लाॕकडाऊन डायरी प्रकरण 1
भाग 1 ते 5
कोरोनाचं संकट आणि नविन नात्याची गुंफण , कुटुंबातील वाढता आपलेपणा
धुमधडाक्यात आशिषचं लग्न होऊन आता दीड महिना होऊन गेलाय. अजुनही रोज वेगवेगळे आणि तेचतेच फोटो पहाणं , video पहाण कोणत्याही नातेवाईकाशी किंवा स्नेह्याशी लग्नाच्या गप्पा मारणं आणि तीच मधुर चव जिभेवर रेंगाळणं सुरुच आहे. त्यांचा नविन संसार पहातांना ऐकतांना काही होत असलेली फजिती ऐकतांना मन एकदम 30 वर्षे मागे जातं आणि फिल्म रिवाईंड होतेय आसं वाटतं. थोडा पिढीतला बदल बाकी नाविण्याचा अनुभव तोच की !!
सगळे आपापल्या ठीकाणी गेले आहेत. आकांक्षाचा क्लास पण जोमानं सुरु झालायं . काका-काकीपण 6 महिने बार्शीला राहिले त्यांना परांड्यात थोडे दिवस जावस वाटलं म्हणून त्यांना परांड्याला सोडून आम्ही पण 8 दिवस पुण्याला जाऊन आशिष-किर्तीचा नविन संसार लावुन आलो . येतीजाती व मामेभावाच्या मुंजीचं गृहमख यासाठी दोघे मिरजेला जाऊन आले. कीर्तीचे आई-बाबा पण लेकीचा संसार आगदी धावती भेट देऊन पाहुन गेले. डिसेंबरपासून यांच पण शेताकडे लक्ष नव्हते .कलिंगडं मिरच्या लावल्यात त्यांनी पण आता शेताकडे मोर्चा वळवलाय. सगळ्यांच छान रुटीन सुरु झालय.
आता पाडव्याला नविन वर्ष सुरु होतेय . पहिला सण . कीर्तीला छानसा पांढरा ड्रेस शिवायला ज्योतीला सांगितले . आकांक्षा पाडव्याला यायला जमणार नाही म्हणाली पण आशिष-किर्ती व काका-काकी येतील. चला मग आपण 6 जण करु पाडवा. सगळी तयारी व्यवस्थित करु बायका तर सगळ्या सांगून ठेवल्यात . मंगळागौरीचं नियोजन पण आत्ता केलं तरच ललिता , संस्कार-भारतीचा ग्रुप ठरवता येईल. तसं बार्शीला दुसरी मंगळागौर करावी असा मानस मी विहिणबाई व कीर्तीला बोलुन ठेवलाय पण ती पाडव्याला आली की प्रत्यक्षात बोलुन ठरवता येईल. आत्ता तिच्या डोक्यात पाडव्याला कायकाय घालावं ? दोन मैत्रीणींची लग्न आहेत त्याला काय घालाव याचं प्लॉनिंग चालु आहे .बार्शीला आली की माझा सगळा खजाना बघ आणि ठरव काय काय हवं ते असं तिला सांगायचं आसं मी ठरवलंय .
आता पुण्यात त्या दोघांचही रुटीन चांगलं सुरु झालय . पुण्यात कीर्तीला विचारुन स्वयंपाक करायला कुवळेकर काकुनां लावल तसं ती सकाळी फक्त लावाव व रात्रीचे मी घरी करेन असं म्हणाली पण तिला आता नारायणबागेतून जा-ये करावी लागेल तस लांब होतय , ब-यापैकी मोठा ब्लॉक , नविनच लग्न झालेले , शिवाय मोठी रजा झाल्याने आॕफिसमध्ये साठलेली कामे हे सगळंच एकदम अंगावर पडले तर आजारी पडेल म्हणून मीच कुवळेकर काकुंना दोन्ही वेळेचं ठरवून आले. जेमतेम 3 आठवडे व्यवस्थित चालले असेल अचानक कुवळेकर काकुंचे सासरे आजारी पडले म्हणून त्या गावाला गेल्यामुळे स्वयंपाक करण्याचं कीर्तीला काम सुरु झालं . फारशी सवय / सराव नसल्यामुळे तिची दमछाक व्हायला लागली . चारपाच दिवसांनी वरकामाच्या मोहिते काकु पण गावाला गेल्या आणि या दोघांचीही फाजिती व्हायला लागली . काय करावं मनूला पण कळेना .सकाळ संध्याकाळ फोनवर काहीतरी सांगावे आणि प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी कराव असं होऊ लागलं . तसं adjust करायचा दोघांचापण प्रयत्न चालू होता. त्यादरम्यान भारतात कोरोनाचा प्रसार होऊ लागाला. पुणे शहर रडारवर आलं . या दोघांचीही कामे घरुन सुरु झाली . आकांक्षाच सी-डॕक खूप जोमात सुरु होतं. मला कशात गृहीत धरु नका 6 महिने ,असे ती म्हणायची . पण कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला की आकांक्षाला 15 ते 25 मार्च क्लासला सुट्टी दिली गेली . पुन्हा प्रवासाचा धोका नको म्हणून ती पण नारायणबागेत रहायला आली. आता घरात कामाला कोणीच नाही आणि या तिघांच घरुन काम आणि घरातल काम असे बऱ्यापैकी सुरु झालं . आकांक्षा आल्यामुळे कीर्तीला थोडसं हायसं वाटलं मनिष पण म्हणू लागला जरा जमतय व्यवस्थित म्हणून . इकडे
कोरोनाच्या उलटसुलट बातम्या कानावर पडू लागल्या . सतत नवनव्या घोषणा होऊ लागल्या आणि 31 मार्चपर्यंत बऱ्यापैकी एकएक बंदचा फतवा निघाला . कलिंगड्याची तीन महिन्याची मेहनत , खर्च केलेले फळ हातातोंडाशी आलं आहे . आणि अशी परिस्थिती त्यामुळे ह्यांची अस्वस्थता वाढलेली. आता काय करावं हा यक्ष प्रश्न !
तस आता पाडव्यासाठी आशिष-किर्ती बार्शीला येणारच होते. आकांक्षाला पण 31 पर्यत सुट्टी जाहीर झाली. म्हणून 18/19 मार्चला मी आशिषला तुम्ही तिघेपण 21 तारखेला बार्शीला गाडीतून या व पाडवा झाल्यावर 31च्या आधी परत जा असं सांगितले . तसं ठरल सुद्धा ! पण 20 तारखेला दुपारपासून खुप उलटसुलट बातम्या ऐकायला यायला लागल्या संचारबंदी करताहेत , फिरु देत नाहीत आणि दुपारी आशिषचा फोन आला आम्ही येत नाही . 15 दिवस पुरेल एवढा किराणा आणतो आणि तिघेजण इथेच रहातो. मला खुप भिती वाटली . यांना 5/6 दिवस इतके त्रासदायक गेलेत समजा इतर देशासारखं लॉकडावुन झालं तर काय करावे . नकोनको ते विचार घोंगावु लागले. हे चीनने मुद्दाम केल आहे. काय कराव आपण इथे मुलं तिथे . तसही 22 तारीख कर्फ्यु जाहीर केलाय. मी माझी चिकाटी सोडली नाही काहीही कर उद्या येता येत नसेल तर आज 5 वाजता निघा रात्री 10 पर्यंत घरी याल असं सांगितले . इकडे बँकेत पण 50% लोकांनी बँकेत यायचं असं सर्क्युलर आल . मी 23/24 अॉफ घ्यायचं ठरवलं आणि घरी आले . आशिष येत नाही म्हणायचा मी यायचा आग्रह करायचे . दोन्ही जिल्ह्याच्या ओळखीच्या पोलिसांना फोन लावले . त्यांनी प्रवासात काही अडचण येणार नसल्याचे सांगितले . दोन्हीकडे वातावरण तंग झालं . रात्री 8 वाजता आशिषचा त्रोटक फोन आला आम्ही सकाळी लवकर निघतो , येतोय बार्शीला . आणि जीव भांड्यात पडला. डोक्यात अनेक विचार येऊन गेले. तिसरे महायुद्ध होईल का ? पुणे धोकादायक आहे का ? काही असो चिडचीड करतील पण डोळ्यासमोर असतील आठवडाभर मग वातावरण निवळलं की जातील . असो पाहुयात.
शनिवारी मी बँकेत आले आणि हे तिघे सकाळी 7 वाजता गाडीतून पुण्याहून निघाले . तासातासाला कीर्ती msg करत होती. 11 वाजता घरी पोहोचलो असा msg आला आणि निवांत वाटलं . इकडे ठरवल्याप्रमाणे पाडव्याची काहीच तयारी केली नव्हती काका-काकींना सोमवारी आणायचं ठरलं . रविवारी उडीद वड्याचा बेत ठरला . कर्फ्युमुळे सगळे घरीच असणार होते.रविवारी दिवसभर आशिष फुगलेला होता. तु हट्टी आहेस असं मला म्हणत होता . चुक की बरोबर कोणालाच कळत नव्हते . कीर्ती आणि आकांक्षा आम्हांला मध्ये घेऊ नका असं म्हणत होत्या . हळुच झालं असतं पुण्यात मॉनेज , आम्ही सामान आणलं होतं असही म्हणत हसायच्या. कीर्ती मात्र लक्ष देऊन चिकाटीने उडीद वड्याच्या मागे लागली . थोडफार आपल्याला जमलच पाहिजे हा तिने निश्चय केला होता . रात्री तर मी हॉलमध्ये बसायचं आणि ती वडे करणार आणि आम्ही वडे खायचे असं सांगण्या इतपत तिचा confidence वाढला. आणि आता पुण्यात मी एकटी वडे करणार हे तिने declear केलं . मिरजेत आईला उडीदवड्याचं पात्र आणून ठेवायला फोन झाला.
22 तारखेचा कर्फ्यु वाढत त्याच रुपांतर 21 दिवसांच्या लाॕकडाऊन मध्ये झालं .पुन्हा एकदा इतकी भिती वाटली बापरे आपलं सगळं पार पडलं . ही पोर कुठ लांब जाऊन परत आली . समर्थांचीच कृपा म्हणाव लागेल . नाहीतर काय खरं होतं . साखरपुड्याचाच अनुभव होता .देवा तुझीच कृपादृष्टी म्हणावी लागेल . आता मात्र आशिष-किर्ती आकांक्षा तिघेपण हसायला लागले बरं झालं बाबा बार्शीला आलो ते. नाहीतर अडकलो असतो तर काय करावे समजले नसते. मग कीर्ती हळुच म्हणते आपण बार्शीला जाऊ असा निर्णय मी घेतला. मग पहिला नंबर माझा न दुसरा तिचा असं म्हणत हशा पिकला , आशिषचा राग कुठल्या कुठे पळून गेला.असो , इकडे मात्र काका-काकी परंड्यात आडकले. आम्ही 5 जणं बार्शीला ! तसं फारशी काळजी करण्यासारखं नव्हते गरज पडलीच तर अर्ध्या तासात पोहोचु एवढ्या अंतरावर आहेत . फक्त कामाला बायका यायला पाहिजेत आणि त्यांची औषधे वेळेवर पोहोचली पाहिजेत . तसही ते बाहेर जात नाहीतच. शेताकडची चिंता मात्र सतावु लागली काहीच मार्ग निघत नव्हता . पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की कोणीही काहीही करु शकणार नव्हते. फक्त बार्शीला घरात मात्र सगळे एकत्र , अगदी ठरवुनसुद्धा आम्हांला कुठेच इतके दिवस एकत्र रहाणे शक्य नव्हते ते साध्य झाले या बंदमुळे ! हा एक प्लस पॉईट होता . तो असा गप्पा मारत सगळ्यांना पटला . मग ठरवलं की ही आपल्याला मिळालेली संधी आहे त्याचा योग्य वापर करु. नविन सून जवळ रहाणं कोणाला नको असतं .मनं जुळायला तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल . तसं आकांक्षाच तिच अगदी मैत्रीचे नात झालय चला आता कुटुंबातील एकरुपता आपोआपच वाढणार शिवाय त्यांची अॉफिसची कामं घरुन चालूच रहाणार होती त्यामुळे ठीक आहे. पुण्यापेक्षा बार्शी केव्हाही चांगल . मोकळी हवा, मोठी जागा , घरात माल भरलेला आहेच आनंदानं दिवस घालवु . फक्त थोडेसे पाणी जपून वापरावे लागणार आणि इकडचा उन्हाळा !! पाहू. आहेत कुलर करु काही मॉनेज ! पण मुलं बार्शीला आली आहेत म्हणल्यावर सगळ्यांनाच हायस वाटलं . विहिणबाई तर फोन करुन म्हणाल्या एकीची तरी काळजी मिटली बार्शीला आलेत म्हणल्यावर आगादी निर्धास्त झालो आम्ही .केतकीचा इलाजच नाही पण काळजी वाटते. कीर्तीला पण बाबा आणि केतकीची खूप काळजी वाटायची.पण काय करावं.
तसा इकडे कीर्तीला आठदहा दिवसांचा घरकामाचा चांगलाच अनुभव आला होता. त्यामुळे तिने स्वयंपाकघरात पुर्ण लक्ष द्यायचं आणि सगळं शिकुन घ्यायचं हा चंगच बांधला . दुसरे दिवशी ईडली झाली. मग घावन . की लगेच पाडवा आला . ललिताला येऊ नको म्हणून सांगितले . मंदा शोभाला सुट्टी आणि आमचा पुरणाचा बेत ठरला ! घरात मात्र सगळेजण काम करत होते अगदी झाडून काढणं भांडी घासणं फरशा पुसणे धुणं . सगळ्या कामात मदत होती. वहिनी असल्यामुळे व अभ्यासामुळे आकांक्षाला वेळ कमी मिळत होता तरी लुडबुड आसायची.
सकाळी लवकर उठुन आहे त्यात सगळं करायचं ठरलं . छान गुढी उभी केली आणि पुरण सुरु झालं . कीर्तीने स्वयंपाकघर सोडलं नाही . सगळ्या कामात मदत आणि निरिक्षण सुरु होतं तिचं . तिचा स्वभाव , सवयी, चिकाटी मुख्य म्हणजे मानसिकता बऱ्यापैकी आकांक्षाशी मिळत्याजुळत्या वाटल्या मला. त्यामुळे तिला टिप्स द्यायला अवघड नाही गेलं . सगळं करत असलेले फोटो न video सगळीकडे पाठवत होते. सगळे खुष आणि कौतुकाचा वर्षाव त्यामुळे ती पण खुष. पुरणाचा स्वयंपाकतिला मी दोन टप्प्यात शिकवला . पाडव्यादिवाशी पुरण आणि एकदोन दिवसांनी फक्त पोळ्या करण्याचा सराव . मला खात्री होती ती करेल याची. पण जेव्हा भरपूर पुरण घालून केलेल्या पोळ्या टुमटुम फुगल्या तेव्हा सगळ्यांना खुप आनंद झाला तिचा तर आनंद गगनात मावेना . मन्या तर नाचायला लागला माझी बायको सुगरण म्हणत . सगळ्यांकडून सुगरणपणाची पावती मिळाली. कीर्ती खुष!!!
मला खात्री होती आजकालच्या मुली जिद्दी असतात. एवढं उच्च शिक्षण घेतात ज्या मुली चिकाटीने करतात तर ही शिकणारच. फक्त करण्याची तयारी असली पाहिजे.मानसिकता आसली पाहिजे. पाककला काही सोपी नाही पण अवघड तर मुळीच नाही करणाराला जमतेच आणि ही करणारच आशी खात्री होती. मुख्य म्हणजे तिचे बाबा आणि पप्पा आगदी लक्ष देऊन विचारणा करणे दाद देणे सुरु होते. आई आजी सगळे फॕमिली ग्रुप अगदी तोंडभरुन कौतुक चालु होत !!
आता रोज घरची सगळी कामं आणि काहीतरी नविन पदार्थ खायला करणे यात खीर, भजी, मिसळ , सांजा , मलिदा , कोथिंबीर वडी भाताचे विविध प्रकार , वरणफळं उकडशिंगोळे , पाकातल्या पुऱ्या , पाणीपुरी भेळ.........आणि बरच काही !! आजून ढोकळा, एकदा कीर्ती स्पेशल पुरणाची ट्रायल , खव्याचे पदार्थ व्हायचे आहेत. वेगवेगळ्या भाज्या रोजचा खाण्याचा नविन बेत आणि संध्याकाळी आशिष-किर्ती आकांक्षा तिघांनी टेरेसवर जाणे फोटो काढणे , पेटी वाजवणे ,ब्रम्हविद्या , टीव्हीवर 30 वर्षांनी पुन्हा रामायण महाभारत सुरु झालं. ते सगळ्यांनी एकत्र बसून पहाणे कँरम खेळणे असं रुटीन सुरु झालं . सगळे एकत्र बसले की हशा पिकतो पण समोर टीव्ही वर करोनाच्या बातम्या पहिल्या की सगळे शांत होतात . प्रत्येकाच्या मनात भविष्यात काय होणार ही भिती आहेच. विशेषतः आकांक्षाच मन था-यावर नाही काय होणार ? असं वाटत तिला . आपल आजून काहीच झालं नाही ही काळजी वाटते तिला. घरात बसून कामाला सगळेच कंटाळून गेलेत. डांबून घातल्यासारखं होतेय . सारखे हात धुवा बाहेरून काही आणले की संशयाने पहा. मला आता रोज बँकेत याव लागतेय कधीकधी खूप भिती वाटते आपण बाहेर जातोय लोकांच्या ,नोटांच्या संपर्कात येतोय पुन्हा मनाची समजूत घालायची शक्य तेवढी काळजी घ्यायची व कामाला लागायचं . इकडे कीर्तीची चुळबुळ सुरु झालीय . अत्यावश्यक सेवेत आम्हाला समाविष्ट केलेय काय कराव लागेल माहित नाही म्हणते. ती आणि आकांक्षा आपापले रुटीन कधी सुरु होईल याला अधिर झाल्या आहेत. त्यांना काहीही वाटू देत . पुर्णपणे सुरक्षित वाटल्या शिवाय मी काही परवानगी देणार नाही मनिष आणि हे पण असंच म्हणतात रुटीन सुरु व्हाव असं तर सगळ्यांनाच वाटतेय. पण परिस्थितीच गांभिर्य पाहून निर्णय घ्यावे लागतील.
मी तर विचार करते की माणसाला किती गोष्टी ठरवुन ठेवायचा सोस असतो पण भविष्याच्या उदरात काय दडलय हे कोणालाच कळत नाही हे खरं . सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतातच. विधित्यांने कशाचाच अंत लागू दिलेला नाही. परिस्थिती मुळ पदावर यायला किती काळ लागेल हे आत्ता तरी सांगू शकत नाही. हे कळायला पण थोडी प्रगल्भता यावीच लागते की . आणि वयाप्रमाणे आसणार यात वाद नाही.
काहीही असो मी तर सध्या खुष आहे . नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे . आहे त्यात समाधान शोधले पाहिजे. आर्धा ग्लास भरलेला पहायचा का रिकामा पहायचा हे ठरवणे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. पण परिस्थितीला आपल्यावर आरुढ होऊ न देता परिस्थितीवर मात करता आली तर जिवन यशस्वी होऊ शकतं हे नक्की !!!
आज आता 7 एप्रील आहे. लॉकडाऊनचे 15 दिवस संपलेत रोज नविन अनुभव येतोय . सकाळी अॉफिसच्या कामाची सुरुवात करण्यापुर्वी कणिक तिंबणे , कमीतकमी पाचसहा पोळ्या करणे , नाष्टा , भाजीत मदत करणे हे करायचच असं कीर्तीने ठरविले आहे. तिने इतकं मनावर घेतलं आहे तर मग रोज थोडथोड सांगत रहायचं शिकवायचं असे मीही ठरवलंय . पाहु आता किती दिवस रहायला मिळते. सहवास घडतो ते. आणि रोजचा अनुभव काय येतो लिहीत राहू.
क्रमशः भाग 2
प्रत्येक आईला आपलं मुल गुणी वाटतच पण खरचच आशिष गुणी मुलगा आहे . फक्त थोडासा आळशी आहे. पण या करोनाच्या परिस्थितीत आपण बार्शीला आहोत ही त्याच्यासाठी आता समाधानाची गोष्ट आहे मुख्य म्हणजे निश्चिंत असल्याचे वाटतंय असं म्हणतो . कामाची तशी फारशी सवय नाहीच आणि जवळजवळ 13/14 वर्षे झाली एकटाच रहायची सवय झालीय त्यामुळे कुटुंबातील शिस्तबद्धता जरा त्याला टोचतीय . तरी पण सध्या घरात दिसत असलेल्या कामात खारीचा वाटा उचलायची तयारी तरी नक्कीच आसते. WFH मुळे त्याच काम full चालू आहे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. पण एकूणच नविन जोडप्याचा घरातील वावर खुप मस्त वाटतो. आपणच 10 वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटते.घरात खळखळुन हस्याचे फवारे उडतात. घरात तरुणाईचा वावर मनाला प्रफुल्लीत करतो हे खरं!!
आता सगळेजण एकत्र रहायला लागून 15/20 दिवस होऊन गेले. सगळच रुटीन चेंज झाल आणि हे नविन रुटीन साधारणपणे रोजचं तेच आता सुरु झालं. मला पण घरकामाची तितकीशी सवय नाही . कीर्तीला तर हे सगळ नविनच आहे . पण आता पर्याय नाही करणे क्रमापाप्त आहे म्हणतो आणि पुन्हा हसत कामाला लागतो . उद्या काय करायचं यावर रात्री चर्चा होते. सकाळी नाष्टा , पोळी-भाजी दुपारी सरबत, कलिंगडं काहीतरी चाणाचुणा व रात्री one dish meal यावर सगळीकडुन शिक्कामोर्तब झालय.
सकाळी छान कणिक मळणे आणि 4/5 पोळ्या करणे हा कीर्तीचा निश्चिय आहे त्यामुळे विवीध आकाराचे नकाशे , पापड ते लुसलुशीत गोल टुमटुमीत फुगलेली पोळी असं तिचं स्वतः च निरिक्षण नोंदवत खुषीत सकाळी कट्ट्याजवळ तिचा अर्धा तास जातो . यात एखादा चहा करणे मग नाष्ट्याला भाजीला थोडी मदत आणि गप्पा असतात . ती स्वतः शीच खुष असते खुप कमी वेळात बरच काम होतय असं तिचं म्हणण आहे . आणि प्रत्येक पदार्थाला आशिषकडुन "माझी बायको सुगरण " म्हणत मिळणारी मिठी तिला खुष करते.
"practice makes man perfect "
हे इथे लागु होतं असं मी सांगितले आहे तिला . सासु डबा बाटली घेऊन अॉफिसला जाते. सासरेबुवांची घरकामात ब-यापैकी मदत मुख्य म्हणजे रोज न चुकता दुपारी कलिंगडं चिरुन बीया साल काढुन मोठ्या डब्यात फोडी करुन ठेवायच्या आणि भरदुपारी प्रत्येकाने गारेगार डीश भरुन खायच्या .एखाद्या दिवशी कोरडी भाजी दिसते म्हणून त्यांच्या बॉचलरपणातला रविवारचा मस्तपैकी कोशिंबीरीचा बेत करायचा आणि त्या चौघांनी ताव मारायचा मला मेसेजेस करायचे असं काहीसं मजेशीर चीत्र आहे सध्या घरात. आम्ही त्याचा पण आनंद घेतोय.
क्रमशः भाग 3
दिवसेंदिवस कोरोनाचे बाधित वाढतच होते. आजुन 30 एप्रील पर्यंत वाढण्याची शक्यता होती. एकूणच सामाजिक परिस्थिती अवघड होत होती . इकडे बँकेत जनधन खात्यावर 500 रु. जमा झाल्याने बँकेत गर्दी वाढत होती. ते तरी काय करणार हातावर पोट आसणारे लोक होते ते. काम बंद पैसा नाही. शेतकऱ्यांचे वेगळेच हाल ! कवडीमोल भावात पिकवलेला माल जात होता . रोजचे कस्टमर खुप कमी यायाचे बँकेत . मेडीकलवाल्यांचा फक्त रोज भरणा आसायचा . एक दुधाचा व्यापारी सांगत होता 25 जनावरं आहेत घरी 100 लिटर दुध रोज ओतुन द्याव लागतं . जनावरांना चारापाणी तर द्यावे लागतेच वर स्वच्छता रोज धारा सगळं करावे लागते. काय करणार ? मला पण रोज मास्क हँडग्लोज घालुन सगळ्या तयारीनिशी बँकेत जायच , उन्हाळ्याच्या झळा होत्याच , चहा नाही , सारखे हात धुवायचे सँनिटायझर वापरायचं घरी आलं की सगळं धुवायचं डोक्यावरून आंघोळ अशी कामापेक्षा इतर कामच खुप झालं होतं . पण हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं . आख्ख जगच जागेवर थांबलय आपण काय करावे.
इकडे घरातलं ब-यापैकी रुटीन सुरु आहे . तीन आठवडे झालेत . त्याचत्याच भाज्यांचे पुन्हा पुन्हा नंबर आले की ती कीर्तीने एकटीने करायचं मी खुर्चीवर बसुन फक्त पहायचं हा नियम होऊन बसला .
परवा भाकरी करायचा बेत ठरवला . यापुर्वी मीच भाकरी केव्हा केली हे मलाही आठवत नव्हते . पण करायचं ठरवलंय .कारण खुप कामे हल्ली केलेलीच नाहीत विसरल्यासारखं झालय . परावलंबीपणा खुप वाढालाय . पण त्याला इलाजच नाही .सगळं नाही करु शकत . पण घरकाम उरकत नाही .खुप वेळ लागतोय कामाला . दमायला होतय . परवा मला वाटलं की ही कामं करणाऱ्या लोकांचे पांढरपेशा वर्ग शोषण करतोय . आपला त्यांचाकडे पहाण्याचा दृष्टिकोन चांगला नाही . त्यांचे कष्ट आणि त्यामानाने दिला जाणारा मोबदला खूप कमी आहे पुर्ण महिनाभर भांडी घासली तर 500 ते 900 रुपये दिले जातात . तेही भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे . पण मला वाटतं हे माझं म्हणणे पटलं तरी रुचणार नाही ब-याचजणांना . पण आपल्याला किती कष्ट पडतात हे तरी मान्य आहे का ??
आरे हो भाकरीचं आर्धच झालं. युद्ध करायच्या तयारीनीशी खुप आत्मविश्वासाने कीर्ती उभी राहिली एक भाकरी मी केली मस्त झाली . मनोमन माझ्यावरच मी खुश झाले. तीचा पण जरा स्वयंपाकघरात वावर सहज होऊ लागलाय आणि ज्या सहजतेने एकएक करत मोठ्या पातळ आगदी माझ्या आईसारख्या 7 भाकरी तिने केल्या . तिच्या आजीलापण खुप आनंद झाला. कांद्याची चटणी , हरभ-याची भाजी , दही आणि भाकरी असा फक्कड बेत होता ! सगळे खुश. भाकरी करतानाचा video अगदी कीर्तीच्या मैत्रिणीपर्यंत गेला . सगळीकडुन कौतुक झाल्याने कीर्ती आणि मी पण खुष झालो. चला कोरोनाचा हा दुसरा परिणाम चांगला झाला म्हणलं !!
क्रमशः भाग 4
आज चैत्रा गौरीची मधली तीज होती. मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की गौर बसवतांना कीर्ती असेल पण या परिस्थितीमुळे पहिली तीज आता दुसऱ्या तीजेची पण पुजा तिच्याकडून ! आज कैरीची डाळ खीर आणि कलिंगडं होत नैवेद्याला.
आत्ता मलापण तीन दिवस सुट्टी लागून आलेली. लॉकडाऊन 30 एप्रीलपर्यंत वाढलं. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता ही एक जमेची बाजू होती. पुन्हा 1/2 दिवस गव्हाची खीर बीट परोठे झाले. एक महिना पुरेल एवढा किराणा दोघांनी जाऊन मोठ्या गाडीतून आणला. आता फक्त भांड्याला मंदा सकाळी येऊ लागली . साबणाने हात धुऊन घासलेली भांडी उन्हात दिवसभर ठेऊन आत घेऊ लागलो थोडी ओढाताण कमी झाली.
मध्ये एकदा काका-काकींची औषधे पोहोच करण्यासाठी डॉक्टरांची फाईल सोबत घेऊन हे परांड्याला टुव्हीलरवर जाऊन आले.तेवढेच तिथे काय कमीजास्त आहे पहाता आलां सगळं ठीक होतं . प्रत्यक्षात भेट घडली . सहजासहजी जाता येत नव्हते पण . मग शेताची परिस्थिती काय तेही पाहून आले होते. पुन्हा आज गेले आणि खुप वाईट वाटलं , कलिंगड्याच्या 22/23 टन मालापैकी 3 टन माल कवडीमोल किंमतीत विकला गेला होता आणि सव्वा एकरात जवळजवळ 18/19 टन मोठाली कलिंगडं नासून बसली होती वेल सुकुन गेले होते.इलाज नव्हता . नैसर्गिक आपत्तीच की ही ! आता मिरच्या लकडल्या आहेत उद्यापासून तोडा करायचा आहे पाहू त्याला कशी मिळते बाजारपेठ ते.
इकडे बँकेत जनधनची गर्दी वाढते सोशल डिस्टनसींगमुळे लोकांना उन्हात थांबावे लागते म्हणून फक्त सोलापूरच्या कलेक्टरंनी बँक सकाळी 8 ते 2 ठेवावी असा आदेश काढला. तसा बँकेचा पण msg आला म्हणजे उद्या 7.45 ला घर सोडावे लागणार तर ! तेवढ्यात सोलापूरमध्ये पहिला करोना रुग्ण सापडला तो मृत झाल्यानंतर करोना positive आल्याचे समजले. पुन्हा संकट इकडे आलं . पाहू आता काय परिस्थिती होणार ते.
आकांक्षा पण खुप अस्वस्थ होती . काही मुलांनी online class ला objection घेतले होते. त्यामुळे उद्या class होणार नव्हता . खरं तर अभ्यासाची लींक चालू राहिली असती तर बरं झालं असतं . पाहुया आता कायकाय होतं ते.
क्रमशः भाग 5
सकाळी 8 वाजता बँक अशी परिस्थिती 30 वर्षात पहिल्यांदाच आली.हेच शेड्यूल आता 30 एप्रीलपर्यंत रहाणार असं समजतय. तसं सगळीकडे बरच कडक वातावरण आहे. शाखेतपण रोज सॉनिटायझींग केलं जातय . शक्य ती काळजी घेतली जातेय. आता माझी आयुर्वेदीक औषधे संपलीत त्याचे टेन्शन आलेय पण डॉ. निलिमाने डायेट आणि व्यायामावर कंट्रोल करु शकता म्हणून सांगितले आहे.पाहु कसं होतं ते. याबाबतीत कीर्ती जरा जास्तच काटेकोर आहे.बाबांच्या पथ्याची तिला सवय आहे चहा आणि गोडावर करडी नजर ठेवतीय माझ्या. सारखा ग्रीन टी किंवा डीपडीप चहा देऊ का चालू असते. ते मला जड जातय पण माझ्या चांगल्यासाठी आहे असो. रात्रीच आम्ही उद्याचं बरचसं नियोजन करुन ठेवलं होतं . त्याप्रमाणे पहाटे 5.30 ला उठले . कीर्तीपण लवकरच खाली आली . तिला लवकर जाग येते म्हणते . रात्री मात्र 9 वाजले की तिची घंटा वाजते झोपेची. याउलट आशिषचं रात्री उशीरापर्यंत जागं रहायचं सकाळ होईल तशी याची साखरझोप सुरु होते. मला खूप हसु येतय हे सगळं ऐकून .आता कॉरममध्ये सगळ्यांना मजा येतेय . यांचा तो खूप आवडता खेळ आहे. पुर्वी बँक सुटली सगळे staff लोक खेळायचे . बार्शीला तर बँकेच्या स्पर्धा व्हायच्या . ते दिवसच खूप वेगळे होते . काम सगळ हाताने लिहून आसायचं. भरपूर staff असायचा , कामाचं स्वरुप वेगळं होतं मजा यायची. त्यामुळे सध्या यांना पण मजा येतेय थोडसं भूतकाळात रमलेत ते . 8 वाजले की बोर्ड हॉलमध्ये मांडून वाट पहात बसतात.लहानपणी खेळल्यामुळे मनिष छान खेळतो. आकांक्षाला व कीर्तीला फारसं येत नव्हते हे शिकवतात त्यांना ब-यापैकी जमू लागलय तिघांचा खूप गोंधळ , आरडाओरडा ,भांडाभांडी, चिडाचीड सुरू असते. मनिष खेळात भिडू नको असतो या दोघींना आपल्या मनाप्रमाणे खेळू देत नाही तो असं म्हणून या दोघी एकत्र असतात. मग छान रंगतो त्यांचा खेळ . नेटवरुन पण यांची सारखी भांडण सुरु असतात , स्लो झालं नेट की प्रत्येकजण एकमेकांना तुझं बंद कर म्हणतात .सारखे मीच का ? आसं सुरु असते . मला मजा येते बघायला . काय कारणं आहेत वादाची असं वाटतं आणि हसायला येतं. तस जरा घरात बसून त्यांना कंटाळा पण आला असणार . मनिष-आकांक्षा लहान असल्यासारखे चक्क मारामारी पळापळी पण करताहेत .फोटोग्राफी मात्र खुप सुरेख चालू आहे त्याची. रोज सनसेटला गच्चीत जातात . सुर्याचे खुप कल्पकतेने विविध फोटो काढलेत त्यांने मॉडेल म्हणून दोघी हजरच असतात.आणि सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे खादगी. बाहेरचं खाणं आजिबात नसल्यामुळे तीनत्रीकाळ काय द्याव हा प्रश्न पडतोय . सकस , चविष्ट फक्त घरचच मिळते .
No comments:
Post a Comment