शाळेतील गणेशोत्सव
घेरडी आमचं छोटंसं गाव त्यातली
" जवाहर विद्यालय घेरडी "
ही माझी शाळा !
छोटीशी , कौलारु , टुमदार शाळा पण त्या शाळेतील आठवणी मात्र आभाळा एवढ्या मोठ्या आहेत . प्रत्येक प्रसंगाच्या आठवणी या सुवर्णाक्षरांनी कोरल्यासारख्या स्मृतीपटलावर लख्ख आहेत . प्रजासत्ताक दिन असो अथवा स्वातंत्र्य दिन असो त्याचं निखळ वेगळेपण आम्हाला खूप अनुभवता आले . आमच्या शाळेत पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत . सलग पाच वर्गखोल्या आणि दोन्ही बाजूला दोन खोल्या एका बाजूला ऑफिस दुसऱ्या बाजूला स्टाफ रूम . एक वर्ग भरण्यास जागा कमी पडते म्हणून छोटी पटसंख्या असलेला वर्ग शाळेच्या खालच्या बाजूला असलेल्या एका खोलीत भरायचा . शाळेसमोर खेळासाठी मोठ्ठं मैदान आहे , त्याच्या बाजूला प्रयोगशाळा त्याच्या शेजारी खेळाच्या आणि कावयतीच्या सामानाची एक खोली . चोहोबाजूंनी महानंदाची झाडे आहेत . हे माझे अनुभव 45 वर्षांपुर्वीचे आहेत , काळानुरूप बदल झाले असले तरी आजही माझे गाव आणि शाळा तशीच आहे
उमेश डोंगरे सर हे हेडसर कोणाला कधी फारसे बोलायचे नाहीत पण उंचे पुरे धिप्पाड ते वर्गावरुन चालले तरी वर्ग एकदम चिडीचूप व्हायचा . तसाच धाक देशपांडे सर आणि खटकाळे सरांचा वाटायचा . पठाण सर , महाजन सर , वाईकर सर आणि डी. व्ही. सर हे त्यामानाने मवाळ होते . काही काळ आमचा भाऊ नंदू आणि आक्कीची मैत्रीण शकू मॅडम हे दोघे पण शिकवायला होते . नंदू सर शाळेत खूप स्ट्रीक्ट असत घरी आलं की भावाप्रमाणे ! कधीच कोणाशीही बोलताना न दिसलेले क्लर्क म्हणजे विठू देशपांडे सर ! तसेच शाळेत सुधाकर , राजाराम आणि विलास हे तीन शिपाई होते . सुट्टीची नोटीस आणणारे खेळासाठी रिंग , दोऱ्या , डंबेल्स , लेझिम , देणारे कोणालाही खेळताना लागले तर लगेच आयोडीन आणि कापूस देणारे आमचे शिपाई गावातीलच असल्यामुळे ते आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे वाटायचे . तसे तर बरेचसे शिक्षक पण गावातील होते . त्यावेळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्हाला जवळ्याला जावं लागायचं तर वेळेत एस टी बस नसायची म्हणून दहा दिवस आमचा मुक्काम जवळ्यात असे आणि आमचे जेवणाचे डबे शिपाई पोहोच करत असे रोज एक शिक्षक येऊन जात आसत आमची व्यवस्था नीट आहे न हे पाहण्यासाठी . एकूणच विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही जबाबदारी पलकांबरोबर शाळा , शिक्षक तितक्याच प्रेमाने पर पाडत असत .
आमच्या शाळेची प्रार्थना
" हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते
माझे मन पावन होते "
ही होती . उभ राहून ती एका तालात म्हणाताना आपसूकच मागेपुढे डुलत म्हणली जायची . शाळेत जायला उशीर झाला की प्रार्थना होईपर्यंत शाळेच्या बाहेर उभे राहावे लागे . बहुदा हे शनिवारच्या सकाळच्या शाळेला होई मग उशीर झाला म्हणून कडाक्याच्या थंडीत जोरात दात खाऊन हळूच छडी मारणारे कोळेकर सर आणि त्याच सरांचा शनिवारी पीटीचा तास असे . तो होत असताना हातवारे करत तोंडात असलेल्या शिट्टीने सूचना देत होणारा पीटीचा तास मधूनच तोंडातील शिट्टी काढून ज्या मुली उड्या मारत नसतील त्यांना
" ए जाफराबादच्या म्हशीनो "
असे रागवत ते हातातच छडी फिरवत मागेपर्यंत चकरा मारत असत आणि सगळ्यांना कवायत करायला लावत असत त्या सरांचा भारी धाक वाटत असे .
आमच्या शाळेत होणारा गणेशोत्सव आणि त्याचं वेगळेपण हे अधोरेखित करण्यासारखे आहे . तसा तर महाराष्ट्रात घरोघरी , गावोगावी मंडळे करुन गणेशोत्सव साजरा केला जातो पण त्याची आमच्या शाळेत जी मजा आम्ही आनुभवली तशी मजा मला पुन्हा कुठेही दिसली नाही हे मात्र मी खात्रीलायक सांगू शकते .
गणेशाचे आगमन , प्रतिष्ठापना , मिरवणूक , दहा दिवस आरत्या , प्रसाद हे तर सगळीकडे उत्साहात होतच असते . पण आमच्या शाळेत होणारा सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मला खूप ठळकपणे आठवतो तो तितकाच आनंद देणारा आणि विस्मयचकित करणारा आहे .
आमच्या शाळेत या उत्सवादरम्यान शाळेच्या प्रत्येक वर्गाला एक दिवस देखाव्यासाठी ठरवून दिलेला असायचा . त्याला आम्ही
" आमचं डेकोरेशन "
असे म्हणत आनंदाने तयारीला लागायचो .
यामधे त्या त्या वर्गासाठी विशिष्ठ विषय ठरलेले असत उदा
" सीतेचे हरण "
" संतोषी माता "
" श्रावण बाळ आणि आईवडील "
आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे देखावे हे काही वस्तू वापरुन न करता ते मुलामुलीमधून निवड करुन केले जायचे . यामधे मुख्य पात्रासाठी साजेशी ठरविक मुलामुलींची निवड केली जायची यामधे दरवर्षी एक देखावा खूप गाजलेले होता तो म्हणजे
संतोषी माता .
यासाठी एकच ठरलेली मुलगी होती ती म्हणजे माळ्याची शांता !
उंचीपुरी , गोरीपान , तरतरीत नाक , लांबसडक काळेभोर केस तिला सहज जरी पाहिले तरी तिचा चेहरा लक्ष्मीचा मुखवटा असल्यासारखे वाटत असे .
तिला नऊवार साडी नेसवून , बटवेणी घालून केस मोकळे सोडून कपाळावर टोप घालून सजवायचं तिच्या एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू देवून उभे करायचे आणि तिला आठ हात दिसले पाहिजे म्हणून तिच्या मागे तीन मुली फक्त हातात तिच्यासारख्या बांगड्या घालून हात बाहेर काढून उभ्या केल्या जायच्या ती समोरून अष्टभुजा देवी दिसत असे . तिच्यासमोर मग बाकी मुली कोणी आरतीचे ताट घेऊन , कोणी हात जोडून नमस्कार करत आहे अशी सहा पात्र केली जायची व तिच्या दोन बाजूला तीन तीन मुली उभ्या केल्या जायच्या . कमी उंचीच्या मुली बाळे होऊन उभ्या राहायच्या . विशेष म्हणजे हा देखावा साधारण सायंकाळी सात वाजता सुरु व्हायचा तो रात्री साडेदहा पर्यंत असे . त्यावेळी वर्गात पंखे नसत मग नवीन कपडे , लाईट यामुळे त्या घामाघूम व्हायच्या , नाकात नथ घातल्यामुळे मध्येच कोणाला शिंक यायची मग सप्लिमेंट लाऊन वाढवलेली वेणी निसटायची . तशातच मग थोडी गर्दी कमी झाली असे वाटले की शकू मॅडम , पानसकर बाई या दार लाऊन घ्यायचं मुलींना पाणी , थोडंसं बिस्कीट केळी खायला द्यायच्या , काहीतरी मेकअप निघालेला , साडीचा पदर , निसटलेली निरी नीट करायची , कोणाचं कानातल गळ्यातील पडलेलं आवरायचं आणि बाहेर गर्दी वाढली की पुन्हा पटापट प्रत्येकानी आपल्या ठरलेल्या स्थितीत जाऊन उभ रहायचं काहीवेळेस मागे हात बाहेर काढून पाठीमागे उभ्या आसलेल्या मुली आवघडल्या की त्यांना बदलायच . पण मुख्य पात्र असलेले चेहरे बदलता येत नसत . हा देखावा पूर्ण गणेशोत्सवात सर्वोत्तम ठरे !
असाच दुसरा देखावा ठरलेला असे तो म्हणजे
सीतेचे हरण
यात एखादी मुलगी सीता होई , तिला भगवे कपडे घालून तयार केले जाई . बाकी राम , लक्ष्मण , रावण असे मुलांना केले जाई .
अशाच प्रकारचा सुंदर देखावा मुलांच्या मराठी शाळेतपण होत असे . तिथे मोहन आण्णा आणि रमेश आण्णा गुरुजी म्हणून होते तर आंता काका मुख्याध्यापक होते . अंता काका म्हणजे धोतर , नेहरु शर्ट आणि टोपी असा त्यांचा ठरलेला पेहराव होता . अत्यंत शांत , अतिशय हुशार आणि शिस्तबद्ध म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते . मागे हात बांधून शाळेत काहीही न बोलता चक्कर मारली तरी मुले त्यांना घाबरत असत . त्याच पद्धतीने मोहन आण्णा आणि रमेश आण्णा हे दोघेही होते . त्यामुळे त्यावेळी मराठी शाळेतील मुले खूप नावाजलेली , तरबेज असत . आमच्या गावात सातवी पर्यंत मुलांची आणि चौथी पर्यंत मुलींची मराठी शाळा आहे .
त्यांचा देखावा ठरलेला असे तो म्हणजे श्रावण बाळाचा !
काठया , दोर आणि पुठ्ठ्यांचा वापर करून कावड केली जायची . मुलांची शाळा असल्यामुळे श्रावण बाळाचे आईवडील दोन्ही मुलेच असत आई ज्याला केलेली असे त्याला बाईचे मेकअप केलं जाई आणि डोक्यावरून पदर देऊन ती दोन्ही मुले डोळे झाकून पुठ्ठ्याच्या कावडीत बसवले जायचे . कोपऱ्यात टेबलवर खुर्ची ठेऊन पुढे आंब्याचे फाटे लावून डोक्यावर टोप गळ्यात माळा घालून हातात धनुष्यबाण घेऊन दशरथ राजा उभा असे तर दुसऱ्या कोपऱ्यात दगड माती लावून खऱ्या पाण्याचा झरा केला जाई त्याच्या शेजारी कळशीतून पाणी घेत असलेला श्रावण बाळ असे आणि संपूर्ण वर्गात वेगवेगळ्या झाडांचे फाटे लावून ते जंगल तयार केलं जाई . दुसरे दिवशी वाड्यात हे दोन्ही आण्णा , ककमरे गुरुजी , पालसांडे गुरुजी आणि आम्ही सगळ्या बहिणी उगाचच वाद घालत बसायचो विषय म्हणजे
" देखावा कोणाचा चांगला झाला "
यावरुन बरीच चर्चा रंगत असायची .
या देखव्यामध्ये आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असे पण ती सगळ्यांना मिळत नसे ज्या मुलांमुलींची यासाठी निवड होई ती आगदी आनंदाने यासाठी तयार होत आसत . अवघडून बसणे , उभे राहणे यात त्यांना आनंद होत असे . गावातील लोक संध्याकाळी आपापल्या सवडीने देखावा पाहायला येत आसत . आख्खा वर्ग स्वयंसेवक म्हणून आसपास फिरत असे . आपल्या ओळखीचे , घरचे लोक पाहायला येत असताना दिसले की आनंदी आनंद होई . घरचे लोक लवकर दिसेना झाले की मधूनच घरी पळत जाऊन यायचं
" चला की लवकर आमचं डेकोरेशन पाहायला "
असा निरोप घरी , शेजारी , मैत्रिणींच्या घरी देऊन परत येऊन स्वयं सेवकासारखे उभे राहायचे . इकडे ज्यांना पात्र करायला मिळालं त्यांना मात्र तीन तीन तास शेवटपर्यंत आजच्या भाषेत
" स्टॅच्यु "
होऊन उभे राहाव लागे तेही आनंदाने आपली भूमिका पार पाडत असत पण असे सजीव माणसांचे देखावे नंतर मला कुठेही पाहायला मिळाले नाही हे मात्र खरे !
हे संपले की गणेश विसर्जनाच्या आदले दिवशी शाळेच्या स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा यामधे छोट्या छोट्या नाटिका , नकला , गाणी , नृत्य याचे सादरीकरण व्हायचे त्यात मुलामुलींना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळायची . यासाठी मुलींबरोबर पानसकर बाई , त्यांचा मुलगा दीपक , सुतराच्या शकू मॅडम खूप कष्ट घ्यायचे . गावातील लोक प्रेक्षक म्हणून बहुतेक आम्हा मुलांचे पालकच असत ते शाळेच्या मैदानात आपापलं बस्कर घेऊन येऊन बसत असत . त्यातच पाऊस येणं , लाईट जाणं असे प्रकार व्हायचे . टाळ्या शिट्ट्या याचा जल्लोष असायचा पण त्यात मजा असायची , उत्साह असायचा . घर , स्टेज , मेकअप करण्यासाठी मिळालेला वर्ग , सामानाची नेआण यासाठी पळापळ करतांना एकप्रकारचा कैफ चढलेला असायचा . रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम व्हायचा तरी दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे तेही बेंबीच्या देठापासून
" गणपती चाल्ले गावाला
चैन पडेना जीवाला " अशा घोषणा देत बाप्पांचं विसर्जन आणि खिरपतीचे वाटप झाल्यावरच वातावरण थंड होई . हे सगळं करताना गावातील मुलं मुली एकत्र असत त्यात बहुतांश मुलं आमच्या वाड्यातील , गल्लीतील होती . म्हणजे आम्ही सगळी भावंडं , भाचे कंपनी ही सगळी शाळेच्या वेळेत शाळेत आणि इतर वेळी वाड्यात असत त्यामुळे आमचं बालपण हे गोकुळात गेल्यासारखे आहे . सगळीकडे गर्दी असली तरी वाटून खाणे आणि मिळूनमिसळून राहणे यासरखे सुख कशातच नाही .
" बालपणीचा श्रावण "
सगळ्यांना खूप आवडला मग येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मन भूतकाळात गेले . खेड्यातील बालपण ज्यांना अनुभवता आले ते खरंच नशीबवान आहेत . त्यांच्यासाठी तो एक अनमोल ठेवा आहे त्याची उजळणी केली तर मनाला तरतरी येते मग तेही शब्दबद्ध करावेसे वाटले आजही हे सगळं आठवलं तर मन आगदी त्या व्हायचं होऊन हुंदडायला लागतं.
सौ सरिता अनिल कुलकर्णी
9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी