मोहीम फत्ते......
कालच कीर्ती भारतात परत आली आणि तब्बल 16 दिवसांनी माय-लेकराच्या भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला आणि मला पण भरुन आल्यासारखं झालं .
कीर्तीची कंपनी क्लाएंट व्हिजीटसाठी बाहेर पाठवते . त्यातही नंबर लागणे ही तशी अवघड गोष्ट आहे . कंपनी आधी तुमच्याकडून जाणार आहात का ही खात्री करुन घेते पाठवेल न पाठवेल ह्याची निश्चिती नाही पण आपलं मत द्यावं लागतच . तिला 2024 मध्ये 2025 साठी विचारलं गेलं त्यावेळी तिची द्विधा मनस्थिती झाली होती . पिल्लू आत्ता कुठे एक वर्षाचं झालं होतं . WFH नुकतेच बंद झाले होते आणि तिने ऑफिसला जायला सुरुवात केली होती . ते थोडस सुरळीत होत होतं , तसं तर बाळ पण अजून पीत होतं . काय करावं ? हा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा होता तिने मला फोन करुन विचारलं काय करावं . मी तिला म्हणलं तुला काय करावस वाटते , तुझं अंतर्मन काय म्हणते याचा पहिल्यांदा तू अंदाज घे नंतर तुम्ही दोघे चर्चा करुन मला सांग . यावर ती म्हणाली दोन दिवस झाले आम्ही दोघेही विचार करतच आहोत . मला जायला पाहिजे असे वाटते त्यावर भविष्यातील काही गोष्टी मला achive करता येतील . तोवर मीपण विचार करुन ठेवला होता अशा संधी काही सारख्या मिळत नाहीत . शिक्षणासाठी मरमर करायची आणि त्याचं फळ मिळताना ते आनंदाने घ्यायला पाहिजे संधीने दार ठोठावलं की तिचं स्वागतच व्हायला हवे म्हणून मी ठरवलं कीर्तीचे मनोधैर्य वाढवले पाहिजे तिला आश्वस्त करायला हवं . तिला सांगितलं
"तू बिनधास्त हो म्हणून सांग , बघूया कसं manage करायचं ते वेळ आल्यावर करु ". यादरम्यान आम्ही जाणून बुजून आमच्या पुण्याला फेऱ्या वाढवल्या . आत्रेयला तशी पहिल्यापासून आमची सवय आहेच . मिरजेचे आजी आबा पण येत जात राहिले .
2025 उजाडलं आणि कंपनीने मार्चमध्ये जाण्याचा प्लॅन दिला .
तशी धावाधाव सुरु झाली , मग सलग सुट्ट्या आल्या की मी पण 1/2 दिवसांची रजा टाकायचे आणि आम्ही पुणे गाठू लागलो . त्यादरम्यान मी पिल्लूचं रुटीन कसं आहे , बाळाचे आईबाबा काय करतात हे टिपत होते . मला आपले स्वतःचे अनुभव जरी असले तरी त्याला आता 25 वर्षे होऊन गेली होती , घरात तसं लहान कोणी नाहीच . आजकालच्या पद्धती वेगळ्या आहेत , बदल भरपूर आहेत . त्याच्या आईबाबासमोर सांभाळणं वेगळं आणि पुर्ण जबाबदारी घेऊन सांभाळणं वेगळं . त्या बाळाबरोबर त्याच्या आईबाबाला पण आश्वस्त करणे ही तारेवरची कसरत होती . कीर्तीपेक्षा जास्त आशिषला प्रश्न पडत होते . एखादा आठवडा आम्ही पुण्यात जाऊ एखादा आठवडा मिरजेचे आजी आजोबा येतील असे आधी मनाशी ठरवले होते .
पुण्यात राहून त्याला डे केअरला सोडणे , आणणे , त्याचा खाऊ आणि मुख्य म्हणजे रात्रीचे झोपवणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आई बाबा समोर केल्या म्हणजे नकळत त्यात काही राहत तर नाही ना हे पाहण्याचा मुख्य उद्देश होता . पण कीर्तीचा प्लॅन नेमकाच मार्चएंडचा आल्यामुळे मलाही गोंधळायला झालं , काय निर्णय घ्यावा समजेना . कारण मला यादरम्यान रजा मिळणे किंवा मी घेणे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते . भरपूर विचार केला आणि मी डीक्लिअर करुन टाकलं पिल्लूला आम्ही बार्शीत नेऊ . त्यावर पहिल्यांदा आशिषच नाही म्हणाला . त्याच्या मते हे शक्यच नाही कीर्ती जरी गेली तरी मी असेन , घर त्याच्या सवयीचे आहे , दिवसभर त्याला डे केअरला सोडता येईल बार्शीत नेलं तर सगळाच एकदम बदल त्याला झेपणार नाही त्यात माझी बँक असणार पप्पांना लोड पडेल असं त्याच म्हणणं होतं . पण कीर्तीला खात्री होती ती म्हणाली फक्त रात्री आम्ही दोघेही नाही त्यामुळे कसं होईल याची शंका आहे तो जर रात्री तुमच्याकडे झोपला तर मग मी निश्चिंत होईन .
मग आम्ही प्रात्यक्षिक घ्यायचे ठरवले आणि त्याला घरातच पहिल्यांदा आमच्याकडे झोपवले आणि नंतर एक दिवस आकांक्षाकडे मुक्कामाला घेऊन गेलो . तो छान रमला त्यामुळे सगळ्यांना थोडासा कॉन्फिडन्स आला . मग आशिष म्हणाला ठीक आहे ,
मी त्याला घेऊन येतो दोन दिवस मी राहीन आणि 4/5 दिवसांनी त्याला परत पुण्यात आणू . मी तर तो 15 दिवस बार्शीत राहिला तरी चालेल आम्ही करु शकतो असे सांगितले पण आशिष तयार नव्हता , मग म्हणलं आशिष तयार तरी झालाय येऊ तरी दे करु पुढचे पुढे .
14 तारखेला आशिषला सुट्टी होती त्यामुळे 13 तारखेला वंदे भारताने पार्सल बार्शीला रवाना झाले . इकडे आबा कुर्डुवाडी स्टेशनवर स्वागताला सज्ज होते !!
घरी आला तेव्हा आत्रेय झोपलेला होता रात्री 10.30 वाजता घरात पोहोचला की तो जागा झाला आणि समोर आजी आबा दिसले तसा तो पुर्णच जागा झाला आम्हाला पाहून त्याला आनंद झाला एक तास खेळून नंतर तो 12 वाजता आमच्याकडेच झोपला . उशिरा झोपल्याने तो सहापर्यंत झोपला निवांत होता .
सकाळी आमचा टास्क सुरु होणार होता मी खूपच आतुर होते कसा काय तो react होणार म्हणून .
पण मला निसर्गाने पण भरपूर साथ दिली होती . 4/5 दिवसापूर्वी आमच्या अंगणात चिक्कूच्या झाडाखाली मांजरीने तिची पाच पिले आणून ठेवली होती . मला फारशी मांजरे-कुत्री आवडत नाहीत पण मुद्दामच बिस्किटे देत मी ती थोडीशी माणसाळवली होती . ती दिवसभर अंगणात , घराभोवती खेळायची आणि मोठ्या गाडीखाली जाऊन सावलीत बसायची .
सकाळी सहा वाजता आत्रेय उठला तो खेळतच !
ए आबा ऊठ
ए आजी ऊठ
दूदू प्यायच अशी बडबड सुरु झाली तोच मांजराच्या पिलांचा आवाज आला . त्याला मी आवाज ऐकवला
ते बघ माऊ म्हणलं की तो माऊ पहायला इतका एक्साईट झाला की त्याला बाहेर नेऊन गाडीखाली वाकून दाखवलं तो इतका चेकाळला तो चक्क अंगणात गुडघ्यावर बसून पुढे कोपरे ठेवून मांजरासारखा त्याच्याकडे बघतच बसला . खेळण्याच्या नादात त्याला दूध पण नको झालं त्याला ओढत घरात न्यायची वेळ आली .
म्हणलं बरं झालं !!
मग घरात त्याच्या ओळखीची त्याची खुर्ची , पांडुरंगाचा फोटो , आणि मुख्य म्हणजे देवघर ! तसे अलीकडे घरात कोणी लहान नाही कधी आला आत्रेय तर त्याच्या मागे धावायला सगळेच असायचे पण आता त्याची उंची वाढली आणि खुर्ची , सोफा , बेड, कट्टा यावर तो सहजपणे चढउतार करु लागलाय त्यामुळे सकाळी दोन तासातच त्याने मला आता घरात काय आवरु , एवढं मोठ्ठं घर असताना कुठे ठेऊ आणि कुठे नको असे त्याने मला सळो की पळो करुन सोडले . हे अपेक्षितच होते पण अरे अरे करेपर्यंत काहीतरी करुन तोंडाचा चंबू करत खट्याळ हसणे , वाट फुटेल तिकडे धावणे असे सुरु झाले . मग त्यादरम्यान खाऊ खाताना खुर्चीत बसून खाणे बंद झाले कारण इथली खुर्ची पुण्यातल्या खुर्चीसारखी नाही त्याला बेल्ट नाही त्यामुळे त्याचे स्वैरपणे धावत खाणे सुरु झाले आगदी गेटच्या बाहेर चिऊ , काऊ , भूभू , माऊ , हंबा सगळ्यांशी गप्पा करत खाणे पिणे करत होता . तो येण्यापूर्वी त्याला एक सायकल आणून ठेवली होती अंगणात त्यावर बसून फेऱ्या व्हायच्या . समोर ग्राऊंड असल्यामुळे ग्राऊंडवर खेळणारे दादा दिवसभर शेळ्या , गायी , म्हशी भूभू , चिऊ , काऊ दारासमोर दिसणे त्याच्यासाठी खूप आनंद देणारे होते .
आम्ही हॉल मध्ये बसलो की त्याच्या मनात आले की तो आमचे दोघांचे हात धरुन उठवायचा
रिंगा रिंगा म्हणायचं की धप्प म्हणत जागेवर पडायचं त्याच्याबरोबर आम्ही पण पडायचं , आम्ही पडलो की तो उचकी लागेपर्यंत खदाखदा हसायचा की लगेच दुसऱ्या सेकंदाला हा उभा रहायचा मग आम्ही पण उठले पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा . त्याच्या बाललीला पाहत त्याच्या बरोबर आम्ही पण लहान झालो होतो . तो जागेवर उड्या मारत जल्लोष करायचा आणि ते पाहून आमच्या आनंदाला पारावर राहायचा नाही .
सुख म्हणजे नक्की काय असतं हे कळत होतं .
कधी नव्हे अशी आमच्या देवघरात हळद कुंकू रांगोळी अक्षदा यांची रंगपंचमी साजरी झाली होती . श्रीकृष्ण , अन्नपूर्णा , गणपती सगळ्या मूर्तींनी नुसता रंगच नाही तर पकडपकडी पण खेळली होती . त्यामुळे लपण्यासाठी जागा सोडून देव कुठेही पळालेले दिसायचे रोज त्यांना जागेवर आणून ठेवावे लागे . कोणत्याही वेळी आमची देवाची घंटा वाजे !!
पाच वाजले की अंगणात पाईपने पाणी मारणे ( खेळणे ) हा छंद . त्याच्याशी खेळताना , त्याचे बोबडे बोल ऐकताना , त्याचा हट्ट पुरवताना मनाला निखळ आनंद होत असे . नातवंड म्हणजे दुधावरची दाट साय म्हणतात त्याची पुरेपूर प्रचिती आली आणि मन भरुन पावलं .
त्याची भाषा फार मजेशीर होती
आपण म्हणेल तसं तो बोलायचा पण ऐकायला दुसरच यायचं त्याचा अर्थ लावावा लागे
पुरंदरे म्हणलं की
' निमांदे '
थालीपीठ पाहिजे तर
' थापीत पाहिजे '
मनुका म्हणलं की
' मुकुंदा '
भगवंत म्हणलं की
' घबंत '
अशी दिवसभर मजा चाले .
सायंकाळी आवरुन कधी बागेत तर बहुतेक वेळा घबंताला (भगवंताला) जायचं . तिथला कार्यक्रम वेगळाच असायचा . भजन करणारासमोर जाऊन उभे राहणे . लहान मुलांबरोबर मस्ती करणे . मंदिरात एक हात जोडून उभी असलेली पाषाणाची गरुडाची मूर्ती आहे रोज गेलं की त्याच्याकडे हा पळत जाऊन उभा राहून गोरिला गोरिला करायचा .
मंदिरात नऊ अवतारांचे मोठ्ठे फोटो लावलेले आहेत हा प्रत्येकापुढे जाऊन त्याच्यासारखा हात पाय तोंड करुन उभे रहायचा . गणपतीसमोर पाटीत साखर असायची त्यावर डल्ला मारायचा विचार असायचा . पळत पळत त्याचे पूर्ण दोन राऊंड व्हायचे मग दमला की चालता चालता त्याने रांगायला सुरुवात केली की आम्ही उठायचो चला आता दमला बाबू म्हणत निघायचो .
घरी आलं की त्याला जाम भूक लागलेली असे जेवण होईपर्यंत आबांनी हॉल मध्ये गाद्या टाकलेल्या असायच्या त्यावर पुन्हा अर्धा तास कोलांट्या उड्या मारायच्या असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता . धुलीवंदनची सुट्टी , संप , एक दिवस माझी दांडी एक शनिवार आणि दोन रविवार असे तब्बल सहा दिवस मला घरी राहता आले होतं आणि चार दिवस बँक होती , तशी शोभा दिवसभर थांबत होती पण त्याला जास्त आबा लागत होते .
पाहिले दोन दिवस आशिष होता . तो होता तेव्हाच त्याच्या सगळ्या गोष्टी मी ताब्यात घेतल्या होत्या त्याच्याशी गप्पा मारत मी त्याला अनेक गोष्टी पाढवत होते .
आई ऑफिसला गेली .
बाबा ऑफिसला गेला .
आत्रेय आजीकडे झोपणार
आबाकडे झोपणार .
आणि आपण परत तोच प्रश्न विचारला की तो बरोबर उत्तर द्यायचा . पंधरा दिवस केव्हाही
आई कुठे गेली म्हणलं की त्याच उत्तर लगेच यायचं
' ऑफिसला '
तेही एका दृष्टीने बरं झालं होत .
तसा तो बार्शीत चांगलाच रमला आहे आता केतकीला पण यायला जमणार नव्हते तर राहू दे म्हणत तब्बल आकारा दिवस विनातक्रार तो बार्शीत राहिला .
रविवारी मिरजेचे आजी आबा आले तर त्याला कोण आनंद झाला . गिरक्या घेत त्याने तो साजरा केला . ती आजी त्याला जिंबी म्हणते तर हा परत आजीला जिंबी आजी म्हणून हाक मारतो . मला शलूsss म्हणायचं आणि पळत सुटायचं . त्याने दोन्ही आज्याना हाताला धरुन रिंगा रिंगा खेळायला लावलं . एकाच ठिकाणी दोन आज्या दोन्ही आबा पाहून तो चेकाळला .
आता सोमवारी तो आजी आबांबरोबर त्याच्या बाबाकडे पुण्याला जाणार होता . मग आवराआवरी सुरु झाली आणि माझ्या पोटात कालवाकालव सुरु झाली आबांना पण चैन नव्हती ते पण त्याला घेऊन फिरु लागले . तसं तर त्याच्या वयाचा विचार केला तर त्याने आईबाबाकडे असणे गरजेचेच आहे पण परिस्थितीमुळे त्याला आणावं लागलं होतं . तो छान राहिला म्हणून त्याचं कौतुकच आहे . त्याचे आई बाबा पण बिनधास्त राहिले त्यामुळे त्यांचेही कौतुक आणि तो आमच्याकडे राहिला त्याची जबाबदारी घेऊन त्याचं बालपण आम्हाला अनुभवण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य म्हणावं लागेल . तसं तर या आठ दहा दिवसात जो बोलेल तो बऱ्यापैकी हळहळत होता . आगोबाई एवढं छोटं बाळ कसं राहतं , बिचारी आई काय हो या नोकरीमुळे एवढ्याशा बाळाला लांब सोडून राहावं लागते तिला , किंवा काय हो तुमची बँक तुमचं वय आणि ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते , तुम्ही बँकेत जाणार आणि त्याच्या आजोबांनी काय करावं हो असे एक ना दोन अनेक प्रश्न लोकांना पडत होते .
पण मला तर हे मुद्दे काही फारसे रुचले नाही . त्याच्या आईला exposer मिळालं , बाळाला चेंज मिळाला थोडासा गावरानपणा , निसर्ग अनुभवता आला आणि आम्हाला बाललीला अनुभवण्याची संधी मिळाली हा सगळाच दुग्धशर्करा योग जुळून आला असे मला वाटले . ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास रिकामा म्हणायचं की अर्धा ग्लास भरलेला म्हणायचं हे ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे .
पुढे पुण्यात आई यायला अजून चारपाच दिवस बाकी होते पण त्याला बाबा भेटला होता , त्याच घर दिसलं होतं तिथे गेला की त्याने घरभर आईला शोधलं पण शांत राहिला खेळत राहिला . आजी , आबा , बाबा तिकडे आत्या आजीकडे एक दिवस अशी मजा केली त्याने . यावेळी कामाच्या व्यस्ततेमुळे हुकमी एक्का असणारी आत्या ( आकांक्षा ) मात्र तिच्या रिलीजमुळे शुक्रवारपर्यंत busy असणार होती एकही दिवस तिला WFH मिळणार नव्हते उलट तिला घरी यायलाच उशीर होत होता . तोपर्यंत त्याची आई आली आणि एकूणच मोहीम फत्ते झाली . त्याच्या बाबाने आता declear करून टाकले आहे की आई आता त्याला सोडून आम्ही आठ दिवस ट्रिप करुन येतो . म्हणलं जावा कुठे जायचं तिथे कमी तिथे आम्ही हजर असू !!!
एकूणच हा कालावधी कायम लक्षात रहाणार आहे . आजुन शाळा सुरु नाही , वयाच्या दोन वर्षाच्या आत त्याची उन्हाळ्याची सुट्टी झाली सगळ्यात मदत कोणाची झाली तर आत्रेयची झाली कारण त्याने सहकार्य केलं नसतं तर काहीच करु शकलो नसतो हेही तितकेच खरे !!
आम्हाला दोघांनाही निखळ आनंद मिळाला एक संधी मिळाली . असे कधी होईल याची कधी कल्पना पण केली नव्हती . पण एकूणच छान कधी खेळ , कधी दंगा , फोडाफोडी , अंघोळ करताना मस्ती , घरात भरपूर राडा नाकी नऊ येईपर्यंत दमछाक पण त्याच एक गोड हसू पाहिलं की , एक गोड आवाजात आजी म्हणून हाक ऐकली की सगळ कुठेच्या कुठे पळून जायचं .