Wednesday, September 2, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 5

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 5



भाग 21 ते 25




क्रमशः भाग 21

कोरोना आणि सौ. ज्योती व श्री मुकुंद घळसासी यांच्या लग्नाचा  रौप्य महोत्सव !!


  
         बार्शीला खूप वर्षांनी यावर्षी मृग नक्षत्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात  पावसाला सुरुवात झाली . आणि जीवाची काहिली काहीशी शमली . सगळीकडे वातावरणात सुखद गारवा जाणवतोय . उन्हाळ्याच्या  कडाक्याने तप्त झालेली धरणीमाता तृप्त झाली 8/10 दिवसांत लगेचच सगळीकडे हिरवळ दिसू लागली . निसर्गाची कीमया ! मनाला व तनाला पण अल्हाददायक वाटते आहे . कोरोनाचा प्रभाव अजून कमी झालेला नाही उलट वाढलाच आहे . पण जनजिवन सुरळीत होऊ पहातय . पुणे-मुंबई , सोलापूर , औरंगाबाद याठिकाणी तर संख्या वाढतेच आहे . अधुनमधुन बार्शीत पण रुग्ण सापडतात पण प्रमाण कमी आहे . पण लोक हळुहळु कोरोनासह जगण्याचा प्रयत्न करत आहेत .
          आज 22 जून 2020 !! सौ. ज्योतीच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस !! 
कोरोनाच्या वैश्वीक संकटाचे सावट असताना हा समारंभ कसा करायचा आणि करायचा नाही हे तर कोणालाच मान्य नव्हते . कीर्तीला हे सगळे नविन होतं . फॕमिली प्रोग्रामचं ती ऐकून होती तशी वाट पण पहात होती . काय करावे हा तर यक्षप्रश्न होता त्यातूनच 
 "  ई-सेलीब्रेशनची "
 कल्पना उदयाला आली . ठीक आहे 
" ना मामुसे नकटा मामू अच्छा "
असे म्हणत सुरुवात केली आणि पत्र , कविता , गाणी , किस्से कोणी audio तर कोणी video  अक्षरशः पाऊस पडला . अगदी इनिकापासून एमबीके भाऊजींपर्यंत सगळे तर मोहन आण्णाची आख्खी फॕमिली , गोविंद काका आणि ज्यांचाशी संपर्क होऊ शकला त्या तिच्या खास मैत्रिणी !  प्रत्येकाने आपल्याआपल्या खास  शैलीत अगदी मनापासून सहभाग नोंदवला आणि एकसे बढकर एक अशा कलाकृती उदयाला आल्या . मन भरुन आलं प्रसन्न वाटले !!!
 त्यासाठी प्रत्येकाला संपर्क करणे  आणि त्यांच्या कडून audio , video आल्यानंतर आकांक्षा-कीर्तीने ते एडीट करणे बरोबर एकत्र करणे असा 10/12 दिवस हा कार्यक्रम चालला . सगळ्यांचे मिळून 
पुर्वरंग 45 मिनीट
उत्तररंग 56 मिनीट
असा पावणेदोन तासांचा video तयार झाला . नंतर त्याची लींक तयार होईपर्यंत नेट प्राॕब्लेममुळे होणाऱ्या गंमतीजमती , धडपड मला जवळून पहाता आली . लहानपणी खेळात आपण पत्त्याचा बंगला करायचो,  उंचउंच करत जायचं आणि शेवटचं पान लावायला गेल की सगळं कोसळायचं तसं नेटमुळे आपलोडींग  98% पर्यंत जायचं गोलगोल होत  पुन्हा बंद पडायचं पुन्हा उद्याच्या रात्रीची वाट पहायची असं काहीस होत होत . शेवटी ते पुर्ण झालं आणि हुश्श्य झालं . कारण ते वेळेत पुर्ण होऊन 2/3दिवस आधी यदुकडे  पोहोचणे आवश्यक होते . ते पोहोचले शेवटी यदुकडे . ती पण एक वेगळीच मजा . तो पहिल्यांदा काही होणार नाही म्हणून नाराज होता पत्राच बोलल्यावर त्यांन काय होणार पण असं जरा नाखुषीतच बोलला पण जसजसा यात रंग भरु लागला तसा तो पण खुष झाला आणि एकएक video टाकालला लागल्यावर मात्र त्याचा मुड बदलला . ए कडक आहे मावशी असे मेसेजेस येऊ लागले . भन्नाट होणार म्हणत त्यांने जे लोक माझ्याशी संपर्क करु शकले नाहीत त्यांना सामावुन घेण्यासाठी मोठी कामगीरी केली . हे सगळं करत आसतांना त्याची फार पंचाईत व्हायची आई-बाबा समोर असायचे आणि कोणाचातरी फोन यायचा त्याला बोलता यायचं नाही . त्यांना काही कळू द्यायचं नाही लपवत लपवत करायचं . हे करत असताना माझा फोन गेला आई बाबा समोर असले की त्याची तारांबळ उडायची . पण लींक पाहून तो जाम एक्साईट झाला होता . प्रोजेक्टर , केक , झुम मीटींग हे अगदी लपत छपत छान मॕनेज केलं त्यांने . 
आमची तयार झालेली लींक आम्ही 20 ला ग्रुपवर टाकली . ते दोघं सोडता सगळ्यांनी पाहिली . 21 तारखेला रात्री 9.30 ला त्यांना हा video यज्ञेश दाखवणार व 11.45 वाजता तो प्रोजेक्टर लाऊन गुगल मीट अॕरेंज करणार व केक कापायला लावणार असा ग्रुपवर कल्ला 20 ला रात्री सुरु झाला . बोलत बोलत 21 च्या मीटची trial 20 ला घ्यायचं ठरलं सगळे join पण झाले . पण आई-बाबा समोर होते त्याला join होता आल नाही . पण 21 ला रात्री मात्र सगळे ठारल्याप्रमाणे पार पडले . सगळं पहाताना त्या दोघांना सुखद धक्के बसत होते . आनंद , हळवेपणा , कौतुक , आठवणी , निशब्दपणा अशा संमिश्र भावनांचा मिलाप होता तो . अशा सप्तरंगी भावनानी 22 तारखेची सुरुवात होणं सुख म्हणजे यापेक्षा निराळं ते काय असतं ? पण हे करत असताना आम्हांला पण एक प्रकारे समाधान लाभले की चला काहीतरी छान झालं हे नक्की . नाही नाही म्हणत एक गोड असा अविस्मरणीय समारंभ झाला . हे होत असतांना प्रत्येकाचा माझ्याशी संपर्क झाला . आणि प्रत्येकाच्या ज्योती विषयीच्या  भावना मला ऐकायला मिळाल्या . 
          ज्योती माझ्यापेक्षा चांगली साडेसात वर्षांनी लहान आहे . पण आमच्या कुटुंबात सगळ्यात मोठ्ठ म्हणजे तायडीपेक्षा पण मोठ्ठ जर  कोण असेल तर ती ज्योती आणि सगळ्यात लहान म्हणजे संजूपेक्षा पण लहान जर कोण असेल  तर ती पण  ज्योतीच अशी ही 
 "आडवा दांडू " 
म्हणजे आमची ज्योती . मी तिला कालच्या पत्रात सांगितले आहे की माझ्या ढीगभर आठवणी आहेत म्हणून . पण सगळ्याच थोडीच आपण सांगू शकतो ? तर नाही . पण काल प्रत्येकाकडून तिच्याविषयी एक कॉमन फॕक्टर ऐकण्यात आला तो म्हणजे समोरच्याला मनापासून , जीव ओतून करणे  व सढळपणे , आनंदाने  खाऊ घालणे ,  तृप्त करणे . आणि तो सढळपणाचा  व अन्नपुर्णेचा गुण तिच्यात आई-काकांनी ओतप्रोत भरुन दिलाय . लहानपणी तर आई म्हणायची  " हीच्या मुठी चौड्यावर आसतात " .
       सुगरणपणा तिच्याकडे वारसाहक्काने आलाय . पण तिची एक खास शैली आहे .  पाककलेचा तसा तिला कधी प्रयोग करुन पहावा लागला नाही . केलं की हमखास जमलेच !  असंच आहे तिचे लहानपणापासून . मला एक किस्सा आठवतो . आमच्या घरी धुण्याभांड्याला बाई होती  .  ज्योती 7/8 वर्षाची असतांना घरात आई , मायडी व मी मोठे असल्यामुळे स्वयंपाकाच तसं तिच्यापर्यंत येत नसे तर ही हीची कामाची हौस तिच्या पिंकी नावाच्या मैत्रिणीच्या घरी पुर्ण करुन घ्यायची . पिंकीची आई नोकरीमुळे घरी नसायची त्यांच्या  बाईने सुट्टी घेतली की  ही जाऊन स्वयंपाकात आणि अगदी भांडी घासण्यात सुद्धा पिंकीला मदत करायची . मी तिला पकडून आणले की आईचा  मार मिळायचा . अशी गम्मत व्हायची . पुरणपोळी करायलासुद्धा ती लग्नालापुर्वीच शिकली . 
" दांडगा सोस आहे ज्योतीला "
असे आई कौतुकाने सांगायची 
ती पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर शिवण शिकतांना तिला साधे कापड चालायचे नाही डायरेक्ट भारी कपड्यांवर प्रयोग करायला तिला आवडायचे आणि ते खासच व्हायचं . असा तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे . ती शिवायला लागल्यापासून माझे ड्रेस शिवणेच नाही तर कपडा पसंती पण तिची असते. तिने खास शिवलेले ड्रेस , ब्लाऊज घालून माझ्या मैत्रिणींमध्ये भाव मारायला मला खूप आवडते . कपड्यांच्या बाबतीत मात्र तिने मला अपडेट ठेवले आहे . मनिषच्या साखारपुड्यात , लग्नात तर आहाहा...... सातत्याने नाविण्याचा शोध घेत असते ती . तशी शिवणाची घरातून सुरुवात मग 
" मिनाक्षी क्रीएशन "
 या  फर्मचं रजिस्ट्रेशन आणि 6 मे 2011  रोजी अक्षयतृतियेच्या शुभमुहुर्तावर नव-याच्या भक्कम पाठिंब्यातून उद्घाटन सोहळा ! त्यासाठी मला आईला घेऊन जाण्याचा योग आला तर कोण आनंद झाला होता तिला . काका,  नाना , सासुबाई हे तिघे  तर हयात नाहीत किमान आईने तरी हा क्षण पहावा ही तिची तळमळ होती . त्यावेळी तायडीकडे चिनूची मुंज होती तर मायडीकडे पृथाचं बाळंतपण होतं . मी डायरेक्ट कोल्हापूरहून आईला घेऊन पुण्याला गेले तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . आणि घरापासून व्यवसायाला सुरुवात करत सिंहगड रोडला दुसरी शाखा उघडण्यापर्यंतच्या यशस्वी वाटचाल जवळून  पहाणारी मी  साक्षीदार आहे . तिचा मुळ स्वभाव लाघवी , धाडसी आणि निर्मळ मनोवृत्ती मुख्य म्हणजे आई-काका , आई-नाना यांची पुण्याई , आशीर्वाद व महाराजांच्या कृपाशीर्वादांने यशाचे शिखर गाठले आहे . ही घोडदौड अशीच पुढे चालू रहाणार कारण त्यांच्या कुटुंबाचे कष्ट तर आहेतच पण नातेवाईक व स्नेही मंडळीच्या मनापासून शुभेच्छा व आशीर्वाद आहेत  की जे  फार कमी जणांना मिळतात . मोबदला तर सगळेच घेतात पण सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणं हेही फार कमी जणांना जमतं आणि त्याबाबतीत ती जागरुक आहे . 
       तिचं लग्न झाल्यानंतर मायडी म्हणाली तसं वयोमानामुळे आई-काका हळवे झाले होते . वारंवार त्यांना दवाखाना लागत आसे . काकांना  पेस मेकर बसवाव लागले होते . त्याकाळात या दोघांचीही कामगीरी खूप मोलाची ठरली . 
       तसं मला स्वतःला घळसासी कुटुंबाकडून अनेकवेळा सहकार्य झाले आहे . मी बार्शीत आणि मुलांच्या शिक्षणासाठी ,  नोकरीसाठी पुण्याला पर्याय नव्हता . मग अगदी पुण्यात फ्लॕट घ्यायचा तर लोकेशन शोधण्यापासून खरेदी पुर्ण होईपर्यंत त्यांचा सिंहाचा वाटा . पुढे मनिष आणि आकांक्षा दोघेही आकरावीतच पुण्यात गेले अनेकवेळा अनेक प्रसंग अचानक आले . सण आहे , आजारपण आहे , काही अडचण आहे तर अश्वासक म्हणून पहिले नाव डोक्यात येणार ते ज्योती मावशी , मुकुंद काका . मुलांना तत्क्षणी आईइतकाच आधार जर कोणाचा वाटला असेल तर तो ज्योती मावशीचाच होता . आणि 250 किलोमीटर वरुन आत्ता जवळ  ज्योती आहे न मग काळजी नाही असे वाटून मी आश्वस्त झाले आहे . 
आपल्या अंतर्मनातल समजतं अशा काही मोजक्या व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तसे नाते माझे व ज्योतीचे आहे .तिच्याविषयी असं खूप जणांना वाटतं हेही एक विशेष आहे . खूप वेळा ब-याच दिवसांनी भेटलो तर अगदी पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो असतो . आणि खूप दिवस भेट झाली नाही तर फोनवर एकमेकींच्या मनातलं आम्ही ओळखलेलं असते .
आमचा कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असेल तर सगळी भाचे कंपनी ज्योती मावशीची अतुरतेने वाट पहात असतात . डिझाईनर म्हणून तर आहेच पण ओसंडून वहाणारा उत्साह जो आहे तो ती आल्याशिवाय पुर्णत्वाला जात नाही व कार्यक्रमाची शोभा वाढत नाही . तिच्या स्वभावात निरागसता , मोकळेपणा , प्रेम , आपुलकी आणि भक्ती आहे . त्यामुळे ती हक्क गाजवून सगळ्यांशी बोलते . तिच्या बुटीकमध्ये व घरी पण व्यवसायानिमित्त कामासाठी अनेक मुली आहेत . प्रत्येकीशी कामाव्यतीरीक्त हीचं प्रेमाचं स्वतंत्र नात आहे . स्वच्छ मनानं जवळीक असते . नविन पहाणाराला ही किती ओरडते आसं वाटू शकत पण ते तिचे गाढवी प्रेम असतं .  
        अध्यात्मवादी वृत्ती तसंच भक्तीरसात चिंब होणं हे वयाच्या मानाने तिला लवकर साध्य झालं आहे . कदाचित ही देणगी तिला आईकडून मिळाली असावी . देवळात नमस्कार केल्यानंतर मुर्तीच्या पायावरची फुलं जरी ओटीत मिळाली तरी त्याच्याकडे आतिशय तल्लीन होऊन पहाणे जसं की देवच तिच्या भेटीला आला आहे . हा तिचा भक्तीभाव ! साधी श्रावणातील शुक्रवारची  सवाष्णसुद्धा जेवायला घालण्याची तिची पद्धत हटके आहे . महालक्ष्मीचा सण तर तिच्याकडे मोठा उत्सव असतो . सगळे नातेवाईक स्नेही जमतात . नेहमी काही न काही चालू असते तिच्याकडे . मोठ्या हाताची म्हणतो आम्ही तिला .
      या तिच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्ताने गेले दीडदोन महिने मन तिच्याभोवती रुंजी घालत होत . अनेक प्रसंग आठवतात . ही भावना माझीच  नव्हे तर सगळ्यांचीच आहे . आता वाटतंय काही कार्यक्रम झाला असता तर सगळे एकत्र भेटलो असतो . पण प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना तशाच मनात  राहिल्या असत्या त्याच काय ? का असेना या निमित्ताने खोलवर निरिक्षण तरी करता आले . तिच्याविषयी व्यक्त होता आलं हेही नसे थोडे ! 
तीने जपलेलं तिच्या स्वभावतील  बालपण आणि सद्सद्विवेकबुद्धी  अबाधीत राहो . पुनश्च एकवेळ त्या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा !!

तुझी शरु ताई



क्रमशः  भाग 22

     ज्योतीच्या लग्नच्या रौप्यमहोत्सवाच ई-सेलीब्रेशन   तिच्या घरी ते तिघेच असतांना अगदी दणक्यात झाला . जणूकाही सगळेजण आवतीभोवती वावरताहेत अशा भावना त्यांच्या होत होत्या . जसं काही एखाद कार्यच मोठ्या धामधुमीत झालं अशी अवस्था सगळ्यांची झाली . आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात होतोच . तसं ई-सेलीब्रेशन हा आमच्या कुटुंबातील पहिला प्रयोग होता . त्यामुळे नवलाई , कुतुहल , उत्सुकता आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की 
" माझं प्रेझेंटेशन कसं झालं "
कारण मोबाईच्या का असेना पण  कॕमे-यासमोरचा प्रत्येकाचा हा पहिला परफॉर्मन्स होता की जो अनेकजण पहाणार होते . त्यामुळे दीड-दोन महिन्यापासून बहुचर्चित असलेल्या विषयाला फुलस्टाॕप मिळाला . फुलस्टाॕप कसला आता
 " आपण कसलं भारी केलं "
या आनंदात पुन्हा चर्चांना उधाण आलं . हे करत असतांना काही वेळेस झोप लागली नाही . 
      विशेष म्हणजे 21 तारखेला तर रात्री 2 वाजेपर्यंत अगदी इनिका , आराध्य अवनी ही छोटीशी मुलं सुद्धा जागी होती , गुगल मीटला जॉईन झाली होती . 21 ला रात्री सगळे दमून झोपले तर उत्सवमुर्ती बरोबर सगळ्यांना कार्य झाल्यावर लागतात तशा मांडवझळा लागल्या होत्या . 
       यदुने  आधी 15/16 तारखेला  video ची trial घेतली . त्याला ते खूपच आवडलं . हे सगळ इतकं उत्साहात होतय म्हणल्यावर त्याला पण खूपच  हुरुप आला होता . 21 च मॕनेजमेंट त्यांन भन्नाट केलं होतं त्यांने आई-बाबांना रात्री 8 वाजता आधी आवरुन बसायला लावले व प्रोजेक्टरवर दोन्हीही video दाखवले . अनपेक्षीतपणे video मधून जणू काही सगळेजण प्रत्यक्षात तिथे उपस्थित आहेत या आविर्भावात प्रत्येकाचे परफाॕरमन्स होत होते . एकामागोमाग एक सुखद धक्के बसत होते .याची सुरुवात स्वामीनी सिरियलच्या टायटल साँगवर त्यांच्या लग्नातील फोटोपासून दोघांच्याही आई-वडीलांसमवेत ते परवाच्या फोटोपर्यंत टाकलेले सुंदर दृश्य असे होते . ते पाहून दोघेपण  आवाक झाले . त्यांना खूप भावनावश व्हायला होत होतं . ज्योतीला आनंदाश्रु आवरण मुश्कील होत होतं .   ते सगळं  live आम्हांला यदु ग्रुपवर टाकत होता दोन तास हा video पहाण्याचा  प्रोग्राम चालला . नंतर त्यांची जेवणं  झाल्यावर केक कापायचा आता असे सांगून  त्यांना छान आवरुन बसायला लावले व 12 वाजता गुगल मीट सुरु झाले . हा आजून एक मोठ्ठा धक्का होता , छान आवरुन बसलेली डीझायनर जोडी व स्क्रीनवर सासर माहेरचे सगळे नातेवाईक मग केक कापणं , दोघांनाही छानपैकी  सील्व्हर एक आणि गोल्डन एक आसे क्राऊन .  हे सगळे अनुभवतांना त्या दोघांचीही अवास्था खुप भारावून गेल्यासारखी झाली होती , अजून यदुने बाबांच्या  कॉलेजमधल्या व वेगवेगळ्या मित्रांशी संपर्क केला होता . त्यांच्याकडूनही अशाच स्वरुपाचा प्रतिसाद मिळत गेला .रात्रीच्या एक दीड वाजेपर्यंत हेच चालू होते .
      तर दुसरे दिवशी  22 तारखेला घरी दुपारी यज्ञेशने राणी व त्रीशालाच्या मदतीने दोन्हीही बुटीकमधील स्टाफसाठी जेवणाची पार्टी मॕनेज केली होती . ज्योती व मुकुंद यांना  22 तारीख कशी उजाडली व आख्खा दिवस कसा संपला हे उमजत नव्हते . काय बोलाव हे त्यांना समजत नव्हते . आम्ही पण फोनवर फक्त शुभेच्छा दिल्या . जास्त बोलू नका असे सांगितले कारण ते तिला शक्य होत नव्हते .
         आज 26 तारीख आहे . सेलीब्रेशन होऊन 5/6 दिवस झाले तरी ज्योती आजून सेटल झाल्यासारखी वाटतच नव्हती . जवळजवळ रोज माझ बोलणं होत होतं . तिला या सगळ्याच खूप नवल , कुतुहल व कौतुक वाटत होतं . सहिजीकच आहे आमचं खलबत दोन महिने चालले होते व ही त्याची फलश्रुती होती आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं त्यापेक्षा तयार झालेली कलाकृती खूपच उंच गेली होती आम्हांला त्याचं आश्चर्य वाटत होत . ते तिला लगेचच पेलणं शक्य नव्हते . काल तिने तिच्या भावना लिहून मोठ्ठा मेसेज पाठवला आहे त्यात शेवटी
 " सध्या तरी आम्ही उभयतांनी सगाळ्यांच्या प्रेमाच्या ऋणात रहाण ठरवलं आहे "
असे लिहीले आहे तेव्हा कुठे तिला थोडंस शांत वाटतय म्हणते असो .
 याची मुळ कल्पना जरी माझी होती तरी त्याला कोंदण लावण्याची कामगीरी  सगळ्यांनी खूप छान पार पाडली  होती .  अनेक कल्पना मिळत गेल्या . मुख्य म्हणजे आकांक्षा ! सध्या लॉकडाऊनमुळे  सगळे घरीच . रोज रात्री यावर चर्चा व्हायची सगळ्यांकडून गोळा करणे त्याचा क्रम ठरवणे हे काम माझं तर पुढे एडीटींग करणे फोटो टाकणे हे काम आकांक्षाच त्यात तिला कीर्तीची खूप मदत होत होती अधूनमधून मनिष असायचा कसं दिसते हे बघायचं काम यांच असायचं मग चर्चा . आणि फोन व्हायचे  असा जुन्या नव्याचा छान मिलाफ झाला होता . जुन्या आठवणींना उधाण आलं  होतं .
" जुन ते सोनं " 
अशी अवस्था झाली होती पण प्रत्यक्ष कलाकृतीला मुर्त स्वरुप येण्यासाठी टेक्नाॕलाॕजीची पण तितकीच गरज होती आणि नवनवीन कल्पनांची व सहभागाची पण आवश्यकता होती . अगदी दोन वर्षाच्या इनिकापासून ते 68 वर्षाच्या एमबीके भाऊजीपर्यंत ! मग आम्ही 
" नव ते हवं " 
असे म्हणू लागलो .
" जुन ते सोनं न नवं ते हव " !
प्रत्यक्ष सहभागी कलाकारांचे अनुभव तर भन्नाटच आहेत . पाहूयात मग ते पुढच्या भागात ..



क्रमशः भाग 23

       ज्योतीच्या लग्नाच्या रौप्यमहोत्सवाच्या ई-सेलीब्रेशनची सुरुवात स्वामीनीच्या टायटल साँगने झाली नंतर संपुर्ण कार्यक्रमाचा घोषवारा असलेल माझं प्रास्ताविक झालं. माझं दोन्हीही शुटींग एकाचवेळी रविवारी केलं होत . आधी प्रास्तविक व नंतर पत्रवाचन तर दोन्हीही शुटींग मी हौसेनं वेगवेगळ्या साड्या नेसून केलं होत . कार्यक्रमाची सुरुवात
 यज्ञेशच्या 
बोलण्यांने करायची होती . त्यासाठी त्याचा  video हवा होता . तो काढायला पण त्याला खूप त्रास झाला . त्याला वाईट वाटायचं आई-बाबा विषयी बोलायचं म्हणून त्याला भरुन येत होत . कशीबशी थोडी तयारी केली तर आईबाबा घरात नसतांना  video काढायला काम करणा-या त्रीशालाची मदत घ्यावी लागली . त्यादरम्यान माझं त्याच्याशी video साठी  व इतर नियोजनासाठी फोनवर बोलणं व्हायचं . मी सारखी मागे लागते , आई-बाबा असतात , मला बोलता येत नाही आणि तू एकशे सत्तावन वेळा मला फोन करतेस  म्हणून तो चिडायचा . तर तू मेसेजेस बघत नाहीस फोन उचलत नाहीस मीस्ड कॉल बघून परत फोन करत नाहीस म्हणून मी चिडायचे . सगळं पुर्ण होईपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना त्रास पण खूप दिला व फिसफीस पण खूप केली पण मजा आली . 
आता तायडी
इकडे " जुनं ते सोनं " म्हणंत कार्यक्रमाची सुरुवात करायची होती . तायडीचं अगदी सुरुवातीला 
" पत्र लिहून काय वाढदिवस केल्याच समाधान मिळणार गं ,  उलट रडायचं काम होईल " 
असं चाललेलं . मी म्हणलं लिही तरी आधी , आणि मी माझं पत्र लिहून वाचतांना video काढून ग्रुपवर पाठवला . बाकी सगळ्यांना कल्पना आवडली होती .  मग तिने लिहिलीले पहिले पत्र मला पाठवले . नंतर तिचा हुंदके देत रडक्या आवाजातला  audio आला . तिला म्हणलं तू आता 3/4 वेळा वाचन कर म्हणजे पुन्हा रडायला येत नाही  .  मग औक्षणाचं ताट जवळ ठेव आणि पत्र वाचनाचा video पाठव  . तर बघते आता 2/3 दिवस थांब असे म्हणाली . आणि काहीतरी  गवसल्या सारखा  3/4 दिवसांनी तिचा मला  फोन आला व म्हणाली मला काहीतरी सुचतंय मी उद्या तुला पाठवते  . आणि लगेचच दुसरे दिवशी तिचा यात दाखवलेला फायनल video आला . 
         तो मी डाऊनलोड केला आणि पहायला लागले तर मला काही सुचेचना रडायला येऊ लागलं  . तायडी एकदम कलंदर अवलिया निघाली . मला तिला फोनच करता येईना . मला काय बोलाव सुचेना मग मी तीला फक्त whatsapp  मेसेजेस करत राहिले . तिला कसं हे सगळे सुचलं असे वाटू लागले . केसांना डाय केलेला , छानपैकी आवरुन जसे काही ज्योतीची पुर्ण फॕमिली समोर बसलीय असं समजून तिने  अगदी हसत हसत बोलत कुंकू लावून औक्षण केलं मग स्वतः केलेला केक कापला आणि मग गोविंद विडा दिला . अबब !!! काय भन्नाट कल्पना ! बघणारा तोंडात बोटच घालायचा . जसं काही नाटकात काम करणारी सराईत कलाकारच आहे ती ! असा सगळा सीन वाटला तो .
   त्यादरम्यान मायडीला फोन झाला तिला म्हणलं तायडी औक्षण करतेय तू बुके दे . लाॕकडाऊनमुळे बुकेचं सोड पण साधं फूल सुद्धा मिळत नाही  म्हणाली . पण काहीतरी दिव्य करुन तीने बुके मिळवला आणि मायडीने पण तोडीसतोड अगदी पीवर सील्कची साडी नेसून छानसा हिरॉईनसारखा  मेकअप करत लगबगीने तायडीला
 " झालं का ग तायडे तुझं " 
 असं विचारत जणू काही तिथे सगळा कार्यक्रम चालू आहे त्या आविर्भावात बुके हातात घेऊन  प्रवेश केला ते करत असतांना मंद आवाजात सनईचे सुर सुरु ठेवले होते जसं काही फंक्शन चालू आहे असा फील आला व पुढचा सीन अगदी त्याला साजेसा वटवला तिने ! हे पहात असताना काटाच आला अंगावर . काय म्हणावं या दोघींना असं वाटल . विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे या दोघीही दोघेदोघेच रहातात . त्यामुळे शुटींग करणे पाठवणे त्यांच त्यानींच केलं .
    पुन्हा यदुच्या  काका-काकूचे पत्र वाचन झाले काकांनी जुन्या आठावणींना उजाळा दिला तर काकू भरभरुन बोलल्या . नंतर  तायडी-भाऊजी , मायडी-भाऊजी , आंम्ही दोघे ओळीनं पत्र वाचन केले ब-यापैकी त्यांच्या जुन्या आठवणी शेअर केल्या मग संजू व पुरंदरेनी त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या . त्यांचा तो छोटासा video घ्यायला मला खूप मजा आली होती .  संजू पण जरीची साडी नेसून शुटींगसाठी मस्त आवरुन माझी वाट पहात बसली होती . नेहमीप्रमाणे तिचं पीनअप करुन दिल . मग शुटींग केलं. खूप आनंद झाला तिला पण . या शुटींगमध्ये सगळी पुरुष मंडळीसुद्धा छान आवरुन कपडे बदलून अगदी उत्साहानं सरसावून बसली होती .
       यानंतर ज्योतीच्या मैत्रिणींचा  भिशी ग्रुप होता . त्यात पण कोणी गाणं कोणी चारोळी कोणी पत्र तर कोणी कविता असं सादरीकरण करत तिच्या सुगरणपणाचं , लाघवी स्वभावाच तर लाड पुरवणारा मायाळू साथीदार म्हणत त्यांच पण खूप कौतूक केलं . विशेष म्हणजे त्या सगळ्याजणी पुण्यात होत्या तीला भेटल्यासुद्धा होत्या . पण कोणीच या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही . अगदी सिक्रेट ठेवलं .सख्ख्या मैत्रिणीच त्या !! त्यांना या सगळ्याचं भारी कौतूक वाटत होतं . मिनू भाग्यवान आहे म्हणायच्या . अगदी फोन करुन मेसेजेस करुन सगळी चौकशी करायच्या . झालं का ग ? आलं का सगळ्यांच ? कसली भारी कल्पना आहे . अशा चर्चा व्हायच्या .
         पुर्वरंग म्हणून पहिला भाग केलेला ब-यापैकी भावनीक , भूतकाळात , बालपणात रमायला लावणाऱ्या आठवणींनी खचाखच भरलेला होता . ते एकत्रित पहातांना त्या दोघांची पण अवस्था प्रेमात दबल्यासारखी झाली होती. निशब्द झाले होते ते .
       Video चा क्रमंच आम्ही असा लावला होता की सगळे बौद्धिक , हळवे प्रसंग पहिल्या भागात संपले होते . आता दुसरा भाग म्हणजे उत्तररंग सुरु झाला यामध्ये सगळ्या भाचे कंपनीने आपल्या जोडीदार व मुलांसह हजेरी लावली होती . एकदम हलकाफुलका , मजा , मस्ती , नाचगाणी असे त्याचे स्वरुप होते.
         याची सुरुवातच आकांक्षाने जसं काही TV वर अँकरींग करतो या अविर्भात केली . मिमीक्री नाच सगळं थोडक्यात पण फार मस्त केलं तिने .
लगेचच चिनू-ओजसने निलेश साबळे व भारत गणेशपूरे स्टाईलने एन्ट्री घेतली . त्यांच्या परफाॕर्मन्सने आवाक झाले सगळे . जसं काही 
"हवा येऊ द्या " 
ही सिरियल बघतोय असे वाटले . कधी स्वप्नातसुद्धा ही पोरं असं काही करतील असे वाटले नव्हते . अर्थात मंजूचं स्क्रीप्ट भारी होत . आणि आनंद यांचा फीनिशींग टच होता त्याला .
" आर. के'ज फॕमिली , घेरडी "
या वाक्याने भारावून सोडलं !!!
      मग आली 
"मो . गु'ज फॕमिली " !
उषा वहिनी व मोहन आण्णा (काका मोहन गुरुजी म्हणजे मो . गु . म्हणायचे ) यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचा वसा घेतलेली त्यांची तिन्ही मुलं अगदी उत्साहात सहकुटुंब सहभागी झाली .
      त्यांच्या ख-या नावापेक्षा चिमू बबलू छबलू या नावाने त्यांच्याशी बोलण्यात जास्त जवळीक वाटते ( तरी मोठे झाल्यापासून कान्हा मात्रा वेलांटी वापरत नाही ) आसो.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुरुवात झाल्यापासून मला चिमूचा खूपवेळा फोन झाला . तिला चैन पडायची नाही . मला यादरम्यात ती शाळेतली आठवली . माझं शेपूट आसायची  तेव्हा . तीचे पुर्ण कुटुंब चंदेरी  दुनियेशी निगडीत असल्याने तिचे पत्र व video पहिल्यांदा आला ! नंतर कलंदर अर्थातच बबलू ! कृतीकासह एकदम खुमासदार पद्धतीने त्याचं सादरीकरण झालं . तो ज्योती बरोबरचा असल्यामुळे लहानपणापासून त्यांची मस्ती चालायची . मग छबलूचा नंबर लागला तर एकट्या राखीने इतक्या गोड आवाजात वाचन केलं की ते ऐकतांना तिच्यातली आकाशवाणीतली निवेदिका डोकावत होती . ऐकणाराला  तिचं वाचन संपूच नये असंच वाटत होतं .
यानंतर वयाप्रमाणे काकांच्या नातवांडांचे नंबर लागले . पहिल्यांदा अंजू ! तिने मस्तपैकी आवरुन झाडाजवळ बसून ज्योतीबरोबरच्या  लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तर मंजू-आनंद जोडीने आठवणींबरोबर अगदी शेर-शायरी पेश केली . गायत्री तर म्हणाली मी 7/8  वेळा केलंय शुटींग बघ तिने पण भरपूर अठवणी सांगितल्या . पुन्हा आला मेधाचा नंबर . मास्तरीणबाई ! तिला सांगितलं सलग 45 मिनिटे नाही बोलायचं 5 मिनिटं वेळ दिलाय  . आधी मी बोलणार म्हणत अवानीने गोड शुभेच्छा दिल्या . मग मेधा तिची 4 मिनिटे संपली की अमोलनी माईकचा ताबा घेतला . मग लागला नंबर धनु आणि आमच्या थोरल्या सुनबाईंचा !  काय बोलावं समजत नाही म्हणत त्यांची कर्नाटक एक्सप्रेस धाडधाड सुटली . सगळ्यात जास्त वेळ या दोघांनी घेतला . खूप सा-या आठवणी अगदी आठवून आठवून सांगितल्या . मग एक छानसी कविता पृथाने सादर केली . नंतर आमचं पात्र म्हणजे दाक्षु 
"चाय चाय " 
करत आलं . ज्योतीच्या लग्नातले फार भन्नाट अनुभव सांगितले तिने . मग नंबर लागला आमच्या गँगचा . तिघांनी छानपैकी मैफिल भरवली ,  भारतीय बैठक मांडली त्यात सुरुवात कीर्ती
 " कार्यक्रमाचा मास्टर माईंड आमच्या आई  "
 म्हणत भाव खावुन गेली .  आशिषने मुकुंद काकांचे आवडतं गाणं " रुपास भाळलो मी " म्हणले तर त्याला ज्योती मावशीकडून उत्तर म्हणून आकांक्षाने 
"फुलले रे क्षण माझे " 
हे गीत सादर केले . आकांक्षाने अजून एक स्पेशल गीफ्ट तयार केले आहे ते म्हणजे त्या दोघांच एक सुंदर स्केच काढले आहे , ते प्रत्यक्ष भेटीत त्यांना ती देणार आहे .
     यानंतर बच्चे कंपनी सुरु झाली
पृथाच्या मुली आर्ता व ईभा यांनी गोड शुभेच्छा देऊन खूपच सुरेख डान्स केला . नंतर धनूच्या आराध्यचा नंबर लागला .  खूप बोलला तो . त्याच्या वयाच्या मानाने त्यांने खूप आठवणी सांगितल्या . त्याच्या हातात जादू आहे त्यांने खूप सुंदर चित्र काढलं होत या दोघांसाठी . आणि गोड शेवट दाक्षुच्या पील्लूने म्हणजे इनिकाने तिच्या डॕडीबरोबर डान्स करत शुभेच्छा दिल्या . पुर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत मेधा मॕडमनी समारोप केला .
      अशाप्रकारे भल्या मोठ्या कार्यक्रमाचे आम्ही नियोजन केले होते  . जवळजवळ दोन महिने गु-हाळ चालू होत . हसणं , रडणे , भावनावश होण अनेक प्रकारचे आविष्कार या कालावधीत पहायला मिळाले  आणि सगळ्यांसाठी कायमस्वरुपी लक्षात रहाणारी उत्कृष्ट  कलाकृती करायला मिळाली . मुख्य म्हणजे उत्सवमुर्ती बेहद्द खूष आहेत त्यामुळे सगळे सार्थक झाल्यासारखे वाटते .



क्रमशः भाग 24

    

सध्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मुडमध्ये असल्यामुळे ज्योतीच्या पाठोपाठ आलेला आमच्या लग्नाचा वाढदिवस पण वेगळ्या धाटणीत साजरा झाला .
 27 जून  ! 
आमच्या लग्नाला 31 वर्षे पुर्ण झाली . नेहमीच येतो मग पावसाळा म्हटल्याप्रमाणे एकामागून एक सहप्रवासाची 31 वर्षे पुर्ण झाली . यावर्षीचं विशेष म्हणजे वाढदिवसाला घरात मुलगा , नवी सुन , मुलगी असे नव्या दमाचे हौशी कलाकार  होते . उद्या या मुलांना बार्शीला येऊन 100 दिवस होतात . त्यामुळे वेगवेगळ्या सणांबरोबर वाढदिवस पण यादरम्यान साजरे होत आहेत . मग खाण्यात पण जास्त येतं . सध्या कॕलरीयुक्त जरा जास्तच खाल्ले जाते असे म्हणत आकांक्षा-कीर्तीने 20 दिवस झाले त्यांनी अगदी सिरियसली एक्सरसाईझला सुरुवात केलीय . मोबाईलवर बघत चालू असतं त्यांच . त्यांना 
"बेली फॕट " कमी करायचा आहे म्हणे . रोज अर्धा तास त्यांचा व्यायाम चालतो , घामाघूम होतात . मी सहज बघायला गेले या काय करतात तर मी त्यांना म्हणलं मला तर तुम्ही तुमचं शरीर गोधड्या बडवल्यासारखं करताय असं वाटतय . त्या हसायला लागल्या म्हणे
 " स्पाॕट रिडक्शन " 
होत नसतं म्हणून आसं करावे लागते . मला तर खरं ब्रम्हविद्या आणि योगा सुर्यनमस्कार  हे सगळे  प्रकार त्यामानाने चांगले वाटतात . पण त्यांना हे हवंय , पण पोट कमी करतांना गाल पण कमी झालेत त्यांचे . आधीच बारीक त्यात आणखी चपट्या दिसतात तर म्हणे वजन बघ अजिबात कमी नाही आम्ही फीट आहोत आम्हांला 
" आवर्स ग्लास फीगर "
करायची आहे . करा म्हणलं मग . पाहू किती दिवस करतात ते . कीर्तीला ब्रम्हविद्याचा क्लास करायचा आहे  सध्या  माझ्याबरोबर करते फ्रेश वाटतं म्हणून . एक बरं वाटलं की हल्लीची पीढी हेल्थ काॕन्शियस आहे . पाहू कितपत सातत्य ठेवतात ते .
        30 एप्रीलचा माझ्या वाढदिवसाचा केक बराच गाजला होता . पुन्हा एकवेळ रवा केक चांगला झाल्यावर वातावरण जरासं  थंड झालं होतं  .
         दरम्यान माझ्या बँकेतील ढाणकेंची सून आईस-केक शिकून आली होती . सध्या लॉकडाऊनमुळे ती घरगुती केकची आॕर्डर पण घेत होती एक दिवस त्यांनी सगळ्यांसाठी बँकेत पण केक आणला होता . खूप मस्त होता . मी विचारलं ती शिकवत का नाही तर म्हणाले आता खूप प्रॕक्टीस झाली आहे व नुकतेच क्लास घ्यायला तिने सुरुवात केली आहे . लगेच मी घरी मेसेज केला तर या दोघी आम्हांला शिकायचं म्हणून नाचायलाच लागल्या . दुसरे दिवशी शनिवार होता त्याच दिवशी मॕनेज केलं . कोरोनाचा प्रादुर्भाव आसल्याने अगदी सगळी काळजी घेत करण्याचं त्यांनी कबूल केलं . एक तर खूप दिवसांनी बाहेर जायला मिळणार होतं आणि आवडीचा मामला होता . त्या दुपारी 12 ला गेल्या मी पण संध्याकाळी 5 वाजता पहायला गेले  होते .  एका दिवसात पाच केक शिकून संध्याकाळी 7 वाजता या अगदी तरबेज झाल्याच्या आविर्भावात  घरी आल्या .आनंदी आनंद गडे !  मग चर्चांना उधाण आलं  जसं की पुण्यात गेलो की आपण नारायणबागेत आता केकच्या आॕर्डरस घ्यायच्या किंवा शनिवार-रविवार केक शिकवण्याचे क्लासेस घ्यायचे वगैरे वगैरे.......
      आता केक घरी करायचा तर साहित्य तर लागणार  मग एकदोन दिवसांनी 
" नालीसाठी घोडं खरेदी " 
मोहिम सुरु झाली . दुकानात शोधून शोधून बीटर , नोजल , पाईपींग बॕग्ज , पॕटल नाईफ , मेजरींग कप , स्पून्स , मोल्ड इत्यादी खरेदी अती उत्साहात झाली . तर प्रीमीक्स  व क्रीमसह सगळं साहित्यसुद्धा आणलं  .  हे सगळं आकांक्षाने बरोबर पप्पांच्या मागे भुंगा लावुन आणलं . तिचं ठरलं की ठरलं असं असतं पिच्छा सोडत नाही ती . मागे माझ्याकडे ओव्हन नव्हता तर तीनचार वर्षापुर्वी असंच आकांक्षा म्हणाली होती आपल्याकडे ओव्हन नाही म्हणून आपण केक करत नाहीत तर तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीने ओव्हन घ्यायला लावला होता पण ओव्हन बार्शीत ती पुण्यात पुन्हा केक मागेच पडला होता . आता आणखी हे साहित्य आलं घरात !
खरं तर पुर्वी केकचं घरी करण्याचं इतकं प्रस्थ नव्हतं . मग मी पण फारशी नादी लागले नव्हते . चायनीज पण मला फारसं जमत नाही . (मी पहिल्यापासून चीनच्या विरोधात आहे 🤪 ) . 
     मग एवढ सगळं आणून घरी मँगो केक केला मस्त झाला . मनसोक्त खाल्ला .  पोरींचा आत्मविश्वास वाढला !
आता लगेचच आला तो आमच्या लग्नाचा वाढदिवस ! आता ब-यापैकी सगळं मिळतंय या तीन महिन्यात खवा आणला नव्हता म्हणून आज गुलाबजामुनचा बेत होता . आमच्या फॕमिलीत माझे 
" लवंगाचे गुलाबजामुन " 
फारच प्रसिद्ध आहेत . त्याची एक वेगळीच कथा आहे . 2014 ला आमच्या लग्नाचा पंचवीसावा  वाढदिवस होता . त्याच वर्षी  28-29 जुनला आईचं पहिलं वर्षश्राद्ध होतं ते बार्शीत करायचं ठरलं . मी वाढदिवसाचं काहीही ठरवलं नव्हते . श्राद्धासाठी सगळे 28 ला पहाटे येणार होते पण सगळ्यांनी ठरवून मला कळू न देता 27 ला पहाटे 5 वाजता बुके घेऊन हजर झाले . तो दिवस पुर्ण आनंदानं साजरा केला व पुढे 2 दिवस श्राद्ध झालं . दुःखी रहाणे आईला आवडले असते का ? असे म्हणत सगळ्यांनी तो दिवस साजरा केला . सगळं मॕनेज केलं . तेव्हा सगळेजण माझ गुलाबजामुन खूप छान करते बार्शी स्पेशल  म्हणून कौतूक करत होते तर यांनी  आतिउत्साहात सगळ्यांची री ओढली होती व म्हणाले की
" हो हो तिचे गुलाबजामुन फारच मस्त होतात पाकात लवंग वगैरे घालून छान करते "
 सगळे कुजबुज करत माझ्याकडे पाहू लागले कसं काय ग गुलाबजामुन मध्ये लवंग  घालतेस . बुंदीच्या लाडूच्या पाकात घालतो आपण . हे काही नविन आहे का ? मी तर पुर्ण गोंधळून गेले की मी काही लवंग घालत नाही गुलाबजामुन मध्ये कशी लवंग चांगली लागेल ? हे काय यांनी सांगितलं बरं ? मग लक्षात आलं की बायकोचं कौतूक होतंय म्हणल्यावर अतिउत्साहात यांनी काहीतरी फेकली होती आणि मग एकच कल्ला झाला होता
 " लवंगाचे गुलाबजामुन " 
तेव्हापासून आमच्याकडे हा पदार्थ फेमस आहे .
मग आज पुरी , कुर्मा , गुलाबजामुन
काकडीची कोशिंबीर , कायरस आणि जोडीला 
चाॕकलेटचा केक !!! असा तो थाट होता . 
सगळा स्वयंपाक या दोघींनी केला मी फक्त गुलाबजामुन केले . मग छान आवरुन थोडंस फोटोसेशन झालं , ताटं सजवली केक कापला मग छानपैकी गप्पा मारत जेवणं झाली .



क्रमशः भाग 25


         मध्यंतरी कोरोना अनलाॕक सुरु झालं आणि आता ब-यापैकी व्यवहार सुरु होणार असं वाटू लागलं . कीर्तीला पण पुण्यात या असे सांगतील असे वाटू लागले  . एकदा पुण्यात गेली की मिरजेला जायचं पुन्हा अवघड पडेल म्हणून त्यांनी दोघांनी मिरजेला जाऊन यायचा प्लॕन केला . 1 जुलैनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन जायचं ठरलं . ब-याच दिवसांनी जायला मिळणार म्हणून कीर्ती एकदम खूष झाली .  लाॕकडाऊनमध्ये शिकलेल्या रेसीपीजमधलं आई-बाबांना काय काय करुन घालायचं याचे तिचे प्लॕन सुरु झाले . मधूनच आॕफिसमधुन कोणालातरी पुण्यात यायला सांगितलं जायचं . त्यामुळे पटकन मिरजेला जाऊन येऊ म्हणजे आल्यावर बोलावलं तर आंदाज घेऊन पुण्याला कधी जायचं हे ठरवता येईल असे वाटले  . पण 1 तारखेनंतर मिरजेत व बार्शीत कोरोनाचं प्रमाण वाढू लागला मग पुन्हा थोडंस थांबूनच जाऊ असे ठरले . दरम्यान 6/7 जुलैला केतकीला ईंटर्नशिपचा भाग म्हणून रत्नागिरी सिव्हिल हाॕस्पिटलला कोव्हीड ड्युटीसाठी जाव लागणार म्हणून समजले . तसं ती स्वतः एक्साईट झाली पण कीर्तीला थोडंस टेन्शन आले सहाजीकच आहे तिच्या आईबाबांना पण काळजी वाटणार न ! पण शेवटी तो तिच्या शिक्षणाचाच भाग आहे म्हणत सगळ्यांनी परिस्थितीचा स्विकार केला . काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचे म्हणत तिचे  काम सुरु झाले .
      आता 9 जुलै म्हणजे आई-काकांचा स्मृतीदिन ! आई-काका गेले म्हणजे माहेर संपलं असं होता कामा नये . तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला पाहिजे असे ठरवून 2014 पासून म्हणजे आईच्या  पहिल्या श्राद्धापासूनच आम्ही पंचकन्या कोणाही एकीकडे जमतो तो दिवस फक्त आम्ही पंचकन्या व आई-काकांच्या आठवणी यासाठी राखीव असतो .  पण यावेळी कोरोनामुळे यात खंड पडला . तरी आम्ही मात्र कान्फरन्स काॕलवर भेटलो बोललो मायडीने भजन म्हणलं . थोडक्यात समाधान मानावे लागले .
        आता 12 जुलै कीर्तीचा वाढदिवस ! ओघानेच तो बार्शीत साजरा झाला . गेल्या वर्षी लग्न ठरलेलं होतं आणि तिचा पंचवीसावा वाढदिवस होता . आकांक्षाने खूप मस्त प्लॕनिंग करुन पुण्यात सेलिब्रेशन केलं होतं . आता नविन-नविन काय काय फंडे आणावेत अशा आमच्या चर्चा सुरु झाल्या मग तिच्याचसमोर आम्ही उद्या गुलाबजामुन करु असे ठरविले व यावर्षी नविन म्हणजे नुकताच शिकलेला केक तर  होताच . पण तो आम्हांला सरप्राईज करायचा होता मग 11 तारखेला शानिवारी दुपारी आम्ही झोपण्याचा प्लाॕन केला व कीर्ती झोपल्यावर आकांक्षाने व मी गुपचूप चाॕकलेट केक बनवून ठेवला . याचा तिला काही पत्ता लागू दिला नाही . आशिषला सांगून मग रात्री बारा वाजता झोपेतुन उठवून तिला खाली आणले केक आणि आमच्याच बागेतील
"रेड रोज "
आशिषने सरप्राईज दिला मजा केली . दुसरे दिवशी मग दुपारी जेवणात गुलाबजामुन  व रात्री रगडा-पॕटीस झालं . नेहमीप्रमाणे फोटोसेशन झाले .     वाढदिवसाच्या स्पेशल ड्रेसची ज्योतीला आॕर्डर दिलींय . बहुतेक सगळे ड्रेस एकदमच घ्यायचे असं दिसतेय . या चार महिन्यात वाढदिवस पण पाठोपाठ येत आहेत त्यामुळे बहुतेक मनिषचा येणारा पण 
"लॉकडाऊन वाढदिवस "
 होणार का असे म्हणत सगळे हसत बसलो . 
       सध्या कोरोनाची परिस्थिती अगदी चिखलात रुतलेल्या चाकासारखी झालीय . कमी व्हायचं नावच नाही उलट प्रचंड वाढतच आहे . त्याला आता बार्शी पण अपवाद नाही . ओळखीतल्या लोकांविषयी समजलं की भिती वाटते .सध्या  कडक उपाय म्हणून 17 जुलै ते 27 जुलै बार्शी पुर्ण बंदचे आदेश निघाले आहेत . आता या दरम्यान श्रावण महिना सुरु होईल बाकी मोठं काही करता येणार नाही पण मंगळारीची पुजा घरच्याघरी करायची हे ठरवलं तसे काकी ,  प्रतिभा तर इकडे तायडी , मायडी , ज्योती , विहीणबाई सगळ्यांचे फोन झाले . मग मी पण 11 तारखेलाच सुट्टीदिवशी जाऊन मंगळागौर , वाती व बाकीचं सामान आणून ठेवलंय . कारण यावेळी नुसतं लॉकडाऊन नसून  कर्फ्यु आहे फक्त दुध व औषधे मिळणार त्यामुळे मोठी नसली तरी व्यवस्थित पूजा तरी करता यावी हा उद्देश . 
          18 जुलै आज शनिवार होता ग्राहकांसाठी बँका बंद आहेत पण आमची अंतर्गत कामे सुरुच आहेत पण 50% लोकांवर काम भागते त्यामुळे जरा सोयीनुसार जाता येतं .10 दिवस इतकी धावपळ नाही मग पहिली मंगळागौर ,  पहिला शुक्रवार पुरणाचा करावा असं नियोजन चालू होतं . रात्री नऊ वाजता अचानक पृथाचा फोन आला व ती म्हणाली मम्मी कोरोना पाॕजिटीव्ह निघाली तिला प्राईव्हेट हॉस्पिटलमध्ये अॕडमीट केलंय आणि पप्पांना क्वारंटाईन सेंटरला नेलंय . फोनवर बोलले मात्र पण पायाखालची जमीनच सरकली , क्षणभर काहीच सुचेना  . हातापायात त्राण नसल्यासारखं जाणवत होतं .  माझ्या बोलण्यावरुन मायडीविषयी बोलणं चालू आहे याचा सगळ्यांना अंदाज येतच होता . वातावरण एकदम गंभीर झालं , थोडंस थांबले मग सगळ्यांना सविस्तर सांगितले .
        पण माणासाचं मन फार विचित्र असतं म्हणतात नं 
" वैरी न चिंती ते मन चिंती " 
लोकांच ऐकणं , टीव्ही वर पहाणं वेगळं पण आपल्याच घरातील व्यक्तीवर आलेला हा प्रसंग पचावायला थोडंस जड गेलं . मग सगळे फोन  मेसेजेस सुरु झाले . पहिला भाऊजींना फोन केला त्यांनी सविस्तर सांगितले . रविवारीच थोडा त्रास सुरु झाला की लगेचच सोमवारपासून त्यांनी त्याच दृष्टीने फॕमिली डाॕक्टरांची ट्रीटमेंट सुरु केली होती . व शंका आली की लगेच स्वॕब दिलेला होता . रिपोर्ट येईपर्यंत आज शनिवार उजाडला . पण रिपोर्ट पाॕजिटीव्ह आला की नियमानुसार सगळे करावे लागते पण भाऊजींनी सगळी धडपड करुन तिला प्राईव्हेट हाॕस्पिटलला अॕडमीट केलं पृथाचे मामेसासरे ठाणे जिल्ह्याचे  सिव्हिल सर्जन असल्याने त्यांची  बरीच मदत झाली  . कीर्तीने पण केतकीला फोन लावला तीला  सगळे रिपोर्ट पाठवले . फारसं काळजीचं कारण नाही लवकर  ब-या होतील फक्त अशक्तपणा जाणवेल म्हणाली . माझ्या एका मैत्रिणीला पण कोरोना झालेला . सगळ्यांशी बोलून अनेक गोष्टी माहित करुन घेतल्या व शेवटी हक्काचं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थांवर सगळा भार सोपवला मग जरा निवांत वाटलं . मग आधी ज्योतीला फोन केला . तिची पण अवस्था काही वेगळी नव्हती . मी शांत आहे असे ती भासवत होती पण  आतून मात्र पुर्ण हलली होती . डाॕ. निलीमाचं औषध मी पोहोच करतेय तिला तशी व्यवस्था केलीय हेही तिने सांगितले . दोघीपण एकमेकींना आधार देत होतो . पुन्हा तायडीला फोन केला ती मात्र ढासळली . ती हल्ली खूपच हळवी झालीय सहन होत नाही तिला . तिचे एकच सारखे होतं कुठं गेली होती कुणास ठाऊक बाई . कशाला बाहेर जात होती कुणास ठाऊक . अशक्तपणा खूप येतो . आगं नाजूक आहे ग ती , तिला कुस्करुन खावं लागतं . काय देतात काय माहित . शनिवारपासून मला ती रोज सकाळ संध्याकाळ फोन करत होती . तेवढंच मनाला हलकं वाटत असणार . अस्वस्थ असते तसं मायडीचं आमच्या पंचकन्या ग्रुपवर  चाटींग सुरु असते त्यामुळे बरं वाटतं . रविवारी थोडीशी आॕक्सिजन लेव्हल कमी झाली पण लगेच एकदोन तासात नाॕर्मल झाली . सोमवारी चांगली  इंप्रुव्हमेंट व्हायला सुरुवात झाली फक्त अशक्तपणा जाणवतो म्हणाली . कालपासून ताप आला नाही कफ पण नाही सात दिवसात होईल सगळे व्यवस्थित मग घरी सोडतील असे वाटतेय . नियमाप्रमाणे भाऊजींचा पण स्वॕब दिला आहे . त्यांना काही त्रास होत नाही . पण मनात सारखा तो विचार असतो घरी आले एकदा व त्यांच व्यवस्थित रुटीन सुरु झालं की समाधान वाटणार  , वेळ तर द्यावा लागणार . दरम्यान दाक्षु-पृथा दोघींशीपण बोलणे झाले . काळजी तर सगळ्यांनाच वाटते पण तब्बेतीत होत असलेली सुधारणा ऐकून सगळ्यांना समाधान वाटतेय . पण कोरोनाचा अंत झाला पाहिजे असे मात्र मनोमन वाटतंय . खूप कंटाळा आला आहे या सगळ्याचा . धसका तर आहेच पण आता राग चीड यायला लागलीय कधी लस येतेय असं झालंय . कोणाचं आपल्याकडे येणंजाण नाही व आपणही कुठे जाऊ शकत नाही !
          आज सोमावार दिव्याची अमावस्या व उद्या मंगळवारी श्रावण सुरु !  कीर्तीची पहिली मंगळागौर ! लग्न झालं  की एकदोन महिन्यात मंगळागौरीचं नियोजन करुन ठेवलं होतं .अगदी स्वयंपाकाची बाई संस्कार भारतीचा ग्रुप ,  तसं मंगळागौर जागवणे हे लहानपणापासून मी पहात आलेय . घेरडी तसं छोटंस गाव पण भावकीची 30/35 घरं गावात होती . त्यामुळे चैत्रागौर ,  श्रावणी शुक्रवार , महालक्ष्म्या ,  दसरा ,  संक्रांत सगळे सण फार उत्साहात व्हायचे तसंच नविन लग्न झालं की मंगळागौर ही  ठरलेली असायची आणि त्याचं जागरण म्हणजे उत्साहाला उधाण यायचं . संध्याकाळी सगळ्यांना बोलावलेले असायचं गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि बरोबर लाडू-करंजी सगळं फराळाचं असायचं . ते झालं की आधी बैठ्या स्वरुपात गाणी , भेंड्या , उखाणे करत करत आंगणात उतरायचं मग फुगड्या , झिम्मा , फेर , नकला आणि निरनिराळे खेळ पहाटे तीनपर्यंत तरी रंग भरलेला असायचा . तीच प्रथा आम्ही पुढे चालू ठेवली आहे . घेरडी ,  किर्लोस्करवाडी ,  बदलापूर याठिकाणी जागरणं झालीत . आजकाल हे कोणाला जमत नाही मग प्रोफेशनल संस्कारभारतीचा ग्रुप बोलावला जातो पण त्यांनी पण हे सगळे पारंपारिक खेळ शिकून घेतल्याचं दिसून येतं . आम्ही घरचेच सगळे खेळू शकतो त्यामुळे आता सगळेजण बार्शीच्या जागरणाची वाट पहात होते . पण कोरोनामुळे सगळ्यालाच मर्यादा आल्या . आता हे घरच्याघरी सगळं करावे लागणार . पूजा  घरच्याघरी असली तरी सगळं करायचं व कामाला कोणी नाही त्यामुळे प्लॕनिंगनी कामं ठरवली . पूजेची कोरडी तयारी करुन ठेवली . स्वयंपाकाचा पुर्ण चार्ज आकांक्षाने घेतला .अगदी उत्साहाने नाचतनाचत उरक्याने10.30 वाजता तर साग्रसंगीत पुरणाचा सगळा स्वयंपाक तिने तयार केला . साडेआकरा वाजता तिचा क्लास  होता मग त्यापुर्वी सगळं तिला पहायचं होतं . इकडे आशिष-किर्तीने सुट्टी घेऊन एन्जाॕय करायचं ठरवलं . जोडी छान कपडे घालून मस्त तयार होऊन हजर . हल्ली दुसरे कपडे घातले जात नाहीत त्यामुळे आवरलं की सगळ्यांना खूप बरं वाटतं .  सकाळी लवकर उठून यांची पूजा माझं बाकीच आवरणं झालं . त्या दोघांचपण  छान आवरुन जोडीने पूजा झाली . पूजा सांगायचे गुरुजींच काम यांनीच केलं त्याचबरोबर आसपास हिंडून आघाडा , दुर्वा आणल्या व लागेल त्याला मदत होतीच  . आकरा प्रकारची पत्री व टोपलीभर फुले तर आंगणातच निघाली . अगदी साग्रसंगीत पूजा व सुग्रास जेवण झाले . मात्र  माणसांची उणीव खूपच जाणवली . पण जवळजवळ सगळ्यांचे फोनवर बोलणे झाले मग फोटो , व्हीडीओ स्टेटस सुरु झाले . 
          कालच्यापेक्षा आज आणखीन तब्बेतीत सुधारणा असल्याचे  मायडी , भाऊजी दाक्षु या सगळ्यांचे मेसेजेस होत आहेत . आम्ही आता ती घरी येण्याची वाट पहात आहोत . फोटो वगैरे पाहून रात्री मायडीने मेसेज केला कीर्तीला नाव घ्यायला लाव , जोडीनं , सासू-सुना , नणंद-भावजय फुगड्या खेळा . मग मात्र खात्री पटली आता हीला हाॕस्पिटलला रहाणं ही शिक्षा आहे . पण ईलाज नाही . ट्रीटमेंट तरी पुर्ण केली पाहिजे .
       आज आॕफिस असल्यामुळे सकाळी लवकरच आवरुन उत्तरपूजा केली . तोवर दाक्षुचा मेसेज आला की रात्रीचे इंजक्शन बंद केले आहेत आता सगळच नाॕर्मल आहे फक्त आॕब्झर्हेशनखाली ठेवलय शनिवारी फारफार तर सोमवारी सोडतील . दुपारी भाऊजींचा मेसेज आला की त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला त्यांना घरी सोडणार ! खूप बरं  वाटलं आता मायडीला सोडण्याची वाट पहाणे सध्यातरी एवढंच करु शकतो .

No comments:

Post a Comment