कोरोना आणि ती
2) भाजीवाली
ली
" अन्न वस्त्र निवारा "
या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्यामुळे भाजी हा अन्नामाधील अपरिहार्य घटक आहे . मग भाजी विकणारावर कधी टाळेबंदीची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते . आमचा आठवडा बाजार शनिवारी असतो . मार्केटमध्ये शिरलं की बरोबर मध्यावर मोठी लाईन मोठ्या मोठ्या भाजीवाल्यांची असते मार्केटींगसाठी त्यांची चढाओढ लागलेली असते . धारदार आवाजात मोठमोठ्यांन मुख्य म्हणजे हसतहसत विशिष्ट पद्धतीने त्यांची शेरेबाजी ऐकत भाजी खरेदी केली की भाज्यासारखं मन पण प्रसन्न व्हायचं . ज्या भाज्या या भागात पिकत नाहीत त्या मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे या मोठ्या भाजीवाल्यांची लाईन असते मग बहुतेक ठिकाणी मुख्य खुर्चीवर त्यांच्या कुटुंबातील पोक्ती बाई बसलेली असते . लिलावाच्या ठिकाणी नवरा आणि हाताशी आलेला मुलगा पण बरोबर गेलेला असतो . मग यार्डातून मंडईत भाजीच्या गोण्या आणून टाकायची हाॕटेलसारखी मोठी गिऱ्हाईकं करायची व लागेल ती मदत करायची ही कामे नवरा किंवा मुलगा करतो . मुलाचं लग्न झालं की या व्यवसायाची सवय नव्या सुनेला पण व्हावी म्हणून घरातलं सगळं आवरुन सगळ्याचे डबे घेऊन सून पण आकरानंतर मदतीला येऊन बसते . असं एकएक करत घरातले सगळेजण त्या धंद्याभोवती असतात .
" उद्या रईवार हाय , तुमाला सुट्टी हाय पोटाला सुट्टी न्हाय कायबी घ्या धा ला पाव " .
असं म्हणत आत्मविश्वासाने चाललेला हा धंदा काही काळाकरता बंद होऊ शकतो ही गोष्टच न पटण्यासारखी होती . चापूनचोपून नेसलेल्या साडीचा पदर खोचून प्रसन्न चेहऱ्याने माधोमध खुर्ची टाकून ती रणरागिणी बसलेली असते . दोन्ही बाजूला चारचार फूटापर्यंत अँगलवर फळ्या टाकून पलंग तयार करुन त्यावर वीसपंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांच्या टोपल्या त्याच्यावर एकाला एक चिकटून ठेवायच्या एकीकडे फळभाज्या , एकीकडे पालेभाज्या , शेंगांचे प्रकार वेगळेच तर बाहेरून मागवलेल्या भाज्या वेगळ्याच , थोड्या लांब आंतरावर कांदे , बटाटे , टोमॅटो , काकडी , मिरच्या अशा तत्सम भाज्या ! आतिशय कल्पकतेने गिऱ्हाईक येण्यापुर्वीच भाज्यांची मांडामांड करुन एका बाजूला अनेक कप्पे असलेली पैशाची पेटी तर दुसऱ्या बाजूला गिऱ्हाईकाला द्यायच्या टोपल्या , पाण्याची बाटली तर अजून एक छोटीशी लाकडी पेटी त्यात पिग्मीची पुस्तकं , मोठ्या नोटांची पॕकेट , नगरपालीकेची पावती , किल्ल्या असं महत्त्वाचे साहित्य ठेवाण्यासाठी सोय असते . पाठीमागच्या बाजूला भाजी भरलेल्या गोण्या आणि समोर वजनकाटा ! हा सगळा जामानिमा करुन जय्यत तयारीनीशी गिऱ्हाईक सुरु व्हायच्या आधी सकाळी आठ वाजता बसलेल्या भाजीवाल्या , गर्दी सुरु झाली की अष्टभुजेप्रमाणे त्यांच काम सुरु होतं . एकाच वेळी पाचसात गिऱ्हाईकं लिलया सांभाळायची कला फक्त त्यांच्याकडेच असू शकते . शिक्षण कमी पण हिशोब मात्र एकदम पक्का ! आपला हिशोब होईपर्यंत पाचसहा भाज्यांचे वेगवेगळ्या भावाने हिशेब करुन त्यात्या गिऱ्हाईकाकडे बोट करत
" ताई तुमचं एवडं झालं बगा न भाऊ तुमचं एवडं "
असं सांगून पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळायच्या सुद्धा ! एकावेळी इतकी वेगवेगळी कामं तीही बीनचूक! त्यातच थोडी गर्दी ओसरली की कमी झालेल्या टोपल्या पुन्हा भाजीने भरायच्या , मधूनच भाज्यावर पाणी शिंपडायचं , चहाची किटली घेऊन फिरणाऱ्या चहावाल्याला हात करुन बोलवायचं आणि दोन घोट चहा घेऊन तरतरीत होऊन पुढच्या कामाला भिडायचं . गिऱ्हाईकांनी आकर्षित व्हाव म्हणून समोरुन जाणाराला हटकत आपुलकीने
हाक मारायची आणि आपल्या भाजीला
" कवळीलूस हाय , बगा कशी हिरवीगार हाय , कडक माल हाय एकदम बरका "
अशी विशेषणं लावत वळून पहायला लावायचं पाव किलोऐवजी आर्धा किलो तर आर्धा किलोऐवजी एक किलो भाजी विकण्याचं त्यांच कसब निराळच !
तर दुसरीकडे स्वतःच्या शेतात पिकणारा मोजकाच शेलका माल घेऊन खेड्याच्या बायका मंडईच्या एका बाजूला नगरपालिकेची पावती फाडून छोट्या भाजीवाल्या होऊन ओळीनं बसायच्या . कोणाकडे हदग्याची फूलं , स्पेशल आमटीसाठी देशी पांढऱ्या भेंडीच्या बीया , ओल्या चवळीच्या शेंगा , तव्यावर मिरची भाजून तांब्यांन रगडून करायच्या ठेच्यात घालायला चटकदार लागणारी बोराएवढी लाललाल टमाटी , देशी कोथिंबीर , देशी लसूण असा वेचक माल खात्रीने फक्त त्यांच्याकडेच मिळणार त्यामुळे त्यांचा रुबाब काही औरच ! सरळसरळ जमिनीवर समोर तोंड करुन दुहेरी पोतं अंथरुन बसायचं , दुपारच्यावेळी स्वतःपेक्षा भाजीला उन्हाचा चटका लागू नये अशा पद्धतीने छत्री लाऊन ठेवायची . माल विकला की येणारे पैसे पोत्याचा एक पदर वर उचलून नोटा एकीकडे तर नाणी एका बाजूला आत सरकवायची त्यांची खास पद्धत क्षणभर त्या कॕशियरच भासायच्या मला !
" थोडंच ऱ्हायलंय फिरुन याल तर मिळायचं न्हाय "
अशी थोडीशी धमकीच असायची त्यांची .
इकडे मंडईच्या तोंडालाच सिझनप्रमाणे केळी , आंबे , डाळींबं , सिताफळं अशा विविध प्रकारच्या फळांनी भरलेला गाड्यावर वयस्कर भाभी बसलेल्या असायच्या . त्यांच ठरलेलं गिऱ्हाईक मात्र डोळे झाकून त्यांच्याकडेच खरेदी करायचं .
काहीजणी मात्र मंडईत बसून भाजी विकू शकत नाही म्हणून डोक्यावर टाॕवेलची चुंबळ करुन त्याच्यावर भाजीचं टोपलं घेऊन मधूनच दोन्ही हात खाली सोडून सकाळच्या वेळी चालत
" भाजीsssss "
अशी दणदणीत आरोळी ठोकतच गल्ली , सोसायटी , काॕलनीत प्रवेश करायच्या . मग तिच्याकडे कायकाय आहे हे अगदी विशेषणासह लयबद्ध पद्धतीने समजायचं .
" कवळी मेती , पालक , शेपू , देशी गवार , दोडका " तोवर चालत चालत घरासमोर आली की थोडासा स्वर बदलत
" काटाळ वांगी हाईत , भरल्या वांग्याला घ्या वैनी "
असं म्हणत बाहेर यायला भाग पाडायच्या . ओरडत घरोघरी फिरून भाजी विकून आपला उदरनिर्वाह करायच्या . त्यांच्या दणदणीत आवाजाने ज्याला भाजी घ्यायची ते बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबायचे . हसत हसतच
" आले आले थांबा वाईस "
असं पुढ्यातलं गिऱ्हाईक करत समोरच्या घराकडे लक्ष !
गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या व्यवसायाला मरणच नाही अशी कल्पना असलेला भाजीवीक्री हा खात्रीचा व्यवसाय आणि भाजीवाली हे व्यक्तिमत्त्व ! आठ तासापेक्षा जास्तवेळ ड्युटी करुनसुद्धा कोणत्याही खात्यांतर्गत न येणारा , कशाचीच हमी , सुरक्षा , भविष्य नसलेला हा व्यवासाय . अगदी पोटापूरतं मिळालं तरी बास म्हणत डोक्यावर टोपली घेऊन हिंडणारापासून भाजीचा मोठा स्टाॕल लावलेल्या आख्खा संसार या धंद्यावरच असलेल्या मोठ्या भाजीवालीपर्यंत प्रत्येकाला या कालावधीत वेगवेगळ्या समस्यानां तोंड द्याव लागलं .
मार्चमध्ये लाॕकडाऊन सुरु झालं आणि उमज न पडणारी परिस्थिती निर्माण झाली . घराच्या आसपास जी भाजी मिळेल ती आणायची आणि भागवायचं हेच चित्र सर्वत्र होतं . आंतराअंतरावर , रस्त्यावर , गाड्यावर विवीध ठिकाणी पोलीसांचा दंडूका चुकवत भाजीवाले लोक भाजी विकताना दिसू लागले . तरतरीत दिसणाऱ्या भाजीवाल्या सुकलेल्या शेपूच्या पेंडीसारख्या भासू लागल्या त्यांच्या नजरेत भेदरलेपणा होता . एप्रिल-मे सारख्या कडक उन्हाळ्यात त्यांची अवस्था गारठल्यासारखी झाली होती . प्रत्येक आठवड्यात बदललेल्या आदेशाप्रमाणे नियोजन करावे लागायचं . सुरवातीच्या काळात अत्यंत गोंधळाची परिस्थिती होती . नेहमीकरता सगळं आवरुन सकाळी आठनऊ वाजता मंडई सुरु करायची ते सगळा माल संपवूनच घरी परतायचं ही सवय आणि कोरोनामुळे सकाळी सात ते नऊ या वेळातच भाजी विकायला परवानगी मिळू लागली . सातला भाजी विकायला जागेवर बसायचं म्हणजे पहाटे चारपासूनच कामाला लागावं लागायचं . भाज्यांच्या लिलावात पण अनिश्चीतता असायची माल कुठून घ्यायचा तो कुठे ठेवायचा आणि कुठे विकायचा यामध्ये गोंधळ निर्माण व्हायचा . समजा हातगाड्यावर भाज्या घेऊन विकायचं ठरवलं तर काहीवेळा गिऱ्हाईक चोहोबाजूंनी गर्दी करायचे तशातच जर पोलीसांची गाडी आली तर जीव मुठीत घेऊन काठ्या लाठ्या चुकवण्यासाठी पळता भुई थोडी व्हायची . आधी अनियमीत दराने पैसे देऊन भाजी मिळवायची मग रिक्षा किंवा वहान मिळायचं नाही म्हणून मुलाच्या , नवऱ्याच्या गाडीवर पाठीमागे जास्तीतजास्त भाजीच्या गोण्या बसवायच्या यादृष्टीने साडीचा काष्टा घालून कमीतकमी जागेत गाडीवर दोन्हीकडे पाय टाकून गोण्या धरुन बसायचे . आणलेला माल हातगाडीवर कसाबसा माल लावायचा मग गिऱ्हाईक जास्त आलं , गर्दी झाली तर एकीकडे या गर्दीत कोणी करोनाचं पेशंट असेल का ही धास्ती आणि पोलिसांची गाडी येते का ही दुसरी धास्ती समजा पोलीस आलेच तर गर्दी केली म्हणून आरडाओरडा , फटके कधीकधी माल उचलून नेणे , उधळून लावणे असेही प्रकार व्हायचे . जास्त गिऱ्हाईक आल नाही तर भाजी न संपण्याची भिती आणि नऊदहापर्यंत जर भाजी संपली नाही तर उरलेल्या भाजीचं करायचं काय दुसरे दिवशीपर्यंर सुकून जाणार म्हणजे नुकसानच ! मग पहाटेपासून एवढी ओढाताण करुन पदरात काय पडलं हा तर वेगळाच मुद्दा .
यातही सगळ्याच जागा बदललेल्या . नेहमीच्या ठिकाणी किंवा मंडईत शौचालयाची सोय असायची मग रोडवर किंवा गाडा घेऊन जायचं म्हणलं तर ही मोठी अडचण होऊन बसायची . त्यातही कोणी महिला गरोदर किंवा लहान बाळ असलेली असेल तर तिच्या वेगळ्याच समस्या असायच्या . मग या सगळ्यापेक्षा कामच न करण्याचा निर्णय घेतला तर काम नाही तर पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . अनेकजणींनी थोडीफार धडपड केली पण त्रास अधिक नुकसान होतंय हे लक्षात आल्यावर घरीच थांबणे पसंत केले .
डिसेंबरमध्ये मार्केट सुरु झालं . सुरु झाल्यावर पहिल्याच शनिवारी मी काळजी घेत बाजारात गेले . संपुर्ण मंडईत चक्कर मारली आपापल्या ठिकाणी भाजीवाल्यांना पाहिल्यावर मनाला समाधान वाटलं . या कोरोनाच्या कालावधीत भाजी घेताना जाणीवपुर्वक भाजीवाल्यांशी संवाद साधत होते . तर नव्याने बळ बांधत प्रत्येकजण उभं रहाण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येकाच्या जिवनात कमीजास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेतच .
बऱ्याचशा मोठ्या भाजीवाल्यांनी मुलांसाठी रिक्षा , गाडी , टीव्ही किंवा इतर कारणांसाठी फायनान्सचं कर्ज घेतलं होतं . धंदा बंद , गोंधळ निर्माण करणाऱ्या आफवा मग बँकेत पैसे भरले नाहीत परिणामी हप्त्याचे चेक परत गेल्यामुळे सहा सहा महिने दंडाची रक्कम बँकेत आणि फायनान्सवाल्यांकडे असे डबल डबल चार्जेस लागले . त्याविषयी व्यवस्थित माहिती मिळत नव्हती . आणि आता एकदमच हप्त्याचे व दंडाचे पैसे भरायचे शिवाय धंद्याचा तितकासा जम अजून बसलाच नाही , गोंधळ निर्माण करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची वेळ आली . मग सगळा मेळ घालणं कठीण होऊन बसलं . यासाठी पहिला मार्ग म्हणजे छोटेमोठे दागीने गहाण ठेऊन कर्ज काढणे .
छोट्या भाजीवाल्यांना मात्र शेतात माल पिकूनसुद्धा आधी वाहतूकीची अडचण मग कसबसं शहर गाठलं तरी माल विकायचा कुठे आणि कसा आणि विकला तरी काहीवेळेस बरा भाव मिळाला तर काहीवेळेस कवडीमोल भावात विक्री करावी लागली . मग या गोंधळात मालाचं शेतातच नासून जाणं डोळ्यांनी पहावं लागलं फायदा तर नाहीच पण केलेला खर्चही गेला . नाशवंत मालाचं खूपच नूकसान झालं . योग्य वेळेत मार्केटींग जर झालं नाही तर मालाचा कचराच व्हायचा .
" तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं "
असं काहीसं बऱ्याजणाचं झालं .
फळवाल्या बागवानांची काही वेगळी परिस्थिती नव्हती माल खरेदी केला आणि विकला गेला नाही तर डबल नुकसान व्हायचं मग निवांत बसलेलं बरं असं म्हणत गुपचूप बसायचे . मग जेवढा मोठा धंदा तेवढी बुडणूक जास्त व्हायची . आम जनतेने भाज्यांना पर्याय म्हणून डाळी कडधान्याची निवड केली पण त्यामुळे त्यावेळचा भाजीवाल्यांचा धंदा बुडलाच !
या धंद्यासाठी ज्यांनी पुणे मुंबई सारखी शहरं जवळ केली त्यांना एकतर शिल्लक असेल तर असलेल्या शीलकेतून घर भागवणे किंवा परत गाव गाठणे हे दोनच पर्याय होते . पण दिवस गेला की त्यादिवसाची कमाई बुडायची असं मात्र खुपजणींच झालं .
डोक्यावर टोपलं घेऊन भाजी विकणारांना फारसा फरक पडला नाही त्यांच्या ठरलेल्या घरी त्यांची भाजी विकली जायची , भाजीला गिऱ्हाईक पण तितकच होतं पण सुसुत्रता नसल्यामुळे शेतकरी , व्यापारी आणि गिऱ्हाईक या सगळ्यांना आडाचणीचा सामना करावा लागला हे मात्र कटू सत्य आहे ! खाणारांना पर्याय होता पण विकणारांनी काय करायचं हा मोठा प्रश्न होता .
काॕम्रेड सरिता कुलकर्णी
sariakulkarni67@gmail.com
वूमन कौन्सिल कन्व्हेनर
बँक आॕफ महाराष्ट्र एम्प्लाॕईज युनियन औरंगाबाद