Saturday, July 10, 2021

क्वारंटाईन डायरी



कोरोनाच्या वातावरणात थोडा बदल झाला कंपनीने पुण्यात यावं लागेल म्हणून सांगितलं  म्हणून आम्ही जानेवारीत पुण्यात रहायला गेलो दोन महिने राहिलो आणि कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली व  मी , आशिष आणि आकांक्षा मार्चमध्ये पुन्हा बार्शीत दाखल झालो ! पुन्हा लाॕकडाऊन , जिल्हाबंदी सुरु झाली . मग उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे 15 जुनपर्यंत बार्शीत राहिलो आंब्याचा मनमुराद आनंद लुटला . त्यादरम्यान आशिषने व मी दोघांनी नविन कंपनी जाॕईन केली . लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि आकांक्षाच पुण्यात काम होतं म्हणून आमचे तिघांचेही पुण्याला जायचे ठरले . एकदा पुण्यात गेलं की थोडंस बाहेर गेलं जातं मग तिकडून मिरजेला जायचा धोका नको म्हणून आमचे बार्शीतून मिरज व मिरजेत आठ दिवस राहून पुण्याला जायचं असे  ठरले .
त्याप्रमाणे रविवारी आम्ही बार्शीहून मिरजेत पोहोचलो केतकी पण मिरजेत आहे मग खूप दिवसांनी सगळे एकत्र रहाणार होतो बार्शीच्या आंब्याचा रस , लोणची , केक , आळूची भाजी असे मी शिकलेल्या पदार्थांचे घरात प्रयोग सुरु होते सगळ्यांनाच एकत्र रहातोय याचा आनंद झाला होता . पण भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसे गुरुवारी आशिषचा घसा खवखवायला लागला . आमच्या दोन्ही कुटुंबात कोरोनाविषयी प्रचंड काळजी घेणारे मेंबर म्हणजे एक माझी आई व दुसरा आशिष ! आई रोज बँकेत जातात तर दीड वर्ष झालं तरी रोज त्या निघण्यापुर्वी पंधरा मिनिट आधी आशिषची त्यांच्यामागे भुणभूण असते . 
" मास्क नीट घाल सॕनिटायझर वापर " 
अशा सुचना देत देत तो गेटपर्यंत जातो. आईंनी एकदा त्याच्याकडे पाहिलं की
" तू कितीही रागव मी सांगतच रहाणार " 
असे म्हणत हसत घरात येतो . 
मग त्याचा घसा थोडासा खवखवू लागला तसे त्यांने स्वतःला आयसोलेट करुन घेतलं वाफ , गुळण्या औषध लगेच सुरु केल . सकाळी उठला की फार नाही पण सर्दी व घसा दोन्हीही थोडंस त्रास देऊ लागलं .आम्ही आमच्या फॕमिली डाॕक्टरकडे जाऊन आलो . त्यांनी औषधे दिली पाहूया म्हणाले . दुसरे दिवशी संध्याकाळी त्याला थोडीशी कणकण वाटली तसे आम्ही दुसऱ्या डाॕक्टकडे गेलो व टेस्ट केली तर टेस्ट पाॕजिटीव्ह !!
घरातला सगळा मूडच चेंज झाला  आशिषला स्वतःला फारच कसतरी वाटू लागले . तो बेसीन सुद्धा वापरेना आपल्यामुळे घरातल्याना त्रास नको ही त्याची भावना . होम आयसोलेशन सांगितल्यामुळे शेजारचा फ्लॕट किंवा हाॕटेल याचा विचार सुरु झाला इकडे बार्शीला फोन झाला तसे लांब असल्यामुळे आई-पप्पा , आकांक्षा यांना पण काळजी वाटू लागले . होम आयसोलेशन आहे तर बाहेर रहाण्यापेक्षा बार्शीला आलं तर  वरच्या घरात रहाता येईल असं त्यांचे म्हणणे येऊ लागले . पण येणार कसं आशिष तर ड्रायव्हींग करु शकणार नाही आणि ड्रायव्हर मॕनेज करता येणार नाही पप्पा तर म्हणू लागले मीच येतो .
इकडे आई-बाबांना पण आम्हांला बाहेर पाठवणे जिवावर आलं पण इलाज नव्हता . मग  फ्लॅटपेक्षा हाॕटेलवर चांगली व्यवस्था होईल म्हणून बाबानी हाॕटेलवर आमची व्यवस्था केली  व बार्शीला पण फोन करुन सांगितले 
" कोणीच कुठेच हलू नका , काळजी पण करु नका आपण फोनवर संपर्कात राहू आता सतरा दिवस जागा पण सोडता येणार नाही . तब्ब्येतीची काळजी घ्यायची आणि वेळ घालवायचा !"
त्याप्रमाणे आम्ही हाॕटेलवर रहायला गेलो पथ्याप्रमाणे  घरगुती डबा लावला . चौदा दिवसांचा अनुभव सुरुवाती पासूनच मला वेगळा जाणवत होता म्हणून मी तो जसा दिवस जाईल तसा लिहून काढायचे ठरवले . त्याप्रमाणे मी चौदा दिवस डायरी लिहीली . त्याची लींक मी पाठवेन .
आठदहा दिवसांनी आई-बाबांना पण वाटू लागलं क्वारंटाईन संपल्यानंतर चार दिवस घरी राहिलं पाहिजे मग बार्शीला फोन झाल्यावर आई-पप्पा पण म्हणाले थोडंस राहूनच या त्यात माझा 12 जुलैला वाढदिवस ! इंजिनियरींगला असतांना मी वाढदिवसाला मिरजेत होते मग सहा वर्षांनी पुन्हा यावार्षी मिरजेत वाढदिवस  . आज माझ्या बरोबर आशिष आहे सगळे रिलॕक्स मूडामध्ये आहेत , तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मला मिळाल्या मजा आली धन्यवाद . आता इकडून पुण्याऐवजी आम्ही बार्शीलाच जाऊ असे वाटतेय  पाहू .

ते चौदा दिवस !!


दिवस एक (26 जून )

आमच्या आई लाॕकडाऊन डायरी लिहितात

मग विचार केला.. आपण पण लिहू क्वारंटाईन डायरी...

आशिष ला कोरोना झालाय. रॅपिड टेस्ट पॉझिटव्ह आली आहे. RTPCR ची प्रतिक्षा सुरू आहे. 

कोरोना ह्या आजाराने सगळे आडाखे नियम रूढी परंपरा पार उखडून टाकले आहेत.

असंख्य विचार आहेत मनात... एकीकडे आशिषला काही त्रास होऊ नये ह्याची काळजी... दुसरीकडे आई बाबांना काही लक्षणे येऊ नयेत ह्याची प्रार्थना... 

वरकरणी शांत आणि धीटच राहावं लागेल कारण आशिष चे मन खात आहे हे जाणवत आहे. 

आम्ही दोघं राजा राणी एका खोलीत बंद आहोत... राणी खाली गादी घालून मास्क मधे बंद.. राजा पलंगावर RTPCR रिपोर्टची चातकासारखी वाट पाहतोय...

सगळ्या सोयी सुविधा आहेत... चहा कॉफी नाश्ता जेवण! मिरजेत असल्याचा फायदा दुसरे काय...

बाबांचा फोन आला... डॉ भट ना दाखवून या. मग आम्ही दोघे गेलो डॉ कडे... त्यांनी आशिषला तपासले... आणि अत्यंत शांतपणे एक डझन निरनिराळ्या प्रकारची औषधे लिहून दिली. RTPCR रिपोर्ट वर फारसे काही अवलंबून नसल्याचे तिथेच स्पष्ट झाले. मला सध्या तरी काहीच त्रास नाही. प्रीकाॕशन म्हणून मला अर्धा डझन गोळ्या... गोळीबार सुरू झाला.

मला कळत आहे की आशिषला कुठे तरी अपेक्षा आहे की RTPCR निगेटिव्ह यावी. मला नाहीये अपेक्षा... एक वर्ष कोरोनाचा अभ्यास झालाय सर्वांचा. एक नक्कीच आहे की हलक्यात घेण्याचा हा आजार नाही. त्यामुळं मी माझ्या मनाची तयारी केली आहे आणि तशी काळजी पण घेत आहे.

कुठेतरी इच्छा आहे की मी साफ चुकीची ठरावे...चमत्कार व्हावा.

पण छे... ह्या कोरोनाच्या आईचा घो!!!

आशिषच्या फोनवर मेसेज आला. अपेक्षेप्रमाणे  रिपोर्ट पॉझिटव्ह आला. आशिष पुरता हादरला! 

नेहमीसारखा डोळे मोठे करून मला लांब रहा बर का.. मास्क घाल की... Sanitize कर ना हात.. असे पालुपद सुरू झाले. मी हे सगळं गेले दोन दिवस त्याचा घसा दुखत असल्यापासून करतीच आहे तरीपण...

नेहमीची वेळ असती तर मी त्याला उलट उत्तर दिली असती (स्वभावदोष?). पण आज वेगळं होत... त्याला भीती वाटली होती. मी खूप शांतपणे त्याच सगळं ऐकून घेतलं!  त्याला हवं तस केलं...

त्याला थोडा वेळ लागणारच होता...

तसा तो मिळाल्यावर मग मला. म्हणाला

 " कीर्त्या, खरंच कोरोना झाला की ग मला..." 

आणि हसायला लागला... हुश्श झालं मला!! मग मी पण "भित्यापाठी ब्रह्मराक्षस..." 

असं म्हणल्या वर मूड लाईट झाला

आता acceptance हा प्रॉब्लेम सुटला होता... आता मुख्य टप्पा आहे... काळजी घेणे आणि पटापट बरे होणे. 

निलेश काका साठे रोज नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण आणून देणार आहे . जेवण मस्त आहे... अगदी सात्विक आणि रुचकर. 

सगळ्यांनी मला सांगितलं आहे की गोळ्यांनी अशक्तपणा येतो आणि त्यामुळं खात राहील पाहिजे. आणि आशिष तर दोन जेवणं सोडली तर अधेमधे चहा सोडून काही म्हणजे काहीच घेत नाही ! आता ह्याला सतत खायला देणे म्हणजे सत्वपरीक्षाच आहे !

आई-बाबा , आई-पप्पा , आकांक्षा सगळे हवालदिल आहेत. त्यांना शक्य तितके अपडेट द्यायचं काम करती आहे...

एक महत्वाचा बदल म्हणजे आशिष थोडा अबोल झालाय... औषधांचा मारा सुरू असल्याने थकवा आहेच.  शिवाय सतत आपल्याला आणि आपल्यामुळे काय होतंय की काय? अशी टांगती तलवार आहेच त्याच्या डोक्यावर! 

खूप विचारांचा गोंधळ उडालाय त्याच्या डोक्यात. मी सगळ्यात जास्त काळजी घेतो.. मग मला कसा काय झालं कोविड? कोणकोणत्या संपर्कात आलोय मी? मी ढिला पडलो का? मला मिरजेला येऊन का झालं हे???? 

एक ना अनेक! परत ते गूगल आहेच छोट्या छोट्या गोष्टींना.. Google the necessary evil!!

सूप पिताना थोडासा खुलला तो... मग आम्ही एकत्र friends बघत जेवण केलं. खूप बरं वाटलं तेवढ्या वेळाने सुद्धा.

12 च्या सुमारास झोपलो दोघेही... अशा रीतीने quarantine पहिला दिवस समाप्त !!


दिवस दोन ( 27 जून )


सकाळी साडेसातला दिवस सुरू झाला माझा.. छान झोप झाली. Ashish अजुन झोपला आहे. मग म्हणलं राहूदे पडून राहावं... उगाच खुडबुड करून त्याला जाग येते. कुठे कोर्टात तारीख आहे गडबडीने आवरायला... निवांत लोळत पडले...

आज आई पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस ! सगळ्या ग्रुप वर दवंडी पिटवली!!!

8.15 ला आशिषला जाग आली... नित्यनेमाने गुळण्या केल्या ,ब्रश केला . 

Acidity ची गोळी घेऊन दिवसाचा नारळ फुटला!

आता चहा आणि नाश्ता करायचा म्हणून त्याच्या मागे लागले... इडली चटणी नाश्ता आला वेळेत. 

कशाबशा त्याने दोन इडल्या खाल्ल्या... गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून खातोय तो... कळतंय मला..

थोडा कफ आणि खोकला वाटला म्हणून महेशदादाला औषध आणायला सांगितलं! महेश दादा हा एक पु. लंचा नारायणच आहे ! पेशाने तो दुकानदार आहे... पण सल्ले पार डॉक्टर, वकील, सरकारी, पोलिस सगळे देऊ शकतो.. एका कोविड सेंटरला त्याने वाहून घेतलं असल्याने सगळी इत्यंभूत माहिती आहे आणि पूर्ण वाहवून घेण्याचा स्वभाव. 

बाबांकडे अशी काय जादू आहे काही समजत नाही... माणसं जोडली की कायमचीच.. फेविकॉल का जोड ! आत्ता काय किंवा इतर वेळी काय... कुठे ही गेलो तरी ओळखीचा एक तरी माणूस सापडणारच ! अक्षी मला म्हणते तशी मिरजेत कायम पूर्ण नावच सांगायचं तू.. हेहे. पण आत्ता हे सगळं सुकर होतंय .

पुन्हा फोन मधे डोकं घालून वेळ काढला.. घरी wish करायला फोन झाला . जेवण आल्यावर आशिष भूकच नाही म्हणून बसला होता... फार मुश्किलीने त्याला थोड तर खा म्हणलं... तर पठ्ठ्याने पूर्ण जेवण आणि आईने दिलेली वाटली डाळ पण फस्त केली . औषधाने त्याला भूक लागते आहे... खाणे गरजेचं आहे . वाफ घ्यायचा आणि गुळण्या करायचा प्रचंड कंटाळा येतोय त्याला... पण ते ultimate solution आहे असं आमच्या घरातल्या खुद्द कोविड वॉरियर डॉ. केतकी ह्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळं किती का चिडचिड करेंना हा... मी मागे लागून करून घेणार.

अतिशय कंटाळा आला आहे आता . एका पिंजऱ्यात बंदिस्त केलेला सिंह कसा असेल... अस्वस्थ येरझाऱ्या सुरू... वेळ झाली म्हणून जेवण आणि झोप . 

संध्याकाळी आज मात्र स्वतःहून आशिष ने घरी फोन केला . काल परवा तूच बोल म्हणत होता मला . आज छान बोलला घरी . आकांक्षाशी पण बोलला..

जरा होमसिक आहे... जाणवत आहे मला . पण सध्या पर्याय नाही . जितका लवकर बरा होईल तितका लवकर कंटाळा मुक्ती !

आज म्हणाला मी pubg खेळतो... आनंदच झाला मला... नॉर्मल कडे वाटचाल... अजून काय !!

थोड मित्रांसोबत वेळ घालवला की फ्रेश होईल . बरं आहे तेच .

आत्ता वाटत आहे केतकीने कसं केलं असेल हे सगळ मॅनेज ? सरकारी दवाखाना.. अपुऱ्या सोयी... काळजी घ्यायला कोणीच नाही... प्रचंड अशक्तपणा , थकवा आणि अखंड एकटेपणा ! मानलं तिला... तावून सुलाखून डॉ झालीये पोरगी . आत्ता समजत आहे.

आता रोज सूप प्यायला सुरू केलंय . गरम पण आहे आणि पोट सुद्धा भरते !

आज मला खूप झोप येतीये . कफ सिरप घेतलय आणि दिवसभर झोपले सुद्धा नाही. 

जेवण करून केव्हा एकदा ताणून देते असा वाटत आहे . जेवण आलं.. मसूर उसळ आणि पोळी होती . आशिष आज म्हणाला संध्याकाळी भात असला तर बरं पडेल... उद्या सांगेन त्यांना... संध्याकाळी भातच द्या म्हणून !

जेवण झालं.. 3-4 मिनिटे चालून ऑक्सिजन चेक करून झाला . सगळं नॉर्मल आहे .

आता शांतपणे आपापले हेडफोन्स घातले आणि झोपायची तयारी सुरू...

अशा रीतीने quarantine दुसरा दिवस समाप्त 😊



दिवस तीन ( 28 जून)


आज सकाळी 6 ला जाग आली . पण मग विचार केला करायचं काहीच नाही.. परत गुडूप झोपले.. थेट 8 ला जागी झाले..

आज ऑफिस आहे माझं

आशिष उठला... तेवढी छान झोप झाली नाही म्हणाला . मी फ्रेश आहे आज . नाश्ता आला... आशिषला कोरडे पोहे जात नव्हते.. मग म्हणलं जातील तेवढे खा आणि मग एक दोन बिस्कीट खा . 

थोडसे पोहे आणि चहा प्यायला फक्त त्याने..

औषधं घेतली.. मी डेटॉलचा स्प्रे मारला रूम मध्ये... आशिष म्हणाला "वास येतोय का ग ह्या स्प्रेचा ?"

 मी म्हणलं "हो येतोय की !"

चटकन लक्षात आलं... वास यायचं बंद झालं आहे !!!

आता त्याचं जर्मन शेफर्ड सारखं सर्व गोष्टी हुंगुन पाहणे सुरू झालं. काय करणार ?? पंचेंद्रिय सुरू असलीच पाहिजेत ही धारणा...

आजची महत्त्वाची प्रगती म्हणजे घसा दुखणे पूर्णपणे बंद आहे... डॉक्टरनी काही औषधे 2 दिवसांनी बंद करायला सांगितली आहेत .

फार बर वाटत आहे ह्यामुळे..

पण जबरदस्त थकवा आलाय त्याला... उठून पाण्याचा ग्लास घेतला तरी थकायला होतंय आणि काहीही झाले तरी मी त्याच्या हातात काहीच नाही देऊ शकत... डोकं दुखायला लागलं तर दाबून नाही देऊ शकत... शेजारी बसून गप्पा मारत चहा नाही पिऊ शकत... बांधून ठेवल्यासारखे झालंय !

सकाळचा चहा झाल्यावर गाढ झोप लागली त्याला . 

थेट जेवायला उठला .

आज जेवायला पण भूक नाही म्हणत होता... पण औषधे इतकी आहेत की जेवलच पाहिजे . मारून मुटकून जेवायला सुरू केलं .

जेवण झाल्यावर थोडी भूक आहे थरथरत आहे म्हणाला.. एक दाण्याचा लाडू आणि अर्धा ग्लास ORS पिल्यावर कुठ शांत झाली भूक .

इतक्या औषधांमुळे भूक निश्चितच लागत आहे.. ह्याची जाणीव झाली मला... 

माझे काम सुरू असल्याने आज वेळ पटकन पळत आहे . कपडे धुवून झाले . अंघोळ झाली . 

एक गोष्ट जाणवत आहे... माणूस जिथे कुठे असेल त्या जागेला आपले घर बनवतो. 

आता ह्या छोट्याश्या खोलीत एक कोपरा माझा आहे आणि एक आशिषचा . वाफेचे मशीन ठेवायची जागा ठरलेली आहे... पाणी उकळायची किटली ठेवायची एका छोट्या टेबल वर . ह्याचे बॉक्स शेजारी शेजारी ठेवून त्यावर औषधे लाऊन ठेवली . 3 hanger ला कपडे वाळत घालायचे . एका टेबल जवळ खाऊ , कपडे आणि पाणी वगैरे आहे .

खोलीभर डेटॉल आणि sanitizer चा गंध (की सुगंध?) पसरला आहे . 

 कंटाळा आला कंटाळा आला असे म्हणत दिनक्रम सुद्धा भरगच्च झालाय . नुसते पाणी उकळा , वाफ घ्या आणि गुळण्या करा... ह्यात अर्धा दिवस संपून जातोय .

कधी एकदा बरे होऊन बाहेरच्या मोकळ्या हवेत जातोय असे झालंय... पण आत्ता waiting period आहे त्यामुळे patience च मदत करेल .

महेश दादा रोज येऊन जातोय... थोड दार खिडक्या उघडा.. थोडे बिनधास्त रहा... बाहेर पडा... चाला... असे सांगतायत.

पण आशिषकडे आत्ता तेवढी ताकद नाहीये की तो बाहेर जाऊन चालून वगैरे येईल...

मी मात्र रोज चालायला सुरू  केलं आहे . नुसत बसून फुगा होईल माझा .

आज थोडी acidity झाली आहे आशिषला . तस तर त्याचं पित्त खवळतच लगेच !!! आता एवढी औषधे... मग नाही झालं तरच नवल!

आज रात्री भात एके भात त्यामुळे :-) 

आज काहीतरी नवीन म्हणून सहज स्विटकॉर्न सूप मागवलं . आणि मस्तच लागलं !! आवडीने खाल्ल .

आज आसावरी पुष्कराज सोबत व्हिडिओ कॉल झाला . खूप दिवसांनी खूप खूप गप्पा झाल्या... जशा आधी व्हायच्या !! बरं वाटलं खूपच . एकटेपणा वाईटच... पण सक्तीचा एकटेपणा जास्त जाणवतो... त्यामुळं हे गॉसिपच टॉनिक लागतच मधे मधे...

जेवण केलं... आशिषची पाठ दुखत आहे . मला वाटतंय की सतत झोपून किंवा बसून राहिल्याने असेल . आईंना कोरोना झालेला तेव्हा त्यांची सुद्धा पाठ दुखत होती. कदाचित आनुवंशिक असेल response शरीराचा...

उद्या सकाळी थोड स्ट्रेचिंग करायला लावेन म्हणजे आखडले असेल तर बरं वाटेल .

बाकी आवाज पण थोडा पूर्वपदावर येऊ लागलाय .

लवकर लवकर आणखी सुधारणा होऊदे म्हणजे झालं...

आता पुन्हा एकदा दोघेही आपापल्या अंथरुणावर आडवे..

अशा रीतीने quarantine तिसरा दिवस समाप्त

🙂



दिवस चार ( 29 जून )


आज सकाळी उठले आणि लगेचच काम सुरू करावं लागलं..

नाश्ता आला होता आणि इकडे कॉल सुरू! आशिष झोपलाच होता अजून... थोडी तारांबळ उडाली माझी आज... ऑफिसच काम आणि रूम मधल्या सर्व गोष्टी मॅनेज करताना...इतकी की मी आज अंघोळच नाहीये केली!!! 

चहा पण उशिराच घेतला आज... आज आशिष एक्स्ट्रा फ्रेश आहे. आज स्वतःहून वाफ आणि गुळण्या लक्षात ठेवून केल्या... 3 मिनिटा ऐवजी 6 मिनिटे  चालून ऑक्सिजन चेक केला!! 

खिडकी दार सगळं बंद असतं रोज.. मला गरम होत  असतं.. पण ह्याला थंडी वाजते... आज स्वतःहून उघड म्हणाला खिडकी.. छोटे छोटे बदल... पण फरक फार मोठा पडतो!

डॉक्टर नी शुक्रवारी रिपीट  चेकअपला बोलावलं आहे... आम्ही अक्षरशः तास मोजतो आहे शुक्रवार यायचे! 

आज मात्र दुपारच्या जेवणानंतर आशिष कुरकुर करायला लागला.. इतके दिवस त्रास होत असल्याने काही सुचत नव्हते त्याला

आता मात्र, कंटाळा आलाय, पडून राहून पाठ दुखती आहे वगैरे तक्रारी ऐकू येत आहेत.

आई बाबा केतकी पण बरे आहेत... 14 दिवस होईपर्यंत आमच्या कोणाचेच चित्त थाऱ्यावर येणार नाही. कोणाला शिंक जरी आली तरी बाकीच्यांची भुवई उंचावलीच म्हणून समजावे! टांगती तलवार आहे ही धास्ती... तरी आई-बाबा, केतकी ह्यांचे vaccine चे दोन्ही डोस झाले आहेत ही एक जमेची बाजू. आमच्या दोघांचा सुद्धा एक झालाय तसा...असो!

आजसुद्धा आशिषला वास येत नाहीये... ऑरेंज क्रीम बिस्कीट दर 2 तासांनी 3-4 वेळ हंगुन गट्ट करतो आहे आज..

सध्या त्याचं डोकं पूर्ण वेळ एकच प्रश्न सोडवण्यात लागलं आहे... त्याला लागण झाली कशी आणि कोणामुळे? मुख्य संशयित आहेत बार्शीचा दहीवाला, मिरजेची फरशीची बाई आणि बिल्डिंगची लिफ्ट! ठोस पुरावा मिळेपर्यंत शोधकार्य चालू ठेवणार आहे तो... हाहा!

आजचं सूप खारटच आलं... मूड ऑफ झाला दोघांचा .

आज दिवस खूप वेगाने सरला... कामात गुंतलेले असले की चांगले किंवा वाईट कसलेच विचार करायला वेळ नाही मिळत.. तस आज झालं मला... काही तास मी कोरोना, sanitizer आणि ताण ह्यापासून लांब होते 

Overall छान दिवस गेला

जेवण झालं... झोप आली आहे बरीच..

त्यामुळे बॅक to comfy position!

Quarantine चा चौथा दिवस समाप्त!




दिवस पाच ( 30 जून ) 


आज उठल्या उठल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे अंघोळ... आज भरपूर काम आहे ऑफिसच... सगळं पटपट केलं आणि कामाला बसले...

काल रात्री डास चावत होते त्यामुळे आशिषची झोप झाली नव्हती... तो बराच उशिरा उठला..

आज नाश्त्याला आप्पे आहेत.. इतके मस्त आणि लुसलुशीत होते... मस्त मटामटा खाल्ले!

आशिषने पण नाश्ता केला... आशिष काल पासून हॉटेल मधला पुलाव किंवा बिर्याणी मागवूया म्हणतोय.. पण मला रिस्क वाटत आहे. आत्ताच बरा झालाय तर कशाला...

आज उठल्यापासून तो उचकलेलाच आहे... नुसती चिडचिड!

त्यात आज पुण्याहून आयुर्वेदिक औषधे आली. गुळण्या आणि काढा ह्याची भर! आता त्याला बर वाटत आहे.. त्यामुळं आता मोकळेपणाने फिरावं, खावं, प्यावं असं वाटतंय त्याला... साहजिक आहे... पण ते शक्य नाहीये ना..

मी अस सांगितलं आहे त्याला की आज 5-6 वाजता प्लेन डोसा मागवूया. त्यातल्या त्यात कमी तेलकट म्हणून मी तो मार्ग काढला...

पण कुठलं काय.. लॉकडाऊन मुळे रेस्टॉरंट बंद आहे. फक्त Chinese food मिळेल. मग बाहेरून मागवणे कॅन्सल!!

पुन्हा चिडचिड झाली... 

डॉ. शिवानंदशी फोन वर बोलणे झाले. ते म्हणाले गुरुवारी 1 week पूर्ण होतो आहे ,पहिली लक्षणे दिसून.. त्यामुळं आम्ही मोजत होतो त्याच्या मागे 2 दिवस कॅलेंडर पळाले असे समजले!! त्यामुळे उद्या आम्ही निम्मा पल्ला गाठू शकतो!

केतकीच्या मते आई बाबांना आता काही धोका नाहीये... Thank god!

आता शुक्रवारी डॉना प्रत्यक्ष दाखवायचं आणि मग पुढच्या आठवड्याचा प्लॅन ठरवायचा.

आम्हा दोघांनाही आता खरंच कंटाळा आलाय.. तेच ते जेवण आणि तीच ती खोली...

रोज मागवला की आयता ग्लास मधला चहा हातात येतो आहे.. पण आता आठवण येती आहे ती स्वतः आधण टाकून भरपूर आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाची...

खोलीचा दरवाजा उघडून निःशंक पणे बाहेर फिरायचे वेध लागलेत. मला आधी वाटायचं की मला माझा फोन, बेड आणि wifi दिले तर मी कुठेही आणि कितीही काळ राहू शकेन.

पुन्हा एकदा कोरोना ने ते सर्व आडाखे चुकीचे ठरवले... 

मी रोज थोडा वेळ गॅलरीमधे जाऊन उभी राहते.

तेवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क!

आज तर चक्क मी आशिषला म्हणाले की मला खालच्या मोकाट कुत्र्यांचा हेवा वाटतोय.. ती मोकळी, विना मास्कची,बिनधास्त फिरत आहेत. ना कसली भीती.... ना कसली बंधने...

असो.. थोडक्यात, इतका कंटाळा आलेला आहे!

आज रात्री 9 पर्यंत तर मीटिंग होती माझी. त्यामुळे दिवस तर बिझीच गेला

आशिष सगळ्याssss भाज्या खातो. अगदी शेपू आणि कारले सुद्धा आवडीने खातो. नखरे माझे बरेच आहेत ह्या विषयात.. त्याला कमी आवडणारी भाजी एकच! भेंडी...! ( ही माझी आवडती भाजी आहे btw)

आज रात्रीच्या डब्यात जरा भारी भाजी असावी अशी माझी इच्छा... तेवढंच जरा मूड lifting

डबा उघडला तर त्यात भेंडी!

मी म्हणलं बोंबलाsss!! तरी शांतपणे खाल्ली बाबा भाजी! आणि मला तर आवडलीच!

उद्या काहीतरी छान खायला पाहिजे म्हणतोय!

बघू. उद्या सकाळी मातोश्रींना कळवावे! ती काहीतरी बिन तेलाचा, खमंग आणि पचायला हलका असा छान पदार्थ शोधून, खायला देईलच करून.

अशा तऱ्हेने quarantine चा 5 वा भेंडीमय दिवस समाप्त!





दिवस सहा ( 1 जुलै )


आज लिहायची पण इच्छा नाही,इतका कंटाळा आलाय!

पण, माझी प्रथम वाचक(pencil speaks) विचारेलच!! म्हणून हे पांढऱ्यावर काळे..!

आता मला Philips जॉईन करून जवळपास एक महिना होऊन गेला... त्यामुळं नवीन नवीन असतानाचा निवांतपणा आता नाहीये. माझी माझी अशी कामे आहेत आणि first impression जमवायचे आहे. त्यामुळे जरा लक्ष देऊन काम करावे लागते. 

थोडीशी अडचण होती आहे इथून काम करताना. इंटरनेट तशी बरीच साथ देते आहे... पण औषधं, चहा, नाश्ता, जेवण आणि हॉटेलचा स्टाफ हे सगळं मॅनेज करणे थोडंसं कठीण होतंय. तरी 2-3 दिवस झाल्याने schedule बसलय बऱ्यापैकी!

पुण्यातील आयुर्वेदिक डॉ. नीलिमा कुलकर्णी ह्यांची औषधे आम्ही सगळेच (देशपांडे - कुलकर्णी) घेतो. गुण चांगलाच आहे. 

काल त्यांचा 14 दिवसांचा डोस आला. कालपासून सुरू झालाय आशिषला. ते घेतल्यापासून चांगलाच थकवा येतोय त्याला. आयुर्वेदिक उपचार पद्धती अशीच असते वाटतं.

आज दिवसभर नुसता झोपतो आहे आणि रात्री टक्क जागा असतो! 

आज आईने धिरडे पाठवलेले. असली मज्जा आली खायला!! वा वा! अन्नदाता सुखी भव.

आज आशिषला कॉफी पिताना किंचीत वास आला.. इतका आनंद झाला पठ्ठ्याला!! 

उद्या डॉ कडे follow-up ला जायचं आहे. थोडी औषधं कमी केली तर फार फार बर होईल... 

बहुधा तरी राहायची जागा नाही बदलणार. पण किमान खाण्यापिण्यात थोडी सवलत मिळावी  अशी आशा आहे. जिभेचे चोचले... दुसरं काय!

संध्याकाळी आशिषला फोन आला की त्याचं बार्शीत tracelink(त्याची कंपनी) कडून कुरिअर आलंय. 

थोड्या वेळाने family ग्रुप वर आईंनी फोटो टाकला.. कंपनीने "Get well soon! From your tracelink family" असं ग्रीटिंग कार्ड आणि एक मोठा बॉक्स पाठवला आहे.  त्या बॉक्स मधे च्यवनप्राश, 3-4 प्रकारचे मध, लेमन टी अशा healthy गोष्टी आहेत.. किती छान कल्पना!


ही कंपनी जॉईन करून त्याला अवघे 15 दिवस च झाले असताना... कोरोना मुळे अचानक दोन आठवडे सुट्टी घ्यावी लागते. तेवढी रजा अजून जमा देखील नाही झाली. त्या बाबतीत काळजी करू नका आणि लवकर बरे व्हा असे आधीच manager ने सांगितलेलं. त्याऊपपर आता हे गिफ्ट! हुरूप येतो अशाने काम करण्याचा..  त्या गोष्टींच्या किमतीपेक्षा त्या मागचा विचार आम्हाला सगळ्यांनाच भावला!

 काही काळ का होईना आम्हा दोघांची मरगळ झटकून टाकली ह्या गिफ्ट ने!

आज आई आणि दोन्ही मावश्यांशी व्हिडिओ कॉल झाला. सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांना बघून बरे वाटले. 

खर तर आम्हाला दोघांनाही एकमेकांना बघायचा आणि बोलायचा कंटाळा आलाय. आता आशिष बऱ्यापैकी नॉर्मल दिसतोय. वास सोडला तर अडचण काहीच नाही. पण अजून त्याला आतून तो बरा झालाय अस वाटत नाहीये.

उद्या डॉक्टरना दाखवल्या नंतर त्याचा confidence थोडा वाढेल की तो बरा झालाय. 

त्यामुळं आता उद्याची वाट पाहत रात्री झोपणे!

अशा तऱ्हेने quarantine चा 6 वा दिवस समाप्त!



दिवस सात ( 2 जुलै)


आज शुक्रवार असल्याने काम कमीच आहे. आज डॉक्टर कडे जायला बाहेर पडायचे आहे..

 तब्बल 8 दिवसांनी बाहेरची माणसं, हवा, वारे मिळणार आहे... मी तर excited आहे.

11.45 ला डॉक्टर कडे गेलो.. त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या ब्लड, युरीन आणि x-ray वगैरे ..

तपासून तब्येत छान आहे म्हणाले.

पण रिपोर्ट बघून ठरवू पुढचं असे सांगून 1 तासाने या म्हणाले.

जेवायची वेळ झालेली... पण आता आशिषला परीक्षेचा निकाल लागणार असल्या सारखे टेन्शन आले आहे त्या टेस्ट चे!.. जेवायला नकोच म्हणून बसला. 

पण अशक्तपणा इतका आहे की न जेवता त्याला पुन्हा दवाखान्यात नेणे खूप चुकीचे ठरेल. खूप convince केल्यावर थोडंसं जेवला आज...

मग 2 वाजता आम्ही पुन्हा गेलो. 

दवाखान्याच्या बाहेर गर्दी इतकी होती की एक क्षण वाटलं मोर्चा वगैरे आलाय की काय! आत शिरल्यावर(घुसल्यावर?) कळलं की ही रांग MR लोकांची आहे!!

डॉक्टरना रिपोर्ट आणि xray दाखवला. इन्फेक्शन काहीच नाही आता असं सांगितलं! Yesss!

पण मागच्या रिपोर्ट च्या तुलनेत WBC count थोडा कमी झालाय... इन्फेक्शन नंतर तो होतोच असं म्हणाले.

एक डझन गोळ्या पासून दिवसाला 3 गोळ्या अशी बढती झाली आमची!!

आता आम्ही मुख्य प्रश्नाला हात घातला "quarantine कब तक?"

त्यांनी शांत चेहऱ्याने आणखी 

 10 दिवस isolation मधे रहा असं सांगितलं! "घरी बाबा आहेत ना ,त्यामुळे रहा!" अशी अजून फोडणी दिली त्यावर!

आम्ही घासाघीस करायचा निष्फळ प्रयत्न केला.. 

पण ते म्हणाले पुढच्या रविवार पर्यंत रहा तिथेच!

पथ्य काही नाही आता, त्यामुळे खावा काहीही असं म्हणाले.. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!

आणखी 10 दिवस आता त्याच रूम मधे राहायचं आहे!!! हे जाम बोअर होणार आहे हे लक्षात आलं!

देशपांडे आणि कुलकर्णी दोन्ही कडे ही साठा उत्तरांची  कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपुर्ण केली!

आई- पप्पा आता बार्शीला या म्हणत आहेत! तिकडे आरामात isolate होता येईल... वेगळ्या खोल्या, बाथरूम वगैरे सगळी सोय आहेच. 

पण आम्ही तिकडे गेलो तर आई काही ना काही वेगळं खायला करायला लागणार आणि पर्यायी त्यांची दमणूक होणारच! मी isolation मधे असल्याने त्यांना काहीच मदत नाही होणार. त्यामुळे मला ते चुकीचं वाटतंय. आशिष घरी आजी आजोबा असल्याने नको म्हणात आहे जायला.

माझी आई बरं झाल्यावर 1 आठवडा राहून, धष्टपुष्ट होऊन जावा असा काहीतरी अवघड पर्याय देत आहे...

आम्ही दोघांनी शेवटी असं ठरवलं की आज काहीच नाही ठरवायचं. पुढच्या आठवड्यात ठरवू!

आज स्वातंत्र्य मिळाले आहे खाण्याचे!!

मग आम्ही 6 वाजताच मेनू चा मन लाऊन अभ्यास सुरू केला...

शेवटी कमी तेलकट पनीर क्रिस्पी वर एकमत झाले! 

खाऊन तृप्त झालो आणि मग नेहमीचा पोळी भाजीचा डबा आला, तो खाल्ला.

उद्या सुट्टी!! त्यामुळे निवांत झोपायचे आज...

अशा तऱ्हेने quarantine चा 7वा दिवस समाप्त



दिवस आठ (3 जुलै )


कीर्ती उठ, कीर्ती उठ! अशा हाकांनी आज जागी झाले...

8.30 वाजलेले !! बाप रे.. नाश्ता द्यायला आलेले काका दार वाजवत होते. आणि माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती...

झोपेतच नाश्ता घेतला. आज उत्तपा होता! भारीच...

मी आवरून पटपट हाणले ! आशिष ने कुरकुर करत अर्धा खाल्ला कसाबसा.

मळमळतय म्हणाला.. मला वाटलं असेल काहीतरी बारीसारीक. थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बापरे... नवीन गोळ्यांमधे acidity ची गोळी नाहीये! 

फार काही खाल्ले नसल्याने त्याला गोळी दिली. मग जरा वेळाने बरं वाटलं लगेचच... हुश्श्य

आमचं पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लॅन सुरू आहेच. पण मागच्या आठवड्यात रिकामपणाच्या उद्योगात मी एका scheme वाल्यांना वीकेंड ला व्हिडिओ कॉल करू असे सांगितलेले! 

आज दोघेही जॉईन झालो त्या कॉलला. तेवढाच टाइमपास. आता ते माग लागलेत साईट वर या आणि बघा वगैरे वगैरे... त्यांना कोण सांगणार की आम्हाला आमचे डॉक्टर कुठेच नाही सोडत म्हणून :-( 

वेळ बाकी छान गेला .

आज आईने मेथीची पीठ पेरून भाजी आणि गोड सांजा पाठवला आहे!! Yayy!

आसावरी पुण्यात आहे आणि अक्षी पण!

आमचा भेटायचा प्लॅन होता ह्या आठवड्यात पुण्याला... Excited होते मी.

आता पुन्हा आसावरी येणार 3-4 महिन्यांनी.

मग भेट लांबणीवर पडलीच.

आम्ही पण इथून आता बार्शी लाच जाऊ... त्यामुळं अक्षी पण नाही भेटणार 

पुढच्या सोमवारी ( 12 जुलैला) माझा वाढदिवस आहे. आणि आमचं quarantine 10-11 ला संपत आहे 

त्यामुळं बार्शी का मिरज हा मोठा प्रश्न आहे!!

आई (बार्शी) म्हणल्या की घरात सगळीकडे फिरता येणार का हे डॉक्टरना विचारून रहायचं ठरवा!

माझ्या आईने डॉ. भट आणि डॉ. शिवानंद दोघांना फोन करून confirm केलं की आम्ही रविवारी घरी आलो तर चालेल का! दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला.

त्यामुळे अजून एक आठवडा तरी आम्ही मिरजेतच आहोत असं सध्या तरी ठरतंय.

आज माझी थोडी चिडचिड झाली असं मला जाणवत आहे. 8 दिवस एकच एक खोली आणि तेच तेच करून कंटाळा आलाय.

नुसत खायचा आणि झोपायचा पण कंटाळा आला आहे.

शेजारच्या खोलीत कोणीतरी माणसं राहायला आली आहेत. आज आम्ही जेवताना त्यांच्या जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. 

मला अक्षरशः त्यांच्यामध्ये जाऊन गप्पा माराव्यात असं वाटलं... इतकी विटली आहे मी ह्या रूमला!

आज meditation केलं मी शांत राहायला.

हे अनुभव लिहून ठेवायचं कारण हेच की जेव्हा मी 4 माणसात गप्पा मारायला बसेन तेव्हा मला फोन कडे दुर्लक्ष करण्याची सद्बुद्धी यावी!! 

मी एकदा वाचलेलं की अत्यानंद, तीव्र दुःख आणि खूप भीती ह्या feelings येतात तेव्हा त्या मेंदू मधे कोरून घ्याव्यात. तेव्हा आपण जे काही केलं ती आपली ताकद बनते म्हणे.

 म्हणून हा अनुभव जो सुरवातीला भीती आणि दुःख घेऊन आला, तोच अनुभव  प्रचंड कृतज्ञता शिकवत आहे.

 रोजचा डबा, औषधे आणि असीम मानसिक आधार देणारे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक ह्यामुळे एका संकटातून सुखरूप बाहेर आलो आहे. Thankful, grateful and blessed!!

अशा तऱ्हेने quarantine चा 8वा दिवस समाप्त




दिवस नऊ (4 जुलै)


"माणूस हा समाजशील प्राणी आहे ", असं शाळेत शिकवलं होतं. 

पण ते खऱ्या अर्थाने शिकले मी ह्या 14 दिवसात.

सोयी, सुविधा, अन्न,वस्त्र, निवारा सगळं सगळं आहे. पण, चार लोकात बसून गप्पा मारणे हे काही शक्य होत नाहीये.. तसे तर मागचे पूर्ण वर्ष विशेष बाहेर फिरणे, मिसळणे, गप्पा गोष्टी हे फार कमी प्रमाणातच आहे... पण बार्शीमधे सुद्धा मी दिवसभर आशिष, आकांक्षा, आई आणि पप्पा ह्यांच्याशी आलटून पालटून गप्पा मारत असायचे. तेव्हा त्या routine चा सुद्धा कंटाळा आला होताच. पण आत्ता आहे ह्यापेक्षा ते लाखपटीने बरे!

व्हिडिओ कॉल सुरूच आहेत सगळ्यांशी... चॅट सुरू आहे. महेश दादा येऊन भेटून जातोय. आशिष आहेच समोर. (Thank god!!)

एकेकदा वाटतं अती होतंय माझं. एवढं काय बंदिस्त राहावं लागलं तर आभाळ कोसळलं की काय??

जरा चिडचिड व्हायला लागली आहे माझी. Actually दोघांची! 

मोबाईल मधेच असतो आम्ही बराचसा वेळ. गप्पा मारायच्या मूड मधे नाहीये अजून तो... जास्त force केला तर irritate होतोय. त्यामुळे मी पण आवरतच घेती आहे. त्याच्या कलाकलाने सुरू आहे.

माझी तर लोकांचे फिरताना किंवा ट्रेकिंग करतानाचे स्टेटस पाहिले ना, चिडचिड होत आहे. 

आम्ही ठरवलेलं की पुण्यातील परिस्थिती बघून थोड फिरायला जाऊ.. अगदी फार नाही तर पावसात रस्त्यावर फिरून तरी येऊ! असे अनेक प्लॅन होते जुलै महिन्यात... पण असुदे... Everything happens for a reason!

आता positive गोष्टींवर focus करायच आहे. कुढत आणि रडत बसून फक्त वेळच वाया जाणार आहे. 

आता आम्ही पुढच्या रविवारी घरी जाणार आहे. त्यामुळे countdown begins! 

(आता येऊद्या ना घरी!!!)

मी ठरवलं आहे की रविवारी haircut करायचा. पूर्ण वेगळा लूक यायला हवा. गंडला तरी चालेल. पण बदल हवा आहे!!

इथे वापरलेले कपडे फेकून द्यायचे अस म्हणत आहेत सगळे... आता मी मागच्याच महिन्यात जॉकीच्या पँट आणि टीशर्ट विकत घेतले आहेत. ते खरचं फेकून द्यावे लागतात की काय असं वाटतं आहे!!

आज आम्ही संध्याकाळी हॉटेल खालच्या पार्किंगमधे फेऱ्या मारून आलो. हालचाल गरजेची आहे...

मी रूम मध्ये आल्यावर मोबाईल आणि किल्लीवर डेटॉलचा sanitizer स्प्रे मारला. आशिष माझ्याकडे खूप आनंदाने बघायला लागला. त्याच्या डोळ्यात काहीतरी हरवलेलं सापडल्याची चमक दिसत होती. म्हणाला की "अग मला डेटॉलचा किंचीत वास येतोय.." भारीच!! फारसे काही अडत नसले तरी एक क्षमता आहेच की वास येणे. हे एक recovery चेच लक्षण! Yesss...

ह्याचे सेलिब्रेशन म्हणुन की काय आज डब्यात सोया chunks ची भाजी होती... नेहमीपेक्षा बरीच झणझीत होती. अर्थातच आशिषला खूप आवडली. शिवाय रविवार म्हणून जिरा राइस पण होता. 

मज्जा आली जेवायला. 

आता राहिले फक्त 6 दिवस!!

अशा तऱ्हेने quarantine चा ९वा दिवस समाप्त...





दिवस दहा (5 जुलै)



आज सोमवार!

मागचा शुक्रवार डॉक्टर डॉक्टर खेळण्यात गेला होता. त्यामुळे काम बरचसं अर्धवट राहिलेले. त्यामुळं आज on toes राहावं लागणार आहे.

सकाळी 9 ला काम सुरू केलं. आज leadership address ची एक मीटिंग होती, त्यात "Return to work" ची थोडीफार वाच्यता सुरू झाली आहे असं लक्षात आलं. पण "ह्या ह्या दिवशी या ऑफिसला!" असा हळदी कुंकू लावून निरोप येत नाही तोपर्यंत काही विचार करण्यात अर्थ नाही.

मी philips जॉईन केली ती लॉक्डाऊन सुरू असतानाच. लॅपटॉप सुद्धा घरपोच कुरिअर ने आलेला. त्यामुळे ऑफिस कसं दिसतं हे माहीतच नाही. पण घरापासून फार फार लांब आहे हे मात्र माहित आहे!! त्यामुळे आत्ता लगेच सुरू होऊ नये असं वाटतं आहे सध्या... असो!

आज घरून वांग्याची भाजी आली... डब्यात घेवडा. मजा आली जेवायला. 

आशिष परवा दिवशी ऑफिस जॉईन करेल म्हणातोय. मग आज त्याचा लॅपटॉप पण आणायला सांगितला घरून. त्या बॅगमधे बाकरवडी आणि लाडू पण होते!! Surprise!!

आशिष आज खूपच चिडचिड करतोय. औषधांमुळे असेल किंवा बांधून ठेवल्याने... पण वैतागला मात्र आहे आज. त्याच त्याला पण जाणवत आहे पण आवरत नाहीये. दिवसभर गेम खेळतो आहे म्हणून मी दुसर काहीतरी कर म्हणते आहे त्याला. 

भूक लागत नाहीये नुसत बसल्याने. खूप मागे लागून त्याला फेऱ्या मार वगैरे सांगती आहे. त्याने पण वैतागतो आहे.

फेऱ्या मारून पण थकवा येतोच आहे. पण हालचाल नाही झाली तर भूक लागत नाहीये... गोळ्या घ्यायच्या आहेत त्यामुळे जेवण चुकवून चालत नाही. सगळं गुंतागुंतीचे शास्त्र!

 रोज 9 ला जेवतो आम्ही. अजिबात भूक लागली नाही म्हणाला आणि खाणार नाही असं declare केलं. 

मला आज ऑफिसच्या कामाने थकवा आलेला. मला जेवताना बघून त्याची भूक चाळवेल असं वाटून मी जेवायला सुरुवात केली. त्याला हळूच म्हणलं "समोरच्या पॅसेज मधे फेऱ्या मारतोस का?"

काय माहित कसं काय.. पण तयार झाला आणि 10 min फिरून आला... 

मग मी त्याला अजिबात जेवायचा आग्रह केला नाही. शेवटी 9.50 ला स्वतःहून डबा घेतला आणि व्यवस्थित संपवला. (भूक लागलेली असते)

आजारी माणूस म्हणजे एक लहान मूल असतं! हे खरंच आहे बाबा... भूक लागलेली कळत नाही. फक्त हट्टीपणा जमतो... रागवता येत नाही. वगैरे वगैरे...

उद्यापासून सकाळ संध्याकाळ चालायला सुरू केलं पाहिजे. त्याशिवाय पोटाची भट्टी सुरू होणार नाही 

रविवारी घरी जायचंय!! आता राहिले फक्त 5 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 10 वा दिवस समाप्त!





दिवस आकरा (6 जुलै)


एक गाणं आहे संदीप खरेच "कंटाळयाचा देखील आता कंटाळा येतो!!!" 

तसे काहीसे दिवस चालले आहेत.

आज मला 7.30 लाच जाग आली. काम होत थोड त्यामुळं आवरून 8.30 लाच कामाला सुरुवात केली. आशिष गाढ झोपेत होता. मग एकटीनेच चहा घेतला. फक्त चहासाठी उठवण्यात काही तथ्य नाही.

आज जरा जास्त काम आहे आणि किचकट काम आहे. Data हाताळायची सवय नाहीये त्यामुळे थोडा गोंधळ उडतो आहे. पण नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. 

आज संध्याकाळचे 7.30 झाले काम उरकायला.

बाबा आणि महेश दादा भेंडवाडला (शेतात) गेले आहेत, त्यामुळे आज कोणीच दुसरं भेटलं नाही.

मी आजकाल सगळ्यांना व्हिडिओ कॉल करते. आशिषला कंटाळा येतो व्हिडिओ कॉल वर बोलायचा.

 माणसं दिसली की बर वाटतंय मला.

आज उशीर झाला आईंना फोन करायला.. आशिषला कॉल करायला जबरदस्तीने बसवलं.

 तर कॉल आकांक्षाने उचलला. आशिषची कळी खुललीच! एकतर खूप दिवसांनी आकांक्षा दिसत होती आणि बोलणं पण धड अस झाल नव्हत!!

मला पण बरं वाटलं बघून तिला... नवीन चेहरा आणि नवीन विषय! गप्पा, चेष्टा, मस्करी झाली. 

मज्जा आली... मी थोडी थकलेले होते कॉलवर बोलायला...

पण आशिष मात्र उत्साहात बोलला आज बऱ्याच दिवसांनी.

जेवणाची आज गंमतच झाली... 

मला भात आवडत नाही. म्हणजे मी खातच नाही. बिर्याणी,पुलाव वगैरे उच्चवर्णीय पदार्थ माझ्यासाठी "भात" ह्या प्रकारात मोडतात...(ह्याबद्दल अनेक भातप्रेमी मंडळींचा रोष मी ओढवून घेतला आहे)

त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच सांगितलेलं की माझ्या डब्यात फक्त पोळीच द्या. भात नकोच.

आता 2 दिवस आशिषला देखील रात्रीचा भात नको वाटत आहे. आज दुपारचा डबा आला की त्या काकांना हा निरोप द्यायचा अस ठरलं.

डबा आला तेव्हा नेमका माझा कॉल सुरू होता. त्यामुळे आशिषने डबा घेतला आणि त्यानेच निरोप दिला..

आज रात्री उत्साहात french fries मागवले, सूप घेतलं. मग डबा आला. मी आत घेतला आणि उघडून बघते तर काय!!!  सगळ्या कप्प्यात खचाखच भरून नुसता भात!!!

आणि छोट्या दोन कप्प्यात वरण दिलेलं.

"फक्त भात नको" च्या ऐवजी "फक्त भातच द्या" असा "ध" चा "मा" झाला असावा!!!

खो खो हसलो दोघं ती फजिती बघून..

तो भात संपवेपर्यंत नाकी नऊ आले ते वेगळंच!!

उद्या पहिली लक्षणे दिसून 14 दिवस पूर्ण होत आहेत! त्यामुळे रूम मधले social distancing उद्या संपेल. हातातल्या sanitizer spray ला आणि पर्यायी मला थोडीशी विश्रांती मिळेल उद्यापासून. 

आता राहिले फक्त 4 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 11 वा दिवस समाप्त!


 


दिवस बारा (7 जुलै)



आजचा दिवस माझा सॉलिड बिझी आहे 

सकाळी 9 ला लॅपटॉप उघडला आहे तो रात्री 10 वाजता बंद केला आहे. आज आशिषने पण ऑफिस जॉईन केले. त्यामुळे दोघेही तसे बिझी बिझी!

आज आमच्या रूम मधला टीव्ही सुरू झाला.. गेले 11 दिवस रोज सकाळी महेश दादा आला की पहिला प्रश्न: "टीव्ही सुरू आहे?"

मी नित्यनेमाने "सुरू नाही. पण असुदे, आम्ही नाही पाहत! " असं उत्तर देते. 

ते मात्र आमच्या उत्तराला न जुमानता हॉटेल स्टाफला गोळा करतात आणि दुरुस्त करून घ्या असं सांगून जातात. मग 1-2 लोक येऊन आपापल्या परीने काहीतरी करून बघतात. टीव्ही काही सुरू होत नाही. महेश दादाची पाठ फिरताच बाकी सगळे थंड!

आज मात्र रूमच बदलून द्या अशी मागणी केल्यावर येन केन प्रकारेण टीव्ही सुरू झालाय!!

आम्ही बघितला नाहीच ही गोष्ट वेगळीच!

आज मला प्रचंड काम आहे त्यामुळे चहा पाणी मागवणे, ग्लास कचरा रूम बाहेर नेऊन ठेवणे, काढा वगैरे वगैरे काम आज आशिष करतो आहे.

इतके दिवस त्याला त्याचा ग्लास, चमचा वगैरे सोडून कुठेच हात लावून दिला नव्हता. आज 14 दिवस पूर्ण झाले quarantine चे, आता तशी काही काळजी नाही. जरा मोकळेपणाने वावरू शकेल आज तो..

 पण पार कामाला जुंपल्यासारखच झालं त्याला! :-(

मला मान वर करून बघायला सुद्धा उसंत नव्हती आज.. 

घरी फोनसुद्धा झाला नाही आज माझा. एक क्लिष्ट काम आलंय. त्यावरच दिवसभर डोकेफोड सुरू आहे. उद्याचा दिवस पण असाच जाणार वाटत. 

आता घरी जायचं आहे लवकरच, त्यामुळे इथला stay enjoy करुया असं ठरवलं आहे आम्ही. आज पनीर क्रिस्पी मागवलं! मस्त लागलं...

शुक्रवारी किंवा शनिवारी पूर्ण जेवण इथलं करायचा प्लॅन आहे... बघू आता कसं execute होतंय.

आता राहिले फक्त 3 दिवस...

अशा तऱ्हेने quarantine चा 12वा दिवस समाप्त!





  दिवस तेरा ( 8 जुलै )


आज Philips ने दिलेल्या अमर्यादित, अति किचकट, सकाळी 9 ते रात्री 11 चालणाऱ्या कामाचा निषेध म्हणून डायरी लेखन बंद राहील!


ता. क. आता राहिले फक्त 2 दिवस

Quarantine चा 13 वा दिवस भुर्रकन उडून समाप्त!



दिवस चौदा (9 july)


आजसुद्धा philips च्या नावाने खडे फोडून डायरी लेखन चुकवायची पूर्ण शक्यता आहे. कामाला अगदी पूर आला आहे..

पण आज डायरी लिहलीच पाहिजे असा दिवस आहे!

2 दिवस इतकी कामात बुडाले होते की कोणाशीच फोन,मेसेज काहीच होत नव्हते. आज आईने सकाळी सकाळी 8 ला फोन केला आणि म्हणाली की तुम्ही उद्याच(शनिवारी) घरी या! 

आता मी थोडी संभ्रमात पडले की डॉक्टर तर रविवारी जावा म्हणाले आहेत... 

ही हाय कोर्टची चर्चा ऐकून, सुप्रीम कोर्टाने सूत्रे हातात घेतली... बाबांनी एकच वाक्यात सांगितलं "एका दिवसाने काहीही फरक पडणार नाही! डॉ. ना फोन करा आणि जातो आहे उद्या घरी असं सांगा"  विषय बंद! 

आम्हाला काय .. घरी जायचेच आहे! आनंदी आनंद गडे...!

आम्ही लगेच प्लॅन केला, आज रात्री हॉटेल मध्ये जेवण करायचं!!

दुपारी महेशदादाला फोन केला की आजचं डॉ कडे जाऊन येऊ. आज सकाळपासूनच मिरजेच्या पावसाने रंग दाखवायला सुरू केले आहे... संततधार पाऊस आहे. 

दुपारी डबा द्यायला काका आले, तेव्हा त्यांना सांगितलं की आता घरी जाणार आहोत. त्यामुळे, आज रात्रीपासून डबा नको... ते त्यावर चटकन म्हणाले " आधी सांगायचं नाहीस का? काहीतरी गोड दिलं असतं!!!"इतकं मस्त वाटलं ते ऐकून. 

मग डबा बनवणाऱ्या काकुंशी फोन झाला.. त्यांना मनापासून thank you म्हणलं.. 

संध्याकाळी 6 ला डॉ ना फोन केला ,तर डॉ म्हणाले की काही त्रास नाही तर यायची काहीच गरज नाही आत्ता.... वाटल्यास सोमवारी एक चक्कर मारून जावा, recovery चेक करायला. 

उद्या घरी जायला ग्रीन सिग्नल दिला!!! आणखी काय हवं??

लगेच, ही सुवार्ता घरी कळवली. आईचं प्लॅनिंग सुरू झालं की नाश्त्याला काय? भाजी कोणती करू? एक ना अनेक...

उद्या अमावस्या सकाळी 7 वाजता संपते, त्यामुळे नाश्ता करून 10 पर्यंत घरी पोचायचे असे ठरले. 


कोरोनाला successfully चितपट केल्याबद्दल रात्री हॉटेलमध्ये जेवण मागवलं. पनीरची भाजी, स्प्रिंग रोल आणि रोटी अशा जेवणावर ताव मारला... खूप बरं वाटलं बाहेरच खाऊन!


गेले 14 दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते finally होतंय. आम्ही घरी जाणार आहे. Yayyy!

आता गेले 2 आठवडे असलेली बंधने नाहीत, ते 

निःशंक मनाने घरी जाणार आहे उद्या!

हे 14 दिवस आम्ही जो काही अनुभव घेतला, तो मी रोज जसा वाटला तसा रोज शब्दबद्ध करत गेले.

तसे पाहिले तर दोनच आठवड्याचा हा काळ. पण आत्ता ह्या 14व्या दिवशी जर पहिल्या दिवसाचे लिखाण वाचले तर आम्हा सगळ्यांच्याच मनस्थितीमधे जमीन अस्मानाचा फरक आहे हे कळते. दिवस सरतील तशी सुधारत जाणारी तब्येत, कमी होणारी भीती आणि मुख्य म्हणजे बदलत जाणारी मानसिकता ह्याचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच!

आज हा quarantine मधला 14 वा आणि शेवटचा भाग...

आणि आता घरवापसी! 😊











Wednesday, June 2, 2021

आकांक्षा कार्तिक स्पेशल


24/11/2021



कु. आकांक्षास
गोड गोड आशीर्वाद 
सर्वप्रथम रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा !!!
आत्ता आत्ता पायात पायात घुटमळणारी , सगळ्या घरात छोट्या छोट्या पावलांनी दुडूदुडू धावत , जिवाच्या आकांताने दाद्याबरोबर गोंधळ म्हणण्यापेक्षा अगदी धुडगूस घालणारी तक्या आज पंचवीस वर्षांची झाली यावर विश्वासच बसत नाही . अगदी पहिल्यापासून आशिष जगमित्र होता तर आई - पप्पा - दादा एवढ्याच चौकटीत रमणारी तू ! 
जन्मल्यावर पहिल्यांदा अगदी पाचवेच दिवशी पप्पाकडे पाहून तू हसलीस आणि आम्हाला वाटल की तू काही ते कळून हसली नसावीस , बाळाला सटवाई हसवते तस असेल ते , पण पुढे रोजच तू फक्त पप्पांकडे पाहून अगदी समजून हसायचीस आणि आम्हाला त्याचं खूप आश्चर्य वाटायचे हे कमी म्हणून की काय तीन आठवड्यांतच तू त्यांना पाहून हुंकार द्यायला लागलीस . आम्ही सगळे आवकच झालो , अस हे बाप-लेकीच जगातील सुंदर नात !! तुझा जन्म पंधरा वीस दिवस उशिरा झाला होता तर काका गमतीने म्हणायचे तिची एक महिना पोटात जास्त वाढ झाली आहे त्यामुळे तिला समज जरा जास्त आहे .
अजूनही तुझ्या वयापेक्षा जास्त समज असल्यासारखीच तू शहण्यासारखी वागतेस .
लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच गायन , नृत्य , चित्रकला , वक्तृत्व , अभिनय या सर्व कलामध्ये तू तरबेजच आहेस . स्पर्धा परीक्षा , स्कॉलरशिप आणि दरवर्षीच्या परीक्षा प्रत्येक ठिकाणची पारितोषिक पटकावत असायचीस . तुझ्या certificates आणि trophy नी तर फाईल आणि शोकेस खचाखच भरले आहेत . आम्हला ते अभिमानास्पद वाटते . हे कमी की काय म्हणून जगातील सर्वात मोठी सुगरण म्हणून मान्यता पावलेली माझी आई तिच्याकडून पाककलेच्या विद्यापीठातून तू मान्यता मिळवलीस आणि अगदी पुरण पोळी सुद्धा झकास बनवतेस . आता सध्या तर तू तुझ्या उच्च शिक्षणाच्या जोरावर मिळवलेला जॉब आणि जोडीला तुझी अभिनयाची सुप्त इच्छा जोपासण्याचे काम करतेस .
तुझ्या लहानपणीचे काही गमतीदार प्रसंग आजूनही आठवले तर हसायला येते .
     काहीही मनाविरुद्ध झालं की पहिलं रडायला सुरुवात करायची आणि आम्ही रागावलो की म्हणायचीस
 " मी रडत नाही माझे डोळे रडतात मी काय करू ".
     पप्पा बाहेर निघाले की त्यांच्या आधी आवरून तू चप्पल घालून बाहेर जाऊन उभी राहायची त्यामुळे तुला बरोबर नेण्याशिवाय पर्याय नसे . एवढंच काय तर दादाला सोडताना पण तू बरोबर जयचीसच . थंडीच्या दिवसात सकाळी साडेसहाला दादाला ट्युशनला सोडायला पप्पाना जावं लागे . अजिबात आवाज न करता तुला चुकवून जायचा प्रयत्न असायचा पण तुला कसं समजायचं माहीत नाही ते निघण्यापूर्वी बरोबर दोन मिनिटे आधी उठून स्वेटर टोपी घालत तू पळत जावून गाडीवर बसायचीस .
       कोणताही नाद इतका करायचा आणि कंटाळा आला की मला काहीच माहीत नाही असे दाखवत सोडून द्यायचा . भरतनाट्यम शिकण्याचा इतका हट्ट केला घुंगरू पूजा केली तीन परीक्षा दिल्या पण तुला क्लासचा कंटाळा आला आणि काहीतरी बहाणा करत क्लासला तू दांड्या मारायला सुरुवात केलीस आणि नंतर आम्हाला न बोलता परस्पर मैत्रिणीकडून सराना तू डान्स क्लास बंद केल्याचा निरोप पाठवलास .
  एकदा घेरडीच्या आजोबांना सोडायला पप्पाबरोबर तू स्टँडवर गेली होतीस व तिथूनच आंगवरच्या कपड्यानिशी 
" मला आजीकडे यायचं " म्हणत त्यांच्याबरोबर घेरडीला गेली होतीस .
         सातवीत असताना दहाबारा मुलींचा ग्रुप करून तू दिल्ली ट्रीपचा प्लॅन केलेलास . शाळा सुटण्याच्या वेळी सगळ्या मुलींना न्यायला आया येऊन बसलेल्या असायच्या माझी बँक करून मी न्यायला यायचे कधीतरी माझी सगळ्यांची भेट व्हायची तर तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होत तुमची आकांक्षा मुलींच्या डोक्यात काहीही भरवून देते पोरी उगाच हट्ट करत बसतात बघा .
       तुझे गुण मात्र मॅडम कौतुकाने सांगायच्या त्या म्हणायच्या
 " जरा आगाऊ आहे पण हुशार आहे सतत पोरींचा घोळका हिच्या मागे असतो चमकणार आहे बघा ही ".
       आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू स्वतः तयार केलेले ग्रीटिंग आणि तू लिहिलेल्या भावना ग्रेटच होत ते ! 
    दाद्यावर जीवापाड प्रेम करणारी तू ! त्याचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने एकदा तू केलेलास 
दादा म्हणजे तुझ्यासाठी जिवश्य कंठश्य त्याची अर्धांगिनी कीर्ती ! ती म्हणजे तुझ्यासाठी एक रेशीम धागाच ! तिच्या पंचविसाव्या वाढदिवसा दिवशी तू केलेलं सेलिब्रेशन अहाहा ! आणि नंतर त्यांचा साखरपुडा त्याची तयारी त्यावेळचा तू बसवलेला डान्स , आणि लग्न होईपर्यंत प्रत्येक इव्हेंट खुलवण्यासाठी मला सांगत केलेले सुरेख नियोजन व्वा !!
        त्यानंतर कोरोना कालावधीत तुम्ही तिघेही बार्शीला आलात आणि आपलं आख्ख कुटुंब जवळजवळ दोन वर्ष झाली एकत्र राहते आहे . शिक्षणाच्या निमित्ताने आधी आशिष नंतर तू बाहेर पडलात आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र राहिलो त्या कालावधीत अनेक प्रसंग घडले .ज्योती मावशीच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे आपण केलेले ई-सेलिब्रेशन आणि त्यासाठी तू काढलेल्या वेगवेगळ्या भन्नाट कल्पना ! मजा आली 
नेहमीच कोणालाही सरप्राइज देणं हा तुझा आवडीचा छंद आहे . त्यातल्या त्यात वाढदिवस हा तुझ्या आवडीचा विषय आहे . आपल्याकडे वाढदिवस करत नाहीत याचा तुला लहानपणापासूनच खूप राग यायचा पण हल्ली या आठदहा वर्षात तुझ्या मनाप्रमाणे करायचं म्हणत आपण तोही करायला सुरुवात केली .
तुझ्या आजच्या स्पेशल रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्याची उजळणी झाली . सर्वच क्षेत्रातील हुशारी याबरोबरच अंगी असलेला सुसंस्कृतपणा यामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो .
दादा आणि तू तुमच्या दोघात एक मोठा फरक म्हणजे सगळ्या गोष्टी तो सहज घेतो त्यामुळे त्याला त्रास होत नाही पण तेही काही फार चांगले नाही . तुझं मात्र सगळ शिस्तीत ठरलेलं असतं . तू सहसा कोणामध्ये ढवळाढवळ करत नाहीस त्यामुळे तुला पण कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही . तोही चांगलाच गुण आहे खरं . कारण मला एका गोष्टीचं इतके कौतुक वाटते की आशिषपेक्षा कीर्तीचा आग्रह होता की तू त्यांच्याजवळ राहावे , मला कीर्तीपण बोलली होती की
" आई आकांक्षा नणंद कमी आणि बेस्टफ्रेंड जास्त वाटते . ती किती समजूतदारपणाने आणि धोरणाने वागते , आम्हाला तिचा काही त्रास होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेते . उलट मदत कशी होईल हे पहाते . आणि मी खरंच नशीबवान आहे कारण अशी ज्यांची मुलगी आहे त्यांची मी सून झाले आहे . काहीही न सांगता तुम्ही दोघीपण मला कशात आनंद मिळतो हे शोधत असता आणि प्रयत्नपूर्वक तसे वागता याचा मला खूप आनंद होतो . माझ्या मैत्रिणी म्हणतात अशी माणसं आपल्या आयुष्यात येणे यासाठी नशीब लागते त्यामुळे आकांक्षाचे लग्न होईपर्यंत आकांक्षा आमच्याबरोबर राहिली पाहिजे हे पहा ".
तेव्हा माझी खात्री पटली की माणूस म्हणून तुला जस स्वातंत्र्य हवे असते तसे दुसऱ्याला मिळावे यासाठी तू दक्ष असतेस .
आणि नाही नाही म्हणत आता तू दादाजवळ राहतेस . तू माझं पण खूप मोठं काम हलकं केलं होते ते म्हणजे आजकालच्या मुलींची मानसिकता कशी असते त्याप्रमाणे मला तुझे बोलणे कीर्ती बरोबर वागताना दिशादर्शकच ठरले . तसा माझा संघटनेच्या माध्यमातून तुमच्या वयाच्या मुलींमध्ये वावर असतोच पण तुझ्यामुळे मला आणखी सोपं गेलं आणि मी छान सासू होऊ शकले की जे आजकाल दुर्मिळ होत चालले आहे . एवढंच काय पण कीर्तीची आई सुद्धा मनापासून सांगते 
 " आम्हाला कीर्तीची अजिबात काळजी नाही आशिष तर सोळा आणे खणखणीत नाणं आहे . त्याचा कोणताच अट्टाहास नसतो तो नेहमीच कीर्तीला म्हणतो तुला कसे बरे वाटेल तसे कर कोणीही तुझ्याकडुन अस्सच कर अशी अपेक्षा करणार नाहीत . हे सगळे आम्हाला कीर्तीकडून समजते . आकांक्षा तर मला माझी तिसरी मुलगीच वाटते मला आमच्याकडे सगळे म्हणतात सगळ्यांना सांगू नकोस कीर्तीचे कौतुक , दृष्ट लगण्यासारखी माणसे तिला मिळाली आहेत ".
तेव्हा खरच खूप चांगले वाटते . जरी जगाची रीत असली तरी वयाची पंचवीस वर्षे एका संस्कृतीत वाढलेल्या मुलीने दुसऱ्या घरात जाऊन आपले आयुष्य घडवणे ही सोपी गोष्ट नसते . त्यामुळे आज माझे परमेश्र्वराकडे एवढं एक मागणं आहे की देवा कीर्ती सारखे सुखी , समाधानी , आनंदी आणि भरभराटीचे आयुष्य आकांक्षालाही लाभो . असो शेवटी हा परमेश्वरी खेळ आहे . 
आई म्हणून तुझं फक्त गुणगान करावे असे नाही . तुझ्यातला खटकणारा गुण म्हणजे लहानपणापासूनच तू सनकी , हट्टी आणि आग्रही आहेस पण हट्टीपणावर कसा ताबा मिळवायचा हे मात्र तू फार छान पद्धतीने हाताळले आहेस आणि तेही कौतुकास्पद आहे की जे तुला तुझ्या आयुष्यात सुखी कसं राहायचं यासाठी मदतच करणार आहे . आणि हे तुला खूप लहान असताना माझ्या आईने समजावून सांगितले आहे . विशेष म्हणजे याबाबतीत तू आजीचे ( माझ्या आईचे ) उपदेश मानलेस आजही ते आचरणात आणत असतेस. ते तुझ्यासाठी हिताचे आहे .
मुलं घडविण्यात आईवडिलांची मेहनत असतेच पण तुझ्या बाबतीत माझ्या आईचा खूप छान सहभाग आहे आणि तुलाही ते पावलोपावली जाणवत असते त्यामुळे आजी हा तुझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . सकारात्मकता आणि सुगरण पणा या दोन्हींची शिदोरी तुला माझ्या आईकडूनच मिळाली हे खरे ! आपण एकटे आपले मालक नसतो . सुख असो वा कठीण प्रसंग असो आपल्याबरोबर आपल आख्ख कुटुंब त्यात आपल्याबरोबर असते हा सर्वसमावेशक विचार नेहमी डोक्यात ठेवायचा म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतात .
असो , आता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहेस . तुला हा शब्दरुपी पुष्पगुच्छ देत परमेश्वराने सर्व सुखे तुझ्या झोळीत ओतावीत हीच अपेक्षा . तुझ्या भोवती असणाऱ्या माणसांचे आयुष्य नेहमीच सुगंधी होऊन जाते असाच सुगंध आयुष्यभर दरवळत राहो . नेहमीच तुझ्याकडून सत्कर्म घडो , घवघवीत यश मिळो , सुखी , समाधानी , आनंदी , आरोग्यदायी आयुष्य तुला लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !









28/10/2023


चि. कार्तिक ,
अनेक शुभाशीर्वाद
सर्वप्रथम तुला रौप्यमहोत्सवी वाढदिसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा .
तुला सुखी , समाधानी , संपन्न , आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो . 
तशी आत्ताआत्ताच आपली ओळख आणि मग भेट झाली पण आपली खूप जुनी ओळख असल्यासारखा भास झाला ! प्रत्येक आई वडिलांना आपले मूल सुखी समाधानी असावे असे वाटत असते . माझ्या दृष्टीने आशिष-कीर्ती ही अनुरुप जोडी आहे तसेच आकांक्षा पण आयुष्यात व्यवस्थित सेटल व्हावी असे वाटत होते . तिला अनुरुप , निर्व्यसनी , सुसंस्कृत मुलगा मिळाला पाहिजे  अशा माफक अपेक्षा आहेत आमच्या .
त्या मला तुझ्यात दिसल्या असो , मला जेव्हा आकांक्षाने अत्यंत संयमाने फोनवर  तुझ्याविषयी सांगितले तेव्हा तुला पाहण्याची , भेटण्याची ओढ लागली . लग्नाच्या बाबतीत एकदम निवांत असणारी मुलगी एखादा मुलगा पहा म्हणून स्वतः हून सुचवते तेव्हाच वाटलं याला तर भेटलच पाहिजे . प्रत्येक आईला जगात एक नंबर आपले मूल आहे असेच वाटत असते पण खरचच आकांक्षा तशी चौकोनी चिरा आहे . आणि सर्वगुण संपन्न असणे ही गोष्ट पण लग्न ठरवताना तारेवरची कसरत असते . ती कलाकार आहे मग त्यात सगळ्या कला आल्या अभ्यास , करियर , नृत्य , गायन , चित्रकला , वक्तृत्व , पाककला , उत्साहीपणा , सौंदर्यदृष्टी , वाचन ,  थोडेफार लेखन   हजरजबाबीपणा , चिडकेपणा , रडकेपणा आणखीच बरच काही .....
आमचे सर्व नातेवाईक तिला 
" बावन्न कशी सोन "
असे म्हणतात .
मजेने 
" हिला अनुरुप नवरा कुठे शोधावा बाई "
असेही म्हणायचे .
काहीही करायचा तिने ध्यास घेतला की तो पूर्णत्वास नेणे हा तिचा स्वभाव लहानपणापासून आहे . तशी ती हट्टी पण आहे बरका .
या सर्व गुणदोषांची पारख करणारा आणि त्याला वाव देणारा , त्यासाठी साथ देणारा  साथीदार , त्याचे कुटुंब असावे अशी अपेक्षा होती . कारण लग्न जरी दोघांचे झाले तरी त्यानिमित्ताने दोन कुटुंबे जोडली जातात .
मुलगा कसा असावा याचे तिचे काही निकष होते . ते गुण तुझ्यात तिला दिसले असणार म्हणूनच गोष्टी पुढे गेल्या . निवड तिच्याकडून झाली ही पण समाधानाची गोष्ट आहे . आपला अजून फारसा संपर्क आला नाही पण पाहताक्षणी आपल्या मुलीचा जोडीदार म्हणून  मलापण तू आवडलास . पण त्यादरम्यान घरात बारसे ठरलेले होते त्यामुळे हलता येणार नव्हते . पुन्हा पक्षपंधरवडा , नवरात्र या गोष्टींचा विचारविनिमय दोन्ही कुटुंबांनी केला आणि आपली पहिली भेट आगदी धावपळीत झाली . तुमचे एकूणच कुटुंब , आई-बाबा , कपिल पण मला लिब्रल , कलेची जाण असणारे आणि सपोर्ट करणारे वाटले . तू पण डान्स करतोस , एकांकिकेत काम केले आहेस पण फोकस करियरवर आहे असे आकांक्षा सांगते .  काळाप्रमाणे वागत गेल्यास गोष्टी सोप्या होतात . प्रत्यक्ष भेटीमुळे स्पष्टता आली पुढच्या गोष्टी ठरवणे सुलभ गेले . आता लवकरच आपली दुसरी भेट होईल तेव्हा सविस्तर बोलूच .
पुनश्च एकदा तुला वाढदिसानिमित्त भावी आयुष्यासाठी तुझ्या सर्व इच्छा , मनोकामना पूर्ण होवोत हीच श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
💐💐🎂🎂🍫🍫🥳🥳




23/07/2024


कर्तिकच्या बाबांच्या पत्रास उत्तर

नमस्कार
लग्न झाल्यापासून लग्न सोहळा खूप छान झाला या आशयाचे  अनेकजणांचे फोन आले . तुम्ही तर आगदी सविस्तर पत्रच लिहिले आहे . 
प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचे कौतुक व्हावे , कशातच कमतरता राहू नये असेच वाटत असते . त्यादृष्टीने आपण दोघांनीही प्रयत्न केला . आनंद तर सगळ्यांनी लुटला पण तो भरभरुन शब्दात तुम्ही व्यक्त केलात त्यासाठी पण मन मोठं असावं लागतं .
तुम्ही पण इतक्या लोकांना घेऊन इतक्या दूरवरचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे काटेकोर वेळेत केला . तसेच त्या 24 तासात ठरल्याप्रमाणे आपण वेळेचं बंधन पाळले  त्यामुळे सगळे सुरळीत पार पडले .
नव्या सुनेला घरी नेणे , तिचे स्वागत , कौतुक करणे तसेच रिसेप्शनसाठी तर राधिका ताई खूपच उत्सुक होत्या . तेही खूप मस्त झाले , आम्हाला सुरवातीपासूनच त्यांचा
" तुम्ही सगळ्यांनी रिसेप्शनसाठी आलच पाहिजे " 
हा गोड आग्रह होता त्यामुळे दुसरेच दिवशी आम्ही निघालो . पण त्यामुळे आम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी , कार्तिक-कपिल विषयी त्यांच्या हुशारीविषयी अनेकांकडून कौतुक ऐकायला मिळाले . कपिल तर बेभानपणे पण अतिशय उत्साहात काम करत होता . आदले दिवशी त्याने अरेंज केलेलं संगीतसंध्या सर्वांना आनंद देऊन गेले .
काय असेल ते आपण आपल्या मुलांसाठीच केलं . आपण एकमेकांचा आदर करतो हीच गोष्ट पुढच्या नात्याची विण घट्ट होण्यासाठी उपयोगी पडत असते . असेच प्रेम असू द्यावे , लोभ असावा तो वाढावा .
धन्यवाद 
श्री. अनिल आणि सौ. सरिता कुलकर्णी 
बार्शी

दिनांक 12/10/2024


सौ. आकांक्षा आणि कार्तिक

 सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा 💐.

नवरात्री सेलिब्रेशन एकदम झकासपणे पार पडले त्याबद्दल खूप खूप खूप खूप अभिनंदन आणि मनापासून कौतुक !

सुरुवातीला कीर्तीने कौतुक केले , मधे बाबांचे बूस्ट मिळाले रोज दोन्ही कुटुंबे , नातेवाईक , आप्तेष्ट , स्नेही यांच्याकडून आतुरतेने वाट पाहणे आणि पाहायला मिळाले की होणारा कौतुकाचा वर्षाव सारे काही आनंद देणारे होते . मग म्हणलं शेवट ( सुरुवात )🥰 गोड आपण करावा  .

हा उपक्रम राबवत असताना या नऊ दिवसामध्ये आकांक्षा तू एकूण 19 व्यक्तिरेखा सादर केल्यास , 19 व्यक्तीचे आवाज काढलेस आणि  21 वेशभूषा केल्यास !! फक्त अभिनय नाही तर तो करत विविध सामाजिक विषय हाताळत एक संदेश देण्याचा प्रयत्न केलास 

 हॅट्स ऑफ 👮

याला खांद्याला खांदा लाऊन भरभरुन साथ मिळाली ती कर्तिकची 👩‍❤️‍👨

त्याच्यासुद्धा तीन व्यक्तिरेखा , पाच ठिकाणी आवाज आणि अथक परिश्रम . दोघांनी मिळून स्क्रिप्ट लेखन , आयडिया , शूटिंग , एडिटिंग आणि एवढे करुन ते दीड मिनिटाच्या रीलमध्ये बसवायचं आणि बरोबर त्या टायमिंगला ते पोस्ट करायचं ही काही खाऊची गोष्ट नव्हती . एखादी फिल्म असते त्यात वेगवेगळे लोक वेगवेगळी कामे करतात हे सगळे दोघांनीच करायचे ( फक्त दोघे नव्हे बरं मध्येच कपिल डोकावून गेला आशिष कीर्ती तर पहिल्यापासून भक्कमपणे तुझ्या साथीला आहेत ते तुझे डावे उजवे हात आहेत आणि दोन्ही आई वडिलांचा पाठिंबा तर आहेच नव्हे दोन्ही फॅमिली ही तुमची support systym आहे.) हे खरच खूप आचंबित करणारे आहे . त्यात तुमचे बिझी असलेले शेड्युल ! लग्न होऊन अजून तीन महिने व्हायचे आहेत अजून तुमचेच रूटीन बसत आहे सगळी धावाधाव आहे त्यात हे इतक्या सुंदर पद्धतीने झालं आहे ते शब्दात सांगणे कठीण . आवड असली की सवड मिळते हे याठिकाणी सिद्ध झाले . यादरम्यान मीडियाचा पण चांगला प्रतिसाद मिळाला . 

तुमची अशीच प्रगती होत राहो , मनासारख्या संधी मिळोत , यशाचे उच्च शिखर गाठता येवो हीच आज दसऱ्याच्या निमित्ताने अजून एकदा शुभेच्छा आणि श्री. स्वामी समर्थचरणी प्रार्थना 🙏🙏 ☺️☺️


सौ. सरिता कुलकर्णी



28/10/2024

चि. कार्तिक यास

सर्वप्रथम तुला वाढिवसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा

💐💐💐💐

तुला सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे आयुष्य लाभो ही श्री. स्वामी समर्थ चरणी प्रार्थना .

 🙏🙏🙏🙏

लग्नानंतरचा तुझा हा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे स्पेशल तर असणारच . आपली ओळख होऊन एक वर्ष होऊन गेले . आपण अनेकदा भेटलो बरेचदा फोनवर बोलतो पण मला बऱ्याचदा पत्र लिहायला जरा जास्त आवडतं स्पेशली वाढदिसानिमित्त तर जरा जास्तच कारण आपण आपल्या भावना त्यातून छान प्रकारे मांडू शकतो दोघांतील सुसंवाद अर्थपुर्ण होऊ शकतो कारण आपण पत्र पुन्हापुन्हा वाचतो . बोलताना काही गोष्टी राहून जातात बोललेल्या विसरतात म्हणून माझा हा आवडीचा छंद आहे .

🥰🥰🥰🥰

 आकांक्षा तर memorable वाढदिवस आगदी खास करत आसते . मग तो पहिला असो की पंचवीसावा असो आटापिटा चाललेला असतो तिचा . गेल्यावर्षी पंचवीसावा झाला यावर्षी पहिला ! मग कसं आहे गिफ्ट आवडलं ना ? 

बरं कसं वाटते नवीन संसार करताना ?

जीवनशैली एकदम 360 मध्ये फिरते ना !

प्रायोरिटीज बदलतात वेगळेच रुटीन सुरु होते . करियर , पॅशन , पळापळी , धावपळ , कसरत , एन्जॉयमेंट या सगळ्याचा कसा क्रम लावायचा याची कसरत होते . काय करावे काय सोडावे समजत नाही . आणि म्हणूनच लग्नाविषयी अनेक गमतीशीर म्हणी आहेत .

    अजून एक म्हणजे यानिमित्ताने मला एक उदाहरण द्यावेसे वाटते . ठराविक ओव्हरची मॅच असते तेव्हा सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भक्कम धावसंख्या असेल तर विजय टप्प्यात असतो त्याची खात्री असते . आणि म्हणून सचिन तेंडुलकर नेहमीच नंबर वन राहिला . त्याच्यापेक्षा जनतेला त्याच्यावर जास्त विश्वास असायचं . तसेच जीवनाचे असते तुमचे आत्ताचे वय असे आहे की you should have to focus on your career and passion right now .

एकदा का तुमच्या मनाप्रमाणे यशाचे शिखर गाठले , अपेक्षित उंचीवर गेलं की पुढच्या गोष्टी आपोआप होतात . मग आपण त्याप्रमाणे आपल्या रुटीनचा sequence ठरवायचा . आमच्या संघटनेत नेहमीच सगळ्या मुलींना , महिलांना आवर्जून सांगितले जाते की 

" तुम्ही सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करु नाकात . त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो ".

मला वाटतं हे मुलांसाठी सुद्धा लागू होते . आजकाल करिअर करणे सोपे नाही , प्रामुख्याने आयटी मध्ये आणि तेही युनिक व्हावे वाटत असेल तर तुम्हाला योगदान द्यावेच लागते . तुमचा त्याठिकाणी कस लागतो . त्यासाठी वेळ द्यावा लागतो अभ्यास करावा लगतो आणि सध्या ती तुमची प्रायोरिटी आहे . ते करत असताना काही गोष्टी नेटाने करणे ते करत असताना काही करु ना शकणे हे स्वाभाविक आहे . कुठेतरी addition करायचे असेल तर काहीतरी delet करावे लागते . फक्त addition करायचे झाल्यास hang होते हे तर माहिती आहे तुम्हाला 🤭🤭🤭असो तुम्ही दोघेही आटोकाट तो प्रयत्न करताय त्याला यश नक्कीच मिळेल . फक्त त्यासाठी तुमच्या रुटीनचा sequence आणि time management ठरवणे गरजेचे असते . मग यश आपल्या हाताशी येते .

मस्त रहा , स्वस्थ राहा तब्ब्येती महत्त्वाच्या ते सांभाळत सारं काही करा , व्यायाम करा . बाकी मस्त प्रत्यक्ष भेटीत बोलूच .

आणखी एकदा वाढिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा सर्व मनोकामना पुर्ण होवोत हीच प्रार्थना . 

Enjoyyyyyy your day

 👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨


13/07/2025


चि.कार्तिक आणि सौ. आकांक्षा 

अ. अ. उत्तम आशीर्वाद 

सर्वप्रथम तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आभाळभरुन शुभेच्छा , उभयतांना सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे सुंदर दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना !

🙏🙏🙏🙏

आत्रेयला म्हणत म्हणत तुमच्या लग्नाला सुद्धा एक वर्ष कधी पुर्ण झाले समजलेच नाही . खूपच धावपळीत हे वर्ष संपले एवढे खरे !

😍😍😍😊😊😊 

मग आज काय स्पेशल ठरवले आहे ? आकांक्षाला काहीतरी suprise ठरवायची सवय आहे कार्तिकही मला तसाच दिसतोय त्यामुळे तुम्ही काय केले असेल याचा मला तरी अंदाज नाही . काहीही ठरवलेले असो तुमचा आजचा दिवस स्वस्थ आणि मस्त जावो .

Enjoy your day

❤️❤️❤️❤️

इथून पुढचे आयुष्य तुम्हाला हवे तसे लाभो , ठरवलेल्या सर्व गोष्टी पुर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा !!

       गेल्या वर्षी याचदिवशी तुम्ही काही स्वप्ने उराशी बाळगत एकमेकांचे झालात . आता त्याची ॲनिवर्सरी करताय . कसं वाटतं मग ? काय काय गोल ठरवले होते , काय काय कमिटमेंट होत्या , काय काय पुर्ण झाले , पाइपलाईन मध्ये काय काय आहे आणि काळाच्या ओघात विसर कशाचा पडला याचाही लेखाजोखा तुमचा तुम्ही घेतला पाहिजे . त्यात काही मिस होते का पहायला हवं आणि त्याच्यात सुधारणा व्हायला हवी .

आजच्या दिवशी मी एकच गोष्ट सांगणार आहे त्याच जमल्यास रोज स्मरण करा किंवा आठवड्यातून एकदा तरी नक्कीच स्वतःला विचारा . 

  माणसाच्या आयुष्यात तीन टप्पे असतात एक बालपण दुसरे तरुण आणि प्रौढ तर तिसरे म्हातारपण . पहिला टप्पा तुमच्यासाठी आपोआप पुढे सरकत जातो त्यात तुम्हाला विशेष काही करावं लागत नाही . पण आता तुम्ही मधल्या आणि महत्वाच्या टप्प्यात आहात की जो तुमचा तुम्हाला स्वतः घडवावा लागतो आम्ही पालक म्हणून आमचा  supportive रोल राहतो तो आम्ही नक्की करु. पुर्वीचा जमाना वेगळा होता आता तसा नाही जीवन धकाधकीचे झाले आहे , प्रायोरिटीज बदललेल्या आहेत त्यामुळे महत्त्व तुमच्या पिढीला आलेले आहे . त्यात तुम्ही पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहता त्याप्रमाणे लाईफ स्टाईल मेन्टेन करावी लागेल .मुख्य म्हणजे आत्ता तुमच्या तरुणपणातील खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे शिक्षण झालं , नोकरी लागली , लग्न झालं म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं होत नाही तर या फक्त बेसिक गोष्टी झाल्या . खऱ्या जीवनाला आत्ता कुठे सुरुवात होते . एक आयडियल जीवन जगायचं असेल तर आता तुम्हाला काय अचिव्ह करायचं यावर फोकस केला पाहिजे यासाठी उत्तम आदर्श म्हणजे आशिष आणि किर्ती आहेत ! ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत , त्यांना आम्ही फक्त दिशा दाखवत राहिलो त्याप्रमाणे त्यांनी स्वतःवर फोकस केला आता स्मुथ चालते गाडी .

आकांक्षा तर खूपच महत्वाकांक्षी मुलगी आहे सर्वसामान्य जगणे तिला मान्य नाही त्यामुळेच तिला लहानपणापासून पोषक वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे , आणि तिला हवे ते करु देणे हा अलिखित नियम होता .   मला कार्तिकपण ध्येयवादी असावा असे जाणवते , त्याच्यामध्ये मला चमक दिसते , स्पार्क दिसतो कदाचित यामुळेच तुम्ही एकत्र आला असाल . फक्त गोल ठरवून होत नाही  त्याचे दृश्य परिणाम पण आता दिसायला हवेत , दोघांनी एकमेकांना पूरक वातावरण निर्माण करुन देऊन , एकमेकांची मूल्ये जपत तुमचा विकास घडवून आणायचा आहे , तुमच्याकडे असलेल्या असामान्य गुणांचा विसर पडू देऊ नकात , तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे त्याचा रोज अभ्यास केला पाहिजे , तुमचे रोजचे रुटीन सांभाळत त्याला वेळ द्या .  स्पेशलायझेशन तर हवंच , तरच तुम्ही पुढे सरकता . सगळ्यां सारखे काम करत राहिलात तर फारसे हातात येत नाही कॉमन लाईफ जगावे लागते . 

पाच दहा वर्षे कष्ट घ्या आणि पुढचे पन्नास वर्षे सुखी , समाधानी , आपल्याला हवे ते मिळवले या भावनेने आयुष्य जगा . अभ्यास , चिंतन , मनन फक्त विद्यार्थीदशेत करावे असे नाही तर आपल्याला समाधान मिळेपर्यंत करावे , आत्ता तर तुम्ही करावेच कारण आता तुम्ही पोटेन्शियल असलेल्या वयात आहात , आकांक्षाची बकेट लिस्ट मला माहित आहे , कार्तिकची पण असणार त्यासाठी हे सगळे आवश्यक आहे .

    पण त्यासाठी आज स्वतःला नियमावलीत बांधव लागेल , प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील . काही addition तर काही deletion होत राहणार हा तर निसर्गनियम आहे . आपण सगळच नाही करु शकत त्यासाठी ideal राहिलं पाहिजे असही नाही . काहीवेळेस स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असते तरच हे साध्य होऊ शकते . हे करत असताना तब्ब्येत पण तेवढीच महत्वाची आहे हे लक्षात ठेवा . तुमचे जीवन पण तुम्ही एन्जॉय केलंच पाहिजे . आता कसं आहे तुमच्या नोकऱ्या , जबाबदाऱ्या ,  रोजचे जाणेयेणे यात दिवस जातो . पण टाईम मॅनेजमेंट करायला शिका , वायफळ गोष्टीत वेळ घालवू नका , एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्या , चैतन्य द्या , आनंद द्या , आदर द्या , चर्चा करा आणि मग पाहा तुम्हाला हवं ते साध्य करता येईल . आणि आम्ही फक्त मार्गदर्शन करु शकतो प्रत्यक्ष अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते .

तुम्ही ते नक्की कराल याची खात्री आहे .

लास्ट बट नॉट लिस्ट आता आपण भेटू तेव्हा मी दोघांचेही क्रॉस व्हेरिफिकेशन घेणार आहे 🤣🤣

बौद्धिक खूप झाले आता एकदम चील मारा

 ❤️❤️❤️❤️

पुनश्च एकदा आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा , इथून पुढील वाटचालीसाठी 

All the best !

👍👍👍👍👍

😍😍😍😍😍



तुमचीच 

आई


कार्तिकचे आकांक्षास पत्र 

Hello Bayko,


Kashi Ahes ?

Aaj 1 Varsha zala Aplya lagnala. 

Khup cheesy vatel pan kharach asa vattay barech Varsha zale Aplya lagnala.


He patra lihayla ghetla ani mhantla chala mag chya eka Varshat kay kay moments ghadlya tyachi ek ujalni karavi.


Switzerland trip,

Mangalagaur,

Gauri-Ganpati,

Navratri videos, 

Apla ghar setup,

Garba night,

Diwali Stall in office,

Apla pahila extra baghitlela natak var varche vadhuvar,

Maza birthday, cake & bapreeee IPhone,

Mazi dental treatment

Pahili Diwali Akola & barshi 

Lagech tuzya bday chi Tamilnadu trip 

LASIK surgery

Pahili sankarant

Holi 

ARAI

Barshi Shet Visit 

International trip 

Eye surgery 

Daily Yoga & yoga day

Jar tar chi goshta etc etc


He sagla baghun asa vattay ki Apan Universal madhlya Cyclone ride peksha mothi ani bhari ride keliye. I mean really, it has been a roller coaster of emotions and a series of special moments. 


Apan ekmekana bhetun ata 2 Varsha houn gele, but atta atta kuthe ekmekana actually olkhayla lagloy asa vattay. 


Apan doghahi vegveglya vatavaranat vadhloy. Apla culture ani traditions jari sarkha asla tari te palaychya ani sajra karaychya paddhati jara veglya ahet. 


Ya var 2 states sarkha 2 pradesh asa movie kadhayla harkat nahi. 


Jokes, apart, Hyamulech, Sansaraychya hya Multi-National company madhe Aplya Fresher Jodi la suruvatila jara sagla Navin adopt karayla thoda vel lagla. 

Veglya experiences cha Anubhav ala. Ekhadya vishayavar ekmekanche kay Mat ahet he kalala. Vicharsarni, approach kalale. 


Ani tuza barobar ki maza barobar hya peksha barobar chukichya palikadle , Aplya doghansathi soyiskar ase Suvarna madhya kadhayla apan shiklo. Aplya doghansathi best Ase decision apan ghyayla shiklo. 

Ekmekana jast samjun ghyayla shiklo. 

Ani Fresher varun 1 Varshachach, pan extraordinary ani दांडगा experience aslele couple mhanun grow zalo. 


Tu survatila mhanaychis, Kartik tu manat khup goshti thevtos, tuzya manat kay challay he mala kasa kalnar. 

Eka arthi mala Patla te, ani mi jast tuzya samor vyakta vhayla laglo, clear bolayla laglo. Tyamule conversations ani expectations clear vhayla lagle. 

Ani parallely tu, mazya manatlya goshti olkhayla shiklis. Hyacha far kautuk vatta mala. 


Mala Aplyadoghanchi saglyat best goshta avadte ti mhanje doghahi firayla, adventure karayla, Navin goshti nirbhidpane try out karayla ekdum tayar asto. 

Fakt kunitari karuya ka? / karaycha ka? Mhanaychi der, ani apan lagech ready. 


Ani ajun ek mhanje, 

jevha mi Ekta Astana maze gharche mala sangtat ki, “Bara zala, Aakanksha milali aplyala, ani tuza kautuk karat” ani tasach tu sangtes mala ki kasa tuzya ghari maza kautuk kartat, he ek family Validation milalyavar aplya Arranged Love marriage baddal bhari vatta. Ani asa vatta ki hya Genz generation madhe kharach apan ek bhari life partner choose kelay. (Aga hooo, tuza ghar maza ghar asa nahi, donhi Aplya doghanchehi ghar ahet).


Aplya building cha Paya ata majboot zalay asa mhanayla kahi harkat nai. 

Bharpur individual ani couple goals planned ahet, te ekmekachya support ni achive karu ani ek ek floor majboot banvat jau. 


Chala, bharpur lihila.

Btw, Thanks for coming into my life !

Ani ho rahilach, Happy First Marriage Anniversary ❤️


Shevti ek ukhana, 


एक वर्षात कळालं – संसार म्हणजे teamwork,

Aakanksha बोलते आणि मी "Hmm" म्हणतो – that's how things work!





आकांक्षाची स्पेशल गाणी

1) मराठी
1) मोगरा फुलला

रचना ः संत ज्ञानेश्वर संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
स्वर ः लता मंगेशकर 
ताल : केरवा राग :


मोगरा फुलला , मोगरा फुलला 
फुले वेचिता बहरु कळियासी आला II धृ II

इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी 
मोगरा फुलला...... II 1 II

मनाचिये गुंती गुंफियला शेला 
बापरखुमा देवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला ......II 2 II




2) भरजरी ग पितांबर दिला फाडून

चित्रपट : श्यामची आई
गीतकार : प्र. के. अत्रे संंगीतकार : 
स्वर : आशा भोसले
ताल : राग : जयजयवंती


भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदिसी बंधू शोभे नारायण 2

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई 
सुभद्रा बोलली 2
 " शालू नि पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हांसी मी ?"
पाठची बहिण झाली वैरीण
द्रौपदीसी ........

द्रौपदी बोलली " हरिची मी कोण
परि मला त्यांने मानिली बहिण 2
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज 2
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .........

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण
प्रीती जी करती जगी लाभावीण 2
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी .......




3) कृष्णा नाही कान्हा नाही 

पारंपारिक गौळण  
ताल : भजनी ठेका
 

कृष्णा नाही कान्हा नाही 
इथं कशाला थांबायच 2
ग गौळणींनो मथुरेला जायाच 3

दही दूध घेऊनी मथुरेला जायाचं 2
दही दूध घेऊन मथुरेला जायाचं नी आनंदाने विकायचं ग गौळणींनो.....II1II 

कृष्ण सख्याची पडता गाठ 2
कृष्ण सख्याची पडता गाठ
आनंदाने नाचायचं ग गौळणीनो II 2II

एका जनार्दनी कृष्ण कृपेने 2
एका जनार्दनी कृष्ण कृपेने
हरीचरणासी लागायचं ग गौळणींनो II 3 II

4 ) चांदणे चाहूल होती कोवळ्या .....
5 ) माझी रेणुका माऊली

Thursday, May 20, 2021

आकांक्षा वाचन


कविता  वाचन

1) ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

     वेगळं राहायचं भारीच सुख.


ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं ते बाजारच सारा.

सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,

जावेच्या पोराची सदा पीर पीर.

पाहुणे रावळे सण नी वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,

वेगळं राहायचं भारीच सुख.

सगळ्यांना वाटतं माझ घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर ढलपी.

बाबांची माया काय मामंजीना येते,

पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,

वेगळ राहायचं भारीच सुख.

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायच.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकुट अन् दह्याची साय ,

त्यावर लोणकढ साजुक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

रडले पडले नी अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांच काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहु नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी

बाळ रडल तर ते खपायचं नाही,

मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.

स्वयपाक करायला मीच,

बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,

वेगळं रहायच कळायला लागल सुख.

सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान

करीत तरी होत्या

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची,

नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलय तुप,

अन् वेगळं व्हायचं कळलय सुख.


2) कविता वाचन 

       

मुक्तता आणि व्यथा


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देईल का मग उत्तर त्याच तुमच्यापैकी कोणी एक II ध्रुII

 

रूप माझं मोलकरणीचं, कष्टकरी शेतकरणीचं

गणित सारखं आखत आसते उत्तरी मेळाचं

दिवसं-दिवस, महिनोंमहींने सरलं सार वर्ष

तरी का मग सुटत नाही गणित हे मेळाच

बेरीज कमी अन वजाच जास्त पारड का नाही समतोलाच

हसत हसत स्वागत करते येणाऱ्या प्रत्येक दिवसचं

मग आत्महत्या न दारू-जुगार हत्यार का या पुरुषांच II 1 II


मी बाई पडले पांढरपेशी कशाला करू कोणाची चौकशी

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही

सणवार, ,व्रतवैकल्ये नेमानं मी करतच राहीन

मी केल ते तू पण कर म्हणत पुढच्या पिढीला रेटतच राहीन

सवाल येतो काय कमी आहे तुला या भरल्या संसारी

पण सन्मान माझा कुठे गेलाय ? मन आक्रांदतय उरी II 2 II


एकविसव्या शतकात म्हणे स्त्री स्वतंत्र झाली

करीयरच्या नावाखाली तिला कवाडं मुक्त केली

का एकटीच अडकतीय ती नोकरी-रिवाजाच्या जोखडात घट्ट 

का मग बांधलाय गळ्यात तिच्या कासरा बंधनाच घट्ट

आखीव परिघातच राहून तिने हुंदडायचाय म्हणे मुक्त

 नभी उंच भरारी घेत तिने का पाळायचेत रीतिरिवाज सक्त II 3 II


जन्माआधीच मुलीच आस्तित्व नाकारणारी जात

लेकीबाळीचं भक्ष्य करणारी लांडग्याची जात

हुंडाबळी, शोषणकर्ती नराधमांची जात

गल्लीपासून दिल्ली पर्यंत वय पण नं पाहणारी जात

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जात

कधी करणार आहोत आपण या मानसिकतेचा नि:पात  II 4 II



8  मार्चच्या संघर्षदिनाला का आलय उत्सवाच रूप

उत्सव कसला म्हणताय त्याला आलय बैल पोळ्याच स्वरूप

एक दिवस करताय कौतुक घालून बेगडी झुल

चार दिवस सोहळ्याचे, झाले स्थिर की पुन्हा सारे गूल

सन्मान असावा माणसासारखा नको मला ही नुसती झुल

राहील का मग माझ्यासाठी प्रत्येक दिन जणू उमलत फुल II 5 II


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देइल का मग उत्तर त्याच  तुमच्या पैकी कोणी एक

पण ----------पण ---------

सावित्रीचीच लेक मी उत्तर शोधीन नक्कीच नेक

लढेन व्यवस्थेशी बदलून टाकीन करून सर्वाना एक



3) वाचन - पत्र

निर्भयाचे समाजातील कुमारवयीन 

मुला-मुलींना उद्द्शून पत्र


आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक

तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक

होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय


लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली


आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला


आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय


जरा उशीरच झालाय , माहितीय मला 

मला हेही माहितीय  की , घालमेल चाललीय तुमची 

काय घडतंय आजूबाजूला 


आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी 


तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार

म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला 


तुमचं बाळ जन्माला आलं न ,

की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या

म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,

ते मुल मोठं केल्याचा 

आभिमान वाटेल तुला


त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा


तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून , 

स्त्री आणि पुरुष ,  ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं 

निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी ,  विज्ञानयुगातसुद्धा 

त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं 


तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस

असं ठसवंच त्याच्या मनावर


खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील

तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला

मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस , 

असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस


फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ


एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,

होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी


तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना 

तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला


सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला 


त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .


तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी

प्रेम , माया , शिक्षण , संस्कार 

वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं 


आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण

आणि होऊदे

सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार


अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं

आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला


आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्

 


4) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे स्वगत

    तुला शिकवीन चांगलाच धडा


मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून )
असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी?
थांब 
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.
तुजा  क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज, 
माजी चाटत येशील बुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा शुद्ध बोलायला शीक.
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा 
हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,
लव्हली, चार्मिंग, ब्युटी हाय, समदे धरत्याल मंजूचे पाय. 
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा 
हाय मंजू, हाय दिलीप....
हाय मंजू, हाय फिलीप...
मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू
कम कम, गो हँगिंग गार्डन, आय बेग युवर पार्डन?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्याची कुडी,
कुनी घालतील फुलांचा सडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
मग ? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,
नदरेला जेव्हा नदर भिडंल, झटक्यात माज्या पायाच पडंल  
म्हनल, रानी, तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती कैसी अदा.
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग.
मी मात्तर गावठीच बोलीन, मणाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढंल लाजेची लाली, नदर जाईल अलगत खाली 
म्हनेन त्याला, ह्ये काय असं, लोकांत उगंच होईल हसं
कुम्पणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव?
हि-याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटाराच्या पान्याला सोन्याचा घडा ? 
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर पन हो माझी सून  
दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हनत्याल, राजाचा मान तरी राख 
तोरणं बांधा न् रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा  !
मग मंजू म्हनल, म्हाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. 
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीनं गर्दन छाटा 
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पाटलून काढून चाबकानं फोडा.
म्हाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रे घोडंस्वार
हा हा हा हा 
जावा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला. 
धरशील पाय आन लोळ्शील कसा, रडत -हाशील ढसाढसा 
तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा
तू   म्हनशील, मंजुदेवी तुला आलो मी शरन
मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.  



5) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे गाणे

     मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगत.....


हे मला फोरीस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाचं हाय

( 3 वेळा )


ये काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी

फूलं इकायची हाये


मला फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाचं है

( 2 वेळा )


आन आमचं हे फाटक्या पायताणावानी बोलनं 

मंग फोरीस्टाच्या शापात चाकरी कशी भेटाची


तितल्या पोरी कशा 

खीसपीस खीसपीस खीसपीस 

मंजूळ बोलत्यात


चकपक चकपक चकपक

चकंपकं दिसत्यात


या फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाच है


काल राती ह्यो बाबा म्हनाला

पैकं दी म्या शिकिवतो


आन आज म्या पैकं घेऊन 

टॕक्शीत बसूनशान आले 


आन अंगावर पाल चढल्यागत झटकतोय


सर मला फोरिस्टाच्या शापामधल्या

बाईगत हुयाचं हाय  

( 3 वेळा )


काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी फूलं ईकायची हाये


मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगात हुयाचं हाय

( 3 वेळा )



6 ) नवरात्रीचे नऊ रंग



1 ) अनाथांची माय 

      सिंधुताई सपकाळ



बेटा निराशेतून आशेकडे जावूयात न आपण ,
आपल्याला पाहिजे तो रस्ता आपणच काढायचा न ? आपल्यापासून दुसऱ्याचं भल व्हावं , आपल्यालाही जगता यावं हा माझा मधला रस्ता असतो !
बाकी इकडल तिकडल मला काही कळत नाही , अडाणी आहे रे मी .
मुक्काम पोस्ट फिरस्ती , जहा खाना वहा बस्ती !
जिथे भाषण आसत तिथे राशन मिळतं बाबा
मग मी जाते 
माझ्या भाषणामुळे लेकर वाढले , जबाबदाऱ्या वाढल्या .
भाषण झालं की पदर पसरून मागते 
देगा उसका भला ना देगा उसका भी भला 
भाषणाचे विषय माझे जगण्याचे असतात जे जगते ते फेकते , शिक्षण नाही आडाणी माई !
मायेचा रस्ता एवढा सोपा नसतो बेटा
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका . कारण काटयाना फक्त बोचण माहीत आसत वेदना कळत नसतात .
म्हणून कटयांशी दोस्ती करा.
पाय इतके मजबूत करा की काटे तुम्हाला सांगतील आईये वेलकम , हम चुबता है तुम चलना सिखो . 
काट्यातून चालणार फार मजबूत होत असतो बेटा .
फुलांसह काटे स्वीकारा .



2 ) पहिली महिला पंतप्रधान
      श्रीमती इंदिरा गांधी

मैं आज यहॉं हूं , कल शायद यहॉं ना रहूं ,

मुझे चिंता नही है , के मै जीवित रहू या नहीं रहू ,

मेरी लंबी उमर रही है ,

और मुझे गौरव किसी चीज पे है ??

तो इसी पे है , मेरा सारा जीवन सेवा मे चला गया , 

केवल इसी चीज पे गौरव है .

और जब तक मुझमे सांस है , तब तक सेवाही मील जये , 

और जब मेरी जान जायेगी , तो मैं कह सकती हूं , एक एक खून का कतरा , जितना मेरा है , एक एक बूँद एक भारत को जीवित करेगा ,

भारत को मजबुती देगा , और मेरी आशा है , नौजवान हो , या महिला हो ये सब इसको आप सोचे



Wednesday, May 5, 2021

कोंदण भाग 6

प्रकरण 26 वे

माझं पहिलं बाळंतपण

05/05/2021

          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!




प्रकरण 27 वे

आई - काकांची मनीषा पूर्ण

25/05/2021




       माझ्या बाळंतपणात  जवळजवळ सव्वा महिना होईपर्यंत आई रोज वेगवेगळ्या खिरी आणि पथ्यांचे प्रकार अगदी हिरिरीने करत रहायची तिची ती नेहमीचीच पद्धत होती . बाळंतीणीची काळजी घेण्याची तिची खास शैली होती . हेळसांड केलेली तिला अजिबात चालत नसे मग पथ्यात दूध , तूप , खसखस , डिंक , खारीक , खोबरं , बदाम , सुका मेवा , मेथ्या , पालेभाज्या  शेकशेगडी हे अगदी लक्षपुर्वक ती करायची व सगळं झालंच पाहिजे हा तिचा अट्टाहास असे . मला हे सगळे पदार्थ खायला खूप आवडायचे व पचायचे पण मग ती म्हणायची 

" नऊ महिने तुला खाण काही अंगी लागलच नाही , विश्रांती काय ती आत्ताच दोन महिने मिळणार . तुझ्या मागं डबल म्हणलं तर तिबल जबाबदारी आहे . एक तुझा स्वतःचा संसार , दुसरं नोकरी व आता बाळ आणि तिसरं परांड्याकडची जबाबदारी या कशातूनच तुला काही अंग काढून घेता येणार नाही . करावं तर लागणारच मग रडत करण्यापेक्षा हसतमुखानं  केलं की आपल्याला सुख व समाधान जास्त मिळतं त्यासाठी आपली तब्बेत आपणच जपावी म्हणजे सगळं सोपं जातं . म्हणून आत्ता मी करतेच आहे आणि तू पण बिनबोभाट खातेस हे मला फार बरं वाटतंय . बेबीनं बाळंतपणात खायला फार नकुसकंगोरा केलाय मला त्याचा भारी राग यायचा . पण राणी मात्र बिनबोभाट खात होती आणि तू तर आवडीनं खातेस मग मला पण करायला हुरुप येतो बघ !" 

       आईला स्वतःच्या सहा व तीन मुलींच्या प्रत्येकी दोन अशा एकूण बारा बाळंतपणाचा अगदी बारीकसारीक अनुभव होता . शिवाय वाड्यात , शेजारी असा अनेक बाळंतपणाचा तिला अनुभव होता . प्रत्येक वेळी जिवाचा आटापीटा करत अगदी उत्साहाने ती बाळंतपण करायची . कशातही कमतरता तिला मान्य नसे . आता माझ्यावेळच्या आईच्या भावना तर आणखीनच वेगळ्या होत्या . नाही म्हणलं तरी मुलगा झाल्याने आई-काका दोघेही मनोमन खूष होते . आई नेहमी म्हणायची 

" आमच्याकडे जरा मुलांची वणवा आहे वाणीकिणीचं हा दुसरा मुलगा झालाय घरात , लहान बाळ असतांना मुलं जरा  नाजूक असतात मला मुलांच्या तब्बेतीचा फारसा अनुभव नाही त्यामुळे जरा भिती वाटते ".

मग काय करु आणि काय नको अशी तिची मानसिकता झाली होती . बाळाची तब्बेत थोडी जरी नरम गरम झाली की आई लगेच  हवालदील व्हायची .

     तीन आठवड्यानंतर बाळाला बीसीजी लस द्यायला आई घेऊन गेली व बरोबर काका पण गेले तर दवाखान्यात नर्सबाई काकांना म्हणाल्या 

" आरे व्वा आज दस्तूरखुद्द काका तुम्ही आलात नातवा बरोबर ! नवलच म्हणावं लागेल . आता बाळाचं नाव रजिस्टरला काय लिहू ते पण तुम्हीच सांगा ."

अजून बारसं झालेलं नव्हते त्यामुळे काय सांगावं त्यांना प्रश्न पडला .पण लगेचच काका  बोलून गेले 

" आमची मुलाची मानिषा पुर्ण झाली त्यामुळे लिहा मनिष "

आणि त्यादिवसापासून बाळाला सगळे मनिष म्हणू लागले .

 बाळ पण जन्मताच गुटगुटीत होत आणि दिवसेंदिवस  चांगलच बाळसं धरत होतं . आलीकडे आईचंही वय पन्नाशीच्या पुढे गेलेलं , भरपूर जबाबदाऱ्या व केलेले कष्ट त्यात डायबेटीस त्यामुळे तीला जरासा हळवेपणा आला होता . त्यातच बाळाला काही झालं की तिचा धीर सुटायचा . एकदा तर रात्रभर बाळ रडत होतं तिच्या अंदाजाप्रमाणे बाळाचं पोट दुखत होतं पहाटे तिने काकांना सांगितले 

" तसं तर मी बऱ्याच बाळांना घरगुती उपचार करते तसे याला पण केले आहेत पण या पोरावर प्रयोग करायला माझं मन धजत नाही आणि आता घरी थांबायचं माझं धाडस नाही सकाळी आठच्या गाडीला आपण बाळाला घेऊन पंढरपूरच्या दवाखान्यात जाऊ ."

काकांना पण मग दम निघत नसे ठरल्याप्रमाणे आम्ही आवरलं तर नेमका त्याच दिवशी बसचा संप असल्याचे काकांना बाहेर गेल्यावर समजले मग बाहेरुन येतानाच काका स्पेशल गाडी ठरवून आले व आम्ही दवाखान्यासाठी म्हणून पंढरपूरला गेलो . बाळाचे असे अनेक किस्से आहेत . 

      बाळाला न्हायला घालायला शांता परटीण होती . तेल लाऊन मनापासून खेळवत ती बाळाला चोळून मोळून आंघोळ घालत असे . बाळ तसं वजनदार होतं . चोळून झालं की मोरीत ती पाय पसरुन बसायची व बाळाचे पाय हातात धरुन बाळाला उलटं करुन हिंदोळे द्यायची तसतसं बाळ खूप हसायचं . ती शांताची पद्धत आईला माहिती होती पण आई तिला म्हणायची

" शांता पोर जरा मस्तीखोर आहे नको खेळवत जाऊ असं ".

आणि एक दिवस बाळाने उलटं केलं तसं पायाला जोरात झटका दिला आणि तेलकट बाळ तिच्या हातातून निसटलं पायावरुन लांब पुढे मोरीच्या तोंडाशी गेलं . आई पाणी घालायला जवळच उभी होती . काही सेकंद बाळ रडलं नाही आई व शांता दोघीपण इतक्या घाबरल्या की  विचारायची सोय नाही . पुन्हा बाळ मोठ्यानं तळतळून रडलं तसं त्यांना हायसं वाटलं पण  त्यादिवशी दिवसभर शांता घरी हेलपाटे घालत होती आईच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं . दोघींना पण चैन नव्हती शेवटी मीच दोघींना समजावलं 

" काळजी करु नका आधी पायावर पडून ते पुढे घसरलय त्यामुळे बाळाला काही लागलं नाही तेवढ्या वेळापुरतं ते खूप  रडलय पण पुन्हा शांत आहे ".

पण पुढे आठवडाभर आई मात्र बेचैन होती . शांता मात्र भितभीतच बाळाला आंघोळ घाली आई म्हणाली 

" दोडाचं भित्यापाठी ब्रम्हराक्षस आहे बाई "!

          बार्शीला बिऱ्हाड केलं होतं  तेव्हापासूनच  काकांनी शेतीचा बराचसा व्याप जाणूनबुजून कमी करत आणला होता . एक तर त्यांच वय पण साठीकडे झुकले होते आयुष्यभर बरीच उलाढाल केली होती . सगळ्या मुली आहेत त्यांच शिक्षण पुर्ण करुन चांगली मुलं पाहून द्यायचं व त्यांना स्थिरस्थावर करायचं यादृष्टीने त्यांनी त्यांचा संसार आवरता घ्यायला सुरुवात केली होती . नविन कोणताही व्याप वाढवायचा नाही आहे तो हळूहळू कमी करत आणायचा . शेतीतले गडी काढून वाटेकरी ठेवला होता त्यामुळे देखारेखीपुरतं किंवा वेळ जात नसला तर ते शेतात जायचे . त्यांचा हल्ली गुढगा पण दुखत असायचा . घरात त्यांची अगदी पहिल्यापासूनची कामं ठरलेली होती त्यात अंथरूण घालणे ,  काढणे , बंब पेटवणे , खड्ड्यातून पाण्याच्या घागरी भरुन देणे अशी कामात त्यांची मदत असायची . तर हल्ली रिटायर झाल्यापासून घरात छोट्या छोट्या कामात पण ते मदत करायचे दुपारच्या वेळी आई काही निवडत बसली की ते पण आईच्या शेजारी आराम खुर्चीत चष्मा घालून बसत व  गप्पा मारत ताटात धान्य घेऊन खडे काढून देत असत . लहान बाळांना खेळवणे हा त्यांचा आवडीचा छंद असायचा . वाड्यात ज्यांच बाळ लहान असेल ते एखादा तास तरी आमच्याकडे असायचं . आणि आमचं घरात जर बाळ असेल तर बराचवेळ ते घेऊन बसत असत . ते म्हणायचे 

" बाळ दिवसभर खेळूनखेळून दमतं त्याचे हातपाय चेपले की ते शांत झोपतं " 

असं म्हणत बाळाला काॕटवर टाकायचं आणि खेळवत खेळवत त्याचे हातपाय दाबायचे . मग बाळांना पण त्यांची सवय लागायची . मनिषला पण तशी सवय लागली होती त्याला काॕटवर टाकलं की आनंदाने पाय आपटत त्याचा खेळ सुरु होत असे.  दिवसेंदिवस  मनिष गोंडस दिसत होता . तोतो  आई-काका त्याच्यात खूप गुंतले होते . आता नवरात्र तोंडावर आलं होतं मनिष एक माहिन्याचा झाला होता . घेरडीत दसरा प्रकरण खूप भारी असतं , हे पण दसऱ्याला येणार होते मग बाळाला सगळे घेणार , त्याला बाहेर आणलं जाणार , मी पण इकडे तिकडे हिंडणार म्हणून सव्वा महिना झाला की नवरात्रातच एक दिवस आईने मला व बाळाला देवाला नेऊन आणलं . परत घरी येताना  दुसऱ्याच्या घरी थांबून घरी यायचं शास्त्र करायचं म्हणून मग येताना मी उषा वहिनी व प्रभा काकूकडे थांबून घरी आले .

वाड्यात कोणाच्याही घरी नविन बाळबाळंतीण  गेली की चहानाष्टा मग कौतुकाने ओटी भरणे , बाळाची टाळू माखणे हा कार्यक्रम अगदी सोहळा असल्यासारखा होई . अशावेळी  वाड्यातल्या सगळ्या काकू वहिनी एकत्र जमायच्या वाड्यात गप्पांना कधीच कारण लागत नसे आपापल्या दारात येऊन उभं राहिलं की सगळे एकत्र जमल्यासारखे वाटायचं आणि घरी निघालं की 

" आता उखाण घे बरं"

असा प्रेमळ हट्ट व्हायचा व चेष्टामस्करी , हसणे याला उधाण यायचं आणि एकीबरोबर सगळ्यांजणी एकमेकींना उखाण्याचा आग्रह करायच्या त्यात दीडदोन तास कसे जायचे समजायचं नाही . देवाला जाऊन आलं की मी जरासं वावरायला सुरुवात केली  मनिषला सोप्यात आणलं जायचं आणि दसऱ्या दिवशी तर थोडावेळ अंगणात पण आणलं  मग लगेच आई हाक देऊ लागली व म्हणू लागली

"शरु , देवाला जाऊन आलीस म्हणजे वागायला उठली नाहीस घरात चल आता बास झालं ".

आणि मग तिन्हीसांजेला गुटी वगैरे झाली की वेगवेगळ्या पद्धतीने बाळाची दृष्ट काढायची हे आईचं नित्यनेमाचं काम असे . 

घेरडीतला दसऱ्याचा सोहळा पाहून यांना तर खूप आश्चर्य वाटलं होतं . एवढं छोटसं गाव त्यात पाचसहा बिऱ्हाडं असलेला तीसचाळीस माणसं रहाणारा एवढा मोठा वाडा त्यात दसऱ्यासारखा सण इतक्या उत्साहात व एकत्रितपणे आंगणात संध्याकाळी चारपाच तास साजरा होतांना पाहून खूप वेगळं वाटलं . वाड्यात लहान मुलं , तरुण वहिनी व सगळे भाऊ , पोक्ते काका-काकू अशा प्रत्येक वयोगटातील लोकांचा वावर दसऱ्याची शोभा वाढवत होता . त्यातून मिळणारी ऊर्जा पुढे पंधरा दिवस तरी टिकून रहायची . त्यात गावातली मंडळी झाडून सोनं द्यायला पानसुपारी घ्यायला यायचे , मानाचे ढोल खेळले जायचे . अशा प्रकारे मोठ्या धामधूमीत दसरा झाला व तोंडावर दिवाळी व मुख्य म्हणजे बाळाचं बारसं त्याची शांत असे वेगवेगळे कार्यक्रम डोळ्यासमोर दिसू लागले . वसुबारशा दिवशी सकाळी शांत , दुपारी जेवणे व संध्याकाळी नामकरण विधी करावा असे एकूण कार्यक्रमाचे  नियोजन झाले .

तायडी , मायडी , गोंदा मामा दोन्ही आत्त्या , अंजू गायत्री व परांड्याचे पाहूणे शिवाय वाड्यातले सगळे असे बारशाला असणार होते व पुढे दिवाळी असणार होती . त्यानुषंगाने आई-काकांनी कामाला सुरुवात केली . किराणा खरेदी  , कपडा खरेदी , भटजी आचारी ठरवणे इ . कामासाठी जवळा , जत , सांगोला , पंढरपूर वेळ पडली तर सोलापूर असे काकांचे हेलपाटे होत होते . फॕशनेबल कपडे  मुंबईहून मायडीला तर सोनं खरेदी सांगलीहून तायडीला करायला सांगितले . आईने पण निलाबाईला हाताशी धरुन बारसं आणि दिवाळीच्या कोरड्या तयारीला सुरुवात केली . आठ दिवस आधीच जय्यत तयारी झाली .  बारशाच्या आदले दिवशीच दुपारपासून एकएकजण यायला सुरुवात झाली व रात्री घर पाहुण्यांनी भरुन गेलं . बाळाला पहाण्यात चेष्टामस्करी करत झोपायला बारा वाजले दुसरे दिवशी सकाळपासून शांत ,  दुपारी जेवणं व संध्याकाळी बारसे असे एकएक कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले  पार पडले बाळाचं नाव

 " आशिष"

 ठेवलं . आलेले पाहूणे काहीजण दुसरे दिवशी गेले बाकी तायडी माडी  दिवाळीसाठी घर गच्च भरलेलं होतं .ज्योती शिकायला बदलापूरला होती त्यामुळे नेहमी करता घेरडीत आई-काका व संजू हे तिघेच रहायचे . मग सगळ्या मुली , जावई नातवंडानी घर भरलं की आई-काका खूष असायचे . त्यावर्षीची दिवाळी पण अगदी धूमधडाक्यात झाली आमाचा नविन संसार होता सणाच्या निमित्ताने आम्ही खरेदी करायचो . त्याकाळात टेपरेकॉर्डर व कॕमेरॕच खूपच आप्रुप होतं म्हणून एसके भाऊजींना सांगून या वस्तू आम्ही मुंबईहून आणायला सांगितल्या होत्या तेही खूप मस्त वाटलं होतं . भरपूर पाहूणे , फराळ , कपडालत्ता अशी मजेत दीवाळी झाली . आईची मात्र कामाने बऱ्यापैकी चिडचीड पण व्हायची . हल्ली आई काकांना संजूची फार काळजी वाटत असे . आभ्यासात तिची काहीच प्रगती होत नव्हती , ती आता नऊदहा वर्षाची झाली होती त्यामुळे तिचे वय वाढेल तसं आई-काकांंची चिंता वाढत होती . मग आम्ही कोणी घेरडीत असलो की आई-काकांंना बरं वाटत असे तिला सुधारण्यासाठी काय करावं यावर चर्चा होत असे . 

      दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी मला परांड्यात न्यायचे ठरले . आता आशिष खूपच खेळकर झाला होता त्याला समजायला लागलं होतं . मग जसजसे मी गावाला जायचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी आई-काकांंची हूरहूर वाढू लागली होती . आता करमणार नाही असे त्यांना वाटायचे आणि मुख्य कारण म्हणजे माझी नोकरी हे होतं . कारण आशिष तीन महिन्याचा झाला की माला बँकेत जाॕईन व्हाव लागणार होतं . बाळाला कसं आणि कोण सांभाळणार याविषयी काहीही ठरलेलं नव्हतं . त्यामुळे आईला असंख्य प्रश्न डोक्यात घोळत असत ती माझ्याशी बोलत असे 

" याला आंघोळ घालावी लागेल तुला तर जमत नाही . पोरग भुकेचं आळकी आहे थोडापण दम धरत नाही , बाळसेदार आहे त्याला व्यवस्थितच खायला प्यायला दिलं पाहिजे , त्याची भूक , खोड्या वाढत जाणार  तुझं तर काम सुरु होणार काय आणि कसं करणार "

असे ती विचारायची यावर 

" काहीच माहित नाही "

हे माझं उत्तर ठरलेलं असायचे तोतो तिला फार चिंता वाटायची .

काका म्हणायचे

" इथपर्यंत केलंय आता पुढे काय करायचं ते त्यांच्या घरच्यांनी ठरवलं असेल . तू का काळजी करतेस परांडकरांच घरी बोलणं झालं असेल . सगळ्यांना मोकळं बोलायची सवय नसते काय करतात पाहूयात ".

यावर आई गप्प बसायची वाड्यात सुद्धा हा विषय चर्चेचा ठरला होता . आता शरुला नोकरी सोडावी लागणार इतपत चर्चा कानावर येऊ लागली .

आईने मग ठणकावून सांगितले 

" नोकरी सोडण्यासाठी तिने एवढे प्रयत्न केले नाहीत . जगात नोकरी करणाऱ्या बायका नाहीत काय ? तिचा नवरा चिकार खंबीर आहे करतीलच काहीतरी फक्त लेकराची आबाळ होऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हांला आपलं वाटतं  ".

       तुळशीच्या लग्नानंतर हे व काकी मला न्यायला घेरडीला आले व जवळजवळ अडीचतीन महिन्यांनी माझं बाडबिस्तार गुंडाळलं व आम्ही परांड्याला आलो . 

    खऱ्या आर्थाने आता काकांच्या सहा मुलींपैकी चार मुलींच्या जबाबदाऱ्या संपल्या होत्या . आता ज्योती व संजू यांचे मार्गी लावणे बाकी होते . त्यातही ज्योतीचे शिक्षण सुरु होते ती दिसायला छान होती व चुणचुणीत होती . ज्योती मायडीकडे बदलापूरसारख्या ठिकाणी रहात होती तीची प्रगती होत होती . संजू दिसायला छान होती पण तीची शैक्षणीकच नाही तर बाकीची पण प्रगती  चारचौघींसारखी होत नव्हती आणि ही गोष्ट दिवसेंदिवस ठळक होत चालली होती . याचा परिणाम म्हणून आईपेक्षा काका संजूच्या बाबतीत जास्तच हळवे होत चालले होते  . तिच्या बारिकसारीक गोष्टी पण ते सतर्कपणे पाहू लागले .

आता काकांना ज्योती व संजू या दोघी तर दिसत होत्याच शिवाय आक्कीच्या मुली पण मोठ्या होऊ लागल्या होत्या . त्यामुळे आई म्हणायची

" आता उतार वयात जबाबदाऱ्या संपत येतात का वाढत जातील हे येणारा काळच ठरवेल !

पाहुया कसं कसं होतं ते ".





 प्रकरण 28 वे

नवा गडी नवं राज्य


24/07/2022




      माझं बाळंतपण झालं आणि आई-काका खऱ्या अर्थाने चार मुलींच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते . पण लग्न झालं चार चौघासारखे रीतिरिवाज केले की संपले असे काकांचे आजिबात नव्हते . मला न्यायला हे आले होते तेव्हा काकांनी यांना जवळ कॉटवर बसायला सांगितले व मला चहा करून घेऊन ये म्हणाले जवळच आई पण मधल्या खांबासमोर खुर्ची टाकून बसली . मला अंदाज आलाच होता . कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर आईकाका आधी चर्चा करत असत आणि मग तो विषय सर्वासमोर बोलत असत . मी पण चहा घेऊन आले आणि कपाटाजवळ बसले . मग काकांनी बोलायला सुरुवात केली .

" परांडकर आता तुम्हाला नोकरी लागून सात वर्षे होऊन गेली दोघेपण आता बार्शीत आहात पुढेही बार्शीतच रहणार . मग किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं , मुलगा पण झाला आहे आता तुम्हाला स्वतःच घर असायला पाहिजे . त्यादृष्टीने तुम्ही प्लॉट बघायला सुरुवात करा तुम्हाला घरासाठी बँक कर्ज देते मात्र प्रश्न प्लॉटचा असू शकतो . कोणताही आडपडदा न ठेवता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी पाठीशी उभा आहे तुम्ही प्लॉट बघा , खरेदीसाठी मी तयारीनिशी येतो , बांधकाम तुमचं तुम्ही करा त्यासाठी बँक कर्ज देतेच आहे . " 

एवढं काकांचं बोलणे ऐकले आणि यांना धक्काच बसला यांना खूप अवघडल्या सारखे झाले . ते म्हणाले 

" काका खरं आहे सगळं , आम्हाला घर तर घ्यायचं आहेच पण बजेटचा प्रश्न आहे , बँक कर्ज देते त्यात प्लॉट घेऊन बांधकाम होत नाही . मी आमच्या घरी काही बोलू शकत नाही तुमच्या तर अजून जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्हाला कसं मागू " .

मग काका म्हणाले 

" तुम्ही कुठे मागताय , मीच देतोय की ".

त्यांना तोडत मध्येच आई म्हणाली 

" आमचं सगळ ठरलंय बघा , आम्हाला आमच्या  मुली-जावई मुलाप्रमाणे आहेत त्यामुळे आहे ते सगळ मुलींचं आहे . आम्ही काही पैसे कोणाला देत नाहीत फक्त इथली इस्टेट ही दुसरी इस्टेट तयार होताना द्यायची , आणि वेळेला मदत द्यायची हे आमचं ठरलेलं आहे . त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका , भीड बाळगायचा काही कारण नाही ".

मधेच काका नाक फुगवत हसत हसत म्हणाले 

" हा आता तुम्ही दोघं मिळवताय फारच वाटलं तर तुमच्याकडे पैसे आल्यावर परत द्या मला , मी काही नाही म्हणणार नाही . अजून बराच खर्च करायचा आहे मला पण " . 

मग चहा पिऊन ती मीटिंग तिथेच संपली . हे मला म्हणू लागले 

" काका किती धोरणी आहेत ते खूप पुढचं पाहतात . किती सहज आणि स्पष्टपणे मुख्य म्हणजे समोरच्याला अजिबात दडपण येणार नाही असे बोलतात , मला खूप मोकळेपणा आणि सच्चेपणा वाटला त्यांच्या बोलण्यात . खरं तर त्यांच्याकडून पैसे घेणे मला कसतरी वाटते पण त्यांनी अगदी क्लिअर ऑफर दिलीय . आपण विचार करू खरंच ते म्हणतात तसे त्यांना गरज पडेल तेव्हा जमतील तसे आपण पैसे परत करू पाहू कसे होते ते ". 

आम्ही घराचा विचार करतच होतो पण काकांनी डोक्यात सोडलेल पिल्लू घेऊन आम्ही बार्शीत आलो . बरोबर लहान आशिष , आता बँक सुरू होणार त्याला बाहेर सोडून जावं लागणार ते कसं करायचं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आधी परंडा मग बार्शीत आलो आणि आमचं पर्व इकडे सुरू झालं .

    घेरडीत अजून ज्योती व मुख्य म्हणजे संजूची पुर्ण जबाबदारी होती कारण संजू दिसायला सुंदर होती पण तिची बुद्धी आणि प्रगती चारचौघींसारखी नव्हती आई-काकांंच्या उतारवयात त्यांना लागलेला घोर होता तो . शिवाय आक्कीच्या दोन मुली पण आता दहाबारा वर्षाच्या झाल्या होत्या

तसं तर आई संसारातून विरक्त व्हायचा प्रयत्न करत होती . तिच्यामध्ये वाचनामुळे बरीच प्रगल्भता आली होती . पण स्वतःच्या सहा मुली त्यातही मुलींच्यात अंतर जास्तीचं असल्यामुळे तिचा संसार तसा नेटका नव्हता त्याला लांबड लागलेलं होतं . पण तिच्या उत्साहाला मात्र तोड नव्हती .

ज्योती बदलापूरला शिकायला होती उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी सोडला तर आई-काका व संजू असे तिघेच घेरडीत रहात असत . काकांनी शेतीचा व्याप जाणूनबुजून कमी केलेला होता व संजूचं शिक्षणात फारसं लक्ष नसल्यामुळे व फारशी प्रगती नसल्यामुळे  आजकाल ते तीघेही बऱ्याच वेळा मुलींकडे जायचे . आकरावीमध्ये काॕलेजला ज्योती बदलापूरहून किर्लोस्करवाडीला आली होती . आता आई-काकांच्या डोळ्यासमोर ज्योती होती . तिच्या पाठोपाठ अंजू-गायत्री होत्या आणि वय वाढेल तसे संजूच्या काळजीची धार तीव्र होत चालली होती . संजुसाठी कोणीही सांगेल तो दवाखाना काका करायचे . एके ठिकाणी तिला पंचधातू दुधात उगाळून त्यात चूर्ण खलून त्याचं चाटण द्यायला सांगितले होते तर काकांनी सोने चांदीसह पाच धातूच्या अंगठ्या करून आणल्या होत्या आणि कित्येक महिने रोज स्वतः सहाणेवर उगाळून त्याच चाटण करुन संजुला  द्यायचे . काहीही करु पण संजू चार चौघीसारखी नॉर्मल व्हावी असे त्यांना वाटत असे . त्या चाटणाचा परिणाम संजुवर बऱ्यापैकी झाला होता शरीरातील सगळेच घटक वाढले होते . ती आणखीनच सतेज , गोरीपान दिसू लागली , तिचे केस कमरेपर्यंत वाढले . शरीर पण सशक्त झाले वयाच्या 14 व्या  वर्षीच तिला मासिक धर्म सुरू झाला . तिला वेणीपण घालता यायची नाही . तिला स्वतः काहीच करता येत नसे सगळ आईला करावे लागे . आम्ही बहिणी असू तेव्हा आम्ही करायचो . आईला मात्र वाईट वाटायचे त्याबरोबरच सांजुचा राग पण यायचा आणि कीव पण यायची . चोवीस तास संजू आईबरोबर असायची त्यामुळे ती म्हणायची 

" उभ आयुष्य कसं टेचात गेलंय आणि उतार वयात भलतीच काय ही चिंता आपल्याला पोखरयला लागली आहे . रेखाचं दुःख तरुणपणाच्या बळावर निभावलं पण आता कठीण वाटतं आहे हे . " 

पण काकांना वाटायचे

 " आपल्या उतारवयात मुख्यतः आईची ताकद नसताना , आईला डायबेटिस झाल्यानंतर संजूचा जन्म झाला आहे आणि त्यामुळे तिच्यात काहीतरी कमतरता आहे त्यात तिचा काय दोष आहे . ती आपली जबाबदारी आहे तिला न्याय देणे आपलं काम आहे . " .

अशी आई काकांची घुसमट व्हायला लागली होती .

इकडे ज्योतीचे राहणे आधी दोन अडीच वर्षे बदलापूर आणि आता किर्लोस्करवाडी याठिकाणी पडल्यामुळे ज्योतीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता . दिसायला घरंदाजा प्रमाणे आणि आधीच अंगी उत्साह , चौकसपणा , धडाडी , लाघवीपणा यासारखे गुण आसलेल्या ज्योतीला पोषक वातावरण मिळत गेले व त्याचे तिने सोने केले . माझ्या बाबतीत नोकरीमुळे लग्न ठरविण्यात येणारी सुलभता पाहता काका ज्योतीला बँकेच्या परीक्षा दे म्हणून मागे लागत होते . तिचे शैक्षणिक करियर चांगले होते पण ती फारसे त्यात रमत नसे . नोकरीसाठी फारसा मनापासून विचार करत नसे . ती जराशी बिनधास्त , आणि नाविन्याचा ध्यास असलेली होती स्वतः काहीतरी नवीनच करायचं आणि चार लोकांना आपल्या नादी लावायचे असं काहीसं तिचं होतं . तिचा शिवणकामाकडे जास्त कल होता . तिने तो क्लास लावला आणि ज्यांच्याकडे ती क्लासला जायची त्यांनाच ती त्यातली विविधता शिकवून यायची , त्या बाबतीत तिच्यातील कला ठळकपणे उठून दिसत होती . संपूर्ण क्लासमध्ये तिच्या कलेच आणि धाडसाचं कौतुक होत होतं आणि ती त्यात रमत होती . तिने शिवण काम शिकण्यासाठी कधीच साधा कपडा वापरला नाही . एकदम भारी कपड्याला हात घालायचा आणि त्याची सुंदर कलाकृती करायची , त्याचं सगळ्यांनी तोंडात बोट घालून कौतुक करायचं . स्वतःच्या डोक्यातून नवनवीन फॅशन काढायची आणि ते करून दाखवायचं . अगदी लहान वयात तिने सगळ्यांना चकित करून सोडलं होतं . आई , तायडी आम्ही सगळ्या बहिणी , वड्यातले , किर्लोस्करवाडीचे सगळेजण तिचे तोंडभर कौतुक करायचे . तिचा त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आईला तर तिचं भारी कौतुक वाटायचं लगेच तिच्या डोळ्यासमोर संजू दिसायची मग ती थोडंसं उद्विग्न होऊन म्हणत असे 

" एकाचढीत एक पोरी आहेत आमच्या , चढती कमान पहायची मला सवय आहे . परमेश्वराने एकवेळ संजुला रंगरूप कमी दिलं असतं तर चाललं असत पण संजू सगळ्या पोरीसारखी व्हायला पाहिजे होती पण काय आहे देवाला ठाऊक " .

      इकडे आमच्या डोक्यात आमच्या घराचा विचार घोळत होता . मी बँक आणि आशिष यात पूर्णपणे गुरफटून गेले होते . तसही प्लॉट , बांधकाम हे विषय मला फारसे समजत नव्हते पण आपलं घर असले पाहिजे एवढं नक्की वाटत होतं . बँकेत बरेचसे सहकारी साधारण यांना समवयस्क असल्याने बऱ्याच जणांचे घराचे काम चालू होते त्याप्रमाणे यांनी प्लॉट शोधायला सुरुवात केली लवकरच त्याला यश आले . बार्शीत त्यामानाने जागेच्या किंमती पहिल्यापासूनच जास्त आहेत . आम्ही दबकत दबकत एक प्लॉट फिक्स केला व त्याप्रमाणे काकांना कळवले . तेव्हा पद्माकर काकांचे आमच्याकडे भरपूर येणंजाणं असायचं . पत्र मिळताच काका बार्शीला आले प्लॉट पाहिल्यावर काकांना पण प्लॉट आवडला मग  मालकांची भेट , बोलणी झाली , इसार दिला आणि खरेदीची तारीख पक्की केली . बाकी सगळी तयारी यांना करायला सांगून काका घेरडीला गेले . प्लॉटचे मालक पाचजण भाऊ होते आणि सगळे वेगवेगळे राहत होते ते एकमेकांशी बोलत नव्हते फक्त व्यवहार एकत्र करायचे . त्यामुळे यांना एक गोष्ट करायची झाली तर पाच जणाकडे फिरावे लागे . स्टॅम्प खरेदी लिखापाडी अशी सगळी तयारी झाली आणि खरेदी उद्यावर आली मग काका घेरडीहून आले . सकाळी हे , काका व पद्माकर काका कचेरीत जायचं ठरलं मी बँकेत जाणार होते . काकांना असे जमिनीचे किंवा जागेचे व्यवहार करायचे असले की भारी उत्साह असायचा . तरुणाला लाजवेल अशी त्यांची तयारी , लगबग असायची . अगदी तसच त्याही दिवशी ते लवकर उठून दाढी , आंघोळ , नाष्टा करून कडक इस्त्रीचे शर्ट पँट घालून पेपर चाळत कॉटवर लोडला टेकून पद्माकर काकांची वाट पाहत बसले . यांची पण अवराआवरी चालू होती पण त्यांना टेन्शन आले आहे असे जाणवत होते . तोवर पद्माकर हजर झाले . ते दोघे गप्पा मारत बसले काका माझ्याकडे पाहून हसत म्हणाले

" परांडकराना टेन्शन आलं असं दिसतंय एवढी काळजी करू नका म्हणावं होत असतं सगळ ".

पण असे काही असले की यांना खरच खूप टेन्शन यायचं त्याचा परिणाम जेवणावर व्हायचा , त्यांना घशाखाली अन्न उतरत नसे . दहा वाजता सगळे जायला निघाले तसे काकांनी त्यांची पैसे ठेवलेली लेदरची बॅग कपाटातून काढली नेहमीप्रमाणे बकोटित धरली नाक फुगवत हसत हसत माझ्याकडे पाहिले आणि ते तिघेजण निघाले मी मात्र आपलं घर होणार फक्त या आनंदात होते . बाकी खरेदी , बांधकाम त्याच नियोजन काय असते यातील ओ की ठो मला समजत नव्हते . फक्त आपल्याबरोबर काका आहेत सगळ नीट होणार आशी खात्री होती . आमच्या दोघांमध्ये मी बरीचशी अल्लड तर हे खूपच दीर्घ विचारी असे चित्र होते . त्यामुळे घराच्या बांधकामाची सर्वस्वी जबाबदारी यांच्यावर होती . मी फक्त नोकरी असल्यामुळे पैशाची काही व्यवस्था करु शकणार होते . 

मी बँकेतून आले तोवर प्लॉटचा व्यवहार करून हे सगळे घरी आले होते . मग रात्री गप्पा मारत असताना यांनी पुढचं बांधकाम कसे करणाऱ याचे नियोजन काकांना सांगितले .

आता पुढचे सुरू करा असे सांगून काका दुसरे दिवशी घेरडीला गेले . बँकेचं कर्जप्रकरण करायचं होतं त्यामुळे सर्च रिपोर्ट , प्लॅन आणि बरीच कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी यांची धावपळ साधारण जानेवारी 92 ला सुरू झाली ते जून 93 ला घराची वास्तुशांती झाल्यावरच संपली . 

आम्ही इंजिनियर कडे फक्त प्लॅन आणि देखरेख एवढंच काम दिले होते . बाकी बांधकामावर आवश्यक तसे वाळू , सिमेंट , विटा असे सामान आणणे , लाकडी साहित्य , ग्रिल , बांधकामावर पाणी मारणे , लाईट कनेक्शन , पाण्याचं कनेक्शन , लाईट फिटिंग , अशी सगळी कामे वेळकाळ न पाहता दीड वर्ष अहोरात्र यांनी एकट्याने करवून घेतली यांना स्वतःला खूप कष्ट करावे लागले , आणि आमचा सुंदरसा बंगला तयार झाला . 

आशिष एक वर्षाचा झाल्यापासून हे काम सुरू झालं तो अडीच वर्षाचा झाला तेव्हा आम्ही या बंगल्यात राहायला आलो . तो जवळजवळ रोज एकदा तरी यांच्याबरोबर बांधकामावर यायचा

" पॉटवर यायचं मला " 

असे म्हणत तो स्कुटरवर येऊन बसायचा . लाईट फिटींग चे काम चालू होते त्यादिवशी पहाटे अडीच पर्यंत तो जागा राहिला होता . घरी सोडतो चल म्हणाल की भोकाड पसरायचा . त्यामुळे त्यालाही या जागेविषयी खूप लळा लागला होता . मी मात्र कधीतरी सुट्टीदिवशी चक्कर मारत असे . बाकी फेफरी मात्र यांची एकट्याची उडत असे . 11 जूनला वास्तुशांती करायचे ठरले त्याप्रमाणे 30 एप्रिल 1993 रोजी आम्ही गृहप्रवेश केला आणि माझ्या  26 व्या वाढदिवशी स्वतःच्या घरात राहायला आलो . आता वास्तुशांती !!

वास्तुशांतीच्या आधी आठ दिवस तायडी , तिची मुलं आणि ज्योती व संजू बार्शीत आले होते बार्शीत पहिल्यापासून उन्हाळा जास्तच असतो त्यामुळे रात्री इथली प्रसिद्ध मावा मस्तानी खायला जाणे हा पण मजेचा भाग होता . आम्ही मात्र  जय्यत तयारीत होतो . दोन्हीकडच्या पाहुण्यांनी घर गच्च भरले होते . मोठ्या थाटामाटात वास्तुशांती झाली . मी लग्नात जेवढं मेकअप केलं नव्हत तेवढे आज मला ज्योतीने तयार केले होते . बार्शीत जरा खव्याचे प्रस्त जास्त आहे तर खवा घालून बुंदीचे चविष्ट लाडू जेवायला होते तर रात्री मावा मस्तानी असा बेत होता . 

माडीवर असलेल्या भाड्याच्या दहा बाय दहाच्या दोन रूम मधून चार रूमच्या मोठ्या बंगल्यात आम्ही तिघेजण राहायला आलो ! एक कॉट , गोदरेजचे कपाट , भांड्याचे रॅक आणि ओनीडाचा टीव्ही एवढंच मोठ समान आणि छोटी छोटी भांडी कुंडी घेऊन आमचं बाडविस्तार घेऊन आम्ही स्वतःच्या घरात राहायला आलो ! समोर मोकळं मैदान , भोवताली बागीचासाठी सोडलेली जागा , तसा बंगला म्हणलं तर आमचाच पहिला झाला होता त्यामुळे त्याचं फार कौतुक होत होतं .

आता ज्योतीची अजून दोन वर्ष राहिली होती पण ती खूपच उठावदार दिसत होती त्यामुळे पाहणारे तिच्या विषयी विचारात असत . इकडे अंजू गायत्री मेडशिंगीला राहत होत्या त्यांच्या बाबतीत  जवळजवळ सगळे निर्णय त्यांचे काकाकाकु घेऊ लागले . खेडेगाव आसल्यामुळे आणि मोठं कुटुंब असल्यामुळे मुलींना फारसे शिक्षणात त्यांनी गुंतू दिले नाही बराचसा त्यांचा वेळ घरकामात जात असे . त्याचा परिणाम असा झाला की त्यांची शिक्षणाची ओढ पूर्ण कमी झाली . मार्क्स चांगले मिळेनात मग आंजू आगदीच पंधरा वर्षांची झाली की 94 साली तिचे खात्यापित्या घरात त्यांनी लग्न ठरवले , शेती करणाऱ्या मुलाशी तिचे लग्न ठरले . मुलींनी शिकाव आशी मनापासून तळमळ असूनसुद्धा लग्नासाठी मदत करण्याखेरीज काका आणि आम्ही काही करू शकलो नाही . त्यावेळी मात्र यांनी आगदी प्रयत्नपूर्वक काही पैसे जमा केले व काकांना दिले . काका म्हणाले 

" तुमच्या समाधानासाठी आता घेतोय पण आता पुन्हा पैशाची व्यवस्था झाली की त्याचे 6 वर्षाचं NSC घेऊन ठेवा मुदत संपल्यावर त्याचं काय करायचं मी सांगतो . पुन्हा मात्र तशीच बचत आम्ही करत गेलो . ती तशीच वाढवत जावा आणि पुढे गरज पडेल तशी वपरा मला काही परत देऊ नका असे काकांनी सांगून टाकले . ज्योतीपेक्षा लहान असूनही पंधराव्या वर्षीच आंजुचे तिच्या काकांनी ठरवल्याप्रमाणे लग्न झाले .

        इकडे ज्योतीचे एस वायचे वर्ष सुरू होते . पुढच्या वर्षी ती बी. कॉम होणार होती आता वीस वर्षाची होईल म्हणत तिच्या लग्नाविषयी घरातल्यापेक्षा बाहेरचे लोकच चर्चा करू  लागले , तायडीला लग्नाविषयी विचारू लागले . ज्योतीमध्ये तायडी जरा जास्तच गुंतली होती नात्याने ती बहीण आसली तरी दोघींच्या वयात जवळजवळ पंधरा वर्षाचे अंतर असल्यामुळे व तायडीच्या मुली ज्योतीच्या पाठोपाठ असल्यामुळे तायडी व भाऊजी ज्योतीला मुलीप्रमाणे मानत असत . त्यामुळे तिचं लग्न जमवणे आपली जबाबदारी असे तायडीला वाटत असे . काकांनी तर वरसंशोधनाची तयारी सुरू केलीच होती पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही यावर घरात शिक्कामोर्तब झाले होते . तरी चर्चा होत असे काका वाडीला गेले की तायडीशी ते चर्चा करत असत आणि त्यांनी ठरवून टाकले की ज्योतीच्या शेवटच्या वर्षाची सहामाही परीक्षा झाली की दिवाळीनंतर तिच्या लग्नाचं पहायचं म्हणजे फायनल झाली की लग्न होईल . तयडीला मात्र चैन पडत नव्हती मग शेवटच्या वर्षी दिवाळीत तिची आजुन परीक्षा होते तोवरच पत्रिका देणे मुलांच्या चौकशा करणे ही लगबग तीने सुरू केली होती , विशेष म्हणजे तिच्याकडे ज्योतीसाठी मागण्या पण येत होत्या . या धडपडीला मार्चमध्ये यशही लगेच आले . मूळचा कराडचा असलेला परंतु नोकरीनिमित्त पुण्यात रहात असलेल्या एका मेकॅनिकल इंजिनीअरच्या स्थळाविषयी तायडीला माहिती मिळाली . लगेचच तिने पत्रिका फोटो दिला सगळ व्यवस्थित जमते  असे समजले की तातडीने त्यावर हालचाली करत ज्योतीची परीक्षा झाली की दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला . ज्योतीची परीक्षा झाली की आता तिचे शिक्षण संपले आहे तर तिला यावेळी न्यायला तुम्ही या असे तिने काकांना आधीच कळवून ठेवले होते त्याप्रमाणे काका आदले दिवशी वाडीत हजर झाले . काका आल्यावर तायडीने सविस्तर माहिती काकांना सांगितली आपण उद्या दाखवून तरी येऊ असे ठरले व त्याप्रमाणे गुरूवारी कराडला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला . काकांना मुलगा व एकूण स्थळ पसंत पडले होते . ज्यांच्याकडे काका , ज्योती , तायडी व भाऊजी उतरले होते तिथेच दिवसभर थांबले होते . त्याच दिवशी मुलाने अजून दोन मुली पहिल्या व ज्योती पसंत असल्याचे संगितले . तसा लगेच काकांना निरोप मिळाला . काका पण याबाबतीत खूप तत्पर होते . लगेचच सगळेजण पुन्हा एकदा मुलाच्या म्हणजे मुकुंद घळसासी यांच्या घरी गेले काकांची व मुलाचे वडील म्हणजे नाना यांनी चर्चा केली . कच्ची बोलणी करून साखरपुड्याची तारीख पक्की केली व बाकी बोलणी  त्यादिवशी करू म्हणत सगळेजण वाडीला परत आले . तायडीच्या आनंदाला सीमा राहिली नाही . सगळे एकदम खुश होते . 

 आता ज्योतीची परीक्षा व एकूणच शिक्षण संपले होते आणि लग्नही ठरले होते . दुसरेदिवाशी काका बरोबर ज्योती घेरडीला जाणार होती . ज्योती जवळजवळ पाच वर्षे तायडीकडे राहिली होती . मंजू मेधा पण बऱ्यापैकी कळत्या झाल्या होत्या त्या तिच्या मैत्रिणीच होत्या . सगळ्यांनाच एकमेकांची इतकी सवय झाली होती की ज्योती बॅग भरू लागली तशी वातावरण एकदमच हळवे झाले . सगळ्या गोष्टी इतक्या पटपट झाल्या होत्या की विचार करायला कोणाला वेळच मिळाला नाही . खरं तर सगळ मनासारखं झालं होत , लग्न ठरलं होतं , मनासारखा मुलगा मिळाला होता . पण लगेचच दोनतीन महिन्यात लग्न होणार आता थोडंसं आईकाका बरोबर रहावस वाटतं होतं . इकडे वाडी कायमची सोडायची याची हुरहूर लागली होती तर तिकडे नाविन्याची आस होती . नवीन जोडीदार कसा असेल आता घेरडी वाडी सगळी माणसं सोडून एकदम पुण्याला राहायला जाणार होती . नवनवीन स्वप्ने उराशी बाळगत हसत हसत साश्रू नयनांनी ज्योतीने बॅग भरली आणि दुसरे दिवशी चार वाजता काका ज्योतीला घेऊन घेरडीत हजर झाले . 

    इकडे आईला याविषयी आईला अजिबात कल्पना नव्हती . आता ज्योती जवळजवळ सातआठ वर्षांनंतर घेरडीत राहणार , बघू आता थोडंसं एकत्र राहू मग लग्नाचं पाहायचं या विचारात आई होती . काकांनी हातपाय धुतले आणि आईला म्हणाले 

 " वाड्यातल्या सगळ्यांना बोलावणं पाठवतो चहा कर सगळ्यासाठी " . 

आणि हसत हसत ज्योतीचे लग्न जमवून आल्याचे सांगितले . आई एकदम भावनावश झाली  

" आहो , आत्ता तर पोरीच शिक्षण झालंय आपल्याजवळ ती राहिलीच नाही चार दिवस जवळ राहील आसे वाटलं होतं  आणि तुम्ही तर लग्नच ठरवून आलो म्हणता, आस कसं हो ".

काकांनी सविस्तर सगळ आईला सांगितले व म्हणाले  

"इतका छान योग जुळून आलाय तर वाट कशाला पहायची म्हणून आलो ठरवून बघ कसं वाटतं तुला . " 

तिला रडू आवरेना पण ते आनंदाश्रू होते . आईने जड अंःकरणाने चहाच आधण टाकलं तोवर मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू , मोठ्या काकू बाकी वहिनी भाऊ हजर झाले . चहापाणी झालं गप्पा रंगल्या आणि एकूणच उत्साहाला उधाण आलं . आता सगळ्यांना पुढचे वेध लागले होते . वड्यातली सगळी भावंडं , भाचे , भाच्या वहिनी ज्योतीला चिडवत होती , चेष्टा मस्करी सुरू झाली  !!!







प्रकरण 29 वे


ज्योतीच्या लग्नाचे स्वर घुमू लागले

11/04/2022


      दरवर्षी 14 एप्रिलच्या दरम्यान बँकांना दोनतीन दिवस सुट्टी येते आणि बहुतेक चैत्र महिना सुरू असतो . माझं लग्न झाल्यापासून रजेचा प्रश्न असायचा मग रविवारला जोडून सुट्टी आली की दोनतीन दिवसांची रजा काढून मी घेरडीला जात असे मग आई पण त्या दरम्यान चैत्रा गौरीचं हळदीकुंकू ठेवायची नुकतच मला काकांचं 

 " परवाच ज्योतीच्या लग्नाचे पक्के करून आलो ".

असे पत्र आले आणि कधी एकदा मी घेरडी गाठते असे मला झाले नेहमीप्रमाणे याहीवर्षी मी घेरडीला गेले . आई-काका , ज्योती , संजू , वाड्यातले सगळे माझी वाटच पाहत होते . घरी गेल्यावर लग्नाचां सगळा वृत्तान्त समजला , घरातील वातावरण एकदम खुशीत होते . ज्योती तर हवेतच होती , त्या दोघांची एकमेकांची पसंती झाली होती पण साखरपुडा , नंतर लग्न , ते कधी , कसे याविषयी अजून काही ठरले नव्हते . तिकडे तायडी कराडच्या संपर्कात राहणार होती . 

आईचे मात्र एक लेक चार दिवसांसाठी माहेरी आली आहे तर दुसरी लवकरच लग्न करुन सासरी जाईल असा विचार करत हळव्या स्वरात स्वगत सुरू होते .

" पोरी शिकवून सवरून मोठ्या करायच्या , त्यांची लग्न करायची आणि हाहा म्हणता चिमण्या उडून गेल्या सारख्या एक दिवस भुर्र उडून जातात , रमतात आपापल्या संसारी , जगाचीच रीत आहे ही म्हणा " .

असे म्हणत म्हणत तिच्या खास स्टाईलने दोन्ही हात वर करत हलवत पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत गौराईच्या हळदीकुंकवाच्या तयारीला सुरू होती . तसं ज्योती नववी पासून शिकण्याच्या निमित्ताने बाहेर होती . ती दिसायला फारशी रेखीव नसली तरी पहिल्यापासून ती मोहक , स्मार्ट आणि रसरशीत दिसायची . आपलं गाव खेडे गाव आहे टवाळी मुलं असतात यापेक्षा शहरात चांगलं शिकेल तिचे कल्याण होईल . पाहू शिक्षण झाल्यावर थोडंसं राहील घेरडीत असे तिला वाटत होते पण ज्योतीचे लग्न चुटकीसरशी जमले आणि आईला एकीकडे आनंद तर एकीकडे पोरीला जवळ राहायला मिळालं नाही याची चुटपुट लागली होती . मग आता आम्ही जमलो तर करु जराशी मज्जा म्हणत यावर्षीचे तिचे हळदीकुंकू स्पेशल होते . पोरी आल्या की गप्पांच्या नादात काम होत नाही म्हणत ओल्या नारळाचा चव घालून साजूक तुपातले रव्याचे लाडू , भरपूर खसखस घालून केलेल्या सारणाच्या करंज्या आणि खमंग काहीतरी आसले पाहिजे म्हणून तिचे खास मेतकूट लावून , भरपूर शेंगदाणे घालून केलेलं भडंग ही सगळी तयारी तिने आदले दिवशी करून ठेवली होती . तर रात्रीच घागरीच्या पितळी पातेल्यात हरभरे भिजायला घालून सकाळी ते पातेलं मागच्या दरात तिने हरभरे फुगण्यासाठी उन्हात ठेवले होते . मंडईतून आणलेल्या त्यातल्या त्यात चोच दिसणाऱ्या दोन कैऱ्या कुंकू लावून पोपट म्हणून दोन ग्लासवर ठेवण्यासाठी तिने बाजूला काढल्या , एकदोन कैऱ्या तिने डाळीसाठी खीसल्या आणि बाकीच्या पन्हं करण्यासाठी उकडायला टाकल्या . 

दुपारची जेवणे लवकरच आटपून आम्ही दोन वाजताच तयारीला लागलो . आईची डाळ खूपच प्रसिद्ध होती . हलक्या हाताने उखळात कुटायची त्यात कैरीचा खीस , मीठ , साखर , कोथिंबीर घालून मोठसर वाटायची आणि त्याला हिंग , जिरे , भरली मिरची घालून चरचरीत फोडणी द्यायची .

आणि संध्याकाळपर्यंत जास्त आंबट होऊ नये म्हणून डब्यात घालून त्यावर पांढरा रुमाल टाकून तिने तो डबा डेऱ्याखाली पाण्यात ठेऊन दिला . 

     तोपर्यंत इकडे सोप्यात काकांनी नेहमीप्रमाणे गौरीच्या मखराची तयारी केली . उंच काळ्या पिपावर मोठा पाट आडवा टाकून पहिली पायरी , मोठ्या निळ्या पेटीची दुसरी पायरी आणि खाली एक छोटी ट्रंक ठेऊन तिसरी पायरी केली त्यावर छानस बेडशीट टाकून आणि वर सुतळ्या बांधून त्यावर साड्या टाकून छानस मखर तयार झाले . तोवर आईने लेकीच्या मायेने देवघरात खण घालून बसवलेली लाकडी गौर काढून उंच समईवर बांधून तीला साडी नेसवून , गजरा माळून त्या मखरात नेऊन बसवली . मग स्वतः माझ्या लग्नात मायडीने घेतलेली कठापदराची नऊवारी सिल्कची चिंतामणी कलरची साडी त्यावर जांभळं ब्लाऊज घालून केसांचा आंबडा त्यावर काकांनी खास आणलेला ग्रीष्मात दरवळणारा मोगऱ्याचा गजरा माळून छान आवरून तयार झाली .

ती अशी तयार झाली की काका नाक फुगवत तिच्याकडे पाहून हसायचे तर ती पण लाजायची . एवढं वय झालं होतं पण दोघेही चिरतरुण होते . तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह असायचा . हल्लीहल्ली आई थोडीशी थकल्यासारखी वाटायची एक तर वय साठीकडे झुकलेले होते , गेल्या पंधरा वर्षांपासून शुगरचा त्रास मुख्य म्हणजे दिसामासाने वाढणारी संजू आणि तिची काळजी . आम्ही मुली जमलो की त्या दोघांना प्रकर्षाने संजूची काळजी वाटायची . तिच्याविषयी गप्पा मारताना ते हवालदिल होत असत . संजू चांगली दिसावी , चारचौघात ती एकटी पडू नये यासाठी त्या दोघांचा अटापिटा असे . जिथे जातील तिथे खास तिच्यासाठी कपडा खरेदी करत असत . ती फक्त चौदा वर्षांची होती पण उफाड वाटायची , देखणी दिसायची , नजरेत भरत असे पण बुध्दी फारशी चाणाक्ष नव्हती . त्याचीच आईकाकाना खूप आरण होती . आईने तिला पण छानसा ड्रेस घालून तयार करायला आम्हाला सांगितले कारण ती आमच्या बरोबरीने दिसावी , राहावी , मागे पडू नये हा मुख्य उद्देश .

तोवर आम्ही गौरीभोवती लाकडी केळीची फणी , कैरीचे पोपट , नक्षीदार कापलेले कलिंगडे , वेगवेगळी खेळणी ठेऊन आरास केली . यावेळी ज्योतीने आणि मी खास एक रांगोळी काढली होती . गौरीसमोर मधोमध थाळ्यामधे दुपारीच पाणी ओतून ते संथ होऊ दिले त्यावर चाळणीने दाट बुक्का चाळला आणि त्यावर हळुवार हाताने ज्योतीने सुंदर रांगोळी रेखाटली , रंग भरले , थाळ्याच्या कडेनी नाजूक महिरप काढला आणि त्या दिवसाचे 

" पाण्यावरची रांगोळी "

 हे हळदी कुंकवाचे खास आकर्षण ठरले .

आईने आधी फराळाची दोन ताटे गौरी समोर आणून ठेवली , पाण्याचं चांदीच तांब्या भांड ठेवले मग एका ताटात हळदीकुंकवाचे पंचपाळ , आत्तरदाणी , डाळ , पन्हं , पाटीत ओटीसाठी भिजलेले हरभरे घेवून देवापुढे असलेल्या मोठ्या पितळी समईत तेल घालून सगळे साहित्य घेऊन ती सोप्यात आली . दोन मिनिट शांत उभे राहून समधानी चेहऱ्याने सगळ नीट आहे न ते न्याहाळून आणि पहिलं आणि अत्यंत सत्विकपणे , भक्तीने पाहिले हळदीकुंकू तिने गौरीला दिले लगेच मला पाटावर बसवून हळदी कुंकू दिले , ज्योतीला पण तिचे आता लग्न ठरले आहे म्हणत पाटावर बसवले मग वाड्यात माहेरी आलेल्या विद्याला हाक मारली तोवर गावातच सासर असलेली पण मळ्यात राहणारी छाया ताई पण जायला अंधार होऊ नये म्हणत लवकरच रुमालात जाईजुईची फुले घेऊन आली . 

सगळ्या माहेरवाशिणीना आई गौरीच्या रूपात पाहतेय असे वाटत होते . गावात ब्राम्हणाची 25 एक घर होती तर सोनार , तेली , वाणी यांच्या घरी सुद्धा कोळ्याच्या भागाबाई कडून आमंत्रण गेले होते . जवळजवळ 50 बायका तरी आज येणार होत्या . 

आईने कोपऱ्यात खुर्चीवर तिनेच केव्हा तरुणपणी पांढऱ्या दोऱ्यानी विणलेला कोयऱ्या कोयाऱ्याचा रुमाल टाकून ते ताट त्यावर ठेवले आणि बायकांची वाट पाहत बसली पाच वाजता तर तिची जय्यत तयारी झालेली होती . माझ्याबरोबर साडेचार वर्षाचा मनीष होता . त्याला ह्या सगळ्याच भारी आप्रुप वाटत होते . आणि आई-काकांना त्याचं कौतुक होतं तो पण आगदी लाडाने त्यांच्याकडून सगळ करून घेत होता . त्याच सगळ लक्ष गौरी समोरच्या फराळावर होतं . आईने पण पटकन नैवेद्य दाखवला आणि

" लहान मुलं म्हणजे कृष्णाचा अवतार असतात " .

म्हणत त्याच्या पुढ्यात लाडवाचा डबाच ठेवला .

त्यानेही दोन हातात दोन लाडू उचलले आणि खाल्ले आई कौतुक भरल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती . खोड्याच गाऱ्हाणं गात होती तोपर्यंत तो अंगणात वाड्यातील मुलासोबत मस्ती करण्यासाठी निघून गेला , त्यांच्यात रमून गेला . बायकांची गर्दी सुरू झाली तशी आईने काकांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि आम्ही सगळे सोप्यात येऊन बसलो .

आज सगळ्यांना हा कुतूहलाचा विषय होता की भाऊकाकानी काकीनी मुलींना शिकवलं आणि शिक्षण संपलं की वेचून काढल्यासारखे जावई आगदी वेळेत शोधले .

ज्योतीपण त्या दिवशी माझी साडी नेसून तिनेच डिझाईन केलेलं ब्लाऊज घालून , वेणी गजरा घालून छान तयार झाली होती . ती पण देखणी , घवघवीत , रसरशीत दिसत होती . रांगोळी , आरास , ब्लाऊज या सगळ्याचं बायका अगदी भरभरून कौतुक करत होत्या . चेष्टा , मस्करी , हसणे आणि उखण्याची तर चढाओढ लागली होती . उषा वहिनींनी त्यांचा खास उखाणा गाण्यातून घेतला . तर रमा काकू , प्रभा काकू , अरविंद काकी , देशपांडे वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी आणि बऱ्याच जणी त्या स्पर्धेत होत्या .

" ज्योती लक्ष देऊन ऐक ग , मी नाव घेते आता ते ऐक तुला नक्कीच उपयोगी पडेल " .

असे म्हणत अलंकारीक उखाणे घेत होत्या . तोतो ज्योती लाजेने चुर होत होती . नेमकी आज दुपारीच मुकुंद घळसासी यांची फक्त

" Miss you "

अशी तार आली होती आणि जवळजवळ वाड्यात सगळ्यांना ते माहीत झाले होते . त्यामुळे वाड्यातील तिच्याबरोबरची सगळी भाचे कंपनी , भावंडं , वहिनी तिला चीडवण्याची एकही संधी सोडत नव्हते काका तर हसतच म्हणू लागले  

" मायला मागच्या आठवड्यात यांची ओळख पण नव्हती न लगेच miss you कसं काय ? "

मला पण ज्योतीला छळायला मजा येत होती . हळदी कुंकवाच्या धामधुमीत दोन तीन तास कसे गेले समजले नाही मग गौर उतरवण्यापूर्वी वाड्यातील पुरुषांना डाळ पन्हं घ्यायला बोलावलं पुन्हा गप्पांचा फड रंगला डाळ कित्ती खमंग लागते म्हणत , ज्योतीचे , तिच्या कलेचं , दिसण्याच कौतुक करत डाळीचा डबल राऊंड फिरवून झाला . तिथल्या रीतीनुसार वाड्यात घरोघरी फराळाची ताटे गेली . सगळे आवरून झाले आईने

" शरू , तुझं पोरगं दोडाच किती गुण करतं ग आणि गोंडस दिसतं सगळ्यांच्या नजरेत भरतं आणि मग दृष्टावत , आण मीठ मोहऱ्या , काढते लेकराची दृष्ट , सुखानी जावा बाई तुमच्या तुमच्या घरी "

असे म्हणत मनीषची दृष्ट काढली . लगेच ज्योतीला पण म्हणाली

" या तुम्हीपण , नाचनाचायचं आणि पुन्हा फ्या म्हणून पडायचं ".

असे म्हणत दोघांची दृष्ट काढून दोन्ही हातांची बोटं कपाळाभोवती दुमडून कडकडून मोडली . मी घेरडीत आले की आई जरा घाबरायची कारण दोनतीन वेळा मनिष तिथे गेला की आजारी पडला होता . इथे चांगला दवाखाना नाही म्हणत पळत सुटावे लागे . मी घेरडीत येणार म्हणलं की पहिलं काका नारळ आणून ठेवायचे . संध्याकाळी सोप्याच्या पाठभिंतीत असलेल्या नरसोबाला मनीष कडून नारळ फोडण्याचा कार्यक्रमच असायचा . 

सोप्यातली सगळी आवराआवर झाली .

मग जेवणे करून झोपायला आम्हाला रात्रीचे आकरा वाजले . 

माझे दोन तीन दिवस लग्नाची चर्चा , नियोजन करण्यात कसे गेले समजले नाही . मला सोमवारी बँक होती म्हणून मी रविवारी बर्शीला जाणार होते . आम्ही जेवणे करून आवरुन पारा गाडी संगोल्याहून आली की जाऊ असे म्हणत बसलो होतो , काका गाडीचा अंदाज घ्यायला पेठेत गेले होते आणि गाडीचा आवाज आला म्हणून मी निघायच्या तयारीत होते तर काका परत आले आणि येताना त्यांच्याबरोबर तायडी आणि एमबीके भाऊजी आले होते . आता ती काय सांगते ते ऐकण्यासाठी आम्ही उस्तुकतेने तिच्याभोवती जमलो . आईने तिला सरबत दिले मग तिने उत्साहात सांगितले 

" 20 एप्रिलला किर्लोस्कर वाडीला लग्नाच्या पक्क्या याद्या , लग्नाची तारीख काढणे आणि साखरपुडा करण्याचे पक्के करून आलो आहे " .

सगळं अगदी पटापट ठरत होते . कारण नाना म्हणजे मुलाच्या वडिलांचे आणि काकांचे त्यादिवशी असे बोलणे झाले होते की जूनमध्ये मुहूर्त आहेत तर कशाला लांबवायचे , उडवून टाकू बार लगेच . मग त्या दृष्टीने या हालचाली होत होत्या . तायडी आणि भाऊजी कराडला जाऊन साखरपुड्याचे पक्के करून आले होते . येणाऱ्या गुरुवारी साखरपुडा होता मग तायडी येतानाच लुकतुकेना जेवणाची ऑर्डर , दारात छोटासा मंडप घालायची ऑर्डर ही कामे करून आली होती . तिने आईकाकांच होत असलेले उतारवय , घेरडीत होणाऱ्या गैरसोयी याचा विचार करत सगळा पुढाकार घेतला होता 

" आईकाका आपल्या मुली-जवयाना मुलाप्रमाणे मानतात तर आपण पण त्यांच्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात " 

असे म्हणत तिने ज्योतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली होती . आणि त्याप्रमाणे तिने कृती केली होती . 

आता गाडी पाऱ्याहून यायची वेळ झाली होती त्यामुळे 19 तारखेला आम्ही साखरपुड्याला वाडीला येतो असा निरोप घेऊन मी बार्शीला निघाले . 

रिटायर झाल्यापासून काकांची बैठक सोपान कांबळेच्या सायकल दुकानात असे . मला स्टँडवर सोडून काका दुकानात बसले नेमके अंता काका पण आले होते . काका सगळ्यांना कौतुकाने ज्योतीच्या साखरपुड्याचे सांगत होते . तसेच बेबीने कसं सगळं परस्पर पण अगदी व्यवस्थित नियोजन केले हे सांगत होते .भाऊ काकांना सगळ्या मुलीच आहेत कसं होणार असे म्हणणारे आता उलट म्हणू लागले . ज्यांना मुलं आहेत ते नीट पाहत नाहीत काय करायचं मुलांना त्यापेक्षा मुली बऱ्या . आई वडिलांना पाहतात तरी असे उघडउघड काका समोर म्हणायचे आईला पण बरेच जण हल्ली म्हणत असत 

" सगळ्या मुली आहेत तुम्हाला पण नशीबवान आहात तुम्ही , मुलं तरी काय देतात " .

आई-काका मात्र यावर काही बोलत नसत . शांत असायचे , त्यांनी एकूणच जीवनशैली ठरवली होती . काय कसे आणि कधी करायचे याच त्यांचं पूर्णपणे नियोजन झाले होते . त्यांना काळजी फक्त संजूची होती . आई अध्यात्मिक होती 

" जे पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे होणार आपण त्यात काही बदल करू शकत नाही "

असे ती म्हणत असे तर काका मात्र संजूची काळजी तर करायचेच पण बरोबर तिच्यावर अती जीव टाकत होते . संजूला कोणी बोललेले त्यांना पटत नसे . यावरून आई-काका मधे पण विसंवाद व्हायचे .

      घेरडीहून बार्शीत आल्याबरोबर मी ज्योतीच्या साखरपुड्याचा यांना सगळा वृत्तान्त सांगितला आणि दोन दिवसात आम्ही वाडीला जायची तयारी करू लागलो . काकांनी कपडा खरेदी जवळ्यात केली तर सोन खरेदी सांगलीत गाडगीळकडे करुन वाडीला जा असे तायडीला सांगितले . 

मायडी बदलापूरहून तर गोंदामामा सोलापूर हून यावा यासाठी काकांनी सांगोल्यात येऊन फोन केले . ठरल्याप्रमाणे 19 तारखेला घेरडीहून मोहन आण्णाचे घर , आमचे घर , आम्ही , मयाडी , गोंदा मामा एकएक करत संध्याकाळपर्यंत किर्लोस्करवाडीत हजर झालो . उद्या साखरपुडा होणार होता आज जय्यत तयारी झाली होती . आनंदाला उधाण आलं होतं , दरात मंडपात बसून गप्पांचे फड रंगले होते . ज्योतीच्या मेंदीला रंग चढत होता तिला नव्या नवरीचे तेज आले होते त्यामुळे ती अधिकच उठावदार दिसत होती . घरात तिच्या मोठ्या बहिणी भाऊजी सगळ्यांनी चिडवून तिला बेजार केले होते तर तायडीच्या मुली , धनु तिच्या भोवती घुटमळत होती एकूणच तायडीचे कुटुंब ज्योती मधे गुंतले होते . गाणी , भेंड्या सुरु होत्या तर कोणी आपल्याच डाव्या हातावर उजव्या हाताने मेंदी रेखाटत होते . रात्रीचे आकरा वाजून गेले होते पण कोणीही झोपण्याच्या मनस्थितीत नव्हते . सगळ्यांचा मजा करण्याचा मुड होता . मग नेहमीच्या स्टाईलने काकांनी आवाज दिला 

" चला बास झाल्या गप्पा उद्या पाहुणे लवकर येणार आहेत सगळ्यांनी पहाटे उठायचं आहे त्यामुळे पटापट झोपा सगळे ".

आणि त्यांनी लाईट पण बंद केले . आम्ही सगळ्या बहिणी , आई , उषा वहिनी , चीमु , शुभांगी मामी अंथरुणावर पडून पुन्हा बराच वेळ लग्न कसे जमले , मुलगा कसा आहे , काय करतो याविषयी गप्पा मारत होतो. केव्हा झोपलो कळले नाही तोवर उठायची वेळ झाली .