कोंदण भाग 1
प्रकरण 1 ले
सुमुहूर्त
आज 5 जुलै 2020
आषाढ पौर्णिमा म्हणजेच
गुरुपौर्णिमा
आई-वडील माझे प्रथम गुरु
नंतर माझे आयुष्य सुरु .
ज्यांच्यामुळे ही दुनिया पहाता आली त्या आई-वाडीलांच ऋण आपण काहीही केलं तरी फिटू शकत नाही .
मला माझ्या आई-काकांचा खूप अभिमान आहे . सर्वसामान्य भासत असले तरी ते खूप असामान्य होते त्यांना शब्दात बांधण कठीणच . तरी मी तो प्रयत्न करणार आहे त्याची सुरुवात आज करतेय .
नेहमीच मला माझ्या आई-काकांचा व आम्हा पंचकन्यांचा अभिमान वाटतो . ( तशा तर आम्ही सहाजणी बहिणी पण 81 साली संजू म्हणजे सगळ्यात धाकट्या बहिणीचा जन्म झाला व दहा महिन्याच्या आत 82 साली सौ.आक्कीने म्हणजे सगळ्यात मोठ्या बहिणींने हे जग सोडले त्यामुळे मला आठवतं तसं आम्ही नेहमीच पंचकन्या राहिलो ) आई-काकांबरोबरच सौ. तायडी व सौ. मायडी माझ्यासाठी आदरणीय आहेत . ज्योती लहान असली तरी मैत्रिणीप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागतो तर संजू बार्शीत असली तरी ब-याचदा महिनोनमहिने आमची भेट होत नाही तरीपण ती आसपास असल्याचा भास होतो
तर मी सगळ्यांच्या सदिच्छेसह माझ्या लिखाणाला सुरुवात करते .
प्रकरण 2 रे
स्मृतीदिन
आज 9 जुलै !
आजच्या तारखेला काकांना जाऊन पंधरा वर्षे झाली त्यानंतर याच तारखेला आणि विशेष म्हणजे त्याच तिथीला आईला जाऊन सात वर्षे झाली . बराच काळ लोटला . आठवणी विसरत नसतात पण दुःख मात्र काळाच्या ओघात सौम्य झालं . ती जगाचीच रीत आहे . तसं तर 2014 पासून आई-काका दोघेही गेले म्हणून माहेर संपले असे होता कामा नये म्हणून आम्ही पंचकन्या दरवर्षी 9 जुलैला कोणाही एकीकडे जमतो व तो पुर्ण दिवस त्यांच्या आठवणीत घालवतो . यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांना एकत्र जमणे शक्य झाले नाही . फक्त कॉन्फरन्स कॉलवर भागवावे लागले . दुधाची तहान ताकावर भागवावी लागली !
पण गेल्या वर्षी मनिषचं लग्न जमलं आणि प्रसंगानुरुप मी भूतकाळात रमत गेले आणि संथ असलेला पाण्याचा डोह अगदी तळातून ढवळून निघावा त्याप्रमाणे मी ढवळून निघाले . काही वेळेस तर इतकी अस्वस्थता वाढली की
" आई-काका तुम्ही समोर पाहिजेच "
असं वाटलं . सगळ्या आठवणी अगदी लख्ख दिसत आहेत . कदाचीत त्या प्रसंगात मी प्रत्यक्षात जितकी रमली नसेल तितकी आता रमतेय . पुलाखालून खूप पाणी गेलंय . जग पहाता आलंय आणि मग तुमच्यातले एकएक गुण चमकदार दिसायला लागले आहेत . खर तर व्हीजन म्हणजे भविष्यात डोकावायची तुमची जी ताकद होती ना त्याला तोड नाही . काळाच्या पंचवीस वर्षे पुढे अशी तुमची विचारसरणी होती . काळाबरोबर चाललं पाहिजे असं म्हणतात ना ? तर तुम्ही काळाच्या पुढे चालत होता . खूप गोष्टींचे आदर्श घेण्यासारखेच आहेत . त्यात मग व्यवहारीपणा , निर्णय-क्षमता , सामाजीक भान , प्रेम , माया , कठोरपणा हे सगळं तर आहेच त्याच बरोबर आईची पाककला , आजीबाईचा बटवा..... याला अंतच नाही . मग ते थोडे लिखित असावेत , संग्रहीत असावेत न जाणो मार्गदर्शक पण सिद्ध होतील या उद्देशाने मी ते काम कालच्या गुरुपौर्णिमेला लिहायला सुरु केलं आहे . सिद्धीस नेण्यास श्री स्वामी समर्थ आहेतच . शिवाय माझ्यासह तुमचीच सावली म्हणा किंवा तुमच्या हिऱ्याच्या कोंदणाभोवतीचे मोती म्हणून आम्ही पंचकन्या आहोत . तसेच माझे पुर्ण कुटुंब अगदी नविन सुनेसह यात समरस होतेय . काकांचे नाव रामचंद्र कृष्णाजी कुलकर्णी त्यामुळे त्यांना आॕफिसचा लोक आर के म्हणत काहीवेळा गंमतीने आईपण आर के म्हणायची त्यामुळे संपुर्ण
" आर. के'ज फॕमिलीच "
आणि सगळे स्नेही आप्तेष्ट पण यात रमतात , भोवती आहेत , संपर्कात आहेत . तुमच्या विषयी थोडंस बोलायला सुरुवात केली की भरभरुन बोलतात . प्रत्येक वेळी सुगंधी कुपी उघडावी त्याप्रमाणे काही न काही तुमच्याविषयी ऐकायला मिळतं . विशेषतः घेरडीतल्या सगळ्या नाती सुनांकडून ! मनाला खूप बरं वाटतं तुम्ही किती जणांना आनंद दिला आहे हे लक्षात येतं . मग तर हे सगळे लिहिण्याचा घाट मी घालतेय पाहू फलित काय येतं . याचा आढावा अर्थातच 9 जुलै 2021 ला !!
प्रकरण 3 रे
आईचं बालपण
10 जुलै 2020
माझे मोठे मामा पंढरपूरला असतात . माझ्या आईचे मामांपेक्षा मामींबरोबर खूप छान संबंध होते . त्या दोघी बालमैत्रीणी ! मग विचार केला आधी मामींबरोबर बोलावं माझ्या जन्मापुर्वीचे आई-काका जाणून घ्यावेत . म्हणून त्यांना फोन लावला तर मामींना आई-काका विषयी किती बोलू व किती नको असं झालं . आता मामांना तर ऐकायला येत नाही नव्वदीकडे झुकले आहेत ते , तर मामी त्र्याऐंशीच्या घरात आहेत पण आई-काका विषयी बोलताना मामी अगदी आठ-दहा वर्षाच्या होऊन बोलू लागल्या .
माझी आजी म्हणजे आक्का दोन मुलं व एक मुलगी यांना शिक्षणासाठी घेऊन पंढरपूरला बोळाबोळातल्या जुन्या पद्धतीच्या वाड्यात रहायला होती . मोठे मामा म्हणजे नारायण महादेव कुलकर्णी त्यांना ना.म. असे काका म्हणायचे मग आई व तिच्या पाठचा गोविंद मामा ज्याला आम्ही गोंदा मामा म्हणायचो . पुढे त्याच्याशी आंम्हा भाच्यांचे मैत्रीचे नाते होते . आजोबा म्हणजे आप्पा ते शिक्षक होते त्यामुळे ते जवळ्यात रहायचे . आक्काचं गोरेपण म्हणजे केवड्याच्या पानांसारखा नाजूक पिवळं होतं . उंच , शेलाटी , धारदार नाक , केसांचा आंबाडा आणि चिंचेच्या पानासारखं लांबाट गोल आडवं कुंकू . असं लक्ष्मीसारखं देखणेपण पण स्वभाव मात्र कडक तर आप्पा खूप मायाळू होते . धोतर शर्ट , वर काळा कोट , डोक्यावर बांधलेलं गुलाबी पागोटं , बसकंच नाक असा त्यांचा जोडा . त्यांची कन्या म्हणजे माझी आई आभ्यासात हुशार दिसायला सुरेख व एकुलती एक त्यामुळे आक्का-आप्पांची ती लाडाची पपी होती तीचं खरं नाव विजया पण ते कागदोपत्रीच ! परकर पोलकं आणि दोन वेण्या असा थाट होता . तिची पट्ट मैत्रिण म्हणजे रतन तीच पुढे मोठ्या मामाची बायको झाली . लहान पपी खेळकर व खोडकर स्वभाव होता तिचा . या मैत्रिणींचे भातूकलीचे खेळ , नदीवर धुण्यासाठी जायचं , खेळायला विठ्ठल मंदिर हे खूप रंगवून सांगितले मामींनी . लहान असतांना मोठा मामा या दोघींची सतत खोडी काढायचा . यांनी चुरमुऱ्याला तेल मेतकूट लावायच , कांदा , कोथिंबीर चिरुन घालायची , शेंगदाणे घालायचे सगळे होईपर्यंत मामा शांत बसायचा पण तो खाऊचा कुंडा घेऊन सगळ्या मुली निघाल्या की मामाने वरचेवर कुंडा उचलून पळवायचा मग पपी घर डोक्यावर घेई . असं मैत्रिणींमध्ये रमलेलं तिचं बालपण !! सहावीपर्यंत शिक्षण झालं की मामाची मॕट्रीक झाली म्हणून पुन्हा बिऱ्हाड जवळ्याला हलवलं . पपी खट्टू झाली ती हुशार तर आहे म्हणून मग तिच्या आजोळी बनाळीला तिला सातवीला घातलं . तिथे तिचे शंकर मामा तिला शिक्षक होते . तिने तिथे पण तिच्या मामा-मामीला मामेभावंडाना खूप लळा लावला त्यातल्या त्यात हरी मामा, लिला मावशी व पका मामा तिची पाठ सोडत नसत . त्यांची ती पपाताई होती . शंकर मामांची पण लाडकी भाची होती . त्याकाळी सातवीला बोर्ड होतं . तर जत बोर्डात ती पहिल्या नंबरानं पास झाली . शिक्षिकेची नोकरी घर चालून आली होती पण आधी लग्न करु मग तिच्या सासरी चालत असेल तर करु दे नोकरी म्हणत वरसंशोधन सुरु झालं . आक्काचा आग्रह होता मुलगा नोकरीवाला असावा .
मग घेरडीचं स्थळ समजलं . आप्पा सगळी चौकशी करुन आले . माहिती काढली मुलाला मोठा एक भाऊ व दोन बहिणी आहेत सगळ्यांची लग्न झाली होती . मुलगा शेंडेफळ होता . शेती , वाड्यात घर , नुकतीच ग्रामसेवकाची नोकरी लागली होती अजून काय हवं मुलगा बऱ्यापैकी सावळा पण एकदम तरावट व होतकरु वाटला . वर्णनावरुन आक्का फिदा झाली तिने
" बनाळीहून तू घेरडीला ये आम्ही जवळ्यातून पपीला घेऊन येतो "
असा शंकर मामाला निरोप धाडला .
दुसरे दिवशी उन्हाच्या आत पोहोचलं पाहिजे म्हणून छकडेवाल्याला सांगून ठेवलं . दिवस उगवायला पपी गुलाबी साडी त्याला काळपट तांबूस रंगाचे डोंगरी काठ व त्याच रंगाच्या बुट्ट्या असलेली साडी व तसच पोलकं नेसून जाडजूड वेणीचा लांबसडक शेपटा त्याच्यावर दारातल्या जुईचा चारपदरी गजरा माळून तयार झाली होती . नुकतच पंधरा पुर्ण होऊन सोळावं वर्ष लागलं होत . गोरापान रंग , गोल चेहरा , छोटसं नाक , लांबसडक वेणी साडीत तिचं रुप नाजूक वेलीसारखं खुलून दिसत होतं . आक्कानं मोकळ्या हाताने जाऊ नये म्हणून साजूक तुपातले ओल्या नारळाचा चव घालून रव्याचे लाडू करुन घेतले होते . बरोबर पाणी असावं म्हणून फिरकीचा मोठा तांब्या भरुन घेतला होता . आक्काने पण बारीक काठापदराचं नऊवारी मोरपंखी लुगडं अगदी चापूनचोपून नेसलं होतं . दोन्ही खांद्यावरुन पदर घेतला होता सुर्याची कोवळी किरणं तिचं गोरेपण अधिकच खुलवत होती. आप्पा पण नेहमीप्रमाणे धोतर , काळा कोट गुलाबी पागोटं घालून तयार होते . ओबडधोबड सडकेवरुन छकडा वाट चालू लागला . छकड्याच्या हालचालीबरोबर हिसका बसला की पपी स्वप्नातून जागी व्हायची . जोडीदाराविषयी तिच्या मनातच ती तर्क बांधत होती स्वप्न रंगवत होती . पहाता क्षणी नजरेत भरंल असं रुप असल्यामुळे घेरडीत घरात पाऊल ठेवलं व मुला-मुलीची दृष्टीभेट झाली . तसं लाजेनं लाल होत तिने लटकेच नजर खाली झुकवली . पण मुलांने मात्र मनोमन ठरवलं की लग्न हिच्याशीच करायचं .
अजूनपर्यंत शंकर मामा पोहोचले नव्हते .
" शंकर मामा येऊ दे मग बोलू "
असं आक्का व आप्पा म्हणू लागले . थोड्यावेळात मामा आले त्यांच्या पण मनास मुलगा घर पसंत पडले आता बोलू म्हणताच काकांची आई लगेच म्हणाली
"आता नुसतं बोलू पक्क मात्र भाऊचा मामा सोलापूरहून येईल मग आपण सुपारी फोडू ! "
आशाप्रकारे मुलीचा मामा आहे तर मुलाचा पण मामा आला पाहिजे असे ठरवून पंधरा दिवसांनी दोन्हीही मामांच्या उपस्थितीत लग्नाची सुपारी फुटली ! व दोन महिन्यात कु. विजयाची सौ. सुलभा झाली . लग्नानंतर पाठराखीण म्हणून पुन्हा बालमैत्रीण रतन बरोबर आली . आईची एक मावशी घेरडीत होती हे स्थळ तिच्या भावकीतलं होत नात्याने दोघी जावा झाल्या मग मावशीमुळे पपा या नावानेच घेरडीत तीला सगळे ओळखू लागले .
फार काही श्रीमंत घर नव्हते पण खाऊन पिऊन सुखी होतं . मनानं मात्र सासु सासरे श्रीमंत होते ते दोघे व नविन जोडी असे चारजणाचं कूटुंब . पण त्यावेळच्या विचारसरणीनुसार आईला आजोबांनी नोकरी करण्याची परवानगी नाकारली . तिने मनाला मुरड घातली आणि संसारात स्वतःला झोकून दिलं . काकांनी मात्र आईला पुर्ण मोकळीक दिली होती . सुरुवातीला काही दिवस तिचे वास्तव्य घेरडीत सासु-सासऱ्यांसोबत होते . एकदोन वर्षांनी नोकरीच्या गावी काका घेऊन जायचे असा त्यांचा संसार झाला सुरु !!
प्रकरण 4 थे
काकांच बालपण
12 जुलै 2020
माझ्या घेरडीच्या आजोबांना सहा भाऊ होते . कुलकर्णीपण वतनाने त्यांच्याकडे आलेले होतं . त्यामुळे यांच्या शेतालासुद्धा त्या भागाला सात पट्टा म्हणून ओळखलं जायच . तर गावात कुलकर्ण्यांचा वाडा म्हणून बऱ्यापैकी वजन होते . आमच्या आजोबांना पण सगळे काकाच म्हणंत असंत . त्यांच नाव कृष्णाजी होतं त्यामुळे ते किष्ट्या काका व आजी राधा काकी या नावाने प्रचलीत होते . घेरडीच्या आजोबांचा स्वभाव करारी होता तर आजी एकदम साधीभोळी होती . त्यांच शेंडेफळ म्हणजे आमचे काका . त्यांना भाऊ या नावाने ओळखलं जायचं बऱ्याच वर्षांनी झाल्यामुळे काकांवर आजीचा जरा जास्तच जीव होता . बऱ्यापैकी सावळा रंग पण एकदम तडफदार , तरतरीत व उत्साही व्यक्तिमत्त्व होते . पण काका खूप हुशार , धडाडी व प्रयत्नवादी होते . त्यांना आजीचा स्वभाव मुळातच साधाभोळा आहे हे समजत होते त्यामुळे ते सतत आजीच्या बरोबर असायचे . आजीला कोणी बोललेलं त्यांना आवडत नसे . लग्नानंतर आजीचा साधेपणा आईच्या लक्षात आला होता पण आईने त्यांच्याशी मायेचे , आधाराचे संबध दृढ केले होते त्यामुळे दोघींमधे आत्यंत सलोख्याचे नाते निर्माण झाले होते त्यामुळे काकांना खूप समाधान वाटत असे . सगळ्यात मोठे पुरुषोत्तम काका मग तिना आत्त्या व नागर आत्त्या सगळ्यांची लग्नं झालेली . काकांच्या भाच्या त्यांच्यापेक्षा मोठ्या होत्या .
इकडे आईची मैत्रीण रतनबरोबर मोठ्या मामाचे लग्न झाले . तशी काकांना शेती भरपूर होती पण फारशी सुधारणा नव्हाती त्यामुळे उत्पन्न बेताचंच असायचं . आई नेहमी सांगायची लग्नात मांडवाशोभा म्हणून काकांच्या सोलापूरच्या मामीचे दागिने नवरीला घातले होते पण हे जेव्हा काकांनी आईला सांगितले तेव्हा आईने ते पटकन काढून दिले . तो आईने दाखवलेला समंजसपणा , समजूतदारपणा काकांना मनास फार भावला व तेव्हाच त्यांनी दृढनिश्चय केला व आईला सांगितले मी तुला दागिन्यांने मढवणार .
लग्न झाले की सहा महिन्यात काकांना दोन वर्षाच्या कोर्ससाठी पुण्याजवळ मांजरी फाॕर्मवर जावे लागले व आई सासु- सासऱ्यांजवळ घेरडीत राहिली . पंधरा दिवसांतून एकदा काका घेरडीला येत असत . त्या दरम्यान सर्वात मोठी रेखा तिला आम्ही आक्की म्हणायचो तिचा जन्म झाला . खूप हुशार होती पण रुप बेताचच होतं . त्याचदरम्यान आक्काला आईचा सर्वात लहान भाऊ म्हणजे बापू मामाचा जन्म झाला . त्यामुळे दोघींचही बाळंतपण आईच्या आजोळी म्हणजे बनाळीला आईच्या मुक्ताआजीने केलं . लहान बाळाला घेऊन आई घेरडीत आली . तोवर आई सहावारी साडी नेसत असे आणि एक दिवस आईला आजोबांनी दोन नऊवार साड्या आणून दिल्या व उद्यापासून या नेसायच्या असे सांगितले तेव्हापासून आईने नऊवार साडी नेसायला सुरुवात केली ते शेवटपर्यंत नऊवारंच नेसली . आक्कीनंतर तीन वर्षांनी दोन नंबर बहिणीचा जन्म झाला तिचे नाव चित्रा पण तिला बेबी म्हणून ओळखलं जातं ती आमची तायडी आहे . दुसरं बाळ झालं म्हाणून आक्कीला जवळ्याच्या आजीकडे म्हणजे आक्काकडे सोडलं . आजीकडे स्वतःचे बाळं व ही नात म्हणजे मामा-भाची होती व त्याच दरम्यान मोठ्या मामाला पण मुलगी झाली होती . तीला उखा म्हणत असत . आई नेहमी त्यांच्या लहानपणीची गंम्मत सांगायची . आक्काकडे जवळ्यात या दोन आतेमामेबहिणी रहायच्या . रेखा न उखा ! आजी त्यांना छोटी छोटी कामे सांगायची . एकदा आजीने शेंगदाणे भाजून दिले व
" रेखे एवढे शेंगदाणे कुटून दे गं "
असे सांगितले . या दोघीजणी उखळाजवळ जाऊन बसल्या . शेंगदाणे खायचे नाहीत असे आजीने बजावले होते त्यामुळे आक्कीने एक शक्कल लढवली . उखाला सांगितले
" जर कुटतांना शेंगादाणा वर आला तरच एक तू व एक मी असं खावू . "
त्याप्रमाणे कुटता कुटता निम्म्यापेक्षा जास्त शेंगदाणे संपले . आजी आली पहाते तर काय एवढंसच कूट तयार होत होतं . आजीने विचारलं तर सगळी हकिकत सांगितली . आजीने कपाळाला हात लावला आणि म्हणाली
" छान संसार कराल गं दोघीपण ! दिवाळ काढाल की नवऱ्याचं गं बायांनो ".
व पुन्हा हे आईला सांगितले . आई रेखाचा खोडकरपणा सगळ्यांना सांगायची .
पुढे एकदोन वर्षात घेरडीकडे अनेक घटना घडल्या . वयोमानाप्रमाणे आजोबांच निधन झालं त्यावेळच्या रिवाजानुसार आजी सोवळी झाली त्यामुळे केशवपन व लाल साडी म्हणजे आलवण हे क्रमप्राप्त होते . आईने आजीला खूप आधार दिला .
त्यावेळी गावात एक घटना घडली गावाच्या बाहेर ओढा होता . तो ओलांडून गेलं की चढ होता पुढे एकदीड किलोमीटर आंतरावर जनावरं टेकडीवर चरत आसायची . तिथे थोडा खोलगट भाग होता व पाण्याचा जिवंत झरा होता . गुराख्यांने सहजच तो खाड्डा खणायचा प्रयत्न केला तर त्याला पाषाणाचा घडवलेला भाग दिसला त्यांने ही घटना गावातील पाटील व कुलकर्णी यांच्या कानावर घातली गावातील पंच मंडळी व प्रतिष्ठित लोक ते पहायला गेले असता तिथे पाषाणाची घडीव मोठी महादेवाची पींड असल्याचे लक्षात आले . ती जागा मुस्लिम समाजाची होती घेरडीतले सर्व पाटील मुस्लिम आहेत . ती पींड तिथून काढून दुसरीकडे प्रतिष्ठा करायचं ठरले त्याप्रमाणे काम सुरु झालं पाच फूट दक्षिणोत्तर कोरीव काम केलेला पींडीच्या बाहेरील भाग व जवळजवळ एक फूट उंच आडवी गोलाकार पींड होती . कडेला जिवंत पाण्याचा झरा . ती पींड फक्त थोडी हलायची . कडेनी भरपूर खोदकाम करुन मोठ्या पहारी वापरुन पुर्ण मुर्ती काढण्याचा प्रयत्न केला जवळजवळ एकवीस दिवस ते प्रयत्न झाले पण पींड काही जागची हलेना ती स्वयंभू असल्याचे म्हणणे येऊ लागले . शेवटी गावपंचायत बसली व आहे तिथेच ती पींड ठेवण्याचा निर्णय झाला फक्त जमिन मिळेपर्यंत मंदिर बांधायचे नाही असे ठरले . कारण पाठीमागे शंंभर मिटरवर पीरबाबाचा दर्गा होता . जर दोन्हीही उत्सव एकत्र आले तर गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला . स्वयंभू पींड म्हणून पंचक्रोशीतील लोक येऊ लागले . त्यावर्षी शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरली व ती प्रथा आजतागायत आहे . खेडेगाव असल्यामुळे मनोरंजनाचे काही कार्यक्रम नसायचे मग यात्रेत चारपाच दिवस सांगोल्याहून सिनेमाच्या टॉकिज यायच्या बाकी दुकाने यायची धामधूम असायची तेवढ्या काळात . आजही पींडीभोवती जिवंत पाणी कधी आटत नाही . कालांतराने ती जमीन मिळाली व मंदिर बांधले गेले . आम्ही लहान असतांना कर्नाटकातील एक महाराज घेरडीत आले व महादेवाची पूजा व परिसर स्वच्छ करण्याचे काम करु लागले . पाच घरी रोज भिक्षा मागायचे व जेवण करायचे . मंदिराजवळ एक खोपटी बांधून ते रहायचे मंदिराच्या मागे विहिर होती त्यामुळे परिसरात त्यांनी बरीच फुलझाडे लावली होती व स्वच्छता ठेवली होती . समोर एक वडाचे झाड होते त्यामुळे तो परिसर रम्य वाटायचा . घेरडीतील लोकांना फिरायला जाण्याची ती एक मस्त जागा होती . उन्हाळ्याच्या सुट्टीत , कोणी पाहुणे आले तर , व्यायाम म्हणून संध्याकाळी महादेवाला जायचं हा सगळ्यांसाठी आवडीचा विषय होता . कारण जाताना ओढा त्यातल्या दगडा दगडावर उड्या मारत पार करायचा . दुतर्फा झाडी पुर्वी वाहनांची वर्दळ नसे त्यामुळे रस्त्यावर मोर दिसायचे . दर्शन झाले की पकडापकडीचे खेळ रंगायचे . कधी कधी तेल मेतकूट लावलेले चुरमुरे खायला न्यायचे अशी धमाल चालायची . सगळ्या वयोगटातील लोक असायचे तिथे.
तेव्हा काकांना नोकरीसाठी सोलापूरच्या आसपास छोटी गावं मिळायची मग आजीसह काकांनी बिऱ्हाड नोकरीच्या गावी न्यायला सुरुवात केली . त्यादरम्यान सर्वात मोठे पुरुषोत्तम काका नोकरीनिमीत्त सांगोल्यात होते . त्यांना नोकरीत काय त्रास झाला समजले नाही ते घर सोडून निघून गेले . ते आजीला सहन झाले नाही वाट पाहून पाहून एकदोन वर्षात त्या पण गेल्या . या सगळ्या गोंधळात आक्कीला ती पाच वर्षाची असतांना टाईफाईड झाला होता तो उलटला व तिच्या पाठीला बाक आला ते वेळेत लक्षात आलं नाही व्यवस्थित उपचार दिले गेले नाहीत लक्षात आल तेव्हा खुप उशीर झाला होता . तिला पाठीत कुबड आलं त्यावर उपचार होईनात तिची उंचीपण त्यामुळे खुंटली व साधारण असलेलं रुप बेरुप झालं . ती खंत आई-काकांच्या दोघांच्याही मनाला टोचणी देऊ लागली .
आजी वारल्यामुळे नागर आत्यांची दोन बाळंतपणं आईने केली . तीना आत्या पण आईकडे माहेरपणाला येत असंत तर मोठे काका निघून गेल्यामुळे काकू घेरडीत येऊन राहिल्या त्यांचा मुलगा मोहन आण्णा मुलगी मंदा आक्का यांच्याकडे लक्ष देण्याची काकांकडे जबाबदारी आली . तायडीनंतर सहा वर्षांनी घरात पाळणा हलण्याची चाहूल लागली . करायला कोणी नाही म्हणून आईला बाळंतपणासाठी जवळ्यात आक्काकडे सोडलं व तीन नंबरच्या बहिणीचा संध्याचा तिला सगळे राणी म्हणतात मी एकटीच मायडी म्हणते तिचा जन्म झाला . त्यानंतर काकांची बदली पंढरपूर तालुक्यात झाली मग बिऱ्हाड पंढरपूरला केलं . तिथे नागर आत्या व काकांची चुलत बहिण सुशिला आत्या होत्या . मायडी लहान असेपर्यंत आईचे चौथे बाळंतपण आले आता तीन मुली आहेत मुलाची सगळे वाट पाहू लागले . तोपर्यंत गोंदा मामाचं लग्न झालं आजीला येणं शक्य नव्हते व छोट्या तीन मुली घेऊन जाण आईला शक्य नव्हते म्हणून तीना आत्या भावजयच्या बाळंतपणासाठी पंढरपूरमध्ये हजर झाल्या व चौथे कन्यारत्न अर्थातच माझा जन्म झाला . यावेळी पंढरपूरला असल्यामुळे दवाखान्यात नेलं होतं . बाळाला आत्याच्या हातात आणून दिल मग आत्यांनी पाळण्यात झोपवलं तर लगेचच मी एका अंगावर झाले . आश्चर्याने आत्या म्हणाल्या
" आगोबाई एक तासाचं बाळ इतकं कसं अवखळ आहे ? नदीसारखा अवखळपणा आहे हा आपण हीचे नाव सरिता ठेऊ "
आणि तेच माझं नाव कायम झाले .चार मुली झाल्यावर जरा कुजबुज सुरु झाली , आता मुलगा हवा असं आईकाका सोडून बाकीचेच म्हणू लागले . आई सांगायची सुशिला आत्या तीना आत्याच्या मदतीला यायच्या , त्यांना भारी कौतुक वाटायचं त्या बोलून दाखवायच्या
"चौथी मुलगी झाली तरी भाऊला त्याचं काही वाटत नाही बायकोचे किती लाड करतो दवाखान्यात डब्याबरोबर विकत पानाचा विडा नेतो बायकोसाठी ! "
घरात भरपूर साजूक तूप , डींक लाडूचे साहित्य आणि बाळंत बाईला द्याव लागणारं सगळं सामान स्वतः आणून ठेवलं व दोन्ही आत्यांना ते व्यवस्थित करुन द्यायला सांगितले . आईची स्वतः जातीने काळजी घ्यायचे . मोठ्या तिन्ही मुलींच अगदी कौतूकाने स्वतः करायचे राणी तर दोन वर्षाचं बाळ होती तिचे सगळ काका पहायचे . काका आॕफिसमधून यायची वेळ झाली की ती वाड्याच्या मुख्य दरवाज्यात येऊन वाट पहात बसायची . आत्या तिला घरात न्यायला आल्या की रडून गोंधळ करायची . रडत रडत तिथेच उंबऱ्यावर झोपायची काका आले की तिला उचलून आणायचे व आत्याला म्हणायचे
" तुम्ही हिच्याकडे लक्ष देत नाहीत . "
मग तिला खांद्यावर बसवून हातात अंगारा घेऊन हेलपाटे घालत रामरक्षा म्हणायचे . मग तो अंगारा लहान बाळाला व घरात सगळ्यांना लावायचे . आता चार मुली झालेल्या पण जवळ तीन मुली होत्या . पंढरपूरला घेरडीच्या लोकांची बाजार , दवाखाना यासाठी घरी सतत वर्दळ असायची . आईला खूप कराव लागायचं पण आई ते हसतमुखाने करायची शिवाय रहाणीमान अगदीच उत्साही असायचं सुशिला आत्त्या आईला जयश्री गडकर म्हणायच्या . केस लांबसडक असल्यामुळे आईचा अंबाडा मोठा यायचा काका नेहमी शेवंतीची वेणी किंवा मोगऱ्याचा गजरा हौसेने आणायचे . कित्ती भरभरुन माया करतो भाऊ मुलींची आणि बायकोची पण असं आत्यांना वाटत असे त्या तसं आईला बोलून दाखवत .
प्रकरण 5 वे
आक्काचे निधन
15 जुलै 2020
आई-काकांच्या संसाराचा व्याप वाढला . इकडे गावाकडे पण शेती पहायला कोणी नव्हते . सगळीकडुन या दोघांच्या जबाबदाऱ्या वाढल्या व काकांना पण पंढरपूर तालुक्यातील गादेगाव मिळाले . मग घेरडीला आठवड्यातून जाऊ शकतो या हिशोबांनी काकांनी
बिऱ्हाड घेरडीला हलवलं व स्वतः गादेगावला खोली करुन राहू लागले शनिवारी यायचं व सोमवारी सकाळी जायचं असा त्यांचा जिवनक्रम सुरु झाला . 1967/68 चा तो काळ होता त्याचवर्षी मोहन आण्णाचं लग्न झालं व थोडंस मोठ्या काकांच घर पण स्थिरावलं . इकडे गोंदा मामाचं पण लग्न झालं . आजीकडे पण मामा लोकांच्या जबाबदाऱ्या सुरु झाल्या म्हणून आक्कीला जवळ्यातून घेरडीला आणलं . मग आई चार मुलींना घेऊन घेरडीत रहायची . काकांनी शेतीत सुधारणा करायला सुरुवात केली . सुका व त्याची बायको आक्कू सालगडी म्हणून शेतात ठेवले त्यांना रहाण्यासाठी शेतात वस्ती करुन दिली . काका रविवारी सगळा आढावा घ्यायचे डायरीत हिशोब लिहून ठेवायचे व मुठीनं पैसे पितळी शकुंतला भांड्यात ठेवायचे . दर सोमवारी दुपारी बारानंतर आठवडा बाजार भरायचा व मेटकरवाडी सगळी गावात आलेली असायची . शेताचा सातपट्टा मेटकरवाडी भागात होता .
सोमवारी दुपारी आई दोन वाजेपर्यंत सगळं आवरुन सोप्यात पैशाचं शकुंतला भांड व पेन आणि डायरी जवळ घेऊन बसायची . सुका सांगायचा व आई डायरीत टीक करुन रोजगारी बायकांचे रोजगार करायची . त्याचबरोबर ज्वारी व गव्हाची पोती तोंडं उघडी करुन शेरावर किरकोळ विक्रीसाठी ठेवलेली असायची . या कामात हिशोब कळू लागलेल्या आक्की तायडी मदत करायच्या . एकच शेर पुर्ण वाड्यात फिरायचा त्यामुळे गिऱ्हाईक आलं की पळत जाऊन ज्यांच्या घरी शेर असेल तिथून घेऊन यायचं काम माझ्याकडे असायचं . तसं तर मी व मायडी अगदीच दोन वर्षाच्या आतल्या होतो त्यामुळे एकच काम दोघींना करायचं असायचं व नकार असला तर दोघीपण करायचो नाही . त्यामुळे आमच्या दोघींच्या भांडणाचा आईला खूप त्रास व्हायचा जुळ्याचं दुखणं आहे हे असे आई म्हणायची . तशी आई खूप कडक होती मार भरपूर द्यायची . तिला राग आला की ती आम्हांला कोपऱ्यात कोंबायची आणि पायावर पाय ठेऊन जोरात चिमटे काढायची जीव अगदी कासावीस व्हायचा . पुन्हा आमचं तेच सुरु असायचं . थोडंस पण कमीजास्त किंवा वेगवेगळे आम्हांला चालायचं नाही . फ्राॕक , वह्या , किंवा बांगड्या कानातलं सगळं दोन आणायचं . एवढंच काय तर सुट्टीला कुठे गावाला जायचं असलं तरी गेलो तर दोघी नाही तर कोणीच नाही . आईची मावशी म्हणजे आमच्या काकू म्हणायच्या
" कसलं ग तुमचं ? तुझं माझं पटेना न तुझ्याविना कटेना ! कित्ती भांडता , उगाच ताप देता आईला ."
काका घेरडीला शनिवारी यायचे तर यायची वेळ झाली की आम्ही दोघीपण स्टँडवर जायचो . तिथे दोन दगडी हत्ती होते मग वाट पहात हत्तीवर बसायचो , महादेवाच्या चढावर बस दिसली की
" गाडी आली गाडी आली "
म्हणत आनंदाने उड्या मारायचो . पुढे दोन मिनीट गाडी उतारावरुन खाली येऊन दिसेनाशी व्हायची मग ओढा ओलांडून एकदम स्टँडवर यायची . काका गाडीतून उतरले की त्यांच्या हातात लेदरची बॕग असायची ती दोघींनी आळीपाळीने घेत पळत घर गाठायच . ओझं म्हणून नव्हे तर दोघींनी घ्यायची म्हणून बदल करायचा . अशी मजा असायची . आक्की व तायडी काकांना दबकायच्या काका सोप्यात आले की या स्वयंपाक घरात पळायच्या व काका आत आले की या सोप्यात यायच्या . आदरयुक्त भिती असायची त्यांना . आई स्वतः निटनेटक आवरुन पावडर कुंकू करुन खुशीत अगदी वाटच पहात असायची मग काका आले की हसतमुख उठायची दुधातल्या घट्ट चहा बरोबर खायला गुळातल्या कापण्या , भडंग , खोबऱ्याच्या वड्या काहीतरी काकांना बरोबर देण्यासाठी केलेलं असायचं ते द्यायची . मग थोड्याशा गप्पा व्हायच्या आणि काका पेठेत जायचे तासदीड तास सगळा आढावा घेऊन यायचे . तोवर काकांना शनिवार सोडायचा म्हणून आईंने पोळीबरोबर खायला रसरशीत भरल्या वांग्याची भाजी , खास लावलेल घट्ट कोयऱ्यांच दही , शेंगादाण्याची चटणी गरम-गरम आमटी-भात केलेला असायचा . तर रविवारी वेगळाच बेत असायचा कधी केळाचं शिकरण करायची नाहीतर जोडगव्हाची सोजी काढून त्यात आलं , गुळ घालून केलेला साजूक तुपातला सांजा असायचा . जाताना बरोबर देण्यासाठी उपीटासाठी किंवा शिऱ्यासाठी रवा भाजून द्यायची तर कधी मुगाची डाळ तांदूळ भाजून त्याचं खिचडीसाठी मिश्रण तयार करुन द्यायची बरोबर लोणकढी तुपाची बरणी , जवसाची चटणी कधी लाडू असं द्यायची की त्याआधारे काकांना आठवड्यात बऱ्यापैकी घरचं खाणं पुरायचं . पुन्हा सोमवारी जातांना खायला कधी शिरा तर कधी सायीखालच दही घालून पोहे असं असायच बरोबर न्यायला पोळीच्या मलिद्याचे लाडू असायचे . तर उन्हाळ्यात आंबे प्रकरण भारी असायच !
सगळे काका मिळून एकत्र खात्रीचे डालीवर शेकड्यांनी आंबे घ्यायचे व त्याची आढी घालायची . मग कैरीचं पन्ह , गुळांबा , साखरांबा , कायरस , चटणी , तक्कू , मेथांबा ते रस , रसाची पोळी , रस घालून शिरा असे एक न दोन अनेक प्रकारे तिच्यातील सुगरणपणा डोकावत असे . काका फिदा असायचे . सकाळी कितीही लवकर जायचं असो गावाला असो वा शेतात जायचे असो खाल्याशिवाय जायचं नाही हा दंडक असायचा . काकांना रात्रीच सकाळचं नियोजन आईला सांगावे लागे त्याप्रमाणे तिचे नियोजन असायचं .
1970 चा काळ होता तो . समाजात बऱ्यापैकी पुरुषी वर्चस्व होते . पण काकांचे वागणे पुर्णपणे वेगळे असायचे . आलेल्या वेळात हाती पडेल त्या कामात ते मदत करायचे . सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची अंथरुण काढणे , बंब पेटवून सगळ्यांच पाणी तापवणे , स्वतः आंघोळ करतांना लहान दोन पोरींना आंघोळ घालायची . पाणी आडाचं असायचं तर ते शेंदून द्यायचं , रात्री अंथरुण घालणे ही कामं काकाच करायचे . कोणताही गाजावाजा न करता समानतेच्या वागणूकीची प्रात्यक्षिके लहानपणापासून न्याहाळण्याचं आम्हांला भाग्य लाभले आहे .
दरम्यान काकांची सांगोला तालुक्यात बदली झाली . काकांच आॕफिसचं काम पण अगदी चोख असायचं . त्यामुळे त्यांना तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती मिळायच्या . तालुक्यातील सर्वात मोठं गाव काकांची सासुरवाडी म्हणजे जवळा हे होतं त्याखालोखाल घेरडी व सोनंद होतं तर काका रिटायर होईपर्यंत त्यांना आलटून पालटून घेरडी , सोनंद मिळायचे व जवळा कायम त्यांच्याकडे असायचं . गावकरी पण खूष असायचे काकांवर . खूप लोक त्यांना गावचे जावई म्हणून " पाव्हणं "असे म्हणायचे . जवळा सोनंदला जायला बस वेळेत नसायची वेळ जातो म्हणून काकांनी लुनासारखी सुवेगा गाडी घेतली व नोकरीच्या गावी व शेतात गाडीवर जायचे . गावात ती पहिली गाडी होती . टीपीओ , बीडीओ यांचा इकडच्या भागात दौरा असला की जेवायला सगळ्यांची व्यवस्था आमच्या घरी असायची . तोंडभर कौतुक करत लोकांची जेवणं असायची . आईच्या मदतीला वाड्यातून उषा वहिनी , शांता वहिनी कुणीही यायच्या . तसंच काकांचे अनेक सहकारी भाऊसाहेबांच्या शेतात हुरडा खायला म्हणून जीप करुन यायचे . तर शेतात नाष्टा म्हणून आईने दोनदोन किलोचं उपीट करुन द्यायचं . बरोबर लोणची , चटण्या , हिंग खोबऱ्याचं मीठ गुळ असं सगळं व्यवस्थित द्यायचं मग सगळे मिटक्या मारत कौतुक करत हुरडा पार्टी करायचे .
माझं आजोळ जवळा . तसं फारसं नाही पण मी सहा-सात वर्षांची होईपर्यंत आम्ही जवळ्याला जात होतो त्यामुळे जवळ्यातल्या काही पुसटशा आठवणी आहेत . आक्का आप्पा आणि बापूमामा जवळ्यात रहायचे . मोठे मामा पंढरपूरला तर गोंदा मामा नोकरीच्या गावी सहकुटुंब असायचे . घेरडीत जनावरांचा राबता होता आणि जवळा तसं पाच किलोमीटरवर होतं त्यामुळे घेरडीत गाय व्याली की आईला चिकाचं दुध आक्काकडे पोहोचवायचं असायचं आणि
काकांना काही ते वेळेत बसत नसे मग काका ती चिकाची किटली घेऊन मला स्टँडवर घेऊन यायचे . कोण जवळ्याला जाणारे ओळखीचे भेटलं की काका त्याला सांगायचे हीला तुमच्याबरोबर न्या आणि घरी सोडा आणि कोणीच भेटलं नाही तर कंडक्टरजवळ बसवायचे आर्ध्या तिकिटाचे पैसे हातात ठेवायला लावायचे आणि कंडक्टरला सांगायचे
"हीला जवळ्यात उतरवा "
माझा जीव मात्र जवळा येईपर्यंत थाऱ्यावर नसायचा . गाडी मधेअधे थांबली की लगेच मी कावरीबावरी होऊन उभी रहात असे . कंडक्टर हसत म्हणायचा
" निवांत बैस जवळा आलं की उतरवतो तुला "
मग परत येतांना तसंच जवळ्यातून बसवून दिलं जायचं आणि मी घेरडीत उतरायचं . घरी आलं की लढाई जिंकल्यासारखं वाटायचं . लगेच वाड्यात पण कौतुक व्हायचं . असे त्याकाळात खूप लहानपणीच आम्हांला घरातूनच स्वावलंबनाचे धडे मिळत गेले त्याचाच पुढे खूप उपयोग झाला .
जवळ्यात आजीचं शेत अगदी गावाजवळ होत . चालतसुद्धा शेतात जाता यायचं . शेतात आंब्याची झाडं होती काळा आंबा , गोटी आंबा , खोबरी आंबा अशी आंब्याची खास नावं होती . एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आई आंबे खायला आम्हांला घेऊन जवळ्याला गेली होती . एकदोन दिवस आई रहिली त्या दोन दिवसात आक्काने लेकीचं केलेलं कोडकौतुक अजुनही आठवते . सकाळी तेल लाऊन चोळूनमोळून न्हाऊमाखू घातलं . आई म्हणजे आक्काची एकुलती एक लेक होती तर आई नेहमी म्हणायची
" प्रत्येक जीव हा एकच असतो त्यामुळे कौतुक प्रत्येकाच केलं पाहिजे "
आणि मग आक्काच्याच पद्धतीने न थकता कायमच प्रत्येक रविवारी आम्हा मुलींना न्हाऊ घालण्याचा सोहळाच असायचा . पाटावार बसायचं मग तेल कोमट करुन वाटी घेऊन आई बसायची एक बोट तेलात बुडवून जमिनीवर पाच ठिपके द्यायची मग दोन्ही कानांत तेल घातलं की गुदगुल्या व्हायच्या . मग केसांना , अंगाला तेल लाऊन चोळायचं . घोटे , कोपर काळे झालेत म्हणत तेल लावायचं . गुडघ्याला कोपराला नेहमी धडपडण्यामुळे जखमा झालेल्या असायच्या कधी प्रेमाने तर कधी रागे भरत तेल लावायची . सकाळी लवकरच काका बंब तापवून ठेवायचे मग आई शिकेकाईनं न्हाऊ घालायची . मऊ हाताचा मायेचा स्पर्श आठवला तर अजूनही अंगावर आनंदाने काटा येतो .
" राणीचे केस लांब आहेत , तिला मोठा पंचा लागतो , त्याची नीट नीगा राखावी लागते "
असे म्हणत सकाळच्या शाळेला गडबड होते म्हणून मला माझी वेणी घालायला शिकवली व मायडीची वेणी स्वतः घालायची रिबीनीने घट्ट बांधून दिल्यावर मग ती खूष व्हायची . केसांची खूप काळजी घ्यायची तिच्या . अशी आक्काची शिस्त , माया , आजीबाईचा बटवा , सुगरणपणा आईमध्ये पुरेपूर उतरला होता .
आई आली की आक्का लेकीसाठी जेवणाचा खास बेत करायची . आंब्याचा रस , पोळी , खास जवळेकर स्पेशल भजी शिवाय आवर्जून मुरडीचा कानोला केलेला होता . का तर लेकीला पुन्हा मुरडुन लवकर माहेरी येता आलं पाहिजे हे शास्त्र ! लेकीनं बुधवारी माहेराहून जायचं नाही कारण काय तर
"जाशील बुधी तर येशील कधी "
असं होतं म्हणे . दारात चिंचेचं मोठं झाड होतं त्याच्याखाली मोठ्ठा चौकोनी घडीव दगड होता . त्याच्यावर बसवून आम्हा मुलींना न्हाऊ घालायची . आम्हांला जवळ्यात सोडून आई परत घेरडीला आली . रात्री आम्ही उन्हाळ्यामुळे आंगणात बाजेवर झोपायचो आप्पा गोष्टी सांगायचे , तर आक्का पहाटे उठून अंथरूणावर बसुनच गोड आवाजात अभंग म्हणायची . ती फारच शिस्तीची होती त्यामुळे बऱ्याचवेळा तीचा ओरडा खावा लागायचा
" गाढीव कुठली , सगुणा , चांगुणा "
हे तीचे परवलीचा शब्द असत . ती रागावल्यावर आम्ही तोंड फुगवून बसलेलं दिसलं की खूण करुन आप्पा ओसरीवर बोलवायचे आणि गुदगुल्या करत बोचऱ्या आवाजात हातावर हात उलटा सुलटा करत टाळी वाजवत म्हणायचे
" गरगर गोटे तू सागरगोटे sssss
गरगर गोटे तू सागरगोटे
तू बागडबील्ले sssssss"
आणि हळूच हातावर चमकीच्या कागदाच्या रोलमधली पेपरमींटची गोळी ठेवायचे . ती जिभेवर ठेवली की गारगार वाटायचे आणि व्हीक्ससारखा वास यायचा मग रुसवा कुठच्या कुठे पळून जायचा .
आक्का दुपारी चार वाजता तिची कंगवा , कुंकू असलेली नक्षीदार लाकडी पेटी घेऊन ती उघडून आवरायला बसायची . त्या पेटीतच झाकणाला आरसा होता . तिचा आंबाडा घालून झाला की ती पातळ सुती कपडा हातावर टाकून बोटाभोवती गुंडाळायची आणि बोटाने अगदी निटसपणे चेहरा पुसून घ्यायची . मग कपाळावर मेणाचा छोटासा ठिपका लावायची व त्यावर तिचं ठराविक आकाराचं चिंचेच्या पानाएवढं आडव कुंकू ठळक करायची व बोटाने कोरायची तिच्या शेजारी बसून पहायला मजा वाटायची . गोरीपान , शेलाटी , उंच धारदार नाक जणू लक्ष्मीच भासायची ती अनेक कप्पे असलेल्या त्या छानशा पेटीविषयी पण कुतूहल वाटायचं . काजळाची डबी , मेणाची डबी , सुई-दोरा , गुंड्या बांगडीतली पीन असा बराचसा खजिना त्या पेटीत असे .
तिथे आम्ही बापूमामाच्या मागे असायचो . संध्याकाळी चिंचेखाली शेजारची मुलं-मुली जमायचे आंधळी कोशींबीर , खोखो आणि पकडापकडी अगदी धडपडेपर्यंत खेळायचो . आम्ही पडलो की त्याचा बापूमामाला ओरडा बसायचा . तसा तो जरा व्रात्यच होता .पण बापूमामा आक्का-आप्पांच शेंडेफळ होतं त्यामुळे थोडंस लाडानं वेडं म्हणतात तसं त्याचं काहीसं झालं होतं . शिक्षणाची त्याला फारशी ओढ नव्हती मोठे दोन्ही मामा चांगले शिकले होते आईचं सगळं छान होतं . आक्काला फक्त बापूमामाची काळजी वाटायची . आक्का-आप्पा दोघेही वयस्कर झाले होते त्यामुळे त्याचा व्रात्यपणा आक्काला आवरायला कठीण व्हायचं तो आई-वडीलांपेक्षा बहीण-भावानां , आमच्या काकांना घाबरायचा . कोणी नसले की यांना त्रास द्यायचा . आक्काला कमी दिसायचं तर शेंगदाण्याच्या चटणीवर कितीही तेल ओतलं तरी पडलच नाही अजून वाढ म्हणायचा मग आम्ही
" आक्का खूप तेल पडलय गं "
असं ओरडलं की आक्का त्याच्यावर धाऊन जायची पण हा पळत सुटायचा .
एकदा तर त्यांने आक्काची जिवघेणी चेष्टा केली . मला व मायडीला घेऊन आक्काला शेतात जायचं होत बरोबर लहान पोरींना उन्हात कुठे चालवत न्यायचं म्हणून आक्काने बापू मामाला सायकल भाड्याने घेऊन आम्हांला सायकलवर बसवून शेतात न्यायला सांगितले . पुढे नळीवर मी तर मायडी पाठीमागे कॕरेजवर असं दोघींना घेऊन बापूमामा सायकलवर व आक्का मागोमाग चालत निघाली व तिने आम्हांला वस्तीवर बसवायला सांगितले . इकडे बापूमामाला गम्मत करायची लहर आली शेतात पोहोचलो की वस्तीवर न जाता त्यांने सायकल आंब्याच्या झाडाकडे वळवली . आम्ही उतरलो मामाने सायकल दिसू नये म्हणून झाडाखाली जमीनीवर आडवी ठेवली . आम्हांला झाडावर चढवलं आणि तो पण चढला आणि आक्काची वाट पहात आम्ही फांद्यावर बसलो . आक्का उन्हांतून चालत येतांना दिसताच मामांने आम्हांला अजिबात आवाज न करता गूपचूप बसायला सांगितले . आक्का शेतात आली की तडक वस्तीवर गेली आम्ही कोणीच दिसलो नाही म्हणून ती घाबरली . पण लगेचच तिला आंदाज आला की बाप्यांन काहीतरी आगाऊपणा केला ! ती गड्याच्या बायकोला घेऊन झाडाकडे आली मग तिला सायकल दिसल्यावर तिचा जीव भांड्यात पडला पण आम्ही अजून दिसलोच नव्हतो . मग आक्काने धमकीवजा हाक मारली
" बाप्या , मेल्या कुठे लपलायस उतर पटकन खाली . उन्हातान्हाचं पोरींना वस्तीवर बसवायला सांगितले होतं तर आगाऊपणा करुन लपून बसलास ? उतर खाली " .
मग त्यांने खाली उडी मारली आम्हांला पण उतरवलं . नंतर जी आक्काने मामाची खारडपट्टी काढली ते सांगायला नको . आम्ही घेरडीला आल्यावर हे सगळं सांगितलं .
इकडे काकांनीआत्यंत चौकसपणे सुधारीत शेती सुरु केली होती . चार म्हशी घेतल्या , मेंढ्या घेतल्या मग एकट्या सुकाला पेलत नाही म्हणून नाना त्याची बायको सुंदा , तात्या व त्याची बायको कला अशा तीन जोड्या ठेवल्या . कापूस , भुईमुग अशी पीकं घेतली . त्यानुषंगाने जळणासाठी व बंबाला घालायला कापसाच्या पळकाट्या असायाच्या . त्या पाच वाजता मोडून ठेवायचं काम आई करायची आम्ही पण मदत करायचो . पुन्हा गावात म्हशी आणल्या त्या सांभाळायला गावातला एक म्हसा नावाचा गडी ठेवला तो पांगळा होता . तो फक्त म्हशी राखायचं काम करायचा . त्याची पण आई-काकां खूप माया करत असत . त्याला हवी ती मदत काका करायचे व खायला आई द्यायची . कधी वेळ पडली तर पडेल ते काम दोघेही करायचे . धारा काढायचे कोणत्याही कामाचा त्यांना कमीपणा वाटत नसे . पण रहाणीमान , कपडे एकदम स्वच्छ , कडक असायचे . दर सोमवारी भट्टीवाला यायचा मागच्या सोमवारी नेलेले कपडे कडक इस्त्री करुन आणालेले असायचे . पांढरा , मोती कलर आणि किरमीजी कलर या तीनच कलरचे नेहरु शर्ट व पांढरी विजार हा काकांचा ड्रेस असायचा पांढऱ्या कपड्यांना फिकटशी निळ घातलेली असायची . तर आईचं नऊवार सुती मऊ साड्या व शक्यतो पांढरे ब्लाऊज असायचे . तिच्या साड्यांची मऊसुत दुपटी अजूनही आमच्याकडे आहेत . स्वच्छ , निटनेटकं , पहाताच प्रसन्न वाटलं पाहिजे असे राहणीमान असायचे दोघांचेही . 1972 ला खूप मोठा दुष्काळ पडला होता तर आमच्या शेतात एकोणीस पोती ज्वारी झाली होती . बऱ्याच पाहुण्या रावळ्यांना त्याचं वाटप झालं . बाकी उत्पन्न पण भरपूर निघालं त्यामुळे त्यावर्षी पहिल्यांदा आईसाठी पाच तोळे सोनं घेतलं व चढती कमान सुरु झाली . तसतसे मुलगा व्हायला पाहिजे असे सगळे पाहुणे रावळे , म्हणू लागले . इकडे सर्वात मोठी आक्की वय वाढू लागलं तशी तिची चिंता यांना सतावू लागली . पाठीत बराच बाक आला होता तिच्या . कुबड स्पष्ट दिसत होतं . ती आभ्यासात हुशार होती पण ऐन मॕट्रीकच्या वर्षी पुन्हा तिला टाईफाईड झाला . तिच्या हाताला मुंग्या यायच्या पण तिचा अभ्यास झाला होता त्यामुळे शाळेच्या सल्ल्याप्रमाणे काकांनी तिच्यासाठी बोर्डाकडून राईटरची परवानगी काढून आणली व तिची परिक्षा झाली ती चांगल्या मार्कांनी पास झाली मग तिला तू स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेस स्वावलंबी झाली पाहिजेस म्हणत बार्शीला डीएड साठी शिकायला ठेवलं . त्याकाळात खेड्यातून मुलींना शिकायला बाहेर ठेवणे ही गोष्टच सगळ्यांना आचंबीत करणारी होती. पण आई-काका तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . पण मुलगा असावा हा पाहुणेमंडळीचा रेटा आसायचा त्यामुळे आईची पण चलबिचल व्हायची . मुलाची वाट पहात मग आत्या , काकू ,मामी , आक्का कोण काय सांगेल ते आईपण करायची काकांना फारसं पटायचं नाही पण विरोध करत नसत . आईने मिठाच्या एकवीस चतुर्थ्या केल्या व कडक सोळा सोमवारचं व्रत केलं . अशावेळी आईला करायचं नसलं की आक्की तायडी स्वयंपाक करायच्या . आणि मिठाचा मोदक शेवटी वाढायचा . आईने भरपूर खावे हा त्या बालमनाचा उद्देश असायचा . सोमवार केले तर आंघोळ झाली की बारीक बुट्ट्याची पांढरी साडी पांढर चिकनचं झंपर घालून दिवसभर असायची शिवलिलामृताचा आकरावा आध्याय वाचायचा दिवसभर कडक उपास करायची मिठाचं काही खायचं नाही दुध घ्यायची फक्त . दुपारीच स्वयंपाक करायचा नैवेद्याला मलिदा करायचा . पाच वाजता सगळं आवरुन पुजेचं साहित्य घेऊन महादेवाला जायचं व आल्यावर सोमवार सोडायचा . काका जेवल्याशिवाय ती जेवत नसे मग काका पण लवकरच घरी यायचे . खूप मनोभावे केलं तिने सगळं . सोळा सोमवारचं उद्यापन पण खूप मोठं केलेलं अगदी मामा, आत्या , पाहूणे यांना टपाल पाठवून सतरा मेहूण जेवायला बोलावले होते . तो एक मोठा सोहळा झाला ! त्यात 74 साल उजाडलं व आक्काला दम्यांच्या व्याधीनं हैराण करुन सोडलं . पंत काका काही कामानिमीत्त जवळ्याला गेले होते ते घरी जायचे आक्का अंथरुणाला खिळून आहे हे त्यांच्या लक्षात आले . जवळ्यात आक्का व आप्पा दोघेच होते . तिथून घेरडीला आल्यावर सगळा वृत्तांत त्यांनी आईला सांगितला .पंत काका आईला जवळजवळ ओरडलेच .
" तू लक्ष द्यायला हवंस म्हातारी अंथरुणाला खिळून आहे म्हाताऱ्याचे हाल होतात आणि तुम्ही कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत ".
मग आईने काकांशी चर्चा केली व बैलगाडी पाठवून आक्का-आप्पांना घेरडीत आणलं . आक्काचं खाणं कमी झालं होतं . आई रोज तीनवेळा ती म्हणेल ते वेगवेगळे पदार्थ करायची पण तिला अन्नच जात नव्हतं . आम्ही शाळेतून आलो की तिचे पाय दाबून द्यायचो . त्यावर आक्का फार खूश असायची .
" शहाणी ग माझी सगुणा "
असे म्हणायची . जवळजवळ एक महिना ते दोघे घेरडीत राहिले होते . तेव्हा नुकतेच आईला दिवस गेलेले आक्काला समजलं होतं . तिला पण खूप आनंद झाला होता कारण माझ्या पाठीवर जवळजवळ साडेसात वार्षांनी घरात पाळणा हलणार होता . इकडे तिच्या लेकीचा संसारात लक्ष्मी पाणी भरत होती . त्यामुळे जावयाचं तिला भारी कौतुक होतं
" आता एक नातू झाला म्हणजे भरुन पावलं "
असे ती म्हणायची . पण तिच्या आजाराचा जोर बळावला तिला आपण जवया कडे राहिलो याचं शल्य होतं. पण आई तिला ओरडायची मी पण तुझीच मुलगी आहे न ? काय बिघडत माझ्याकडे राहिलीस तर ? पण तिला ते फारस रुचत नसे त्या दरम्यान मोठे मामा शिक्षणासाठी रहुरीला होते तर गोंदा मामा नोकरीनिमित्त बाहेरगावी होता . बापू मामा कधी जवळा तर कधी गोंदा मामाकडे राहत असे . मोठ्या मामी त्यांच्या चार मुली एक मुलगा घेऊन राहत होत्या त्यामुळे आक्काकडे पाहायला थोडंसं जिकरीचे व्हायचे . आईने मात्र दीडेक महिना तिची अंथरुणावर सेवा केली जमेल तसे आम्ही मुली मदत करायचो . मोठे मामा रहुरीहून आले त्यांचं शिक्षण संपले होते मग ते आक्का आप्पांना पंढरपूरला घेऊन गेले . पण आक्काच्या दम्याने जोर धरला होता त्यातच तिचे पंढरपूरला मोठ्या मामाकडे निधन झाले .
प्रकरण 6 वे
संसाराचा वाढता व्याप
18 जुलै 2020
1974चा काळ म्हणजे उघडपणे मुल-मुली असा फरक केला जायचा . नेमके त्याच काळात घराला बऱ्यापैकी उबदारी येऊ लागली बरकत येऊ लागली होती . काका चार पैसे बाळगून असायचे . तसेच हवी असेल त्याला मदत करायचे त्यामुळे चार लोक संबंध ठेवायचे काका उदारमतवादी होते . गावात लोक काकांना प्रतिष्ठित व मार्गदर्शक व्यक्ती म्हणून ओळखू लागले . शेतामध्ये प्रत्यक्षात किंवा त्याला पूरक असा कोणताही प्रयोग काका करायचे . त्याला आईची साथ असायची मुख्य म्हणजे तिचे एक तत्व होतं ती म्हणायची घरची बाई म्हणजे लक्ष्मी असते ती जर समाधानी असेल तर घरात शांतता , समाधान लाभते मग नक्की त्याठिकाणी लक्ष्मी नांदते . लक्ष्मी स्थीर नसते ती चंचल असते तिने घरात नांदावे तिचा वास घरात असावा यासाठी घरात कधी चिडचिड करु नये , रखरख नसावी , करकर नसावी , तंटेबखेडे नसावेत , आदळआपट करु नये तर घराला घरपण टिकते . वाचा चांगली असावी
" वास्तू तथास्तु "
म्हणत असते त्यामुळे घरात बोलतांना सकारात्मक बोलावे अशी ओतप्रोत समाधानी वृत्ती तिच्या ठायी होती . त्यामुळे घरामध्ये आबादीआबाद होते . सुबत्ता वाढीस लागली होती . हे सगळ बघतांना बोलतांना सग्यासोयऱ्यांच एकच पालूपद असायचं ओळीनं चार मुली झाल्यात आता मुलगा व्हायला पाहिजे . इतका व्याप वाढवला तो पहायला पुढे कोणी नको का ? आई-काका काही बोलायचे नाहीत पण मुलींना त्यांनी कधीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली नाही . उलट आईला तिला घर चालून आलेली नोकरी करता आली नाही याची खंत वाटत असे . " नोकरी केली असती तर आत्तापर्यंत मी हेडमास्तरीण झाली असते "
असे मात्र म्हणायची . तिची ती सुप्त इच्छा आता प्रबळ होऊ लागली व मुलींना शिकवावे असे तिचे मत येऊ लागले . आक्कीच्या बाबतीत तिच्या अधुपणामुळे तिने स्वावलंबी असलं पाहिजे यावर त्या दोघांचे एकमत झाले होते .
वाड्यात आमचे चुलत काका वयाने सर्वात मोठे म्हणजे आईच्या मावशीचे यजमान त्यांना सगळे पंत काका म्हणून ओळखत . वाड्यात सर्वांना त्यांचा आदरयुक्त धाक होता . त्यांना आम्ही मावशी आणि काका म्हणायचो तर दुसरे फक्कड काका व प्रभा काकू तर जरा लांबचे पण समविचारी असल्यामुळे मित्राप्रमाणे असलेले अंता काका व रमा काकू हे काका हेडमास्तर होते . तर आमचे चुलत भाऊ म्हणजे मोहन आण्णा-उषा वहिनी , राजाभाऊ दादा-पीलू वहिनी , रमेश आण्णा-शांता वहिनी आणि बराच गोतावळा होता . काकांची बऱ्याच बाबतीत सल्लामसलत , चर्चा अंता काकांबरोबर होत असे . आक्कीच्या बाबतीत पण त्यांच्या चर्चा झालेल्या . आक्कीची एक बाजू अधू असल्यामुळे सगळेजण तिच्याविषयी सहानुभूतीने विचार करायचे .
आईचे दिवस भरत आले तसे कोण करणार असा प्रश्न सतावू लागला . आक्की तेव्हा डीएडसाठी शिकायला बार्शीला होती तर मॕट्रीक बंद होऊन एसएससीला सुरुवात झाली होती व त्या पहिल्या बॕचला तायडी होती . त्यामुळे तिच्या वर्गात असलेल्या आमच्या चुलत बहिणी शरु , शकू , पुष्पा आमच्या घरी झोपायला व आभ्यासाला यायच्या आमच्याकडे किल्ली फिरवून गजर लावायचं गोल घड्याळ होतं . पहाटे आभ्यासाला उठाण्यासाठी त्या घड्याळाला किल्ली देऊन झोपायच्या . गजर झाला की अभ्यासाला उठायच्या मी पण उगाचच लवकर उठून पाटी पेन्सिल घेऊन त्यांच्याजवळ बसायचे . माझे गाल गोबरे होते सगळेजण गाल ओढायचे व ओढून ओढून ते लाल व्हायचे म्हणून सगळ्यांनी माझ नाव
" गाजरी " असं पाडलं होत . मी दिसले नाही की
"कुठं गेली गाजरी "
असं म्हणायचे सगळे . तेव्हा शिकवण्या नसायच्या यांची दहावीची पहिलीच बॕच म्हणून त्यांचे शाळेत रात्री जादा तास व्हायचे . मग तायडीच्या अभ्यासात व्यत्यय नको यायला म्हणून नागर आत्याची मोठी मुलगी बेगडी आक्का तिला घरात मदतीला आणायचं ठरलं . मायडी व मी तर लहान होतो आमचंच उलट करायला लागायचं . मग आमच्याच एक लांबच्या काकू होत्या रुक्मीणी काकू त्यांच नाव , त्या स्वयंपाकाची कामे करायच्या आईने त्यांना आधीच स्वयंपाकाला लावले सगळे माहिती करुन दिलं . बाकी ठकू परटीण सुईण होती भागाबाई भांड्याला आणि इतर निलाबाई , शिवा , शेवंता गरजेनुसार बोलावल्या की हजर असत . वाड्यातल्या सगळ्या काकू वहिनी सगळ्यांचे एकमेकांशी खूप जिव्हाळ्याचे संबंध होते . पण सुगरणपणात आई हुकुमी एक्का होती . तिचे सुगरणपण हे एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकतं . वाडा संस्कृती असल्यामुळे नेहमी भाज्यांच्या किंवा काही नवं जुन केले की देवाण घेवाण होत असे . काही केलं की पाच भांडी पाच घरी पोहोच होत असत . उन्हाळ कामं पण या सगळ्याजणी ठरवुन करत असत. पापड लाटणे , शेवया अशा चिकट कामाला एकमेकींना मदत करायच्या . संध्याकाळी बऱ्याचदा आम्ही मुलं आमच्या आंगणात अंगतपंगत करायचो .
आईचे दिवस भरले होते तर प्रत्येकाच्या घरी वहिनींची छोटी बाळं होती . मला ती घेऊन फिरायचा फार नाद होता . त्यामुळे घरात आमच्या बाळाची मी वाट पहात होते कारण मला ते घेऊन फिरता येणार होता .
घेरडी गावात धनगर समाज जास्त आहे .घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी त्यांची शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये आहे त्यामुळे सधन लोक आहेत . घेरडीत दसऱ्याचं खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आमचे घेरडीकरांच कुलदैवत त्यामुळे वाड्यात पण नवरात्र व दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो . अष्टमीला कडकण्या करायच्या , बनाळीच्या देवीला जाऊन यायचं मग दसरा .
दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासून आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं व जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथक ढोलाच्या तालाघवर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी घेऊन सामिल व्हायचे . मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा, दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे.
इकडे वाड्यात नवरात्र बसण्यापुर्वी आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतलेला असायचा यासाठी पण पुढाकार आई-काकांचा असायचा . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची तिला पैशात रोजगार द्यायचा व दिवसभर आपल्याबरोबर चहा, नाष्टा , जेवण सगळं आई द्यायची . ती हातवारे करत सांगायची दुसरीकडे कामाला असली तर जेवायला घरी जावं लागतं आमच्याकडे येताना काही पहावे लागत नाही . कधीकधी तिला काम नसले की पैसे नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची आई ओळखायची आज हीच्याकडे काही नाही लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची व जेवण करुन जा म्हणायची तिला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . यावेळी आईचे दिवस भरलेले दिसले तर ती पण आईच्या पोटाकडे खूणेने हात करत नाक फुगवत काकांची नक्कल करायची व असा मुलगा पाहिजे असं जिभेने ळूळू करत म्हणजे मुलाची खूण असे तिची ते आईला सांकेतीक भाषेत सांगायची सगळे तिची नक्कल पाहून हसायचे . काकांनी डोकावलं की ती पळत सुटायची . कधीकधी पेठेत पण काकांसमोर येऊन हात पुढे करायची काका तिला पैसे देत असत .
वाड्यात आमच्या घरासमोरचं आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्या कार्यक्रम एकत्र होत असे . मग काका चार वाजताच आंगणात मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के लाऊन ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लायायचे विड्याच्या पानाची आख्खी करंडी , सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , अडकित्ता सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
दुपारी पुरणावरणाचा स्वयंपाक झाला होता .तर घरकामात तायडी बरीच मदत करायची . मावशींचे घरी हेलपाटे वाढले होते . पपाला सगळं पहाव लागतं घरी मोठं कोणी नाही म्हणंत काय हवं नको पहायला चक्कर मारुन जात असत . अवघडलेली असली तरी आईचा उत्साह भारी होता . दुपारी चार वाजताच तिने मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास गडद गुलबक्षी रंगाचे काठपदर असलेली शामला कलरची जरीची साडी नेसाण्यासाठी काढली . त्यात मधेच केवड्याचं पान ठेवलेलं होतं ते वाळलं होत पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलूजान स्वतः हुंगला व आम्हीपण मला मला करत तीच्या भोवती जाऊन वास घेतला . ती साडी तिने दसऱ्याला नेसायला काढली . नीटनेटकं आवरुन तीने ती नऊवार साडी छान काठ काढून नेसली मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढले गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी नुकत्याच केलेल्या पाटल्या , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार झालं . नाक फुगवून हसत काका तिच्याकडे पहायचे न बोलताच त्यांच्यातील प्रेमाचा तो संवाद असायचा . काकांचा दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . त्यांच्याकडे पाहून आईपण डावा गाल उचलत मान हलवत हसायची . तुम्ही पण खूप रुबाबदार दिसता असे म्हणायची मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत . सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद ओवाळून टाके . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं कडकण्या खायला द्यायच्या .सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो . मग एक एक ढोल यायचा त्यांचा मधल्या आंगणात नाच होत आसे . ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत . त्यापण वाड्याशेजारी रहायच्या त्यापण आशावेळी वाड्यात येऊन बसत . जेवढ्या मोठ्या लोकांना आई नमस्कार करायची ते प्रत्येकजण आईला
" आता मुलगा होऊ दे "
असा आशीर्वाद देत असत .
माझ्या बालमनाला तेव्हापासून हा प्रश्न पडला की आमच्या आई-काकांना मुलगा झाला पाहिजे असे सगळे का म्हणतात .
प्रकरण 7 वे
पाचवे कन्यारत्न
24 जुलै 2020
दसरा झाला आणि दिवाळी तोंडावर आली . आता आईचे दिवस भरलेले होते त्यामुळे तिला जास्त दगदग नको म्हणून घरकामात काका बरीचशी मदत करायचे , घरात पहायला कोणी नाही म्हणून स्वतः जातीने लक्ष द्यायचे . आईला झोपण्यासाठी नविन बाजलं करुन घेतलं . नवरात्रानिमित्त घराची तर साफसफाई झालेलीच होती पण बाळ-बाळंतीणीसाठी पडदे टाकावे लागणार त्यासाठी आधीच लाकडी पट्ट्या ठोकून दोऱ्या बांधून ठेवल्या . तर घेरडीत चांगला मिळत नाही म्हणत जतेला जाऊन चांगल्या प्रतीचा किराणा आणून ठेवला . स्वयंपाकाला रुक्मीणी काकू येतच होत्या . ऐनवेळी बेगडी आक्काला आणायचं ठरलं . इकडे शेतीत पण निरनिराळे प्रयोग करण्याचा काकांनी सपाटा लावला होता . मुख्य म्हणजे करेल त्यात त्यांना यश येत होत . काका काय करतात हे गावकरी पहायचे व त्यात चांगलं उत्पन्न निघाले की परवडतं म्हणायचे व कोणीकोणी लगेचच अनुकरण करायचे तोपर्यंत काकांनी काहीतरी नविन शोधलेलं असायचं . त्याप्रमाणे त्यांनी यावर्षी ऊसाची लागवड करायची ठरवलं . पाण्याचं प्रमाण कमी त्यामुळे आसपास ऊस कोणाकडेही नव्हता सुरुवात काकांनी केली बराच मोठा घाट असणार होता तो . कारण त्या काळी इतके साखर कारखाने नसायचे त्यामुळे गुऱ्हाळ मांडावं लागणार होतं . शेती , नोकरी आणि घर असे एकावेळी तीन ठिकाणी काकांची घोडदौड सुरु होती .
मावशी शेजारीच रहात होत्या , घरात मोठं बाईमाणूस कोणी नाही म्हणायच्या व त्या स्वतः दिवसातून सारख्या डोकावून जायच्या आईची चौकशी करायच्या . घेरडी तसं खेडं होतं . गावात मोठा दवाखाना नाही पण आमच्या गावात मुंबईला नर्सींग कोर्स व काम केलेल्या बाई होत्या . गावातले प्रतिष्ठीत किराणा दुकानदार अरविंद डोंगरे यांच्याशी त्यांच लग्न झालं होतं त्यामुळे त्या घेरडीत त्यांच्या रहात्या घरी दवाखाना चालवायच्या . सारा गाव त्यांना आरविंद काकी म्हणून ओळखायचा . त्या बाळंतपणाच्या कामासाठी पंचक्रोशीत प्रसिध्द होत्या . ते काम त्या घरगुती पण अत्यंत कौशल्याने करत असत . आईला पण त्यांचीच ट्रीटमेंट होती . दसऱ्यानंतर दोनतीन दिवसांत आमच्या घरी पाचवे कन्यारत्न जन्माला आले . आई-काकांनी आनंदाने बाळाचे स्वागत केले . महादेवाची कृपादृष्टी आहे या बाळावर , नशिबवान आहे पोरगी . जन्माला येताना घरात बरकत घेऊन आली आहे . पायगुणी आहे असे आई म्हणायची मुलगा का मुलगी हा विचारदेखील त्यांच्या मनास शिवत नसे , फरक दोघांनाही पडत नव्हता . पण गावात व पाहुणे मंडळी मात्र भाऊ काकांना पाचवी पण मुलगीच झाली असं म्हणायचे . हे दोघे सोडून बाकीच्यानाच प्रश्न पडायचे . पण काका मात्र बाळ दहा दिवसाचं झालं की बाजेजवळ खुर्ची टाकून त्यावर तासनतास बाळाला मांडीवर घेऊन बसायचे आईशी गप्पा मारायचेग . चेष्टा मस्करी चालायची घरात वातावरण आनंदी होतं . तिच्या जन्माने घर उजळून निघालं म्हणत तिचं नाव ज्योती ठेवलं पण तिला सगळे नन्या म्हणायचे . अतिशय गोंडस , खोडकर व खेळकर बाळ ! मी मात्र जाम खूष होते चोवीस तास बाळाजवळ ठाण मांडून बसायचे . मी तेव्हा तिसरीला होते दोनवेळा शाळा असायची सकाळची शाळा दहाला सुटली की माझा मुक्काम बाजेवर असायचा .
काकांनी नागर आत्याकडे जाऊन घरात लक्ष द्यायला म्हणून बेगडी आक्काला आणलं . डींकाचे व आळीवाचे लाडू , वेगवेगळ्या खिरी फक्त आईपुरत्या नाही तर सगळ्यांसाठी करायच्या असा शिरस्ता होता . दुधदुभतं व तूप याची तर घरात रेलचेल असायची . संक्रांत झाली की बेगडी आक्का गेली तायडीची दहावी मग आई सगळं करु लागली . ज्योती कडेवर घ्यायसारखी झाली की ती आम्ही शाळेतून यायची वाट पहात असायची आम्ही आलो की तिला घेऊन तासनतास फिरत बसायचो मारुतीचा कट्टा ठरलेला आसायचा .
आता काकांनी ऊसाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली . उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून फेब्रुवारीमध्येच विहिर घेतली . पाणी भरपूर लागलं मग पाणी उजवण्याचा कार्यक्रम गुऱ्हाळ झाल्यावर करु असे ठरले . ज्योती जेमतेम एक वर्षाची झाली व गुऱ्हाळ सुरु होणार होतं . त्यासाठी चोवीस तास माणूस वस्तीवर असणे गरजेचे होते . मागे हटेल ती आई कसली ! काका काय करतील त्याला हिरिरीने साथ द्यायचा जणू तिने विडाच उचलला होता . मग आईने मी शेतात येऊन रहाणार असे जाहिर केले . मग काकांनी पण शेतात चार खणाचं घर बांधलं , गुऱ्हाळ बांधलं आणि मागेपुढे पहायला व आईला दिवसभर सोबत घरचं कोणीतरी हवं म्हणून आईच्या बनाळीच्या शंकर मामांचा मुलगा प्रकाश त्याला आम्ही पका मामा म्हणायचो त्याला बोलावून घेतलं . आई-काका , ज्योती व पकामामा शेतात रहायचे . आमची शाळा होती त्यामुळे तायडी मायडी व मी गावात रहायचो . आक्की बार्शीला होती व तायडीची नुकतीच दहावी पुर्ण झाली होती त्यामुळे ती घरीच होती . मला आईबरोबर जायचं असायचं पण शाळा होती त्यामुळे जाता येत नसे तेव्हा तायडीने मला खूप जीव लावला होता . आईला जवळजवळ तीन आठवडे महिनाभर शेतात रहावे लागणार होते . सगळे बाडबिस्तार घेऊन बिऱ्हाड शेतात रहायला गेलं . खूप पाहुणे गुऱ्हाळ पहायला यायचे पर्यायांने जेवायला असायचे . आईला भरपूर स्वयंपाक करावा लागायचा . तसच गुऱ्हाळाकडे पण लक्ष द्यावं लागायचं . काका सकाळी लवकर उठून सगळी गुऱ्हाळाची व्यवस्था लावायचे व जेवण करुन ते आॕफिससाठी जवळ्याला जायचे व येताना किंवा जाताना गावात येऊन जायचे . तिकडे आधी ऊस तोडणी मग ऊसाचा रस काढून भट्टीवर काईली भरल्या जायच्या मग भट्टी पेटायची त्याची काकवी , पाक मग पातळ गुळ तो मोठ्या हौदात बादल्यांत ओतून थंड झाल्यावर त्याच्या गुळाच्या ढेपा तयार व्हायच्या . हे रोज चालायचं पंचवीसतीस माणसं असायची कामावर . ती देखरेख पकामामा करायचा . भरपूर ढेपा तयार झाल्या की बैलगाडीतून वाड्यात आणून टाकायच्या व गुऱ्हाळ पुर्ण झाल्यावर ट्रकने गुळ सांगलीला पाठवायचा . हे केलेलं नियोजन व त्याप्रमाणे सगळं पार पडले आणि जबरदस्त फायदा झाला काकांना लोक बागायतदार म्हणू लागले .
ही गुऱ्हाळाची प्रक्रिया आम्हांला सुट्टीदिवशी पहायला मिळायची . शेतात म्हशी होत्या व दुधाचे गावात रतीब घालायला नाना गडी यायचा त्याच्याबरोबर त्याच्या सायकलवर बसून मी व मायडी आणि चालत तायडी असं सगळ्याजणी शेतात शनिवारी संध्याकाळी जायचे व सोमवारी सकाळी त्याच्या बरोबरच यायचे . गेलं की ज्योतीला कोण आनंद व्हायचा पुन्हा तिला काखोटीला मारुन शेतात हिंडायचं . पका मामा आम्हांला गुऱ्हाळावर न्यायचा तिथे पेपरवर डाळे व शेंगदाण्याच्या पाकळ्या पसरायचा व गुळ होत आलेल्या पाकात ऊसाचं कांड फिरवायचं आणि ते या डाळे शेंगदाण्यात फिरवायचा पाच मिनिटांत खुसखुशीत गुडदाणी तयार व्हायची . चुरमुरे परातीत ठेवायचे व त्याच्यावर कच्चा गरम पाक टाकून लाडू करायचे . त्यानंतर असे लाडू किंवा गुडदाणी आजतागायत मिळाली नाही . किटल्या भरुन ऊसाचा रस , काकवी गावात अनेक घरी पोहोच व्हायची . रसात कणीक भिजवून आई पोळ्या करायची . मस्त लागायचं . भन्नाट ते गुऱ्हाळ आणि रम्य ते बालपण !
शेजारीच सुका व आक्कू रहायचे . ती सकाळी उघड्यावर तीन दगडांची चूल मांडायची त्याच्यावर मीठ घालून पिवळ्या पिवळ्या मक्याच्या भाकरी व हरभऱ्याची भाजी करायची त्या भाकरी दुधाबरोबर फार मस्त लागायच्या . तीचा मुलगा श्रीराम पण त्याला शिरमा म्हणायचे सगळे . ज्योतीएवढा होता तर आई जे ज्योतीसाठी करायची ते त्याला द्यायची . ज्योती कोणाकडेही जायची त्यामुळे नाना आणि तात्या तिला खांद्यावर बसवायचे मी आणि मायडी त्यांच्याबरोबर चालत सगळ्या शेतात फिरायचो.
प्रकरण 8 वे
संसाराची चढती कमान
26 जुलै 2020
माझी आई , दिवस मावळतीकडं झुकू लागला तसं नुकत्याच हौसेनं शेतात नविन बांधलेल्या धाब्याच्या घरामागे हेलपाटे घालत होती . न राहून गावातून येणाऱ्या छोट्याशा रस्त्याकडे डोळे लावुन होती . ती काकांची वाट बघत होती . आज जरा लवकरच काका सकाळी सकाळी आईच्या हातचा घरच्या म्हशीचं दूध अन साजूक तुप घालुन केलेला शिरा खाऊन आधी गावात मग तिकडून तसंच जवळ्याला आॕफिसला जाऊन आज अमावस्या होती म्हणून म्हसोबाला जाऊन येताना मधल्या रस्त्याने शेताकडं येणार होते . काका शनिवार करायचे शनिवारी मारुतीला आणि आमावस्येला म्हसोबाला ते न चुकता जायचे . तसच गावात घराच्या पाठभींतीत असलेला नरसोबा व शेतातला म्हसोबा यांचीपण शनिवारी व अमावस्येला न चुकता पूजा नारळ ठरलेलं असायचं . अशी धावपळ करता यावी म्हणून काकांनी गाडी घेतली होती व ते गाडीवर गेले होते काका फार धावपळ करतात . नोकरी , शेतीचा हौसेनं वाढवलेला एवढा मोठा व्याप मग आई मात्र खमक्यापणानं त्यांच्या मागे उभी रहायची . पण काकांना यायला थोडा जरी उशीर झाला तरी तिच्या जिवाला चैन नसायची . पाच वाजले की तिचा जीव थाऱ्यावर नसे .
" गाडीवर गेलेत बाई , आडव्या तिडव्या रस्त्याने येतात , दिवसाबरोबर आलं म्हणजे बरं असतं बाई ! "
असं म्हणायची आणि यायची वेळ झाली की पाय धुवायला पाणी गरम करायला ठेवायची . आल्यावर मागेमागे असायची दिवसभराचा त्यांचा सगळा शीण निघून जाईल असं वातावरण असायचं .
तसं कायमचं वास्तव्य गावातल्या प्रसिद्ध कुलकर्णी वाड्यातच . सख्खी-चुलत अशी भावकीची पाच घर वाड्यात होती , छान एकोप्यानं रहात होती .पण शेताचा व्याप वाढला . सातत्याने नाविण्याची आस असलेला काकांचा स्वभाव . आणि खांद्याला खांदा लावुन काम करणे आणि जबरदस्त मानसिक बळ पुरवणं ही पहिल्यापासून आईची वृत्ती . एकमेकांना सतत पाठिंबा देणं , मदत करणं हा जणू त्यांच्या सुखी संसारातला अलिखीत नियमच होता . उत्साहानं अखंड वहाणारे झरेच होते ते !!!
काका नवनविन प्रयोग करत रहायचे अर्थातच उत्साहाने व खंबिरपणे आई पाठिशी उभी असायचीच . त्याचा उच्चांक म्हणजे यावर्षी ऊस , पाणी कमी पडतं म्हणून विहिर , खारंच पण भरपूर लागलेलं पाणी , जोमाने वाढलेला ऊस आणि मोठ्या धाडसानं घातलेला गुऱ्हाळाचा घाट . आता गुऱ्हाळ संपत आलं होतं . मग शेवटी शेवटी आईनं दोन्ही आत्यांना निरोप धाडला होता . पंढरपूरची नागर आत्या आणि सांगोल्याची तिनाबाई आत्या . विहिरीचं पाणी उजवणं होईल , गुऱ्हाळ बघतील चार दिवस रहातील आणि जातील . कित्येक पै-पाहूणे येऊन गेले त्यांच्याच बापाचं शेत आहे म्हणत पाणी उजवायचं ठरलं . निरोपासरशी भोळीभाबडी नागर आत्या व तीना आत्या उत्साहानं आल्या होत्या . मग आईनं पण दोघींना चोळी- बांगडी , बारीक चौखडा असलेल्या फिकट निळसर व गुलाबी रंगाची जरीकाठाची नऊवार लुगडी घेऊन पुरणावरणाचा स्वयंपाक केला व शेतातल्या बायकांना गुऱ्हाळावरच्या लोकांसकट सगाळ्यांना जेवणांसाठी मोठ्ठा हंडा भरुन गव्हाची खीर करायला सांगितले . जेवणाच्या पंगती उठल्या आणि मोठ्या उत्साहात पाणी उजवलं .
" लेकमाती समाधानी असावी
आशीर्वाद असतो "
असं आई म्हणायची . दोन्हीही आत्यांची लाडाची भावजय होती ती . मुळात आमच्या दोन्हीही आत्यांना भावाचाच फार अभिमान होता . सगळ्यात लहान भाऊ . सांगोलच्या आत्याची तर मुलगीसुद्धा काकांपेक्षा मोठी होती . त्यामुळे नात्याने भावजय असलेली सुलभा म्हणजे आई त्यांना मुलीसारखी वाटायची .
" आमचा भाऊ म्हणजे लाथ मारल तिथं पाणी काढल "
असा आहे म्हणायच्या . आणि शेतातली इतकी सुधारणा पाहून त्यांना धन्य धन्य वाटलं !!
आम्हांला पण नागर आत्या आली म्हणलं की खूप आनंद व्हायचा ज्या सिझनला त्या यायच्या त्या सिझनची पिशवी भरुन फळं घेऊन यायच्या . भुईमूगाच्या शेंगा ,तोतापूरी आंबे , मोठाली डाळींबं , बोर आणि त्याबरोबर खारेमुरे , लाल वाटाणे , कांड्या-बत्तासे , पंढरपूरी चुरमुरे असं भरगच्च सामान घेऊन आत्या व त्यांचे यजमान त्यांना आम्ही केसकर दादा म्हणायचो . तर ते दोघे जोडीनं यायचे . मग वाड्यातल्या प्रत्येक घरी त्याचं वाटप करायचं हा संध्याकाळचा अलिखीत नियम असायचा .
नागर आत्त्या खाण्याच्या वस्तूबरोबरच पोरींना बांगड्या , जाई काजळाची डबी तर शेवंतीच्या वेण्या व केवड्याचं कणीस ओल्या कपड्यात गुंडाळून हमखास आणायच्या . मग केवड्याची पिवळी धम्मक सुवासीक पानं आणि चमकी व गुलाबी सुपारीची फुलं घालून केलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या शेवंतीच्या वेण्या वाड्यात काकू व वहिनीला पोहोच व्हायच्या . आईसाठी मेण कुंकू पण आणायच्या . आई फार हौशी होती कुरळे असले तरी तिचे काळेभोर केस लांब होते . त्यामुळे तीचा मोठा आंबाडा असायचा . कुठेही गावाला जाऊन आली की त्या आंबाड्यावर मोगऱ्याचा गजरा किंवा शेवंतीची वेणी असायची . आमची चुलत आत्त्या म्हणजे सुशीला आत्त्या आईला जयश्री गडकर म्हणायच्या आईचा चेहरा बराचसा तसा दिसायचा . आणि मग चंद्रकांत-सुर्यकांत सारखा तरावट आमचा भाऊ आहे असं म्हणायच्या . एवढं कौतुक ऐकून आई पण मनोमन खुश व्हायची . सगळ्या नणंदा तिला चिडवायच्या
" आमचा भाऊ फिदा असतो तुझ्यावर "
एवढंच काय तिची जाऊ म्हणजे आमची प्रभा काकू पण म्हणायची
" भाऊजींना काही सांगाव लागत नाही , हौशी आहेत , लाडाची बायको आहेस . नशिबानं घ्याव लागतं बाई ".
पण खरंच काका एकटे जरी पंढरपूरला गेले तरी येतांना सुगंधीत टपोऱ्या मोगऱ्याचे गजरे व शेवंतीच्या वेण्या घेतल्याशिवाय येत नसत . मग आपण आणलेला गजरा किंवा वेणी बायको कशी माळते हे आगदी कौतुकाने पहायचे . आम्ही लहान होतो तरी त्यांची प्रेमाची भाषा आम्हांला समजायची . असं मुक्यांन डोळ्यांतून बोलते असं वाटायचं . घेरडीत फारसं काही मिळायचं नाही तसं छोटसं पण टुमदार असं गाव ते . त्यात चौसोपी चिरेबंदी असा आमचा मोठ्ठा वाडा , त्याला साजेसा चांगला आठ-नऊ फूट उंच पाच फूट रुंद असा दरवाजा त्याला जाड लाकडी दरवाजे , पितळी कड्या , कोयंडे ,आऱ्या आतून लावायला जाड आढू . असा सरंजामी थाट होता त्या वाड्याचा ! आतमध्ये तीन बाजूंनी घरं होती . उंच पायऱ्या चढून घरात जाव लागे . मध्ये मोठ्ठ आंगण . उन्हाळ्यात दुपारी नंबरनी पापड्या कुरवड्याची वाळवणं असायची . तर रात्री सगळ्यांची आंथरुणं यायची . रात्री कसलं आंधार पडू लागला की जागा पकडण्यासाठी स्पर्धा असायची . मग गप्पा , गाणी , भेंड्या , गोष्टी रंगायच्या . त्याच आंगणात पावसाळ्यात पाऊस पडला की पाणी वाहायला लागायचं आपापल्या घरातून आम्ही भावंड त्यात कागदी होड्या सोडायचो त्या धडकल्या की जोरात कल्ला करायचा . रोज संध्याकाळी सगळ्या काकू , वहिनी , बहिणी कुणी पायरीवर कुणी आंगणात मध्ये येऊन ताजी ताजी आणलेली भाजी उद्यासाठी निवडत बसायच्या . आम्हा भावंडांचा खेळ चालू असायचा वयाप्रमाणे पकडापकडी , जिबल्या , विटी-दांडू , फुगड्या झिम्मा काहीही आसायचं .
त्याची एक जबरदस्त आठवण आहे आम्ही बहिणी जिबल्या वाड्याबाहेर केव्हाही खेळायचो . आईने मला दुकानातून काहीतरी आणायला सांगितले व चार आणे दिले . सव्वा वर्षाच्या ज्योतीला कडेवर घेऊन मी निघाले . बाहेर पोरींचा जिबल्यांचा खेळ रंगाला होता . मी एक डाव त्यांना मागितला व त्यांनी दिल्यावर जवळच्या कट्ट्यावर ज्योतीला बसवलं , ती खाली उतरायला तयार होईना म्हणून तिला पैसा फिरवून दाखवला ती नादाला लागली आणि मी खेळू लागले . पटकन तिने पैसा तोंडात घातला आणि बघता बघता तो तिच्या घशात अडकला आणि आमच्या तोंडचं पाणी पळालं . काय करावे समजेना आईकडे जायची हिंम्मत होईना . शेवटी विद्या म्हणजे माझी चुलत बहिण ओरडली
" शरे , पटकन घरी घेऊन चल काकूकडे , हिच्या नरड्यात आडकलेत पैशे ".
भीतभीत सगळं लटांबर घरी आईला हाक मारतच आलो आणि आईला काय झाल ते सांगितलं . आईने पटकन तीला हातावर पालथं करुन मानेवर हलक्या बुक्क्या मारल्या तसा पैसा तोंडातून बाहेर पडला आणि माझा जीव भांड्यात पडला . पुन्हा मात्र पैसा तिच्या हातात कसा गेला याची उलटतपासणी करतांना आईने माझी किती धुलाई केली हे सांगायला नको !
आम्ही खेळतांना पण भावंडामध्ये मधूनच भांडणं व्हायची कधी-कधी आईपर्यंत पण जायची ती भांडणं मग खटके उडायचे एकदोन दिवस अबोला की पुन्हा बट्टी व्हायची पण घरात कोणीच बसत नसे . गोकूळंच होतं तो वाडा म्हणजे . 17-18 मोठी माणसं आणि 25-30 मुल-मुली ( 7/8 मुलं बाकी सगळ्या मुली ) अशी 50 तरी माणसं होतीच वाड्यात . घेरडीकरांकडे मुलींच प्रमाण त्यामानाने जास्त आहे . प्रत्येक घरी तीनचार मुली व एखादा मुलगा असे . त्यामुळे मुलांच जरा आप्रुपच होतं . वाड्याच्या मागे मशिद होती बरोबर तिन्हीसांजेला मोठ्या आवाजात नमाज पढला जायचा . मग
"अल्ला ओरडला दिवा लावा "
म्हणत आम्ही पोरी दिवा लावायला पळायचो मग सगळ्यांनी एकमेकींना कुंकू लावून घरात यायचं अशी संस्कृती व दिनक्रम असायचा .
वाड्याच्या बाहेर आलं की दोन्ही बाजूला बांगड्याचा धंदा कराणारी 7/8 घरं असलेला एक बोळ ओलांडला की मुख्य रस्ता यायचा डावीकडे चौथीपर्यंत मुलींची शाळा त्याला लागून दहावीपर्यंतचं हायस्कूल . समोर वरलीकडची गल्ली . व मागे खाल्लीकडची गल्ली . त्या रस्त्यावर उजवीकडे वळलं की किराण्याची दोनचार दुकानं , मग रेशनचं दुकान , एकदोन कपड्याची दुकानं , एकच दवाखाना , सायकलचं दुकान , एखादा टेलर , एकदोन स्टेशनरी , एकच बँक अशी भरगच्च भरलेली बाजारपेठ असलेला तो रस्ता . तो रस्ता तसाच पुढे एस. टी. स्टँडकडे जायचा पेठ संपली की वेशीचा उतार लागायचा . वेशीतच उजव्या बाजूला काळ्याभोर चिरेबंदी दगडाचं मोठ्ठ मारुतीचं देऊळ . 4/5 पायऱ्या चढल्या की दोन्ही बाजूला कट्टे व डाव्या बाजूला चावडी वर ग्रामपंचाईतचं आॕफिस थोडसं पुढे पोलिस चौकी समोर मोठ्ठ मैदान तिथं गावातली मुलं हॉलीबॉल खेळायची . त्याच मैदानावर सोमवारी आठवडा बाजार भरायचा . स्टँडवर तर गाव संपला ! चावडी आणि मारुतीच्या कट्ट्यावर चार वाजल्यापासून पुरुषमंडळी जमायची येणंजाणं अशी गजबज रात्री नऊपर्यंत असायची .
महाशिवरात्र आता तोंडावर आली होती . गुऱ्हाळा पण संपलं होत मग सगळं बाडबिस्तार घेऊन जवळजवळ महिनाभरानी आई गावात आली . त्यावेळी आमच्या चुलत आत्या म्हणजे सुशिला आत्या त्यापण पंढरपूरहून घेरडीला आल्या होत्या . कोणाकडेही पाहूणे आले की चहानाष्ट्याला वाड्यात प्रत्येकाने बोलवायची पद्धत होती . आमच्याकडे तीना आत्या , नागर आत्या होत्या म्हणून आईने दुपारीच सुशीला आत्याला जेवायला बोलावलं आणि या सगळ्या बहिणी आहेत म्हणून गावातल्या ताई आत्यांना पण आईंने बोलवलं होतं . त्या थोड्याशा फटकळ होत्या . जेवणं झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले . काकांच्या धडाडीचं तोंडभर कौतुक चाललं होतं .
" कसलं धाडस करतो भाऊ , त्याचं बघून मागेमागे गावातले लोक करतात . गावात मानतात लोक त्याला , दबदबा आहे . भाऊ खोऱ्यांन पैसे ओढतोय पण ..."
बोलत बोलत विषय मुळ मुद्द्यावर आला .तो म्हणजे मुलगा !!
सुशिला आत्या चिडवत चिडवत मला म्हणाल्या
" काय गं , तुझ्या आईला सगाळ्या मुलीच आहेत , तुला दुसरी आई आणायची का मग तिला मुलगा होईल . "
आणि मग ताई आत्या व सुशीला आत्या यांनी बरीच चेष्टा सुरु केली , आळीपाळीने बोलत राहिल्या . आठ-नऊ वर्षाची मी मला ते सहन झालं नाही रडून गोंधळ केला , घर डोक्यावर घेतलं . आमच्या आत्या काही बोलल्या नाहीत पण होईल की अजून मुलगा , काय होणार नाही का , म्हातारे झालेत का ते ? असा त्यांचा सूर निघू लागला . त्या दोन्ही आत्या त्यांच्या घरी गेल्या . काकांनी तो विषय तिथेच सोडला पण आई जरा गंभीर झाली व अगदी शांतपणे काकांना म्हणाली
" सगळ्यांना वाटतं आपल्याला मुलगा नाही . बाकीचे दबक्या आवाजात बोलतात या स्पष्ट बोलल्या एवढंच . बघा विचार करा तुम्हाला करायचं असेल दुसरं लग्न तर माझी काहीच हरकत नाही संमती आहे माझी ".
आता मात्र काकापण गंभीर झाले व बोलले
" आत्ता बोललीस ते बोललीस यानंतर कधीही पुन्हा असं बोलायचं नाही .आपल्याला पाच मुली आहेत त्याच आपली मुलं आहेत . इथून पुढे मुलबाळ झालं किंवा नाही झालं तरी हरकत नाही . हा विषय पुन्हा निघणार नाही ."
त्यादिवशी आईला पण भरपूर मानसिक त्रास झाला . भावनावश झाली होती . पण काका ठाम होते मग आता तिनेही खंबीरपणे बोलायचं असे मनाशी ठरवले . तिच्या डोळ्यांत चमक दिसू लागली . पण कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया काही झाली नव्हती .
No comments:
Post a Comment