Friday, March 7, 2025

महिलादिन

 जागतिक महिला दिनानिमित.....


 8 मार्च 1914 रोजी सर्वप्रथम महिलादिन साजरा करण्यात आला . महिलादिनाला क्रांतिकारी इतिहास आहे . अमेरिका आणि युरोपसह जगभरामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता . 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली . त्यामध्ये क्लारा झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 

" सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे "

अशी घोषणा केली . 

8 मार्च 1908 रोजी न्युयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली . प्रमुख मागण्या होत्या कामासाठी दहा तासांचा दिवस असावा ( 16 तास काम करावे लागे ) , कामाच्या जागी महिलांना सुरक्षितता आणि सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे !!!

यावेळी महिलांवर लाठीमार करुन हा संघर्ष मोडण्यात आला .

1910 मध्ये विविध देशातील महिलांची कोपनहेगन येथे परिषद झाली . या परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस 

" जागतिक महिला दिन "

म्हणून घोषित करावा असा प्रस्ताव क्लारा झेटकीन यांनी मांडला . यावेळी ज्या विविध मागण्या केल्या गेल्या त्या मागण्यांचे 

" ब्रेड अँड रोजेस " 

हे ब्रीदवाक्य होते . महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून

 ' ब्रेड ' तर जगण्यासाठी उत्तम दर्जाची वागणूक मिळावी म्हणून 

' गुलाब ' हे प्रतीक होते .

त्यावेळी महिलांना जनावरप्रमाणे न वागवता माणसाप्रमाणे वागणूक द्यावी असा ठराव पास झाला . या प्रस्तावाला 19 मार्च 1911 रोजी मान्यता मिळाली . त्यानंतर युरोप अमेरिका या देशांमधून सार्वत्रिक मतदान हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या , या झाल्या जागतिक घडमोडी .

     भारतात पहिला महिला दिन 1943 मध्ये साजरा केला गेला . 8 मार्च 1971 रोजी पुण्यात एक मोठ्ठा मोर्चा काढण्यात आला तर 1975 हे वर्ष युनोने 

" जागतिक महिला वर्ष "

म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समोर येत गेल्या आणि विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्या मांडण्यात येत आहेत . त्यावर मंथन होते उपाययोजना करण्यात येतात .

बँकिंग क्षेत्रात डोळसपणे नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना म्हणून AIBEA ची ओळख आहे . त्यामुळे बँकिंगमध्ये आणि पर्यायाने संघटनेत महिलांचा वाढता ओघ लक्षात घेता संघटनेने महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन दिले . महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाव्य प्रश्न आणि त्यावरील उपाय याचे मंथन केले जाते त्याप्रमाणे व्यवस्थापनाला  वेळोवेळी त्यात बदल सुचवले जातात . सेवाशर्तीच्या बाबत विचार केला तर इतर कोणत्याही क्षेत्रातील महिलांच्या तुलनेत बँकिंग क्षेत्रातील महिला या सुरक्षित आहेत .

     भारतात एकूण महिलांच्या 20% महिला या संघटित क्षेत्रात काम करतात त्यांना सर्व सेवा सुविधा मिळतात पण जवळपास  80% महिला या वर्तुळाबाहेर आहेत . मोलमजुरी आणि शेतमजुरी करणारांची संख्या जास्त आहे . महिलादिन साजरा करत असताना यावरही विचार करणे गरजेचे आहे . 

   आजकालची एकूणच समाजव्यवस्था पाहता असे जाणवते की महिलादिनाचा क्रांतिकारी इतिहास कुठेतरी बाजूला होत एक दिवस महिलादिन उत्सव म्हणून साजरा करायचा आणि उरलेले 364 दिवस तीचे अस्तित्व पुन्हा एकदा स्त्री , महिला , नारी , मादी या शब्दापाशी येऊन थांबत आहे ' ती ' या शब्दाशी निगडित आहे . त्याविषयी पुन्हा एकदा प्रखरपणे विचार मांडण्याची गरज निर्माण झाली आहे . कायद्याने समानता दिलेल्या स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे . कायद्याने संरक्षण दिले असले तरी त्याला अनेक पळवाटा आहेत . स्त्रीभ्रूणहत्या , बलात्कार , अत्याचार , राजरोसपणे चाललेले हुंडा प्रकरण हे ऐरणीवर आलेले प्रश्न आहेत . तिला ना वयाच ना जागेच बंधन आहे . आगदी 3 वर्षापासून 70 वर्षापर्यंत वय , निरक्षरापासून अत्युच्च शिक्षण घेत असलेल्या महिला या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही ठिकाणी सुरक्षित नाहीत . सध्या अवतीभोवती घडणाऱ्या असंख्य घटनांपैकी मोजक्याच घटना प्रखरपणे उजेडात येतात . कित्येक प्रकरणे जीवाचा अकांत करुन त्याचा कोणालाही थांगपत्ता न लागता विरुन जातात . मनुष्य म्हणून जन्माला आलेली पाशवी वृत्तीची माणसे समाजात बुरखा पांघरुन वावरत आहेत . आणि संधी मिळताच सावज सापडल्याप्रमाणे ती घाला घालतात , शिकार करतात .

हे कमी की काय म्हणून झालेल्या घटनेला बगल देत त्याला राजकीय , धार्मिक आणि जातीय रंग दिले जातात . पुरुषसत्ताक संस्कृती वगैरे म्हणणे गैर आहे . त्यामुळे स्त्री पुरुष असा संघर्ष , भेदभाव तर नाहीच म्हणू शकत उलट समविचारी स्त्रीपुरुषच एकत्रितपणे यावर उपाय करु शकतात . म्हणून हा विषय अत्यंत गंभीर समजून त्यावर होणारे राजकारण बाजूला ठेवून सरकार , लोकप्रतिनिधी , कायदेपंडित , समाजसुधारक यांनी एकत्रित येऊन सुज्ञपणे कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे . स्त्रीपुरुष समानता या विषयावर समारंभापुरत्या बाता मारणे व त्यातून स्वतःचा काही फायदा होतो का पाहणे ह्या बळावत चाललेल्या  प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे . तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा आचार आणि विचाराची अंतर्बाह्य पुनर्रचना होणे गरजेचे आहे . सच्चेपणाने काही निर्णय घ्यायला हवेत . समित्या गठित करायला हव्यात . त्यावर चिंतन व्हायला हवे , तिला सन्मान वाटला पाहिजे , तीन आत्मनिर्भर व्हावे , स्वयंरोजगार मिळवला पाहिजे यासाठी तिने प्रेरित झालं पाहिजे  अशा काही योजना जाणीवपुर्वक निर्माण केल्या पाहिजेत .

यासाठी भारताच्या इतिहासात थोडंसं डोकावून पाहायला हवं आणि जाणीवपुर्वक त्याची पुनरावृत्ती व्हायला हवी .

स्वराज्याचा ध्यास शिवाजी महाराजांना होता अष्टपैलू व्यक्तिमत्व आसलेला जनतेचा राजा , स्त्रियांना आदराने वागणूक मिळायची कोणी आगळीक केलीच तर जिवानिशी जाण्याची दहशत होती ! 

स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणारे फुले दाम्पत्य , समाजसुधारक आगरकर आणि स्त्रियांसाठी , पिचलेल्या दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला तीव्र उठाव , भलं मोठं आंदोलन . यासारखी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली आणि यांच्यासारख्या अनेक आदर्श व्यक्तींच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात आपण धन्यता मानतो हे चुकीचे आहे . त्यांचे विचार जाणीवपूर्वक आचरणात आणायला हवेत . 

या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करुन पिचलेल्या स्त्रिजातीसाठी ,  स्त्रीउद्धारासाठी नव्याने विचार करण्याची गरज आहे , नव्याने शाहू फुले आंबेडकर निर्माण होण्याची गरज आहे असे वाटत आहे . 

आजकाल स्त्रिया शिकल्या , मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या , राजकारणात वावरू लागल्या , नवनवीन तंत्रज्ञान शिकून आकाश कवेत घेऊ लागल्या या आणि अशा प्रकारच्या वाक्यांची लाज वाटू लागली आहे . वेळ पडली की झर्रकन तिच्या स्त्रित्वाची लक्तरं ओरबाडली जातात तिला आणि तिच्या स्त्रित्वाला रक्तबंबाळ केलं जातंय . त्यावर उपाय होणे ही काळाची गरज आहे त्यासाठी दहशत बसेल असे कायदे आणि त्याची ठराविक कालावधीत अंमलबजावणी जाणीवपूर्वक करायला हवी . स्त्रीपुरुष समानतेची पुनर्रचना होणे गरजेचे आहे . संस्कृतीत जाणीवपुर्वक बदल घडवणे गरजेचे आहे . नवीन पिढी त्याप्रकारे होणे गरजेचे आहे .

' ति ' ला मुक्तपणे , निर्भयपणे संचार करता आला पाहिजे . अशी मानसिक , राजकीय , सामाजिक परिस्थिती निर्माण होईल का ? तिला निर्भयतेचा , स्वाभिमानाचा , स्वावलंबनाचा , निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल का ? 

एवढीच या महिलादिनानिमित्त अपेक्षा !!!



कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी शाखा 

जॉईंट सेक्रेटरी 

बीओएमईयु औरंगाबाद युनिट

मो. 9421607248

saritakulkarni67@gmail.com

No comments:

Post a Comment