सौ. मिनाक्षी व मुकुंद घळसासी
लग्नाचा रौप्य महोत्सव समारंभ
ई-सेलीब्रेशन
प्रस्तावना
नमस्कार
मी सरिता कुलकर्णी म्हणजे ज्योतीची शरुताई .
आज पुर्वाश्रमीची ज्योती उर्फ नन्या म्हणजेच आजची मिनाक्षी क्रीएशनची प्रोप्रायटर अर्थातच मिनाक्षी व मुकुंद घळसासी यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस ! सर्वप्रथम त्या दोघांना आजच्या दिवसाच्या आभाळभरुन शुभेच्छा !! कोणत्याही नातेवाईकाचा किंवा स्नेह्याचा कोणताही कार्यक्रम असो अगदी उत्साहात मुख्य म्हणजे अगदी लक्षवेधी स्वरुपात ही जोडी उपस्थित असते ! "पेराल तसे उगवते "
या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला असं वाटत होत की आपण पण यांच्या कार्यक्रमाला काहीतरी हटके करुयात त्याप्रमाणे मनोरे रंगू लागले !!!
पण भारतात मार्चमध्ये कोरोनानं गंभीर रुप धारण केलं आणि प्रत्येकाला डोक्यात 22 जुनचं कसं होणार हा प्रश्न सतावू लागला . एप्रीलमध्ये कोरोनाची गंभीरता इतकी वाढली व असं लक्षात आलं की हे सेलीब्रेशन होऊ शकत नाही . म्हणून मग मी एका पत्राचा प्रयोग केला सगळ्यांना आव्हान केलं की या परिस्थितीचा आपण संधी म्हणून का उपयोग करु नये ? हटके काहीतरी करु . पत्राला प्रतिसाद मिळाला तर लक्षात आलं की 4 महिन्यांपुर्वीच सासरी , माहेरी आणि स्नेह्यांचा या कार्यक्रमाच्या नियोजनाचा ग्रुपपण तयार झाला आहे . सगळेजण आपापल्या ग्रुपवर चर्चापण करत होते पण आता सगळे एकत्र येऊ शकत नाहीत कोणीही आपली जागा सोडू शकणार नाही त्यामुळे सगळे शांत आहेत . पण मी त्या पत्रात एक कल्पना दिली होती ती पत्रातील कल्पना मात्र सगळ्यांना आवडली आणि तिथुन आजच्या या कार्यक्रमाच्या आखणीला सुरुवात झाली व आजची कलाकृती तयार झाली .
निश्चीतच एका फॕशन डिझायनरसाठी त्या उभयतांच्या नातेवाईक व स्नेह्यांनी केलेलं हे डिझायनर सेलीब्रेशन आहे असं मी म्हणेन . गेले दीड दोन महिने प्रयत्न करुन 50 लोक 50 ठिकाणाहून आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि दोन महिने कारागीरी करुन म्हणजेच हँडवर्क केलेली सुंदरशी कलाकृती तयार झालेली आहे . तर त्याचं प्रेझेंटेशन आपण आज याठिकाणी करणार आहोत . पत्ररुपी भावना तर याठिकाणी आलेल्या आहेत . एकएक करुन त्या पोहोचवत आहोत . आणि हो याची हार्ड कॉपी त्यांना भेट म्हणून देणार आहोत कायमस्वरुपी आठवण म्हणून !! व साॕफ्ट काॕपी पण सगळ्यांसाठी आहे . चला तर या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊयात .
याची सुरुवात त्यांच्या संसारवेलीवर उमललेल्या फुलाकडून करुयात .
सर्वप्रथम
यज्ञेश घळसासी
यानंतर सर्वात जेष्ट आसलेल्या
नलु आत्या
नंदू आत्या
आशा आत्या
गोविंद काका
आता माहेरची कुपी उघडुयात
किर्लोस्करवाडीची तायडी
बदलापूरची राणी ताई
बार्शीची शरु ताई
बार्शीची संजु
आता फुलपाखरासारख्या अवतीभवती गुंजी घालणाऱ्या मैत्रिणी / स्नेही
वयाच अंतर न ठेवता प्रत्येकालाच माझ्या जवळची आहे असं वाटणारी सगळी भाचे कंपनी
1) गोविंदा काका व राधिका काकू
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेलं कराड हे गाव आमचे जन्मस्थान. आकाराने लहान पण संस्कृतीने महान. एक काळ विद्वानांचे माहेरघर म्हणून ओळखले जात असे. आमचे घराणे म्हणजे गावाच्या लौकिकाला साजेसे वैदिक घराणे.भागवत सप्ताह पुराणे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे.आम्हाला अतिशय सन्मानाची वागणूक असे. असो
एकत्र कुटुंबात आम्ही वाढलो.वै.वे.शा.सं वासुदेवशास्त्री घळसासी व वै. सत्यभामा वासुदेवशास्त्री घळसासी हे आमचे वंदनीय पूजनीय माता पिता.त्यांनी केलेल्या सर्वोत्तम संस्कारांच्या मुशीतच आम्ही वाढलो. आम्ही पाच भावंडे. नलू अक्का ताई,माई मी व मुकुंदा. बहिणी आमच्यापेक्षा खूपच मोठ्या.मुकुंदा शेंडेफळ सर्वात लहान. आमच्या आज्जी आजोबांना ८ अपत्ये.५ मुले व तीन मुली. आमचे वडील सर्वात थोरले त्यामुळे जबाबदारी मोठी. शालेय शिक्षण मध्येच सोडून ते वैदिक शास्त्रात पारंगत झाले. शालेय शिक्षणाची अपूर्ण इच्छा त्यांनी मुलांच्या माध्यमातून पूर्ण केली. मी B.Com. आणि मुकुंदा B.E. Mechanic झाला.त्यावेळच्या परि स्थितीनुसार मुकुंदाच्या शिक्षणाचा खर्च जास्त होता. परंतु प्रचंड इच्छाशक्ती व मुलाला इंजिनियर करायची महत्त्वाकांक्षा यांमुळे ती.नानांनी त्याला इंजिनियर केले.
मुकुंदाच्या बाबतीत बोलायचे त्यानेसुद्धा आपले वडील एकटेच मिळवते आहेत याची जाणीव ठेऊन शिक्षण चांगले पूर्ण केले.उत्तम गुणवत्ता संपादन करून तो इंजिनियर झाला.शिक्षण पूर्ण करताना मुळातच आईवेडा असल्याने आई नानांना सोडून राहताना त्याला खूप त्रास झाला असणार. पण त्याने तो आम्हाला कधीही दाखवला नाही.का?तर आम्हाला त्रास होऊ नये.शिक्षण घेताना त्याने 1 रू.देखील वावगा खर्च केला नाही.आवश्यक तेवढीच पुस्तके घ्यायचा आणि बाकी लायब्ररीत वाचायचा.अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने,मेहनतीने त्याने शिक्षण पूर्ण केले.ती.नानांचे स्वप्नं कृतज्ञतेने साकारून पुण्याला नोकरीसाठी गेला.
शिक्षण चालू असताना सातारला तो बहिणीकडे (सौ. ताई)कडे रहात होता.नोकरीसाठी पुण्याला नलू अक्काकडे होता.परंतु तिथे राहत असताना करत असलेल्या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबातीलच होत असे.त्यामुळे ज्यावेळी तो सातारहून पुण्याला गेला त्यावेळी बहिणीला हात मोडल्यासारखे वाटून खूप वाईट वाटले. तसेच पुण्याच्या बहिणीकडून दुसरीकडे राहायला गेल्यावर तिची पण अवस्था सातारच्या बहिणीसारखी झाली.पुढे त्याने नोकरी करताना M.B.A. केले.विशेष म्हणजे पुण्याला गेल्यावर त्याने वडिलांकडे पैसे मागितले नाही.स्वतःच्या नोकरीच्या पैशातून स्वतःचा खर्च केला. शिक्षण चालू असताना नोकरी करताना त्याने 1रू.ची सुद्धा चैन केली नाही. आपल्या गरजा मर्यादीत ठेवल्या.अर्थातच त्यामुळे तो माझा भाऊ असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.अशा प्रकारे म्हटले तर खडतर आणि बऱ्यापैकी संघर्षात्मक असे त्याचे मार्गक्रमण.
आजपासून 25वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये सौ.मीनाक्षीने सोनेरी पाऊल ठेवले.एकाचे दोन हात झाले.मीनाक्षीनेदेखील मोठ्यांचा मान ठेऊन संसाराची सुरुवात केली.सगळेकाही सुरळीत चालू असताना आमचे मातृ पितृ छत्र हरपले.आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटले. तरी त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सावरलो.त्यांच्या संस्कारांच्या जाणिवेतून पुढील वाटचाल चालू ठेवली. मुकुंदा व मीनाक्षी यांच्या संसार वेलीवर 'यज्ञेश'रुपी सुंदर फुल उमलले.सौ. मीनाक्षीने पण मुकुंदाला मनोमन बरोबरीने साथ दिली,देते आहे. स्वतःच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर ती सुद्धा आपला व्यवसाय उत्तम सांभाळते आहे.
तीने निवडलेल्या क्षेत्रामध्ये तिने चांगले यश संपादन केले आहे.रथाची दोन चाके बरोबर चालली आहेत.संसारात येणाऱ्या चढ-उतारांचा यशस्वीरीत्या सामना करून दोघांनी मिळून पुण्यामध्ये स्वतःला चांगले स्थिरावले आहे.यज्ञेशलाही चांगले शिक्षण देऊन त्याचे भविष्यासुद्धा उज्ज्वल आहे.
तुमच्या विवाहाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यशस्वी असे हे पर्व असून उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो .सुख-समृद्धी,आनंद,समाधान यांचे सिंचन तुमच्या संसारात घडो. अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या भरपूर शुभेच्छा.
शुभेच्छुक
श्री. गोविंद वासुदेव घळसासी
प्रिय सौ मीनाक्षी,
माझी धाकटी जाऊ म्हणून विचार करताना मला तुझा अभिमान वाटतो.कारण आजपर्यंतच्या आयुष्यात आपल्या दोघींच्यात काधीसुद्धा वाद-मतभिन्नता झाली नाही.नेहमीच सामंजस्याने आपण एकमेकींशी वागतो.छान अशीच प्रसन्न रहा.स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नको.तुमच्या भावी वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
तुझीच वहिनी,
सौ.राधिका गोविंद घळसासी
2) तायडीचं पत्र
सौ. ज्योती व श्री मुकुंद ( जावईबापू ) यांना आनेक आशीर्वाद पत्रास कारण की या कोरोनाच्या आपत्तीमुळे प्रत्यक्ष येऊन उभयतांना शुभेच्छा देणे शक्य नसल्यामुळे मी या पत्राद्वारे माझ्या शुभेच्छा व भावना जमतील तशा व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.
कशी गेली वर्षे कसे गेले दिवस आज तुमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस !
खरच 25 वर्षापूर्वीचे दिवस आजही मला जसेच्या तसे आठवतात . तू लग्नाच्या आधी चार वर्षे शिक्षणासाठी आमच्याकडे होतीस . त्यामुळे तू आम्हांला आमच्या मुलींच्यापेक्षा वेगळी कधी वाटलीच नाहीस . वाडीतले बरेचसे लोक तुला आमचीच मुलगी समजायचे . तुझ्यासाठी वर संशोधन करणे, हेसुद्धा माझेच आद्य कर्तव्य आहे असे मी समजायचे . आणि त्याप्रमाणे महाराजांच्या कृपेने तसे घडुनही आले .
मुकुंदासारखा सुसंस्कृत , सोज्वळ , सालस असा वर शोधण्यापासून ते साखरपुडा , लग्नाचा लाडू-चिवडा , दागिने खरेदी हे सगळे माझ्याकडेच झाले .
तुझी शेवटच्या वर्षाची परिक्षा झाली आणि लगेचच दुसरे दिवशी दाखवण्याचा कार्यक्रम होता . काकांना पण बोलावून घेतले होते . स्थळाची कसून चौकशी माझ्या मैत्रिणीच्या बहिणीकडून ( धोपाटे वहिनींची बहिण ) केलेलीच होती . ती म्हणाली डोळे झाकून दे . खूप चांगला आहे मुलगा , माणसं पण छान आहेत . मी ओळखते त्यांना . मग काय झालं तर आपण कराडला गेलो आणि लग्न ठरवूनच परत आलो . आनंद दुथडी भरुन वाहू लागला . बघता बघाता काॕलेजला जाणारी तू एकदम सासरच्या उंबरठ्यावरच उभी राहिलीस की !
लगेचच दुसरे दिवशी तू व काका घेरडीला जाणार होतात . तशीही तू परिक्षा झाल्यावर जाणारच होतीस पण यावेळी गोष्ट जरा वेगळी होती .
आवारायचे म्हणून कपाटातला एक एक ड्रेस काढून तू बॕगेत भरत होतीस तसतसा माझ्या पोटात खड्डा पडायला लागला . आपल्याच घरी निघाली होतीस तू तरी पण दोघांच्याही भावना काही वेगळच सांगत होत्या . एकमेकींपासून चेहरा लपवत अखेर तू बॕग भरलीस . वातावरण तंग झाले पण थोड्याच वेळात लग्नाच्या गप्पा सुरु झाल्या आणि वातावरण बदलून गेल . तुझ्या मनीचे मोर नाचू लागले .
तसा पहिल्यापासूनच तुझा लवाजमा जास्तच होता . लाडकी बहिण , मेव्हणी , मावशी आशी तुझी ओळख होती . अजूनही तशीच आहे . तोंडात खडीसाखरेचा खडा आसल्यासारखं सगळ्यांशी गोड बोलणं , सगळ्यांना आपलसं करुन घेणं हा तुझा पहिल्यापासूनचाच स्वभाव !!
" जिथे ज्योती तिथे बहुत प्रीती "
हा तुझा स्वभाव !
असच आहे काहीसे तुझे . सर्वांची मने जिंकून तू आख्ख्या किर्लोस्करवाडीची लाडकी ज्योती झालीस. अजूनही येथील सर्वजण तुझी वेळोवेळी आठवण काढतात . जोशी काकूंकडेही उत्सवात सर्वजण आवर्जून तुझी चौकशी करतात . परवाचाच एक प्रसंग , आमणापूरचा गोरंबेकर आला होता . त्यांनी मला विचारलं
" काकू तुमची मोठी मुलगी कुठे असते हो "
मी म्हणाले
" मंजू ना कोल्हापूरला असते "
तर तो म्हणाला
" मंजू नव्हे हो ज्योती "
हे असं व्हायचं .
तसेच तू शिवण क्लासमध्येही अशाच मैत्रिणी जोडत गेलीस . सगळ्यांचा तुझ्यावर जीव होता . C V वहिनी तुझ्या शिवणक्लासच्या टीचर होत्या तर तुझ डोकं त्यांच्यापेक्षा सुपर चालायचं . आजूबाजूच्या मुली पण नंतर तुलाच विचारुन फॕशन करायच्या . नवनवीन idea असायच्या तुझ्याकडे , नंतरनंतर तर CV वहिनी पण तुलाच विचारुन फॕशन करायच्या . तिथेच तुझ्यातील फॕशन डिझाईनरचा जन्म झाला . आता तर काय दोन दोन बुटीकची मालक आहेस . लिहावे तितके थोडे आहे तुझ्याविषयी !
आशी आमची ज्योती आणि तिला साजेसा कर्तबगार , धाडसी , शिस्तबद्ध , मायाळू वेळप्रसंगी कठोर असा तुझा जोडीदार व तुमच्या संसारवेलीवरचं लोभसवाण फुल यदु ! अशा सर्व घळसासी कुटुंबीयाला एमबीके कुटुंबाकडून लाख लाख शुभेच्छा !!
तुझी तायडी व भुजी
M B K भाऊजी
नमस्कार मंडळी !!
आता काय सगळ्या भावना आमच्या मॕडमनी वाचून दाखविलेल्याच आहेत तर आता मी शुभेच्छा द्यायचं गोड काम करतो .
तुम्हा दोघांनाही भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा !! याहीपेक्षा भरभराटीचा काळ तुमच्यासाठी येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !!!
3) मायडीच पत्र
आठवणी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त.
हे वर्ष सौ. ज्योती आणि श्री.मुकुंद यांच्या लग्नच्या रौप्यमहोत्सवाचं.
ज्योतीचा जन्म झाला तेव्हा मी १०वर्षांची असेन त्यामुळे आई तिला पायावर झोपवून नैवेद्याच्या भांड्यानं दुध पाजताना पायाला रेटे देऊन रडण्यापासूनच्या आठवणी आहेत .दात येताना तिचा कान फुटायचा ,शाळेत जायला लागली तेंव्हा मागच्या दाराने सोडलं की ही पुढच्या दाराने घरी यायची.मग हायस्कूलमध्ये गेल्यावर तिची वही शिक्षकांनी च फाडली म्हणून माझं शिक्षकांशी भांडण,तिला एका वर्गमैत्रिणीची खूप भिंती वाटायची त्यामुळे ती तिचं झोपेत घाबरून उठणं या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत.
त्यानंतर माझं लग्न झालं दोन अडीच वर्षांनी नववीत ती बदलापूरला शिकायला आली.घेरडी तसं खेडेगांव त्यामुळे सुरवातीला बुजल्यासारख झाले पण _४ महिन्यात रुळली त्यावेळी पृथा व दाक्षू दोघीही लहान होत्या दोघींनाही तिचा लळा होता .मी मारलं की दोघी तिच्याकडे जायच्या .
अभ्यास करायला ती बदलापूर ला आल्यावर शिकली.😀अभ्यास करता करता ती झोपायची आणि हे सेकन्ड शिफ्ट करून आलेले असले की तिच्या तोंडावर असलेलं पुस्तक काढून माळ्यावर ठेवायचे व ती सकाळी तोंड फुगवून बसली की द्यायचे.दहावीची परिक्षा चालू असताना उल्हासनगरमध्ये एका मुलीवर परिक्षाहॉलमध्ये अॕसिडहल्ला झाला तर काका दुसर्यादिवशी संध्याकाळी हजर झाले आणि परिक्षा झाल्यावर घेऊन गेले . रिझल्ट लागल्यानंतर अॕडमिशनसाठी काका आले होते.पुढे ती कि.वाडीला शिकायला गेली.तिथे तिने खूपच प्रगती केली.
मग आला महत्त्वाचा भाग तो म्हणजे लग्नाचा . आई काकांचे ठरलेलं असायचं नोकरीची वाट नाही बघायची शिक्षण झालं की लग्न त्याप्रमाणे २०वर्षे पूर्ण झाली की तातडीने वरसंशोधनाला सुरुवात केली आणि कॉलेज संपलं की २२जूनला लग्न थाटामाटात पार पडलं.मुकुंद घळसाशी जोडीदार मिळाला.
जोडी एकदम साजेशी .आई काकांना किती कौतुक . ज्योतीचा लग्न झाल्यावर आई काका थोडे हळवे झाले होते.तिची पहिली मंगळागौर बदलापुरात झाली. नंतर गोड बातमी आली .दरम्यानचे सगळे सणवार डोहाळे जेवण पार पडलं.
मे महिन्यात घेरडीला सुट्टीसाठी सगळे जमलो होतो . तेव्हा तिचं बाळांतण बदलापुरात करायचं ठरलं.त्याप्रमाणे ८_१० दिवस आधी बदलापुरात मुकुंद आणि ज्योती आले .आई काका ११ जूनला आले आणि यज्ञेशचा जन्म १२जूनला झाला.बाळाचे बाबा बाळाला बघायला आले त्याच दरम्यान त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा झाला.
वाढदिवसाची खरेदी मी आणि मुकुंद घळसाशींनी बदलापुरात केली.ज्योतीबरोबर बाळासाठीपण खरेदी झाली . अशाप्रकारे लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा झाला.
आज २५वर्षे पूर्ण होत आहेत .या काळात अनेक घडामोडी झाल्या सुरू जुळले लोणचं चांगलंच मुरलं.त्यात यज्ञेश सारखं समंजस समजुतदार बाळ आता तोही मोठा झालायं.एकूण सुखी समाधानी त्रिकोणी कुटुंब ,पण गोतावळा भरपूर स्वभावामुळे तयार झालेला मित्रवर्ग, सहकार्य करण्याची वत्ती त्यामुळे अनेकजणांना धरून ठेवलंय.आणि व्यवसायासाठी घेतलेले कष्ट, सांभाळलेली व्यसायातली माणसं सगळ्यांना सांभाळत यशस्वी घोडदौड मुकुंदांच्या साथीने चालू आहे ती अशीच पुढे चालू राहो .हीच श्रीरामचरणी प्रार्थना.
चि.सौ ज्योती श्री.मुकुंद व यज्ञेशला अनेक शुभाशीर्वाद व अनेक शुभेच्छा.
4) शरुताईचं पत्र
सौ. ज्योती व श्री मुकुंदा यांना अनेक आशीर्वाद
पत्रास कारण की देवाब्राम्हणांच्या , आई-काकांच्या ,आई-नानांच्या आणि सर्व नातेवाईक व स्नेही मंडळीच्या साक्षींने , लक्ष लक्ष शुभाशीर्वादांने तुम्ही एकमेकांच्या रेशीम बंधनात बांधले गेलात त्या सोनेरी प्रवासाला आज 25 वर्षे पुर्ण झाली ! त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन .
तुमच्या लग्नाच्या रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा पत्र लिहून देण्याची संधी मिळेल असं स्वप्नात पण वाटलं नव्हते . पण प्रत्यक्षात तसं घडतयं . कारण कोरोनामुळे ती वेळ आली असं म्हणण्यापेक्षा कोरोनामुळे ही संधी मिळाली असं आपण म्हणुयात . अन्यथा हा समारंभ वेगळ्या पद्धतीने झाला असता की जो बरेचजण करतात . पण तू म्हणतेस न की आमच्या बुटीकमध्ये अँटिक पीस मिळतात की जे बाहेर कुठेही मिळत नाहीत तसं हे आँटिक सेलिब्रेशन आहे की कोणाचही अशा प्रकारे झालं नाही .त्याचा फील तुम्हा उभयतांना कसा येतोय ते सांगा . मज्जा येते न ?
असो आता थोड तुमच्याकडे वळू ज्योती तू मला 77 सालची आठवतेस . आडीचतीन वर्षाचं बाळ होतीस ! तायडीचं लग्न होतं . आई-काका तुला कोल्हापूरला रेडीमेड कपड्याच्या दुकानात फ्राॕक घ्यायला घेऊन गेलेले . तर तू तिथे नेटेडचा एकदम भारी पीस
" मला हे पाहिजे "
असं म्हणत काढून दिलास .
"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात "
असंच काहीसं ते झालं म्हणावं लागेल . मग काकांनी पण तोच फ्राॕक घेतला व पुढे कित्येक दिवस कौतुकाने आई तुझी निवड सगळ्यांना सांगत राहिली . आणि तू पण हट्टाने तोच फ्राॕक घालायचीस व 9/10 वर्षाची मी तुला कडेवर घेऊन फिरायचे ती तुझी मुचक्या तोंडाची लेमन कलरच्या फ्राॕकमधली छबी आजही मला स्पष्ट आठवते .
अनेक आठवणी आहेत . अगदी बोबडे बोल आठवतात तुला लहानपणी नन्या म्हणायचे तू खेळत असताना विचारलं
का कत्तो नन्या तर तू पटकन उत्तर द्यायचीस
" खुल्ला कत्ते नम्नाला , नम्ना कत्ते खुल्लाला "
तर थोडी कळती झाल्यावर पाहूणे आलेत आपल्याकडे शहाण्यासारखं वागायचं म्हणून सांगितलं की हमखास पाहुण्यासमोर कधी बासुंदी न खाल्ल्यासारखं
" बासुंदी म्हणजे काय ग आई"
किंवा वाड्यात सगळी भावंडे एकत्र बसुन गप्पांचा नकलांचा फड जमला की तुला खुमखुमी यायची मग तुझं सुरु .
"भगरम भगरे खीचडंम खीचडे "
म्हणून हात पसरुन माशी तोंडात जाऊन परत येईपर्यंत उभारणे ते बघून नुसता हास्यकल्लोळ व्हायचा . अशा गमतीजमती तर पुढे नविन लग्न जमल्यावर गच्चीत जाऊन
" टेरेस कुठेय "
असं बावरून विचारणे .
किंवा STD सेंटर दिसलं नजर भिरभिरणे आणि फोन दिसला की मला समोर फक्त मुकुंदा दिसतो म्हणत STD कडे धाव घेणे . आणि तासनतास गप्पा . तिच अवस्था समोरुन व्हायची पुर्वी तार आली की लोक घाबरायचे पण तुमचं लग्न ठरल्यापासून होईपर्यंत रोज दुधाप्रमाणे तारांचा रतीब होता. गुलाबी दिवस असतात ते . मग यानिमित्ताने अशा आठवणींना उजाळा दिला की मन पण त्या वयाचं होऊन जातं त्यासाठीच तर हा खटाटोप . तसं evergreen जोडपं आहे तुमचं असो
आगं एक का दोन !
अशा अनेक मजेशीर , आनंदी , भावनीक , सुखदुःखाच्या , चोरकप्प्यातल्या ढीगभर आठवणी आहेत पण आज फक्त हास्यफवारे उडतील अशाच शेअर करणार . बाकी आठवणींचा खजाना उद्या whatsapp वर शेअर करणार कारण आज रडायचं नाही .
तशी लहानपणापासून छानछुक्की रहायची तुला आवडच आहे . सर्वसमावेशक पण खुशालचेंडू तुझा स्वभाव . स्वतः काहीतरी करायचं मग तू म्होरक्या आणि लहानमोठ्या चार पोरी तुझ्या मागेपुढे असायच्या .
पुढे तुझं लग्न पण वयाची 20 वर्षे पुर्ण होतात तोवरच झालं . छान घरंदाज जोडीदार लाभला तुला . जोडा शोभला तुमचा . मग तुमच्या सहप्रवासाला सुरुवात . त्यामानाने तुझ्या सासुबाईंच लवकरच निधन झालं आणि तिशीच्या आतच त्यांच मातृत्वाचं छत्र हरपलं असं म्हणत तू अल्लड ज्योतीची समजूतदार मिनाक्षी झालीस . आणि रोजच्या जिवनात तुम्हांला मुलगी नाही म्हणून लहान मुलगी आणि बायको आसे दोघींचे हट्ट तू करत रहायचे व मुकुंदानी ते पुरवत रहायचे . असं आळीपाळीने लहान मुल व पालक अशी भूमीका दोघेपण करता अशी मस्त केमेस्ट्री आहे तुमची . प्रत्येकाच्या जिवनात येतात तसे अनेक चढउतार तुम्ही पण पाहिलेत . ते लिलया पेलले पण .
प्रसंग सासरचा असो वा माहेरचा दोन्हीकडे पण त्याचबरोबर जोडलेली नाती पण तितकीच आहेत तुमची . सर्वच ठिकाणी सक्रीय सहभाग असतो तुमचा . आनंदाचा असो वा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी वेळेला धावत जाणे ही प्रवृत्ती आहे तुमची . पण त्यात तुम्ही दोघांनी छान एकमेकांच्या हातात हात घालून अडचणीचे गड सर केलेत . ज्योती , एवढा मोठा तुझा व्याप दिसतो पण मुकुंदांच्या खंबीर साथ व भक्कम पाठिंब्याशिवाय ते शक्य नाही हेही तितकच सत्य आहे . वरुन काटेरी पण सुमधुर फणस आशी उपमा देता येईल तुझ्या जिवनसाथीदाराला . अशा पोषक वातावरणात यज्ञेशची जडणघडण होत गेलीय त्यामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार घडलेत . तुमच्या तिघांच छोटसं पण सर्वसमावेशक असं मोठ्ठ कुटुंब आहे . तुमची घोडदौड अशीच चालू राहो . तुमच्या सर्व अपेक्षा इच्छा पुर्ण होवोत .एकदा ज्योतीची ओळख करुन देताना मी सहजच जोशात म्हणलं होतं
" ही माझी बहीण आहे आणि हीचे पाच बुटीक आहेत "
तर बुटीकच्या आणखी शाखासाठी तुम्हाला शुभेच्छा .
तुम्हांला भरभरुन यश मिळो . व इथुन पुढे आनंदी , समृद्ध , समाधानी , निरोगी जिवन लाभो हीच आम्हा उभयतांकडून परमेश्वरचरणी प्रार्थना ! व सुवर्ण महोत्सवी वर्षाकडील वाटचालीस शुभेच्छा !!
5) आकांक्षाची प्रस्तावना
हाय ज्योती मावशी हॕलो मुकुंद काका आणि हो यदू , भावा काय म्हणतोस .
वातावरण जरा सेंटी झालंय नं , भरपूर पाजळलंय आणि गूळ पण भरपूर निघालाय अगदी ढेपा तयार झाल्यात . काय राव तुमच्या फॕमिलीनं असं इमोशनल नसतं व्हायचं .
माझ्याकडे तर पोतं भरुन आठवणी व किस्से आहेत . आपण त्याचं एक स्पेशल सेशन करावसं वाटतय मला . आत्ता याक्षणी धतडांग धतडांग नाचावंस वाटतंय . नाहीतर तुझ्या स्टाईलनं दादाच्या लग्नाआधी धुंद गाण्यावर कशी प्रॕक्टीस करायचो तसं करावासं वाटतयं .
वाटतंय काय आगं केलंय सगळ्यांनी तसं . कारण आईची
" अंजू चिमाणी "
सगाळ्यांच्या मागे लागाली आणि यातली हाईक सांगू का हे करतांना सगळ्यांनी खूप एन्जाॕय केलं . सगाळीकडे वातावरण कसं होतं माहित आहे का ?
आगं सगळीकडे ना🤭🤭🤭श्शूssss हळू बरं
" देशापांडे बावचळले " होते .
आग आपल्याकडे आता नविन आलेला मेंबर देशपांडेआहे 🤣
आत्ता पाहिलास न पुर्वरंग ? ते आणि आता दिसणार ते पण सगळेचजण आधी पत्र लिहायचं तर काय लिहावं बाबा ? लिहायची तर सवयंच नाही . तरी मग लिहायला बसलं की रडून घ्यायचं . पुन्हा video करायचा म्हणजे आता आपण जसं काही TV वर दिसणार या आविर्भावात सगळ्यांची लगबग कोणी केसांना डाय करते तर कोणी दाढी करतय . तर कोणी केसांची स्टाईल बघते तर कोण घरीच कपड्याला इस्त्री !
विचारु नकोस.
ज्यो मा तू न आपल्या फॕमिलीत बरोबर मध्ये आहेस . आता सगळे तुमच्या नात्याने बरोबरीचे आहेत त्यांच्या भावना ऐकल्या आहेत तुम्ही . आता जरा तुझ्या वयाचे लोक अर्थातच इनिकाएवढे ग ! का तर तू यदूची छोटीशी आई आहेस . काय म्हणतात बघू तुमच्या विषयी . कारण हीच तर आमची ज्योती मावशी आहे बाबा . आणि मुकुंद काका सुद्धा . चला तर मग या पुढच्या पिढीनं काय काय केलय पाहूयात आणि करुयात जरा कल्ला .अशी सरसाऊन बैस ग तुझ्या नेहमीच्या स्टाईलने आणि हो मुकुंद काका तुम्हीपण वाॕलीउडमध्ये आल्यासारखे वाटतय म्हणत डोक्यावर हात ठेवत बसा जरा . 👍
6) नियोजन
हॕलो मंडळी
आपण केलेल्या नियोजनाप्रमाणे आकांक्षाने मस्तपैकी video तयार केलेला आहे .तो दोन भागात केलाय .
1) पुर्वरंग 45 मिनिटं
2) उत्तररंग 56 मिनिटं
म्हणजे जवळजवळ पावणेदोन तासाचा video झालाय . सगाळ्ंनी खूप मस्त केलेय . सलग पहायला मजा येतेय . आपण म्हणल्याप्रमाणे हे ई-सेलिब्रेशन अगदीच हटके होणार आहे .
तो google वर upload होतोय . पाऊस आसल्यामुळे व नेट प्राॕब्लेम मुळे थोडा वेळ लागतोय ते झालं की यज्ञेशकडे लिंक पाठवणार व तो ती laptop वर save करुन चेक करेल . त्याची लिंक इथे पण टाकेन तो तुम्ही पण पहा . 21 जुनला दुपारचे जेवण , आराम झाला की 4/5 वाजता किंवा रात्रीचे जेवण झाले की साधारण 10 च्या दरम्यान यज्ञेशनी हे दोन्हीही भाग एकापाठोपाठ एक दाखवायचे व रात्री 12 वाजता यज्ञेशने बुके देऊन केक कापायचा . म्हणजे या सा-या आठवणीत 22 तारखेची सुरुवात होईल .
video ब-यापैकी भावनीक आहे त्यामुळे ती रडणार पण उत्तररंग ( दुसरा भाग ) हसतखेळत होतोय . पुर्ण 22 तारीख यात रमतील ती दोघं पण.
हे 21 ला पाहिल्यामुळे त्यांचा 22चा पुर्ण दिवस मजेत जाणार प्रत्येकाने आपापल्या वेळेनुसार फोन केला तरी चालू शकतो .
22 ला रात्री 9 वाजता झूम मिटींग ठेऊ . ती यज्ञेशला मॕनेज करावी लागेल .
7) आभार
हॕलो मंडळी नमस्कार ,
खरं तर इ-सेलीब्रेशनच्या माध्यमातून 21 तारखेला तुम्ही सर्वांनी मिळुन यज्ञेशच्या मदतीने आम्हा उभयतांना जो धक्का दिला त्याला कसलीच तोड नाही . कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर मात करत 1/2 महिने विचारमंथन करत सुंदरशी कलाकृती तयार करुन आहे त्या जागेवरुन आम्हांला 25 वर्षे माग नेलत . सुंदर क्षणात रममाण व्हायला लावलत. तुम्ही काय हटके मार्ग शोधलाय , यावर काय व्यक्त व्हावं , काय बोलावं , कसे आभार मानावे काहीच सुचत नाही . तुमच्या भावना पहाताना , वाचताना ऐकताना ते क्षण जसेच्या तसे समोर उभे राहिले व त्यावेळी त्यातून तुम्हांला इतका आनंद मिळाला ही भावनाच खूप भावूक आहे . आम्हांला त्यात्या क्षणांची आठवण होतेय . मन भूतकाळात रमतं . सुख म्हणजे यापेक्षा वेगळ काय असतं ? दोन दिवस तर सगळ्या भावनांमध्ये आम्ही चिंब नाहून निघालेलो आहोत . फोन केला तर काय बोलावं सुचत नाही . निशब्द झालोत आम्ही . अशक्य भावना आहेत , अक्षरशः भावनांचे मेघ दाटून आलेत पण बरसाव कसं हे समजत नाही . त्यामुळे सध्या आम्ही उभयतांनी तुमच्या प्रेमाच्या ऋणातच रहाणं निश्चीत केलंय . व्यक्त तर होणार पण त्यासाठी आम्हांला वेळ हवा आहे . एवढं मात्र नक्की की रौप्य महोत्सवानिमित्त हे कायमस्वरुपी स्मरणात रहाणारे सुवर्णक्षण आम्हांला दिलेत , आपला लोभ असाच रहावा वृद्धींगत व्हावा हीच आम्हा उभयतांकडून आपेक्षा.
आपलेच
श्री मुकुंद घळसासी व सौ मिनाक्षी घळसासी.