Sunday, October 18, 2020

कोंदण भाग 3

 कोंदण भाग 3



प्रकरण 14 वे


संकटाची चाहूल


8 आॕक्टोबर 2020



          पंढरपूरहून आई-काका बाळाला घेऊन घेरडीला आले . माझी नववीची परिक्षा तोंडावर आली होती . पुढचं वर्ष दहावीचं बोर्डाचं होतं . ज्योती तर पहिलीतच होती त्यामुळे घरात काम करायला कोणीतरी पाहिजे म्हणून नागर आत्त्यांची मुलगी बाळी ताईला आणलं होतं . आईकडे बाळ असायचं त्यामुळे ज्योतीचं सगळं काका पहायचे व काका बाहेर गेले की ज्योती बाळीताईच्या मागे असायची त्यामुळे ज्योतीला बाळीताईची खूपच सवय लागली होती . बाळ म्हणजे संजिवनी तिला आम्ही संजू म्हणतो दिवासेंदिवस बाळसेदार होत होतं त्यामुळे ती गोरीपान , सफरचंदासारखे गाल त्यामुळे फार छान दिसायची . मग तिच्याजवळून हलावसं वाटत नसे . आईचे बाजलं  स्वयंपाक घरात होतं त्याभोवाती पडदे टाकलेले असायचे काका आले की बाजेजवळ खुर्ची टाकून संजूला मांडीवर घेऊन आईशी तासंतास गप्पा मारत बसायचे . संजूला लाडानं ते

 " कांतराव " 

म्हणायचे . सगळ्यांना वाटत असे भाऊ काकांना आता सहावीपण मुलगी झाली आवघड आहे बाबा ! पण आई-काकांंना त्याचं काहीच वाटत नसायचं बाळाचे लाड करण्यात ते गुंग असायचे . जे लाड पहिल्या बाळाचे वा बाळंतपणात केले तेच आणि तितकेच लाड याहीवेळी सुरु होते . जन्मापासुनच संजू आईपेक्षा काकांच्या गळ्यातला ताईत झाली . अतिशय लाडकं आमच शेंडेफळ आहे हे असे काका म्हणायचे . अशात आईची तब्ब्येत मात्र जरा त्रास देऊ लागली , चाळीसीनंतरच्या बाळंतपणाचा व त्यातच निघालेल्या डायबेटीसचा तिच्या तब्ब्येतीवर परीणाम झाला . तीला मधूनच थकवा जाणवायचा . त्यामुळे काका आईकडे विशेष लक्ष द्यायचे . 

          आक्की तायडीचं लग्न झाल्यावर घरात माणासांचा राबता वाढला मग जागा कमी पडायची म्हणून घरासमोर मध्ये अंगण सोडून काकांनी एकावर एक अशा दोन खोल्यांच बांधकाम काढलं . तसं अंगणपण लहानच होतं पण, समोर लांब पट्टी होती त्यामुळे एका बाजूला लाकडी जीना वरच्या खोलीला कौलं , खिडकी त्यामुळे ते घर टुमदार दिसायचं . सगळे जमले की दिवाळीच्या सुट्टीत झोपायला मग आरामात जागा पुरायची . तसं घेरडीत गावात दोन मजली घार म्हणजे कौतुकाचा विषय होता डोंग-यांकडे दोन घरात दोन मजली खोल्या होत्या त्यानंतर मात्र दोन मजली घर  काकांनीच बांधलं . मग सत्यनारायण केला . आई-काका खूश होते पण लोकांची कुजबूज मात्र ऐकायला येत होती सगळ्या तर मुली आहेत आणि भाऊकाका इतकं काय काय कशाला करतात ? 

पण काकांच म्हणणं यायचं आत्ता आपल्याला गरज आहे आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो . सगळं पैशात न मोजता मिळणाऱ्या समाधानाची किंमत ही पैशापेक्षा मौल्यवान असते . आम्ही मात्र त्या घराचा पुरेपूर उपभोग घेतला ! एवढंच कशाला किर्लोस्करवाडीला नविन नविन काही काकांना आवाडलं की ते घेरडीत पण तसंच आणायचे . अगदी पितळी डबेभांडी , जुन्या फळ्या काढून नविन रॕक व स्टीलचे डबे सुद्धा . सगळ्यांनी छान राहिलं पाहिजे  एकूणच असा त्यामागचा विचार असे .

      आई , आक्की व तायडी या सगळ्यांनाच एकमेकींची नविन बाळं पहाण्याची उत्सुकता लागली . त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत किर्लोस्करवाडीहून भाऊजी तायडी , मायडी , मंजू व मेधा आले तर धुमाळवाडीहून मोठे भाऊजी आक्की अंजू व गायत्रीला घेऊन आले . सहा महिन्यातील तीन बाळं  दोनआडीच वर्षाच्या अंजू मंजू आणि आम्ही पाचजणी असे घरात जागा पुरेना इतकी गर्दी झाली ,  गोंधळ होऊ लागला तरीपण मजा यायची . त्यावेळी पुन्हा एकदा संजूला ताप आला व त्रास झाला पण लगेचच अरविंद काकींना बोलावून तिला ट्रीटमेंट दिली . पंढरपूरला नेऊन आणलं काळजीचं कारण नसल्याचे त्यांनी सांगितले . पण तिची प्रगती त्यामानाने मंद होतेय असे जाणवू लागले . आईला मात्र तिची चिंता वाटू लागली .  आईला वाटायचं आपले गाडं आता उताराला लागलंय आणि हे तर हिरिरीने संसार करत आहेत आता थोडंस  आवरतं घेतलं पाहीजे पण काकांना ते मान्य नव्हते . मग आई पण हो ला हो करायची . सुट्यांमुळे घरात आधीच गर्दी होती त्यात नेहमीप्रमाणे शनिवारी गोंदा मामा आलाच होता . तो पण खूपच हौशी होता त्यावेळी तो जत तालुक्यात रांजणी गावी होता बेबीनं रांजणी पाहिलं नाही म्हणत त्यांने तिला रांजणीला न्यायचं ठारविले तिच्याबरोबर पुन्हा मी व मायडी चार दिवस जाऊन  आलोच .  इथे घरात स्वयंपाकघरात आईच्या मदतीला आक्कीपेक्षा तायडीचा बराचसा हातभार असायचा आणि हाताखाली मी व मायडी असायचो . सगळ्यांना एकत्र बोलवायचा काका घाट घालायचे पण ते आईला जास्त होऊ लागलं तीला त्रास होत असे मग तेही काकांच्या लक्षात यायचं मग ते मुलींना कामं वाटून द्यायचे व आल्यावर कोणी कोणी काम केलं हे विचारायचे . आईला पण म्हणायचे

 "मी सांगितले त्याप्रमाणे तू सगळ्यांकडून कामं करुन घे "

पण घरात मेजवान्यांची रेलचेल असायची . आई तायडी तर दोन तीन महिन्यांच्या बाळंतीण तायडीला आईच्या हातचं बाळंतपणात मिळालं नाही , आक्कीचं पण बाळ लहान आहे  म्हणत नेहमीप्रमाणे काकांनी जतेला जाऊन किराणा आणला डींक लाडू , वेगवेगळ्या खिरी , दूध तूप सगळ्यांसाठी खाण्याची रेलचेल होती . तसेच आंब्याचे दिवस असल्यामुळे आंब्याची आढी घातलेली असे त्यामुळे दुपारी रस , तळण पोळ्या तर चार वाजता कधी हुरड्याच्या घुग-या , बटाटेवडे , भजी ,  मिसळ , गोपाळकाला , लाह्या किंवा चुरमुरे तेलमेतकूट लावून खायला होई मग चहा होई . लहान मुलींच्या किलबिलाटाने घर गच्च भरले होते . घरात संध्याकाळच्यावेळी बाळांच्या रडण्याचा एकच कल्ला होई व शांत झाले की एकदमच सगळे शांत असायचे . झोपल्या की एकदम सगळ्या झोपायच्या आणि एकजण उठलं की सगळेच जागे व्हायचे . भारी गंमत व्हायची . बाळांना फिरवून आणायचं काम आमच्याकडे असायचं . संध्याकाळच्या वेळी महादेवाला जाण्याचा कार्यक्रम असे बरोबर वाड्यातले पण असायचे . उन्हाळ्यात संध्याकाळी मात्र ब-याचदा लाईट गेलेली असायची आणि दिवसभर दगदग झाल्यामुळे आई अंगणातच बसायची . वाड्यात प्रत्येकजण अंगणात बसलेले असायचे . जेवणापुरतं घरात जायचं कंदिल लाऊन जेवणाचा बेत होई . रात्री शक्यतो दुपारचं शिल्लक पाहून पुरवठा म्हणून भाताचा प्रकार केला जायचा त्यात बहूधा मूग डाळीची खिचडी , कांदेभात , वांगेभात , साधा भात व आमटी किंवा पिठलं असे काहीतरी केलेलं असायचं सगळ्यांच होऊन जायचं त्यावर  .

         तसही वाड्यात नेहमीकरता मी , मायडी , विद्या , कुंदा व सुधीरचा ग्रुप होता तर आता सगळ्या भावांची मुलं साधारण ज्योतीपेक्षा लहान मोठी होती सुनील , चिमू , पंपू बाळी मोठे तर  बबलू  , ज्योती  , मीनू , हरणी , सचिन , सारिका , स्वाती , छबलू , अरुणा हे बरोबरचे त्यामुळे कुलकर्णी वाडा म्हणाजे जणू गोकूळच वाटायचा . त्यामुळे भरपूर मजा मस्ती खेळ चालायचे . भांडणं पण व्हायची पण ती तात्पुरती असायची . दुपारी कोया , गजगे , विटी-दांडू , लगोर , गोट्या ,  पत्ते असे खेळ चालायचे तर संध्याकाळी बहुतेक वेळा आंगणात आपापले जेवणाचे ताट पाण्याचा तांब्या घेऊन आमच्या आंगणात मोठा गोल करुन अंतपंगत बसायची . गाणी , भेंड्या , नकला ,  गप्पा चालायच्या . पौर्णिमेला लाईट नसली की खूप मजा यायची . टपो-या चांदण्याच्या उजेडात आंगणात हे सगळे प्रकार करायला मजा यायची . उन्हाळ्यात  बहुतेक सगळ्यांकडे कोणी न कोणी पाहूणे आलेले असायचे मग वाड्यात अंगण गच्च भरुन जायचं . झोपायला जागा पुरायची नाही मग प्रत्येक घराचा सोपा उघडा ठेऊन मोठी माणसं दाराशी झोपायची . कधीकधी रात्रीचा अवकाळी पाऊस सगळ्यांची धांदल उडवून द्यायचा आणि त्यानंतरचा उकाडा हैराण करुन सोडत असे .

         तसं घेरडीत वाड्यात मुलांपेक्षा मुलींच प्रमाण जास्त होतं . पण आमचं घर सोडता आतापर्यंत प्रत्येक काकांना किंवा चुलत भावांना एखादा मुलगा झालेला होता .  त्यामुळे काकांच्या मुली व नाती हा लोकांसाठी जरा चर्चेचा विषय झाला होता . पण आई-काकांवर त्याचा परिणाम होत नव्हता उलट  इकडे काकांचे तर शेतात नवनवे प्रयोग चालूच असायचे मुख्य म्हणजे त्यांना त्यात यश मिळत होतं . पैसा भरपूर मिळत होता .

           आता आपल्या सहा मुली ह्याच आपल्यासाठी मुलं आहेत ही खूणगाठ मनाशी पक्की केली व त्याप्रमाणे आई-काकांंनी आपल्या वाटचालीचा रोख बदलला . बोलण्यात पण त्यांच्या परखडपणा येऊ लागला . त्यामुळे काय केल्यास काय होईल त्याप्रमाणे काका नियोजन करु लागले . किर्लोस्करवाडीचं घर बांधून झालं त्यामुळे तायडीचं सगळं स्थिरस्थावर झालं होतं .  बस्तान बसलेलं होतं . आता आक्कीचं बस्तान बसवणे व पुढच्या मुलींना शिक्षण देणं यादिशेने त्यांनी विचार करायला सुरुवात केली . आईला स्वतःला नोकरी करता आली नाही याचे शल्य होतेच , तिच्या बोलण्यातून तसे जाणवत असे . मुलींच्या लग्नाची घाई न करता शिक्षण पुर्ण केलं पाहिजे यासाठी आई सातत्याने सकारात्मक असायची ,  पाठीशी असायची . इकडे आक्कीच्या दिराचे म्हणजे अरविंदाचे लग्न झाले होते ते मेडाशींगीत तर आक्कीचं कुटुंब धुमाळवाडीत रहात होतं . खेड्यातून आक्की व भाऊजींचा संसार धुमाळवाडीसारख्या एका वस्तीवर मांडला होता पण उज्वल भविष्य खुणावत होतं त्यामुळे आक्कीनं ते आनंदाने स्विकारले होते . तिचा स्वभाव विनोदी होता त्यामुळे ती खूश असायची . काकांची धडपड तिला समजत होती त्यामुळे  भाऊजींशी तिने जुळवून घेतलं होतं एक दिवस काकांनी त्यांना घेरडीत बोलावून घेतलं . त्यांच्या लग्नाला आता साडेचार वर्षे झाली होती तिचा संसार वाढला होता पण सगळंच काकांना पहावं लागायचं . पण स्वस्थ किंवा हतबल रहातील ते काका कसले . सतत भविष्याचा वेध घेण्याचा स्वभाव काकांना स्वस्थ बसू देत नव्हता . त्यांचत्यांच रांकेला लागायला हवं म्हणून भरपूर विचार करुन आईशी चर्चा करुन काकांनी मोठ पाऊल उचललं !  मेडाशींगीच्या शेतात काहीच सुधारणा होत नव्हती  मग काकांनी आक्कीला सांगितले 

"  तुला नोकरी लागेपर्यंत तुम्ही घेरडीतल्या शेतात रहायचं . शेतीचे सर्व ते स्वतः  पहातील भाऊजींनी देखरेख करायची व भाऊजींसाठी खास उद्योग म्हणून , जोडधंदा म्हणून पोल्ट्री उभारुन देणार त्यांना मार्गदर्शन करणार तो व्यवसाय त्यांचा राहिल . कमीजास्त मागेपुढे काका पहाणार . त्यासाठी आक्कीचं कुटुंब घेराडीच्या शेतात रहायला येईल तिथून दीड किलोमीटर अंतरावर आक्कीची धुमाळवाडीची शाळा होती . तिला रोज बैलगाडीने शाळेत सोडलं जाईल . शेतात सुकाची बायको आक्कू मुलींना सांभाळणं व घरकामात सगळी मदत करण्याचं काम करेल "

त्याप्रमाणे आई-काका , आक्की भाऊजी सगळ्यांनी चर्चा केली विचारविनीमय केला व ठरल्याप्रमाणे सगळे करायचे ठरले . मग काकांना चैन नव्हती जणू काही नविन मार्ग सापडला या उद्देशाने ते आखणी करु लागले . तिला नोकरी लागेल तेव्हा पाहू पुढच्यापुढे . सध्यातरी त्यांच त्यांना करायला लावू . 

          त्याप्रमाणे काका अनेक ठिकाणी स्वतः जाऊन आले  सांगलीजवळ अनेक प्लॕन्ट स्वतः पाहून आले दोन ठिकाणीतर भाऊजींना पण बरोबर घेऊन गेले व त्यांना त्या व्यवसायाच प्रात्यक्षिक  दाखवून आणलं . त्यांना मानसिकरित्या तयार केलं . कारण भाऊजी फारशे होतकरु नव्हते , काहीतरी करावे लागेल हे त्यांना सतत आक्कीला सांगावे लागायचे . काकापण अगदी तळमळीने सांगायचे त्याप्रमाणे शेतात त्यांच्यासाठी वेगळा गडी ठरवला तो पोल्ट्रीचं सगळे पहाणार  शेतात पोल्ट्रीसाठी शेड उभे करण्याची तयारी केली पत्रे अँगल याची सगळ्याची आधी चार ठिकाणी चौकशी करणे नंतर आॕर्डर देणे असे सुरु झाले  . कोंबड्यासाठी साचे तयार करण्याची आॕर्डर दिली . त्यांच खाद्य आणून ठेवलं . व कोंबड्यांची आॕर्डर दिली . घराची ब-यापैकी डागडूजी करुन घेतली . साधारण नवरात्राच्या आधीच  धुमाळवाडीहून पुन्हा आक्कीचा संसार बैलगाडींने शेतात आणला . त्यावेळी पुन्हा आई रांकेला लावायला चार दिवस शेतात जाऊन राहिली . आक्कीची शाळा दहा ते एक होती मग बैलगाडीने सुका शाळेत घेऊन जायचा तिथेच थांबून शाळा सुटल्यावर घेऊन यायचा . इकडे दोन्ही मुली भाऊजी घरी असायचे हे सगळं सुकाची बायको आक्कु हीला पहायची सवय करुन दिली व नंतर आई गावात आली . काकांना स्वतःची नोकरी , शेताचं पाहून या सगळ्यांसाठी धावपळ करावी लागायची . आई म्हणायची

"पायाला भिंगरी बांधल्यासारखं यांना फिराव लागतं बाई "

आणि त्यांच्या खाण्याची अगदी कटाक्षाने काळजी घ्यायची . काकांची धडपड पाहून  तिचा जीव कासावीस व्हायचा मग काका तिची समजूत घालायचे 

" रेखाचा स्वतंत्र संसार सुरु झाला आहे . नोकरी लागेल तेव्हा लागेल पण त्यांच त्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे . त्यासाठी त्यांना आपल्याला उचलून धरावच लागेल ". 

तेही आईला मान्य व्हायचे . मग तीपण हिरीरीने सहभागी व्हायची  चर्चा करायची नियोजन करायची . कमीजास्त पाहून सल्ला द्यायची  .

         यादरम्यान आक्कीला थोडासा डोकेदुखीचा त्रास सुरु झाला होता . तात्पुरते उपचार ती घ्यायची पण फारसा फरक पडला नव्हता दसरा झाल्यानंतर  एक दिवस डोक दुखत असतांना तिला एकदा थोडीशी चक्कर आल्यासारखे झाले होते . पुन्हा दिवाळीसाठी ते सगळे गावात आल्यावर तिने आई-काकांंना चक्कर आल्याचे सांगितले . दिवाळीतपण एक दिवस तिला चक्कर आली . तिची ती अवस्था पाहून आई-काका जाम घाबरुन गेले . गोंदा मामा भाऊबीजेला आलेला होता . तोपण म्हणू लागला हे लक्षण काही बरोबर दिसत नाही आपल्याला तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल . मग लगेच  अरविंद काकींना घरी बोलवलं तर त्यांनी तिला जतेला दाखवून आणण्यास सांगितले . त्याप्रमाणे दुसरेच दिवशी काका तिला घेऊन जतेला गेले . आणि त्यावेळी नेमके डाॕक्टरसमोर जायला व तिसऱ्यांदा तिला चक्कर यायला गाठ पडली . डाॕक्टरांना काहीतरी प्राॕब्लेम आहे हे लक्षात आले व त्यांनी सांगितले की

 " तुम्ही आता वेळ न दवडता यांना मिरजेच्या  मिशन हाॕस्पिटलला घेऊन जा तात्पुरते औषध देतो  . "

काका सहज दवाखान्यात म्हणून गेले होते इकडे काहीच माहिती नव्हते म्हणून संध्याकाळी तिला घेऊन परत घेरडीला आले व लगेच दुसरे दिवशी काका आक्की भाऊजी व एक वर्षाचे बाळ आहे म्हणून गायत्रीला घेऊन किर्लोस्करवाडीला मुक्कामाला गेले . इकडे घरात आई मी ज्योती संजू व आक्कीची मोठी मुलगी अंजू राहिलो . तशी अंजू तीन वर्षांची होती पण आक्कीला दुसरं बाळ झाल्यापासून तीला माझी बरीच सवय झाली होती ती माझ्याकडे बरीच रहायची . वाड्यातच नव्हे तर घेरडीत सगळ्यांना समजले होते की रेखाला काहीतरी झालं आहे तिला मोठ्या दवाखान्यात न्यावं लागणार . वाड्यात मोहन आण्णा , फक्कड काका , पंत काका तसेच आंता काका सगळेजण चौकशीला येऊ लागले धीर देऊ लागले . काका केवढ्या धैर्याने वाट काढत आहेत आणि त्यांना इतक्या संकटांना तोंड द्यावं लागतेय यावर हळहळ करायचे . तसं आक्कीविषयी सगाळ्यांनाच ममत्वाची भावना होती त्यामुळे तिला त्रास होऊ नये असे सर्वांनाच वाटायचे . मग मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून दवाखान्याबरोबरच आईने  कोण काय सांगेल ते उपाय करायला सुरुवात केली . अंगारे , धुपारे , उतारे हे पण केलं . उद्देश एवढाच की तीला लवकर बरं वाटावं . मेडशींगीला पण समजल्यामुळे तिचे सासरे येऊन गेले ते पण सगळे ऐकून खूप घाबरले होते .

           तायडीला यातलं बरचसं माहिती झालं होतं मग तिने पण काकांना धीर देण्याची , मदत करण्याची भुमीका घेतली . किर्लोस्करवाडीच्या भाऊजींना मिरजेतील सगळी माहिती होती म्हणून त्यांना बरोबर घेऊन सकाळी लवकरच काका मिशन हाॕस्पिटलला गेले . तिथे पण तायडीच्या लहान दोन मुली मायडीचं बारावीचं बोर्डाचं वर्ष चालू होतं . आक्कीलाच धीर देत तिने तिला मिरजेला पाठावलं .  मोठ्ठ हाॕस्पिटल पाहून तिला पण जरा घाबारल्यासारखं झालं होतं . डाॕक्टरांकडे गेल्यावर  त्यांनी आक्कीची लक्षणं पहाता  ब-याच चाचण्या केल्या व दोन दिवसांनी पुन्हा बोलावलं . मग आक्की वाडीला गेली व काका दोन दिवसांनी तुम्ही मिरजेला या मीपण जरा घेरडीतले काही कमीजास्त पाहून येतो म्हणून घेरडीला आले . इकडे शेतात एवढा मोठा घाट घातलेला वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या भेटी घेतलेल्या वायदे केलेले आणि आक्कीच्या तब्ब्येतीची काळजी वाटू लागली . आई खूपच घाबरुन गेली होती ती काकांना म्हणू लागली

" तुम्ही हे पोल्ट्रीचं थांबवा रेखाचा दवाखाना होऊदे आता मिरजेला जाव लागणार तुमची खूप ओढाताण होतेय . तीचे औषधोपचार झाले की आपण सगळं करु ".

 पण काकांनी निम्म्यापेक्षा जास्त काम करत आणलेलं होतं . सगळीकडे आॕर्डर्स दिलेल्या होत्या त्यामुळे ते धीरानं घेत होते . आईला समजावत होते 

"आपण तिला खूप मोठ्या दवाखान्यात नेलं आहे नक्की उपचार होतील काळजी करु नकोस  सगाळं ठीक होईल" 

असे समजवायचे . मग आईचा पण नाईलाज होई . त्यांच्या धावपळीला अंतच नव्हता . इकडे थोडंस मार्गी लावून इकडून ते मिरजेला परत गेले संजू आठनऊ महिन्याची होती अंजू लहान ज्योतीची शाळा माझी दहावी त्यामुळे आईला हलता येत नव्हते .    

काका घेरडीतून मिरजला गेले व आक्की , तायडी व दोन्ही भाऊजी किर्लोस्करवाडीहून मिरजेत आले . डाॕक्टरांच्याकडे गेल्यावर डाॕक्टरांनी आक्कीला मेजर प्राॕब्लेम आहे हे सांगितले . तिला

 " ब्रेन ट्युमर " झाल्याचे सांगितले . काकांना या आजाराविषयी काहीच माहिती नव्हती मग डाॕक्टरांनी त्यांना सविस्तर माहिती दिली .

मेंदूत गाठ झाल्यामुळे मेंदूला  रक्तपुरवठा सुरळीतपणे झाला नाही तर चक्कर येते . हे प्रमाण सातत्याने वाढत जाणार त्याचं आॕपरेशन करणे हाच त्यावरील उपाय आहे . ते केलं नाही तर जीवाला धोका निर्माण होणार होता , मोठं आॕपरेशन असून त्याला आख्खा दिवस लागणार होता तसेच त्या आॕपरेशनसाठी स्पेशल डाॕक्टरांची अपाॕंईंटमेंट घ्यावी लागते खर्चिक आहे पण मिशन हाॕस्पिटलला बाकी खर्च कमी होणार होता . आॕपरेशनच्या आधी आठ दिवस व नंतर पंधरा दिवस हाॕस्पिटलला रहावे लागणार होते . हे सर्व ऐकून  यावर काकांनी तिथेच बाहेर थांबून चर्चा करुन तातडीने आॕपरेशन करण्याचा निर्णय घेतला . साधारणपणे पंधरा दिवसांनंतरची तारीख मिळाली एमबीके भाऊजी सतत बरोबर होतेच . त्यावेळी त्यांचा व तायडीचा काकांना खूपच आधार वाटत होता . आता बाकी सर्व तयारीनीशी पंधरा दिवसांनी मिरजेला परत येण्याचे पक्के करुन काका आक्कीला घेऊन घेरडीला आले . वाड्यातील सर्व मोठी मंडळी आमच्या घरात येऊन बसली व आॕपरेशनचे नियोजन कसं करायचं यावर चर्चा करु लागली . धीर देऊ लागली . आख्ख्या वाड्यावरच ते संकट आलंय आशी सगळ्यांची भावना होती .





प्रकरण 15 वे


जिवाचं रान


19 आॕक्टोबर 2020



         घरात , गावात , नातेवाईक मंडळीत धाडसानं , वेळ न दवडता आणि योग्य निर्णय घेणारे काकाच होते . कोणालाही कोणत्याही प्रसंगी काका मदतीला असायचे . सगळ्यांना सल्ला द्यायचा वेळ पडली तर पैशाची मदत करुन धीर देणं ही कामं काका करायचे आता बाका  प्रसंग काकांवर आलेला होता . ते वरुन खंबीरपणा दाखवत होते कारण त्यांनीच जर अस्वस्थता दाखविली तर सगळेच घाबरतील हे काका ओळखून होते त्यामुळे काका धीरानं घेत होते पण आतून ते हलले होते कारण प्रश्न पोटच्या गोळ्याचा होता . काका आक्कीच्या बाबतीत हळवे होते  ही गोष्ट आई पुर्णपणे ओळखून होती . ते दोघेही एकमेकांना धीर देत होते .आपल्या जोडीदाराच्या मनात काय चालू आहे याचा अचूक अंदाज बांधून त्याप्रमाणे  वागण्याची दिशा ठरवणारे ते आदर्श जोडपं होतं . आई देवाचा धावा करायची तसेच आमचे फक्कड काका की ज्यांना पंचाग पहाता येत असे , आईने त्यांना आक्कीविषयी विचारलं तर त्यांनी तिच्यासाठी दवाखाना गरजेचं असल्याचे सांगितले . कधीकधी वेळ बदलून विचारले तर उत्तर वेगळं येतं असे प्रभा काकू म्हणायच्या . मग आई वेळ बदलून दोनदा तीनदा काकांकडे गेली तर प्रत्येकवेळी 

 " दवाखाना पहा " 

हे एकच उत्तर ते  देत असंत मग आई घरी येऊन काकांना सांगायची की

" भाऊजी रेखाला दवाखानाच नीट बघा असे म्हणतात बघा "

मग काका नुसताच सुस्कारा सोडायचे . काका म्हणजे वरुन खंबीरपणा दाखवणारे पण हळूवारपणे भावनांची कदर  करणाऱ्यातले होते . वरुन फणसासारखा काटेरीपणा पण आतमध्ये गोड गरे , वरुन टणक असणाऱ्या नारळात जसे गोड पाणी आणि खोबरे असतं असंच काहीसं काकांच होतं . काकांना  जेवढं प्रेम आक्कीविषयी होतं  तेवढंच प्रेम नऊ महिन्याच्या संजूविषयी होतं ! मुली म्हणजे त्यांच्यासाठी  जीव की प्राण होत्या आणि त्यात आक्की अधू होती आपल्याकडून तिच्या  लहानपणच्या आजारात तिच्याकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे ती अधू झालं याचं शल्य होतंच . त्यामुळे आता तिला बरं करण्यासाठी काय करु आणि  काय नको असे झालेलं . काका ख-या अर्थाने बेचैन , अस्वस्थ आणि हळवे झाले होते वाड्यातले कोणी न कोणी सतत असायचे पंत काका मावशी धीर द्यायचे मोहन आण्णा व उषा वहिनी तर रोज येऊन बसू लागले कसं करायचं यावर चर्चा होऊ लागली . आक्कीची छोटी मुलगी गायत्री एक वर्षाची होती तिला घेरडीतच ठेवायचं ठरलं मग पहिल्यांदा तिचं अंगावर पीणं बंद केलं . लहान बाळंच ते रडून गोंधळ करायचं पण त्याला इलाज नव्हता . आक्कीबरोबर दवाखान्यात उषा वहिनी रहातील असं आण्णा वहिनीनी ठरवलं . तशा त्या ब-यापैकी चुणचुणीत होत्या काही लागलं तर त्या सहजपणे मॕनेज करु शकतील इतपत त्यांना माहिती होती . त्यांच्या मुलांना काकूंची सवय होती शिवाय वाड्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मुलांची काळजी नव्हती  . म्हणून मग आॕपरेशन झाल्यानंतर आक्कीला सोबत म्हणून त्यांना मिरजेला न्यायचं ठरलं . घरात आई व तिच्या मदतीला मी होते , ज्योती तशी  लहानच होती तर अंजू तीन वर्षांची व गायत्री आणि संजू ही दोन बाळं यांना पहावं लागणार होतं माझं दहावीच वर्ष चालू होतं . काका मिरज-घेरडी जाऊन येऊन करणार भाऊजी सुरुवातीला आक्कीजवळ रहातील व नंतर घेरडीत येतील असे ठरले . कारण पोल्ट्री व्यवसायाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं . तिकडे दवाखान्यात जा-ये करणे ,  कमीजास्त पहाणे व डबा पोहोच करणे ही कामं किर्लोस्करवाडीचे भाऊजी म्हणजे एमबीके भाऊजी करणार होते . असे सगळे नियोजन केले  काकांनी आॕपरेशनसाठी लागणाऱ्या  पैशाची व्यवस्था केली , शेताकडे काय हव-नको पाहून व्यवस्था लावली . वाड्यातले , गावातले लोक घरी यायचे . गोंदा मामा आलेला होताच .

" एवढा मोठा दवाखाना करताय होईल सगळं व्यवस्थित " 

असं सगळे म्हणून धीर द्यायचे . 

इकडे आईची घालमेल वेगळीच होती . एकतर तिची स्वतःची तब्ब्येत , नुकतच सुरु झालेलं डायबेटीस , लहान बाळ , काकांची धावपळ आणि आक्कीच्या तब्बेतीची काळजी , तिचे होणारं आॕपरेशन ,  तिच्या लहान मुलींसह तिच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी आणि काकांनी घातलेला पोल्ट्रीचा घाट  !  तिला उमजच पडत नव्हता . पाहूण्यांचा राबता वाढलेला . ती काकांच्या मागे लागली होती

 " तुम्ही हे पोल्ट्रीचं तुर्तास थांबवा रेखा बरी झाल्यावर करु ".

असे तिचे पालूपद होते . पण काका तिचे काही ऐकून घ्यायच्या मनस्थीतीत नव्हते . कारण कायकाय कराव लागणार , कधी करावं लागणार , किती पैसा गुंतला आहे हे सगळे नियोजन फक्त काकांनाच माहिती होतं . पण आईला वाटायचं काका रात्रीचा दिवस करुन धावाधाव करत आहेत . जिवाचं रान करत आहेत . पैशापरी पैसा तर जातोच आहे शिवाय मानसिक व शारीरिक ताण पण खूप येतोय . पण काका काहीच थांबवायला तयार नव्हते . 

       मग सगळी तयारी करुन ठरल्याप्रमाणे दिलेल्या तारखेला काका , आक्की व भाऊजी मिरजेला गेले व आक्कीला अॕडमीट केलं . तिकडून एमबीके भाऊजींच येणंजाण होतंच . सगळ्या तपासण्या झाल्या व आॕपरेशनचा दिवस उजाडला त्यादिवशी भाऊजींबरोबर तायडीपण आली होती . गोंदा मामा होता . मुंबईहून आक्कीच्या आॕपरेशनसाठी स्पेशल डाॕक्टरांची टीम आली होती . बरेचसे डाॕक्टर ख्रीश्चन होते . मुख्य डाॕक्टर " फाॕरेन रिटर्न " आहेत त्यांना अनेक मोठमोठया हाॕस्पिटलला जावे लागते असे ऐकायला मिळत होते . आक्कीला आत नेलं आणि जवळजवळ नऊ तास आॕपरेशन चाललं . तसं त्याकाळी  अशा प्रकारचे आॕपरेशन क्वचितच होत असे त्यामुळे शिकाऊ डाॕक्टरांची पण भरपूर गर्दी होती . बाहेर हे सगळे नातेवाईक उभे होते वेळ संपता संपत नव्हता पण

" आॕपरेशन अगदी व्यवस्थित झालं आहे "

असे जेव्हा डाॕक्टरांनी बाहेर येऊन सांगितले तेव्हा सगळ्यांनाच हुश्श्य झालं . बाहेर आणले तरी अजून आक्कीची भूल उतरलेली नव्हती . काका , तायडी , दोन्ही भाऊजी , मामा सगळ्यांसाठी हा अनुभव भयचकीत करणारा पण आशावादी होता . मेंदूचं आॕपरेशन होतं ते त्यामुळे 1981 च्या काळात कठीण व वेळखाऊ काम होतं ते . आक्की दुसरे दिवशी व्यवस्थित शुद्धीवर आली . मग दोन दिवसांनी थोडासा सुरळीतपणा  लागला असा विश्वास वाटल्यावर काका घेरडीला आले . काका आलेले दिसताच मागोमाग वाड्यातले सगळे जमले . आई तर देव पाण्यात ठेऊन बसलेली होती .  त्याकाळात पत्र किंवा माणूस या दोनच मार्गांनी बातम्या समजत असत . जेव्हा काकांच्याकडून सगळा वृत्तांत समजला तेव्हा आईचा जीव भांड्यात पडला . इथला सगळा आढावा घेऊन काकांना दुसरे दिवशी उषा वहिनींना घेऊन मिरजेला जायचं होतं . कोंबड्यांसाठी मागवलेल्या जाळ्या अजून आल्या नव्हत्या पण दोनच दिवसांत कोंबड्या मात्र येणार होत्या . सगळीकडे वेळेत निरोप देणे काकांना शक्य होईना मग त्यांनी वहिनींना मिरजेला नेलं व भाऊजींना घेरडीत पाठवलं . माझी दहावीची पुर्व परिक्षा सुरु झाली होती . सहामाही परिक्षेत फर्स्टक्लास मिळाला होता त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या . त्याचदरम्यान

गायत्रीचं पोट बिघडलं आणि जुलाबाने ती हैराण झाली . आईला दिवसभर काम आणि गायत्रीचं रडणं व जागरण असायचं आई  तिला औषधोपचार आणि घरगुती चाटण करुन द्यायची . मला ब-यापैकी समजत होतं . तास , परिक्षा , अभ्यास यातून मुलींना मी पहायचे दहावीची मुलगी पण लेकुरवाळ्या बाईसारखं मुलींच्या शी-शूसहित आईच्या मायेनं मुलींचे करते असे आई म्हणायची  पण त्याचं पण आईला वाईट वाटायचे माझा अभ्यासाचा वेळ मुलींना सांभाळण्यात जातोय असे तिला वाटायचे . आई लाडाने मला

 " सरोजनी नायडू " 

म्हणायची . समज नव्हती पण घरावर काहीतरी संकट आहे हे समजून ज्योती पण मनानेच  समजदारपणे वागायची काहीतरी मदत करायची धडपड करायची . या लहान तीन मुलींना सांभाळणं फारच जिकरीचं होऊन बसलं होतं . मग धुण्याचं काम करणाऱ्या शांता परटीणीला आईने मुलींना संभाळायला ठेवलं पण ती दुपारी यायची सकाळी आम्हीच पहायचो . 

       तिकडे एमबीके भाऊजींनी आवश्यकतेनुसार रजा घेतली होती व नंतर कंपनीत कामाला जाऊ लागले पण त्यांची रोज मिरजला चक्कर असायची . आॕफिस सुटलं की भाऊजी साडेचारला स्टेशनवर यायचे तर घरी तायडी डबा करुन मायडीची वाट पहात बसायची . मायडी चार वाजता कॉलेजमधून यायची व तयार डबा घेऊन भाऊजींना द्यायला साडेचार वाजता स्टेशनवर यायची व पावाणेपाचच्या ट्रेनने भाऊजी मिरजला जायचे . दवाखान्यात जाऊन डबा देऊन हवेनको पाहून परत रात्री साडेआठच्या ट्रेनने भाऊजी वाडीला परत यायचे घरी येईस्तोवर त्यांना दहा वाजायचे . तिथे पण मंजू लहान ,  मेधा बाळ , मायडीची बारावी अशी सगळी तारांबळ उडायची . पण प्रत्येकजण धावपळ करायला आपण होऊन पुढे येत होतं इच्छा फक्त आक्कीला बरे वाटले पाहिजे ही होती .

           भाऊजी घेरडीला आले आणि शेतात रहायला गेले कारण जाळ्या आणि कोंबड्या येणार होत्या . काकांचा तर एक दिवस मिरजेत तर एक दिवस घेरडीत मुक्काम असायचा . एवढी धावाधाव करुन शेवटी पोल्ट्रीचा गोंधळ व्हायचा तो झालाच . अजून शेड तयार झालेच नव्हते पण एक दिवस कोंबड्या सकाळी आल्या व दुसरे दिवशी जाळ्या येणार होत्या . शेतात कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था व्हायला दोन दिवस लागणार होते . थंडीचे दिवस होते कोंबड्या म्हणजेच पिल्लं लहान होती व त्या विलायती कोंबड्या असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं होतं .मग काकांनी तात्पुरत्या कोंबड्या वाड्यात आमच्या वरच्या घरात ठेवायचं ठरवलं , व जाळ्या आल्या की रहात्या घरात सोप्यात ठेवायचं ठरवले . आईला हे अजिबात मान्य नव्हते आपण ब्राम्हण आहोत कोंबड्या , अंडी यापासून आपण चार हात लांब असतो . लोक काय म्हणतील समोर जरी कोणी काही बोलत नसले तरी मागे काय म्हणत असतील . काय असेल ते शेतात करा हे कोंबड्या वगैरे घरात कशाला असे तिला वाटत होते . तिला वाईट वाटायचं मग तिने स्वयंपाक घराचे दारच  लावून घेतले व तिने सोप्यात यायचेच बंद  केले असहाय्य होऊन कधीकधी ती रडायची . आक्कीची काळजी , तिच्या मुलींचे रडणे , आजारपण  ,  पाहुण्यांचा राबता , काकांची होणारी त्रेधा , स्वतःची तब्बेत या सगळ्यांमध्ये पोल्ट्री तिला डोईजड झाली . मग काकांनी चार दिवसांत त्या कोंबड्या शेतात नेण्याची व्यवस्था केली . त्यांच्या धावपळीला तर अंतच नव्हता . 

"उर फुटेपर्यंत नका हो धावपळ करु तुम्ही " 

असे आई म्हणायची . 

आक्कीची तब्बेत आता चांगली वाटत होती , आॕपरेशन छान झालं होत , टाके व्यवस्थित निघाले होते  . मेडीकल काॕलेजचे विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्हणून आक्कीकडे यायचे तिला झोप लागली असेल तर उषा वहिनी कोणालाही आत येऊ देत नसत वहिनी त्यांना म्हणायच्या 

" एक प्रश्न एकानेच विचारायचा आणि त्या जे उत्तर देतील ते  उत्तर तुम्ही लिहून ठेवायचं व तुमच्या तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं त्याचत्याच शंकांसाठी आमच्या पेशंटला सारखा त्रास द्यायचा नाही ".

लिहून दिलेली औषधे आणायची , आक्कीबरोबर गप्पा मारत तिला हसवत ठेवायचं , असं अगदी व्यवस्थित मॕनेज करत होत्या . तायडी मधूनमधून येऊन जायची . काकांना व भाऊजींना उषा वहिनी तिथला सगळा वृत्तांत सांगायच्या मग त्याप्रमाणे काका तिथे बोलून यायचे सुचना देऊन यायचे .

आक्कीला घरी सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला , इकडे गायत्रीला पण बरं वाटू लागले , पोल्ट्रीचं सगळं आलं व ते शेतात अगदी व्यवस्थित सुरु झाले . असे सगळच एकदमच व्यवस्थित झालं असे वाटू लागले . दहा दिवसांनी मुंबईचे डाॕक्टरांची व्हीजीट झाली व त्यांनी आक्कीला  30 डिसेंबरला घरी जाण्याची परवानगी दिली . या बातमीनेच सगळ्यांना तरतरी आल्यासारखे वाटू लागले . मग आई-काकांंना पण इतका थकवा येऊनसुद्धा बळ आल्यासारखे वाटू लागले . एवढ्या मोठ्या आॕपरेशननंतर पोरगी घरी येणार म्हणत आईंने सगळे घर स्वच्छ करुन घेतले . न रहावून ती पुन्हा फक्कड काकांकडे पंचाग पहायला गेली तर ते थोडंस चिडलेच सारखे कशाला पहाता म्हणू लागले तरी प्रश्न टाकला की ते पहायचे . त्यांनी सांगितले 2 जानेवारीनंतर तिच्या तब्बेतीत सुधारणा होईल . मग आईला पण आनंद झाला तिने घरी येऊन काकांना पण सांगितले की आता रेखाचा त्रास संपेल . घरी आली की तिची आपण छान काळजी घेऊ , पौष्टिक खायला प्यायला घालू की जेणेकरुन लवकर तिची तब्बेत सुधारेल व तिचे तिचे छान रुटीन सुरु होऊ शकेल  . सगळेजण मग 30 डिसेंबरची वाट पाहू लागले . तशी आक्कीची इंजक्शन्स पण बंद झाली होती पण तिथून निघताना तिला मोठं इंजक्शन दिलं होतं हे निरिक्षण उषा वहिनींनी केलं होतं . त्यांनी विचारलं हे कशासाठी तर दवाखान्यात सांगितले गेले की तुम्ही आता प्रवास करुन जाणार आहात तर बहात्तर तास काहीच त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे देतो . आता आक्की घेरडीला जाणार म्हणून तायडी मायडी पण 30 तारखेला सकाळी मिरजेला आल्या . सगळ्यांनाच आपण केलेल्या कष्टाचं चीज होतंय असे वाटायचे . जवळजवळ तीन आठवडे दवाखान्यात राहील्यामुळे व हिचे मोठे आॕपरेशन झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे आक्कीच्या लाघवी व चेष्टेखोर स्वभावामुळे दवाखान्यात अनेकांशी तिचे स्नेह  संबंध जुळले होते ती निघतांना अनेकजण तिला निरोप द्यायला आले होते . इकडे घेरडीत पण आम्ही सगळे तिची वाट पहात होतो . संध्याकाळच्या वेळी आक्कीला घेऊन काका घेरडीत पोहोचले . डोक्याला बांधलेले अंगावर स्वेटर घातलेली आक्की वाड्यात पोहोचली वाड्यातील सगळेजण आपापल्या दारात येऊन उभे राहिले होते . अंजूला कळत होतं आई येणार म्हणून गायत्रीला मात्र कळत नव्हते . ती दारात येताच तुकडा ओवाळून पाय धुऊन आईने तिला घरात घेतलं . वाड्यातले सगळेजण भेटायला येणार म्हणून आईने सोप्यात मोठी सतरंजी अंथरुन ठेवली होती . सोप्यात आक्की येऊन बसली आणि तिला पहाताच तिच्या दोन्ही मुली तिच्या गळ्यात  पडल्या , त्या जवळून हलायलाच तयार नव्हत्या . आईने सगळ्यांसाठी चहा केला . उषा वहिनी भरभरुन तिथले अनुभव सांगत होत्या . आक्कीला आराम करायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले . आक्कीला गोड आवडायचं मग आईने जेवायला शेवयाची खीर केली . जेवणं करुन सगळे झोपले . आक्कीसाठी बाळंतीण बाईप्रमाणे स्वयंपाकघरात बिछाना तयार केला होता . पण एकूणच आक्की खूपच फ्रेश वाटत होती . दुसरे दिवशी गावातले भावकीचे , स्नेह संबधातील लोक येतच होते . पुर्ण दिवस कोणी न कोणी येतंच राहीले . मग संध्याकाळी पुन्हा एकदा वाडायातले काका-काकू सगळ्या वहिनी भाऊ येऊन बसले सगळे म्हणू लागले 

" चला आता 1981 साल आज संपतय . उद्यापासून नविन वर्षाची सुरुवात होतेय . सगळी पीडा संपून जाईल आज . उद्यापासून नविन आयुष्याला सुरुवात होणार ".

          मग त्याकाळी ख्याली खुशाली कळवण्याच साधन म्हणजे टपाल होतं . मग काकांनी सगळ्या पाहूण्यांना

" रेखाचं आॕपरेशन व्यवस्थित झाले असून तिला आता घेरडीत आणले आहे काळजी नसावी ".

या आशयाची पत्र लिहीलं व ती टपालपेटीत टाकून आले .-काका पण खूष झाले . काकांना बारा हत्तीचं बळ आलंय असे वाटू लागले . मग रात्री त्यांनी ठरविले उद्या जतेला जाऊन सगळा किराणा आणू की ज्यामुळे आक्कीला जरा चांगल चुंगलं करुन घालता येईल .1 जानेवारी 1982 नविन वर्षाची सुरुवात  अगदी सकाळी साडेसातला काकांना जत गाडी होती आई-काका लवकरच उठले काकांच आवरेपर्यंत आईने साजूक तुपातला शिरा केला . आक्की सात वाजले तरी उठली नव्हती मग काकांनी तिला उठवलं व माझ्याबरोबर शिरा खायचा म्हणू लागले . ती म्हणाली 

" काका मला जरा झोप येतेय मी थोड्या वेळाने उठते व खाते तुम्ही जाऊन या जतेला ".

आई-काकांंना वाटले प्रवासाचा कालच्या गाप्पांचा ताण पडला असेल झोपू द्यावं तिला . पुन्हा घरातून बाहेर पडतांना काकांनी तिला बजावलं . 

" रेखा मी किराणा आणायला जतेला निघालोय तू शिरा खाऊन औषधं घे आणि मग झोप " .

मग ती अंथरुणातच उठून बसली व काकांना तिने हसून निरोप दिला . आणि काका सामान आणायला जतेला गेले




प्रकरण 16 वे


सगळं मुसळ केरात !


2 नोव्हेंबर 2020



           1 जानेवारी 1982 नविन वर्षाची सकाळ अगदी उत्साहात उजाडली आहे या विचारात आई-काका मनोरे रचू लागले . आता रेखाचं बस्तान लवकर बसेल त्यासाठी तिची तब्ब्येत अगदी व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे यासाठी तिला व्यवस्थित खायला प्यायला दिलं पाहिजे आणि म्हणून मग चांगल्या दर्जाचा किराणा आणू असं म्हणत काका सकाळच्या एसटीने जतेला गेले होते . आक्कीला गोड आवडतं म्हणत काकांबरोबरच आईने सकाळी सातला तिला दिलेला शिरा नऊ वाजले तरी आक्की खायला नको म्हणत होती मग आई रागाऊनच म्हणाली 

 " असं का ग करतेस रेखा ? वेळेवर खाल्लं पाहिजेस उषाला हाक मारु का " 

मग आक्की म्हणाली 

" आता त्यांना नको त्रास द्यायला शरी मला मदत करेल " .

हे बोलतांना पण तिची जीभ जड झालीय असं जाणवत होतं . आणि ती गुंगीत आहे असे वाटत होते . आईला वाटलं औषधांमुळे गुंगी लागत असेल तसंच दोन दिवस जरा दगदग पण झालीय .  मी आक्कीजवळ शिरा घेऊन गेले तिला उठून बसायला जमेना म्हणून तिने माझा आधार घेतला .  मी भिंतीला तक्क्या टेकवून ठेवला व तक्क्याला टेकवून तिला बसवलं . तिला शि-याचा चमचा उचलून पण घेता येईना मग मीच एक चमचा शिरा तिला भरवला तर तिला तो गिळता येईना . आई स्वयंपाक करत होती मी तिला हा  सगळा प्रकार सांगितला तर आई आक्कीकडे आली व म्हणू लागली 

" रेखा तू खाण्याची हायगय करु नकोस बरका औषधाच्या बरोबरीनं सगळं व्यवस्थित खाल्लस तर लवकर बरी होशील बघ , आता तुझ्यावर सगळं अवलंबून आहे  ".

आक्कीने गिळायला त्रास होतोय म्हणून सांगताच आईने दूध उकळून त्यात शिरा घातला व खिरीसारखं मिश्रण करुन दिलं . पुन्हा ते घेऊन मी आक्कीकडे गेले तर ती म्हणाली

" शरे मला हातानं खायला हात उचलत नाही तुच घाल खायला "

मग मी तिला चमच्यानं भरवल्यावर मात्र अगदी व्यवस्थित खाल्लं तिने . पण आईला मात्र काळजी वाटू लागली परवा दिवशी ही एवढा मोठा प्रवास करुन आली काल दिवसभर छान गप्पा मारल्या ,  जेवण केलं , घरातल्या घरात फिरली आणि आज एकदमच असं का होतंय हिला ? तिला जडपणा का आलाय ? बोलतांना पण नीट नाही बोलत असे म्हणत ती चिंतातुर झाली .

    त्यादिवशी मला 1 जानेवारीची शाळेला सुट्टी होती . आमच्या आडाचं पाणी खारं होतं ते प्यायला चांगलं लागत नसे . म्हणून आम्ही वाड्यातले सगळे मिळून बबन काकांच्या आडाचं पाणी प्यायला म्हणून आणायचो त्यासाठी वरलीकडं जावं लागायचं जरा लांब होतं ते . सगळे आमच्या घरात जमायचे मग मागच्या दारांनी आम्ही पाण्याला जायचो . दहाच्या सुमारास आपापल्या घागरी घेऊन उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी व विद्या आमच्या घरी जमले . आईने काळजीच्या सुरातच उषा वहिनींना आक्कीविषयी सगळं सांगितले . तर त्या आक्कीजवळ जाऊन बोलू लागल्या 

" काहो रेखा आत्त्या असं का करताय  ? दवाखान्यात तर घरी कधी जायच म्हणून घोकत होता . आता आपण घरी आलो ना ? मग आता असं का करताय ? तुम्ही जर असं केलं तर काका उद्याच मिरजेला जाऊ म्हणतील बघा ".

मग आक्की दमाल्यासारखं होत होतं म्हणून हाताने खूणा करुन बोलू लागली . तिने तिचं अंथरुण जरा पुढे घ्यायला सांगितले . आम्ही तिला देवासमोर तिचे अंथरुण टाकून दिलं . आई घाबरली होती तिने मागच्या दारात उषा वहिनीला बोलावलं व हळूहळू आवाजात दोघी बोलू लागल्या . उषा वहिनींनी सांगितले 

" तिथे असं झालं की इंजक्शन द्यायचे मग दोनतीन दिवस सगळं सुरळीत चालायचं . येतांना इंजक्शन दिलं होतं पण आता पुन्हा द्यावं लागणार नाही असं सांगितलं आहे . बघूआता काका आल्यावर काय म्हणतात ते नाहीतर परत न्यायची पाळी येतीय का काय असं वाटतंय  ".

मग थोडावेळ थांबून आम्ही सगळे पाण्याला गेलो . 

साधारण आकरा वाजत आले होते आम्ही पाण्याच्या घागरी घेऊन घराजवळ परत आलो तर आई खूप मोठ्या आवाजात 

" रेखा ए रेखा अगं रेखा "

अशा हाका मारत असलेला आवाज येत होता मी पळतच घरात गेले आणि आक्कीच्या डोक्याजवळच घागर ठेवली व "काय झालंय ग "

म्हणून आईला विचारु लागले . आई खूप घाबरली होती आक्कीचं डोकं मांडीवर  घेऊन हनुवटी हालवत तोंडावरुन हात फिरवत तिला हाका मारत होती . मला म्हणाली 

" शरु हिच्या तोंडात थोडंस पाणी घाल ग बाबा ". 

 मला पण सुचेना त्याच घागरीतलं पाणी हातानं बोटांच्या खोबणीत घेऊन मी तिच्या तोंडात घातलं तिने डोळे किलकीले करत माझ्याकडे पाहिलं व एक घोट हळूहळू पिला मी लगेच पळत जाऊन फुलपात्र आणलं व त्यात पाणी घेऊन तोंडात आणखी एक घोट घातला तर गडगड आवाज आला . आई रडतच तिच्या कानाच्या पाळ्या चापचू लागली , तोंडावरुन हात फिरवू लागली तोवर उषा वहिनी व पिलू वहिनी मागच्या दाराने घागरी घेऊन आल्या आई उषा वहिनीला म्हणाली  

" तू घरी जा आणि मोहनला बोलावून आण पटकन " 

पुन्हा मी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तर तोंडातून पाणी बाहेर आलं तिची हालचाल बंद झाली होती ! डोळे अर्धवट उघडे पण हलत नव्हते , मग मात्र आईचा धीर सुटला तोवर आण्णा-वहिनी धावत आले . त्यांना पाहून आईने   हंबरडाच फोडला कासावीस होत ती आण्णाला म्हणाली

" अरे मोहन बघ रे बाबा , रेखांच चरित्र मला काही बरोबर दिसत नाही  . हिच्या कानाच्या पाळ्या बघ कशा लुळ्या पडल्यात , दोन घोट पाणी पिलं तिसरा घोट बाहेर आलाय ,  हालचाल तर काहीच जाणवत नाही आता काय करावं मला तर काही कळना बाबा , बघ आता तूच कर काहीतरी ". 

तोवर वाड्यात सगळ्यांना रेखाला काहीतरी झालं ही बातमी समजली . जसं आहे तसं एकएकजण आमच्या घराकडे पळत येऊ लागले . घरात झालेली गर्दी , आईचा आक्रोश सगळ्या बायकांची रडारड पाहून फारसं कळत नसलेली ज्योती , लहानगी अंजू यांना काय होतंय हे कळेना त्यापण आईकडे पाहून मोठमोठ्या आवाजात रडू लागल्या तर गायत्री आक्कीच्या जवळजवळ करु लागली आणि संजू आईच्या जवळून हलेना या दोघी बाळंच होत्या ती दोन बाळं पण घाबरी झाली रडू लागली मला ब-यापैकी समजत होते मी इकडून तिकडे पळत होते कोण काय सांगेल ते करत होते  . कोणीतरी म्हणालं

 "अरविंद काकींना आणावं ".

 कोणी मध्येच अंगाला हात लाऊन पहात 

" गार लागतंय  "

म्हणायचं तर कोणी नाकापुढे हात धरुन श्वास येतोय का पाही , नाडी लागतेय का बघ असे प्रकार सुरु झाले अंदाज तर सगळ्यांना आला होता पण बोलणार कोण आणि काय ?

दहा मिनिटांत आरविंद काकी आल्या . त्यांना पाहून आई लहान मुलांसारखे त्यांना प्रश्न विचारु लागली 

" काकी बघाहो हीला आणि पटकन काहीतरी द्या . आज हे जतेला गेलेत पाहिजे तर आले की नेतील मिरजेला पण आत्ता काहीतरी हिला द्या "

अस्वस्थ होऊन बडबड करु लागली . आरविंद काकी आक्कीजवळ बसल्या तिला हात लावला की त्यांना कळून आलं होत पण आईची स्थिती पाहून त्यांना गोंधळायला होऊ लागलं आता यांना काय सांगावा म्हणून . त्या म्हणाल्या 

" मी इंजक्शन देते पाहूया काय होत ते तुम्ही शांत बसा ".

 पण आई हुशार होती , आक्कीची हालचाल पुर्ण बंद झाली होती त्यामुळे तिला आंदाज आला होता पण मान्य होत नव्हते ती एकदम मोठ्या आवाजात ओरडली

" रेखा ssss"

 आणि जोरात ओरडली तशी तिची दातखीळ बसली . मावशी व प्रभा काकूंनी आईला बाजूला घेतलं अरविंद काकींनी आईला इंजक्शन दिल . खूणेनं मोहन आण्णाला वाड्याबाहेर जायला सांगितले पाठोपाठ त्यापण निघाल्या  त्यांच्याकडे माझं लक्ष होतंच . काकी वाड्याबाहेर गेल्या पाठोपाठ मी पण गेले त्यांनी मोहन आण्णाला सांगितले

" मोहन , रेखा गेलीय ! " 

एवढं ऐकलं मात्र मी पण जोरात रडू लागले , मोहन आण्णा डोक धरुन नरसोबासमोरच्या दगडावर मटकन बसला तोपण रडायला लागला मागोमाग रंगा माळी , रमेश आण्णा , फक्कड काका हे सगळे मागोमागच आले होते . रंगाने मला पकडून ठेवलं मग काकी म्हणाल्या 

" काकांना आणायला माणूस पाठवण्याची व्यवस्था करा . आपण आत्ताच पपा काकींना काही सांगायला , बोलायला नको , भाऊकाका आल्यावर सांगू . त्यांना ओळखायला आलंय पण त्यांच्या मनाची तयारी होऊदे . आधीच त्यांना डायबेटीसचा त्रास सुरु झालाय सध्या ताण पण खूप आहे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे पण जवळच्या माणसांना बोलावून घ्या . "

हे सगळं माझ्यासमोर त्यांनी सांगितले त्यामुळे मी गप्प बसले . 

आईला खूप त्रास होत होता ती एकदम गप्प बसायची मधूनच जोरात ओरडायची . त्यामुळे  दोनतीनवेळा आईची दातखीळ बसली . घरात आलेल्या बायकांनी ज्योती , अंजू  , गायत्री आणि संजू सगळ्यांना देशपांडे सरांच्या घरात बसवलं तर बाहेरच्या बाहेर मोहन आण्णा , रमेश आण्णा , आंता काका व  फक्कड काका यांनी  काकांना जतेहून , शेतातून भाऊजींना आणायला तर मेडशींगीला  तिच्या सासरी माणसं पाठविली . पहिल्यांदा शेतातून भाऊजी आले . त्यांना इतका धक्का बसला होता की त्यांना रडायचं पण समजेना मग हुंदके देतच ते सांगू लागले की 

" मी आणि सुका मघाशी शेतात फिरत होतो तर माझ्या डोक्यावरच टिटव्या जोरजोरात ओरडत होत्या  . 

सुका मला  म्हणाला सुद्धा पाव्हणं काय होतंय असं आव ,  लक्षण काय बरं न्हाय मग मला पण वाटलं की यावं काय गावात तर थोड्याच वेळात गावातूनच माणूस आला ".

आणि हे सांगतच ते हमसूनहमसून रडू लागले . 

इकडे आईच बाळ म्हणजे संजू नऊ महिन्याचं अंगावर पिणारं बाळ होतं भूकेनं रडूनरडून गोंधळ घालू लागलं , मावशी  आईला संजूला जवळ घे म्हणू लागल्या तर आईचा आक्रोश चालू होता 

" मावशी माझ्या पोटचा गोळा काढून नेल्यासारखं वाटतंय , खड्डा पडलांय माझ्या पोटात , माझा पान्हा आटून गेलाय कुठून आणू दूध हीला सांगा बाई  ".

मावशी व माई मावशी आईच्या  दोन्ही बाजूला बसून होत्या धीर देत होत्या . दुपारचे दोन वाजून गेले . वाडा आणि वाड्याबाहेर गच्च गर्दी जमली होती . सगळे आता काकांची वाट पहात होते . रंगा माळी व अजून एकजण काकांना आणायला गाडीवर जतेला  गेले होते . त्यांची काकांना गाडीवर बसवून आणतांना खूप फजिती होत होती .

" रेखाला बरं वाटत नाही मिरजेला जायचंय म्हणून तुम्हांला न्यायला आलोय ".

असं त्यांनी काकांना खोटं सांगितले होते व दोघांच्या मध्ये बसवून आणत होते पण काकांचा विश्वास बसत नव्हता , त्यांना शंका आली होती . काकांनी दोनवेळा त्याला चालती गाडी थांबवायला लावून 

" काय झालंय खरं सांग मला खोट बोलू नकोस " 

असं दरडावून विचारलं सुद्धा होतं . पण त्यांन काहीही न सांगता कसबसं घेरडीपर्यंत आणलं होतं . पेठेत लोक जमले होते काका आलेले दिसताच कुजबूज करु लागले , काकांकडे पाहू लागले मग काकांना पण शंका येऊ लागली . पण कोणीच काही बोलत नव्हतं .  मुख्य रस्त्यावरून गाडी बोळात वळली आणि वाड्याबाहेर गच्च गर्दी जमलेली दिसल्यावर मात्र काकांचा धीर सुटला होता . काका धावतच वाड्यात आले . आंता काका व रमेश आण्णानी त्यांना पकडून घरात आणलं . आक्कीला सोप्यात आणून झोपवलेलं होतं तिला पहाताच काका  दरवाज्याजवळ कोपऱ्यातच पाय पसरुन मटकन खाली बसले आणि डोकं दोन्ही बाजूला धडाधड बडवत ओक्साबोक्शी रडू लागले चारचारजणांना त्यांना सावरण मुश्कील होऊ लागलं .

" मी किती धडपड केली तरी असं कसं झालं . रेखा अशी कशी मला न सांगत गेली  "

त्यांचा आक्रोश आतडी पीळवटून टाकणारा होता . आई रडतरडतच  म्हणू लागली 

" रडू दे त्यांना फार गिळलंय त्यांनी . जिद्द बाळगून धडाडीनं केलंय खरं परमेश्वरांन खाडकन थोबाडीत मारलीय . हारलेत ते त्यांच दुंःख बाहेर येऊ दे नाहीतर छाती दडपून जाईल त्यांची ".

आणि रडारडीचा एकच कल्लोळ उठला . आक्कीचे दीर व सासरे आले  . ते पण हतबल होऊन रडू लागले . सासरे दुःखीकष्टी होत रडतच बोलू लागले 

" रेखाबाई काय केलंत हे उलटसुलट पहायची आमच्यावर पाळी का आणली हो . सुखाची  चटक लावून निघून गेलात  माझा रवी राज्यावरुन उठला ".

आक्रोशाला सीमाच राहिली नाही उलटसुलट घडलं होतं . लहानलहान दोन पोरी टाकून ऐन पंचवीशीत आक्की या जगातून निघून गेली होती . हातातोंडाशी आलेले सुखाचे दिवस तिला उपभोगता आले नाहीत .

पाच वाजता जगरहाटीप्रमाणे अंत्यसंस्कार करायचं ठरलं . आख्खा गाव जमला होता . जवळपासचे पाहुणे जमले होते . बोळात थांबायला जागा नव्हती .  इतकी गर्दी जमली होती . सगळे सोपस्कार पार  पडेपर्यंत आंधार पडला . सुन्न वातावरणात सगळे घरी येऊन बसले . सख्ख्या  बाहिणी तायडी मायडी यांना यातलं काहीच माहित नव्हतं आता प्रश्न त्यांना सांगण्याचा होता . मग विचार करुन मोहन आण्णाला दुसरे दिवशी प्रत्यक्षात  किर्लोस्करवाडीला पाठवून द्यायचं व त्यांना घेऊन यायचं असे ठरले . त्याप्रमाणे आण्णा गेला . आचानकच मोहन आण्णाला दारात पाहून तायडीला खूप आनंद झाला . तिच्या ध्यानीमनी पण काही नव्हते . चहापाणी झाल्यावर आण्णा भीतभीतच म्हणाला

" रेखा तुमची फार आठवण काढतेय म्हणून काकांनी मला तुम्हांला आणायला पाठवलय ".

हे ऐकून तायडीला काही पटेना ती आण्णाला खोदूनखोदून विचारु लागली . तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण आण्णा गप्पा मारत होता असं कसं बोलावं म्हणत ती गप्प बसली . सगळे आवरुन निघाले मधूनच तायडी आण्णाला विचारायची 

" आण्णा , घेरडीत सगळं ठीक आहे ना रे ? " 

आण्णा छातीवर दगड ठेऊन हो म्हणायचा . पाच वाजता ते सगळे घेरडीत पोहोचले . घरी येईस्तोवर त्यांना अंदाज आला होता . एकमेकांना पाहून जो आक्रोश सुरु झाला तो हृदय पिळवटून टाकणारा होता . मायडीने तर घराच्या पायऱ्या कशातरी चढल्या ती चक्कर येऊनच पडली . पुन्हा सगळी भावकी जमली , सगळे तायडीला 

" तूच घरात मोठी आहेस , तूच जर हातपाय गाळून बसलीस तर काका-काकींना कोण धीर देईल ? तुला स्वतःला सावरुन या दोघांना धीर द्यावा लागेल ".

कोणी कोणाला सावरायचं हाच  मोठा प्रश्न होता . अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत काका सकारात्मक दृष्टी ठेवून मार्ग काढत होते पण नियतीपुढे काहीच चालले नाही .

" सगळं मुसळ केरात गेलं ".

हाहा म्हणता बातमी गावोगावी पोहोचली असं कसं झालं म्हणत पुन्हा सकाळी तिसऱ्याला म्हणून पाहुणे , स्नेही , नातेवाईक गोळा झाले . आईमध्ये त्राणच उरले नव्हते तिला सावरायलाच कोणीतरी लागायचं इतके तडफदार काका पण त्यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती . आम्ही कळत्या मुली दुःखी तर नकळत्या मुली , नाती भयभीत झाल्या होत्या . मेडशींगीहून आक्कीचे दीर , जाऊ , सासरे , नणंद बाकीचे नातेवाईक आले होते . आक्कीचा दीर अरवींद म्हणाला 

" गेली पाच वर्षे खूप केलं तुम्ही , पण आता काका-काकूंची दोघांचीही अवस्था पहाता आम्ही दोघा नवराबायकोंनी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे अंजू व गायत्री या दोघींनाही आम्ही सांभाळतो , त्यांना घेऊन जातो , तुम्हांला जेव्हा त्यांना पहावं वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना घेरडीला घेऊन या पण ही जबाबदारी आम्ही घेतो ".

सध्या तर घरातील परिस्थिती खूपच नाजूक झाली होती या दोन पोरी डोळ्यासमोर दिसल्या की आईची अवस्था भयभीत होत होती .  मग कोणीच काहीच बोलले नाही . अरवींद म्हणाला त्याप्रमाणे तिसरा झाल्यावर भाऊजी व मुली सगळ्यांबरोबर मेडशींगीला गेल्या .




प्रकरण 17 वे

दुःखाचा डोंगर


29 नोव्हेंबर 2020



         आक्की गेल्यानंतर बरेचसे परगावचे नातेवाईक तिसऱ्या दिवशी आले होते . एक तारखेच्या वातावरणात फारसा बदल झालेला नव्हता . त्यामुळे सगळे रडूनरडून व्याकूळ झाले होते . त्राण म्हणून कोणात उरले नव्हते . रोजच चहाच्या वेळेला चहा आणि जेवणाच्या वेळी जेवण घेऊन कोणीतरी हजर असायचे इच्छा नसतांना जिवनाचे रहाटगाडगं सुरु झालं होतं . आणि जसं समजेल तसं धक्का बसल्याप्रमाणे चौथे दिवसापासून लांबलांबचे पाहूणे येऊ लागले . त्याला वेळकाळाचं बंधनच नसायचे मग प्रत्येकाला पहिल्यापासून सगळा घटनाक्रम सांगायचा आणि ते सांगत असतांना राहून राहून आईला तितकेच दुःखाचे उमाळे यायचे .आई त्यातून बाहेरच येईना . काका थोडंस तरी बाहेर जायचे पण आई घरातच असायची कामे करायला आम्ही मुली होतो त्यामुळे तिच्या डोक्यातून तो विषय जातच नसे . ती संजूकडे पण फारसं पहायची नाही . सातआठ दिवसांनी दुपारीच काकांचे सोलापूरचे नारायण मामा व मामी भेटायला आले . ते खूप धोरणी होते व त्यांच्या बोलण्यात परखडपणा  होता . काका त्यांना फार मानायचे ते त्यादिवशी मुक्कामाला राहिले आणि दिवसभर भेटायला येणारे लोक व आईला होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिला रात्री जेवणं झाल्यानंतर आई-काकांंना समोर बसवून सध्या परिस्थिती काय आहे व दुःखावर मात करण्यासाठी आता काय केलं पाहिजे याविषयी जणू मौलिक सल्लाच दिला त्यांनी . ते आईला सुलभा व काकांना भाऊ म्हणायचे ते म्हणाले 


"  हे बघ सुलभा , झालंय हे खूपच वाईट झालंय , भाऊंनी व तू  कशातच कुचराई केली नाही . रेखासाठी तुम्ही जे जे केलंय ते मला पहिल्यापासून माहिती आहे . तिच्यासाठी जेजे करायचं होतं त्यापेक्षा काकणभर जास्तच केलंय जिवाचं रान केलंय पण यश आलं नाही . जे झालं ते  विधीलिखीत होतं , ती अल्पायुषी होती हे आता तुम्ही मान्य केलं पाहिजे . तसं तर तुमच्या स्वतःच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अजून भरपूर आहेत . फक्त एका मुलीचं सुरळीत लागलं आहे . दुसरी मुलगी काॕलेजला आहे तर तिसरी आता काॕलेजला घालावी लागेल , चौथी शाळेत जातेय आणि पाचवं तर बाळ आहे .  म्हणजे तुमच्या संसाराचा व्याप  बऱ्यापैकी मोठा आहे , मुख्य म्हणजे अनेक जबाबदाऱ्या अजून पार पाडायच्या आहेत . सुलभाची तब्बेत त्रास देते आहे . जे आहे हेच व्यवस्थित पार पाडणं तुम्हांला विशेषतः सुलभाला जरा जास्त कठीण होतंय . आता या परिस्थितीत रेखाचं जाणं म्हणजे तुमच्यासठी खूपच क्लेशदायक आहे हे मान्य आहे पण आता जर रेखाच्या मुली सुलभाच्या डोळ्यासमोर राहिल्या , त्यांची जबाबदारी जर तिच्यावर टाकली तर सगळच मोडून पडेल तुमचा व रेखाचा दोघांचे दोन वेगवेगळे संसार होते सगळं एकत्र केलं तर ती गल्लत होईल आणि तुम्ही ती गल्लत करु नका . रेखाच्या मुली मेडशींगीलाच राहू द्या त्यांना आवश्यक ती मदत करा . त्यांना मधूनमधून सगळे असतांना सुट्टीत इकडे आणा . मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या . आता भाऊंनी त्याची नोकरी पहावी व पुर्वीप्रमाणे शेतीत लक्ष घालावं व सुलभाने नेहमीप्रमाणे संसार पहावा रिकाम्या वेळात तिला रुचेल ते अध्यात्माचे वाचन करावे हे जेवढं लवकर सुरुवात कराल तेवढे लवकर या धक्क्यातून तुम्ही सावराल  ."


हे इतकं त्यांच्याकडून ऐकल्यावर मात्र आईला थोडंस हलकं वाटलं कारण मामांनी एकूणच जबाबदाऱ्यामध्ये सुटसुटीतपणा आणला होता कोणीतरी मोठ्या माणसांनी विशेष म्हणजे काकांचा ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी दिलेला सल्ला होता हा , काकांना तो पचनी पडत नव्हता त्यांचा आक्कीच्या मुलींमध्ये जीव गुंतला होता . पण त्यांना घेरडीत ठेवलं तर सांभाळणं पण अवघड होणार व आईला त्याचा खूप त्रास होईल हा विचार करत शेवटी काकांनी नारायण मामांचा सल्ला ऐकला . व मुली मेडशींगीला गेल्यात तर तिथेच रहातील असे ठरले . आता काकांनी आक्कीसाठी शेतीत पोल्ट्रीचा जो घाट घातला होता तो निस्तारणं भाग होतं . पंधरा दिवसांनी काका पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे गेले त्याला सगळा वृत्तांत सांगितला व त्याच्या मदतीने ते सगळं बाडबिस्तार  गुंडाळून टाकलं त्यात त्यांना मानसिक त्रास खूप झाला आणि आर्थिक बाबतीत तर कशाचाच हिशोब करायचा नाही असे काकांनी ठरवून टाकले . 


" लाख मोलाची पोरगी गेली तिच्यासाठी जे काही केलं ते तिचं होतं ते तिच्याबरोबर गेलं "


असे म्हणत दवाखाना व पोल्ट्री हे विषय चर्चेसाठी त्यांनी कायमचे बंद केले व दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली . तायडी व तिच्याबरोबर मायडी वाडीला गेल्या . पंधरा जानेवारी उजाडलं उजाडणारा प्रत्येक दिवस काहींना काही आठवणी घेऊन उजाडायचा . भेटायला येणारे अजून येतच होते मी अजून शाळेत जात नव्हते ही गोष्ट माझे क्लास टीचर पठाण सरांनी काकांना पेठेत बोलून दाखविली होती व घरी मुली पाठवून त्यांनी मला शाळेत बोलावून घेतलं व ते मला म्हणाले 


" आज पंधरा जानेवारी आहे सहामाही परिक्षेत वर्गात पहिली आलीयस व फर्स्टक्लास मिळाला होता आता 21 तारखेपासून पुर्वपरिक्षा आहे व दोन महिन्यांवर वार्षिक परिक्षा आलीय . तुझा अभ्सास वाढण्याऐवजी कमी झाला होता व या पंधरा दिवसांत तर काहीच झाला नाही . तू अभ्यासाला व  शाळेत यायला सुरुवात कर  ".


ही गोष्ट पण खरी होती दिवाळीपासून आक्कीचा दवाखाना सुरु झाला होता तेव्हापासून तिच्या मुलींना पहाणे व आईला मदत करणे यात माझा अभ्यास होत नव्हता . फक्त शाळेत जाऊन येत होते पण जादा तास व शिकवणीला जायला मला जमतच नव्हते घरी अभ्यास तर अजिबात होत नसे .

त्यादिवशी आई-काकांंच्या पण लक्षात आले की माझं दहावीचं महत्त्वाचे वर्ष आहे आणि माझा  अभ्यास होत नाही . त्यांनी मला सांगितले 


" तुझं तू शाळा शिकवणी सुरु कर समोर माडीवर अभ्यासाला जाऊन बसत जा . घरी येणाराकडे लक्ष देऊ नकोस ."


पण तसं होत नसे , मी माझ्या रुटीनला  सुरुवात केली पण कोणीही भेटायला घरी आलं की रडारड व्हायची पुन्हा गप्पांचा आवाज यायचा आठवणी निघायच्या  मग माझं पण अभ्यासांत लक्ष लागत नसे .

आमच्या वाड्याशेजारी डोंगरे वाडा होता . तिथे नेहमी भजन , पोथीवाचनाचे कार्यक्रम व्हायचे वयस्कर दांपत्य होतं पण त्यांना सारा गाव दादा वहिनी म्हणायचा . एक दिवस डोंगरे दादा आईसाठी 


" एकनाथी भागवत , ज्ञानेश्वरी , तुकारामाची गाथा , दासबोध " 


ह्या सगळ्या पुस्तकांचे बाड घेऊन आले . आई-काकांंना भेटणं , बोलणं हा त्यांचा उद्देश होता . त्यांनीपण बऱ्यापैकी संबोधन केले व आईला  पाहिजे तो ग्रंथ/ पुस्तक ठेवून घ्या व वाचा असे सांगितले . मग आईने पण त्यात मन रमवायला सुरुवात केली . तिने दुपारच्या वेळी वाचन सुरु केले मग वाड्यातून पण मावशी , प्रभा काकू , मोठ्या काकू व ताई आत्या ऐकायला येऊन बसू लागल्या त्यांची पोथीवाचनानंतर खूप चर्चा व्हायची . सगळ्यांनी मिळून आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठीचा हा प्रयत्न होता . खेडेगाव होते तरी एकोपा खूप होता एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा तो जमाना होता .

प्रत्येक शनिवारी गोंदा मामा पण यायचा मग तेवढाच बदल बरा वाटायचा . सण आला की आई-काका दुःखी व्हायचे पण काळ हेच त्याच्यावरचं औषध होतं . मार्चच्या पहिल्या आठवड्यात मायडीची बारावीची परिक्षा संपली व ती घेरडीत आली व माझी दहावीची परिक्षा सुरु झाली सगळ्यांच्या परिक्षा संपल्या . मग  मे महिन्यात तायडी घेरडीला आली मग आक्कीच्या मुलींना आणायचं ठरलं पण गायत्री खूपच लहान होती आता तिला तिच्या काका-काकूची सवय लागली असणार थोडी कळती झाल्यावर आणू असे म्हणून अंजूला एकटीलाच घेरडीला आणायचं ठरलं नेहमीप्रमाणे मला मेडशींगीला पाठवायचं ठरलं  यावेळी मात्र मी रडतरडत काकांना सांगून टाकल


" मी आता कधीही मेडशींगीला जाणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणालाही पाठवा ".


मग या कामासाठी लहानग्या ज्योतीला तयार केलं . वायाने अंजू , मंजू ज्योतीला मैत्रिणीसारख्या वाटायच्या खेळायला मिळेल असे वाटून ती पण जायला तयार झाली मग लहान आहे म्हणून  तिला सोबत म्हणून बबलूला पाठवून अंजूला आणलं तिला पाहिलं की पुन्हा आठवणींचे कढ निघाले , ती भळभळती जखमच होती .

सुट्टी संपेपर्यंत सगळे घेरडीतच होते . पुन्हा अंजू जातांना दप्तर गणवेश बरोबर देऊन ज्योती पोहोच करुन आली . आता रिझल्टनंतर मला पण शिक्षणासाठी बाहेर पडावं लागणार होतं . मग आता राणीचं लग्नाचं पहावं लागेल तसेच सांगोल्यात जर ती राहिली तर  शनिवारी घेरडीत घरी येऊन रविवारी परत जाईल तेवढाच आईला आधार होईल मग जवळच असलेली बरी म्हणत  मायडीला सांगोल्यात आत्याकडे व मला किर्लोस्करवाडीला तायडीकडे शिकायला ठेवायचं ठरलं . जून महिना आला तसे रिझल्टचे वेध लागले आधी मायडीचा लागला नंतर माझा  होता . आमची बॕच जरा रद्दड होती त्यामुळे वर्गात सुधीर व मी आम्हांलाच बरे मार्क्स असायचे . पण सहामाहीनंतर माझा अभ्यास झालाच नव्हता त्याचा परिणाम रिझल्टवर झाला होता . फक्त 56% मार्क्स मिळवून मी वर्गात पहिली आले होते . मला पहिल्या नंबरची अजूनही लाज वाटते कारण आमच्या शाळेत आॕफिसमधल्या बोर्डवर दहावीत पहिला नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव व मार्क्स लिहीले जायचे व त्या बोर्डवर एवढे कमी मार्क्स मलाच होते . मोहन आण्णाला शिक्षणाच्या बाबतीत फार रस असायचा मार्क्स कितीही आसू देत पण पहिला नंबर आला आहे तर शरुचं कौतुक  झालंच पाहिजे म्हणत मोहन आण्णांनी स्वतः पेढे आणून सगळीकडे वाटले होते .

जूनमध्ये ठरल्याप्रमाणे मी किर्लोस्करवाडीला शिकायला गेले . सुरुवातीला दोन महिने मला अजिबात करमत नसे रडायला यायचं . आई-काका , ज्योती , संजू यांची आठवण यायची हे पाहून तायडीने मला काही दिवस समजावण्याचा प्रयत्न केला पण मी रडायचीच मग मात्र तिने मला खडसावूनच सांगितले 


" तुला नेमकं काय पाहिजे ते तू एकदा शांतपणे ठरव . इथे राहिलीस तर शिकशील घेरडीत रहायचं असेल तर शिक्षण सोडावं लागेल काय करायचं ते ठरव . आठवण तर येणारच पण आठवण आली की पत्र लिहावं मग बरं वाटेल तुला . बघ काय ते तूच सांग त्याप्रमाणे आपण करुयात . " 


तिचा डोस चांगलाच लागू पडला  मी पण विचार केला रडण्यात काही अर्थ नाही म्हणत स्वतःला सावरलं व आठवड्यातून एकदा आई-काकांंना पत्र लिहायचे ठरवले . पुन्हा पुन्हा मैत्रिणी झाल्या मग मी रमले . 

इकडे घेरडीला गोंदा मामा नेहमी यायचा सण झालेला असला की आईची मनःस्थिती फारशी चांंगली नसायची . मग मामांने  दसऱ्यातच काकांना एक प्लॕन सांगितला तो म्हणाला 


" भाऊजी , यावर्षी तुम्ही दिवाळीचं काहीच करु नका सगळेजण माझ्याकडे मुचंडीला या , आपण दिवाळी झाली की दुसरे दिवशी ट्रीपला जाऊ ."


 मग काकांनी पण विचार केला रडारडीपेक्षा हे ठीक राहिल आणि मग आमचं ट्रीपला जायचं ठरले त्याप्रमाणे आम्ही मुचंडीला गेलो . दिवाळी झाली व दुसरेच दिवशी मामा , मामी , त्याची दोन मुलं ,एक मुलगी तर आम्ही चौघी बहिणी आणि आई-काका असे आकराजण मिळून विजापूर , बदामी , शिर्डी , नाशिक , त्र्यंबकेश्वर , तुळजापूर सोलापूर असे आठवडाभर फिरुन आलो तेवढाच बदल झाला त्यामुळे आई जराशी समाधानी वाटली . आता संजू दीड वर्षाची झाली होती ती दिसायला एकदम गुटगुटीत , गोरीपान छान दिसायची त्यामानाने तिची प्रगती झाली नव्हती , तिचं चालणं बोलणं ज्या गतीने व्हायला हवं होतं तसे नाॕर्मल मुलांच्या गतीने होत नाही हे आई-काकांंच्या लक्षात आले होते . आईच्या डायबेटीसमध्ये झालेलं बाळ आहे असे आईला वाटायचे . मग आईपेक्षा काकाच संजूकडे जास्त लक्ष देऊ लागले . 

बघता बघता आक्कीला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं होतं एकही दिवस तिच्या आठवणीवीना जात नसे . आख्खं वर्ष दुःखात गेलं होतं पण आपापले उद्योग सुरु झाले होते . आई नेहमी म्हणायची . 


" जो जातो तो चार घासाला मुकतो जगरहाटी सुरुच रहाते . "


 सुरुवातीला काही दिवस फक्त अंजूला आणलं जायचं पण पुढेपुढी गायत्री पण तिच्याबरोबर येत असे . उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मंजू मेधा माझ्याबरोबर घेरडीला यायच्या नंतर तायडी यायची मग ज्योती जाऊन अंजू गायुला घेऊन यायची आलेल्या  दिवशी रडारडी व्हायची हे असे पुढे अनेक दिवस चालत राहिले पुढेपुढे त्या दोघींना बसवून दिलं की येणे जाणे व्हायचे . पण सध्या तरी 1982 साल हे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आमच्या घरातील प्रत्येकासाठी वाईट आठवणीसाठी स्मरणात राहिलं . पुढे कित्येक वर्षे सारे जग नविन वर्षीचे स्वागत उत्साहाने करत असतांना आम्ही मात्र खट्टू असायचो . काळाच्या ओघात दुःखाची तिव्रता फक्त कमी झाली पण कटू आठवणी कुठेतरी खोलवर काळजात रुतलेल्या आजही जाणवतात .

1983 साल पण काही फारसा बदल झाला नाहीच . आहे ते रुटीन फक्त सुरु होते . बघता बघता आक्कीला जाऊन दोन वर्षे झाली . 84 साल उजाल्यावर मात्र थोडेफार विचार करायला सुरुवात केली  . आता काकांना मायडीचा विषय डोक्यात घोळू लागला होता तसं तिचे आजून दीड वर्ष राहिले होते मग आईनेच सांगितले 

"तिच शिक्षण पुर्ण होईपर्यंत घाई करु नका "

पण काकांच म्हणणं होतं पहात पहात एखादं वर्ष जातं . काहीका असेना पण वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं होतं त्यामुळे वातावरणातील ताण काहीसा कमी झाला होता . त्यातच तायडीला दिवस गेल्याचे समजले होते . मग वातावरण पुर्ण बदलून गेलं . आता नविन मेंबरची वाट सर्वजण पहात होते !!!






Wednesday, October 7, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 7

 लाॕकडाऊन यायरी प्रकरण 7

क्रमशः भाग 31 ते शेवट



क्रमशः भाग  31



        आली दिवाळी !!!

       आशिष-किर्तीच लग्न  झाल्यापासून  सगळे छोटेमोठे सण झाले आणि आता सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली . त्यांची पहिली दिवाळी ! उत्साहाला अगदी भरतं आलं आहे . मुख्य म्हणजे सुट्ट्या-रजा मॕनेज करुन चांगली आठदहा दिवसांची मोठी सुट्टी मिळणार आणि खमंग-गोड-खुसखुशीत अशी फराळाची मेजवानी मिळणार , विशेष म्हणजे अनेक वर्षांनी दिवाळीपुर्वीच घरी असल्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक ताज्याताज्या गरमगरम पदार्थाची लज्जत चाखायला मिळणार याचा आनंद वेगळाच . लक्ष्मीपूजन बार्शीला तर पाडवा मिरजेत ठरल्यामुळे दोन्हीही घरात उत्साहाला उधाण आलेलं आहे . 

         तसं तर बार्शीत आधी नविन मजला बांधला म्हणून , मग गेल्या वर्षी लग्न ठरलं म्हणून तर यावर्षी  नविन लग्न झालं म्हणत वरचा मजला लाईटींगनी उजळून निघाला . दोन्ही मजल्यावर लाईटचे व पोर्चमध्ये छोटे छोटे आकाशकंदिल लाऊन कालच बील्डींग सजून तयार झाली . त्यामुळे आठ दिवस आधीच घरात धामधूम सुरु झाली होती . 

         मग मी पण अगदी वसुबारसपासून घरीच आहे . तसं सगळे शास्त्र मी नेहमी करतेच पण आज मी पण थोडंस एन्जाॕय करायचं ठरवलं . कीर्तीची पण सुट्टी सुरु झालीय हल्ली तिला पण साड्या नेसण्याचा नाद लागलाय म्हणून तिला मग आज वासुबारसला  इरकल साडी , मॕचींग ब्लाऊज , ठुशी , काकींची एकदाणी , मोठी नथ , मोठ मंगळसुत्र , कानातली फुलं , चंद्रकोर असा सगळा जामानिमा दिला . ती पण हौसेने तयार झाली मग मी पण इरकलचाच गेटअप करुन तयार झाले .  समोर ग्राउंडवर गायी येतात , त्यांना गोग्रास खायची सवय आहे त्यामुळे त्यांनी छान पूजा करुन घेतली . रात्रीच्या जेवणात मेथी परोठ्याबरोबर ताज्या ताज्या खारी बुंदीच्या रायत्यांन लज्जत वाढविली . 

      आज धनत्रयोदशी ! यावर्षी काॕलनीत घरोघरी लाइटींग पणत्या दिसत आहेत . बरेचजण कोरोनामुळे बार्शीतच आहेत . थंडी चांगलीच वाढलीय मग तिन्हीसांजेला तयार होऊन सोनं , चांदी , पैसे याची धने गुळ ठेऊन पूजा केली . बरचसं लगेचच खाण्यास सुरुवात करता येणारं फराळाचं तयार झालेय . तर उद्या पहाटेच्या पूजेला नैवेद्यासाठी थोडेसे रवा लाडू करुन ठेवले .हे कसं लागतंय ते कसं झालंय म्हणत टेस्ट बघत बघत खाणं झालं मग तशी फारशी भूक कोणालाच नव्हती मग गरम गरम मूग डाळीची खिचडी केली . लवकर आवरुन झोपलो कारण उद्या  पहाटे उठायचं होतं . 

         यावर्षी दिवाळीत जाम थंडी आहे त्यामुळे गुडुप झोपायला  मजा येतेय . पण लवकरच उठून पहाटे आंघोळी झाल्या . यावर्षी  मंदिर बंद असल्यामुळे आमच्या

 " श्री स्वामी समर्थ क्लासेसचा "

पहाटगाण्याचा  नेहमीचा कार्यक्रम होऊ शकला नाही ही गोष्ट चुकल्यासारखी वाटतेय .

पण दारात रंगीत रांगोळी , देवपूजा , फुलं असं प्रसन्न वातावरण आहे . पुर्वीप्रमाणे आजकालची मुलं दिवाळीचा फराळ नाही करत काहीतरी गरम हवं असतं . जेवणात आज गुलाबजामुन होते . आजच  संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे मग लग्नाच्या श्रीमंतपूजनाच्या तयारीसारखी दुपारपासूनच आकांक्षा-कीर्ती-आशिषची आवराआवरीची लगाबग चालू आहे . फोटोसाठी सगळी धडपड !  नैवेद्यासाठी करंज्या व अनारसे तळून झालेत . पूजेची तयारी केली आम्ही पण  आवरुन  घेतलं मग नविन जोडीकडून आजची पूजा झाली . नेहमीप्रमाणे भरपूर पणत्यांनी घर उजळून निघालं . छान फोटो सेशन झालं . रात्री पुन्हा अनारसे तळले गरम गरम अनारसे खाण्याचा आमच्याकडे हा प्रोग्राम असतो . ताजा भात केला जेवणे झाली .

     उद्याचा दिवस भाकड आहे परवा पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आहे मग उद्या आशिष-किर्ती व आम्ही दोघं मिरजेला जाणार आहोत . इकडे आकांक्षाला सुट्टी नाही तर तिकडे केतकीला सुट्टी नाही . लग्नानंतर कोणाच्या भेटी होऊ शकल्या नाही म्हणत उद्याचा प्लॕन ठरला .  आम्ही बार्शीत सातजण राहातोय   सगळ्यांची कामं चालू आहेत त्यामुळे वेळ कसा जातो समजत नाही पण कीर्तीचे आई-बाबा दोघेजणच असतात  त्यामुळे ते खूपच कंटाळून गेलेत . त्यामुळे दिवाळसणानिमित्त गेटटुगेदर !!

      पुर्वी बरीच वर्षे दिवाळीत आम्ही परांड्यात असायचो तसं तर दिवाळीत भरपूर फटाके आणायचे व लक्ष्मीपूजनाला फटाक्याची मोठ्ठी माळ फोडायची हे काम नेहमीच सुनील भाऊजींच होतं . पण हल्ली प्रदुषण नको म्हणत मुलांचा फटाक्यांना विरोध असायचा आणि आता तर भाऊजीपण गेले आणि ती प्रथा खंडीत झाली . पण काही माणसं आपल्या इतकी जवळची असतात मग प्रसंगानुरुप त्यांच्या आठवणींचे उमाळे आल्याशिवाय रहात नाहीत . पण अकाली गेल्यामुळे भाऊजींची आठवण नेहमीच मनाला रुखरुख लावणारी चटका लावणारी असते .

       आमची घेरडीतली दिवाळी पण  भन्नाट असायची . घेरडीत सण किंवा कार्यक्रम असला की वाडा म्हणजे एक मोठ्ठ कुटुंब वाटायचं .

ब-याचशा कोरड्या कामासाठी आई निलाबाईला हाताशी घ्यायची . आठवडाभर आधीच साखर दळणे , चकलीची भाजणी दळणे , खोबरं खीसणे , करंजीचं सारण अशी कोरडी तयारी करुन ठेवली जायची आणि फराळाला सुरुवात करंज्यानी व्हायची मग किचकट काम म्हणत त्या कामात आम्ही मुली वाड्यात एकमेकींच्या घरी मदतीला जायचो . वसुबारसेपासूनच वाड्यात प्रत्येकाच्या आंगणात  पहाटे शेणाचा सडा टाकून शेणाच्या गवळणी , पेद्या , बळीराणा करायचं  काम आमच्या भागाबाई करायच्या . आम्ही थंडीत कुडकुडत त्यांच्याजवळ बसून बघायचो मग रोज गवळणीच्या डोक्यावरच्या खळग्यात दूध घालायचं कडेनी रांगोळीची कमान काढायची . आंगणात ठिपक्यांची मोठी रांगोळी काढायची . रंगीबेरंगी रांगोळीन भरायची .  उषा वहिनी , शांता वहिनी , पीलू वहिनी त्यांच्या मुली आणि आम्ही सख्ख्या-चुलत बहिणी सगळ्यांनी एकमेकींच्या रांगोळ्या पहायच्या . स्पर्धा , चढाओढ लागायाची . शेवटच्या दिवशी वैरण बांधायची दूध उतू घालवायचं . असा स्पेशल कार्यक्रम असायचा . 

     आमचे काका अगदी कमी प्रमाणात फटाके आणायचे .  टिकल्या ,  कावळे , लवंगी फटाकड्या , एखादं लक्ष्मी तोट्याचं पाकीट ,  फुलबाज्या  , झाडं  , भुईचक्र असे सगळे प्रकार पण कमी प्रमाणात  आणायचे त्यातलं आधीच थोडंथोडं तुळशीच्या लग्नासाठी काढून कपाटावर ठेवलं जायचं आणि राहिलेले फटाके आम्हांला वाटून द्यायचे मग आम्ही पण पुरवून पुरवून त्या उडवायचो . लक्ष्मीपूजन झालं की वाड्यात  एकमेकांच्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असायचा . घेरडीत बारा बालुतेदारांची घरी येण्याची प्रथा होती . त्यामुळे उद्या पाडवा म्हणलं की रात्रीच आई फराळाचं , ब्लाऊज पीस , पैसे काढून ठेवायची . कारण पहाटेपासूनच बायका ओवाळायाला यायच्या . पहिला नंबर लावायची ती म्हणजे रोज वाडा झाडणारी शिवा . यादिवशी तिचा ढंग न्याराच आसायचा . उजाडायच्या आधी लवकरच  साडेपाचला ती कुंकू , अक्षदा , सुपारी आणि कणकीचे दोन दिवे असलेलं ताट घेऊन इरकलचं लुगडं नेसून डोक्यावर पदर , नाकात नथ , ठसठशीत कुंकू लाऊन हसतमुखाने

  " काका " म्हणत हजर व्हायची . मग काका टोपी घालून यायचे त्यांच्या मागोमाग आम्हीपण जाऊन तिच्यासमोर तोंड करायचो मग ती म्हणायची


" दिन दिन दिवाळी 

    गायी म्हशी ववाळी........

    इडा पीडा टळो 

    आन धन्याचं घर

    सुखासमाधानाने भरो "


असं म्हणत हसत हसत ओवाळायची मग आई तिचा मान तिला द्यायची . मग ठकू परटीण तिची मुलगी कमलला बरोबर घेऊन यायची तर कोळ्याची भामा यायची अशा एकएक बायका येतच रहायच्या . मग उजाडल्यावर गोंधळी , बहुरुपी , नंदीबैल , आस्वलवाला फेरीवाले थोडाथोडा वेळ आपापली कला सादर करायचे . मुकी , म्हसा , धोंडीआप्पा , म्हातारी असे सगळे लोक येऊन जायचे . फराळाचे डबे खालीच ठेवलेले असायचे आई ताट तयार करुन द्यायची मग आम्ही  फराळाचं ताट त्यांना द्यायचो तर काका पैसे  द्यायचे . दारात येणारांन खुशीत गेलं पाहिजे असे आई-काका म्हणायचे . यातले मजा वाटणारे दोन कार्यक्रम असायचे एक म्हणजे 

" बहुरुपी "

तो अगदी पोलिसासारखा खाकी ड्रेस , खाकी टोपी , पायत बूट हातात काठी घेऊन थाटात यायचा व आलं की त्याच यमक जुळवून केलेलं गाणं सुरु करायचा 


"चला काकू चला तुम्ही लग्नाला चला , 

पोर बांधा खांबाला न

 कुत्री घ्या काकला 

एकीचा शेंबूड तिघीजणी पूसा 

चला चला चला काकू जेवायला बसा  

पंक्चर झालंय बैलगाडीचं चाक

गंगूबाई पीत बसल्यात घरात ताक "


अशा प्रकारे विबांडनात्मक मोठीच्या मोठी रचना म्हणायचे . हसून हसून पुरेवाट व्हायची . आजकाल ही कला पण नष्ट होत चालली आहे . 

      सगळ्यात मजा यायची ती म्हणजे अस्वलाचा खेळ !

घराच्या आसपास दरवेशी आला की आस्वलाच्या मोठमोठ्या आवाजात गुरगुरण्याचा आवाज यायचा . आम्ही कान लावून बसलेलोच असायचो . पंधरावीस पोरांचा घोळका त्याच्यामागे असायचा . पतकी गुरुजींच्या वाड्यापासून आम्ही त्याच्या मागे आसायचो . आपल्या दारात केव्हा येणार ही उत्सुकता असायची . प्रत्येक घरासमोर आलं की त्याचा खेळ सुरु व्हायचा . शिकवलेलं असल्यामुळे दरवेशी जसंजसं बोलेल तसंतसं  अस्वल नक्कल करायचं . सासुबाईंनी रागे भरल्यावर रुसलेल्या सुनेची नक्कल ते फार मस्त करायचं 

" सुनबाई रुसली कोपऱ्यात जाऊन बसली "

असं म्हणलं की ते लांब मागे जाऊन खाली मान घालून बसायच . मग सासू , सासरा ,  नणंद , दीर , जाऊ प्रत्येकाचं नाव घेऊन समजवायला आले म्हणलं तरी जागचं हलायचं नाही . जास्तच रुसली गुलबी म्हणल की आहे तिथंच झोपायचं  कोणाच्याही समजावण्याला ते भीक घालायचं नाही सर्वात शेवटी दरवेशी ओरडायचा

 " मंबईहून गुलबीचे मालक आलेत . येताना गुलबीला साडी आणलीय , गाळ्यात घालायला चंद्रहार आणलाय .आता गुलबी उठली आहे आणि लगबगीनं 

नव-याला बसायला पाट , दिवळीच्या फरळीच ताट , आणि पाण्याचा तांब्या घिऊन आता गुलबी कशी निघाली "

असं म्हणलं की ते अंग झटकून उभ रहायचं मग आम्ही ओरडत लांब पळायचो . मग दरवेशी पुन्हा तालात म्हणायचा 

" आता आमची गुलाबी साडी नेसून नाचणार कशी 

गुलबी गुलबी गुलबी गुलबी "

असं ओरडला की अस्वल जागच्या जागी नाचायला लागायचं . आम्ही पण तालात टाळ्या वाजवायचो . मग त्याचे दोनचार केस ओढून तो काढायचा . ते घेण्यासाठी सगळ्यांची धडपड असायची का तर ते वहीत ठेवलं तर पेपर सोपा जातो असं म्हणायचे . मग त्याच्यामागे वाडाभर आम्ही फिरायचो . वाड्याबाहेर अगदी ताई आत्या , डोंगरे वाड्यातून बाहेर पडेपर्यंत मागेमागे जायचं . कधीकधी किती फिरायचं म्हणून आईचा ओरडा सुद्धा बसायचा पण आम्ही जायचोच .

      दिवाळीत वाड्यात कोणाच्या न कोणाच्या तरी घरात नविन लग्न झालेलं असायचं आणि  जावई आलेला असायचा मग त्याच्या दिवाळसणाचा सोहळा व्हायचा . संध्याकाळी मग प्रत्येक  घरात मामा लोकांच आगमन व्हायचं . आमच्याकडे गोंदा मामा व गंगाधर मामा न चुकता हजर असायचे . गोंदा मामा एक अविस्मरणीय प्रकरण आहे . तो पण मजा मजा करायचा ओवाळणीच्या बदल्यात आम्ही दमेपर्यँत  मनसोक्त तेल लाऊन चोळायला लावायचा . तिकडे  काकूंकडे म्हाळू मामा व उषा वहिनींचे चार भाऊ यायचे . आमच्या वाड्यात  पाहूण्यांना एकमेकांकडे फराळाला बोलवायची प्रथा होती . आलेल्या  पाहूण्यांची मात्र सगळ्यांकडे फराळाला जाऊन खाता खाता फजिती व्हायची . पुन्हा घरात जेवणाचा बेत असायचाच . भाऊजी लोक , मामा , मोहन आण्णा हे रात्री बेट लाऊन  ऊशीरपर्यंत पत्ते खेळायचे व रात्री उशीरा हारणारांकडून  हाॕटेलमध्ये चहा प्यायला जायचे कधीकधी भजी फीस्ट व्हायची . अशी आठवडाभर मजा चालायची . दिवाळी तीच आहे पण साजरी करण्याचे पॕटर्न बदलले आहेत . पण प्रसंगानूरुप भूतकाळात रमायला होतं हे नक्की !!



क्रमशः भाग  32



      उद्या पाडवा आशीष-कीर्तीची पहिली दिवाळी म्हणून आज सकाळी लवकरच मिरजेला निघायचं ठरलं . कीर्तीचा आनंद ओसंडून वहात होता . आम्ही एकदीड पर्यंत मिरजेत पोहोचणार होतो . कोरोनामुळे बाहेर कुठेही जाता येणार नव्हते मग विचार केला एक रात्र  किर्लोस्करवाडीला जाऊन येऊ कारण तायडी कुठेच जाणार नव्हती आणि वाडीला पण कोणी येणार नव्हते . तेवढाच तिला बदल होईल आपल्या भेटी होतील म्हणून बार्शीतून निघण्यापुर्वी तिला फोन करुन मिरजमध्ये जेवण करुन संध्याकाळपर्यंत पोहोचण्याचं पक्क केलं व लवकरच निघालो . कुठेही न थांबता जवळचा चहा घेत आम्ही दीड वाजता घरी पोहोचलो . विहिणबाई तशा खंबीर आहेत पण कोरोनाची दहशत त्यात त्यांना झालेला चिकन गुनिया , केतकीचं आजारपण त्यामुळे त्या थोड्या हळव्या झाल्यासारख्या झाल्यात मग कीर्तीला पाहून त्या खूपच भावनावश झाल्या . केतकीला पण दिवाळीला येता आलं नाही मग

" दोन्हीही मुली लक्ष्मुपूजनाला नाहीत असं पहिल्यांदा झालंय " 

असं म्हणत त्या मोकळ्या झाल्या . थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच विशेषतः दोघेदोघे रहाणारांची हीच परिस्थिती आहे . एकटेपणा नकोसा झालाय आणि भेट झाली तरी भावनावश व्हायला होतंय . पण नंतर मात्र सुरळीत होतं दाटून आलेले मेघ बरसून निरभ्र झालेल्या आकाशाप्रमाणे ! थोड्या गप्पा झाल्यावर आराम करुन आम्ही मुक्कामाला वाडीला गेलो . तायडीकडे  चहापाणी झालं की तायडीच्या दोन्ही मुली-जावई , सून -मुलगा नातवंडं असा काॕन्फरन्स काॕल झाला . सगळेच आश्चर्यचकित झाले पण सगळ्यांना खूप बरं वाटलं की कोणीतरी वाडीत आलंय मग सगळ्यांनी एकच कल्ला केला . तायडी मनिषच्या लग्नानंतर वाडीला गेली आणि फक्त अधिक महिन्यात मंजूची भेट झाली मग कोणाचच कुठेच जाणंयेणं नाही . मग या कोरोनामुळे फीट रहाणं म्हणा कींवा वेळ जाणं म्हणा यासाठी तिने स्वतःला खूपच बीझी ठेवलंय . अगदी साधा फोन वापरणारी तायडी आधी व्हाट्सअॕप आणि आता युट्युबवर खूपच अॕक्टीव्ह  झालीय . अनेक प्रकारचे व्यायाम , रेसिपीज , स्तोत्रं सगळे डाऊनलोड करायचं व त्याप्रमाणे शिकायचा व करायचा तिला नाद लागलाय . ती हल्ली सहजपणे स्मार्ट फोन वापरते त्यामुळे आम्ही तिला स्मार्ट तायडी म्हणतो . वयाने 61 वर्षांची असलेली तायडी मनाने मात्र 16 वर्षांची आहे . रात्री , पहाटे यांच्या , माझ्या खूप सा-या गप्पा झाल्या मग पाडव्याचं सकाळी छान तयार होऊन छानसं फोटोसेशन झालं आणि फोटो फँमिली ग्रुपवर टाकले मग त्यावर मेसेजेसना उधाण आलं .मग आम्ही मिरजेला निघालो .

       इकडे पहिली दिवाळी !!

        घरी आलो तर दुपारच्या जेवणाची साग्रसंगीत तयारी झाली होती . लेक-जावई असल्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खुशीत होते . थाटात जेवणं झाली . त्यांना पण वातावरणात बदल झाला . थोडासा आराम झाला की पुन्हा आशीष-कीर्तीची आवरा आवरीची लगबग सुरु झाली . सध्या  WFH मुळे बाहेरचे कपडे घातलेच जात नाहीत . कीर्तीने अगदी हौसेनं साखरपुड्याला शिवलेला लेहंगा पुन्हा घालायचा तिला चान्सच मिळाला नव्हता मग तो घालायचा ठरवून छानपैकी आवरुन थाटामाटात पाडव्याचं सेलिब्रेशन झालं आणि मग सगळेच खास फोटोसेशनसाठी गच्चीत गेलो . पाठीमागे जणू आपल्यासाठीच फटाके उडत होते मग त्याची रंगीबेरंगी कारंजे फोटोत पकडत पणत्यांच्या उजेडात आशिषने खूप  मस्त फोटो काढले . सगळ्यांना त्याचं खूप कौतुक होतं सगळे खूष !!  मग कीर्तीचे लहानपणीचे व सगळेच जुने फोटो पहात गप्पा , रात्रीची जेवणं झाली . सकाळी आम्ही बार्शीला निघालो आशीष-कीर्ती मिरजेत राहिले . आम्ही बार्शीत पोहोचतो तोवर ज्योती वाडीत हजर ! तिने पण कोणाच्या गाठीभेटी नाही म्हणत  दोन दिवसांचा दौरा काढला होता . आधी वाडी मग कराड सातारा करुन ती पुण्यात जाईल . तायडीला ज्योती बहिणीपेक्षा जास्त मुलगीच वाटते . ज्योतीच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला एकत्र जमू शकत नव्हतो त्याची तायडीला खूपच चुटपूट लागली होती . पण ई-सेलीब्रेशनमुळे ती खूष झाली होती . त्यानंतर त्या दोघी पहिल्यांदा भेटल्या मग तायडीने रांगोळी वगैरे घालून पुन्हा एकदा धमाल केली त्यांच्या गप्पा झाल्या . एकूणच फोटो ,  स्टेटसवरुन सगळी कल्पना येत होती . मोबाईलमुळे कितीही जवळ आलो असलो तरी प्रत्यक्ष भेटीतील ओलावा , माया , प्रेम याला तोड नसते हेही तितकच खरं .

      अशाप्रकारे अगदी पाडवा ते दिवाळीपर्यंत सगळे सण आणि वाढदिवस या कोरोनाच्या काळात बार्शीत  झाले . आता आमच्या घरातील मुख्य माणूस की जे लहानपणापासून कायम वाढदिवसाची वाट पहातं ते म्हणजे आकांक्षा ! लहानपणापासून तिला वाढदिवसाचं खूपच आकर्षण  आहे आणि पण आमच्याकडे पद्धत नाही म्हणत हा कार्यक्रम नेहमीच स्कीप झालाय . त्याचा तिला राग येतो पण काय करणार . पण ती काॕलेजला गेल्यापासून तिच्या मैत्रिणी मात्र साजरा करतात . ती सध्या सीडॕकमध्ये खूप बीझी आहे आजकाल तिची माझी भेट सुद्धा फक्त रात्री जेवतांना होते . आता पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आणि पाठोपाठ तुळशीचं लग्न आहे . त्यापुर्वीच  आशीष-कीर्ती बार्शीला येतील .  तुळशीच लग्न म्हणजे छोटी दिवाळीच !

        माझ्या लग्नानंतर आम्ही दिवाळीला नेहमीच परांड्यात असायचो त्यामुळे बहुतेकवेळा तुळशीच्या लग्नाला मी घेरडीत असायचे . कोणतीही एखादी बहिण दिवाळीत घेरडीत असायची . तुळशीच्या लग्नासाठी आईनं करंजीचं सारण काढून ठेवलेलं असायचं मग आई त्याच्या ताज्या करंज्या ,  रव्याचे लाडू करायची दिवाळीतच आईने थोड्या चकल्या बाजूला काढून ठेवलेल्या असायच्या . मग ती छोटी दिवाळी साजरी व्हायची . घेरडीत ब-याचवेळा यांनी तुळशीचं लग्न लावलेलं आहे . दस-याप्रमाणे तुळशीच्या लग्नाचा सोहळाच असायचा घेरडीत ! आम्ही लहान होतो तेव्हा दोन दिवस आधीच आम्ही तयारीला लागायचो . तेलाचे चौकोनी डबे किंवा पत्र्याच्या बादलीत तुळस असायची . चुन्यात थोडंस पाणी घालून कुंच्यानी त्या बादलीला चुना लाऊन ठेवायचा मग ते खडखडीत वाळलं की दुसरे दिवशी काव पाण्यात कालवून काडेपेटीतील काडीला कापूस गुंडाळून बादलीवर 

" II श्री. राधा - दामोदर प्रसन्न II "

        "II तुलसीविवाह II"

असं लिहायचं मग स्वस्तीक काढायचं आणि वाळवत ठेवायचं  जातायेता न्याहाळून पहायचं . वाड्यात सगळ्यात छान अक्षर  कोणाच आलं या चर्चांना उधाण यायचं . लग्नादिवशी सकाळी धोंडीआप्पा बेल झेंडू , चाफा , फुटाण्यांच्या फुलाबरोबर चींचा , बोरं , आवळा द्यायचे .  पूजा करतांनाच आई काकांना  म्हणायची 

" बाळकृष्ण आणि घंटा काढून ठेवा संध्याकाळी तुळशीच्या लग्नाला  लागेल " .

आम्ही मुली दुपारीच पॕरणच्या दुकानात जाऊन छोट्या हिरव्या बांगड्या आणायचो मग चुरमुरे आणि सुई-दोरा  घेऊन बसायचो एकसारखे चुरमुरे दो-यात ओवून त्याच्या मुंडावळ्या करायचो . त्या करताना भारी मजा यायची चुरमुरे मोजत मध्ये दो-या बांधून बरोबर उंचीच्या मुंडावळ्या तयार झाल्या की जग जिंकल्याचा आनंद होई . अंतरपाट म्हणून पांढराशुभ्र बागाईतदार रुमालाची घडी ( गमशा) पूजेच्या ताटात ठेवली जायची . काका दोन ऊस आणायचे ते बरोबर तुलशीवर मंडप केल्यासारखे बांधायचे तुळशीसमोर शेणानं सारवायचं मोठी रांगोळी त्याला कमान काढून तयार ठेवायचो आणि मग एकमेकांच्या रांगोळीची तुलना करत वाडाभर फिरायचो . आई पूजेचं ताट तयार करुन ठेवायची त्यात हळदकुंकू , बांगड्या , गळसरी , फुलं , चिंच , बोरं , आवळा , चुरमुरे ,कांड्या-बत्तासे , लाडू-करंजी,  बाळकृष्ण , घंटा , जाडजूड चांदीचं फुलपात्र , पळी , समई , फुलवात , उदबत्ती असं सगळं व्यवस्थित मांडून ठेवायची . वाड्यात सगळ्यांची तिन्हीसांजेला तयारी व्हायची मग सगळेजण अगदी नविन कपडे घालून नटूनथटून तयार व्हायचे . आम्ही दिवाळीतले काढून ठेवलेले  फटाके , संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक सोप्यात आणून ठेवायचो . सगळी मुलं बायका तयार झाल्या की पुरुष मंडळी जमायचे . वाड्यात आमच्या घरापासून सुरुवात व्हायची सगळे आमच्या आंगणात जमायचे मोठ्या आवाजात पाच मंगलाष्टका , आरत्या व्हायच्या . बायकांमध्ये उषा वहिनी हमखास मंगलाष्टक  म्हणायच्या . लग्न चालू आसतांना वाड्याच्या छोट्या दारात नरसोबासमोर जावून आम्ही फटाके उडवून मुद्दाम राखून ठेवलेल्या अक्षदा घेऊन पाठीमागे उभे रहायचं आणि शेवटची मंगलाष्टक झाली की खोडसाळपणे ठरवून सगळ्या मुलांनी एखाद्याच्या डोक्यावर मारायची व नंतर मी त्यातला नाही असा निर्वीकार चेहरा करत प्रसाद वाटायला परत तयार असायचो आर्थातच पुढच्या घरी त्याची परतफेड होणार हे नक्की आसायचे . त्याचवेळी पुढचे लग्न ज्यांच्याकडे असेल तो मोठ्या आवाजात म्हणायचा

" सर्व व-हाडी मंडळींनी आमच्याकडे लग्नाला चलावे ".

मग सगळ्यांचा मोर्चा त्यांच्याकडे वळायचा . पुन्हा तिथे सगळे तेच सोपस्कार  व्हायचे तिन्हीसांजेला सुरु केलेली लग्नं वाड्यात एकूण पाच घरी लग्न लागेपर्यंत नऊ वाजायला यायचे . धावाधाव करुन आम्ही पण दमून जायचो . चेष्टामस्करी , गप्पा गोष्टींना उधाण यायचं . अशा प्रकारे तुलसीविवाहानंतर खरी दिवाळी संपायची .

    आजकाल शहरात भरपूर फटाक्यांचा आवाज येतो रोषणाई असते पण माणसांची इतकी गर्दी नसते . आता पुढच्या रविवारी बार्शीत पण हा सोहळा होईल यावर्षी घरचेच आम्ही सगळे असणार त्यामुळे ती मजा येणार हे नक्की ! बघता बघता मुलांना बार्शीला येऊन आठनऊ महिने पुर्ण होत आले .

मग आता संक्रांत झाली की एक फेब्रुवारीला तारखेंनी तर तिथीने रथसप्तमीला आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस !! असं पुर्ण वर्ष कोरोनाच्या घोंगावातात गुंडाळल्यासारखं झाल पण बराच काळ एकमेकांच्या सहवासात रहाता आलं एवढं मात्र  खरं !!

           आता सगळेजण फिरत आहेत काही ना काही कामं निघतात . कीर्तीच्या दोनतीन मैत्रिणींची लग्नं आहेत त्यानुषंगाने आशीष-कीर्ती आता सारखे बार्शी-पुणे-मिरज असे दौरे करणार . आकांक्षाच पण डिसेंबरअखेर शेवटच्या टप्प्यात येणार , तिचा प्रोजेक्ट संपून सगळं पुर्ण व्हायला पंधरा फेब्रुवारी उजाडेल . पण सध्या सारखेच जाणेयेणे असल्यामुळे सगळेच बार्शीत आहेत असे नाही . पण हेडक्वाॕर्टर अजूनही बार्शीच आहे . येणाऱ्या दिवसात कोरोनाचं प्रमाण कसे असेल याविषयी अजूनही स्पष्टता नाही पण लस यावी व जनजिवन पुर्ववत व्हावे असे मात्र मनोमन वाटतेय !!




क्रमशः भाग 33




 " दिवाळी सण ओवाळी "


या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने सगळे सण संपतात . मग आता  आकांक्षाचा वाढदिवस आहे म्हणत दिवाळी झाली की आठ दिवसात आशीष-कीर्ती मिरजेहून परत आले .

 मला मनिषंच लग्न झाल्यापासून असं वाटायचं की मुलांचा त्यांचा एकमेकांचा तसेच त्यांचा आमच्याबरोबर पण एकत्र सहवास होत नाही . लग्न झाल्यावर आई-वडील मुलांकडे थोडंस जाऊन तरी रहातात पण मला तेही शक्य होणार नाही आणि रिटायरमेंटनंतर गेलो तर तोवर आकांक्षा कुठे असेल माहित नाही . मुलं कळती झाली तसं आपला सहवास कमी होतोय याचं शल्य होतं आणि ते स्वीकारलंही होतं इलाजच नव्हताच . पण ध्यानीमनी नसतांना कोरोनामुळे ,  लाॕकडाऊनमुळे या नऊ  महिन्यात ती कसर भरुन निघाली . 

" काही हरवले काही गवसले " 

  याप्रमाणे काहीसं झालं मग   संधी म्हणून आम्ही उपयोग केला . यादरम्यान घरातील सगळ्यांचे वाढदिवस झाले ,  आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला . आता  24 नोव्हेंबर आकांक्षाचा वाढदिवस ! तिला वाढदिवसाचं खुपच औत्सुक्य असतं पण सध्या ती  सी-डॕक मध्ये  पुर्ण बीझी आहे मग आम्ही दोघे आणि आशीष-कीर्तीने सगळं प्लॕनिंग केलं . आकांक्षा-कीर्ती जरी केक शिकून आल्या असल्या तरी या दोनतीन महिन्यात घरात केक झाला नव्हता आणि करायचा तर यावेळी एकट्या कीर्तीला तो करावा लागणार होता . तशी ती मिरजेतून येताना पुर्ण तयारीनीशी आली होती . यावेळी आम्ही दोघी केक करणार होतो . हल्ली मैत्रिणीसोबतच आकांक्षा असायची त्यामुळे नेहा , नुपूर , आशीष-कीर्ती या सगळ्यांचे गीफ्ट आठ दिवस आधीच माझ्याकडे  कुरीयरने आले होते . 

मग कीर्तीने 23 तारखेला  संध्याकाळी सात वाजता केक करायला सुरुवात केली . मी फक्त आधारासाठी समोर उपस्थित असणं तिला आवश्यक होतं . ( समजा केक फसला तर दोघींनी केला म्हणता येईल म्हणून 😃) . मग आकांक्षाला आवडतो म्हणून चाॕकलेट केक करायला लागलो तोवर यांनी पण बाहेर जाऊन लाहानपणापासून आकांक्षाचं स्पेशल आवडीचं मोठ्ठ

  " कॕडबरी सेलीब्रेशन "

 आणून ठेवलं . तोवर कीर्तीने केलेला केक मस्त फुगला आता त्याच पुढचं सगळं राहिलं होतं आणि आकांक्षा खाली येते काय वाटू लागलं . खबऱ्या मनिष वरती होताच त्याला तिला वरंच गुंगवून ठेवायला सांगितले होते त्याप्रमाणे ते दोघे वरच होते . बहुदा आकांक्षाने समजून घेतलं असे आम्हांला वाटले . बऱ्याच दिवसांनी केला तरी एक नंबर केक तयार झाला , डेकोरेट केला आणि कीर्तीला खूप आनंद झाला मग पटापट सगळी आवाराआवरी केली केक फ्रीझरमध्ये ठेवला आम्ही हुश्श्य केलं , खूष झालो आणि आशीष-आकांक्षा खाली आले . मग आमची जेवणं वगैरे झाली आणि झोपायला निघालो . लहान मुलाला एखादी गोष्ट हवी असेल तर

"  मला ते नको आहे " 

असे म्हणते तसंच काहीसं आकांक्षाने सांगितले 

" माझा वाढदिवस आहे पण उगाच जागत बसू नकात मी पण लवकरच झोपणार आहे ".

बरं बरं म्हणंत आम्ही झोपलो . मग बारा वाजता आशीष-कीर्ती तिला खाली घेऊन आले आणि बऱ्याच वर्षांनी कुटुंबीयासमवेत आकांक्षाचा वाढदिवस साजरा झाला . बराचवेळ मैत्रिणींचे फोन चालू होते . सकाळी साधं जेवण रात्री पावभाजीचा बेत झाला . आणि 2020 संपत आले तसे आमचे वाढदिवस पण संपले . आता फक्त आशीष-कीर्तीच्या लग्नाचा वाढदिवस बाकी आहे .

आता 27 तारखेला तुळशीचं लग्न पण आदलेदिवशीच 26 ला कंपनीने कीर्तीला सप्लायरकडे पाच दिवसासाठी पुन्हा मिरजेला जायला सांगितलं . मग पुन्हा 27 लाच भल्या पहाटे आशीष-कीर्ती मिरजेला गेले . मुख्य म्हणजे लेक-जावयाची हजेरी मिरजेच्या तुळशीच्या लग्नांला लागली !त्यामुळे कीर्तीचे आई-बाबा खूष !  कीर्तीला पण खूप आनंद झाला फक्त चारपाच दिवसातच लगेचच प्रवासाची दगदग झाली आधीच माहित असतं तर कदाचित थांबली असती . आता मे महिन्यापासून पोस्टपोन होत असलेली तिच्या दोन मैत्रिणींची पण लग्नं आहेत . पुणे -मिरज -बार्शी असे दौरे त्यांना करावे लागणार आहेत . यानिमित्ताने आशिषचं मिरजेत रहाणं पडलं कोरोनामुळे बाकी काही नाही पण

" वेळच मिळत नाही "

हे पुर्णपणे खोडून निघालं घरी काम करत हवं तिथं रहायला मिळालं त्यामुळे सहवास घडतोय सहवासाने प्रेम वाढतं एवढं खरं ! आणि नाती लवकर आपलीशी होतात . 

परांड्यात मामांच्या घराची वास्तूशांती म्हणून परवाच काका-काकींना हे परांड्यात सोडून आले . सध्या आम्ही तिघेच बार्शीत आहोत कोरोनामुळे सध्या आजूबाजूला  लग्नं मर्यादित लोकसंख्येत केलीली दिसून येतात  मग आम्ही पण तुळशीच लग्न घरच्याघरी केलं असं मी मजेनी म्हणते  !

कोरोनावर लस अजूनही आलेली नाही पण येणार येणार म्हणत भीतभीत का होईना सगळं जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत झालं आहे . नाॕर्मल आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे . पुर्वी असं म्हणायचे की पाडव्यादिवशी आपण जे करतो खातो तसं वर्षभर मिळतं म्हणून चांगलं खावं , नवे कपडे घालावे पण यावर्षी त्याची खरं खरं प्रचिती आली पाडवाच आपण सर्वांनी  लाॕकडाऊनमध्ये केला , सगळी कामं स्वतः केली तर पुढचं वर्ष जवळजवळ तसंच गेलंय . पण आता मात्र काळोखानंतर पहाट होणारच या आशेने येणाऱ्या उषःकालाची सारेजण मोकळा श्वास घेण्यासाठी आतुरतेने वाट पहात आहेत हे नक्की .

आज आकरा डिसेंबर मघाशी आशीष-कीर्तीचा फोन झाला तर कीर्तीला आता जानेवरीमध्ये पुण्यात यायचा प्लॕन करा असं मिटींगमध्ये सांगितले . खरं तर तिचं काम तिथेच आहे तरी पण बार्शीत रहायची सवय झालीय आता कायमसाठी पुण्यात जायचं म्हणलं की उगाचच कसंतरी झालं . तशी दोनतीन कारण आहेत एकतर अजून लस मिळाली नाही ती घेऊन गेलं तर बिनधास्त होईल . दुसरं म्हणजे घरी कामाला बायका लगेच येऊ शकतील का ? आणि नाही आल्या तर मॕनेज होईल का ?आणि तिसरं म्हणजे आता सणामध्ये फक्त संक्रातीचा सण राहिलाय तो तोंडावर आलाय तो झाला की संपल आता पाहू काय होतं ते . माणसाच्या आशा वाढत असतात खरं . कीर्तीच्या मैत्रिणीचं लग्न झालं की 26 डिसेंबरला ती दोघं येतील बार्शीला . मग पाहूयात किती रहायला मिळतं त्यांना त्याप्रमाणे करु . आता आकांक्षाचा पण क्लास यामहिन्यात संपतोय पंधरा जानेवारीपर्यंत परिक्षा संपेल पुढे 15 फेब्रुवारीपर्यंत प्रोजेक्ट तिलाही वाटतंय प्रोजेक्ट क्लासमध्ये करावा पाहू आता काय होतं ते . एवढं नक्की की प्रत्येकाला नाॕर्मल आयुष्य जगावं असं वाटत आहे . तेही बरोबरच आहे पण 2020 हे कॕलेंडर वर्ष संपत आलंय तर त्याच्याबरोबरच करोना पण संपावा एवढीच इच्छा !

आज 27 डिसेंबर ! कालच आशीष-कीर्ती तब्बल एक महिना मिरजेत राहून परत आली . एक वर्षाच्या आत नविन सुनेचा सहवास जसा आम्हांला झाला तसाच कीर्तीच्या आई-बाबा व आशिष यांना एकत्र रहाता आल ! की जे असं कधी रहाता येईल असं वाटलं नव्हतं . कोरोनामुळे हेही झालं !  

लग्नाला एक वर्ष व्हायला आता फक्त एक महिना राहिला आहे .

आता सध्या भाज्यांची रेलचेल आहे पुन्हा सगळे एकत्र रहात आहेत मग पुन्हा खवय्येगीरीचा एकएक राऊंड करणार . आता मुलं आधी पुण्याला जातात का आशीष-कीर्तीच्या लग्नाचा  वाढदिवस आधी होतो हे पहायचं कारण क्रमशःची समाप्ती जे आधी होईल तेव्हा करणार !





क्रमशः भाग 34




        आता नविन वर्षात म्हणजेच 9 जानेवारी 2021 शनिवारी  मुलांच पुण्याला जायचं ठरलं आहे.  त्यानुषंगाने कामांची लिस्ट तयार झाली . आणि मन भूतकाळात गेलं . भारतात कोरोनाचं घोंघावतं वादळ सुरु झालं आणि हो नाही करत पाडव्याच्या आधी दोन दिवस  आशिष-किर्ती-आकांक्षा  बार्शीला येऊन पोहोचली . तसा कोरोनाचा फारसा अंदाज कोणालाच येत नव्हता आणि एकदोन दिवसांत एकवीस दिवसांसाठी  लाॕकडाऊन घोषीत  झालं आणि मुलांना वाटलं

" आता तीन आठवडे सगळंच बंद आहे तर बार्शीला आलो खूप बरं झालं आता रहाणं पडेल . "

          नविनच लग्न झाल्यामुळे आम्ही नुकताच आशिषचा नविन संसार लावून आलो होतो त्यामुळे त्यांनी अजून एखादा किलो तांदूळ पण बाहेरुन आणला नव्हता तर एकदम सगळं अंगावर पडलं तर गोंधळायला झालं असतं. पुण्यात राहून काय केलं असतं ? फजितीच झाली असती . आता इथे बार्शीत एकत्र रहायला तरी मिळेल थोडफार स्वयंपाक शिकता येईल असं म्हणत म्हणत पंधरा-पंधरा दिवस लाॕकडाऊन  वाढत राहिले . कंपनी WFH वाढवत राहिली . आकांक्षाचा क्लास आॕनलाईन सुरु झाला आणि  मग आज तब्बल नऊदहा महिने झाले आम्ही सगळे बार्शीत एकत्र राहतो आहोत ! 
       आलेला अनुभव लिहावा असे सुरुवातीला वाटले जवळजवळ एक महिन्यांनी बराच मोठा अनुभव लिहीला आणि माझे आप्तेष्ट व स्नेह्यांना पाठवला तर प्रतिसाद इतका छान मिळाला की 

 " लिहित रहा छान वाटतंय "

हा मेसेज जवळजवळ सगळ्यांनी दिला . सुरुवातीला रोजचा दिवस काहीतरी नविन अनुभव यायचा मग मला पण ते लिहायला व सगळ्यांना वाचायला आवडू लागलं . शेरे , टिपण्णी इतकी की मला काहीजणांनी सांगितले की

 " कीर्ती नविन सून आहे तसेच तू पण नविन सासू आहेस . लिहित रहा संग्रह करुन त्याचं पुस्तक तयार कर . एवढ्यावरच न थांबता नविन लग्न झालेल्या मुलींच्या व तिच्या सासूच्या  वाचनात येईल असेही पहा . त्यांच्यासाठी हे अनुभव नक्कीच दिशादर्शक ठरतील , नविन संसार टवटवीत रहातील ".
  
असे मेसेजेस , फोन ऐकल्यावर मात्र माझा लिहिण्याचा उत्साह वाढत गेला मग मी लिहीत राहिले . लिहीत लिहीत मी माझ्या बालपणात , मुलांच्या बालपणात पण फेरफटका मारुन आले .ओघाने आई-काकांंची आठवण ताजी झाली .  मनाला समाधान वाटायचं . बऱ्याचदा सुनिल भाऊजी व सुखदाची आठवण यायची आणि मनाला रुखरुख लागायची . मध्यंतरी मात्र तेच तेच वातावरण होतं . नविन काही घडत नसे , कोरोनाचा कंटाळा यायचा मग लिखाणात पण खंड पडायचा पण लिखाणाची नाळ तशी तुटू दिली नव्हती  आणि बघत बघत क्रमशः 33 भाग पुर्ण झाले . वाचणारांना पण याची सवय झाली . जास्तच खंड पडला तर 

" काय ग , आलीकडे बरेच दिवसात  क्रमशःचा  पुढचा भाग आला नाही " 

असे मेसेजेस यायचे तर काहीतरी घडलं की आशिष-किर्ती-आकांक्षा म्हणायचे 

" काही घडलं नाही म्हणून क्रमशः लिहीलं नाही आता हे तर लिहीलच पाहिजे "

मग माझा पुढचा भाग लिहीला जाई . या कालावधीत बरंच पाणी पुलाखालुन गेलं अनेक प्रसंग घडले त्याचे अनुभव लिहायचे व ते वाचताना खूप आनंद व्हायचा . काहीवेळा काळजी वाटायची ,  काहीवेळा घाबरायला व्हायचं . मायडी , केतकी यांना कोरोना होणं यासारख्या काही अस्वस्थ करणाऱ्या घटना या कालावधीतच  घडल्या तर खूप दिवसापासून कुठेही जाणंयेणं नसल्याने दोघदोघच घरात राहून अनेकजण कंटाळून गेलेलं पण जाणवायचं . ज्योतीच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली त्याचं केलेलं ई-सेलिब्रेशन आणि त्यावेळी मनाने सर्वजण एका साखळीत गुंफल्यासारखे असायचे मग त्याचा परमोच्च बींदू गाठल्यावर आनंदाला आलेलं उधाण ! यादरम्यान झालेले आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस . सगळेच्या सगळे सण आणि लाॕकडाऊनमुळे सगळी कामे  घरीच करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पाककलांना आलेलं उधाण ! आणि पदार्थाच्या चविप्रमाणेच
 " सुगरण कन्या " 
ग्रुपवरची खमंग-गोड अशी चविष्ठ खुसखुशीत चटकदार चर्चा . यादरम्यान आमच्याकडे  "किचन" 
हा शब्द लोप पावला आणि आम्ही  
" मुदपाकखाना " 
हा शब्दप्रयोग करु लागलो कारण घरामध्ये खाणारी तरुणाई ते वृद्ध अशी सर्व वयोगटातील माणसं . आणि सगळी कामं स्वतःच करायची मग घाईच्या पण मर्यादित मुख्य म्हणजे सकाळच्या वेळेत मोकळं , पातळ, खमखमीत , आळणी , कडक , मऊ असा वैविध्यपुर्ण साग्रसंगीत स्वयंपाक करतांना होणारी दमछाक . बाहेरचं खाणं नाही त्यामुळे प्रमाण पण भरपूर . चहा सारखा करावा लागतो म्हणून मग एकदमच बारापंधरा  कप चहाच मिश्रण करुन ठेवलं की आशिषने त्यात आलं वगैरे भरपूर टाकून डावाने हलवत 
" सरितातुल्य चहा " 
असे म्हणत थर्मास भरणे व सगळ्यांना चहा देणे हे त्याचं काम होत . 
         एकूणच लाॕकडाऊनच्या प्रकारानुसार किराणा , भाजी आणि लागणारं सगळं सामान आणायचं . आणि प्रत्येकाने माझी वेळ झाली म्हणून पळायचं मग कमीजास्त सगळं पहायचं हे काम एकदोन दिवस नाही तर नऊदहा माहिने रोजच यांना करावं लागलं  . 
          अशा एक ना दोन  कायमस्वरुपी स्मरणात रहातील अशा अनेक घटना घडल्या . आणि आता बघता बघता मुलं पुण्याला परत जाण्याचा क्षण येऊन ठेपला ! आणि मन हळवं झालं . संपुर्ण घटनाक्रम फ्लॕशबॕकसारखा डोळ्यासमोर तरळतोय .
     तसं तर दहावी झाली की मुलं बाहेर आहेत त्यामुळे ते नसण्याची सवय झालीय पण........ 
आता ती परिपक्व झालीत आशिषचं लग्न झाल्यामुळे कीर्तीपण आहे .  मग नऊदहा  महिन्यात इतकी सवय झालीय की ते जाणार आहेतच हे माहित  असूनसुद्धा अगदी 9 जानेवारीला  जाणार आहेत म्हणलं की मनाची अवस्था कातर कातर झाली , आतल्या आत उमाळे येऊ लागलेत .भरभरुन होणारं लिखाण मागच्या भागापासूनच आकसल्यासारखं वाटतंय . खरं तर हे नऊदहा महिने एकत्र रहाणे हे अनपेक्षीत आहे . पण तो अगदी आपला हक्कच आहे असे वाटतं आहे . मन आहे जसा विचार करते तेच बरोबर आहे असे वाटत रहाते . सुख घटाघटा प्यायचं ही माणसाची प्रवृत्ती आहे . एखाद्या मुलीचं लग्न जमलं की घरच्यांना आनंद तर होतोच पण मुलगी सासरी जाणार म्हणून भरुन पण येतं , हुरहुर वाटते तशीच काहीतरी ही मानसिकता आहे . आजकाल नोकरीच्या निमित्ताने मुले दूर असतात आणि असणारच ही मानसिकता तयार झालेली असते . आयुष्यात धावण्याची शर्यत लावल्याप्रमाणे बाकी सगळं गौण समजत आपण पण  धावत रहातो . हातातून वाळू निसटावी त्याप्रमाणे असे काही क्षण निसटून जातात की या धकाधकीच्या जिवनात त्याचा कधी आपण विचारंच करत नाहीत त्यामुळे मला तरी मनोमन असं वाटतंय की कोरोनामुळे 

" काही हरवलं 
तर काही गवसलं "  

असं झालं हे नक्की !
माझं या भागाच लिखाण चालू होतं आणि आशिष-किर्ती येऊन बसले आणि म्हणू लागले . 

" आम्हांला पुण्याला नाही जावं वाटत बार्शीत रहावं वाटतंय . इथे बघ न सगळ छान वाटतंय , घरात माणसं आहेत खाणं , पीण , गप्पा , मजा येते . जेव्हा काम किंवा आराम करायचा असतो तेव्हा वरच्या घरात गेलं की संपलं . तिथे दोघेजणच मग आम्ही काय करु तिथे ? "

हे ऐकून मी मात्र आवाक झाले . लळा लागलाय हे मान्य आहे पण बार्शीत राहून करायचं काय ? मग हसतहसत चर्चा आपली स्वतःची एखादी कंपनी बार्शीच्या आसपास काढू इथपर्यंत येऊन पोहोचली ! पण जायला नको वाटतंय हे नक्की . बरोबरही आहे कारण गृहस्थाश्रमात प्रवेश केला तसं एकत्र कुटुंबात रहायची सवय लागली आहे पुण्यात गेलं की अ पासून सुरुवात करायची , तशी तर मागच्या वर्षी ती झाली होती पण आता विसरी पडली आणि हेच जिवन बरं वाटू लागलं म्हणून आता दोघेच रहायला नको वाटतेय . मग पुन्हा ठरलं कंपनीने आत्ता बोलावलं आहे तर जाऊन तरी पाहू . फारसं जावं लागणार नसेल तर जाणंयेणं करु . जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे मॕनेज करु . मला माहित आहे गाडीनं वेग घेईपर्यंत असतं हे . आधी येताना हो-नाही चाललेलं तर आता जायचं जीवावर आलंय !  तसं तर भावनावश सगळ्यांनाच होतंय . 
      आता आकांक्षाच सी-डॕकपण शेवाटच्या टप्प्यात आलं आहे त्यामुळे आता दोन महिने तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत तसे आम्हीपण बांधीलच आहोत !
      पुन्हा गप्पांमध्ये गाडी क्रमशः लिखाणावर आली .मी जर हे पुस्तक छापणार असेल तर त्याची प्रस्तावना कीर्ती करणार असे ठरलं आहे पाहूया आता केव्हा देते ते . तसं तिला वाचनाचा बऱ्यापैकी नाद आहे लिहिते पण छान आता मी प्रस्तावनेची वाट पहातेय . मग माझं मनोगत लिहून पुर्ण भागांची लींक तयार करण्याचा विचार आहे , पाहूयात कसे जमते ते . तर अशा संमिश्र भावना आहेत या सगळ्या . काय काय होतय हेच समजत नाही भावनांचा कल्लोळ आहे !!
           पण आता जाणार तर आहेतच मग तयारी पण करायलाच हवी . आता आधी एक दिवस परांडा दौरा करायचा आहे कीर्तीला पण परांड्याचं घर पहायचं आहे पाहू कसं जमतं ते . मग पुण्याला जाण्यापुर्वी किमान महिनाभर तरी बाहेर जायला लागू नये इतपत पीठं , किराणा , आठवडाभर पुरेल एवढी भाजी , नेहमीप्रमाणे थोडाफार कोरडा खाऊ ही सगळी तयारी करावी लागेल . आत्ता सगळ्यात जास्त त्रास देणारा विचार म्हणजे माझ्या मनात आलं की मी शनिवारी हुतात्माने जाऊन रविवारी परत येऊ शकेन अशी परिस्थिती कधी होणार ! असे सतत विचारचक्र सुरु आहे . पण हळुहळू जनजिवन पण सुरळीत होईल . कुठेही जाणंयेणं नाही . बहिणी , पाहूणे , मैत्रीणी , संघटनेतील सहकारी , गायन क्लास ग्रुप सगळ्यांच्या प्रत्यक्ष भेटी होऊन पण नऊदहा महिने होऊन गेलेत . फोन मेसेजेस चालूच आहेत पण प्रत्यक्ष भेटीची पण आस आहे . पाहूया कधी सगळं सुरळीत होतं ते !
        कधी नव्हे ते मध्यंतरी घरातच बुलबुलला अगदीच जवळून न्याहाळण्याचा योग आला . अथक परिश्रम करुन त्या युगुलाने तयार केलेलं उबदार घरटं मग त्यात अंडी घालणं आणि पिलांचा जन्म या प्रक्रिया पुर्ण होईस्तोवर जिवाचं रान करणं मग त्या पिलांना जिवापाड जपणं , संगोपन करणे , उडायला शिकवणं सरते शेवटी पंखात बळ आलं की पिलांनी घरटं सोडून उंच आकाशात भरारी घेणं त्यातच जन्मदात्यांनी समाधान मानणं ! सगळंच कसं अगदी क्रमाने ठरल्याप्रमाणे असतं ! पक्षी असो , प्राणी असो वा माणुस ! प्रत्येकाची जिवनशैली ही समानच असते आणि तशी जगता आली तरच समाधान वाटतं . सहवास , प्रेम , आनंद , विरह , समाधान आणि सर्वात शेवटी असंच घडलं तरच वाटणारी धन्यता !! नऊदहा महिने मी मुलांमध्ये पुरती गुरफटून गेले , मानसिकरित्या मुलांमध्ये गुंतले पण त्यांच्या पंखात बळ आलेलं आहे संधी मिळताच ते भरारी घेणार आणि त्यातच धन्यता मानली पाहिजे याचं जणू प्रात्यक्षिकच परमेश्वराने बुलबुलच्या रुपाने दाखविले असे म्हणायला हरकत नाही . माझी आई नेहमी म्हणायची

" पाण्याला पुढे धावण्याची ओढ असते , माणसाचही तसंच असत पुढेपुढे तो धावत असतो आणि असाव पण तसंच  ".

मनुष्य प्राणी हे एक अजब रसायन आहे तसंच न उलगडलेलं तरीपण हवहवसं वाटणारं कोडंदेखील  !!!





क्रमशः भाग 35

( शेवटचा भाग )



          जवळजवळ दहा-आकरा महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर आशिष-किर्ती काल रहाण्यासाठी पुण्याला गेले आणि मनाशी संवाद सुरु झाला ! आकांक्षाचं सी-डॕक अजून चालू आहे त्यामुळे ती अजून इथेच आहे तिची परिक्षा , प्रोजेक्ट आणि बरंच काही महत्त्वाचे याच महिन्यात आहे त्यामुळे ती खूपच बीझी आहे पण घरात आहे तिला खायला व्यवस्थित देता येतंय घरात तिचा वावर आहे त्यामुळे थोडंस बरं वाटतंय फेब्रुवारी अखेर तिचं शिक्षण संपून नविन पर्व सुरु होईल . मुलांची घोडदौड सुरु झालीय त्यांना पुढची ध्येयं खुणावत आहेत . मग भरारी तर घेतलीच पाहिजे पण आशिष-किर्ती गेल्यामुळे घर अगदी खायला उठल्यासारख झालंय . तशी खूप कामं आहेत पण काहीच करावसं वाटत नाही . सगळं एकदम शांत........

       तसं बारातेरा वर्षे झाली मुलांचे येणे दोनतीन दिवस राहून जाणे ही सवय झालीय . जातांना थोडंस कसंतरी होतं पण पुन्हा लगेचच आपापल्या उद्योगात गुंतले जाते . पण यावेळी मनू आणि आकांक्षा दोघेपण त्यांच्या बारावीच्या सुट्टीनंतर इतके दिवस बार्शीला राहिलेत यावेळी त्यांच्याबरोबर कीर्तीपण होती. त्यामुळे खुप समाधान वाटलं . पण मुलं पहिल्यांदा शिकायला गेली तेव्हा जशी अवस्था झाली तशीच किंबहुना त्याहीपेक्षा काहीशी जास्तच आज झालीय असं वाटतय रितेपणा जाणवतोय ....

या झाल्या माझ्या भावना .

पण मागच्या आठवड्यातील माझं निरीक्षण मला सांगू लागल आहे की मला वाटलं त्याहीपेक्षा जास्त घालमेल आशिष-किर्तीची सुरु आहे छोटीशी तोंडं करुन बसतात . सकाळच्या वेळेत आशिषबरोबर गप्पा होतात तर संध्याकाळच्या वेळी कीर्ती गप्पा मारत असते एकूणच दोघांचाही नूर एकच असतो , काय करावं , आता तर जावं लागणार आहे पण जायची अजिबात इच्छा नाही . बार्शीत सगळ्याबरोबर रहायला मजा आली सगळ्यांशी कनेक्ट होता आलंय . कालपासून दोनतीनवेळा व्हीडीओ काॕल झाला अज्जिबात करमत नाही आसा त्यांचाही नूर येतोय पण खात्री आहे थोडंस रुळलं की नक्की रमणार . सध्या हे छान वाटत होतं सवय झाली होती भरपूर गप्पा व्हायच्या ते एकटं पडल्यासारखं वाटतंय . तसा माझा स्वभाव जरा जास्तच  बडबडा आहे पण यांचा तसा नाही . पण मी दिवसभर घरी नसायचे तर इतकं एकत्र रहाता आल्यामुळे त्यांना कीर्तीच्या व कीर्तीला त्यांच्या आवडीनिवडी , सवयी , स्वभाव चांगले माहित झालेत हाही महत्त्वाचा भाग आहे यांना चहा लागतो तो वेळेत द्यायचा हे काम कीर्ती चोख बजावायची तर कीर्तीला खायला जरा चाणाचूणा जास्त आवडतो तर लक्षात ठेवून आणायचं काम यांच असायचं  .

       असो पण त्यांचे पुढचे रुटीन सुरु होणे ही बाब पण तितकीच अत्यावश्यक आहे. अगदी सुरुवातीला मुलं तशी कंटाळली होती . घड्याळाच्या काट्यावर पळायची सवय ते बेहिशेबी वागणं फार काळ नकोस वाटायचं . तसं WFH खुप होतं त्यांना  , मनिष तर कामाला जाम त्रस्त झाला होता . आॕफिसला जाऊन आलेलं परवडलं पण हे नको असं त्याला वाटायचं . त्याचे क्लाएंट बाहेरचे असल्याने दुपारी चारच्यापुढे काम रंगात यायचं आणि घरुनच काम म्हणजे वेळेचं बंधनच नाही . मग तो पण आणि आम्ही पण वैतागायचो . घरात असून बोलणं होत नसे कीर्तीचं तर हे रुटीनच नव्हते सतत फील्डवर फिरायचं आणि बोलायचं एखादी चक्कर लॕपटाॕप समोर बसायचं . असे असल्यामुळे सतत लॕपटाॕपसमोरच्या कामात ती रमत नव्हती . आणि आकांक्षाला तर कधी एकदा मैत्रिणींना भेटू असं वाटायचं . तिच्या सहा महिन्याच्या कोर्सला एक वर्ष लागलं आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय .

 हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ताच्या वातावरणात मुलांना  बार्शी एकदम निवांत वाटलं . नुकताच बांधलेला वरचा मजला त्याचा अगदी पुरेपूर वापर झाला . सार्थक झालं , पैसै फिटले असं वाटलं . आहे त्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःला मोल्ड करुन आपापली जिवनशैली ठरवून घेतली होती त्यामुळे मी पहिल्या भागात म्हणलं तसं आर्धा ग्लास भरलेल्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे कध्धीच मिळालं नसतं असं जिवन जगता आलं आणि मग आत्ता जसं चालू आहे ते छान वाटू लागलं . मुख्य म्हणजे आशिष-किर्तीनं नुकताच आयुष्यात टर्न घेतला होता . नविन जिवन सुरु झालं होतं . नव्या सुनेला घरात रुळायला वेळ द्यावा लागतो . तसंच संसारात रुळायलाही वेळ लागतोच की . तसं तिचं प्रत्येक सणाला बार्शीला येणं किंवा आम्ही पुण्यात चारआठ दिवस जाणं झालं असतं . पण यातून काही दिवसात नव्हे , महिन्यात नव्हे काही वर्षातसुद्धा आम्हांला इतके दिवस एकत्र रहाता आलं नसतं तेवढं या लॉकडाऊनमुळे शक्य झालं ! पाडव्यापासून सणांना सुरुवात झाली . मुख्य म्हणजे कुलदैवत असलेल्या नृसिंह जयंतीला हे आले असते ते आख्ख नवरात्र त्यांना अनुभवता आलं . आणि मग जेष्ठ पौर्णिमा , श्रावणात मंगळागौर , शुक्रवार , रक्षाबंधन , पोळा तर सगळ्यात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती ! देवीचं नवरात्र , दसरा आणि सणांचा शेवट म्हणजे 

" दिवाळी आणि सण ओवाळी " 

त्यानंतरचं सटीचं नवरात्र इथपर्यंत सगळे सण अगदी व्यवस्थित थाटामाटात पार पडले , जवळून पहाता आले . तसं प्रत्येक सणाला ऐनवेळी येऊन सण साजरा करुन लगेच परताव लागलं असतं ते सलग दहा महिने राहून अगदी शिस्तीत सगळ्या रिती जवळून पहाता आल्या माणसांचा सहवास लाभला विशेष म्हणजे  काका-काकींना नातसुनेचा , स्वतःच्या नातवंडांचा सहवास कित्येक वर्षांनी मिळाला . हे क्षण मात्र कायम स्मरणात रहातील . विशेष दिवसांच्या स्मृती आशिषने जशा कॕमेरॕत टिपल्यात तशा मी पण या क्रमशःमध्ये नोंद केल्या आहेत भविष्यात केव्हाही वाचलं तर सुगंधी कुपी उघडल्यावर जसा सुवास दरवळावा तशा आठवणी मनात रुंजी घालतील हे नक्की ! आता फक्त संक्रांत सण व लग्नाचा वाढदिवस राहिलांय . तसं तर सुरुवातीला तरी लवकरच त्यांची चक्कर होईल मग एखाद्या रविवारी संक्रांत सण घालणार तिथिने लग्न रथसप्तमीला झालं होतं ! पाहूया कसं होतं ते .

       माझी शाखा सुरुवातीला कापड बाजारमध्ये होती तिथे शाखा इमारतीचे मालक असलेले रायचुरकर त्यांच्या कुटूंबाशी माझे जवळचे संबध होते . त्यांच व्यापारी घराणं होतं ! तर त्या काकू बोललेलं एक वाक्य मला खूप स्मरणात राहिलं होत व त्याची प्रचिती यादरम्यान आली त्या म्हणायच्या 

" आम्ही कापड दुकानदार ! आमचा मुलगा निलेश त्याला आम्ही पहिलं काय शिकवणार तर दुकान उघडून देवाला उदबत्ती , नमस्कार व मुख्य म्हणजे कपडा कापता आला पाहिजे , कात्री चालवता आली पाहिजे , कारण एखादं गिऱ्हाईक लवकर आलं तोपर्यंत जर नोकर आला नसेल तर भवानीच्या गिऱ्हाईकाला थांबावं लागू नये किंवा परतही जावं लागू  नये . ते संस्कार आम्हांला बालवयातच करावे लागतात . मोठं झालं की बोटं लवकर बसत नसतात आणि मनाची पण तयारी होत नसते . "

 किती अर्थ भरला आहे या वाक्यात ! म्हणजे काय तर थोडक्यात स्वावलंबीपणाचं थोडसं शिक्षणच की हे !  माझ्या मते सर्व ठिकाणी हा नियम लागू होतो. होय आपण सगळ्या कामासाठी नोकर ठेवलेत पण जर अडचण आलीच तर प्रत्येकाला पोटापुरतं करायला येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे . आमची आई पण म्हणायची 

" जेवढं लवकर शिकाल तेवढं चुटूचुटू करता येतं . कणिक मळणे , भाजी चिरणे , आवराआवरी करणे ही कामे तुम्ही हाताखाली करायला पाहिजेत ."

आणि मग नकळतपणे स्वावलंबीपणा कधी आला कळलंच नाही . या कालावधीत कीर्तीला संसाराच , स्वयंपाकाच प्रॕक्टीकल ट्रेनिंग मिळालं एवढ खरं . देताना मी खूष घेताना ती खूष एकूणच आनंदीआनंद गडे !!  माझ्या परीने मी मनिषला पण यात सामावुन घेतलं आहे . धडे दिले आहेत . तसं लहानपणापासूनच आकांक्षा व आशीष मध्ये कधीही भेदभाव केला नाही . मुळात माझं बालपणच अशा संस्कारात गेलं आहे . त्यामुळे त्याचीपण मानसिकता तशीच आहे . समानता शिकवावी लागत नाही ती संस्कारातुन बिंबवावी लागते . मला नक्की खात्री आहे तेवढं काम मी केलंय !

        आमचं नविन नातं छान तर आहेच पण त्याची वीण घट्ट होण्याचं काम या दहा महिन्यात  झालं . न बोलता मनातलं ओळखणे म्हणतात नं तेवढे संबंध दृढ झालेत असं म्हणायला हरकत नाही . खुपवेळा डोळ्यांची भाषा समजते आम्हांला  . मग हसायला लागतो आम्ही . या कालावधीत आमच्या खूप साऱ्या गप्पा व्हायच्या . त्यामुळे अंतर्बाह्य ओळख म्हणतात तसं काहीसं झालयं एवढं खरं . अधिकार गाजवणं , गोड धाक या साऱ्याची अनुभूती आली . व्यायामाला दांडी झाली , माझ्या खाण्यात जास्तीचं गोड आलं , चहाचं प्रमाण वाढलं किंवा जास्त दगदग झाली की आकांक्षा-कीर्ती अगदी आळीपाळीने फैलावर घेतात . आकांक्षाला काय केल्यावर काय होतं हे जसं समजतं त्याच दर्जाचा कीर्तीच्या तब्ब्येतीचा व मनाचा दोन्हीचा माझा अभ्यास झाला आहे व अचूक अंदाज पण येतोय . तसंच  तीला पण एकूणच घराची , घरातल्या माणसांची ओळख अगदी छान झालीय . 

        बार्शीला इतका पाऊस होऊनही आमच्याकडे तीन दिवसाला पाणी येतं . कोणीही पाणी भरलं तरी काही न काही कारणांनी पाणी भरतांना फिसफीस असते . याची कीर्तीला मजा येते एखादेवेळी शांततेत पाणी झालं तर 

" आज जलयुद्ध झालं नाही त्यामुळे पाण्याची काहीच  मजा नाही आली "

असं ती म्हणते मग हशा पिकतो त्यानंतर एक फक्कड चहा होऊन जातो . असे हे पाणीपुराण !!

      चला मुलांना त्यांच्या आयुष्यात परमेश्वराने सुखी , निरोगी , मुख्य म्हणजे समाधानी असं माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना  !!

या संपुर्ण प्रवासात सगळ्याच बाबतीत नव्याची नवलाई , कुतुहल , उत्सुकता , अधिरपणा अगदी जवळून न्याहाळता आला , अनुभवता आला . विवीध पाककृती करता आल्या ,  खाऊ घालता आल्या . सणवारांचा आनंद लुटता आला . अनेक बाबतीत कौतुक , माया तर अनेकवेळा बराच वेळ तसेच पडलेले चहाचे कप , सरबताचे ग्लास , खाण्याच्या डीश यासारख्या आळशीपणावर  घर डोक्यावर घेत केलेला ओरडा , खरडमपट्टी , कामाची झालेली दमछाक , कडक उन्हाळ्यामुळे झालेली उमघाम या सगळ्यावर शितल वाटणारे हास्याचे फवारे असे वातावरण होते त्यामुळे  बालपणीच्या सहवासानंतर तरुणाईची मौज पण जवळून न्याहाळता आली . असा जन्मभर आठवणीत राहिल असा आंबट-गोड झणझणीत तडका अशा अनेक आठवणींचा ठेवा आहे हा . स्मृतीगंध म्हणल्यास वावगे ठरणार नाही .


" Well beginning is half done "


   असं म्हणतात तर तसंच झालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही . 

त्याचबरोबर थोडीशी हुरहुर थोडीशी चूटपूटपण आहे .........



समाप्त


ता. क.

क्रमशःच्या निमित्ताने मी लिहीत गेले व तुम्ही माझे नातेवाईक , स्नेही माझा उत्साह वाढवत गेलात . लिखाणाची सवय लागली . छान वाटतं लिहिती रहा असा आग्रह सुरु झाला मग मी पण ठरवलंय काहीतरी नविन घेऊन तुमच्या भेटीला यायचं .

🙏🙏🙏🙏🙏









Monday, September 21, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 6

क्रमशः  भाग 26 ते 30


क्रमशः भाग 26


    

        तेचतेच वातावरण असल्यामुळे हल्ली क्रमशः काय लिहाव हा प्रश्न पडत होता पण श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले तसं पुन्हा नव्याची नवलाई डोकावू लागली मग माझी लेखणी पण सज्ज झाली . तसेच  आॕगस्ट महिन्याची सुरुवात लाॕकडाऊन वाढदिवसाने म्हणजेच यांच्या 2 आॕगस्टच्या वाढदिवसाने झाली . नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा इडली-चटणी-सांबार बेत झाला . इकडे श्रावण महिना असल्यामुळे बाहेर जरी सगळं बंद असले तरी घरात मंगळागौर व शुक्रवार याची धामधुम सुरु होती तर 15 दिवसानंतर बँका उघडल्या होत्या व पहिला आठवडा त्यामुळे बँकेत पण  प्रचंड गर्दी होती मला उसंतच नव्हती . आता  5 आॕगस्टनंतर जिल्हाबंदी उठली तर मिरजेला जाऊन यावे असे कीर्तीला वाटत होते ते बरोबरही होते . कारण आई-बाबांची भेट होऊन पाच महिने झाले होते तेही लग्नानंतर लगेचच . त्यामुळे जिल्हाबंदी उठण्याची वाट न पहाता ई-पास काढून जाऊन यावे अशी चर्चा झाली व  6 तारखेला पास काढला आणि आता मात्र कीर्तीला आनंदी आनंद झाला . इतके दिवस इलाजच नाही म्हणून तीने संयम ठेवलेला होता . कारण मागच्या महिन्यात जायचं गाजलं व पुन्हा कॕन्सल झालं मग सगळ्यांचाच मूड गेलेला म्हणून पक्क ठरेपर्यंत शांत रहायचं असं तिने ठरवलेलं पण आता पक्के झाल्यावर मात्र  8 तारीख केव्हा येते व मी मिरजेला कधी पोहोचते असे तिला झालेलं . आता घरच्या घरी का होईना पण कीर्तीला माहेरी मंगळागौर ,  श्रावणी शुक्रवार मिळणार होता .

      सध्या सगळीकडे कोरोनानं भीषण रुप घेतलं आहे त्याला बार्शी आपवाद नाही पण  सगळीकडेच नियम मात्र  शिथिल केले आहेत त्यामुळे हे पण परांड्याला दोनतीन दिवस गेले होते काका-काकींची औषधे , घरात कमीजास्त पाहून आले . आता आकांक्षाचा क्लासपण रिशेड्युल झालाय . 31 जानेवारीला संपणार फेब्रुवारी अखेर तिचे पुर्ण होऊन जाईल .

     8 तारखेला सकाळी लवकरच आशिष-किर्ती मिरजेला गेले . 4/5 महिन्यांच्या सवयीमुळे घर मात्र एकदमच शांतशांत वाटू लागलं . आणि मिरजेत आनंद ओसंडून वहात होता . खूप दिवसांनी भेटी झाल्या होत्या . फोटो , स्टेटस आणि फोनवरुन मिरजेतील मंगळागौर , शुक्रवार अगदी उत्साहात पार पडलेले समजत होते . ठरवल्याप्रमाणे शुक्रवारी कीर्तीने पुरणाचा स्वयंपाक करुन आई-बाबांना चकित केलं . केतकी पण चार महिने झाले आली नव्हती त्यामुळे घरात दोघेच राहून तेही कंटाळले होते मुख्य म्हणजे केतकीची काळजी करुन करुन आई बेजार झाली होती . तेही खरंच होतं कारण उत्साहाच्या भरात केतकीचं काम चालू होतं . रोज नविन नविन अनुभव आम्हांला पण ऐकायला मिळत होते पण रोजची तीची ड्युटी कोव्हीड पाॕजिटीव्ह वार्डमध्ये होती . कितीही काळजी घेतली तरी विस्तवाशी खेळ होतोय तो त्यामुळे तिच्या आईच्या जिवाला चैन नव्हती . आधीच केतकीची तब्बेत नाजूक , जेवायला व्यवस्थित मिळत नाही परवाच कावीळ झाली त्यानंतर दोनदा आजारी पडली त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालीय . असे उलटसुलट विचार करुन अस्वस्थ झालेल्या मनाला आशिष-किर्तीच्या जाण्यांने थोडासा दिलासा मिळाला , बदल झाला , मुलं आल्यावर ते जरा रिफ्रेश झाले . आठवडाभर राहून आशिष-किर्ती रविवारी बार्शीला  निघाले . पण येण्याआधी केतकी आजारी पडली होती तिला ताप येत होता व टाईफाईड झाल्याचे निदान झाले .  पुन्हा कोरोनाची टेस्ट केली होती त्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या काळजीत भर पडली होती . भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसं झालं .  बार्शीला येताना  रस्त्यातच केतकी कोरोना पाॕजिटीव्ह निघाल्याचे समजले.......पुन्हा सगळे चलबिचल झाले पण केतकी मात्र फर्म होती . हे होणारच होतं असे तिचे म्हणणे होते . एकदोन दिवसांत ताप कमी झाला होता पण औषधांमुळे थकवा जास्त आला होता . गोळ्यांनी पोट भरते म्हणायची . तिची चिडचीड वाढली होती आणि सहनशक्ती उरली नव्हती त्यामुळे फोनवर बोलायचं म्हणलं की तिला रडायला येत होतं ती आईबरोबर तर बोलायचीच नाही पण कीर्तीसोबत बोलायची मग मी  पण बोलत होते . पिळून निघाली होती , फोन झाला की कीर्ती खूप  अस्वस्थ व्हायची पण आम्ही 4/5 जण असल्यामुळे वातावरण लगेचच बदलायचं . आता केतकीला काहीच होत  नव्हते पण दहा दिवस अॕडमीट रहावं लागणार होतं . नंतर सात दिवस क्वारंटाईन ! मग यानंतर मिरजेला आणायचं ठरलं . पण केतकी जाम वैतागली . असेच काळजीत दोनतीन दिवस गेले नंतर केतकी फोनवर व्यवस्थित बोलू लागली मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं .

      आता बार्शीला आल्याआल्या शेवटची मंगळागौर  व पोळा ( आशिषचा तिथिने वाढदिवस )  एकाच दिवशी आला त्यामुळे पुरण व दुसरेच दिवाशी म्हणजे 19 आॕगस्टला आशिषचा तारखेनी लाॕकडाऊन वाढदिवस आला . किर्तीने आधीच गीफ्ट मागवून ठेवलं होतं तर आकांक्षाने सुंदरसा लाॕकडाऊन क्राऊन तयार केला होता . केक झाला व रात्री त्याच्या आवडीचे उडीदवडे केले . 

      आता लगेचच हरितालिका ,  गौरी-गणपती येणार ,  सगळ्यात मोठा सण !  प्रवास करता येत होता मग यांनी पण परांड्याला जाऊन काका-काकींना बार्शीला आणलं . ब-याच दिवसांनी ते आले होते .आता घर माणसांनी भरलं वातावरण सगळं छान वाटतेय पण कोरोनामुळे बाहेरचं  वातावरण तसं गंभीरच आहे . पण बाप्पाच्या आगमनाने घरात चैतन्य आलं . जोडीला निरनिराळे पदार्थ खायला मिळत होते मग सगळे अगदी खूशच ! कामाला कोणीच नाही त्यामुळे तो ताण जरा जास्तच येतोय म्हणून गौरीची तयारी जरा लवकरच सुरु केली . त्यामुळे घरात धामधूम सुरु झाली . उभ्या लक्ष्म्याचं कीर्ती ऐकून होती त्यामुळे कसं असणार सगळं याविषयी तिला खूप उत्सुकता होती . तसही गौरीला दोन दिवस ती येणार हे गृहित होतं पण कोरोनामुळे पाडव्यापासून तिचे सगळे सणवार बार्शीत अगदी शिस्तीत होत होते . अगदी जुन्या जमान्यांसारखं तिचे सासरी रहाणं पडलं आहे . वरचा मजला बांधल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतेय . पण सगळं खुशीत चालू आहे , मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिची प्रवृत्ती व करण्याची धडपड माझा उत्साह वाढवत होती .  तिला बरोबरीने वेळेप्रमाणे आकांक्षा जोडीला होतीच त्यामुळे उत्साह अगदी ओसंडून वहात होता . अगदी मंडप घालणे ,  पडदे घालणे गौरीच्या साड्या नेसवणे , थोडथोडच पण सगळं फराळाचं त्यात रव्याचे लाडू , बेसन लाडू , करंज्या ,  फुलोरा सगळं या दोघींनी विचारत विचारत पहिल्यांदा  केलं . फक्त माझ्या देखरेखीखाली व नियोजनबद्ध पद्धतीने सगळं चाललं होतं . एक दिवस आधीच सगळी तयारी या दोघींना हवी होती कारण त्यादिवशी त्यांना स्वतःला नटायचं होतं . दुपारची जेवणं झाली की या  तयारीला लागल्या मस्तपैकी साडी , मेकअप ट्रेडीशनल लुकमध्ये तयार ! जणू चालत्या बोलत्या जेष्ठा कनिष्ठाच !!  मला पण नऊवारीचा आग्रह मग काकींना पण सेमीपैठणी नेसायला लावली . आणि गौराईच्या स्वागताला तीन पिढ्या तयार झालो . वाजतगाजत थाटामाटात आनंदाने गौराईचं आगमन दोरे घेणं , फराळांनी पोटं भरणे तर पुजेची तयारी ताटात हळदीकुंकू  पंचामृत , गंध , अत्तर , हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या ,  आघाडा , दारातली जास्वंदीची लाल  फूलं , बाकी रंगीबेरंगी फूलं ,  पांढरीशुभ्र पण हळदी-कुंकवाने रंगवलेली टपोरी  माळावस्त्र , भिजवलेल्या वातींचा जुडगा हे सगळं 16-16  गौरीसाठी ,  8-8  बाळांसाठी तर 21-7  गणपती व जिवातीसाठी अशी तीन दिवसांची तीन ताट त्यात दुसरे दिवशी फक्त साळी-डाळी वहायच्या आणि हे सगळे क्षण वैविध्यपुर्ण पद्धतीने  कॕमे-यात टिपण्याची आशिषची कला व ते पाहून आकांक्षा-कीर्तीचं हरखून जाणं ! नवदांपत्याकडून गौरीची शोषडशोपचारे पूजा ! बाकी फारशी आरास न करता समोर फळं , पाणी भरुन तांब्या-भांडं , तांदूळ व हरभरा डाळीच्या राशी , असोल्या नारळाने ओटी , दक्षणा मग सगळ्यांनी मोठ्या आवाजात सात आरत्या धूप-कापराचा सुवास मंद लाईटींग व त्यात प्रसन्न मुद्रेने गौराई ! आणि मग पुढचे दोन दिवस अगदी धामधुमीत कसे गेले समजले नाही . लहानपणापासून आकांक्षाची लुडबूड असते पण यावर्षी तिने पण जबाबदारीने अंगावर घेत काम केलं . दुसरे दिवशी कीर्तीने स्वयंपाकघरात एन्ट्री तर सकाळी लवकरच  घेतली विचारुन विचारुन सगळं काम चालू होतं . लक्ष्म्याचा स्वयंपाक तसा चिकटच असतो पण त्यात मी ब-यापैकी सुटसुटीतपणा आणला आहे .कोणताही आती काटेकोरपणा ठेवला नाही .  एकत्र करुन एकूण दोनच भाज्या एकएकच चटणी व कोशींबीर ,  विकतचं श्रीखंड बासुंदी आणि थोडासा साखरभात , खीर आणि भरपूर पुरण हे पंचपक्वान्न तर पडवळाची कढी , मिरचीच पंचामृत , कटाची आमटी तळणात आळू , घोसावळ , मिरची व पालक भजी , वडे ,  कुरडया हे मात्र यथासांग करत असते कारण सगळेजण आवडीने खातात विशेषतः काका-काकी . मुख्य म्हणजे पाडवा , वैशाखीला ते नव्हते . आणि वयपरत्वे स्वतः करुन खाणे जमत नाही .  मग सगळं निरिक्षण करत करत हे काय ते काय असं विचारात यातला मोठा पुरणाचा भाग कीर्तीने उचलला व बाकी मी केल . हिरवी भाजी , केशरी साखरभात , पांढरा भात , भजी असा रंगीबेरंगी स्वयंपाक हिरव्यागार केळीच्या शेंड्याच्या पानावर नैवेद्याचं पान सजलं .  सगळं मजेत हसतहसत चालू होतं त्यामुळे जरी दगदग खूप झाली असली  तरी फारसा थकवा जाणवला नाही . या सगळ्यामध्ये आव्याहतपणे न सांगता यांची खूप मदत नेहमीच असते . जमेल तसं हातभार लावण्याची आशिषची तयारी होती . मुख्य म्हणजे दिवसातून सहावेळा चहा ! काकांचीपण काहीना काही हालचाल सुरु होती . विडे लावणे , भाज्या-दुर्वा निवडणे काकींच्या मदतीने करत होते . नव्याची नवलाई  , प्रौढत्व आणि परिपक्व अशा तीन पिढ्या हा सण एकत्रितपणे साजरा करत होत्या . हे दोनतीन  दिवस मात्र  आकांक्षा-कीर्ती-आशिष फोटो स्टेटस यात अगदी तल्लीन होते . या सगळ्याचं  कीर्तीच्या माहेरी , आजी , आत्त्या ,  मावशा , मैत्रिणी सगळ्यांना खूप कौतुक होतं . तर इकडे आमचा पंचकन्या परिवार ,  काका-काकी  , आत्या , मैत्रिणी , माझे सासर माहेरचे सगळे ग्रुप अगदी कौतुकाने मेसेजेस फोन करत होते . नविन सुनबाईसोबत व वयस्कर सासुबाईंबरोबर  सगळ्यांना छान वाटत होतं . पिढ्यानपिढ्या हे सण तितक्याच  उत्साहाने , श्रद्धेने मनापासून करण्याची रीत आहे लहानपणी माहेरच्या आंगणात आईच्या शिस्तीत मायेच्या उबीत तर लग्न झाल्यावर सासरी थोडंस जबाबदारीने सासूबाईंच्या पद्धतीने घरोघरी हा सण साजरा केला जातो . त्याच परंपरेत नाविण्यपुर्ण पद्धतीने नविन पिढीला अलगदपणे सामावून घेणं , वसा देणं त्यापासून मिळणारं समाधान नव्या पिढीला  आधोरेखीत करणं ही आपली जबाबदारी आहे , संस्कृती आहे . तीची जपणूक तर व्हायलाच हवी ! आजकाल कामं तर  सगळ्यांना आहेत वेळ नसतो पण वेळ राखीव ठेऊन हे सगळं जसं रुचेल आणि पचेल व झेपेल असं केलं तर उर्जा मिळते हे तर स्वानुभवानेच सिद्ध होते !! आता सध्या सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती असते . अनंतचतुर्दशीला आमच्याकडे बाप्पाचे विसर्जन असते . आता नवरात्रोत्सवापर्यंत थोडंस शांत आहे . माझ्या माहेरी जेष्ठी पौर्णिमेला बेंदूर असतो तर मी लहानपणी आईकडून खूपवेळा  ऐकलं आहे 

" बेंदूर न लागलं सणाचं लेंडूर

दिवाळी न सण ओवाळी "

खरंच आहे हे . यावर्षी मात्र कोरोनामुळे कुटुंबातील माणसं एकत्र राहिली आहेत व सणांमध्ये किती उत्साह असतो याची पुनश्च प्रचीती आली आहे !!!!


क्रमशः भाग 27


आज अनंत-चतुर्दशी , गणपती बाप्पाचे विसर्जन !

गेले दहा दिवस बाप्पाच्या सहवासात , धामधुमीत कसे गेले समजले नाही . नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात पुढच्यावर्षी येण्याचे आमंत्रण देऊन बाप्पाला निरोप दिला .

 आज आशिष-किर्तीला सुट्टी होती पण मला बँक होती . त्यामुळे मी बँकेतुन आले की आम्ही चहा घेत बसलो होतो तेव्हा कीर्ती म्हणाली

 " आमच्या खिडकीत पक्षाने घरटं केलंय आणि त्यात चार अंडी घातली आहेत ."

हे ऐकलं मात्र पण ते केव्हा एकदा  पहाते याची मला खूप उत्सुकता लागली .

पटकन चहा घेतला आणि लगबगीने वरती गेलो . तोपर्यंत अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊन गेले .

" नेमकं कोणत्या पक्षाचं घरटं असेल . आत्तापर्यंत चिमणीचं घरटं पाहिलय पण कीर्तीने अंड्याच्या व घरट्याच्या केलेल्या वर्णनांवरुन तर ते  चिमणीचं तर नसणार मग कोणता पक्षी असेल नेमका तो ? "

तोवर आम्ही वर पोहोचलो . मागोमाग आकांक्षा पण आली . पडदा बाजूला सरकवला तसा पक्षी उडून गेलेला दिसला . मग हळूंच काच सरकवली तर इतकं सुंदर असे बाहेरुन जाड्या भरड्या काड्या वापरुन द्रोणासारखं पण थोडंस अंडाकृती आणि आतून मऊसुत गवत वापरुन अगदी वार्तुळाकार गोल केलेलं घरटं  आणि त्यात अतिशय चमकदार  जांभूळाच्या बियाच्या रंगाची व आकाराने पण तेवढीच चार अंडी ! मुख्य म्हणजे ते घरटं पाहून क्षणभर असं वाटलं ना पट्टी ,  ना टेप , ना कुठलं हत्यार कसं केलं असेल ?  ते तयार करताना या पक्षांनी वास्तूशास्त्र आणि विज्ञान याचा अभ्यास केला की काय ? कारण इतकं खोपचात ते आहे की पाऊस आला तर तो लागणार नाही पण सुर्याची कोवळी किरणे त्यावर नक्कीच पडणार !  ग्रीलच्या आत पण काचेच्या बाहेर , बरोबर स्लाईडींगच्या तीन चॕनलवर अगदी अलगद बनवलेलं आणि त्यात ती अंडी घातलेली ! परमेश्वराची लिला अगाध आहे . कोणत्या विद्यापीठात घेतली पदवी त्यांनी ? ते सगळं पाहून इतकं हरकायला झालं . हे घरटं किंवा अंडी चिमणीचं नाही , हा तर सुगरणीचा खोपा पण नाही मग कोणाचं असेल ?  अशी आम्ही चर्चा करत होतो तर एक चिमणीपेक्षा मोठा पण डोक्यावर तुरा असलेला लांब शेपटाचा काळा पक्षी खिडकीत येऊन इतका जोरात कलकलाट करुन गेला की क्षणभर तो पक्षी आत आला की काय असेच वाटले . पण तो आम्हांला रागवून गेला होता . असं वाटलं की तो म्हणतोय , 

 " हा इलाका माझा आहे . माझं इथे घरटं आहे थोड्याच दिवसात इथे पिल्लू येणार आहे . मला इथे तुमची लुडबूड आजिबात चालणार नाही ".

मग आम्ही हळूच काच बंद केली काचेतून बाहेरचं दिसत होतं . थोड्याच वेळात पक्षीण येऊन घरट्यात बसून गेली . वाटलं जणू काही सगळं अलबेल आहे ना हे पहाण्यासाठी ती येऊन गेली असावी . 

हे सगळं पाहून आम्हांला इतका आनंद झाला की त्याचे फोटो काढून आम्ही स्टेटस टाकले होते . तोपर्यंत पक्षी कोणता याची शोधाशोध सुरु होती . बाहेर जाऊन खिडकीखाली बसले व घरट्याभोवती घिरट्या घालणाऱ्या पक्षाचे निरिक्षण करत बसले . बुलबुल असावा असा तर्क चालू होता तेवढ्यात माझ्या स्टेटसला एका मैत्रिणीकडून 

" व्वा बुलबुलचं घरटं !" 

असा रिप्लाय आला . मग आम्ही गुगलवर 

" बुलबुल पक्षाचे घरटे " 

शोधले आणि अगदी आमच्या खिडकीतल्या घरट्याप्रमाणे अंड्यासहीत घरटी दिसली . मग ते घरटं आणि अंडी बुलबुलची आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. 

मला खूप काळजी वाटतेय त्या अंड्यांची . खूप उंचीवरआहे ते घरटं ,  त्या पक्षांच्या जोडगोळीला त्या खिडकीतच दाणापाणी ठेवावे का ? का तांदूळ ठेवले तर ते खायला इतर पक्षी येतील ? आणि माणसाची चाहूल लागते म्हणून हे पक्षी अंड्याकडे फिरकलेच नाहीत तर ??

छे छे ! असं होता कामा नये म्हणून मी मुलांना खिडकी उघडूच नका म्हणून सांगितले ! पण डोळ्यासमोरुन ते घरटं आणि अंडी हालतच नव्हती . खरं तर हे सगळं नैसर्गिक आहे . त्याची एवढी चिंता करण्याची गरजच नाही . किती पक्षी आणि किती घरटी असतील पण ते अगदी घरातच आल्यामुळे एवढी उत्सुकता वाढली हे खरं !   सकाळी उठल्या बरोबर आधी पक्षी घरट्यात येऊन बसल्याची कीर्तीकडून खात्री करुन घेतली आणि जीव भांड्यात पडला  आणि आता त्याला अजिबात विचलीत करायचं नाही असे ठरविले आहे . पुन्हा संध्याकाळी आतूनच पक्षी आहे का खात्री केली . कीर्ती म्हणाली

" दिवसभर  दिसत होता पक्षी  मधूनमधून चक्कर मारुन यायचा पण  आहे . "

बरं वाटलं चला म्हणजे आपला त्याला डिस्टर्ब नाही होत तर . मग मी गच्चीत गेले . तिथुन मात्र पक्षी उडाले की स्पष्ट दिसत होते  बुलबुलचंच प्रेमी युगूल होतं ते . मधुनच आंब्याच्या , रामफळाच्या ,  चिक्कूच्या झाडावर फेरफटका मारुन परत घरट्यात  येऊन बसत होते ते .

 " अच्छा असं आहे तर . सगळ आलबेल आहे की यांच चालूदे आता आपला त्यांना काही त्रास होणार नाही न ?"

फक्त  हे पहायचं मी ठरवलं . मला एकदम हलकं हलकं वाटलं , प्रसन्न वाटलं . सुमन कल्याणपूरकरचं गाणं गुणगुणावासं वाटलं.


" पक्षीणी ,

प्रभाती चारियासी जाये

पिलू वाट पाहे उपवासी "


हे चित्र दिसू लागलं 

मग खाली येतांना सगळ्यांना सक्त ताकीद देऊनच खाली आले . खरं तर हा सगळा कोरोनाचा परिणाम आहे . ब-याच वर्षांनी प्रदूषण नाही , गर्दी नाही , कलकलाट नाही त्यामुळे निसर्ग मात्र खूष आहे . शांततेमुळे पक्षी प्राणी मनसोक्त विहार करु लागले आहेत . 

        यावरुन मला माझे कॉलेजचे दिवस आठवले . माझी शेवटची दोन वर्षे सांगोल्यात झाली . तेव्हा मी आत्त्याकडे रहायला होते . आत्या ,  त्यांचे यजमान त्यांना आण्णा म्हणत असत दोघेही म्हातारे झाले होते . त्यांची मुलगी मंगल , नातू अतुल व मी रहायचो . खूप जुना धाब्याचा  दगडी वाडा होता तो ! वाड्यात  पाच भाडेकरु होते.  हे जुने भाडेकरु होते मग त्यांच्यात वाद होता त्यामुळे जागा सोडत नव्हते म्हणून घरमालकांनी यांची लाईट बंद केली होती . वाड्यात अगदी कोपऱ्यात तीन फूट रुंदीच्या आंधा-या लंबुळक्या बोळातून गेलं की आत्याच्या घरात प्रवेश व्हायचा ! दोन अंधाऱ्या खोल्या आत स्वयंपाक घर कोपऱ्यात न्हाणीघर बाहेरची एक खोली त्यात पण शेतमालाची पोती असायची . पावसाळ्यात ओल यायची .  दिवसा वाचायचं असेल तरी उजेडासाठी समोरच्या दारात किंवा सवण्याखाली बसाव लागायचं व रात्रीचा अभ्यास तर कंदिलावर ! घेरडीत सगळ्या सुखसोई होत्या पण शिक्षणाची सोय नव्हती आणि मुलींना बाहेर एकटं ठेवणे त्या जमान्यात मान्य नव्हते मग आम्ही पण काहीच तक्रार करत नव्हतो शिकायला मिळतं हाच आनंद होता . मायडीपासून शिकायला बाहेर गेलो आम्ही . सुरुवातीला तायडीकडे किर्लोस्करवाडीला व पुढे आत्याकडे सांगोल्याला . आत्त्याचा वाडा मोडकळीस आलेला होता व भरपूर कपारी होत्या त्यामुळे पक्षी बरेच असायचे . कधी कधी पिल्लं पण दिसायची . खूपदा वाड्यात साप पण निघायचे आणि घर शेणानं सारवलेलं असायचं व भिंती पण सारवायच्या होत्या उंदीर असायचे त्यामुळे घरात बीळं व्हायची आणि मग धग वाढली की विंचू निघायचे . रोज दुपारी बीळं बुजवाचं काम आत्त्या करायच्या . त्यांच्या घरात  सगळ्यांना ती सवय झाली होती मला मात्र ते नविन होतं . विंचू निघाला की आण्णा किंवा मंगल तो कातडी चप्पलने मारत असत . मी मात्र धूम ठोकायची विंचू मारल्याची खात्री झाली की मग घरात यायचे तर लगेच आण्णा नाकातून मोठा आवाज काढत म्हणयचे


" उंदीर म्हणती माझे घर

पाल म्हणती माझे घर

ढेकूण म्हणती माझे घर

विंचू म्हणती माझे घर  "


माझी मात्र बोबडी वळलेली असायची . 

         आण्णा हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व होते . पंचाहत्तरी ओलांडलेले पण स्वभावाने तापट होते देवाची पूजा करत नसत पण दोनवेळा संध्या चुकत नसे त्यांची . सारखं पद्मासनात बसून डोळे मिटलेले आणि गुंईई असा आवाज सुरु असायचा . प्राणायाम ,  शिरसासन पण करायचे . शेतात चार किलोमीटर चालत जाऊन यायचे . फारसं कोणाशी बोलत नसायचे पण  त्यांच्या मनात बोलायचं असलं की समोर बसायला लावायचे मग इंग्रजीत बोलायचे , ग्रामर विचारुन भांबेरी उडवायचे मधूनच कोणतही स्तोत्र म्हणायचे व मागे म्हणायला लावायचे . एकश्लोकी रामायण व एकश्लोकी महाभारत त्यांनीच पाठ करुन घेतलं . खूप वेळ सोडलं नाही की आत्त्या येऊन म्हणायच्या 

" तिला तासाला जायचंय 

बाहेर तिची मैत्रीण आलीय ".

मग माझा जीव भांड्यात पडायचा ते फक्त आत्याकडे तिरके डोळे करुन पहायचे .

" केलीत का सुटका , पळा "

एवढं म्हणायचा आवकाश मी लगेच पळ काढायची . 

      एकदा रात्री मी कंदिलाच्या ऊजेडात अभ्यास करत बसले होते मार्च महिना असल्यामुळे गरम होत होतं . मंगल जवळ येऊन बसली व म्हणाली 

" शरे , चल वर , धगाटा जास्त आहे , यायचा एखादा विंचू . वर मागच्या भिंतीला लागून लाईटचा पोल आहे , उजेड येतोय तिथं  आभ्यास कर , वाड्यातले सगळेजण वर येतात झोपायला , ऐक माझं  गार हवेत बैस ."

विंचवाचं नाव निघालं की मी घाबरले पटकन उठून उभी राहिले आणि आता दप्तर उचलायची पण भिती वाटू लागली . असला वहीखाली विंचू तर ? मग गयावया करत मी मंगलला मदत मागितली . आणि भित्यापाठी राक्षस म्हणतात तसं पसरलेल्या दप्तराखाली मोठा विंचू होता . माझी पळता भुई थोडी झाली . वर गेलेली सकाळीच खाली आले . 

अशा या प्राणी , पक्षी , किटक असलेल्या  वाड्यात दोन वर्षे राहिले होते मी . आणि कंदिलात व रोड लाईटवर अभ्यास केला .  पण आमच्या  आत्त्या खूप प्रेमळ होत्या . जसं आहे त्यात ताज ताज खायला करुन द्यायचा त्यांचा अटापीटा असायचा . त्यांचा स्वयंपाक चुलीवर असे . मला यायला एक वाजतो म्हणून साडेसातला काॕलेजला जाताना खाऊनच जायचं हा आग्रह असायचा त्यांचा . जोडगहू भरडून गुळ घालून केलेला गोड सांजा किंवा लाल तिखट शेंगदाणे हळद घालून केलेला तिखटाचा सांजा , थालीपीठ , गरम भाकरी  हे ठरलेले पदार्थ आसायचे त्यांचे . थंडीच्या दिवसात गरमगरम खायला मजा यायची . मी येईपर्यंत सगळं काम व्हायचं  त्यांच आणि दुपारी वाड्याच्या दारात येऊन वाट पहात बसायच्या त्या . वाड्यातल्या शेजा-यांना कौतुकाने सांगायच्या 

" आमच्या भावाचं घर खेड्यात आहे पण फरशी आहे तिथं . श्रीमंत बापाची लेक आहे ही . एका निमित्ताने राहिलीय आमच्याकडे  " 

आणि मी घेरडीला गेले की शेणानं सारवण्याचं काम उरकून घ्यायच्या .माहेरचा , भावाचा , भाच्यांचा एवढ्या म्हातारपणी सुद्धा इतका अभिमान !!!

एका बुलबुलच्या घरट्याने काॕलेज जीवनातील पक्षी , प्राण्यांच्या सहवासातील गोड , भितीदायक प्रसंगाची आठवण झाली . सध्या या पक्षांचा गोड आवाज आता प्रकर्षाने जाणवतो . वाढलाय असे वाटतेय . आता ही पिल्ल कधी होतील , कशी आसतील , किती दिवस त्यांचा मुक्काम आमच्या खिडकीत असेल याविषयी मात्र उत्सुकता लागली आहे हे खरं !!


क्रमशः भाग 28


        आशिष-किर्तीला बार्शीला येऊन सहा महिने पुर्ण झाले . येतांना अगदी हो-नाही करत आले होते आणि आलं की परत जाणेच झाले नाही त्यामुळे घरात कायकाय झालं असेल , नुकतच फर्निचर केलय धूळ कितपत झाली असेल ,  पेपरचा ढीग पडला असेल काय , फ्रीजची परिस्थिती कशी आहे हे सगळे प्रश्न सतावत होते . त्यात दोघांच्याही कंपनीने आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोवर  WFH च करावे असे सांगितले . आता प्रवास पण सहजासहजी करता येत होता  त्यामुळे पुण्याला एखादी चक्कर मारुन आलेल बरंच होईल म्हणत भाज्या आणि आठवडाभरासाठी लागणारं सगळं सामान गाडीत टाकून आजच ते दोघं पुण्याला गेले आणि घर एकदमच रिकामं रिकामं वाटायला लागलं . घरात काही कामच नाही आणि असलं तरी करावसं वाटेना .

          आज जवळजवळ तीन आठवडे झाले आमचं आख्ख कुटुंब बुलबुलभोवती रुंजी घालत होत . काल पिल्लं घरट्यातून उडाली आणि बुलबुल प्रकरणावर पडदा पडला .  बुलबुल पक्षी एवढंच माहिती होतं . तसं बुलबुलला इतक्या जवळून न्याहाळण्याचा पहिलाच प्रसंग ! त्यामुळे त्यांच्या सवयी किंवा त्यांच्याविषयी काहीही  माहिती नव्हती . पण या 15/20 दिवसात सतत त्यांचा वेगवेगळ्या मुडमधला  किलबीलाट ऐकून त्यांचा आवाज  ओळखीचा झाला होता . सकाळ संध्याकाळ ते ऐकण्यासाठी माझे तर कान आसुसलेले असायचे त्यांच निरिक्षण करण्यात मन रमायचं . त्यांच उडणं , पिल्लांना भरवणं , पिल्लांच्या रक्षणासाठी माणसं किंवा मांजर दिसलं तर जोरजोरात कलकलाट करणं आणि आवडता खाऊ मिळाला तर आनंदाने किलबील करणं प्रत्येक आवाज न्याराच  असायचा . पुन्हा एकदा खात्री पटली की परमेश्वराची लीला अगाध आहे ! निसर्ग भन्नाट आहे ! त्याचा पण आनंद आपल्याला लुटता आला  पाहिजे . 

        सुरुवातीला घरट्यात अंडी पाहिल्यानंतर 1/2 दिवस फक्त खिडकी उघडून पाहिली होती मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून पुन्हा मात्र त्यांना आम्ही काचेतूनच पहात होतो . पण हळूहळू त्यांना पण आमची सवय झाली होती . सुरवातीला पडदा थोडासा जरी हलला तरी उडून जाणारी ती आता आमचा आवाज आला तरी आरामात घरट्यात  बसून रहायची . 2/3 दिवस तर एखादी चक्कर मारायची नाहीतर सतत घरट्यातच बसलेली असायची . आणि 9 तारखेला सकाळी आम्हांला थोडीशी किलबील जाणवली आम्ही आतूनच आंदाज घेत होतो . बहुतेक पिल्लु झालंय असे वाटत होते . मग दुपारी ती उडून गेल्यावर या मुलांनी हळूच खिडकी उघडून डोकावलं तर डोळे बंद असलेलं एकदम  छोटंस एक लाल पिल्लु दिसलं . आशिषने शिळ घातली  तसं लालबुंद चोच उघडून आ केलं की त्याची मान लकलक  हलत होती आणि असा भास होत होता  की जणूकाही ते म्हणतंय

" मला खाऊ , मला खाऊ "

एका सेकंदात तर लगेच त्याचं मुटकुळ झालं पण त्याच्या उघडलेल्या चोचीचं दृष्य इतकं लोभसवाणं दिसत होतं की हरकायला होत होतं .त्या  दोघांचेही अथक परिश्रम सुरु होते . चोचीत चारा घेऊन यायचं  त्याला भरवायचं पुन्हा चारा आणायला जायचं . पण एकावेळी ते दोघे बाहेर जात नसत . एकजण ग्रीलवर , पाईपवर बसलेला असायचं . चारा घेऊन एकजण आलं की दुसरा जायचा . मधुनच बुलबुल पिल्लाला उब देण्यासाठी  घरट्यावर पंख पसरुन बसून रहायची . पुन्हा संध्याकाळी किलबील जराशी  वाढल्या सारखी जाणवत होती मग संध्याकाळी मी घरी गेल्यावर ती नाही असे पाहून पुन्हा एकदा हळूच  काच सरकवली व शिळ घातली तर दोन पिल्लांनी चोच उघडून मान वर  केली . दोन अंडी अजून तशीच होती . इतक गोड दृश्य दिसत होतं ते  पटकन फोटो , video काढला तोवर बुलबुल जोरात आवाज करत ग्रीलजवळ येऊन गेली . जणू ती आम्हांला रागवतेय असे वाटले मग आम्ही लगेच काच बंद केली . त्यानंतर आम्ही छोटीशी सफरचंदाची फोड हळूच  घरट्याजवळ ठेवून काच बंद केली तर लगेचच बुलबुल येऊन बसली स्वतः 3/4 वेळा फोड चाखून पाहिली जणूकाही तिने खात्री केली की 

" माझ्या पिल्लांना हे चालेल न "

 मग दोन्ही पिल्लांना तिने आनंदाने आळीपाळीने भरवले व फोड चोचीत घेऊन उडून गेली . बराच वेळ ती परतच आली नाही मग उगाचच शंकेची पाल चुकचुकली 

" काय झालं बाबा ? आपण पिल्लाला खायला घालतो असे तर तिला वाटले नसेल ? आणि परत आलीच नाही तर ? "

 अंगावर काटाच आला , तिथंच बसले तर जवळजवळ पाऊण तासांनी बुलबुल परत ग्रीलवर येऊन बसली . तिला पाहून मला खूप आनंद झाला . आंम्ही जवळच गप्पा मारत बसलेलो होतो तर तिने काचेवर चोचीने टकटक केले . गेल्या आठदहा दिवसांत कधीच हा अनुभव आला नव्हता  मग आम्ही आंदाज बांधला तिला सफरचंद हवे आहे . मग पुन्हा फोड ठेवली तर  पुन्हा तोच अनुभव आला ती थोड खायची थोडंस पिलांना भरवायची व फोड घेऊन उडून जायची असे दोन तीन वेळा झाले .

      दुसरे दिवशी सकाळी पिलांचा किलबीलाट जरा  आणखीनच  वाढला होता पुन्हा पाहिलं तर तीन पिल्लं दिसली . अजून एक पिल्लू दिसायला हवं होतं आम्ही वाट पहात होतो . आता मात्र चारा भरवण्यासाठी त्या दोघांचे खूप हेलापाटे होत आहेत असं वाटायच मग आम्ही पण जरा सफरचंदाच्या जास्तच फोडी ठेऊ लागलो . पुन्हा एकदा  मोसंबीची फोड ठेवली तीने ती चाखून पाहिली पण पुन्हा तोंड लावलं नाही पिलांना पण भरवलं नाही ती फोड तशीच ठेवली मग आम्ही पण ती काढून टाकली पुन्हा सफरचंदाचीच ठेवली तर स्वतः खाऊन पिल्लांना भरवून फोड घेऊन ती उडत जायची तोच अनुभव सारखा येत होता . ती फोड कुठे नेऊन ठेवते याचं आम्हांला कोडं पडत होतं . मग मी गच्चीत जाऊन पाहिलं तर ती मागे शेतात बदामाच्या झाडावर जात होती . आता त्यांना आमची सवय झाली होती ते घरट्यात नाहीत असे पाहून आम्ही जरी  खिडकी उघडली तरी फारसा दंगा करत नसत . पिल्लं मात्र शिट्टी वाजवली की तोंड वर करुन चोच उघडून किलबील आवाज करायची पण डोळे बंदच होते . पहिलं पिल्लू दोनच दिवसात मोठ वाटू लागलं तर तिसरे दिवशी त्यांच्या अंगावर काळे केस दिसू लागले .  घरट्यात तळाशी बसलेली पील्लं वरवर येतात असे वाटू लागले . चार दिवासात तर पंख दिसु लागले . जागच्या जागी ती भरपूर हलचाल करायची चौथं पिल्लू मात्र दिसलं नाही . या तीनमध्ये पण एक जरासं मोठं दिसायचं व दुसरी दोन लहान वाटायची . त्या द्रोणाएवढ्या घरट्यातसुद्धा मोठं पिल्लू या छोट्यांना आत ढकलून स्वतः  वर यायचं ! आम्हांला भारी मजा वाटायची पहायला , पण भिती पण वाटायची हे जर बाहेर आलं तर खालीच पडेल म्हणून  . मुख्य म्हणजे त्यांना पंख फुटले की ते गोजिरवाणे दिसेनात    काळे काळे पीस दिसत होते पण शेवटी परमेश्वराची लिला ती ! असणारच काहीतरी असे वाटायचे .

पाच दिवसाची पिल्लं मात्र चांगलीच मोठी वाटू लागली छोटे छोटे पंख दिसत होते . अगदी कोंबडीच्या जन्मलेल्या छोट्याशा  पिलाएवढी ती दिसू लागली . घरट्याच्या काठापर्यंत पिल्लं दिसू लागली . दाटीवाटीने एकमेकांना ढकलून शिट्टी वाजवली की तिन्ही पिल्लं चोच उघडून गोड आवाजात किलबील  करायची . तासंनतास रमायला व्हायचं . मी तर एवढ्या गडबडीत पण सकाळी 10/15 मिनीटं आणि संध्याकाळी एक तास वरच असायची . आता 1/2 दिवसात ही चालत बाहेर येतील की काय असं वाटत होतं . सहावे दिवशी मात्र मला संध्याकाळी उशीर झाल्यामुळे पहाता आलं नाही . पण आज मात्र डोळे उघडले होते ,  शिटी वाजवली की डोळे उघडून पहायचे व लगेच डोळे झाकून निवांत झोपायचे तर फक्त त्यांची आई आली तरच चोच उघडायचे . आज घरट्यातच पंख पसरुन जागेवर उडी मारल्या सारखे करत होते . हे सगळे अपडेट्स मला घरी गेले की मिळाले . सहाच दिवसांत कित्ती शहाणपण ते ! असे मला वाटले अजून आठदहा दिवस तर नक्कीच रहातील इथे ग्रीलवरृ उड्या मारायला जागा आहे फक्त खाली पडायला नको . असा विचार करत मी झोपले . रात्रभर गडगडाटासह  खूप पाऊस झाला . झोपेतच ती पिल्लं मला डोळ्यांसमोर दिसू लागली . पाऊस तिरका असेल तर भिजलं  असेल का घरटं ? असा विचार करत मी सकाळी पिल्लांना पहायला गडबडीने वरती गेले तर घरट्यात दोनच पिल्लं ! बापरे पडलं की काय एक पिल्लू असं वाटलं . खाली जाऊन खिडकीखाली पाहिलं पण तिथेही पिल्लू  दिसलं नाही .  नेलं का काय दुसरीकडे ? पण कसं नेलं असेल . माझी अस्वस्थता वाढली  विचार करतच मी  बँकेत आले तर मुलांनी अर्ध्या तासातच मला  मेसेज केला की घरटं रिकामं आहे पिल्लं नाहीत . मुलं पण पिल्लं पडली असावीत म्हणून खाली बोळात पळत गेली तर दोन पिलांना ते दोघे उडायला शिकवत होते व ती पील्लं मस्त उडत होती . बोळात मात्र कोणालाच येऊ देत नव्हती प्रचंड कलकलाट करत तोंडाजवळून जात होती . आता मात्र घरट्यात येतील का नाही याची शंका होती . मग मुले पण त्यांना विचलीत करायला नको म्हणत घरात आली . एकदोन तासात बोळातला आवाज बंद झाला पाहिलं तर सर्वजण उडून गेले होते . दुपारी दोनतीनवेळा बुलबुल मात्र घरट्यात येऊन सफरचंद घेऊन गेली . घरट्यात तळाशी एक अंड तसंच राहिलं होतं .  त्यासाठी येत होती का काय माहित नाही . आता मात्र एकएक गोष्टीचा उलगडा होत गेला नक्कीच यांनी कुठेतरी पिलांसाठी घरटं बनवलं असणार . जसं मांजर पिलांची जागा बदलते तसं पक्षी पण बदलत असणार . निसर्गाची किमयाच न्यारी आहे त्याचा ठाव घेण इतकं सोपं नाही. सगळ्यांना खूपच सुनसुनं वाटत होतं . संध्याकाळी मी गच्चीत जाऊन बसले तर ते दोघेही आंब्याच्या झाडावर दिसत होते मधूनच लांबच्या बदामाच्या झाडावर जात होते आवाज ओळखायला येत होता . नक्कीच त्यांच पिलांसाठीच नवं घरटं बदामाच्या झाडावर असणार . कारण अजून त्यांना निवा-याची गरज आहे असे मला वाटते आहे . आकाशात भरारी घेण्याइतपत पंखात बळ आलं की पील्लं ते घरटं सोडून आपोआपच  जातील हे नक्की ! 

आज मात्र पील्लं घरट्यात नाहीत म्हणून थोडीशी हूरहूर , थोडीशी चुटपूट लागली पण त्यांनी भरारी घेण्यासाठी पहिला धडा गिरवला याचा पण आनंद आहे . मुख्य म्हणजे जवळून पहाण्याचा आनंद आम्हाला मिळाला त्याचे अनेक फोटौ व video संग्रह करता आला हेही नसे थोडके

!!!





क्रमशः भाग 29



           परवाच आठ दिवसांसाठी आशिष-किर्ती पुण्याला जाऊन घरातील थोडी स्वच्छता करुन  आले . एकूणच पुण्यातील वातावरणात व बार्शीच्या वातावरणातील बदल त्या दोघांनाही प्रकर्षाने जाणवला . पुण्याच्या मानाने बार्शी जरा जास्तच सुरक्षित वाटलं . तसेच मोठ जीघर , मोकळं आंगण , मुख्य म्हणजे घरात असल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॕनेज होऊ शकतात याची पुनश्च प्रचिती आली !

           इकडे आम्हांला पण अगदीच सुनंसुनं वाटत होतं . हे दोघे आल्यावर पुन्हा घर भरल्यासारखे वाटले . साधारणपणे तीन आठवडे वेड लावून बुलबुलने तिच्या पीलांसह  मागच्या आठवड्यात पलायन केले होते . तेही पचनी पडायला जरा जडच गेलं .

पक्षांच्या निरिक्षणाचा जरा नादच लागल्यासारखं झालं होतं मला . दोनतीन दिवस तर बँकेतून घरी गेल्यावर मी त्या खिडकीजवळ जाऊन बसायची सफरचंदाची फोड ठेऊन आता येईल बुलबुल म्हणत उगाच वाट पहात .......        पण पुन्हा काही ते फिरकले नाही.......                                       पहिल्या दिवशी तर मी गच्चीत जाऊन बसले . झाडावर बुलबुलची जोडी दिसली . उगाचच मला वाटलं हीच ती असावी .......

थोड्या वेळानं छोटी पीलं उडतांना दिसली . आपल्यात होती तीच असतील का ? येईल का पिलांना घेऊन  खिडकीत ती ? अशी मनाची घालमेल झाली .

पण पुन्हा मनाची खात्री पटली आकाशात स्वच्छंदी विहार करणारे जीव आहेत हे ! असे थोडीच घरात रमतील ते ? यांनी असंच बागडावं आणि आपण फक्त आनंद लुटावा . पण उगाचच  अस्वस्थता , चुटपूट मात्र लागत होती .

           दुसरे दिवशी सकाळी अगदी उजाडत असतांनाच बाहेर कट्ट्यावर जाऊन  बसले . पक्षांचा इतका किलबीलाट ,  चिवचिवाट ऐकायला येत होता .  हे निसर्गाचे खरं रुप अनुभवायला खूप मस्त वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होत .

            सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही या घरात रहायला आलो त्यावेळी या परिसरात पक्षांचा खूपच वावर होता . पोपट तर थव्यांने येत असत . झाडांवर निरनिराळ्या रंगाचे पक्षी दिसायचे . एकदा चिमणीनं घरटं केलं होतं . तेव्हाही असाच नाद लागला होता . पण हळूहळू माणसांची वर्दळ वाढत गेली . पाऊसमान कमी होत गेलं . वाहनं वाढली प्रदूषण वाढलं आणि नकळत पक्षांचा वावर कमी होत गेला . तुरळक प्रमाणात पक्षी दिसायचे .

          यावर्षी कोरोनामुळे माणसाचे  जगणं मुश्कील झालं आहे पण निसर्ग खुलला आहे . पक्षी , प्राणी यांना जणू पर्वणी लाभल्यासारखं झालं आहे . त्यांचा मुक्त वावर , मुक्त संचार अनेक ठिकाणी दिसून येतोय . पाऊस तर जूनला जो सुरु झालाय तो अजून थांबलेला नाही . प्रत्येक नक्षत्राचा व्यवस्थित पाऊस आहे . ओढेनाले  भरुन वहाणं , रस्ते बंद होणं हे प्रकार आलीकडे बंद झाले होते , ऐकीवात  येत नव्हते . पण सध्या चित्र बदललंय पावसाचं वातावरण अगदी चाळीस  वर्षापूर्वी प्रमाणे झाल्यासारखे वाटत आहे .

            परवाच जवळजवळ चाळीस वर्षांनी घेरडीत प्रचंड पाऊस झाला . मारुतीच्या पायरीला पाणी लागलं . शेताचे बांध तुडूंब भरले होते . गावाचा संपर्क तुटला होता  त्या पावसाचे राखीने केलेलं वर्णन , फोटो , व्हीडीओ पाहून मला आमच्या  लहानपणीची आठवण झाली .  त्याहीवेळी मारुतीच्या पायरीला पाणी लागले होते . त्या काळात ब-याचदा असा पाऊस होत असे  मग सगळीकडे पाणी पाणी व्हायचं . आमचं धाब्याचं घर असल्यामुळे माडीवर एकदोन महिन्यात गवत वाढायच . मग गवत काढणं झालं नाही की मुळं पाणी धरायची मग घर गळायला लागायचं . वाड्यातल्या मधल्या अंगणात पाणी साठायचं थोडासा  पाऊस आला की वहायला लागायचं मग आम्ही त्यात कागदी होड्या सोडायचो त्या एकमेकांना धडकल्या की कल्ला  करायचो . खूप पाऊस झाला की पा-याचं तळं भरायचं मग तळ्याची सांड सोडली जायची ते पाणी ओढ्यात यायचं मग ओढ्याचा पूर जरी ओसरला तरी पुढे बरेच दिवस पाणी वहातं रहायचं . उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी , विद्या अशा वाड्यातल्या सगळ्यांबरोबर ओढ्याला धुणं घेऊन जायला मजा वाटायची . ओढ्याच्या काठावर खरबरीत दगड मांडलेले असायचे दगड पकडायचा आणि धुणं धुवायचं . लांब कपडे किंवा साडी धुवायची आणि एका बाजूला पकडून वहात्या पाण्यात सोडून ती चुन्या करताना ओढायची हे तर  धुण्याचं काम न वाटता तो खेळ वाटायचा .

      पा-याच तळं हा एक आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता . दरवर्षी शाळेची सहल गाजून गाजून एकतर बनाळीला जायची नाहीतर तळ्यावर जायची . 1972 च्या दुष्काळात बांधलेले हे तळं आहे . पारे गावापासून जवळच  आलीकडे हे तळं आहे . घेरडीपासून पाच किलोमीटरवर असेल . आम्ही मुली रोज जाणाऱ्या बसने जायचो एखादे सर बरोबर असायचे मुलं सायकलवर यायची . सगळ्यांनी तळ्यावर एकत्र भेटायचं ! अशीच एकदा जतहून येणारी बस खूपवेळ आली नाही नंतर ती पंक्चर झाल्याचे समजले तर वाट न पहाता सरळ चालत परत यायचं सरांनी ठरवलं त्याप्रमाणे आम्ही चालत आलो मात्र पाय खूप दुखले . 

            साधारणपणे दिवाळी झाली की सहल ठरायची आपापला जेवणाचा डबा व पाणी घेऊन जायच . तळ्याच्या काठावर उंच टेकडीवर टुमदार कौलारु गेस्ट हाऊस आहे . गेल्याबरोबर आख्खा परिसर फिरुन यायचं . खूप पाणी असेल तर सांडवा सोडलेला असायचा त्याचं पाणी घेरडीच्या ओढ्यात मिळायचे . तळ्यात छोट्या छोट्या मासळ्या असायच्या . पक्षांचे थवे पाण्यावर उतरतांना पहायला मजा यायची . हे करत असतांना भरपूर दंगामस्ती व्हायची मग थकून भागून गोलाकार बसायचं . जेवणं व्हायची मग थोडावेळ बसूनच गाणी-भेंड्या मग खेळ व्हायचे मग सगळ्यांना ओळीनं बसवून प्रत्येकवेळी शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही भाग वाईकर सर अगदी जोशात कथाकथन स्वरुपात सादर करत असत . ते ऐकताना अगदी स्फुरण आल्यासारखे होई  . मग संध्याकाळी परत घरी यायचं . कधीकधी वाड्यातील व भजनी मंडळातील  सगळ्या बायका जायच्या  . त्यांच्याबरोबर आम्हांला जायला मिळत असे . यावेळी आई सगळ्यांना पुरेल एवढा मोठा डबा भरुन तिचा स्पेशल रावणभात घ्यायची . सगळे अगदी खूश असायचे . 

         पुर्वी अगदी आषाढ महिन्यातच धुव्वादार पावासाला सुरुवात होत असे त्यामुळे सगळीकडे हिरवळ असायची . दिंडी हाही घेरडीत  एक आनंददायी सोहळा असे . आषाढी  एकादशीसाठी कर्नाटकमधून पंढरपूरला निघालेल्या दिंडीचा घेरडीत एक मुक्काम असे . दिंडी आली की पहिल्यांदा ती आमच्या वाड्याच्या बाहेरच्या चौकात यायची . दिंडीचे मानकरी डोंगरे होते त्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा वाडा होता . दोन दिवस आधीच वाड्याची आसपासची स्वच्छता होई . डोंगरे वाड्यात आडाजवळ एक मोठा दगडी हौद होता तो धुऊन भरण्यासाठी एक गडी दिवसभर असायचा . वारक-यांची मुक्कामाची सोय शाळेत केली जायची त्यामुळे त्यादिवशी सकाळीच शाळा भरायची व आकरा वाजता सुटायची दुपारी दोन वाजल्यापासूनच दिंडीतले काही लोक स्वयंपाकासाठी पुढे आलेले असायचे . मग आसपासच्या घरातून तवा-परात , पोळपाट लाटणं घेऊन जायचे ते कन्नड बोलत असत मग खूणेनेच हवी ती भांडी मागायचे आम्ही मुद्दाम काहीतरी बोलायचो तर ते पण कन्नडमध्ये बोलायचे . दोघांनापण एकमेकांच्या भाषा समजायच्या नाहीत मग ते हसत हसत निघून  जायचे . भात-पिठलं भाकरी ते दगडाच्या चुली मांडून करत आणि गावाक-यांकडून त्यांच्यासाठी लाप्शी केली जायची . त्यासाठी मोठा चर खांदला जाई बैलगाडीतून मोठाली लाकड आणून त्यात टाकली जायची व जवळजवळ दहा फुटाचा घेर असलेली तीन फुट उंचीची काईल त्या चरावर चढविली जाई व  त्याच्यावर आधण ठेवलं जायचं . भरडलेले गहू पोत्यात असायचे व गुळाच्या ढेपा असायच्या . काईल चढवतांना , आधणात पोत्यांनी भरड ओततांना मोठ्यांदा विठूनामाचा जयजयकार व्हायचा तो लांबपर्यंत ऐकायला यायचा . हे पाच वाजेपर्यंत झालेलं असे तोवर पायी दींडी आलेली असायची . स्वागतासाठी गावातलं भजनी मंडळ तयार आसायचं . चार वाजल्यापासून आम्हा मुलांचे दिंडीच्या  आवाजाचा वेध घेत दिंडी कुठंपर्यंत आली हे पहायला हेलपाटे असायचे . समोरच्या बोळात दिंडी दिसली की आनंदीआनंद होई . ताईआत्त्याच्या कट्ट्यावर  आम्ही वाड्यातले सगळे तर गावातले लोक बोळातल्या घरांवर , कट्ट्यावर जशी जागा मिळेल तसे दाटीवाटीने उभे रहायचो . दुतर्फा रांगेत मोठ्या दिमाखात दिंडीचं आगमन व्हायचं सुरवातीला त्यांचे स्वयंसेवक त्यांच्यामागे डोक्यावर  तुळशीवृंदावन ,  तुळशीचा हार घातलेल्या मुर्ती घेऊन काही बायका मग विविध वाद्य वाजवत भजन करत येणारं मंडळ आणि मागे वारकरी आसायचे . चौकात मोठा गोल करुन हे मंडळ आणि मुख्य वारकरी उभे रहायचे आणि स्थानीक मंडळ आणि दींडीचं मंडळ गोलाकार उभे रहायचे टाळाच्या ठेक्यावर नाचत आतबाहेर पावलं टाकत  तल्लीन होऊन भजन चाले . असा तो नेत्रदिपक सोहळा पार पडत असे . मग आर्ध्या तासांनी आसपासच्या घरांमधून कळशा भरुन चहा यायचा . त्याचं सगळ्या वारक-यांना वाटप व्हायचं . थोडावेळ इकडेतिकडे झालं की पंगत बसायची तयारी सुरु व्हायची इकडे लाप्शीचा घमघमाट सुटलेला असायचा . कधीकधी प्रसाद म्हणून त्याची चव पण घेतली आहे . आम्ही उगाचच इकडूनतिकडे जणू काही घरचं कार्यच आहे अशा थाटात फिरायचो . पुर्ण बोळात काठ्या पुरुन लाईटची व्यवस्था केली जायची . दुतर्फा पंगत बसायची . दोनतीन पंगतीत त्यांची जेवणं व्हायची . जेवलेले लोक झोपायला पटकन निघून जायचे . रात्री सगळं संपायला दहा आकरा व्हायचे . नेलेली भांडी ते लोक रात्रीच परत आणून द्यायचे . अशात पाऊस आला की फजिती व्हायची . सगळ्यांची झोपायची सोय शाळेत केली जायची कधी कधी जागा पुरली नाही तर कोणाच्याही ओसरीवर त्याच्यातले मुख्य वारकरी येऊन झोपायचे . पहाटे तर दिंडी गेलेली असायची . असा तो दिंडी सोहळा पार पडायचा  .






क्रमशः भाग 30


         चैत्री पाडव्यापासून अगदी श्रावण महिन्यापर्यंत असे वाटायचे की आशिषचे नविन लग्न झालंय कोरोनामुळे बरेचसे सण मिळाले आणि आता तोंडावर आलेले पण बरेचसे सण आहेत . कंपनीने बोलावलं तर जावं तर लागणारच पण पुन्हा सणासाठी येता येईल का ? रजा मिळेल का ? असे प्रश्न पडायचे . पण बघत बघत गौरी-गणपती झाले , नवरात्र-दसरा  झाला आणि आता दिवाळी आली . यामध्ये सगळ्या सणांबरोबर नृसिंहाचं व देवीचं नवरात्र  कुलधर्म कुलाचार पण पाहण्यात आला ह्याचं समाधान वाटलं . गेल्या आठ महिन्यांपासून सगळे एकत्र रहातोय . पाहुणे मंडळी बोलावता आली नाही पण घरच्याघरी का असेना सगळे सण अगदी यथासांग पार पडले . साग्रसंगित स्वयंपाक आणि छानपैकी आवरणे हे दोन अगदी अलिखीत नियम झाले होते . माझं बँकेत जाणे आणि काही  कामिनिमीत्त यांच बाहेर जाण याव्यतिरीक्त सुरुवातीला सहा महिने कोणी घराबाहेर पडलेच नाही . अगदी सुरुवातीला कलिंगडाच्यावेळी शेतात जायचं असे आमचे ठरले होते पण तेव्हा तर लाॕकडाऊनचे एकदम कडक  नियम लागू  झाले . आणि मार्चपासून अनेकदा शेतात जायचा आम्ही प्लॕन करायचो आणि काही न काही कारणांमुळे जाणं कॕन्सलच व्हायचं . एकवेळेस तर पहाटे उठलो पण पावसाचा इतका जोर होता की परत कॕन्सल करावं लागले . परवाच्या रविवारी मात्र खूप दिवसांपासून ठरवत असलेला प्लॕन यशस्वी ठरला . आकांक्षाचं शेड्यूल बीझी असल्याने ती आली नाही मग आम्ही चौघेजण निघालो . बरोबर आल्याचा चहा घेऊन सकाळी सव्वासहाला आम्ही घरातून बाहेर पडलो कारण आशिषला गावाबाहेर छान हिरवळ असेल तिथे सुर्योदयाच्यावेळी थांबायचे होते . कॕमेरा घेऊन तो सज्जच होता . मग आम्हीपण पाऊण तास ती सकाळ उगवता सुर्य न्याहाळत अगदी रोडवर घालवली . थंडी होतीच त्यामुळे गरमागरम चहा प्यायला मजा आली . निसर्गाच्या सानिध्यात आमचे पण फोटो आले ! रमत गमत आम्ही साडेसातला शेतात पोहोचलो . वाटेकऱ्याची बायको सुनिता तिची चूल पेटलेली होती तिने लगेच चहा केला . सकाळी जरी हवेत गारठा वाटत असला तरी दहाच्यापुढे ऊन चांगलंच तावत होतं त्यामुळे आम्ही शेतात लवकर फिरायचं ठरवूनच निघालो होतो . यावर्षी पाऊस खूपच झाला होता त्यामुळे तूर खूपच जोमाने वाढलीय आणि पिवळ्या धमक फुलांनी बाहरलीय हे यांच्याकडून ऐकून होतो . सुनिता म्हणाली थंडीत सकाळच्या वेळी तूरीत दव फार असतं , तुम्ही जरा तासाभरांनी जावा . तसं आशिष पटकन ऊठला आणि म्हणाला  

" तीच तर मजा अनुभवायची आहे , निघुया आपण चला "

मग आम्ही सगळेच निघालो आणि पहिल्यांदा तूरीच्या शेतात जायचं ठरवलं . 

       आमच्या शेतातून चाळीस वर्षापुर्वी कॕनाॕल गेला आहे त्याला फार पुर्वी चांदणी तलावाचं पाणी सोडत असायचे म्हणे पण मी पहाते तसं या तीस वर्षात कधी पाणी नव्हतं हा भाग वेगळा !  पण कॕनाॕल आहे व पलीकडे जाण्यासाठी त्यातूनच पायवाट आहे पावसाळ्यात तिथे गवत वाढतं मग पलिकडे जाता यावं म्हणून कॕनाॕलवर साधारण एक फूट रुंदीचा व वीस फूट लांबीचा सिमेंटचा पोल आहे . आता आम्हांला पोलवरुनच पलिकडे जावे लागणार होते आणि आपल्यासाठी ती कसरत असते . कीर्तीसाठी तर हे नविन होतं सातआठ फूट खोल असलेल्या कॕनाॕलच्या पोलवरुन आम्ही पलिकडे गेलो . मी पण बऱ्याच दिवसांनी पोलवरुन गेले पण मजा आली . बांधावरुन उतरलो की तूरीचं शेत होतं . एवढी उंच तूर मी पण पहिल्यांदाच पाहिली . मधेमधे देशी भेंड्यांची व देशी गवारची झाडं लकडलेली होती . आकांक्षाला भेंडीबियांची आमटी फार आवडते मग भेंड्या व गवार तोडत हे पुढे त्यांच्या पाठोपाठ आम्ही असे पुढेपुढे निघालो . धुक्याच दव , गारठा आणि तूरीची पिवळी फूलं जणू काही हील स्टेशनच्या बागेत फिरतोय असा भास झाला . तेवढाच एक विकेंड एन्जाॕय करायला मिळाला असं मुलांना वाटलं . तसं तर घरी रहायला मिळत असलं तरी खरं तर वर्क फ्राॕम होममुळे मुलं अगदी वैतागून गेली आहेत फिल्ड वर्कची सवय असल्यामुळे आशिषपेक्षा कीर्तीला फोनवर मॕनेज करणं तसं त्रासदायक होतंय . मग मोकळ्या वातावरणात शेतात फिरायला जोडी आगदी खुशीत होती . चला तेवढाच बदल म्हणत यांच्या मागोमाग आम्ही शेतात फिरु लागालो .

        यांनी सुरुवातीला अगदी काॕलेजला असतांना दोन वर्षे शेती पाहिली होती पुन्हा बँकेत नोकरी लागल्यावर जालन्याला जावं लागलं पुढे बदली झाल्यावर लग्न झालं मग दोघांची नोकरी लहान मुलं त्यामुळे मात्र लक्ष देता आलं नाही . तेव्हापासून सुनिल भाऊजी लक्ष देऊ लागले मग यांनी पण दुर्लक्ष केलं . पण भाऊजी गेल्यावर सगळंच पहायचं यांच्याकडे आलं . हळुहळु बघत रिटायर झाल्यावर यांनी शेतीत चांगलंच लक्ष द्यायला , सुधारणा करायला सुरुवात केली . प्रामुख्याने पाणी प्रश्न सतावतो आहे हे लक्षात आल्यावर तीन चार बोअर घेतले . तरीही पाण्यावाचून काम आडतच होते मग एक मोठा निर्णय घेतला आमच्या शेतात एकच सामायीक विहीर होती त्याचं पाणी पुरत नव्हते म्हणून स्वतंत्र विहिर घ्यायचं ठरवलं . आणि दोन वर्षांपुर्वी विहीरीचं खोदकाम झालं , पाणी लागलं व गेल्या वर्षी विहीरीचं बांधकाम झालं . हे सगळं करतांना कारण नसताना भरपूर त्रास झाला पण हल्ली त्यांची शेतीची ओढ मात्र खूप वाढली व त्यांच्या नादाने म्हणा किंवा घरात होणाऱ्या चर्चेमुळे म्हणा आम्ही सगळेच शेती या विषयावर रमू लागलो . काका-काकींना हे सगळं ऐकायला मिळत वयोमानामुळे शेतात जाता येत नाही पण  काका मात्र कौतुकाने म्हणत आसतात  

" आमचं गाव म्हणजे आसू ! त्याला सावळारामाचं आसू म्हणून ओळखले जातं . शेतातली आत्ता जी सामायीक विहीर आहे ती सावळारामांनी घेतलेली त्यांच्या  काळातील ती जुनी विहीर आहे त्यानंतर पाच सहा पिढ्या गेल्या पण कोणीही विहिर घेण्याचं धाडस केलं नाही पण सावळारामांनंतर ते काम आनिलनं केलंय पुढच्या अनेक  पिढ्यांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे  ".

आणि खरंचच तसे झाले आहे कारण विहिर घेणं त्याचं बांधकाम करणं हे काम आजच्या काळात एवढं सोपं नाही . या दोन वर्षात त्यानुषंगाने लेव्हल करणे , बांध भरुन घेणे अशी पुढची कामं निघत गेली व ते करत राहिले . ऊस , कलिंगडे , मिरच्या , टोमॅटो अशी पीकं घेत राहिले व जास्त जास्त शेतात गुंतत गेले . पण यावर्षी आधी कोरोना मग जास्तीचा पाऊस त्यामुळे ताली फुटणे , मोठाल्या भगळी , खूप मोठं गवत ही कामं वाढली गेली . आता पुन्हा सगळी डागडूजी करणं आलं .

         शेतात कुठे काय केलं होतं व आता पावसामुळे काय झालं हे दाखवत ते पुढे व आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो कीर्ती पहिल्यांदा शेतात आली होती मग तिला , आशिषला सगळी माहिती सांगत ते चालत होते . मग आम्ही नव्या विहीरीकडे गेलो . सध्या विहीरीला चांगलं पाणी आहे उपसाच नाही . हल्ली  आशिष पण बरेचवेळा शेतात आला आहे सगळीकडचे फोटो घेत त्याचं पण निरिक्षण चाललं होतं . आडीच तीन तास फिरुन आम्ही जुन्या विहीरीवर आलो तर यावर्षी या विहीरीला पण भरपूर पाणी आहे पण गाळपण तितकाच आहे . पण या विहीरीचं बांधकाम चिरेबंदी आहे नविन विहीरीच बांधकाम रींग टाकून स्लॕब टाकलेलं आहे हाच तो फरक आहे दोन्ही विहीरीत . आता आम्ही वस्तीकडे निघालो . आता मात्र ऊन्हाचा चटका वाढला होता आणि पोटात पण कावळे ओरडत होते .

तोवर इकडे सुनिताने कारल्याची भाजी , पिठलं , तव्यावर ठेचून खरडा करुन ठेवलं होतं व चुलीवर भाकरी चालू होत्या ते पाहूनच तोंडाला पाणी सुटलं . कीर्ती पहिल्यांदा आली म्हणून सुनिताने तळण पण तळले होते . खमखमीत जेवण असणार हे माहित होते त्यामुळे मी बरोबर ताकाची बाटली घेतलीच होती . चार घास जास्तच खाऊन  फक्कड जेवण करुन दुपारच्या विश्रांतीसाठी आम्ही घरी पोहोचलो !!

     आता वेध दिवाळीचे आहेत . घराची साफसफाई ब-यापैकी झाली आहे . यांनी कालच भरगच्च किराणा आणून ठेवला आहे . आकाशकंदील , पणत्या , लाईटच्या माळा ही कामं आजउद्या होतील तर माझी पण कोरडी तयारी तर झाली आहे . आज रविवार मग करंजीचं सारण , अनारसा पीठ तयार झालं आहे , भाजणी दळून आणलीय . कायकाय करताय करत कीर्तीचं निरीक्षण चालू  आहे . येत्या शनिवारी लक्ष्मीपूजन आहे मग तू काय घालणार मी काय घालणार करत आकांक्षा-कीर्तीची कालपासूनच  लगबग सुरु आहे ज्वेलरी , कपडे , पार्लर अशी त्यांची धावपळ सुरु आहे कारण मुख्य आकर्षण फोटोचं आहे . तयारी करुन ठेवली म्हणजे बरं  पुन्हा उद्यापासून आपापले उद्योग सुरु होतात .