Friday, January 15, 2021

कोरोना आणि ती ( 1 घरकामवाली )


कोरोना आणि ती

माझं मनोगत




2021 साल उजाडलं आणि जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत सुरु झालं म्हणायला हरकत नाही . 2020 सालासारखा अनुभव यापुर्वी येणं तर लांबच पण ऐकिवात सुद्धा नसलेली परिस्थिती मीच नाही तर संपुर्ण जगाने अनुभवली . आपल्या आजुबाजूला असणारी , नेहमीच संपर्कात असणारी इतकी माणसं यादरम्यान बऱ्याच दिवसांनी तर  काहीजण बऱ्याच महिन्यांनी भेटली . कहीजण अजून भेटायचे आहेत कदाचित ती भेट होईपर्यंत एक वर्षसुद्धा झालेलं असू शकेल . 
 या कालावधीत 
" बरंच पाणी पुलाखालून गेलं "
हा परवलीतला शब्दप्रयोग पण त्याचा खोलवर अर्थ लावायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने कोरोनाकाळातच लागला . पाणी वहाण्याचा जो वेग असतो त्या वेगाने किंवा वाऱ्याच्या वेगाने लोकांना अनुभव येत गेले म्हटलं तर आतिशयोक्ती होणार नाही . मग काहींच्या जिवनात संथ वहाणाऱ्या कृष्णामाईप्रमाणे संथ अनुभव आले तर काहींना उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे अंगावर येणारे अनुभव आले तर काहीजणांच्या आयुष्यात वावटळ आलं . अनिश्चित आणि अकल्पीत असं काहीसं त्याचं स्वरुप आहे त्यामुळे संमीश्र आणि विचलीत भावना आहेत . बँकेत आणि संघटनेत काम करत असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात मैत्रिणी आहेत त्या फक्त मैत्रिणी नसून कार्यकर्त्या आहेत . आमचा फोनवर संपर्क व्हायचा तेव्हा चर्चेआंती हेही जाणवलं की भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा अनुभवात वैविध्य आहे . बँकेत काम करत असतांना काऊंटरवर आलेल्या महिला किंवा रोजच्या व्यवहारात संपर्कात आलेल्या अनेकजणी आहेत जसं की  घरकामवाली , भाजीवाली , मजुरी करणारी , दुकानात काम करणारी , कोणत्याही खाजगी क्षेत्रात काम करणारी महिला . आरोग्य खाते , पोलीस खाते , बँका , शाळा , अंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी आणि कोणत्याही सरकारी खात्यात काम करणारी महिला . कोणताही स्वतःचा छोटासा किंवा मोठा व्यवसाय करणारी महिला विशेष करुन बचत गटातील महिला ! यांचे चांगले , वाईट , भयावह , दारुण , हिंसक , व्यसनीधीनता असे अनेक अनुभव अनेकींच्या वाट्याला आलेले ऐकायला मिळालं . यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे  वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आहेत त्यांच्याशी संवाद साधून भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला . आणि मैत्रीण असलेल्या प्रा. डाॕ. भारती रेवडकर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे त्याच संकलन करत आहे . मग माझ्या काॕम्रेड मैत्रीणी आणि बहिणी यांच्याकडून नांदेड , औरंगाबाद , लातूर , सोलापूर ,अमरावती , नाशिक , पुणे , मुंबई इत्यादी ठिकाणाहून अनेक अनुभव ऐकायला मिळाले . त्याला अनेक कंगोरे होते . काही मन हळवे करणारे तर काही अंतःकरण पिळवटून टाकणारे तसेच काहींनी त्याचा आनंदही लुटला तर काहींना फारसा फरक पडला नाही . एकच परिस्थिती पण प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी भासली . अशा विविध व्यक्तीमत्वांच आवलोकन करण्याचा  , शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .



1) घरकामवाली 


मंगल जवळजवळ पंचवीस वर्षापासून धुणं-भांड्याची कामं करते . सततच्या कष्टाने आणि पिणाऱ्या नवऱ्याचे तरुणपणीच निधन झाल्यामुळे तिला अकाली प्रौढत्व आलेलं . कसंबसं उसनवारी करत मुलीचं लग्न केलं तोवर मुलगा पण हाताशी आला चार पैसे कमवू लागला मग त्याचही लग्न तिने लवकरच केलं . केशकर्तन हा त्यांचा  पिढीजात धंदा पण भांडवलाअभावी मुलाला दुकान टाकणे शक्य झालं नाही म्हणून मग तो दुसऱ्याच्या दुकानात पगारावर काम करतो . मुलाचं मुलीचं थोडंस रांकेला लागलं असं वाटत होतं थोडीशी मोकळीक मिळाली असं मंगलला भासू लागलं तोवर जावई पण व्यसनी असल्याचं लक्षात आलं . तिच्या मनानं ते मान्य करेपर्यंत तर जावयाचं पीणं हाताबाहेर गेलं . संपर्कात आल्यामुळे मुलगा पण हळूहळू पिऊ लागला आणि त्याच वाटेवर चालू लागला त्यामुळे घर चालवण्याची हिची जबाबदारी काही संपली नाही उलट दोन नातवंडांची त्यात भरच पडाली  ! जावयाचं पीणं इतकं बेताल झालं की त्याचा शेवट वाईट झाला . दोन वर्षांपुर्वी तिचं स्वतःचं जे झालं तेच तिच्या मुलीच्या पदरी आलं जावई अकाली गेला आणि तरुण मुलगी व छोटीशी नात पुन्हा अनाथ झाल्या . या पंधरा वीस वर्षात या साऱ्या घटना मंगलच्या आयुष्यात उमज पडू न देता अतिशय वेगाने घडल्या ! मग नुकतीच  पन्नाशी ओलांडली असली तरी मंगल मानसिक व आर्थिक जबाबदाऱ्यांनी आहे त्यापेक्षा वयस्कर वाटू लागली  आताशा थकल्यासारखी भासू लागलीय .

      " आता मला लै कामं व्हुईना झालेती वैनी , बाकीची कामं सोडनार हाय मी . तुमचं आन , डाक्टरचं आशी दोनतीनच कामं करनार हाय बगा ".
 अधूनमधून असं सारखं तिचं चालू असतं पण घरच्या जबाबदाऱ्या पहाता तिला तसं करणं शक्य होत नव्हतं . त्यात कोरोनाचं वादळ आलं आणि एक दिवसाची संचारबंदी लागू झालेली तिने ऐकलं आणि कामाला घरी आल्यावर परत जातांना सांगू लागली , 
" वैनी , उद्या समदच बंद हाय जनू , मग न्हाय येनार लई कटाळा आलाय कामाचा बी ऱ्हाते बया घरी ".
आता काही ईलाजच नाही म्हटल्यावर मी गप्पच बसले पण संचारबंदीला जोडूनच लाॕकडाऊन झालं आणि लोकांचे फिरणं बंद झालं . कामाला कोणीच येत नव्हतं पण मनात फार धास्ती वाटत होती . कारण कपडे धूणं , केर फरशी कसही करता येईल पण आता मुलं घरी आली होती मग भांडी पण घासावी लागणार आणि ते काम माझ्यासाठी फार अवघड होतं आणि कामाला ये म्हणावं तर कोरोनाची धास्ती ! पाहू कसं होतं ते असं म्हणत मी वेळ नेली मारुन पण मालकीण म्हणून मी पुरती कोलमडून गेले होते . मग घरात सगळेजण वाटून कामं करु लागलो . आठ दहा दिवसात आमची हालत बेकार झाली होती कारण कामवालीची एखादी दांडी सुद्धा सहसा सहन होत नाही तिथं सलग काम करणं म्हणजे महाकठिणच . पंधरा दिवसांनी एप्रीलच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळी मंगल पैसे हवे म्हणून दारात हजर झाली आणि ती मला देवाप्रमाणे भासली मधूनच कोणी एप्रील फूल तर नाही करत ना असे मला वाटले . मी भानावर येत अंगणात गेले तर ती मला पाहून म्हणाली 
" वैनी उद्यापास्न मी मास्क बांधून येते , साबणानं हात धुते भांडी भाईरच घासून उनात वाळाय घालते चांगली तापल्यावर न्ह्या आत पण आता मी कामाला येते , कोणी आडवलं तर दावाया डाक्टरंनी मला पास दिलाय मग चालल ना तुमास्नी ".
मी आनंदाने तिला परवानगी दिली मला एकदम हायसं वाटलं होतं . कारण केर फरशीची कमल पण येत नव्हती घरात राहूदे पण बाहेरच्या बाहेर जेवढं होतं ते तरी करुदे मला तिची खूपच गरज होती . काळजी घेऊन करु , काय हरकत आहे नाहीतरी घरात सगळे बीझी आहेत हे काम अवघडच की ! मी लगेच परवानगी दिली व पडलेली भांडी घासायला देऊन थोडंस लांब कट्ट्यावर बसून तिच्याशी गप्पा मारु लागले . तर भांडी घासतच ती सांगू लागली 
" वैनी , तुमची दोनतीन घरं सोडली तर समद्या बायांनी मार्च महिन्याचं खाडा कापून तीन आठवड्याचंच पैसं दिलंत बगा . तेबी आता कामाला येऊ नगस आमी जवा सांगू तवाच ये म्हनून सांगितलय बगा  , आता मला कामंच न्हाईत काय करावं रेशन मिळतंय पर भागत न्हाई वर पैसा लागतोय बगा  ".
मग बराच वेळ तिच्याशी बोलत बसले आणि या गप्पा परवापर्यंत आमची भेट होईल तेव्हा सुरुच होत्या . तिचा या आठदहा महिन्यात झालेला प्रवास मात्र आंतर्मुख करायला लावणारा होता .
कामाचा कंटाळा आलेली मंगल आता काम कुठे मिळंल का ? या शोधात होती . ज्यांची कुवत आहे त्यांनीसुद्धा तीला खाड्याचे पैसे दिले नव्हते तर कोणी सढळ हाताने मदत केली होती . रेशनला तांदूळ जास्त मिळत होता तर ज्वारी महाग वाटत होती म्हणून ज्वारी-तांदूळ दोन्ही निम्मनिम्म करुन भाकरीसाठी दळून आणत होती . कित्येक दिवस डाळ-भात-भाकरी हेच त्यांच जेवण होतं .
सलून बंद असल्यामुळे मुलगा घरीच बसून होता . पैसा कमावणं लांबच पण वाडीवस्तीवर कुठं प्यायला मीळेल का यासाठी वणवण भटकायचा , पैशासाठी आईला , बायकोला भांडायचा . प्यायला मिळालं नाही की त्याला थरथर सुटायची मग घरात रोजंच भांडणं , हाणामारी , रडारडी व्हायची , लहानलहान पोरं पण रडायची . तिची सुन थोडफार हिच्याबरोबरच कामाला जात होती हिचीच कामं बंद झाली तर तिला कुठून काम मिळणार . दोनचार घरातून उसने पैसे नेऊन संपून गेले आता काय करायचं .बऱ्याचवेळा  टक्केवारीनं पण पैसे काढायची . तसं तिला हातातोंडाचा मेळ घालणं पण नेहमीच कठीण होत होतं मग व्याज भरुनभरुन ती बेजार व्हायची . मुलगा जरी नशेत धुंद असला तरी लहानलहान नातवंडांसाठी मंगलचं काळीज रक्तबंबाळ होत असायचं मग फिरुन बळ आणून ती कामाला जायची .....


याउलट कमलचं होतं . दोन मुलं आणि नवराबायको असं तिचं चौकोनी कुटूंब . नवरा एका खाजगी बँकेत सिक्युरीटीचं काम करतो , त्याला पगार कमी आहे मग मुलं शिक्षणात बरी आहेत पैसा पुरत नाही म्हणून थोडासा खर्चाला हातभार लागावा म्हणून कमल घराबाहेर पडली सुरुवातीला दोन वर्षे तिने दुकानात काम केलं . पण दुकानात दहा ते आठ असं दहा तास म्हणजे जरा जास्तवेळ बांधील रहावं लागतं म्हणून मग ते काम सोडलं आणि चार घरी स्वैयंपाकाचं आणि फरशीचं काम करायला सुरुवात केली . तिच्याकडे बांगड्या भरण्याची कला होती   म्हणून मग ती जोडधंदा म्हणून बांगड्याचा व्यवसाय  करायची त्यामुळे संसाराला थोडासा हातभार लागायचा  परिस्थिती जरा बरी झाली . त्यामानाने कमलचं वय लहान होतं चुणचुणीतपणा आणि काहीतरी करण्याची आस ,  ध्येय आणि धडपडी वृत्ती असल्यामुळे तिच्या डोळ्यांत नेहमी वेगळीच चमक दिसायची . लाॕकडाऊन झालं तसं तिचं कामाला येणं बंद झालं . मग मधूनमधून फोन करायची येऊ का विचारायची . कधीतरी उसने पैसे न्यायची . असंच जूनमध्ये एक दिवस घरी आली होती मग तिचं कसं चालू आहे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला .
तिने सांगितले काम नसल्यामुळे आधी महिनाभर जरा झोपच काढली मग आळशीपणा वाढू लागला सुस्ती आली म्हणून घराजवळ पोळीभाजी पुरवणारी एक संस्था होती तिथे पोळ्या करायला जात होती रोजगार मिळत होता . शिवाय मिळणारं रेशन , नवऱ्याचा पगार यात जेमतेम भागत होतं पण उदास वाटतं म्हणाली . कोरोनांमुळे लग्नंपण बंद होती आणि सणवार पण साजरे झाले नाहीत मग बांगड्याचा धंदा बंदच होता म्हणाली . मग हातात पैसा रहात नव्हता जेमतेम घर भागत होतं आणि आता घरीच बसून रहायचा पण कंटाळा आला म्हणून काम सुरु करावं असे तिला वाटू लागले . मंगल भांड्याला येते तर मी पण काळजी घेत माझ्या कामावर येते असा तिने तगादा लावला . पण हिला कामाला बोलावल तर हिचं काम घरात करावं लागणार होतं मग मी पण  थोडंस लांबवत लांबवत   सप्टेंबरपासून तिला बोलावलं तर त्याचाही तिला खूप आनंद झाला . एकूणच काय पैशासाठी म्हणा , गरज म्हणून म्हणा प्रत्येकजण आपल काम करायला मनापासून 
तयार होता हे खरं !!



 " पुणे तिथे काय उणे " म्हणत आलीकडे हाताला काम नसेल त्या बऱ्याचजणांनी पुणे गाठलंय , पूनम त्यातलीच एक ! तिचं मुळ गाव कोकणातलं पण भावाभावाच्या  वाटण्या झाल्यावर शेतीतील उत्पन्न त्यांना पुरेना त्यात दोन मुली एक मुलगा असं जरासं वाढलेलं कुटुंब आहे तर काहीतरी करुन खाऊ म्हणून दहा वर्षापासून पुण्यात रहातेय तसं बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं . दोघं नवराबायको मिळून कमवत होती मुलांना शाळेत घातलं होतं पूनम फारशी शिकलेली नव्हती मग लोकांकडे   घरकाम करायला तिने सुरुवात केली . कोकणातल्या खेड्यातून आली पण पुण्यासारख्या शहरात एका वर्षातच तिने तिथल्या काम करण्याची पद्धत आणि गरज याचं निरिक्षण करत कामं मिळवत गेली मग दिवसभर पुरतील एवढ्या घरी कामं करायचा तिने सपाटा लावला . बऱ्यापैकी बस्तान बसलं घर व्यवस्थित चालू लागलं . आठनऊ वर्षे कशी गेली समजले नाही आणि लाॕकडाऊन झालं ! तरी सुरवातीचे दोनतीन महिने आहे ती पदरमोड करत असलेल्या शिलकेतून तिने घर भागवलं . काही घरी  पैसे दिले पण चारपाच महिन्यांनी घर चालवणं कठिण होऊ लागलं . घरभाडं थकू लागलं तसा तिने पुन्हा सगळं गबाळ गुंडाळून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा तिला तो नाईलाजाने घ्यावा लागला......


नांदेडमध्ये काम करणाऱ्या रंजनाचा अनुभव काही वेगळंच शिकवून गेला . चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीचा घर आणि व्यवसायाचा मोठा व्याप होता . त्यामुळे त्यांनी आपल्याच कंपाऊंडमध्ये दहा वर्षापूर्वी रंजनाची कुटुंबासह  रहाण्याची सोय करुन दिली होती . रंजना व तिचा नवरा दोघेही त्यांच्याकडे राबत होतं . दुर्दैवाने मालकांचे वडील आजारी पडले एकदोन दिवसात ते कोरोना पाॕजिटीव्ह निघाले पर्यायाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आले . त्यात रंजनाला पण टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आलं तर याठिकाणी रंजनाची व्यवस्था पहाण्यास मालकांनी नकार दिला . हे सारे सोपस्कार  रंजनाला स्वखर्चाने करावे लागले व ते करत असतांना रंजनाचे संपुर्ण कुटुंब दोन दिवस होरपळून निघालं . आणि रिपोर्टमध्ये मालकांचे पुर्ण कुटुंब पाॕजिटीव्ह आणि रंजनाचं कुटूंब निगेटीव्ह आलं . त्यांच घर मोठं असल्याने आजोबा सोडता बाकी सगळ्यांना घरातच क्वारंटाईन रहायला सांगितले तर त्यांनी रंजनाने घरात कामास येण्यासाठी आग्रह केला पण आता रंजना ही जोखीम स्वीकारू इच्छित नव्हती तिने ठाम नकार दिला कारण आलेल्या आनुभवावरुन आपल्याला कोरोना झाला तर मालक पहाणार नाहीत ही तिची खात्री झाली होती . तर रंजना कामाला न आल्याचा मालकांनी मनात राग धरुन तिला पैसे तर दिले नाहीतच शिवाय तिला जागा सोडण्यास भाग पाडले . कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक एकमेकांना मदत करत असल्याचे दिसत होते तितकेच काहीजण निष्ठुरपणेही वागत होते यामध्ये रंजनासारखे मात्र होरपळून निघाले ...........


वंदनाचा अनुभव तर भयचकीत करणारा होता . आगदी सुरुवातीच्या काळातील ही घटना आहे . चार पोलीस एक फ्लॕट भाड्याने घेऊन रहात होते . एक वर्षापासून वंदना त्यांच्याकडे कामाला होती भाजी आणण्यापासून स्वयंपाक , झाडू-पोछा व भांडी अशी सगळी कामं ती करायची तिच्याकडे घराची एक किल्ली पण देऊन ठेवलेली होती . या कालावधीत पोलीसांना विविध विभाग दिले जायचे . त्यामुळे या चार जणांचे नऊ मित्रांना या विभागात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटी मिळाली . ते परगावचे होते त्यामुळे तेराजण आंघोळ जेवण व ड्युटीप्रमाणे आळीपाळीने फ्लॕटवर असायचे . यापैकी एकजण पाॕजिटीव्ह निघाला की लगेच गाडी येऊन फ्लॕटवर आसलेले सर्व पोलिस व काम करत असलेली वंदना यांना गाडीत घालून घेऊन गेली . दोन दिवस तिच्या घरच्यांना तिचा पत्ता लागला नाही . तु निगेटीव्ह निघाल्यावर तिला चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन रहायला सांगून गाडी निघून गेली . कुठेच काही समजत नव्हते त्यामुळे दोन दिवस घरच्यांच्या तोंडचं पाणी पळालं एवढं खरं !


हे आणि यासारखे विविध ठिकाणी विवीध प्रसंग घडले . दिल्ली-मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून तर घरकाम करुन घर चालवणाऱ्या लाखो महिला आहेत ज्यांचे संसार या कालावधीमध्ये अडचणीत आले . सरकारने तीन महिन्यांसाठी दरमहा देऊ केलेले रु.500/  बँक खात्याला आधारजोड नसल्यामुळे मिळू शकले नाहीत त्यासाठी अनेकजणी हळहळ करत गेलेल्या अनेक अनुभव बँकेत आले . तसेच अनेक घरी या कामवाल्यांचा वावर असल्यामुळे मोठमोठया सोसायट्यामध्ये त्यांच्या येण्यावर बंदी घातली गेली . पुढेपुढे तर त्यांनी फक्त एका सोसायटीतच काम करायचं त्यांच्यासाठी बंधनकारक केलं . सुरुवातीच्या कालावधीत तर काम नाही मग पगार नाही अशी त्यांची अवस्था झाली . काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांकडे काम केल्यामुळे त्यांना स्वतःला आजाराला सामोरं जावं लागलं तर यांच्या माध्यमातून कोरोना पसरतोय या नजरेने लोक पहायचे त्याला तोंड देणं ही वेगळीच कटकट होऊन बसली होती . पण प्रत्येक बाई गरिब आसो वा श्रीमंत , शहरात असो वा खेड्यात शिकलेली असो वा आशिक्षीत समोर उभ्या ठाकलेल्या प्रसंगाशी मोठ्या हिमतीने दोन हात करत होती . आला प्रसंग निभावून नेत होती !



काॕम्रेड सरिता कुलकर्णी 

saritakulkarni67@gmail.com

वूमन कौन्सिल कन्व्हेनर

बँक आॕफ महाराष्ट्र एम्प्लाॕईज युनियन औरंगाबाद 











No comments:

Post a Comment