Tuesday, July 7, 2026

वंचितांची शाळा एक पाऊल प्रगतीकडे

 महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत सोलापूर येथे 19 मार्च 2017 रोजी जागतिक  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमांमध्ये सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे , बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मेनेजर मृदल जोगळेकर यांचा सत्कार केला तर वंचित घटकासाठी काम करणाऱ्या सौ. अनु प्रसाद मोहीते हिला सन्मानित करण्यात आले . त्या दरम्यान या मुलीच्या  कार्याची माहिती मिळाली व तिचे भविष्यातील ठरलेले नियोजन समजले . हे ऐकत असताना ह्या कार्याची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून सर्व प्रसंग लिहून

" मिळून साऱ्याजणी " 

या मासिकात प्रसिद्धीस देण्यासाठी पाठविला होता तो फेब्रुवारी 2018 च्या अंकात छापून आला होता .



वंचितांची शाळा : एक पाऊल प्रगतीकडे

" खंरतर हा पुरस्कार नसुन ही एक जिम्मेदारी आहे की आम्ही जे काम करतो ते आणखी चांगल्या पध्दतीने व्हावं आणि अविरत व्हावं , समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करताना खऱ्या अर्थाने मन  दु:खी होतं आहे . कारण आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना एकीकडे अन्नाच्या घासासाठी कचराकुंडी हुडकणारे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे चिमुकले हात…..रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण…..भिकारी……वृध्द……माणसाला एका घासासाठी तरसावं लागतं यासारखी दुसरी शोकांतिका नाही . पण कधी कधी हे समाधान वाटतंय की या दुर्लक्षित , वंचित घटकांची आपण सेवा तरी करतोय . फार मोठ काही नका नसेना पण त्यांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न तरी करतोय . मित्रानों  हे काम कोणी एकटा करु शकत नाही यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे . समाजातील सर्वांनी ही आपली जिम्मेदारी आहे या दृष्टीकोनातून विचार केला तर समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही . पण आमच्यातली माणुसकी कुठेतरी संपत चालालेली दिसत आहे. तीच माणुसकी आपण जपायला हवी ".

   पंचवीस वर्ष वयाची बी ए एमएसडब्ल्यु झालेली सौ. अनु मोहीते तळमळीने व्यासपीठावर बोलत होती . निमित्त होते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॕईज फेडरेशन महिला आघाडी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे ! या संघटनेच्या सोलापुरात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या महिलेला सन्मानित करायचे ठरले होते. त्यासाठी सोलापुर मधेच सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. नभा काकडे यांची मदत घेण्याचं ठरवलं . नभाला हा विषय बोलून दाखवताच तिने अनुच्या कार्याबद्दल माहिती दिली . ती ऐकून भारावून गेल्यासारख झालं आणि वाटलं ही करते ते कार्य समाजासमोर आलं पाहिजे. नभाने तिची माहिती दिली जणु सन्मान पत्रच !

      समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे हा अनुचा ध्यास ! वंचितांची शाळा " एक पाऊल प्रगतिकडे " हे तिच्या प्रकल्पाचे नाव आहे हा प्रकल्प वंचित मुलांसाठी असुन जी मुल रस्त्यावर भीक मागतात , राहायला घर नाही , जागा मिळेल तिथे त्यांचे आईवडील झोपडी बांधून रहातात . झोपड्या महापालिकेने काढा म्हणले की काढतात . फुटपाथवर राहतात . अशा मुलामुलींना शोधून एकत्र करुन शाळा चालवते . सुरूवातीला मुलांना हे विचित्र वाटायचं , ती दगड मारायची , मरामारी करायची नुसतं हसत रहायची . पण समाजाच्या मुख्य प्रवाहात या मुलांना आणायला या ध्येयाने पतीच्या सक्रीय साथीने अनु हे काम करत आहे . सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळा चालवते .

        याच प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यावर भीक मागणारे मनोरुग्ण यांनाही आधार देण्याचा हे दोघे प्रयत्न करतात . अनेक मनोरुग्णांना इस्पितळात नेणे , त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे , थंडी , ऊन , पाऊस यापासून सरंक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही पण कामे ही दोघे करतात . महापालिका व पोलिस खाते यांच्या सहकार्याने त्यांना सिध्देश्वर शाळेसमोरील पोलिस चौक हाच कॅम्पस शाळेसाठी मिळाला आहे तर दुसरी शाळा हैद्राबाद रोडवरील पण्याच्या टाकीजवळ आहे . उघड्यावर 

" गुरूकुल " या पध्दतीने या शाळा चालतात ती एमएसडब्ल्यु  झाली आहे याचा ती खरोखरच समाजकार्यासाठी उपयोग करते . आपल्या आसपास कुटुंबाचा भार वाहणाऱ्या  दिवसरात्र कष्ट करणाऱ्या  , रुढी परंपरांनी पिचलेल्या स्त्रीया आपण पाहतोच . पण याच स्त्रिया समाजाचाही भार वाहून , कष्ट करून रूढी परंपरांच्या बंधनाला भिरकावतात याचं एक उदाहरण म्हणजे अनु आहे . प्रसाद मोहिते याच्याशी तिने परवाच सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं आणि वाचलेला पैसा त्यांच्याच शाळेतील पाच मुलींच्या नावे एफडी करून ठेवले . सासरचे पहिले स्वागत आपल्या विधवा सासुच्या हातूनच झालं पाहिजे आणि आपली ओटी पण त्यांनीच भरली पाहिजे हा अनुने आग्रह धरला ! सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळचे इर्लेवाडी हे प्रसादाचे ग्रामीण भागातील गाव आहे . लोकांनी खूप विरोध केला , अशुभ होईल म्हणून भीती घातली परंतु अनुचे उत्तर होते की ज्या आईने शेतीकर्जामध्ये आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात मुलाला शिकवलं , सामाजिक संस्कार केले , मोठ केल ती प्रसादची आई माझ्यासाठी अशुभ असूच शकत नाही . उलट तिचेच आशिर्वाद माझ्यासाठी प्रथम महत्वाचे आहेत . अशी ही बंडखोर , प्रेमळ , कष्टाळु आणि समाजमन जाणणारी अनु हीचा आज आम्ही सत्कार करत आहोत . तिचा हा सत्कार समाजात तिच्यासारखे काम करणाऱ्या  तमाम महिलांच्या कार्याचा सन्मान आहे भविष्यामध्ये वंचित घटकांसाठी कायमस्वरुपी प्रकल्प उभारण्याचा मोहिते पतिपत्निचा मानस आहे . त्यास मनापासून शुभेच्छा ! 

  कार्यक्रमामध्ये आनुचा परिचय दिला आणि एकप्रकारची गंभीर शांतता पसरली होती . अंतर्मुख व्हायला होत होतं . पण अनु अगदी सहजपणे व्यासपीठावर आली व आपले अनुभव आणि अपेक्षा उकलत होती . हिच्या शाळेच्या आसपासच एक जागा आहे की ज्याठिकाणी लोक उतारे टाकतात . ती सांगत होती हिच्या शाळेतल्या मुलांना हे चांगलाच माहिती आहे आणि ते एवढ मोठ चांगल अन्न लोक उतारे म्हणून टाकतात आणि ही मुल तो उतारा घेऊन येतात आणि खातात . आनु म्हणली

" अशा आंधश्रध्दामधून जर मुलांची पोटं भरणार असतील तर त्या चाललेल्या बऱ्या ! आईवडिल मुलांना वाढवत असतांना आईवडिलांना बजेटचा कधीच प्रश्न पडत नाही पण त्याच आईवडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा बजेटचा प्रश्न कसा काय उद्भवू शकतो ? आणि वृध्दाश्रमात कसे काय चालु शकतात? माझ्या कुटुंबाच मासिक उत्पन्न रु सात असून त्यात आमच तिघांचं व्यवस्थित भागते पण लोकांना पैसे कसे काय पुरत नाहीत हे मला न उलगडलेलं कोड आहे .

     आपण रस्त्यावर भीक मागणारे लोक तसेच व्यसनाच्या आहारी गेलेले मनोरुग्ण पाहतो . पण आपण त्यांचा विचार करत नाही कारण आपण आपल्याच जीवनात इतके व्यस्त झालेले असतो की आपल्याला आसपास काय चालले आहे याच्याकडे पाहायला कुठून वेळ आणणार ? खरे तर हे लोक खूप दिवस अंघोळ करत नाहीत , स्वच्छतेची काळजी घेत नाहीत , नखे , केस न कापणे दात न घासणे भरपुर बिड्डया सिगरेट पिणे मग ही माणसं समाजातुन बाहेर फेकली जातात . त्यांच अंतर्मन जाणुन घेता आलं पाहिजे त्याचं दु:ख आपलसं करता आलं पाहिजे . तर कुठे या गोष्टी शक्य होतील . असे लोक दिसले तर त्यांना मदत जर करणे तुम्हाला जमणार नसेल तर करु नकात पण त्यांचा तिरस्कार तरी करु नकात . आम्ही अशाच लोकांसाठी काम करतो . मैत्रिणिनों हा शिवधनुष्य पेलणे हे एकट्याचे काम नाही जर आपला हातभार लागला तर नक्कीच हे शिवधनुष्य पेलण्यास मदत होणार आहे . आणि एकही माणूस उपाशी राहणार नाही . 

तिने केलेलं आव्हाहन हे ऐकत होत्या त्या बऱ्यापैकी कमवत असलेल्या भगिनी होत्या . बऱ्याचजणींनी त्या कार्यक्रमानंतर आपले मानस बोलुन दाखवले . कोणी वाढदिवसाची घोषणा तर कोणी स्मरणदिनाचे औचित्य साधण्याचा मानस बोलुन दाखवत होत्या आणि कार्यक्रमाचे सार्थक होत आसल्याचे जाणवत होते . थोडासा आशेचा किरण दिसू लागला होता…….



 कॉ. सरिता कुलकर्णी 

वूमन कौन्सिल कन्व्हेनर

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन औरंगाबाद युनिट

मोबाईल :- 9421607248