Thursday, May 20, 2021

आकांक्षा वाचन


कविता  वाचन

1) ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

     वेगळं राहायचं भारीच सुख.


ऊन ऊन खिचडी साजुकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं ते बाजारच सारा.

सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,

जावेच्या पोराची सदा पीर पीर.

पाहुणे रावळे सण नी वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,

वेगळं राहायचं भारीच सुख.

सगळ्यांना वाटतं माझ घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर ढलपी.

बाबांची माया काय मामंजीना येते,

पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,

वेगळ राहायचं भारीच सुख.

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायच.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकुट अन् दह्याची साय ,

त्यावर लोणकढ साजुक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

रडले पडले नी अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांच काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहु नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी

बाळ रडल तर ते खपायचं नाही,

मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.

स्वयपाक करायला मीच,

बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,

वेगळं रहायच कळायला लागल सुख.

सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान

करीत तरी होत्या

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची,

नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलय तुप,

अन् वेगळं व्हायचं कळलय सुख.


2) कविता वाचन 

       

मुक्तता आणि व्यथा


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देईल का मग उत्तर त्याच तुमच्यापैकी कोणी एक II ध्रुII

 

रूप माझं मोलकरणीचं, कष्टकरी शेतकरणीचं

गणित सारखं आखत आसते उत्तरी मेळाचं

दिवसं-दिवस, महिनोंमहींने सरलं सार वर्ष

तरी का मग सुटत नाही गणित हे मेळाच

बेरीज कमी अन वजाच जास्त पारड का नाही समतोलाच

हसत हसत स्वागत करते येणाऱ्या प्रत्येक दिवसचं

मग आत्महत्या न दारू-जुगार हत्यार का या पुरुषांच II 1 II


मी बाई पडले पांढरपेशी कशाला करू कोणाची चौकशी

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही

सणवार, ,व्रतवैकल्ये नेमानं मी करतच राहीन

मी केल ते तू पण कर म्हणत पुढच्या पिढीला रेटतच राहीन

सवाल येतो काय कमी आहे तुला या भरल्या संसारी

पण सन्मान माझा कुठे गेलाय ? मन आक्रांदतय उरी II 2 II


एकविसव्या शतकात म्हणे स्त्री स्वतंत्र झाली

करीयरच्या नावाखाली तिला कवाडं मुक्त केली

का एकटीच अडकतीय ती नोकरी-रिवाजाच्या जोखडात घट्ट 

का मग बांधलाय गळ्यात तिच्या कासरा बंधनाच घट्ट

आखीव परिघातच राहून तिने हुंदडायचाय म्हणे मुक्त

 नभी उंच भरारी घेत तिने का पाळायचेत रीतिरिवाज सक्त II 3 II


जन्माआधीच मुलीच आस्तित्व नाकारणारी जात

लेकीबाळीचं भक्ष्य करणारी लांडग्याची जात

हुंडाबळी, शोषणकर्ती नराधमांची जात

गल्लीपासून दिल्ली पर्यंत वय पण नं पाहणारी जात

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जात

कधी करणार आहोत आपण या मानसिकतेचा नि:पात  II 4 II



8  मार्चच्या संघर्षदिनाला का आलय उत्सवाच रूप

उत्सव कसला म्हणताय त्याला आलय बैल पोळ्याच स्वरूप

एक दिवस करताय कौतुक घालून बेगडी झुल

चार दिवस सोहळ्याचे, झाले स्थिर की पुन्हा सारे गूल

सन्मान असावा माणसासारखा नको मला ही नुसती झुल

राहील का मग माझ्यासाठी प्रत्येक दिन जणू उमलत फुल II 5 II


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक

देइल का मग उत्तर त्याच  तुमच्या पैकी कोणी एक

पण ----------पण ---------

सावित्रीचीच लेक मी उत्तर शोधीन नक्कीच नेक

लढेन व्यवस्थेशी बदलून टाकीन करून सर्वाना एक



3) वाचन - पत्र

निर्भयाचे समाजातील कुमारवयीन 

मुला-मुलींना उद्द्शून पत्र


आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक

तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक

होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय


लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली


आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला


आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय


जरा उशीरच झालाय , माहितीय मला 

मला हेही माहितीय  की , घालमेल चाललीय तुमची 

काय घडतंय आजूबाजूला 


आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी 


तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार

म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला 


तुमचं बाळ जन्माला आलं न ,

की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या

म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,

ते मुल मोठं केल्याचा 

आभिमान वाटेल तुला


त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा


तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून , 

स्त्री आणि पुरुष ,  ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं 

निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी ,  विज्ञानयुगातसुद्धा 

त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं 


तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस

असं ठसवंच त्याच्या मनावर


खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील

तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला

मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस , 

असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस


फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ


एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,

होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी


तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना 

तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला


सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला 


त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .


तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी

प्रेम , माया , शिक्षण , संस्कार 

वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं 


आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण

आणि होऊदे

सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार


अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं

आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला


आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्

 


4) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे स्वगत

    तुला शिकवीन चांगलाच धडा


मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून )
असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी?
थांब 
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.
तुजा  क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज, 
माजी चाटत येशील बुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा शुद्ध बोलायला शीक.
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा 
हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,
लव्हली, चार्मिंग, ब्युटी हाय, समदे धरत्याल मंजूचे पाय. 
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा 
हाय मंजू, हाय दिलीप....
हाय मंजू, हाय फिलीप...
मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू
कम कम, गो हँगिंग गार्डन, आय बेग युवर पार्डन?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्याची कुडी,
कुनी घालतील फुलांचा सडा! तुला शिकवीन चांगलाच धडा!
मग ? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,
नदरेला जेव्हा नदर भिडंल, झटक्यात माज्या पायाच पडंल  
म्हनल, रानी, तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती कैसी अदा.
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग.
मी मात्तर गावठीच बोलीन, मणाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढंल लाजेची लाली, नदर जाईल अलगत खाली 
म्हनेन त्याला, ह्ये काय असं, लोकांत उगंच होईल हसं
कुम्पणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव?
हि-याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटाराच्या पान्याला सोन्याचा घडा ? 
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर पन हो माझी सून  
दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हनत्याल, राजाचा मान तरी राख 
तोरणं बांधा न् रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा  !
मग मंजू म्हनल, म्हाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. 
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीनं गर्दन छाटा 
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पाटलून काढून चाबकानं फोडा.
म्हाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रे घोडंस्वार
हा हा हा हा 
जावा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला. 
धरशील पाय आन लोळ्शील कसा, रडत -हाशील ढसाढसा 
तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा
तू   म्हनशील, मंजुदेवी तुला आलो मी शरन
मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.  



5) नाटक - ती फुलराणी मंगल साळुंखेचे गाणे

     मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगत.....


हे मला फोरीस्टाच्या शापामधल्या बाईगत हुयाचं हाय

( 3 वेळा )


ये काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी

फूलं इकायची हाये


मला फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाचं है

( 2 वेळा )


आन आमचं हे फाटक्या पायताणावानी बोलनं 

मंग फोरीस्टाच्या शापात चाकरी कशी भेटाची


तितल्या पोरी कशा 

खीसपीस खीसपीस खीसपीस 

मंजूळ बोलत्यात


चकपक चकपक चकपक

चकंपकं दिसत्यात


या फोरीस्टाच्या शापामधल्या 

बाईगत हुयाच है


काल राती ह्यो बाबा म्हनाला

पैकं दी म्या शिकिवतो


आन आज म्या पैकं घेऊन 

टॕक्शीत बसूनशान आले 


आन अंगावर पाल चढल्यागत झटकतोय


सर मला फोरिस्टाच्या शापामधल्या

बाईगत हुयाचं हाय  

( 3 वेळा )


काचच्या म्हागं हुब ऱ्हाऊनशेनी फूलं ईकायची हाये


मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाईगात हुयाचं हाय

( 3 वेळा )



6 ) नवरात्रीचे नऊ रंग



1 ) अनाथांची माय 

      सिंधुताई सपकाळ



बेटा निराशेतून आशेकडे जावूयात न आपण ,
आपल्याला पाहिजे तो रस्ता आपणच काढायचा न ? आपल्यापासून दुसऱ्याचं भल व्हावं , आपल्यालाही जगता यावं हा माझा मधला रस्ता असतो !
बाकी इकडल तिकडल मला काही कळत नाही , अडाणी आहे रे मी .
मुक्काम पोस्ट फिरस्ती , जहा खाना वहा बस्ती !
जिथे भाषण आसत तिथे राशन मिळतं बाबा
मग मी जाते 
माझ्या भाषणामुळे लेकर वाढले , जबाबदाऱ्या वाढल्या .
भाषण झालं की पदर पसरून मागते 
देगा उसका भला ना देगा उसका भी भला 
भाषणाचे विषय माझे जगण्याचे असतात जे जगते ते फेकते , शिक्षण नाही आडाणी माई !
मायेचा रस्ता एवढा सोपा नसतो बेटा
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका . कारण काटयाना फक्त बोचण माहीत आसत वेदना कळत नसतात .
म्हणून कटयांशी दोस्ती करा.
पाय इतके मजबूत करा की काटे तुम्हाला सांगतील आईये वेलकम , हम चुबता है तुम चलना सिखो . 
काट्यातून चालणार फार मजबूत होत असतो बेटा .
फुलांसह काटे स्वीकारा .



2 ) पहिली महिला पंतप्रधान
      श्रीमती इंदिरा गांधी

मैं आज यहॉं हूं , कल शायद यहॉं ना रहूं ,

मुझे चिंता नही है , के मै जीवित रहू या नहीं रहू ,

मेरी लंबी उमर रही है ,

और मुझे गौरव किसी चीज पे है ??

तो इसी पे है , मेरा सारा जीवन सेवा मे चला गया , 

केवल इसी चीज पे गौरव है .

और जब तक मुझमे सांस है , तब तक सेवाही मील जये , 

और जब मेरी जान जायेगी , तो मैं कह सकती हूं , एक एक खून का कतरा , जितना मेरा है , एक एक बूँद एक भारत को जीवित करेगा ,

भारत को मजबुती देगा , और मेरी आशा है , नौजवान हो , या महिला हो ये सब इसको आप सोचे



Wednesday, May 5, 2021

कोंदण भाग 6

प्रकरण 26 वे

माझं पहिलं बाळंतपण

05/05/2021

          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!




प्रकरण 27 वे

आई - काकांची मनीषा पूर्ण

25/05/2021




       माझ्या बाळंतपणात  जवळजवळ सव्वा महिना होईपर्यंत आई रोज वेगवेगळ्या खिरी आणि पथ्यांचे प्रकार अगदी हिरिरीने करत रहायची तिची ती नेहमीचीच पद्धत होती . बाळंतीणीची काळजी घेण्याची तिची खास शैली होती . हेळसांड केलेली तिला अजिबात चालत नसे मग पथ्यात दूध , तूप , खसखस , डिंक , खारीक , खोबरं , बदाम , सुका मेवा , मेथ्या , पालेभाज्या  शेकशेगडी हे अगदी लक्षपुर्वक ती करायची व सगळं झालंच पाहिजे हा तिचा अट्टाहास असे . मला हे सगळे पदार्थ खायला खूप आवडायचे व पचायचे पण मग ती म्हणायची 

" नऊ महिने तुला खाण काही अंगी लागलच नाही , विश्रांती काय ती आत्ताच दोन महिने मिळणार . तुझ्या मागं डबल म्हणलं तर तिबल जबाबदारी आहे . एक तुझा स्वतःचा संसार , दुसरं नोकरी व आता बाळ आणि तिसरं परांड्याकडची जबाबदारी या कशातूनच तुला काही अंग काढून घेता येणार नाही . करावं तर लागणारच मग रडत करण्यापेक्षा हसतमुखानं  केलं की आपल्याला सुख व समाधान जास्त मिळतं त्यासाठी आपली तब्बेत आपणच जपावी म्हणजे सगळं सोपं जातं . म्हणून आत्ता मी करतेच आहे आणि तू पण बिनबोभाट खातेस हे मला फार बरं वाटतंय . बेबीनं बाळंतपणात खायला फार नकुसकंगोरा केलाय मला त्याचा भारी राग यायचा . पण राणी मात्र बिनबोभाट खात होती आणि तू तर आवडीनं खातेस मग मला पण करायला हुरुप येतो बघ !" 

       आईला स्वतःच्या सहा व तीन मुलींच्या प्रत्येकी दोन अशा एकूण बारा बाळंतपणाचा अगदी बारीकसारीक अनुभव होता . शिवाय वाड्यात , शेजारी असा अनेक बाळंतपणाचा तिला अनुभव होता . प्रत्येक वेळी जिवाचा आटापीटा करत अगदी उत्साहाने ती बाळंतपण करायची . कशातही कमतरता तिला मान्य नसे . आता माझ्यावेळच्या आईच्या भावना तर आणखीनच वेगळ्या होत्या . नाही म्हणलं तरी मुलगा झाल्याने आई-काका दोघेही मनोमन खूष होते . आई नेहमी म्हणायची 

" आमच्याकडे जरा मुलांची वणवा आहे वाणीकिणीचं हा दुसरा मुलगा झालाय घरात , लहान बाळ असतांना मुलं जरा  नाजूक असतात मला मुलांच्या तब्बेतीचा फारसा अनुभव नाही त्यामुळे जरा भिती वाटते ".

मग काय करु आणि काय नको अशी तिची मानसिकता झाली होती . बाळाची तब्बेत थोडी जरी नरम गरम झाली की आई लगेच  हवालदील व्हायची .

     तीन आठवड्यानंतर बाळाला बीसीजी लस द्यायला आई घेऊन गेली व बरोबर काका पण गेले तर दवाखान्यात नर्सबाई काकांना म्हणाल्या 

" आरे व्वा आज दस्तूरखुद्द काका तुम्ही आलात नातवा बरोबर ! नवलच म्हणावं लागेल . आता बाळाचं नाव रजिस्टरला काय लिहू ते पण तुम्हीच सांगा ."

अजून बारसं झालेलं नव्हते त्यामुळे काय सांगावं त्यांना प्रश्न पडला .पण लगेचच काका  बोलून गेले 

" आमची मुलाची मानिषा पुर्ण झाली त्यामुळे लिहा मनिष "

आणि त्यादिवसापासून बाळाला सगळे मनिष म्हणू लागले .

 बाळ पण जन्मताच गुटगुटीत होत आणि दिवसेंदिवस  चांगलच बाळसं धरत होतं . आलीकडे आईचंही वय पन्नाशीच्या पुढे गेलेलं , भरपूर जबाबदाऱ्या व केलेले कष्ट त्यात डायबेटीस त्यामुळे तीला जरासा हळवेपणा आला होता . त्यातच बाळाला काही झालं की तिचा धीर सुटायचा . एकदा तर रात्रभर बाळ रडत होतं तिच्या अंदाजाप्रमाणे बाळाचं पोट दुखत होतं पहाटे तिने काकांना सांगितले 

" तसं तर मी बऱ्याच बाळांना घरगुती उपचार करते तसे याला पण केले आहेत पण या पोरावर प्रयोग करायला माझं मन धजत नाही आणि आता घरी थांबायचं माझं धाडस नाही सकाळी आठच्या गाडीला आपण बाळाला घेऊन पंढरपूरच्या दवाखान्यात जाऊ ."

काकांना पण मग दम निघत नसे ठरल्याप्रमाणे आम्ही आवरलं तर नेमका त्याच दिवशी बसचा संप असल्याचे काकांना बाहेर गेल्यावर समजले मग बाहेरुन येतानाच काका स्पेशल गाडी ठरवून आले व आम्ही दवाखान्यासाठी म्हणून पंढरपूरला गेलो . बाळाचे असे अनेक किस्से आहेत . 

      बाळाला न्हायला घालायला शांता परटीण होती . तेल लाऊन मनापासून खेळवत ती बाळाला चोळून मोळून आंघोळ घालत असे . बाळ तसं वजनदार होतं . चोळून झालं की मोरीत ती पाय पसरुन बसायची व बाळाचे पाय हातात धरुन बाळाला उलटं करुन हिंदोळे द्यायची तसतसं बाळ खूप हसायचं . ती शांताची पद्धत आईला माहिती होती पण आई तिला म्हणायची

" शांता पोर जरा मस्तीखोर आहे नको खेळवत जाऊ असं ".

आणि एक दिवस बाळाने उलटं केलं तसं पायाला जोरात झटका दिला आणि तेलकट बाळ तिच्या हातातून निसटलं पायावरुन लांब पुढे मोरीच्या तोंडाशी गेलं . आई पाणी घालायला जवळच उभी होती . काही सेकंद बाळ रडलं नाही आई व शांता दोघीपण इतक्या घाबरल्या की  विचारायची सोय नाही . पुन्हा बाळ मोठ्यानं तळतळून रडलं तसं त्यांना हायसं वाटलं पण  त्यादिवशी दिवसभर शांता घरी हेलपाटे घालत होती आईच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं . दोघींना पण चैन नव्हती शेवटी मीच दोघींना समजावलं 

" काळजी करु नका आधी पायावर पडून ते पुढे घसरलय त्यामुळे बाळाला काही लागलं नाही तेवढ्या वेळापुरतं ते खूप  रडलय पण पुन्हा शांत आहे ".

पण पुढे आठवडाभर आई मात्र बेचैन होती . शांता मात्र भितभीतच बाळाला आंघोळ घाली आई म्हणाली 

" दोडाचं भित्यापाठी ब्रम्हराक्षस आहे बाई "!

          बार्शीला बिऱ्हाड केलं होतं  तेव्हापासूनच  काकांनी शेतीचा बराचसा व्याप जाणूनबुजून कमी करत आणला होता . एक तर त्यांच वय पण साठीकडे झुकले होते आयुष्यभर बरीच उलाढाल केली होती . सगळ्या मुली आहेत त्यांच शिक्षण पुर्ण करुन चांगली मुलं पाहून द्यायचं व त्यांना स्थिरस्थावर करायचं यादृष्टीने त्यांनी त्यांचा संसार आवरता घ्यायला सुरुवात केली होती . नविन कोणताही व्याप वाढवायचा नाही आहे तो हळूहळू कमी करत आणायचा . शेतीतले गडी काढून वाटेकरी ठेवला होता त्यामुळे देखारेखीपुरतं किंवा वेळ जात नसला तर ते शेतात जायचे . त्यांचा हल्ली गुढगा पण दुखत असायचा . घरात त्यांची अगदी पहिल्यापासूनची कामं ठरलेली होती त्यात अंथरूण घालणे ,  काढणे , बंब पेटवणे , खड्ड्यातून पाण्याच्या घागरी भरुन देणे अशी कामात त्यांची मदत असायची . तर हल्ली रिटायर झाल्यापासून घरात छोट्या छोट्या कामात पण ते मदत करायचे दुपारच्या वेळी आई काही निवडत बसली की ते पण आईच्या शेजारी आराम खुर्चीत चष्मा घालून बसत व  गप्पा मारत ताटात धान्य घेऊन खडे काढून देत असत . लहान बाळांना खेळवणे हा त्यांचा आवडीचा छंद असायचा . वाड्यात ज्यांच बाळ लहान असेल ते एखादा तास तरी आमच्याकडे असायचं . आणि आमचं घरात जर बाळ असेल तर बराचवेळ ते घेऊन बसत असत . ते म्हणायचे 

" बाळ दिवसभर खेळूनखेळून दमतं त्याचे हातपाय चेपले की ते शांत झोपतं " 

असं म्हणत बाळाला काॕटवर टाकायचं आणि खेळवत खेळवत त्याचे हातपाय दाबायचे . मग बाळांना पण त्यांची सवय लागायची . मनिषला पण तशी सवय लागली होती त्याला काॕटवर टाकलं की आनंदाने पाय आपटत त्याचा खेळ सुरु होत असे.  दिवसेंदिवस  मनिष गोंडस दिसत होता . तोतो  आई-काका त्याच्यात खूप गुंतले होते . आता नवरात्र तोंडावर आलं होतं मनिष एक माहिन्याचा झाला होता . घेरडीत दसरा प्रकरण खूप भारी असतं , हे पण दसऱ्याला येणार होते मग बाळाला सगळे घेणार , त्याला बाहेर आणलं जाणार , मी पण इकडे तिकडे हिंडणार म्हणून सव्वा महिना झाला की नवरात्रातच एक दिवस आईने मला व बाळाला देवाला नेऊन आणलं . परत घरी येताना  दुसऱ्याच्या घरी थांबून घरी यायचं शास्त्र करायचं म्हणून मग येताना मी उषा वहिनी व प्रभा काकूकडे थांबून घरी आले .

वाड्यात कोणाच्याही घरी नविन बाळबाळंतीण  गेली की चहानाष्टा मग कौतुकाने ओटी भरणे , बाळाची टाळू माखणे हा कार्यक्रम अगदी सोहळा असल्यासारखा होई . अशावेळी  वाड्यातल्या सगळ्या काकू वहिनी एकत्र जमायच्या वाड्यात गप्पांना कधीच कारण लागत नसे आपापल्या दारात येऊन उभं राहिलं की सगळे एकत्र जमल्यासारखे वाटायचं आणि घरी निघालं की 

" आता उखाण घे बरं"

असा प्रेमळ हट्ट व्हायचा व चेष्टामस्करी , हसणे याला उधाण यायचं आणि एकीबरोबर सगळ्यांजणी एकमेकींना उखाण्याचा आग्रह करायच्या त्यात दीडदोन तास कसे जायचे समजायचं नाही . देवाला जाऊन आलं की मी जरासं वावरायला सुरुवात केली  मनिषला सोप्यात आणलं जायचं आणि दसऱ्या दिवशी तर थोडावेळ अंगणात पण आणलं  मग लगेच आई हाक देऊ लागली व म्हणू लागली

"शरु , देवाला जाऊन आलीस म्हणजे वागायला उठली नाहीस घरात चल आता बास झालं ".

आणि मग तिन्हीसांजेला गुटी वगैरे झाली की वेगवेगळ्या पद्धतीने बाळाची दृष्ट काढायची हे आईचं नित्यनेमाचं काम असे . 

घेरडीतला दसऱ्याचा सोहळा पाहून यांना तर खूप आश्चर्य वाटलं होतं . एवढं छोटसं गाव त्यात पाचसहा बिऱ्हाडं असलेला तीसचाळीस माणसं रहाणारा एवढा मोठा वाडा त्यात दसऱ्यासारखा सण इतक्या उत्साहात व एकत्रितपणे आंगणात संध्याकाळी चारपाच तास साजरा होतांना पाहून खूप वेगळं वाटलं . वाड्यात लहान मुलं , तरुण वहिनी व सगळे भाऊ , पोक्ते काका-काकू अशा प्रत्येक वयोगटातील लोकांचा वावर दसऱ्याची शोभा वाढवत होता . त्यातून मिळणारी ऊर्जा पुढे पंधरा दिवस तरी टिकून रहायची . त्यात गावातली मंडळी झाडून सोनं द्यायला पानसुपारी घ्यायला यायचे , मानाचे ढोल खेळले जायचे . अशा प्रकारे मोठ्या धामधूमीत दसरा झाला व तोंडावर दिवाळी व मुख्य म्हणजे बाळाचं बारसं त्याची शांत असे वेगवेगळे कार्यक्रम डोळ्यासमोर दिसू लागले . वसुबारशा दिवशी सकाळी शांत , दुपारी जेवणे व संध्याकाळी नामकरण विधी करावा असे एकूण कार्यक्रमाचे  नियोजन झाले .

तायडी , मायडी , गोंदा मामा दोन्ही आत्त्या , अंजू गायत्री व परांड्याचे पाहूणे शिवाय वाड्यातले सगळे असे बारशाला असणार होते व पुढे दिवाळी असणार होती . त्यानुषंगाने आई-काकांनी कामाला सुरुवात केली . किराणा खरेदी  , कपडा खरेदी , भटजी आचारी ठरवणे इ . कामासाठी जवळा , जत , सांगोला , पंढरपूर वेळ पडली तर सोलापूर असे काकांचे हेलपाटे होत होते . फॕशनेबल कपडे  मुंबईहून मायडीला तर सोनं खरेदी सांगलीहून तायडीला करायला सांगितले . आईने पण निलाबाईला हाताशी धरुन बारसं आणि दिवाळीच्या कोरड्या तयारीला सुरुवात केली . आठ दिवस आधीच जय्यत तयारी झाली .  बारशाच्या आदले दिवशीच दुपारपासून एकएकजण यायला सुरुवात झाली व रात्री घर पाहुण्यांनी भरुन गेलं . बाळाला पहाण्यात चेष्टामस्करी करत झोपायला बारा वाजले दुसरे दिवशी सकाळपासून शांत ,  दुपारी जेवणं व संध्याकाळी बारसे असे एकएक कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले  पार पडले बाळाचं नाव

 " आशिष"

 ठेवलं . आलेले पाहूणे काहीजण दुसरे दिवशी गेले बाकी तायडी माडी  दिवाळीसाठी घर गच्च भरलेलं होतं .ज्योती शिकायला बदलापूरला होती त्यामुळे नेहमी करता घेरडीत आई-काका व संजू हे तिघेच रहायचे . मग सगळ्या मुली , जावई नातवंडानी घर भरलं की आई-काका खूष असायचे . त्यावर्षीची दिवाळी पण अगदी धूमधडाक्यात झाली आमाचा नविन संसार होता सणाच्या निमित्ताने आम्ही खरेदी करायचो . त्याकाळात टेपरेकॉर्डर व कॕमेरॕच खूपच आप्रुप होतं म्हणून एसके भाऊजींना सांगून या वस्तू आम्ही मुंबईहून आणायला सांगितल्या होत्या तेही खूप मस्त वाटलं होतं . भरपूर पाहूणे , फराळ , कपडालत्ता अशी मजेत दीवाळी झाली . आईची मात्र कामाने बऱ्यापैकी चिडचीड पण व्हायची . हल्ली आई काकांना संजूची फार काळजी वाटत असे . आभ्यासात तिची काहीच प्रगती होत नव्हती , ती आता नऊदहा वर्षाची झाली होती त्यामुळे तिचे वय वाढेल तसं आई-काकांंची चिंता वाढत होती . मग आम्ही कोणी घेरडीत असलो की आई-काकांंना बरं वाटत असे तिला सुधारण्यासाठी काय करावं यावर चर्चा होत असे . 

      दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी मला परांड्यात न्यायचे ठरले . आता आशिष खूपच खेळकर झाला होता त्याला समजायला लागलं होतं . मग जसजसे मी गावाला जायचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी आई-काकांंची हूरहूर वाढू लागली होती . आता करमणार नाही असे त्यांना वाटायचे आणि मुख्य कारण म्हणजे माझी नोकरी हे होतं . कारण आशिष तीन महिन्याचा झाला की माला बँकेत जाॕईन व्हाव लागणार होतं . बाळाला कसं आणि कोण सांभाळणार याविषयी काहीही ठरलेलं नव्हतं . त्यामुळे आईला असंख्य प्रश्न डोक्यात घोळत असत ती माझ्याशी बोलत असे 

" याला आंघोळ घालावी लागेल तुला तर जमत नाही . पोरग भुकेचं आळकी आहे थोडापण दम धरत नाही , बाळसेदार आहे त्याला व्यवस्थितच खायला प्यायला दिलं पाहिजे , त्याची भूक , खोड्या वाढत जाणार  तुझं तर काम सुरु होणार काय आणि कसं करणार "

असे ती विचारायची यावर 

" काहीच माहित नाही "

हे माझं उत्तर ठरलेलं असायचे तोतो तिला फार चिंता वाटायची .

काका म्हणायचे

" इथपर्यंत केलंय आता पुढे काय करायचं ते त्यांच्या घरच्यांनी ठरवलं असेल . तू का काळजी करतेस परांडकरांच घरी बोलणं झालं असेल . सगळ्यांना मोकळं बोलायची सवय नसते काय करतात पाहूयात ".

यावर आई गप्प बसायची वाड्यात सुद्धा हा विषय चर्चेचा ठरला होता . आता शरुला नोकरी सोडावी लागणार इतपत चर्चा कानावर येऊ लागली .

आईने मग ठणकावून सांगितले 

" नोकरी सोडण्यासाठी तिने एवढे प्रयत्न केले नाहीत . जगात नोकरी करणाऱ्या बायका नाहीत काय ? तिचा नवरा चिकार खंबीर आहे करतीलच काहीतरी फक्त लेकराची आबाळ होऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हांला आपलं वाटतं  ".

       तुळशीच्या लग्नानंतर हे व काकी मला न्यायला घेरडीला आले व जवळजवळ अडीचतीन महिन्यांनी माझं बाडबिस्तार गुंडाळलं व आम्ही परांड्याला आलो . 

    खऱ्या आर्थाने आता काकांच्या सहा मुलींपैकी चार मुलींच्या जबाबदाऱ्या संपल्या होत्या . आता ज्योती व संजू यांचे मार्गी लावणे बाकी होते . त्यातही ज्योतीचे शिक्षण सुरु होते ती दिसायला छान होती व चुणचुणीत होती . ज्योती मायडीकडे बदलापूरसारख्या ठिकाणी रहात होती तीची प्रगती होत होती . संजू दिसायला छान होती पण तीची शैक्षणीकच नाही तर बाकीची पण प्रगती  चारचौघींसारखी होत नव्हती आणि ही गोष्ट दिवसेंदिवस ठळक होत चालली होती . याचा परिणाम म्हणून आईपेक्षा काका संजूच्या बाबतीत जास्तच हळवे होत चालले होते  . तिच्या बारिकसारीक गोष्टी पण ते सतर्कपणे पाहू लागले .

आता काकांना ज्योती व संजू या दोघी तर दिसत होत्याच शिवाय आक्कीच्या मुली पण मोठ्या होऊ लागल्या होत्या . त्यामुळे आई म्हणायची

" आता उतार वयात जबाबदाऱ्या संपत येतात का वाढत जातील हे येणारा काळच ठरवेल !

पाहुया कसं कसं होतं ते ".





 प्रकरण 28 वे

नवा गडी नवं राज्य


24/07/2022




      माझं बाळंतपण झालं आणि आई-काका खऱ्या अर्थाने चार मुलींच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते . पण लग्न झालं चार चौघासारखे रीतिरिवाज केले की संपले असे काकांचे आजिबात नव्हते . मला न्यायला हे आले होते तेव्हा काकांनी यांना जवळ कॉटवर बसायला सांगितले व मला चहा करून घेऊन ये म्हणाले जवळच आई पण मधल्या खांबासमोर खुर्ची टाकून बसली . मला अंदाज आलाच होता . कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर आईकाका आधी चर्चा करत असत आणि मग तो विषय सर्वासमोर बोलत असत . मी पण चहा घेऊन आले आणि कपाटाजवळ बसले . मग काकांनी बोलायला सुरुवात केली .

" परांडकर आता तुम्हाला नोकरी लागून सात वर्षे होऊन गेली दोघेपण आता बार्शीत आहात पुढेही बार्शीतच रहणार . मग किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं , मुलगा पण झाला आहे आता तुम्हाला स्वतःच घर असायला पाहिजे . त्यादृष्टीने तुम्ही प्लॉट बघायला सुरुवात करा तुम्हाला घरासाठी बँक कर्ज देते मात्र प्रश्न प्लॉटचा असू शकतो . कोणताही आडपडदा न ठेवता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी पाठीशी उभा आहे तुम्ही प्लॉट बघा , खरेदीसाठी मी तयारीनिशी येतो , बांधकाम तुमचं तुम्ही करा त्यासाठी बँक कर्ज देतेच आहे . " 

एवढं काकांचं बोलणे ऐकले आणि यांना धक्काच बसला यांना खूप अवघडल्या सारखे झाले . ते म्हणाले 

" काका खरं आहे सगळं , आम्हाला घर तर घ्यायचं आहेच पण बजेटचा प्रश्न आहे , बँक कर्ज देते त्यात प्लॉट घेऊन बांधकाम होत नाही . मी आमच्या घरी काही बोलू शकत नाही तुमच्या तर अजून जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्हाला कसं मागू " .

मग काका म्हणाले 

" तुम्ही कुठे मागताय , मीच देतोय की ".

त्यांना तोडत मध्येच आई म्हणाली 

" आमचं सगळ ठरलंय बघा , आम्हाला आमच्या  मुली-जावई मुलाप्रमाणे आहेत त्यामुळे आहे ते सगळ मुलींचं आहे . आम्ही काही पैसे कोणाला देत नाहीत फक्त इथली इस्टेट ही दुसरी इस्टेट तयार होताना द्यायची , आणि वेळेला मदत द्यायची हे आमचं ठरलेलं आहे . त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका , भीड बाळगायचा काही कारण नाही ".

मधेच काका नाक फुगवत हसत हसत म्हणाले 

" हा आता तुम्ही दोघं मिळवताय फारच वाटलं तर तुमच्याकडे पैसे आल्यावर परत द्या मला , मी काही नाही म्हणणार नाही . अजून बराच खर्च करायचा आहे मला पण " . 

मग चहा पिऊन ती मीटिंग तिथेच संपली . हे मला म्हणू लागले 

" काका किती धोरणी आहेत ते खूप पुढचं पाहतात . किती सहज आणि स्पष्टपणे मुख्य म्हणजे समोरच्याला अजिबात दडपण येणार नाही असे बोलतात , मला खूप मोकळेपणा आणि सच्चेपणा वाटला त्यांच्या बोलण्यात . खरं तर त्यांच्याकडून पैसे घेणे मला कसतरी वाटते पण त्यांनी अगदी क्लिअर ऑफर दिलीय . आपण विचार करू खरंच ते म्हणतात तसे त्यांना गरज पडेल तेव्हा जमतील तसे आपण पैसे परत करू पाहू कसे होते ते ". 

आम्ही घराचा विचार करतच होतो पण काकांनी डोक्यात सोडलेल पिल्लू घेऊन आम्ही बार्शीत आलो . बरोबर लहान आशिष , आता बँक सुरू होणार त्याला बाहेर सोडून जावं लागणार ते कसं करायचं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आधी परंडा मग बार्शीत आलो आणि आमचं पर्व इकडे सुरू झालं .

    घेरडीत अजून ज्योती व मुख्य म्हणजे संजूची पुर्ण जबाबदारी होती कारण संजू दिसायला सुंदर होती पण तिची बुद्धी आणि प्रगती चारचौघींसारखी नव्हती आई-काकांंच्या उतारवयात त्यांना लागलेला घोर होता तो . शिवाय आक्कीच्या दोन मुली पण आता दहाबारा वर्षाच्या झाल्या होत्या

तसं तर आई संसारातून विरक्त व्हायचा प्रयत्न करत होती . तिच्यामध्ये वाचनामुळे बरीच प्रगल्भता आली होती . पण स्वतःच्या सहा मुली त्यातही मुलींच्यात अंतर जास्तीचं असल्यामुळे तिचा संसार तसा नेटका नव्हता त्याला लांबड लागलेलं होतं . पण तिच्या उत्साहाला मात्र तोड नव्हती .

ज्योती बदलापूरला शिकायला होती उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी सोडला तर आई-काका व संजू असे तिघेच घेरडीत रहात असत . काकांनी शेतीचा व्याप जाणूनबुजून कमी केलेला होता व संजूचं शिक्षणात फारसं लक्ष नसल्यामुळे व फारशी प्रगती नसल्यामुळे  आजकाल ते तीघेही बऱ्याच वेळा मुलींकडे जायचे . आकरावीमध्ये काॕलेजला ज्योती बदलापूरहून किर्लोस्करवाडीला आली होती . आता आई-काकांच्या डोळ्यासमोर ज्योती होती . तिच्या पाठोपाठ अंजू-गायत्री होत्या आणि वय वाढेल तसे संजूच्या काळजीची धार तीव्र होत चालली होती . संजुसाठी कोणीही सांगेल तो दवाखाना काका करायचे . एके ठिकाणी तिला पंचधातू दुधात उगाळून त्यात चूर्ण खलून त्याचं चाटण द्यायला सांगितले होते तर काकांनी सोने चांदीसह पाच धातूच्या अंगठ्या करून आणल्या होत्या आणि कित्येक महिने रोज स्वतः सहाणेवर उगाळून त्याच चाटण करुन संजुला  द्यायचे . काहीही करु पण संजू चार चौघीसारखी नॉर्मल व्हावी असे त्यांना वाटत असे . त्या चाटणाचा परिणाम संजुवर बऱ्यापैकी झाला होता शरीरातील सगळेच घटक वाढले होते . ती आणखीनच सतेज , गोरीपान दिसू लागली , तिचे केस कमरेपर्यंत वाढले . शरीर पण सशक्त झाले वयाच्या 14 व्या  वर्षीच तिला मासिक धर्म सुरू झाला . तिला वेणीपण घालता यायची नाही . तिला स्वतः काहीच करता येत नसे सगळ आईला करावे लागे . आम्ही बहिणी असू तेव्हा आम्ही करायचो . आईला मात्र वाईट वाटायचे त्याबरोबरच सांजुचा राग पण यायचा आणि कीव पण यायची . चोवीस तास संजू आईबरोबर असायची त्यामुळे ती म्हणायची 

" उभ आयुष्य कसं टेचात गेलंय आणि उतार वयात भलतीच काय ही चिंता आपल्याला पोखरयला लागली आहे . रेखाचं दुःख तरुणपणाच्या बळावर निभावलं पण आता कठीण वाटतं आहे हे . " 

पण काकांना वाटायचे

 " आपल्या उतारवयात मुख्यतः आईची ताकद नसताना , आईला डायबेटिस झाल्यानंतर संजूचा जन्म झाला आहे आणि त्यामुळे तिच्यात काहीतरी कमतरता आहे त्यात तिचा काय दोष आहे . ती आपली जबाबदारी आहे तिला न्याय देणे आपलं काम आहे . " .

अशी आई काकांची घुसमट व्हायला लागली होती .

इकडे ज्योतीचे राहणे आधी दोन अडीच वर्षे बदलापूर आणि आता किर्लोस्करवाडी याठिकाणी पडल्यामुळे ज्योतीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता . दिसायला घरंदाजा प्रमाणे आणि आधीच अंगी उत्साह , चौकसपणा , धडाडी , लाघवीपणा यासारखे गुण आसलेल्या ज्योतीला पोषक वातावरण मिळत गेले व त्याचे तिने सोने केले . माझ्या बाबतीत नोकरीमुळे लग्न ठरविण्यात येणारी सुलभता पाहता काका ज्योतीला बँकेच्या परीक्षा दे म्हणून मागे लागत होते . तिचे शैक्षणिक करियर चांगले होते पण ती फारसे त्यात रमत नसे . नोकरीसाठी फारसा मनापासून विचार करत नसे . ती जराशी बिनधास्त , आणि नाविन्याचा ध्यास असलेली होती स्वतः काहीतरी नवीनच करायचं आणि चार लोकांना आपल्या नादी लावायचे असं काहीसं तिचं होतं . तिचा शिवणकामाकडे जास्त कल होता . तिने तो क्लास लावला आणि ज्यांच्याकडे ती क्लासला जायची त्यांनाच ती त्यातली विविधता शिकवून यायची , त्या बाबतीत तिच्यातील कला ठळकपणे उठून दिसत होती . संपूर्ण क्लासमध्ये तिच्या कलेच आणि धाडसाचं कौतुक होत होतं आणि ती त्यात रमत होती . तिने शिवण काम शिकण्यासाठी कधीच साधा कपडा वापरला नाही . एकदम भारी कपड्याला हात घालायचा आणि त्याची सुंदर कलाकृती करायची , त्याचं सगळ्यांनी तोंडात बोट घालून कौतुक करायचं . स्वतःच्या डोक्यातून नवनवीन फॅशन काढायची आणि ते करून दाखवायचं . अगदी लहान वयात तिने सगळ्यांना चकित करून सोडलं होतं . आई , तायडी आम्ही सगळ्या बहिणी , वड्यातले , किर्लोस्करवाडीचे सगळेजण तिचे तोंडभर कौतुक करायचे . तिचा त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला आईला तर तिचं भारी कौतुक वाटायचं लगेच तिच्या डोळ्यासमोर संजू दिसायची मग ती थोडंसं उद्विग्न होऊन म्हणत असे 

" एकाचढीत एक पोरी आहेत आमच्या , चढती कमान पहायची मला सवय आहे . परमेश्वराने एकवेळ संजुला रंगरूप कमी दिलं असतं तर चाललं असत पण संजू सगळ्या पोरीसारखी व्हायला पाहिजे होती पण काय आहे देवाला ठाऊक " .

      इकडे आमच्या डोक्यात आमच्या घराचा विचार घोळत होता . मी बँक आणि आशिष यात पूर्णपणे गुरफटून गेले होते . तसही प्लॉट , बांधकाम हे विषय मला फारसे समजत नव्हते पण आपलं घर असले पाहिजे एवढं नक्की वाटत होतं . बँकेत बरेचसे सहकारी साधारण यांना समवयस्क असल्याने बऱ्याच जणांचे घराचे काम चालू होते त्याप्रमाणे यांनी प्लॉट शोधायला सुरुवात केली लवकरच त्याला यश आले . बार्शीत त्यामानाने जागेच्या किंमती पहिल्यापासूनच जास्त आहेत . आम्ही दबकत दबकत एक प्लॉट फिक्स केला व त्याप्रमाणे काकांना कळवले . तेव्हा पद्माकर काकांचे आमच्याकडे भरपूर येणंजाणं असायचं . पत्र मिळताच काका बार्शीला आले प्लॉट पाहिल्यावर काकांना पण प्लॉट आवडला मग  मालकांची भेट , बोलणी झाली , इसार दिला आणि खरेदीची तारीख पक्की केली . बाकी सगळी तयारी यांना करायला सांगून काका घेरडीला गेले . प्लॉटचे मालक पाचजण भाऊ होते आणि सगळे वेगवेगळे राहत होते ते एकमेकांशी बोलत नव्हते फक्त व्यवहार एकत्र करायचे . त्यामुळे यांना एक गोष्ट करायची झाली तर पाच जणाकडे फिरावे लागे . स्टॅम्प खरेदी लिखापाडी अशी सगळी तयारी झाली आणि खरेदी उद्यावर आली मग काका घेरडीहून आले . सकाळी हे , काका व पद्माकर काका कचेरीत जायचं ठरलं मी बँकेत जाणार होते . काकांना असे जमिनीचे किंवा जागेचे व्यवहार करायचे असले की भारी उत्साह असायचा . तरुणाला लाजवेल अशी त्यांची तयारी , लगबग असायची . अगदी तसच त्याही दिवशी ते लवकर उठून दाढी , आंघोळ , नाष्टा करून कडक इस्त्रीचे शर्ट पँट घालून पेपर चाळत कॉटवर लोडला टेकून पद्माकर काकांची वाट पाहत बसले . यांची पण अवराआवरी चालू होती पण त्यांना टेन्शन आले आहे असे जाणवत होते . तोवर पद्माकर हजर झाले . ते दोघे गप्पा मारत बसले काका माझ्याकडे पाहून हसत म्हणाले

" परांडकराना टेन्शन आलं असं दिसतंय एवढी काळजी करू नका म्हणावं होत असतं सगळ ".

पण असे काही असले की यांना खरच खूप टेन्शन यायचं त्याचा परिणाम जेवणावर व्हायचा , त्यांना घशाखाली अन्न उतरत नसे . दहा वाजता सगळे जायला निघाले तसे काकांनी त्यांची पैसे ठेवलेली लेदरची बॅग कपाटातून काढली नेहमीप्रमाणे बकोटित धरली नाक फुगवत हसत हसत माझ्याकडे पाहिले आणि ते तिघेजण निघाले मी मात्र आपलं घर होणार फक्त या आनंदात होते . बाकी खरेदी , बांधकाम त्याच नियोजन काय असते यातील ओ की ठो मला समजत नव्हते . फक्त आपल्याबरोबर काका आहेत सगळ नीट होणार आशी खात्री होती . आमच्या दोघांमध्ये मी बरीचशी अल्लड तर हे खूपच दीर्घ विचारी असे चित्र होते . त्यामुळे घराच्या बांधकामाची सर्वस्वी जबाबदारी यांच्यावर होती . मी फक्त नोकरी असल्यामुळे पैशाची काही व्यवस्था करु शकणार होते . 

मी बँकेतून आले तोवर प्लॉटचा व्यवहार करून हे सगळे घरी आले होते . मग रात्री गप्पा मारत असताना यांनी पुढचं बांधकाम कसे करणाऱ याचे नियोजन काकांना सांगितले .

आता पुढचे सुरू करा असे सांगून काका दुसरे दिवशी घेरडीला गेले . बँकेचं कर्जप्रकरण करायचं होतं त्यामुळे सर्च रिपोर्ट , प्लॅन आणि बरीच कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी यांची धावपळ साधारण जानेवारी 92 ला सुरू झाली ते जून 93 ला घराची वास्तुशांती झाल्यावरच संपली . 

आम्ही इंजिनियर कडे फक्त प्लॅन आणि देखरेख एवढंच काम दिले होते . बाकी बांधकामावर आवश्यक तसे वाळू , सिमेंट , विटा असे सामान आणणे , लाकडी साहित्य , ग्रिल , बांधकामावर पाणी मारणे , लाईट कनेक्शन , पाण्याचं कनेक्शन , लाईट फिटिंग , अशी सगळी कामे वेळकाळ न पाहता दीड वर्ष अहोरात्र यांनी एकट्याने करवून घेतली यांना स्वतःला खूप कष्ट करावे लागले , आणि आमचा सुंदरसा बंगला तयार झाला . 

आशिष एक वर्षाचा झाल्यापासून हे काम सुरू झालं तो अडीच वर्षाचा झाला तेव्हा आम्ही या बंगल्यात राहायला आलो . तो जवळजवळ रोज एकदा तरी यांच्याबरोबर बांधकामावर यायचा

" पॉटवर यायचं मला " 

असे म्हणत तो स्कुटरवर येऊन बसायचा . लाईट फिटींग चे काम चालू होते त्यादिवशी पहाटे अडीच पर्यंत तो जागा राहिला होता . घरी सोडतो चल म्हणाल की भोकाड पसरायचा . त्यामुळे त्यालाही या जागेविषयी खूप लळा लागला होता . मी मात्र कधीतरी सुट्टीदिवशी चक्कर मारत असे . बाकी फेफरी मात्र यांची एकट्याची उडत असे . 11 जूनला वास्तुशांती करायचे ठरले त्याप्रमाणे 30 एप्रिल 1993 रोजी आम्ही गृहप्रवेश केला आणि माझ्या  26 व्या वाढदिवशी स्वतःच्या घरात राहायला आलो . आता वास्तुशांती !!

वास्तुशांतीच्या आधी आठ दिवस तायडी , तिची मुलं आणि ज्योती व संजू बार्शीत आले होते बार्शीत पहिल्यापासून उन्हाळा जास्तच असतो त्यामुळे रात्री इथली प्रसिद्ध मावा मस्तानी खायला जाणे हा पण मजेचा भाग होता . आम्ही मात्र  जय्यत तयारीत होतो . दोन्हीकडच्या पाहुण्यांनी घर गच्च भरले होते . मोठ्या थाटामाटात वास्तुशांती झाली . मी लग्नात जेवढं मेकअप केलं नव्हत तेवढे आज मला ज्योतीने तयार केले होते . बार्शीत जरा खव्याचे प्रस्त जास्त आहे तर खवा घालून बुंदीचे चविष्ट लाडू जेवायला होते तर रात्री मावा मस्तानी असा बेत होता . 

माडीवर असलेल्या भाड्याच्या दहा बाय दहाच्या दोन रूम मधून चार रूमच्या मोठ्या बंगल्यात आम्ही तिघेजण राहायला आलो ! एक कॉट , गोदरेजचे कपाट , भांड्याचे रॅक आणि ओनीडाचा टीव्ही एवढंच मोठ समान आणि छोटी छोटी भांडी कुंडी घेऊन आमचं बाडविस्तार घेऊन आम्ही स्वतःच्या घरात राहायला आलो ! समोर मोकळं मैदान , भोवताली बागीचासाठी सोडलेली जागा , तसा बंगला म्हणलं तर आमचाच पहिला झाला होता त्यामुळे त्याचं फार कौतुक होत होतं .

आता ज्योतीची अजून दोन वर्ष राहिली होती पण ती खूपच उठावदार दिसत होती त्यामुळे पाहणारे तिच्या विषयी विचारात असत . इकडे अंजू गायत्री मेडशिंगीला राहत होत्या त्यांच्या बाबतीत  जवळजवळ सगळे निर्णय त्यांचे काकाकाकु घेऊ लागले . खेडेगाव आसल्यामुळे आणि मोठं कुटुंब असल्यामुळे मुलींना फारसे शिक्षणात त्यांनी गुंतू दिले नाही बराचसा त्यांचा वेळ घरकामात जात असे . त्याचा परिणाम असा झाला की त्यांची शिक्षणाची ओढ पूर्ण कमी झाली . मार्क्स चांगले मिळेनात मग आंजू आगदीच पंधरा वर्षांची झाली की 94 साली तिचे खात्यापित्या घरात त्यांनी लग्न ठरवले , शेती करणाऱ्या मुलाशी तिचे लग्न ठरले . मुलींनी शिकाव आशी मनापासून तळमळ असूनसुद्धा लग्नासाठी मदत करण्याखेरीज काका आणि आम्ही काही करू शकलो नाही . त्यावेळी मात्र यांनी आगदी प्रयत्नपूर्वक काही पैसे जमा केले व काकांना दिले . काका म्हणाले 

" तुमच्या समाधानासाठी आता घेतोय पण आता पुन्हा पैशाची व्यवस्था झाली की त्याचे 6 वर्षाचं NSC घेऊन ठेवा मुदत संपल्यावर त्याचं काय करायचं मी सांगतो . पुन्हा मात्र तशीच बचत आम्ही करत गेलो . ती तशीच वाढवत जावा आणि पुढे गरज पडेल तशी वपरा मला काही परत देऊ नका असे काकांनी सांगून टाकले . ज्योतीपेक्षा लहान असूनही पंधराव्या वर्षीच आंजुचे तिच्या काकांनी ठरवल्याप्रमाणे लग्न झाले .

        इकडे ज्योतीचे एस वायचे वर्ष सुरू होते . पुढच्या वर्षी ती बी. कॉम होणार होती आता वीस वर्षाची होईल म्हणत तिच्या लग्नाविषयी घरातल्यापेक्षा बाहेरचे लोकच चर्चा करू  लागले , तायडीला लग्नाविषयी विचारू लागले . ज्योतीमध्ये तायडी जरा जास्तच गुंतली होती नात्याने ती बहीण आसली तरी दोघींच्या वयात जवळजवळ पंधरा वर्षाचे अंतर असल्यामुळे व तायडीच्या मुली ज्योतीच्या पाठोपाठ असल्यामुळे तायडी व भाऊजी ज्योतीला मुलीप्रमाणे मानत असत . त्यामुळे तिचं लग्न जमवणे आपली जबाबदारी असे तायडीला वाटत असे . काकांनी तर वरसंशोधनाची तयारी सुरू केलीच होती पण शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचे नाही यावर घरात शिक्कामोर्तब झाले होते . तरी चर्चा होत असे काका वाडीला गेले की तायडीशी ते चर्चा करत असत आणि त्यांनी ठरवून टाकले की ज्योतीच्या शेवटच्या वर्षाची सहामाही परीक्षा झाली की दिवाळीनंतर तिच्या लग्नाचं पहायचं म्हणजे फायनल झाली की लग्न होईल . तयडीला मात्र चैन पडत नव्हती मग शेवटच्या वर्षी दिवाळीत तिची आजुन परीक्षा होते तोवरच पत्रिका देणे मुलांच्या चौकशा करणे ही लगबग तीने सुरू केली होती , विशेष म्हणजे तिच्याकडे ज्योतीसाठी मागण्या पण येत होत्या . या धडपडीला मार्चमध्ये यशही लगेच आले . मूळचा कराडचा असलेला परंतु नोकरीनिमित्त पुण्यात रहात असलेल्या एका मेकॅनिकल इंजिनीअरच्या स्थळाविषयी तायडीला माहिती मिळाली . लगेचच तिने पत्रिका फोटो दिला सगळ व्यवस्थित जमते  असे समजले की तातडीने त्यावर हालचाली करत ज्योतीची परीक्षा झाली की दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला . ज्योतीची परीक्षा झाली की आता तिचे शिक्षण संपले आहे तर तिला यावेळी न्यायला तुम्ही या असे तिने काकांना आधीच कळवून ठेवले होते त्याप्रमाणे काका आदले दिवशी वाडीत हजर झाले . काका आल्यावर तायडीने सविस्तर माहिती काकांना सांगितली आपण उद्या दाखवून तरी येऊ असे ठरले व त्याप्रमाणे गुरूवारी कराडला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला . काकांना मुलगा व एकूण स्थळ पसंत पडले होते . ज्यांच्याकडे काका , ज्योती , तायडी व भाऊजी उतरले होते तिथेच दिवसभर थांबले होते . त्याच दिवशी मुलाने अजून दोन मुली पहिल्या व ज्योती पसंत असल्याचे संगितले . तसा लगेच काकांना निरोप मिळाला . काका पण याबाबतीत खूप तत्पर होते . लगेचच सगळेजण पुन्हा एकदा मुलाच्या म्हणजे मुकुंद घळसासी यांच्या घरी गेले काकांची व मुलाचे वडील म्हणजे नाना यांनी चर्चा केली . कच्ची बोलणी करून साखरपुड्याची तारीख पक्की केली व बाकी बोलणी  त्यादिवशी करू म्हणत सगळेजण वाडीला परत आले . तायडीच्या आनंदाला सीमा राहिली नाही . सगळे एकदम खुश होते . 

 आता ज्योतीची परीक्षा व एकूणच शिक्षण संपले होते आणि लग्नही ठरले होते . दुसरेदिवाशी काका बरोबर ज्योती घेरडीला जाणार होती . ज्योती जवळजवळ पाच वर्षे तायडीकडे राहिली होती . मंजू मेधा पण बऱ्यापैकी कळत्या झाल्या होत्या त्या तिच्या मैत्रिणीच होत्या . सगळ्यांनाच एकमेकांची इतकी सवय झाली होती की ज्योती बॅग भरू लागली तशी वातावरण एकदमच हळवे झाले . सगळ्या गोष्टी इतक्या पटपट झाल्या होत्या की विचार करायला कोणाला वेळच मिळाला नाही . खरं तर सगळ मनासारखं झालं होत , लग्न ठरलं होतं , मनासारखा मुलगा मिळाला होता . पण लगेचच दोनतीन महिन्यात लग्न होणार आता थोडंसं आईकाका बरोबर रहावस वाटतं होतं . इकडे वाडी कायमची सोडायची याची हुरहूर लागली होती तर तिकडे नाविन्याची आस होती . नवीन जोडीदार कसा असेल आता घेरडी वाडी सगळी माणसं सोडून एकदम पुण्याला राहायला जाणार होती . नवनवीन स्वप्ने उराशी बाळगत हसत हसत साश्रू नयनांनी ज्योतीने बॅग भरली आणि दुसरे दिवशी चार वाजता काका ज्योतीला घेऊन घेरडीत हजर झाले . 

    इकडे आईला याविषयी आईला अजिबात कल्पना नव्हती . आता ज्योती जवळजवळ सातआठ वर्षांनंतर घेरडीत राहणार , बघू आता थोडंसं एकत्र राहू मग लग्नाचं पाहायचं या विचारात आई होती . काकांनी हातपाय धुतले आणि आईला म्हणाले 

 " वाड्यातल्या सगळ्यांना बोलावणं पाठवतो चहा कर सगळ्यासाठी " . 

आणि हसत हसत ज्योतीचे लग्न जमवून आल्याचे सांगितले . आई एकदम भावनावश झाली  

" आहो , आत्ता तर पोरीच शिक्षण झालंय आपल्याजवळ ती राहिलीच नाही चार दिवस जवळ राहील आसे वाटलं होतं  आणि तुम्ही तर लग्नच ठरवून आलो म्हणता, आस कसं हो ".

काकांनी सविस्तर सगळ आईला सांगितले व म्हणाले  

"इतका छान योग जुळून आलाय तर वाट कशाला पहायची म्हणून आलो ठरवून बघ कसं वाटतं तुला . " 

तिला रडू आवरेना पण ते आनंदाश्रू होते . आईने जड अंःकरणाने चहाच आधण टाकलं तोवर मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू , मोठ्या काकू बाकी वहिनी भाऊ हजर झाले . चहापाणी झालं गप्पा रंगल्या आणि एकूणच उत्साहाला उधाण आलं . आता सगळ्यांना पुढचे वेध लागले होते . वड्यातली सगळी भावंडं , भाचे , भाच्या वहिनी ज्योतीला चिडवत होती , चेष्टा मस्करी सुरू झाली  !!!







प्रकरण 29 वे


ज्योतीच्या लग्नाचे स्वर घुमू लागले

11/04/2022


      दरवर्षी 14 एप्रिलच्या दरम्यान बँकांना दोनतीन दिवस सुट्टी येते आणि बहुतेक चैत्र महिना सुरू असतो . माझं लग्न झाल्यापासून रजेचा प्रश्न असायचा मग रविवारला जोडून सुट्टी आली की दोनतीन दिवसांची रजा काढून मी घेरडीला जात असे मग आई पण त्या दरम्यान चैत्रा गौरीचं हळदीकुंकू ठेवायची नुकतच मला काकांचं 

 " परवाच ज्योतीच्या लग्नाचे पक्के करून आलो ".

असे पत्र आले आणि कधी एकदा मी घेरडी गाठते असे मला झाले नेहमीप्रमाणे याहीवर्षी मी घेरडीला गेले . आई-काका , ज्योती , संजू , वाड्यातले सगळे माझी वाटच पाहत होते . घरी गेल्यावर लग्नाचां सगळा वृत्तान्त समजला , घरातील वातावरण एकदम खुशीत होते . ज्योती तर हवेतच होती , त्या दोघांची एकमेकांची पसंती झाली होती पण साखरपुडा , नंतर लग्न , ते कधी , कसे याविषयी अजून काही ठरले नव्हते . तिकडे तायडी कराडच्या संपर्कात राहणार होती . 

आईचे मात्र एक लेक चार दिवसांसाठी माहेरी आली आहे तर दुसरी लवकरच लग्न करुन सासरी जाईल असा विचार करत हळव्या स्वरात स्वगत सुरू होते .

" पोरी शिकवून सवरून मोठ्या करायच्या , त्यांची लग्न करायची आणि हाहा म्हणता चिमण्या उडून गेल्या सारख्या एक दिवस भुर्र उडून जातात , रमतात आपापल्या संसारी , जगाचीच रीत आहे ही म्हणा " .

असे म्हणत म्हणत तिच्या खास स्टाईलने दोन्ही हात वर करत हलवत पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत गौराईच्या हळदीकुंकवाच्या तयारीला सुरू होती . तसं ज्योती नववी पासून शिकण्याच्या निमित्ताने बाहेर होती . ती दिसायला फारशी रेखीव नसली तरी पहिल्यापासून ती मोहक , स्मार्ट आणि रसरशीत दिसायची . आपलं गाव खेडे गाव आहे टवाळी मुलं असतात यापेक्षा शहरात चांगलं शिकेल तिचे कल्याण होईल . पाहू शिक्षण झाल्यावर थोडंसं राहील घेरडीत असे तिला वाटत होते पण ज्योतीचे लग्न चुटकीसरशी जमले आणि आईला एकीकडे आनंद तर एकीकडे पोरीला जवळ राहायला मिळालं नाही याची चुटपुट लागली होती . मग आता आम्ही जमलो तर करु जराशी मज्जा म्हणत यावर्षीचे तिचे हळदीकुंकू स्पेशल होते . पोरी आल्या की गप्पांच्या नादात काम होत नाही म्हणत ओल्या नारळाचा चव घालून साजूक तुपातले रव्याचे लाडू , भरपूर खसखस घालून केलेल्या सारणाच्या करंज्या आणि खमंग काहीतरी आसले पाहिजे म्हणून तिचे खास मेतकूट लावून , भरपूर शेंगदाणे घालून केलेलं भडंग ही सगळी तयारी तिने आदले दिवशी करून ठेवली होती . तर रात्रीच घागरीच्या पितळी पातेल्यात हरभरे भिजायला घालून सकाळी ते पातेलं मागच्या दरात तिने हरभरे फुगण्यासाठी उन्हात ठेवले होते . मंडईतून आणलेल्या त्यातल्या त्यात चोच दिसणाऱ्या दोन कैऱ्या कुंकू लावून पोपट म्हणून दोन ग्लासवर ठेवण्यासाठी तिने बाजूला काढल्या , एकदोन कैऱ्या तिने डाळीसाठी खीसल्या आणि बाकीच्या पन्हं करण्यासाठी उकडायला टाकल्या . 

दुपारची जेवणे लवकरच आटपून आम्ही दोन वाजताच तयारीला लागलो . आईची डाळ खूपच प्रसिद्ध होती . हलक्या हाताने उखळात कुटायची त्यात कैरीचा खीस , मीठ , साखर , कोथिंबीर घालून मोठसर वाटायची आणि त्याला हिंग , जिरे , भरली मिरची घालून चरचरीत फोडणी द्यायची .

आणि संध्याकाळपर्यंत जास्त आंबट होऊ नये म्हणून डब्यात घालून त्यावर पांढरा रुमाल टाकून तिने तो डबा डेऱ्याखाली पाण्यात ठेऊन दिला . 

     तोपर्यंत इकडे सोप्यात काकांनी नेहमीप्रमाणे गौरीच्या मखराची तयारी केली . उंच काळ्या पिपावर मोठा पाट आडवा टाकून पहिली पायरी , मोठ्या निळ्या पेटीची दुसरी पायरी आणि खाली एक छोटी ट्रंक ठेऊन तिसरी पायरी केली त्यावर छानस बेडशीट टाकून आणि वर सुतळ्या बांधून त्यावर साड्या टाकून छानस मखर तयार झाले . तोवर आईने लेकीच्या मायेने देवघरात खण घालून बसवलेली लाकडी गौर काढून उंच समईवर बांधून तीला साडी नेसवून , गजरा माळून त्या मखरात नेऊन बसवली . मग स्वतः माझ्या लग्नात मायडीने घेतलेली कठापदराची नऊवारी सिल्कची चिंतामणी कलरची साडी त्यावर जांभळं ब्लाऊज घालून केसांचा आंबडा त्यावर काकांनी खास आणलेला ग्रीष्मात दरवळणारा मोगऱ्याचा गजरा माळून छान आवरून तयार झाली .

ती अशी तयार झाली की काका नाक फुगवत तिच्याकडे पाहून हसायचे तर ती पण लाजायची . एवढं वय झालं होतं पण दोघेही चिरतरुण होते . तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह असायचा . हल्लीहल्ली आई थोडीशी थकल्यासारखी वाटायची एक तर वय साठीकडे झुकलेले होते , गेल्या पंधरा वर्षांपासून शुगरचा त्रास मुख्य म्हणजे दिसामासाने वाढणारी संजू आणि तिची काळजी . आम्ही मुली जमलो की त्या दोघांना प्रकर्षाने संजूची काळजी वाटायची . तिच्याविषयी गप्पा मारताना ते हवालदिल होत असत . संजू चांगली दिसावी , चारचौघात ती एकटी पडू नये यासाठी त्या दोघांचा अटापिटा असे . जिथे जातील तिथे खास तिच्यासाठी कपडा खरेदी करत असत . ती फक्त चौदा वर्षांची होती पण उफाड वाटायची , देखणी दिसायची , नजरेत भरत असे पण बुध्दी फारशी चाणाक्ष नव्हती . त्याचीच आईकाकाना खूप आरण होती . आईने तिला पण छानसा ड्रेस घालून तयार करायला आम्हाला सांगितले कारण ती आमच्या बरोबरीने दिसावी , राहावी , मागे पडू नये हा मुख्य उद्देश .

तोवर आम्ही गौरीभोवती लाकडी केळीची फणी , कैरीचे पोपट , नक्षीदार कापलेले कलिंगडे , वेगवेगळी खेळणी ठेऊन आरास केली . यावेळी ज्योतीने आणि मी खास एक रांगोळी काढली होती . गौरीसमोर मधोमध थाळ्यामधे दुपारीच पाणी ओतून ते संथ होऊ दिले त्यावर चाळणीने दाट बुक्का चाळला आणि त्यावर हळुवार हाताने ज्योतीने सुंदर रांगोळी रेखाटली , रंग भरले , थाळ्याच्या कडेनी नाजूक महिरप काढला आणि त्या दिवसाचे 

" पाण्यावरची रांगोळी "

 हे हळदी कुंकवाचे खास आकर्षण ठरले .

आईने आधी फराळाची दोन ताटे गौरी समोर आणून ठेवली , पाण्याचं चांदीच तांब्या भांड ठेवले मग एका ताटात हळदीकुंकवाचे पंचपाळ , आत्तरदाणी , डाळ , पन्हं , पाटीत ओटीसाठी भिजलेले हरभरे घेवून देवापुढे असलेल्या मोठ्या पितळी समईत तेल घालून सगळे साहित्य घेऊन ती सोप्यात आली . दोन मिनिट शांत उभे राहून समधानी चेहऱ्याने सगळ नीट आहे न ते न्याहाळून आणि पहिलं आणि अत्यंत सत्विकपणे , भक्तीने पाहिले हळदीकुंकू तिने गौरीला दिले लगेच मला पाटावर बसवून हळदी कुंकू दिले , ज्योतीला पण तिचे आता लग्न ठरले आहे म्हणत पाटावर बसवले मग वाड्यात माहेरी आलेल्या विद्याला हाक मारली तोवर गावातच सासर असलेली पण मळ्यात राहणारी छाया ताई पण जायला अंधार होऊ नये म्हणत लवकरच रुमालात जाईजुईची फुले घेऊन आली . 

सगळ्या माहेरवाशिणीना आई गौरीच्या रूपात पाहतेय असे वाटत होते . गावात ब्राम्हणाची 25 एक घर होती तर सोनार , तेली , वाणी यांच्या घरी सुद्धा कोळ्याच्या भागाबाई कडून आमंत्रण गेले होते . जवळजवळ 50 बायका तरी आज येणार होत्या . 

आईने कोपऱ्यात खुर्चीवर तिनेच केव्हा तरुणपणी पांढऱ्या दोऱ्यानी विणलेला कोयऱ्या कोयाऱ्याचा रुमाल टाकून ते ताट त्यावर ठेवले आणि बायकांची वाट पाहत बसली पाच वाजता तर तिची जय्यत तयारी झालेली होती . माझ्याबरोबर साडेचार वर्षाचा मनीष होता . त्याला ह्या सगळ्याच भारी आप्रुप वाटत होते . आणि आई-काकांना त्याचं कौतुक होतं तो पण आगदी लाडाने त्यांच्याकडून सगळ करून घेत होता . त्याच सगळ लक्ष गौरी समोरच्या फराळावर होतं . आईने पण पटकन नैवेद्य दाखवला आणि

" लहान मुलं म्हणजे कृष्णाचा अवतार असतात " .

म्हणत त्याच्या पुढ्यात लाडवाचा डबाच ठेवला .

त्यानेही दोन हातात दोन लाडू उचलले आणि खाल्ले आई कौतुक भरल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती . खोड्याच गाऱ्हाणं गात होती तोपर्यंत तो अंगणात वाड्यातील मुलासोबत मस्ती करण्यासाठी निघून गेला , त्यांच्यात रमून गेला . बायकांची गर्दी सुरू झाली तशी आईने काकांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि आम्ही सगळे सोप्यात येऊन बसलो .

आज सगळ्यांना हा कुतूहलाचा विषय होता की भाऊकाकानी काकीनी मुलींना शिकवलं आणि शिक्षण संपलं की वेचून काढल्यासारखे जावई आगदी वेळेत शोधले .

ज्योतीपण त्या दिवशी माझी साडी नेसून तिनेच डिझाईन केलेलं ब्लाऊज घालून , वेणी गजरा घालून छान तयार झाली होती . ती पण देखणी , घवघवीत , रसरशीत दिसत होती . रांगोळी , आरास , ब्लाऊज या सगळ्याचं बायका अगदी भरभरून कौतुक करत होत्या . चेष्टा , मस्करी , हसणे आणि उखण्याची तर चढाओढ लागली होती . उषा वहिनींनी त्यांचा खास उखाणा गाण्यातून घेतला . तर रमा काकू , प्रभा काकू , अरविंद काकी , देशपांडे वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी आणि बऱ्याच जणी त्या स्पर्धेत होत्या .

" ज्योती लक्ष देऊन ऐक ग , मी नाव घेते आता ते ऐक तुला नक्कीच उपयोगी पडेल " .

असे म्हणत अलंकारीक उखाणे घेत होत्या . तोतो ज्योती लाजेने चुर होत होती . नेमकी आज दुपारीच मुकुंद घळसासी यांची फक्त

" Miss you "

अशी तार आली होती आणि जवळजवळ वाड्यात सगळ्यांना ते माहीत झाले होते . त्यामुळे वाड्यातील तिच्याबरोबरची सगळी भाचे कंपनी , भावंडं , वहिनी तिला चीडवण्याची एकही संधी सोडत नव्हते काका तर हसतच म्हणू लागले  

" मायला मागच्या आठवड्यात यांची ओळख पण नव्हती न लगेच miss you कसं काय ? "

मला पण ज्योतीला छळायला मजा येत होती . हळदी कुंकवाच्या धामधुमीत दोन तीन तास कसे गेले समजले नाही मग गौर उतरवण्यापूर्वी वाड्यातील पुरुषांना डाळ पन्हं घ्यायला बोलावलं पुन्हा गप्पांचा फड रंगला डाळ कित्ती खमंग लागते म्हणत , ज्योतीचे , तिच्या कलेचं , दिसण्याच कौतुक करत डाळीचा डबल राऊंड फिरवून झाला . तिथल्या रीतीनुसार वाड्यात घरोघरी फराळाची ताटे गेली . सगळे आवरून झाले आईने

" शरू , तुझं पोरगं दोडाच किती गुण करतं ग आणि गोंडस दिसतं सगळ्यांच्या नजरेत भरतं आणि मग दृष्टावत , आण मीठ मोहऱ्या , काढते लेकराची दृष्ट , सुखानी जावा बाई तुमच्या तुमच्या घरी "

असे म्हणत मनीषची दृष्ट काढली . लगेच ज्योतीला पण म्हणाली

" या तुम्हीपण , नाचनाचायचं आणि पुन्हा फ्या म्हणून पडायचं ".

असे म्हणत दोघांची दृष्ट काढून दोन्ही हातांची बोटं कपाळाभोवती दुमडून कडकडून मोडली . मी घेरडीत आले की आई जरा घाबरायची कारण दोनतीन वेळा मनिष तिथे गेला की आजारी पडला होता . इथे चांगला दवाखाना नाही म्हणत पळत सुटावे लागे . मी घेरडीत येणार म्हणलं की पहिलं काका नारळ आणून ठेवायचे . संध्याकाळी सोप्याच्या पाठभिंतीत असलेल्या नरसोबाला मनीष कडून नारळ फोडण्याचा कार्यक्रमच असायचा . 

सोप्यातली सगळी आवराआवर झाली .

मग जेवणे करून झोपायला आम्हाला रात्रीचे आकरा वाजले . 

माझे दोन तीन दिवस लग्नाची चर्चा , नियोजन करण्यात कसे गेले समजले नाही . मला सोमवारी बँक होती म्हणून मी रविवारी बर्शीला जाणार होते . आम्ही जेवणे करून आवरुन पारा गाडी संगोल्याहून आली की जाऊ असे म्हणत बसलो होतो , काका गाडीचा अंदाज घ्यायला पेठेत गेले होते आणि गाडीचा आवाज आला म्हणून मी निघायच्या तयारीत होते तर काका परत आले आणि येताना त्यांच्याबरोबर तायडी आणि एमबीके भाऊजी आले होते . आता ती काय सांगते ते ऐकण्यासाठी आम्ही उस्तुकतेने तिच्याभोवती जमलो . आईने तिला सरबत दिले मग तिने उत्साहात सांगितले 

" 20 एप्रिलला किर्लोस्कर वाडीला लग्नाच्या पक्क्या याद्या , लग्नाची तारीख काढणे आणि साखरपुडा करण्याचे पक्के करून आलो आहे " .

सगळं अगदी पटापट ठरत होते . कारण नाना म्हणजे मुलाच्या वडिलांचे आणि काकांचे त्यादिवशी असे बोलणे झाले होते की जूनमध्ये मुहूर्त आहेत तर कशाला लांबवायचे , उडवून टाकू बार लगेच . मग त्या दृष्टीने या हालचाली होत होत्या . तायडी आणि भाऊजी कराडला जाऊन साखरपुड्याचे पक्के करून आले होते . येणाऱ्या गुरुवारी साखरपुडा होता मग तायडी येतानाच लुकतुकेना जेवणाची ऑर्डर , दारात छोटासा मंडप घालायची ऑर्डर ही कामे करून आली होती . तिने आईकाकांच होत असलेले उतारवय , घेरडीत होणाऱ्या गैरसोयी याचा विचार करत सगळा पुढाकार घेतला होता 

" आईकाका आपल्या मुली-जवयाना मुलाप्रमाणे मानतात तर आपण पण त्यांच्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात " 

असे म्हणत तिने ज्योतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली होती . आणि त्याप्रमाणे तिने कृती केली होती . 

आता गाडी पाऱ्याहून यायची वेळ झाली होती त्यामुळे 19 तारखेला आम्ही साखरपुड्याला वाडीला येतो असा निरोप घेऊन मी बार्शीला निघाले . 

रिटायर झाल्यापासून काकांची बैठक सोपान कांबळेच्या सायकल दुकानात असे . मला स्टँडवर सोडून काका दुकानात बसले नेमके अंता काका पण आले होते . काका सगळ्यांना कौतुकाने ज्योतीच्या साखरपुड्याचे सांगत होते . तसेच बेबीने कसं सगळं परस्पर पण अगदी व्यवस्थित नियोजन केले हे सांगत होते .भाऊ काकांना सगळ्या मुलीच आहेत कसं होणार असे म्हणणारे आता उलट म्हणू लागले . ज्यांना मुलं आहेत ते नीट पाहत नाहीत काय करायचं मुलांना त्यापेक्षा मुली बऱ्या . आई वडिलांना पाहतात तरी असे उघडउघड काका समोर म्हणायचे आईला पण बरेच जण हल्ली म्हणत असत 

" सगळ्या मुली आहेत तुम्हाला पण नशीबवान आहात तुम्ही , मुलं तरी काय देतात " .

आई-काका मात्र यावर काही बोलत नसत . शांत असायचे , त्यांनी एकूणच जीवनशैली ठरवली होती . काय कसे आणि कधी करायचे याच त्यांचं पूर्णपणे नियोजन झाले होते . त्यांना काळजी फक्त संजूची होती . आई अध्यात्मिक होती 

" जे पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे होणार आपण त्यात काही बदल करू शकत नाही "

असे ती म्हणत असे तर काका मात्र संजूची काळजी तर करायचेच पण बरोबर तिच्यावर अती जीव टाकत होते . संजूला कोणी बोललेले त्यांना पटत नसे . यावरून आई-काका मधे पण विसंवाद व्हायचे .

      घेरडीहून बार्शीत आल्याबरोबर मी ज्योतीच्या साखरपुड्याचा यांना सगळा वृत्तान्त सांगितला आणि दोन दिवसात आम्ही वाडीला जायची तयारी करू लागलो . काकांनी कपडा खरेदी जवळ्यात केली तर सोन खरेदी सांगलीत गाडगीळकडे करुन वाडीला जा असे तायडीला सांगितले . 

मायडी बदलापूरहून तर गोंदामामा सोलापूर हून यावा यासाठी काकांनी सांगोल्यात येऊन फोन केले . ठरल्याप्रमाणे 19 तारखेला घेरडीहून मोहन आण्णाचे घर , आमचे घर , आम्ही , मयाडी , गोंदा मामा एकएक करत संध्याकाळपर्यंत किर्लोस्करवाडीत हजर झालो . उद्या साखरपुडा होणार होता आज जय्यत तयारी झाली होती . आनंदाला उधाण आलं होतं , दरात मंडपात बसून गप्पांचे फड रंगले होते . ज्योतीच्या मेंदीला रंग चढत होता तिला नव्या नवरीचे तेज आले होते त्यामुळे ती अधिकच उठावदार दिसत होती . घरात तिच्या मोठ्या बहिणी भाऊजी सगळ्यांनी चिडवून तिला बेजार केले होते तर तायडीच्या मुली , धनु तिच्या भोवती घुटमळत होती एकूणच तायडीचे कुटुंब ज्योती मधे गुंतले होते . गाणी , भेंड्या सुरु होत्या तर कोणी आपल्याच डाव्या हातावर उजव्या हाताने मेंदी रेखाटत होते . रात्रीचे आकरा वाजून गेले होते पण कोणीही झोपण्याच्या मनस्थितीत नव्हते . सगळ्यांचा मजा करण्याचा मुड होता . मग नेहमीच्या स्टाईलने काकांनी आवाज दिला 

" चला बास झाल्या गप्पा उद्या पाहुणे लवकर येणार आहेत सगळ्यांनी पहाटे उठायचं आहे त्यामुळे पटापट झोपा सगळे ".

आणि त्यांनी लाईट पण बंद केले . आम्ही सगळ्या बहिणी , आई , उषा वहिनी , चीमु , शुभांगी मामी अंथरुणावर पडून पुन्हा बराच वेळ लग्न कसे जमले , मुलगा कसा आहे , काय करतो याविषयी गप्पा मारत होतो. केव्हा झोपलो कळले नाही तोवर उठायची वेळ झाली .







Saturday, May 1, 2021

कोंदण भाग 5

प्रकरण 25 वे


24/04/2021


माझे लग्न


        आठवड्यावर माझं लग्न आलं आणि घेरडीसारखं बार्शीत सुद्धा घर माणसांनी गच्च भरुन गेलं . मला खूप आनंद होत होता कारण मी जसं बार्शीत येऊन राहिले तसे माझे कुठेही जाणे झाले नव्हते आई-काका , संजू जाऊन आले होते पण रजेच्या कारणाने मला हलता येत नव्हते . आणि मी बँकेत जाॕईन व्हायला घेरडीतून निघालेली  ते पुन्हा घेरडीला न जाताच माझं लग्न होणार होतं . आमचं वऱ्हाड घेरडी व बार्शी या दोन ठिकाणाहून निघणार होतं . काही जण बार्शीला आले होते पण राहिलेल्या लोकांना घेरडीहून सोलापूरला आणण्याची काकांनी व्यवस्था केली होती . बार्शीत भाड्याचं घर त्यामुळे अनेक मर्यादा येत होत्या . पण त्याकडे लक्ष न देता इथे वेगळ काय मिळतं व त्यातून कसा आनंद मिळवायचा व संपुर्ण घर हसतं खेळतं कसं ठेवायचं यासाठी आई-काकांंना आदर्श म्हणूनच पहाव लागेल . 

          आता शरुचं लग्न झालं की आपण घेरडीला जाऊ पुन्हा कधी ही संधी मिळेल म्हणत सगळ्या लेकी-जावई नातवंडं जमल्यानंतर देवब्राम्हणादिवशी पहाटे भगवंताची महापूजा केली . मला अजूनही या गोष्टीचं राहूनराहून आश्चर्य वाटतं की चौथ्या मुलीचं लग्न तितक्याच म्हणण्यापेक्षा काकणभर जास्तच उत्साने आई-काकांंनी कसं केलं असेल ? किती ते कौतुक आणि किती माया , प्रेम ! पाहूणे रावळे वाढले तर कधी चिंता नाही की चिडचीड नाही . बार्शीत आग्रवालकडे रबडी छान मिळते , आंबे छान मिळतात , चार पैसे सोडले की वरकामाला ,  स्वयंपाकाला , बाकी कामाला बायका मिळतात म्हणत रोज एक काहीतरी काकांनी आणायचं आणि आईने व्यवस्थित नियोजन करत चविष्ट पदार्थानी सर्वांना तृप्त करायचं ! आता घरामध्ये आम्हा बहिणींबरोबर एमबीके भाऊजी व एसके भाऊजी आणि नातवंडांच्या गोतावळ्यांनी घर फुलून आलं होतं . त्याचबरोबर गोंदा मामा , उषा वहिनी , प्रभा काकू , तायडीच्या सासूबाई ही मंडळी पण आली होती मग घरामध्ये चेष्टा मस्करी , खाणपीणं आणि गप्पांचे फड रंगलेले असायचे . आठवडाभर पंचवीस तीस माणूस तरी नक्कीच घरात होतं . पद्माकर काकांच कुटुंब जाऊन येऊन असायचं . एकूणच कशाचीही उणीव भासत नव्हती . अगदी घेरडीतल्या सारखेच घरी बांगड्या भरणे , मेंदी , जातीपूजन सगळं यथासांग पार पडले . सोलापूर तसं बार्शीपासून दीड तासाच्या अंतरावर त्यामुळे दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही तीनच्या नाॕनस्टाॕपने सोलापूरला गेलो . पाच वाजता तर आम्ही कार्यालयात पोहोचलो ! माझ्या मैत्रीणी आणि घेरडीची मंडळी सहा वाजता आली आणि सहा महिन्यांनी खूप जणांच्या भेटी झाल्या . प्रत्येकाला पाहून मला भरुन येत होतं . श्रीमंतपूजन , लग्न अगदी थाटामाटात पार पडले . आता या लग्नकार्याची ,  प्रत्येक समारंभाची व शेवटी नवरीची पाठवणी करायची जणू आमच्याकडे सवय झाल्यासारखे झाले होते . तसे आई थोडंस रडून रिकामी होई पण काका मात्र जेवणे झाली की चेहरा लपवत अस्वस्थपणे इकडून तिकडे करत असत तसे ते हळवेच होते . माझी पण अवस्था फारशी वेगळी नव्हती . एकीकडे भावनावश होत रडणं तर दुसरीकडे नव्याची नवलाई मला खुणावत होती . परांड्याहून वऱ्हाड स्पेशल बसने आलं होतं . आता वऱ्हाडाची बस मला घेऊन सोलापूरहून बार्शीमार्गे  परांड्याला जाणार होती . 

       आमची दोन्ही कुटुंबे दोन टोके असल्याचे मला जाणवत होते . घेरडीच्या वातावरणात मोकळेपणा होता , चेष्टामस्करी व हसतखेळत बोलणं असायचं . तसं आमच्या दोघांच्या बऱ्याच भेटी झाल्यामुळे हेच मला जास्त ओळखीचे वाटत होते . ह्यांचे आमच्याकडे बऱ्यापैकी येणंजाणं झालंं होतं त्यामुळे ह्यांना आमच्या घरातील वातावरणाची पुर्ण कल्पना आली होती व मला थोडंस अवघडल्यासारखे वाटणार याची त्यांना कल्पना आली होती . सासुबाई म्हणजे काकी अगदीच जुजबी म्हणजे कामापुरतंच बोलत होत्या तर नणंदबाई अजिबातच बोलत नव्हत्या . बसमध्ये आम्ही बसलो बस निघाली तरी माझं रडणं सुरु होतं व शेजारी हे बसलेले काय कराव हे त्यांना समजत नव्हते वैराग आलं तसं हे थोडंस वेगळा विषय काढून बोलू लागले . वैरागमध्ये चहाला गाडी थांबली होती ह्यांचे मामा-मामी माझ्याशी बोलू लागले मग मला जरा हायसं वाटलं . परत गाडीत येताना यांनी माझ्यासाठी बानारस पान आणलं . पुढे आर्ध्या तासातच बार्शी आलं पण बार्शी मागे टाकताना मला मात्र हूरहूर वाटली तसं बार्शी काही आमचं मूळ गाव नव्हते पण सहा महिन्यापासून माझे बार्शीत वास्तव्य होते . साधारणपणे सातच्या दरम्यान आम्ही परांड्यात पोहोचलो मग लक्ष्मीपूजन झाले .

काकींचे माहेर शेजारी होते तर त्यांच्या दोन बहिणी पण शेजारीच रहात होत्या त्यामुळे लक्ष्मीपूजन झाले की सगळे पाहूणे आपापल्या घरी गेले त्यामुळे आमच्या घरी फारसे पाहूणे नव्हते , ह्यांच्या एक आत्या व आणखी दोघी कोणीतरी होत्या तसं घरात शांत शांत वाटत होतं . त्यामुळे मला परांडा घेरडी दोन्ही घराणी पुर्णपणे भिन्न संस्कृती असल्याचे जाणवले त्याचं मला खूप दडपण आलं होतं . यांनी मात्र सुरुवातीपासुनच अगदी सतर्कतेची भुमिका घेतली होती . सुनिल भाऊजी मात्र माझ्याशी एकदम मोकळेपणाने बोलत होते तेही बँकेत होते त्यामुळे आम्हाला तिघांना गप्पांना विषय होता . काका म्हणजे सासरे तेही फारसे बोलत नव्हते .

        मला बऱ्याच प्रयत्नांनी एकूण सतरा दिवसांची रजा मिळाली होती . देवब्राम्हणा पासून मी रजेवर होते मग बार्शीतच माझी येतीजाती करायची व नंतर आई-काका बिऱ्हाड घेरडीला हलवणार असे ठरले होते . चारपाच दिवसांनी सकाळी आठ वाजता काका मला येतीजातीसाठी बार्शीला नेण्यासाठी परांड्यात आले . त्यादिवशी आषाढ महिना सुरु झाला होता तर नव्या सुनेनं पहिल्या आषाढात सासूच तोंड पहायचं नसतं म्हणून मी उठण्यापुर्वी पहाटेच काकी त्यांच्या भावाकडे जाऊन बसल्या ! आमचे काका आल्यावर त्यांना  हे समजले ते इतकं हसू लागले आणि म्हणाले

" हाच तो पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात फरक आहे . हे सगळे  रितीरिवाज खूप जुने आहेत आजकाल कोणी हे पाळत नाहीत पण अजूनही  मराठवाड्यातील लोक जुन्या  रितीरिवाजांना  घट्ट पकडून आहेत म्हणून  त्यांची 33% मानसिकता आहे असे म्हणले जाते ". 

काका बोलतांना फार स्पष्टपणे बोलायचे . काका आले म्हणून यांचे मामा घरी आले होते त्यांच्याशी काकांनी अशा गप्पा मारल्या तर सगळे हसू लागले व बरोबर आहे असेही म्हणू लागले . मी व काका बार्शीला आलो . इकडे आई व संजू माझी वाटच पहात बसल्या होत्या . दिवसभर आई-काकांशी मी गप्पा मारत होते तर आई व मी रात्री पुन्हा पहाटेपर्यंत गप्पा मारत बसलो होते . आईला मुली आल्यावर रात्री बराचवेळ गप्पा मारायची सवय होती . या गप्पासुद्धा तिच्या कधीही चुगलीखोर किंवा कान भरण्याच्या नसायच्या मुलगी खूष आहे ना याची चाचपणी असायची ती . तर आपल्या मुली कशा वागतात यावरही तिचे लक्ष असे वेळ पडली तर ती मुलींचीच कानउघडणी करायची . दुसरे दिवशी हे लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला येणार होते व एक दिवस राहून आम्ही महाबळेश्वरला जाणार होतो . पुन्हा पहिल्यांदा जावई सासुरवाडीला आले  म्हणून कोडकौतुकाला अगदी उधाण आलंं होतं .

        बार्शीत आम्ही फुलवारा चौकात रहात होतो सकाळी सहापासून आमच्या दारातच फुलांचे लिलाव व्हायचे . तो सिझन मोगऱ्याचा होता यांना अत्तर , उदबत्ती , परफ्युम , सुवासिक फुले मानापासून आवडतात त्यामुळे मोगऱ्याचा ढीग दारात पाहून ते इतके खूष झाले . अर्ध्या तासांने बाहेर जाऊन त्यांनी जादा पैसे देऊन फुलवाल्याकडून मोगऱ्याचे स्पेशल गजरे करुन आणले ते पाहून आई खूप खूष झाली व म्हणाली 

" शरु , काळजी करायचं काही कारण नाही परांडकर स्वतः खूप हौशी आहेत बघ , न सांगता एखादी गोष्ट नवऱ्याला समजली की तो दर्दी आहे असं समजावं ".

आणि हे मनोमन हसले . तसा यांचा स्वभाव थोडासा भिडस्तच होता पण अंदाज घेत ते दिलखुलास होत असत . तशी पाचसहा महिन्यात चांगली ओळख झाली होती व आई-काका पण चेष्टेत बोलत असत . महाबळेश्वरला जाण्यासाठी आम्ही जेवणे वगैरे करुन लवकरच निघालो चार वाजता पुण्यात पोहोचलो त्यादिवशी आम्ही पुण्यात फिरलो व दुसरे दिवशी महाबळेश्वरला रवाना झालो . चारपाच दिवस खूप मजेत गेले त्यादरम्यान काकांनी बार्शीहून बिऱ्हाड उचलले होते . आणि घेरडीतील लोक म्हणाले त्याप्रमाणे काकांनी घेरडीतून उचललेले बिऱ्हाड सहा महिन्यातच माझं लग्न करुन देऊन पुन्हा घेरडीत नेले होते . आम्ही महाबळेश्वरहून आल्यावर डायरेक्ट परांड्याला गेलो .

या ट्रीप दरम्यान खूप मजा आली व यांनी सांगितलेले किस्से आठवले तर आजही हसू येते .

        पहिला किस्सा म्हणजे पहिल्यांदा स्थळासाठी काका यांना बँकेत जाऊन भेटले व पत्रिका देऊन आले तर दुसरे दिवशी हे खातं उघडायच्या बहाण्याने आमच्या बँकेत आले होते व माझ्या काऊंटरसमोर उभे राहून फाॕर्म भरत मला व्यवस्थित पाहून गेले होते त्याची मला सुताराम कल्पना नव्हती . तर दुसरा किस्सा म्हणजे आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एका शनिवारी बँक सुटल्यानंतर मी गड्ड्याच्या यात्रेसाठी चंदूकाकाबरोबर सोलापूरला निघाले होते नेमके त्याच वेळेस हे परांड्याला जाण्यासाठी स्टँडवर आल्यावर त्यांना मी दिसले होते . तर हे जवळून दोन चकरा मारुन गेले तरी मला समजले नव्हते म्हणे ! अशा प्रकारे त्यांनी लग्न ठरण्यापुर्वी तीन वेळेस मला पाहिलं होतं पण मी मात्र यांना एकदाच भेटले होते ! 

       महाबळेश्वर ट्रीपमध्ये त्यांनी बोलण्याची सुरुवात एकूणच मोकळेपणानं केली होती . घरातील वातावरण समजून घ्यावं अशी त्यांची तळमळ मला दिसून आली . तीनचार वर्षापासून बहिणीच्या लग्नाचं पहातात पण जमले नाही मग यांना उशीर होऊ लागला मग एक लग्न झालं तर दुसरं होतं असे म्हणून यांच्यासाठी पहायला सुरुवात केली तर लगेच आमचं लग्न जमले होते व झाले त्यामुळे मुलीच्या आधीच मुलाचं लग्न करावे लागणार मग लोक काय म्हणतील म्हणत घरातील वातावरण थोडंस तंग झाले होते . बहिणीचं लग्नाच पहातोच आहे तीचं झालं की लगेचच भावाचं पण करणार आहोत मग सगळी मजा येईल . तर थोडे दिवस आपल्याला समजूतीनं वागावं लागेल . घरात मी मोठा आहे  तू यादरम्यान मला समजून घ्यावस . आपण दोघेही छान नोकरी करतो आपला जम बसायला काहीच अडचण नाही . 

     घेरडीत मुलींमध्ये माझा चौथा नंबर होता त्यामुळे बऱ्यापैकी लहान म्हणून लाडावलेली , थोडासा स्वभावात अल्लडपणा , खोडकरपणा होता ते इकडे आले की हे सर्वात मोठे मग त्यांची बायको म्हणून सगळच बदललं मी वयाने लहान असले तरी मानाने मोठेपणाचं शिक्कामोर्तब झालं . त्यामुळे मला वागण्यात जाणिवपूर्वक जबाबरपणा , समजूतदारपणा आणावा लागला व मी त्यांना पुर्णपणे आश्वस्त केलं . हे जेव्हा मी येतीजातीला आले तेव्हा आई-काकांना सांगितले तर त्या दोघांनी पण

" परांडकरांचे म्हणणे अगदी बरोबर आहे तू ते काही  अडचणीत पडतील असं वागू नकोस आम्हांला पाच मुली आहेत तशीच तुला ती अजून एक बहिण आहे असे समज  तुमच्या घरात ती दोन्ही लग्न झाली की सगळं व्यवस्थित होईल . लग्न जमत नाही म्हणून सगळे हवालदील झालेत व ते सहाजीकच आहे ".

      आमची रजा संपली व आमचे रुटीन सुरु झाले . आई-काका सहा महिने फेरफटका मारुन पुन्हा घेरडीत स्थीरस्थावर झाले . काकांना व एकूणच घेरडीत माझ्या नोकरीचे खूप आप्रुप वाटायचे . एकूणच माझी नोकरी , जावई पण सरकारी बँकेत , तेही दोघेपण एकाच गावात त्यामुळे नोकरीनिमित्त आम्हांला वेगळ रहावं लागणार नव्हत . शरुचं  सगळं कसं व्यवस्थित रांकेला लावलं याबाबत काका स्वतःवर खूष होते . तसेच काका यांच्यावर पण मनोमन खूष होते . 

" परांडकर धोरणी , चाणाक्ष आहेत , त्यांना व्यवहारी ज्ञान भरपूर आहे व ते जबाबदारीने वागतात बरोबर मॕनेज करतील ही खात्री आहे काळजीचं काहीच कारण नाही ".

असं काका म्हणायचे . आता घेरडीत माझ्या पाठोपाठ मोहन आण्णाची मुलगी चिमू लग्नाची होती .  तिला काका बँकेच्या परिक्षा दे म्हणून मागे लागत तर ज्योतीने पण काॕमर्सला जावे व बँकेची परिक्षा दिली तर नोकरी लागायला , लग्न जमायला सोपं जाईल असं त्यांना वाटायचं . आता घरात आई-काका व संजू तिघेच रहायचे त्यांनी शेतीचा व्याप बराचसा कमी करत आणला होता तसंच मुलींच्या जबाबदाऱ्या पण कमी होत चालल्या होत्या . आता त्यांना वाटायचे की मुलींना जिथे गरज आहे तिथे त्यांनी स्वतःचे घर घेऊन स्थीर झाले पाहिजे . ज्योती बदलापूरला शिकत होती , ती दिसायला छान दिसायची , चुणचुणीत व हुशार होती . संजू तर सगळ्या मुलींमध्ये सुंदर दिसत होती पण बुद्धीचा मंदपणा मात्र प्रकर्षाने जाणवत होता . ती शाळेत जायची पण इतर मुलांच्या तुलनेत हिची प्रगती होत नव्हती . शाळेतील सर्वजण ओळखीचे होते मग काकांची मुलगी म्हणून तिला सांभाळून घेणं सुरु झालं . काकांनी शाळेत जाऊन सांगितले होते

" आम्हांला आमच्या मुलीची पुर्ण कल्पना आहे तीला फक्त मुलींसोबत वावरायला मिळावं म्हणून शाळेत पाठवत आहोत तिला आलं पाहिजे हा अट्टाहास नाही . जेवढं येतं तेवढं करुदे ".

खेडेगाव होतं काकांची सगळीकडे उठबस होती मग शाळेनी पण सहकार्य केले व तिला पुढच्या वर्गात ढकलणे सुरु झाले .

      माझा लग्नानंतर पहिला सण मंगळागौरीचा आला . आणि जवळजवळ आठ महिन्यांनी मी घेरडीला जाणार होते . आम्ही दोघेही परांड्याहून रोज जाऊन येऊन करत होतो त्यामुळे काका मला नेण्यासाठी परांड्यात आले होते . आम्ही शनिवारी सकाळी बार्शीला आलो माझी बँक करुन दुपारी तीन नंतर घेरडीला गेलो . घेरडीला केव्हा एकदा पोहोचते असे मला झाले होते मला खूप आनंद झाला होता . रविवारी दिवसभर वाड्यात सगळ्यांकडे जाऊन आले शिवाय संध्याकाळी सगळेजण महादेवाला गेलो . सोमवारी हे पहिल्यांदा घेरडीला आले . मंगळागौरीची पूजा झाली व रात्रीच्या फराळाचा व खेळांचा खूप मोठा घाट आईने घातला होता . उखाणे , गाणी आणि खेळ आनंदाला अगदी उधाण आलं होतं . पहाटे तीन वाजेपर्यंत मंगळागौर जागवली . मला तीन दिवसांची रजा मिळाली होती त्यामुळे गुरुवारी बँकेत जाण्यासाठी मला बुधवारी परांड्याला जावे लागणार होते . तर बुधवारी मुलींना सासरी पाठवू नये 

"जाशील बुधी तर येशील कधी "

 असं होतं असे आई म्हणाली तर काका आईला म्हणाले 

" नविन असेपर्यंत शरुला तीन दिवसांचीच रजा मिळणार व सुट्टीला जोडून आणलं तर तिला नेहमीच बुधवारी जावे लागणार आहे त्यामुळे हे आपल्याला पाळता येणार नाही ".

आणि खरंचच नेहमीच मी बुधवारी घेरडीतून निघत असे . 

      माझी पहिली दिवाळी किर्लोस्करवाडीला झाली आई-काका संजू घेरडीहून , मायडीचे कुटुंब व ज्योती बदलापूरहून तर आम्ही दोघे परांड्याहून किर्लोस्करवाडीला गेलो आम्ही सगळ्या लेकी व जावई माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा भेटलो पुन्हा गप्पा , चेष्टा , मस्करीला उधाण आलं . आम्ही सगळे नरसोबा वाडीला जाऊन आलो त्यावेळेस पण भारीच गंमत झाली आमच्या दोघांपैकी ह्यांना केळी खूप आवडतात तर मी केळीला हातच लावत नाही तर दुध म्हणजे मला जीव की प्राण तर यांना दुधाचा वास पण नाही आवडत चहा मात्र खूप लागतो पण घरचं ताक दही लोणी अगदी वर्ज्य पण तूप चालतं विकतची बासूंदी , श्रीखंड , दही चालतं अस शास्त्र आहे . घेरडीत मात्र सर्वांनाच दुग्धजन्य पदार्थ भरपूर आवडतात आणि लागतात . यांचे दुध न खाणे हा आमच्याकडे चर्चेचा विषय असायचा . आम्ही नरसोबावाडीला गेल्यावर सगळेजण तीसपस्तीस पायऱ्या उतरुन पाय धुवून वर आलो व दर्शन घेतलं तिथल्या प्रथेप्रमाणे पुजाऱ्यांनी पटपट सर्वांना भरपूर दहीदुध असलेला मोठा चमचाभर पंचामृत दिलं , यांची झाली पंचाईत ! कसतरी पटकन त्यांनी ते पीलं व तितक्याच पायऱ्या उतरुन ते तोंड हात धुवायला पुन्हा खाली गेले . आमच्याकडे सगळ्यांना त्या गोष्टीचे इतके आश्चर्य वाटले की विचारता सोय नाही . तिथून निघताना दिवाळी आहे म्हणून मोठा डबा भरुन तीन किलो बासूंदी घेतली व बसमध्ये चढताना यांनी डब्याची पिशवी घेतली व सीटखाली ठेवली वाडीत आल्यावर आम्ही घराजवळच्या स्टाॕवर उतरलो बस पुढे गेली व लक्षात आले की बसमध्ये बासूंदीचा डबा तसाच गेला ! यांना कससच झालं , आपण अगदीच लहान मुलांप्रमाणे वागतोय असे वाटू लागले . आधी तो पंचामृताचा किस्सा व आता बासूंदीचा ! एमबीके भाऊजींनी पटकन कोणाच्यातरी गाडीवर बसून स्टँड गाठले गाडी अजून उभी होती व सीटखाली डबा पण ! भाऊजी डबा घेऊन परत आल्यावर सगळ्यांना हुश्श्य झालं विशेषतः ह्यांना ! नंतर मात्र सगळे जमले की आजही हा विषय निघाला की सगळे हसत आसतात .

           पुढे डिसेंबरमध्ये माझ्याकडे गोड बातमीची चाहूल लागली व मला खूप त्रास होत होता मग जानेवारीमध्ये संक्रांत सण घेऊन आई आली होती तेव्हा आम्ही बार्शीत रहायला सुरुवात केली होती आई दोनतीन दिवस बार्शीत राहिली व सणासाठी आम्ही परांड्याला गेलो .आई  नविन बाळाची उत्सुकतेने वाट पहात व जाताना मात्र सगळे पुढचे नियोजन करत होती माझ्यावेळी मात्र आईला वेगळीच काळजी वाटायची ती म्हणजे आता हीला रजा कधी मिळणार घेरडीला कधी न्यायचं आणि मुख्य म्हणजे मायडीला पहिल्यावेळी झालेला त्रास व दवाखान्याची सोय नाही व माझी परिस्थिती याचा विचार करत एकीकडे काळजी तर एकीकडे आनंद अशा मनस्थितीत व नविन बाळाच्या स्वागताच्या तयारीत ती घेरडीला गेली !



प्रकरण 26 वे


माझं पहिलं बाळंतपण


05/05/2021


          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!