Showing posts with label Kondan. Show all posts
Showing posts with label Kondan. Show all posts

Saturday, May 1, 2021

कोंदण भाग 5

प्रकरण 25 वे


24/04/2021


माझे लग्न


        आठवड्यावर माझं लग्न आलं आणि घेरडीसारखं बार्शीत सुद्धा घर माणसांनी गच्च भरुन गेलं . मला खूप आनंद होत होता कारण मी जसं बार्शीत येऊन राहिले तसे माझे कुठेही जाणे झाले नव्हते आई-काका , संजू जाऊन आले होते पण रजेच्या कारणाने मला हलता येत नव्हते . आणि मी बँकेत जाॕईन व्हायला घेरडीतून निघालेली  ते पुन्हा घेरडीला न जाताच माझं लग्न होणार होतं . आमचं वऱ्हाड घेरडी व बार्शी या दोन ठिकाणाहून निघणार होतं . काही जण बार्शीला आले होते पण राहिलेल्या लोकांना घेरडीहून सोलापूरला आणण्याची काकांनी व्यवस्था केली होती . बार्शीत भाड्याचं घर त्यामुळे अनेक मर्यादा येत होत्या . पण त्याकडे लक्ष न देता इथे वेगळ काय मिळतं व त्यातून कसा आनंद मिळवायचा व संपुर्ण घर हसतं खेळतं कसं ठेवायचं यासाठी आई-काकांंना आदर्श म्हणूनच पहाव लागेल . 

          आता शरुचं लग्न झालं की आपण घेरडीला जाऊ पुन्हा कधी ही संधी मिळेल म्हणत सगळ्या लेकी-जावई नातवंडं जमल्यानंतर देवब्राम्हणादिवशी पहाटे भगवंताची महापूजा केली . मला अजूनही या गोष्टीचं राहूनराहून आश्चर्य वाटतं की चौथ्या मुलीचं लग्न तितक्याच म्हणण्यापेक्षा काकणभर जास्तच उत्साने आई-काकांंनी कसं केलं असेल ? किती ते कौतुक आणि किती माया , प्रेम ! पाहूणे रावळे वाढले तर कधी चिंता नाही की चिडचीड नाही . बार्शीत आग्रवालकडे रबडी छान मिळते , आंबे छान मिळतात , चार पैसे सोडले की वरकामाला ,  स्वयंपाकाला , बाकी कामाला बायका मिळतात म्हणत रोज एक काहीतरी काकांनी आणायचं आणि आईने व्यवस्थित नियोजन करत चविष्ट पदार्थानी सर्वांना तृप्त करायचं ! आता घरामध्ये आम्हा बहिणींबरोबर एमबीके भाऊजी व एसके भाऊजी आणि नातवंडांच्या गोतावळ्यांनी घर फुलून आलं होतं . त्याचबरोबर गोंदा मामा , उषा वहिनी , प्रभा काकू , तायडीच्या सासूबाई ही मंडळी पण आली होती मग घरामध्ये चेष्टा मस्करी , खाणपीणं आणि गप्पांचे फड रंगलेले असायचे . आठवडाभर पंचवीस तीस माणूस तरी नक्कीच घरात होतं . पद्माकर काकांच कुटुंब जाऊन येऊन असायचं . एकूणच कशाचीही उणीव भासत नव्हती . अगदी घेरडीतल्या सारखेच घरी बांगड्या भरणे , मेंदी , जातीपूजन सगळं यथासांग पार पडले . सोलापूर तसं बार्शीपासून दीड तासाच्या अंतरावर त्यामुळे दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही तीनच्या नाॕनस्टाॕपने सोलापूरला गेलो . पाच वाजता तर आम्ही कार्यालयात पोहोचलो ! माझ्या मैत्रीणी आणि घेरडीची मंडळी सहा वाजता आली आणि सहा महिन्यांनी खूप जणांच्या भेटी झाल्या . प्रत्येकाला पाहून मला भरुन येत होतं . श्रीमंतपूजन , लग्न अगदी थाटामाटात पार पडले . आता या लग्नकार्याची ,  प्रत्येक समारंभाची व शेवटी नवरीची पाठवणी करायची जणू आमच्याकडे सवय झाल्यासारखे झाले होते . तसे आई थोडंस रडून रिकामी होई पण काका मात्र जेवणे झाली की चेहरा लपवत अस्वस्थपणे इकडून तिकडे करत असत तसे ते हळवेच होते . माझी पण अवस्था फारशी वेगळी नव्हती . एकीकडे भावनावश होत रडणं तर दुसरीकडे नव्याची नवलाई मला खुणावत होती . परांड्याहून वऱ्हाड स्पेशल बसने आलं होतं . आता वऱ्हाडाची बस मला घेऊन सोलापूरहून बार्शीमार्गे  परांड्याला जाणार होती . 

       आमची दोन्ही कुटुंबे दोन टोके असल्याचे मला जाणवत होते . घेरडीच्या वातावरणात मोकळेपणा होता , चेष्टामस्करी व हसतखेळत बोलणं असायचं . तसं आमच्या दोघांच्या बऱ्याच भेटी झाल्यामुळे हेच मला जास्त ओळखीचे वाटत होते . ह्यांचे आमच्याकडे बऱ्यापैकी येणंजाणं झालंं होतं त्यामुळे ह्यांना आमच्या घरातील वातावरणाची पुर्ण कल्पना आली होती व मला थोडंस अवघडल्यासारखे वाटणार याची त्यांना कल्पना आली होती . सासुबाई म्हणजे काकी अगदीच जुजबी म्हणजे कामापुरतंच बोलत होत्या तर नणंदबाई अजिबातच बोलत नव्हत्या . बसमध्ये आम्ही बसलो बस निघाली तरी माझं रडणं सुरु होतं व शेजारी हे बसलेले काय कराव हे त्यांना समजत नव्हते वैराग आलं तसं हे थोडंस वेगळा विषय काढून बोलू लागले . वैरागमध्ये चहाला गाडी थांबली होती ह्यांचे मामा-मामी माझ्याशी बोलू लागले मग मला जरा हायसं वाटलं . परत गाडीत येताना यांनी माझ्यासाठी बानारस पान आणलं . पुढे आर्ध्या तासातच बार्शी आलं पण बार्शी मागे टाकताना मला मात्र हूरहूर वाटली तसं बार्शी काही आमचं मूळ गाव नव्हते पण सहा महिन्यापासून माझे बार्शीत वास्तव्य होते . साधारणपणे सातच्या दरम्यान आम्ही परांड्यात पोहोचलो मग लक्ष्मीपूजन झाले .

काकींचे माहेर शेजारी होते तर त्यांच्या दोन बहिणी पण शेजारीच रहात होत्या त्यामुळे लक्ष्मीपूजन झाले की सगळे पाहूणे आपापल्या घरी गेले त्यामुळे आमच्या घरी फारसे पाहूणे नव्हते , ह्यांच्या एक आत्या व आणखी दोघी कोणीतरी होत्या तसं घरात शांत शांत वाटत होतं . त्यामुळे मला परांडा घेरडी दोन्ही घराणी पुर्णपणे भिन्न संस्कृती असल्याचे जाणवले त्याचं मला खूप दडपण आलं होतं . यांनी मात्र सुरुवातीपासुनच अगदी सतर्कतेची भुमिका घेतली होती . सुनिल भाऊजी मात्र माझ्याशी एकदम मोकळेपणाने बोलत होते तेही बँकेत होते त्यामुळे आम्हाला तिघांना गप्पांना विषय होता . काका म्हणजे सासरे तेही फारसे बोलत नव्हते .

        मला बऱ्याच प्रयत्नांनी एकूण सतरा दिवसांची रजा मिळाली होती . देवब्राम्हणा पासून मी रजेवर होते मग बार्शीतच माझी येतीजाती करायची व नंतर आई-काका बिऱ्हाड घेरडीला हलवणार असे ठरले होते . चारपाच दिवसांनी सकाळी आठ वाजता काका मला येतीजातीसाठी बार्शीला नेण्यासाठी परांड्यात आले . त्यादिवशी आषाढ महिना सुरु झाला होता तर नव्या सुनेनं पहिल्या आषाढात सासूच तोंड पहायचं नसतं म्हणून मी उठण्यापुर्वी पहाटेच काकी त्यांच्या भावाकडे जाऊन बसल्या ! आमचे काका आल्यावर त्यांना  हे समजले ते इतकं हसू लागले आणि म्हणाले

" हाच तो पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात फरक आहे . हे सगळे  रितीरिवाज खूप जुने आहेत आजकाल कोणी हे पाळत नाहीत पण अजूनही  मराठवाड्यातील लोक जुन्या  रितीरिवाजांना  घट्ट पकडून आहेत म्हणून  त्यांची 33% मानसिकता आहे असे म्हणले जाते ". 

काका बोलतांना फार स्पष्टपणे बोलायचे . काका आले म्हणून यांचे मामा घरी आले होते त्यांच्याशी काकांनी अशा गप्पा मारल्या तर सगळे हसू लागले व बरोबर आहे असेही म्हणू लागले . मी व काका बार्शीला आलो . इकडे आई व संजू माझी वाटच पहात बसल्या होत्या . दिवसभर आई-काकांशी मी गप्पा मारत होते तर आई व मी रात्री पुन्हा पहाटेपर्यंत गप्पा मारत बसलो होते . आईला मुली आल्यावर रात्री बराचवेळ गप्पा मारायची सवय होती . या गप्पासुद्धा तिच्या कधीही चुगलीखोर किंवा कान भरण्याच्या नसायच्या मुलगी खूष आहे ना याची चाचपणी असायची ती . तर आपल्या मुली कशा वागतात यावरही तिचे लक्ष असे वेळ पडली तर ती मुलींचीच कानउघडणी करायची . दुसरे दिवशी हे लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला येणार होते व एक दिवस राहून आम्ही महाबळेश्वरला जाणार होतो . पुन्हा पहिल्यांदा जावई सासुरवाडीला आले  म्हणून कोडकौतुकाला अगदी उधाण आलंं होतं .

        बार्शीत आम्ही फुलवारा चौकात रहात होतो सकाळी सहापासून आमच्या दारातच फुलांचे लिलाव व्हायचे . तो सिझन मोगऱ्याचा होता यांना अत्तर , उदबत्ती , परफ्युम , सुवासिक फुले मानापासून आवडतात त्यामुळे मोगऱ्याचा ढीग दारात पाहून ते इतके खूष झाले . अर्ध्या तासांने बाहेर जाऊन त्यांनी जादा पैसे देऊन फुलवाल्याकडून मोगऱ्याचे स्पेशल गजरे करुन आणले ते पाहून आई खूप खूष झाली व म्हणाली 

" शरु , काळजी करायचं काही कारण नाही परांडकर स्वतः खूप हौशी आहेत बघ , न सांगता एखादी गोष्ट नवऱ्याला समजली की तो दर्दी आहे असं समजावं ".

आणि हे मनोमन हसले . तसा यांचा स्वभाव थोडासा भिडस्तच होता पण अंदाज घेत ते दिलखुलास होत असत . तशी पाचसहा महिन्यात चांगली ओळख झाली होती व आई-काका पण चेष्टेत बोलत असत . महाबळेश्वरला जाण्यासाठी आम्ही जेवणे वगैरे करुन लवकरच निघालो चार वाजता पुण्यात पोहोचलो त्यादिवशी आम्ही पुण्यात फिरलो व दुसरे दिवशी महाबळेश्वरला रवाना झालो . चारपाच दिवस खूप मजेत गेले त्यादरम्यान काकांनी बार्शीहून बिऱ्हाड उचलले होते . आणि घेरडीतील लोक म्हणाले त्याप्रमाणे काकांनी घेरडीतून उचललेले बिऱ्हाड सहा महिन्यातच माझं लग्न करुन देऊन पुन्हा घेरडीत नेले होते . आम्ही महाबळेश्वरहून आल्यावर डायरेक्ट परांड्याला गेलो .

या ट्रीप दरम्यान खूप मजा आली व यांनी सांगितलेले किस्से आठवले तर आजही हसू येते .

        पहिला किस्सा म्हणजे पहिल्यांदा स्थळासाठी काका यांना बँकेत जाऊन भेटले व पत्रिका देऊन आले तर दुसरे दिवशी हे खातं उघडायच्या बहाण्याने आमच्या बँकेत आले होते व माझ्या काऊंटरसमोर उभे राहून फाॕर्म भरत मला व्यवस्थित पाहून गेले होते त्याची मला सुताराम कल्पना नव्हती . तर दुसरा किस्सा म्हणजे आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एका शनिवारी बँक सुटल्यानंतर मी गड्ड्याच्या यात्रेसाठी चंदूकाकाबरोबर सोलापूरला निघाले होते नेमके त्याच वेळेस हे परांड्याला जाण्यासाठी स्टँडवर आल्यावर त्यांना मी दिसले होते . तर हे जवळून दोन चकरा मारुन गेले तरी मला समजले नव्हते म्हणे ! अशा प्रकारे त्यांनी लग्न ठरण्यापुर्वी तीन वेळेस मला पाहिलं होतं पण मी मात्र यांना एकदाच भेटले होते ! 

       महाबळेश्वर ट्रीपमध्ये त्यांनी बोलण्याची सुरुवात एकूणच मोकळेपणानं केली होती . घरातील वातावरण समजून घ्यावं अशी त्यांची तळमळ मला दिसून आली . तीनचार वर्षापासून बहिणीच्या लग्नाचं पहातात पण जमले नाही मग यांना उशीर होऊ लागला मग एक लग्न झालं तर दुसरं होतं असे म्हणून यांच्यासाठी पहायला सुरुवात केली तर लगेच आमचं लग्न जमले होते व झाले त्यामुळे मुलीच्या आधीच मुलाचं लग्न करावे लागणार मग लोक काय म्हणतील म्हणत घरातील वातावरण थोडंस तंग झाले होते . बहिणीचं लग्नाच पहातोच आहे तीचं झालं की लगेचच भावाचं पण करणार आहोत मग सगळी मजा येईल . तर थोडे दिवस आपल्याला समजूतीनं वागावं लागेल . घरात मी मोठा आहे  तू यादरम्यान मला समजून घ्यावस . आपण दोघेही छान नोकरी करतो आपला जम बसायला काहीच अडचण नाही . 

     घेरडीत मुलींमध्ये माझा चौथा नंबर होता त्यामुळे बऱ्यापैकी लहान म्हणून लाडावलेली , थोडासा स्वभावात अल्लडपणा , खोडकरपणा होता ते इकडे आले की हे सर्वात मोठे मग त्यांची बायको म्हणून सगळच बदललं मी वयाने लहान असले तरी मानाने मोठेपणाचं शिक्कामोर्तब झालं . त्यामुळे मला वागण्यात जाणिवपूर्वक जबाबरपणा , समजूतदारपणा आणावा लागला व मी त्यांना पुर्णपणे आश्वस्त केलं . हे जेव्हा मी येतीजातीला आले तेव्हा आई-काकांना सांगितले तर त्या दोघांनी पण

" परांडकरांचे म्हणणे अगदी बरोबर आहे तू ते काही  अडचणीत पडतील असं वागू नकोस आम्हांला पाच मुली आहेत तशीच तुला ती अजून एक बहिण आहे असे समज  तुमच्या घरात ती दोन्ही लग्न झाली की सगळं व्यवस्थित होईल . लग्न जमत नाही म्हणून सगळे हवालदील झालेत व ते सहाजीकच आहे ".

      आमची रजा संपली व आमचे रुटीन सुरु झाले . आई-काका सहा महिने फेरफटका मारुन पुन्हा घेरडीत स्थीरस्थावर झाले . काकांना व एकूणच घेरडीत माझ्या नोकरीचे खूप आप्रुप वाटायचे . एकूणच माझी नोकरी , जावई पण सरकारी बँकेत , तेही दोघेपण एकाच गावात त्यामुळे नोकरीनिमित्त आम्हांला वेगळ रहावं लागणार नव्हत . शरुचं  सगळं कसं व्यवस्थित रांकेला लावलं याबाबत काका स्वतःवर खूष होते . तसेच काका यांच्यावर पण मनोमन खूष होते . 

" परांडकर धोरणी , चाणाक्ष आहेत , त्यांना व्यवहारी ज्ञान भरपूर आहे व ते जबाबदारीने वागतात बरोबर मॕनेज करतील ही खात्री आहे काळजीचं काहीच कारण नाही ".

असं काका म्हणायचे . आता घेरडीत माझ्या पाठोपाठ मोहन आण्णाची मुलगी चिमू लग्नाची होती .  तिला काका बँकेच्या परिक्षा दे म्हणून मागे लागत तर ज्योतीने पण काॕमर्सला जावे व बँकेची परिक्षा दिली तर नोकरी लागायला , लग्न जमायला सोपं जाईल असं त्यांना वाटायचं . आता घरात आई-काका व संजू तिघेच रहायचे त्यांनी शेतीचा व्याप बराचसा कमी करत आणला होता तसंच मुलींच्या जबाबदाऱ्या पण कमी होत चालल्या होत्या . आता त्यांना वाटायचे की मुलींना जिथे गरज आहे तिथे त्यांनी स्वतःचे घर घेऊन स्थीर झाले पाहिजे . ज्योती बदलापूरला शिकत होती , ती दिसायला छान दिसायची , चुणचुणीत व हुशार होती . संजू तर सगळ्या मुलींमध्ये सुंदर दिसत होती पण बुद्धीचा मंदपणा मात्र प्रकर्षाने जाणवत होता . ती शाळेत जायची पण इतर मुलांच्या तुलनेत हिची प्रगती होत नव्हती . शाळेतील सर्वजण ओळखीचे होते मग काकांची मुलगी म्हणून तिला सांभाळून घेणं सुरु झालं . काकांनी शाळेत जाऊन सांगितले होते

" आम्हांला आमच्या मुलीची पुर्ण कल्पना आहे तीला फक्त मुलींसोबत वावरायला मिळावं म्हणून शाळेत पाठवत आहोत तिला आलं पाहिजे हा अट्टाहास नाही . जेवढं येतं तेवढं करुदे ".

खेडेगाव होतं काकांची सगळीकडे उठबस होती मग शाळेनी पण सहकार्य केले व तिला पुढच्या वर्गात ढकलणे सुरु झाले .

      माझा लग्नानंतर पहिला सण मंगळागौरीचा आला . आणि जवळजवळ आठ महिन्यांनी मी घेरडीला जाणार होते . आम्ही दोघेही परांड्याहून रोज जाऊन येऊन करत होतो त्यामुळे काका मला नेण्यासाठी परांड्यात आले होते . आम्ही शनिवारी सकाळी बार्शीला आलो माझी बँक करुन दुपारी तीन नंतर घेरडीला गेलो . घेरडीला केव्हा एकदा पोहोचते असे मला झाले होते मला खूप आनंद झाला होता . रविवारी दिवसभर वाड्यात सगळ्यांकडे जाऊन आले शिवाय संध्याकाळी सगळेजण महादेवाला गेलो . सोमवारी हे पहिल्यांदा घेरडीला आले . मंगळागौरीची पूजा झाली व रात्रीच्या फराळाचा व खेळांचा खूप मोठा घाट आईने घातला होता . उखाणे , गाणी आणि खेळ आनंदाला अगदी उधाण आलं होतं . पहाटे तीन वाजेपर्यंत मंगळागौर जागवली . मला तीन दिवसांची रजा मिळाली होती त्यामुळे गुरुवारी बँकेत जाण्यासाठी मला बुधवारी परांड्याला जावे लागणार होते . तर बुधवारी मुलींना सासरी पाठवू नये 

"जाशील बुधी तर येशील कधी "

 असं होतं असे आई म्हणाली तर काका आईला म्हणाले 

" नविन असेपर्यंत शरुला तीन दिवसांचीच रजा मिळणार व सुट्टीला जोडून आणलं तर तिला नेहमीच बुधवारी जावे लागणार आहे त्यामुळे हे आपल्याला पाळता येणार नाही ".

आणि खरंचच नेहमीच मी बुधवारी घेरडीतून निघत असे . 

      माझी पहिली दिवाळी किर्लोस्करवाडीला झाली आई-काका संजू घेरडीहून , मायडीचे कुटुंब व ज्योती बदलापूरहून तर आम्ही दोघे परांड्याहून किर्लोस्करवाडीला गेलो आम्ही सगळ्या लेकी व जावई माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा भेटलो पुन्हा गप्पा , चेष्टा , मस्करीला उधाण आलं . आम्ही सगळे नरसोबा वाडीला जाऊन आलो त्यावेळेस पण भारीच गंमत झाली आमच्या दोघांपैकी ह्यांना केळी खूप आवडतात तर मी केळीला हातच लावत नाही तर दुध म्हणजे मला जीव की प्राण तर यांना दुधाचा वास पण नाही आवडत चहा मात्र खूप लागतो पण घरचं ताक दही लोणी अगदी वर्ज्य पण तूप चालतं विकतची बासूंदी , श्रीखंड , दही चालतं अस शास्त्र आहे . घेरडीत मात्र सर्वांनाच दुग्धजन्य पदार्थ भरपूर आवडतात आणि लागतात . यांचे दुध न खाणे हा आमच्याकडे चर्चेचा विषय असायचा . आम्ही नरसोबावाडीला गेल्यावर सगळेजण तीसपस्तीस पायऱ्या उतरुन पाय धुवून वर आलो व दर्शन घेतलं तिथल्या प्रथेप्रमाणे पुजाऱ्यांनी पटपट सर्वांना भरपूर दहीदुध असलेला मोठा चमचाभर पंचामृत दिलं , यांची झाली पंचाईत ! कसतरी पटकन त्यांनी ते पीलं व तितक्याच पायऱ्या उतरुन ते तोंड हात धुवायला पुन्हा खाली गेले . आमच्याकडे सगळ्यांना त्या गोष्टीचे इतके आश्चर्य वाटले की विचारता सोय नाही . तिथून निघताना दिवाळी आहे म्हणून मोठा डबा भरुन तीन किलो बासूंदी घेतली व बसमध्ये चढताना यांनी डब्याची पिशवी घेतली व सीटखाली ठेवली वाडीत आल्यावर आम्ही घराजवळच्या स्टाॕवर उतरलो बस पुढे गेली व लक्षात आले की बसमध्ये बासूंदीचा डबा तसाच गेला ! यांना कससच झालं , आपण अगदीच लहान मुलांप्रमाणे वागतोय असे वाटू लागले . आधी तो पंचामृताचा किस्सा व आता बासूंदीचा ! एमबीके भाऊजींनी पटकन कोणाच्यातरी गाडीवर बसून स्टँड गाठले गाडी अजून उभी होती व सीटखाली डबा पण ! भाऊजी डबा घेऊन परत आल्यावर सगळ्यांना हुश्श्य झालं विशेषतः ह्यांना ! नंतर मात्र सगळे जमले की आजही हा विषय निघाला की सगळे हसत आसतात .

           पुढे डिसेंबरमध्ये माझ्याकडे गोड बातमीची चाहूल लागली व मला खूप त्रास होत होता मग जानेवारीमध्ये संक्रांत सण घेऊन आई आली होती तेव्हा आम्ही बार्शीत रहायला सुरुवात केली होती आई दोनतीन दिवस बार्शीत राहिली व सणासाठी आम्ही परांड्याला गेलो .आई  नविन बाळाची उत्सुकतेने वाट पहात व जाताना मात्र सगळे पुढचे नियोजन करत होती माझ्यावेळी मात्र आईला वेगळीच काळजी वाटायची ती म्हणजे आता हीला रजा कधी मिळणार घेरडीला कधी न्यायचं आणि मुख्य म्हणजे मायडीला पहिल्यावेळी झालेला त्रास व दवाखान्याची सोय नाही व माझी परिस्थिती याचा विचार करत एकीकडे काळजी तर एकीकडे आनंद अशा मनस्थितीत व नविन बाळाच्या स्वागताच्या तयारीत ती घेरडीला गेली !



प्रकरण 26 वे


माझं पहिलं बाळंतपण


05/05/2021


          पहिली दिवाळी साजरी करुन आम्ही  किर्लोस्करवाडीहून आधी परांड्यात व मग बार्शीला आलो . आम्ही दिवाळीत स्कूटर घेतली होती त्याकाळात गाडी असणं हे फार आप्रुप वाटायचं . आम्ही बार्शीत रहात होतो पण प्रत्येक शनिवारी परांड्याला जायचं व सोमवारी परत यायचं तसेच केव्हाही सुट्टी असेल तेव्हा , प्रत्येक सणाला जायचं व बँक असलेल्या दिवशी सकाळी यायचं हा अलिखित नियम होता थोडक्यात बँक नसली की आमचा मुक्काम परांड्यात असे . माझे डोहाळे खूपच त्रासदायक होते मला पाणीसुद्धा पचत नव्हतं .  फक्त आईस्क्रीम तेवढं चालायचं त्यामुळे रोज दुपारच्या सुट्टीत हे आईस्क्रीम घेऊन घरी यायचे व जाताना मला बँकेत सोडून जायचे . गमंत म्हणजे मला परांड्यात गेलं की काही होत नसे तिथे सगळं पचायचं व मी तिथे काम पण करायचे . तब्ब्येत तशी बरीच अशक्त झाली होती . तसं माझ्यावर बराचसा परिणाम हा  परांड्यातील वातावरणाचा झाला होता . एकदा तर मी यांना गंमतीने  म्हणाले 

" मला तर आपलं लग्न म्हणजे घरच्यांचा विरोध असतांना तुम्ही हट्टानं केलेलं लव्ह मॕरेज आहे असं वाटतंय ."

मी असे काही बोलले की यांना खूप अपराध्यासारखं वाटायचं .

" तसं काही नाही , तुला उगाच तसं वाटतं , घरच्यांना कमी बोलायला लागतं जरासं ."

असं म्हणत त्यांची सारवासारवी चालायची . खरंतर सासुबाई नणंद दोघी किंवा शेजारी , मामी यांच्याशी त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या माझ्याशी फक्त बोलत नसत . मग मी पण तो विषय सोडून देऊन जसं जमेल तसं अॕडजस्ट करायचं ठरवलं . एकमेकांना त्रास होणार नाही हे पहायचं व पुढे चालायचं असे अगदी ठरवूनच टाकले . माझा स्वभाव एकदम मोकळा , हौशी , बडबड्या व सतत हसरा असल्याने मला हे सगळं जमवायला फार कठीण गेलं . कोणताही सण , समारंभ असला की आम्ही परांड्यात असायचो पण त्यात कौतुक , उत्साह , खेळीमेळीचं वातावरण असं अजिबातच नसायचे . उलट वातावरण तंग असायचं कडक सोवळ ओवळ आणि कडक उपास याचं प्रमाण जास्तच होतं त्यामुळे हे सगळ पचनी पडायला मला त्रासदायक गेलं . माझ्याशी सुनील भाऊजी तेवढे गप्पा मारायचे , माझ्याशी कोणी बोलत नाही हे त्यांच्या पण लक्षात यायचं . त्यामुळे मला ह्यांच्यानंतर घरात भाऊजींचा आधार वाटायचा . हसतखेळत बोलणं काय ते फक्त त्यांच्याशी व्हायचं . ते काहीही आणलं की मला व नणंदेला अगदी एकसारखं आणायचे . 

          आम्ही जेव्हा दिवाळीला किर्लोस्करवाडीला गेलो तेव्हा चारपाच महिन्यांचा हा घरचा अनुभव माझ्यासाठी खूपच त्रासदायक झाला होता . सगळ्यांना ते समजत होतं बऱ्याच गप्पा झाल्या . तेव्हा मग आई-काका व तायडी यांनी मला अगदी समोर बसवून सांगितले होते .

" हे बघ हा सगळा कोरडा त्रास आहे .परांडकर स्वभावाने एक नंबर आहेत . तुला काही त्रास होणार नाही याची ते पुरेपूर दक्षता घेतात त्यांना परांड्यातील जबाबदारी आहे ती झटकून टाकता येणार नाही आता तू त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजेस त्यांची आडकित्त्यात सुपारी करायची नाही प्रतिभाचं लग्न झालं की वातावरण बदलून जाईल ही खात्री बाळग ."

त्यानंतर मी पण मग विचार करु लागले . सगळं सोडून द्यायला शिकले त्याचा योग्य परिणाम आमच्या दोघांवर झाला . सासू , सासरे , नणंद आणि नवरा अशा चार भूमिका ते एकटेच बजावत असत . आपल्या घरच्यांना कोणी नावं ठेऊ नयेत हा एकच त्यांचा उद्देश असायचा . पण हे सगळं करत असतांना त्यांची दमछाक व्हायची , खूपच त्रास व्हायचा पर्यायाने मला पण त्याच्या झळा बसायच्या . 

       आम्ही तीन महिने रोज परांडा-बार्शी जाऊनयेऊन केलं . पावसाळ्यात पाणी यायचं म्हणून बार्शीत घर केलं तर आमच्या बरोबरसुद्धा कोणी आलं नव्हतं उलट यांच्याशी पण बोलणं बंद केलं . पुढे दिवस गेल्यावरही कधी कोणी आलं नाही आम्हीच परांड्याला जायचो . तेव्हा आम्ही देशपांडे वाड्यात रहात होतो . आमचे घरमालक म्हणजे मम्मी व बाबा मला मुलगी मानत असत . मम्मी मात्र खूप कौतुक करायच्या  हवं नको पहायच्या . त्यांच्या चार दिरांची घरं शेजारी होती त्यांच्याकडे आमची बऱ्यापैकी उठबस असायची . त्याचदरम्यान आई दोनदा बार्शीला आली होती व दोन्हीही वेळेस ती आली की माझी तब्ब्येत जास्तच बिघडली होती व दोन्हीही वेळेस मला अॕडमीट करावे लागले होते त्यामुळे तिला जरा काळजी वाटायची . पण मम्मी व त्यांची जाऊ वर्षा वहिनीनी आईला खूप धीर दिला होता व सांगितले की

" तुम्ही सरिताची अजिबात काळजी करु नका काही झालं तर आम्ही आहोत पहायला ".

पद्माकर काकांनी पण आई-काकांना काळजी करु नका कमीजास्त पहायला आम्ही आहोत असे सांगितले  मग जरा आई बिनधास्तपणे घेरडीला गेली . आमच्या घरी मुलगा मुलगी समान धरलं जायचं पण मुलींपैकी कोणालाही दिवस गेले की आसपास , पाहुण्या रावळ्यात सगळ्यांचे कान अगदी टवकारलेले असायचे . आता हीला काय होणार याविषयी चर्चा असायची . आईपण मग तेवढ्या कालावधीत अस्वस्थ असायची . मग डोहाळे कसे आहेत यावरुन तर्क बांधले जायचे वाड्यात पण सगळ्या काकू , वहिनी चर्चा करायच्या . आईला माझी लक्षणं वेगळीच वाटायची त्यामुळे मला घेरडीला नेणं जरा धोकादायक वाटायचं . मग आई-काकांंनी चर्चा केली व ठरवलं आणि आम्हांला पण  आईने सांगितले

" घेरडीत काही दवाखान्याची सोय नाही , राणीच्या वेळी फजिती झाली होती आता परिक्षा नको पहायला . शरुला  जरा जास्तच त्रास होतोय तिचं  नाव बार्शीतल्या दवाखान्यात  घालू . गणपती झाल्यावरची  तिला तारीख दिलीय त्यावेळी  महालक्ष्म्या झाल्या की लगेच मी बार्शीला येईन व नंतर बाळंतीण झाली की तिला स्पेशल गाडी करुन घेरडीला नेईन . तोवर रजेचं पण कसंकसं आहे ते तुम्ही  बघा काय असेल ते व दवाखान्यात असल्याने बिनधास्त असेल काळजीचं कारण पण रहाणार नाही ."

       आम्ही पण मग त्याप्रमाणे करायचं ठरवलं . पुढे सातव्या महिन्यात आईने घेरडीला डोहाळजेवणाचा मोठ्ठा कार्यक्रम ठेवला होता . परांड्यात  डोहाळजेवण करण्याची आमच्याकडे पद्धत नाही म्हणून आईने सर्वांना घेरडीला यायचे आमंत्रण दिले होते पण घेरडीला पण कोणी आले नाही मग आम्ही दोघेच घेरडीला गेलो होतो . काकांनी पंढरपूरला जाऊन हार , गजरे , फुलं आणली होती . सोप्यात फुलांची सजावट केली होती व गावातील सगळ्या बायका जमल्या होत्या . आईने सगळ्यांसाठी फराळाचं केलेलं होतं . कोणताही कार्यक्रम असो घेरडीत बायका जमल्या की उत्साहाला अगदी उधाण येत असे . उखाणे व गाण्यांची अगदी चढाओढ लागली होती . उषा वहिनी व मावशी सुरेल आवाजात डोहाळे म्हणत होत्या . ह्यांना या सगळ्याचं भारी आप्रुप वाटत असे . ते म्हणत असत

"  खेडेगाव आहे पण घेरडीत असं निवांत व समाधानी वाटतं वातावरण एकदम आनंदी व चैतन्यमय असतं ." 

परांड्यात अजून लग्नाचा जम बसला नव्हता त्यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतच होता . दोन्हीकडील वातावरणात असलेला फरक बघून यांना फार कसंतरी व्हायचं काय केलं तर सगळं एकदम सुरळीत होईल याचा विचार करुन करुन त्यांना दमायला व्हायचं . 

           पुन्हा आम्ही बार्शीला आलो मग मला प्रवासाचा त्रास व्हायला लागला म्हणून रविवारी हे एकटे परांड्याला जायचे व मी देशपांडे वाड्यात ! आता माझे दिवस भरत आले होते तरी माझ्या उलट्या बंद झाल्या नव्हत्या . पंधरा दिवस आधी आराम असावा म्हणून मी 20 आॕगस्ट सोमवारपासून रजा घेतली होती . 18 आॕगस्टला रात्री 10 वाजता आमचे घरमालक बाबांच्या आईचे सोलापूरला अचानकपणे निधन झाल्याचे समजले व सगळेजण रात्री 11 वाजता सोलापूरला गेले . आख्ख्या वाड्यात आम्ही दोघेजणच होतो . दुसरे दिवशी रविवार होता पण वाड्यात कोणी नाही म्हणून हे परांड्याला गेले नाही . मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही डॉ.यादवच्या दवाखान्यात जाऊन आलो तर रविवार सुट्टीमुळे डाॕक्टर गावाला गेल्या होत्या त्या भेटल्याच नाहीत . फार काही होत नसेल तर उद्या या असे आम्हांला दवाखान्यातून सांगितले मग आम्ही घरी आलो मी स्वयंपाक केला व जेवण करुन आराम केला पाच वाजता मात्र मला पोटातच दुखायला लागलं . काहीच समजेना म्हणून  हे पद्माकर काकांच्या घरी जाऊन काकूंना घेऊन आले . त्या म्हणाल्या 

" जरी दिलेली तारीख लांब असली तरी आपण आता यादव डाॕक्टरकडे जाऊ त्या नसतील तर आपण दुसरीकडे घेऊन जाऊ पण आता घरी नको थांबायला ".

मग आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो अजून यादव मॕडम आल्या नव्हत्या म्हणून रिक्षा तशीच माढेकर हाॕस्पिटलला नेली तर तिथे मला अॕडमीट करायला सांगितले . हे मात्र पुरते गोंधळून गेले होते करावे यांना समजेना तशात त्यांनी डाॕक्टरना विचारलं

" दिलेली तारिख लांब आहे मग कसं अॕडमीट करायचं एकदोन दिवसात तिच्या आईला बोलावतो तोवर चालेल का "

मग डाॕक्टरनी हसूनच सांगितले कोणी असो नसो ती दवाखान्यात आहे आणि आज डिलीव्हरी होणार शक्य असेल कोणाला बोलावणं तर बोलवा नाहीतर तुम्ही व आम्ही आहोतच ".

       तोवर संध्याकाळचे सात वाजायला आले मग यांनी बसस्टाॕपवर जाऊन परांड्याला घरी मला अॕडमीट केल्याचा  निरोप दिला . शेवट गाडीने दहा वाजता काका-काकी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा बार्शीला आले तोवर पद्माकर काका पण आले व 19 आॕगस्टला रात्री आकरा वाजता मी सुखरूपपणे मुलाला जन्म पण दिला आणि माझी मॕटर्निटी लीव्ह 20 आॕगस्टपासून सुरु झाली !

    डाॕक्टरनी दिलेल्या तारखेच्या जवळजवळ  पंधरा दिवस आधी बाळाचा जन्म झाला होता . बाळ  एकदम गुटगुटीत साडेनऊ पाऊंडाचे होते . सगळी फजिती झाली होती पण आनंदाला उधाण आलं होतं . आता घेरडीला निरोप जाणे गरजेचे होते . पद्माकर काका ह्यांना म्हणाले 

" परांडकर मी रात्रीच्याच गाडीने निघतो म्हणजे सकाळपर्यंत घेरडीला पोहोचतो . जरा आवराआवारी करुन एकदोन दिवसांत भाऊसाहेबांना यायला सांगतो तोवर आमच्या घरुन डबा देतो ."

तोवर पुन्हा काका-काकींना बार्शीतलं काहीच माहित नाही म्हणून त्यांना घरी सोडणं त्यांची  जेवणाची व्यवस्था सगळं करुन परत दवाखाना अशी यांची पळापळ सुरु होती .

        पद्माकर काकांना रात्री दोन वाजताच्या गाडीत यांनी बसवून दिलं . अशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून यांची एकट्याचीच स्कूटरवरुन प्रत्येकाला आणायला व सोडायला धावपळ चालू होती . पण बाळ बाळंतीण एकदम मस्त होते त्यामुळे आनंदात सगळी कामं होत राहिली . 

        तेव्हा फोन नव्हते काही समजायला मार्ग नव्हता त्यामुळे यांनी बसमधून परांड्याला घरी निरोप दिला होता तर सुनिल भाऊजींना निरोप मिळताच त्यांनी परांड्यात  दोन किलो पेढे वाटले व दुपारी दोन वाजता दवाखान्यात हजर झाले . त्यांना पण खूप आनंद झाला होता त्यादिवशी श्रावणपोळा होता काकी त्यांना पूजेचं विचारु लागल्या तर ते म्हणाले 

" मला वाटलच होतं इथ काहीतरी गडबड असणार म्हणून मी सकाळीच सगळं केलय , पूजा नैवेद्य करुन आलोय  . आता तू परांड्यातली काही काळजी करु नकोस वहिनी घेरडीला जाईपर्यंत तू इथच थांब काकांना परांड्याला घेऊन जातो तू रहा .

        इकडे पद्माकर काका सकाळी सात वाजताच घेरडीत पोहोचले . स्टँडवर त्यांना आंता काका भेटले . आंता काका तंबाखू चोळत सांगोल्याला जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते . पद्माकर काकांना पहाताच त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा पद्माकर काकांनी सांगितले 

" भाऊकाकांना नातू झाल्याचा निरोप घेऊन आलोय ".

तेव्हा आंता काकांनी आनंदाने दोन्ही हात जोडून नमस्कार करत कपाळाला लावला तर हे करतांना हातात तंबाखू असल्याचेसुद्धा त्यांच्या लक्षात राहिले नाही सगळी तंबाखू अंगावर सांडली . वाड्याच्या मोठ्या दरवाजातच मोहन आण्णा , उषा वहिनी , फक्कड काका , प्रभा काकू सगळ्यांना बातमी समजली सगळे अगदी आनंदात त्यांच्या बरोबर घराकडे आले . काका आंघोळ करत होते तर आई मागच्या दारात होती . सगळ्यांचा हसण्याचा आवाज व बरोबर पद्माकर काका दिसले तर आई-काकांना आंदाज आलाच . पद्माकर काका आई-काकांंना म्हणाले 

" काय राव नातू तुम्हांला झालाय आणि आख्ख्या घेरडीला आनंद झालाय . बातमी ऐकली की लोकं खूष होतायत . कसं काय असं हो ? त्या आंतामास्तरंना तर तंबाखू हातात असलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही ."

यावर सगळे हसू लागले 

" शरुला पहिला मुलगा झाला भाऊकाकांना नातू झाला सगळ्यांना आनंद झालाय "

असे सगळे म्हणू लागले मग  चहापाणी झाल्यावर पद्माकर काकांनी सगळा वृत्तांत सांगितला आई-काकांंच्या आनंदाला अगदी भरतं आलं . पद्माकर काका निघू का म्हणाले तसं आई म्हणाली 

"दोन दिवसांनी नाही फक्त दोन  तास थांबा जेवणं करुन दहाच्या गाडीनं आपण सगळेच जाऊ . "

त्यादिवशी श्रावणी पोळा होता दोनतीन दिवसात गणपती बसणार होते . उषा वहिनीला मदतीला घेऊन आईने सगळी तयारी केली व पद्माकर काकांच्याबरोबर आई-काका दुपारीच बार्शीत आले व चार वाजता दवाखान्यात हजर झाले . बाळाला पाहून तर आई-काका , संजू एकदम खूश झाले . ह्यांची एकट्याची पळापळ झालेली ऐकून आई त्यांना म्हणाली 

" फार मोठ्ठ काम केलंय तुम्ही आता जरा निवांत बसा . सगळ बघतो आम्ही ".

खरंच तसं झालं होतं पण . तायडी , मायडी , गोंदा मामा या तिघांनाही काकांनी लगेचच पत्र पाठवून ही बातमी कळवली . मग दोन दिवस राहून उद्या गणपती बसणार म्हणलं की काका संजूला घेऊन घेरडीला गेले व गणेश चतुर्थीला आम्ही स्पेशल गाडीने घेरडीला जाणार असे ठरले . काकांनी पुढे जाऊन बाळंतीणीचं बाजलं , पडदे टाकून सामान सगळ जागेवर ठेऊन आमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी करुन ठेवली ! गणापती बसवून आमची वाट पहात बसले . गणेशचतुर्थीला सकाळी लवकरच आम्ही बार्शीहून निघालो बरोबर हे व पद्माकर काका आले होते . घेरडीत सगळ्खया काकू , वहिनी  काका ,संजू सगळे वाटच पहात होते . खरंतर लक्ष्म्याचा सण झाल्यावर बाळंतपणासाठी आई बार्शीला येणार होती तर लक्ष्म्याच्या सणाला आई मला व बाळाला घेऊन घेरडीला गेली ! आणि लक्ष्म्याला घरी नातू आला म्हणून तिने लक्ष्म्या येण्याच्या दिवशी हौसेनी गोडाचा नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू केले व आई  जाईपर्यंत शेवटपर्यंत तिने लक्ष्म्या येतात त्यादिवशी बेसनलाडू करण्याची प्रथा ठेवली !

    घरात बाळ-बाळंतीण असल्यामुळे आईला भरपूर काम होतं तरीही भागाबाई , निलाबाई आणि बाळ-बाळंतीणीसाठी खास शांता परटीणीला हाताशी धरुन आईने नियोजन करत त्यावर्षीचा गौरी-गणापतीचा सण घेरडीत अगदी धुमधडाक्यात केला . आईच्या उत्साहाला उधाण आलं होतं . गुटगुटीत नातवाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं तिला झालेलं . बाळाची तब्ब्येत छान राहिली पाहिजे यासाठी माझ्या पथ्यपाण्याचं चाललेलं तिचं नियोजन खूप भारी होतं . बार्शीत किराणा छान मिळतो म्हणत बार्शीतून जातानाच डिंक लाडू , वेगवेगळ्या खिरी यासाठी लागणारा वेचक किराणा तिने घ्यायला लावला होता तर घेरडीत गेल्यावर काका आईला सांगायचे

" संपलं तर संपलं कच्चून कर तिला खायला पुन्हा जतेला जाऊन येईन पाहिजे तर ".

असं माझ्यासाठी व बाळासाठी काय करु नी काय नको असं आई-काकांना झालेलं . तायडी मायडीची लगेच पत्राला उत्तर आली होती . सगळ्यांना आता बाळाला पहायची ओढ लागली होती . हे घेरडीहून बार्शीला यायला निघाले तेव्हा मात्र त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून काकांनी ह्यांना सांगितले 

" तुम्ही आपलं शनिवारी बँक सुटली की घेरडीला येत जावा , आठवड्याला नाही जमलं तर पंधरा दिवसाला येत जावा ". 

मग हे त्या दोनअडीच महिन्यात पंधरा दिवसाला घेरडीला यायचे . पंधरा दिवसात दोन पत्र त्यांनी मला व मी त्यांना उत्तराची वाट न पहाता पाठवायची असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ वीसवीस पत्रे एकमेकांना पाठविली ! आता बारसं कधी करायचं हा मुख्य चर्चेचा विषय होता कारण बारशाला सगळे येणार आणि तोंडावर दिवाळी आलेली तर बाळाची नक्षत्रावर शांत पण करावी लागणार होती . 

       पहिल्यांदा पंधरा दिवसांनी हे जेव्हा घेरडीला आले तेव्हा मग दिवाळीत वसुबारशाला आधी शांत व बारसं करायचं ठरलं . तशी सगळ्यांना पत्र पाठविली . त्याप्रमाणे तायडी मायडी दोन्ही भाऊजी बारशाला आणि दिवाळीला घेरडीला यायचे ठरले व तयारीला सुरवात झाली !!