01/12/2019
आई काका तुम्ही फार घाई केलीत राव !! तुम्ही हवे होतात....
कालच्या रविवारी थाटामाटात लेकाच्या ( आशिष उर्फ मनिषच्या ) लग्नाचा मुहूर्त केला , सोडमुंज केली , नवग्रह शांती केली . सुरुवातीलाच गुरुजींनी जेव्हा सांगितलं की विडा देवासमोर ठेवा आणि देवाला, वडिलधा-यांना नमस्कार करुन या. देवापुढे नतमस्तक झाले काका-काकींच्या ( माझे सासु-सासरे ) पाया पडले आणि तुमची खुप आठवण आली . भावुक झाल्यासारखं झाल . पण पटकन तुमची दिलेली शिकवण आठवली .
आनंदाच्या प्रसंगी उत्साही रहायचं !!
कोणाचाही कसलाही प्रसंग असो त्यात हिरिरीने पुढं होण्याची तुमची पद्धत !! तो प्रसंग कोणावर आलाय हे तुम्ही कधी पाहिलंच नाहीत . वाड्यात कार्य असेल तर आपल्या घरात असणारी लगबग ! आई तु गेल्याशिवाय त्यांच्या घरी पातेलं स्टोव्हवर चढायचं नाही तेव्हा . तुझ्या सगळ्या जावा , सुना, पुतण्या सगळ्यांना तुझा केवढा आधार असायचा. पपा काकी म्हणजे सगळ्यातला हुकुमी एक्का ! तुम्हांला फक्त नातीच नव्हती माहिती तर गोतावळा पण खुप होता. मग भांडी घासणा-या भागाबाईच्या घरी तिच्या लेकीचं भामाचं लग्न ! त्यात सुद्धा तु तिच्या घरी जाऊन चुलीवर लाडु करुन दिलेलेस . केवढा आनंद झालेला भागाबाईला ! असे एक न दोन अनेक घरी हेडमास्तरीण म्हणून तुला पाहिलं जायचं. आपली मोठी निळी पेटी आणि 6 घागरीचं पातेलं ज्याच्या घरी कार्य तिथं मुक्कामाला आसायचं , विशेष म्हणजे ते काका पोहोच करायचे . त्यांनी मागायची वाट न पहाता. आणि मग आहेराचं सगळं आपल्या पोटात ठेऊन ती पेटी लग्नघरी नख-यात मिरावायची. पातेल नाही तर मग 15 दिवस घरात पाणी कशातही अगदी पांढऱ्या डब्यात भरुन ठेवलं जायचं .
आज घरात सगळं चकचकीत आहे पण नक्कीच तुमची लगबग आणि वावर याची उणीव भासते. ब-यापैकी सावळा रंग पण अतिशय रुबाबर व्यक्तिमत्त्व , कडक इस्त्रीचे नीळ घातलेले कपडे आणि नाकपुड्या फुगवत हसुन बोलण्याची लकब त्याला साजेस नऊवारीतली तुमची आर्धांगीनी ! गोरापान गोल चेहरा , छोटस नाक पण चेह-यावर समाधानाचं सात्विक तेज कुरळ्या केसांचा अंबाडा असा लक्ष्मी-नारायणाचा जोडा तस्साच डोळ्यासमोर दिसतोय. तुमच अस्तित्व जाणवतय ते आम्हा सगळ्या जणीत उतरलं आहे . अगदी नातवंडात सुद्धा !! पण लग्नघर म्हणून तुम्ही पाहिजे होता राव. फार घाई केलीत .
तुमचं अस वागणं फक्त लग्नघरीच होतं असं नाही तर कोणाच्याही
घरात लेक किंवा सुन बाळांतीण झाली की पथ्य पाणी बाळाची काळजी सगळ्यांना तुझा सल्ला पाहिजे असायचा. कश्शावरही उपाय तुझ्याकडे तयार असायचा . काका तर तुला डॉक्टर पपा म्हणायचे.
तुमचा सहभाग फक्त आनंदातच असायचा असं नव्हतं . तोरणाघरी घरी आसणारी तत्परता मरणादारीपण तशीच असायची कोणीच नसलेली शेंबड्याची म्हातारी , धोंडीआप्पा, निलाबाई यांना आपला सोपा आणि सणादिवशीचं आईच्या हातचं जेवण विशेषतः कटाची आमटी हक्काची होती. शेंबड्याची म्हातारी गेली तिला कोणीच नव्हतं सगळे कुजबुज करायला लागले तर काकांनी पुढाकार घेतला मग वस्तीवरचे लोक धावत आले. आणि तिचा अंत्यविधी झाला. गावातही अशा घरी जाऊन पुढाकार काकाच घ्यायचे. लोकांच्या मनात काय आहे हे काका अचुक ओळखायचे आणि कृतीत उतरवायचे.
आपल्याकडे झाडुवाली शिवा होती. मुलगा नोकरीला लागल्यावर कोकणात गेली. 10/12 वर्षांनी दस-यादिवशी घरी आली आणि आईला म्हणाली तुमच्या हातची कटाची आमटी पोळी खायचीय. जाताना म्हणाली
" लई दिस झालं हे खाव वाटत हुतं ".
तृप्त होऊन गेली . शेवटीशेवटी निलाबाई भ्रमीष्ट झाली होती पण तिला भुक लागली की बरोबर घराकडे यायची ती दिसली की तिने न मागता आईनं तिला जेवायला वाढायचं तिने जेवण करुन निघुन जायचं तिच गोष्ट धोंडीआप्पाची असायची .ते दिसले की काका काहीच न बोलता आईकडे पहायचे मग आई जेवण चहा द्यायची.धोंडीबाला पंधरा दिवसांच्या एकादशीला चहासाठी पैसे द्यायचे,२५ पैशाला एक कप चहा होता तेव्हापासून सुरूवात केली होती . किर्लोस्करवाडीला रहायला येईपर्यंत तो नियम चालू होता.
एख मुकी होती पैसे पाहिजे असले की उगाचच मागच्या दारात येऊन गवत काढायची मग आईनी चहा न काकांनी तिला पेसै दिले की खुष होऊन हसत हातवारे करत निघुन जायची. लंगडा म्हसा होता त्याला पण चहा आणि तंबाखूला पैसे हवे असले की घरी यायचा.असं एक न दोन आनेकांना विश्वास आसायचा की कुठेच काही नाही मिळालं तर हे हक्काचं घर आहे.
कुणाचं लग्न जमायच चाललंय म्हणलं की काका आवर्जून हजर रहायचे बोलणी ताणायला लागली की काय पाहिजे ? चला मी देतो अस म्हणून बैठक पुर्णत्वाला न्यायची आणि सुपारी फोडूनच उठायचं.
एवढ करुन शांत बसतील ते काका कसले. शेताकडच्या लोकांची लग्न झाल्यावर अनेकाच्यात वाद व्हायचे माहेरीआलेली मुलगी स्वतः घेऊन तिच्या सासरी जायचे दोन्हीकडच्या मंडळीची कानउघडणी करुन नव-याचा कान पकडुन पोरीला सासरी सोडून यायचे.
तुम्हाला सगळ्या मुलीच म्हणून समाजालाच चिंता पडलेली असायची . प्रसंगी सल्लेपण दिले लोकांनी ते तुम्ही मस्त धुडकावुन लावले . पण त्याची फिकीर तुम्हाला कधी वाटली नाही आणि आम्हा मुलींना पण कधी भासली नाही. आमचे सहा जावई म्हणजे सहा मुलांप्रमाणे आहेत आम्हांला हे ठरलेलं वाक्य होतं तुमचं .
अशा एक न दोन अनंत आठवणीनी मन भरुन येतेय पण आभिमान वाटतो की आम्हा सगळ्या मुलींना तुम्ही खुप सशक्त करुन या दुनियेत वावरायला शिकवलं आहेत . आम्ही खुपखुप भाग्यवान आहोत.
सौ सरिता आनिल कुलकर्णी
9421607248
15/12/2019
सुनिल भाऊजी तुम्ही दोघेपण नॉट रिचेबल लागताय.........
आशिषचं लग्न ठरलंय . लग्नाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतशी त्या अनुषंगाने येणा-या कामाची पण रोज धामधुम चालु आहे. मागच्या रविवारी कुलदैवत , माहेरची देवी यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि काल परांडा दौरा झाला. आणि पुन्हा एकदा जखमेवरची ढलपी निघुन भळभळा रक्त वहावं तस मन आक्रंदायला लागलं . आठवण केव्हा येते ? विसरलं तर न ? पण जर विसरच पडला नसेल तर आठवण आली असं कसं म्हणाव ? पण जेव्हा आठवणींचे कढ येतात नं , तेव्हा मुकरुदन सुरु होतं. घुसमटायला होत. त्याला वाट करुन द्यावी लागते. नाहीतर मनातल्या मनात संवाद चालतो आणि आठवणींचा गुंता वाढतच जातो. मी मनाची खुप समजुत घातली पण त्याची घालमेल , अस्वस्थता काही संपेना. काल त्याचा कडेलोट झाला. आणि म्हणून ठरवलं आठवणींना आज मनसोक्त बरसु द्याव . म्हणजे ढग बरसल्यावर आकाश कस निरभ्र होतं त्याप्रमाणे मन पण मोकळं होईल , हलकं होईल .
आलीकडे आम्ही परांड्याला सुट्टीदिवशी यायचो तर भाऊजी तुम्ही नसायचात . तुम्ही गेवराईला गेलात हे माहिती असायचं त्याच काहीच वाटायचं नाही . उलट सुट्टीदिवशी आपल्या चौघांच पण फोनवर बोलणं व्हायचं . मनात आल की उचलला फोन आणि झालं बोलणं असं व्हायचं. पण काय करु भाऊजी तुम्ही दोघेपण आता नॉट रिचेबल लागताय......
माझं लग्न झाल्यादिवसापासून घरात मला अश्वस्त करणारी मायेची वागणूक जर कोणाकडून होती तर पहिलं नाव तुमचं येतं. राम-लक्ष्मणाची तुम्हां भावाभावाची जोडी आणि त्यात माझं येण ! सुरुवातीला 3/4 वर्षे खुप छान गेली. आशिषचा जन्म झाला तर आख्या परांड्यात तुम्ही पेढे वाटलेले . तुमच्याच सारखा शर्ट पाहिजे हा त्याचा हट्ट कित्येक वर्षे तुम्ही एकाच ताग्यातले दोघांना कपडे घेत पुरा केलात. खुप मजा यायची . पाडवा, दिवाळी, दसरा, लक्ष्म्या सगळे सण आपण एकत्र करायचो. दिवाळीत फटाक्याची मोठ्ठी पिशवी आणायची. बहीण आणि वहिनी दोघींना एकसारख्या साड्या ही प्रथा तुम्ही शेवटपर्यंत ठेवली. या सगळ्याचा परिणाम मला नेहमीच मोठया कुटुंबात वावरायची सवय लागली. अजुनही सणादिवशीचा माझा स्वयंपाक दुप्पट तिप्पट होतो . 1992/93च्या दरम्यान बार्शी परांडा दोन्ही ठिकाणी घरांची बांधकामं , मनासारख्या नोक-या . सारं काही आलबेल होत. आनंदी कुटुंब होतं आपलं . समाजात पण तुमची नेहमीच मदतीची भुमिका होती. अनेक स्नेही किंवा नातेवाईकांना अडचणीच्यावेळी तुमची आठवण यायची . फटकन बोलुन जाण्याचा तुमचा स्वभाव रागीट पण तेवढाच मायाळु मुख्य म्हणजे जिथल्या तिथे सोडुन द्यायचं असं होतं . सगळच काही गुडीगुडी होतं अस नव्हतं बरं ! तुमच्या भावाभावांचे अनेकदा मतभेद व्हायचे आगदी पराकोटीचे ! पण त्याचा संबध माझ्याशी वागण्यात कध्धीच आला नाही . उलट माझ्याशी चर्चा व्हायची बरचसं माझं तुम्ही ऐकायचात. ब-याचदा हे पण गंमतीनं म्हणायचे माझा भाऊ पण तु सांगितलेले पटतं त्याला सगळं माझं नाही . स्वभाव तसा मितभाषीच . न सांगता न बोलता अनेक गोष्टी धोरणानी करायच्या . देखावा तर आजिबातच नाही . न बोलता कृती करायची . असे सगळं व्यवस्थित चाललेलं .
पण नियतीला ते मान्य नव्हते सुखी कुटुंबाला काळी झालर लागली . तुमची काहीही चुक नसतांना तुमच्याच सहका-यापैकी काही विघ्नसंतुष्टी लोकांनी तुम्हांला जाळ्यात अडकवलं . आणि गुंता सुरु झाला. 1994 मध्ये तुमच्या पाठी नोकरीमध्ये त्रास सुरु झाला . सगळे हादरुन गेलो , गारठुन गेलो . एकमेकांना धीर देऊ लागलो . खुप खच्चीकरण झालं तुमचं . तुम्हांला आमच्याकडे मन मोकळ करावसं वाटायचं . तुम्ही ते करायचा . हे षडाष्टक काही न काही कारणांनी एक नाही दोन नाही तब्बल 15 वर्षे विनाकारण तुमच्या पाठी होत.प्रचंड पिळवणूक झाली . आणि तुमच्या बरोबर आख्ख कुटुंब त्यात भरडुन निघाल . त्यादरम्यान एकाला टोचलं तर दुस-याला वेदना होत होती. वाघासारख्या माणसाची कोकरासारखी अवस्था झाली . राम-लक्ष्मण-सिता यांच्या पवित्र नात्याप्रमाणे आपल नातं होत .
त्यादरम्यान इतर सगळ्या गोष्टी होत होत्या . आकांक्षाचा जन्म झाला . तिचं बालपण कोडकौतुक कश्शात कमतरता ठेवली नाही. तुमच्या बहिणीचं लग्न आणि आशिषची मुंज ही घरातली दोन मोठी कार्यं . या सगळ्यात तुमचा असलेला सहभाग म्हणण्यापेक्षा पुढाकारच म्हणावा लागेल. तुमच्या चिंतेचा कुटुंबावर परिणाम होऊ नये असा तुमचा प्रयत्न असायचा . सण असो की कार्य असो ते उत्साहाने करण्यात तुमचं पाऊल पुढे असायचं . आशिष आकांक्षाच सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे हा अट्टाहास असायचा तुमचा . प्रचंड जीव पोरांच्यावर . सणाला किंवा कार्यात तुमच्या दोघा भावांची कामं ठरलेली असायची . एकमेकांच्या कामात तुम्ही दखल द्यायचा नाहीत . दोघेपण बिनबोभाटआपापल्या जबाबदाऱ्या पार पाडायचात . तीच गोष्ट शेताची झाली . कधी फिरकलोच नाही आम्ही . तुम्हीच सगळे निर्णय घ्यायचात . आलिखित नियमानुसार कामं व्हायची. हे नेहमी म्हणायचे
" शेतात रमतो तो. करुदे त्याला काय करायचं ते . माणसाला कुठेतरी विसाव्याची गरज असते ". बरीच वर्षे तेचतेच रुटीन राहिलं . आम्ही बार्शीला तुम्ही परांड्यात .पण म्हणतात न
" घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी "
अगदी याप्रमाणे यांच वागणं असायचं . ब-याचदा मला राग पण यायचा . पण माझा नाईलाज आहे जे आहे ते आहे असं समज म्हणायचे हे . अशी इतकी ईन्व्हॉलमेंट होती . मग सांगा आता हे दुःख पचवायला आम्हांला किती कष्ट पडले असतील . मला वाटलं तर मी ढसढसा रडुन मोकळी होते . यांच असं होत नाही . आयुष्यभर एक दुखरी नस असणार आहे. मुलांचे पण आसच आहे . तुमच्या विषयी घडघड नाही बोलत ती . असो काळ हेच त्याच्यावरचं औषध आहे . नविन माणसांच येणं आणि वातावरणातील बदल ही परिस्थिती बदलु शकतो . तुमची रुतलेली गाडी रुळावर यायला खुपच कालावधी लागला . त्यात अत्यंत मंद गतीने सकारात्मक बदल होत गेले . 2009 साल उजाडलं सगळं स्थिरावायला . निष्कलंक सिद्ध झालात तुम्ही पण त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली . आयुष्यातील ऐन उमेदीचा मोठ्ठा काळ निघुन गेला . पुन्हा अचानकपणे 2010 मध्ये झांझावाताप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुखदाचं येणं!! ( प्रतिभा आडसकर जी सुखाच्या सरी घेऊन आली म्हणून सुखदा ) आहाहा !! काय स्वप्नवत घटना घडत गेल्या . हे सगळच कित्ती वेगळं घडलं . एक आपत्ती येणं . तीच निराकरण होणं पुन्हा आयुष्य सुखावह होणं . खुप समाधान वाटलं .अतिशय उत्साही जोडीदारीण मिळाली तुम्हाला ! काय काय मनोरे रचले आपण .भराभर चुटकीसरशी दिवस संपले हो ते . लग्नाचा 25 वा वाढदिवस करायला खुप उशिर होतोय म्हणून 5 वा वाढदिवस मोठा केला आपण . 20-20 मॉचच म्हणावी आशी फक्त सहा वर्षे तुमच्या आयुष्यात आनंदाची उधळण काय व्हावी आणि सगळ्यांना चटका लाऊन सुखदानं जगाचा कायमचा निरोप काय घ्यावा . कुण्णाचाही विश्वास बसणार नाही अशी ही दुर्दैवी घटना . किती लढायचं ? किती लढायचं ? थकलात तुम्ही आणि आम्ही पण ! सगळं निरर्थक आहे मिथ्या आहे असच ठरवुन की काय धावत तिच्यामागोमाग पाचच महिन्यात लांबलांब ढांगा टाकत डोंगराच्या पल्याड निघुन गेलात तुम्ही !! खुप उलटसुलट घडलं हे . दोघेपण आल्पायुषी ! एकतर एकमेकांना लवकर भेटला नाहीत . भेटलात तर फक्त एकमेकांसाठीच जन्मलो अशा थाटात गेलात निघुन ! एखाद्या चित्रपटात पहाव्या अशा या विचित्र घटना घडून गेल्या . काय म्हणायचं याला . एखाद्याच्याच आयुष्यात इतक्या घटना कशा घडु शकतात ? तुम्ही एकटेच तुमचे मालक असल्यासारखं तुम्ही गुपचूप पळ काढलात . पण मागे रहाणारांनी कस सावरायचं हा विचारच केला नाही तुम्ही दोघांनी पण ! दोघांनाही वयस्कर आई तुम्हांला वाडिल ! त्यांच काय ? वयोमानाप्रमाणे आघात सोसण्याची ताकदच नव्हती त्यांच्यात . विचारक्षमताच गोठुन गेली त्यांची . आणि तुमची दोघांची पण भावंड ! त्यांच काय ? जानेवारी 2017 ते जुन 2018 ! दीड वर्षाचा भयानक कालखंड होता तो आमच्या सर्वांसाठी. घरात हलती चित्रं वावरतात की काय असं वाटायचं .भळभळत्या जखमा उराशी कवटाळुन आला दिवस सरत होता . एकांतात नजर लावुन बसले आसतांना " माणूस एकदा गेला की परत येऊच शकत नाही का ग ?" अस अत्यंत भावनिकपणे , अगतीकपणे बेचैन होऊन ह्यांनी विचारलेला प्रश्न आज जरी आठवला तरी अंगावर काटा येतो माझ्या . कोणत्या जन्मीचा दावा साधला परमेश्वरांने असं वाटतं . पण.....पण जन्माला येताना जेवढे श्वास घेऊन माणूस येतो त्यापेक्षा एकही श्वास त्याला मिळत नाही हे तितकच खरं आहे . कितीही मी मी म्हटलं तर विधात्याने काही गोष्टी स्वतःच्याच हातात ठेवाल्यात हे खरं !! असो
जे जे वाटलं ते ते उतरुन काढलं आहे . मोकळं झाल्यासारखं ,निरभ्र झाल्यासारखं वाटतय . मन थोडसं शांत झाल्यासारखं वाटतंय . तुमच्या दोघांचाही रोल आता आम्हालाच करावा लागणार आहे . त्यात कमतरता झालेली तुम्हाला अजिबात चालणार नाही हे माहित आहे मला . कोणत्या न कोणत्या रुपात तुमचे अशिर्वाद असणारच आहेत त्यात वादच नाही . पण पोकळी मात्र नक्कीच जाणवते . एक निग्रह केला आहे मी मुलांच सगळं आपण सगळेजण जसं चित्र रंगवत होतो जसं अपेक्षित होत तसच आनंदाने करणार त्यात कोणतीच कमतरता ठेवणार नाही हे नक्की !!
ओम शांती शांती शांती !!!
सौ सरिता आनिल कुलकर्णी
9421607248
20/09/2021
दिवा मालवला !
रविवार 12 सप्टेंबर 2021 भाद्रपद शुक्ल षष्ठी सकाळचे पावणेआठ वाजलेले आणि यांनी जोरजोरात "काकी , ए काकी " असा हाका मारण्याचा सपाटा लावला . मी घाबरुन पळत गेले , जाऊन पाहिलं तर काकी म्हणजे सासूबाई डोळे बंद व तोंड उघडं ठेऊन शांत झोपल्यासारख्या दिसत होत्या . त्यांच्या नाडीचे ठोके लागेनात , श्वास जाणवेना , शरीर थंडगार पडलेलं पण दंड थोडेसे उबदार वाटले म्हणून थोड्या आशा पल्लवीत झाल्या . पण एकूणच आंदाज आला होता . मी मुलांना जोरजोरात हाका मारल्या एकूणच परिस्थिती पाहून सगळे भांबावून गेले . आशिषने धावत जाऊन अँब्युलन्स आणली व दवाखान्यात घेऊन गेला मागोमाग आकांक्षा-कीर्ती गाडीवर गेल्या . नेहमीप्रमाणे पुरंदरे हजर झाले तेही बरोबर गेले . हे घरासमोरच अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले .
आजच्या दिवशी यांच्या आजीची तिथी असते म्हणून गुरुजींना आठ वाजता घरी बोलावलं होतं . ते येण्यापुर्वी सगळं आवरायचं म्हणून काका-काकी आणि हे लवकरच उठले होते दोन दिवसांपासून काकींना पित्ताचा त्रास होत होता . हल्ली दोनतीन महिन्यांनी तसा त्रास त्यांना नेहमीच होत असे अशावेळी ओआरएस , शहाळं , ज्यूस यावर एकदोन दिवस त्या रहायच्या मग त्यांची गाडी रुळावर येत असे तेव्हा त्या चहा अजिबात घेत नसत . पहाटेच आपलं आपलं ऊठून तोंड धूऊन प्रातर्वीधी आटोपून त्या बसल्या होत्या हे पूजेला जाण्यापुर्वी त्यांनी एकदा डोकावलं तर त्या ऊठून पुन्हा बाथरुमला गेल्या व जाऊन नेहमीप्रमाणे लोडवर कपाळ टेकवून पडून राहिल्या . इकडे अर्धा तास यांची पूजा चालू तेवढा वेळ आम्ही तिकडे फिरकलो नाही . काका त्यांच्या अगदी जवळ खुर्चीवर बसलेले होते पूजा झाल्यावर चहा घेणार का म्हणून विचारण्यासाठी हे त्यांच्याजवळ गेले व विचारु लागले पण त्यांच्या कडून काहीच प्रतीसाद मिळेना . मग यांनी त्यांना हलवले तर त्या शांतच होत्या समईतील तेल संपून वात कोरडी होऊन दिवा मालवतो त्याप्रमाणे घरात पूजेचा मंत्रघोष चालू असतांना कोणालाही थांगपत्ता न लागता , शांतपणे त्यांची प्राणज्योत मालवलेली होती . मला ते समजलेले होते पण थोडी आशापण होती म्हणून आम्ही मुलांच्या फोनची वाट पहात होतो तोवर दारात गुरुजी हजर ! घडला प्रसंग त्यांना सांगितला . तोवर आकांक्षाचा फोन आला की ईसीजी काढला काहीच उपयोग नाही असे डाॕक्टरांनी सांगितलेय व लगेचच घरी न्यायला सांगितले आहे आम्ही दहा मिनीटात येतो .
गुरुजी आंगणातच होते घडला प्रकार त्यांना सांगितला तर त्यांनी सांगितले की लगेचच कोणाकडूनही हळदकुंकू , अक्षदा वाहून गणपती विसर्जन करुन घ्या . लक्ष्म्याच्या सणाची बाकी तयारी झाली होती पण गौरी अजून आणलेल्या नव्हत्या त्यामुळे बाकी सगळ पटापट आवरुन घेतलं तोवर अँब्युलन्स दारात हजर ! दवाखान्यात काकींना नेले असे आम्ही समजत होतो पण येतांना मात्र काकींची बाॕडी हाॕलमध्ये आणून ठेवली गेली !!!
तशी तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्ब्येत तोळामासाच होती फेब्रुवारीपासून तर त्या बेडवरच होत्या फक्त खाणपीणं , आंघोळ , संडास-बाथरुम एवढ्यासाठी उठायच्या . त्यामुळे हे सहासात महिने म्हणजे बोनसच होता . बऱ्या असल्या की दोनदोन तास त्या बाहेर कट्ट्यावर बसायच्या पण थोडी जरी तब्ब्येत बिघडली तर पंधरा पंधरा दिवस झोपून रहायच्या . बहुतेकवेळा त्यांना पित्ताचाच त्रास होत असे पण त्यांची विश्रांती झाली की पुन्हा तरतरीत असायच्या . त्यामुळे याहीवेळी करुदे दोन दिवस आराम वाटेल बरे अशा समजूतीत मी होते . कारण या आठवड्यात पोळ्याला पुरणपोळीचं तर गणेशचतुर्थीला उकडीच्या मोदकाचं अगदी व्यवस्थित जेवण त्यांनी केलं होतं . मला बरं नव्हते चिकन गुनिया झालेला त्यामुळे आकांक्षा-कीर्ती लक्ष्म्याची तयारी करत होत्या तर शनिवारी काकी त्यांच्याशी गप्पा मारत बघत बसल्या होत्या .
बत्तीस वर्षापूर्वी या घराशी माझे ऋणानुबंध जोडले गेले . काकी म्हणजे बुटक्या फक्त साडेचार फूट उंची आणि उंचीला साजेशी एकदम सडसडीत शरीरयष्टी गोरा रंग चेहऱ्यावरुन त्या शांत वाटायच्या फारसं बोलणं नाही त्यामुळे मला त्यांच्या स्वभावाचा अंदाज येत नव्हता . स्वच्छता टापटीप आणि सगळी कामं न थकता दिवसभर करत रहायचा त्यांना अजिबात कंटाळा येत नसे . त्या महिनोनमहिने घराच्या बाहेर पडत नसत . घरकाम , देवधर्म , व्रतवैकल्यं यातच त्या गुरफटलेल्या असत . बोलणं पण फारसं नसायचं त्यामुळे मनात काय चालू याचा थांगपत्ता लागत नसे पण जसजसा सहवास घडू लागला तसतसा अंदाज येऊ लागला . दोन्ही घरची संस्कृती पुर्णपणे वेगळी आहे हे माझ्या लक्षात येत होत . सासरी पुर्ण मराठवाडी पगडा होता सोवळंओवळं कडक होतं . उपवास , व्रतवैकल्य आणि नेमधर्म याला खूप 8महत्त्व होतं . मुलगा-मुलगी फरक केला जायचा . प्रत्येक सणाला सोवळ्यात स्वयंपाक , जेवायला सवाष्ण-ब्राह्यण हे सगळं नित्यनेमानं करायचच . त्यांनी मला
" तू हे केलच पाहिजेस "
असं कधीच सांगितले नाही पण मी करावे ही मनोमन अपेक्षा मात्र असायची आणि मी करायला लागले की त्या पुढचं पुढचं सांगत रहायच्या . न बोलता त्यांचा धाक आणि अंकूश शेवटपर्यंत होता . जबरदस्ती न करता स्वतःचा आब राखत त्यांनी माझ्याकडून शेवटपर्यंत हडसून खडसून सगळं व्यवस्थित करुन घेतलं . एकूणच कर्मठपणा ठासून भरलेला होता . त्यांची तब्ब्येत एवढी कमी होती तरी त्यांच बीपी हाय असायचं . सुरुवातीला नेने डाॕक्टरसुद्धा म्हणाले होते
" तब्ब्येत अशी आणि बीपी इतका कसा ? "
काकींच माहेर परांडा त्यांना लागून सलग यांच्या दोन मावशांची घरं होती व तिसरं घर आमचं होतं . माहेरच्या वाड्याला ओसरी म्हणून ओळखलं जायचं तिथे यांचे चार मामा रहात असत . त्यांना एकूणच माहेर , भाऊ भावजया , बहिणी भाचे कंपनी , आण्णा याविषयी खूप प्रेम होते . ओसरी हा विषय त्यांना गप्पांसाठी जिव्हाळ्याचा होता . माहेरच्या विषयावर त्या भरभरून तासंतास बोलायच्या . इतकं वय झालं तरी भाऊबीज आणि राखीपौर्णीमेला त्या अस्वस्थपणे भावांच्या वाटेकडे डोळे लाऊन असायच्या . मला या गोष्टीच खूप आश्चर्य वाटत असायचं पण त्यादिवशी त्या भावांविषयी बोलतांना जणू छोट्या पोरांविषयी बोलतो असे
" बंडू , निशीकांत, शाम , अविनाश "
अशी आलटून पालटून नावे घेत असत . छकी-मुन्नी जोडीनं नाव घ्यायचं . तर बहिणी व त्यांच्या मुलांना लहानपणी किती जीव लावला हे नेहमी तेवढ्याच रंजकतेने सांगायच्या . त्यांच स्वतःच्या लेकीवर पण अतोनात प्रेम होतं .
काकी हट्टी होत्या , स्वमग्न होत्या . जुनं काही बदलायची त्यांची अजिबात तयारी नसे पुढेपुढे त्याचा मला खूप त्रास झाला . बार्शीपासून परांडा जवळ असल्याने व मी मोठी सून असल्याने प्रत्येक सणाला आलच पाहिजे हा आलिखीत नियम होता . काकींचे उपवास तर वारेमाप होते भाऊजी तर चिडून म्हणायचे
" आठवड्यातून नऊ दिवस हिचे उपवास आसतात "
सोमवार , गुरुवार , शनिवार , पंधरा दिवसाच्या एकादशा , कायमस्ववरुपी मिठाच्या चतुर्थ्या , चतुर्दशी ,पौषातील रविवारच व्रत , शुक्रवारच व्रत , चातुर्मास , श्रावणी , वर्षातून तीन नवरात्र आणि उरल सुरल कोणी काही नविन सांगितले की आहेच असे एक ना दोन उपासांची रेलचेल !!! मी मात्र एकूण प्रकार पाहता सोवळे आणि उपवास यात अडकले नाही ते मोडीत काढायला मला उशीर झाला आणि त्रास पण झाला पण संघटनेत काम करताना एकूणच बरच वाचन आणि अभ्यास व्हायचा मग विचार करत मी माझ्या वागण्याची दिशा बदलत गेले . दोन गोष्टी मी स्वतंत्र ठेवल्या एक नातेसंबंध दुसरी रीतिरिवाज आणि रुढीपरंपरा कारण माझ्या मते पहिल्या गोष्टीबाबत आपण तडजोड करु नये त्यामुळे घरातील वातावरण तंग होऊ शकते . मतभिन्नता असेल तर तो भाग वेगळा मला ही गोष्ट पटत नाही मी ती करणार नाही संपले त्याचा आपल्या नात्यावर परिमाण होऊ द्यायचा नाही . मी स्पष्टपणे बोलत असे त्यामुळे त्यावर काकी फारसे बोलत नसत पण त्यांना ते पटत असे त्या म्हणायच्या
" तू बरोबर बोलतेस पण आम्हाला असा विचार करायचं सुचले नाही आणि आता इतकी वर्षे असे केले ते अंगवळणी पडलय नाही केलं तर चुकल्यासारखं वाटतं पण तुला कसे करायचे तसे कर माझा आग्रह नाही ".
शेवटशेवट या उपवासांचा त्यांना त्रास झालाच या दोनतीन वर्षीत त्यांचे सगळे उपवास मी बंद केले होते . पण पीत्त डोकं वर काढायचच गंमत म्हणजे या चारपाच वर्षात वडे , सामोसे , पापडी यासारखे बाहेरचे पदार्थ त्यांनी भरपूर खाल्ले आणि उपवास बंद केले तसे नाष्टा जेवण अगदी व्यवस्थित करायच्या .
तसं आमचं लग्न वेळेत झालं आणि पुढच्या दोन्ही लग्नाचं घोडं आडलं आणि घरात ताण निर्माण होऊ लागला आणि त्यामुळे उपवास , नवसं यात काकींनी स्वतःला पुर्णपणे गुंतवून ठेवलं होत . नातेवाईक पाहूणे यांच्यापासून अलिप्त रहाणं त्या पसंत करायच्या . त्यांना समाजाच्या नातेवाईकांच्या नजरा बोचत असत . त्या स्वतःला क्लेश करुन घेत असत . आपण आणि आपली मुलं यापलीकडे त्यांनी पहाणं बंदच केलं . सगळेच एकमेकांवर इतकं प्रेम करायचे की कधीकधी ते सगळेच त्यात घुसमटून जायचे . त्यामुळे आयुष्यातील मौज काही त्यांना स्वतःला लुटता आली नाही पर्यायांने घरातील वातावरणात पण हलकेपणा नव्हता . त्या फारसं आमच्यात रमल्याच नाहीत . त्या स्वतःमध्येच पुर्णपणे गुरफटून गेलेल्या होत्या . माझी नोकरी , लहान मुलं , आमचा वाढता संसार याबरोबरीने परांड्यातील जबाबदाऱ्या पेलतांना आमची खूप कसरत व्हायची दमछाक व्हायची . बार्शीत मोठ्ठ घर होतं तरी प्रत्येक सण परांड्यात झाला पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असायचा .
आशिषचा जन्म झाला , पहिला मुलगा झाला म्हणून त्यांना हुश्श्य झालं होतं कारण मला सगळ्या बहिणी आहेत असे त्यांना वाटत असे . नातवावर मात्र त्यांच जिवापाड प्रेम होतं अभिमान पण खूप असायचा . दुसरी आकांक्षा तिच्यावर पण खूप जीव पण थोडंस उन्नीस-बीस होतंच ते मात्र मला खटकत असे . पुढेपुढे माझा व्याप वाढत गेला यांची बदली झाली आणि आम्हांला परांड्याला जायला जमेना . मग त्यांच्या मनाविरुद्ध फक्त दिवाळीला ते बार्शीत येऊ लागले . भाऊजींच लग्न झाल्यावर मात्र मला जायला जमेचना . परांड्यात सगळ्या कामासाठी बाई ठेवली . मग कधीमधी ते बार्शीत येऊन राहू लागले तोवर आमची मुले बार्शीच्या बाहेर गेली होती . इतक्या वर्षात सासू-सून म्हणून एकदाही आमचे भांडण झाले नाही .
2017 मध्ये आधी सुखदा नंतर भाऊजी गेले आणि आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला काका-काकींना तर सगळच उलटसुलट पहायची पाळी आली . त्यांना चैन पडत नसे . या पाच वार्षात कधी बार्शी कधी परांडा असे ते राहू लागले . घरात हलती चित्रं असल्यासारखा त्यांचा वावर असायचा . गेल्या दोन वर्षात मात्र परांड्यात त्यांना एकटं सोडणं आम्हांला धोकादायक वाटायचं पण त्यांना बार्शीत चैन पडायची नाही . परांड्यातील घरात त्या रमत असत . मग एकदोन महिने सोडायचं परत आणायचं असे करु लागलो . पण ते कुठेही असले तरी यांना चैनच नसायची सातत्याने बरोबरीने भाऊजी असायची सवय होती मोठा आधार होता त्यांचा ती सगळी जबाबदारी एकट्यावर पडली त्यांचा एकखांबी तंबू झाला . काका-काकींची तब्ब्येत थोडी जरी बिघडली तरी ते अस्वस्थ असायचे . या चारपाच वर्षात अस्वस्थता होती तब्ब्येत फार काही वाईट नव्हती पण सतत काहीतरी कुरबूर असायची या दोन वर्षात तर बार्शी व परांडा याच्या बाहेर हे गेले नाहीत . पण शेवटपर्यंत मात्र काकी स्वतः एका स्वाभिमानी तपस्वीनीचे जिवन जगल्या व पूजेचा मंत्रघोष चालू असतांना हसत्या खेळत्या घरातून , नातवंडे सुनांच्या गराड्यातून सौभाग्याचं लेणं मिरवत अचानकपणे सगळ्यांना चटका लावत लुप्त झाल्या !!!
सौ सरिता आनिल कुलकर्णी
9421607248
14/02/2022
अध्याय समाप्त ......
काकीना म्हणजे सासूबाईंना जाऊन जेमतेम पाच महिने व्हायचे आहेत तोपर्यंत शर्यत लावल्याप्रमाणे काका म्हणजे माझ्या सासऱ्यानी धावत जाऊन फंजा पोहोचवला . कारण हल्ली त्यांचं सगळ जोडीने असायचं . घरात समोरासमोर दोन बेडवर दोघे बसायचे , एखादी पौराणिक सिरियल असेल तर हॉलमधे टीव्हीसमोर दोन छोटी मुलं येऊन बसतात तस बसायचे आणि सिरियल संपली की त्याच्यावर चर्चा करायचे . अंगणात जोडीने दोन खुर्च्या , कट्ट्यावर बसले तरी जोडीने , जेवण , नाष्टा , चहा आधी एकमेकाकडे घेतल का हे पाहायचं , घेतल्याची खात्री झाली की मग स्वतः घ्यायचं मी गमतीने म्हणायची
" देणार नाही त्यांना "
की लगेच सावरून बसत म्हणायचे
" तसे नाही ग त्यांनी घेतल का पहिलं "
एकमेकांसाठी जगायचं असा त्यांचा दिनक्रम असे . दिसणे किंवा ऐकायला येणे हे दोघांनाही वयोमानाप्रमाणे खूप कमी झाले होते पण ते तासनतास गप्पा मारायचे आणि एकमेकात गुंतून जायचे , रमायचे . मला त्यांच्या गप्पा ऐकायला यायच्या एकाने काही बोलले तर त्यावर दुसरा जे बोलेल त्या दोन वाक्याचा काहीही संबंध असेलच असे नसे . कधीकधी ते ऐकून मला हसायला यायचे पण त्या गप्पा म्हणजे त्यांच्यासाठी विरंगुळा असायचां . काका थोडफार फिरत असत त्यामुळे ते थोडेसे जरी नजरेआड गेले तर काकी अस्वस्थ व्हायच्या . हाका मारत रहायच्या मग सतत काकीसमोर असण्याची काकांना सवय झाली होती . त्यामुळे काकी गेल्या तसे काका आतून तुटल्यासारखे वाटत होते . सुरुवातीचे आठदहा दिवस तर त्यांना राहून राहून हुंदके यायचे . घरात मुलगा , मुलगी , सून नातवंडे असा सगळा परिवार असूनसुध्दा ते शून्यात हरवल्यासारखे वाटत होते . काकी गेल्यावर चौदा दिवस आशिषने त्यांना गीतासार ऐकवलं . तसे थोडे सावरले होते त्यांनी स्वतः ला खूप छान समजावलं होत . ते म्हणायचे
" कोणीतरी एकजण आधी जाणारच की निसर्गनियम आहे तो " .
गप्पांच्या ओघात खूप जुन्या जुन्या आठवणी ते सांगत बसायचे . फिल्म रिवाईंड व्हावी तशा काही काही आठवणी त्यांना लख्ख आठवत असत . काकी गेल्यावर हे खूप आजारी पडल्यामुळे यांना दवाखान्यात ठेवावं लागलं मग काकांच्या जवळ काळजी घेणारं कोणीतरी असायला हवं म्हणून यांनी बहिणीला बोलवून घेतलं त्यामुळे काकी गेल्यापासून दिवाळी होईपर्यंत त्या बार्शीत राहिल्या पुन्हा दवाखान्यासाठी आमचे पुण्याला हेलपाटे होणार काकांना सारखी दगदग नको शिवाय बार्शीत कसं व्हायचं म्हणत त्यांना पुण्यातच ठेवलं जानेवारीमध्ये आणायचं ठरल तर आजुन एक महिना राहतो इथे प्रतिभाकडे , मलापण जास्त होत नाही , माणूस लागतेय असे ते म्हणाले म्हणून त्यांना तिथे ठेऊन आम्ही बार्शीत आलो पुन्हा थंडी जास्त पडू लागली तसा त्यांना दम लागू लागला तसा त्यांना नेहमीच तो त्रास व्हायचा मग 11 फेब्रुवारीला त्यांना बार्शीत आणायचे ठरले पण सगळ्याच गोष्टी आपण ठरवू तशा होत नसतात . जे विधिलिखित असते तेच घडते म्हणतात त्याप्रमाणे बार्शीत यायच्या आधीच पाच फेब्रुवारीला काका नेहमीप्रमाणे दुपारी जेवले सायंकाळी पावणेसहाला मला आता चहा कॉफी नको म्हणत लेकीला पाणी गरम करून मागितलं ते त्यांनी आपल्या हातांनी अगदी नेहमीसारखं पिल आणि आता थोडंसं झोपतो म्हणत ते आडवे झाले . पाच दहा मिनिटात त्या काकांना सहज बोलू लागल्या तर काकाकडून काहीच प्रतिसाद मिळेना म्हणून त्या काका जवळ गेल्या त्यांना काही हालचाल जाणवेना म्हणून त्यांनी काकांना हलवल तर काका शांत झोपले होते ते कायमचेच ! काकांची प्राणज्योत मालवली होती . त्या मोठमोठ्या आवाजात काकांना हाका मारू लागल्या पण सगळ शांत झालं होत सहा वाजता घबऱ्याघुबऱ्या आवाजात त्यांनी मला फोन केला
" वहिनी , काय झालंय ओ काकाना काका निपचित झोपले बघा , काय करू आता मी , आप्पाला काय सांगायचं मला काही समजत नाही "
तो आक्रोश ऐकून मलाही काही सुचेना 250 किलोमीटर लांब मी काय करू उडून जाऊ का पळून काही समजेना . हे बाहेर चक्कर मारायला गेलेले . तिकडे रडका आवाज ऐकून त्यांचे शेजारी सगळे जमा झाले सुधीरना बोलवून घेतलं डॉक्टरना बोलवून आणल आणि डॉक्टरनी घोषित केलं .पुन्हा मला फोन आला सगळ संपल म्हणून मग मी ज्योतीला फोन केला पुण्यातून आणावं लागेल काय करावं ते पहा . नंतर मुकुंद पण गेले तोवर इकडे हे घरी आले त्यांना कसं सांगावं हा माझ्यापुढे यक्षप्रश्न होता . हळूहळू त्यांना सगळ सांगितलं आणि त्यांना सावरता सावरता माझी पुरेवाट झाली तिकडे शेजाऱ्यांनी खूप मदत केली . सगळ मॅनेज करून पहाटे साडेतीन वाजता ऍंबुलन्स मधून काकांना घेवून त्या बार्शीत आल्या . काकांना शेवटच्या क्षणापर्यंत लेकीचा सहवास मात्र लाभला होता . लेकीला त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले . मातृऋण पितृऋण असेचं काहीसे असणार . कारण काका काकी बार्शी आणि परंडा सोडून कुठेही राहत नसत त्यांना लेकीची आठवण झाली तर त्यांनाच बोलावून घेत मग त्या पण महिना महिना राहत असत . यांच्या आजारपणाच्या निमित्ताने तब्बल आठरा वर्षांनी काका पुण्यात लेकिकडे गेले आणि तिथेच त्यांचा शेवट झाला , हे यांच्या मनाला खूप लागले होते पण जे विधिलिखित असते ते घडते .
पण काका-काकी दोघांनीपण अगदी ठरवल्याप्रमाणे शांतपणे एक्झीट घेतली असे म्हणावे लागेल शेवटपर्यंत पूर्णपणे शुध्दीवर , चालत बोलत चुटकीसरशी देह सोडून अनंतात विलीन व्हावे याला काय म्हणावं . एखाद पान पक्व झालं तरी देठाला पक्के असावे , तसच झाडावर सुकाव आणि अचानकपणे वाऱ्याच्या झुळूकेच निमित्त व्हावं आणि टपकन झाडावरून गळून पडाव असा दोघांचाही शेवट चुटकीसरशी व्हावा , कोणतेही क्लेश न होता नैसर्गिकरीत्या अनंतात विलीन व्हावे यासारखे भाग्य ते कोणते? काकांचे पण 92 वर्षे वय चालू होते तर काकी 86 वर्षाच्या होत्या .
काका म्हणजे अजातशत्रू माणूस . लहान मुलालासुद्धा आदराने बोलणार , अत्यंत कनवाळू , बुजरा स्वभाव , त्यांनी कोणालाही शब्द उचलून बोललेले मी पूर्ण आयुष्यात पाहिले नाही . त्यांची दहशत कधीच वाटली नाही . जेवणात सुद्धा त्यांची कधीही तक्रार नसे . काहीही खायला दिले की तोंडभर कौतुक करत असत . त्यांना चहा प्यायची मात्र खूप सवय होती . घरकामात ते सगळी मदत करायचे . चहा तर बरेचदा तेच करायचे . हल्ली परांड्यात काकाकाकी दोघे राहिले तर काकीना काहीच काम होत नसे तर सगळ काम काका करायचे . त्यांचे बोलणे खूप शुद्ध होते . काका खूप हुशार होते 1952 साली ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकायला होते . त्यांचे इंग्लिश खूप छान होते नातवंडे आली की ते आवर्जून इंग्लिशमध्ये बोलायचे आशिषचे लग्न झाल्यावर त्याने कीर्तीला याबाबत सांगितले तर तिच्याशी पण ते इंग्लिश बोलू लागले तिला त्यांचे खूप कौतुक वाटले .
यांच्यावर , नातवांडवर त्यांचे जीवापाड प्रेम होते . आम्ही परांड्याला जात असू तेव्हा ते हॉलमधे किंवा ओट्यावर आमची वाट पहात बसत असत . त्यांना अस्थम्याचा त्रास होता दरवर्षी थंडीत त्याचा जोर होत असे आठदहा दिवसांचा दवाखाना केला की ओके होत असत . पुन्हा फक्त पंप ओढणे याशिवाय त्यांना कोणती गोळी नव्हती . त्यांना जवळजवळ वीस वर्षापूर्वी असाच कफचा खूप त्रास झाला होता तेव्हा त्यांना ICU मध्ये ठेवावे लागले होते नंतर त्यांना मी प्राणायाम , कपालभाती आणि काही योगासने समोर बसून शिकवली होती तर तेव्हापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही नित्यनियमाने पहाटे त्यांचा व्यायाम झालेला असे . या पाच वर्षात म्हणजे भाऊजी गेल्यानंतर मात्र काकाकाकी दोघांनीही हाय खाल्ली होती त्यातच वार्धक्य त्यामुळे त्यांना एकटे ठेवणे आवघड होत होते पण काकीना परांड्यात रहाणे आवडत होते तेही तसे परांड्यात रमायचे शेवटी कर्मभूमी होती ती त्यांची ! पण तिथे राहिलं की काकांना कामाचं ताण पडायचा त्यामुळे त्यांचा ओढा बार्शीत असायचा , पण एकूणच अस्वस्थता होती .
काका पेशाने ग्रामसेवक होते त्यामुळे त्यांची खेडोपाडी नोकरी होती त्यावेळच्या काळात वाहनांची सोय नसे त्यामुळे बहुतांश नोकरी ही सायकलवर झाली त्यामुळे काकांचे शरीर काटक होते . त्यांनी ग्रामसेवक म्हणून नोकरी केली ती अतिशय इमाने इतबारे केली त्याचाही त्यांना प्रचंड त्रास झाला . तसे तर माझ्या लग्नापूर्वी काका रिटायर झाले होते हल्ली ते म्हणायचे मी जेवढी वर्षे नोकरी केली त्यापेक्षा जास्त वर्षे पेन्शन घेतो आहे .
काका दत्तभक्त होते ते शालेय जिवनापासून गुरुचरीत्राचे पारायण करत होते हल्लीहल्ली बैठक होईना म्हणून त्यांनी ते बंद केले पण बारा महिने ते रोज एक आध्याय वाचन मात्र करत होते . त्यामुळे त्यांना गुरुचरित्र पाठ झाल्यासारखे झाले होते .
कोरोनाच्या निमित्ताने मुलांचे वर्क फ्रॉम होम असल्याने नातवंड नातसून यांचा सहवास मात्र त्यांना छान मिळाला . याच कालावधीत वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे घरात प्रयोग व्हायचे तर तेही उत्साहाने सहभागी होत असत . बसून भाजी निवडण्याचे काम काकीपेक्षा जास्त काका करायचे . कामाच्या बायका येत नसत तेव्हा तर पहाटे अंगण साफ करायचे . परांड्यात पाणी भरणे हे मोठ्ठं काम असायचं तर बार्शीत पाणी आले की त्यांचे उगाचच बेचैनपणे आतबाहेर हेलपाटे सुरू व्हायचे . मी शेवटी त्यांना सांगून टाकलं इथे पाण्याचं काही काम नसते पाणी जाईपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका पाणी सांडलेले असते पाय घसरू शकतो तर ते आत जाऊन दारासमोर खुर्ची घेऊन बसायचे . त्यांचा अस्वस्थपणा पाहून मला हसायला यायचं .
बारा महिने सकाळी लवकर त्यांची आंघोळीची घाई असायची . व्यायाम , आंघोळ , जप ही नित्याची कामे झाली की दिवसभर ते खुर्चीत बसून असायचे .
शेवटी ते गेल्यावर त्यांना बार्शीत आणले होते , तर झोपल्याप्रमाणे त्यांची मुद्रा शांत वाटत होती . गडद गुलाबी रंगाचे सोवळे नेसवल्यावर ते सिद्ध पुरुष भासले . उत्तरायण सुरू झाल्यानंतर वसंत पंचमीला वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचा अंत झाला !
पण काकी वाट पहात आहेत मला जायला हवं या लगबगीने अनपेक्षितपणे आमच्यातून ते निघून गेले . आता यांना एकट्याला कस सांभाळावं , कुठे न्याव , कुठे ठेवावं असे प्रश्न आम्हाला पडण्यापूर्वी त्यांनी पळ काढला असे वाटते एवढं खरं !!
सौ सरिता आनिल कुलकर्णी
9421607248
30/11/2024
थोरामोठ्यांची पुण्याई आणि आशीर्वाद
कालच श्री. नारायण पुरंदरे ( संजुचे मिस्टर ) रिटायर झाले आणि त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा ठरवण्यापासून तो पूर्ण होईपर्यंतची मी सक्रिय साक्षीदार आहे आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की ज्याची चिंता परमेश्वराला असते त्यासाठी निमित्तमात्र कोणीही होऊ शकते . यासाठी मोठ्यांचे आशीर्वाद आणि पुण्याई कामाला येते .
संजू लहानपणापासून कशी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहेच पण पुरंदरेना पण गेल्या तीस वर्षापासून मी ओळखते त्यांच्यात होत गेलेला बदल मी जवळून पाहिला आहे . दोन्ही कुटुंबात या नानाची काळजी त्यांच्या आईना वाटायची तर संजूविषयी आई काका चिंताग्रस्त असायचे पण असा योग जुळून आला आणि यांची रेशीमगाठ बांधली गेली आणि त्या दोघांचाही येणारा प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा आज छान असाच होत गेला . या प्रवासात त्यांच्याविषयी पालकत्व स्वीकारलेले बाबा आणि वृषाली वाहिनी तर आमच्याकडे आमचे हे म्हणजे अनिल कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा होता . सर्वसामान्याप्रमाणे पुरंदरे यांचे जीवन नव्हते पण दोन्हीकडील कुटुंबियांच्या सहकार्याने ते सुकर होत गेले आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
बँकेतून सर्वचजण सेवानिवृत्त होतात पण अशा पद्धतीने समारंभ हा ज्याची त्याची मुले करतात . याठिकाणी तो अपवाद ठरला इथे मात्र अनेकजणांनी आम्ही रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला येणार आहोत असे सांगितले आणि वाढत वाढत मोठा समारंभ घडला . आम्ही नियोजन करत गेलो हे करु ते करु असे करत finaly छान कलाकृती तयार झाली .
मी बँकेत असल्यामुळे बँकेत कार्यक्रम करु आणि 20 एक लोकांना जेवण देऊ असे ठरले पण पुरंदरेंची मध्यंतरी अँजिओप्लास्टी झाली होती त्यावेळी त्यांचे पुतणे आणि भाचे आलेले होते त्यांनी या कार्यक्रमाला आम्ही येणार असल्याचे तेव्हाच सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केला . बरोबर मोठ्या वाहिनी , मुंबईची बहिण आणि सोलापूरचे भाऊ असे 10/11 जण आले . शेंद्रीच्या शेतातील जवळच्या लोकांनी
" नाना आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येणार " असे ठणकावून सांगितले ते 10 जण आले . बार्शी शहरात असलेल्या रिटायर लोकांनी पण
" आम्ही नानाच्या सेंड ऑफला येणार आहोत " असे मला येऊन सांगितले ते 20 लोक आले . आणि आठ दिवसापूर्वी त्यांच्या कॉलनीतील लोकांनी त्यांच्या घरी येऊन सांगितले की
" नाना आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे" . ते 20 लोक आले आणि एकूण 90/95 लोकांची संख्या झाली !!
परत पुरंदरे आमच्या घरी आले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं आणि आता कसं करायचं सांगा म्हणून विचारु लागले .
त्यामध्ये नेहमीचे पडद्यामागचे कलाकार म्हणजे आमचे हे ( अनिल कुलकर्णी ) सर्व करण्यास सज्ज झाले ! बँकेतील सेंड ऑफचे नियोजन नेहमीच माझ्याकडे असते पण घरगुती कार्यक्रम घरचे लोक मॅनेज करतात याठिकाणी दुहेरी नाते असल्याने या दोन्हीकडे माझा रोल होता .
मग घरच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघांनी लिस्ट केली आणि हॉल पाहणे , केटरर्स पाहणे , मेनू ठरवणे हे बाकी सर्व नियोजन केले . आणि टुमदार कार्यक्रमाचे आयोजन झाले .
यावेळी त्या दोघांचे भरपूर सत्कार झाले तर अनेकांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली यामध्ये पुरंदरेंचे आत्तापर्यंतचे घरच्या आणि बाहेरच्या सर्वांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या , प्रेमाच्या संबंधाची ही पोहोच पावती होती . त्यांचा हसतमुख चेहरा , चेष्ठेकोर स्वभाव , मदतीची भावना , गणेशोत्सव , नवरात्रोत्सव यातील उत्साही सहभाग , कामातील वक्तशीरपणा याच गोष्टी ऐकायला मिळाल्या तर संजूच्या साधेपणा प्रत्येकाला भावत होता . पण एक भाषण मी जसेच्या तसे इथे सांगणार आहे . त्यांच्या शेजारी राहणारी तीसएक वर्षाची बाई स्टेजवर येऊन मला म्हणाली ताई मला बोलायचं आहे मी म्हणाले बोला त्या सांगू लागल्या
" आम्ही 3/4 महिन्यापूर्वी पुरंदरे काकांच्या शेजारी भाड्याने राहायला आलो आणि दोन महिन्यापूर्वी काकूंच्या पायाला इन्फेक्शन झाले आणि काकूंना जागेवरून उठता पण येत नव्हते त्यावेळी काका जे करत होते ते पाहून मला असे वाटले की प्रत्येक बाईला असा पार्टनर असला पाहिजे . त्यांची स्वतःची नोकरी , शेतातील हेलपाटे , घरातील सगळी कामं , काकूंचा दवाखाना त्याच वेळी कॉलनीत नवरात्रोत्सव आणि ही सगळी कामे करताना काकूंना समजून घेऊन अजिबात न चिडता काकूची सेवा काका करत होते त्यामुळे मला त्यांच्याविषयी खूपच आदर वाटतो ".
हा मुद्दा मात्र मला मनोमन पटला . खरखरच आता त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण होतील पण एवढ्या दिवसात पुरंदरे यांनी संजुला जे सांभाळून घेतले आहे त्याला तोड नाही त्यांच्याबरोबरच एकूणच पुरंदरे कुटुंबाने पण संजुला खूप छान प्रकारे सांभाळून घेतले आहे . आता पुढची पिढी म्हणजे सगळे पुतणे , भाचे कंपनीला सुद्धा संजूविषयी भरपूर प्रेम आहे आणि संजू सुद्धा पूर्णपणे त्यांच्या फॅमिली मध्ये एकरूप झालेली आहे . पूर्ण फॅमिलीविषयी तिची आपुलकीची भावना आहे . तिला नेहमीच बहिणीपेक्षा जास्त जावा आणि नणंदाविषयी प्रेम आहे त्याचबरोबर पुतणे आणि भाचे तिला जवळचे वाटतात एवढेच काय तर नवीन आलेली सून आर्या हिच्याविषयी सुद्धा तिला खूप अभिमान आहे .
मला आज आई काकांना अगदी विश्वासाने सांगावे वाटते की संजूविषयीचा आपला निर्णय अगदी योग्य ठरला . तिच्याविषयी तुम्हाला खूप समाधान वाटत होते . पण विनाकारण तुम्ही शेवटपर्यंत तिची काळजी करत राहिलात पण तुमच्या पुण्याईने ती खूपच सुखी समाधानी आणि आनंदी आहे . पुरंदरे यांचे पूर्ण कुटुंब असेच एकसंघ राहो सर्वांनी एकमेकास सांभाळून घ्यावे . त्यांच्या पुढील वाटचालीच आभाळ भरुन शुभेच्छा ! उभयतांना सुखी , समाधानी , आनंदी , भरभराटीचे आणि निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
सौ. सरिता कुलकर्णी
Mob 9421607248
No comments:
Post a Comment