सुजाता कथा नायिका
सतिश- नवरा
वासंतीबाई-रघुनाथराव आई-वडिल
वनिता-रोहित-दिपक भावंडे
सिंधूताई-माधवराव सासूसासरे
गिरिष-मोहिनी-नलिनी दीरनणंद
निता-रुपेश थोरली लेक-जावई
गौरी-निरज धाकटी लेक-जावई
मानसी-मिलींद रुपेशचे आईबाबा
रागिणी-सुरेश निरजचे आईबाबा
श्लोक निताचा मुलगा
ओवी गौरीची मुलगी
सुजाताला घरात सगळीकडे छोट्याशा ओवीच्या खुणा दिसत होत्या . जवळजवळ तीन महिने बाळंतपणासाठी माहेरी राहून ओवीला घेऊन तिची धाकटी लेक गौरी आज औरंगाबादला गेली होती . तिचं सासर औरंगाबाद पण लग्नानंतर गौरी आणि निरज दोघेही मोठ्या साॕफ्टवेअर कंपनीमध्ये गेल्या तीन वर्षापासून बंगलोरला आहेत . परवाच आठ दिवसांची रजा घेऊन निरज विमानाने औरंगाबादला आला होता . गौरीची रजा अजून दोन महिने आहे मग जाॕईन होण्यापुर्वी थोडंस सासरी रहायला मिळेल म्हणून काल निरजबरोबर त्याचे आई-बाबा म्हणजे रागिणी-सुरेश पण आले होते व आज गौरीला औरंगाबादला घेऊन गेले . रागिणीचं शेंडेफाळ म्हणजे निरजची धाकटी बहिण निशा चोवीस वर्षांची झालीय तिच्यानंतर त्यांच्या घरात आत्ता बाळ आलंय मग थोडंस सगळ्यांबरोबर रहाता येईल म्हणत ओवीच्या स्वागताची जय्यत तयारी करुन रागिणी नातीला न्यायला आली होती . काल रात्री निरज आणि गौरीच्या जन्माच्यावेळच्या अनेक आठवणी काढत दोघी विहीणी एकमेकींना अगदी दिलखुलासपणे सांगत होत्या . पंचवीस-तीस वर्षात माणसांच्या भावना , अपेक्षा , कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यामध्ये अमुलाग्र बदल झालाय म्हणत त्या दोघी उशीरापर्यंत गप्पा मारत बसल्या होत्या . आजकाल विहिणी मैत्रिणी होतात . सकाळी धावपळीत नऊ कसे वाजले हे कळलं नाही पण गौरीला निरोप देऊन सुजाता घरात आली आणि हल्ली दुपटी , खेळणी , आणि बराच राडा पसाऱ्यांनी भरलेलं घर रिकामं झाल्यामुळे सुजाताला एकदमच मोठ्ठ भासलं . मोठी लेक निताचं सगळं झालं होतं तेव्हा धाकटी गौरी घरात होती त्यामुळे इतका एकटेपणा सुजाताला भासला नव्हता कदाचित तेव्हा पाठोपाठच्या गौरीच्या जबाबदाऱ्या तिला खुणावत असतील . तिने आधीपासूनच मनाला समजावलं होतं एकना एक दिवस हे होणारच पण आजचा रितेपणा मात्र तिला खायला उठला होता . भल्या मोठ्या खटल्यात आयुष्य गेलेलं त्यामुळे आता अगदी दोघंच दोघं रहायचं सुजाताच्या जिवावर आलं होतं . आत्तापर्यंत हवा असतांना सुद्धा तिला मोकळा वेळ कधी मिळाला नव्हता आता सगळा वेळच वेळ होता . सतिशला रिटायर व्हायला अजून एक वर्ष आवकाश होता त्यामुळे तसा तोही व्यस्तच होता त्यांनं तसं बऱ्यापैकी स्वतःला गुंतवुन ठेवलं आहे त्यामुळे त्याला वेळ नव्हता निदान तो तसं दाखवत तरी होता . पण सुजाताला मात्र एकटेपणा आता प्रकर्षाने जाणवू लागला . सकाळी पाहुण्यांबरोबर सगळ्यांचाच नाष्टा झाला होता . आज सतिशला सुट्टी होती मग जेवणाचं जरासं निवांतच होतं . गौरी निघायच्या आधीच मंगल आली होती गौरी पाचवीत होती तेव्हापासून घरकामाला तीच होती आणि गेले चार महिने ओवीला आंघोळ घालायचं काम तीच करायची . गौरीच्या लग्नात पण आणि आज पण ती हमसून हमसून रडली होती . आत्ता सुद्धा गौरीची गाडी लांब गेली तरी ती एका हाताने तोंडाला पदर लावत होती तर दुसरा हात उंचावत होती . घरात आलं की मंगलने न बोलताच सगळ्या कामाची पटापट आवराआवरी केली आणि निघतांना चहा करुन सुजाता आणि सतिशच्या पुढ्यात ठेवला व सुजाताला
" येते ताई "
एवढंच म्हणून चेहरा न दाखवताच निघून गेली . सुजाताला तिच्या लहानपणीची माहेरच्या कमलचीच आठवण झाली .
कमल म्हणजे वासंतीबाईंनी हाताशी धरलेली कामवाली म्हणण्यापेक्षा घरचीच . वासंतीबाईंना सगळ्यात मोठी सुजाता तिच्या पाठीवर दोन दोन वर्षाच्या अंतराने आधी वनिता झाली मग रोहित , दिपक ही दोन मुलं झाली . रघुनाथराव शिक्षक होते तेच मोठे असल्यामुळे वासंतीबाईंना घरात सासु सासरे एक सोवळी आत्या ही चार लहान मुलं एवढा पसारा होता शिवाय जाणारयेणाराचा आणि शेताचा राबता होताच . सासुबाई बऱ्यापैकी कडक स्वभावाच्या होत्या तरी त्या शकु आत्त्याला घाबरायच्या . मग वासंतीबाईना कडक सासु-सासरे , शकु आत्त्या आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले रघुनाथराव पती म्हणून लाभलेले . लहान वयात लग्न झालेलं आणि पाठोपाठ दोन मुली सुजाता आणि वनिता झाल्या . घरंदाज घराणं होतं मग हाताखाली कामाला म्हणून कमल असायची .
कमल ! रुपयाच्या नण्यापेक्षा मोठं कपाळभर लालभडक कुंकू , इरकलचं लुगडं , तुकडे जोडून शिवलेली चोळी , कमरेला करकचून लावलेला चांदीचा कंबरपट्टा , हातभरुन बांगड्या , पायात मोठी मोठी जोडवी , कानात फुलं , गळ्यात सोन्याची घसघशीत दोन डोरली चार मणी घालून काळ्या मण्यात पटवलेलं मंगळसुत्र आणि काळ्याभोर केसांचा अंबाडा असा तिचा साजश्रंगार असायचा . सतत कामामुळे रापलेला काळा रंग पण हसतमुख चेहरा , सडसडीत बांधा डोक्यावर पदर सावरतच भराभरा चालत ती कामाला यायची . तीला वासंतीबाईंचा खूप कनवाळा यायचा .
No comments:
Post a Comment