2015
संघटनेच्या प्रेरणेमुळे कार्यकर्त्यांसोबत सामाजीक सहलीचा अनुभव घेता आला . त्याचं शब्दांकन करण्याचा हा प्रयत्न
दिनांक 19/8/2015
हेमलकसा – लोकबिरादरी प्रकल्प सहल
युनियनने राबविलेला एक अविस्मरणीय उपक्रम
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाईज युनियन औरंगाबाद युनिटने आनंदवन – हेमलकसा या ठिकाणी कार्यकर्ते व सभासदांसाठी एक सोशल टुर आयोजित करावी असा विषय झाला आणि कॉ. देविदास तुळजापूरकर व कॉ धनंजय कुलकर्णी यांच्या प्रेरणेने 15/08/2015 ते 18/08/2015 अशी ही अविस्मरणीय सहल नवे जुने मिळून पस्तीस जणांना प्रत्यक्षात अनुभवता आली .
सर्वप्रथम सकाळी सात वाजता लातूरहून गाडी निघाली 15 ऑगस्ट असल्यामुळे झेंडावंदन व्हायलाच हवे अस सर्वांनाच वाटत होत त्याप्रमाणे रस्त्यावरील एका खेड्यातील शाळेत 8 वाजता झेंडावंदन होणार होतं तेथे गाडी थांबली व सर्वजण शाळेत गेलो . त्या शाळेत महिलाराज होतं . अतिशय ऊत्साहात व सुबकपणे सर्व कार्यक्रमाची आखणी झालेली दिसत होती . तिसरी व चौथीच्या मुलांच्या रांगा उभ्या होत्या . त्याच्याशेजारी आमची रांग उभी राहिली . शाळेच्या आठवणीत रमत झेंडावंदन झाले . अशी दिवसाची छानशी सुरूवात करुन आम्ही पुढील प्रवासाला रवाना झालो . गप्पा , गाणी , भेंड्या आणि रस्त्यात थांबून वनभोजन याचा स्वाद घेत आम्ही रात्री साडेदहाला आनंदवनला पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने आमचा टूर सुरू झाला होता .
बाबा आमटे , साधनाताई व त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन सामील झालेले शेकडो कार्यकर्ते या सर्वांच्या प्रयत्नाने माळरानावर फुललेल्या आनंदवनात आम्ही दाखल झालो होतो . तेथे पोहोचल्यापासूनच तिथली शिस्त , व्यवस्था , निटनेटकेपणा , स्वावलंबन निदर्शनास येत होते . बँकेकडून एलएफसी घेऊन रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यात , लक्झरीने , विमानाने प्रवास करून अनेक सहली व निसर्गसौंदर्याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असला तरी माणूसकीच वेगळच विश्व पहायला , अनुभवायला मिळणार होतं . हे काही एकदोन माणसांच किंवा दोनचार वर्षात साध्य झालेल कार्य नव्हते . यासाठी आमटे कुटुंबाची तिसरी पीढी सध्या काम करताना अन चौथी तयार होताना दिसतेय .
समाजाने अन कुटुंबाने नाकारलेल्या उपेक्षीतांना त्यांचा आत्मविश्वास मिळवून देत सन्मानाने जगण्याची ताकद , शक्ती देण्याच काम बाबांनी सुरू केल्यापासून अव्याहतपणे चालू आहे . आज ती धुरा डॉ विकास व डॉ भारती आमटे सांभाळत आहेत . कुष्ठरोगीश , क्षयरोगी , अंध , मुकबधीर , अपंग अशी अनेकप्रकारे समाजात उपेक्षीत राहिलेले लोकं येथे दाखल होतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते , जगण्याच भान मिळतं . आणि हे जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो तेव्हा असं वाटलं की परमेश्वरांने आपल्याला किती भरभरुन दिल आहे . तरी आपल्याला काय काय होतं . किती दु:ख , कष्ट होतात नैराश्य येतं याची लाज वाटू लागते अत्यंत चाकोरीध्द सुरक्षीत कवचात आपल्याला जगण्याची सवय झाली आहे ते थोडही तोडायची आपली तयारी नसते . शकुंतला बारंगे या हसतमुख महिलेला पाहिल तर निशब्द व्हायला होतं जगात यापेक्षा काही अवघड असू शकत नाही . ज्यांच्यापुढे अडचणींचे डोंगर असतील त्यांनी या शकुंतलेची आवश्य भेट घ्यावी.
आनंदवनमधे जे लोक दाखल होतात त्यांना प्रथम औषधोपचार केले जातात ( पुर्वी बाबांनी या लोकांना गोळा केले होते ) व नंतर त्यांच पुनर्वसन केले जाते . ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम दिले जाते . त्यातूनच अर्थार्जन होते . व सुंदर कलाकृती उदयास आलेल्या दिसतात . ग्रीटींग्ज , शोभेच्या वस्तु , काष्ठशिल्प , सुतकताई , सतरंजी पट्ट्या , खुर्च्या , शेती , असे एक ना दोन 26 कुटीरोद्योग व अनेक व्यवसाय चालतात . आमटे कुटूंब जणू देवाचं आर्ध राहिलेल काम करत आहेत . माणसांना पुर्णत्व दिलं जातंय . हे सर्व पाहिल्यावर आम्ही हेमलकशाला रवाना होणार होतो . आजचा एक मुक्काम इथे होणं गरजेच होतं पण वेळेअभावी ते शक्य होणार नव्हते . म्हणून माणुसकीची भली मोठी शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना झालो .
आयुष्यात आतापर्यंत केलेले प्रवास आणि आनंदवन ते हेमलकसा हा प्रवास यात खुप फरक आहे . पूर आलेल्या नद्या ओढे पार करत जंगलातून रस्ता होता नक्षलवाद्ंयाचे राज्य असलेला तो भाग आहे . पावसाळ्याचे दिवस आणि दोनच दिवसांपुर्वी पाऊस पडल्यामुळे पुलांवरून भरभरुन वाहणाऱ्या नद्या त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तर पुरात अडकण्याची भीती ! पण कॉ धनंजय कुलकर्णी यांचा धाडसी निर्णय आणि सर्वांची इच्छाशक्ती यामुळे यातून तरुन निघालो. आनंदवनहून निघताना निरोप आला की सातच्या आत हेमलकशाला पोहोचणार असाल तर या नसल्यास येऊ नका ! यावरुनच तिथल्या शिस्तीचा आंदाज येत होता. आम्ही पुलावरच पाणी पार करत सव्वासहाला हेमलकशात दाखल झालो (गाडीत बसुन) . इथे कसे आहे याची सर्वांनाच उत्सुकता होती . घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिथलं नियोजन होतं . संध्याकाळी सात वाजता जेवणाची घंटा व जेवणे झाली . इथे विद्यार्थी , कार्यकर्ते , प्रवासी अन ते या सर्वांच अन्न एकाच ठिकाणी केले जातं . पावणेआठला डॉक्युमेंटरी पहायला मिळाली एकूण प्रकल्पाची माहिती देण्याचा तो प्रयत्न आहे . व दुसऱ्या दिवसाचं नियोजनही याच ठिकाणी सांगितल गेलं . सकाळी सातला नाष्टा व त्यानंतर आमटे दापंत्याची भेट ठरली !
आमच्याबरोबर निम्म्याला निम्मे युवा कार्यकर्ते होते उत्सुकतेपोटी सर्वजण सकाळी सहा वाजताच आवरुन तयार झाल्याचे दिसत होते . पहिल्यांदा आम्हांला आमटे दांपत्य फिरायला बाहेर पडताना दिसले . त्यांची चाल पाहुनच त्यांचा देह किती कष्ट सोसून तयार झाला आहे हे जाणवत होते . सहज फेरफटका मारला तर उंच कुत्रे दिसले म्हणुन त्याच्याकडे हात केला तर ते अंगावर दोन पाय ठेऊन उभे राहिले तुम्ही प्रेमाने कुरवाळले पाहिजे ही त्याची हक्काची मागणी होती . संपुर्ण परिसरात तीन वर्ष वयापासून ते बारावी पर्यंतची मुले सकाळचं सगळं आवरुन बागडतांना दिसत होती . त्यांच रुटीन ठरलेल होतं . त्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम चाले . तिथे विश्वासाने आईवडिलांनी आपल्या मुलांना सोडलेले दिसत होते . सब घोडे बारा टक्के याप्रमाणे वागणूक होती मुले इथे मुक्तपणे बागडतांना दिसत होती . त्यानंतर आम्हाला विलास मनोहरांची ओझरती भेट झाली . आणि रेणूका मनोहर हे अत्यंत प्रसन्न व्यक्तीमत्व आम्हाला भेटल . त्यांच्याशी खुप मनमोकळ्या गप्पा झाल्या .
रेणूका म्हणजे डॉ. प्रकाश यांची बहीण त्या इतक्या भरभरुन बोलत होत्या . चाळीस वर्षापुर्वीचे अनुभव आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळाले . त्या अगदी सहजपणे आणि वारंवार सांगत होत्या की आल्या थोड्याशा अडचणी पण काही नाही एकदम छान होत गेलं सगळं . त्या जी अडचण एकदम छोटी म्हणुन सांगत होत्या तो अनुभव मला तरी मोठ्या डोंगराएवढी अडचण आहे असे वाटत होते . पण त्यांनी ते सहजतेने स्वीकारलेले व्रत होते आश्रमशाळेतील मुलांकडे लक्ष कसले त्यांना घडवण्याचा वसा त्यांनी घेतला आहे . लहान मुलांची नखे कापणे , केस कापणे त्यांना स्वच्छता कशी ठेवली पाहिजे हे रोज सांगत त्यांच्याकडून करुन घेणे , बारीक बारीक गोष्टी सातत्याने संस्कारातून शिस्त लावत शिकवत राहणे याचा त्यांनी वसा घेतला आहे . त्या अनंत मुलांची माता आहेत .
आम्ही सर्वजण डॉ. दांपत्याची वाट पाहत होतो . प्रथम त्यांनी सगळ्यांची ओळख करुन घेतली महाबँकेचे इतके लोक विविध ठिकाणाहून कसे काय आले याविषयी पण त्यांना उत्सुकता वाटली . कॉ. धनंजय यांनी संघटनेची भुमीका स्पष्ट केली बऱ्याच जणांनी आपले प्रश्न विचारले . आदिवासींना आपलसं करताना मीठ , रॉकेल या दैनंदीन आवश्यक गोष्टींची उपलब्धी कशी करून दिली त्या मिळवतांना त्यांच्या भावना कशा होत्या हेही सांगितले . आदिवासी लोक किती सोशिक आहेत . तसेच त्यांच्याकडे मुलगा-मुलगी हा फरक केला जात नाही . आपण शिक्षणामुळे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा तो आपल्याकडे होत असलेला गैरवापर आहे असे त्यांचे मत आहे. एक तास गप्पांमधे कसा गेला समजले पण नाही . यानंतर डॉ. चा जगावेगळा राऊंड पहायला मिळाला कारण आतापर्यंत मी नातेवाईक अजारी असताना फक्त टेंन्शनमधील राऊंड पाहिलेला पण हा राऊंड म्हणजे विलक्षण होता . डॉ. चे प्राणीप्रेम अफलातून आहे . वाघ, अस्वल, मगर , साळीदंर , वेगवेगळ्या जातीचे साप , नाग , हरणे , निलगाय आणखी अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी सगळेजण त्यांच्या भेटीची अतुरतेने वाट पहात असतात . जणू त्यांनी प्रेमाने कुरवाळणे हा या सर्वांचा हक्कच आहे हे त्यांच्या कृतीतून जाणवत होते . कशाचीच कुठेच तुलना होऊ शकत नाव्हती .
त्यानंतर आमच्याबरोबर जगनभाऊ आले . हेमलकशाला आल्यापासून आदिवासींचे जिवन कसे होते . उंदीर , मुंग्या , पक्षी , कंदरमुळे हे खाद्य आणि लज्जारक्षणपुरता कपड्यांचा वापर याच्यात परिवर्तन घडवत आज त्यांना माणसात आणण्यासाठी त्यांची मुले शाळेत पाठवा म्हणून मागे लागण्याचे दिवस आज आमची मुले शाळेत घ्या या मन:स्थितीपर्यंत पोहोचायला त्यांच्या टीमला चाळीस वर्षे कशी घालवावी लागली किती कष्ट , प्रयत्न , यातना सोसाव्या लागल्या हे हसतमुखाने सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते . आश्रमशाळा होस्टेल या सर्व गोष्टी ते कौतुकाने दाखवत होते . रेणूताई , मंदाताई , फडणवीस आज्जी , विलास मनोहर , जगनभाऊ , प्रकाशभाऊ या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटता आलं बोलता आलं सगळ्यांच्या बाबतीत एक समान गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळ्यांनी साठी ओलांडली आहे पण प्रचंड कष्ट केल्यामुळे , प्रत्येक गोष्ट होकारार्थी घेत गेल्यामुळे पंचवीशीतील तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि तगडेपणा त्यांच्यात दिसून येतो . नकार , यातना , कष्ट , त्रास , दु:ख हे शब्द त्यांनी जाणिवपुर्वक त्यांच्या जिवनातून काढून टाकले आहेतष . डॉ. प्रकाश आमटेंनी ही गोष्ट आवर्जुन सांगीतली की कोणतीही कुरकुर न करता मंदाताईंची साथ आणि सगळ्या कर्यकर्त्यांची तितकीच साथ यामुळे आज इथपर्यंत येऊन पोहचलो . त्यांनी हेही आवर्जून सांगितले की मंदाताई या वयाने दोन वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणजे हेही प्रवाहाच्या विरुद्ध उचलेले पाऊल होते कारण सामान्यपणे नवऱ्यापेक्षा लहान बायको करण्याचा प्रघात आहे , पण जे स्वीकारलंय ते आनंदाने पार पाडायचे व्रत आहे त्यांचे .
आनंदवनाच्या पुढचं पाऊल म्हणजे बाबांनी सुरु केलेला हा हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्प आहे . तो हसतहसत डॉ प्रकाश आमटेंनी आपल्या शिरावर घेतला . तेवढ्याच आनंदाने त्यांची पुढची पीढी त्यात सामिल झालीय . आणि आता नातवंडं पण प्राण्याच्या प्रेमात पडताना दिसत आहे . आमटे घराण्यांनी हे व्रतच घेतल आहे धुरा अलगदपणे एकाच्या खांद्यावरुन दुसऱ्याच्या खांद्यावर जातेय . सुन डॉ. अनघाची गळ्यात पिशवी घालून प्लॅस्टीक गोळा करण्याची कृती ! काय म्हणयच याला . विशेष म्हणजे याचा कुठेही गाजावाजा नाही , प्रसिद्धी नाही , जाहिरात नाही तुम्ही आपणहून पहायला गेलात तर तुम्हाला महिती मिळते . माणसातला देव पहायला मिळतात . अन्यथा नाही .
आज आपल्या देशात राजकारण-भ्रष्टाचार याच साटलोट दिसत . त्याठिकाणी घराणेशाही दिसते . बिनबोभाटपणे सत्ता आणि संपत्ती वारसा हक्कांने मिळविली जाते . पण अशा सामाजिक उपक्रमांविषयी तितकीशी अस्था दाखविली जात नाही . याचं कोणी अनुकरण करायला धजत नाही . याला काय म्हणावे ? आज हे आम्हाला पहायला मिळालं ते संघटना आणि जनरल सेक्रटरी कॉ धनंजय कुलकर्णी यांची तळमळ ! आता काय करायच हे ठरवण्याची जबाबदारी बाकी चौतिस जणांची उरते.
आज याठिकाणी काम करत असतांना डॉ प्रकाश आमटे चार पिढ्या मागचं जिवन प्रत्यक्षात जगले म्हणजे लाईट , पाणी , रस्ते नाहीत जात्यावर दळणे , चालत जाणे , पडेल ते काम करणे अणि हे करत असतांना आदिवासींनी मात्र दोन पिढ्या पुढचं शिक्षण देणे म्हणजे हे लोक एका पिढीत सहा पिढ्यांची जिवन जगले असं म्हणाव लागेल . त्यांना शतश: प्रणाम !
मला या दोनतीन दिवसांचा विचार केला तर एका गोष्टीच साधर्म्य जाणवल ते म्हणजे समाजातील उपेक्षीतांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अस्वस्थ होउन ध्येयाने पछाडून बाबांनी या उपक्रमाला सुरुवात केली आदिवासींना
" बाबांनो लांब पळू नका हे घ्या हे तुमच्या कल्याणासठी आहे " असे म्हणत लांब लांब पळणारांना अडवुन त्यांच कल्याण करुन देणं यात यांच्या चार पिढ्या गेल्या . आणि 1946 च्या पुर्वीपासुन अपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी अन्यायाची चीड येऊन कष्ट आणि संघर्षमय जिवन जगत बलाढ्य संघटना आपल्यासाठी निर्माण करून ठेवली . एक एक करत आपले सर्व प्रश्न मार्गी लावले , सेवा शर्ती सेट करून दिल्या . सुखकारक जिवन आपल्या वाट्याला आणुन ठेवलंय आणि म्हणूनच की काय संघटनेच्या उपक्रमांकडे पहातांना एक प्रकारचं शैथील्य आले आहे . आदिवासींप्रमाणे लांब लांब पळतो . संघटनेची वर्गणी भरली की आपलं काम संपत नाही . आपण सुज्ञपणे आपल्या पुर्वेतिहासात डोकावायला हव . गाफिल राहिलो तर हल्ला होणार ही खुणगाठ जरी आपण आपल्या मनात बांधली तरी खुप आहे . आपल देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे कारण देशकारण आणि अर्थकारण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत . आपण संघटना जो उपक्रम राबवेल त्यात सक्रीयपणे सहभागी व्हायला पाहिजे . तर आणि तरच आपले भविष्य उज्वल आहे . सध्या जी नेते मंडळी काम करते त्यांना पुढची फळी तयार व्हायला हवी आहे . काही उपक्रम राबवायचे असतील तर ते अंमलात येईपर्यंत त्यांची नको इतकी क्रयशक्ती वाया जाते . सध्या सिनियर्स आहेत तोपर्यंत धावून नवीन पिढींने काम करायला हवं . शिकुन घ्यायला हवं . या टुरला बरीच नवीन मंडळी आली होती . त्यातल्या प्रत्येकाने किमान पाच जणापर्यंत जरी हे सर्व पोहोचवल तर कॉ धनंजय कुलकर्णी यांची या सहलीची धडपड यशस्वी झाली असे मी म्हणेन.
हेमलकशाहून परत निघतानाच हा सगळा अनुभव मी लिहुन ठेवण्याचा निश्चय केला होता कारण भविष्यात कधी जर आपल्याला काही समस्या किंवा नैराश्य आलं आहे असे जाणवलं तर हे वचालं तर नक्की त्यातून बाहेर पडू किंवा आपल्या बैंक कर्मचाऱ्यांना वयाच्या चाळीसीनंतर बीपी, शुगर , मणकेदुखी इ व्याधी ग्रस्त करतात त्यावेळी त्यांनी या प्रकल्पांविषयीची पुस्तके समिधा , प्रकाशवाटा , आनंदवन प्रयोगवन वाचण्यास सांगावे की जेणेकरुन बाबंनी आणि सर्व कुटुंबीयांनी त्यांच्या दुर्धर आजारावर आणि वेळोवेळी घडलेल्या प्राण घातक हल्यांवर कशी मात केली हे वाचून तरी आपण आपल्या कोशातून बाहेर पडू असा विश्वास वाटतो. पुनश्च एकवेळ संघटना , कॉ. देविदास तूळजापूरकर , कॉ. धनंजय कुलकर्णी ही ट्रीप मॅनेज करणारे काॕ. दिपक माने , कॉ. उदय मोरे आणि सर्व सहभागींचे आभार व अभिनंदन ! पुनश्च अशाच एखाद्या ट्रीपच्या प्रतिक्षेत ! धन्यवाद !
कॉम्रेड सरिता कुलकर्णी
कन्व्हेनर वुमेन्स कौन्सील
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र
एम्प्लॉईज युनीयन औरंगाबाद
मोबाईल नंबर 9421607248
मेल saritakulkarni 67@gmail.com
----------------------------------------------
-----------------------------------------------