Sunday, December 20, 2020

कोरोना आणि बँका

कोरोना आणि बँका 
भाग 1


     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तिसऱ्यांदा देशात लॉकडाऊन वाढवलेले आहे . कोरोनाची कारणे , परिणाम , उपाय हे आता सर्वसामान्यापर्यंत पोहोचले आहे . तुरळक क्षेत्रातील लोक कामानिमीत्त बाहेर पडतात  . त्यापैकी एक म्हणजे बँकिंग क्षेत्र आहे . 
       देशाभरातील राष्ट्रीयकृत  बँकातील दहा लाख कर्मचारी व अधिकारी या सेवाक्षेत्रांमध्ये निस्सीमपणे ,  विनाथांबा आपली सेवा सर्वसामान्यांपर्यंत पुरवत आहेत .  मग त्या जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी उसळलेली गर्दी असो किंवा मुलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा घेण्यासाठी आलेला  नोकरवर्ग , पेन्शनर , कष्टकरी , शेतकरी , आम जनता असो .सेवा देण्याचे  काम बिनबोभाटपणे बँकांतून चालू आहे . मुख्य म्हणजे ती सेवा पुरवत असताना कुठल्याही प्रकारच्या  कौतुकाची ,  प्रसिद्धीची किंवा उपकाराची भावना नाही , अपेक्षा नाही , गाजावाजा नाही . विशेष म्हणजे सरकारने  30 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा देय असलेला पगारवाढीचा करार लटकत ठेवलेला आहे . पण या असल्या  गदारोळात 1 एप्रील 2020 रोजी नियोजित असलेल्या बँक एकत्रीकरणासारख्या कृतीचे सोपस्कार बिनबोभाटपणे पार पाडून घेतले . पण विरोधाची ही वेळ नाही रात्र वै-याची आहे इतका सुज्ञपणा बँकींग क्षेत्रातील संघटनांनी दाखवला . आणि नियोजित  आंदोलने तात्पुरती स्थगित केली .
       पण समाजाकडून विशेषतः प्रसार माध्यमातून काहीवेळा विरोधाभासच दाखावला जातो . आज घराबाहेर पडायला कोणी धजत नाही तिथे बँकांच  सेवा देण्याचं काम आविरत चालू आहे . आणि जाणीवपूर्वक त्याची फारशी दखल घेतली जात नाही हे दुर्दैव ! दखल नाही तर नाही पण या क्षेत्राविषयी समाजामध्ये किमान विरोधाभास तरी निर्माण करु नये ही अपेक्षा . परवा  तर TV वर
"मे महिन्यामध्ये तब्बल नऊ दिवस बँका बंद राहाणार "
आशी बातमी रंजकतेने  सांगितली जात होती . तसं पाहिलं तर त्यात 5 रविवार व  2 शनिवार आहेत . 1 मे ची सुट्टी तर सगळ्यांना नेहमीच असते . त्यात इतकं  रंजकपणे दाखवण्यासारखे काय होते हे समजले नाही . उद्या वर्षभराचे दिवस मोजून त्यातले शनिवार रविवार मोजून
 " बँकेला तब्बल .... सुट्ट्या " 
  असे सांगितले तर फारसे नवल नाही वाटणार . सध्या परिस्थितीत डॉक्टर , पोलीस , सरकारी आधिकारी यांचे काम तर कौतुकास्पद आहेच पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजातील  प्रत्येकाच्या सेवेसाठी सांगेल त्यावेळेला सेवा द्यायला बँका तत्पर राहिल्या  आहेत . त्यामध्ये शुगर बीपी सारख्या काही व्याधी स्वतःला  असलेले कर्मचारी असतील तर काहीजणांची छोटी बाळं किंवा  वयस्कर आई-वडिल घरी असतील . काही गर्भवती महिला असतील . पण कशाचीच तमा न बाळगता जास्तीत जास्त लोक आपली सेवा देत आहेत . या एका कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे त्याचं आख्ख कुटुंब चिंतेत आहे . पण स्वतः कर्मचारी मात्र न डगमगता काम करत आहेत . यावेळी संघटना मात्र नेहमीप्रमाणे खंबीरपणे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे . आणि म्हणूनच कोणतेही दडपण न घेता काम करणे सुलभ होतंय .
" न भूतो न भविष्यती" 
अशी सध्याची परिस्थिती आहे . परंतु सातत्याने भविष्याचा वेध घेत परिस्थितीवर मात कशी करायची याचं संघटनेकडून विचारमंथन चाललेलं असतं .आणि धैर्य वाढवलं जात. तातडीने बारिकसारीक आडचणींचा विचार केला जातो . पाठपुरावा केला जातो .  सहज शाखेत चर्चा चाललेली असते 
"असं झालं तर काय करायचं "
लगेच उत्तर तयार असतं
" बघु की संघटना काहीतरी सांगेल की "
संघटना फक्त कर्मचाऱ्यांचा विचार नाही करत . तर त्याहीपेक्षा  सामाजीक बांधीलकी अधिक  जपण्याचा प्रयत्न करतेय . भविष्याचा वेध घेतेय अपेक्षा एवढीच आहे की  समाजातील सुजाण लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे . बँकांच राष्टीयकरण अबाधीत रहाणं हे कर्मचाऱ्यांइतकच किंबहुना त्यापेक्षा जास्तीचच सामान्य जनतेसाठी आवश्यक आहे . त्यांचा पैसा जर सुरक्षित रहायचा असेल , तळागाळातल्या जनतेपर्यंत जर बँकिंग पोहोचवायचं असेल , बँकांच जाळं अजून विस्तृत करायचं असेल तर बँकेची मालकी ही सरकारी असली पाहिजे . आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनीच स्वतःची तमा न बाळगता  जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे . 
        म्हणून आता सरकारची जी हळुहळु वाटचाल चालू आहे आधी एकत्रीकरण आणि मग खाजगीकरण त्याकडे डोळेझाक करुन चालणार नाही . त्यात सध्या इतका गदारोळ चालू असतांना देखील 1 एप्रील 2020 रोजी नियोजित बँकांच्या  एकत्रीकरणाचे सोपस्कार पार पाडले त्याची समाजाने दखलच घेतली नाही . सोयीस्करपणे डोळेझाक केली हे घातक आहे  .पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होणाऱ्या परिणामाचे चटके हे  सर्वसामान्यांना बसणार आहेत हे  नक्की ! त्यामुळे आपल्यासाठी आपणच लढा दिला पाहिजे . वेळीच विरोध केला पाहिजे . त्यासाठी हा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांचा आहे ही भावना प्रथम दूर केली पाहिजे . "सर्वांसाठी सर्वांनी "
ही भावना आसायला हवी तर आणि तरच आपण आपल आर्थिक स्वातंत्र्य आबाधीत ठेऊ शकू हे नक्की !!

कॉम्रेड सरिता कुलकर्णी 
महिला प्रतिनिधी 
बीओएमईयु औरंगाबाद युनिट







करोना आणि बँका 
भाग 2



            "जनधन खाते" असे  नामकरण करुन शुन्य रुपयांनी खाती उघडण्याची योजना  निघाली तेव्हा तळागाळातील जनतेला त्याचा लाभ मिळावा याउद्देशांनी यामध्ये देशभरातील बँकिग क्षेत्र  हे ग्राहक व सरकारी योजना यामधील महत्त्वाचा दुवा ठरले . थेट ग्राहकांच्या खात्यावर विविध लाभ मिळणार ! स्काॕलशीप , विमा , आनुदान विविध प्रकारच्या सबसीडी यासाठी जनधन खातं प्रमाण झालं .  ज्याचे बँकेत नियमीत खाते आहे पण या योजनेअंतर्गत खाते असेल तर भविष्यात  त्याचा काही लाभ होऊ शकतो म्हणून हुशार लोकांनी एक तर नविन खाती उघडली किंवा आहे ती खाती या योजनेत परिवर्तीत केली . पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्या सगळ्यांनीच खाती उघडली असे झाले नाही . अनेक कारणांनी काहीजण त्यापासून वंचित राहिले . किंवा खाते उघडले तरी त्यावर काहीच व्यवहार नाही ती बंद पडली . आज काम केलं तर जेवण मिळणार अशी जेमतेम मिळकत असलेले लोक पुन्हा बँकेकडे फिरकलेच नाहीत . अनेक लोकांची अजुनही बँकेत खाती नाहीत .पण त्यावेळी त्यानिमित्ताने उसळलेली गर्दी आणि बँकर्स यांनी दिव्य पार पाडले . त्याचा फारसा उल्लेख नाही .
            पुन्हा नोटाबंदीचा  काळ ! पण बिनबोभाटपणे सामाजिक बांधिलकी म्हणून बँकर्सनी कामासाठी कंबर कसली आणि समोर जास्तीतजास्त असे ग्राहक की ज्यांचं काळ्या पैशाशी देणघेणं नाही . दहशतवादाशी काडीमात्र संबध नाही . किंवा पुन्हा  कधी डुप्लीकेट नोटांची आकडेवारी प्रसिद्ध  झाली नाही .  
      आता कोरोनाच्या निमित्ताने एप्रीलपासून तीन महिने दरमहा 500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार . यातले दोन हप्ते तर जमा झाले . पण याचा लाभ प्रत्येक गरिब महिलेला मिळालेलाच आहे असे झाले नाही  . एक बँकर म्हणून माझा हा आनुभव आहे . यामध्ये कित्येक गरीब महिला अशा आहेत पुस्तक दाखवतात पण रक्कम जमा नसते . याचं कारण कोणी कोणाला विचारायचं ? काहीजण हातात रेशनकार्ड , आधारकार्ड घेऊन येतात व आम्हांला कोरोनाची 500 रुपये मदत द्या असे  म्हणतात .  न्यायालयाने निकाल देताना शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरापधा-याला शिक्षा देता कामा नये असं म्हटलं जातं . तसं याठिकाणी 100 श्रीमंताना मदत मिळाली तरी हरकत नाही पण एकही गरीब मदतीविना नाही राहिला पाहिजे  . यासाठी त्रुटी शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करायला हवी . आता बुडलेल्या पैशाचं काय हा प्रश्न तर निरुत्तरीतच रहातो .
     जनधन खाते उघडायचं असो की त्यामार्फत स्काॕलशीप , सबसीडी , विमा वाटप असो . आधारजोड असो किंवा निश्चलीकरणाचा आतिरिक्त बोजा पेलण्याची कामगीरी असेल . आणि आता तर पाणी नाकातोंडात चाललंय पण सामाजिक बांधिलकीरुपी लेकराला उराशी कवटाळून बँकर्स धडपड करत आहेत . भविष्यात आणखी कायकाय होणार ते माहित नाही . मात्र प्रत्येकवेळी बंदूक बँकर्सच्या खांद्यावर आहे . तो लढतोय  कारण त्याची जडणघडणच अशा मुशीत तयार  होतीय . देशाचं रक्षण जसं सैनिक करतात तसं  अर्थव्यवस्थेचं रक्षण संघटने अंतर्गत बँकर्स करतात . चळवळीतील लोक आहोत आपण . आपण डोळेझाक करुच शकत नाहीत . आता कोरोनाच्या निमित्ताने कायद्यात बदल करत संघटनेचे हात कितपत बांधले जातील , मर्यादा आणल्या जातील आणि या कोरोनाच्या हल्लकल्लोळामध्ये किती पोळ्या भाजून घेतल्या जातील  . हे आज तरी कोणीच सांगू शकत नाही . त्याचे होणारे दुष्परिणाम आणि पुन्हा संघर्ष ,  लढाई मग दुरुस्ती किती काळ जाईल हेही आत्ता नाही सांगू शकत !  संघर्ष तर अटळ आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीपासून बँकामध्ये संघटना आहेत वेळोवेळी देशहीत नजरेसमोर ठेवून संघर्ष केलेला आहे . निर्णय घ्यायला भाग पाडले आहे . संघटनेला मोठ्या चळवळीचा इतिहास आहे . तीचा दबदबा आहे . इतिहासाची पुनुरावृत्ती करण्यासाठी व्युहरचना तर होईलच पण संघर्ष करायला आपण मात्र  कात टाकून सज्ज झालं पाहिजे हे खरं !!


काॕम्रेड सरिता कुलकर्णी 
महिला प्रतिनिधी 
बीओएमईयु औरंगाबाद युनिट





करोना आणि बँका 
भाग 3



      आज बँक कर्मचाऱ्यांच्या  सुरक्षेचा प्रश्न गुजरातमधील सुरत येथील कॕनरा बँकेच्या ( पुर्वीची सींडीकेट बँक ) सारोळी शाखेतील महिला कॕशियरवर पोलिस कॉन्स्टेबलकडून झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला . हा हल्ला केवळ एका महिलेवर झाला नसून या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये ग्राहकांना आविरत सेवा देणाऱ्या समस्त बँक कर्मचाऱ्यांवर झालेला आहे आणि तोही कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी , समाजाचं रक्षण करण्यासाठी बांधील असलेल्या पोलिस विभागात काम करणाऱ्या कॉन्स्टेबलकडून !  त्यांनी हा गुन्हा तर केलाच आहे पण सध्या कोरोनाच्या काळात मोलाची कामगिरी करणाऱ्या पोलिस विभागाला काळीमा फासण्याचं दुष्कर्म केलं आहे . एखाद्या कुख्यात आरोपी महिलेलासुद्धा हात लावायची परवानगी पोलीस खात्यात महिला पोलीसांवर सोपवली जाते पुरुष पोलीस तिला हात लावू शकत नाहीत . त्याच खात्यात काम करणारांना या नियमाचा विसर पडावा ही लाजीरवाणी गोष्ट आहे . त्यांचे सहकारी बँकेच्या सेवेविषयी TV वर मत व्यक्त करत होते पण त्यांची पाठराखण करण्याच दुसरं वाईट काम कोणीही करु नये . हे अत्यंत घृणास्पद व लाजिरवाणं कृत्य आहे .
          पण बँक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आत्यंत  महत्त्वाची व समाधानाची गोष्ट म्हणजे सदर घटना घडल्यानंतर AIBEA शी संपर्क झाला व  नेहमीप्रमाणे संघटनेने पालकत्वाची जबाबदारी घेत तातडीने पुढील कार्यवाही सुरु केली . त्वेषाने अन्यायाला वाचा फोडली व त्याचा परिणाम देशाच्या वित्त मंत्र्यांनी याची दखल घेत पुढील सुत्रे हलवली . केवळ आणि केवळ बँक कर्मचाऱ्यांना AIBEA ची अभेद्य कवचकुंडले आहेत म्हणून हे शक्य झाले आहे . मुळात या मुलीचं पण कौतुक आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता तिने तिचा लढा लढवत संघटनेच्या प्लॕटफाॕर्मवर आणला !
       बँकामधुन पासबुक प्रींटर चालू नसणं हे दृश्य सर्रास दिसते . त्यासाठी काऊंटरच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं जात . त्यांना आपल्या कामकाजा सोबतच ग्राहकाच्या रोषाला सामोरं जाव लागते . व्वस्थापनाकडून  यावर विचार होणे अत्यंत गरजेचे आहे . 
     पण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बँका मधून अत्यावश्यक सेवा दिल्या जातात . सर्व सेवा देण्याची घोषणा जरी झाली असली तरी ग्रामीण व निमशहरी भागात मेंटेनन्स हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे . त्यामुळे  प्रींटर व कॕश काऊंटींग मशीन ही सेवा ब-यापैकी विस्कळीत असू  शकते . 
       घराबाहेर पडतांना भिती मनात धरुन बाहेर पडत असताना ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यांच्या मनस्थितीचा माणूसकीच्या दृष्टिकोणातून विचार करायला हवा .
बँक कर्मचाऱ्यांमध्ये तरुण मुलं मुली आहेत . वयस्कर आहेत महिला आहेत . प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी आहे . अनेकांना आपल्या घरापासून बँकेत जाईपर्यंत जीव मुठीत घेऊन जावे लागते . एकीकडे बँका अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करायच्या तर मुंबई सारख्या ठिकाणी लोकलच्या प्रवासासाठी बँक कर्मचाऱ्यांना परवानगी नाही हे दुटप्पीपणाचे धोरण . तर स्वतःच काहीतरी सोय करुन शाखेत पोहोचले तर अनेक  ठिकाणाहून आलेल्या ग्राहकांशी संपर्क येतो . अवतीभोवती भितीयुक्त वातावरण आहे त्यातच त्यांना आपले रोजचे कामकाज करावे लागाते . अशा परिस्थितीत बँक कर्मचाऱ्यांच्या मनस्थितीचा विचार व्हायला हवा .


काॕम्रेड सरिता कुलकर्णी
उमन कौन्सिल कन्व्हेनर 
बीओएमईयु औरंगाबाद युनीट




मनातलं मोरपीस ( सासू -सून)

11/08/2019


अनुरुपच्या माध्यमातून
कुलकर्णी-देशपांडे कुटुंबीयांची झाली भेट
त्यातुनच ऋणानुबंधाच्या
रेशीमगाठी जुळुन आल्या थेट  ll 1 ll

लपाछपी , पकडापकडी
खेळत खेळत कधी सरल बालपण
नाही आलं ध्यानी
आशिष-कीर्ती घट्ट गुंतले
एकमेकांच्या मनी ll 2 ll

कीर्तीसम स्वप्नपरी
आशिषच्या जिवनात उतरली
जणु वसंताच्या आगमनाने
सृष्टी उमलुन आली ll 3ll

सुगंधाने मोग-याच्या
सारा आसमंत दरवळला
आशिष-कीर्तीच्या विहाराने
जणु अंगणी स्वर्ग आवतरला  ll 4 ll

वैशाख वणव्याच्या तडाख्यात
होतो शितल चांदण्याचा भास
ओढ मनी हुरहुर अंतरी
लागे मना भेटीची आस ll 5 ll

होताच दृष्टीभेट
कारंजे उडती ह्रुदयात
तप्त उन्हातील सहवास
पण गारवा आहे मनात ll 6 ll





नमास्कार
आज याठिकाणी उपस्थित पाहुण्यांच मी मनापासून स्वागत  करते.आणि आभार  मानते . कारण कार्यक्रमाची खरी शोभा ही आपल्या उत्सापुर्ण सहभागाने वाढली आहे.मी सुरुवात करणार आहे ते म्हणजे निवेदनासह  एक छोटीशी कविता . हा एक छोटासा प्रयत्न आहे.
मी आत्ता आपल्याला आमच्या या दोन कुटुंबाच्या नविन जुळलेल्या नात्याविषयी आमच्या नविन प्रवासाचे वर्णन प्रामुख्याने या दोघाविषयी त्यात्यावेळी वाटलेल्या भावना आणि त्यात्यावेळी टिपलेले क्षण हे दोन्ही आपल्याशी शेयर करणार आहे.
आम्ही जे हे संशोधन करत होतो ते आनुरुपवरुन.तर त्यासाठी .........

अनुरुपच्या माध्यमातून
कुलकर्णी-देशपांडे कुटुंबीयांची झाली भेट
त्यातुनच ऋणानुबंधाच्या
रेशीमगाठी जुळुन आल्या थेट  ll 1 ll

लपाछपी , पकडापकडी
खेळत खेळत कधी सरल बालपण
नाही आलं ध्यानी
आशिष-किर्ती घट्ट गुंतले
एकमेकांच्या मनी ll 2 ll

या दोघांनी वेळ भरपुर घेतला . म्हणजे त्या सगळ्या process व्हायला तीनएक महिन्याचा कालावधी लागला. सुरुवात त्याची वसंत ऋतुत झाली म्हणुन म्हणावस वाटत.....

कीर्तीसम स्वप्नपरी
आशिषच्या जिवनात उतरली
जणु वसंताच्या आगमनाने
सृष्टी उमलुन आली ll 3 ll

आजच्या जमान्यात लग्न जमण्याच्या पद्धती पण बदलल्यात . जेव्हा त्या दोघांना made for each other हा feel आला तेव्हा आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांकडे गेलो.तोपर्यंत Mrs.देशपांडे आणि मी एकमेकींशी अदृश्य स्वरुपात भेटतच होतो. आर्थातच फोनवर . पण प्रत्यक्षात जेव्हा आईबाबांसह दोन्हीही ठिकाणी भेटलो तेव्हा वाटलं ....


सुगंधाने मोग-याच्या
सारा आसमंत दरवळला
आशिष-कीर्तीच्या विहाराने
जणु अंगणी स्वर्ग आवतरला  ll 4 ll

मग दोन्ही कुटुंबाना पण तो feel आला की जोडी जमली . Green signal मिळाला आणि गाडी सुरु झाली . मग उन आसुदे पाऊस आसुदे . या बाह्य वातावरणाचा या love birds वर काहीच परिणाम होत नव्हता . फक्त भेट होण महत्त्वाचे .......

वैशाख वणव्याच्या तडाख्यात
होतो शितल चांदण्याचा भास
ओढ मनी हुरहुर अंतरी
लागे मना भेटीची आस ll 5 ll

होताच दृष्टीभेट
कारंजे उडती ह्रुदयात
तप्त उन्हातील सहवास
पण गारवा आहे मनात ll 6 ll

अशा प्रकारे या ऋणानुबंधाच्या गाठी परमेश्वरांने बांधलेल्या आहेत त्याला आपण सर्वांनी भरभरुन आशीर्वाद द्यावेत .जाता जाता एवढच सांगेन ....रोज नव्याने उगावणा-या दिवासाबरोबर वाढता उत्साह , वाढती ओढ पाहुन मला एक नवा वाक्यप्रचार किंवा कहावत म्हणतात ती सुचली . नीट ऐका बरं सगळे . साधारणपणे आपण आसपास नेहमी पहातो लग्न जमलं की प्रश्न असतो कसं जमलं म्हणजे love marriage आहे का arrange marriage आहे तर love marriage ला म्हणतात love but arrange marriage आहे.
आणि arrange असेल  तर म्हणतात नाही नाही arrange marriage आहे हे.
मी काय सांगते बघा हं
आमच्या मुलांच arrange but love marriage आहे....






12/08/2019

प्रिय किर्तीस
अनेक उत्तम आशीर्वाद 
    कालच आशिष आणि तुझा साखरपुडा झाला म्हणलं आज तुझ्याशी थोडसं हितगुज कराव. चार गुजगोष्टी सांगाव्या . फोन करावा म्हणलं पण म्हणलं नको फक्त बोलल की संपल पुर्वीच्या पद्धतीने पत्रच लिहाव म्हणजे कसं आठवलं की वाचता यावं . खुप समाधान वाटलं  ग कालचा कार्यक्रम अनुभवताना !  एका आईच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आहेत . तुम्हा दोघांना आभाळभरुन शुभेच्छा ! तुमचं नविन नात असच बहरु दे. नव्या आयुष्याची वाटचाल सुखा समाधानाने  होऊ दे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .
      गेल्या 5/6 महिन्यापासुन  नविन नातं तयार होण्याची जी संक्रमण अवस्था आहे त्यातला एक सोनेरी टप्पा आपण ओलांडला. एका गोड प्रसंगाच्या निमित्ताने सगळ्या नात्यातली वीण आणखीनच घट्ट झाली. असं म्हणतातच की , लग्न फक्त दोघांच नसतं तर दोन कुटुंबांच असत म्हणून म्हणलं सगळ्या नात्यातली वीण घट्ट झाली. किती सुंदर वीण आहे बघ न !
(नवरा-बायको ) (सासु-सुन/जावई ) (सासरे-सुन/जावई ) (वहिनी-नणंद/दीर) (भाऊजी-मेहुणी/मेहुणा) (विहीण-व्याही ) !!आणि या सर्व नात्यांच्या अनुषंगाने येणारी सगळी आणखी अनेक  नाती !!!
        मग सगळीकडुन कोडकौतुकाचा वर्षाव होतो.ती एक मस्त धुंदी असते . पण खरी मजा केव्हा येते माहिती आहे का तुला ? यातले मधाळ क्षण जे आहेत  ते आठवत रहिलं आणि फुलपाखरासारखं उडत राहिलं की आणि अविस्मरणीय क्षणांची पुरचुंडी बांधुन आपल्या हृदयात ठेवली की झालं.
प्रत्येकवेळी सगळच आपण ठरवलं तस 💯% होतच असं नाही पण त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. फक्त चांगल्या घटनांनाच आपल्या मनावर राज्य करायला आपण दिले पाहिजे.मग त्याचा खरा आनंद आपल्याला मिळु शकतो . 
जेवणात  गोड-आंबट-खारट-तुरट अशा सर्वच चवी असतील तरच ते चविष्ट आणि चवदार असतं . कितीही छान असलं तरी फक्त गोडच अन्न आपण खाऊ शकत नाही . जिवनही तसंच असत . सगळ्या चवी आल्याशिवाय त्याची लज्जत वाढत नाही पण प्रमाण पण तितकेच महत्त्वाचे असते , आणि कोणती चव किती वापरावी हे आपल्या हातात असते नव्हे असले पाहिजे . तरच आयुष्याची गाडी सुरळीत चालते.तुमचं नात जसजसे जवळ येत जाईल तशी त्याची लज्जत वाढत जाईल . ओढ-माया-प्रेम वाढत जाईल त्याचबरोबर जबाबदारी पण वाढत जाईल. पण एक सांगु जबाबदारीचं ओझ कधी वाटुन नाही घ्यायचं हसतखेळत जे शक्य ते करायचं . औपचारिकतेच्या ओझ्याखाली नाही दबायचं त्यासाठी बोलण्यात मोकळेपणा असला पाहिजे . कारण मनातलं कोणीही ओळखु नाही शकत. सुरुवातच जर मोकळेपणानं झाली तर नात्यांची निकोप आणि सुदृढ वाढ व्हायला मदत होते. तुला वाटेल मी इतके उपदेशाचे डोस का पाजतेय पण तसं नाही ग जे आजच्या क्षणी  सहजपणे मनात आलं ते सगळं लिहुन काढलं . उद्या जे वाटेल तो उद्याचा विचार.
    आसो पुन्हा एकदा परमेश्वराकडे तुमच्यासाठी सुख-समाधानाची प्रार्थना करून शुभेच्छा देते.
तुझ्या भावना पण नक्की कळव .
तुझीच 
आई



19/08/2019

चि. आशिष यांस अनेक उत्तम आशीर्वाद . पत्रास कारण की साखरपुडा झाल्यावर दोघांना पण पत्र लिहायचं मी ठरविले होत. पण म्हणलं राहूदे तुला आज लिहावे . पहिल्यांदा तुला कीर्तीसोबतच्या पहिल्या वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा !! तुझे भावी आयुष्य सुखासमाधानाचे , आनंदाचे भरभराटीचे जावो हीच परमेश्वर  चरणी प्रार्थना !!
       तिला जे जे पत्रात लिहिलं आहे तो मजकुर तुला पण लागु आहे . त्यात अजुन थोडेसे वाढवुन हे पत्र तुझ्यासाठी .
आज तु 29 वर्षे पुर्ण केलीस.  खरं तर हा काळ खुप मोठा आहे पण ,आत्ता आत्ता तु छोटसं बाळ होतास ,कधी एवढा मोठ्ठा झालास कळलेच नाही.
आता तुझी सेकंड इनिंग सुरु झाली. नकळतपणे आमची जबाबदारी कमी होत जाणार ,तुझी वाढत जाणार . पण नेमकं याच ठिकाणी तुला सांगते की आजिबात गोंधळून जाऊ नकोस . तुला ज्याप्रमाणे आजपर्यंत जसं आयुष्य जगता आलं त्याहीपेक्षा एक पायरी वर  असं खुप समाधानी आयुष्य लाभणार आहे. कारण तुला लाभलेली तुझी जोडीदार "सोने पे सुहागा " अशीच आहे. एकुणच देशपांडे परिवाराशी तुझे नाते निखळ राहिल यात शंका नाही.तु कसा आहेस हे पुर्णपणे मी जाणून आहे. आजकालची मुलं आणि माझी मुलं याचा मी नेहमी विचार करत असते . त्याबाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजते. त्याला साजेशी तुझी निवड आहे हे नक्की .
माणुसकी जपत , सामाजिक बांधिलकीच भान ठेऊन जमिनीवर स्थिर राहून पुढील आयुष्याची वाटचाल कर . तु मायाळु आहेस , बुद्धिमान आहेस , माणसं जपणारा आहेस , स्पष्ट बोलणारा आहेस . तसाच रहा . पुन्हा एकदा सांगते मोकळेपणा जेवढा आसेल तेवढी  सगळ्या नात्यामधे सुदृढता येते हे नक्की !!माणसाची खरी ओळख ही कठीण प्रसंगी होते . मग त्या प्रसंगाचं स्वरुप कोणतही असु शकते . आर्थिक  असो वा मानसिक ! न डगमगता ठाम राहिलं की आलेली वेळ निघुन जात असते पण याठिकाणी माणुसकीचा कस लागतो . सारासार विचार करण्याची सद्सद् विवेकबुद्धी जागृत आसली पाहिजे . आणि हो महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही म्हणलं तरी मुलगा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो त्यातही मुलीची मानसिकता खूप हळवी झालेली असते आलवारपणे त्याची उकल करायची यात मुलांची भूमिका फार महत्वाची असते . मुलीला सर्वात जवळचा नवरा वाटत असतो आणि त्याच्याकडून आश्वस्तपणाची अपेक्षा असते . ती हळुवारपणे जपायला हवी , यामध्ये आपले रीतिरिवाज , पद्धती लादण्याचा , सातत्याने सांगण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही . दोघांना जे पचेल रुचेल त्यापद्धतीने इथून पुढची वाटचाल करायची . आता तुमचा नवीन संसार सुरू होईल कोणतेही ओझे मनावर न बाळगता तुम्हाला हवे तसे तुमचे जीवन जगायला हवं त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल . आर्थिक , मानसिक आणि वैचारिक असे भक्कम पाठबळ तुम्हाला असणार आहे पण तुमचा संसार तुमच्या पद्धतीने सुरू करा त्याची मजा लूटा . कमी तिथे आम्ही तर असणारच आहोत पण त्याचे ओझे होता कामा नये याची कायमच दक्षता घेऊ . 
असो आज तुझा नविन वळणावरचा पहिला वाढदिवस आहे पुन्हा एकदा आभाळभरुन शुभेच्छा !
All the best !!
तुझीच
आयडी



19/09/2019

हाय कीर्ती😀
कशी आहेस ?आजारी पडलं म्हणून एवढं घाबरतात का ? स्ट्रॉग मुलगी आहेस न ?  मग ? चल हट् म्हणाव . मी नसते घाबरत ! अरे होतं माणसाला कधी कधी. त्यात काय एवढा विचार करायचा ?  एक तर रजा मिळत नाही . मिळालीय आता म्हणायचं न द्यायची ताणून.🤣🤣

खरतर आजारी पडलं की डॉक्टर काय देतात ते घेणे , आराम करणे , त्याचा कालावधी संपेपर्यंत वाट पहाणे काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहे. पण काहीवेळा आपले मन याला जुमानतच नाही 
वा-याच्या वेगाने धावत सुटतं . आणि मग आधीच आलेला अशक्तपणा आणि मनाचा स्वैरपणा काही उमज पडु देत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्रीची झोप उडणे . मनी वसे ते स्वप्नी दिसे असा काहीसा होतो. 
म्हणून हा माझा एक स्पेशल डोस 😇

तुला पडलेले प्रश्न 
1) मी कधीच आशी आजारी नाही पडले . काय झालय मला.🤔😧
2) आत्ताच का ? ☹😧
3) माझं लग्न ठरलय अजुन व्हायचं आहे. मी इथं येऊन राहिलेय उगाच माझा या दोघांना त्रास ☹😧
4) बार्शीला काय म्हणत आसतील🤔
5) विनाकारण कित्ती रजा चालल्यात माझ्या 😡माझ्याबरोबर आशिषच्या🤦‍♀

माझी उत्तरे 
1) सध्या वातावरण खुपच खराब आहे. केव्हाही पहिल्यांदा आसच वाटणार. काय झालं आहे हे डॉक्टरना ठरवु दे . त्यांनी खुप वेळ व पैसा खर्च केलेला आसतो. आपण सगळ्यात तज्ञ आसु शकत नाही. 😇
2) हे कोणाच्याच हातात नाही. खरतर गेले 5 महिने सातत्याने होत असलेली दगदग सटकलीय. आणि थोडेसे भटकण व नको आसलेल खाणं बादलय थोडस.
3) 1 फेब्रुवारी काढलीय न तारीख होईल तेव्हा 🤣. लग्नाच्या गाठी पुर्वसंचितानुसार बांधलेल्या असतात. त्यात सुख-दुःख आणि गुण-दोषासकट स्वीकृती असते. माझं तुझं असं आंतर नाही रहात. आणि राहु पण नये.  
4) एक आकांक्षा जीव टांगणीला लावायची आली तिला एक जोडीदार 🤪. बराय पण काळजी घेतील एकमेकींची.
5) किती ताबलायच त्या शरीराला ? विश्रांती देईना म्हटल्यावर शेवटी त्यांने असहकार पुकारला. 😎

सारांश
जबरदस्त आजारपण आलेलं आहे. लगेचच बरं होत नसतं . मोठं कोणी जवळ नाही . परक्या माणसांपेक्षा निःसंकोचपणे आपल्या माणसासोबत रहावे. जुलैमध्ये लग्न होऊन आत्ता अजारी पडली आसतीस तर काय केल असतस ?
डॉक्टर ठरवतील काय द्यावे ते त्याप्रमाणे करावे . सध्या तरी उतार पडलाय असे वाटते , निलीमाला बोलुन पहावे . काळजी फक्त खोकल्याची आहे .तो थोडा मुरलाय म्हणून समुळ उच्चाटन होईपर्यंत काळजी घेणे. आवश्यकता वाटल्यास 2nd opinion  घेणे . फक्त काळजी घे काळजी करु नकोस . इतके सगळे आहेत तु कशाला विचार करतेस सगळं ओझ तुझ्या डोक्यावर असल्यासारखं ?😃  relax रहा  एकदम . 
👻👻👻👻👻👻



30/04/2020


Dear mom-in-law 

( आहो आई )



आशिषची आई , माझ्या होणाऱ्या सासुबाई , mom-in-law , अग्गबाई सासुबाई आणि आता आहो आई असा आपला प्रवास!
       एप्रिल महिन्यात तुमचा वाढदिवस आणि आपल्या भेटीचासुद्धा !  सासुबाई
ह्या व्यक्तीमत्वाचा खरं तर बागुलबुवा होता माझ्या मनात . मैत्रीणी , बहिणी ह्यांच्याकडून ऐकून एक व्यक्तीरेखा तयार होत गेली होती . त्या प्रतिमेला तडा देत मला भेटलात तुम्ही ! Cool सासुबाई !
       पहिल्या भेटीतच 
" शगुन के कंगन " 
म्हणत हातात बांगड्या घालून मिठी मारली ना तेव्हाच समजलं मला की मज्जा येणार आहे खुपच ! हे रसायन काही वेगळंच आहे :-)
           पहिल्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत दडपण कधी येऊनच नाही दिलं मला कोणताही event असो , तुमचा उत्साह आम्हां तरुणांना लाजवेल असा असतो . सुनेच्या 25 व्या वाढदिवसाला 25 गिफ्ट्स करुन सरप्राईज देणाऱ्या सासु आणि नणंद असतात का कुठे ? मैत्रीणीच आहात तुम्ही माझ्या !
मग आला साखारपुडा .
" केले की जमतेच " 
हे तुमचे ब्रीद वाक्य : आमची केतकी नाचु शकते ? ते ही इतके छान ? मानलं राव तुम्हाला ! कार्यक्रमाला रंगत आणाली ती तुमच्या कवितेने . सर्वांनाच डोळ्यासमोर आमची Arranged Love story  अगदी Film सारखी दिसली .
       एकच वर्ष झालंय तसे . पण आठवणी उफाळून येत आहेत . ब्लाऊजवरुन झालेला राडा तर आठवायलाच नको ! बाळासारखी समजूत घातलीत तुम्ही माझी  . माझी आई असती तर रागावली असती शिस्तीत . आणि खरंच तुम्ही म्हणालात  तसं आता एक नंबरचं ब्लाऊज वाटतेय ते मला .
         लग्नाची धामधूम सुरु करायच्या तयारीत असतांना एकदम मी अजारी पडले . ह्यापुर्वी कधी ताप न आल्यांने जरा घाबरलेलेच होते मी . आई-बाबा सुद्धा टेन्शनमध्येच होते . तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलेले . आज ही मी अधूनमधून वाचते. धीर येतो वाचतांना खरच . घाबरायचं नाही आजिबात हे शिकते आहे मी तुमच्याकडून . जशी एक आकांक्षा तशीच दुसरी कीर्ती हे नुसते लिहीण्यापुरतं वाक्य 
  • नाहीच . ते प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतसुद्धा होतं मला . 
           आई-बाबा पण नेहमी उल्लेख करतात की काळजींच नाही इतकं छान सासर मिळाले आहे तुला असंच म्हणतात नेहमी . शंभर टक्के सत्य !
    कुठल्याशा serial मधल्या त्या शुभ्रावरुन आपलं सुरु झालं अग्गबाई सासुबाई पर्व ! रोजचे GM चे मेसेज चुकत नाहीत आणि दिवसभर गप्पाटप्पा नाही झाल्या तर चुकल्यागत वाटते . असे करत लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पळत होते . लग्न महिन्यावर  आले आणि चक्क तुम्ही आशिषला pre-wedding shooting साठी आग्रह केलात . खरंच परत कधीच झालं  नसतं की ! मज्जा आली हो खूप.
     हा हा म्हणता लग्न झालं की .... चि.सौ.कां.ची  झाले मी सौ.कुलकर्णी ! तसा बार्शीमधला मुक्काम धावपळीतच गेला . एकटं awkward किंवा नविन अशा भावनांचा लवलेशच नाही कुठे. 
         न्युझीलंड ट्रीप पुर्ण करुन घरी परत येणे जीवावर आलेलं. आरे संसार संसार सुरु करणे सोप्प आहे का ?  तरी तुम्ही येते म्हणालेलात त्यामुळे काळजी नव्हतीच . प्रदीर्घ प्रवास करुन एकदा घर आलेलं तेव्हा इतकं बरं वाटलं . पहाटे 6 ची वेळ पण उत्साहाला वेळकाळ असते का ? चक्क डोळे चोळत फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही , पप्पा आणि आकांक्षा तयार होते स्वागताला .......मस्त वाटलं ओ ! शीणच ओसरला प्रवासाचा . 
         पुढचे दिवस मस्त घरात सामान लावणे , स्वयंपाकाच्या काकू ठरवुन देणे अशी मस्त घडी बसवून दिलीत. सर्व डाळींपासून ते किसलेल्या गुळापर्यंत सगळं आणलेलं . प्लँनिंग किती perfect करायचं असतं हे पण शिकते आहे मी तुमच्याकडून !
         संध्याकाळी आल्यावर कुलुप बघायची सवय लगेच 5/6 दिवसात मोडलीच की . व्यायाम करायचा , चहा प्यायचा , गप्पा मारायच्या बार्शीला गेलात ना तेव्हा घर खायला उठलेलं मला आणि आशिषला.
पाकशास्त्रामध्ये माझे प्रयोगातून विज्ञान सुरू होतेच. कोरोना मुळे इकडे बार्शीला आले तसे सुरू झाले अहो आईं चे पर्व.
बाकी जग ठप्प झाले असले. तरी ह्या कोरोना मुळे मिळालेला वेळ आपल्या दोघींसाठी सुवर्णसंधी ठरली.
मला जमेल की नाही किंवा मला जमतच नाही... अशी माझी सुरुवात असते नेहमीच. तुम्ही मला इतकं मस्त motivate केलत ना..
पाककला सोप्पी मुळीच नाही पण अवघड मात्र नक्कीच नाही.. हे वाक्य बिंबवले माझ्या मनात.

पापडासारख्या पोळ्या बनवणारी मी हा हा म्हणता पदार्थ बनवायला शिकले की ओ! उडीद वडे, साधी पोळी, वरण फळे, थालीपीठ, भाकरी आणि साग्रसंगीत पुरणपोळी सुद्धा!! अबब..! माझी आई, आजी, मावश्या विस्फारून माझे पदार्थांचे फोटो बघत असतात. अनिरुद्ध ने तर पुण्यात आमच्याकडे राहायला येणार असेच सांगितले. पाककलेच माहीत नाही पण confidence नक्कीच वाढलाय माझा
All credit to अर्थातच: अग्गबाई सासूबाई!
आणि तुम्ही मला इतकं लाडावून ठेवलंय ना.. ऑफिसच ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ice cream देणार म्हणून promise केलं आणि चक्क खरंच एकदम ice cream आणलं सुद्धा. त्या ice cream ची मज्जा काही औरच! Ice cream मधे लाड आणि प्रेम उतरलं होते भरभरून!
सौ बातो की एक बात: लाडकी लेक, लाडकी बहिण सगळ्याच असतात. लाडकी सून बनायला भाग्य लागते. अशा भाग्यवान सूनेकडून सुपर डुपर मस्त सासूबाईंना पहिल्यावहिल्या पत्रातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
तुमचीच,


लाडकी सूनबाई!!


20/03/2022


सौ कीर्तीस

   तुझा कंपनीच्या कामासाठी पस्तीस दिवसांचा नेदरलँड दौरा यशस्वीपणे पुर्ण करुन तू भारतात परत आलीस यासाठी पहिल्यांदा तुझे खूप खूप स्वागत , कौतुक आणि अभिनंदन !!
लॉकडाऊन मधे तू तुझ्या हुशारी आणि सिन्सीयर पणामुळे कमिन्स मधून स्विच करत फिलिप्स सारख्या नामवंत कंपनीमध्ये जॉईन झालीस . खरं तर वर्क फ्रॉम होम हे तुझ्यासारख्या मेकॅनिकल इंजिनिअरना अवघडच कारण फिल्ड वर्कची सवय आणि गरज . पण नविन कंपनीतील नविन आव्हाने तू लीलया पेललीस आणि त्याचच फलित म्हणून एक वर्षाच्या आत अनेकजण रेस मध्ये असताना सुद्धा नेदरलँडचा चार्ज घेण्याची संधी तुला मिळाली . त्यातही अनंत अडचणी आल्या . तुला ऑनसाईट जायला मिळणार म्हणून आशिष तर खूपच एक्साईटेड होता . डिसेंबरमध्ये जायचं होतं पण काही न काही कारणांनी ते लांबत लांबत फेब्रुवारी महिना आला तरी जायचं काही पक्क होत नव्हतं . आता जायला मिळते की नाही असे वाटायला लागले होते त्यामुळे तुम्ही दोघेही खूपच नर्व्हस झालात . पण होते ते बऱ्याकरता म्हटल्याप्रमाणे शेवटी 11 फेब्रुवारीला तुला जायचे आहे असे समजले .
     जगात खूप मुलं बाहेर देशात गेली असतील जात असतील पण तुझं जायचं ठरलं आणि उगाचच माझ्या पोटात गोळा आला . माझ्यासाठी हा अनुभव पहिलाच होता त्यामुळे माझ्या मनात कौतुक , अभिमान , उस्तुकता , दडपण , प्रेम , काळजी या सगळ्याची रसमिसळ होती . जायचं चलल्यापासून मी पण बरेच प्लॅन केले होते पण पाच फेब्रुवारीला अचानकपणे आजोबा गेले आणि दोनतीन दिवसातच तुला आकरा तारखेला जायला लागणार हे समजले . पण आजोबांचे शेवटचे दर्शन तुला घेता आले असे म्हणण्यापेक्षा हे सगळे घडणार होते म्हणूनच तुझं जाणं लांबत गेलं की काय कोण जाणे . 
 त्यांचा आशीर्वाद होताच म्हणूनच ही संधी मिळाली हे निश्चित होते त्यामुळे दुःख बाजूला सारत तुझ्या जाण्याच्या तयारीला आपण सगळेच लागलो . विशेष म्हणजे त्यादरम्यान आशिषचीआत्या पण बार्शीत होती . नेदरलँड मधे खायचा थोडा प्रश्न आहे ब्रेडवर जास्त भर असतो असे म्हणत एका दिवसात वेगवेगळ्या चटण्या , ठेचा , घावन-थालीपीठ पिठं तुला सर्दी खोकला झाला होता तिकडे तर बर्फ पडतो कस सोसणार म्हणत पस्तीस दिवसासाठी पस्तीस हळद गुळाच्या गोळ्या अशी जेवढी शक्य होईल तेवढी आम्ही तयारी केली . औषधं , बॅग्स , गरम कपडे , तिकडे लागणारी सगळी खरेदी करावी लागणार म्हणून तू आणि आशिष दोन दिवस आधीच पुण्यात गेलात . ऑफिस करत करत तुम्ही सगळी तयारी केलीत . गोडाचं काही करता येणार नाही हे लक्षात घेत पुण्यातून ज्योतीने मुगाचे पौष्टिक लाडू दिले आणि 11 तारखेला तुझं विमान नेदरलँडला रवाना झाले . तुला बाय करून आशिष पुन्हा बार्शीत आला होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे कौतुक , प्रेम , अभिमान , आनंद , काळजी , भीती हे सर्व भाव आणि त्याचबरोबर त्याला होणारा विरह हे सर्व मला दिसत होते .
तू पुण्याहून दिल्ली व पुढे अजून एक विमान बदलून नेदरलँडला जाणार होतीस . तिथला दिवस पाच तास मागे असल्यामुळे दुसरे दिवशी सकाळी तू तिकडे पोहोचणार होतीस . ठरल्याप्रमाणे कंपनीने सगळी चोख व्यवस्था केलेली होती व तू सुखरूप पोहोचलीस असे समजल्यावर जीव भांड्यात पडला . सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे तिथे तुला तुझी बालमैत्रीण असावरी आणि तिचा नवरा पुष्कराज , बाबांच्या मित्राचा मुलगा ऋषीकेश यांची मिळालेली मदत आणि मॉरल सपोर्ट ! आम्ही सगळेच असावरीला तुझ्याविषयी वाटणाऱ्या काळजीने , प्रेमाने खूप भारावून गेलो . तिथे पोहोचलीस की त्याच दिवशी ते दोघेही बेल्जियमहून तुझ्याकडे आले . पुन्हा एक आठवड्याचा तुझा हॉटेल मधील स्टे संपला आणि तू भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायला गेलीस तर तुला एकटेपणा जाणवू नये म्हणून पुन्हा असावरी तुझ्याकडे राहायला आली . मग जाता येता आपल्याकडचे पदार्थ घेऊन यायची ते ऐकल की मला बरं वाटायचं बरं झालं आज कीर्तीला घरचं खायला मिळाल असे वाटायचे . पूर्ण आठवडा कामात आणि वीकेंडला तिची सोबत असे मस्त रूटीन झालं तुझं . युरोपमधील छोटे छोटे देश फिरण्याचा तुमचा प्लॅन झाला होता त्याप्रमाणे 
दुसऱ्या वीकेंडला तू ट्रेनने तिच्याकडे जाणार होतीस . तू मला तिथले भले मोठे स्टेशन दाखवले , ट्रेनमधे बसलीस आणि गप्पा मारायला मला फोन केलास . माझ्या नेहमीच्या पद्धतीने मी अनेक प्रश्न तुला विचारले तू सहजपणे उत्तरे देत गेलीस आणि मला मात्र खूप भीती वाटली . आपल्या बोलण्यातून मला माहित झालेलं गोष्टी म्हणजे 
तू ऑफिस संपवून तिथल्या पाच वाजता निघालीस व रात्री नऊ वाजता असावरीकडे पोहोचणार होतीस . यात मधे एका स्टेशनवर ट्रेन बदलायची होती सगळे बोर्ड डच भाषेत होते इंग्रजी बोर्ड कुठेही नव्हते . तू त्या बोर्डचे फोटो काढून गुगलवर ट्रान्सलेट करून माहिती करून त्याप्रमाणे प्लॅन करत होतीस असे तू बोलत बोलत मला सांगितले आणि मी आतून थोडी हललेच .
 " तू बरोबर ट्रेन मध्ये बसलीस ना ?. " 
असेही मी तुला हळूच विचारले तर तू अगदी आत्मविश्वासाने हो म्हणत होतीस . रात्रीची वेळ , एका देशातून दुसऱ्या देशात जायचं , मध्येच दुसऱ्या देशात प्रवेश होणार तिथे एका स्टेशनवर ट्रेन बदलायची , उलट सुलट विचार करून माझ डोकं सुन्न झालं होतं . 
नेटच चाललं नाही तर ? फोनचे चार्जिंग संपले तर ? 
असे काहीही विचार माझ्या डोक्यात यायचे आणि भीती वाटायची . पण जेव्हा इथल्या मध्यरात्री असावरीबरोबर तिच्या घरतला तुझा फोटो ग्रूपवर पाहिला तेव्हा माझा जीव भांड्यात पडला तोवर पप्पा पण जागे होते . त्यारात्री मात्र ग्रुपवर आईबाबा , आम्ही दोघं , आशिष , आकांक्षा केतकी सगळेच जागे होतो . तू पोहोचली असे मसेजेस झाले त्यानंतर मात्र मी अश्वस्त झाले मग झोपले . पुढे भारतात येईपर्यंत प्रत्येक विकेंड तू छान एन्जॉय केलेस . युरोपमध्ये छोटे छोटे देश जवळजवळ आहेत सेप्रेट व्हिसा लागत नाही म्हणत पॅरिससह बऱ्याच ठिकाणी तू फिरून आलीस .
ते पाहून खूप बरे वाटले . 
मिरजेतील ऋषीकेश दोन वर्षापासून तिकडे शिकायला आहे तोही तू तिथे गेल्यापासून सतत मदत करत होता . त्याला पण आपल्या गावची ताई आलीय याचा आनंद होत होता . 
शेवटी शेवटी मात्र आशिष आणि तू तुम्ही दोघेही कंटाळलात . बोलत बोलत सतत म्हणायचीस इथे सगळ छान आहे पण आशिष हवा होता .अगदी खर आहे ते सलग इतके दिवस भेट नाही ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे . शेवटी शेवटी तर पंधरा दिवस राहिले , चौदा दिवस राहिले आता उद्या भेटणार असे दोघेपण दिवस मोजत होता ते मात्र जाणवत होते . आणि शेवटी आज तो दिवस उजाडला , किती आतुरतेने तुम्ही भेटण्याची वाट पाहत होता ! असो करा आता एन्जॉय .
पण एकूणच तुझा हा दौरा खूप छान झाला . तुझ्या करियरसाठी , स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे सर्व अनेक दृष्टीने खूप फायदेशीर ठरणार आहे . 
आता लवकर बार्शीला या म्हणजे आपली भेट होईल यावेळी खूप वाट पाहतेय मी .
येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा , भरभराटीचा , समाधानाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . इथून पुढच्या करियरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!

तुझीच
आमच्या आई !!


 प्रिय तीन दिवसांचे पिल्लू उर्फ गणू

30/06/2023

मायना काय लिहू ह्या विचारात घोळत बसले मी. तसे आपले नाते अगदी काही तासांचे ताजे ताजे आणि तसे पाहीले तर ९ महिन्यांचा अखंड सहवास!!

सहज मजेत ५ महिन्याच्या गर्भाला आशिषने गणू म्हणून हाक मारली आणि झालास की तू सगळ्यांचाच गणू. मुलगा आहे की मुलगी हे माहीत देखील नसताना घरातले सगळेजण तुला गणू म्हणायला लागले. आता नाव फायनल होईपर्यंत टोपणनाव फायनल आहे.

पिल्लू, आत्ता तुला माझ्या कुशीत गाढ झोपलेलं बघून आपला प्रवास डोळ्यांसमोर तरळतोय. अगदी काल परवा तर आम्हाला तुझ्या येण्याची चाहूल लागली होती. लांब लांब अंदमानच्या समुद्रकिनारी आम्ही ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली. दोन्ही आजी-आजोबा, आत्या आणि मावशी सगळ्यांना जणू हर्षवायुच झाला! 

गेले २ महिने स्कुबा डायव्हिंग करायला उत्सुक असलेली मी अचानक २ पायऱ्या सुद्धा खूप जपून उतरू लागले.

मला आणि तुझ्या बाबाला  मात्र आता तुला पहायची घाईच झाली. ट्रिप झाली की तुझ्या आगमनाची निश्चिती!!

पुण्याला येताच तडक गाठला तो दवाखानाच!

त्या सोनोग्राफी मधे दिसणारा इवलासा पांढरा ठिपका म्हणजे तू!!! आम्ही क्षणभर बघतच राहिलो. ही तुझी आणि माझी पहिली भेट. रिपोर्ट मध्ये Cardiac activity is seen हे वाचून माझ्या आत एक नाजूकसे हृदय धडधडत आहे  ह्याची लख्ख जाणीव झाली. 

३ महिने कोणालाही ही गुड न्यूज़ सांगायची नाही

आता संयमाचा खरा कस लागणार होता! कधी एकदा हा आनंद सगळ्यांना सांगता येईल ह्याची वाट पाहत दिवस जाऊ लागले.

एरवी ट्रॅफिफ मधे गाडी काढायचा कंटाळा करणारा तुझा बाबा आता माझा हक्काचा ड्रायव्हर झाला! 

फक्त माझा नव्हे.. आपला😇 

पौष्टिक खा, दगदग नको अशा दोन्ही आज्यांच्या सूचना सुरूच होत्या. 

बघता बघता ३ महिने झाले, मिरजेला चोर ओटी भरली आणि मग मी गडबडीने सर्व भावी मावशांना ही news दिली.

 पिल्लू, तुझ्या येण्याची केवळ चाहूलच काय धामधूम घेऊन आली माहिताय? 

सगळ्या आज्या,आजोबा, मामा, काका, मावश्या, आत्या आणि इतर अनेक मंडळी कंबर कसून तयारच झाले तुझ्या स्वागताला... अगदी बाप्पाच्या आगमनाइतका उत्साह संचारला सगळ्यांच्यात. सगळ्यांना वेध लागले ते २ जुलैचे! 

दर आठवड्याला डॉक्टरकाका बोलवत होतेच तुझा फोटो बघायला. 

पाहता पाहता ५ महिने झाले आणि तुझा चेहरा, एवढेसे हात पाय सगळं दिसू लागलं!  प्रत्येक स्कॅन मधे काहीतरी वेगळं दिसायचं आणि आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे आमच्या. वाटायचं की ह्याहून भारी काहीच नाही... पण तोवर पुढचा स्कॅन यायचा आणि त्याहून भारी फीलिंग!!


दर आठवड्याला तुझी प्रगती बघत दिवस भराभर पळत होते! 

इथून सुरू झाले ते डोहाळेजेवणांचे पर्व..

पुण्याच्या ज्योती मावशीआजी आणि प्रतिभा आत्याआजी ह्या दोघींनी मस्त खादगीचा बेत करुन आपले भरपूर लाड केले बर का!

तुझा जन्म मिरजेत म्हणजे तुझ्या आजोळी planned होता. एप्रिल महिना आला आणि पुण्याला टाटा बाय बाय करून आपण दोघे निघालो की मिरजेला.

मिरजेत आजी आजोबांनी एकदम झकास असा सेटअप केलेला. आपल्या मिरजेच्या घरात मला धुळीचा त्रास होतो म्हणून चक्क नवीन २ फ्लॅट मध्ये तात्पुरते शिफ्टिंग केलेलं! असा आहे साहेब तुमचा थाट!

७ एप्रिल रोजी आजीने सुरेख प्लॅन करुन डोहळेजेवण केलं. आपण त्या दिवशी पंचपाकवन्नाचे जेवण भरपुर हाणले😇

हा सगळ्या घरच्या मंडळींचा उत्साह...तर ऑफिसमधल्या सर्व मामा मावश्यांनी एक ऑनलाइन म्हणजे virtual babyshower केला😂 

आई होणार म्हणून माझे आणि पर्यायाने तुझे खूप लाड सुरू झाले. मंजू मावशी आजी खास दहिवडे करायला मिरजेला येऊन गेली! उल्का आत्याआजी कडे जाऊन दिवसभराची खाद्यजत्रा केली..

मिरजेच्या आजीला तर आपण नुसत्या बसून फर्माईशी केल्या! 

मिरजेतल्या आजी आजोबांच्या मित्रपरिवारांनी सुद्धा खाण्यापिण्याचे भरपूर लाड केले. भिशीतल्या आज्यांनी तर दणक्यात डोहळेजेवण सुद्धा केलं.

ह्या सगळ्यात दुधात साखर म्हणूनच की काय माझ्या ४ जवळच्या मैत्रिणी म्हणजेच तुझ्या मावशा सुध्दा नवीन पाहुण्याची बातमी घेऊन तयार होत्या! आसावरी मावशी, अक्षता मावशी, ऋता मावशी आणि श्वेता मावशी!!!

आमची online डोहाळ्यांची देवाणघेवाण सुरूच होती. 

२ मेला तुझा मित्र अगस्त्य याचा जन्म झाला. 


आता तुझ्या आगमनाला अवघे २ महिने राहिले आणि पोटात तुझा वांडपणा वाढत चालला होता.

१-२-३-४... अशा सलग २०-२० लाथा मला जाणवू लागल्या. प्रत्येक लाथेगणिक एक सुखद लहर मनात उमटू लागली. हळूहळू तू पोटात गोल गोल फिरत आहेस हेही मला कळू लागलं. गर्भातल्या माझ्या पिल्लाला भेटायची उत्सुकता शिगेस पोचली होती.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला आणि तुझी भेट अगदी नजीक येऊन ठेपली😇

२४ जूनला ठरले की २७ जूनला चिमुरड्याला बाहेरच्या जगात आणायचे आहे🫣 

धडधडत्या छातीने मी तुझ्या बाबाला ही बातमी दिली तर तो पुढच्या क्षणी गाडी काढून पुण्यातून निघाला सुद्धा! बार्शीचे आजी आजोबा, पुण्यातून आत्या आणि बेळगाव मधून मावशी अशा सर्व दिशांनी तुझे fans पळत सुटले😂 इथून मात्र दिवस म्हणावं तर पटकन आणि म्हणावं तर मुंगीच्या गतीने पळाले.

पाहता पाहता तो दिवस -२७ जून २०२३ उजाडला! सकाळी १२ वाजता आपले आगमन ठरले होते. वरकरणी शांत चेहरा असला तरी माझ्या मनात काहूर उठले होते. उत्सुकता, हळवेपणा, हुरहूर, अस्वस्थता अशा एका विचित्र मनस्थितीमध्ये भीती मात्र मुळीच नव्हती. इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली, ज्या भेटीची आस धरली आणि ज्या मिठीची स्वप्ने बघितली... तो क्षण असा माझ्या उंबरठ्यावर येऊन उभा होता.

ऑपरेशन थिएटरच्या आत जाताना सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आत टेबलावर पहाडल्यानंतर डॉक्टर काकांच्या गप्पांनी उरलीसूरली चिंतासुद्धा पळून गेली. काही क्षणात ट्याहा ट्ट्याहा करत एक अत्यंत खणखणीत असा आवाज ऐकायला आला आणि माझ्या तोंडभर हसू पसरले! एक छोटासा आनंदश्रू माझ्या गालावर ओघळला... डॉक्टर काकानी चपखल पणे एक डायलॉग मारला "million dollar smile"

त्याइतका आनंद खरच नव्हता रे झाला ह्यापूर्वी. थोडया वेळात मला तो एवढासा मांसाचा गोळा आणून दाखवला "congrats, it's a baby boy" हा क्षण माझ्या स्मृतीत पक्का कोरला गेला.

गेले ९ महिने नाळेने बांधले गेलेले आपण त्याच क्षणी विलग झालो आणि कायमचे मायलेक म्हणून जोडले गेलो.

आज तुला येऊन ३ दिवस झालेत. जागरण, औषधे ह्यांनी खूप खूप थकली आहे रे मी पण एक अनामिक ऊर्जा आहे आतून.

आईची माया ही एक शक्ती आहे ह्याची प्रचिती येती आहे.

दिवस पळतील आणि तू झपाट्याने मोठा होशील. ह्या क्षणाला मागे टाकणारे अनेक परमानंदाचे क्षण तू आम्हा दोघांना देशीलच. तेव्हा ही आपली पाहिली भेट धूसर होत जाईल म्हणून च हा लेखन प्रपंच!


तुझीच

ताजी ताजी ३ दिवसाची आई



खदखद!!


आज ४ डिसेंबर २०२३! 

बरोबर १ आठवड्यात माझी maternity leave संपेल. मला ११ डिसेंबर रोजी join व्हायचे आहे. ऑफिस मधले सहकारीसुद्धा कीर्ती back in action पाहायला उत्सुक आहेत. 

मी तशी सुरुवातीपासून career-minded, महत्त्वाकांक्षी वगैरे आहे. माझं काम अतिशय आवडीचे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कामाला, तिथल्या शिस्तीला, deadlines ला प्राधान्य द्यायला मला मनापासून आवडते. ते कधीच मला बंधन किंवा ओझे नाही वाटले. 

असे सगळे असतानाही आज नको नको नको म्हणत असतानाही तो विचार मनात डोकावलाच!! ज्याची धास्ती होती आणि जे मला शक्यच नाही असे वाटत होते त्या कल्पनेने डोक्याचा एक कोपरा हळूच व्याप्त केला होता.

तो विचार म्हणजे... काही दिवस सोडावी का नोकरी? घ्यावा का ब्रेक? आहे का गरज एवढी ओढाताण करायची?


ह्याच कारण म्हणजे माझ्याकडे बघून हातपाय नाचवत खुदुखुदू हसणारे आणि मी कडेवर घेईपर्यंत भोकाड पसरून घर डोक्यावर घेणारे माझेच बाळ- आत्रेय!

विश्वासच नाही बसत की ६ महिने असे संपले सुद्धा.. 

मन म्हणते,

"अरे कालच नाही का तू ह्या जगात आला! आणि

परवाच तर मी शिकले लंगोटी बांधायला आणि पाठीवर हात फिरवून ढेकर काढायला!

अरे काल नाही का तू आणि मी पूर्ण रात्र जागून काढली! आणि परवाच नाही का तुझी पहिली लस दिली!

अरे कालच तर आपण तुझे कान टोचले! आणि परवाच नाही का बाबाने नवीन पाळण्यात घालून तुझे फोटो काढले!

अरे काल तर तुला माझी ओळख पटायला लागली! आणि परवाच नाही का मला तू गोड अशी first smile दिलीस!

अरे कालच तर तू लांब लांब हुंकार देऊ लागलास! आणि परवाच नाही का तू थेट पालथाच पडलास!"


हे सगळं असे कालपरवा होत असताना अचानक असा "आज" येऊन ठेपला आणि बाळाला बाजूला सारून काम जवळ घ्याव लागते ह्या कल्पनेने माझे धाबे दणाणले! 

हा सगळा वेळ केव्हा संपला? जागरण होतंय ह्याचे रडगाणे गाता गाता अचानक ६ महिने झाले पण!!! आता हे माझे पिल्लू लगेच काही महिन्यात एक वर्षाचे पण होईल का? मला समजेल ना हा प्रवास?

असा reality hits सुरू असताना मी स्वतःला सावरले. स्वतःशी संवाद साधला. नेमक वाईट कशाचं वाटतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आता "मी काम करणे" हा बाळावर अन्याय आहे वगैरे विचार नाहीच आले उत्तरात! 

उत्तर एकच होत : आपल्या हातून त्याच बालपण निसटू लागलंय ही एकमेव तीव्र भावना... गेले ६ महिने माझे आयुष्य आत्रेयमय झालेल आहे. त्याच्या बाललीला पाहत जागरणाचा थकवा विसरुन जायची आता सवयच लागली आहे.

हे सगळं अचानक थांबवून समोर तो शुष्क लॅपटॉप उघडून दिवसभर काम करणे अशक्य वाटू लागलंय. मी नाही म्हणून हा १ तास रडेल, १ दिवस त्याला माझी आठवण येऊन येऊन रडू फुटेल पण मग १ दिवस त्याला सवयसुद्धा होईलच की माझ्या नसण्याची... सगळच हातातून निसटून जातंय असे वाटत आहे. 

पण हे असे नसणार! 

हो , मला आता त्याचे तान्हया बाळाचे रूप नाही मिळणार पाहायला!

पण तो घरभर रांगेल तेव्हा त्याच्यामागे मीच तर पळणार आहे. रोज कॉल्स घेऊन किटलेले माझे कान ,आत्रेयचे पहिले बोबडे बोल ऐकायला तेवढेच आसुसलेले असणार आहेत. लॅपटॉप बडवून दमलेल्या माझ्या बोटांना आराम म्हणून एक घास चिऊचा भरवायचा आहेच! 

अजून तर हा चालायचा आहे, पळायचा आहे आणि धडपडायचा सुध्दा आहे.

हे तर पुस्तकाच पहिले पान आहे. मोठ्या ग्रंथातील पहिला श्लोक आहे. एका मस्त thriller आणि action वाल्या movie चा हा फक्त trailer आहे!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

त्यामुळे आता मी ताज्या दमाने ऑफिस जॉइन करणार आहे. कारण आता फक्त कीर्ती back in action नसून आत्रेयची आई कीर्ती back in action आहे!

😇


*स्तनपानाचे पान उलटताना*


आनंदात सर्व आणि साजरे होई त्याचे आगमन 

नाळेचे तुटले नाते म्हणून मात्र सैरभैर तिचे मन 


विचारांचे वादळ डोक्यात आणि हात पोटाकडे जाई

नवा नवा जीव तो आणि नवखीच की ती आई 


मनातून आतुरता फक्त पिल्लूच्या भेटीची 

पण चिंता तिला पडली आता त्याच्या भुकेची 


टयाहा टयाहा आले कानी आणि चटकन बसली आवरून 

"कुठे आहे बाळाची आई" ऐकून स्वतःला घेई सावरून 


भरून आले डोळे आणि फुटला तिचा पान्हा 

मांडीवर तिच्या जेव्हा आला इवलासा तो कान्हा 


बहरला आसमंत आणि क्षणात शांत झाली ती

स्तनपानाची सुरू झाली आता दैवी अनुभूती 


अहोरात्र सुरू झाला आता तहानभूकेचा खेळ 

थकून गेली ती बिचारी बसवून झोपेचा मेळ 


सरला काळ आणि खाऊ लागला तो चिऊकाऊचे घास 

मायलेकाचा उरला आता फक्त रात्रीचा सहवास 


दिवस जवळ आले आता तिचे घरट्याबाहेर उडायचे 

ठरलेच की मग आता अंगावरचे सोडवायचे 


तशी न डगमगणारी ती पण आज वेगळाच होता नूर 

स्तनपानाच्या निरोपाची तिला नुसतीच हुरहूर 


रडवेल्या बछड्याने तिच्याकडे केला खूप हट्ट 

पण वाघीण अशी ती की दूर उभी राहिली घट्ट 


रडण्याच्या आवाजाबरोबर वाढे अंतर त्यांच्या मधले 

नाराजीने का होऊन वाटी-चमच्याला केले त्याने आपले 


बाळ होई मोठे आणि विस्मरणात जाई ह्या यातना 

आई घेते नवा जन्म स्तनपानाचे पान उलटताना...!!


नशीबवान आहेस!


आज रोजी १४ मार्च २०२५! 


काय पटापट दिवस पुढे सरकत आहेत... बघता बघता आत्रेय दीड वर्षाचा झाला! पूर्वी मी मनातली खदखद लिहून व्यक्त केली आहे. पण आज वेगळ आहे! आज मनात कृतज्ञता दाटून आली आहे आणि त्यामुळे गतवर्षाचा थोडा आढावा...


नोव्हेंबर-२०२३ आला आणि आता महिन्याभरात पिल्लूची आणि माझी नवीन घडी बसवायचे नियोजन सुरू झाले.

तेवढ्यात कंपनीने विचारले की १५ दिवस आधी जॉइन करू शकतेस का? पुढे रजा adjust करता येईल. संधी चांगली होती पण काय करावे असा माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला.

चेहऱ्यावर भले मोठठे प्रश्नचिन्ह घेऊन सासू सासऱ्यांना हे update दिले! चाय पे चर्चा रंगली आणि नेहमीप्रमाणे माझ्यामागे ते दोघे खंबीरपणे उभे राहिले. माझ्या सासूबाई बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरी फक्त मी आणि retired सासरे! 

तरीही त्यांनी "करू आपण मॅनेज" म्हणून मला जॉइन करायला सांगितले. आशिषला वर्क फ्रॉम होम नसल्याने त्याला पुण्याला जावे लागले. 

मी जॉइन झाले. पहिला कॉल सुरू झाला आणि colleague कडून पहिला प्रश्न हाच आला की अग तू सासरी आहेस? आशिष नाहीये? मग बाळाकडे कोण?? 

मी जेव्हा अभिमानाने उत्तर दिले की "माझे सासरे! "

तेव्हा बाकी सगळे थक्कच झाले . 

मला माझी मैत्रीण म्हणाली "नशीबवान आहेस!!"


महिन्यभरात मी पुण्याला निघाले. थोड्या मुश्किलीनेच पण पुन्हा एकदा माझ्या नशिबाने आत्रेयला सांभाळायला अगदी आईसारखे प्रेम करणारी nanny मिळाली. वैशालीताईंची कामाची पद्धत आणि निटनेटकेपणा पाहून पुन्हा सगळे हेच म्हणाले "नशीबवान आहेस"


आत्रेय मोठा होऊ लागला. त्याला वेगवेगळ्या चवी खायला घालणे आणि स्वतःच्या हाताने खायची सवय लावणे (baby led weaning) हे अजिबातच सोपे नव्हते. 

पुन्हा एकदा नशिबाने माझ्या नणंदेचे आकांक्षाचे लग्न अजून ६ महिन्यांवर होते. ती आमच्याबरोबर होती. तिने हा विडा उचलला. आम्ही प्रवाहाविरुद्ध काहीतरी करू पाहत होतो! प्रचंड गोंधळ आणि अमर्यादित patience चा हा खेळ होता. पण आकांक्षाच्या मदतीने आम्ही थकून भागून का होईना ही प्रगती करू लागलो.

आज १.५ वर्षाचा आत्रेय जेव्हा आपापला जेवू पाहतो आहे तेव्हा मला पुन्हा एकदा सगळे म्हणतात "नशीबवान आहेस"


वैशाली ताई आणि माझे workfromhome हे गणित एकदम चपखल बसले होते. पण आता मला work from office करायला लागणार होते. वैशाली ताईंना जड अंतःकरणाने निरोप देऊन आत्रेयचे पाळणघर- आजोळ सुरू करावे लागले. तो तिथे छान रमू लागला पण थोडी नाजूक तब्येत असल्याने खूप आजारी पडू लागला. आमच्या दोघांचेही ऑफिस सुरू झाले असल्याने राजांचा प्रश्न येऊ लागला. अशावेळी आमचा हुकमी एक्का ठरली माझी आई! एक फ़ोन करायचा अवकाश आणि हातातली सगळी कामे सोडून माझे आईबाबा किंवा एकटी आई पुण्याला हजर होऊ लागले. सासूबाईंना बँक आहे, त्यांना रजा नाही मिळत त्यामुळे आईला यावे लागते आहे ह्या विषयांची चर्चा सुद्धा नाही झाली. 

समाजात अकारण कटू असलेले विहिण हे नाते आणि ह्या दोघी विहीणींचे मैत्रिणीसारखे नाते पाहून पुन्हा एकदा ऐकू आलेच "नशीबवान आहेस"


सगळी घडी बसली. रूटीन सुरू झाले. अत्रिच्या खोड्या आणि प्रगती पाहत दिवस पळत होते. जॉइन करून १ वर्ष झाले आणि माझी official tour प्लॅन होऊ लागली.

पुन्हा एकदा माझ्या पोटात गोळा आला आणि पुन्हा एकदा माझी सपोर्ट सिस्टम मदतीसाठी सरसावली. २ आठवड्यांच्या माझ्या टूरची तिकिटे होण्याआधीच दोन्ही आजी -आजोबांचा प्लॅन फिक्स झाला. १ आठवडा आत्रेय बार्शीला जाणार आणि १ आठवडा माझे आई बाबा पुण्याला येणार! तू काही टेन्शन घेऊ नकोस .

मला confidence यावा म्हणून माझ्या सासूबाई १ आठवडा पुण्याला आल्या आणि रोज आत्रेय आजी आबांकडे झोपला. एक रात्र तर फक्त आम्हाला आश्वस्त वाटावे म्हणून आत्रेयला घेऊन आजी-आजोबा आकांक्षा कडे गेले आणि एक पूर्ण दिवस त्याला छान सांभाळले!

एवढा सगळा खटाटोप फक्त ह्यासाठी की आम्हाला निश्चिंती असावी...

शिक्षण सुरू असल्याने एरवी कोणत्याच गणितात नसणारी माझी बहीण अचानक मदतीला म्हणून शनिवार रविवार पुण्याला यायला तयार झाली.

कसे मॅनेज करणार म्हणता म्हणता सगळे सज्ज झाले आत्रेय बार्शीमध्ये आजीच्या कुशीत गाढ झोपू लागला आणि आज मी निघाले सुद्धा!

आता कोणीही म्हणायची सुद्धा गरज नाही इतकी मी नशीबवान आहे ! ♥️




मोहीम फत्ते......

29/03/2025


कालच कीर्ती भारतात परत आली आणि तब्बल 16 दिवसांनी माय-लेकराच्या भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला आणि मला पण भरुन आल्यासारखं झालं .
कीर्तीची कंपनी क्लाएंट व्हिजीटसाठी बाहेर पाठवते . त्यातही नंबर लागणे ही तशी अवघड गोष्ट आहे . कंपनी आधी तुमच्याकडून जाणार आहात का ही खात्री करुन घेते पाठवेल न पाठवेल ह्याची निश्चिती नाही पण आपलं मत द्यावं लागतच . तिला 2024 मध्ये 2025 साठी विचारलं गेलं त्यावेळी तिची द्विधा मनस्थिती झाली होती . पिल्लू आत्ता कुठे एक वर्षाचं झालं होतं . WFH नुकतेच बंद झाले होते आणि तिने ऑफिसला जायला सुरुवात केली होती . ते थोडस सुरळीत होत होतं , तसं तर बाळ पण अजून पीत होतं . काय करावं ? हा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा होता तिने मला फोन करुन विचारलं काय करावं . मी तिला म्हणलं तुला काय करावस वाटते , तुझं अंतर्मन काय म्हणते याचा पहिल्यांदा तू अंदाज घे नंतर तुम्ही दोघे चर्चा करुन मला सांग . यावर ती म्हणाली दोन दिवस झाले आम्ही दोघेही विचार करतच आहोत . मला जायला पाहिजे असे वाटते त्यावर भविष्यातील काही गोष्टी मला achive करता येतील . तोवर मीपण विचार करुन ठेवला होता अशा संधी काही सारख्या  मिळत नाहीत . शिक्षणासाठी मरमर करायची आणि त्याचं फळ मिळताना ते आनंदाने घ्यायला पाहिजे संधीने दार ठोठावलं की तिचं स्वागतच व्हायला हवे म्हणून मी ठरवलं कीर्तीचे मनोधैर्य वाढवले पाहिजे तिला आश्वस्त करायला हवं . तिला सांगितलं 
"तू बिनधास्त हो म्हणून सांग , बघूया कसं manage करायचं ते वेळ आल्यावर करु ". यादरम्यान आम्ही जाणून बुजून आमच्या पुण्याला फेऱ्या वाढवल्या . आत्रेयला तशी पहिल्यापासून आमची सवय आहेच . मिरजेचे आजी आबा पण येत जात राहिले .
2025 उजाडलं आणि कंपनीने मार्चमध्ये जाण्याचा प्लॅन दिला .
तशी धावाधाव सुरु झाली , मग सलग सुट्ट्या आल्या की मी पण 1/2 दिवसांची रजा टाकायचे आणि आम्ही पुणे गाठू लागलो . त्यादरम्यान मी पिल्लूचं रुटीन कसं आहे , बाळाचे आईबाबा काय करतात हे टिपत होते . मला आपले स्वतःचे अनुभव जरी असले तरी त्याला आता 25 वर्षे होऊन गेली होती , घरात तसं लहान कोणी नाहीच . आजकालच्या पद्धती वेगळ्या आहेत , बदल भरपूर आहेत . त्याच्या आईबाबासमोर सांभाळणं वेगळं आणि पुर्ण जबाबदारी घेऊन सांभाळणं वेगळं . त्या बाळाबरोबर त्याच्या आईबाबाला पण आश्वस्त करणे ही तारेवरची कसरत होती . कीर्तीपेक्षा जास्त आशिषला प्रश्न पडत होते . एखादा आठवडा आम्ही पुण्यात जाऊ एखादा आठवडा मिरजेचे आजी आजोबा येतील असे आधी मनाशी ठरवले होते .
पुण्यात राहून त्याला डे केअरला सोडणे , आणणे , त्याचा खाऊ आणि मुख्य म्हणजे रात्रीचे झोपवणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आई बाबा समोर केल्या म्हणजे नकळत त्यात काही राहत तर नाही ना हे पाहण्याचा मुख्य उद्देश होता . पण कीर्तीचा प्लॅन नेमकाच मार्चएंडचा आल्यामुळे मलाही गोंधळायला झालं , काय निर्णय घ्यावा समजेना . कारण मला यादरम्यान रजा मिळणे किंवा मी घेणे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते . भरपूर विचार केला आणि मी डीक्लिअर करुन टाकलं पिल्लूला आम्ही बार्शीत नेऊ . त्यावर पहिल्यांदा आशिषच नाही म्हणाला . त्याच्या मते हे शक्यच नाही कीर्ती जरी  गेली तरी मी असेन , घर त्याच्या सवयीचे आहे , दिवसभर त्याला डे केअरला सोडता येईल बार्शीत नेलं तर सगळाच एकदम बदल त्याला झेपणार नाही त्यात माझी बँक असणार पप्पांना लोड पडेल असं त्याच म्हणणं होतं . पण कीर्तीला खात्री होती ती म्हणाली फक्त रात्री आम्ही दोघेही नाही त्यामुळे कसं होईल याची शंका आहे तो जर रात्री तुमच्याकडे झोपला तर मग मी निश्चिंत होईन .
 मग आम्ही प्रात्यक्षिक घ्यायचे ठरवले आणि त्याला घरातच पहिल्यांदा आमच्याकडे झोपवले आणि नंतर एक दिवस आकांक्षाकडे मुक्कामाला घेऊन गेलो . तो छान रमला त्यामुळे सगळ्यांना थोडासा कॉन्फिडन्स आला . मग आशिष म्हणाला ठीक आहे , 
मी त्याला घेऊन येतो दोन दिवस मी राहीन आणि 4/5 दिवसांनी त्याला परत पुण्यात आणू . मी तर तो 15 दिवस बार्शीत राहिला तरी चालेल आम्ही करु शकतो असे सांगितले पण आशिष तयार नव्हता , मग म्हणलं आशिष तयार तरी झालाय येऊ तरी दे करु पुढचे पुढे . 
14 तारखेला आशिषला सुट्टी होती त्यामुळे 13 तारखेला वंदे भारताने पार्सल बार्शीला रवाना झाले . इकडे आबा कुर्डुवाडी स्टेशनवर स्वागताला सज्ज होते !! 
घरी आला तेव्हा आत्रेय झोपलेला होता रात्री 10.30 वाजता घरात पोहोचला की तो जागा झाला आणि समोर आजी आबा दिसले तसा तो पुर्णच जागा झाला आम्हाला पाहून त्याला आनंद झाला एक तास खेळून नंतर तो 12 वाजता आमच्याकडेच झोपला . उशिरा झोपल्याने तो सहापर्यंत झोपला निवांत होता . 
सकाळी आमचा टास्क सुरु होणार होता मी खूपच आतुर होते कसा काय तो react होणार म्हणून .
पण मला निसर्गाने पण भरपूर साथ दिली होती . 4/5 दिवसापूर्वी आमच्या अंगणात चिक्कूच्या झाडाखाली मांजरीने तिची पाच पिले आणून ठेवली होती . मला फारशी मांजरे-कुत्री आवडत नाहीत पण मुद्दामच बिस्किटे देत मी ती थोडीशी माणसाळवली होती . ती दिवसभर अंगणात , घराभोवती खेळायची आणि मोठ्या गाडीखाली जाऊन सावलीत बसायची . 
सकाळी सहा वाजता आत्रेय उठला तो खेळतच ! 
ए आबा ऊठ 
ए आजी ऊठ 
दूदू प्यायच अशी बडबड सुरु झाली तोच मांजराच्या पिलांचा आवाज आला . त्याला मी आवाज ऐकवला 
ते बघ माऊ म्हणलं की तो माऊ पहायला इतका एक्साईट झाला की त्याला बाहेर नेऊन गाडीखाली वाकून दाखवलं तो इतका चेकाळला तो चक्क अंगणात गुडघ्यावर बसून पुढे कोपरे ठेवून मांजरासारखा त्याच्याकडे बघतच बसला . खेळण्याच्या नादात त्याला दूध पण नको झालं त्याला ओढत घरात न्यायची वेळ आली .
म्हणलं बरं झालं !!
मग घरात त्याच्या ओळखीची त्याची खुर्ची , पांडुरंगाचा फोटो , आणि मुख्य म्हणजे देवघर ! तसे अलीकडे घरात कोणी लहान नाही कधी आला आत्रेय तर त्याच्या मागे धावायला सगळेच असायचे पण आता त्याची उंची वाढली आणि खुर्ची , सोफा , बेड, कट्टा यावर तो सहजपणे चढउतार करु लागलाय त्यामुळे सकाळी दोन तासातच त्याने मला आता घरात काय आवरु , एवढं मोठ्ठं घर असताना कुठे ठेऊ आणि कुठे नको असे त्याने मला सळो की पळो करुन सोडले . हे अपेक्षितच होते पण अरे अरे करेपर्यंत काहीतरी करुन तोंडाचा चंबू करत खट्याळ हसणे , वाट फुटेल तिकडे धावणे असे सुरु झाले . मग त्यादरम्यान खाऊ खाताना खुर्चीत बसून खाणे बंद झाले कारण इथली खुर्ची पुण्यातल्या खुर्चीसारखी नाही त्याला बेल्ट नाही त्यामुळे त्याचे स्वैरपणे धावत खाणे सुरु झाले आगदी गेटच्या बाहेर चिऊ , काऊ , भूभू , माऊ , हंबा सगळ्यांशी गप्पा करत खाणे पिणे करत होता . तो येण्यापूर्वी त्याला एक सायकल आणून ठेवली होती अंगणात त्यावर बसून फेऱ्या व्हायच्या . समोर ग्राऊंड असल्यामुळे ग्राऊंडवर खेळणारे दादा दिवसभर  शेळ्या , गायी , म्हशी भूभू  , चिऊ , काऊ दारासमोर दिसणे त्याच्यासाठी खूप आनंद देणारे होते . 
आम्ही हॉल मध्ये बसलो की त्याच्या मनात आले की तो आमचे दोघांचे हात धरुन उठवायचा 
रिंगा रिंगा म्हणायचं की धप्प म्हणत जागेवर पडायचं त्याच्याबरोबर आम्ही पण पडायचं , आम्ही पडलो की तो उचकी लागेपर्यंत खदाखदा हसायचा की लगेच दुसऱ्या सेकंदाला हा उभा रहायचा मग आम्ही पण उठले पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा . त्याच्या बाललीला पाहत त्याच्या बरोबर आम्ही पण लहान झालो होतो . तो जागेवर उड्या मारत जल्लोष करायचा आणि ते पाहून आमच्या आनंदाला पारावर राहायचा नाही .
सुख म्हणजे नक्की काय असतं हे कळत होतं .
कधी नव्हे अशी आमच्या देवघरात हळद कुंकू रांगोळी अक्षदा यांची रंगपंचमी साजरी झाली होती . श्रीकृष्ण , अन्नपूर्णा , गणपती सगळ्या मूर्तींनी नुसता रंगच नाही तर पकडपकडी पण खेळली होती . त्यामुळे  लपण्यासाठी जागा सोडून देव कुठेही पळालेले दिसायचे रोज त्यांना जागेवर आणून ठेवावे लागे . कोणत्याही वेळी आमची देवाची घंटा वाजे !!
पाच वाजले की अंगणात पाईपने पाणी मारणे ( खेळणे ) हा छंद . त्याच्याशी खेळताना , त्याचे बोबडे बोल ऐकताना , त्याचा हट्ट पुरवताना मनाला निखळ आनंद होत असे . नातवंड म्हणजे दुधावरची दाट साय म्हणतात त्याची पुरेपूर प्रचिती आली आणि मन भरुन पावलं . 
त्याची भाषा फार मजेशीर होती 
आपण म्हणेल तसं तो बोलायचा पण ऐकायला दुसरच यायचं त्याचा अर्थ लावावा लागे
पुरंदरे म्हणलं की  
' निमांदे '
थालीपीठ पाहिजे तर 
' थापीत पाहिजे '
मनुका म्हणलं की 
' मुकुंदा '
भगवंत म्हणलं की
 ' घबंत '
अशी दिवसभर मजा चाले .
सायंकाळी आवरुन कधी बागेत तर बहुतेक वेळा घबंताला (भगवंताला) जायचं . तिथला कार्यक्रम वेगळाच असायचा . भजन करणारासमोर जाऊन उभे राहणे . लहान मुलांबरोबर  मस्ती करणे . मंदिरात एक हात जोडून उभी असलेली पाषाणाची गरुडाची मूर्ती आहे रोज गेलं की त्याच्याकडे हा पळत जाऊन उभा राहून गोरिला गोरिला करायचा .
मंदिरात नऊ अवतारांचे मोठ्ठे फोटो लावलेले आहेत हा प्रत्येकापुढे जाऊन त्याच्यासारखा हात पाय तोंड करुन उभे रहायचा . गणपतीसमोर पाटीत साखर असायची त्यावर डल्ला मारायचा विचार असायचा . पळत पळत त्याचे पूर्ण दोन राऊंड व्हायचे मग दमला की  चालता चालता त्याने रांगायला सुरुवात केली की आम्ही उठायचो चला आता दमला बाबू म्हणत निघायचो .
घरी आलं की त्याला जाम भूक लागलेली असे जेवण होईपर्यंत आबांनी हॉल मध्ये गाद्या टाकलेल्या असायच्या त्यावर पुन्हा अर्धा तास कोलांट्या उड्या मारायच्या असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता . धुलीवंदनची सुट्टी , संप , एक दिवस माझी दांडी एक शनिवार आणि दोन रविवार असे तब्बल सहा दिवस मला घरी राहता आले होतं आणि चार दिवस बँक होती , तशी शोभा दिवसभर थांबत होती पण त्याला जास्त आबा लागत होते . 
पाहिले दोन दिवस आशिष होता . तो होता तेव्हाच त्याच्या सगळ्या गोष्टी मी ताब्यात घेतल्या होत्या त्याच्याशी गप्पा मारत मी त्याला अनेक गोष्टी पाढवत होते .
आई ऑफिसला गेली .
बाबा ऑफिसला गेला .
आत्रेय आजीकडे झोपणार 
आबाकडे झोपणार .
आणि आपण परत तोच प्रश्न विचारला की तो बरोबर उत्तर द्यायचा . पंधरा दिवस केव्हाही
आई कुठे गेली म्हणलं की त्याच उत्तर लगेच यायचं 
' ऑफिसला '
तेही एका दृष्टीने बरं झालं होत .
तसा तो बार्शीत चांगलाच रमला आहे आता केतकीला पण यायला जमणार नव्हते तर राहू दे म्हणत तब्बल आकारा दिवस विनातक्रार तो बार्शीत राहिला .
रविवारी मिरजेचे आजी आबा आले तर त्याला कोण आनंद झाला . गिरक्या घेत त्याने तो साजरा केला . ती आजी त्याला जिंबी म्हणते तर हा परत आजीला जिंबी आजी म्हणून हाक मारतो . मला शलूsss म्हणायचं आणि पळत सुटायचं . त्याने दोन्ही आज्याना हाताला धरुन रिंगा रिंगा खेळायला लावलं . एकाच ठिकाणी दोन आज्या दोन्ही आबा पाहून तो चेकाळला .
आता सोमवारी तो आजी आबांबरोबर त्याच्या बाबाकडे  पुण्याला जाणार होता . मग आवराआवरी सुरु झाली आणि माझ्या पोटात कालवाकालव सुरु झाली आबांना पण चैन नव्हती ते पण त्याला घेऊन फिरु लागले . तसं तर त्याच्या वयाचा विचार केला तर  त्याने आईबाबाकडे असणे गरजेचेच आहे पण परिस्थितीमुळे त्याला आणावं लागलं होतं . तो छान राहिला म्हणून त्याचं कौतुकच आहे . त्याचे आई बाबा पण बिनधास्त राहिले त्यामुळे त्यांचेही कौतुक आणि तो आमच्याकडे राहिला त्याची जबाबदारी घेऊन त्याचं बालपण आम्हाला अनुभवण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य म्हणावं लागेल . तसं तर या आठ दहा दिवसात जो बोलेल तो बऱ्यापैकी हळहळत होता . आगोबाई एवढं छोटं बाळ कसं राहतं , बिचारी आई काय हो या नोकरीमुळे एवढ्याशा बाळाला लांब सोडून राहावं लागते तिला ,  किंवा काय हो तुमची बँक तुमचं वय आणि ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते , तुम्ही बँकेत जाणार आणि त्याच्या आजोबांनी काय करावं हो असे एक ना दोन अनेक प्रश्न लोकांना पडत होते .
पण मला तर हे मुद्दे काही फारसे रुचले  नाही . त्याच्या आईला exposer मिळालं , बाळाला चेंज मिळाला थोडासा गावरानपणा , निसर्ग अनुभवता आला आणि आम्हाला बाललीला अनुभवण्याची संधी मिळाली हा सगळाच दुग्धशर्करा योग जुळून आला असे मला वाटले . ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास रिकामा म्हणायचं की अर्धा ग्लास भरलेला म्हणायचं हे ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे . 
पुढे पुण्यात आई यायला अजून चारपाच दिवस बाकी होते पण त्याला बाबा भेटला होता , त्याच घर दिसलं होतं तिथे गेला की त्याने घरभर आईला शोधलं पण शांत राहिला खेळत राहिला . आजी , आबा , बाबा तिकडे आत्या आजीकडे एक दिवस अशी मजा केली त्याने . यावेळी कामाच्या व्यस्ततेमुळे हुकमी एक्का असणारी आत्या ( आकांक्षा ) मात्र तिच्या रिलीजमुळे  शुक्रवारपर्यंत busy असणार होती एकही दिवस तिला WFH मिळणार नव्हते उलट तिला घरी यायलाच उशीर होत होता . तोपर्यंत त्याची आई आली आणि एकूणच मोहीम फत्ते झाली . त्याच्या बाबाने आता declear करून टाकले आहे की आई आता त्याला सोडून आम्ही आठ दिवस ट्रिप करुन येतो . म्हणलं जावा कुठे जायचं तिथे कमी तिथे आम्ही हजर असू !!!
एकूणच हा कालावधी कायम लक्षात रहाणार आहे . आजुन शाळा सुरु नाही , वयाच्या दोन वर्षाच्या आत त्याची उन्हाळ्याची सुट्टी झाली सगळ्यात मदत कोणाची झाली तर आत्रेयची झाली कारण त्याने सहकार्य केलं नसतं तर काहीच करु शकलो नसतो हेही तितकेच खरे !!
आम्हाला दोघांनाही निखळ आनंद मिळाला एक संधी मिळाली . असे कधी होईल याची कधी कल्पना पण केली नव्हती . पण एकूणच छान कधी खेळ , कधी दंगा , फोडाफोडी , अंघोळ करताना मस्ती , घरात भरपूर राडा नाकी नऊ येईपर्यंत दमछाक पण त्याच एक गोड हसू पाहिलं की , एक गोड आवाजात आजी म्हणून हाक ऐकली की सगळ कुठेच्या कुठे पळून जायचं .



27/06/2025
Halloo आई व पप्पा



आज डबल धमाका असतो आपल्याकडे... तुमचा लग्नाचा वाढदिवस आणि आत्रेयचा वाढदिवस ! 
आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली त्यामुळे मला नेमका संसार काय असतो आणि तो कसा करायचा ह्याचा उलगडा हळूहळू होत आहे. 
पण ह्या ५ वर्षात मी तुम्हा दोघांना आणि तुमच्या एकमेकांना पुरक अश्या संसाराला जवळून अनुभवत आहे! बोलता बोलता सहजपणे तुम्हाला compliments दिल्या जातात पण पप्पांविषयी व्यक्त होणे राहून जाते. त्यामुळे हे खास anniversary special पत्र!
सासू सासरे आणि सून ह्या नात्याबद्दल आत्तापर्यंत एक कटकट आणि अपरिहार्य गोष्ट असेच बघितले जाते.
अशा ह्या अकारण कटू असलेल्या नात्याला पूर्णपणे challenge करायला मला हे सासर मिळाले आहे. माझे मित्र मैत्रिणी थक्क होऊन माझ्या stories ऐकात असतात. माझे काही मित्र त्यांच्या आई बाबांना तुम्हा दोघांच उदाहरण सुद्धा देतात. अश्यावेळी मनापासून अभिमान वाटतो मला तुमचा ..
लग्नानंतर माझे आई बाबा इतके निर्धास्त आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या friendly आणि frank support मुळेच! आईतर नेहमीच म्हणते ह्या विहीणबाई माझी छान मैत्रीण झाल्या आहेत तशाच दुसऱ्या मिळाव्या 😜
ह्या पत्रात काय लिहावे आणि काय वगळावे असे झाले आहे. एकदोन किंवा बोटावर मोजण्याइतक्या घटना नाहीतच...आपल्या कुटुंबाची पुर्ण जीवनशैलीच तुम्ही दोघांनी प्रयत्नपुर्वक घडवलेली आहे. 
लग्न झाल्यावर मुलीना तसे सगळे बदलते असे म्हणतात. मला थोडी धास्ती वाटली होती. पण ते तुम्ही होऊच दिले नाही 
" तुझ्या पद्धतीने चालू दे " 
असे म्हणत माझे मला पुर्ण freedom दिले. त्यामुळे तो मोकळेपणा आणि आपलेपणा माझ्याकडून सुद्धा सहजच आला. 
विशेष म्हणजे मी lockdown मुळे बार्शीत लगेचच सलग राहायला आले. स्वभाव वगैरे नीट कळायच्या आतच आपला सगळ्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. पण this was the best thing that happened to me! 
कामामुळे आम्ही तिघेही दिवसभर वरच्या खोल्यात असायचो. तेव्हा मी सून म्हणून काही वेगळ्या अपेक्षा किंवा गृहीत धरणे असे काहीच कुठेच नव्हते... उलट जास्तीत जास्त privacy सहजपणे देत होतात.
नेहमीच्या बायका वगैरे घरी येत नसतानाही माझीच जास्त काळजी घेतली जात होती... घरी लागणारे सामान, मला नव्यानेच समजलेला जलोत्सव (🤣पाणी भरणे) आणि इतर सर्व गोष्टी तुम्ही दोघे काही कळूही न देता करून टाकायचात.
मला पालेभाजी विशेष आवडत नाही म्हणून जेवायच्या आधी हळूच थोडीशी कोशिंबीर करणारे हे सासरे फक्त मलाच मिळाले आहेत! 
वर्ष २ वर्षे बार्शीत घरी राहिल्याने सगळे सणवार एकत्र साजरे झाले. पण देव, नैवद्य, सोवळे ह्याचे अवडंबर न करता, मुख्य म्हणजे जीवाचा आटापिटा न करता ते उत्साहाने कसे साजरे करायचे हेच मी पाहिले. पाहुणेरावळे, रीतिरिवाज, घरगुती कार्यक्रम, सोहळे ह्याची माझ्या कलाने आणि माझ्या पद्धतीने ओळख होऊ दिली. 
मला वाटत त्यामुळे मी सहजपणे सामावत गेले.
सगळे आधीचे बरेवाईट झटकून एकदम एक नवीन सासरची "brand new सून" होण्याचा आग्रह (दुराग्रह?) कोणीच नाही धरला... आणि त्यामुळेच मी चटकन बार्शीकर कुलकर्ण्यांच्या प्रेमात पडले! ♥️

मी माझ्या कित्येक मैत्रिणी बाळ झाल्यावर जॉइन करताना इतक्या त्रस्त आणि अस्वस्थ झालेल्या पाहिल्या आहेत. पण माझा तुम्हा दोघांच्या प्रेमावर आणि काळजी घेण्यावर इतका विश्वास होता की त्यामुळेच मी आत्रेय लहान असताना त्याला घेऊन बार्शीत राहिले. पप्पा तर स्वतःहून इतके करतात की कधीकधी मला आश्चर्य, अभिमान आणि कौतुक सगळं एकत्रच वाटायच! आत्तासुद्धा आत्रेय आजारी पडला की आबा पुढच्या गाडीने पुण्यात दाखल! 
एकूणच दोघांनीही खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहून आम्हाला boost दिले आहे . मग ती आर्थिक , मानसिक , शारीरिक कोणतीही मदत करण्यास, आम्हाला उभे करण्यात कसूर ठेवली नाही आणि त्याचा गाजवजा तर अजिबातच नाही . त्याचमुळे पाच वर्षात आमची एवढी मजल गेली , आम्ही settle झालो. 
नव्याची नवलाई संपली, मी रुळले. पण तुम्हा दोघांच्या समजूतदार स्वभावाचे अनेक पैलू मला माहीत होत गेले. आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस तर साजरे करण्याची आईंची पद्धत मला फार आवडते ती म्हणजे पत्रलेखन! 
आई म्हणतात " तुमच्या खास दिवशी आम्ही disturb करत नाही , तुम्ही Enjoy करा!" 
कोण करते असे? 
खाण्यापिण्याची चंगळ... ह्या विषयावर तर पुस्तकच लिहावं लागेल. 
पप्पांना निवडक सामान आणायची आवड तर आईंना विविध पदार्थ करून द्यायचा नाद!
वेगवेगळ्या चटण्या , लोणची , घावन पीठ , थालीपीठ भाजणी पीठ , कित्येक दिवस शेंगदाण्याचे कूट , खाऊचे पदार्थ , एक ना दोन कितीतरी पदार्थ अजूनही मी केलेले नाहीत आणि करावे लागत नाहीत . स्वस्थ बसणे तर माहितच नाही... बँक, शेत आणि इतर सगळे दोघे मिळून ठरवून तयारी करता , बार्शीतून येताना प्रत्येकाच्या आवडीचे काहीतरी करुन आणलेले असतेच , जडच्या जड उचलणार नाहीत इतक्या पिशव्या खचाखच भरुन आणायच्या!
आता गेल्या वर्षीपासून तर हे सगळं दुप्पट झाले ( Rahatani special )😍
generally मुली सासू आली की नाक मुरडतात... मी मात्र राणीसारखा आराम करू घेते. 
ऑफिस झाले की कंटाळा आलेला असतो स्वैपाकघरात जायचाच. कामाला बायका असल्या की काम हलके नक्कीच होते पण त्यांना manage करणे हे काही सोप्प नाही! 
आई आल्या की मात्र त्या किचन पूर्ण हाताळतात! काय करायचे, किती करायचे आणि आत्रेयला काय द्यायचे हे सगळं त्या बघतात.. माझी कोणतीही आई आली तरी मी थेट पानात वाढल्यावरच मेन्यू बघते😜
शिवाय तेव्हा ताटात १-२ नवीन पदार्थांची पर्वणी वेगळीच... पप्पा आले की भाजी, फळे, किराणा आणायला लागणार नाही म्हणून आशिष खुश असतो ! 
 काय सुख असते त्यात म्हणून सांगू . 😍
खाण्यापिण्याची इतकी आवड असतानाही आपली 
तब्ब्येत आणि पथ्य पाणी कसे सांभाळायचे हे तुम्हाला गवसले आहे. आजारपणाचा थांगपत्ता लागू देत नाहीत , दवाखाना कधी करतात कळू देत नाहीत .
माझ्या मावश्या , आजी , आत्या एवढेच काय मिरजेतील घरकाम करणाऱ्या बायका , पुण्यातील काम करणाऱ्या बायका मला नेहमी म्हणतात की तू खूप नशिबवान आहेस .
सणवार तर त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने करण्याची पद्धत बदलत नवीन सुरू केली की त्यामुळे सणांची मी तर वाट पाहत असते . त्यावेळी सगळे घरी असणार , जाचक प्रथा त्यांनी हद्दपार केल्या आहेत. सण म्हणलं की तरुणांना लाजवेल असा दोघांचा उत्साह असतो. पप्पांनी पूजेचे सगळे तयार करून ठेवलेले असते . जणू एखाद्या event mnaagement कंपनी ने करावे अशी तयारी असते.
अगदी साडी आणि त्यावर ज्वेलरी सेटचे बरेच option सुद्धा तयार असतात!
आम्ही आलो की हे इथे आहे ते तिथे आहे घ्या , घाला मजा करा. त्यामुळे दिवाळी , महालक्ष्मी , नृसिंह नवरात्र ह्याचे दडपण कधीच वाटत नाही.
मी नेहमी आईना women council चे काम करताना पाहिलं आहे . बँकेतील मुलींना मुलांना फोनवर बोलताना ऐकले आहे . नंतर त्यांचे किस्से ऐकले आहेत . जवळजवळ आई त्यांच counselling च करत असतात , त्यांचे विचार ऐकले की मला थक्क व्हायला होते. त्या काळाबरोबर तर आहेतच पण मला तर त्या काळच्या पुढे वाटतात . काळाच्या ओघात त्या नवीन गोष्टी adopt करायला खूप flexible आहेत . आमच्या काळात आम्हाला superwoman बनाव लागलं तुम्ही अजिबात बनू नका असे त्यांचे म्हणणे असते . शिक्षण घेतलं , एवढ्या जबाबदारीचे job करायचे ही काही खाऊची गोष्ट नाही असे त्या म्हणतात . सून बनण्यात मला कोणतीही डोकेदुखी झाली नाही इथून पुढेही होणार नाही ही खात्री आहे . पत्र मोठ झालं आहे पण 10% पण लिहून झाले नाही पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे मला कसा अनुभव आला हे मला लिहायचं होतं एकूणच अशा पद्धतीचे वातावरण मला मिळालेले आहे . 
वेळोवेळी सगळ्याच प्रकारच्या सल्ल्याची मलाच आवश्यकता आहे आपण नेहमीच आपली उच्च level ची चर्चा करत राहू . 

Wish you a very happy anniversary!


तुमचीच 
सगळेच म्हणतात तशी लिखाणात शोभणारी सासूची सून 😍😍


हॅलो सुनबाई 


धन्यवाद बाळा 
एकदम सिक्सर मारलात की हो ! किती बारीक बारीक लक्षात आहे तुझ्या छान वाटलं वाचून मला . आमच्या वागण्यातून तुला सुख मिळत असेल तर यापेक्षा जास्त सुख कशात आहे ग .
छान छान आपण असेच give and take policy follow करु आणि सुखी राहू . 
त्याबरोबर आपल्या कुटुंबालाही समाधानी ठेऊ .
एकमेकांना समजून घेण्यात जे सुख आहे ते दुसरे कशात नाही हे खरे ! पु. ल. देशपांडे यांची मैत्रीवर एक कविता आहे तीच नात्यात सुद्धा लागू होते असे मला वाटते असो असाच मोकळेपणा राहू दे . समजलेच नाही तर दिलखुलासपणे व्यक्त होत जा हा नेहमीचा सल्ला आहे .
खूप आनंद वाटला 
आणखी एकदा धन्यवाद !
😍😍😍
तुझेच आई पप्पा


मनातील घालमेल
05/08/2026



चिरंजीव आशिष आणि सौ. कीर्तीस
अनेक उत्तम आशीर्वाद 
पत्रास कारण की 
अनेक दिवस झाले पत्र लिहायला काही विषय म्हणा किंवा काही फारसे कारण मिळत नव्हते . परवा पुण्याला चक्कर झाली आणि तुमचे HBA1C चे रिपोर्ट्स , त्यावर आपली झालेली चर्चा आणि तुमच्या मनातील कल्लोळ आणि त्यावर झालेले माझं स्वतःच झालेलं मंथन म्हणलं सरळ पत्र लिहून काढावं आणि पाठवावं म्हणजे सवडीने तुम्हाला ते पुनःपुन्हा वाचता येईल , विचार करता येईल आणि थोडसं हलकं वाटेल !
     सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हेल्थ काँशियस आहात ही चांगलीच गोष्ट आहे पण काही वेळा त्याचा अतिरेक तर होत नाही ना हेदेखील पाहणे गरजेचे असते . कारण त्याची धास्ती हेच मूळ दुखण्याचे कारण असू शकतं .
     तुमचं रोजचं शेड्युल , कामाचा ताण , AI चे टेन्शन , नोकरीतील अस्थिरता , कर्जाचा बोजा , भविष्यातील नियोजन , आत्रेयचा ताण , मानसिक घालमेल , आमच्या तब्ब्येती कशा आहेत , आईबाबांना तर काही त्रास नाही ना अशा एक ना दोन रोजच्या साध्या साध्या गोष्टींचा पण लांब असाल तर ताण येत राहतो .
    त्यात काही नियोजन करणे हे आत्ता करायचं म्हणजे करायचच असे थोडे आखीव रेखीव असावं असं म्हणणं ( अट्टाहास ) त्यात थोडा बदल होतो म्हणून प्रचंड ताण किंवा अस्वस्थता येते . यावर उपाय म्हणजे थोडसं उनाडपणाने जगलं पाहिजे . थोडसं बेहिशोबी जगलं पाहिजे . एखादं नाटक , सिनेमा पहायला जा . कोणतच नियोजन न करता एखादी कोकण ट्रीप काढा , दोन दिवस उंडारून या ( हवं तर बरोबर आम्हांला न्या 😜 ) . अती डाएट फॉलो करु नका , काही खावस वाटलं तर बिनधास्त खा . कारण शुगर फक्त गोड खाण्याने वाढते असे नाही हे मी नको सांगायला . सध्या जगात 80-90% लोक या विळख्यात अडकलेले आहेत याचा अर्थ असा मुळीच नाही की आपणही त्यात असावे . 10 टक्क्यात राहीलो तर उत्तमच !
    आत्ता सध्या तुम्ही वेगळ्या मूडमध्ये होतात मला माहिती आहे मीपण ती स्वप्ने रंगवत होतेच कीर्ती मला जागे करत होती . पण इतके मूड ऑफ होण्याची अजिबातच गरज नाही , मी म्हणल न की आगदी आखीवरेखीव करण्याच्या आपण मागे लागतो . आम्हाला उशीर झाला असे मला नेहमीच वाटत राहिले तुमच्या बाबतीत एखादं वर्ष पोस्टपोन झालं तर काही हरकत नाही . माझी मोठी बहीण 1956 ची होती तर शेवटचे सुदृढ बाळ म्हणजे ज्योती 1974 ची आहे . आईकाकांना शुगर होतीच पण ती लवकर समजली नाही . त्यामुळे तुमच्या दोनमध्ये  पाच वर्षांचे अंतर असेल तर फारसे बिघडत नाही उलट अर्धा ग्लास रिकामा पेक्षा अर्धा ग्लास भरलेला पहायचा . आत्रेयला आजुन एक वर्ष फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित झालं आईबाबा पूर्णपणे त्याला मिळतील आणि तशी त्याला गरजही आहे . तसही व्यवस्थित अंतर असलेली भावंडे छान डेव्हलप होतात त्यांना आयुष्यभर आनंद मिळतो , तुम्हाला पण थोडीशी उसंत मिळेल , मी पण पूर्ण रिकामी होईन त्यामुळे तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल . आता आधी सहा महिने कोणतेही टेन्शन न घेता डाएट फॉलो करा , सकाळी अर्धा तास लवकर उठा 15 मिनिटं मेडिटेशन आणि 15 मिनिटं *ब्रम्हविद्या* करा .
शनिवारी गाडी काढून भटकून या . शनिवार रविवार अवांतर काहीही करा त्यात गाण्याचा क्लास , चित्रकला , वाचन , लिखाण किंवा आणखी काही करा आणि हे आनंदाने आणि strictly फॉलो करा . FM आणा त्याचा साउंड box हॉलमध्ये फीट करुन घ्या सकाळी उठल्याबरोबर सुरु करायचा तो बाहेर निघतानाच बंद करायचा !
      तुमच्या नशिबाने दोन्ही आईवडील विचारी आहेत , तुम्हाला आर्थिक , मानसिक , कष्टाने पाठबळ देण्यास सतत सज्ज आहेत . भविष्याची अती चिंता करु नकात , आपण म्हणलं तर पुर्ण कर्ज बंद करु शकतो , शेती हा उत्पन्नाचा स्रोत असला पाहिजे हा प्रयत्न सुरू आहेच त्यामुळे सधनपणे राहू शकता . हे सावट साऱ्या दुनियेवर आहे त्यामुळे त्याची चिंता सोडा . 
     दोन्ही घरात मोठे आहात परिपक्वतेप्रमाणे थोडसं जबाबदारीचे ओझे आपले आपण पण घेत असतो पण मला वाटतं आम्ही चौघेही जबाबदारीने वागतो . आपापले व्यायाम , औषधपाणी करत असतोच .
दोघांचेही वडील भल्या मोठ्या आजारांशी झुंज देऊन पुन्हा तगडे झाले आहेत . दोन्ही आई तर पडल्या , मोडल्या पुन्हा उभ्या राहिल्या . माझी तर पूर्ण बॉडी renew केलेली आहे . आगदी डोळे , दात , नाक , मणके , शोल्डर अजून काय सांगू तरी पण सगळ्यात फ्रेश असते . कोणत्याही व्याधीला दोन हात करायला मला चॅलेंजिंग वाटत . तुम्हाला माहिती आहे ते नाकाचे हाड पुन्हा वाढू द्यायचं नाही , शोल्डर therapy लगेच घरच्या घरी सुरू करायची , एकदा अँजिओग्राफी केली तर दम लागू नये म्हणून पळायची ( जॉगिंग ) सवय ठेवली आहे . आपणच आपले उपचार करायचे पण ताण न घेता हसत हसत केलं पाहिजे आणि वर सगळ्यांना चुकवून आवडतं म्हणून गोड पण खाते . बिपीला डायबेटिसचा भाऊ मानतात पण *ब्रम्हविद्येने* त्याला अजूनतरी दूर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे . आणि हो भाग्येश सरांचा एक पॉईंट मला फार आवडला तो म्हणजे ते म्हणायचे आई वडिलांना जर शुगर असेल तर मुले समजायला लागल्यापासून ती स्वतः आणि आईवडील सतत शुगर निघणार हे गृहीत धरतात तर तसा विचार अजिबातच करायचा नाही . अगोदर मनात त्याला घर करू द्यायचं नाही . रणांगणावर हरण्यापूर्वी मनात हरला तर तो कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे  पॉझिटिव्ह thinking करत राहायचे , मनाला स्वैर होऊ द्यायचं नाही त्याला चाबकाने बडवायचं .असे प्रयोग करत राहायचे . 
दुसरे म्हणजे आपण लहान समजत असलो तरी दोन्ही धाकट्या पण जबाबदारीने वागत आहेतच . त्या दोघीपण मावशी आत्या जेवढ्या उत्साहात झाल्या तिथे आता तुम्ही मामा-मामी , मोठी मावशी-काका व्हायचं आहे त्यासाठी पण तुम्ही उत्साहात असायला पाहिजे , ते क्षण एंजॉय करण्यासाठी आतुर असला पाहिजे त्यामुळे तुम्हीपण थोडस तणावमुक्त रहा .
      आता मुख्य म्हणजे तुमच्या सवडीने मिरजेत दोन आणि बार्शीत दोन गायनिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा . तोपर्यंत छानसा सायकॅट्रीस्ट शोधून ठेवा आणि *कपल थेरपी* घ्या . आजकाल शरीराच्या आजारापेक्षा मन सुदृढ ठेवणं ही काळाची गरज आहे . संघटनेच्या उपक्रमांतर्गत मी डॉक्टर मूलमुले , डॉक्टर आनंद नाडकर्णी , डॉक्टर सुखदा यांना प्रत्यक्षात बऱ्याचदा ऐकले आहे . मला खरतर यांना सुद्धा आनंदी राहण्यासाठी , तणावमुक्त राहण्यासाठी यांना आणि आकांक्षाला सायकॅट्रीस्टकडे जायचे आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनसंस्कृतीत ती गरज आहे . 
आणि हो मी तर गेल्या 25 वर्षांपासून अनेक प्रयोग करत राहिले आहे , ssy , हटयोग , ब्रम्हविद्या , योगा , माधवबाग , भाग्येश , सौरभ बोथरा याचबरोबर संघटना , पेटी , वाचन , लिखाण करत राहिले आणि फिट राहिले . तसे अनेक मार्ग शोधत राहायचं . प्रत्येकाच आपल्याला लागू पडेल तेवढंच मी लक्षात ठेवते , वापरत आणते मग खाणे असो की व्यायाम ! आणि आपल्या स्थावर इस्टेटीबरोबर ही विचारांची  संस्काराची शिदोरी तुम्हाला तुमच्या नातवंडांपर्यंत प्रयत्नपूर्वक पोहोचवायची आहे . मी जरा अती सांगते असे वाटू शकते , प्रत्यक्षात इतके समजून सांगता आले नसते म्हणून हे पत्रमार्फत पोहोचवत आहे .
    पहा सगळा विचार करा , तुम्ही सुज्ञ आहात , विचारी आहात मनावर ताबा मिळवा आणि स्वच्छंदी राहा  , आनंदी राहा , सुखी राहा !
All the best !!


गमंत जमंत

24/01/2020


नमस्कार मंडळी 
मी आकांक्षा  कुलकर्णी 
sorry sorry sorry sorry
थांबा हं 1 मिनिट 

( अंगावर शेला पांघरुन घेत )
नमस्कार मंडळी ,
आम्ही आकांक्षा कुलकर्णी ,
नवरदेवाच्या भगिनी आहोत आम्ही. उद्या आमच्या  दादासाहेबांचा विवाह आहे. त्यानिमीत्त इथे उपस्थित मंडळींच आम्ही  कुलकर्णी-देशपांडे  कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करतो. 
आमच्याघरी सध्या खुप आनंदी वातावरण आहे . दादासाहेब आणि वहिनीबाईसाहेब फक्त भेटीची संधी शोधत असतात . अगदी सुरुवातीला , नविन आसतांना त्यांना आमची खुप गरज पडली हो  . पण आता,  चुकवत आहेत हो दोघेही आम्हांला  , समजतं आम्हांला सारं. पण आम्हांला भारी मौज येते हो  हे सारं पहायला. आमच्या दादासाहेबांच कसं सगळंच आगळवेगळं असत . मग आम्ही पण नाही मागे हटत .पहा मग मजा सांगते आपल्याला  .
विवाह म्हणलं की आनंदाला कसं उधाण येत असतं . तसच काहीसं आमच्याही वाड्यावर चाललंय . चर्चांना , नियोजनांना आणि स्वप्न रंगवायला अगदी भरतं आलयं . आपणही चला जरा आमच्या वाड्यात  . ऐकुयात आमच्या मातोश्री आणि पिताजी यांच काय चाललंय ते. या  जरा तुम्हीपण डोकावायला.




25/01/2020


अनिल -  
 या !! सरिताबाई , जरा बसा निवांत . भलतीच धावपळ चालु आहे तुमची.

सरिता-  
हो. सगळं कसं ठरल्याप्रमाणे पार पडलं म्हणजे निवांत वाटेल हो आम्हांस . आशिषरावांच्या लग्नासाठी बार्शीगावाहुन व-हाडी मंडळी घेऊन प्रस्थान केलं आपण. ते मिरजगावला पोहोचेपर्यंत जिवास स्वस्थता नव्हती हो आमच्या . आधीच लांब पल्याचा प्रवास करुन थकवा आलेला अशी सगळी पाहुणे मंडळी , तर काही जेष्ठ मंडळी ,लहान मुलं कोणाला वाटेत त्रास होऊ नये याची खबरदारी घेत होतो आम्ही .

अनिल- 
हं ! पण काळजी नसावी . आपण निश्चिंत असावे. सारं कसं ,ठरल्याप्रमाणे होईल हो.

सरिता- 
इकडच्या स्वारींनी खबरदारी घेतलीय , हे जाणतो  हो आम्ही . तसं मिरजगावला पण व्याह्यांनी कशी चोख व्यवस्था ठेवलीय. पण उद्याचा विवाहसोहळा पार पडेपर्यंत ,  आम्हांस स्वस्थता नाही वाटणार हो .

अनिल- 
तेही खरच आहे म्हणा. स्वभावाला औषध नसते.

सरिता- 
काय म्हणालात ?

अनिल - 
काहीच नाही

सरिता- 
तिकडे आशिषराव आणि कीर्तीबाईंच्या उत्साहाला ,  उधाण आलय आगदी. त्यांचही बरोबरच आहे म्हणा. सततची मोहिम असते हो दोघांचीपण. तितकीच कामाची व्यस्तता . त्यात वेळ काढुन एकमेकांना भेटायचं ,  बोलायचं , एकमेकांना  बिना खलित्याचे कसलेशे मजकूर पाठवायचे,  या  सा-यासाठी सतत संधी शोधत असतात दोघेपण . आता होतील जरा निवांत  .

अनिल - 
हो नं . नवनविन लागलेल्या शोधांच्या माध्यमातून, अंगावर पडलेली जबाबदारी , अगदी चोखपणे पार पाडत आहेत हो दोघेही . सुनबाई कसलीशी यंत्रसामग्री हाताळतात.  तर चिरंजीव , काहीतरी हलत खोक समोर ठेऊन ,त्यात एकटेच वार करत बसलेले असतात.

सरिता-
 हो बाई ! मला भारी मौज वाटते त्याची. नविन शोधांच म्हणाल तर हेच पहा  न मौज म्हणून आपण काय केलं विवाहानंतर ? तर हौदात पाय सोडुन उडती कारंजे पहात बसलो होतो !  आता आशिषराव आणि कीर्तीबाई  , हे दोघेजण म्हणे कसल्याशा बग्गीत बसुन, उंच हवेतुन स्वच्छंदी विहार करणार म्हणे. भारी मौज वाटते बाई मला.

अनिल- 
सरिताबाई भानावर या . सुनबाईंना घेऊन चिरंजीव निघालेत. आपल्याला उद्याच्या सोहळ्याच , व-हाडी मंडळीच पहाव लागेल . मग करु , आपणही हवेत विहार.

सरिता - 
ईश्श ! काहीही हं. 

आनिल- 
चला पाहुणे मंडळींना बोलु जरा

आनिल-
नमस्कार मंडळी ! आजच्या व उद्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे इथे स्वागत आहे.सर्वांनी चहा न्याहरी व  भोजनाचा अस्वाद घ्यावा.

 
सरिता-
 या मेजवानी बरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याचाही आपण आस्वाद घ्यावा वआमचा आनंद द्वीगुणीत करावा ही विनंती .धन्यवाद !!


हळवा कोपरा




01/12/2019

आई काका तुम्ही फार घाई केलीत राव !! तुम्ही हवे होतात....


कालच्या रविवारी थाटामाटात लेकाच्या ( आशिष उर्फ मनिषच्या ) लग्नाचा मुहूर्त केला , सोडमुंज केली , नवग्रह शांती केली . सुरुवातीलाच गुरुजींनी जेव्हा सांगितलं की विडा देवासमोर ठेवा आणि देवाला, वडिलधा-यांना नमस्कार करुन या. देवापुढे नतमस्तक झाले काका-काकींच्या ( माझे सासु-सासरे ) पाया पडले आणि तुमची खुप आठवण आली . भावुक झाल्यासारखं झाल . पण पटकन तुमची दिलेली शिकवण आठवली . 
आनंदाच्या प्रसंगी  उत्साही रहायचं !!
कोणाचाही कसलाही प्रसंग असो त्यात हिरिरीने पुढं होण्याची तुमची पद्धत !! तो प्रसंग कोणावर आलाय हे तुम्ही कधी पाहिलंच नाहीत . वाड्यात कार्य असेल तर आपल्या घरात असणारी लगबग ! आई तु गेल्याशिवाय त्यांच्या घरी पातेलं स्टोव्हवर चढायचं नाही तेव्हा . तुझ्या सगळ्या जावा , सुना, पुतण्या सगळ्यांना तुझा केवढा आधार असायचा. पपा काकी म्हणजे सगळ्यातला हुकुमी एक्का ! तुम्हांला  फक्त नातीच नव्हती माहिती तर गोतावळा पण खुप होता. मग भांडी घासणा-या भागाबाईच्या घरी तिच्या लेकीचं भामाचं लग्न ! त्यात सुद्धा तु तिच्या घरी जाऊन चुलीवर लाडु करुन दिलेलेस . केवढा आनंद झालेला भागाबाईला ! असे एक न दोन अनेक घरी हेडमास्तरीण म्हणून तुला पाहिलं जायचं. आपली मोठी निळी पेटी आणि 6 घागरीचं पातेलं ज्याच्या घरी कार्य तिथं मुक्कामाला आसायचं , विशेष म्हणजे ते काका पोहोच करायचे . त्यांनी मागायची वाट न पहाता. आणि मग आहेराचं सगळं आपल्या पोटात ठेऊन ती पेटी लग्नघरी नख-यात मिरावायची. पातेल नाही तर मग 15 दिवस घरात  पाणी कशातही अगदी पांढऱ्या डब्यात भरुन ठेवलं जायचं .
आज घरात सगळं चकचकीत आहे पण नक्कीच तुमची लगबग आणि वावर याची उणीव भासते. ब-यापैकी सावळा रंग पण अतिशय रुबाबर व्यक्तिमत्त्व , कडक इस्त्रीचे नीळ घातलेले कपडे आणि नाकपुड्या फुगवत हसुन बोलण्याची लकब त्याला साजेस नऊवारीतली तुमची आर्धांगीनी ! गोरापान गोल चेहरा , छोटस नाक पण चेह-यावर समाधानाचं सात्विक तेज कुरळ्या केसांचा अंबाडा असा लक्ष्मी-नारायणाचा जोडा तस्साच डोळ्यासमोर दिसतोय. तुमच अस्तित्व जाणवतय ते आम्हा सगळ्या जणीत उतरलं आहे . अगदी नातवंडात सुद्धा !! पण लग्नघर म्हणून तुम्ही पाहिजे होता राव. फार घाई केलीत . 
तुमचं अस वागणं फक्त लग्नघरीच होतं असं नाही तर कोणाच्याही 
 घरात लेक किंवा सुन बाळांतीण झाली की पथ्य पाणी बाळाची काळजी सगळ्यांना तुझा सल्ला पाहिजे असायचा. कश्शावरही उपाय तुझ्याकडे तयार असायचा . काका तर तुला डॉक्टर पपा म्हणायचे.
तुमचा सहभाग फक्त आनंदातच असायचा असं नव्हतं . तोरणाघरी घरी आसणारी तत्परता मरणादारीपण तशीच असायची कोणीच नसलेली शेंबड्याची म्हातारी , धोंडीआप्पा, निलाबाई यांना आपला सोपा आणि सणादिवशीचं आईच्या हातचं जेवण विशेषतः कटाची आमटी हक्काची होती. शेंबड्याची म्हातारी गेली तिला कोणीच नव्हतं सगळे कुजबुज करायला लागले तर काकांनी पुढाकार घेतला मग वस्तीवरचे लोक धावत आले. आणि तिचा अंत्यविधी झाला. गावातही अशा घरी जाऊन पुढाकार काकाच घ्यायचे. लोकांच्या मनात काय आहे हे काका अचुक ओळखायचे आणि कृतीत उतरवायचे.

आपल्याकडे झाडुवाली शिवा होती. मुलगा नोकरीला लागल्यावर कोकणात गेली. 10/12 वर्षांनी दस-यादिवशी घरी आली आणि आईला म्हणाली तुमच्या हातची कटाची आमटी पोळी खायचीय. जाताना म्हणाली 
" लई दिस झालं हे खाव वाटत हुतं ". 
तृप्त होऊन गेली . शेवटीशेवटी निलाबाई भ्रमीष्ट झाली होती पण तिला भुक लागली की बरोबर घराकडे यायची ती दिसली की तिने न मागता आईनं तिला जेवायला वाढायचं तिने जेवण करुन निघुन जायचं तिच गोष्ट धोंडीआप्पाची असायची .ते  दिसले की काका काहीच न बोलता आईकडे  पहायचे मग आई जेवण चहा द्यायची.धोंडीबाला पंधरा दिवसांच्या एकादशीला चहासाठी पैसे द्यायचे,२५ पैशाला एक कप चहा होता तेव्हापासून सुरूवात केली होती . किर्लोस्करवाडीला रहायला येईपर्यंत तो नियम चालू होता.
एख मुकी होती पैसे पाहिजे असले की उगाचच मागच्या दारात येऊन गवत काढायची मग आईनी चहा न काकांनी तिला पेसै दिले की खुष होऊन हसत हातवारे करत निघुन जायची. लंगडा म्हसा होता त्याला पण चहा आणि तंबाखूला पैसे हवे असले की घरी यायचा.असं एक न दोन आनेकांना विश्वास आसायचा की कुठेच काही नाही मिळालं तर हे हक्काचं घर आहे.
कुणाचं लग्न जमायच चाललंय म्हणलं की काका आवर्जून हजर रहायचे बोलणी ताणायला लागली की काय पाहिजे ? चला मी देतो अस म्हणून बैठक पुर्णत्वाला न्यायची आणि सुपारी फोडूनच उठायचं. 
एवढ करुन शांत बसतील ते काका कसले. शेताकडच्या लोकांची  लग्न झाल्यावर अनेकाच्यात वाद व्हायचे माहेरीआलेली मुलगी स्वतः घेऊन तिच्या सासरी जायचे दोन्हीकडच्या मंडळीची कानउघडणी करुन नव-याचा कान पकडुन पोरीला सासरी सोडून यायचे. 
तुम्हाला सगळ्या मुलीच म्हणून समाजालाच चिंता पडलेली असायची . प्रसंगी सल्लेपण दिले लोकांनी ते तुम्ही मस्त धुडकावुन लावले . पण त्याची फिकीर तुम्हाला कधी वाटली नाही आणि आम्हा मुलींना पण कधी भासली नाही. आमचे सहा जावई म्हणजे सहा मुलांप्रमाणे आहेत आम्हांला हे ठरलेलं वाक्य होतं तुमचं .
अशा एक न दोन अनंत आठवणीनी मन भरुन येतेय पण आभिमान वाटतो की आम्हा सगळ्या मुलींना तुम्ही खुप सशक्त करुन या दुनियेत वावरायला शिकवलं  आहेत . आम्ही खुपखुप भाग्यवान आहोत.

सौ सरिता आनिल कुलकर्णी 
9421607248







15/12/2019

सुनिल भाऊजी तुम्ही दोघेपण नॉट रिचेबल लागताय.........



आशिषचं लग्न ठरलंय . लग्नाची तारीख  जसजशी जवळ येतेय तसतशी त्या अनुषंगाने येणा-या  कामाची पण रोज धामधुम चालु आहे. मागच्या रविवारी कुलदैवत , माहेरची देवी यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि काल परांडा दौरा झाला. आणि पुन्हा एकदा जखमेवरची ढलपी निघुन भळभळा रक्त वहावं तस मन आक्रंदायला लागलं .  आठवण केव्हा येते ?  विसरलं तर न ?  पण जर विसरच पडला नसेल तर आठवण  आली असं कसं म्हणाव ?  पण जेव्हा आठवणींचे कढ येतात नं  , तेव्हा मुकरुदन सुरु होतं. घुसमटायला होत. त्याला वाट करुन द्यावी लागते.  नाहीतर मनातल्या मनात संवाद चालतो आणि आठवणींचा गुंता वाढतच जातो. मी मनाची खुप समजुत घातली पण त्याची घालमेल , अस्वस्थता काही संपेना. काल त्याचा कडेलोट झाला. आणि म्हणून ठरवलं आठवणींना आज मनसोक्त बरसु द्याव . म्हणजे ढग बरसल्यावर आकाश कस निरभ्र होतं त्याप्रमाणे मन पण मोकळं होईल ,  हलकं होईल .

आलीकडे आम्ही परांड्याला सुट्टीदिवशी यायचो तर भाऊजी तुम्ही नसायचात . तुम्ही गेवराईला गेलात हे माहिती असायचं त्याच काहीच वाटायचं नाही . उलट सुट्टीदिवशी आपल्या चौघांच पण फोनवर बोलणं व्हायचं . मनात आल की उचलला फोन आणि झालं बोलणं असं व्हायचं.  पण काय करु भाऊजी तुम्ही दोघेपण आता नॉट रिचेबल लागताय......

माझं लग्न झाल्यादिवसापासून घरात मला अश्वस्त करणारी मायेची वागणूक जर कोणाकडून होती तर पहिलं नाव तुमचं येतं. राम-लक्ष्मणाची तुम्हां भावाभावाची जोडी आणि त्यात माझं येण ! सुरुवातीला 3/4 वर्षे खुप छान गेली. आशिषचा जन्म झाला तर आख्या परांड्यात तुम्ही पेढे वाटलेले . तुमच्याच सारखा शर्ट पाहिजे हा त्याचा हट्ट कित्येक वर्षे तुम्ही एकाच ताग्यातले दोघांना कपडे घेत पुरा केलात. खुप मजा यायची . पाडवा, दिवाळी, दसरा, लक्ष्म्या सगळे सण आपण एकत्र करायचो. दिवाळीत फटाक्याची मोठ्ठी पिशवी आणायची. बहीण आणि वहिनी दोघींना  एकसारख्या साड्या ही प्रथा तुम्ही शेवटपर्यंत ठेवली.  या सगळ्याचा परिणाम मला नेहमीच मोठया  कुटुंबात वावरायची सवय लागली. अजुनही सणादिवशीचा माझा स्वयंपाक दुप्पट तिप्पट होतो . 1992/93च्या दरम्यान बार्शी परांडा दोन्ही ठिकाणी घरांची बांधकामं , मनासारख्या नोक-या . सारं काही आलबेल होत. आनंदी कुटुंब होतं आपलं . समाजात पण तुमची  नेहमीच मदतीची भुमिका होती. अनेक स्नेही किंवा नातेवाईकांना अडचणीच्यावेळी तुमची आठवण यायची . फटकन बोलुन जाण्याचा तुमचा स्वभाव  रागीट पण तेवढाच  मायाळु मुख्य म्हणजे जिथल्या तिथे सोडुन द्यायचं असं होतं . सगळच काही गुडीगुडी होतं अस नव्हतं बरं !  तुमच्या भावाभावांचे   अनेकदा मतभेद व्हायचे आगदी पराकोटीचे ! पण त्याचा संबध माझ्याशी वागण्यात कध्धीच आला नाही . उलट माझ्याशी चर्चा व्हायची बरचसं माझं तुम्ही ऐकायचात.  ब-याचदा हे पण गंमतीनं म्हणायचे माझा भाऊ पण तु सांगितलेले पटतं त्याला सगळं माझं नाही . स्वभाव तसा मितभाषीच . न सांगता न बोलता अनेक गोष्टी धोरणानी करायच्या . देखावा तर आजिबातच नाही . न बोलता कृती करायची . असे सगळं व्यवस्थित चाललेलं .
पण नियतीला ते मान्य नव्हते सुखी कुटुंबाला काळी झालर लागली . तुमची काहीही चुक नसतांना तुमच्याच सहका-यापैकी काही विघ्नसंतुष्टी लोकांनी तुम्हांला जाळ्यात अडकवलं . आणि गुंता सुरु झाला. 1994  मध्ये  तुमच्या पाठी नोकरीमध्ये त्रास सुरु झाला . सगळे हादरुन गेलो ,  गारठुन गेलो . एकमेकांना धीर देऊ लागलो . खुप खच्चीकरण झालं तुमचं  . तुम्हांला आमच्याकडे मन मोकळ करावसं वाटायचं . तुम्ही ते करायचा . हे षडाष्टक  काही न काही कारणांनी एक नाही दोन नाही तब्बल 15  वर्षे विनाकारण  तुमच्या पाठी होत.प्रचंड पिळवणूक झाली . आणि तुमच्या बरोबर आख्ख कुटुंब त्यात भरडुन निघाल . त्यादरम्यान एकाला  टोचलं तर दुस-याला वेदना होत होती. वाघासारख्या माणसाची कोकरासारखी अवस्था झाली . राम-लक्ष्मण-सिता यांच्या पवित्र नात्याप्रमाणे आपल नातं होत . 
त्यादरम्यान इतर सगळ्या गोष्टी होत होत्या . आकांक्षाचा जन्म झाला . तिचं बालपण कोडकौतुक कश्शात कमतरता ठेवली नाही. तुमच्या बहिणीचं लग्न आणि आशिषची मुंज ही घरातली दोन मोठी कार्यं . या सगळ्यात तुमचा असलेला सहभाग म्हणण्यापेक्षा पुढाकारच म्हणावा लागेल. तुमच्या चिंतेचा कुटुंबावर परिणाम होऊ नये असा तुमचा प्रयत्न असायचा . सण असो की कार्य असो ते उत्साहाने करण्यात तुमचं पाऊल पुढे असायचं . आशिष आकांक्षाच सगळं  व्यवस्थितच झालं  पाहिजे हा अट्टाहास असायचा तुमचा . प्रचंड जीव पोरांच्यावर . सणाला किंवा  कार्यात तुमच्या दोघा भावांची कामं ठरलेली असायची . एकमेकांच्या कामात तुम्ही दखल द्यायचा नाहीत . दोघेपण बिनबोभाटआपापल्या  जबाबदाऱ्या पार पाडायचात . तीच गोष्ट शेताची झाली . कधी फिरकलोच नाही आम्ही . तुम्हीच सगळे निर्णय घ्यायचात . आलिखित नियमानुसार कामं व्हायची. हे नेहमी म्हणायचे 
" शेतात रमतो तो. करुदे त्याला काय करायचं ते . माणसाला कुठेतरी विसाव्याची गरज असते ". बरीच वर्षे तेचतेच रुटीन राहिलं . आम्ही बार्शीला तुम्ही परांड्यात .पण म्हणतात न 
" घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी " 
अगदी याप्रमाणे यांच वागणं असायचं . ब-याचदा मला राग पण यायचा . पण माझा नाईलाज आहे  जे आहे ते आहे असं समज म्हणायचे हे . अशी इतकी ईन्व्हॉलमेंट होती . मग सांगा आता हे दुःख पचवायला आम्हांला किती कष्ट पडले असतील . मला वाटलं तर मी ढसढसा रडुन मोकळी होते . यांच असं होत नाही . आयुष्यभर एक दुखरी नस असणार आहे. मुलांचे पण आसच आहे . तुमच्या विषयी घडघड नाही बोलत ती . असो काळ हेच त्याच्यावरचं औषध आहे . नविन माणसांच येणं आणि वातावरणातील बदल ही परिस्थिती बदलु शकतो . तुमची रुतलेली गाडी रुळावर यायला खुपच कालावधी लागला . त्यात अत्यंत मंद गतीने सकारात्मक बदल होत गेले . 2009 साल उजाडलं सगळं स्थिरावायला . निष्कलंक सिद्ध झालात तुम्ही पण त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली . आयुष्यातील ऐन उमेदीचा मोठ्ठा काळ निघुन गेला . पुन्हा अचानकपणे  2010 मध्ये  झांझावाताप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुखदाचं येणं!!  ( प्रतिभा आडसकर जी सुखाच्या सरी घेऊन आली म्हणून सुखदा )  आहाहा !!  काय स्वप्नवत घटना घडत गेल्या . हे सगळच कित्ती वेगळं घडलं . एक आपत्ती येणं . तीच निराकरण होणं पुन्हा आयुष्य सुखावह होणं . खुप समाधान वाटलं .अतिशय उत्साही जोडीदारीण मिळाली तुम्हाला ! काय काय मनोरे रचले आपण .भराभर चुटकीसरशी दिवस संपले हो ते . लग्नाचा 25 वा वाढदिवस करायला खुप उशिर होतोय म्हणून 5 वा वाढदिवस मोठा केला आपण . 20-20 मॉचच म्हणावी आशी फक्त सहा वर्षे तुमच्या  आयुष्यात आनंदाची उधळण काय व्हावी आणि सगळ्यांना चटका लाऊन सुखदानं जगाचा कायमचा निरोप काय घ्यावा . कुण्णाचाही विश्वास बसणार नाही अशी ही दुर्दैवी  घटना . किती लढायचं ? किती लढायचं ? थकलात तुम्ही आणि आम्ही पण ! सगळं निरर्थक आहे मिथ्या आहे असच ठरवुन की काय धावत तिच्यामागोमाग पाचच महिन्यात लांबलांब ढांगा टाकत डोंगराच्या पल्याड निघुन  गेलात तुम्ही !! खुप उलटसुलट घडलं हे . दोघेपण आल्पायुषी ! एकतर एकमेकांना  लवकर भेटला नाहीत . भेटलात तर फक्त एकमेकांसाठीच जन्मलो अशा थाटात गेलात निघुन ! एखाद्या चित्रपटात पहाव्या अशा या विचित्र घटना घडून गेल्या . काय म्हणायचं याला . एखाद्याच्याच आयुष्यात इतक्या घटना कशा घडु शकतात ? तुम्ही एकटेच तुमचे मालक असल्यासारखं तुम्ही गुपचूप पळ काढलात . पण मागे रहाणारांनी कस सावरायचं हा विचारच केला नाही तुम्ही दोघांनी पण ! दोघांनाही वयस्कर आई  तुम्हांला वाडिल  ! त्यांच काय ? वयोमानाप्रमाणे आघात सोसण्याची ताकदच  नव्हती त्यांच्यात . विचारक्षमताच गोठुन गेली त्यांची . आणि तुमची दोघांची पण भावंड !  त्यांच काय ?  जानेवारी 2017 ते जुन 2018 !  दीड वर्षाचा भयानक कालखंड होता तो आमच्या सर्वांसाठी. घरात हलती चित्रं वावरतात की काय असं वाटायचं .भळभळत्या जखमा उराशी कवटाळुन आला दिवस सरत होता . एकांतात नजर लावुन बसले आसतांना " माणूस एकदा गेला की परत येऊच शकत नाही का ग ?" अस अत्यंत भावनिकपणे , अगतीकपणे बेचैन होऊन ह्यांनी विचारलेला प्रश्न आज जरी आठवला तरी अंगावर काटा येतो माझ्या . कोणत्या जन्मीचा दावा साधला परमेश्वरांने असं वाटतं .  पण.....पण जन्माला येताना जेवढे श्वास घेऊन माणूस येतो त्यापेक्षा एकही श्वास त्याला मिळत नाही हे तितकच खरं आहे . कितीही मी मी म्हटलं तर विधात्याने काही गोष्टी स्वतःच्याच हातात ठेवाल्यात हे खरं !! असो 
जे जे वाटलं ते ते उतरुन काढलं आहे . मोकळं झाल्यासारखं ,निरभ्र झाल्यासारखं वाटतय . मन थोडसं शांत झाल्यासारखं  वाटतंय . तुमच्या दोघांचाही रोल आता आम्हालाच करावा लागणार आहे . त्यात कमतरता झालेली तुम्हाला अजिबात चालणार नाही हे माहित आहे मला . कोणत्या न कोणत्या रुपात तुमचे अशिर्वाद असणारच आहेत त्यात वादच नाही . पण पोकळी मात्र  नक्कीच जाणवते . एक निग्रह केला आहे मी  मुलांच सगळं आपण सगळेजण जसं चित्र रंगवत होतो जसं अपेक्षित होत तसच आनंदाने  करणार त्यात कोणतीच कमतरता ठेवणार नाही हे नक्की  !! 


ओम शांती शांती शांती !!!


सौ सरिता आनिल कुलकर्णी 
9421607248




20/09/2021

दिवा मालवला !




रविवार 12 सप्टेंबर 2021 भाद्रपद शुक्ल षष्ठी सकाळचे पावणेआठ वाजलेले आणि यांनी जोरजोरात "काकी , ए काकी " असा हाका मारण्याचा सपाटा लावला . मी घाबरुन पळत गेले , जाऊन पाहिलं तर काकी म्हणजे सासूबाई डोळे बंद व तोंड उघडं ठेऊन शांत झोपल्यासारख्या दिसत होत्या . त्यांच्या  नाडीचे ठोके लागेनात , श्वास जाणवेना , शरीर थंडगार पडलेलं पण दंड थोडेसे उबदार वाटले म्हणून थोड्या आशा पल्लवीत झाल्या . पण एकूणच आंदाज आला होता . मी मुलांना जोरजोरात हाका मारल्या एकूणच परिस्थिती पाहून सगळे भांबावून गेले . आशिषने धावत जाऊन अँब्युलन्स आणली व दवाखान्यात घेऊन गेला मागोमाग आकांक्षा-कीर्ती गाडीवर गेल्या . नेहमीप्रमाणे पुरंदरे हजर झाले तेही बरोबर गेले . हे घरासमोरच अस्वस्थपणे  येरझाऱ्या घालू लागले .
आजच्या दिवशी यांच्या आजीची तिथी असते म्हणून गुरुजींना आठ वाजता घरी बोलावलं होतं . ते येण्यापुर्वी सगळं आवरायचं म्हणून काका-काकी आणि हे लवकरच उठले होते दोन दिवसांपासून काकींना पित्ताचा त्रास होत होता . हल्ली दोनतीन महिन्यांनी तसा त्रास त्यांना नेहमीच होत असे अशावेळी ओआरएस , शहाळं , ज्यूस यावर एकदोन दिवस त्या रहायच्या मग त्यांची गाडी रुळावर येत असे तेव्हा त्या चहा अजिबात घेत नसत . पहाटेच आपलं आपलं ऊठून तोंड धूऊन प्रातर्वीधी आटोपून त्या बसल्या होत्या हे पूजेला जाण्यापुर्वी त्यांनी एकदा डोकावलं तर त्या ऊठून पुन्हा बाथरुमला गेल्या व जाऊन नेहमीप्रमाणे लोडवर कपाळ टेकवून पडून राहिल्या . इकडे अर्धा तास यांची पूजा चालू तेवढा वेळ आम्ही तिकडे फिरकलो नाही . काका त्यांच्या अगदी जवळ खुर्चीवर बसलेले होते पूजा झाल्यावर चहा घेणार का म्हणून विचारण्यासाठी हे त्यांच्याजवळ गेले व विचारु लागले पण त्यांच्या कडून काहीच प्रतीसाद मिळेना . मग यांनी त्यांना हलवले तर त्या शांतच होत्या समईतील तेल संपून वात कोरडी होऊन दिवा मालवतो त्याप्रमाणे घरात पूजेचा मंत्रघोष चालू असतांना कोणालाही थांगपत्ता न लागता , शांतपणे त्यांची प्राणज्योत मालवलेली होती . मला ते समजलेले होते पण थोडी आशापण होती  म्हणून आम्ही मुलांच्या फोनची वाट पहात होतो  तोवर दारात गुरुजी हजर ! घडला प्रसंग त्यांना सांगितला . तोवर आकांक्षाचा फोन आला की ईसीजी काढला काहीच उपयोग नाही असे डाॕक्टरांनी सांगितलेय व लगेचच घरी न्यायला सांगितले आहे आम्ही दहा मिनीटात येतो . 
गुरुजी आंगणातच होते घडला प्रकार त्यांना सांगितला तर त्यांनी सांगितले की लगेचच कोणाकडूनही हळदकुंकू , अक्षदा वाहून गणपती विसर्जन करुन घ्या . लक्ष्म्याच्या सणाची बाकी तयारी झाली होती पण गौरी अजून आणलेल्या नव्हत्या त्यामुळे बाकी सगळ पटापट आवरुन घेतलं तोवर अँब्युलन्स दारात हजर ! दवाखान्यात काकींना नेले असे आम्ही समजत होतो पण येतांना मात्र काकींची बाॕडी हाॕलमध्ये आणून ठेवली गेली !!!
तशी तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्ब्येत तोळामासाच होती फेब्रुवारीपासून तर त्या बेडवरच होत्या फक्त खाणपीणं , आंघोळ , संडास-बाथरुम एवढ्यासाठी उठायच्या . त्यामुळे हे सहासात महिने म्हणजे बोनसच होता . बऱ्या असल्या की दोनदोन तास त्या बाहेर कट्ट्यावर बसायच्या पण थोडी जरी तब्ब्येत बिघडली तर पंधरा पंधरा दिवस झोपून रहायच्या . बहुतेकवेळा त्यांना पित्ताचाच त्रास होत असे पण त्यांची विश्रांती झाली की पुन्हा तरतरीत असायच्या . त्यामुळे याहीवेळी करुदे दोन दिवस आराम वाटेल बरे अशा समजूतीत मी होते . कारण या आठवड्यात पोळ्याला पुरणपोळीचं तर गणेशचतुर्थीला उकडीच्या मोदकाचं अगदी व्यवस्थित जेवण त्यांनी केलं होतं . मला बरं नव्हते चिकन गुनिया झालेला त्यामुळे आकांक्षा-कीर्ती लक्ष्म्याची तयारी करत होत्या तर शनिवारी काकी त्यांच्याशी गप्पा मारत बघत बसल्या होत्या . 
          बत्तीस वर्षापूर्वी या घराशी माझे ऋणानुबंध जोडले गेले . काकी म्हणजे बुटक्या फक्त  साडेचार फूट उंची आणि उंचीला साजेशी एकदम सडसडीत शरीरयष्टी गोरा रंग चेहऱ्यावरुन त्या शांत वाटायच्या फारसं बोलणं नाही त्यामुळे मला त्यांच्या स्वभावाचा अंदाज येत नव्हता . स्वच्छता टापटीप आणि सगळी कामं न थकता दिवसभर करत रहायचा त्यांना अजिबात कंटाळा येत नसे  . त्या महिनोनमहिने घराच्या बाहेर पडत नसत . घरकाम , देवधर्म , व्रतवैकल्यं यातच त्या गुरफटलेल्या असत . बोलणं पण फारसं नसायचं त्यामुळे मनात काय चालू याचा थांगपत्ता लागत नसे पण जसजसा सहवास घडू लागला तसतसा अंदाज येऊ लागला . दोन्ही घरची संस्कृती पुर्णपणे वेगळी आहे हे माझ्या लक्षात येत होत . सासरी पुर्ण मराठवाडी पगडा होता सोवळंओवळं कडक होतं . उपवास , व्रतवैकल्य आणि नेमधर्म याला खूप 8महत्त्व होतं . मुलगा-मुलगी फरक केला जायचा . प्रत्येक सणाला सोवळ्यात स्वयंपाक , जेवायला सवाष्ण-ब्राह्यण हे सगळं नित्यनेमानं करायचच . त्यांनी मला 
" तू हे केलच पाहिजेस "
असं कधीच सांगितले नाही पण मी करावे ही मनोमन अपेक्षा मात्र असायची आणि मी करायला लागले की त्या पुढचं पुढचं सांगत रहायच्या . न बोलता त्यांचा धाक आणि अंकूश शेवटपर्यंत होता . जबरदस्ती न करता स्वतःचा आब राखत त्यांनी माझ्याकडून शेवटपर्यंत हडसून खडसून सगळं व्यवस्थित करुन घेतलं . एकूणच कर्मठपणा ठासून भरलेला होता . त्यांची तब्ब्येत एवढी कमी होती तरी त्यांच बीपी हाय असायचं . सुरुवातीला नेने डाॕक्टरसुद्धा म्हणाले होते
" तब्ब्येत अशी आणि बीपी इतका कसा ? "
काकींच माहेर परांडा त्यांना लागून सलग यांच्या दोन मावशांची घरं होती व तिसरं घर आमचं होतं . माहेरच्या वाड्याला ओसरी म्हणून ओळखलं जायचं तिथे यांचे चार मामा रहात असत . त्यांना एकूणच माहेर , भाऊ भावजया , बहिणी भाचे कंपनी , आण्णा याविषयी खूप प्रेम होते . ओसरी हा विषय त्यांना गप्पांसाठी जिव्हाळ्याचा होता . माहेरच्या विषयावर त्या भरभरून तासंतास बोलायच्या . इतकं वय झालं तरी भाऊबीज आणि राखीपौर्णीमेला त्या अस्वस्थपणे भावांच्या वाटेकडे डोळे लाऊन असायच्या . मला या गोष्टीच खूप आश्चर्य वाटत असायचं पण त्यादिवशी त्या भावांविषयी बोलतांना जणू छोट्या पोरांविषयी बोलतो असे 
" बंडू , निशीकांत, शाम , अविनाश " 
अशी आलटून पालटून नावे घेत असत . छकी-मुन्नी जोडीनं नाव घ्यायचं . तर बहिणी व त्यांच्या मुलांना लहानपणी किती जीव लावला हे नेहमी तेवढ्याच रंजकतेने सांगायच्या . त्यांच स्वतःच्या लेकीवर पण अतोनात प्रेम होतं . 
काकी हट्टी होत्या , स्वमग्न होत्या . जुनं काही बदलायची त्यांची अजिबात तयारी नसे पुढेपुढे त्याचा मला खूप त्रास झाला . बार्शीपासून परांडा जवळ असल्याने व मी मोठी सून असल्याने प्रत्येक सणाला आलच पाहिजे हा आलिखीत नियम होता . काकींचे उपवास तर वारेमाप होते भाऊजी तर चिडून म्हणायचे
" आठवड्यातून नऊ दिवस हिचे उपवास आसतात "
सोमवार , गुरुवार , शनिवार , पंधरा दिवसाच्या एकादशा , कायमस्ववरुपी मिठाच्या चतुर्थ्या , चतुर्दशी ,पौषातील रविवारच व्रत , शुक्रवारच व्रत , चातुर्मास , श्रावणी , वर्षातून तीन नवरात्र आणि उरल सुरल कोणी काही नविन सांगितले की आहेच असे एक ना दोन उपासांची रेलचेल !!! मी मात्र एकूण प्रकार पाहता सोवळे आणि उपवास यात अडकले नाही ते मोडीत काढायला मला उशीर झाला आणि त्रास पण झाला पण संघटनेत काम करताना एकूणच बरच वाचन आणि अभ्यास व्हायचा मग विचार करत मी माझ्या वागण्याची दिशा बदलत गेले . दोन गोष्टी मी स्वतंत्र ठेवल्या एक नातेसंबंध दुसरी रीतिरिवाज आणि रुढीपरंपरा कारण माझ्या मते पहिल्या गोष्टीबाबत आपण तडजोड करु नये त्यामुळे घरातील वातावरण तंग होऊ शकते . मतभिन्नता असेल तर तो भाग वेगळा मला ही गोष्ट पटत नाही मी ती करणार नाही संपले त्याचा आपल्या नात्यावर परिमाण होऊ द्यायचा नाही . मी स्पष्टपणे बोलत असे त्यामुळे त्यावर काकी फारसे बोलत नसत पण त्यांना ते पटत असे त्या म्हणायच्या 
" तू बरोबर बोलतेस पण आम्हाला असा विचार करायचं सुचले नाही आणि आता इतकी वर्षे असे केले ते अंगवळणी पडलय नाही केलं तर चुकल्यासारखं वाटतं पण तुला कसे करायचे तसे कर माझा आग्रह नाही ".
  शेवटशेवट या उपवासांचा त्यांना त्रास झालाच या दोनतीन वर्षीत त्यांचे सगळे उपवास मी बंद केले होते . पण पीत्त डोकं वर काढायचच गंमत म्हणजे या चारपाच वर्षात वडे , सामोसे , पापडी यासारखे बाहेरचे पदार्थ त्यांनी भरपूर खाल्ले आणि उपवास बंद केले तसे नाष्टा जेवण अगदी व्यवस्थित करायच्या .
तसं आमचं लग्न वेळेत झालं आणि पुढच्या दोन्ही लग्नाचं घोडं आडलं आणि घरात ताण निर्माण होऊ लागला आणि त्यामुळे उपवास , नवसं यात काकींनी स्वतःला पुर्णपणे गुंतवून ठेवलं होत . नातेवाईक पाहूणे यांच्यापासून अलिप्त रहाणं त्या पसंत करायच्या . त्यांना समाजाच्या नातेवाईकांच्या नजरा बोचत असत . त्या स्वतःला क्लेश करुन घेत असत . आपण आणि आपली मुलं यापलीकडे त्यांनी पहाणं बंदच केलं . सगळेच एकमेकांवर इतकं प्रेम करायचे की कधीकधी ते सगळेच त्यात घुसमटून जायचे .  त्यामुळे आयुष्यातील मौज काही त्यांना स्वतःला लुटता आली नाही पर्यायांने घरातील वातावरणात पण हलकेपणा नव्हता . त्या फारसं आमच्यात रमल्याच नाहीत . त्या स्वतःमध्येच पुर्णपणे गुरफटून गेलेल्या होत्या . माझी नोकरी , लहान मुलं , आमचा वाढता संसार याबरोबरीने परांड्यातील जबाबदाऱ्या पेलतांना आमची खूप कसरत व्हायची दमछाक व्हायची . बार्शीत मोठ्ठ घर होतं तरी प्रत्येक सण परांड्यात झाला पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असायचा .  
आशिषचा जन्म झाला ,  पहिला मुलगा झाला म्हणून त्यांना हुश्श्य झालं होतं कारण मला सगळ्या बहिणी आहेत असे त्यांना वाटत असे . नातवावर मात्र त्यांच जिवापाड प्रेम होतं अभिमान पण खूप असायचा . दुसरी आकांक्षा तिच्यावर पण खूप जीव पण थोडंस उन्नीस-बीस होतंच ते मात्र मला खटकत असे .  पुढेपुढे माझा व्याप वाढत गेला यांची बदली झाली आणि आम्हांला परांड्याला जायला जमेना . मग त्यांच्या मनाविरुद्ध फक्त दिवाळीला ते बार्शीत येऊ लागले . भाऊजींच लग्न झाल्यावर मात्र मला जायला जमेचना . परांड्यात सगळ्या कामासाठी बाई ठेवली . मग कधीमधी ते बार्शीत येऊन राहू लागले तोवर आमची मुले बार्शीच्या बाहेर गेली होती . इतक्या वर्षात सासू-सून म्हणून एकदाही आमचे भांडण झाले नाही .
2017 मध्ये आधी सुखदा नंतर  भाऊजी गेले आणि आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला काका-काकींना तर सगळच उलटसुलट पहायची पाळी आली . त्यांना चैन पडत नसे . या पाच वार्षात कधी बार्शी कधी परांडा असे ते राहू लागले . घरात हलती चित्रं असल्यासारखा त्यांचा वावर असायचा . गेल्या दोन वर्षात मात्र परांड्यात त्यांना एकटं सोडणं आम्हांला धोकादायक वाटायचं पण त्यांना बार्शीत चैन पडायची नाही . परांड्यातील घरात त्या रमत असत . मग एकदोन महिने सोडायचं परत आणायचं असे करु लागलो . पण ते कुठेही असले तरी यांना चैनच नसायची सातत्याने बरोबरीने भाऊजी असायची सवय होती मोठा आधार होता त्यांचा ती सगळी जबाबदारी एकट्यावर पडली त्यांचा एकखांबी तंबू झाला . काका-काकींची तब्ब्येत थोडी जरी बिघडली तरी ते अस्वस्थ असायचे . या चारपाच वर्षात अस्वस्थता होती तब्ब्येत फार काही वाईट नव्हती पण सतत काहीतरी कुरबूर असायची या दोन वर्षात तर बार्शी व परांडा याच्या बाहेर हे गेले नाहीत .  पण शेवटपर्यंत  मात्र काकी स्वतः एका स्वाभिमानी तपस्वीनीचे जिवन जगल्या व पूजेचा मंत्रघोष चालू असतांना हसत्या खेळत्या घरातून , नातवंडे सुनांच्या गराड्यातून सौभाग्याचं लेणं मिरवत अचानकपणे सगळ्यांना चटका लावत लुप्त झाल्या !!!


सौ सरिता आनिल कुलकर्णी 
9421607248


14/02/2022

अध्याय समाप्त ......


       काकीना म्हणजे सासूबाईंना जाऊन जेमतेम पाच महिने व्हायचे आहेत तोपर्यंत शर्यत लावल्याप्रमाणे काका म्हणजे माझ्या सासऱ्यानी धावत जाऊन फंजा पोहोचवला . कारण हल्ली त्यांचं सगळ जोडीने असायचं . घरात समोरासमोर दोन बेडवर दोघे बसायचे , एखादी पौराणिक सिरियल असेल तर हॉलमधे टीव्हीसमोर दोन छोटी मुलं येऊन बसतात तस बसायचे आणि सिरियल संपली की त्याच्यावर चर्चा करायचे  . अंगणात जोडीने दोन खुर्च्या , कट्ट्यावर बसले तरी जोडीने , जेवण , नाष्टा , चहा आधी एकमेकाकडे घेतल का हे पाहायचं , घेतल्याची खात्री झाली की मग स्वतः घ्यायचं मी गमतीने  म्हणायची 
" देणार नाही त्यांना "
 की लगेच सावरून बसत म्हणायचे 
" तसे नाही ग त्यांनी घेतल का पहिलं "
एकमेकांसाठी जगायचं असा त्यांचा दिनक्रम असे . दिसणे किंवा ऐकायला येणे हे दोघांनाही वयोमानाप्रमाणे खूप कमी झाले होते पण ते तासनतास गप्पा मारायचे आणि एकमेकात गुंतून जायचे , रमायचे . मला त्यांच्या गप्पा ऐकायला यायच्या एकाने काही बोलले तर त्यावर दुसरा जे बोलेल त्या दोन वाक्याचा काहीही संबंध असेलच असे नसे . कधीकधी ते ऐकून मला हसायला यायचे पण त्या गप्पा म्हणजे त्यांच्यासाठी विरंगुळा असायचां . काका थोडफार फिरत असत त्यामुळे ते थोडेसे जरी नजरेआड गेले तर काकी अस्वस्थ व्हायच्या . हाका मारत रहायच्या मग सतत काकीसमोर असण्याची काकांना सवय झाली होती . त्यामुळे काकी गेल्या तसे काका आतून तुटल्यासारखे वाटत होते . सुरुवातीचे आठदहा दिवस तर त्यांना राहून राहून हुंदके यायचे . घरात मुलगा , मुलगी , सून नातवंडे असा सगळा परिवार असूनसुध्दा ते शून्यात  हरवल्यासारखे वाटत होते . काकी गेल्यावर चौदा दिवस आशिषने त्यांना गीतासार ऐकवलं . तसे थोडे सावरले होते त्यांनी स्वतः ला खूप छान समजावलं होत . ते म्हणायचे 
" कोणीतरी एकजण आधी जाणारच की निसर्गनियम आहे तो " . 
गप्पांच्या ओघात खूप जुन्या जुन्या आठवणी ते सांगत बसायचे . फिल्म रिवाईंड व्हावी तशा काही काही आठवणी त्यांना लख्ख आठवत असत . काकी गेल्यावर हे खूप आजारी पडल्यामुळे यांना दवाखान्यात ठेवावं लागलं मग काकांच्या जवळ काळजी घेणारं कोणीतरी असायला हवं म्हणून यांनी बहिणीला बोलवून घेतलं त्यामुळे काकी गेल्यापासून दिवाळी होईपर्यंत त्या बार्शीत राहिल्या पुन्हा दवाखान्यासाठी आमचे पुण्याला हेलपाटे होणार काकांना सारखी दगदग नको शिवाय बार्शीत कसं व्हायचं म्हणत त्यांना पुण्यातच ठेवलं जानेवारीमध्ये आणायचं ठरल तर आजुन एक महिना राहतो इथे प्रतिभाकडे , मलापण जास्त होत नाही , माणूस लागतेय असे ते म्हणाले म्हणून त्यांना तिथे ठेऊन आम्ही बार्शीत आलो पुन्हा थंडी जास्त पडू लागली तसा त्यांना दम लागू लागला तसा त्यांना नेहमीच तो त्रास व्हायचा मग 11 फेब्रुवारीला त्यांना बार्शीत आणायचे ठरले पण सगळ्याच गोष्टी आपण ठरवू तशा होत नसतात . जे विधिलिखित असते तेच घडते म्हणतात त्याप्रमाणे बार्शीत यायच्या आधीच पाच फेब्रुवारीला काका नेहमीप्रमाणे दुपारी जेवले  सायंकाळी पावणेसहाला मला आता चहा कॉफी नको म्हणत लेकीला पाणी गरम करून मागितलं ते त्यांनी आपल्या हातांनी अगदी नेहमीसारखं पिल आणि आता थोडंसं झोपतो म्हणत ते आडवे झाले . पाच दहा मिनिटात त्या काकांना सहज बोलू लागल्या तर काकाकडून काहीच प्रतिसाद मिळेना म्हणून त्या काका जवळ गेल्या त्यांना काही हालचाल जाणवेना म्हणून त्यांनी काकांना हलवल तर काका शांत झोपले होते ते कायमचेच ! काकांची प्राणज्योत मालवली होती . त्या मोठमोठ्या आवाजात काकांना हाका मारू लागल्या पण सगळ शांत झालं होत सहा वाजता घबऱ्याघुबऱ्या आवाजात त्यांनी मला फोन केला
" वहिनी , काय झालंय ओ काकाना काका निपचित झोपले बघा , काय करू आता मी , आप्पाला काय सांगायचं मला काही समजत नाही " 
तो आक्रोश ऐकून मलाही काही सुचेना 250 किलोमीटर लांब मी काय करू उडून जाऊ का पळून काही समजेना . हे बाहेर चक्कर मारायला गेलेले . तिकडे रडका आवाज ऐकून त्यांचे शेजारी सगळे जमा झाले सुधीरना बोलवून घेतलं डॉक्टरना बोलवून आणल आणि डॉक्टरनी घोषित केलं .पुन्हा मला फोन आला सगळ संपल म्हणून मग मी ज्योतीला फोन केला पुण्यातून आणावं लागेल काय करावं ते पहा . नंतर मुकुंद पण गेले तोवर इकडे हे घरी आले त्यांना कसं सांगावं हा माझ्यापुढे यक्षप्रश्न होता . हळूहळू त्यांना सगळ सांगितलं आणि त्यांना सावरता सावरता माझी पुरेवाट झाली तिकडे शेजाऱ्यांनी खूप मदत केली . सगळ मॅनेज करून पहाटे साडेतीन वाजता ऍंबुलन्स मधून काकांना घेवून त्या बार्शीत आल्या . काकांना शेवटच्या क्षणापर्यंत लेकीचा सहवास मात्र लाभला होता . लेकीला त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले . मातृऋण पितृऋण असेचं काहीसे असणार . कारण काका काकी बार्शी आणि परंडा सोडून कुठेही राहत नसत त्यांना लेकीची आठवण झाली तर त्यांनाच बोलावून घेत मग त्या पण महिना महिना राहत असत . यांच्या आजारपणाच्या निमित्ताने तब्बल आठरा वर्षांनी काका पुण्यात लेकिकडे गेले आणि तिथेच त्यांचा शेवट झाला , हे यांच्या मनाला खूप लागले होते पण जे विधिलिखित असते ते घडते . 
पण काका-काकी दोघांनीपण अगदी ठरवल्याप्रमाणे शांतपणे एक्झीट घेतली असे म्हणावे लागेल शेवटपर्यंत पूर्णपणे शुध्दीवर , चालत बोलत चुटकीसरशी देह सोडून अनंतात विलीन व्हावे याला काय म्हणावं . एखाद पान पक्व झालं तरी देठाला पक्के असावे , तसच झाडावर सुकाव आणि अचानकपणे वाऱ्याच्या झुळूकेच निमित्त व्हावं आणि टपकन झाडावरून गळून पडाव असा दोघांचाही शेवट चुटकीसरशी व्हावा , कोणतेही क्लेश न होता नैसर्गिकरीत्या अनंतात विलीन व्हावे यासारखे भाग्य ते कोणते? काकांचे पण 92 वर्षे वय चालू होते तर काकी 86 वर्षाच्या होत्या .
काका म्हणजे अजातशत्रू माणूस . लहान मुलालासुद्धा आदराने बोलणार , अत्यंत कनवाळू , बुजरा स्वभाव ,  त्यांनी कोणालाही शब्द उचलून बोललेले मी पूर्ण आयुष्यात पाहिले नाही . त्यांची दहशत कधीच वाटली नाही . जेवणात सुद्धा त्यांची कधीही तक्रार नसे . काहीही खायला दिले की तोंडभर कौतुक करत असत . त्यांना चहा प्यायची मात्र खूप सवय होती . घरकामात ते सगळी मदत करायचे . चहा तर बरेचदा तेच करायचे . हल्ली परांड्यात काकाकाकी दोघे राहिले तर काकीना काहीच काम होत नसे तर सगळ काम काका करायचे . त्यांचे बोलणे खूप शुद्ध होते . काका खूप हुशार होते  1952 साली ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकायला होते . त्यांचे इंग्लिश खूप छान होते नातवंडे आली की ते आवर्जून इंग्लिशमध्ये बोलायचे आशिषचे लग्न झाल्यावर त्याने कीर्तीला याबाबत सांगितले तर  तिच्याशी पण ते इंग्लिश बोलू लागले तिला त्यांचे खूप कौतुक वाटले .
यांच्यावर , नातवांडवर त्यांचे जीवापाड प्रेम होते . आम्ही परांड्याला जात असू तेव्हा ते हॉलमधे किंवा ओट्यावर आमची वाट पहात बसत असत . त्यांना अस्थम्याचा त्रास होता दरवर्षी थंडीत त्याचा जोर होत असे आठदहा दिवसांचा दवाखाना केला की ओके होत असत . पुन्हा फक्त पंप ओढणे याशिवाय त्यांना कोणती गोळी नव्हती . त्यांना जवळजवळ वीस वर्षापूर्वी असाच कफचा खूप त्रास झाला होता तेव्हा त्यांना ICU मध्ये ठेवावे लागले होते नंतर त्यांना मी प्राणायाम , कपालभाती आणि काही योगासने समोर बसून शिकवली होती तर तेव्हापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही नित्यनियमाने पहाटे त्यांचा व्यायाम झालेला असे . या पाच वर्षात म्हणजे भाऊजी गेल्यानंतर मात्र काकाकाकी दोघांनीही हाय खाल्ली होती त्यातच वार्धक्य त्यामुळे त्यांना एकटे ठेवणे आवघड होत होते पण काकीना परांड्यात रहाणे आवडत होते तेही तसे परांड्यात रमायचे शेवटी कर्मभूमी होती ती त्यांची ! पण तिथे राहिलं की काकांना कामाचं ताण पडायचा त्यामुळे त्यांचा ओढा बार्शीत असायचा , पण एकूणच अस्वस्थता होती . 
काका पेशाने ग्रामसेवक होते त्यामुळे त्यांची खेडोपाडी नोकरी होती त्यावेळच्या काळात वाहनांची सोय नसे त्यामुळे बहुतांश नोकरी ही सायकलवर झाली त्यामुळे काकांचे शरीर काटक होते . त्यांनी ग्रामसेवक म्हणून नोकरी केली ती अतिशय इमाने इतबारे केली त्याचाही त्यांना प्रचंड त्रास झाला . तसे तर माझ्या लग्नापूर्वी काका रिटायर झाले होते हल्ली ते म्हणायचे मी जेवढी वर्षे नोकरी केली त्यापेक्षा जास्त वर्षे पेन्शन घेतो आहे . 
काका दत्तभक्त होते ते शालेय जिवनापासून गुरुचरीत्राचे पारायण करत होते हल्लीहल्ली बैठक होईना म्हणून त्यांनी ते बंद केले पण बारा महिने ते रोज एक आध्याय वाचन मात्र करत होते . त्यामुळे त्यांना गुरुचरित्र पाठ झाल्यासारखे झाले होते .
कोरोनाच्या निमित्ताने मुलांचे वर्क फ्रॉम होम असल्याने नातवंड नातसून यांचा सहवास मात्र त्यांना छान मिळाला . याच कालावधीत वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे घरात प्रयोग व्हायचे तर तेही उत्साहाने सहभागी होत असत . बसून भाजी निवडण्याचे काम काकीपेक्षा जास्त काका करायचे . कामाच्या बायका येत नसत तेव्हा तर पहाटे अंगण साफ करायचे . परांड्यात पाणी भरणे हे मोठ्ठं काम असायचं तर बार्शीत पाणी आले की त्यांचे उगाचच बेचैनपणे आतबाहेर हेलपाटे सुरू व्हायचे . मी शेवटी त्यांना सांगून टाकलं इथे पाण्याचं काही काम नसते पाणी जाईपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका पाणी सांडलेले असते पाय घसरू शकतो तर ते आत जाऊन दारासमोर खुर्ची घेऊन बसायचे . त्यांचा  अस्वस्थपणा पाहून मला हसायला यायचं .
बारा महिने सकाळी लवकर त्यांची आंघोळीची घाई असायची . व्यायाम , आंघोळ , जप ही नित्याची कामे झाली की दिवसभर ते खुर्चीत बसून असायचे .
शेवटी ते गेल्यावर त्यांना बार्शीत आणले होते , तर झोपल्याप्रमाणे त्यांची मुद्रा शांत वाटत होती . गडद गुलाबी रंगाचे सोवळे नेसवल्यावर ते सिद्ध पुरुष भासले . उत्तरायण सुरू झाल्यानंतर वसंत पंचमीला वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचा अंत झाला !
पण काकी वाट पहात आहेत मला जायला हवं या लगबगीने अनपेक्षितपणे आमच्यातून ते निघून गेले . आता यांना एकट्याला कस सांभाळावं , कुठे न्याव , कुठे ठेवावं असे प्रश्न आम्हाला पडण्यापूर्वी त्यांनी पळ काढला असे वाटते एवढं खरं !!


सौ सरिता आनिल कुलकर्णी 
9421607248


30/11/2024

थोरामोठ्यांची पुण्याई आणि आशीर्वाद 



कालच श्री. नारायण पुरंदरे ( संजुचे मिस्टर ) रिटायर झाले आणि त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा ठरवण्यापासून तो पूर्ण होईपर्यंतची मी सक्रिय साक्षीदार आहे आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की ज्याची चिंता परमेश्वराला असते त्यासाठी निमित्तमात्र कोणीही होऊ शकते . यासाठी मोठ्यांचे आशीर्वाद आणि पुण्याई कामाला येते .
संजू लहानपणापासून कशी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहेच पण पुरंदरेना पण गेल्या तीस वर्षापासून मी ओळखते त्यांच्यात होत गेलेला बदल मी जवळून पाहिला आहे . दोन्ही कुटुंबात या नानाची काळजी त्यांच्या आईना वाटायची तर संजूविषयी आई काका चिंताग्रस्त असायचे पण असा योग जुळून आला आणि यांची रेशीमगाठ बांधली गेली आणि त्या दोघांचाही येणारा प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा आज छान असाच होत गेला . या प्रवासात त्यांच्याविषयी पालकत्व स्वीकारलेले बाबा आणि वृषाली वाहिनी तर आमच्याकडे आमचे हे म्हणजे अनिल कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा होता . सर्वसामान्याप्रमाणे पुरंदरे यांचे जीवन नव्हते पण दोन्हीकडील कुटुंबियांच्या सहकार्याने ते सुकर होत गेले आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
बँकेतून सर्वचजण सेवानिवृत्त होतात पण अशा पद्धतीने समारंभ हा ज्याची त्याची मुले करतात . याठिकाणी तो अपवाद ठरला इथे मात्र अनेकजणांनी आम्ही रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला येणार आहोत असे सांगितले आणि वाढत वाढत मोठा समारंभ घडला . आम्ही नियोजन करत गेलो हे करु ते करु असे करत finaly छान कलाकृती तयार झाली .
मी बँकेत असल्यामुळे बँकेत कार्यक्रम करु आणि 20 एक लोकांना जेवण देऊ असे ठरले पण पुरंदरेंची मध्यंतरी अँजिओप्लास्टी झाली होती त्यावेळी त्यांचे पुतणे आणि भाचे आलेले होते त्यांनी या कार्यक्रमाला आम्ही येणार असल्याचे तेव्हाच सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केला . बरोबर मोठ्या वाहिनी , मुंबईची बहिण आणि सोलापूरचे भाऊ असे 10/11 जण आले . शेंद्रीच्या शेतातील जवळच्या लोकांनी 
" नाना आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येणार " असे ठणकावून सांगितले ते 10 जण आले . बार्शी शहरात असलेल्या रिटायर लोकांनी पण 
" आम्ही नानाच्या सेंड ऑफला येणार आहोत " असे मला येऊन सांगितले ते 20 लोक आले . आणि आठ दिवसापूर्वी त्यांच्या कॉलनीतील लोकांनी त्यांच्या घरी येऊन सांगितले की
" नाना आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे" . ते 20 लोक आले आणि एकूण 90/95 लोकांची संख्या झाली !! 
परत पुरंदरे आमच्या घरी आले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं आणि आता कसं करायचं सांगा म्हणून विचारु लागले .
त्यामध्ये नेहमीचे पडद्यामागचे कलाकार म्हणजे आमचे हे ( अनिल कुलकर्णी ) सर्व करण्यास सज्ज झाले ! बँकेतील सेंड ऑफचे नियोजन नेहमीच माझ्याकडे असते पण घरगुती कार्यक्रम घरचे लोक मॅनेज करतात याठिकाणी दुहेरी नाते असल्याने या दोन्हीकडे माझा रोल होता .
मग घरच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघांनी लिस्ट केली आणि हॉल पाहणे , केटरर्स पाहणे , मेनू ठरवणे हे बाकी सर्व नियोजन केले . आणि टुमदार कार्यक्रमाचे आयोजन झाले .
यावेळी त्या दोघांचे भरपूर सत्कार झाले तर अनेकांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली यामध्ये पुरंदरेंचे आत्तापर्यंतचे घरच्या आणि बाहेरच्या सर्वांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या , प्रेमाच्या संबंधाची ही पोहोच पावती होती . त्यांचा हसतमुख चेहरा , चेष्ठेकोर स्वभाव , मदतीची भावना , गणेशोत्सव , नवरात्रोत्सव यातील उत्साही सहभाग , कामातील वक्तशीरपणा याच गोष्टी ऐकायला मिळाल्या तर संजूच्या साधेपणा प्रत्येकाला भावत होता . पण एक भाषण मी जसेच्या तसे इथे सांगणार आहे . त्यांच्या शेजारी राहणारी तीसएक वर्षाची बाई स्टेजवर येऊन मला म्हणाली ताई मला बोलायचं आहे मी म्हणाले बोला त्या सांगू लागल्या 
" आम्ही 3/4 महिन्यापूर्वी पुरंदरे काकांच्या शेजारी भाड्याने राहायला आलो आणि दोन महिन्यापूर्वी काकूंच्या पायाला इन्फेक्शन झाले आणि काकूंना जागेवरून उठता पण येत नव्हते त्यावेळी काका जे करत होते ते पाहून मला असे वाटले की प्रत्येक बाईला असा पार्टनर असला पाहिजे . त्यांची स्वतःची नोकरी , शेतातील हेलपाटे , घरातील सगळी कामं , काकूंचा दवाखाना त्याच वेळी कॉलनीत नवरात्रोत्सव आणि ही सगळी कामे करताना काकूंना समजून घेऊन अजिबात न चिडता काकूची सेवा काका करत होते त्यामुळे मला त्यांच्याविषयी खूपच आदर वाटतो ".
हा मुद्दा मात्र मला मनोमन पटला . खरखरच आता त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण होतील पण एवढ्या दिवसात पुरंदरे यांनी संजुला जे सांभाळून घेतले आहे त्याला तोड नाही त्यांच्याबरोबरच एकूणच पुरंदरे कुटुंबाने पण संजुला खूप छान प्रकारे सांभाळून घेतले आहे . आता पुढची पिढी म्हणजे सगळे पुतणे , भाचे कंपनीला सुद्धा संजूविषयी भरपूर प्रेम आहे आणि संजू सुद्धा पूर्णपणे त्यांच्या फॅमिली मध्ये एकरूप झालेली आहे . पूर्ण फॅमिलीविषयी तिची आपुलकीची भावना आहे . तिला नेहमीच बहिणीपेक्षा जास्त जावा आणि नणंदाविषयी प्रेम आहे त्याचबरोबर पुतणे आणि भाचे तिला जवळचे वाटतात एवढेच काय तर नवीन आलेली सून आर्या हिच्याविषयी सुद्धा तिला खूप अभिमान आहे .
मला आज आई काकांना अगदी विश्वासाने सांगावे वाटते की संजूविषयीचा आपला निर्णय अगदी योग्य ठरला . तिच्याविषयी तुम्हाला खूप समाधान वाटत होते . पण विनाकारण तुम्ही शेवटपर्यंत तिची काळजी करत राहिलात पण तुमच्या पुण्याईने ती खूपच सुखी समाधानी आणि आनंदी आहे . पुरंदरे यांचे पूर्ण कुटुंब असेच एकसंघ राहो सर्वांनी एकमेकास सांभाळून घ्यावे . त्यांच्या पुढील वाटचालीच आभाळ भरुन शुभेच्छा ! उभयतांना सुखी , समाधानी , आनंदी , भरभराटीचे आणि निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

सौ. सरिता कुलकर्णी 
Mob 9421607248