Sunday, May 8, 2022

मनोरंजन

 उखाणे  

1)

कांडून कुटून केली पंचमी 

सण आला पोळा

पोळ्याची वाटते डाळ 

तोवर आली घटाची माळ

शिलंगणाच सोन

अन दिवाळीनं केलं येणं

दिवाळीची लावते पणती

तोवर संक्रांत आली बाई नेमकी

संक्रांतीचं सुगड

आणि पूनव आली दुगड

पूनवेला केले वड्यान पाट

तेवढ्यात शिमगा आला गजानघाट

शिमग्याला केली खीर

अन रंगपंचमीन दिला धीर

रंगपंचमीचा लावते रंग 

तेवढ्यात पाडवा आला जबर दंग

पडव्याची उभारते गुढी

तोवर अक्षय तृतयेने मारली उडी

अक्षय तृतीयेचा तोरा

........रावांच नाव घेते कारवणी पर्यंत जरा दम धरा 



2)

झुण झुण जाते खिडकीतून पाहते

खिडकीला तीन तारा

अडकित्त्याला घुंगर बारा

तिकडून आला व्यापारी

त्याने दिली सुपारी

सुपारी देते वण्याला

हंडा आणते पाण्याला

पाणी आणते गंगेचं

वाडा बांधते भिंगाचा 

वाड्यात वाडा सात खोल्या

मधल्या खोलीत कॉट

कॉटवर गादी

गादीवर उशी

उशीवर बशी 

बशीत घड्याळ

घड्याळात वाजला एक

..... नाव घेते..... लेक

वाजले दोन 

..... आला फोन

वाजले आठ

.... नाव घेते आज आहे.... थाट

बशीत ओल्या नारळाचे सारण.... नावाला ....कारण



3)

वसंताची लागता चाहूल 

गुढी उभी केली तोच

चैत्रागौर धावत आली 

दारी सजल चैत्रांगण

गौराईचं डाळ पन्हं

तोच झाले अक्षय तृतीयेचा येणे 

वैशाख वणव्यात दरवळला सुगंध मोगऱ्याचा 

हलकेच मनाला थंडाऊन गेला

गंध रोहिण्यातील मातीचा

लागता चाहूल मृगाची 

धरणीमाय अंकुरली

श्रावण सरीत चिंब होऊनी

सृष्टी सारी बहरली 

झिम्मा , फुगडी मंगळागौर 

नाचगाण्याना आला पूर

गणेशाबरोबर आल्या माहेरवाशिणी

त्यांची करते पाठवणी

  स्वच्छ्ता करून करते

नवरात्राची तयारी

तोच धावत धावत दिवाळी आली दारी

भाऊबीज पाडवा वाढवी नात्यातील गोडवा

कणभर तिळ मणभर गूळ 

तुमच्या माझ्यातील स्नेह असाच वाढवा 


.... नाव घेऊन करते आज ..... साठी जागरण



4)

गोठ घेतले पाटल्या घेतल्या 

घेतला राणीहार 

ठुशी घेतली चिंचपेटी घेतली

घेतला लक्ष्मीहार 

आंगठी घेतली वेल घेतले

बाजूबंद आणि वाकी 

आंबड्यातली फुलेही घेतली

राहिले नाही काही बाकी

नाकातील नथ घेतली 

तन्मणी आणि तोडे

सोन्याचांदीचे घेऊन झाले 

म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे 

जोडवी जोड मासोळ्या 

पैंजण घेतले पायी

छल्ला मेखला घेतला आता 

राहिले नाही काही बाकी

झाली सगळी खरेदी

आता मी करते नट्टापट्टा 

आगबाई घाईघाईत तर घ्याचाच राहिला

बिंदी आणि कंबरपट्टा

तोही घेतला , बाजारात गेले आणि तोही घेतला

झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली 

आणि अनिल म्हणतात कसे 

आग उठ सरिता पहाट झाली