Sunday, December 20, 2020

मनातलं मोरपीस ( सासू -सून)

11/08/2019


अनुरुपच्या माध्यमातून
कुलकर्णी-देशपांडे कुटुंबीयांची झाली भेट
त्यातुनच ऋणानुबंधाच्या
रेशीमगाठी जुळुन आल्या थेट  ll 1 ll

लपाछपी , पकडापकडी
खेळत खेळत कधी सरल बालपण
नाही आलं ध्यानी
आशिष-कीर्ती घट्ट गुंतले
एकमेकांच्या मनी ll 2 ll

कीर्तीसम स्वप्नपरी
आशिषच्या जिवनात उतरली
जणु वसंताच्या आगमनाने
सृष्टी उमलुन आली ll 3ll

सुगंधाने मोग-याच्या
सारा आसमंत दरवळला
आशिष-कीर्तीच्या विहाराने
जणु अंगणी स्वर्ग आवतरला  ll 4 ll

वैशाख वणव्याच्या तडाख्यात
होतो शितल चांदण्याचा भास
ओढ मनी हुरहुर अंतरी
लागे मना भेटीची आस ll 5 ll

होताच दृष्टीभेट
कारंजे उडती ह्रुदयात
तप्त उन्हातील सहवास
पण गारवा आहे मनात ll 6 ll





नमास्कार
आज याठिकाणी उपस्थित पाहुण्यांच मी मनापासून स्वागत  करते.आणि आभार  मानते . कारण कार्यक्रमाची खरी शोभा ही आपल्या उत्सापुर्ण सहभागाने वाढली आहे.मी सुरुवात करणार आहे ते म्हणजे निवेदनासह  एक छोटीशी कविता . हा एक छोटासा प्रयत्न आहे.
मी आत्ता आपल्याला आमच्या या दोन कुटुंबाच्या नविन जुळलेल्या नात्याविषयी आमच्या नविन प्रवासाचे वर्णन प्रामुख्याने या दोघाविषयी त्यात्यावेळी वाटलेल्या भावना आणि त्यात्यावेळी टिपलेले क्षण हे दोन्ही आपल्याशी शेयर करणार आहे.
आम्ही जे हे संशोधन करत होतो ते आनुरुपवरुन.तर त्यासाठी .........

अनुरुपच्या माध्यमातून
कुलकर्णी-देशपांडे कुटुंबीयांची झाली भेट
त्यातुनच ऋणानुबंधाच्या
रेशीमगाठी जुळुन आल्या थेट  ll 1 ll

लपाछपी , पकडापकडी
खेळत खेळत कधी सरल बालपण
नाही आलं ध्यानी
आशिष-किर्ती घट्ट गुंतले
एकमेकांच्या मनी ll 2 ll

या दोघांनी वेळ भरपुर घेतला . म्हणजे त्या सगळ्या process व्हायला तीनएक महिन्याचा कालावधी लागला. सुरुवात त्याची वसंत ऋतुत झाली म्हणुन म्हणावस वाटत.....

कीर्तीसम स्वप्नपरी
आशिषच्या जिवनात उतरली
जणु वसंताच्या आगमनाने
सृष्टी उमलुन आली ll 3 ll

आजच्या जमान्यात लग्न जमण्याच्या पद्धती पण बदलल्यात . जेव्हा त्या दोघांना made for each other हा feel आला तेव्हा आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांकडे गेलो.तोपर्यंत Mrs.देशपांडे आणि मी एकमेकींशी अदृश्य स्वरुपात भेटतच होतो. आर्थातच फोनवर . पण प्रत्यक्षात जेव्हा आईबाबांसह दोन्हीही ठिकाणी भेटलो तेव्हा वाटलं ....


सुगंधाने मोग-याच्या
सारा आसमंत दरवळला
आशिष-कीर्तीच्या विहाराने
जणु अंगणी स्वर्ग आवतरला  ll 4 ll

मग दोन्ही कुटुंबाना पण तो feel आला की जोडी जमली . Green signal मिळाला आणि गाडी सुरु झाली . मग उन आसुदे पाऊस आसुदे . या बाह्य वातावरणाचा या love birds वर काहीच परिणाम होत नव्हता . फक्त भेट होण महत्त्वाचे .......

वैशाख वणव्याच्या तडाख्यात
होतो शितल चांदण्याचा भास
ओढ मनी हुरहुर अंतरी
लागे मना भेटीची आस ll 5 ll

होताच दृष्टीभेट
कारंजे उडती ह्रुदयात
तप्त उन्हातील सहवास
पण गारवा आहे मनात ll 6 ll

अशा प्रकारे या ऋणानुबंधाच्या गाठी परमेश्वरांने बांधलेल्या आहेत त्याला आपण सर्वांनी भरभरुन आशीर्वाद द्यावेत .जाता जाता एवढच सांगेन ....रोज नव्याने उगावणा-या दिवासाबरोबर वाढता उत्साह , वाढती ओढ पाहुन मला एक नवा वाक्यप्रचार किंवा कहावत म्हणतात ती सुचली . नीट ऐका बरं सगळे . साधारणपणे आपण आसपास नेहमी पहातो लग्न जमलं की प्रश्न असतो कसं जमलं म्हणजे love marriage आहे का arrange marriage आहे तर love marriage ला म्हणतात love but arrange marriage आहे.
आणि arrange असेल  तर म्हणतात नाही नाही arrange marriage आहे हे.
मी काय सांगते बघा हं
आमच्या मुलांच arrange but love marriage आहे....






12/08/2019

प्रिय किर्तीस
अनेक उत्तम आशीर्वाद 
    कालच आशिष आणि तुझा साखरपुडा झाला म्हणलं आज तुझ्याशी थोडसं हितगुज कराव. चार गुजगोष्टी सांगाव्या . फोन करावा म्हणलं पण म्हणलं नको फक्त बोलल की संपल पुर्वीच्या पद्धतीने पत्रच लिहाव म्हणजे कसं आठवलं की वाचता यावं . खुप समाधान वाटलं  ग कालचा कार्यक्रम अनुभवताना !  एका आईच्या ज्या भावना असतात त्याच भावना माझ्या आहेत . तुम्हा दोघांना आभाळभरुन शुभेच्छा ! तुमचं नविन नात असच बहरु दे. नव्या आयुष्याची वाटचाल सुखा समाधानाने  होऊ दे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .
      गेल्या 5/6 महिन्यापासुन  नविन नातं तयार होण्याची जी संक्रमण अवस्था आहे त्यातला एक सोनेरी टप्पा आपण ओलांडला. एका गोड प्रसंगाच्या निमित्ताने सगळ्या नात्यातली वीण आणखीनच घट्ट झाली. असं म्हणतातच की , लग्न फक्त दोघांच नसतं तर दोन कुटुंबांच असत म्हणून म्हणलं सगळ्या नात्यातली वीण घट्ट झाली. किती सुंदर वीण आहे बघ न !
(नवरा-बायको ) (सासु-सुन/जावई ) (सासरे-सुन/जावई ) (वहिनी-नणंद/दीर) (भाऊजी-मेहुणी/मेहुणा) (विहीण-व्याही ) !!आणि या सर्व नात्यांच्या अनुषंगाने येणारी सगळी आणखी अनेक  नाती !!!
        मग सगळीकडुन कोडकौतुकाचा वर्षाव होतो.ती एक मस्त धुंदी असते . पण खरी मजा केव्हा येते माहिती आहे का तुला ? यातले मधाळ क्षण जे आहेत  ते आठवत रहिलं आणि फुलपाखरासारखं उडत राहिलं की आणि अविस्मरणीय क्षणांची पुरचुंडी बांधुन आपल्या हृदयात ठेवली की झालं.
प्रत्येकवेळी सगळच आपण ठरवलं तस 💯% होतच असं नाही पण त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. फक्त चांगल्या घटनांनाच आपल्या मनावर राज्य करायला आपण दिले पाहिजे.मग त्याचा खरा आनंद आपल्याला मिळु शकतो . 
जेवणात  गोड-आंबट-खारट-तुरट अशा सर्वच चवी असतील तरच ते चविष्ट आणि चवदार असतं . कितीही छान असलं तरी फक्त गोडच अन्न आपण खाऊ शकत नाही . जिवनही तसंच असत . सगळ्या चवी आल्याशिवाय त्याची लज्जत वाढत नाही पण प्रमाण पण तितकेच महत्त्वाचे असते , आणि कोणती चव किती वापरावी हे आपल्या हातात असते नव्हे असले पाहिजे . तरच आयुष्याची गाडी सुरळीत चालते.तुमचं नात जसजसे जवळ येत जाईल तशी त्याची लज्जत वाढत जाईल . ओढ-माया-प्रेम वाढत जाईल त्याचबरोबर जबाबदारी पण वाढत जाईल. पण एक सांगु जबाबदारीचं ओझ कधी वाटुन नाही घ्यायचं हसतखेळत जे शक्य ते करायचं . औपचारिकतेच्या ओझ्याखाली नाही दबायचं त्यासाठी बोलण्यात मोकळेपणा असला पाहिजे . कारण मनातलं कोणीही ओळखु नाही शकत. सुरुवातच जर मोकळेपणानं झाली तर नात्यांची निकोप आणि सुदृढ वाढ व्हायला मदत होते. तुला वाटेल मी इतके उपदेशाचे डोस का पाजतेय पण तसं नाही ग जे आजच्या क्षणी  सहजपणे मनात आलं ते सगळं लिहुन काढलं . उद्या जे वाटेल तो उद्याचा विचार.
    आसो पुन्हा एकदा परमेश्वराकडे तुमच्यासाठी सुख-समाधानाची प्रार्थना करून शुभेच्छा देते.
तुझ्या भावना पण नक्की कळव .
तुझीच 
आई



19/08/2019

चि. आशिष यांस अनेक उत्तम आशीर्वाद . पत्रास कारण की साखरपुडा झाल्यावर दोघांना पण पत्र लिहायचं मी ठरविले होत. पण म्हणलं राहूदे तुला आज लिहावे . पहिल्यांदा तुला कीर्तीसोबतच्या पहिल्या वाढदिवसाच्या लाखलाख शुभेच्छा !! तुझे भावी आयुष्य सुखासमाधानाचे , आनंदाचे भरभराटीचे जावो हीच परमेश्वर  चरणी प्रार्थना !!
       तिला जे जे पत्रात लिहिलं आहे तो मजकुर तुला पण लागु आहे . त्यात अजुन थोडेसे वाढवुन हे पत्र तुझ्यासाठी .
आज तु 29 वर्षे पुर्ण केलीस.  खरं तर हा काळ खुप मोठा आहे पण ,आत्ता आत्ता तु छोटसं बाळ होतास ,कधी एवढा मोठ्ठा झालास कळलेच नाही.
आता तुझी सेकंड इनिंग सुरु झाली. नकळतपणे आमची जबाबदारी कमी होत जाणार ,तुझी वाढत जाणार . पण नेमकं याच ठिकाणी तुला सांगते की आजिबात गोंधळून जाऊ नकोस . तुला ज्याप्रमाणे आजपर्यंत जसं आयुष्य जगता आलं त्याहीपेक्षा एक पायरी वर  असं खुप समाधानी आयुष्य लाभणार आहे. कारण तुला लाभलेली तुझी जोडीदार "सोने पे सुहागा " अशीच आहे. एकुणच देशपांडे परिवाराशी तुझे नाते निखळ राहिल यात शंका नाही.तु कसा आहेस हे पुर्णपणे मी जाणून आहे. आजकालची मुलं आणि माझी मुलं याचा मी नेहमी विचार करत असते . त्याबाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजते. त्याला साजेशी तुझी निवड आहे हे नक्की .
माणुसकी जपत , सामाजिक बांधिलकीच भान ठेऊन जमिनीवर स्थिर राहून पुढील आयुष्याची वाटचाल कर . तु मायाळु आहेस , बुद्धिमान आहेस , माणसं जपणारा आहेस , स्पष्ट बोलणारा आहेस . तसाच रहा . पुन्हा एकदा सांगते मोकळेपणा जेवढा आसेल तेवढी  सगळ्या नात्यामधे सुदृढता येते हे नक्की !!माणसाची खरी ओळख ही कठीण प्रसंगी होते . मग त्या प्रसंगाचं स्वरुप कोणतही असु शकते . आर्थिक  असो वा मानसिक ! न डगमगता ठाम राहिलं की आलेली वेळ निघुन जात असते पण याठिकाणी माणुसकीचा कस लागतो . सारासार विचार करण्याची सद्सद् विवेकबुद्धी जागृत आसली पाहिजे . आणि हो महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही म्हणलं तरी मुलगा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो त्यातही मुलीची मानसिकता खूप हळवी झालेली असते आलवारपणे त्याची उकल करायची यात मुलांची भूमिका फार महत्वाची असते . मुलीला सर्वात जवळचा नवरा वाटत असतो आणि त्याच्याकडून आश्वस्तपणाची अपेक्षा असते . ती हळुवारपणे जपायला हवी , यामध्ये आपले रीतिरिवाज , पद्धती लादण्याचा , सातत्याने सांगण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही . दोघांना जे पचेल रुचेल त्यापद्धतीने इथून पुढची वाटचाल करायची . आता तुमचा नवीन संसार सुरू होईल कोणतेही ओझे मनावर न बाळगता तुम्हाला हवे तसे तुमचे जीवन जगायला हवं त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल . आर्थिक , मानसिक आणि वैचारिक असे भक्कम पाठबळ तुम्हाला असणार आहे पण तुमचा संसार तुमच्या पद्धतीने सुरू करा त्याची मजा लूटा . कमी तिथे आम्ही तर असणारच आहोत पण त्याचे ओझे होता कामा नये याची कायमच दक्षता घेऊ . 
असो आज तुझा नविन वळणावरचा पहिला वाढदिवस आहे पुन्हा एकदा आभाळभरुन शुभेच्छा !
All the best !!
तुझीच
आयडी



19/09/2019

हाय कीर्ती😀
कशी आहेस ?आजारी पडलं म्हणून एवढं घाबरतात का ? स्ट्रॉग मुलगी आहेस न ?  मग ? चल हट् म्हणाव . मी नसते घाबरत ! अरे होतं माणसाला कधी कधी. त्यात काय एवढा विचार करायचा ?  एक तर रजा मिळत नाही . मिळालीय आता म्हणायचं न द्यायची ताणून.🤣🤣

खरतर आजारी पडलं की डॉक्टर काय देतात ते घेणे , आराम करणे , त्याचा कालावधी संपेपर्यंत वाट पहाणे काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहे. पण काहीवेळा आपले मन याला जुमानतच नाही 
वा-याच्या वेगाने धावत सुटतं . आणि मग आधीच आलेला अशक्तपणा आणि मनाचा स्वैरपणा काही उमज पडु देत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्रीची झोप उडणे . मनी वसे ते स्वप्नी दिसे असा काहीसा होतो. 
म्हणून हा माझा एक स्पेशल डोस 😇

तुला पडलेले प्रश्न 
1) मी कधीच आशी आजारी नाही पडले . काय झालय मला.🤔😧
2) आत्ताच का ? ☹😧
3) माझं लग्न ठरलय अजुन व्हायचं आहे. मी इथं येऊन राहिलेय उगाच माझा या दोघांना त्रास ☹😧
4) बार्शीला काय म्हणत आसतील🤔
5) विनाकारण कित्ती रजा चालल्यात माझ्या 😡माझ्याबरोबर आशिषच्या🤦‍♀

माझी उत्तरे 
1) सध्या वातावरण खुपच खराब आहे. केव्हाही पहिल्यांदा आसच वाटणार. काय झालं आहे हे डॉक्टरना ठरवु दे . त्यांनी खुप वेळ व पैसा खर्च केलेला आसतो. आपण सगळ्यात तज्ञ आसु शकत नाही. 😇
2) हे कोणाच्याच हातात नाही. खरतर गेले 5 महिने सातत्याने होत असलेली दगदग सटकलीय. आणि थोडेसे भटकण व नको आसलेल खाणं बादलय थोडस.
3) 1 फेब्रुवारी काढलीय न तारीख होईल तेव्हा 🤣. लग्नाच्या गाठी पुर्वसंचितानुसार बांधलेल्या असतात. त्यात सुख-दुःख आणि गुण-दोषासकट स्वीकृती असते. माझं तुझं असं आंतर नाही रहात. आणि राहु पण नये.  
4) एक आकांक्षा जीव टांगणीला लावायची आली तिला एक जोडीदार 🤪. बराय पण काळजी घेतील एकमेकींची.
5) किती ताबलायच त्या शरीराला ? विश्रांती देईना म्हटल्यावर शेवटी त्यांने असहकार पुकारला. 😎

सारांश
जबरदस्त आजारपण आलेलं आहे. लगेचच बरं होत नसतं . मोठं कोणी जवळ नाही . परक्या माणसांपेक्षा निःसंकोचपणे आपल्या माणसासोबत रहावे. जुलैमध्ये लग्न होऊन आत्ता अजारी पडली आसतीस तर काय केल असतस ?
डॉक्टर ठरवतील काय द्यावे ते त्याप्रमाणे करावे . सध्या तरी उतार पडलाय असे वाटते , निलीमाला बोलुन पहावे . काळजी फक्त खोकल्याची आहे .तो थोडा मुरलाय म्हणून समुळ उच्चाटन होईपर्यंत काळजी घेणे. आवश्यकता वाटल्यास 2nd opinion  घेणे . फक्त काळजी घे काळजी करु नकोस . इतके सगळे आहेत तु कशाला विचार करतेस सगळं ओझ तुझ्या डोक्यावर असल्यासारखं ?😃  relax रहा  एकदम . 
👻👻👻👻👻👻



30/04/2020


Dear mom-in-law 

( आहो आई )



आशिषची आई , माझ्या होणाऱ्या सासुबाई , mom-in-law , अग्गबाई सासुबाई आणि आता आहो आई असा आपला प्रवास!
       एप्रिल महिन्यात तुमचा वाढदिवस आणि आपल्या भेटीचासुद्धा !  सासुबाई
ह्या व्यक्तीमत्वाचा खरं तर बागुलबुवा होता माझ्या मनात . मैत्रीणी , बहिणी ह्यांच्याकडून ऐकून एक व्यक्तीरेखा तयार होत गेली होती . त्या प्रतिमेला तडा देत मला भेटलात तुम्ही ! Cool सासुबाई !
       पहिल्या भेटीतच 
" शगुन के कंगन " 
म्हणत हातात बांगड्या घालून मिठी मारली ना तेव्हाच समजलं मला की मज्जा येणार आहे खुपच ! हे रसायन काही वेगळंच आहे :-)
           पहिल्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत दडपण कधी येऊनच नाही दिलं मला कोणताही event असो , तुमचा उत्साह आम्हां तरुणांना लाजवेल असा असतो . सुनेच्या 25 व्या वाढदिवसाला 25 गिफ्ट्स करुन सरप्राईज देणाऱ्या सासु आणि नणंद असतात का कुठे ? मैत्रीणीच आहात तुम्ही माझ्या !
मग आला साखारपुडा .
" केले की जमतेच " 
हे तुमचे ब्रीद वाक्य : आमची केतकी नाचु शकते ? ते ही इतके छान ? मानलं राव तुम्हाला ! कार्यक्रमाला रंगत आणाली ती तुमच्या कवितेने . सर्वांनाच डोळ्यासमोर आमची Arranged Love story  अगदी Film सारखी दिसली .
       एकच वर्ष झालंय तसे . पण आठवणी उफाळून येत आहेत . ब्लाऊजवरुन झालेला राडा तर आठवायलाच नको ! बाळासारखी समजूत घातलीत तुम्ही माझी  . माझी आई असती तर रागावली असती शिस्तीत . आणि खरंच तुम्ही म्हणालात  तसं आता एक नंबरचं ब्लाऊज वाटतेय ते मला .
         लग्नाची धामधूम सुरु करायच्या तयारीत असतांना एकदम मी अजारी पडले . ह्यापुर्वी कधी ताप न आल्यांने जरा घाबरलेलेच होते मी . आई-बाबा सुद्धा टेन्शनमध्येच होते . तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलेले . आज ही मी अधूनमधून वाचते. धीर येतो वाचतांना खरच . घाबरायचं नाही आजिबात हे शिकते आहे मी तुमच्याकडून . जशी एक आकांक्षा तशीच दुसरी कीर्ती हे नुसते लिहीण्यापुरतं वाक्य 
  • नाहीच . ते प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतसुद्धा होतं मला . 
           आई-बाबा पण नेहमी उल्लेख करतात की काळजींच नाही इतकं छान सासर मिळाले आहे तुला असंच म्हणतात नेहमी . शंभर टक्के सत्य !
    कुठल्याशा serial मधल्या त्या शुभ्रावरुन आपलं सुरु झालं अग्गबाई सासुबाई पर्व ! रोजचे GM चे मेसेज चुकत नाहीत आणि दिवसभर गप्पाटप्पा नाही झाल्या तर चुकल्यागत वाटते . असे करत लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पळत होते . लग्न महिन्यावर  आले आणि चक्क तुम्ही आशिषला pre-wedding shooting साठी आग्रह केलात . खरंच परत कधीच झालं  नसतं की ! मज्जा आली हो खूप.
     हा हा म्हणता लग्न झालं की .... चि.सौ.कां.ची  झाले मी सौ.कुलकर्णी ! तसा बार्शीमधला मुक्काम धावपळीतच गेला . एकटं awkward किंवा नविन अशा भावनांचा लवलेशच नाही कुठे. 
         न्युझीलंड ट्रीप पुर्ण करुन घरी परत येणे जीवावर आलेलं. आरे संसार संसार सुरु करणे सोप्प आहे का ?  तरी तुम्ही येते म्हणालेलात त्यामुळे काळजी नव्हतीच . प्रदीर्घ प्रवास करुन एकदा घर आलेलं तेव्हा इतकं बरं वाटलं . पहाटे 6 ची वेळ पण उत्साहाला वेळकाळ असते का ? चक्क डोळे चोळत फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही , पप्पा आणि आकांक्षा तयार होते स्वागताला .......मस्त वाटलं ओ ! शीणच ओसरला प्रवासाचा . 
         पुढचे दिवस मस्त घरात सामान लावणे , स्वयंपाकाच्या काकू ठरवुन देणे अशी मस्त घडी बसवून दिलीत. सर्व डाळींपासून ते किसलेल्या गुळापर्यंत सगळं आणलेलं . प्लँनिंग किती perfect करायचं असतं हे पण शिकते आहे मी तुमच्याकडून !
         संध्याकाळी आल्यावर कुलुप बघायची सवय लगेच 5/6 दिवसात मोडलीच की . व्यायाम करायचा , चहा प्यायचा , गप्पा मारायच्या बार्शीला गेलात ना तेव्हा घर खायला उठलेलं मला आणि आशिषला.
पाकशास्त्रामध्ये माझे प्रयोगातून विज्ञान सुरू होतेच. कोरोना मुळे इकडे बार्शीला आले तसे सुरू झाले अहो आईं चे पर्व.
बाकी जग ठप्प झाले असले. तरी ह्या कोरोना मुळे मिळालेला वेळ आपल्या दोघींसाठी सुवर्णसंधी ठरली.
मला जमेल की नाही किंवा मला जमतच नाही... अशी माझी सुरुवात असते नेहमीच. तुम्ही मला इतकं मस्त motivate केलत ना..
पाककला सोप्पी मुळीच नाही पण अवघड मात्र नक्कीच नाही.. हे वाक्य बिंबवले माझ्या मनात.

पापडासारख्या पोळ्या बनवणारी मी हा हा म्हणता पदार्थ बनवायला शिकले की ओ! उडीद वडे, साधी पोळी, वरण फळे, थालीपीठ, भाकरी आणि साग्रसंगीत पुरणपोळी सुद्धा!! अबब..! माझी आई, आजी, मावश्या विस्फारून माझे पदार्थांचे फोटो बघत असतात. अनिरुद्ध ने तर पुण्यात आमच्याकडे राहायला येणार असेच सांगितले. पाककलेच माहीत नाही पण confidence नक्कीच वाढलाय माझा
All credit to अर्थातच: अग्गबाई सासूबाई!
आणि तुम्ही मला इतकं लाडावून ठेवलंय ना.. ऑफिसच ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ice cream देणार म्हणून promise केलं आणि चक्क खरंच एकदम ice cream आणलं सुद्धा. त्या ice cream ची मज्जा काही औरच! Ice cream मधे लाड आणि प्रेम उतरलं होते भरभरून!
सौ बातो की एक बात: लाडकी लेक, लाडकी बहिण सगळ्याच असतात. लाडकी सून बनायला भाग्य लागते. अशा भाग्यवान सूनेकडून सुपर डुपर मस्त सासूबाईंना पहिल्यावहिल्या पत्रातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
तुमचीच,


लाडकी सूनबाई!!


20/03/2022


सौ कीर्तीस

   तुझा कंपनीच्या कामासाठी पस्तीस दिवसांचा नेदरलँड दौरा यशस्वीपणे पुर्ण करुन तू भारतात परत आलीस यासाठी पहिल्यांदा तुझे खूप खूप स्वागत , कौतुक आणि अभिनंदन !!
लॉकडाऊन मधे तू तुझ्या हुशारी आणि सिन्सीयर पणामुळे कमिन्स मधून स्विच करत फिलिप्स सारख्या नामवंत कंपनीमध्ये जॉईन झालीस . खरं तर वर्क फ्रॉम होम हे तुझ्यासारख्या मेकॅनिकल इंजिनिअरना अवघडच कारण फिल्ड वर्कची सवय आणि गरज . पण नविन कंपनीतील नविन आव्हाने तू लीलया पेललीस आणि त्याचच फलित म्हणून एक वर्षाच्या आत अनेकजण रेस मध्ये असताना सुद्धा नेदरलँडचा चार्ज घेण्याची संधी तुला मिळाली . त्यातही अनंत अडचणी आल्या . तुला ऑनसाईट जायला मिळणार म्हणून आशिष तर खूपच एक्साईटेड होता . डिसेंबरमध्ये जायचं होतं पण काही न काही कारणांनी ते लांबत लांबत फेब्रुवारी महिना आला तरी जायचं काही पक्क होत नव्हतं . आता जायला मिळते की नाही असे वाटायला लागले होते त्यामुळे तुम्ही दोघेही खूपच नर्व्हस झालात . पण होते ते बऱ्याकरता म्हटल्याप्रमाणे शेवटी 11 फेब्रुवारीला तुला जायचे आहे असे समजले .
     जगात खूप मुलं बाहेर देशात गेली असतील जात असतील पण तुझं जायचं ठरलं आणि उगाचच माझ्या पोटात गोळा आला . माझ्यासाठी हा अनुभव पहिलाच होता त्यामुळे माझ्या मनात कौतुक , अभिमान , उस्तुकता , दडपण , प्रेम , काळजी या सगळ्याची रसमिसळ होती . जायचं चलल्यापासून मी पण बरेच प्लॅन केले होते पण पाच फेब्रुवारीला अचानकपणे आजोबा गेले आणि दोनतीन दिवसातच तुला आकरा तारखेला जायला लागणार हे समजले . पण आजोबांचे शेवटचे दर्शन तुला घेता आले असे म्हणण्यापेक्षा हे सगळे घडणार होते म्हणूनच तुझं जाणं लांबत गेलं की काय कोण जाणे . 
 त्यांचा आशीर्वाद होताच म्हणूनच ही संधी मिळाली हे निश्चित होते त्यामुळे दुःख बाजूला सारत तुझ्या जाण्याच्या तयारीला आपण सगळेच लागलो . विशेष म्हणजे त्यादरम्यान आशिषचीआत्या पण बार्शीत होती . नेदरलँड मधे खायचा थोडा प्रश्न आहे ब्रेडवर जास्त भर असतो असे म्हणत एका दिवसात वेगवेगळ्या चटण्या , ठेचा , घावन-थालीपीठ पिठं तुला सर्दी खोकला झाला होता तिकडे तर बर्फ पडतो कस सोसणार म्हणत पस्तीस दिवसासाठी पस्तीस हळद गुळाच्या गोळ्या अशी जेवढी शक्य होईल तेवढी आम्ही तयारी केली . औषधं , बॅग्स , गरम कपडे , तिकडे लागणारी सगळी खरेदी करावी लागणार म्हणून तू आणि आशिष दोन दिवस आधीच पुण्यात गेलात . ऑफिस करत करत तुम्ही सगळी तयारी केलीत . गोडाचं काही करता येणार नाही हे लक्षात घेत पुण्यातून ज्योतीने मुगाचे पौष्टिक लाडू दिले आणि 11 तारखेला तुझं विमान नेदरलँडला रवाना झाले . तुला बाय करून आशिष पुन्हा बार्शीत आला होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे कौतुक , प्रेम , अभिमान , आनंद , काळजी , भीती हे सर्व भाव आणि त्याचबरोबर त्याला होणारा विरह हे सर्व मला दिसत होते .
तू पुण्याहून दिल्ली व पुढे अजून एक विमान बदलून नेदरलँडला जाणार होतीस . तिथला दिवस पाच तास मागे असल्यामुळे दुसरे दिवशी सकाळी तू तिकडे पोहोचणार होतीस . ठरल्याप्रमाणे कंपनीने सगळी चोख व्यवस्था केलेली होती व तू सुखरूप पोहोचलीस असे समजल्यावर जीव भांड्यात पडला . सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे तिथे तुला तुझी बालमैत्रीण असावरी आणि तिचा नवरा पुष्कराज , बाबांच्या मित्राचा मुलगा ऋषीकेश यांची मिळालेली मदत आणि मॉरल सपोर्ट ! आम्ही सगळेच असावरीला तुझ्याविषयी वाटणाऱ्या काळजीने , प्रेमाने खूप भारावून गेलो . तिथे पोहोचलीस की त्याच दिवशी ते दोघेही बेल्जियमहून तुझ्याकडे आले . पुन्हा एक आठवड्याचा तुझा हॉटेल मधील स्टे संपला आणि तू भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायला गेलीस तर तुला एकटेपणा जाणवू नये म्हणून पुन्हा असावरी तुझ्याकडे राहायला आली . मग जाता येता आपल्याकडचे पदार्थ घेऊन यायची ते ऐकल की मला बरं वाटायचं बरं झालं आज कीर्तीला घरचं खायला मिळाल असे वाटायचे . पूर्ण आठवडा कामात आणि वीकेंडला तिची सोबत असे मस्त रूटीन झालं तुझं . युरोपमधील छोटे छोटे देश फिरण्याचा तुमचा प्लॅन झाला होता त्याप्रमाणे 
दुसऱ्या वीकेंडला तू ट्रेनने तिच्याकडे जाणार होतीस . तू मला तिथले भले मोठे स्टेशन दाखवले , ट्रेनमधे बसलीस आणि गप्पा मारायला मला फोन केलास . माझ्या नेहमीच्या पद्धतीने मी अनेक प्रश्न तुला विचारले तू सहजपणे उत्तरे देत गेलीस आणि मला मात्र खूप भीती वाटली . आपल्या बोलण्यातून मला माहित झालेलं गोष्टी म्हणजे 
तू ऑफिस संपवून तिथल्या पाच वाजता निघालीस व रात्री नऊ वाजता असावरीकडे पोहोचणार होतीस . यात मधे एका स्टेशनवर ट्रेन बदलायची होती सगळे बोर्ड डच भाषेत होते इंग्रजी बोर्ड कुठेही नव्हते . तू त्या बोर्डचे फोटो काढून गुगलवर ट्रान्सलेट करून माहिती करून त्याप्रमाणे प्लॅन करत होतीस असे तू बोलत बोलत मला सांगितले आणि मी आतून थोडी हललेच .
 " तू बरोबर ट्रेन मध्ये बसलीस ना ?. " 
असेही मी तुला हळूच विचारले तर तू अगदी आत्मविश्वासाने हो म्हणत होतीस . रात्रीची वेळ , एका देशातून दुसऱ्या देशात जायचं , मध्येच दुसऱ्या देशात प्रवेश होणार तिथे एका स्टेशनवर ट्रेन बदलायची , उलट सुलट विचार करून माझ डोकं सुन्न झालं होतं . 
नेटच चाललं नाही तर ? फोनचे चार्जिंग संपले तर ? 
असे काहीही विचार माझ्या डोक्यात यायचे आणि भीती वाटायची . पण जेव्हा इथल्या मध्यरात्री असावरीबरोबर तिच्या घरतला तुझा फोटो ग्रूपवर पाहिला तेव्हा माझा जीव भांड्यात पडला तोवर पप्पा पण जागे होते . त्यारात्री मात्र ग्रुपवर आईबाबा , आम्ही दोघं , आशिष , आकांक्षा केतकी सगळेच जागे होतो . तू पोहोचली असे मसेजेस झाले त्यानंतर मात्र मी अश्वस्त झाले मग झोपले . पुढे भारतात येईपर्यंत प्रत्येक विकेंड तू छान एन्जॉय केलेस . युरोपमध्ये छोटे छोटे देश जवळजवळ आहेत सेप्रेट व्हिसा लागत नाही म्हणत पॅरिससह बऱ्याच ठिकाणी तू फिरून आलीस .
ते पाहून खूप बरे वाटले . 
मिरजेतील ऋषीकेश दोन वर्षापासून तिकडे शिकायला आहे तोही तू तिथे गेल्यापासून सतत मदत करत होता . त्याला पण आपल्या गावची ताई आलीय याचा आनंद होत होता . 
शेवटी शेवटी मात्र आशिष आणि तू तुम्ही दोघेही कंटाळलात . बोलत बोलत सतत म्हणायचीस इथे सगळ छान आहे पण आशिष हवा होता .अगदी खर आहे ते सलग इतके दिवस भेट नाही ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे . शेवटी शेवटी तर पंधरा दिवस राहिले , चौदा दिवस राहिले आता उद्या भेटणार असे दोघेपण दिवस मोजत होता ते मात्र जाणवत होते . आणि शेवटी आज तो दिवस उजाडला , किती आतुरतेने तुम्ही भेटण्याची वाट पाहत होता ! असो करा आता एन्जॉय .
पण एकूणच तुझा हा दौरा खूप छान झाला . तुझ्या करियरसाठी , स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे सर्व अनेक दृष्टीने खूप फायदेशीर ठरणार आहे . 
आता लवकर बार्शीला या म्हणजे आपली भेट होईल यावेळी खूप वाट पाहतेय मी .
येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा , भरभराटीचा , समाधानाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . इथून पुढच्या करियरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!

तुझीच
आमच्या आई !!


 प्रिय तीन दिवसांचे पिल्लू उर्फ गणू

30/06/2023

मायना काय लिहू ह्या विचारात घोळत बसले मी. तसे आपले नाते अगदी काही तासांचे ताजे ताजे आणि तसे पाहीले तर ९ महिन्यांचा अखंड सहवास!!

सहज मजेत ५ महिन्याच्या गर्भाला आशिषने गणू म्हणून हाक मारली आणि झालास की तू सगळ्यांचाच गणू. मुलगा आहे की मुलगी हे माहीत देखील नसताना घरातले सगळेजण तुला गणू म्हणायला लागले. आता नाव फायनल होईपर्यंत टोपणनाव फायनल आहे.

पिल्लू, आत्ता तुला माझ्या कुशीत गाढ झोपलेलं बघून आपला प्रवास डोळ्यांसमोर तरळतोय. अगदी काल परवा तर आम्हाला तुझ्या येण्याची चाहूल लागली होती. लांब लांब अंदमानच्या समुद्रकिनारी आम्ही ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली. दोन्ही आजी-आजोबा, आत्या आणि मावशी सगळ्यांना जणू हर्षवायुच झाला! 

गेले २ महिने स्कुबा डायव्हिंग करायला उत्सुक असलेली मी अचानक २ पायऱ्या सुद्धा खूप जपून उतरू लागले.

मला आणि तुझ्या बाबाला  मात्र आता तुला पहायची घाईच झाली. ट्रिप झाली की तुझ्या आगमनाची निश्चिती!!

पुण्याला येताच तडक गाठला तो दवाखानाच!

त्या सोनोग्राफी मधे दिसणारा इवलासा पांढरा ठिपका म्हणजे तू!!! आम्ही क्षणभर बघतच राहिलो. ही तुझी आणि माझी पहिली भेट. रिपोर्ट मध्ये Cardiac activity is seen हे वाचून माझ्या आत एक नाजूकसे हृदय धडधडत आहे  ह्याची लख्ख जाणीव झाली. 

३ महिने कोणालाही ही गुड न्यूज़ सांगायची नाही

आता संयमाचा खरा कस लागणार होता! कधी एकदा हा आनंद सगळ्यांना सांगता येईल ह्याची वाट पाहत दिवस जाऊ लागले.

एरवी ट्रॅफिफ मधे गाडी काढायचा कंटाळा करणारा तुझा बाबा आता माझा हक्काचा ड्रायव्हर झाला! 

फक्त माझा नव्हे.. आपला😇 

पौष्टिक खा, दगदग नको अशा दोन्ही आज्यांच्या सूचना सुरूच होत्या. 

बघता बघता ३ महिने झाले, मिरजेला चोर ओटी भरली आणि मग मी गडबडीने सर्व भावी मावशांना ही news दिली.

 पिल्लू, तुझ्या येण्याची केवळ चाहूलच काय धामधूम घेऊन आली माहिताय? 

सगळ्या आज्या,आजोबा, मामा, काका, मावश्या, आत्या आणि इतर अनेक मंडळी कंबर कसून तयारच झाले तुझ्या स्वागताला... अगदी बाप्पाच्या आगमनाइतका उत्साह संचारला सगळ्यांच्यात. सगळ्यांना वेध लागले ते २ जुलैचे! 

दर आठवड्याला डॉक्टरकाका बोलवत होतेच तुझा फोटो बघायला. 

पाहता पाहता ५ महिने झाले आणि तुझा चेहरा, एवढेसे हात पाय सगळं दिसू लागलं!  प्रत्येक स्कॅन मधे काहीतरी वेगळं दिसायचं आणि आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे आमच्या. वाटायचं की ह्याहून भारी काहीच नाही... पण तोवर पुढचा स्कॅन यायचा आणि त्याहून भारी फीलिंग!!


दर आठवड्याला तुझी प्रगती बघत दिवस भराभर पळत होते! 

इथून सुरू झाले ते डोहाळेजेवणांचे पर्व..

पुण्याच्या ज्योती मावशीआजी आणि प्रतिभा आत्याआजी ह्या दोघींनी मस्त खादगीचा बेत करुन आपले भरपूर लाड केले बर का!

तुझा जन्म मिरजेत म्हणजे तुझ्या आजोळी planned होता. एप्रिल महिना आला आणि पुण्याला टाटा बाय बाय करून आपण दोघे निघालो की मिरजेला.

मिरजेत आजी आजोबांनी एकदम झकास असा सेटअप केलेला. आपल्या मिरजेच्या घरात मला धुळीचा त्रास होतो म्हणून चक्क नवीन २ फ्लॅट मध्ये तात्पुरते शिफ्टिंग केलेलं! असा आहे साहेब तुमचा थाट!

७ एप्रिल रोजी आजीने सुरेख प्लॅन करुन डोहळेजेवण केलं. आपण त्या दिवशी पंचपाकवन्नाचे जेवण भरपुर हाणले😇

हा सगळ्या घरच्या मंडळींचा उत्साह...तर ऑफिसमधल्या सर्व मामा मावश्यांनी एक ऑनलाइन म्हणजे virtual babyshower केला😂 

आई होणार म्हणून माझे आणि पर्यायाने तुझे खूप लाड सुरू झाले. मंजू मावशी आजी खास दहिवडे करायला मिरजेला येऊन गेली! उल्का आत्याआजी कडे जाऊन दिवसभराची खाद्यजत्रा केली..

मिरजेच्या आजीला तर आपण नुसत्या बसून फर्माईशी केल्या! 

मिरजेतल्या आजी आजोबांच्या मित्रपरिवारांनी सुद्धा खाण्यापिण्याचे भरपूर लाड केले. भिशीतल्या आज्यांनी तर दणक्यात डोहळेजेवण सुद्धा केलं.

ह्या सगळ्यात दुधात साखर म्हणूनच की काय माझ्या ४ जवळच्या मैत्रिणी म्हणजेच तुझ्या मावशा सुध्दा नवीन पाहुण्याची बातमी घेऊन तयार होत्या! आसावरी मावशी, अक्षता मावशी, ऋता मावशी आणि श्वेता मावशी!!!

आमची online डोहाळ्यांची देवाणघेवाण सुरूच होती. 

२ मेला तुझा मित्र अगस्त्य याचा जन्म झाला. 


आता तुझ्या आगमनाला अवघे २ महिने राहिले आणि पोटात तुझा वांडपणा वाढत चालला होता.

१-२-३-४... अशा सलग २०-२० लाथा मला जाणवू लागल्या. प्रत्येक लाथेगणिक एक सुखद लहर मनात उमटू लागली. हळूहळू तू पोटात गोल गोल फिरत आहेस हेही मला कळू लागलं. गर्भातल्या माझ्या पिल्लाला भेटायची उत्सुकता शिगेस पोचली होती.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला आणि तुझी भेट अगदी नजीक येऊन ठेपली😇

२४ जूनला ठरले की २७ जूनला चिमुरड्याला बाहेरच्या जगात आणायचे आहे🫣 

धडधडत्या छातीने मी तुझ्या बाबाला ही बातमी दिली तर तो पुढच्या क्षणी गाडी काढून पुण्यातून निघाला सुद्धा! बार्शीचे आजी आजोबा, पुण्यातून आत्या आणि बेळगाव मधून मावशी अशा सर्व दिशांनी तुझे fans पळत सुटले😂 इथून मात्र दिवस म्हणावं तर पटकन आणि म्हणावं तर मुंगीच्या गतीने पळाले.

पाहता पाहता तो दिवस -२७ जून २०२३ उजाडला! सकाळी १२ वाजता आपले आगमन ठरले होते. वरकरणी शांत चेहरा असला तरी माझ्या मनात काहूर उठले होते. उत्सुकता, हळवेपणा, हुरहूर, अस्वस्थता अशा एका विचित्र मनस्थितीमध्ये भीती मात्र मुळीच नव्हती. इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली, ज्या भेटीची आस धरली आणि ज्या मिठीची स्वप्ने बघितली... तो क्षण असा माझ्या उंबरठ्यावर येऊन उभा होता.

ऑपरेशन थिएटरच्या आत जाताना सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आत टेबलावर पहाडल्यानंतर डॉक्टर काकांच्या गप्पांनी उरलीसूरली चिंतासुद्धा पळून गेली. काही क्षणात ट्याहा ट्ट्याहा करत एक अत्यंत खणखणीत असा आवाज ऐकायला आला आणि माझ्या तोंडभर हसू पसरले! एक छोटासा आनंदश्रू माझ्या गालावर ओघळला... डॉक्टर काकानी चपखल पणे एक डायलॉग मारला "million dollar smile"

त्याइतका आनंद खरच नव्हता रे झाला ह्यापूर्वी. थोडया वेळात मला तो एवढासा मांसाचा गोळा आणून दाखवला "congrats, it's a baby boy" हा क्षण माझ्या स्मृतीत पक्का कोरला गेला.

गेले ९ महिने नाळेने बांधले गेलेले आपण त्याच क्षणी विलग झालो आणि कायमचे मायलेक म्हणून जोडले गेलो.

आज तुला येऊन ३ दिवस झालेत. जागरण, औषधे ह्यांनी खूप खूप थकली आहे रे मी पण एक अनामिक ऊर्जा आहे आतून.

आईची माया ही एक शक्ती आहे ह्याची प्रचिती येती आहे.

दिवस पळतील आणि तू झपाट्याने मोठा होशील. ह्या क्षणाला मागे टाकणारे अनेक परमानंदाचे क्षण तू आम्हा दोघांना देशीलच. तेव्हा ही आपली पाहिली भेट धूसर होत जाईल म्हणून च हा लेखन प्रपंच!


तुझीच

ताजी ताजी ३ दिवसाची आई



खदखद!!


आज ४ डिसेंबर २०२३! 

बरोबर १ आठवड्यात माझी maternity leave संपेल. मला ११ डिसेंबर रोजी join व्हायचे आहे. ऑफिस मधले सहकारीसुद्धा कीर्ती back in action पाहायला उत्सुक आहेत. 

मी तशी सुरुवातीपासून career-minded, महत्त्वाकांक्षी वगैरे आहे. माझं काम अतिशय आवडीचे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कामाला, तिथल्या शिस्तीला, deadlines ला प्राधान्य द्यायला मला मनापासून आवडते. ते कधीच मला बंधन किंवा ओझे नाही वाटले. 

असे सगळे असतानाही आज नको नको नको म्हणत असतानाही तो विचार मनात डोकावलाच!! ज्याची धास्ती होती आणि जे मला शक्यच नाही असे वाटत होते त्या कल्पनेने डोक्याचा एक कोपरा हळूच व्याप्त केला होता.

तो विचार म्हणजे... काही दिवस सोडावी का नोकरी? घ्यावा का ब्रेक? आहे का गरज एवढी ओढाताण करायची?


ह्याच कारण म्हणजे माझ्याकडे बघून हातपाय नाचवत खुदुखुदू हसणारे आणि मी कडेवर घेईपर्यंत भोकाड पसरून घर डोक्यावर घेणारे माझेच बाळ- आत्रेय!

विश्वासच नाही बसत की ६ महिने असे संपले सुद्धा.. 

मन म्हणते,

"अरे कालच नाही का तू ह्या जगात आला! आणि

परवाच तर मी शिकले लंगोटी बांधायला आणि पाठीवर हात फिरवून ढेकर काढायला!

अरे काल नाही का तू आणि मी पूर्ण रात्र जागून काढली! आणि परवाच नाही का तुझी पहिली लस दिली!

अरे कालच तर आपण तुझे कान टोचले! आणि परवाच नाही का बाबाने नवीन पाळण्यात घालून तुझे फोटो काढले!

अरे काल तर तुला माझी ओळख पटायला लागली! आणि परवाच नाही का मला तू गोड अशी first smile दिलीस!

अरे कालच तर तू लांब लांब हुंकार देऊ लागलास! आणि परवाच नाही का तू थेट पालथाच पडलास!"


हे सगळं असे कालपरवा होत असताना अचानक असा "आज" येऊन ठेपला आणि बाळाला बाजूला सारून काम जवळ घ्याव लागते ह्या कल्पनेने माझे धाबे दणाणले! 

हा सगळा वेळ केव्हा संपला? जागरण होतंय ह्याचे रडगाणे गाता गाता अचानक ६ महिने झाले पण!!! आता हे माझे पिल्लू लगेच काही महिन्यात एक वर्षाचे पण होईल का? मला समजेल ना हा प्रवास?

असा reality hits सुरू असताना मी स्वतःला सावरले. स्वतःशी संवाद साधला. नेमक वाईट कशाचं वाटतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आता "मी काम करणे" हा बाळावर अन्याय आहे वगैरे विचार नाहीच आले उत्तरात! 

उत्तर एकच होत : आपल्या हातून त्याच बालपण निसटू लागलंय ही एकमेव तीव्र भावना... गेले ६ महिने माझे आयुष्य आत्रेयमय झालेल आहे. त्याच्या बाललीला पाहत जागरणाचा थकवा विसरुन जायची आता सवयच लागली आहे.

हे सगळं अचानक थांबवून समोर तो शुष्क लॅपटॉप उघडून दिवसभर काम करणे अशक्य वाटू लागलंय. मी नाही म्हणून हा १ तास रडेल, १ दिवस त्याला माझी आठवण येऊन येऊन रडू फुटेल पण मग १ दिवस त्याला सवयसुद्धा होईलच की माझ्या नसण्याची... सगळच हातातून निसटून जातंय असे वाटत आहे. 

पण हे असे नसणार! 

हो , मला आता त्याचे तान्हया बाळाचे रूप नाही मिळणार पाहायला!

पण तो घरभर रांगेल तेव्हा त्याच्यामागे मीच तर पळणार आहे. रोज कॉल्स घेऊन किटलेले माझे कान ,आत्रेयचे पहिले बोबडे बोल ऐकायला तेवढेच आसुसलेले असणार आहेत. लॅपटॉप बडवून दमलेल्या माझ्या बोटांना आराम म्हणून एक घास चिऊचा भरवायचा आहेच! 

अजून तर हा चालायचा आहे, पळायचा आहे आणि धडपडायचा सुध्दा आहे.

हे तर पुस्तकाच पहिले पान आहे. मोठ्या ग्रंथातील पहिला श्लोक आहे. एका मस्त thriller आणि action वाल्या movie चा हा फक्त trailer आहे!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

त्यामुळे आता मी ताज्या दमाने ऑफिस जॉइन करणार आहे. कारण आता फक्त कीर्ती back in action नसून आत्रेयची आई कीर्ती back in action आहे!

😇


*स्तनपानाचे पान उलटताना*


आनंदात सर्व आणि साजरे होई त्याचे आगमन 

नाळेचे तुटले नाते म्हणून मात्र सैरभैर तिचे मन 


विचारांचे वादळ डोक्यात आणि हात पोटाकडे जाई

नवा नवा जीव तो आणि नवखीच की ती आई 


मनातून आतुरता फक्त पिल्लूच्या भेटीची 

पण चिंता तिला पडली आता त्याच्या भुकेची 


टयाहा टयाहा आले कानी आणि चटकन बसली आवरून 

"कुठे आहे बाळाची आई" ऐकून स्वतःला घेई सावरून 


भरून आले डोळे आणि फुटला तिचा पान्हा 

मांडीवर तिच्या जेव्हा आला इवलासा तो कान्हा 


बहरला आसमंत आणि क्षणात शांत झाली ती

स्तनपानाची सुरू झाली आता दैवी अनुभूती 


अहोरात्र सुरू झाला आता तहानभूकेचा खेळ 

थकून गेली ती बिचारी बसवून झोपेचा मेळ 


सरला काळ आणि खाऊ लागला तो चिऊकाऊचे घास 

मायलेकाचा उरला आता फक्त रात्रीचा सहवास 


दिवस जवळ आले आता तिचे घरट्याबाहेर उडायचे 

ठरलेच की मग आता अंगावरचे सोडवायचे 


तशी न डगमगणारी ती पण आज वेगळाच होता नूर 

स्तनपानाच्या निरोपाची तिला नुसतीच हुरहूर 


रडवेल्या बछड्याने तिच्याकडे केला खूप हट्ट 

पण वाघीण अशी ती की दूर उभी राहिली घट्ट 


रडण्याच्या आवाजाबरोबर वाढे अंतर त्यांच्या मधले 

नाराजीने का होऊन वाटी-चमच्याला केले त्याने आपले 


बाळ होई मोठे आणि विस्मरणात जाई ह्या यातना 

आई घेते नवा जन्म स्तनपानाचे पान उलटताना...!!


नशीबवान आहेस!


आज रोजी १४ मार्च २०२५! 


काय पटापट दिवस पुढे सरकत आहेत... बघता बघता आत्रेय दीड वर्षाचा झाला! पूर्वी मी मनातली खदखद लिहून व्यक्त केली आहे. पण आज वेगळ आहे! आज मनात कृतज्ञता दाटून आली आहे आणि त्यामुळे गतवर्षाचा थोडा आढावा...


नोव्हेंबर-२०२३ आला आणि आता महिन्याभरात पिल्लूची आणि माझी नवीन घडी बसवायचे नियोजन सुरू झाले.

तेवढ्यात कंपनीने विचारले की १५ दिवस आधी जॉइन करू शकतेस का? पुढे रजा adjust करता येईल. संधी चांगली होती पण काय करावे असा माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला.

चेहऱ्यावर भले मोठठे प्रश्नचिन्ह घेऊन सासू सासऱ्यांना हे update दिले! चाय पे चर्चा रंगली आणि नेहमीप्रमाणे माझ्यामागे ते दोघे खंबीरपणे उभे राहिले. माझ्या सासूबाई बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरी फक्त मी आणि retired सासरे! 

तरीही त्यांनी "करू आपण मॅनेज" म्हणून मला जॉइन करायला सांगितले. आशिषला वर्क फ्रॉम होम नसल्याने त्याला पुण्याला जावे लागले. 

मी जॉइन झाले. पहिला कॉल सुरू झाला आणि colleague कडून पहिला प्रश्न हाच आला की अग तू सासरी आहेस? आशिष नाहीये? मग बाळाकडे कोण?? 

मी जेव्हा अभिमानाने उत्तर दिले की "माझे सासरे! "

तेव्हा बाकी सगळे थक्कच झाले . 

मला माझी मैत्रीण म्हणाली "नशीबवान आहेस!!"


महिन्यभरात मी पुण्याला निघाले. थोड्या मुश्किलीनेच पण पुन्हा एकदा माझ्या नशिबाने आत्रेयला सांभाळायला अगदी आईसारखे प्रेम करणारी nanny मिळाली. वैशालीताईंची कामाची पद्धत आणि निटनेटकेपणा पाहून पुन्हा सगळे हेच म्हणाले "नशीबवान आहेस"


आत्रेय मोठा होऊ लागला. त्याला वेगवेगळ्या चवी खायला घालणे आणि स्वतःच्या हाताने खायची सवय लावणे (baby led weaning) हे अजिबातच सोपे नव्हते. 

पुन्हा एकदा नशिबाने माझ्या नणंदेचे आकांक्षाचे लग्न अजून ६ महिन्यांवर होते. ती आमच्याबरोबर होती. तिने हा विडा उचलला. आम्ही प्रवाहाविरुद्ध काहीतरी करू पाहत होतो! प्रचंड गोंधळ आणि अमर्यादित patience चा हा खेळ होता. पण आकांक्षाच्या मदतीने आम्ही थकून भागून का होईना ही प्रगती करू लागलो.

आज १.५ वर्षाचा आत्रेय जेव्हा आपापला जेवू पाहतो आहे तेव्हा मला पुन्हा एकदा सगळे म्हणतात "नशीबवान आहेस"


वैशाली ताई आणि माझे workfromhome हे गणित एकदम चपखल बसले होते. पण आता मला work from office करायला लागणार होते. वैशाली ताईंना जड अंतःकरणाने निरोप देऊन आत्रेयचे पाळणघर- आजोळ सुरू करावे लागले. तो तिथे छान रमू लागला पण थोडी नाजूक तब्येत असल्याने खूप आजारी पडू लागला. आमच्या दोघांचेही ऑफिस सुरू झाले असल्याने राजांचा प्रश्न येऊ लागला. अशावेळी आमचा हुकमी एक्का ठरली माझी आई! एक फ़ोन करायचा अवकाश आणि हातातली सगळी कामे सोडून माझे आईबाबा किंवा एकटी आई पुण्याला हजर होऊ लागले. सासूबाईंना बँक आहे, त्यांना रजा नाही मिळत त्यामुळे आईला यावे लागते आहे ह्या विषयांची चर्चा सुद्धा नाही झाली. 

समाजात अकारण कटू असलेले विहिण हे नाते आणि ह्या दोघी विहीणींचे मैत्रिणीसारखे नाते पाहून पुन्हा एकदा ऐकू आलेच "नशीबवान आहेस"


सगळी घडी बसली. रूटीन सुरू झाले. अत्रिच्या खोड्या आणि प्रगती पाहत दिवस पळत होते. जॉइन करून १ वर्ष झाले आणि माझी official tour प्लॅन होऊ लागली.

पुन्हा एकदा माझ्या पोटात गोळा आला आणि पुन्हा एकदा माझी सपोर्ट सिस्टम मदतीसाठी सरसावली. २ आठवड्यांच्या माझ्या टूरची तिकिटे होण्याआधीच दोन्ही आजी -आजोबांचा प्लॅन फिक्स झाला. १ आठवडा आत्रेय बार्शीला जाणार आणि १ आठवडा माझे आई बाबा पुण्याला येणार! तू काही टेन्शन घेऊ नकोस .

मला confidence यावा म्हणून माझ्या सासूबाई १ आठवडा पुण्याला आल्या आणि रोज आत्रेय आजी आबांकडे झोपला. एक रात्र तर फक्त आम्हाला आश्वस्त वाटावे म्हणून आत्रेयला घेऊन आजी-आजोबा आकांक्षा कडे गेले आणि एक पूर्ण दिवस त्याला छान सांभाळले!

एवढा सगळा खटाटोप फक्त ह्यासाठी की आम्हाला निश्चिंती असावी...

शिक्षण सुरू असल्याने एरवी कोणत्याच गणितात नसणारी माझी बहीण अचानक मदतीला म्हणून शनिवार रविवार पुण्याला यायला तयार झाली.

कसे मॅनेज करणार म्हणता म्हणता सगळे सज्ज झाले आत्रेय बार्शीमध्ये आजीच्या कुशीत गाढ झोपू लागला आणि आज मी निघाले सुद्धा!

आता कोणीही म्हणायची सुद्धा गरज नाही इतकी मी नशीबवान आहे ! ♥️




मोहीम फत्ते......

29/03/2025


कालच कीर्ती भारतात परत आली आणि तब्बल 16 दिवसांनी माय-लेकराच्या भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला आणि मला पण भरुन आल्यासारखं झालं .
कीर्तीची कंपनी क्लाएंट व्हिजीटसाठी बाहेर पाठवते . त्यातही नंबर लागणे ही तशी अवघड गोष्ट आहे . कंपनी आधी तुमच्याकडून जाणार आहात का ही खात्री करुन घेते पाठवेल न पाठवेल ह्याची निश्चिती नाही पण आपलं मत द्यावं लागतच . तिला 2024 मध्ये 2025 साठी विचारलं गेलं त्यावेळी तिची द्विधा मनस्थिती झाली होती . पिल्लू आत्ता कुठे एक वर्षाचं झालं होतं . WFH नुकतेच बंद झाले होते आणि तिने ऑफिसला जायला सुरुवात केली होती . ते थोडस सुरळीत होत होतं , तसं तर बाळ पण अजून पीत होतं . काय करावं ? हा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा होता तिने मला फोन करुन विचारलं काय करावं . मी तिला म्हणलं तुला काय करावस वाटते , तुझं अंतर्मन काय म्हणते याचा पहिल्यांदा तू अंदाज घे नंतर तुम्ही दोघे चर्चा करुन मला सांग . यावर ती म्हणाली दोन दिवस झाले आम्ही दोघेही विचार करतच आहोत . मला जायला पाहिजे असे वाटते त्यावर भविष्यातील काही गोष्टी मला achive करता येतील . तोवर मीपण विचार करुन ठेवला होता अशा संधी काही सारख्या  मिळत नाहीत . शिक्षणासाठी मरमर करायची आणि त्याचं फळ मिळताना ते आनंदाने घ्यायला पाहिजे संधीने दार ठोठावलं की तिचं स्वागतच व्हायला हवे म्हणून मी ठरवलं कीर्तीचे मनोधैर्य वाढवले पाहिजे तिला आश्वस्त करायला हवं . तिला सांगितलं 
"तू बिनधास्त हो म्हणून सांग , बघूया कसं manage करायचं ते वेळ आल्यावर करु ". यादरम्यान आम्ही जाणून बुजून आमच्या पुण्याला फेऱ्या वाढवल्या . आत्रेयला तशी पहिल्यापासून आमची सवय आहेच . मिरजेचे आजी आबा पण येत जात राहिले .
2025 उजाडलं आणि कंपनीने मार्चमध्ये जाण्याचा प्लॅन दिला .
तशी धावाधाव सुरु झाली , मग सलग सुट्ट्या आल्या की मी पण 1/2 दिवसांची रजा टाकायचे आणि आम्ही पुणे गाठू लागलो . त्यादरम्यान मी पिल्लूचं रुटीन कसं आहे , बाळाचे आईबाबा काय करतात हे टिपत होते . मला आपले स्वतःचे अनुभव जरी असले तरी त्याला आता 25 वर्षे होऊन गेली होती , घरात तसं लहान कोणी नाहीच . आजकालच्या पद्धती वेगळ्या आहेत , बदल भरपूर आहेत . त्याच्या आईबाबासमोर सांभाळणं वेगळं आणि पुर्ण जबाबदारी घेऊन सांभाळणं वेगळं . त्या बाळाबरोबर त्याच्या आईबाबाला पण आश्वस्त करणे ही तारेवरची कसरत होती . कीर्तीपेक्षा जास्त आशिषला प्रश्न पडत होते . एखादा आठवडा आम्ही पुण्यात जाऊ एखादा आठवडा मिरजेचे आजी आजोबा येतील असे आधी मनाशी ठरवले होते .
पुण्यात राहून त्याला डे केअरला सोडणे , आणणे , त्याचा खाऊ आणि मुख्य म्हणजे रात्रीचे झोपवणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आई बाबा समोर केल्या म्हणजे नकळत त्यात काही राहत तर नाही ना हे पाहण्याचा मुख्य उद्देश होता . पण कीर्तीचा प्लॅन नेमकाच मार्चएंडचा आल्यामुळे मलाही गोंधळायला झालं , काय निर्णय घ्यावा समजेना . कारण मला यादरम्यान रजा मिळणे किंवा मी घेणे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते . भरपूर विचार केला आणि मी डीक्लिअर करुन टाकलं पिल्लूला आम्ही बार्शीत नेऊ . त्यावर पहिल्यांदा आशिषच नाही म्हणाला . त्याच्या मते हे शक्यच नाही कीर्ती जरी  गेली तरी मी असेन , घर त्याच्या सवयीचे आहे , दिवसभर त्याला डे केअरला सोडता येईल बार्शीत नेलं तर सगळाच एकदम बदल त्याला झेपणार नाही त्यात माझी बँक असणार पप्पांना लोड पडेल असं त्याच म्हणणं होतं . पण कीर्तीला खात्री होती ती म्हणाली फक्त रात्री आम्ही दोघेही नाही त्यामुळे कसं होईल याची शंका आहे तो जर रात्री तुमच्याकडे झोपला तर मग मी निश्चिंत होईन .
 मग आम्ही प्रात्यक्षिक घ्यायचे ठरवले आणि त्याला घरातच पहिल्यांदा आमच्याकडे झोपवले आणि नंतर एक दिवस आकांक्षाकडे मुक्कामाला घेऊन गेलो . तो छान रमला त्यामुळे सगळ्यांना थोडासा कॉन्फिडन्स आला . मग आशिष म्हणाला ठीक आहे , 
मी त्याला घेऊन येतो दोन दिवस मी राहीन आणि 4/5 दिवसांनी त्याला परत पुण्यात आणू . मी तर तो 15 दिवस बार्शीत राहिला तरी चालेल आम्ही करु शकतो असे सांगितले पण आशिष तयार नव्हता , मग म्हणलं आशिष तयार तरी झालाय येऊ तरी दे करु पुढचे पुढे . 
14 तारखेला आशिषला सुट्टी होती त्यामुळे 13 तारखेला वंदे भारताने पार्सल बार्शीला रवाना झाले . इकडे आबा कुर्डुवाडी स्टेशनवर स्वागताला सज्ज होते !! 
घरी आला तेव्हा आत्रेय झोपलेला होता रात्री 10.30 वाजता घरात पोहोचला की तो जागा झाला आणि समोर आजी आबा दिसले तसा तो पुर्णच जागा झाला आम्हाला पाहून त्याला आनंद झाला एक तास खेळून नंतर तो 12 वाजता आमच्याकडेच झोपला . उशिरा झोपल्याने तो सहापर्यंत झोपला निवांत होता . 
सकाळी आमचा टास्क सुरु होणार होता मी खूपच आतुर होते कसा काय तो react होणार म्हणून .
पण मला निसर्गाने पण भरपूर साथ दिली होती . 4/5 दिवसापूर्वी आमच्या अंगणात चिक्कूच्या झाडाखाली मांजरीने तिची पाच पिले आणून ठेवली होती . मला फारशी मांजरे-कुत्री आवडत नाहीत पण मुद्दामच बिस्किटे देत मी ती थोडीशी माणसाळवली होती . ती दिवसभर अंगणात , घराभोवती खेळायची आणि मोठ्या गाडीखाली जाऊन सावलीत बसायची . 
सकाळी सहा वाजता आत्रेय उठला तो खेळतच ! 
ए आबा ऊठ 
ए आजी ऊठ 
दूदू प्यायच अशी बडबड सुरु झाली तोच मांजराच्या पिलांचा आवाज आला . त्याला मी आवाज ऐकवला 
ते बघ माऊ म्हणलं की तो माऊ पहायला इतका एक्साईट झाला की त्याला बाहेर नेऊन गाडीखाली वाकून दाखवलं तो इतका चेकाळला तो चक्क अंगणात गुडघ्यावर बसून पुढे कोपरे ठेवून मांजरासारखा त्याच्याकडे बघतच बसला . खेळण्याच्या नादात त्याला दूध पण नको झालं त्याला ओढत घरात न्यायची वेळ आली .
म्हणलं बरं झालं !!
मग घरात त्याच्या ओळखीची त्याची खुर्ची , पांडुरंगाचा फोटो , आणि मुख्य म्हणजे देवघर ! तसे अलीकडे घरात कोणी लहान नाही कधी आला आत्रेय तर त्याच्या मागे धावायला सगळेच असायचे पण आता त्याची उंची वाढली आणि खुर्ची , सोफा , बेड, कट्टा यावर तो सहजपणे चढउतार करु लागलाय त्यामुळे सकाळी दोन तासातच त्याने मला आता घरात काय आवरु , एवढं मोठ्ठं घर असताना कुठे ठेऊ आणि कुठे नको असे त्याने मला सळो की पळो करुन सोडले . हे अपेक्षितच होते पण अरे अरे करेपर्यंत काहीतरी करुन तोंडाचा चंबू करत खट्याळ हसणे , वाट फुटेल तिकडे धावणे असे सुरु झाले . मग त्यादरम्यान खाऊ खाताना खुर्चीत बसून खाणे बंद झाले कारण इथली खुर्ची पुण्यातल्या खुर्चीसारखी नाही त्याला बेल्ट नाही त्यामुळे त्याचे स्वैरपणे धावत खाणे सुरु झाले आगदी गेटच्या बाहेर चिऊ , काऊ , भूभू , माऊ , हंबा सगळ्यांशी गप्पा करत खाणे पिणे करत होता . तो येण्यापूर्वी त्याला एक सायकल आणून ठेवली होती अंगणात त्यावर बसून फेऱ्या व्हायच्या . समोर ग्राऊंड असल्यामुळे ग्राऊंडवर खेळणारे दादा दिवसभर  शेळ्या , गायी , म्हशी भूभू  , चिऊ , काऊ दारासमोर दिसणे त्याच्यासाठी खूप आनंद देणारे होते . 
आम्ही हॉल मध्ये बसलो की त्याच्या मनात आले की तो आमचे दोघांचे हात धरुन उठवायचा 
रिंगा रिंगा म्हणायचं की धप्प म्हणत जागेवर पडायचं त्याच्याबरोबर आम्ही पण पडायचं , आम्ही पडलो की तो उचकी लागेपर्यंत खदाखदा हसायचा की लगेच दुसऱ्या सेकंदाला हा उभा रहायचा मग आम्ही पण उठले पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा . त्याच्या बाललीला पाहत त्याच्या बरोबर आम्ही पण लहान झालो होतो . तो जागेवर उड्या मारत जल्लोष करायचा आणि ते पाहून आमच्या आनंदाला पारावर राहायचा नाही .
सुख म्हणजे नक्की काय असतं हे कळत होतं .
कधी नव्हे अशी आमच्या देवघरात हळद कुंकू रांगोळी अक्षदा यांची रंगपंचमी साजरी झाली होती . श्रीकृष्ण , अन्नपूर्णा , गणपती सगळ्या मूर्तींनी नुसता रंगच नाही तर पकडपकडी पण खेळली होती . त्यामुळे  लपण्यासाठी जागा सोडून देव कुठेही पळालेले दिसायचे रोज त्यांना जागेवर आणून ठेवावे लागे . कोणत्याही वेळी आमची देवाची घंटा वाजे !!
पाच वाजले की अंगणात पाईपने पाणी मारणे ( खेळणे ) हा छंद . त्याच्याशी खेळताना , त्याचे बोबडे बोल ऐकताना , त्याचा हट्ट पुरवताना मनाला निखळ आनंद होत असे . नातवंड म्हणजे दुधावरची दाट साय म्हणतात त्याची पुरेपूर प्रचिती आली आणि मन भरुन पावलं . 
त्याची भाषा फार मजेशीर होती 
आपण म्हणेल तसं तो बोलायचा पण ऐकायला दुसरच यायचं त्याचा अर्थ लावावा लागे
पुरंदरे म्हणलं की  
' निमांदे '
थालीपीठ पाहिजे तर 
' थापीत पाहिजे '
मनुका म्हणलं की 
' मुकुंदा '
भगवंत म्हणलं की
 ' घबंत '
अशी दिवसभर मजा चाले .
सायंकाळी आवरुन कधी बागेत तर बहुतेक वेळा घबंताला (भगवंताला) जायचं . तिथला कार्यक्रम वेगळाच असायचा . भजन करणारासमोर जाऊन उभे राहणे . लहान मुलांबरोबर  मस्ती करणे . मंदिरात एक हात जोडून उभी असलेली पाषाणाची गरुडाची मूर्ती आहे रोज गेलं की त्याच्याकडे हा पळत जाऊन उभा राहून गोरिला गोरिला करायचा .
मंदिरात नऊ अवतारांचे मोठ्ठे फोटो लावलेले आहेत हा प्रत्येकापुढे जाऊन त्याच्यासारखा हात पाय तोंड करुन उभे रहायचा . गणपतीसमोर पाटीत साखर असायची त्यावर डल्ला मारायचा विचार असायचा . पळत पळत त्याचे पूर्ण दोन राऊंड व्हायचे मग दमला की  चालता चालता त्याने रांगायला सुरुवात केली की आम्ही उठायचो चला आता दमला बाबू म्हणत निघायचो .
घरी आलं की त्याला जाम भूक लागलेली असे जेवण होईपर्यंत आबांनी हॉल मध्ये गाद्या टाकलेल्या असायच्या त्यावर पुन्हा अर्धा तास कोलांट्या उड्या मारायच्या असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होता . धुलीवंदनची सुट्टी , संप , एक दिवस माझी दांडी एक शनिवार आणि दोन रविवार असे तब्बल सहा दिवस मला घरी राहता आले होतं आणि चार दिवस बँक होती , तशी शोभा दिवसभर थांबत होती पण त्याला जास्त आबा लागत होते . 
पाहिले दोन दिवस आशिष होता . तो होता तेव्हाच त्याच्या सगळ्या गोष्टी मी ताब्यात घेतल्या होत्या त्याच्याशी गप्पा मारत मी त्याला अनेक गोष्टी पाढवत होते .
आई ऑफिसला गेली .
बाबा ऑफिसला गेला .
आत्रेय आजीकडे झोपणार 
आबाकडे झोपणार .
आणि आपण परत तोच प्रश्न विचारला की तो बरोबर उत्तर द्यायचा . पंधरा दिवस केव्हाही
आई कुठे गेली म्हणलं की त्याच उत्तर लगेच यायचं 
' ऑफिसला '
तेही एका दृष्टीने बरं झालं होत .
तसा तो बार्शीत चांगलाच रमला आहे आता केतकीला पण यायला जमणार नव्हते तर राहू दे म्हणत तब्बल आकारा दिवस विनातक्रार तो बार्शीत राहिला .
रविवारी मिरजेचे आजी आबा आले तर त्याला कोण आनंद झाला . गिरक्या घेत त्याने तो साजरा केला . ती आजी त्याला जिंबी म्हणते तर हा परत आजीला जिंबी आजी म्हणून हाक मारतो . मला शलूsss म्हणायचं आणि पळत सुटायचं . त्याने दोन्ही आज्याना हाताला धरुन रिंगा रिंगा खेळायला लावलं . एकाच ठिकाणी दोन आज्या दोन्ही आबा पाहून तो चेकाळला .
आता सोमवारी तो आजी आबांबरोबर त्याच्या बाबाकडे  पुण्याला जाणार होता . मग आवराआवरी सुरु झाली आणि माझ्या पोटात कालवाकालव सुरु झाली आबांना पण चैन नव्हती ते पण त्याला घेऊन फिरु लागले . तसं तर त्याच्या वयाचा विचार केला तर  त्याने आईबाबाकडे असणे गरजेचेच आहे पण परिस्थितीमुळे त्याला आणावं लागलं होतं . तो छान राहिला म्हणून त्याचं कौतुकच आहे . त्याचे आई बाबा पण बिनधास्त राहिले त्यामुळे त्यांचेही कौतुक आणि तो आमच्याकडे राहिला त्याची जबाबदारी घेऊन त्याचं बालपण आम्हाला अनुभवण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य म्हणावं लागेल . तसं तर या आठ दहा दिवसात जो बोलेल तो बऱ्यापैकी हळहळत होता . आगोबाई एवढं छोटं बाळ कसं राहतं , बिचारी आई काय हो या नोकरीमुळे एवढ्याशा बाळाला लांब सोडून राहावं लागते तिला ,  किंवा काय हो तुमची बँक तुमचं वय आणि ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते , तुम्ही बँकेत जाणार आणि त्याच्या आजोबांनी काय करावं हो असे एक ना दोन अनेक प्रश्न लोकांना पडत होते .
पण मला तर हे मुद्दे काही फारसे रुचले  नाही . त्याच्या आईला exposer मिळालं , बाळाला चेंज मिळाला थोडासा गावरानपणा , निसर्ग अनुभवता आला आणि आम्हाला बाललीला अनुभवण्याची संधी मिळाली हा सगळाच दुग्धशर्करा योग जुळून आला असे मला वाटले . ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास रिकामा म्हणायचं की अर्धा ग्लास भरलेला म्हणायचं हे ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे . 
पुढे पुण्यात आई यायला अजून चारपाच दिवस बाकी होते पण त्याला बाबा भेटला होता , त्याच घर दिसलं होतं तिथे गेला की त्याने घरभर आईला शोधलं पण शांत राहिला खेळत राहिला . आजी , आबा , बाबा तिकडे आत्या आजीकडे एक दिवस अशी मजा केली त्याने . यावेळी कामाच्या व्यस्ततेमुळे हुकमी एक्का असणारी आत्या ( आकांक्षा ) मात्र तिच्या रिलीजमुळे  शुक्रवारपर्यंत busy असणार होती एकही दिवस तिला WFH मिळणार नव्हते उलट तिला घरी यायलाच उशीर होत होता . तोपर्यंत त्याची आई आली आणि एकूणच मोहीम फत्ते झाली . त्याच्या बाबाने आता declear करून टाकले आहे की आई आता त्याला सोडून आम्ही आठ दिवस ट्रिप करुन येतो . म्हणलं जावा कुठे जायचं तिथे कमी तिथे आम्ही हजर असू !!!
एकूणच हा कालावधी कायम लक्षात रहाणार आहे . आजुन शाळा सुरु नाही , वयाच्या दोन वर्षाच्या आत त्याची उन्हाळ्याची सुट्टी झाली सगळ्यात मदत कोणाची झाली तर आत्रेयची झाली कारण त्याने सहकार्य केलं नसतं तर काहीच करु शकलो नसतो हेही तितकेच खरे !!
आम्हाला दोघांनाही निखळ आनंद मिळाला एक संधी मिळाली . असे कधी होईल याची कधी कल्पना पण केली नव्हती . पण एकूणच छान कधी खेळ , कधी दंगा , फोडाफोडी , अंघोळ करताना मस्ती , घरात भरपूर राडा नाकी नऊ येईपर्यंत दमछाक पण त्याच एक गोड हसू पाहिलं की , एक गोड आवाजात आजी म्हणून हाक ऐकली की सगळ कुठेच्या कुठे पळून जायचं .



27/06/2025
Halloo आई व पप्पा



आज डबल धमाका असतो आपल्याकडे... तुमचा लग्नाचा वाढदिवस आणि आत्रेयचा वाढदिवस ! 
आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली त्यामुळे मला नेमका संसार काय असतो आणि तो कसा करायचा ह्याचा उलगडा हळूहळू होत आहे. 
पण ह्या ५ वर्षात मी तुम्हा दोघांना आणि तुमच्या एकमेकांना पुरक अश्या संसाराला जवळून अनुभवत आहे! बोलता बोलता सहजपणे तुम्हाला compliments दिल्या जातात पण पप्पांविषयी व्यक्त होणे राहून जाते. त्यामुळे हे खास anniversary special पत्र!
सासू सासरे आणि सून ह्या नात्याबद्दल आत्तापर्यंत एक कटकट आणि अपरिहार्य गोष्ट असेच बघितले जाते.
अशा ह्या अकारण कटू असलेल्या नात्याला पूर्णपणे challenge करायला मला हे सासर मिळाले आहे. माझे मित्र मैत्रिणी थक्क होऊन माझ्या stories ऐकात असतात. माझे काही मित्र त्यांच्या आई बाबांना तुम्हा दोघांच उदाहरण सुद्धा देतात. अश्यावेळी मनापासून अभिमान वाटतो मला तुमचा ..
लग्नानंतर माझे आई बाबा इतके निर्धास्त आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या friendly आणि frank support मुळेच! आईतर नेहमीच म्हणते ह्या विहीणबाई माझी छान मैत्रीण झाल्या आहेत तशाच दुसऱ्या मिळाव्या 😜
ह्या पत्रात काय लिहावे आणि काय वगळावे असे झाले आहे. एकदोन किंवा बोटावर मोजण्याइतक्या घटना नाहीतच...आपल्या कुटुंबाची पुर्ण जीवनशैलीच तुम्ही दोघांनी प्रयत्नपुर्वक घडवलेली आहे. 
लग्न झाल्यावर मुलीना तसे सगळे बदलते असे म्हणतात. मला थोडी धास्ती वाटली होती. पण ते तुम्ही होऊच दिले नाही 
" तुझ्या पद्धतीने चालू दे " 
असे म्हणत माझे मला पुर्ण freedom दिले. त्यामुळे तो मोकळेपणा आणि आपलेपणा माझ्याकडून सुद्धा सहजच आला. 
विशेष म्हणजे मी lockdown मुळे बार्शीत लगेचच सलग राहायला आले. स्वभाव वगैरे नीट कळायच्या आतच आपला सगळ्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. पण this was the best thing that happened to me! 
कामामुळे आम्ही तिघेही दिवसभर वरच्या खोल्यात असायचो. तेव्हा मी सून म्हणून काही वेगळ्या अपेक्षा किंवा गृहीत धरणे असे काहीच कुठेच नव्हते... उलट जास्तीत जास्त privacy सहजपणे देत होतात.
नेहमीच्या बायका वगैरे घरी येत नसतानाही माझीच जास्त काळजी घेतली जात होती... घरी लागणारे सामान, मला नव्यानेच समजलेला जलोत्सव (🤣पाणी भरणे) आणि इतर सर्व गोष्टी तुम्ही दोघे काही कळूही न देता करून टाकायचात.
मला पालेभाजी विशेष आवडत नाही म्हणून जेवायच्या आधी हळूच थोडीशी कोशिंबीर करणारे हे सासरे फक्त मलाच मिळाले आहेत! 
वर्ष २ वर्षे बार्शीत घरी राहिल्याने सगळे सणवार एकत्र साजरे झाले. पण देव, नैवद्य, सोवळे ह्याचे अवडंबर न करता, मुख्य म्हणजे जीवाचा आटापिटा न करता ते उत्साहाने कसे साजरे करायचे हेच मी पाहिले. पाहुणेरावळे, रीतिरिवाज, घरगुती कार्यक्रम, सोहळे ह्याची माझ्या कलाने आणि माझ्या पद्धतीने ओळख होऊ दिली. 
मला वाटत त्यामुळे मी सहजपणे सामावत गेले.
सगळे आधीचे बरेवाईट झटकून एकदम एक नवीन सासरची "brand new सून" होण्याचा आग्रह (दुराग्रह?) कोणीच नाही धरला... आणि त्यामुळेच मी चटकन बार्शीकर कुलकर्ण्यांच्या प्रेमात पडले! ♥️

मी माझ्या कित्येक मैत्रिणी बाळ झाल्यावर जॉइन करताना इतक्या त्रस्त आणि अस्वस्थ झालेल्या पाहिल्या आहेत. पण माझा तुम्हा दोघांच्या प्रेमावर आणि काळजी घेण्यावर इतका विश्वास होता की त्यामुळेच मी आत्रेय लहान असताना त्याला घेऊन बार्शीत राहिले. पप्पा तर स्वतःहून इतके करतात की कधीकधी मला आश्चर्य, अभिमान आणि कौतुक सगळं एकत्रच वाटायच! आत्तासुद्धा आत्रेय आजारी पडला की आबा पुढच्या गाडीने पुण्यात दाखल! 
एकूणच दोघांनीही खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहून आम्हाला boost दिले आहे . मग ती आर्थिक , मानसिक , शारीरिक कोणतीही मदत करण्यास, आम्हाला उभे करण्यात कसूर ठेवली नाही आणि त्याचा गाजवजा तर अजिबातच नाही . त्याचमुळे पाच वर्षात आमची एवढी मजल गेली , आम्ही settle झालो. 
नव्याची नवलाई संपली, मी रुळले. पण तुम्हा दोघांच्या समजूतदार स्वभावाचे अनेक पैलू मला माहीत होत गेले. आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस तर साजरे करण्याची आईंची पद्धत मला फार आवडते ती म्हणजे पत्रलेखन! 
आई म्हणतात " तुमच्या खास दिवशी आम्ही disturb करत नाही , तुम्ही Enjoy करा!" 
कोण करते असे? 
खाण्यापिण्याची चंगळ... ह्या विषयावर तर पुस्तकच लिहावं लागेल. 
पप्पांना निवडक सामान आणायची आवड तर आईंना विविध पदार्थ करून द्यायचा नाद!
वेगवेगळ्या चटण्या , लोणची , घावन पीठ , थालीपीठ भाजणी पीठ , कित्येक दिवस शेंगदाण्याचे कूट , खाऊचे पदार्थ , एक ना दोन कितीतरी पदार्थ अजूनही मी केलेले नाहीत आणि करावे लागत नाहीत . स्वस्थ बसणे तर माहितच नाही... बँक, शेत आणि इतर सगळे दोघे मिळून ठरवून तयारी करता , बार्शीतून येताना प्रत्येकाच्या आवडीचे काहीतरी करुन आणलेले असतेच , जडच्या जड उचलणार नाहीत इतक्या पिशव्या खचाखच भरुन आणायच्या!
आता गेल्या वर्षीपासून तर हे सगळं दुप्पट झाले ( Rahatani special )😍
generally मुली सासू आली की नाक मुरडतात... मी मात्र राणीसारखा आराम करू घेते. 
ऑफिस झाले की कंटाळा आलेला असतो स्वैपाकघरात जायचाच. कामाला बायका असल्या की काम हलके नक्कीच होते पण त्यांना manage करणे हे काही सोप्प नाही! 
आई आल्या की मात्र त्या किचन पूर्ण हाताळतात! काय करायचे, किती करायचे आणि आत्रेयला काय द्यायचे हे सगळं त्या बघतात.. माझी कोणतीही आई आली तरी मी थेट पानात वाढल्यावरच मेन्यू बघते😜
शिवाय तेव्हा ताटात १-२ नवीन पदार्थांची पर्वणी वेगळीच... पप्पा आले की भाजी, फळे, किराणा आणायला लागणार नाही म्हणून आशिष खुश असतो ! 
 काय सुख असते त्यात म्हणून सांगू . 😍
खाण्यापिण्याची इतकी आवड असतानाही आपली 
तब्ब्येत आणि पथ्य पाणी कसे सांभाळायचे हे तुम्हाला गवसले आहे. आजारपणाचा थांगपत्ता लागू देत नाहीत , दवाखाना कधी करतात कळू देत नाहीत .
माझ्या मावश्या , आजी , आत्या एवढेच काय मिरजेतील घरकाम करणाऱ्या बायका , पुण्यातील काम करणाऱ्या बायका मला नेहमी म्हणतात की तू खूप नशिबवान आहेस .
सणवार तर त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने करण्याची पद्धत बदलत नवीन सुरू केली की त्यामुळे सणांची मी तर वाट पाहत असते . त्यावेळी सगळे घरी असणार , जाचक प्रथा त्यांनी हद्दपार केल्या आहेत. सण म्हणलं की तरुणांना लाजवेल असा दोघांचा उत्साह असतो. पप्पांनी पूजेचे सगळे तयार करून ठेवलेले असते . जणू एखाद्या event mnaagement कंपनी ने करावे अशी तयारी असते.
अगदी साडी आणि त्यावर ज्वेलरी सेटचे बरेच option सुद्धा तयार असतात!
आम्ही आलो की हे इथे आहे ते तिथे आहे घ्या , घाला मजा करा. त्यामुळे दिवाळी , महालक्ष्मी , नृसिंह नवरात्र ह्याचे दडपण कधीच वाटत नाही.
मी नेहमी आईना women council चे काम करताना पाहिलं आहे . बँकेतील मुलींना मुलांना फोनवर बोलताना ऐकले आहे . नंतर त्यांचे किस्से ऐकले आहेत . जवळजवळ आई त्यांच counselling च करत असतात , त्यांचे विचार ऐकले की मला थक्क व्हायला होते. त्या काळाबरोबर तर आहेतच पण मला तर त्या काळच्या पुढे वाटतात . काळाच्या ओघात त्या नवीन गोष्टी adopt करायला खूप flexible आहेत . आमच्या काळात आम्हाला superwoman बनाव लागलं तुम्ही अजिबात बनू नका असे त्यांचे म्हणणे असते . शिक्षण घेतलं , एवढ्या जबाबदारीचे job करायचे ही काही खाऊची गोष्ट नाही असे त्या म्हणतात . सून बनण्यात मला कोणतीही डोकेदुखी झाली नाही इथून पुढेही होणार नाही ही खात्री आहे . पत्र मोठ झालं आहे पण 10% पण लिहून झाले नाही पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे मला कसा अनुभव आला हे मला लिहायचं होतं एकूणच अशा पद्धतीचे वातावरण मला मिळालेले आहे . 
वेळोवेळी सगळ्याच प्रकारच्या सल्ल्याची मलाच आवश्यकता आहे आपण नेहमीच आपली उच्च level ची चर्चा करत राहू . 

Wish you a very happy anniversary!


तुमचीच 
सगळेच म्हणतात तशी लिखाणात शोभणारी सासूची सून 😍😍


हॅलो सुनबाई 


धन्यवाद बाळा 
एकदम सिक्सर मारलात की हो ! किती बारीक बारीक लक्षात आहे तुझ्या छान वाटलं वाचून मला . आमच्या वागण्यातून तुला सुख मिळत असेल तर यापेक्षा जास्त सुख कशात आहे ग .
छान छान आपण असेच give and take policy follow करु आणि सुखी राहू . 
त्याबरोबर आपल्या कुटुंबालाही समाधानी ठेऊ .
एकमेकांना समजून घेण्यात जे सुख आहे ते दुसरे कशात नाही हे खरे ! पु. ल. देशपांडे यांची मैत्रीवर एक कविता आहे तीच नात्यात सुद्धा लागू होते असे मला वाटते असो असाच मोकळेपणा राहू दे . समजलेच नाही तर दिलखुलासपणे व्यक्त होत जा हा नेहमीचा सल्ला आहे .
खूप आनंद वाटला 
आणखी एकदा धन्यवाद !
😍😍😍
तुझेच आई पप्पा


मनातील घालमेल
05/08/2026



चिरंजीव आशिष आणि सौ. कीर्तीस
अनेक उत्तम आशीर्वाद 
पत्रास कारण की 
अनेक दिवस झाले पत्र लिहायला काही विषय म्हणा किंवा काही फारसे कारण मिळत नव्हते . परवा पुण्याला चक्कर झाली आणि तुमचे HBA1C चे रिपोर्ट्स , त्यावर आपली झालेली चर्चा आणि तुमच्या मनातील कल्लोळ आणि त्यावर झालेले माझं स्वतःच झालेलं मंथन म्हणलं सरळ पत्र लिहून काढावं आणि पाठवावं म्हणजे सवडीने तुम्हाला ते पुनःपुन्हा वाचता येईल , विचार करता येईल आणि थोडसं हलकं वाटेल !
     सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हेल्थ काँशियस आहात ही चांगलीच गोष्ट आहे पण काही वेळा त्याचा अतिरेक तर होत नाही ना हेदेखील पाहणे गरजेचे असते . कारण त्याची धास्ती हेच मूळ दुखण्याचे कारण असू शकतं .
     तुमचं रोजचं शेड्युल , कामाचा ताण , AI चे टेन्शन , नोकरीतील अस्थिरता , कर्जाचा बोजा , भविष्यातील नियोजन , आत्रेयचा ताण , मानसिक घालमेल , आमच्या तब्ब्येती कशा आहेत , आईबाबांना तर काही त्रास नाही ना अशा एक ना दोन रोजच्या साध्या साध्या गोष्टींचा पण लांब असाल तर ताण येत राहतो .
    त्यात काही नियोजन करणे हे आत्ता करायचं म्हणजे करायचच असे थोडे आखीव रेखीव असावं असं म्हणणं ( अट्टाहास ) त्यात थोडा बदल होतो म्हणून प्रचंड ताण किंवा अस्वस्थता येते . यावर उपाय म्हणजे थोडसं उनाडपणाने जगलं पाहिजे . थोडसं बेहिशोबी जगलं पाहिजे . एखादं नाटक , सिनेमा पहायला जा . कोणतच नियोजन न करता एखादी कोकण ट्रीप काढा , दोन दिवस उंडारून या ( हवं तर बरोबर आम्हांला न्या 😜 ) . अती डाएट फॉलो करु नका , काही खावस वाटलं तर बिनधास्त खा . कारण शुगर फक्त गोड खाण्याने वाढते असे नाही हे मी नको सांगायला . सध्या जगात 80-90% लोक या विळख्यात अडकलेले आहेत याचा अर्थ असा मुळीच नाही की आपणही त्यात असावे . 10 टक्क्यात राहीलो तर उत्तमच !
    आत्ता सध्या तुम्ही वेगळ्या मूडमध्ये होतात मला माहिती आहे मीपण ती स्वप्ने रंगवत होतेच कीर्ती मला जागे करत होती . पण इतके मूड ऑफ होण्याची अजिबातच गरज नाही , मी म्हणल न की आगदी आखीवरेखीव करण्याच्या आपण मागे लागतो . आम्हाला उशीर झाला असे मला नेहमीच वाटत राहिले तुमच्या बाबतीत एखादं वर्ष पोस्टपोन झालं तर काही हरकत नाही . माझी मोठी बहीण 1956 ची होती तर शेवटचे सुदृढ बाळ म्हणजे ज्योती 1974 ची आहे . आईकाकांना शुगर होतीच पण ती लवकर समजली नाही . त्यामुळे तुमच्या दोनमध्ये  पाच वर्षांचे अंतर असेल तर फारसे बिघडत नाही उलट अर्धा ग्लास रिकामा पेक्षा अर्धा ग्लास भरलेला पहायचा . आत्रेयला आजुन एक वर्ष फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित झालं आईबाबा पूर्णपणे त्याला मिळतील आणि तशी त्याला गरजही आहे . तसही व्यवस्थित अंतर असलेली भावंडे छान डेव्हलप होतात त्यांना आयुष्यभर आनंद मिळतो , तुम्हाला पण थोडीशी उसंत मिळेल , मी पण पूर्ण रिकामी होईन त्यामुळे तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल . आता आधी सहा महिने कोणतेही टेन्शन न घेता डाएट फॉलो करा , सकाळी अर्धा तास लवकर उठा 15 मिनिटं मेडिटेशन आणि 15 मिनिटं *ब्रम्हविद्या* करा .
शनिवारी गाडी काढून भटकून या . शनिवार रविवार अवांतर काहीही करा त्यात गाण्याचा क्लास , चित्रकला , वाचन , लिखाण किंवा आणखी काही करा आणि हे आनंदाने आणि strictly फॉलो करा . FM आणा त्याचा साउंड box हॉलमध्ये फीट करुन घ्या सकाळी उठल्याबरोबर सुरु करायचा तो बाहेर निघतानाच बंद करायचा !
      तुमच्या नशिबाने दोन्ही आईवडील विचारी आहेत , तुम्हाला आर्थिक , मानसिक , कष्टाने पाठबळ देण्यास सतत सज्ज आहेत . भविष्याची अती चिंता करु नकात , आपण म्हणलं तर पुर्ण कर्ज बंद करु शकतो , शेती हा उत्पन्नाचा स्रोत असला पाहिजे हा प्रयत्न सुरू आहेच त्यामुळे सधनपणे राहू शकता . हे सावट साऱ्या दुनियेवर आहे त्यामुळे त्याची चिंता सोडा . 
     दोन्ही घरात मोठे आहात परिपक्वतेप्रमाणे थोडसं जबाबदारीचे ओझे आपले आपण पण घेत असतो पण मला वाटतं आम्ही चौघेही जबाबदारीने वागतो . आपापले व्यायाम , औषधपाणी करत असतोच .
दोघांचेही वडील भल्या मोठ्या आजारांशी झुंज देऊन पुन्हा तगडे झाले आहेत . दोन्ही आई तर पडल्या , मोडल्या पुन्हा उभ्या राहिल्या . माझी तर पूर्ण बॉडी renew केलेली आहे . आगदी डोळे , दात , नाक , मणके , शोल्डर अजून काय सांगू तरी पण सगळ्यात फ्रेश असते . कोणत्याही व्याधीला दोन हात करायला मला चॅलेंजिंग वाटत . तुम्हाला माहिती आहे ते नाकाचे हाड पुन्हा वाढू द्यायचं नाही , शोल्डर therapy लगेच घरच्या घरी सुरू करायची , एकदा अँजिओग्राफी केली तर दम लागू नये म्हणून पळायची ( जॉगिंग ) सवय ठेवली आहे . आपणच आपले उपचार करायचे पण ताण न घेता हसत हसत केलं पाहिजे आणि वर सगळ्यांना चुकवून आवडतं म्हणून गोड पण खाते . बिपीला डायबेटिसचा भाऊ मानतात पण *ब्रम्हविद्येने* त्याला अजूनतरी दूर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे . आणि हो भाग्येश सरांचा एक पॉईंट मला फार आवडला तो म्हणजे ते म्हणायचे आई वडिलांना जर शुगर असेल तर मुले समजायला लागल्यापासून ती स्वतः आणि आईवडील सतत शुगर निघणार हे गृहीत धरतात तर तसा विचार अजिबातच करायचा नाही . अगोदर मनात त्याला घर करू द्यायचं नाही . रणांगणावर हरण्यापूर्वी मनात हरला तर तो कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे  पॉझिटिव्ह thinking करत राहायचे , मनाला स्वैर होऊ द्यायचं नाही त्याला चाबकाने बडवायचं .असे प्रयोग करत राहायचे . 
दुसरे म्हणजे आपण लहान समजत असलो तरी दोन्ही धाकट्या पण जबाबदारीने वागत आहेतच . त्या दोघीपण मावशी आत्या जेवढ्या उत्साहात झाल्या तिथे आता तुम्ही मामा-मामी , मोठी मावशी-काका व्हायचं आहे त्यासाठी पण तुम्ही उत्साहात असायला पाहिजे , ते क्षण एंजॉय करण्यासाठी आतुर असला पाहिजे त्यामुळे तुम्हीपण थोडस तणावमुक्त रहा .
      आता मुख्य म्हणजे तुमच्या सवडीने मिरजेत दोन आणि बार्शीत दोन गायनिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा . तोपर्यंत छानसा सायकॅट्रीस्ट शोधून ठेवा आणि *कपल थेरपी* घ्या . आजकाल शरीराच्या आजारापेक्षा मन सुदृढ ठेवणं ही काळाची गरज आहे . संघटनेच्या उपक्रमांतर्गत मी डॉक्टर मूलमुले , डॉक्टर आनंद नाडकर्णी , डॉक्टर सुखदा यांना प्रत्यक्षात बऱ्याचदा ऐकले आहे . मला खरतर यांना सुद्धा आनंदी राहण्यासाठी , तणावमुक्त राहण्यासाठी यांना आणि आकांक्षाला सायकॅट्रीस्टकडे जायचे आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनसंस्कृतीत ती गरज आहे . 
आणि हो मी तर गेल्या 25 वर्षांपासून अनेक प्रयोग करत राहिले आहे , ssy , हटयोग , ब्रम्हविद्या , योगा , माधवबाग , भाग्येश , सौरभ बोथरा याचबरोबर संघटना , पेटी , वाचन , लिखाण करत राहिले आणि फिट राहिले . तसे अनेक मार्ग शोधत राहायचं . प्रत्येकाच आपल्याला लागू पडेल तेवढंच मी लक्षात ठेवते , वापरत आणते मग खाणे असो की व्यायाम ! आणि आपल्या स्थावर इस्टेटीबरोबर ही विचारांची  संस्काराची शिदोरी तुम्हाला तुमच्या नातवंडांपर्यंत प्रयत्नपूर्वक पोहोचवायची आहे . मी जरा अती सांगते असे वाटू शकते , प्रत्यक्षात इतके समजून सांगता आले नसते म्हणून हे पत्रमार्फत पोहोचवत आहे .
    पहा सगळा विचार करा , तुम्ही सुज्ञ आहात , विचारी आहात मनावर ताबा मिळवा आणि स्वच्छंदी राहा  , आनंदी राहा , सुखी राहा !
All the best !!


No comments:

Post a Comment