Monday, September 21, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6

क्रमशः  भाग 26 ते 30


क्रमशः भाग 26


    

        तेचतेच वातावरण असल्यामुळे हल्ली क्रमशः काय लिहाव हा प्रश्न पडत होता पण श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले तसं पुन्हा नव्याची नवलाई डोकावू लागली मग माझी लेखणी पण सज्ज झाली . तसेच  आॕगस्ट महिन्याची सुरुवात लाॕकडाऊन वाढदिवसाने म्हणजेच यांच्या 2 आॕगस्टच्या वाढदिवसाने झाली . नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा इडली-चटणी-सांबार बेत झाला . इकडे श्रावण महिना असल्यामुळे बाहेर जरी सगळं बंद असले तरी घरात मंगळागौर व शुक्रवार याची धामधुम सुरु होती तर 15 दिवसानंतर बँका उघडल्या होत्या व पहिला आठवडा त्यामुळे बँकेत पण  प्रचंड गर्दी होती मला उसंतच नव्हती . आता  5 आॕगस्टनंतर जिल्हाबंदी उठली तर मिरजेला जाऊन यावे असे कीर्तीला वाटत होते ते बरोबरही होते . कारण आई-बाबांची भेट होऊन पाच महिने झाले होते तेही लग्नानंतर लगेचच . त्यामुळे जिल्हाबंदी उठण्याची वाट न पहाता ई-पास काढून जाऊन यावे अशी चर्चा झाली व  6 तारखेला पास काढला आणि आता मात्र कीर्तीला आनंदी आनंद झाला . इतके दिवस इलाजच नाही म्हणून तीने संयम ठेवलेला होता . कारण मागच्या महिन्यात जायचं गाजलं व पुन्हा कॕन्सल झालं मग सगळ्यांचाच मूड गेलेला म्हणून पक्क ठरेपर्यंत शांत रहायचं असं तिने ठरवलेलं पण आता पक्के झाल्यावर मात्र  8 तारीख केव्हा येते व मी मिरजेला कधी पोहोचते असे तिला झालेलं . आता घरच्या घरी का होईना पण कीर्तीला माहेरी मंगळागौर ,  श्रावणी शुक्रवार मिळणार होता .

      सध्या सगळीकडे कोरोनानं भीषण रुप घेतलं आहे त्याला बार्शी आपवाद नाही पण  सगळीकडेच नियम मात्र  शिथिल केले आहेत त्यामुळे हे पण परांड्याला दोनतीन दिवस गेले होते काका-काकींची औषधे , घरात कमीजास्त पाहून आले . आता आकांक्षाचा क्लासपण रिशेड्युल झालाय . 31 जानेवारीला संपणार फेब्रुवारी अखेर तिचे पुर्ण होऊन जाईल .

     8 तारखेला सकाळी लवकरच आशिष-किर्ती मिरजेला गेले . 4/5 महिन्यांच्या सवयीमुळे घर मात्र एकदमच शांतशांत वाटू लागलं . आणि मिरजेत आनंद ओसंडून वहात होता . खूप दिवसांनी भेटी झाल्या होत्या . फोटो , स्टेटस आणि फोनवरुन मिरजेतील मंगळागौर , शुक्रवार अगदी उत्साहात पार पडलेले समजत होते . ठरवल्याप्रमाणे शुक्रवारी कीर्तीने पुरणाचा स्वयंपाक करुन आई-बाबांना चकित केलं . केतकी पण चार महिने झाले आली नव्हती त्यामुळे घरात दोघेच राहून तेही कंटाळले होते मुख्य म्हणजे केतकीची काळजी करुन करुन आई बेजार झाली होती . तेही खरंच होतं कारण उत्साहाच्या भरात केतकीचं काम चालू होतं . रोज नविन नविन अनुभव आम्हांला पण ऐकायला मिळत होते पण रोजची तीची ड्युटी कोव्हीड पाॕजिटीव्ह वार्डमध्ये होती . कितीही काळजी घेतली तरी विस्तवाशी खेळ होतोय तो त्यामुळे तिच्या आईच्या जिवाला चैन नव्हती . आधीच केतकीची तब्बेत नाजूक , जेवायला व्यवस्थित मिळत नाही परवाच कावीळ झाली त्यानंतर दोनदा आजारी पडली त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालीय . असे उलटसुलट विचार करुन अस्वस्थ झालेल्या मनाला आशिष-किर्तीच्या जाण्यांने थोडासा दिलासा मिळाला , बदल झाला , मुलं आल्यावर ते जरा रिफ्रेश झाले . आठवडाभर राहून आशिष-किर्ती रविवारी बार्शीला  निघाले . पण येण्याआधी केतकी आजारी पडली होती तिला ताप येत होता व टाईफाईड झाल्याचे निदान झाले .  पुन्हा कोरोनाची टेस्ट केली होती त्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या काळजीत भर पडली होती . भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसं झालं .  बार्शीला येताना  रस्त्यातच केतकी कोरोना पाॕजिटीव्ह निघाल्याचे समजले.......पुन्हा सगळे चलबिचल झाले पण केतकी मात्र फर्म होती . हे होणारच होतं असे तिचे म्हणणे होते . एकदोन दिवसांत ताप कमी झाला होता पण औषधांमुळे थकवा जास्त आला होता . गोळ्यांनी पोट भरते म्हणायची . तिची चिडचीड वाढली होती आणि सहनशक्ती उरली नव्हती त्यामुळे फोनवर बोलायचं म्हणलं की तिला रडायला येत होतं ती आईबरोबर तर बोलायचीच नाही पण कीर्तीसोबत बोलायची मग मी  पण बोलत होते . पिळून निघाली होती , फोन झाला की कीर्ती खूप  अस्वस्थ व्हायची पण आम्ही 4/5 जण असल्यामुळे वातावरण लगेचच बदलायचं . आता केतकीला काहीच होत  नव्हते पण दहा दिवस अॕडमीट रहावं लागणार होतं . नंतर सात दिवस क्वारंटाईन ! मग यानंतर मिरजेला आणायचं ठरलं . पण केतकी जाम वैतागली . असेच काळजीत दोनतीन दिवस गेले नंतर केतकी फोनवर व्यवस्थित बोलू लागली मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं .

      आता बार्शीला आल्याआल्या शेवटची मंगळागौर  व पोळा ( आशिषचा तिथिने वाढदिवस )  एकाच दिवशी आला त्यामुळे पुरण व दुसरेच दिवाशी म्हणजे 19 आॕगस्टला आशिषचा तारखेनी लाॕकडाऊन वाढदिवस आला . किर्तीने आधीच गीफ्ट मागवून ठेवलं होतं तर आकांक्षाने सुंदरसा लाॕकडाऊन क्राऊन तयार केला होता . केक झाला व रात्री त्याच्या आवडीचे उडीदवडे केले . 

      आता लगेचच हरितालिका ,  गौरी-गणपती येणार ,  सगळ्यात मोठा सण !  प्रवास करता येत होता मग यांनी पण परांड्याला जाऊन काका-काकींना बार्शीला आणलं . ब-याच दिवसांनी ते आले होते .आता घर माणसांनी भरलं वातावरण सगळं छान वाटतेय पण कोरोनामुळे बाहेरचं  वातावरण तसं गंभीरच आहे . पण बाप्पाच्या आगमनाने घरात चैतन्य आलं . जोडीला निरनिराळे पदार्थ खायला मिळत होते मग सगळे अगदी खूशच ! कामाला कोणीच नाही त्यामुळे तो ताण जरा जास्तच येतोय म्हणून गौरीची तयारी जरा लवकरच सुरु केली . त्यामुळे घरात धामधूम सुरु झाली . उभ्या लक्ष्म्याचं कीर्ती ऐकून होती त्यामुळे कसं असणार सगळं याविषयी तिला खूप उत्सुकता होती . तसही गौरीला दोन दिवस ती येणार हे गृहित होतं पण कोरोनामुळे पाडव्यापासून तिचे सगळे सणवार बार्शीत अगदी शिस्तीत होत होते . अगदी जुन्या जमान्यांसारखं तिचे सासरी रहाणं पडलं आहे . वरचा मजला बांधल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतेय . पण सगळं खुशीत चालू आहे , मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिची प्रवृत्ती व करण्याची धडपड माझा उत्साह वाढवत होती .  तिला बरोबरीने वेळेप्रमाणे आकांक्षा जोडीला होतीच त्यामुळे उत्साह अगदी ओसंडून वहात होता . अगदी मंडप घालणे ,  पडदे घालणे गौरीच्या साड्या नेसवणे , थोडथोडच पण सगळं फराळाचं त्यात रव्याचे लाडू , बेसन लाडू , करंज्या ,  फुलोरा सगळं या दोघींनी विचारत विचारत पहिल्यांदा  केलं . फक्त माझ्या देखरेखीखाली व नियोजनबद्ध पद्धतीने सगळं चाललं होतं . एक दिवस आधीच सगळी तयारी या दोघींना हवी होती कारण त्यादिवशी त्यांना स्वतःला नटायचं होतं . दुपारची जेवणं झाली की या  तयारीला लागल्या मस्तपैकी साडी , मेकअप ट्रेडीशनल लुकमध्ये तयार ! जणू चालत्या बोलत्या जेष्ठा कनिष्ठाच !!  मला पण नऊवारीचा आग्रह मग काकींना पण सेमीपैठणी नेसायला लावली . आणि गौराईच्या स्वागताला तीन पिढ्या तयार झालो . वाजतगाजत थाटामाटात आनंदाने गौराईचं आगमन दोरे घेणं , फराळांनी पोटं भरणे तर पुजेची तयारी ताटात हळदीकुंकू  पंचामृत , गंध , अत्तर , हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या ,  आघाडा , दारातली जास्वंदीची लाल  फूलं , बाकी रंगीबेरंगी फूलं ,  पांढरीशुभ्र पण हळदी-कुंकवाने रंगवलेली टपोरी  माळावस्त्र , भिजवलेल्या वातींचा जुडगा हे सगळं 16-16  गौरीसाठी ,  8-8  बाळांसाठी तर 21-7  गणपती व जिवातीसाठी अशी तीन दिवसांची तीन ताट त्यात दुसरे दिवशी फक्त साळी-डाळी वहायच्या आणि हे सगळे क्षण वैविध्यपुर्ण पद्धतीने  कॕमे-यात टिपण्याची आशिषची कला व ते पाहून आकांक्षा-कीर्तीचं हरखून जाणं ! नवदांपत्याकडून गौरीची शोषडशोपचारे पूजा ! बाकी फारशी आरास न करता समोर फळं , पाणी भरुन तांब्या-भांडं , तांदूळ व हरभरा डाळीच्या राशी , असोल्या नारळाने ओटी , दक्षणा मग सगळ्यांनी मोठ्या आवाजात सात आरत्या धूप-कापराचा सुवास मंद लाईटींग व त्यात प्रसन्न मुद्रेने गौराई ! आणि मग पुढचे दोन दिवस अगदी धामधुमीत कसे गेले समजले नाही . लहानपणापासून आकांक्षाची लुडबूड असते पण यावर्षी तिने पण जबाबदारीने अंगावर घेत काम केलं . दुसरे दिवशी कीर्तीने स्वयंपाकघरात एन्ट्री तर सकाळी लवकरच  घेतली विचारुन विचारुन सगळं काम चालू होतं . लक्ष्म्याचा स्वयंपाक तसा चिकटच असतो पण त्यात मी ब-यापैकी सुटसुटीतपणा आणला आहे .कोणताही आती काटेकोरपणा ठेवला नाही .  एकत्र करुन एकूण दोनच भाज्या एकएकच चटणी व कोशींबीर ,  विकतचं श्रीखंड बासुंदी आणि थोडासा साखरभात , खीर आणि भरपूर पुरण हे पंचपक्वान्न तर पडवळाची कढी , मिरचीच पंचामृत , कटाची आमटी तळणात आळू , घोसावळ , मिरची व पालक भजी , वडे ,  कुरडया हे मात्र यथासांग करत असते कारण सगळेजण आवडीने खातात विशेषतः काका-काकी . मुख्य म्हणजे पाडवा , वैशाखीला ते नव्हते . आणि वयपरत्वे स्वतः करुन खाणे जमत नाही .  मग सगळं निरिक्षण करत करत हे काय ते काय असं विचारात यातला मोठा पुरणाचा भाग कीर्तीने उचलला व बाकी मी केल . हिरवी भाजी , केशरी साखरभात , पांढरा भात , भजी असा रंगीबेरंगी स्वयंपाक हिरव्यागार केळीच्या शेंड्याच्या पानावर नैवेद्याचं पान सजलं .  सगळं मजेत हसतहसत चालू होतं त्यामुळे जरी दगदग खूप झाली असली  तरी फारसा थकवा जाणवला नाही . या सगळ्यामध्ये आव्याहतपणे न सांगता यांची खूप मदत नेहमीच असते . जमेल तसं हातभार लावण्याची आशिषची तयारी होती . मुख्य म्हणजे दिवसातून सहावेळा चहा ! काकांचीपण काहीना काही हालचाल सुरु होती . विडे लावणे , भाज्या-दुर्वा निवडणे काकींच्या मदतीने करत होते . नव्याची नवलाई  , प्रौढत्व आणि परिपक्व अशा तीन पिढ्या हा सण एकत्रितपणे साजरा करत होत्या . हे दोनतीन  दिवस मात्र  आकांक्षा-कीर्ती-आशिष फोटो स्टेटस यात अगदी तल्लीन होते . या सगळ्याचं  कीर्तीच्या माहेरी , आजी , आत्त्या ,  मावशा , मैत्रिणी सगळ्यांना खूप कौतुक होतं . तर इकडे आमचा पंचकन्या परिवार ,  काका-काकी  , आत्या , मैत्रिणी , माझे सासर माहेरचे सगळे ग्रुप अगदी कौतुकाने मेसेजेस फोन करत होते . नविन सुनबाईसोबत व वयस्कर सासुबाईंबरोबर  सगळ्यांना छान वाटत होतं . पिढ्यानपिढ्या हे सण तितक्याच  उत्साहाने , श्रद्धेने मनापासून करण्याची रीत आहे लहानपणी माहेरच्या आंगणात आईच्या शिस्तीत मायेच्या उबीत तर लग्न झाल्यावर सासरी थोडंस जबाबदारीने सासूबाईंच्या पद्धतीने घरोघरी हा सण साजरा केला जातो . त्याच परंपरेत नाविण्यपुर्ण पद्धतीने नविन पिढीला अलगदपणे सामावून घेणं , वसा देणं त्यापासून मिळणारं समाधान नव्या पिढीला  आधोरेखीत करणं ही आपली जबाबदारी आहे , संस्कृती आहे . तीची जपणूक तर व्हायलाच हवी ! आजकाल कामं तर  सगळ्यांना आहेत वेळ नसतो पण वेळ राखीव ठेऊन हे सगळं जसं रुचेल आणि पचेल व झेपेल असं केलं तर उर्जा मिळते हे तर स्वानुभवानेच सिद्ध होते !! आता सध्या सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती असते . अनंतचतुर्दशीला आमच्याकडे बाप्पाचे विसर्जन असते . आता नवरात्रोत्सवापर्यंत थोडंस शांत आहे . माझ्या माहेरी जेष्ठी पौर्णिमेला बेंदूर असतो तर मी लहानपणी आईकडून खूपवेळा  ऐकलं आहे 

" बेंदूर न लागलं सणाचं लेंडूर

दिवाळी न सण ओवाळी "

खरंच आहे हे . यावर्षी मात्र कोरोनामुळे कुटुंबातील माणसं एकत्र राहिली आहेत व सणांमध्ये किती उत्साह असतो याची पुनश्च प्रचीती आली आहे !!!!


क्रमशः भाग 27


आज अनंत-चतुर्दशी , गणपती बाप्पाचे विसर्जन !

गेले दहा दिवस बाप्पाच्या सहवासात , धामधुमीत कसे गेले समजले नाही . नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात पुढच्यावर्षी येण्याचे आमंत्रण देऊन बाप्पाला निरोप दिला .

 आज आशिष-किर्तीला सुट्टी होती पण मला बँक होती . त्यामुळे मी बँकेतुन आले की आम्ही चहा घेत बसलो होतो तेव्हा कीर्ती म्हणाली

 " आमच्या खिडकीत पक्षाने घरटं केलंय आणि त्यात चार अंडी घातली आहेत ."

हे ऐकलं मात्र पण ते केव्हा एकदा  पहाते याची मला खूप उत्सुकता लागली .

पटकन चहा घेतला आणि लगबगीने वरती गेलो . तोपर्यंत अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊन गेले .

" नेमकं कोणत्या पक्षाचं घरटं असेल . आत्तापर्यंत चिमणीचं घरटं पाहिलय पण कीर्तीने अंड्याच्या व घरट्याच्या केलेल्या वर्णनांवरुन तर ते  चिमणीचं तर नसणार मग कोणता पक्षी असेल नेमका तो ? "

तोवर आम्ही वर पोहोचलो . मागोमाग आकांक्षा पण आली . पडदा बाजूला सरकवला तसा पक्षी उडून गेलेला दिसला . मग हळूंच काच सरकवली तर इतकं सुंदर असे बाहेरुन जाड्या भरड्या काड्या वापरुन द्रोणासारखं पण थोडंस अंडाकृती आणि आतून मऊसुत गवत वापरुन अगदी वार्तुळाकार गोल केलेलं घरटं  आणि त्यात अतिशय चमकदार  जांभूळाच्या बियाच्या रंगाची व आकाराने पण तेवढीच चार अंडी ! मुख्य म्हणजे ते घरटं पाहून क्षणभर असं वाटलं ना पट्टी ,  ना टेप , ना कुठलं हत्यार कसं केलं असेल ?  ते तयार करताना या पक्षांनी वास्तूशास्त्र आणि विज्ञान याचा अभ्यास केला की काय ? कारण इतकं खोपचात ते आहे की पाऊस आला तर तो लागणार नाही पण सुर्याची कोवळी किरणे त्यावर नक्कीच पडणार !  ग्रीलच्या आत पण काचेच्या बाहेर , बरोबर स्लाईडींगच्या तीन चॕनलवर अगदी अलगद बनवलेलं आणि त्यात ती अंडी घातलेली ! परमेश्वराची लिला अगाध आहे . कोणत्या विद्यापीठात घेतली पदवी त्यांनी ? ते सगळं पाहून इतकं हरकायला झालं . हे घरटं किंवा अंडी चिमणीचं नाही , हा तर सुगरणीचा खोपा पण नाही मग कोणाचं असेल ?  अशी आम्ही चर्चा करत होतो तर एक चिमणीपेक्षा मोठा पण डोक्यावर तुरा असलेला लांब शेपटाचा काळा पक्षी खिडकीत येऊन इतका जोरात कलकलाट करुन गेला की क्षणभर तो पक्षी आत आला की काय असेच वाटले . पण तो आम्हांला रागवून गेला होता . असं वाटलं की तो म्हणतोय , 

 " हा इलाका माझा आहे . माझं इथे घरटं आहे थोड्याच दिवसात इथे पिल्लू येणार आहे . मला इथे तुमची लुडबूड आजिबात चालणार नाही ".

मग आम्ही हळूच काच बंद केली काचेतून बाहेरचं दिसत होतं . थोड्याच वेळात पक्षीण येऊन घरट्यात बसून गेली . वाटलं जणू काही सगळं अलबेल आहे ना हे पहाण्यासाठी ती येऊन गेली असावी . 

हे सगळं पाहून आम्हांला इतका आनंद झाला की त्याचे फोटो काढून आम्ही स्टेटस टाकले होते . तोपर्यंत पक्षी कोणता याची शोधाशोध सुरु होती . बाहेर जाऊन खिडकीखाली बसले व घरट्याभोवती घिरट्या घालणाऱ्या पक्षाचे निरिक्षण करत बसले . बुलबुल असावा असा तर्क चालू होता तेवढ्यात माझ्या स्टेटसला एका मैत्रिणीकडून 

" व्वा बुलबुलचं घरटं !" 

असा रिप्लाय आला . मग आम्ही गुगलवर 

" बुलबुल पक्षाचे घरटे " 

शोधले आणि अगदी आमच्या खिडकीतल्या घरट्याप्रमाणे अंड्यासहीत घरटी दिसली . मग ते घरटं आणि अंडी बुलबुलची आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. 

मला खूप काळजी वाटतेय त्या अंड्यांची . खूप उंचीवरआहे ते घरटं ,  त्या पक्षांच्या जोडगोळीला त्या खिडकीतच दाणापाणी ठेवावे का ? का तांदूळ ठेवले तर ते खायला इतर पक्षी येतील ? आणि माणसाची चाहूल लागते म्हणून हे पक्षी अंड्याकडे फिरकलेच नाहीत तर ??

छे छे ! असं होता कामा नये म्हणून मी मुलांना खिडकी उघडूच नका म्हणून सांगितले ! पण डोळ्यासमोरुन ते घरटं आणि अंडी हालतच नव्हती . खरं तर हे सगळं नैसर्गिक आहे . त्याची एवढी चिंता करण्याची गरजच नाही . किती पक्षी आणि किती घरटी असतील पण ते अगदी घरातच आल्यामुळे एवढी उत्सुकता वाढली हे खरं !   सकाळी उठल्या बरोबर आधी पक्षी घरट्यात येऊन बसल्याची कीर्तीकडून खात्री करुन घेतली आणि जीव भांड्यात पडला  आणि आता त्याला अजिबात विचलीत करायचं नाही असे ठरविले आहे . पुन्हा संध्याकाळी आतूनच पक्षी आहे का खात्री केली . कीर्ती म्हणाली

" दिवसभर  दिसत होता पक्षी  मधूनमधून चक्कर मारुन यायचा पण  आहे . "

बरं वाटलं चला म्हणजे आपला त्याला डिस्टर्ब नाही होत तर . मग मी गच्चीत गेले . तिथुन मात्र पक्षी उडाले की स्पष्ट दिसत होते  बुलबुलचंच प्रेमी युगूल होतं ते . मधुनच आंब्याच्या , रामफळाच्या ,  चिक्कूच्या झाडावर फेरफटका मारुन परत घरट्यात  येऊन बसत होते ते .

 " अच्छा असं आहे तर . सगळ आलबेल आहे की यांच चालूदे आता आपला त्यांना काही त्रास होणार नाही न ?"

फक्त  हे पहायचं मी ठरवलं . मला एकदम हलकं हलकं वाटलं , प्रसन्न वाटलं . सुमन कल्याणपूरकरचं गाणं गुणगुणावासं वाटलं.


" पक्षीणी ,

प्रभाती चारियासी जाये

पिलू वाट पाहे उपवासी "


हे चित्र दिसू लागलं 

मग खाली येतांना सगळ्यांना सक्त ताकीद देऊनच खाली आले . खरं तर हा सगळा कोरोनाचा परिणाम आहे . ब-याच वर्षांनी प्रदूषण नाही , गर्दी नाही , कलकलाट नाही त्यामुळे निसर्ग मात्र खूष आहे . शांततेमुळे पक्षी प्राणी मनसोक्त विहार करु लागले आहेत . 

        यावरुन मला माझे कॉलेजचे दिवस आठवले . माझी शेवटची दोन वर्षे सांगोल्यात झाली . तेव्हा मी आत्त्याकडे रहायला होते . आत्या ,  त्यांचे यजमान त्यांना आण्णा म्हणत असत दोघेही म्हातारे झाले होते . त्यांची मुलगी मंगल , नातू अतुल व मी रहायचो . खूप जुना धाब्याचा  दगडी वाडा होता तो ! वाड्यात  पाच भाडेकरु होते.  हे जुने भाडेकरु होते मग त्यांच्यात वाद होता त्यामुळे जागा सोडत नव्हते म्हणून घरमालकांनी यांची लाईट बंद केली होती . वाड्यात अगदी कोपऱ्यात तीन फूट रुंदीच्या आंधा-या लंबुळक्या बोळातून गेलं की आत्याच्या घरात प्रवेश व्हायचा ! दोन अंधाऱ्या खोल्या आत स्वयंपाक घर कोपऱ्यात न्हाणीघर बाहेरची एक खोली त्यात पण शेतमालाची पोती असायची . पावसाळ्यात ओल यायची .  दिवसा वाचायचं असेल तरी उजेडासाठी समोरच्या दारात किंवा सवण्याखाली बसाव लागायचं व रात्रीचा अभ्यास तर कंदिलावर ! घेरडीत सगळ्या सुखसोई होत्या पण शिक्षणाची सोय नव्हती आणि मुलींना बाहेर एकटं ठेवणे त्या जमान्यात मान्य नव्हते मग आम्ही पण काहीच तक्रार करत नव्हतो शिकायला मिळतं हाच आनंद होता . मायडीपासून शिकायला बाहेर गेलो आम्ही . सुरुवातीला तायडीकडे किर्लोस्करवाडीला व पुढे आत्याकडे सांगोल्याला . आत्त्याचा वाडा मोडकळीस आलेला होता व भरपूर कपारी होत्या त्यामुळे पक्षी बरेच असायचे . कधी कधी पिल्लं पण दिसायची . खूपदा वाड्यात साप पण निघायचे आणि घर शेणानं सारवलेलं असायचं व भिंती पण सारवायच्या होत्या उंदीर असायचे त्यामुळे घरात बीळं व्हायची आणि मग धग वाढली की विंचू निघायचे . रोज दुपारी बीळं बुजवाचं काम आत्त्या करायच्या . त्यांच्या घरात  सगळ्यांना ती सवय झाली होती मला मात्र ते नविन होतं . विंचू निघाला की आण्णा किंवा मंगल तो कातडी चप्पलने मारत असत . मी मात्र धूम ठोकायची विंचू मारल्याची खात्री झाली की मग घरात यायचे तर लगेच आण्णा नाकातून मोठा आवाज काढत म्हणयचे


" उंदीर म्हणती माझे घर

पाल म्हणती माझे घर

ढेकूण म्हणती माझे घर

विंचू म्हणती माझे घर  "


माझी मात्र बोबडी वळलेली असायची . 

         आण्णा हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व होते . पंचाहत्तरी ओलांडलेले पण स्वभावाने तापट होते देवाची पूजा करत नसत पण दोनवेळा संध्या चुकत नसे त्यांची . सारखं पद्मासनात बसून डोळे मिटलेले आणि गुंईई असा आवाज सुरु असायचा . प्राणायाम ,  शिरसासन पण करायचे . शेतात चार किलोमीटर चालत जाऊन यायचे . फारसं कोणाशी बोलत नसायचे पण  त्यांच्या मनात बोलायचं असलं की समोर बसायला लावायचे मग इंग्रजीत बोलायचे , ग्रामर विचारुन भांबेरी उडवायचे मधूनच कोणतही स्तोत्र म्हणायचे व मागे म्हणायला लावायचे . एकश्लोकी रामायण व एकश्लोकी महाभारत त्यांनीच पाठ करुन घेतलं . खूप वेळ सोडलं नाही की आत्त्या येऊन म्हणायच्या 

" तिला तासाला जायचंय 

बाहेर तिची मैत्रीण आलीय ".

मग माझा जीव भांड्यात पडायचा ते फक्त आत्याकडे तिरके डोळे करुन पहायचे .

" केलीत का सुटका , पळा "

एवढं म्हणायचा आवकाश मी लगेच पळ काढायची . 

      एकदा रात्री मी कंदिलाच्या ऊजेडात अभ्यास करत बसले होते मार्च महिना असल्यामुळे गरम होत होतं . मंगल जवळ येऊन बसली व म्हणाली 

" शरे , चल वर , धगाटा जास्त आहे , यायचा एखादा विंचू . वर मागच्या भिंतीला लागून लाईटचा पोल आहे , उजेड येतोय तिथं  आभ्यास कर , वाड्यातले सगळेजण वर येतात झोपायला , ऐक माझं  गार हवेत बैस ."

विंचवाचं नाव निघालं की मी घाबरले पटकन उठून उभी राहिले आणि आता दप्तर उचलायची पण भिती वाटू लागली . असला वहीखाली विंचू तर ? मग गयावया करत मी मंगलला मदत मागितली . आणि भित्यापाठी राक्षस म्हणतात तसं पसरलेल्या दप्तराखाली मोठा विंचू होता . माझी पळता भुई थोडी झाली . वर गेलेली सकाळीच खाली आले . 

अशा या प्राणी , पक्षी , किटक असलेल्या  वाड्यात दोन वर्षे राहिले होते मी . आणि कंदिलात व रोड लाईटवर अभ्यास केला .  पण आमच्या  आत्त्या खूप प्रेमळ होत्या . जसं आहे त्यात ताज ताज खायला करुन द्यायचा त्यांचा अटापीटा असायचा . त्यांचा स्वयंपाक चुलीवर असे . मला यायला एक वाजतो म्हणून साडेसातला काॕलेजला जाताना खाऊनच जायचं हा आग्रह असायचा त्यांचा . जोडगहू भरडून गुळ घालून केलेला गोड सांजा किंवा लाल तिखट शेंगदाणे हळद घालून केलेला तिखटाचा सांजा , थालीपीठ , गरम भाकरी  हे ठरलेले पदार्थ आसायचे त्यांचे . थंडीच्या दिवसात गरमगरम खायला मजा यायची . मी येईपर्यंत सगळं काम व्हायचं  त्यांच आणि दुपारी वाड्याच्या दारात येऊन वाट पहात बसायच्या त्या . वाड्यातल्या शेजा-यांना कौतुकाने सांगायच्या 

" आमच्या भावाचं घर खेड्यात आहे पण फरशी आहे तिथं . श्रीमंत बापाची लेक आहे ही . एका निमित्ताने राहिलीय आमच्याकडे  " 

आणि मी घेरडीला गेले की शेणानं सारवण्याचं काम उरकून घ्यायच्या .माहेरचा , भावाचा , भाच्यांचा एवढ्या म्हातारपणी सुद्धा इतका अभिमान !!!

एका बुलबुलच्या घरट्याने काॕलेज जीवनातील पक्षी , प्राण्यांच्या सहवासातील गोड , भितीदायक प्रसंगाची आठवण झाली . सध्या या पक्षांचा गोड आवाज आता प्रकर्षाने जाणवतो . वाढलाय असे वाटतेय . आता ही पिल्ल कधी होतील , कशी आसतील , किती दिवस त्यांचा मुक्काम आमच्या खिडकीत असेल याविषयी मात्र उत्सुकता लागली आहे हे खरं !!


क्रमशः भाग 28


        आशिष-किर्तीला बार्शीला येऊन सहा महिने पुर्ण झाले . येतांना अगदी हो-नाही करत आले होते आणि आलं की परत जाणेच झाले नाही त्यामुळे घरात कायकाय झालं असेल , नुकतच फर्निचर केलय धूळ कितपत झाली असेल ,  पेपरचा ढीग पडला असेल काय , फ्रीजची परिस्थिती कशी आहे हे सगळे प्रश्न सतावत होते . त्यात दोघांच्याही कंपनीने आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोवर  WFH च करावे असे सांगितले . आता प्रवास पण सहजासहजी करता येत होता  त्यामुळे पुण्याला एखादी चक्कर मारुन आलेल बरंच होईल म्हणत भाज्या आणि आठवडाभरासाठी लागणारं सगळं सामान गाडीत टाकून आजच ते दोघं पुण्याला गेले आणि घर एकदमच रिकामं रिकामं वाटायला लागलं . घरात काही कामच नाही आणि असलं तरी करावसं वाटेना .

          आज जवळजवळ तीन आठवडे झाले आमचं आख्ख कुटुंब बुलबुलभोवती रुंजी घालत होत . काल पिल्लं घरट्यातून उडाली आणि बुलबुल प्रकरणावर पडदा पडला .  बुलबुल पक्षी एवढंच माहिती होतं . तसं बुलबुलला इतक्या जवळून न्याहाळण्याचा पहिलाच प्रसंग ! त्यामुळे त्यांच्या सवयी किंवा त्यांच्याविषयी काहीही  माहिती नव्हती . पण या 15/20 दिवसात सतत त्यांचा वेगवेगळ्या मुडमधला  किलबीलाट ऐकून त्यांचा आवाज  ओळखीचा झाला होता . सकाळ संध्याकाळ ते ऐकण्यासाठी माझे तर कान आसुसलेले असायचे त्यांच निरिक्षण करण्यात मन रमायचं . त्यांच उडणं , पिल्लांना भरवणं , पिल्लांच्या रक्षणासाठी माणसं किंवा मांजर दिसलं तर जोरजोरात कलकलाट करणं आणि आवडता खाऊ मिळाला तर आनंदाने किलबील करणं प्रत्येक आवाज न्याराच  असायचा . पुन्हा एकदा खात्री पटली की परमेश्वराची लीला अगाध आहे ! निसर्ग भन्नाट आहे ! त्याचा पण आनंद आपल्याला लुटता आला  पाहिजे . 

        सुरुवातीला घरट्यात अंडी पाहिल्यानंतर 1/2 दिवस फक्त खिडकी उघडून पाहिली होती मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून पुन्हा मात्र त्यांना आम्ही काचेतूनच पहात होतो . पण हळूहळू त्यांना पण आमची सवय झाली होती . सुरवातीला पडदा थोडासा जरी हलला तरी उडून जाणारी ती आता आमचा आवाज आला तरी आरामात घरट्यात  बसून रहायची . 2/3 दिवस तर एखादी चक्कर मारायची नाहीतर सतत घरट्यातच बसलेली असायची . आणि 9 तारखेला सकाळी आम्हांला थोडीशी किलबील जाणवली आम्ही आतूनच आंदाज घेत होतो . बहुतेक पिल्लु झालंय असे वाटत होते . मग दुपारी ती उडून गेल्यावर या मुलांनी हळूच खिडकी उघडून डोकावलं तर डोळे बंद असलेलं एकदम  छोटंस एक लाल पिल्लु दिसलं . आशिषने शिळ घातली  तसं लालबुंद चोच उघडून आ केलं की त्याची मान लकलक  हलत होती आणि असा भास होत होता  की जणूकाही ते म्हणतंय

" मला खाऊ , मला खाऊ "

एका सेकंदात तर लगेच त्याचं मुटकुळ झालं पण त्याच्या उघडलेल्या चोचीचं दृष्य इतकं लोभसवाणं दिसत होतं की हरकायला होत होतं .त्या  दोघांचेही अथक परिश्रम सुरु होते . चोचीत चारा घेऊन यायचं  त्याला भरवायचं पुन्हा चारा आणायला जायचं . पण एकावेळी ते दोघे बाहेर जात नसत . एकजण ग्रीलवर , पाईपवर बसलेला असायचं . चारा घेऊन एकजण आलं की दुसरा जायचा . मधुनच बुलबुल पिल्लाला उब देण्यासाठी  घरट्यावर पंख पसरुन बसून रहायची . पुन्हा संध्याकाळी किलबील जराशी  वाढल्या सारखी जाणवत होती मग संध्याकाळी मी घरी गेल्यावर ती नाही असे पाहून पुन्हा एकदा हळूच  काच सरकवली व शिळ घातली तर दोन पिल्लांनी चोच उघडून मान वर  केली . दोन अंडी अजून तशीच होती . इतक गोड दृश्य दिसत होतं ते  पटकन फोटो , video काढला तोवर बुलबुल जोरात आवाज करत ग्रीलजवळ येऊन गेली . जणू ती आम्हांला रागवतेय असे वाटले मग आम्ही लगेच काच बंद केली . त्यानंतर आम्ही छोटीशी सफरचंदाची फोड हळूच  घरट्याजवळ ठेवून काच बंद केली तर लगेचच बुलबुल येऊन बसली स्वतः 3/4 वेळा फोड चाखून पाहिली जणूकाही तिने खात्री केली की 

" माझ्या पिल्लांना हे चालेल न "

 मग दोन्ही पिल्लांना तिने आनंदाने आळीपाळीने भरवले व फोड चोचीत घेऊन उडून गेली . बराच वेळ ती परतच आली नाही मग उगाचच शंकेची पाल चुकचुकली 

" काय झालं बाबा ? आपण पिल्लाला खायला घालतो असे तर तिला वाटले नसेल ? आणि परत आलीच नाही तर ? "

 अंगावर काटाच आला , तिथंच बसले तर जवळजवळ पाऊण तासांनी बुलबुल परत ग्रीलवर येऊन बसली . तिला पाहून मला खूप आनंद झाला . आंम्ही जवळच गप्पा मारत बसलेलो होतो तर तिने काचेवर चोचीने टकटक केले . गेल्या आठदहा दिवसांत कधीच हा अनुभव आला नव्हता  मग आम्ही आंदाज बांधला तिला सफरचंद हवे आहे . मग पुन्हा फोड ठेवली तर  पुन्हा तोच अनुभव आला ती थोड खायची थोडंस पिलांना भरवायची व फोड घेऊन उडून जायची असे दोन तीन वेळा झाले .

      दुसरे दिवशी सकाळी पिलांचा किलबीलाट जरा  आणखीनच  वाढला होता पुन्हा पाहिलं तर तीन पिल्लं दिसली . अजून एक पिल्लू दिसायला हवं होतं आम्ही वाट पहात होतो . आता मात्र चारा भरवण्यासाठी त्या दोघांचे खूप हेलापाटे होत आहेत असं वाटायच मग आम्ही पण जरा सफरचंदाच्या जास्तच फोडी ठेऊ लागलो . पुन्हा एकदा  मोसंबीची फोड ठेवली तीने ती चाखून पाहिली पण पुन्हा तोंड लावलं नाही पिलांना पण भरवलं नाही ती फोड तशीच ठेवली मग आम्ही पण ती काढून टाकली पुन्हा सफरचंदाचीच ठेवली तर स्वतः खाऊन पिल्लांना भरवून फोड घेऊन ती उडत जायची तोच अनुभव सारखा येत होता . ती फोड कुठे नेऊन ठेवते याचं आम्हांला कोडं पडत होतं . मग मी गच्चीत जाऊन पाहिलं तर ती मागे शेतात बदामाच्या झाडावर जात होती . आता त्यांना आमची सवय झाली होती ते घरट्यात नाहीत असे पाहून आम्ही जरी  खिडकी उघडली तरी फारसा दंगा करत नसत . पिल्लं मात्र शिट्टी वाजवली की तोंड वर करुन चोच उघडून किलबील आवाज करायची पण डोळे बंदच होते . पहिलं पिल्लू दोनच दिवसात मोठ वाटू लागलं तर तिसरे दिवशी त्यांच्या अंगावर काळे केस दिसू लागले .  घरट्यात तळाशी बसलेली पील्लं वरवर येतात असे वाटू लागले . चार दिवासात तर पंख दिसु लागले . जागच्या जागी ती भरपूर हलचाल करायची चौथं पिल्लू मात्र दिसलं नाही . या तीनमध्ये पण एक जरासं मोठं दिसायचं व दुसरी दोन लहान वाटायची . त्या द्रोणाएवढ्या घरट्यातसुद्धा मोठं पिल्लू या छोट्यांना आत ढकलून स्वतः  वर यायचं ! आम्हांला भारी मजा वाटायची पहायला , पण भिती पण वाटायची हे जर बाहेर आलं तर खालीच पडेल म्हणून  . मुख्य म्हणजे त्यांना पंख फुटले की ते गोजिरवाणे दिसेनात    काळे काळे पीस दिसत होते पण शेवटी परमेश्वराची लिला ती ! असणारच काहीतरी असे वाटायचे .

पाच दिवसाची पिल्लं मात्र चांगलीच मोठी वाटू लागली छोटे छोटे पंख दिसत होते . अगदी कोंबडीच्या जन्मलेल्या छोट्याशा  पिलाएवढी ती दिसू लागली . घरट्याच्या काठापर्यंत पिल्लं दिसू लागली . दाटीवाटीने एकमेकांना ढकलून शिट्टी वाजवली की तिन्ही पिल्लं चोच उघडून गोड आवाजात किलबील  करायची . तासंनतास रमायला व्हायचं . मी तर एवढ्या गडबडीत पण सकाळी 10/15 मिनीटं आणि संध्याकाळी एक तास वरच असायची . आता 1/2 दिवसात ही चालत बाहेर येतील की काय असं वाटत होतं . सहावे दिवशी मात्र मला संध्याकाळी उशीर झाल्यामुळे पहाता आलं नाही . पण आज मात्र डोळे उघडले होते ,  शिटी वाजवली की डोळे उघडून पहायचे व लगेच डोळे झाकून निवांत झोपायचे तर फक्त त्यांची आई आली तरच चोच उघडायचे . आज घरट्यातच पंख पसरुन जागेवर उडी मारल्या सारखे करत होते . हे सगळे अपडेट्स मला घरी गेले की मिळाले . सहाच दिवसांत कित्ती शहाणपण ते ! असे मला वाटले अजून आठदहा दिवस तर नक्कीच रहातील इथे ग्रीलवरृ उड्या मारायला जागा आहे फक्त खाली पडायला नको . असा विचार करत मी झोपले . रात्रभर गडगडाटासह  खूप पाऊस झाला . झोपेतच ती पिल्लं मला डोळ्यांसमोर दिसू लागली . पाऊस तिरका असेल तर भिजलं  असेल का घरटं ? असा विचार करत मी सकाळी पिल्लांना पहायला गडबडीने वरती गेले तर घरट्यात दोनच पिल्लं ! बापरे पडलं की काय एक पिल्लू असं वाटलं . खाली जाऊन खिडकीखाली पाहिलं पण तिथेही पिल्लू  दिसलं नाही .  नेलं का काय दुसरीकडे ? पण कसं नेलं असेल . माझी अस्वस्थता वाढली  विचार करतच मी  बँकेत आले तर मुलांनी अर्ध्या तासातच मला  मेसेज केला की घरटं रिकामं आहे पिल्लं नाहीत . मुलं पण पिल्लं पडली असावीत म्हणून खाली बोळात पळत गेली तर दोन पिलांना ते दोघे उडायला शिकवत होते व ती पील्लं मस्त उडत होती . बोळात मात्र कोणालाच येऊ देत नव्हती प्रचंड कलकलाट करत तोंडाजवळून जात होती . आता मात्र घरट्यात येतील का नाही याची शंका होती . मग मुले पण त्यांना विचलीत करायला नको म्हणत घरात आली . एकदोन तासात बोळातला आवाज बंद झाला पाहिलं तर सर्वजण उडून गेले होते . दुपारी दोनतीनवेळा बुलबुल मात्र घरट्यात येऊन सफरचंद घेऊन गेली . घरट्यात तळाशी एक अंड तसंच राहिलं होतं .  त्यासाठी येत होती का काय माहित नाही . आता मात्र एकएक गोष्टीचा उलगडा होत गेला नक्कीच यांनी कुठेतरी पिलांसाठी घरटं बनवलं असणार . जसं मांजर पिलांची जागा बदलते तसं पक्षी पण बदलत असणार . निसर्गाची किमयाच न्यारी आहे त्याचा ठाव घेण इतकं सोपं नाही. सगळ्यांना खूपच सुनसुनं वाटत होतं . संध्याकाळी मी गच्चीत जाऊन बसले तर ते दोघेही आंब्याच्या झाडावर दिसत होते मधूनच लांबच्या बदामाच्या झाडावर जात होते आवाज ओळखायला येत होता . नक्कीच त्यांच पिलांसाठीच नवं घरटं बदामाच्या झाडावर असणार . कारण अजून त्यांना निवा-याची गरज आहे असे मला वाटते आहे . आकाशात भरारी घेण्याइतपत पंखात बळ आलं की पील्लं ते घरटं सोडून आपोआपच  जातील हे नक्की ! 

आज मात्र पील्लं घरट्यात नाहीत म्हणून थोडीशी हूरहूर , थोडीशी चुटपूट लागली पण त्यांनी भरारी घेण्यासाठी पहिला धडा गिरवला याचा पण आनंद आहे . मुख्य म्हणजे जवळून पहाण्याचा आनंद आम्हाला मिळाला त्याचे अनेक फोटौ व video संग्रह करता आला हेही नसे थोडके

!!!





क्रमशः भाग 29



           परवाच आठ दिवसांसाठी आशिष-किर्ती पुण्याला जाऊन घरातील थोडी स्वच्छता करुन  आले . एकूणच पुण्यातील वातावरणात व बार्शीच्या वातावरणातील बदल त्या दोघांनाही प्रकर्षाने जाणवला . पुण्याच्या मानाने बार्शी जरा जास्तच सुरक्षित वाटलं . तसेच मोठ जीघर , मोकळं आंगण , मुख्य म्हणजे घरात असल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॕनेज होऊ शकतात याची पुनश्च प्रचिती आली !

           इकडे आम्हांला पण अगदीच सुनंसुनं वाटत होतं . हे दोघे आल्यावर पुन्हा घर भरल्यासारखे वाटले . साधारणपणे तीन आठवडे वेड लावून बुलबुलने तिच्या पीलांसह  मागच्या आठवड्यात पलायन केले होते . तेही पचनी पडायला जरा जडच गेलं .

पक्षांच्या निरिक्षणाचा जरा नादच लागल्यासारखं झालं होतं मला . दोनतीन दिवस तर बँकेतून घरी गेल्यावर मी त्या खिडकीजवळ जाऊन बसायची सफरचंदाची फोड ठेऊन आता येईल बुलबुल म्हणत उगाच वाट पहात .......        पण पुन्हा काही ते फिरकले नाही.......                                       पहिल्या दिवशी तर मी गच्चीत जाऊन बसले . झाडावर बुलबुलची जोडी दिसली . उगाचच मला वाटलं हीच ती असावी .......

थोड्या वेळानं छोटी पीलं उडतांना दिसली . आपल्यात होती तीच असतील का ? येईल का पिलांना घेऊन  खिडकीत ती ? अशी मनाची घालमेल झाली .

पण पुन्हा मनाची खात्री पटली आकाशात स्वच्छंदी विहार करणारे जीव आहेत हे ! असे थोडीच घरात रमतील ते ? यांनी असंच बागडावं आणि आपण फक्त आनंद लुटावा . पण उगाचच  अस्वस्थता , चुटपूट मात्र लागत होती .

           दुसरे दिवशी सकाळी अगदी उजाडत असतांनाच बाहेर कट्ट्यावर जाऊन  बसले . पक्षांचा इतका किलबीलाट ,  चिवचिवाट ऐकायला येत होता .  हे निसर्गाचे खरं रुप अनुभवायला खूप मस्त वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होत .

            सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही या घरात रहायला आलो त्यावेळी या परिसरात पक्षांचा खूपच वावर होता . पोपट तर थव्यांने येत असत . झाडांवर निरनिराळ्या रंगाचे पक्षी दिसायचे . एकदा चिमणीनं घरटं केलं होतं . तेव्हाही असाच नाद लागला होता . पण हळूहळू माणसांची वर्दळ वाढत गेली . पाऊसमान कमी होत गेलं . वाहनं वाढली प्रदूषण वाढलं आणि नकळत पक्षांचा वावर कमी होत गेला . तुरळक प्रमाणात पक्षी दिसायचे .

          यावर्षी कोरोनामुळे माणसाचे  जगणं मुश्कील झालं आहे पण निसर्ग खुलला आहे . पक्षी , प्राणी यांना जणू पर्वणी लाभल्यासारखं झालं आहे . त्यांचा मुक्त वावर , मुक्त संचार अनेक ठिकाणी दिसून येतोय . पाऊस तर जूनला जो सुरु झालाय तो अजून थांबलेला नाही . प्रत्येक नक्षत्राचा व्यवस्थित पाऊस आहे . ओढेनाले  भरुन वहाणं , रस्ते बंद होणं हे प्रकार आलीकडे बंद झाले होते , ऐकीवात  येत नव्हते . पण सध्या चित्र बदललंय पावसाचं वातावरण अगदी चाळीस  वर्षापूर्वी प्रमाणे झाल्यासारखे वाटत आहे .

            परवाच जवळजवळ चाळीस वर्षांनी घेरडीत प्रचंड पाऊस झाला . मारुतीच्या पायरीला पाणी लागलं . शेताचे बांध तुडूंब भरले होते . गावाचा संपर्क तुटला होता  त्या पावसाचे राखीने केलेलं वर्णन , फोटो , व्हीडीओ पाहून मला आमच्या  लहानपणीची आठवण झाली .  त्याहीवेळी मारुतीच्या पायरीला पाणी लागले होते . त्या काळात ब-याचदा असा पाऊस होत असे  मग सगळीकडे पाणी पाणी व्हायचं . आमचं धाब्याचं घर असल्यामुळे माडीवर एकदोन महिन्यात गवत वाढायच . मग गवत काढणं झालं नाही की मुळं पाणी धरायची मग घर गळायला लागायचं . वाड्यातल्या मधल्या अंगणात पाणी साठायचं थोडासा  पाऊस आला की वहायला लागायचं मग आम्ही त्यात कागदी होड्या सोडायचो त्या एकमेकांना धडकल्या की कल्ला  करायचो . खूप पाऊस झाला की पा-याचं तळं भरायचं मग तळ्याची सांड सोडली जायची ते पाणी ओढ्यात यायचं मग ओढ्याचा पूर जरी ओसरला तरी पुढे बरेच दिवस पाणी वहातं रहायचं . उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी , विद्या अशा वाड्यातल्या सगळ्यांबरोबर ओढ्याला धुणं घेऊन जायला मजा वाटायची . ओढ्याच्या काठावर खरबरीत दगड मांडलेले असायचे दगड पकडायचा आणि धुणं धुवायचं . लांब कपडे किंवा साडी धुवायची आणि एका बाजूला पकडून वहात्या पाण्यात सोडून ती चुन्या करताना ओढायची हे तर  धुण्याचं काम न वाटता तो खेळ वाटायचा .

      पा-याच तळं हा एक आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता . दरवर्षी शाळेची सहल गाजून गाजून एकतर बनाळीला जायची नाहीतर तळ्यावर जायची . 1972 च्या दुष्काळात बांधलेले हे तळं आहे . पारे गावापासून जवळच  आलीकडे हे तळं आहे . घेरडीपासून पाच किलोमीटरवर असेल . आम्ही मुली रोज जाणाऱ्या बसने जायचो एखादे सर बरोबर असायचे मुलं सायकलवर यायची . सगळ्यांनी तळ्यावर एकत्र भेटायचं ! अशीच एकदा जतहून येणारी बस खूपवेळ आली नाही नंतर ती पंक्चर झाल्याचे समजले तर वाट न पहाता सरळ चालत परत यायचं सरांनी ठरवलं त्याप्रमाणे आम्ही चालत आलो मात्र पाय खूप दुखले . 

            साधारणपणे दिवाळी झाली की सहल ठरायची आपापला जेवणाचा डबा व पाणी घेऊन जायच . तळ्याच्या काठावर उंच टेकडीवर टुमदार कौलारु गेस्ट हाऊस आहे . गेल्याबरोबर आख्खा परिसर फिरुन यायचं . खूप पाणी असेल तर सांडवा सोडलेला असायचा त्याचं पाणी घेरडीच्या ओढ्यात मिळायचे . तळ्यात छोट्या छोट्या मासळ्या असायच्या . पक्षांचे थवे पाण्यावर उतरतांना पहायला मजा यायची . हे करत असतांना भरपूर दंगामस्ती व्हायची मग थकून भागून गोलाकार बसायचं . जेवणं व्हायची मग थोडावेळ बसूनच गाणी-भेंड्या मग खेळ व्हायचे मग सगळ्यांना ओळीनं बसवून प्रत्येकवेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही भाग वाईकर सर अगदी जोशात कथाकथन स्वरुपात सादर करत असत . ते ऐकताना अगदी स्फुरण आल्यासारखे होई  . मग संध्याकाळी परत घरी यायचं . कधीकधी वाड्यातील व भजनी मंडळातील  सगळ्या बायका जायच्या  . त्यांच्याबरोबर आम्हांला जायला मिळत असे . यावेळी आई सगळ्यांना पुरेल एवढा मोठा डबा भरुन तिचा स्पेशल रावणभात घ्यायची . सगळे अगदी खूश असायचे . 

         पुर्वी अगदी आषाढ महिन्यातच धुव्वादार पावासाला सुरुवात होत असे त्यामुळे सगळीकडे हिरवळ असायची . दिंडी हाही घेरडीत  एक आनंददायी सोहळा असे . आषाढी  एकादशीसाठी कर्नाटकमधून पंढरपूरला निघालेल्या दिंडीचा घेरडीत एक मुक्काम असे . दिंडी आली की पहिल्यांदा ती आमच्या वाड्याच्या बाहेरच्या चौकात यायची . दिंडीचे मानकरी डोंगरे होते त्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा वाडा होता . दोन दिवस आधीच वाड्याची आसपासची स्वच्छता होई . डोंगरे वाड्यात आडाजवळ एक मोठा दगडी हौद होता तो धुऊन भरण्यासाठी एक गडी दिवसभर असायचा . वारक-यांची मुक्कामाची सोय शाळेत केली जायची त्यामुळे त्यादिवशी सकाळीच शाळा भरायची व आकरा वाजता सुटायची दुपारी दोन वाजल्यापासूनच दिंडीतले काही लोक स्वयंपाकासाठी पुढे आलेले असायचे . मग आसपासच्या घरातून तवा-परात , पोळपाट लाटणं घेऊन जायचे ते कन्नड बोलत असत मग खूणेनेच हवी ती भांडी मागायचे आम्ही मुद्दाम काहीतरी बोलायचो तर ते पण कन्नडमध्ये बोलायचे . दोघांनापण एकमेकांच्या भाषा समजायच्या नाहीत मग ते हसत हसत निघून  जायचे . भात-पिठलं भाकरी ते दगडाच्या चुली मांडून करत आणि गावाक-यांकडून त्यांच्यासाठी लाप्शी केली जायची . त्यासाठी मोठा चर खांदला जाई बैलगाडीतून मोठाली लाकड आणून त्यात टाकली जायची व जवळजवळ दहा फुटाचा घेर असलेली तीन फुट उंचीची काईल त्या चरावर चढविली जाई व  त्याच्यावर आधण ठेवलं जायचं . भरडलेले गहू पोत्यात असायचे व गुळाच्या ढेपा असायच्या . काईल चढवतांना , आधणात पोत्यांनी भरड ओततांना मोठ्यांदा विठूनामाचा जयजयकार व्हायचा तो लांबपर्यंत ऐकायला यायचा . हे पाच वाजेपर्यंत झालेलं असे तोवर पायी दींडी आलेली असायची . स्वागतासाठी गावातलं भजनी मंडळ तयार आसायचं . चार वाजल्यापासून आम्हा मुलांचे दिंडीच्या  आवाजाचा वेध घेत दिंडी कुठंपर्यंत आली हे पहायला हेलपाटे असायचे . समोरच्या बोळात दिंडी दिसली की आनंदीआनंद होई . ताईआत्त्याच्या कट्ट्यावर  आम्ही वाड्यातले सगळे तर गावातले लोक बोळातल्या घरांवर , कट्ट्यावर जशी जागा मिळेल तसे दाटीवाटीने उभे रहायचो . दुतर्फा रांगेत मोठ्या दिमाखात दिंडीचं आगमन व्हायचं सुरवातीला त्यांचे स्वयंसेवक त्यांच्यामागे डोक्यावर  तुळशीवृंदावन ,  तुळशीचा हार घातलेल्या मुर्ती घेऊन काही बायका मग विविध वाद्य वाजवत भजन करत येणारं मंडळ आणि मागे वारकरी आसायचे . चौकात मोठा गोल करुन हे मंडळ आणि मुख्य वारकरी उभे रहायचे आणि स्थानीक मंडळ आणि दींडीचं मंडळ गोलाकार उभे रहायचे टाळाच्या ठेक्यावर नाचत आतबाहेर पावलं टाकत  तल्लीन होऊन भजन चाले . असा तो नेत्रदिपक सोहळा पार पडत असे . मग आर्ध्या तासांनी आसपासच्या घरांमधून कळशा भरुन चहा यायचा . त्याचं सगळ्या वारक-यांना वाटप व्हायचं . थोडावेळ इकडेतिकडे झालं की पंगत बसायची तयारी सुरु व्हायची इकडे लाप्शीचा घमघमाट सुटलेला असायचा . कधीकधी प्रसाद म्हणून त्याची चव पण घेतली आहे . आम्ही उगाचच इकडूनतिकडे जणू काही घरचं कार्यच आहे अशा थाटात फिरायचो . पुर्ण बोळात काठ्या पुरुन लाईटची व्यवस्था केली जायची . दुतर्फा पंगत बसायची . दोनतीन पंगतीत त्यांची जेवणं व्हायची . जेवलेले लोक झोपायला पटकन निघून जायचे . रात्री सगळं संपायला दहा आकरा व्हायचे . नेलेली भांडी ते लोक रात्रीच परत आणून द्यायचे . अशात पाऊस आला की फजिती व्हायची . सगळ्यांची झोपायची सोय शाळेत केली जायची कधी कधी जागा पुरली नाही तर कोणाच्याही ओसरीवर त्याच्यातले मुख्य वारकरी येऊन झोपायचे . पहाटे तर दिंडी गेलेली असायची . असा तो दिंडी सोहळा पार पडायचा  .






क्रमशः भाग 30


         चैत्री पाडव्यापासून अगदी श्रावण महिन्यापर्यंत असे वाटायचे की आशिषचे नविन लग्न झालंय कोरोनामुळे बरेचसे सण मिळाले आणि आता तोंडावर आलेले पण बरेचसे सण आहेत . कंपनीने बोलावलं तर जावं तर लागणारच पण पुन्हा सणासाठी येता येईल का ? रजा मिळेल का ? असे प्रश्न पडायचे . पण बघत बघत गौरी-गणपती झाले , नवरात्र-दसरा  झाला आणि आता दिवाळी आली . यामध्ये सगळ्या सणांबरोबर नृसिंहाचं व देवीचं नवरात्र  कुलधर्म कुलाचार पण पाहण्यात आला ह्याचं समाधान वाटलं . गेल्या आठ महिन्यांपासून सगळे एकत्र रहातोय . पाहुणे मंडळी बोलावता आली नाही पण घरच्याघरी का असेना सगळे सण अगदी यथासांग पार पडले . साग्रसंगित स्वयंपाक आणि छानपैकी आवरणे हे दोन अगदी अलिखीत नियम झाले होते . माझं बँकेत जाणे आणि काही  कामिनिमीत्त यांच बाहेर जाण याव्यतिरीक्त सुरुवातीला सहा महिने कोणी घराबाहेर पडलेच नाही . अगदी सुरुवातीला कलिंगडाच्यावेळी शेतात जायचं असे आमचे ठरले होते पण तेव्हा तर लाॕकडाऊनचे एकदम कडक  नियम लागू  झाले . आणि मार्चपासून अनेकदा शेतात जायचा आम्ही प्लॕन करायचो आणि काही न काही कारणांमुळे जाणं कॕन्सलच व्हायचं . एकवेळेस तर पहाटे उठलो पण पावसाचा इतका जोर होता की परत कॕन्सल करावं लागले . परवाच्या रविवारी मात्र खूप दिवसांपासून ठरवत असलेला प्लॕन यशस्वी ठरला . आकांक्षाचं शेड्यूल बीझी असल्याने ती आली नाही मग आम्ही चौघेजण निघालो . बरोबर आल्याचा चहा घेऊन सकाळी सव्वासहाला आम्ही घरातून बाहेर पडलो कारण आशिषला गावाबाहेर छान हिरवळ असेल तिथे सुर्योदयाच्यावेळी थांबायचे होते . कॕमेरा घेऊन तो सज्जच होता . मग आम्हीपण पाऊण तास ती सकाळ उगवता सुर्य न्याहाळत अगदी रोडवर घालवली . थंडी होतीच त्यामुळे गरमागरम चहा प्यायला मजा आली . निसर्गाच्या सानिध्यात आमचे पण फोटो आले ! रमत गमत आम्ही साडेसातला शेतात पोहोचलो . वाटेकऱ्याची बायको सुनिता तिची चूल पेटलेली होती तिने लगेच चहा केला . सकाळी जरी हवेत गारठा वाटत असला तरी दहाच्यापुढे ऊन चांगलंच तावत होतं त्यामुळे आम्ही शेतात लवकर फिरायचं ठरवूनच निघालो होतो . यावर्षी पाऊस खूपच झाला होता त्यामुळे तूर खूपच जोमाने वाढलीय आणि पिवळ्या धमक फुलांनी बाहरलीय हे यांच्याकडून ऐकून होतो . सुनिता म्हणाली थंडीत सकाळच्या वेळी तूरीत दव फार असतं , तुम्ही जरा तासाभरांनी जावा . तसं आशिष पटकन ऊठला आणि म्हणाला  

" तीच तर मजा अनुभवायची आहे , निघुया आपण चला "

मग आम्ही सगळेच निघालो आणि पहिल्यांदा तूरीच्या शेतात जायचं ठरवलं . 

       आमच्या शेतातून चाळीस वर्षापुर्वी कॕनाॕल गेला आहे त्याला फार पुर्वी चांदणी तलावाचं पाणी सोडत असायचे म्हणे पण मी पहाते तसं या तीस वर्षात कधी पाणी नव्हतं हा भाग वेगळा !  पण कॕनाॕल आहे व पलीकडे जाण्यासाठी त्यातूनच पायवाट आहे पावसाळ्यात तिथे गवत वाढतं मग पलिकडे जाता यावं म्हणून कॕनाॕलवर साधारण एक फूट रुंदीचा व वीस फूट लांबीचा सिमेंटचा पोल आहे . आता आम्हांला पोलवरुनच पलिकडे जावे लागणार होते आणि आपल्यासाठी ती कसरत असते . कीर्तीसाठी तर हे नविन होतं सातआठ फूट खोल असलेल्या कॕनाॕलच्या पोलवरुन आम्ही पलिकडे गेलो . मी पण बऱ्याच दिवसांनी पोलवरुन गेले पण मजा आली . बांधावरुन उतरलो की तूरीचं शेत होतं . एवढी उंच तूर मी पण पहिल्यांदाच पाहिली . मधेमधे देशी भेंड्यांची व देशी गवारची झाडं लकडलेली होती . आकांक्षाला भेंडीबियांची आमटी फार आवडते मग भेंड्या व गवार तोडत हे पुढे त्यांच्या पाठोपाठ आम्ही असे पुढेपुढे निघालो . धुक्याच दव , गारठा आणि तूरीची पिवळी फूलं जणू काही हील स्टेशनच्या बागेत फिरतोय असा भास झाला . तेवढाच एक विकेंड एन्जाॕय करायला मिळाला असं मुलांना वाटलं . तसं तर घरी रहायला मिळत असलं तरी खरं तर वर्क फ्राॕम होममुळे मुलं अगदी वैतागून गेली आहेत फिल्ड वर्कची सवय असल्यामुळे आशिषपेक्षा कीर्तीला फोनवर मॕनेज करणं तसं त्रासदायक होतंय . मग मोकळ्या वातावरणात शेतात फिरायला जोडी आगदी खुशीत होती . चला तेवढाच बदल म्हणत यांच्या मागोमाग आम्ही शेतात फिरु लागालो .

        यांनी सुरुवातीला अगदी काॕलेजला असतांना दोन वर्षे शेती पाहिली होती पुन्हा बँकेत नोकरी लागल्यावर जालन्याला जावं लागलं पुढे बदली झाल्यावर लग्न झालं मग दोघांची नोकरी लहान मुलं त्यामुळे मात्र लक्ष देता आलं नाही . तेव्हापासून सुनिल भाऊजी लक्ष देऊ लागले मग यांनी पण दुर्लक्ष केलं . पण भाऊजी गेल्यावर सगळंच पहायचं यांच्याकडे आलं . हळुहळु बघत रिटायर झाल्यावर यांनी शेतीत चांगलंच लक्ष द्यायला , सुधारणा करायला सुरुवात केली . प्रामुख्याने पाणी प्रश्न सतावतो आहे हे लक्षात आल्यावर तीन चार बोअर घेतले . तरीही पाण्यावाचून काम आडतच होते मग एक मोठा निर्णय घेतला आमच्या शेतात एकच सामायीक विहीर होती त्याचं पाणी पुरत नव्हते म्हणून स्वतंत्र विहिर घ्यायचं ठरवलं . आणि दोन वर्षांपुर्वी विहीरीचं खोदकाम झालं , पाणी लागलं व गेल्या वर्षी विहीरीचं बांधकाम झालं . हे सगळं करतांना कारण नसताना भरपूर त्रास झाला पण हल्ली त्यांची शेतीची ओढ मात्र खूप वाढली व त्यांच्या नादाने म्हणा किंवा घरात होणाऱ्या चर्चेमुळे म्हणा आम्ही सगळेच शेती या विषयावर रमू लागलो . काका-काकींना हे सगळं ऐकायला मिळत वयोमानामुळे शेतात जाता येत नाही पण  काका मात्र कौतुकाने म्हणत आसतात  

" आमचं गाव म्हणजे आसू ! त्याला सावळारामाचं आसू म्हणून ओळखले जातं . शेतातली आत्ता जी सामायीक विहीर आहे ती सावळारामांनी घेतलेली त्यांच्या  काळातील ती जुनी विहीर आहे त्यानंतर पाच सहा पिढ्या गेल्या पण कोणीही विहिर घेण्याचं धाडस केलं नाही पण सावळारामांनंतर ते काम आनिलनं केलंय पुढच्या अनेक  पिढ्यांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे  ".

आणि खरंचच तसे झाले आहे कारण विहिर घेणं त्याचं बांधकाम करणं हे काम आजच्या काळात एवढं सोपं नाही . या दोन वर्षात त्यानुषंगाने लेव्हल करणे , बांध भरुन घेणे अशी पुढची कामं निघत गेली व ते करत राहिले . ऊस , कलिंगडे , मिरच्या , टोमॅटो अशी पीकं घेत राहिले व जास्त जास्त शेतात गुंतत गेले . पण यावर्षी आधी कोरोना मग जास्तीचा पाऊस त्यामुळे ताली फुटणे , मोठाल्या भगळी , खूप मोठं गवत ही कामं वाढली गेली . आता पुन्हा सगळी डागडूजी करणं आलं .

         शेतात कुठे काय केलं होतं व आता पावसामुळे काय झालं हे दाखवत ते पुढे व आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो कीर्ती पहिल्यांदा शेतात आली होती मग तिला , आशिषला सगळी माहिती सांगत ते चालत होते . मग आम्ही नव्या विहीरीकडे गेलो . सध्या विहीरीला चांगलं पाणी आहे उपसाच नाही . हल्ली  आशिष पण बरेचवेळा शेतात आला आहे सगळीकडचे फोटो घेत त्याचं पण निरिक्षण चाललं होतं . आडीच तीन तास फिरुन आम्ही जुन्या विहीरीवर आलो तर यावर्षी या विहीरीला पण भरपूर पाणी आहे पण गाळपण तितकाच आहे . पण या विहीरीचं बांधकाम चिरेबंदी आहे नविन विहीरीच बांधकाम रींग टाकून स्लॕब टाकलेलं आहे हाच तो फरक आहे दोन्ही विहीरीत . आता आम्ही वस्तीकडे निघालो . आता मात्र ऊन्हाचा चटका वाढला होता आणि पोटात पण कावळे ओरडत होते .

तोवर इकडे सुनिताने कारल्याची भाजी , पिठलं , तव्यावर ठेचून खरडा करुन ठेवलं होतं व चुलीवर भाकरी चालू होत्या ते पाहूनच तोंडाला पाणी सुटलं . कीर्ती पहिल्यांदा आली म्हणून सुनिताने तळण पण तळले होते . खमखमीत जेवण असणार हे माहित होते त्यामुळे मी बरोबर ताकाची बाटली घेतलीच होती . चार घास जास्तच खाऊन  फक्कड जेवण करुन दुपारच्या विश्रांतीसाठी आम्ही घरी पोहोचलो !!

     आता वेध दिवाळीचे आहेत . घराची साफसफाई ब-यापैकी झाली आहे . यांनी कालच भरगच्च किराणा आणून ठेवला आहे . आकाशकंदील , पणत्या , लाईटच्या माळा ही कामं आजउद्या होतील तर माझी पण कोरडी तयारी तर झाली आहे . आज रविवार मग करंजीचं सारण , अनारसा पीठ तयार झालं आहे , भाजणी दळून आणलीय . कायकाय करताय करत कीर्तीचं निरीक्षण चालू  आहे . येत्या शनिवारी लक्ष्मीपूजन आहे मग तू काय घालणार मी काय घालणार करत आकांक्षा-कीर्तीची कालपासूनच  लगबग सुरु आहे ज्वेलरी , कपडे , पार्लर अशी त्यांची धावपळ सुरु आहे कारण मुख्य आकर्षण फोटोचं आहे . तयारी करुन ठेवली म्हणजे बरं  पुन्हा उद्यापासून आपापले उद्योग सुरु होतात .






कोंदण भाग 2

  


कोंदण भाग 2


     

प्रकरण 9 वे


आक्कीचं लग्न

31 जुलै 2020

             1975-76  याकाळात मुलींना शिक्षणासाठी बाहेर ठेवणे ही फारशी सहजपणे घडणारी गोष्ट नव्हती  पण भविष्यात आक्कीने स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे कारण तिच्या अपंग असण्याचा संबध थेट तिच्या वैयक्तिक जिवनावर पडणार होता म्हणून तिला दोन वर्षे त्याकाळात शिक्षणासाठी होस्टेलवर ठेवले होते . ती पण व्यवस्थित शिकली . तिला त्यावेळी स्टाईपेंड मिळायचा खेड्यातून शहरात गेलेली मग तिने तिथे खूप पिक्चर्स पाहिले होते तसेच चेहऱ्यावर लावायला ती स्नो वापरायची त्याचं आम्हांला भारी आप्रूप वाटायचं . पण तिने एवढाच काय तो तिच्या वागण्यात केलेला बदल होता आणि तेही आईला सांगून . त्यातही तिने तिच्या स्टाईपेंडच्या पैशातून  माझ्यासाठी तेव्हा फॕशन असलेला शामला कलरचा पाकिजा ड्रेस आणला होता . असे वडिलकीच्या नात्याने ती लहान बहिणींशी वागत असे . आता तिची एक बाजू अशी आहे मग तिचे लग्न होईल का आणि झालं तर तिला जोडीदार कसा मिळेल असे अनेक प्रश्न आई-काकांना व स्वतः आक्कीला पण सतावत असत . ज्योती दीड वर्षाची तर आक्की आता एकोणीस वर्षाची म्हणजे उपवर झाली होती अशा पाच मुली घरात . आता डीएड पुर्ण होऊन ती घरी आली होती व नोकरीच्या शोधात होती . पण नेमकं त्याच वर्षी डीएड झालेल्यांची संख्या अतिरीक्त झाली होती व त्यामानाने जागा कमी होत्या परिणामी आक्कीला आता शिक्षण होऊन नोकरीची वाट पहावी लागणार होती . तसं  आता वय पण लग्नाचं झालं होतं . उपवर मुलगी घरात होती तिच्या पाठोपाठ लगेचच लग्नाला येणारच आशा वयात तायडीपण होती . तायडीचं दहावी झाल्यावर तिच्या शिक्षणाचा थोडासा विचार चालला होता . स्टेनोसाठी प्रयत्न केला पण ते फारसं मनावर घेतलं नाही एकटीदुकटी अंगापिंडाने मोठी असलेली काळीसावळी पणा स्मार्ट असलेली मुलगी कुठे बाहेर ठेवायची अशा विचारातून तो विषय बाजूला सारला गेला . तायडीने आईकडे खूप हट्ट केला पण त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही . ती पण हुशार  , चाणाक्ष  होती .  हरतऱ्हेंने तिने प्रयत्न केले पण तिला काही पुढच्या शिक्षणाची संधी मिळाली नाही . आई-काकांंचा हा एकच निर्णय मागासलेपणाचा ठरला पण पुढे मात्र आयुष्यभर ती खंत तिला व आई-काकांना कायम राहिली . 

       काकांना पाच मुली आहेत . मुलींची रांगच आहे असे संवाद मात्र कानावर पडत असत .  

" ज्यांच्या घरी म्हणा किंवा ज्यांच्या पोटी मुली आहेत ते खर्चांने दबले जाणार . मुलींसाठी वरसंशोधन म्हणजे बापाला जोडे झिजवावे लागणार आणि मुलगी म्हणजे डोक्याला ताप व  मुलगा म्हणजे प्रतिष्ठेची बाब "

त्याकाळात अशा प्रकारची साधारण विचारसरणी समाजात रुढ होती . आमच्या घरच्यांपेक्षा हा विषय इतरांसाठी चर्चेचा होता . तोंडावर नाही पण दबक्या स्वरातील चर्चा चालायच्या , कोणी तिरकस बोलतेय असं जर आईच्या निदर्शनास आलं तर आता मात्र आई सडेतोड उत्तर देत होती . पण आई-काकांंनी  कधीच मुलींना कमी लेखलं नाही पण एकूणच  समाजरुढीप्रमाणे वरसंशोधन करावं हा विचार मात्र त्यांच्या डोक्यात घोळू लागला . पडेल धोरण मात्र कधीही त्या दोघांनी मान्य केले नाही . एक मात्र विशेष होतं की यांची स्वतःची काही तत्व होती आणि ती मात्र त्यांनी शेवटपर्यंत पाळली . यातले मुख्य तत्व म्हणजे लग्नात हुंडा द्यायचा नाही . ते स्वतः घोषीत करत असत मी या पद्धतीने मुलीचे लग्न करुन देतो . मुलींची जावयाची खूप हौस करणार .  त्यांना जे वाटेल ते स्वतःहून करणार पण पैसा देणार नाहीत . त्यावेळच्या रिवाजांनुसार हे मात्र विशेष होतं .

          आणखी एक संकट तेव्हा आलं ते म्हणजे त्यादरम्यान मला ताप आला आणि तो नेमका  टाईफाईडवर गेला . जवळजवळ तीन आठवडे मी झोपून होते . वार्षिक परिक्षा तोंडावर आलेली आणि मला शाळेत जाता येईना झोपून झोपून डोक्यात टक्कल पडले , रंग काळवंडला तायडीने तेव्हा मला बरं वाटावं , परिक्षा देता यावी यासाठी नवस म्हणून सोमवार केलेले . महादेवाला जायची प्रसाद , आंगारा आणायची . अरविंद काकींनी सांगोल्याच्या केळकर डॉक्टरांकडे न्यायला सांगितले . मग त्यांचे औषध चालू होतं . परिक्षेपर्यंत ताप गेला परिक्षा झाली . पण मला बसवत नव्हतं . आणि अचानक माझ्या पाठीत उजव्या बाजूला दुखू लागले , पाठीला बाक आल्यासारखे जाणवू लागले व तिथे स्पर्श सुद्धा करु देत नव्हते इतकी पाठ दुखायची . आक्कीचा अनुभव होता त्यामुळे सगळे खूप घाबरले . डाॕक्टरी इलाज झाले त्यांनी पण पाठीला बाक येऊ शकतो असे सांगितले तशी सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली . पुन्हा सांगोल्याला नेऊन आणलं औषधाबरोबर डाॕक्टरनी रोज विशिष्ट पद्धतीने औषधी तेल लाऊन चोळायला सांगितले . तोवर काकांनी इकडे घरगुती इलाज पण शोधले . एका चोळणाऱ्या माणासाविषयी त्यांच्या ऐकण्यात आलं . त्याला घरी बोलावून घेतलं व पुर्ण बरं होईपर्यंत रोज घरी येऊन चोळायला ठरवलं . तो चोळत असतांना स्वतः समोर बसून रहायचे . दोनतीन  वेळेस तो काही कारणांनी आला नव्हता तर त्यात्यादिवशी काका स्वतः तो जसं चोळायचा त्या पद्धतीने चोळत होते पण खंड पडू देत नव्हते , कारण आक्कीचं उदाहरण होतं घरात त्याची पुनुरावृत्ती नको होती . आणि मग  दीडदोन महिन्यांनी मी पुर्ण बरी झाले . तेव्हा जीव भांड्यात पडला . 

    इकडे शेतात काकांचे वेगवेगळे प्रयोग चालूच होते . ऊस होताच त्यामुळे गुऱ्हाळ तर याहीवर्षी होणारच होतं जोडीला इतर पीकं आणि जनावरं पण वाढविली . गायी , म्हशी , बैलं , मेंढ्या . हात घालेल तिथे यश येऊ लागले , करेल त्याचं सोनं होऊ लागलं काका खोऱ्यांन पैसा ओढू लागले . तसं गावात पण त्यांना लोक मानू लागले सल्ला घेऊ लागले . गावात पण काही लोकांनी ऊस केला . त्यात अंता काका होते . त्यामुळे त्या दोघांत नात्यापेक्षा मित्राच्या नात्याने जास्त चर्चा व्हायची . आक्कीच्या लग्नाचा विषय डोक्यात होताच .

        सहजच आंता काकांकडूनच आक्कीसाठी एक स्थळ आले . जवळच दोन गावं सोडली की एक खेडे गाव होतं मेडशींगी . पण डायरेक्ट बस नव्हती मग सांगोल्याहून जावं लागे . काका व आंता काका दोघेजण घर पहायला म्हणून मेडशिंगीला जाऊन आले . घर एकदम साधं मागची बाजू पडलेली . मुलाला आई नव्हती दोन बहिणी व एक भाऊ आणि वडील . मोठ्या बहिणीचं आधीच लग्न झालं होत व नुकतेच दुसऱ्या बहिणीचं लग्न झालेलं . त्यामुळे  आता घरात वडील व दोन मुलं होती मग बाईमाणूस कोणी घरात नाही  म्हणून या मुलाचं लग्नाचं पहात होते . आई गेल्यामुळे शिक्षण अर्धवटच राहिलं होतं . नोकरी नाही तशी परिस्थिती पण बेताची व मुलगा पण साधरणच फारशी धडपडी वृत्ती नव्हती . वडील भिक्षुकीचं काम करत होते शेती पण कोरडवाहू होती . त्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत मग मुलगी मिळणे पण कठीण होते . इकडे आक्कीची अशी अडचण म्हणजे दोन्ही बाजूंनी काही न काही अडचण होती . पण माणूसकीला माणसं एकदम साधी होती . सांभाळून घेण्याची वृत्ती होती . मदतीचा हात पुढे केला तर सावरण्याची शक्यता होती . काकांनी आक्कीला सविस्तर सांगितले मुलांने नोकरी जरी नाही केली तरी त्यांना शेती आहे आपण शेतीत सुधारणा करु शकतो . मी आहे मागेपुढे पहायला बघ तुझं मत सांग . तिला निर्णय घ्यायला पुर्णपणे मोकळीक दिली  मग तिने सारासार विचार केला  सध्यातरी आपल्याला नोकरी नाही पण पदवी आहे भविष्यात लागू शकते तरीपण स्वतःकडे पहाता यापेक्षा मुलाविषयी जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचं होईल इकडे काकांना तिच्या पाठी चार मुली आहेत मग आपल्या जबाबदारीतून मुक्त केलं तर आई-काकांना पण दिलासा वाटेल म्हणून मग तिने आई-काकांंना या लग्नासाठी तयारी दर्शविली . मग पहाण्याचा कार्यक्रम झाला . तीला मेडशिंगीला नेऊन आणले . दोघांनीही एकमेकांना पाहिलं. आक्कींने घर पाहिले व दोन्हीकडून होकार दिसल्यावर आंता काकांनी मध्यस्थी करुन ते लग्न जमवले . हे लग्न केले तर सध्या तरी एका आक्कीबरोबर आणखी चार जणांची जबाबदारी वाढू शकते हे काकांना उमजत होते पण आक्कीचा संसार उभा रहाणार होता याचा त्यांना खूप आनंद होता . आर्थिक बाजू कशाही प्रकारे उंचावता येऊ शकते याचा त्यांना विश्वास होता . घेरडीत दारात लग्न  करुन द्यायचं काकांनी ठरवलं . तशी आक्की विषयी वाड्यात पण सगळ्यांना खूप माया होती . त्यामुळे तिचे लग्न जमले म्हणलं की वाड्यात उत्साहाला उधाण आलं . तिचे लग्न फक्त आमच्या घरापुरते मर्यादित न रहाता वाड्यातील कार्य म्हणून पाहिले जाऊ लागले . मुख्य मान सगळ्यात मोठे म्हणून पंत काका व मावशींचा ठरला त्यांनी सांगायचं व त्याप्रमाणे  प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडायची . आई फक्त आडोतीस वर्षांची व काका चौव्वेचाळीस वर्षाचे आणि इतक्या तरुण वयात त्यांना पहिला जावई आला होता . त्यामुळे अतिशय हुंबाडीनं व  थाटामाटात हे लग्न पार पडले . जोडीला मदतीला मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू होतेच . सगळ्या आत्या , काका-काकू , अगदी आनंदाने हजर होते . काकांच्या सोलापूरच्या मामा-मामींना आई-काकांच फार कौतुक होतं . त्यांचा लाडका भाचा भाऊ म्हणजे अतिशय धाडसी मुलगा आहे व त्याची जोडीदारीण म्हणजे आई त्याला साजेशी आहे असे ते म्हणत . काकांना हल्ली ते बागायतदार म्हणून संबोधत असत . त्यावेळी आप्पा म्हणजे जवळ्याचे आजोबा खूप आजारी होते . त्यांच वास्तव्य गोंदा मामाकडे होते त्यामुळे आठ दिवसाला घेरडीला येणारा गोंदा मामा लग्नाच्या आधी काही येऊ शकला नव्हता . मोठ्या मामाचे व आईचे थोडंस बिनसलं होतं त्यामुळे तेही नव्हते . आईचे बनाळीचे शंकर मामा व मामी मात्र जातीने हजर होते . त्यांना पण आई-काकांच फार कौतुक वाटत असे . पका मामाकडून त्यांना सगळा वृत्तांत समजत असे . त्यामानाने आईच्या  माहेरचं गोत नव्हतं त्याचं तिला दुःख होत होतं . 15 डिसेंबर 1976 ला दुपारी आकरा वाजता लग्नाचा मुहूर्त ठरला होता आणि स्पेशल जीप करुन आप्पांसह गोंदा मामाचं कुटुंब पावणेआकरा वाजता घेरडीत हजर झालं होतं . आईचा आनंद गगनात मावेना आणि आप्पांची अवस्था पाहून तिचे दुःख अनावर होत होते . अशा संमीश्र भावना होत्या तिच्या पण धीर द्यायला सगळा गोतावळा होता  . इकडे खेडेगाव असल्यामुळे लग्नात सगळा मेळ घालेपर्यंत आई-काकांची खूपच दमछाक झाली व पहिले कार्य असल्यामुळे नातेवाईक तितकेच व स्नेही पण तितकेच आले . आणि आख्खा गाव होता जेवायला . कार्य पार पडेपर्यंत जीव अगदी मेटाकुटीला आला . मग मात्र पुन्हा घेरडीत लग्न करायचं नाही असे काकांनी ठरवले . इकडे मेडशिंगीहून वऱ्हाड आणायला काकांनी बैलगाड्या पाठवल्या होत्या . लग्नानंतर त्याच गाड्यांनी वऱ्हाड  नवरीसकट मेडशींगीला गेलं . नवरीबरोबर पाठराखण पाठवण्याचा आग्रह झाला म्हणून मला पाठवायचं ठरलं . कारण तायडीला पाठवणार नव्हते व मायडी जायला तयार नव्हती मग नवरीबरोबर मी पण बैलगाडीत गेले . कारण वऱ्हाड आणायला आमच्या भावकीच्या बैलगाड्या गेल्या होत्या त्यातली आमची गाडी घेऊन सुका आला होता . तो बैलगाडी घेऊन तिथेच तीनचार दिवस राहिला होता कारण आक्कीचे आसपासचे देवदेव पण बैलगाडीतूनच झाले त्यांच्याबरोबर माझी पण वरात . मी मात्र खूप कंटाळले होते मला अजिबात करमत नव्हते . केव्हा एकदा आई येतेय आणि तिच्याबरोबर मी घेरडीत जाते असं झालं होतं मला .

          इकडे लगेच गुऱ्हाळ सुरु झाले . पुन्हा आई-काका शेतात रहायला गेले पका मामा आला . आम्हीपण त्याची वाट पहायचो . पुन्हा तायडी , मायडी व मी गावात व ज्योतीला घेऊन आई-काका शेतात गेले .  यावर्षी तसा थोडासा सराव झाला होता . कधी कधी मावशी सोबत झोपायला यायच्या . मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या . तेव्हा गोंदा मामाची ड्युटी मुचंडी या जत तालुक्यातील गावात होती ते गाव कन्नड होतं . आक्कीला लग्नानंतर संक्रांतीसाठी माहेरी आणलं होतं व तेव्हाच आप्पांच मुचंडीत निधन झाले . फक्त नातीचं लग्न त्यांना पहायला मिळालं याचं सगळ्यांना समाधान वाटलं . 

         आक्कीचे पुढचे सण मात्र मोठ्या उत्साहात पार पडले . मंगळागौरीचा थाट  तर निराळाच होता . श्रावण महिन्यात आक्कीला पंचमीसाठी आणलं पहिली मंगळागौर करायची ठरलं तर अगदी पूजेसाठीच आकरा मुली होत्या . सगळे पाहूणे बोलावलेले . दुपारी पुरणाचा घाट , खेड्यात आचारी मिळत नसे तर सगळ्या काकू सकाळी सात वाजता स्वयंपाकासाठी हजर असायच्या . कोणताही कार्यक्रम सामुदायिक जबाबदारी म्हणूनच पेलला जायचा . मग संध्याकाळी हळदीकुंकू , फराळ आणि जागरणासाठी गावातील आमची सगळी घरं बोलावली . अंगण एकदम फुलून गेल . मग उखाणे , गाणी , फेर , झिम्मा , फुगड्या अगदी दमून जाईपर्यंत खेळ रंगले होते . नेत्रदिपक सोहळा पार पडला तो .

           इकडे गणपतराव देशमुख सांगोला तालुक्यातील आमदार होते . आणि संपुर्ण घेरडी गावचा त्यांना पाठींबा असायचा . ते घेरडीत आले की काका पण त्यांच्या बरोबर असायचे . त्यावेळी गावकऱ्यांनी गावातले खूप लोक मुंबईला गोदीत आहेत तर घेरडी-मुंबई गाडी सुरु करावी अशी विनंती केली . मेडशिंगी व आलेगावच्या लोकांनी पण ती मागणी उचलून धरली होती आणि घेरडी-मुंबई गाडी सुरु झाली तीही मेडशींगी मार्गे ! त्या गाडीचा मुहूर्तसुद्धा गावकऱ्यांनी धुमधडाक्यात केला . त्यामुळे आक्कीकडे जाण्याची अगदी छान सोय झाली . ती गाडी सकाळी सांगोला-घेरडी यायची व परत घेरडी-मुंबई अशी जायची .संध्याकाळी मुंबई-घेरडी व पुन्हा घेरडी-सांगोला जायची . मग महिन्यातून एकदा तरी मला मेडाशिंगीला किराणा माल घेऊन पाठवलं जायचं . तेव्हाही असंच असायचं किराण्याची पिशवी घेऊन काका स्टँडवर यायचे . मला बसमध्ये बसवून द्यायचे व मेडशींगी आलं की हीला उतरवा असे कंडक्टरला सांगायचे तशी पाचवी सहावीत होते तरी पण भीती वाटायची . कारण मेडशींगीला उतरणारे बहुतेक कोणी गाडीत नसायचच . मग गाडी थांबलीच नाहीतर ? असं वाटायचं . गाडीतून उतरलं की जीव भांड्यात पडायचा मग ती जड पिशवी घेऊन हात बदलत मी घरी जायचे कोणीतरी ओळखीचे भेटले की पिशवी घ्यायचे काकांनी सगळा तेलासह किराणा पाठवलेला असायचा आणि पाठवतांना आक्कीचा स्वाभीमान दुखावला जाणार नाही याची काका काळजी घ्यायचे . तिला म्हणायचे

"जतेला किराणा माल चांगला मिळतो म्हणून तुमच्यासाठीपण आणलाय "

पण आक्कीला सगळे समजायचे . काका मदत करत आहेत . 

     मी एकटी मेडशींगीला गेलेली असले की मला करमायचं नाही मला लगेचच संध्याकाळी परत यायचं असायचं . आणि भाऊजींचा रहाण्यासाठी आग्रह असायचा . मग ते चप्पल लपव , पिशवी लपव असे करायचे . एकदा एक दिवस राहिले पुन्हा दुसरे दिवशी अजून त्यांचा आग्रह सुरुच होता . त्यांनी माझी तिकीटाचे पैसे असलेली पिशवी लपवून ठेवली . यावेळी मात्र मला रहायचं नव्हते .  मुंबई गाडी सांगोल्याहून यायला लागली की आक्कीच्या मागच्या दारातून टेकडीवरुन उतरतांना दिसायची मग घरातून निघालं तरी गाडी स्टँडवर येण्यापुर्वी चालत स्टँडवर पोहोचत असे . गाडी टेकडीवर दिसली की मी पिशवी द्या म्हणून रडायला लागले आणि त्यांचा आग्रह काही संपेना . मग लगेचच मी धमकी दिली .

" मी निघाले तुम्ही पैसे घेऊन या . मागोमाग नाही आलात तर मी जाणारच  ".

 भाऊजींना खरं वाटलच नाही . त्यांना वाटले पैसे नाहीत कुठे जाईल ही ?  तरी बराच वेळ वाट पाहिली पण मी परत आले नाही मग मात्र सगळेच घाबरले . आक्कीला चैन पडेना . पण मी पळत स्टँडवर आले गाडी आली व मी गाडीत चढले होते . कंडाक्टरला दोन मिनीटं थांबा म्हणाले तोवर गाडीत आमच्या शेजारी रहाणारऱ्या घोंगडे वहिनींचे जावई दिसले . ते आलेगावला असायचे व त्यांची बायको आक्कीची मैत्रीण होती , एकदा आलेगावला आम्ही जाऊन आलो होतो.  आमचे भाऊजी दिसेनात कंडक्टर म्हणे यायचं नसेल तर उतर . मग सांगितले मी उतरणार नाही द्या बेल  !

दोन रुपये तिकीट होतं आर्ध तिकीट एक रुपया ! मी रडवेली झाले होते . त्या शेजारच्या पाहुण्यांनी मला बसायला जागा दिली मग मी त्यांना म्हणाले 

" आमच्या भाऊजींना यायला उशीर झाला माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही तिकीट काढा मी घरी गेले की पैसे आणून देते ".

त्यांना काहीतरी घोळ आहे हे लक्षात आले मग ते काय झाल विचारु लागले ते एकदम गोड बोलायला लागले मग त्यांना मी  सगळं सांगून टाकलं . ते खूप हसायला लागले व म्हणाले 

" निवांत बैस काळजी नको करुस मी तिकीट काढतो . " 

घेरडीत उतरले की पुन्हा भिती वाटायला लागली आता आई-काका रागावणार म्हणून मग घरी आले नी मीच भोकाड पसरलं . आईला सांगू लागले .

" मी आता जाणार नाही एकटी "

तोवर काका बाहेरुन हसतच आले . त्यांना पेठेतच ते शेजारचे पाहूणे भेटले होते व घडला प्रकार त्यांना कळाला होता . सगळेच हसायला लागले . आई म्हणाली

" सासरी गेल्यावर करमत नाही म्हणून आशी पळून येऊ नकोस म्हणजे झालं "!

काका गंमतीने म्हणाले 

" तू जवळ पैसे नसले तरी प्रवास करु शकतेस.  मी रेखाला सांगतो पुन्हा असे होऊ देऊ नकोस म्हणून पण जायचं मेडशींगीला ".

मेडशींगीत मात्र सगळा गोंधळ झाला . आक्की घाबरुन गेली असणार याचा काकांना अंदाज आलेलाच होता त्यामुळे येतांनाच त्या गाडीला जाणाराकडून मी घेरडीला सुखरूप पोहोचल्याचा त्यांनी निरोप पाठवला होता . 

       प्रवासाचा अजून एक अनुभव म्हणजे एकदा शंकर मामांनी मुलीच्या लग्नासाठी काकांना उसने पैसे मागितले होते त्यासाठी पका मामा घेरडीला आला होता पण जवळ पैसे नसल्यामुळे चार दिवसात पाठवून देतो म्हणून काकांनी सांगितले . पैशाची व्यवस्था झाल्यावर काकांनी मला बनाळीला जायला तयार केलं आणि  सांगितलं की

" मी चिठ्ठी लिहून देतो , रुमालात पैसे गुंडाळून देतो व्यवस्थित पिशवीत घालून देतो ती घेऊन तू दीडच्या जत गाडीनं बनाळीला जायचं ही चिठ्ठी व पैसे द्यायचे व एक तासात तीच गाडी जतेहून बनाळीत येते त्यात बसायच व परत घेरडीला यायचं ".

आम्ही नवरात्रात बनाळीला जायचो त्यामुळे मला बनाळी माहिती होतं . मी जाऊन परत आल्यावर मोठी रक्कम घेऊन मला पाठवलं होतं व ती व्यवस्थित पोहोच झाल्याची चिठ्ठी लिहून शंकर मामांनी माझ्याबरोबर पाठवली होती ! 

आज हे प्रसंग आठवले तरी मला माझ्यापेक्षा काकांचा खूप आभिमान वाटतो . लहानपणापासून त्यांनी आम्हांला स्वावलंबी कसं बनावं याचे धडे गिरवून घेतले . आत्मविश्वास वाढवला व धाडसीपणा अंगात बाणवला !                 आता काकांनी घेरडीतून माणसं पाठवून मेडशींगीच्या घराची डागडूजी करुन घर व्यवस्थित करुन घेतलं आणि मेडशींगीच्या शेतात पण प्रयोग केले जाऊ लागले . आक्कीने पण मनापासून ते घर आपलसंं केलं होतं . आईच्या पद्धतीने बायका हाताशी घेत छानसं बस्तान बसवले . आणि तिचा संसार आनंदाने सुरु झाला . भाऊजींना काहीतरी करायला लावायचे यावर काकांच विचारमंथन सुरु होतं प्रयोग सुरु होते .

        शिकायला बाहेर ठेवलं नाही म्हणून तायडी नाराज होती तर तिला खूष करण्यासाठी म्हणून पंढरपूरला नागर आत्याकडे तीन माहिन्याच्या शिवाण क्लाससाठी तिला ठेवलं व त्याचदरम्यान तिच्यासाठी वरसंशोधन सुरु झाले . गोंदा मामा पंधरा दिवासातून शनिवारी घेरडीला यायचा दोन दिवस रहायचा व सोमवारी परत जायचा . आप्पा गेल्यावर तो खूपच भावनाविवश झाला होता . आई-काकांंना तो खूप मानायचा . आईपण खूप माया करायची तो आला की भज्यांचा बेत ठरलेला असायचा . आम्हा भाच्यांबरोबर त्याचे वेगळेच संबध होते . तो शिकत असतांना आक्का-आप्पांना त्याच्याकडे फारसं लक्ष देता आलं नाही मग त्याला काय हव नको ते आई-काका पहायचे . मग तो पण आई-काकांंना खूप मानायचा . ताईच्या मुलींंसाठी मी स्थळं शोधणार असे त्यांने सांगून ठेवलेलं . नोकरी करणारा आसावा ही एकच अट आई-काकांची होती मग त्यांने तायडीसाठी स्थळ शोधले . बनाळीकडून नात्यातला मुलगा किर्लोस्कर कंपनीत होता . मग तिला सांगलीला दाखवण्यासाठी न्यायचं होतं . काकांची एक मावशी होती सांगलीला त्यांच्याकडे काका तायडीला घेऊन गेले . व तिला दाखवायला म्हणून गेले आणि लग्न ठरवून साखरपुडा करुनच घेरडीला आले ! आणि दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त काढला . आक्कीच्या लग्नानंतर आकरा महिन्यात तायडीचं लग्न होणार होतं . तिचं वय अर्थातच नुकतेच आठरा पुर्ण झालेल .


प्रकरण 10 वे 


तायडीचे लग्न

2 आॕगस्ट 2020


              गोंदा मामा म्हणजे आंम्हा भाच्यांसाठी एक जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व होते . तो आमच्या  आई-काकांंना बहिण-भाऊजी  या नात्यापेक्षा गुरुस्थानी खूप मानत होता . त्यांच्याशी आदराने वागणे असायचे त्याचे व आंम्हा   भाच्यांबरोबर मात्र तो मैत्रीच्या नात्याने वागत असे , चेष्टामस्करी भरपूर असायची तो खवैय्या होता . तो आला की भजाचा बेत ठरलेला असे . आम्हीपण मग तो यायची वाट पहात असायचो . मायडीत व माझ्यात तो नेहमी शर्यत लावायचा

" जे कोणी जास्त वेळ माझे पाय चेपून देईल त्याला मी पाच पैसे बक्षीस देईन " 

 असे म्हणायचा आणि बराचवेळ पाय चेपून झाले की

 "आता बास पुढच्यावेळी परत सुरु करुयात शर्यत "

 असे  म्हणून स्पर्धा बंद करायचा मग आम्ही पण पुढच्या वेळची वाट पहायचो . शाळेला सुट्ट्या लागल्या की त्याच्याबरोबर आम्ही सुट्टीला मुचंडीला जायचो . आमच्या मामी पण मायाळु होत्या . रोज काहीतरी स्पेशल खायला केलेलं असायचं . त्याला दोन मुलं महेन्द्र व रविंन्द्र तर एक मुलगी कांचन . पुर्ण सुट्टीत आम्ही त्यांच्याकडे नंतर ही मुलं आमच्याकडे असायचे . तीघेपण माझ्यापेक्षा लहान होते . नागर आत्याचा छोटूपण सुट्टीत घेरडीला यायचा . आम्ही सगळी भावंड जिथे जमू तिथे स्वयंपाक मात्र भरपूर लागायचा . पत्ते , कोया , लगोर ,  विटी-दांडू , गोट्या , गजगे असले खेळ असायचे आमचे . 

      आक्कीच्या लग्नानंतर मात्र मामांने सांगून ठेवलं होतं 

"बेबीसाठी मुलगा मी शोधणार " 

आणि बोलाफूलाला गाठ पडावी तसं झालं . आईच्या आजोळच्या म्हणजे बनाळीच्या नात्यातून एका लग्नाच्या  मुलाची माहिती त्याला मिळाली . मधुकर बाबुराव कुलकर्णी म्हणजेच ज्यांच्याशी तायडीचं लग्न झालं ते आमचे एमबीके भाऊजी ! भाऊजींच आजोळ पण बनाळीच . ते पाच भाऊ सगळ्यात लहान भाऊजी व भाऊजींच्या लहानपणीच त्यांचे वडील गेलेले त्यामुळे त्यांच बालपण बनाळीत गेलेलं पण पुढे मोठ्या भावांबरोबर ते सांगलीत रहायला गेले व नंतर त्यांना किर्लोस्कर कंपनीत अकाउंट्स सेक्शनला नोकरी लागली मग किर्लोस्करवाडीला रहायला गेले त्यांचा एक भाऊ तिथे होता . त्यांना आई होती सगळ्या भावांची लग्न झालेली फक्त यांच लग्न बाकी होतं जबाबदारी काही नाही पण पाठबळ पण कोणाचे नव्हतं वडील नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःचे शिक्षण मग नोकरी असे स्थिरावत गेले होते . 

            बाकी सगळी चौकशी झाली मग पहाण्याचा कार्यक्रम त्यांच्या  किर्लोस्करवाडीच्या भावाकडे करायचा ठरला . काकांची मावस मावशी म्हणजे  गोहाड मावशी सांगलीत होत्या व  त्यांचे यजमान एका साखर कारखान्यात वरिष्ठ पदावर होते . तायडीला घेऊन काका त्यांच्याकडे मुक्कामी गेले . खूप वर्षांनी भेटी झाल्या शेतीचा सगळा वृत्तांत काकांनी त्यांना  सांगितला त्यांना पण खूप कौतुक वाटले . मग दुसरे दिवशी तायडीच्या दाखवण्याच्या  कार्यक्रमाला तायडी , काका , गोंदा मामा सांगलीहून रेल्वेने किर्लोस्कर वाडीला  गेले . मुलगा दिसायला गोरापान नाकीडोळी निटस एकदम देखणा तर त्यामानाने तायडी काळीसावळी होती . पण एकूण सगळीच माणसं माहितीतली , नात्यातली निघाली . घेरडीला परत आले मग तुम्हांला पण मुलगा योग्य वाटत आसेल तर अजून एकदा सांगलीत भेटू असा त्यांचा निरोप आल्यावर कार्यक्रम करायचा ठरला मग तिथे भाऊजींची आई बाकी भाऊ-भावजया आले तर घेरडीहून काका , आंता काका , गोंदा मामा तायडीला घेऊन  जमवायच्या दृष्टीने गेले . दोन्ही बाजूंनी होकार आला व  तिथेच लग्नाचं पक्क केलं . लग्न कुठे करायचं हा मुद्दा आल्यावर मिरजेला कार्यालयात ठराविक रक्कम दिली की उक्त घेतलं जातं हे काका ऐकून होते त्याप्रमाणे मिरजेला सालंकृत कन्यादान करुन द्यायचं ठरलं . लगेच संध्याकाळी तिथेच घरच्याघरीच  साखरपुडा करायचं ठरलं . त्याप्रमाणे त्यांनी तायडीला साडी , आंगठी , गजरा व तिथल्या प्रथेप्रमाणे ओटीत मोठ्ठा असोला नारळ दिला . मग काका व तायडी त्यादिवशी गोहाड काकांकडे राहिले .

          दुसरे दिवशी तायडी साखरपुड्याला दिलेली हिरवी साडी नेसून तशीच घेरडीत संध्याकाळी पाच वाजता हजर झाली . आईला आंदाज आलाच . काका हसू लागले आईला चहा ठेवायला सांगितला मग सोप्यात मोठी सतरंजी अंथरली व आम्हांला वाड्यातील सगळ्यांना बोलावून आणायला सांगितले . मग चहापाणी करत काकांनी सगळ्यांना पुर्ण वृत्तांत सांगितला त्या नारळाचे खूप कौतुक झाले . तसले नारळ घेरडीत कधी पाहिलेच नव्हते . काका जावयाच्या बाबतीत खूष होते . आता आम्ही मिरजेला जाऊन मुहूर्त व कार्यालय ठरवून येणार हे काकांनी सांगितले . आनंदाला उधाण आलं .

          आताशा काका चार पैसे बाळगून होते आईला पण ब-यापैकी सोनंनाण केलं होतं . तसा जिवनस्तर उंचावला होता . आणि तायडीच्या लग्नानिमित्त सोनं खरेदी , कपडा खरेदी , कार्यालय ठरवणे या कामासाठी आई-काकांच सांगलीला जाणं होत होतं . मग हौस म्हणून पुढे कोल्हापूरला जाऊन आले . फिरायला जायचे . बरोबर लहान होती म्हणून फक्त ज्योतीला न्यायचे . आईला पण तेवढाच बदल बरा वाटायचा .

मुहूर्त व कार्यालय ठरलं .

" 27 नोव्हेंबर 1977 , काशिकर मंगल कार्यालय मिरज " 

फक्त पैसे द्यायचे आणि वेळेत  जाऊन बसायचं अशा पद्धतीने पक्क करुन आले आता प्रश्न होता फक्त व-हाड घेऊन मिरजेला वेळेत पोहोचण्याचा . त्यादरम्यान सगळ्या चौकशा करुन व-हाड लातूर-मिरज या देवाच्या गाडीतून जवळा स्टेशनला बसून जायचं ठरले . घेरडीपासून पाच किलोमीटर जवळा व तिथून तीन किलोमीटर गावाबाहेर स्टेशन . स्टेशनवर जाण्यासाठी जवळ्यातून छकडे असत . मग सामानाची चढउतार करायला नको म्हणून घेरडीतून घरातूनच  बैलगाड्यांनी डायरेक्ट स्टेशनवर जायचे ठरले . 

     त्यादरम्यान उषा वहिनी खूपच आजारी पडाल्या होत्या त्यांना खोकला झाला होता व मिरजेत अॕडमीट केले होते . त्यामुळे मोहन आण्णा खूपच अस्वस्थ होता . त्याची मुलगी चिमू सहासात वर्षाची व मुलगा बबलू तीन वर्षाचा आणि काकू घरी होत्या . मंदा आक्काच लग्न झालं होतं . त्यामुळे आई-काका खूप अस्वस्थ होते . आण्णाचे हेलपाटे होत होते , तो घाबरला होता . त्याला धीर द्यावा लागायचा , आमच्या काकू कर्नाटकातील होत्या त्या जरासा वहिनीला जाच करायच्या ते आई-काकांंना अजिबात आवडत नसे . पण काका निघून गेले होते त्यामुळे काकूंना कोणीच काही बोलत नसत आण्णा पण पुर्णपणे काकू सांगतील तसच वागायचा . पण आता मात्र त्याच्या लक्षात आले व मोहन आण्णानेच घरी येऊन त्यांच्याविषयी बोलल्यावर आईने उषा वहिनीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला निक्षून सांगितले . ही झालेली चूक आता आण्णाच्या लक्षात आली होती मग मात्र त्यांने वहिनीकडे नीट लक्ष द्यायचे ठरवले कारण हा मुद्दा आण्णाला पटला  होता . 

        इकडे लग्नाविषयी सगळ्या पाहुण्या रावळ्यांना पत्र पाठवून झाली . गोंदा मामा , आक्कीच्या सासरचे सर्वजण घेरडीत येणार होते . बाकी काकांचे सोलापूरचे मामा-मामी आणि पंढरपूरच्या आत्या पंढरपूरहून तर तिना आत्या सांगोल्यातून त्या गाडीला बसण्यास कळवले.

        तसं भाऊजींच शिक्षण व बरचसं रहाण सांगलीत होतं . साखरपुडा झाल्यानंतर तायडीच्या नावे एक आंतरदेशीय नीळं पत्र आलं आणि पाठीमागे पाठवणाराचे नाव पत्ता भाऊजींच होतं . दुपारची वेळ होती पत्र काकांच्या हातात पडले . आई-काका अगदी कौतुकाने बोलू लागले 

" नवरा फारच हौशी आहे बेबीचा अगदी तिच्याच नावे टपाल बिपाल पाठवलं आहे त्यांने ."

 त्यावेळी तायडी तिची मैत्रीण शरुकडे सगळ्याजणी जमल्या होत्या व त्यांच्या गप्पा चालल्या होत्या . आई म्हणाली 

"जा ग ,बेबीला बोलावून आणा"

मायडी व मी पळत तिच्याकडे गेलो आणि आईने बोलावले हे नुसतं सांगितले नाही तर सगळ्या मैत्रिणींसमोर अगदी हसत आम्हीच लाजत तोंडावर हात ठेऊन


" तायडे , तुझ्या नावावर भाऊजींनी पत्र पाठवलंय " 


असे सांगितले . झाल ! तिच्या मैत्रिणींना तेवढंच पुरेसे होतं . मग चिडवण्याला अगदी भरतं आल होतं . ती लाजून चूर झाली होती . आणि आता काकांसमोर कसं जायचं याचं तायडीला खूप टेन्शन आलेलं . जवळजवळ एका तासानंतर हळूच मागच्या दारांने तायडी घरात आली मग तिला पत्र दिलं व उत्तर देण्यासाठी कोर आंतरदेशीय टपाल पण तिला दिलं . याची चर्चा मात्र वाडाभर रंगली होती व त्यावरुन तायडीला चिडवणं पण ! पुढे लग्न होईपर्यंत आठवड्यातून एकदा कधीकधी दोनदा हा पत्रव्यवहार व चिडवाचिडवी सुरुच राहिली .

       आक्कीचं लग्न ठरल्यापासून तेरा दिवसात झालं होतं तसा वेळ कमी होता व दारातच झालं होतं हिच्या लग्नाला मात्र वेळ मिळाला होता . आई-काकांंनी मग पंढरपूरला जाऊन तायडीसाठी शालू खरेदी व आक्कीसाठी जेष्ठ जावयाचा मान खरेदी केला . गावाला जाताना ज्योतीला ते बरोबर न्यायचे एकदा कोल्हापूरला गेले होते तर तीन वर्षाची ज्योती पण तिने एकदम भारी नेटेडचा फ्राॕक स्वतःसाठी काढून दिला व म्हणाली 

" हा मला घ्यायचा " 

आई-काकांंना तिचे फार कौतुक वाटलं मग त्यांनी तोच फ्राॕक तिला घेतला आणि मला व मायडीला पण उडत्या बाहीचा व फुग्याच्या बाहीचा नायलाॕनचे फ्रॉक आणले होते . ज्योतीचं कौतुक मात्र सगळ्यांना सांगायची तेव्हापासून ते परवापर्यंत अगदी तिने बुटीक काढलं तेव्हा सुद्धा सगळ्यांना हे सांगायची व म्हणायची 

" बाळाचे पाय आम्हांला पाळण्यातच दिसले होते " . मग 

 तायडीसाठी सांगलीच्या पू. ग.गाडगीळ च्या दुकानात दागिने खरेदी झाली वते सोनं इतक आवडलं की इथून पुढे सोन खरेदी फक्त गाडगीळांकडे करायची असे ठरले . ही सगळी खरेदी घेरडीत सगळ्यांना खूपच भारी वाटायची .

" काका मुलींच किती कौतुक करतात . एवढ्या मुली पण सगळ्यांना भारी भारी कपडे घेतलेत कशालाच मागेपुढे पहात नाहीत ".

असे कौतुक चालायचं .

          लग्न मार्गशीर्ष महिन्यात होतं मग दिवाळी झाल्यावर कामाला सुरुवात झाली . फराळाचं करायचं तर करंज्याच्या आदले दिवशीच भांडीवाल्या भागाबाईकडून गावातल्या सगळ्या भावकीकडे करंज्याला बोलावणं गेलं . आईंने    आधीच दोन दिवस निलाबाईकडून सोजी काढून , साखर दळून घेतली होती व प्रभा काकू  , मावशी व आईंने सारण तयार करुन ठेवले होते . सकाळीच आईने निरशा दुधात दोन शेर सोजी भिजवून ठेवली . दुपारी दोन वाजताच गावातल्या सगळ्या काकू , वहिनी , बहिणी हजर झाल्या पंचवीस तीसजणी होत्या . वाड्यातली सगळी पोळपाट , लाटणी , फिरकीचे चमचे आणले आणि स्वयंपाक घरात दुतर्फा बसून गाण्याच्या तालावर करंज्या सुरु ! मग त्यातल्या त्यात रमा काकू , माई मावशी , देशपांडे बाई  , शांता वहिनी अशा पाचसहाजणी एका बाजूला बसून पोळपाटभर मोठ्या पात्या लाटून रुखवतासाठी करंज्या , स्वस्तीक त्याच्यावर केशरी , गुलाबी,  हिरवा खाण्याचा रंग दुधात भिजवून काडीच्या टोकाला कापूस गुंडाळून नवरा-नवरीचं नाव किंवा शुभ-लाभ आणि काही चिन्ह कोरायच्या आणि ते न मोडता तळून काढण्यात त्यांच कौशल्य पणाला लागायचं .हे सगळं चालू असतांना अगदी  चढाओढीनं उखाणे घेणं , गाणी म्हणणं किंवा कोणी एखादी नविन लग्न झालेली असेल तर तिला चिडवणं ,  मस्करी व्हायचीआणि हास्याचे कारंजे उडत असत . गाणी म्हणतांंना तायडीचं , आई-काकांंच आणि कुरवली म्हणून आक्कीचं नाव घालून म्हणली जायची मग मी व मायडी आपापले वशिले कोणत्यातरी काकूकडे लावायचो मग आमचं नाव घेतलं की कोण आनंद व्हायचा . तर हातात बसणार नाहीत एवढे मोठे बेसनाचे , रव्याचे लाडू , रुपया घालून तिळाचा महादेव सगळं तयार झालं मग नवरीची कपडा खरेदी , दागिने खरेदी बघत बाकी आमचे कपडे पहात  चहापाणी आणि जातांना कुंकू लावून  बरोबर पेपरमध्ये गुंडाळून करंज्या द्यायचा कार्यक्रम झाला !

         देवब्राम्हणाच्या आदले दिवशीच सगळे पाहूणे आले . मग दुसरे दिवशी चौकन्हाणं , जातीपूजन , बांगड्या पुरणाचं जेवण आणि उचलून जायचं म्हणून सगळी पॕकिंग करायचे काम सुरु झाले .

        आमच्या घरी गुढग्याएवढी उंच मोठ्ठीच्या मोठ्ठी पत्र्याची ट्रंक होती तिला नेहमी निळा रंग द्यायचे काका आणि मोठ्ठ्या सहा घागरी पाणी बसेल एवढं पितळेचं पातेलं होतं . कोणाचही लग्न असलं की ही पेटी व ते पातेलं लग्नघरी पंधरा दिवस मुक्कामाला असायचं . काका त्यांनी मागायच्या आधीच  शेतातला गडी आला की त्याच्या हातून ते पोहोच करायचे . मग ती पेटी सगळं आहेराचं पोटात घेऊन लग्नघरी कोठीघरात मानानं मिरवायची . तिला रंग देऊनच ठेवला होता परवा त्यात मग मानपान एका बाजूला बस्त्याच्या कपड्यात गुंडाळून खुणेनं ठेवला तर बाकी पुर्ण ट्रंक आहेराचे देणंघेणं लेबल लाऊन पॕक केले . मोठ्या खोक्यात चिवडालाडूच पॕकिंग , आणि रुखवताचं सगळं , नवरीची न्यायची सुटकेस वेगळी असं सगळं भरुन ठेवलं . दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली . उद्याचा दिवस मध्ये परवा निघायचं . एक वाजता रेल्वे जवळा स्टेशनवर येणार होती !

दुसरा दिवस उजाडला तरी पाऊस काही थांबायचं नाव घेईना . परिणामी आधीच भरलेल्या ओढ्यांना पूर आला व वाहतूक थांबली . इकडे तयारी सुरुच होती . आठ किलोमीटर बैलगाडीने जायचं म्हणजे दोनतीन तास तर आरामात लागणार होते . सामान चढवणं व स्टेशनवर उतरवणं दुपारचं जेवण  हे सगळं गृहित धरुन सकाळी सातला घरातून निघायचं ठरलं होतं . संध्याकाळी पाऊस थांबला होता आता जर रात्रभर पाऊस नाही पडला तरच ओढ्याचं पाणी सकाळपर्यंत ओसरणार होतं . तसं देवाला साकडं घालायला सुरुवात झाली . नशीबानं रात्री पाऊस झाला नाही . इकडे जागरण करुन उद्या दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी रुक्मीणी काकूला बोलावलं मदतीला आई , शुभांगी मामी , बाकीच्या वाड्यातल्या बायका होत्या . पोळ्या , धपाटी , रावण भात , मुगाचा पेंडपाला , शेंगदाण्याची चटणी , लोणचं आणि मोठ्ठी किटली भरुन ताक घेतलं होत व बरोबर द्रोण-पत्रावळ्या घागरीत पाणी ग्लास असं सगळं आवरुन सकाळी साडेसहा  वाजताच सगळे तयार झालेले  . मग स्टँडवर काकांचे हेलपाटे सुरु झाले . ओढ्याचं पाणी ब-यापैकी ओसरलं होतं तर सहा वाजताच ओढ्याच्या पलीकडे बैलगाड्या येऊन उभ्या होत्या . आर्ध्या तासात सगळं पाणी कमी झालं व बैलगाड्या वाड्याच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या मग मात्र जीव भांड्यात पडला आणि  आनंदीआनंद झाला . पटापट गाड्यात सामान चढलं इकडे नवरी नटूनथटून तयार होती . देवाला दिवा , मालत्यानी ओटी भरणे हे करत असतांना आईला व तायडीला भरुन येणं ते पाहून काकांनी तोंड लपवणे मग एकाचं पाहून एक सगळ्यांनाच निरोप देणं जड गेलं मग मामींनी सगळ्यांच्या हातावर दहीसाखर घातली आणि व-हाड बैलगाडीत बसलं . मजलदरमजल करत आकरा वाजता स्टेशनवर पोहोचलं दोन तास आवकाश होता गाडीला मग तिथेच एका झाडाखाली ते जेवणाच खोकं उघडून जेवायला वाढलं तासाभारात सगळ्यांची जेवणं उरकली मग मामाची पोरं , आम्ही आणखी कोणी लहान पोर तिथेच पळापळीचा खेळ सुरु झाला मग मधूनच कोणी ओरडलं की शांत बसायचं . बहुतेक लाहान मुलांचा रेल्वेत बसण्याचा तो पहिला प्रसंग होता त्यामुळे उत्सुकता , आनंद भिती सगळच वाटायचं . आणि बरोबर दीड वाजता शिटीचा आवाज करत हळूहळू गाडी आली तसं गाडीतून छोटू , नंदा , कोंडी , बाळी ताई सोलापूरचे मामा-मामी , तारा मामी , नागर आत्या , सुशिला आत्या , तीना आत्या सगळे पाहूणे गाडीतून हात करु लागले आणि गाडी थांबली की भराभरा आम्हा लहान पोरांना गोंदा मामांनी चढवलं आत बघायला सगळे होतेच . मग बायका चढल्या शेतातले दोन गडी बरोबर घेतले होते त्यांनी सामान चढवलं मग मामा , काका यांनी सगळं बरोबर आहे का पाहिलं तोवर परत गिडीची शिट्टी वाजली   धक्का बसला आणि गाडी सुरु झाली . इतका आनंद इतका आनंद  की विचारायची सोयच नाही . डुगुडुगु करत गाडी निघाली . नेहमीप्रमाणे नागर आत्यानी पिशवीभरुन पेरु आणि खारेमुरे आणलेले इकडून तिकडे पळत जायचं आणि सगळ्यांना देऊन यायचं . माझ्यासहित सगळी पोरं चेकाळली होती मधूनच ओरडा खात होती . 

     शेवटी पाच वाजता गाडी मिरजेत पोहोचली तिथे गोहाड काका त्यांची कार घेऊन हजर होते . स्टेशनवर टांगे पण होते मग कार टांगे असं करत व-हाड सहा वाजता कार्यालयात पोहोचलं . पाठोपाठ नव-याकडील व-हाड आलं ते सांगलीतूनच येणार होतं नव-या  मुलाला आणायला गोंदा मामा गोहाड काकांची गाडी घेऊन गेलेला . 

     सात वाजता तर संध्याकाळचे कार्यक्रम सुरु झाले ते संपल की नऊला जेवणं वाढून तयार होती सगळ्यांना ती पद्धत फार आवडली कारण तिथे सगळं जागेवर व वेळेवर हजर होतं . पंढरपूरला मठात लग्न व्हायची पण सगळ घेऊन जावं लागत असे इथली सिस्टीम सगळ्यांना खूप आवडली . दुसरं एक महत्त्वाचे म्हणजे भाऊजींनी फोटो काढण्यासाठी बरोबर फोटोग्राफर आणला होता की आत्तापर्यंत असे फोटो कोणाचेच काढले नव्हते त्यामुळे आम्ही त्याच्यामागे हिंडायचो . तो फोटो काढायला लागला की पळत जाऊन समोर उभं रहायचं . त्यामुळे तायडीच्या लग्नात बहुतेक सगळ्या फोटोत मी आहे ब-याच ठिकाणी मायडी आहे . तिच्या सासरच्या फॕमिली फोटोत पण मी व मायडी आहोत .

       दुसरे दिवशी थाटामाटात लग्न पार पडलं सगळी व्यवस्था चोख होती . परत दुपारी पाऊस पडला सगळे म्हणायचे बेबी खूप काम करत होती म्हणून पाऊस पडतोय . मग निरोपाची वेळ आली तसंआईपेक्षा काकाच जास्त भावनावश झाले . तायडीला थोपटून निरोप दिला आणि व-हाड नवरी घेऊन निघून गेलं . घरी आल्यावर मात्र घर एकदमच रिकाम जाणवत होतं..........


             

प्रकरण 11 वे


माझं बालपण

17 आॕगस्ट 2020


         तायडीचं लग्न अगदी थाटामाटात झालं आणि आई-काकांंनी पुन्हा आपला मोर्चा घर शेती इकडे वळवला . आईला तिच्या वयाच्या फाक्त  एकोणचाळीसाव्या वर्षी दोन जावई आले . तरुण होती व तीचे रहाणीमान पण निटनेटकं होतं त्यामुळे ती दिसायला खूप सुंदर  दिसायची . माझी आई म्हणजे गोरापान रंग  , छोटसं नाक , कुरळ्या केसांचा आंबाडा,  गोंडाळ शरीरयष्टी चेह-यावर समाधान व सात्वीक वृत्ती असल्यामुळे दिसायला खूप   छान दिसायची . डावा गाल थोडासा वर उचलत हसण्याची लकब होती तिची . खेड्यात रहाणं होतं शेती त्या अनुषंगाने येणारा राडा , जनावरांचा राबता असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत तिचं ठरलेलं असायचं . केस पुसायला पांढरा स्वच्छ पंचाच असायचा तर शक्यतो मलमलचे पांढरे ब्लाऊज घालण्यावर भर असे . गबाळेपणा , आळशीपणा तिच्या आसपास फिरकत नसे . प्रसंगानुरुप निटनेटकं , प्रसन्न  रहायचा शिरस्ता होता तिचा . तसंच खाण्यात पण चविष्ट , सात्त्विक असलं पाहिजे याकडे पण तिचे बारीक लक्ष असायचं. 

           हल्ली कपडा खरेदी पण शहरात केली जायची त्यामुळे आईसाठी भारी भारी साड्या तर त्यांना कपडे घेतले जायचे व वापरात यायचे त्यामुळे आई-काकांंची जोडी अगदी मस्त दिसायची . आधुनिकतेचे भोक्ते होते दोघेजण . एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे . सोन्याचे दागिने पण आईला केलेले होते .  पाटल्या , बांगड्या , मंगळसुत्र रोज घालायची . मग काका तिला पाटलीण म्हणायचे . पुर्वी  सोलापूरजवळ रहायला असतांना ते दोघेपण कन्नड शिकले होते त्यामुळे त्यांना आम्हा मुलींसमोर बोलू नये असे काही विषय वाटले की ते गंमतीने कन्नड बोलायचे . हसत हसत लाजत आईपण बोलायची आम्हांला मात्र ते कळत नसे पण त्यांचा तो प्रेमाचा संवाद चालू आहे हे मात्र आम्हांला  कळायचं कारण काका आईला " गौडती " म्हणायचे . आणि आम्हांला माहित होतं गौडती म्हणजे पाटलीणबाई .

         भाऊकाकांनी आकरा माहिन्यात दोन मुलींची लग्न केली असे सगळे म्हणू लागले . मुख्य म्हणजे तेव्हा कार्यालयात लग्न ही कल्पना तशी सगळ्यांनाच आवडली . कारण घेरडीसारख्या ठिकाणी एवढं करणे म्हणजे दिव्यच होत होतं त्यानंतर मात्र घेरडीत किंवा पाहुण्यारावळ्यात  लग्न म्हणलं की मिरज हा पायंडा पडला . आक्की व तायडीच लग्न झालं की घर अगदीच रिकामं रिकामं जाणवू लागलं . 

        तायडीच्या लग्नाला आमचे पुण्याचे चुलत काका म्हणजे नाना काका व काकू आले होते ते पुढे आठावडाभर घेरडीत येऊन राहिले . इकडे उषा वहिनींना पण मिरजेतून दवाखान्यातून घरी आणले होते . त्यांना हवापालट होईल व चांगल्या दवाखान्यात दाखवता येईल म्हणून पुण्यात त्यांच्याकडे न्यायचे ठरले . गप्पा मारत मारत विषय पुन्हा आमच्या  घरावर व मुलींवर येऊन ठेपला !  नाना काका दत्त भक्त होते त्यांना सिद्धी प्राप्त आहे असे सर्वजण मानत पण काकांचा फारसा विश्वास नसे तरीपण ते काही बोलत नसत . कोणात्याही गोष्टीचे स्तोम नसावे असे त्यांचे म्हणणे असायचे . त्या काकूंनी पुन्हा आईला भरीस घातले व म्हणू लागल्या

" एकवेळ माझ ऐका तुम्ही जाऊबाई तुम्ही दोघेही पुण्यात या . यांचे गुरुबंधू आहेत एक जप करुन घेऊ आपण . " 

आई म्हणाली 

"आता दोन जावई आले आहेत  बरं नाही वाटत . "

तर पुन्हा आत्या , काकू सगळ्यां समजावू लागल्या

" कुठे वय झाले तुमचं ? होईल की अजून तुम्हाला मुलबाळ , पुण्याला जाऊन तरी या . नाना काका काय सांगतात ते करा तरी बाकी बघू नंतर ."

असा सगळ्यांचा रेटा सुरु होता बघू ठरवून कळवतो तुम्हांला असे आईने सांगितले . पुर्वीच्या काळी लेकीचं पहिलं बाळंतपण झाल्यानंतर आईला मुल होण तसं फारसं आश्चर्यकारक वाटत नसे . ब-याच ठिकाणी असे चित्र दिसत असे . त्यामुळे तो मुद्दा विचाराधीन राहिला .

       आता गु-हाळ पण तोंडावर आलं होतं तसंच किर्लोस्करवाडी तसं लांब होतं त्यामुळे तायडीला आणणे नेणे यासाठी काकानांच जावे लागायचे . मग जातायेता एकटे असातील तेव्हा काका सांगलीला गोहाड काकांच्याकडे जाऊन यायचे . त्यामागे पण कारण होतं ते म्हणजे ऊस जर कारखान्याला पाठवला तर परवडेल का याचा अंदाज ते घेत होते . दोन वर्षे गु-हाळ झालं त्याचप्रमाणे याहीवर्षी लग्नानंतर आई-काकांचा ज्योतीला बरोबर घेऊन मुक्काम शेतात हालला . यावर्षी पका मामांने पण त्याच्या शेतीत सुधारणा केली होती त्यामुळे त्यालापण पुर्ण गु-हाळ होईपर्यंत थांबता येणार नव्हते मग इकडे आक्कीचा धाकटा दीर अरविंद यायला तयार झाला , यावर्षीच्या गु-हाळाची देखरेख त्यांने केली . गावात मी व मायडी दोघीच रहायचो झोपायला मावशी यायच्या . स्वयंपाकाच्या रुक्मीणी काकू आजारी पडू लागल्या त्यामुळे कधीकधी त्या येत नसत . आमची शाळा असायची त्यामुळे आई सकाळी लवकर नानाबरोबर डबा पाठवायची तर कधी आम्ही करायचो . पण शनिवार रविवार शेतात जायचो एकदातर या शनिवारी गेलो तर पुर्ण आठवडा शाळेला दांडी मारुन पुढच्या सोमवारीच गावात आलो . थंडीचे दिवस असायचे शनिवार सोमवार सकाळची शाळा आसायची व तीही आर्धी आसायची . त्याचदरम्यान 26 जानेवारी गणतंत्र दिवस असायचा . आमची ती धावपळ वेगळीच असायची आठ दिवस आधीच शाळेत वातावरण तापू लागायचं . शाळेचं पटांगण स्वच्छ करुन घेणं . लेझीमची प्रॕक्टीस , खेळाच्या स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि इतर ब-याच कार्यक्रमाचे नियोजन चालू असे . झेंड्याच्या कट्ट्याभोवती वर्गासमोर रांगोळी काढण्यासाठी धडपड असायची . डोंगरे मॕडम व शकू मॕडम आदले दिवशी नावानीशी जबाबदाऱ्या वाटून द्यायच्या मग काय हिरवा , निळा ,  भगवा रंग आणून रांगोळीत मिसळायचा आणि रंग चढावा म्हणून त्याला पाण्याचा हात लावून घरभर पेपरवर पसरुन ठेवायचा .बाकी अनेक रंग तयार करायचे .  शाळेचा गणवेष , रिबन धुवुन ठेवायची वाळली की छान घडी घालून गादीखाली ठेवायची म्हणजे तो इस्त्री केल्यासारखा दिसतो असा समज होता तेव्हा . पहाटेच कुडकुडत शाळेत जायचं .  शिपाई कट्ट्याभोवती पाणी मारुन  द्यायचा मग 

सुस्वागतम् 

वंदे मातरम् 

....... वा गणतंत्र दिन

असं पांढऱ्या रांगोळीनं लिहायचं झेंडा काढायचा तो रंगीत  रांगोळीने रंगवायचा बाकी वर्गासमोर चढाओढीनं रांगोळ्या काढायच्या रंग भरायचे आणि सहा वाजता आवरायला परत घरी यायचं . मग आंघोळ वेणी गणवेष असं सगळं आटोपून पुन्हा शाळेत जायचं मग झेंडावंदन आणि मुख्य म्हणजे संपूर्ण गावातून प्रभातफेरी आणि परत आलं की लेमन गोळ्या व षटकोनी आकाराची जि-याची छोटी बिस्कीट मिसळलेले चुरमुरे घेऊन पसार व्हायचं . शाळा घराजवळच असल्यामुळे हेलपाटे भरपूर व्हायचे . वक्तृत्व स्पर्धेत एकवर्ष झालेली फजिती अजूनही आठवते . भाषण पाठ केलेलं समोर जाऊन उभी राहिले "अध्यक्ष महोदय.....

आणि आता आपण माझे दोन शब्द शांत चित्ताने ऐकून घ्यावे "

पुढे काहीच आठवेना 

पुन्हा एकदा अध्यक्ष महोदयपासून सुरुवात केली पण गाडी काही पुढे जाईना . मग धन्यवाद म्हणून खाली येऊन बसले . अजुनही तो प्रसंग आठवला की हसायला येतं . पण पुन्हा कधी भाषण करतांना आडखळले नाही . आज सहजच लॉकडाऊन मधला 15 आॕगस्ट घरातच झाला तेव्हा या आठवणींना उजाळा मिळाला .     गु-हाळ संपवून गावात आल्यावर मुलींची तारांबळ होते तसेच आईला पण जास्त ताण पडतो असे काकांना वाटायचं मग ते स्वतः घरकामात आईला मदत करायचे . गावात अजून नळ आले नव्हते तर आडाचं पाणी असायचं . मग काकांनी आडातून शेंदून द्यायचं आणि मी व मायडीने छोट्या घागरीने घरात आणून ओतायचं असं सुरु केलं . हे पाहिलं की ताई आत्या म्हणायच्या

 "चार बोटात आंगठ्या घालतो , चारी हाताने पैसा मिळवतो पण भाऊ  बायको पोरींना किती जपतो काळजी घेतो  " . 

तोतो आईलापण काकांविषयी खूपआदर वाटायचा . गु-हाळ झाल्यानंतर सहज आक्की घेरडीला आली होती तर तिच्याकडे गोड बातमी असल्याचे समजले . पुन्हा आनंदानं घर उजळून निघालं . तिला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करुन घालायचे . काय खावं वाटतं हे अगदी हौसेनं विचारपूस सुरु होती कारण आता आई-काकांंना पहिलं नातवंड होणार होतं . त्याचबरोबर त्यांना थोडीशी भिती पण वाटली कारण आक्की स्वतः अपंग होती त्याची काही अडचण येईल का ? बाळ व्यवस्थित होईल का ? तिला काही त्रास होईल का हे अनेक प्रश्न त्यांना सतावू लागले . मग एके दिवशी पाच वाजता घरगुती संबध असल्यामुळे अरविंद काकींना (घेरडीतील प्रसीद्ध डाॕक्टर ) घरी बोलावलं . भरपूर गप्पा झाल्या खायला व चहापाणी झालं व त्यांनी एकदम बिनधास्त रहा काहीही अडचण येणार नाही आपण अगदी व्यवस्थितपणे तिला घेरडीत मॕनेज करु शकतो अशी ग्वाही दिल्यावर आई-काका दोघेही निश्चींत झाले . तायडीचं पण लग्नानंतर पहिलं वर्ष असल्यामुळे तिचे सणवार होत होते. ती पहिल्यांदा आली तेव्हा आम्ही तिची इतकी वाट पहात होतो कारण आम्हांला लग्नातील  फोटोविषयी प्रचंड उत्सुकता होती . तो आल्बम ती घेरडीत जेवढे दिवस होती तेवढे दिवस  आम्ही रोज पहात होतो . आम्हांला मजा वाटायची . तायडीचं लग्न झालं आमची शाळा आणि तशा लहान होतो त्यामुळे आईवर सगळ्या जबाबदाऱ्या पडणार हे गृहीत धरुन  काकांनी पुढच्यावर्षी गु-हाळ न करता ऊस कारखान्याला पाठवायचे ठरवले . पाण्याला गडी लावला व बरीचशी कामे बायका लाऊन करुन घ्यायला सुरुवात केली .

आता त्यांना एकट्याला देखरेख करता येईल असा त्यांनी शेतात एक नविन प्रयोग सुरु केला तो म्हणजे  

" मेंढीपालन "

जवळजवळ शंभर मेंढ्या खरेदी केल्या , तोही जोमात चालला त्यातूनही भरपूर उत्पन्न मिळू लागले . त्यादरम्यान छोटया मेंढ्यांच काळंभोर जावळ साठवलं व त्याची लोकर तयार करुन घेऊन मऊसुत उबदार सहा घोंगडी घरी ठेवण्यासाठी  घेरडीतच तयार करुन घेतली होती . त्याकाळात घेरडीची घोंगडी आख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद् होती .कारण आसपास वाड्यावस्त्यावर धनगर समाज होता तर गावात हातावर घोंगडी तयार करणारी सनगर समाजाची कुटुंब होती . चिंचोके भिजवून ते मोठ्या उखळात ओंडक्यासारख्या वरवंट्याने दोघेजण वाटायचे व ते रात्रभर भिजवून सकाळी शिजवून खळ तयार केली जायची व ती खळ  साच्यावरच्या लोकरीने विणलेल्या घोंगड्यावर हातांनी लावली जायची व मस्त घोंगडी तयार व्हायची . पुढे कितीतरी घोंगडी आमच्या ब-याशा  पाहुण्यारावळ्यांना पोहोच झाली . तसच त्याचवेळी झोपण्यासाठी पाठीला जाड म्हणून गादीसारखी गुंडाळून ठेवता येतील अशी दोन जेनं पण तयार करुन घेतली ती आजही माझ्याकडे आहेत . आजकाल माझ्या दारातल्या आंब्याची आढी घालण्यासाठी मी त्याचा वापर करते . त्याच्यात इतकी उब आहे की त्या उबीने बीना औषध कैरीचे रसाळ आंबे तयार होतात . तेवढ्याच जुन्या स्मृती !

       आईच्या डोक्यात जपाचा विषय होताच . त्यामुळे नाना काका म्हणाल्या प्रमाणे आईच्या आग्रहास्तव उन्हाळ्यात पुण्यात  जप करायचं ठरले . तसं येत असल्याचे त्यांना पत्र टाकून कळवले . मग सगळ्यांनी पुण्याला जाण्यापेक्षा 

परिक्षा संपली की सुट्टीला मायडीला किर्लोस्करवाडीला सोडवं व ज्योतीला म्हणजे नन्याला  सांभाळायला म्हणून मला घेऊन आई-काकांनी पुण्याला जावे असे ठरले . कारण नन्या खोडकर होता व त्याला खडेवर घेऊन फिरायला त्याच्या मागेमागे फिरायला कोणीतरी लागायचं . त्याप्रमाणे आम्ही गेलो . नाना काकांनी तो जप करुन घेतला  त्याची सांगता झाली . हे सगळं काका आईच्या समाधानाकरता करायचे त्यांना मनापासून हे पटत नव्हतं . पण केलं आणि आता पुण्यात आलाच आहात तर दोन दिवस रहा पुणे पहा तसेच नविन लग्न झालेल्या मुलींना काहीना काही कारणांनी साड्या द्याव्या लागतात ती खरेदी इथेच करा म्हणत काकुंनी आग्रह केला मग आम्ही पण राहिलो . मग खरेदीसाठी कापड दुकानात गेलो  . तेव्हा नुकताच नविन प्रकार निघाला म्हणत दोघी मुलींसाठी हिरव्या रंगाच्या गजीसील्क साड्या घेतल्या कारण तोवर तायडीकडे गोड बातमीची कुणकुण लागली होती . ते पहात आसतानाच  याच प्रकारतली  नऊवार साडी दुकानदाराला काकांनी काढायला सांगितले . कारण आईसाठी त्यांना साडी घ्यायची होती . सुंदर  अशा लिंबू कलरची साडी तर त्याला गडद गुलबक्षी रंगाचे काठ व त्याच रंगाचे साडीवर नाजूक बुंदके होते ती साडी एकदमच दोघांना आवडली किंमत विचारली तर जास्त वाटल्यावर आई बघू नंतर म्हणाली तर काकांनी तीच साडी बाजूला काढली . 

" पुन्हा लगेच कोण येणार आहे इथे ? ही साडी आत्ताच घ्यायची"    

असे काकांनी सांगितले . ते पाहून काकू आवाकच झाल्या त्यांना खूप कौतुक वाटले त्या काकांना म्हणू लागल्या

 " भाऊजी , आम्ही पुण्यात रहातो पण तुमच्या भावाला कधी असे वाटले नाही हो . आमच्या जाऊबाई नशिबवान आहेत बाबा ! हौशी जोडीदार मिळायला पण नशीब लागतं हो " 

आणि हशा पिकला . घरात लग्न होऊन सहाच महिने झाले होते तरीपण सारखसारखं कोण पुण्याला येतय म्हणत दोघांना पसंत पडलेल्या वेगवेगळ्या प्रकारातल्या प्रत्येकी तीनतीन साड्यांची खरेदी या तिघींसाठी झाली तर मायडी तायडीकडे एकटी राहिली म्हणून तिला फ्राॕक घेतला .मग मला व ज्योतीला पण कपडे घेतले , अशी इतकी मोठ्ठी खरेदी करुन आम्ही पुण्याहून रेल्वेने किर्लोस्कर वाडीला तायडीचा नविन संसार पहायला आलो . आता दुसऱ्यांदा मला रेल्वेत बसायला मिळालं . ही रेल्वे मोठी होती . सायंकाळी पाच वाजता आम्ही कि.वाडीला पोहोचलो तर स्टेशनवर तायडी , मायडी व भाऊजी हजर होते . खाली उतरलो तर तायडीला आई-काकांंना पाहून इतका आनंद झाला होता की ती हसतहसत रडत होती . कारण तिच्याकडेपण विशेष होतं व पहिल्यांदा आईला ती भेटत होती . घरात आलं की आईने लगेच तिला काय खावसं वाटतं विचारायला सुरुवात केली . दोघी हळुहळू आवाजात बोलू लागल्या . दोनदोन नातवंड होणार याचा आई-काकांंना खूप आनंद झाला होता .

           किर्लोस्करवाडी तसं नविन वसलेले गाव होत . बहुतेक सगळे कंपनीत कामाला जाणारे लोक तिथे रहात असत . त्यामुळे त्या गावातील लोकांनी चाळी बांधून बि-हाडं भाड्याने दिलेली होती . तिथे सगळी घरं कौलारु होती . अशाच मोठ्या कौलारु दोन मजली चाळीत दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्यात तायडीचा संसार होता . आसपास भरपूर समवयस्क बि-हाड रहात होती . सगळेच नोकरीच्या निमित्ताने आलेले मग या बायका सगळ्या एकमेकांच्या मैत्रिणी ! सगळे एकोप्यांन रहायचे . कंपनीचा साडेसातचा भोंगा झाला की सगळे घरातून निघायचे . सगळ्या वेळा भोंग्याप्रमाणे ठरलेल्या असायच्या .  नवनविन पदार्थ म्हणजे इडली-सांबार , आंबोळी हे पदार्थ  तिच्याकडे पहिल्यांदा खाल्ले . ती करायला शिकली याचं खूप कौतुक वाटायचं आईला . आम्ही प्रेशर कुकर पाहिल्यांदा तिच्याकडे पाहिला . मग इडलीपात्र व प्रेशर कुकर तिच्या सांगण्यावरून आईने घेतला . पंप मारुन सुरु करायचा पितळी स्टोव्हवर तिचा स्वयंपाक असायचा .  घरात फरशा , छोटसं बाथरुम , भिंतीत कपाटं आणि  सिमेंटचं प्लॕस्टर केलेल्या व रंग दिलेल्या भिंती . घरामध्ये  अधुनिकपणा जाणवत होता  ते पाहून आई-काकांंना ते टुमदार घर खूप आवडले . घेरडीत मोठा वाडा असला तरी तो जुन्या जमान्यातील होता एकूणच भिंती पोते-यानं व जमीन शेणानं सारवावी लागायची .  कामवाल्या बायकांकडून जरी सारवणाची कामं करुन घेतली तरी घरात फरक जाणवायचा . मग काकांनी तिथेच ठरवलं 

" आता घेरडीत फरशा बसवून घ्यायच्या व भिंतीना प्लॕस्टर करुन घ्यायचं व चूल काढून टाकायची दोन तीन स्टोव्ह आणू  म्हणजे गौडतीला होणारा त्रास कमी होईल !"

     आता एकापाठोपाठ एक दोघींची डोहाळजेवणं ,  बाळंतपणं येतील म्हणत घेरडीत आलं की पावसाळ्याच्या तोंडावर काकांनी रहात्या घरात काम काढलं . स्वयंपाक घरातलं सगळं सामान सोप्यात आणलं व तीन आठवड्यात स्वयंपाक घराचा कायापालट केला , फरशा ,  जुन्या भिंती काढून त्यात रॕक तयार करुन प्लॕस्टर करुन स्वयंपाकघर एकदम चकाचक करुन घेतलं . पुन्हा सोप्यातपण फरशा प्लॕस्टर करुन रंग देऊन घेतला . घर एकदम भारी वाटू लागलं मुख्य म्हणजे सारवण्याचं काम बंद झाल . आता मुली येतील व नविन बाळं पण तर त्यांच्या स्वागतासाठी घार सज्ज झालं होत !!!


               

प्रकरण 12 वे


नातींचे आगमन

21 सप्टेंबर 2020


            फरशीच्या घरात वावरतांना आम्हांला खूप आनंद होत होता . घरातला पसारा आवरुन घर सुटसुटीत वाटत होतं . लगेचच आक्की तायडीला घेरडीत आणलं आणि दोघींचा मोठा डोहाळजेवणाचा कार्यक्रम एकत्रितपणे थाटामाटात झाला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . आक्कीची उंची खूपच कमी होती पण तेज आलं होतं . तर तायडी सावळी होती पण स्मार्ट दिसायची . त्यादिवशी तायडीने  आईची नऊवार साडी नेसली होती , नथ घातली होती आणि जोडीला आंबाडा ! त्यामुळे जास्तच उठून दिसत होती , तिने वयाची वीशी पण गाठली नव्हती पण तेज आलंय असं जमलेल्या बायका म्हणू लागल्या . गावातल्या बायकांचा फराळ झाला ओटी भरणे , उखाणे , गाणी चेष्टामस्करी सगळे अगदी नेहमीप्रमाणे आनंदाने पार पडलं .

गाणी डोहाळे म्हणण्यात उषा वहिनी म्हणजे मोहन आण्णाची बायको तरबेज होती . त्यांचा आवाज छान होता . पण त्यांच्या घरात त्यांच्या गुणाची कदर झालीच नव्हती . आई-काकांंची ती लाडकी सून होती . आई त्यांना आपली मुलगीच मानायची . त्या तशा आशक्त होत्या व आता त्यांना पण बाळ होणार होतं त्यामुळे आईचं सतत त्यांच्यावर लक्ष असे . मुख्य म्हणजे काकांचे बारीक लक्ष असे .परवाच्या आजारपणानंतर त्यांना औषधे सुरु होती तर आई अगदी नाष्टा केलास का पासून विचारपूस करायची . गोड्या पाण्याला जाताना सगळ्याजणी आमच्या घरी जमायच्या . तिथेच घागरी टेकवून सुखदु:खाच्या चार  गोष्टी व्हायच्या मग सगळ्या मिळून पाण्याला जायच्या . आईने खायला काहीतरी केलेलंच  असायचं त्याची डीश पुढे सरकवली जायची . खाऊन पाणी पिऊनच पुढे कामाला लागायचं असा मायेचा शिरस्ता होता तिचा . हे सगळं वहीनींच्या लक्षात येत असे मग त्यांना पण भावनावश झाल्यासारखे व्हायचे.  उषा वहिनीबरोबर वाड्यातल्या मुलींचे मैत्रीचे नाते होते . महादेवाला त्यांच्याबरोबर जायचं यात्रेत किंवा सिनेमाला

 "बरोबर कोण आहे ?  उषा असेल तर जावा ."

असे घरातून काकांचे आम्हांला सांगणे असे.  त्या आम्हांला पिक्चरची स्टोरी सांगायच्या ,  गप्पा मारायच्या , आम्ही बाजारात , भाजीला ,  महादेवाला नेहमी वहिनीच्या मागे असायचो त्यामुळे वहिनीपेक्षा आम्हांला त्या जास्त मैत्रीणच भासायच्या . तसंच चीमू माझ्यापेक्षा थोडी लहान त्यामुळे सतत माझ्या मागे असायची बबलू ज्योतीबरोबरचा त्यामुळे त्यांचा खेळ चालायचा . पुढेपुढे तर काकू नसल्या व वहिनींना  करायचं नसलं की पोळ्या करायला आम्ही कोणीपण मुली जायचो आण्णा त्याची ठरलेली स्पेशल भरल्या वांग्याची भाजी व ठेचा करायचा तीन दिवस धमाल चालायची . वहिनीच्या आजारपणानंतर हल्ली आण्णानेपण घरात नरमाईचं धोरण स्विकारलं होतं . आणि आता तर त्यांच्याकडेपण बाळ येणार होत त्यामुळे वहिनींची काळजी घेतली जायची . त्यांच्या घरातले वातावरण हल्ली बरे झाले होते . 

          तायडीला आवकाश होता म्हणून तिला किर्लोस्कर वाडीला पोहोच केल . आक्कीला पण फोटो काढण्यासाठी आधी पंढरपूर नंतर मेडशींगीला पाठवलं . त्यावेळच्या पद्धतीने आक्कीचा चंद्रावर बसलेला फोटो काढला . तायडी वाडीला गेली आणि आठवडाभरातच तायडीच्या दिराचे पत्र आले . तायडीला सांगलीला दवाखान्यात नेलं होतं नको ती दुर्घटना घडली होती . आई खूप चुटपूट करु लागली .

 " बेबीला दगदग झाली , तिचा नथीचा नखरा डोळ्यांवर आला , दोडाचं दृष्टावलं , का एकावेळी दोघींची चोळी केली म्हणून असं झालं काय कुणास ठाऊक "

एक ना दोन ती अनेक तर्क लावत बसली काका सांगलीला जाऊन तायडीला घेऊन आले व थोडे दिवस घेरडीत ठेऊन घेतलं नंतर पोहोच करुन आले . आई मात्र खूप अस्वस्थ होत होतं . मावशी प्रभा काकू दुपारी येऊन बसायच्या. आईला पण दोनवेळा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले होते . आणि या बायकांचे तर्क लावण्याचे चालू होते 

" जेव्हा असे होते तेव्हा तो गर्भ नक्कीच मुलाचा असतो . मुलाच्यावेळी बाईला सांभाळून रहावं लागतं . "

 आता झालं ते झालं म्हणत  हळहळ करत बसण्याशिवाय काही करता येत नव्हते . 

तोवर आक्कीचे दिवस भरत आले होते म्हणून तिला घेरडीत आणलं . आता वेध बाळंतपणाचे लागले होते व त्यादृष्टीने तयारी चालू होती .आईला थोडीपण उसंत मिळायची नाही आम्ही पण जमेल तशी मदत करत होतो . घरात आता लहान बाळ येणार म्हणत आम्हांला पण उकळ्या फुटायच्या . आक्कीला व्यायाम हवा म्हणत महादेवाला पाठवलं जायचं मग तिच्यामागे जायला आम्हांला गंम्मत वाटायची . आईला मात्र भरपूर काम असे शेतीचा वाढलेला व्याप , मुलींची लग्न झाल्यामुळे त्यानुषंगाने वाढणारी कामं आणि स्वतःचा मोठा संसार . तरी कामाला हातोहात बायका होत्या पण पसाराच खूप वाढत होता . 

     इकडे शेतीमध्ये काकांचे एकावर एक प्रयोग चालू होते . दरम्यान खिलारी गायी वाढवल्या त्या व्याल्या की गावात आणायचे . एकदा दोन गायींना दोन खोंड झाली तर लहान मुलासारखी त्यांची काळजी घ्यायचे . तेलमीठ घालून कणीक मळून त्याचे गोळे करुन भरवायचे . अशी तरावट खीलारी खोंडांची जोडी कशी भारी दिसते असं त्यांना वाटायचं . ती खोंड पण काकांची वाट पहायचे ते आले की शेपूट वर हलवत हंबरायची . जागेवरच खुंट्याभोवती गोल गोल फिरायची मग काका जवळ गेले की एकदम शांत उभी रहायची काका पाठीवर जोरात थाप मारायचे मग ते तोंड वर करायचे म्हणजे जणू आता गळ्याखाली खाजवायची वेळ झाली असं सांगताहेत असे वाटायचे . मग काका बाजूला झाले की नाकानी जोरजोरात फूसफूस करायचे . असा त्यांचा मुक्या प्राण्याबरोबर प्रेमाचा संवाद चालायचा . गाईच्या धारा काढायचे काम आई करायची . बाकी गायींच मागेपुढे पहायला , चरायला न्यायला राखणदार होताच . 

       काकांच एक तत्व होतं , कोणताही उद्योग ते फार काळ करत नसत चांगली मिळकत झाली की काढता पाय घ्यायचे . त्यामुळे त्यांना कधी नुकसान झालं नाही . आणि उद्योगात पण वैविध्य राहिलं . भुईमुग , ऊस  , कापूस गहू-ज्वारीची सातत्याने नविन बियाणे , गाई , म्हशी , मेंढ्या खोंडं एक ना दोन सतत बदल करत रहायचे . पुढचा विचार करण्याची त्यांची पद्धत होती मग त्यांच्या सतर्कपणामुळे ते नेहमीच फायद्यात राहिले .

दरम्यान त्यांनी शेतीचा थोडा भाग विकला . राहिलेल्या शेतीत सुधारणा केली . तिकडे आक्कीच घर ब-यापैकी डागडुजी करुन घेतल . आपले बैलं , गडी , गाडी पाठवून तीचं शेत वहित करुन घेतलं व भाऊजींना लक्ष द्यायला सांगितलं . आक्कीसाठी नोकरीच्यापण शोधात होतेच पण तिचा कुठेच नंबर लागत नव्हता . त्याकाळात संस्थेला बांधकाम निधी दिला की नोकरीत घेतलं जायचं . काका तोही प्रयत्न करायचे . पण अजून यश आले नव्हते . 

     दरम्यान नवरात्रात आक्की सुखरूपपणे बाळंत झाली व तिला पहिली मुलगी झाली . बाळ-बाळंतीण सुदृढ असणं आई-काकांंसाठी महत्त्वाचे होते . पण दबक्या आवाजात चर्चा व्हायचीच 

" आधी आईला ओळीनं मुली झाल्या आता मुलगीपण आईवरच गेली . "

तायडीची पहिली दिवाळी होती त्यामुळे त्या दोघांना दिवाळसणासाठी बोलावलं होत . लग्नानंतर भाऊजी पहिल्यांदाच घेरडीला आले होते त्यामुळे आई-काकांंच्या उत्साहाला व कौतुकाला भरतं आलं होतं . भाऊजी एकदम मिळून मिसळून वागत होते . वडील नसल्यामुळे तसं ते मायेला पोरके झाले होते .त्यामुळे घेरडीत त्यांना मायेची उब मिळाली . त्याकाळात जावई म्हणजे ताठर भुमीका असायची पण भाऊजींकडे ती भावना नव्हती . मोठ्या भाऊजींच वागणं पण समजुतीने असे . त्यामुळे आई-काका म्हणायचे

" आमचे जावई हीच आमची मुले आहेत "

  आईला तर जावयांचा खूप अभिमान होता . 

   यावर्षी मायडी नववीला होती तर तिला आता पुढे शिकायचं होतं तिने तसा रेटा लाऊन धरला होता .मग तिला तिला शिकायला घातलां पाहिजे लग्नाची घाई न करता शिकवलं पाहिजे असा नूर निघू लागला व आईंने हे उचलून धरले . आक्की तायडी पण हल्ली हल्ली काकांशी बोलू लागल्या होत्या .त्यामुळे मायडीला पुढे शिकायला घालायचं यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्याच दरम्यान आक्कीच्या बाळाचं बारसं झालं आणि शनिवारी जन्म झाला म्हणून तिचे " अंजली " नाव ठेवलं . पुन्हा तायडीकडे गोड बातमी होती . यावेळी ती परत जातांना आईने तिला भरपूर सुचना दिल्या व पुन्हा ऐनवेळेस तिला घेरडीत आणायचं ठरले . 

     आता उषा वहिनींचे दिवस भरलेले होते . बरचसं औषधपाणी झालं होतं त्यामुळे त्या जरी आशक्त होत्या तरी त्यांना छानसा मुलगा झाला . मोठा बबलू म्हणून याला सगळे छबलू म्हणू लागले . तेव्हा एक गंमतच झाली . वहिनी आजारातून उठली छान बाळ झालंय आता सगळ्या पाहुण्यांना बोलावून जरा निवांत बारसं करु म्हणत म्हणत बाळ मोठ झालं आणि शेवटी जावळाच्या आदले दिवशी आठनऊ महिन्याच्या बाळाचं बारसं झालं त्याच

 " विनोद " नाव ठेवलं मोहन आण्णाचे वडिल म्हणजे आमचे मोठे काका निघून गेल्यामुळे खूप त्रास झाला होता आता मोहन आण्णाचा स्वतःचा संसार व्यवस्थितच झाला पाहिजे यासाठी काका उषा वहिनीकडे जातीने लक्ष द्यायचे . ते घर आपलंच आहे असे काकांनी ठरवून टाकले . मोहन आण्णाला दोन खोल्यांच घर अपुरं पडू लागलं म्हणून तो वाड्याबाहेर रहायला गेला . आपल्याकडे मुली आहेत उद्या मुलींची लग्न झाली की इतकी जागा लागत नाही म्हणत आई-काकांंनी चर्चा करुन आमचं वाड्यातलं दुसरं घर आण्णाला जबरदस्तीने विकत घ्यायला लावले मग पुन्हा आण्णा वाड्यात रहायला आल्यावर सगळ्यांना आनंद झाला .  आक्कीनंतर सातआठ महिन्यात तायडीला कन्यारत्न झाले . बाळ भाऊजींसारखा गोरपान देखणं होतं . आमच्या घरात आनंदी आनंद झाला होता . तायडीला पहिल्यांदा तसं झालं म्हणून आईने परत तिचे काहीच कोडकौतुक केले नाही . पण बाळाचे बारसे मात्र धुमधडाक्यात केलं . तिच्या सासरचे,  वाड्यातले ,   आमच्या आत्त्या , सहकुटुंब गोंदामामा बरीच मंडळी होती . बाळाचं नाव " मंजिरी " ठेवलं . दोन नाती आंजू न मंजू .बाहेरची चर्चा आईच्या कानावर यायची तसं आता आईने जरा ठसक्यातच बोलायला सुरुवात केली होती  . 

" पहिली बेटी तूप रोटी ! आम्हांला पाच मुली आहेत त्याचं आम्हांला काही वाटत नाही बेबीचं तर हे पहिलंच बाळ आहे त्याचं आम्ही हसतमुखाने स्वागतच करणार. "

मग फारसं कोणी बोलत नसे .

      आता काकांनी सर्व मुलींच्या भवितव्याकडे जास्त लक्ष द्यायचं ठरवलं . किर्लोस्कर वाडीला सारखे जाणे व्हायचं . भाडं भरत बसण्यापेक्षा आपणच भाडेकरु ठेवले पाहिजेत . स्वतःचे घर होईल , सोबत होईल व चार पैसे मिळतील या उद्देशाने तायडी रहात होती तिथे समोरच विक्रीस निघालेला प्लाट घेतला . स्वतःच त्याचा चाळीप्रमाणे प्लॕन तयार केला जोडीला तायडी व भाऊजी होतेच पण वयांने लहान असल्यामुळे काका करतील ते छानच करणार म्हणत नाचत नाचत सगळी धावपळ करु लागले . चार घरांची बैठी कौलारु चाळ बांधायचं ठरले आणि सगळ्या कामांसाठी घेरडीतून माणसं नेली . तायडीचं लहान बाळ होत तरी बांधाकामावरच्या लोकांना जेवण करुन घालायचं काम तायडी उत्साहाने करायची . कारण आता स्वतःच्या घराची तिला ओढ लागली होती . उन्हाळ्याच्या सुट्टीत पोळ्या करण्यासाठी तायडीला मदत म्हणून मला व मायडीला आळीपाळीने नेऊन सोडलं  आणि मे अखेर तिचे घर बांधून तयार झाले . 

          तायडी मे महिन्यात घेरडीला आली तिचा आनंद गगानात मावत नव्हता . तेव्हा मायडीची दहावी झाली होती व घेरडीत दहावीच्या पुढे शाळा नव्हती .  आई-काका , तायडी भाऊजी सर्वांनी चर्चा केली व मायडीला पुढच्या शिक्षणासाठी किर्लोस्करवाडीला ठेवायचं ठरलं . दरम्यान तायडीने नविन घराची जूनमध्ये वास्तुशांत करायचे ठरवले .

          त्यादरम्यान काकांनी पण गमंत केली . एका शनिवारी गोंदामामा पण आला होता व बोलत बोलत सहजच काकांना म्हणाला 

" भाऊजी तुम्हांला दोन जावई आलेत असे तुमच्याकडे पाहून तर वाटत नाही . तुम्ही एक काम करा , माझी पँट घालून पहा . कशी वाटते बघू आपण अजून तरुण दिसाल तुम्ही  ".

          मग काकांनी पण मामाचा ड्रेस घातला सावळा रंग पण एकदम तरतरीत होते ते . मग नाक फुगवत ते हासू लागले . आणि आईला विचारु लागले 

" कसा दिसतो मी ? दिसतो की नाही मी एकदम तरुण मग ? वापरु का असे कपडे ?  तुला आवडत असतील तर वापरेन मी बघ . तुझ मत सांग . "

आई मान हलवत गाल उचलत हसू लागली व नेहमीप्रमाणे लाजून हात उंचावत हसत म्हणू लागली .

" तुम्हांला काय धोतर काय आणि पँट काय ? रुबाबदार माणसाला काहीही शोभून दिसतं   बाहेर एक चक्कर मारुन या लोकच सांगतील काय ते . " 

मग आम्ही पण नाचू लागलो व हट्ट केल्याप्रमाणे 

" काका छान दिसतेय तुम्हांला पँट आता तुम्ही पण वापरा "

असे म्हणू लागलो . मग काका पण सोप्यात चौकटीवर लावलेल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभे राहिले व हसतच स्वतःला  न्याहाळू लागले . त्यांना पण त्यांच ते रुप मनोमन आवडलं होतं . मग ते तसेच चक्कर मारायला गावात गेले तर काय जो पाहील तो तोंडात बोट घालायचा आणि त्यांना हसतहसतच म्हणायचा

"छान वाटतंय राव काका ! तुम्ही तर दहा वर्षांनी लहान दिसताय . पँट-शर्ट वापरायला करा सुरुवात आता . बदल करावा तर त्याची सुरुवात  तुम्हीच करावी  ." 

अशा स्वरुपाचे शेरे त्यांना मिळाले . मग काका पण खूष झाले .पाहूया ,  एखादा  ड्रेस शिवून घेऊ म्हणू लागले . मामांने त्याचा ड्रेस घेरडीतच ठेवला 

"बघा थोडे दिवस वापरुन कसे वाटते ते  मग ठरवा " 

काकांनी दोन दिवस मामाचा ड्रेस  वापरला . 

     दरम्यान तायडीची नव्या घराची वास्तूशांत जूनमध्ये ठरली होती मग तायडीने मोठ्या उत्साहाने तिच्या वास्तूशांती निमीत्त काकांना पँट-शर्ट शिवली आणि वयाच्या पंचेचाळीसीपर्यंत शर्ट विजार वापरणारे काका पँटशर्ट वापरु लागाले एकदमच मॉडर्न वाटू लागले . पहिल्यांदा पहाणारा आवर्जून ड्रेसबद्दल काहीतरी टिपण्णी करायचाच की काका खूष व्हायचे , आईपण खूश आणि आम्ही मुलीपण !!!




प्रकरण 13 वे


घरात एकूण 10 मुली


30 सप्टेंबर 2020



      तायडीने वास्तूशांत ठरवली आणि सासर माहेरचे सगळे पाहूणे बोलावले . तिच्या आनंदाला अगदी उधाण आलं होतं . ती भाड्याने रहात होती त्या चाळीत रहाणारं सगळ्यात लहान जोडपं होतं ते की जे स्वतःच्या घरात रहायला निघालं  होत ! आणि काकांनी भविष्याचा विचार करुन घेतलेला निर्णय होता तो . दोन-दोन खोल्यांची चार घरांची टुमदार कौलारु इमारत होती ती . दारात फुलझाडं असलेली  फिकट पीस्ता रंग देऊन त्यावेळच्या पद्धतीने स्वयंपाक घरात रॕक , कीचन कट्टा , बाथरुम , माळा शेजारीच हौद ,  नळ , टाॕयलेट संपुर्ण इमारत आतून बाहेरून प्लॕस्टर फरशा असं सगळंच अगदी अद्ययावत घर पाहून वास्तूशांतीला आलेले पाहूण्यांना आचंबा वाटला .मोहन आण्णाच कुटूंब , गोंदा मामाचं कुटूंब , नागर आत्या सगळे आवर्जून आले होते . तिथल्या पद्धतीने नाष्ट्याला इडली-सांबार तर जेवणात  मोतीचुर बुंदीचे लाडू  , मसालेभात असा बेत होता . तसं  सगळ्यांच आतापर्यंत रहाणं खेड्यात घेरडीत जुन्या वाड्यात गेलेलं त्यामुळे किर्लोस्करवाडीच मुळात टुमदार गाव , तिथे नविन बांधलेलं घर ,  हे सगळं अधुनीक वाटत होतं . दोन्हीकडच्या पाहुण्यांना कौतुक वाटत होतं , काकांच्या दूरदृष्टीचे व धाडसी निर्णयाचे सगळे कौतुक  करु लागले . तायडीच्या सासूबाई म्हणजे शांताक्का व आई आजोळच्या नात्याने लांबच्या आते-मामे बहिणी होत्या . त्या स्वतः , भाऊजींचे भाऊ सगळे अगदी खूष होते . आई-काका आधी म्हणतच असत पण तेव्हापासून आई-काकांनी 

"जावईच आमची मुलं आहेत "

असे जणू घोषीतच करुन टाकले मग वयपरत्वे थोडीशी समज आल्यामुळे तायडी पण घरातली कर्तीसवरती मुलगी म्हणून जणू हाताशी आलेला मुलगा याप्रमाणे लक्ष देऊ लागली . न बोलता एकमेकांच्या  गरजा ओळखंत वाढता संसार काका व तायडी एकमेकांना मदत करत सावरु 

लागले . वास्तूशांत झाली की लगेचच तीन भाडेकरी शेजारी रहायला येणार होते . तर कॉलेज सुरु झालं की मायडी तायडीकडे रहायला येणार होती .

      आक्कीचं रहाणं खेड्यात होतं त्यामुळे इच्छा असूनही  तिला काही करता येत नव्हते . तिच्या नोकरीचा अजून मेळ बसला नव्हता पण आज न उद्या तिला नोकरी लागणार हे नक्की होतं . तीचे बाळ म्हणजे अंजू आता दीड वर्षाची झाली होती व आक्कीला दुस-यांदा दिवस गेले होते . साधारण दिवाळीच्या आसपास  तिचे दुसरे बाळंतपण येत होते . त्यामुळे आईने पुन्हा कंबर कसली होती . वास्तूशांती करुन आम्ही घेरडीला गेलो . मायडीचा दहावीचा रिझल्ट लागला मग ती काॕलेजला जाणार म्हणून काकांनी तिला त्यावेळच्या फॕशनप्रमाणे सोलापूरहून मॕक्सीचे कापड आणून दिले व तिची बॕग भरली . दहावी झाली की ती बाहेर पडली . तिला शिकायला तायडीकडे ठेवायचं ठरलं म्हणून आमच्याच काही लोकांनी नावं पण ठेवली पण आलीकडे आईने खडसावून बोलण्याचे धोरण स्विकारले होते ती म्हणायची

" न शिकता खेड्यात घरी राहून घरकामच करायचं की त्यापेक्षा शिक्षण झालं तर कल्याणच होईल शहराचं वळण पडेल  आणि दुसऱ्या कुणाकडे नाही मोठ्या लेकीकडे सुखरूप आहे "

आणि मग काका मायडीला स्वतः   किर्लोस्करवाडीला सोडून आले . 

          इकडे घरात आई-काका मी आणि ज्योती चारजणच रहात होतो . तसं मायडी व मी दोनच वर्षाच्या अंतराने असल्यामुळे सतत भांडायचो पण आम्ही सहसा कधी एकमेकींना सोडून राहिलो नव्हतो . जुळ्याचं दुखणं होतं आमचं . आमचे लहानपणीचे काही मजेशीर किस्से आहेत . नेहमीप्रमाणे एकदा सुट्टीत मामाची दोन्ही मुलं घेरडीत आली होती व शनिवारी मामा येऊन आम्हांला सगळ्यांना  मुचंडीला घेऊन जाणार होता . मला सायकल शिकायची होती म्हणून भाड्याने सायकल घेऊन आम्ही मराठी शाळेकडे सायकल  शिकायला गेलो . माझा पाय चेनमध्ये अडकला व टाचेच्या वर हाडापर्यंत खूप मोठी जखम झाली . मग आता हे दाखवायचं तर आईची भिती वाटू लागली  म्हणून परस्पर नर्सबाईंच्या घरी गेलो त्यांची मुलं म्हणजे आमच्या बरोबरच खेळायला असायची . त्यांने आयोडीन लावून कापूस लाऊन पट्टी बांधून दिली मग घरी गेलो आणि सायकल खेळताना पायाला थोडंसच लागलंय असे आईला खोटं सांगितले . दोन दिवसांनी शनिवारी मामा आला मला पाय टेकवता येईना . रविवारी सकाळी सणकून ताप भरला मामा जनावरांचा डॉक्टर होता . त्याला अंदाज आला त्यांने पायाची पट्टी सोडली व पाहिलं तर पाय सुजला होता व सेप्टीक झालं होतं . तो आईला म्हणाला

 " ताई ही तर टाके घ्यायची जखम होती . आता तीन दिवस उलटून गेलेत , आता जखम चिघळलीय  , बघा दवाखान्यात न्यावं लागेल हीला ".

जखम आंधळी झाली पुढे सहा महिने लागले माझा पाय नीट व्हायला तोवर ओरडा खात होते . 

मग माझं मुचंडीला जाणं कॕन्सल झालं त्याची मुलं व मायडी एकटी नको म्हणत असतांना मामा तिला  मुचंडीला घेऊन गेला . नंतर आई मला घेऊन आठ दिवसांनी मुचंडीला जाणार होती . मायडीचं तेव्हा नाक टोचलेलं होतं तर तिला दिवसातून जेव्हा केव्हा आठवण होईल तेव्हा ती नाकाचं कारण सांगायची आणि

" माझं  नाक दुखतंय " 

म्हणायची व रडून गोंधळ करायची मी व आई गेल्यावर पुन्हा तिचे नाक कधी दुखले नाही व ती रडली पण नाही . मग सगळे तिला नाकावरुन  चिडवत असत . मामांने आईला सांगितले 

" इथून पुढे शरी राणी दोघीही असतील तर मी आणणार ,  एकटीला नाही बाबा  ".

असे आमचे जुळ्याचे दुखणे होते . 

     मुचंडीत आता नणंद , भाच्या आल्यात म्हणून मग मामी रोज वेगवेगळे पदार्थ करायच्या . जवळेकर स्पेशल भजी दोनदा व्हायची . पैज लाऊन बापू मामा ,  गोंदा मामा व त्याची मुलं पोट तडणी लागेपर्यंत भजी  खायची . भजी हा जवळेकरांचा जिव्हाळाचा विषय असे . अगदी आप्पा सुद्धा तसेच होते ते असेपर्यंत पेन्शनच्या दिवशी त्यांच्यातर्फे सर्वांना 

 " स्पेशल भजाची फीस्ट "

असायची . असे हे भजी पुराण !

चैत्र महिना असल्याने आई आली म्हणून मामींनी चैत्रागौरीचं हळदीकुंकू करायचा बेत आखला मग कमाळाप्रमाणे कलिंगडं चिरुन ठेवायचं . कैरीची डाळ ,  पन्हं तसेच दोन फुलपात्रात गहू घालून त्यावर एकसारख्या दोन कै-या ठेवायच्या त्याला राघूची चोच म्हणून लालभडक कुंकू लावायचं आणि आवरुन बसायचं ! हा एकूण कार्यक्रम .

       मग मामाची दोन्ही मुलं , मी व मायडी कै-या आणायला गावाजवळच्या शेतात गेलो होतो .  अर्थातच त्या मालकाला न सांगता कै-या आणायच्या होत्या . आम्ही बांधावरुन झाडापर्यंत गेलो . मामाची दोन्ही मुलं झाडावर चढून कै-या काढून आमच्याकडे फेकत होती . मी व मायडी खाली होतो . पोरांना झाडावरुन मालक हातात काठी घेऊन येतांना दिसला तसं त्यांनी पटापट उड्या मारल्या व आम्हांला पण त्यांच्या पाठोपाठ पळायला सांगितले . तो म्हातारा जे कानडीत शिव्या देत आमच्या पाठी काठी घेऊन लागला ते आम्हांला पळता भुई थोडी झाली ! अजूनही आठवलं तर हसायला येतं . अशी आमची जोडगोळी होती त्यामुळे मायडी वाडीला गेल्यावर मला खूप जड गेलं होतं . तशी ज्योती खूपच लहान होती त्यामुळे तिचा तिचा ग्रुप वेगळा होता . फक्कड काकांचा सुधीर व मी एका वर्गात होतो . पाच बहिणीत तो एकटाच होता . त्याची माझी ब-याचदा भांडणं व्हायची मी मुलगी म्हणून मागं घेतलं पाहिजे असा प्रभा काकूंचा रेटा असायचा पण आईला आजिबात सहन होत नसे मग बोलायला आई मागेपुढे पहात नसे . असे जरा चालायचं . 

     आक्की घेरडीला दवाखान्यासाठी यायची त्यादरम्यान तिला , एम्प्लाॕयमेंटकडून अंगणवाडी शिक्षीका म्हणून तीन वर्षासाठी आॕर्डर आली व घेरडी-मेडशींगी रोडवर असलेलं धुमाळवाडी गाव मिळालं . पुन्हा जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षीका म्हणून मिळू शकणारी पोस्टींग लक्षात घेता जाॕईन व्हायचे ठरले . व तिचे बि-हाड धुमाळवाडीला आणण्याचे ठरले . छोटीशी वाडी होती त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटू लागली . काय सोय होईल हे पहाण्यासाठी आई-काका दोघेही आक्कीसह  धुमाळवाडीला शाळेवर गेले . शाळेच्या पाठीमागे एक घर दिसले मग तिथे काही व्यवस्था होते का पहायला काका गेले . माणसं चांगली वाटली 

"आंगणवाडीला बाई मिळतात तर आम्ही आमच्याकडे रहायची सोय बघू त्यांची "

असे त्यांनी सांगितले चहा करण्यासाठी त्यांनी आपल्या बायकोला म्हणजे मंगलला शेतातल्या कामावरुन बोलावून घेतलं . मंगल आणि आक्कीने एकमेकींना पाहिलं फक्त आणि दोघीजणी एकमेकींच्या गळ्यातच पडल्या . त्या जवळ्यातल्या बालमैत्रीणी निघाल्या ! आई-काकांंना तिने सांगितले 

" आता तुम्ही रेखाची काळजी सोडा , माझी एक खोली रिकामी करुन मी तिला दिली ! तीचं बि-हाड  कायमच आमच्या वस्तीवर राहिल शाळा आमच्या शेतातच आहे ". 

 आई-काकांंचा व आक्कीचा जीव भांड्यात पडला . त्याचदिवशी आक्की जाॕईन झाली . मग सुकाला बैलगाडी घेऊन मेडशींगीला आक्कीचा संसार धुमाळवाडीला आणाण्यासाठी पाठवलं . आता भाऊजी-आक्की व अंजू असा तिचा नविन संसार सुरु झाला . आता  तिच्या सरकारी नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्या व सगळ्यांना खूप आनंद झाला . 

            तिकडे एकदोन महिन्यात तायडीला पण दुसऱ्या बाळाची चाहूल लागल्याचे पत्र आले . आईनं आता चाळीसी ओलांडली होती . रेखाच्या पाठोपाठ चार महिन्यातच बेबीचं बाळंतपण येईल असा तिचा हिशेब चालू होता . आलीकडे तिला जरासा थकवा पण जाणवत होता आणि तिच्या लक्षात आलं यावेळी आपली पण पाळी चुकली आहे . दुपारच्या वेळी मावशी काकू सगळ्यांशी गप्पा मारताना आईने त्यांना सांगितले व म्हणाली आता चाळीसी होऊन गेलीय म्हणून असे होत असेल का ? मला थकवा पण वाटतोय . मग  सगळ्यांची चर्चा सुरु झाली त्या म्हणू लागल्यावर 

" बघ आठदहा दिवस वाट पण काहीही असू शकते , सरळ अरविंद काकीला दाखवून ये " .  मग आई त्यांच्याकडे गेली त्या आईला म्हणाल्या 

" आत्ताच मला काही सांगता येणार नाही पण जर दिवस राहिले असतील तर तुम्ही पंढरपूरला जाऊन आलेलं बरं उशीर नको ".

मग आई-काका पंढरपूरला गेले मोठा दवाखाना असल्यामुळे चेकींग केलं की  तिला दिवस गेल्याचे लगेचच समजले पण थकवा येतो म्हणून साखर तपासावी लागेल असे त्यांनी सांगितले . त्याप्रमाणे सर्व चेकींगनंतर तिला साखर असल्याचे सांगितले . 1980 चा तो काळ होता डायबेटीसविषयी त्या काळात फारशी माहिती नव्हती , विज्ञानपण फारसं पुढे गेलेलं नव्हतं . 

         एकीकडे आनंद , एकीकडे भिती आणि आता दोन जावई आलेत दोन नाती झाल्यात सध्या दोन्हीही मुलींना दिवस गेलेत आणि आपल्यालाही दिवस गेले यामुळे आईला शरमायला व्हायचं . घेरडीत आल्यावर सगळ्यांना माहिती झाल्यावर सगळे समजूत घालू लागले .  

" असुदे ,  काही होत नाही ". मावशी काकू आईला अनेकांची उदाहरणे देऊ लागल्या . 

"असेल नशिबात मुलगा  तर होऊदे . घ्यायचं जरा औषधपाणी काळजी घ्यायची ".

मग आईला पंढरपूरची ट्रीटमेंट सुरू केली फक्त साखर खाऊ नका म्हणून सांगितले . 

आता तायडीनंतर एकाच महिन्यात आईचं बाळंतपण येणार होतं . त्यामुळे आईच्या डोक्यात कसं करावं याविषयी विचारचक्र सुरु झाले . दिवाळीत आक्की-तायडी दोघीपण घेरडीला आल्या मग तेव्हा आक्कीला बाळंतपणासाठी घेरडीत आणायचं ठरलं व तायडीचं बाळांतपण किर्लोस्करवाडीत करायचं ठरलं त्यासाठी तिच्या सासूबाई म्हणजे शांताक्का येणार होत्या . तर आईच्या बाळंतपणासाठी नागर आत्त्यांची मुलगी बाळी ताई येणार असे ठरले . इतका गोंधळ उठला होता तरी आई-काकांंच सगळं आनंदात हसतखेळत चालू होतं . शेतातील सुधारणा नवनवीन  प्रयोग सुरुच होते . आईला मात्र दिवसेंदिवस थकवा जाणवत होता . 

      दिवाळीनंतर लगेचच एक दिवस दुपारीच आचानक तब्बेत बरी नाही म्हणून आक्की आली . आई गोळी घेऊन झोपली होती मी सोप्यात बसले होते तर काकांनी स्वतः उठून आक्कीवरुन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला का तर झोपलेल्या आईला उठवायला नको आणि दिवस भरलेली आक्की तर प्रवास करुन आली होती ! मग तुकडा तर ओवाळून टाकायलाच हवा . मला तो प्रसंग आजही तसाच डोळ्यांसमोर उभा रहातो .  लेकीची माया आणि बायकोची काळजी एकाचवेळी !

         पुढे पंधरा दिवसांनी आक्कीला दुसरे कन्यारत्न झाले . आता मात्र सगळेच कान टवकारत होते . चर्चांना उधाण येत होतं . पण आई स्वतः अवघडलेली होती तरीही तिने आक्कीच्या कशातच कमतरता पडू दिली नाही . हातोहात बायका लावून सर्व कामं करुन घेतली . या बाळाचं नाव मायडीने "गायत्री"  ठेवलं . तीन महिन्यांनी बाळाला घेऊन आक्की धुमाळवाडीला गेली . लगेच एक महिन्यात तायडीला दुसरी मुलगी झाल्याचे व बाळ बाळंतीण सुखरुप आहेत तसेच बाळ नाकीडोळी एकदम निटस आणि बाळसेदार असल्याचे पत्र आले . या बाळाचे नाव " मेधा " ठेवले . मायडी काॕलेजला गेल्यानंतर कादंबऱ्या वाचू लागली होती त्यामुळे नविन नविन नावं ती शोधून काढत असे . आमच्या घरातले वातावरण छानच होते . आई-काका म्हणायचे जे असेल ते असेल सध्या आईचं वय जरा जास्त झालं होतं त्यातच आता तिला डायबेटीस निघालं . त्यामुळे सुखरूपपणे सुटका झाली पाहिजे एवढीच अपेक्षा ते बाळगून होते . दरमहा काका आईला पंढरपूरला दवाखान्यात घेऊन जायचे . वयपरत्वे आईला जडत्व आलं होतं त्यातच शुगारमुळे अशक्तपणा जाणवत होता .पण बाहेर मात्र चर्चांना उधाण आलं होतं . आता सर्वांचे डोळे आईकडे लागलेले होते . 

" आधीच्या पाच मुली आहेत आता एवढं पपा काकीला मुलगा झाला पाहिजे ".

तारीख जवळ आली म्हणून काका आईला पंढरपूरला रहायला घेऊन गेले व दोनतीन दिवसात आईला दवाखान्यात न्यावे लागले . आत्तापर्यंत एकदम सहज होणारी डिलीव्हरी यावेळी थोडी त्रासदायक व वेळखाऊ झाली पण नॉर्मल झाली . आणि आईला सहावे कन्यारत्न झाले .     

 आई-काकांंच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळे मोहन आण्णा त्याच दिवशी पंढरपूरला गेला होता . झालेलं बाळ गोरपान आणि गुबगुबीत होतं . दोघीजणी सुखरूप आहेत याचच आई-काकांंना खूप समाधान वाटत होतं . घेरडीत आक्की आली होती आणि आम्ही सगळेजण काळजी करत बसलेलो असणार याची आई-काकांंना कल्पना होती मग त्यांनी मोहन आण्णाला रात्रीच घरी पाठवून दिलं होतं . आण्णा आला की वाड्यातले सर्वजण आमच्या घरी जमले होते . मुलगी झालेले ऐकून सगळे शांत बसले असं का याचा मला विचार पडत असे . आता घरामध्ये एकूण आई-काकांंना सहा मुली व चार नाती अशा दहा मुली झाल्या . हा हिशेब घरच्यापेक्षा बाहेरचेच लोक जास्त करत आसल्याचे जाणवत होते .

          आईला अशक्तपणा आलेला होता त्यामुळे तिला थोडंस दवाखान्यात रहाव लागणार होते . तिसरे दिवशी सकाळी आईने बाळाला मांडीवर घेतलं तर बाळाचे तळहात व ओठ काळे पडले होते व बाळाला झटके आले . आईने आरडाओरडा करताच सगळे जमले धावपळ करत लगेचच बाळावर उपचार केले गेले व नर्स बाळाला घेऊन आईकडे आली व म्हणाली

" हे घ्या तुमचं बाळ बेशुद्ध पडलेलं बाळ संजिवनी घेतल्यासारखं जाग झालय छान गोरपान गुटगुटीत आहे हीचं नाव तुम्ही संजिवनी ठेवा  ".

आसपासच्या नर्स डाॕक्टर हसू लागले व तिथेच नामकरण झाल्याप्रणाणे ती घेरडीला येतानाच बरोबर " संजिवनी " हे नाव बरोबर घेऊन आली . काकांनी तायडीला पत्र लिहीले 

"  गोरीपान मुलगी झाली आहे . एक नंबर दिसते मुलगी , तब्बेतीने पण छान आहे सौ. ची पण प्रकृती ठीक आहे ".

मायडी व तायडीला आता घेरडीला येण्याचे वेध लागले होते . कारण त्यांना संजूला पहायचे होते तर आम्ही सगळेजण मेधाला पहाण्यासाठी उत्सुक होतो !!