अंदमान एक विलक्षण अनुभव
26 ऑक्टोंबर 2022
अशिषाचे लग्न झाल्यापासून एक फॅमिली ट्रिप काढायची अशी आमची नेहमी चर्चा व्हायची पण प्रत्यक्षात काही होत नव्हते . प्रत्येकाला आपापल्या बजेटची तयारी करायची होती . पण आता जर या दिवाळीच्या सुट्टीत प्लॅन झाला नाही तर पुन्हा सगळ्यांचा मेळ केव्हा होईल हे सांगता येणार नव्हते . त्यादृष्टीने अंदमानचा प्लॅन सुरू झाला . पण गेल्या वर्षापासून पोर्टब्लेअर एअरपोर्टचे काम सुरु असल्यामुळे ते दहा दिवसापैकी सहा दिवस सुरु व चार दिवस बंद असते असे समजले . यावर्षी आमच्याकडे दिवाळी पण नव्हती मग मुलांनी अगदी प्लॅनच केला की सगळ्यांच्या सुट्ट्यांचा मेळ बसवू आणि लक्ष्मीपूजन झाले की आपण अगदी सहा दिवसांचा अंदमान प्लॅन करु . काढलेल्या माहितीप्रमाणे 572 बेटापैकी 36 बेटावर वस्ती आहे 6/7 बेटांवर पर्यटकांना जाता येते आणि पर्यटकांना अभ्यासकांना , निसर्गप्रेमींना कितीही दिवस राहिले तरी समाधान होणार नाही मग सगळाच विचार करून मेळ घालत सहा दिवसाचा आम्ही प्लॅन केला पोर्टब्लेअर आणि हॅवलॉक इथे राहून आसपासची बेटे पाहण्यासाठी सगळ्यांच्या सुट्ट्या , रजा पाहून आम्हाला प्लॅन करावा लागला होता त्यामुळे अगदीच पीक पिरियडमधे आमची ट्रिप निघाली होती . फ्लाईटची तिकिटे आमचे आम्ही काढली होती तर पुण्याचा दिपाली इखे यांचे लेगसी हॉलीडेज यांच्याकडून अंदमानचे पॅकेज घेतले होते . ठरलेल्या प्लॅन प्रमाणे दिवाळी पडव्यादिवाशी पहाटे आमचे विमान पुणे-चेन्नई आणि नंतर चेन्नई-पोर्टब्लेअरसाठी रवाना झाले . गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या अंदमान ट्रीपला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली . आम्ही दोघे , आशिष-कीर्ती आणि आकांक्षा केतकी असा सहा जणांचा ग्रुप होता . ऐनवेळी कीर्तीच्या आईबाबाचे येणे तब्ब्येतीमुळे कॅन्सल झाले त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच अर्र असे झाले कीर्ती तर थोडी खट्टू झाली पण त्यांची ट्रिप तिच्या आत्याबरोबर रीशेड्युल झाली त्यामुळे ती पुन्हा खुश झाली , मग आम्ही सहाजण निघालो . दोन दिवसापासून पाऊस थांबला होता आणि आचानक थंडी पडली होती पण ट्रिपच्या उत्सहापुढे पहाटे तीनची थंडी पण जाणवत नव्हती सगळ्यांच्या मनात एक अनामिक ओढ होती . सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही सकाळी साडेसातला चेन्नई एअरपोर्टला उतरलो . पुढच्या विमानाला तीनचार तासांचा वेळ होता त्यामुळेे चहा नाष्टा करुन वेळ होता म्हणून आम्ही विमानतळावर फिरत बसलो . चेन्नई विमानतळ तसे पाहायला छान वाटले सुबक नक्षीकाम केलेल्या धातूच्या अनेक मुर्ती तिथे पाहायला मिळाल्या . सहसा कुठे पाहायला न मिळणाऱ्या मूर्ती म्हणजे उभा गणपती , शेषशय्येवरील विष्णू , कार्तिकस्वामी , कामदेवाची मूर्ती आणखी बऱ्याच मूर्ती होत्या .
बरोबर आकरा वाजता आमचे विमान पोर्टब्लेअरकडे रवाना झाले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला . एक वाजता आमचे फ्लाईट उतरणार होते तर साडेबारापासून आम्हाला खाली पूर्ण पाणी दिसू लागले जसजसे जवळ येऊ लागले तसतशी छोटी छोटी हिरवीकंच बेटे दिसू लागली आणि खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची जाणीव झाली कारण विमान उतरण्यापूर्वी शहरावर असलेले प्रदूषण आपले स्वागत करत असते इथे मात्र आम्हाला स्वच्छ असलेले सर्वात मोठं अंदमानचे बेट सभोवती निळेशार पाणी , किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू , ऊन आणि लाटेमुळे बदलणारे रंग इतक्या उंचीवरुनही नयनरम्य दिसत होते . निसर्गाने अंदमानला बहाल केलेली देणगी पाहून हरकायला होत होते .
आत्ता तर ही सुरुवात आहे आणखी काय काय पाहायला मिळणार असा विचार करुन लहान मुलासारखे , फुलपाखरासारखे मन भिरभिरायला लागले . एअरपोर्टला बाहेर दिखे मॅडमचा माणूस आलेला होताच . बाहेर आल्यावर एअरपोर्टला महाराष्ट्रीयन असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून स्वाभिमानाने उर भरून आला दोन मिनिट तिथेच शांत उभे राहिलो आणि हॉटेलकडे रवाना झालो .
त्यानंतर आम्ही
" 1943 "
या ऐतिहासिक पॉइंटला आलो समुद्रकाठी भिंतीवर 1943 असे भले मोठे जाडजूड , उंच दगडी अंक त्याच्यासमोर उंच मोठ्ठा झेंडा फडकत होता ते दृश्य पाहून उर भरुन आला त्याक्षणी सलामी द्यावीशी वाटली आणि मी दिली .
तिन्हीसांजेला एका बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज दुसऱ्या बाजूला झेंडा , 1943 या अंकाभोवती आणि समोर टेकडीवर हिरवळीवर भारताच्या नकाशाचे लाईटिंग बाकी सर्व शांत वातावरणात होते त्यात एक तास कसा निघून गेला समजले पण नाही .
अंदमानची राजधानी असलेले पोर्टब्लेअर हे शहर बेटावर असल्यामुळे नैसर्गिक वाटत होते . वाहनांची फारशी दाटी नाही , माणसांची उर धापापेपर्यंत धावाधाव नाही त्यामुळे रस्त्यावर फार गर्दी नाही , असलेली गर्दी मॅनेज करण्यासाठी तिथे सिग्नल नाहीत , ट्रॅफिक पोलिस हातात " स्टॉप आणि गो " या पाट्या दाखवत ट्रॅफिक मॅनेज करत होते . मनाला समाधान वाटत होते .
आमच्या प्लॅनप्रमाणे सकाळी 8.45 वाजता सेल्युलर जेल पाहण्यासाठी आम्ही निघणार होतो . भल्या पहाटे दोन वाजल्यापासून आम्ही जागे होतो त्यामुळे 8 वाजताच जेवणे आटोपून आम्ही विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो . हॉटेल व्यवस्था पूर्ण आपल्यासारखी होती आम्ही लवकरच झोपी गेलो .
ट्रिप ठरली तशी दोन महिन्यापासून अंदमान विषयी माहिती वाचणे , व्हिडिओ पाहणे , ऐकणे नित्याचे होते . आता उद्या प्रत्यक्षात त्या भूमीवर पाय ठेवण्याचा योग येणार होता . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तर लहानपणापासून ऐकलेले होते पण त्यांनी ज्या तुरुंगातील दहा बाय दहाच्या खोलीत ऐन तारुण्यातील आकरा वर्षे सजा भोगली तीही त्या कालावधीत न डगमगता , स्फुरलेले लेखन भिंतीवर कोरुन पुन्हा ते पाठ करून ती लिखित स्वरुपत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले ते सारे विचार मनात दाटी करू लागले . मी नुकतेच योगेश सोमण यांचे
" मी विनायक दामोदर सावरकर "
चे सतरा भाग सलग ऐकले होते तसेच सावरकरा विषयी बरेच वाचलेले होते आम्ही चर्चा पण करत होतो . त्यामुळे जेल परिसरात प्रवेश करताच सगळेचजण भावूक आणि गंभीर झाले होते . प्रवेशद्वाराजवळ नेताजी आर्ट गॅलरी आहे त्याठिकाणी अनेक परक्रमींची सचित्र माहिती वाचायला मिळते . जवळच दोन स्वातंत्र्यज्योती अखंड तेवत आहेत
त्याठिकाणी रजकैद्याना दिली जाणारी वागणूक कसली ती पिळवणूकच होती ते वर्णन गाईडकडून ऐकताना आपसूकच हाताच्या मुठी वळत होत्या . याठिकाणी अनेक स्वातंत्र्य सेनानीना मरणयातना भोगाव्या लागल्या होत्या . ब्रिटिशांनी अघोरी अत्याचार केले होते .
जेलमधील खोल्या त्यांची बांधकाम रचना , जाडजूड कड्या-कोयंडे , घाणे , साखळदंड , फाशीची जागा पाहताना कल्पना पण करवत नव्हती . संपूर्ण जेल परिसर , अखंड तेवत असलेल्या दोन ज्योती पाहून झाल्यानंतर जेलमध्ये सावरकरांच्या खोलीत प्रवेश केला . तिथेच शांतपणे बसून त्यांचेच
" ने मजसी ने परत मातृभूमीला "
हे गीत ऐकले , ते सुरु असताना आशिषने नेहमीप्रमाणे तिथे आलेल्या वस्तू की ज्या सावरकरांनी वापरल्या होत्या त्या म्हणजे त्यांची जेवणाची थाळी , पाण्याचा कटोरा , एक फूट उंचीचा लाकडी खाट आणि पांघरायची कांबळ एवढ्या वस्तू जतन करुन ठेवलेल्या आहेत याचा व्हिडिओ केला सगळ मनात साठवले , त्यांना विनम्र अभिवादन करून जड अंतःकरणाने आम्ही तेथून निघालो .
सेल्युलर जेल मात्र मनातून पटकन जाईना . इंग्रजांचा , ब्रिटिशांचा मनातून प्रचंड राग तर येत होताच पण त्याचवेळी कुतूहलही वाटत होते . दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी या जागा शोधून कशा काढल्या आणि इतकी बांधकामे कशी केली असतील . मुंबई , दिल्ली , गोवा ही ठिकाणे नेमकी टिपली कशी आणि त्यातही आपल्याच देशातील देशप्रेमीना शिक्षा देण्यासाठी कैद करुन अंदमान सारख्या बेटावर बंदिवान करुन ठेवले . त्यातूनही चुकून कोणी निसटले तर जिवंत राहण्याची शक्यता नाही कारण बाहेर चोहोबाजूंनी पाणी चुकून किनारा सापडलाच तर घनदाट जंगल . अंदमान आज जरी पर्यटन स्थळ वाटत असले तरी ती शंभर वर्षापूर्वी काळकोठडीच होती ती . विचार करून डोकं सुन्न झाले होते . तशातच आम्ही बाहेर पडलो .
आता आकरा नंतरचा पूर्णवेळ रिकामाच असणार होता . सध्या जेलमध्ये लाईटचे अपग्रेडेशनचे काम चालू असल्यामुळे दोन महिन्यापासून लाईट शो बंद आहे हे ऐकून थोडासा मूड गेला . मग प्लॅनमधे नसलेले रॉस आयलॅंड आणि चिडिया टापू आम्ही मॅनेज केले . आता इथून पुढे कुठेही जायचे तर बोटीने , फेरीने प्रवास असणार होता आणि प्रत्येकवेळी वॉटरप्रूफ जॉकेट घालून प्रवास असणार ती मजा घेत आम्ही बोटीने पोर्टब्लेअर ते रॉस आयलॅंड हा प्रवास केला . पूर्वी इथे ब्रिटिशांची राजधानी होती अनेक कार्यालयांचे अवशेष दिसतात एक ब्रिटिश सागरी पर्यवेक्षक डॅनियल रॉस याच्या नावावरून या बेटाला रॉस नाव दिलेले होत त्याला आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव दिले .बेटावर उतरले की याठिकाणी मोर , हरीण आणि सांबर भरपूर आहेत . टेकडीवर बऱ्याच छोट्या छोट्या इमारती आहेत . 2004 च्या त्सुनामी मध्ये या बेटावर बरीच पडझड झाली आहे त्यामुळे आज ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष याठिकाणी दिसतात . बेटावर उंच टेकडी असून टेकडीवर जाण्यासाठी याठिकाणी गाडीची सोय आहे गाडीने आम्ही टेकडीवर गेलो तिथून पुढे दीडशे पायऱ्या उतरुन दीपस्तंभ असलेल्या पॉईंटला जाता येते त्याला . पायऱ्या संपल्या की त्या पॉइंटला जाताना लाकडी पूल आहे त्यावरुन आम्ही गेलो . तिथे पुतळा आणि उंच दीपस्तंभ आहे चोहोबाजूंनी समुद्र आहे आणि समुद्रात मोठाले खडक आहेत सतत त्या खडकावर समुद्राच्या लाटा फेसळत येऊन धडकत असतात . पाणी गेले की खडकावर असंख्य खेकडे चालताना दिसतात पुन्हा पाण्याची लाट येते त्यात ते निघून जातात पुन्हा दिसतात असा सतत खेळ सुरु असतो . कोणत्याही पॉइंटला गेलं की तिथल्या निसर्गसौंदर्याची भुरळ पडत होती . प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण खुणावत होते . पुन्हा तितक्याच पायऱ्या चढून येताना मात्र दमछाक झाली पण तितकाच आनंदही होत होता . वर आल्याबरोबर मटक्यातील मलई कुल्फी खायला जी मजा आली त्याला कशाची तोड नव्हती .
तिथून आम्ही बंदरावर गेलो याठिकाणी एका गोष्टींनी चित्त वेधून घेतले ते म्हणजे माणसाला पाहून कोसो दूर पाळणारे हरीण त्याठिकाणी पक्षी व प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा राव यांनी हाक मारताच धावत येत होती . आरती , बाबू , रामा , पिंकी , छोटू अशा त्यांनी ठेवलेल्या वेगवेगळ्या नावांनी लाडीक हाक मारताच धावत जवळ येतात आणि त्या आपल्या हातात खाऊ देतात तो आपण हरणाना भरवू शकतो . थोडावेळ थांबून पक्षी प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा रावबरोबर आम्ही गप्पा मारल्या . चाळीस वर्षांपासून त्या हेच काम करतात त्यांचे वडील हेच काम करत असत . त्या रोज बोटीने पोर्टब्लेअर जा-ये करतात कधीकधी तिथेच राहतात . 2004 च्या त्सुनामीनंतर हरणांची संख्या एकोणतीस झाली होती आज ती चारशे झाली आहे . त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी त्सुनामी पाहिल्याचे सांगितले त्या करत असलेले वर्णन ऐकून अंगावर शहारा आला .
रॉस नंतर आम्ही पुन्हा पोर्टब्लेअरला आलो जेवण करुन एक तास आराम केला आणि गाडीने 30 किलोमीटरवर असलेल्या चिडिया टापू कडे रवाना झालो . रस्त्यात उंच उंच नारळाची आणि सुपाऱ्याची झाडे दिसत होती . मोठाले नारळ आणि कुतूहल म्हणजे सुपाऱ्याच्या लडीने लकडलेली नारळाच्या झाडाप्रमाणे दिसणारी सुपारीची झाडे पाहताना मजा वाटत होती . ती शेती मात्र खाजगी मालकांची होती . आम्ही बीचवर पोहोचणार तोच काठावर दलदलीत मोठी मगर आम्हला ड्रायव्हरने दाखवली . त्या बीचवर आम्हाला सनसेट दिसणार होता , निरीक्षण केले , नीट कान देऊन आवाज ऐकला तर क्वचित रंगीबेरंगी चिमण्या उडताना दिसत होत्या . आम्ही बीचवर फिरत होतो पण सूर्य ढगाआड होता पण लालबुंद सागर किनारा आणि त्याची समुद्रावर पडलेली किरणे मात्र मोहक होती . सनसेट दिसला नाही पण सुर्यास्ताच्यावेळेचा लालिमा फाकलेला समुद्रकिनारा पाहून आम्ही हॉटेलवर परतलो . दुसरे दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला हॅवलॉक साठी निघायचे होते . इकडे लवकर अंधार पडतो त्यामुळे आठ वाजताच रात्रीची जेवणे आणि पॅकिंग करुन आम्ही नऊ वाजताच झोपलो .
28 ऑक्टोंबर , आज ट्रिपचा तिसरा दिवस ! खऱ्या अर्थाने दोन दिवस आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला जाणार होतो ते ठिकाण म्हणजे हॅवलॉक बेट ज्याचे आताचे नाव आहे
" स्वराज-द्वीप ".
पोर्टब्लेअरला रोडचा संपर्क तुटला होता तर याठिकाणी रोडबरोबर हवाई संपर्कपण असणार नव्हता फक्त बोटीने ( फेरिने ) प्रवास असणार होता . इथे जसा पाचला सूर्य मावळतो तसा पाचला उगवतो . लवकरच आवरुन आम्ही नाष्टा वगैरे करुन सातलाच हॉटेल सोडले आणि बंदरावर पोहोचलो . त्याठिकाणी विमानतळावर जितके सोपस्कार असतात तितकेच सोपस्कार करावे लागणार होते त्यामुळे नऊच्या बोटीसाठी आम्ही साडेसातला बंदरावर गेलो . " नौटीका " नावाची भाली मोठी फेरी आमच्या स्वागतासाठी समुद्रात हेलकावे घेत उभी होती . लाल , निळी , पिवळी , पांढरी अशा रंगीबेरंगी अनेक फेरी त्याठिकाणी उभ्या होत्या . निळाशार समुद्र , पांढऱ्याशुभ्र रेतीचा किनारा , घनदाट अशी दिमाखात डोलणारी हिरवीगार झाडी आकाशात निळ्या पांढऱ्या विविध छटांचे ढग ! सोबतीला खट्याळ वारा होताच ,आहाहा ! काय ती निसर्गाची कमाल म्हणावी , काय पहावे आणि काय नाही असे वाटत होते . दीडदोन तास या बोटीत बसून अथांग सागरात प्रवास करणार याचा विलक्षण आनंद होत होता .फेरीमध्ये प्रवेश करताच रेल्वेच्या एसी डब्यात प्रवेश केल्यासारखे वाटले ( सुरक्षित ) पण खिडकीतून बाहेर पाहिल्यावर मात्र आपण अथांग सागरात हेलकावे खाणाऱ्या मोठ्या बोटीत आहोत हे जाणवते . दोन दिवसापासून अवतीभोवती पाणी आणि बोटी दिसत होत्या त्यामुळे पाण्याची भीती कमी झाली होती . हेलकावे खात फेरी पुढे निघाली की पाण्याची तयार होणारी वर्तुळे , पाठीमागे फेसाळत तयार होणारी रेषा , फेरीवर येऊन आदळणारी लाट पाहत कसे दिडदोन तास गेले समजले नाही .
फेरी बंदराला लागली तेव्हा आकरा वाजून गेले होते . त्याठिकाणी आमचा माणूस गाडी घेऊन तयारच होता . आमचे रिसॉर्ट स्कुबाच्या बीचच्या काठावर होते त्यामुळे मुलांना अत्यानंद झाला . 80% लाकडी असलेल्या कौलारु रिसॉर्टमध्ये आम्ही बीचवर राहणार होतो म्हणजे केव्हाही मनात आलं की समुद्रकाठी आम्ही जाऊन बसणार होतो .
आज आम्ही दोन वाजता राधानगर बीचवर जाणार होतो दोन तास आमच्याकडे होते आम्ही समान ठेवलं , चहा घेतला आणि रिसॉर्टच्या पाठीमागे बीचवर गेलो . तिथे रेतीत विविध आकाराचे शंख दिसत होते . शंख उचलून हातात घेतला की पटकन आतून शंखाच्या आकाराचे आणि त्याच रंगाचे किडे बाहेर यायचे , बराचवेळ सगळेजण त्यात रमले . अनेक फांद्या असलेली विशिष्ट प्रकारची झाडे पाण्यात होती . त्यामुळे पाण्यातल्या झाडावर उभे राहून विविध पोजमधली फोटोग्राफी झाली . दिडला रिसॉर्टवर आलो अर्धा तास आराम करुन आम्ही राधानगर बीचवर गेलो .
याठिकाणी सनसेट दिसणार होता दुपारचे दोन वाजले होते सुर्य तळपत होता पण त्याचा त्रास काही जाणवत नव्हता . बीचवर विविध आकारांचे हट्स होते . लाकडी जिने , लकडाचे ओंडके असे बसायला किंवा फोटो काढायला खूप छान बॅकग्राउंड होते त्यामुळे आशिष त्याच्याबरोबर आकांक्षा , कीर्ती , केतकी आगदी चेकळले होते . समुद्रात डुंबण्याचा आनंद तर सगळ्यांनीच लुटला . समुद्राचे पाणी , पांढरी वाळू आणि बीचवरील झाडी असा लपंडाव सगळे खेळत होते . चार वाजले तसे सगळ्यांना सनसेटचे वेध लागले . आणि साडेचार वाजले की तळपणारा सुर्य मात्र ढगाआड लपू लागला त्यामुळे सगळ्यांनाच सनसेट पाहायला मिळणार नाही याची हुरहूर लागू लागली . पाच वाजता स्वच्छ सुर्य काही दिसला नाही पण मावळतीच्या दिशेला दिसणाऱ्या रक्तीमासुद्धा खूपच मोहक दिसत होत्या . तोही एकप्रकारचा विलक्षण आनंद झाला . त्यातील फोटोग्राफी झाली आणि दहा पंधरा मिनिटात तर आंधार गुडूप झाला .
आम्ही रेसोर्टवर परत आलो तिथल्या लोकांच्या मते आम्ही प्युअर व्हेजीटीरीयन असल्यामुळे खाण्याचा फारसा आनंद घेऊ शकत नाही असे होते . पण आम्हाला त्याचे काही वाटत नव्हते . पनीरचे फार तर चायनीजचे वेगवेगळे प्रकार खाऊन आम्ही खूष असत होतो . उद्या सकाळी सर्वात मोठ आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग आणि सर्वात सुंदर अशा एलेफंट बीचवर आम्ही उद्या जाणार होतो . एलेफंट बीच हेही एक खास आकर्षण होते . गेल्या वर्षीपासून पन्नासपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना स्कुबा करण्यास मनाई होती त्यामुळे माझा मूड गेला होता पण मुले मात्र खूप एक्साईटेड होती . ज्यांना स्कुबा करायचे आहे त्यांनी वयाच्या पन्नाशी पूर्वी प्लॅन करावा तसेच फार लहान मुलांना नेण्यापेक्षा ती कळती झाल्यावर ट्रिप करावी म्हणजे परिपूर्ण ट्रिप होऊ शकते तसेच ग्रुपने मजा येते त्यामुळे दोन फॅमिली असल्यास आनंद द्विगुणित होतो .
स्कुबासाठी सकाळी सहाच्या बॅचचे रजिस्ट्रेशन झाले होते रिसॉर्टच्या पाठीमागेच जायचे होते पण उत्साहात मुलांचे पाचपासून गुड मॉर्निंगचे मेसेज येत होते . आम्ही पण लवकर उठलो सगळेजण पावणेसहा वाजता बीचवर पोहोचलो . आधी फॉर्म भरणे , कपडे चेंज करणे सगळ्या गोष्टी होईस्तोवर पाऊसच सुरु झाला आभाळ गच्च भरुन आलं पण त्याचा काही परिणाम होत नसल्याचे समजले . अत्यंत आनंदात मुले उड्या मारत स्कुबासाठी गेली आम्ही बीचवर बसून पावसातले समुद्राचे सौंदर्य न्यहाळत बसलो आमच्यासारखे बरेचसे पालक तिथे होते थोडीशी हुरहूर प्रत्येकाच्या मनात होतीच . आकांक्षाला पाण्यात पोहायला , खेळायला खूप आवडते तर आशिषपण यासाठी आतुर होता . आशिष कीर्तीचे न्युझीलंडमध्ये बारा हजार फुटावरून स्काय डायव्हिंग झाले होते आता हा अनुभव घ्यायचा होता . केतकी पाण्याला घाबरत होती पण सगळ्यांबरोबर हिम्मत करत होती .
त्यांचा ड्रेस , पाठीवर ऑक्सीजन घेऊन बोटीतून मुले समुद्रात गेली बरच वेळ त्यांचे ट्रेनिंग सुरू होते . आम्ही चहा पीत इकडे तिकडे हिंडत त्यांची वाट पाहत होतो . काळेभोर ढग आणि कोसळणारा पाऊस पाहून अनामिक भीती वाटत होती . बोटीतून समुद्रात मुलांनी उद्या घेतल्यापासून अर्ध्या तासाने ती परत येताना दिसली . उड्या मारत आनंदाने आरडाओरडा करत ते वर आले , अनुभव सांगू लागले खाली पाऊस आहे की नाही काहीच समजले नाही म्हणाली . जवळजवळ चाळीस फूट खोल त्यांना नेलेले होते एका नवख्या युगात ते चक्कर मारुन आलेले होते सगळे फोटो व्हिडिओ मिळणार होते . प्रत्यकाचे अनुभव ऐकताना मजा येत होती आता पाऊस पण थांबला होता .
रिसॉर्ट वर आलो फार गडबड नव्हती जायची फार गडबड नव्हती थोडा आराम केला , नाष्टा केला आणि एलिफंट बीचसाठी तयार झालो सगळेच पिकनिकच्या मूडमध्ये होतो , बरोबर तरुणाई होती त्यामुळे अखंड ट्रिप म्हणजे खळाळता धबधबा सोबत आहे असे वाटत होते . आकरा वाजता आम्ही बंदरावर आलो तर तिथे अनेक वॉटर गेम्स त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही सगळ्यांनी ग्लास बोटिंग आणि मी स्नाॅर्कलिंग करायचे ठरवले आणि बोटीने बीचवर आलो . याठिकाणी सगळे पर्यटक आणि अनेक गेम्स असल्यामुळे थोडी गर्दी वाटली पण बीचचे सौंदर्य वाखाणण्याजोगेच ! वेगवेगळ्या फळांच्या फ्रूट प्लेट्स आणि चाटचे स्टॉल खाचखच भरलेले होते . आम्ही एकत्र बसून काही खाल्ले नाही ज्याला जेव्हा जे खावेसे वाटते ते त्यांनी घेऊन खावं असे ठरवले आणि जेवढे प्रकार होते ते सगळे प्रत्येकाने आळीपाळीने घेतले आणि सगळ्यांनी टेस्ट केले . आता गेम्स होते मी पहिल्यांदा स्नाॅर्कलिंग केले असा भन्नाट अनुभव आला आहाहा ! आपण शोपिस म्हणून रंगीबेरंगी मासे काचेमध्ये पाण्यात बंदिस्त करून ठेवतो तसे विविध रंगी , विविध आकाराचे मासे आगदी थव्याने आपल्याला स्पर्श करुन जातात असा भारी अनुभव होता तो . पाण्याखाली असलेल्या , किनाऱ्यालगतच्या वेगवेगळ्या वनस्पती , त्यांची घरटी अशी मस्त सफर ते आपल्याला सफाईदारपणे घडवून आणतात . ते करत असताना तिथले स्थानिक समुद्री विश्वाचे , निसर्गाचे आपल्या लेकराप्रमाणे संवर्धन करताना दिसतात . कशालाही धक्का पोहोचणार नाही याची खूप काळजी घेतात म्हणून आज ते सौंदर्य आहे तसे टिकून आहे . स्कुबा करता आले नाही तरी स्नाॅर्कलिंग केल्यामुळे माझी हौस फिटली होती मला पण आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . यानंतर आम्ही सगळेजण ग्लास बोटिंगसाठी बसलो यामध्ये बोटीत मधे मोठी दुर्बीण असते आणि कडेनी गोलाकार बसायला व्यवस्था असते . बोट थोडी पाण्यात गेली की खोलवर असलेले मासे , वनस्पती , जलचर आपल्याला अगदी काचेजवळ असल्यासारखे दिसते ती सफर पण खूप आनंद देऊन जाते . गेम्स झाल्यानंतर आम्ही बराच वेळ बीचवर वाळूत , पाण्यात झाडीत असे फेरफटके मारत होतो फोटो काढत होतो . साडेतीन वाजता तो बीच बंद करतात सव्वातीन वाजल्यापासून स्पिकरवर त्याप्रमाणे सूचना दिल्या जातात त्याप्रमाणे आख्खी दुपार आम्ही त्या बीचवर घालवली आणि साडेचारला रेसॉर्टवर परत आलो
रोज वेगळाच बीच , रोज वेगळाच पॉइंट , वेगळेच ठिकाण आणि त्यामुळे येणारी मजा रोज वेगळाच अनुभव देऊन गेली . समुद्र तोच , निसर्ग तोच पण अनुभूती मात्र रोज वेगळी आली . ना प्रवसाचा थकवा जाणवला , ना आपल्या दैनंदिन जीवनाची आठवण . मस्तपैकी सहा दिवस कसे गेले समजले नाही आणखी राहायला मिळालं तर बरं तेच सौंदर्य रोज नव्याने न्याहळावे असे वाटत होते . बोटी पासून क्रुझ पर्यंत सगळ्या जलप्रवसाची हौस याठिकाणी फिटते . आता हुरहूर लागली होती पण तृप्ती होती . आता परतीचे वेध लागले , सगळ्यांच्या रजा सुट्ट्या संपत आल्या होत्या . खूप फोटोग्राफी केली पण अफाट निसर्ग तो कसा कैद होईल शक्य तेवढा नजरेत साठवून परत निघालो . ही माझी पहिली ट्रिप आहे की ज्याठिकाणी मी काहीही खरेदी केली नाही ( पोवळे सोडता ) . अंदमान हे निसर्गाने भारताला बहाल केलेलं एक सुंदर कोंदण आहे म्हणायला हरकत नाही . त्याची जपणूक तिथले स्थानिक ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे पर्यटक म्हणून आपण करणे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते तितकेच महत्त्वाचे आहे .
.




















