दिवसांनी पोलवरुन गेले पण मजा आली . बांधावरुन उतरलो की तूरीचं शेत होतं . एवढी उंच तूर मी पण पहिल्यांदाच पाहिली . मधेमधे देशी भेंड्यांची व देशी गवारची झाडं लकडलेली होती . आकांक्षाला भेंडीबियांची आमटी फार आवडते मग भेंड्या व गवार तोडत हे पुढे त्यांच्या पाठोपाठ आम्ही असे पुढेपुढे निघालो . धुक्याच दव , गारठा आणि तूरीची पिवळी फूलं जणू काही हील स्टेशनच्या बागेत फिरतोय असा भास झाला . तेवढाच एक विकेंड एन्जाॕय करायला मिळाला असं मुलांना वाटलं . तसं तर घरी रहायला मिळत असलं तरी खरं तर वर्क फ्राॕम होममुळे मुलं अगदी वैतागून गेली आहेत फिल्ड वर्कची सवय असल्यामुळे आशिषपेक्षा कीर्तीला फोनवर मॕनेज करणं तसं त्रासदायक होतंय . मग मोकळ्या वातावरणात शेतात फिरायला जोडी आगदी खुशीत होती . चला तेवढाच बदल म्हणत यांच्या मागोमाग आम्ही शेतात फिरु लागालो .
यांनी सुरुवातीला अगदी काॕलेजला असतांना दोन वर्षे शेती पाहिली होती पुन्हा बँकेत नोकरी लागल्यावर जालन्याला जावं लागलं पुढे बदली झाल्यावर लग्न झालं मग दोघांची नोकरी लहान मुलं त्यामुळे मात्र लक्ष देता आलं नाही . तेव्हापासून सुनिल भाऊजी लक्ष देऊ लागले मग यांनी पण दुर्लक्ष केलं . पण भाऊजी गेल्यावर सगळंच पहायचं यांच्याकडे आलं . हळुहळु बघत रिटायर झाल्यावर यांनी शेतीत चांगलंच लक्ष द्यायला , सुधारणा करायला सुरुवात केली . प्रामुख्याने पाणी प्रश्न सतावतो आहे हे लक्षात आल्यावर तीन चार बोअर घेतले . तरीही पाण्यावाचून काम आडतच होते मग एक मोठा निर्णय घेतला आमच्या शेतात एकच सामायीक विहीर होती त्याचं पाणी पुरत नव्हते म्हणून स्वतंत्र विहिर घ्यायचं ठरवलं . आणि दोन वर्षांपुर्वी विहीरीचं खोदकाम झालं , पाणी लागलं व गेल्या वर्षी विहीरीचं बांधकाम झालं . हे सगळं करतांना कारण नसताना भरपूर त्रास झाला पण हल्ली त्यांची शेतीची ओढ मात्र खूप वाढली व त्यांच्या नादाने म्हणा किंवा घरात होणाऱ्या चर्चेमुळे म्हणा आम्ही सगळेच शेती या विषयावर रमू लागलो . काका-काकींना हे सगळं ऐकायला मिळत वयोमानामुळे शेतात जाता येत नाही पण काका मात्र कौतुकाने म्हणत आसतात
" आमचं गाव म्हणजे आसू ! त्याला सावळारामाचं आसू म्हणून ओळखले जातं . शेतातली आत्ता जी सामायीक विहीर आहे ती सावळारामांनी घेतलेली त्यांच्या काळातील ती जुनी विहीर आहे त्यानंतर पाच सहा पिढ्या गेल्या पण कोणीही विहिर घेण्याचं धाडस केलं नाही पण सावळारामांनंतर ते काम आनिलनं केलंय पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे ".
आणि खरंचच तसे झाले आहे कारण विहिर घेणं त्याचं बांधकाम करणं हे काम आजच्या काळात एवढं सोपं नाही . या दोन वर्षात त्यानुषंगाने लेव्हल करणे , बांध भरुन घेणे अशी पुढची कामं निघत गेली व ते करत राहिले . ऊस , कलिंगडे , मिरच्या , टोमॅटो अशी पीकं घेत राहिले व जास्त जास्त शेतात गुंतत गेले . पण यावर्षी आधी कोरोना मग जास्तीचा पाऊस त्यामुळे ताली फुटणे , मोठाल्या भगळी , खूप मोठं गवत ही कामं वाढली गेली . आता पुन्हा सगळी डागडूजी करणं आलं .
शेतात कुठे काय केलं होतं व आता पावसामुळे काय झालं हे दाखवत ते पुढे व आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो कीर्ती पहिल्यांदा शेतात आली होती मग तिला , आशिषला सगळी माहिती सांगत ते चालत होते . मग आम्ही नव्या विहीरीकडे गेलो . सध्या विहीरीला चांगलं पाणी आहे उपसाच नाही . हल्ली आशिष पण बरेचवेळा शेतात आला आहे सगळीकडचे फोटो घेत त्याचं पण निरिक्षण चाललं होतं . आडीच तीन तास फिरुन आम्ही जुन्या विहीरीवर आलो तर यावर्षी या विहीरीला पण भरपूर पाणी आहे पण गाळपण तितकाच आहे . पण या विहीरीचं बांधकाम चिरेबंदी आहे नविन विहीरीच बांधकाम रींग टाकून स्लॕब टाकलेलं आहे हाच तो फरक आहे दोन्ही विहीरीत . आता आम्ही वस्तीकडे निघालो . आता मात्र ऊन्हाचा चटका वाढला होता आणि पोटात पण कावळे ओरडत होते .
तोवर इकडे सुनिताने कारल्याची भाजी , पिठलं , तव्यावर ठेचून खरडा करुन ठेवलं होतं व चुलीवर भाकरी चालू होत्या ते पाहूनच तोंडाला पाणी सुटलं . कीर्ती पहिल्यांदा आली म्हणून सुनिताने तळण पण तळले होते . खमखमीत जेवण असणार हे माहित होते त्यामुळे मी बरोबर ताकाची बाटली घेतलीच होती . चार घास जास्तच खाऊन फक्कड जेवण करुन दुपारच्या विश्रांतीसाठी आम्ही घरी पोहोचलो !!
आता वेध दिवाळीचे आहेत . घराची साफसफाई ब-यापैकी झाली आहे . यांनी कालच भरगच्च किराणा आणून ठेवला आहे . आकाशकंदील , पणत्या , लाईटच्या माळा ही कामं आजउद्या होतील तर माझी पण कोरडी तयारी तर झाली आहे . आज रविवार मग करंजीचं सारण , अनारसा पीठ तयार झालं आहे , भाजणी दळून आणलीय . कायकाय करताय करत कीर्तीचं निरीक्षण चालू आहे . येत्या शनिवारी लक्ष्मीपूजन आहे मग तू काय घालणार मी काय घालणार करत आकांक्षा-कीर्तीची कालपासूनच लगबग सुरु आहे ज्वेलरी , कपडे , पार्लर अशी त्यांची धावपळ सुरु आहे कारण मुख्य आकर्षण फोटोचं आहे . तयारी करुन ठेवली म्हणजे बरं पुन्हा उद्यापासून आपापले उद्योग सुरु होतात .
No comments:
Post a Comment