कोंदण भाग 3
प्रकरण 14 वे
संकटाची चाहूल
8 आॕक्टोबर 2020
पंढरपूरहून आई-काका बाळाला घेऊन घेरडीला आले . माझी नववीची परिक्षा तोंडावर आली होती . पुढचं वर्ष दहावीचं बोर्डाचं होतं . ज्योती तर पहिलीतच होती त्यामुळे घरात काम करायला कोणीतरी पाहिजे म्हणून नागर आत्त्यांची मुलगी बाळी ताईला आणलं होतं . आईकडे बाळ असायचं त्यामुळे ज्योतीचं सगळं काका पहायचे व काका बाहेर गेले की ज्योती बाळीताईच्या मागे असायची त्यामुळे ज्योतीला बाळीताईची खूपच सवय लागली होती . बाळ म्हणजे संजिवनी तिला आम्ही संजू म्हणतो दिवासेंदिवस बाळसेदार होत होतं त्यामुळे ती गोरीपान , सफरचंदासारखे गाल त्यामुळे फार छान दिसायची . मग तिच्याजवळून हलावसं वाटत नसे . आईचे बाजलं स्वयंपाक घरात होतं त्याभोवाती पडदे टाकलेले असायचे काका आले की बाजेजवळ खुर्ची टाकून संजूला मांडीवर घेऊन आईशी तासंतास गप्पा मारत बसायचे . संजूला लाडानं ते
" कांतराव "
म्हणायचे . सगळ्यांना वाटत असे भाऊ काकांना आता सहावीपण मुलगी झाली आवघड आहे बाबा ! पण आई-काकांंना त्याचं काहीच वाटत नसायचं बाळाचे लाड करण्यात ते गुंग असायचे . जे लाड पहिल्या बाळाचे वा बाळंतपणात केले तेच आणि तितकेच लाड याहीवेळी सुरु होते . जन्मापासुनच संजू आईपेक्षा काकांच्या गळ्यातला ताईत झाली . अतिशय लाडकं आमच शेंडेफळ आहे हे असे काका म्हणायचे . अशात आईची तब्ब्येत मात्र जरा त्रास देऊ लागली , चाळीसीनंतरच्या बाळंतपणाचा व त्यातच निघालेल्या डायबेटीसचा तिच्या तब्ब्येतीवर परीणाम झाला . तीला मधूनच थकवा जाणवायचा . त्यामुळे काका आईकडे विशेष लक्ष द्यायचे .
आक्की तायडीचं लग्न झाल्यावर घरात माणासांचा राबता वाढला मग जागा कमी पडायची म्हणून घरासमोर मध्ये अंगण सोडून काकांनी एकावर एक अशा दोन खोल्यांच बांधकाम काढलं . तसं अंगणपण लहानच होतं पण, समोर लांब पट्टी होती त्यामुळे एका बाजूला लाकडी जीना वरच्या खोलीला कौलं , खिडकी त्यामुळे ते घर टुमदार दिसायचं . सगळे जमले की दिवाळीच्या सुट्टीत झोपायला मग आरामात जागा पुरायची . तसं घेरडीत गावात दोन मजली घार म्हणजे कौतुकाचा विषय होता डोंग-यांकडे दोन घरात दोन मजली खोल्या होत्या त्यानंतर मात्र दोन मजली घर काकांनीच बांधलं . मग सत्यनारायण केला . आई-काका खूश होते पण लोकांची कुजबूज मात्र ऐकायला येत होती सगळ्या तर मुली आहेत आणि भाऊकाका इतकं काय काय कशाला करतात ?
पण काकांच म्हणणं यायचं आत्ता आपल्याला गरज आहे आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो . सगळं पैशात न मोजता मिळणाऱ्या समाधानाची किंमत ही पैशापेक्षा मौल्यवान असते . आम्ही मात्र त्या घराचा पुरेपूर उपभोग घेतला ! एवढंच कशाला किर्लोस्करवाडीला नविन नविन काही काकांना आवाडलं की ते घेरडीत पण तसंच आणायचे . अगदी पितळी डबेभांडी , जुन्या फळ्या काढून नविन रॕक व स्टीलचे डबे सुद्धा . सगळ्यांनी छान राहिलं पाहिजे एकूणच असा त्यामागचा विचार असे .
आई , आक्की व तायडी या सगळ्यांनाच एकमेकींची नविन बाळं पहाण्याची उत्सुकता लागली . त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत किर्लोस्करवाडीहून भाऊजी तायडी , मायडी , मंजू व मेधा आले तर धुमाळवाडीहून मोठे भाऊजी आक्की अंजू व गायत्रीला घेऊन आले . सहा महिन्यातील तीन बाळं दोनआडीच वर्षाच्या अंजू मंजू आणि आम्ही पाचजणी असे घरात जागा पुरेना इतकी गर्दी झाली , गोंधळ होऊ लागला तरीपण मजा यायची . त्यावेळी पुन्हा एकदा संजूला ताप आला व त्रास झाला पण लगेचच अरविंद काकींना बोलावून तिला ट्रीटमेंट दिली . पंढरपूरला नेऊन आणलं काळजीचं कारण नसल्याचे त्यांनी सांगितले . पण तिची प्रगती त्यामानाने मंद होतेय असे जाणवू लागले . आईला मात्र तिची चिंता वाटू लागली . आईला वाटायचं आपले गाडं आता उताराला लागलंय आणि हे तर हिरिरीने संसार करत आहेत आता थोडंस आवरतं घेतलं पाहीजे पण काकांना ते मान्य नव्हते . मग आई पण हो ला हो करायची . सुट्यांमुळे घरात आधीच गर्दी होती त्यात नेहमीप्रमाणे शनिवारी गोंदा मामा आलाच होता . तो पण खूपच हौशी होता त्यावेळी तो जत तालुक्यात रांजणी गावी होता बेबीनं रांजणी पाहिलं नाही म्हणत त्यांने तिला रांजणीला न्यायचं ठारविले तिच्याबरोबर पुन्हा मी व मायडी चार दिवस जाऊन आलोच . इथे घरात स्वयंपाकघरात आईच्या मदतीला आक्कीपेक्षा तायडीचा बराचसा हातभार असायचा आणि हाताखाली मी व मायडी असायचो . सगळ्यांना एकत्र बोलवायचा काका घाट घालायचे पण ते आईला जास्त होऊ लागलं तीला त्रास होत असे मग तेही काकांच्या लक्षात यायचं मग ते मुलींना कामं वाटून द्यायचे व आल्यावर कोणी कोणी काम केलं हे विचारायचे . आईला पण म्हणायचे
"मी सांगितले त्याप्रमाणे तू सगळ्यांकडून कामं करुन घे "
पण घरात मेजवान्यांची रेलचेल असायची . आई तायडी तर दोन तीन महिन्यांच्या बाळंतीण तायडीला आईच्या हातचं बाळंतपणात मिळालं नाही , आक्कीचं पण बाळ लहान आहे म्हणत नेहमीप्रमाणे काकांनी जतेला जाऊन किराणा आणला डींक लाडू , वेगवेगळ्या खिरी , दूध तूप सगळ्यांसाठी खाण्याची रेलचेल होती . तसेच आंब्याचे दिवस असल्यामुळे आंब्याची आढी घातलेली असे त्यामुळे दुपारी रस , तळण पोळ्या तर चार वाजता कधी हुरड्याच्या घुग-या , बटाटेवडे , भजी , मिसळ , गोपाळकाला , लाह्या किंवा चुरमुरे तेलमेतकूट लावून खायला होई मग चहा होई . लहान मुलींच्या किलबिलाटाने घर गच्च भरले होते . घरात संध्याकाळच्यावेळी बाळांच्या रडण्याचा एकच कल्ला होई व शांत झाले की एकदमच सगळे शांत असायचे . झोपल्या की एकदम सगळ्या झोपायच्या आणि एकजण उठलं की सगळेच जागे व्हायचे . भारी गंमत व्हायची . बाळांना फिरवून आणायचं काम आमच्याकडे असायचं . संध्याकाळच्या वेळी महादेवाला जाण्याचा कार्यक्रम असे बरोबर वाड्यातले पण असायचे . उन्हाळ्यात संध्याकाळी मात्र ब-याचदा लाईट गेलेली असायची आणि दिवसभर दगदग झाल्यामुळे आई अंगणातच बसायची . वाड्यात प्रत्येकजण अंगणात बसलेले असायचे . जेवणापुरतं घरात जायचं कंदिल लाऊन जेवणाचा बेत होई . रात्री शक्यतो दुपारचं शिल्लक पाहून पुरवठा म्हणून भाताचा प्रकार केला जायचा त्यात बहूधा मूग डाळीची खिचडी , कांदेभात , वांगेभात , साधा भात व आमटी किंवा पिठलं असे काहीतरी केलेलं असायचं सगळ्यांच होऊन जायचं त्यावर .
तसही वाड्यात नेहमीकरता मी , मायडी , विद्या , कुंदा व सुधीरचा ग्रुप होता तर आता सगळ्या भावांची मुलं साधारण ज्योतीपेक्षा लहान मोठी होती सुनील , चिमू , पंपू बाळी मोठे तर बबलू , ज्योती , मीनू , हरणी , सचिन , सारिका , स्वाती , छबलू , अरुणा हे बरोबरचे त्यामुळे कुलकर्णी वाडा म्हणाजे जणू गोकूळच वाटायचा . त्यामुळे भरपूर मजा मस्ती खेळ चालायचे . भांडणं पण व्हायची पण ती तात्पुरती असायची . दुपारी कोया , गजगे , विटी-दांडू , लगोर , गोट्या , पत्ते असे खेळ चालायचे तर संध्याकाळी बहुतेक वेळा आंगणात आपापले जेवणाचे ताट पाण्याचा तांब्या घेऊन आमच्या आंगणात मोठा गोल करुन अंतपंगत बसायची . गाणी , भेंड्या , नकला , गप्पा चालायच्या . पौर्णिमेला लाईट नसली की खूप मजा यायची . टपो-या चांदण्याच्या उजेडात आंगणात हे सगळे प्रकार करायला मजा यायची . उन्हाळ्यात बहुतेक सगळ्यांकडे कोणी न कोणी पाहूणे आलेले असायचे मग वाड्यात अंगण गच्च भरुन जायचं . झोपायला जागा पुरायची नाही मग प्रत्येक घराचा सोपा उघडा ठेऊन मोठी माणसं दाराशी झोपायची . कधीकधी रात्रीचा अवकाळी पाऊस सगळ्यांची धांदल उडवून द्यायचा आणि त्यानंतरचा उकाडा हैराण करुन सोडत असे .
तसं घेरडीत वाड्यात मुलांपेक्षा मुलींच प्रमाण जास्त होतं . पण आमचं घर सोडता आतापर्यंत प्रत्येक काकांना किंवा चुलत भावांना एखादा मुलगा झालेला होता . त्यामुळे काकांच्या मुली व नाती हा लोकांसाठी जरा चर्चेचा विषय झाला होता . पण आई-काकांवर त्याचा परिणाम होत नव्हता उलट इकडे काकांचे तर शेतात नवनवे प्रयोग चालूच असायचे मुख्य म्हणजे त्यांना त्यात यश मिळत होतं . पैसा भरपूर मिळत होता .
आता आपल्या सहा मुली ह्याच आपल्यासाठी मुलं आहेत ही खूणगाठ मनाशी पक्की केली व त्याप्रमाणे आई-काकांंनी आपल्या वाटचालीचा रोख बदलला . बोलण्यात पण त्यांच्या परखडपणा येऊ लागला . त्यामुळे काय केल्यास काय होईल त्याप्रमाणे काका नियोजन करु लागले . किर्लोस्करवाडीचं घर बांधून झालं त्यामुळे तायडीचं सगळं स्थिरस्थावर झालं होतं . बस्तान बसलेलं होतं . आता आक्कीचं बस्तान बसवणे व पुढच्या मुलींना शिक्षण देणं यादिशेने त्यांनी विचार करायला सुरुवात केली . आईला स्वतःला नोकरी करता आली नाही याचे शल्य होतेच , तिच्या बोलण्यातून तसे जाणवत असे . मुलींच्या लग्नाची घाई न करता शिक्षण पुर्ण केलं पाहिजे यासाठी आई सातत्याने सकारात्मक असायची , पाठीशी असायची . इकडे आक्कीच्या दिराचे म्हणजे अरविंदाचे लग्न झाले होते ते मेडाशींगीत तर आक्कीचं कुटुंब धुमाळवाडीत रहात होतं . खेड्यातून आक्की व भाऊजींचा संसार धुमाळवाडीसारख्या एका वस्तीवर मांडला होता पण उज्वल भविष्य खुणावत होतं त्यामुळे आक्कीनं ते आनंदाने स्विकारले होते . तिचा स्वभाव विनोदी होता त्यामुळे ती खूश असायची . काकांची धडपड तिला समजत होती त्यामुळे भाऊजींशी तिने जुळवून घेतलं होतं एक दिवस काकांनी त्यांना घेरडीत बोलावून घेतलं . त्यांच्या लग्नाला आता साडेचार वर्षे झाली होती तिचा संसार वाढला होता पण सगळंच काकांना पहावं लागायचं . पण स्वस्थ किंवा हतबल रहातील ते काका कसले . सतत भविष्याचा वेध घेण्याचा स्वभाव काकांना स्वस्थ बसू देत नव्हता . त्यांचत्यांच रांकेला लागायला हवं म्हणून भरपूर विचार करुन आईशी चर्चा करुन काकांनी मोठ पाऊल उचललं ! मेडाशींगीच्या शेतात काहीच सुधारणा होत नव्हती मग काकांनी आक्कीला सांगितले
" तुला नोकरी लागेपर्यंत तुम्ही घेरडीतल्या शेतात रहायचं . शेतीचे सर्व ते स्वतः पहातील भाऊजींनी देखरेख करायची व भाऊजींसाठी खास उद्योग म्हणून , जोडधंदा म्हणून पोल्ट्री उभारुन देणार त्यांना मार्गदर्शन करणार तो व्यवसाय त्यांचा राहिल . कमीजास्त मागेपुढे काका पहाणार . त्यासाठी आक्कीचं कुटुंब घेराडीच्या शेतात रहायला येईल तिथून दीड किलोमीटर अंतरावर आक्कीची धुमाळवाडीची शाळा होती . तिला रोज बैलगाडीने शाळेत सोडलं जाईल . शेतात सुकाची बायको आक्कू मुलींना सांभाळणं व घरकामात सगळी मदत करण्याचं काम करेल "
त्याप्रमाणे आई-काका , आक्की भाऊजी सगळ्यांनी चर्चा केली विचारविनीमय केला व ठरल्याप्रमाणे सगळे करायचे ठरले . मग काकांना चैन नव्हती जणू काही नविन मार्ग सापडला या उद्देशाने ते आखणी करु लागले . तिला नोकरी लागेल तेव्हा पाहू पुढच्यापुढे . सध्यातरी त्यांच त्यांना करायला लावू .
त्याप्रमाणे काका अनेक ठिकाणी स्वतः जाऊन आले सांगलीजवळ अनेक प्लॕन्ट स्वतः पाहून आले दोन ठिकाणीतर भाऊजींना पण बरोबर घेऊन गेले व त्यांना त्या व्यवसायाच प्रात्यक्षिक दाखवून आणलं . त्यांना मानसिकरित्या तयार केलं . कारण भाऊजी फारशे होतकरु नव्हते , काहीतरी करावे लागेल हे त्यांना सतत आक्कीला सांगावे लागायचे . काकापण अगदी तळमळीने सांगायचे त्याप्रमाणे शेतात त्यांच्यासाठी वेगळा गडी ठरवला तो पोल्ट्रीचं सगळे पहाणार शेतात पोल्ट्रीसाठी शेड उभे करण्याची तयारी केली पत्रे अँगल याची सगळ्याची आधी चार ठिकाणी चौकशी करणे नंतर आॕर्डर देणे असे सुरु झाले . कोंबड्यासाठी साचे तयार करण्याची आॕर्डर दिली . त्यांच खाद्य आणून ठेवलं . व कोंबड्यांची आॕर्डर दिली . घराची ब-यापैकी डागडूजी करुन घेतली . साधारण नवरात्राच्या आधीच धुमाळवाडीहून पुन्हा आक्कीचा संसार बैलगाडींने शेतात आणला . त्यावेळी पुन्हा आई रांकेला लावायला चार दिवस शेतात जाऊन राहिली . आक्कीची शाळा दहा ते एक होती मग बैलगाडीने सुका शाळेत घेऊन जायचा तिथेच थांबून शाळा सुटल्यावर घेऊन यायचा . इकडे दोन्ही मुली भाऊजी घरी असायचे हे सगळं सुकाची बायको आक्कु हीला पहायची सवय करुन दिली व नंतर आई गावात आली . काकांना स्वतःची नोकरी , शेताचं पाहून या सगळ्यांसाठी धावपळ करावी लागायची . आई म्हणायची
"पायाला भिंगरी बांधल्यासारखं यांना फिराव लागतं बाई "
आणि त्यांच्या खाण्याची अगदी कटाक्षाने काळजी घ्यायची . काकांची धडपड पाहून तिचा जीव कासावीस व्हायचा मग काका तिची समजूत घालायचे
" रेखाचा स्वतंत्र संसार सुरु झाला आहे . नोकरी लागेल तेव्हा लागेल पण त्यांच त्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे . त्यासाठी त्यांना आपल्याला उचलून धरावच लागेल ".
तेही आईला मान्य व्हायचे . मग तीपण हिरीरीने सहभागी व्हायची चर्चा करायची नियोजन करायची . कमीजास्त पाहून सल्ला द्यायची .
यादरम्यान आक्कीला थोडासा डोकेदुखीचा त्रास सुरु झाला होता . तात्पुरते उपचार ती घ्यायची पण फारसा फरक पडला नव्हता दसरा झाल्यानंतर एक दिवस डोक दुखत असतांना तिला एकदा थोडीशी चक्कर आल्यासारखे झाले होते . पुन्हा दिवाळीसाठी ते सगळे गावात आल्यावर तिने आई-काकांंना चक्कर आल्याचे सांगितले . दिवाळीतपण एक दिवस तिला चक्कर आली . तिची ती अवस्था पाहून आई-काका जाम घाबरुन गेले . गोंदा मामा भाऊबीजेला आलेला होता . तोपण म्हणू लागला हे लक्षण काही बरोबर दिसत नाही आपल्याला तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल . मग लगेच अरविंद काकींना घरी बोलवलं तर त्यांनी तिला जतेला दाखवून आणण्यास सांगितले . त्याप्रमाणे दुसरेच दिवशी काका तिला घेऊन जतेला गेले . आणि त्यावेळी नेमके डाॕक्टरसमोर जायला व तिसऱ्यांदा तिला चक्कर यायला गाठ पडली . डाॕक्टरांना काहीतरी प्राॕब्लेम आहे हे लक्षात आले व त्यांनी सांगितले की
" तुम्ही आता वेळ न दवडता यांना मिरजेच्या मिशन हाॕस्पिटलला घेऊन जा तात्पुरते औषध देतो . "
काका सहज दवाखान्यात म्हणून गेले होते इकडे काहीच माहिती नव्हते म्हणून संध्याकाळी तिला घेऊन परत घेरडीला आले व लगेच दुसरे दिवशी काका आक्की भाऊजी व एक वर्षाचे बाळ आहे म्हणून गायत्रीला घेऊन किर्लोस्करवाडीला मुक्कामाला गेले . इकडे घरात आई मी ज्योती संजू व आक्कीची मोठी मुलगी अंजू राहिलो . तशी अंजू तीन वर्षांची होती पण आक्कीला दुसरं बाळ झाल्यापासून तीला माझी बरीच सवय झाली होती ती माझ्याकडे बरीच रहायची . वाड्यातच नव्हे तर घेरडीत सगळ्यांना समजले होते की रेखाला काहीतरी झालं आहे तिला मोठ्या दवाखान्यात न्यावं लागणार . वाड्यात मोहन आण्णा , फक्कड काका , पंत काका तसेच आंता काका सगळेजण चौकशीला येऊ लागले धीर देऊ लागले . काका केवढ्या धैर्याने वाट काढत आहेत आणि त्यांना इतक्या संकटांना तोंड द्यावं लागतेय यावर हळहळ करायचे . तसं आक्कीविषयी सगाळ्यांनाच ममत्वाची भावना होती त्यामुळे तिला त्रास होऊ नये असे सर्वांनाच वाटायचे . मग मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून दवाखान्याबरोबरच आईने कोण काय सांगेल ते उपाय करायला सुरुवात केली . अंगारे , धुपारे , उतारे हे पण केलं . उद्देश एवढाच की तीला लवकर बरं वाटावं . मेडशींगीला पण समजल्यामुळे तिचे सासरे येऊन गेले ते पण सगळे ऐकून खूप घाबरले होते .
तायडीला यातलं बरचसं माहिती झालं होतं मग तिने पण काकांना धीर देण्याची , मदत करण्याची भुमीका घेतली . किर्लोस्करवाडीच्या भाऊजींना मिरजेतील सगळी माहिती होती म्हणून त्यांना बरोबर घेऊन सकाळी लवकरच काका मिशन हाॕस्पिटलला गेले . तिथे पण तायडीच्या लहान दोन मुली मायडीचं बारावीचं बोर्डाचं वर्ष चालू होतं . आक्कीलाच धीर देत तिने तिला मिरजेला पाठावलं . मोठ्ठ हाॕस्पिटल पाहून तिला पण जरा घाबारल्यासारखं झालं होतं . डाॕक्टरांकडे गेल्यावर त्यांनी आक्कीची लक्षणं पहाता ब-याच चाचण्या केल्या व दोन दिवसांनी पुन्हा बोलावलं . मग आक्की वाडीला गेली व काका दोन दिवसांनी तुम्ही मिरजेला या मीपण जरा घेरडीतले काही कमीजास्त पाहून येतो म्हणून घेरडीला आले . इकडे शेतात एवढा मोठा घाट घातलेला वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या भेटी घेतलेल्या वायदे केलेले आणि आक्कीच्या तब्ब्येतीची काळजी वाटू लागली . आई खूपच घाबरुन गेली होती ती काकांना म्हणू लागली
" तुम्ही हे पोल्ट्रीचं थांबवा रेखाचा दवाखाना होऊदे आता मिरजेला जाव लागणार तुमची खूप ओढाताण होतेय . तीचे औषधोपचार झाले की आपण सगळं करु ".
पण काकांनी निम्म्यापेक्षा जास्त काम करत आणलेलं होतं . सगळीकडे आॕर्डर्स दिलेल्या होत्या त्यामुळे ते धीरानं घेत होते . आईला समजावत होते
"आपण तिला खूप मोठ्या दवाखान्यात नेलं आहे नक्की उपचार होतील काळजी करु नकोस सगाळं ठीक होईल"
असे समजवायचे . मग आईचा पण नाईलाज होई . त्यांच्या धावपळीला अंतच नव्हता . इकडे थोडंस मार्गी लावून इकडून ते मिरजेला परत गेले संजू आठनऊ महिन्याची होती अंजू लहान ज्योतीची शाळा माझी दहावी त्यामुळे आईला हलता येत नव्हते .
काका घेरडीतून मिरजला गेले व आक्की , तायडी व दोन्ही भाऊजी किर्लोस्करवाडीहून मिरजेत आले . डाॕक्टरांच्याकडे गेल्यावर डाॕक्टरांनी आक्कीला मेजर प्राॕब्लेम आहे हे सांगितले . तिला
" ब्रेन ट्युमर " झाल्याचे सांगितले . काकांना या आजाराविषयी काहीच माहिती नव्हती मग डाॕक्टरांनी त्यांना सविस्तर माहिती दिली .
मेंदूत गाठ झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुरळीतपणे झाला नाही तर चक्कर येते . हे प्रमाण सातत्याने वाढत जाणार त्याचं आॕपरेशन करणे हाच त्यावरील उपाय आहे . ते केलं नाही तर जीवाला धोका निर्माण होणार होता , मोठं आॕपरेशन असून त्याला आख्खा दिवस लागणार होता तसेच त्या आॕपरेशनसाठी स्पेशल डाॕक्टरांची अपाॕंईंटमेंट घ्यावी लागते खर्चिक आहे पण मिशन हाॕस्पिटलला बाकी खर्च कमी होणार होता . आॕपरेशनच्या आधी आठ दिवस व नंतर पंधरा दिवस हाॕस्पिटलला रहावे लागणार होते . हे सर्व ऐकून यावर काकांनी तिथेच बाहेर थांबून चर्चा करुन तातडीने आॕपरेशन करण्याचा निर्णय घेतला . साधारणपणे पंधरा दिवसांनंतरची तारीख मिळाली एमबीके भाऊजी सतत बरोबर होतेच . त्यावेळी त्यांचा व तायडीचा काकांना खूपच आधार वाटत होता . आता बाकी सर्व तयारीनीशी पंधरा दिवसांनी मिरजेला परत येण्याचे पक्के करुन काका आक्कीला घेऊन घेरडीला आले . वाड्यातील सर्व मोठी मंडळी आमच्या घरात येऊन बसली व आॕपरेशनचे नियोजन कसं करायचं यावर चर्चा करु लागली . धीर देऊ लागली . आख्ख्या वाड्यावरच ते संकट आलंय आशी सगळ्यांची भावना होती .
प्रकरण 15 वे
जिवाचं रान
19 आॕक्टोबर 2020
घरात , गावात , नातेवाईक मंडळीत धाडसानं , वेळ न दवडता आणि योग्य निर्णय घेणारे काकाच होते . कोणालाही कोणत्याही प्रसंगी काका मदतीला असायचे . सगळ्यांना सल्ला द्यायचा वेळ पडली तर पैशाची मदत करुन धीर देणं ही कामं काका करायचे आता बाका प्रसंग काकांवर आलेला होता . ते वरुन खंबीरपणा दाखवत होते कारण त्यांनीच जर अस्वस्थता दाखविली तर सगळेच घाबरतील हे काका ओळखून होते त्यामुळे काका धीरानं घेत होते पण आतून ते हलले होते कारण प्रश्न पोटच्या गोळ्याचा होता . काका आक्कीच्या बाबतीत हळवे होते ही गोष्ट आई पुर्णपणे ओळखून होती . ते दोघेही एकमेकांना धीर देत होते .आपल्या जोडीदाराच्या मनात काय चालू आहे याचा अचूक अंदाज बांधून त्याप्रमाणे वागण्याची दिशा ठरवणारे ते आदर्श जोडपं होतं . आई देवाचा धावा करायची तसेच आमचे फक्कड काका की ज्यांना पंचाग पहाता येत असे , आईने त्यांना आक्कीविषयी विचारलं तर त्यांनी तिच्यासाठी दवाखाना गरजेचं असल्याचे सांगितले . कधीकधी वेळ बदलून विचारले तर उत्तर वेगळं येतं असे प्रभा काकू म्हणायच्या . मग आई वेळ बदलून दोनदा तीनदा काकांकडे गेली तर प्रत्येकवेळी
" दवाखाना पहा "
हे एकच उत्तर ते देत असंत मग आई घरी येऊन काकांना सांगायची की
" भाऊजी रेखाला दवाखानाच नीट बघा असे म्हणतात बघा "
मग काका नुसताच सुस्कारा सोडायचे . काका म्हणजे वरुन खंबीरपणा दाखवणारे पण हळूवारपणे भावनांची कदर करणाऱ्यातले होते . वरुन फणसासारखा काटेरीपणा पण आतमध्ये गोड गरे , वरुन टणक असणाऱ्या नारळात जसे गोड पाणी आणि खोबरे असतं असंच काहीसं काकांच होतं . काकांना जेवढं प्रेम आक्कीविषयी होतं तेवढंच प्रेम नऊ महिन्याच्या संजूविषयी होतं ! मुली म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण होत्या आणि त्यात आक्की अधू होती आपल्याकडून तिच्या लहानपणच्या आजारात तिच्याकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे ती अधू झालं याचं शल्य होतंच . त्यामुळे आता तिला बरं करण्यासाठी काय करु आणि काय नको असे झालेलं . काका ख-या अर्थाने बेचैन , अस्वस्थ आणि हळवे झाले होते वाड्यातले कोणी न कोणी सतत असायचे पंत काका मावशी धीर द्यायचे मोहन आण्णा व उषा वहिनी तर रोज येऊन बसू लागले कसं करायचं यावर चर्चा होऊ लागली . आक्कीची छोटी मुलगी गायत्री एक वर्षाची होती तिला घेरडीतच ठेवायचं ठरलं मग पहिल्यांदा तिचं अंगावर पीणं बंद केलं . लहान बाळंच ते रडून गोंधळ करायचं पण त्याला इलाज नव्हता . आक्कीबरोबर दवाखान्यात उषा वहिनी रहातील असं आण्णा वहिनीनी ठरवलं . तशा त्या ब-यापैकी चुणचुणीत होत्या काही लागलं तर त्या सहजपणे मॕनेज करु शकतील इतपत त्यांना माहिती होती . त्यांच्या मुलांना काकूंची सवय होती शिवाय वाड्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मुलांची काळजी नव्हती . म्हणून मग आॕपरेशन झाल्यानंतर आक्कीला सोबत म्हणून त्यांना मिरजेला न्यायचं ठरलं . घरात आई व तिच्या मदतीला मी होते , ज्योती तशी लहानच होती तर अंजू तीन वर्षांची व गायत्री आणि संजू ही दोन बाळं यांना पहावं लागणार होतं माझं दहावीच वर्ष चालू होतं . काका मिरज-घेरडी जाऊन येऊन करणार भाऊजी सुरुवातीला आक्कीजवळ रहातील व नंतर घेरडीत येतील असे ठरले . कारण पोल्ट्री व्यवसायाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं . तिकडे दवाखान्यात जा-ये करणे , कमीजास्त पहाणे व डबा पोहोच करणे ही कामं किर्लोस्करवाडीचे भाऊजी म्हणजे एमबीके भाऊजी करणार होते . असे सगळे नियोजन केले काकांनी आॕपरेशनसाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था केली , शेताकडे काय हव-नको पाहून व्यवस्था लावली . वाड्यातले , गावातले लोक घरी यायचे . गोंदा मामा आलेला होताच .
" एवढा मोठा दवाखाना करताय होईल सगळं व्यवस्थित "
असं सगळे म्हणून धीर द्यायचे .
इकडे आईची घालमेल वेगळीच होती . एकतर तिची स्वतःची तब्ब्येत , नुकतच सुरु झालेलं डायबेटीस , लहान बाळ , काकांची धावपळ आणि आक्कीच्या तब्बेतीची काळजी , तिचे होणारं आॕपरेशन , तिच्या लहान मुलींसह तिच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी आणि काकांनी घातलेला पोल्ट्रीचा घाट ! तिला उमजच पडत नव्हता . पाहूण्यांचा राबता वाढलेला . ती काकांच्या मागे लागली होती
" तुम्ही हे पोल्ट्रीचं तुर्तास थांबवा रेखा बरी झाल्यावर करु ".
असे तिचे पालूपद होते . पण काका तिचे काही ऐकून घ्यायच्या मनस्थीतीत नव्हते . कारण कायकाय कराव लागणार , कधी करावं लागणार , किती पैसा गुंतला आहे हे सगळे नियोजन फक्त काकांनाच माहिती होतं . पण आईला वाटायचं काका रात्रीचा दिवस करुन धावाधाव करत आहेत . जिवाचं रान करत आहेत . पैशापरी पैसा तर जातोच आहे शिवाय मानसिक व शारीरिक ताण पण खूप येतोय . पण काका काहीच थांबवायला तयार नव्हते .
मग सगळी तयारी करुन ठरल्याप्रमाणे दिलेल्या तारखेला काका , आक्की व भाऊजी मिरजेला गेले व आक्कीला अॕडमीट केलं . तिकडून एमबीके भाऊजींच येणंजाण होतंच . सगळ्या तपासण्या झाल्या व आॕपरेशनचा दिवस उजाडला त्यादिवशी भाऊजींबरोबर तायडीपण आली होती . गोंदा मामा होता . मुंबईहून आक्कीच्या आॕपरेशनसाठी स्पेशल डाॕक्टरांची टीम आली होती . बरेचसे डाॕक्टर ख्रीश्चन होते . मुख्य डाॕक्टर " फाॕरेन रिटर्न " आहेत त्यांना अनेक मोठमोठया हाॕस्पिटलला जावे लागते असे ऐकायला मिळत होते . आक्कीला आत नेलं आणि जवळजवळ नऊ तास आॕपरेशन चाललं . तसं त्याकाळी अशा प्रकारचे आॕपरेशन क्वचितच होत असे त्यामुळे शिकाऊ डाॕक्टरांची पण भरपूर गर्दी होती . बाहेर हे सगळे नातेवाईक उभे होते वेळ संपता संपत नव्हता पण
" आॕपरेशन अगदी व्यवस्थित झालं आहे "
असे जेव्हा डाॕक्टरांनी बाहेर येऊन सांगितले तेव्हा सगळ्यांनाच हुश्श्य झालं . बाहेर आणले तरी अजून आक्कीची भूल उतरलेली नव्हती . काका , तायडी , दोन्ही भाऊजी , मामा सगळ्यांसाठी हा अनुभव भयचकीत करणारा पण आशावादी होता . मेंदूचं आॕपरेशन होतं ते त्यामुळे 1981 च्या काळात कठीण व वेळखाऊ काम होतं ते . आक्की दुसरे दिवशी व्यवस्थित शुद्धीवर आली . मग दोन दिवसांनी थोडासा सुरळीतपणा लागला असा विश्वास वाटल्यावर काका घेरडीला आले . काका आलेले दिसताच मागोमाग वाड्यातले सगळे जमले . आई तर देव पाण्यात ठेऊन बसलेली होती . त्याकाळात पत्र किंवा माणूस या दोनच मार्गांनी बातम्या समजत असत . जेव्हा काकांच्याकडून सगळा वृत्तांत समजला तेव्हा आईचा जीव भांड्यात पडला . इथला सगळा आढावा घेऊन काकांना दुसरे दिवशी उषा वहिनींना घेऊन मिरजेला जायचं होतं . कोंबड्यांसाठी मागवलेल्या जाळ्या अजून आल्या नव्हत्या पण दोनच दिवसांत कोंबड्या मात्र येणार होत्या . सगळीकडे वेळेत निरोप देणे काकांना शक्य होईना मग त्यांनी वहिनींना मिरजेला नेलं व भाऊजींना घेरडीत पाठवलं . माझी दहावीची पुर्व परिक्षा सुरु झाली होती . सहामाही परिक्षेत फर्स्टक्लास मिळाला होता त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या . त्याचदरम्यान
गायत्रीचं पोट बिघडलं आणि जुलाबाने ती हैराण झाली . आईला दिवसभर काम आणि गायत्रीचं रडणं व जागरण असायचं आई तिला औषधोपचार आणि घरगुती चाटण करुन द्यायची . मला ब-यापैकी समजत होतं . तास , परिक्षा , अभ्यास यातून मुलींना मी पहायचे दहावीची मुलगी पण लेकुरवाळ्या बाईसारखं मुलींच्या शी-शूसहित आईच्या मायेनं मुलींचे करते असे आई म्हणायची पण त्याचं पण आईला वाईट वाटायचे माझा अभ्यासाचा वेळ मुलींना सांभाळण्यात जातोय असे तिला वाटायचे . आई लाडाने मला
" सरोजनी नायडू "
म्हणायची . समज नव्हती पण घरावर काहीतरी संकट आहे हे समजून ज्योती पण मनानेच समजदारपणे वागायची काहीतरी मदत करायची धडपड करायची . या लहान तीन मुलींना सांभाळणं फारच जिकरीचं होऊन बसलं होतं . मग धुण्याचं काम करणाऱ्या शांता परटीणीला आईने मुलींना संभाळायला ठेवलं पण ती दुपारी यायची सकाळी आम्हीच पहायचो .
तिकडे एमबीके भाऊजींनी आवश्यकतेनुसार रजा घेतली होती व नंतर कंपनीत कामाला जाऊ लागले पण त्यांची रोज मिरजला चक्कर असायची . आॕफिस सुटलं की भाऊजी साडेचारला स्टेशनवर यायचे तर घरी तायडी डबा करुन मायडीची वाट पहात बसायची . मायडी चार वाजता कॉलेजमधून यायची व तयार डबा घेऊन भाऊजींना द्यायला साडेचार वाजता स्टेशनवर यायची व पावाणेपाचच्या ट्रेनने भाऊजी मिरजला जायचे . दवाखान्यात जाऊन डबा देऊन हवेनको पाहून परत रात्री साडेआठच्या ट्रेनने भाऊजी वाडीला परत यायचे घरी येईस्तोवर त्यांना दहा वाजायचे . तिथे पण मंजू लहान , मेधा बाळ , मायडीची बारावी अशी सगळी तारांबळ उडायची . पण प्रत्येकजण धावपळ करायला आपण होऊन पुढे येत होतं इच्छा फक्त आक्कीला बरे वाटले पाहिजे ही होती .
भाऊजी घेरडीला आले आणि शेतात रहायला गेले कारण जाळ्या आणि कोंबड्या येणार होत्या . काकांचा तर एक दिवस मिरजेत तर एक दिवस घेरडीत मुक्काम असायचा . एवढी धावाधाव करुन शेवटी पोल्ट्रीचा गोंधळ व्हायचा तो झालाच . अजून शेड तयार झालेच नव्हते पण एक दिवस कोंबड्या सकाळी आल्या व दुसरे दिवशी जाळ्या येणार होत्या . शेतात कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था व्हायला दोन दिवस लागणार होते . थंडीचे दिवस होते कोंबड्या म्हणजेच पिल्लं लहान होती व त्या विलायती कोंबड्या असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं होतं .मग काकांनी तात्पुरत्या कोंबड्या वाड्यात आमच्या वरच्या घरात ठेवायचं ठरवलं , व जाळ्या आल्या की रहात्या घरात सोप्यात ठेवायचं ठरवले . आईला हे अजिबात मान्य नव्हते आपण ब्राम्हण आहोत कोंबड्या , अंडी यापासून आपण चार हात लांब असतो . लोक काय म्हणतील समोर जरी कोणी काही बोलत नसले तरी मागे काय म्हणत असतील . काय असेल ते शेतात करा हे कोंबड्या वगैरे घरात कशाला असे तिला वाटत होते . तिला वाईट वाटायचं मग तिने स्वयंपाक घराचे दारच लावून घेतले व तिने सोप्यात यायचेच बंद केले असहाय्य होऊन कधीकधी ती रडायची . आक्कीची काळजी , तिच्या मुलींचे रडणे , आजारपण , पाहुण्यांचा राबता , काकांची होणारी त्रेधा , स्वतःची तब्बेत या सगळ्यांमध्ये पोल्ट्री तिला डोईजड झाली . मग काकांनी चार दिवसांत त्या कोंबड्या शेतात नेण्याची व्यवस्था केली . त्यांच्या धावपळीला तर अंतच नव्हता .
"उर फुटेपर्यंत नका हो धावपळ करु तुम्ही "
असे आई म्हणायची .
आक्कीची तब्बेत आता चांगली वाटत होती , आॕपरेशन छान झालं होत , टाके व्यवस्थित निघाले होते . मेडीकल काॕलेजचे विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्हणून आक्कीकडे यायचे तिला झोप लागली असेल तर उषा वहिनी कोणालाही आत येऊ देत नसत वहिनी त्यांना म्हणायच्या
" एक प्रश्न एकानेच विचारायचा आणि त्या जे उत्तर देतील ते उत्तर तुम्ही लिहून ठेवायचं व तुमच्या तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं त्याचत्याच शंकांसाठी आमच्या पेशंटला सारखा त्रास द्यायचा नाही ".
लिहून दिलेली औषधे आणायची , आक्कीबरोबर गप्पा मारत तिला हसवत ठेवायचं , असं अगदी व्यवस्थित मॕनेज करत होत्या . तायडी मधूनमधून येऊन जायची . काकांना व भाऊजींना उषा वहिनी तिथला सगळा वृत्तांत सांगायच्या मग त्याप्रमाणे काका तिथे बोलून यायचे सुचना देऊन यायचे .
आक्कीला घरी सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला , इकडे गायत्रीला पण बरं वाटू लागले , पोल्ट्रीचं सगळं आलं व ते शेतात अगदी व्यवस्थित सुरु झाले . असे सगळच एकदमच व्यवस्थित झालं असे वाटू लागले . दहा दिवसांनी मुंबईचे डाॕक्टरांची व्हीजीट झाली व त्यांनी आक्कीला 30 डिसेंबरला घरी जाण्याची परवानगी दिली . या बातमीनेच सगळ्यांना तरतरी आल्यासारखे वाटू लागले . मग आई-काकांंना पण इतका थकवा येऊनसुद्धा बळ आल्यासारखे वाटू लागले . एवढ्या मोठ्या आॕपरेशननंतर पोरगी घरी येणार म्हणत आईंने सगळे घर स्वच्छ करुन घेतले . न रहावून ती पुन्हा फक्कड काकांकडे पंचाग पहायला गेली तर ते थोडंस चिडलेच सारखे कशाला पहाता म्हणू लागले तरी प्रश्न टाकला की ते पहायचे . त्यांनी सांगितले 2 जानेवारीनंतर तिच्या तब्बेतीत सुधारणा होईल . मग आईला पण आनंद झाला तिने घरी येऊन काकांना पण सांगितले की आता रेखाचा त्रास संपेल . घरी आली की तिची आपण छान काळजी घेऊ , पौष्टिक खायला प्यायला घालू की जेणेकरुन लवकर तिची तब्बेत सुधारेल व तिचे तिचे छान रुटीन सुरु होऊ शकेल . सगळेजण मग 30 डिसेंबरची वाट पाहू लागले . तशी आक्कीची इंजक्शन्स पण बंद झाली होती पण तिथून निघताना तिला मोठं इंजक्शन दिलं होतं हे निरिक्षण उषा वहिनींनी केलं होतं . त्यांनी विचारलं हे कशासाठी तर दवाखान्यात सांगितले गेले की तुम्ही आता प्रवास करुन जाणार आहात तर बहात्तर तास काहीच त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे देतो . आता आक्की घेरडीला जाणार म्हणून तायडी मायडी पण 30 तारखेला सकाळी मिरजेला आल्या . सगळ्यांनाच आपण केलेल्या कष्टाचं चीज होतंय असे वाटायचे . जवळजवळ तीन आठवडे दवाखान्यात राहील्यामुळे व हिचे मोठे आॕपरेशन झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे आक्कीच्या लाघवी व चेष्टेखोर स्वभावामुळे दवाखान्यात अनेकांशी तिचे स्नेह संबंध जुळले होते ती निघतांना अनेकजण तिला निरोप द्यायला आले होते . इकडे घेरडीत पण आम्ही सगळे तिची वाट पहात होतो . संध्याकाळच्या वेळी आक्कीला घेऊन काका घेरडीत पोहोचले . डोक्याला बांधलेले अंगावर स्वेटर घातलेली आक्की वाड्यात पोहोचली वाड्यातील सगळेजण आपापल्या दारात येऊन उभे राहिले होते . अंजूला कळत होतं आई येणार म्हणून गायत्रीला मात्र कळत नव्हते . ती दारात येताच तुकडा ओवाळून पाय धुऊन आईने तिला घरात घेतलं . वाड्यातले सगळेजण भेटायला येणार म्हणून आईने सोप्यात मोठी सतरंजी अंथरुन ठेवली होती . सोप्यात आक्की येऊन बसली आणि तिला पहाताच तिच्या दोन्ही मुली तिच्या गळ्यात पडल्या , त्या जवळून हलायलाच तयार नव्हत्या . आईने सगळ्यांसाठी चहा केला . उषा वहिनी भरभरुन तिथले अनुभव सांगत होत्या . आक्कीला आराम करायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले . आक्कीला गोड आवडायचं मग आईने जेवायला शेवयाची खीर केली . जेवणं करुन सगळे झोपले . आक्कीसाठी बाळंतीण बाईप्रमाणे स्वयंपाकघरात बिछाना तयार केला होता . पण एकूणच आक्की खूपच फ्रेश वाटत होती . दुसरे दिवशी गावातले भावकीचे , स्नेह संबधातील लोक येतच होते . पुर्ण दिवस कोणी न कोणी येतंच राहीले . मग संध्याकाळी पुन्हा एकदा वाडायातले काका-काकू सगळ्या वहिनी भाऊ येऊन बसले सगळे म्हणू लागले
" चला आता 1981 साल आज संपतय . उद्यापासून नविन वर्षाची सुरुवात होतेय . सगळी पीडा संपून जाईल आज . उद्यापासून नविन आयुष्याला सुरुवात होणार ".
मग त्याकाळी ख्याली खुशाली कळवण्याच साधन म्हणजे टपाल होतं . मग काकांनी सगळ्या पाहूण्यांना
" रेखाचं आॕपरेशन व्यवस्थित झाले असून तिला आता घेरडीत आणले आहे काळजी नसावी ".
या आशयाची पत्र लिहीलं व ती टपालपेटीत टाकून आले .-काका पण खूष झाले . काकांना बारा हत्तीचं बळ आलंय असे वाटू लागले . मग रात्री त्यांनी ठरविले उद्या जतेला जाऊन सगळा किराणा आणू की ज्यामुळे आक्कीला जरा चांगल चुंगलं करुन घालता येईल .1 जानेवारी 1982 नविन वर्षाची सुरुवात अगदी सकाळी साडेसातला काकांना जत गाडी होती आई-काका लवकरच उठले काकांच आवरेपर्यंत आईने साजूक तुपातला शिरा केला . आक्की सात वाजले तरी उठली नव्हती मग काकांनी तिला उठवलं व माझ्याबरोबर शिरा खायचा म्हणू लागले . ती म्हणाली
" काका मला जरा झोप येतेय मी थोड्या वेळाने उठते व खाते तुम्ही जाऊन या जतेला ".
आई-काकांंना वाटले प्रवासाचा कालच्या गाप्पांचा ताण पडला असेल झोपू द्यावं तिला . पुन्हा घरातून बाहेर पडतांना काकांनी तिला बजावलं .
" रेखा मी किराणा आणायला जतेला निघालोय तू शिरा खाऊन औषधं घे आणि मग झोप " .
मग ती अंथरुणातच उठून बसली व काकांना तिने हसून निरोप दिला . आणि काका सामान आणायला जतेला गेले
प्रकरण 16 वे
सगळं मुसळ केरात !
2 नोव्हेंबर 2020
1 जानेवारी 1982 नविन वर्षाची सकाळ अगदी उत्साहात उजाडली आहे या विचारात आई-काका मनोरे रचू लागले . आता रेखाचं बस्तान लवकर बसेल त्यासाठी तिची तब्ब्येत अगदी व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे यासाठी तिला व्यवस्थित खायला प्यायला दिलं पाहिजे आणि म्हणून मग चांगल्या दर्जाचा किराणा आणू असं म्हणत काका सकाळच्या एसटीने जतेला गेले होते . आक्कीला गोड आवडतं म्हणत काकांबरोबरच आईने सकाळी सातला तिला दिलेला शिरा नऊ वाजले तरी आक्की खायला नको म्हणत होती मग आई रागाऊनच म्हणाली
" असं का ग करतेस रेखा ? वेळेवर खाल्लं पाहिजेस उषाला हाक मारु का "
मग आक्की म्हणाली
" आता त्यांना नको त्रास द्यायला शरी मला मदत करेल " .
हे बोलतांना पण तिची जीभ जड झालीय असं जाणवत होतं . आणि ती गुंगीत आहे असे वाटत होते . आईला वाटलं औषधांमुळे गुंगी लागत असेल तसंच दोन दिवस जरा दगदग पण झालीय . मी आक्कीजवळ शिरा घेऊन गेले तिला उठून बसायला जमेना म्हणून तिने माझा आधार घेतला . मी भिंतीला तक्क्या टेकवून ठेवला व तक्क्याला टेकवून तिला बसवलं . तिला शि-याचा चमचा उचलून पण घेता येईना मग मीच एक चमचा शिरा तिला भरवला तर तिला तो गिळता येईना . आई स्वयंपाक करत होती मी तिला हा सगळा प्रकार सांगितला तर आई आक्कीकडे आली व म्हणू लागली
" रेखा तू खाण्याची हायगय करु नकोस बरका औषधाच्या बरोबरीनं सगळं व्यवस्थित खाल्लस तर लवकर बरी होशील बघ , आता तुझ्यावर सगळं अवलंबून आहे ".
आक्कीने गिळायला त्रास होतोय म्हणून सांगताच आईने दूध उकळून त्यात शिरा घातला व खिरीसारखं मिश्रण करुन दिलं . पुन्हा ते घेऊन मी आक्कीकडे गेले तर ती म्हणाली
" शरे मला हातानं खायला हात उचलत नाही तुच घाल खायला "
मग मी तिला चमच्यानं भरवल्यावर मात्र अगदी व्यवस्थित खाल्लं तिने . पण आईला मात्र काळजी वाटू लागली परवा दिवशी ही एवढा मोठा प्रवास करुन आली काल दिवसभर छान गप्पा मारल्या , जेवण केलं , घरातल्या घरात फिरली आणि आज एकदमच असं का होतंय हिला ? तिला जडपणा का आलाय ? बोलतांना पण नीट नाही बोलत असे म्हणत ती चिंतातुर झाली .
त्यादिवशी मला 1 जानेवारीची शाळेला सुट्टी होती . आमच्या आडाचं पाणी खारं होतं ते प्यायला चांगलं लागत नसे . म्हणून आम्ही वाड्यातले सगळे मिळून बबन काकांच्या आडाचं पाणी प्यायला म्हणून आणायचो त्यासाठी वरलीकडं जावं लागायचं जरा लांब होतं ते . सगळे आमच्या घरात जमायचे मग मागच्या दारांनी आम्ही पाण्याला जायचो . दहाच्या सुमारास आपापल्या घागरी घेऊन उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी व विद्या आमच्या घरी जमले . आईने काळजीच्या सुरातच उषा वहिनींना आक्कीविषयी सगळं सांगितले . तर त्या आक्कीजवळ जाऊन बोलू लागल्या
" काहो रेखा आत्त्या असं का करताय ? दवाखान्यात तर घरी कधी जायच म्हणून घोकत होता . आता आपण घरी आलो ना ? मग आता असं का करताय ? तुम्ही जर असं केलं तर काका उद्याच मिरजेला जाऊ म्हणतील बघा ".
मग आक्की दमाल्यासारखं होत होतं म्हणून हाताने खूणा करुन बोलू लागली . तिने तिचं अंथरुण जरा पुढे घ्यायला सांगितले . आम्ही तिला देवासमोर तिचे अंथरुण टाकून दिलं . आई घाबरली होती तिने मागच्या दारात उषा वहिनीला बोलावलं व हळूहळू आवाजात दोघी बोलू लागल्या . उषा वहिनींनी सांगितले
" तिथे असं झालं की इंजक्शन द्यायचे मग दोनतीन दिवस सगळं सुरळीत चालायचं . येतांना इंजक्शन दिलं होतं पण आता पुन्हा द्यावं लागणार नाही असं सांगितलं आहे . बघूआता काका आल्यावर काय म्हणतात ते नाहीतर परत न्यायची पाळी येतीय का काय असं वाटतंय ".
मग थोडावेळ थांबून आम्ही सगळे पाण्याला गेलो .
साधारण आकरा वाजत आले होते आम्ही पाण्याच्या घागरी घेऊन घराजवळ परत आलो तर आई खूप मोठ्या आवाजात
" रेखा ए रेखा अगं रेखा "
अशा हाका मारत असलेला आवाज येत होता मी पळतच घरात गेले आणि आक्कीच्या डोक्याजवळच घागर ठेवली व "काय झालंय ग "
म्हणून आईला विचारु लागले . आई खूप घाबरली होती आक्कीचं डोकं मांडीवर घेऊन हनुवटी हालवत तोंडावरुन हात फिरवत तिला हाका मारत होती . मला म्हणाली
" शरु हिच्या तोंडात थोडंस पाणी घाल ग बाबा ".
मला पण सुचेना त्याच घागरीतलं पाणी हातानं बोटांच्या खोबणीत घेऊन मी तिच्या तोंडात घातलं तिने डोळे किलकीले करत माझ्याकडे पाहिलं व एक घोट हळूहळू पिला मी लगेच पळत जाऊन फुलपात्र आणलं व त्यात पाणी घेऊन तोंडात आणखी एक घोट घातला तर गडगड आवाज आला . आई रडतच तिच्या कानाच्या पाळ्या चापचू लागली , तोंडावरुन हात फिरवू लागली तोवर उषा वहिनी व पिलू वहिनी मागच्या दाराने घागरी घेऊन आल्या आई उषा वहिनीला म्हणाली
" तू घरी जा आणि मोहनला बोलावून आण पटकन "
पुन्हा मी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तर तोंडातून पाणी बाहेर आलं तिची हालचाल बंद झाली होती ! डोळे अर्धवट उघडे पण हलत नव्हते , मग मात्र आईचा धीर सुटला तोवर आण्णा-वहिनी धावत आले . त्यांना पाहून आईने हंबरडाच फोडला कासावीस होत ती आण्णाला म्हणाली
" अरे मोहन बघ रे बाबा , रेखांच चरित्र मला काही बरोबर दिसत नाही . हिच्या कानाच्या पाळ्या बघ कशा लुळ्या पडल्यात , दोन घोट पाणी पिलं तिसरा घोट बाहेर आलाय , हालचाल तर काहीच जाणवत नाही आता काय करावं मला तर काही कळना बाबा , बघ आता तूच कर काहीतरी ".
तोवर वाड्यात सगळ्यांना रेखाला काहीतरी झालं ही बातमी समजली . जसं आहे तसं एकएकजण आमच्या घराकडे पळत येऊ लागले . घरात झालेली गर्दी , आईचा आक्रोश सगळ्या बायकांची रडारड पाहून फारसं कळत नसलेली ज्योती , लहानगी अंजू यांना काय होतंय हे कळेना त्यापण आईकडे पाहून मोठमोठ्या आवाजात रडू लागल्या तर गायत्री आक्कीच्या जवळजवळ करु लागली आणि संजू आईच्या जवळून हलेना या दोघी बाळंच होत्या ती दोन बाळं पण घाबरी झाली रडू लागली मला ब-यापैकी समजत होते मी इकडून तिकडे पळत होते कोण काय सांगेल ते करत होते . कोणीतरी म्हणालं
"अरविंद काकींना आणावं ".
कोणी मध्येच अंगाला हात लाऊन पहात
" गार लागतंय "
म्हणायचं तर कोणी नाकापुढे हात धरुन श्वास येतोय का पाही , नाडी लागतेय का बघ असे प्रकार सुरु झाले अंदाज तर सगळ्यांना आला होता पण बोलणार कोण आणि काय ?
दहा मिनिटांत आरविंद काकी आल्या . त्यांना पाहून आई लहान मुलांसारखे त्यांना प्रश्न विचारु लागली
" काकी बघाहो हीला आणि पटकन काहीतरी द्या . आज हे जतेला गेलेत पाहिजे तर आले की नेतील मिरजेला पण आत्ता काहीतरी हिला द्या "
अस्वस्थ होऊन बडबड करु लागली . आरविंद काकी आक्कीजवळ बसल्या तिला हात लावला की त्यांना कळून आलं होत पण आईची स्थिती पाहून त्यांना गोंधळायला होऊ लागलं आता यांना काय सांगावा म्हणून . त्या म्हणाल्या
" मी इंजक्शन देते पाहूया काय होत ते तुम्ही शांत बसा ".
पण आई हुशार होती , आक्कीची हालचाल पुर्ण बंद झाली होती त्यामुळे तिला आंदाज आला होता पण मान्य होत नव्हते ती एकदम मोठ्या आवाजात ओरडली
" रेखा ssss"
आणि जोरात ओरडली तशी तिची दातखीळ बसली . मावशी व प्रभा काकूंनी आईला बाजूला घेतलं अरविंद काकींनी आईला इंजक्शन दिल . खूणेनं मोहन आण्णाला वाड्याबाहेर जायला सांगितले पाठोपाठ त्यापण निघाल्या त्यांच्याकडे माझं लक्ष होतंच . काकी वाड्याबाहेर गेल्या पाठोपाठ मी पण गेले त्यांनी मोहन आण्णाला सांगितले
" मोहन , रेखा गेलीय ! "
एवढं ऐकलं मात्र मी पण जोरात रडू लागले , मोहन आण्णा डोक धरुन नरसोबासमोरच्या दगडावर मटकन बसला तोपण रडायला लागला मागोमाग रंगा माळी , रमेश आण्णा , फक्कड काका हे सगळे मागोमागच आले होते . रंगाने मला पकडून ठेवलं मग काकी म्हणाल्या
" काकांना आणायला माणूस पाठवण्याची व्यवस्था करा . आपण आत्ताच पपा काकींना काही सांगायला , बोलायला नको , भाऊकाका आल्यावर सांगू . त्यांना ओळखायला आलंय पण त्यांच्या मनाची तयारी होऊदे . आधीच त्यांना डायबेटीसचा त्रास सुरु झालाय सध्या ताण पण खूप आहे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे पण जवळच्या माणसांना बोलावून घ्या . "
हे सगळं माझ्यासमोर त्यांनी सांगितले त्यामुळे मी गप्प बसले .
आईला खूप त्रास होत होता ती एकदम गप्प बसायची मधूनच जोरात ओरडायची . त्यामुळे दोनतीनवेळा आईची दातखीळ बसली . घरात आलेल्या बायकांनी ज्योती , अंजू , गायत्री आणि संजू सगळ्यांना देशपांडे सरांच्या घरात बसवलं तर बाहेरच्या बाहेर मोहन आण्णा , रमेश आण्णा , आंता काका व फक्कड काका यांनी काकांना जतेहून , शेतातून भाऊजींना आणायला तर मेडशींगीला तिच्या सासरी माणसं पाठविली . पहिल्यांदा शेतातून भाऊजी आले . त्यांना इतका धक्का बसला होता की त्यांना रडायचं पण समजेना मग हुंदके देतच ते सांगू लागले की
" मी आणि सुका मघाशी शेतात फिरत होतो तर माझ्या डोक्यावरच टिटव्या जोरजोरात ओरडत होत्या .
सुका मला म्हणाला सुद्धा पाव्हणं काय होतंय असं आव , लक्षण काय बरं न्हाय मग मला पण वाटलं की यावं काय गावात तर थोड्याच वेळात गावातूनच माणूस आला ".
आणि हे सांगतच ते हमसूनहमसून रडू लागले .
इकडे आईच बाळ म्हणजे संजू नऊ महिन्याचं अंगावर पिणारं बाळ होतं भूकेनं रडूनरडून गोंधळ घालू लागलं , मावशी आईला संजूला जवळ घे म्हणू लागल्या तर आईचा आक्रोश चालू होता
" मावशी माझ्या पोटचा गोळा काढून नेल्यासारखं वाटतंय , खड्डा पडलांय माझ्या पोटात , माझा पान्हा आटून गेलाय कुठून आणू दूध हीला सांगा बाई ".
मावशी व माई मावशी आईच्या दोन्ही बाजूला बसून होत्या धीर देत होत्या . दुपारचे दोन वाजून गेले . वाडा आणि वाड्याबाहेर गच्च गर्दी जमली होती . सगळे आता काकांची वाट पहात होते . रंगा माळी व अजून एकजण काकांना आणायला गाडीवर जतेला गेले होते . त्यांची काकांना गाडीवर बसवून आणतांना खूप फजिती होत होती .
" रेखाला बरं वाटत नाही मिरजेला जायचंय म्हणून तुम्हांला न्यायला आलोय ".
असं त्यांनी काकांना खोटं सांगितले होते व दोघांच्या मध्ये बसवून आणत होते पण काकांचा विश्वास बसत नव्हता , त्यांना शंका आली होती . काकांनी दोनवेळा त्याला चालती गाडी थांबवायला लावून
" काय झालंय खरं सांग मला खोट बोलू नकोस "
असं दरडावून विचारलं सुद्धा होतं . पण त्यांन काहीही न सांगता कसबसं घेरडीपर्यंत आणलं होतं . पेठेत लोक जमले होते काका आलेले दिसताच कुजबूज करु लागले , काकांकडे पाहू लागले मग काकांना पण शंका येऊ लागली . पण कोणीच काही बोलत नव्हतं . मुख्य रस्त्यावरून गाडी बोळात वळली आणि वाड्याबाहेर गच्च गर्दी जमलेली दिसल्यावर मात्र काकांचा धीर सुटला होता . काका धावतच वाड्यात आले . आंता काका व रमेश आण्णानी त्यांना पकडून घरात आणलं . आक्कीला सोप्यात आणून झोपवलेलं होतं तिला पहाताच काका दरवाज्याजवळ कोपऱ्यातच पाय पसरुन मटकन खाली बसले आणि डोकं दोन्ही बाजूला धडाधड बडवत ओक्साबोक्शी रडू लागले चारचारजणांना त्यांना सावरण मुश्कील होऊ लागलं .
" मी किती धडपड केली तरी असं कसं झालं . रेखा अशी कशी मला न सांगत गेली "
त्यांचा आक्रोश आतडी पीळवटून टाकणारा होता . आई रडतरडतच म्हणू लागली
" रडू दे त्यांना फार गिळलंय त्यांनी . जिद्द बाळगून धडाडीनं केलंय खरं परमेश्वरांन खाडकन थोबाडीत मारलीय . हारलेत ते त्यांच दुंःख बाहेर येऊ दे नाहीतर छाती दडपून जाईल त्यांची ".
आणि रडारडीचा एकच कल्लोळ उठला . आक्कीचे दीर व सासरे आले . ते पण हतबल होऊन रडू लागले . सासरे दुःखीकष्टी होत रडतच बोलू लागले
" रेखाबाई काय केलंत हे उलटसुलट पहायची आमच्यावर पाळी का आणली हो . सुखाची चटक लावून निघून गेलात माझा रवी राज्यावरुन उठला ".
आक्रोशाला सीमाच राहिली नाही उलटसुलट घडलं होतं . लहानलहान दोन पोरी टाकून ऐन पंचवीशीत आक्की या जगातून निघून गेली होती . हातातोंडाशी आलेले सुखाचे दिवस तिला उपभोगता आले नाहीत .
पाच वाजता जगरहाटीप्रमाणे अंत्यसंस्कार करायचं ठरलं . आख्खा गाव जमला होता . जवळपासचे पाहुणे जमले होते . बोळात थांबायला जागा नव्हती . इतकी गर्दी जमली होती . सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत आंधार पडला . सुन्न वातावरणात सगळे घरी येऊन बसले . सख्ख्या बाहिणी तायडी मायडी यांना यातलं काहीच माहित नव्हतं आता प्रश्न त्यांना सांगण्याचा होता . मग विचार करुन मोहन आण्णाला दुसरे दिवशी प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीला पाठवून द्यायचं व त्यांना घेऊन यायचं असे ठरले . त्याप्रमाणे आण्णा गेला . आचानकच मोहन आण्णाला दारात पाहून तायडीला खूप आनंद झाला . तिच्या ध्यानीमनी पण काही नव्हते . चहापाणी झाल्यावर आण्णा भीतभीतच म्हणाला
" रेखा तुमची फार आठवण काढतेय म्हणून काकांनी मला तुम्हांला आणायला पाठवलय ".
हे ऐकून तायडीला काही पटेना ती आण्णाला खोदूनखोदून विचारु लागली . तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण आण्णा गप्पा मारत होता असं कसं बोलावं म्हणत ती गप्प बसली . सगळे आवरुन निघाले मधूनच तायडी आण्णाला विचारायची
" आण्णा , घेरडीत सगळं ठीक आहे ना रे ? "
आण्णा छातीवर दगड ठेऊन हो म्हणायचा . पाच वाजता ते सगळे घेरडीत पोहोचले . घरी येईस्तोवर त्यांना अंदाज आला होता . एकमेकांना पाहून जो आक्रोश सुरु झाला तो हृदय पिळवटून टाकणारा होता . मायडीने तर घराच्या पायऱ्या कशातरी चढल्या ती चक्कर येऊनच पडली . पुन्हा सगळी भावकी जमली , सगळे तायडीला
" तूच घरात मोठी आहेस , तूच जर हातपाय गाळून बसलीस तर काका-काकींना कोण धीर देईल ? तुला स्वतःला सावरुन या दोघांना धीर द्यावा लागेल ".
कोणी कोणाला सावरायचं हाच मोठा प्रश्न होता . अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत काका सकारात्मक दृष्टी ठेवून मार्ग काढत होते पण नियतीपुढे काहीच चालले नाही .
" सगळं मुसळ केरात गेलं ".
हाहा म्हणता बातमी गावोगावी पोहोचली असं कसं झालं म्हणत पुन्हा सकाळी तिसऱ्याला म्हणून पाहुणे , स्नेही , नातेवाईक गोळा झाले . आईमध्ये त्राणच उरले नव्हते तिला सावरायलाच कोणीतरी लागायचं इतके तडफदार काका पण त्यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती . आम्ही कळत्या मुली दुःखी तर नकळत्या मुली , नाती भयभीत झाल्या होत्या . मेडशींगीहून आक्कीचे दीर , जाऊ , सासरे , नणंद बाकीचे नातेवाईक आले होते . आक्कीचा दीर अरवींद म्हणाला
" गेली पाच वर्षे खूप केलं तुम्ही , पण आता काका-काकूंची दोघांचीही अवस्था पहाता आम्ही दोघा नवराबायकोंनी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे अंजू व गायत्री या दोघींनाही आम्ही सांभाळतो , त्यांना घेऊन जातो , तुम्हांला जेव्हा त्यांना पहावं वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना घेरडीला घेऊन या पण ही जबाबदारी आम्ही घेतो ".
सध्या तर घरातील परिस्थिती खूपच नाजूक झाली होती या दोन पोरी डोळ्यासमोर दिसल्या की आईची अवस्था भयभीत होत होती . मग कोणीच काहीच बोलले नाही . अरवींद म्हणाला त्याप्रमाणे तिसरा झाल्यावर भाऊजी व मुली सगळ्यांबरोबर मेडशींगीला गेल्या .
प्रकरण 17 वे
दुःखाचा डोंगर
29 नोव्हेंबर 2020
आक्की गेल्यानंतर बरेचसे परगावचे नातेवाईक तिसऱ्या दिवशी आले होते . एक तारखेच्या वातावरणात फारसा बदल झालेला नव्हता . त्यामुळे सगळे रडूनरडून व्याकूळ झाले होते . त्राण म्हणून कोणात उरले नव्हते . रोजच चहाच्या वेळेला चहा आणि जेवणाच्या वेळी जेवण घेऊन कोणीतरी हजर असायचे इच्छा नसतांना जिवनाचे रहाटगाडगं सुरु झालं होतं . आणि जसं समजेल तसं धक्का बसल्याप्रमाणे चौथे दिवसापासून लांबलांबचे पाहूणे येऊ लागले . त्याला वेळकाळाचं बंधनच नसायचे मग प्रत्येकाला पहिल्यापासून सगळा घटनाक्रम सांगायचा आणि ते सांगत असतांना राहून राहून आईला तितकेच दुःखाचे उमाळे यायचे .आई त्यातून बाहेरच येईना . काका थोडंस तरी बाहेर जायचे पण आई घरातच असायची कामे करायला आम्ही मुली होतो त्यामुळे तिच्या डोक्यातून तो विषय जातच नसे . ती संजूकडे पण फारसं पहायची नाही . सातआठ दिवसांनी दुपारीच काकांचे सोलापूरचे नारायण मामा व मामी भेटायला आले . ते खूप धोरणी होते व त्यांच्या बोलण्यात परखडपणा होता . काका त्यांना फार मानायचे ते त्यादिवशी मुक्कामाला राहिले आणि दिवसभर भेटायला येणारे लोक व आईला होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिला रात्री जेवणं झाल्यानंतर आई-काकांंना समोर बसवून सध्या परिस्थिती काय आहे व दुःखावर मात करण्यासाठी आता काय केलं पाहिजे याविषयी जणू मौलिक सल्लाच दिला त्यांनी . ते आईला सुलभा व काकांना भाऊ म्हणायचे ते म्हणाले
" हे बघ सुलभा , झालंय हे खूपच वाईट झालंय , भाऊंनी व तू कशातच कुचराई केली नाही . रेखासाठी तुम्ही जे जे केलंय ते मला पहिल्यापासून माहिती आहे . तिच्यासाठी जेजे करायचं होतं त्यापेक्षा काकणभर जास्तच केलंय जिवाचं रान केलंय पण यश आलं नाही . जे झालं ते विधीलिखीत होतं , ती अल्पायुषी होती हे आता तुम्ही मान्य केलं पाहिजे . तसं तर तुमच्या स्वतःच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अजून भरपूर आहेत . फक्त एका मुलीचं सुरळीत लागलं आहे . दुसरी मुलगी काॕलेजला आहे तर तिसरी आता काॕलेजला घालावी लागेल , चौथी शाळेत जातेय आणि पाचवं तर बाळ आहे . म्हणजे तुमच्या संसाराचा व्याप बऱ्यापैकी मोठा आहे , मुख्य म्हणजे अनेक जबाबदाऱ्या अजून पार पाडायच्या आहेत . सुलभाची तब्बेत त्रास देते आहे . जे आहे हेच व्यवस्थित पार पाडणं तुम्हांला विशेषतः सुलभाला जरा जास्त कठीण होतंय . आता या परिस्थितीत रेखाचं जाणं म्हणजे तुमच्यासठी खूपच क्लेशदायक आहे हे मान्य आहे पण आता जर रेखाच्या मुली सुलभाच्या डोळ्यासमोर राहिल्या , त्यांची जबाबदारी जर तिच्यावर टाकली तर सगळच मोडून पडेल तुमचा व रेखाचा दोघांचे दोन वेगवेगळे संसार होते सगळं एकत्र केलं तर ती गल्लत होईल आणि तुम्ही ती गल्लत करु नका . रेखाच्या मुली मेडशींगीलाच राहू द्या त्यांना आवश्यक ती मदत करा . त्यांना मधूनमधून सगळे असतांना सुट्टीत इकडे आणा . मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या . आता भाऊंनी त्याची नोकरी पहावी व पुर्वीप्रमाणे शेतीत लक्ष घालावं व सुलभाने नेहमीप्रमाणे संसार पहावा रिकाम्या वेळात तिला रुचेल ते अध्यात्माचे वाचन करावे हे जेवढं लवकर सुरुवात कराल तेवढे लवकर या धक्क्यातून तुम्ही सावराल ."
हे इतकं त्यांच्याकडून ऐकल्यावर मात्र आईला थोडंस हलकं वाटलं कारण मामांनी एकूणच जबाबदाऱ्यामध्ये सुटसुटीतपणा आणला होता कोणीतरी मोठ्या माणसांनी विशेष म्हणजे काकांचा ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी दिलेला सल्ला होता हा , काकांना तो पचनी पडत नव्हता त्यांचा आक्कीच्या मुलींमध्ये जीव गुंतला होता . पण त्यांना घेरडीत ठेवलं तर सांभाळणं पण अवघड होणार व आईला त्याचा खूप त्रास होईल हा विचार करत शेवटी काकांनी नारायण मामांचा सल्ला ऐकला . व मुली मेडशींगीला गेल्यात तर तिथेच रहातील असे ठरले . आता काकांनी आक्कीसाठी शेतीत पोल्ट्रीचा जो घाट घातला होता तो निस्तारणं भाग होतं . पंधरा दिवसांनी काका पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे गेले त्याला सगळा वृत्तांत सांगितला व त्याच्या मदतीने ते सगळं बाडबिस्तार गुंडाळून टाकलं त्यात त्यांना मानसिक त्रास खूप झाला आणि आर्थिक बाबतीत तर कशाचाच हिशोब करायचा नाही असे काकांनी ठरवून टाकले .
" लाख मोलाची पोरगी गेली तिच्यासाठी जे काही केलं ते तिचं होतं ते तिच्याबरोबर गेलं "
असे म्हणत दवाखाना व पोल्ट्री हे विषय चर्चेसाठी त्यांनी कायमचे बंद केले व दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली . तायडी व तिच्याबरोबर मायडी वाडीला गेल्या . पंधरा जानेवारी उजाडलं उजाडणारा प्रत्येक दिवस काहींना काही आठवणी घेऊन उजाडायचा . भेटायला येणारे अजून येतच होते मी अजून शाळेत जात नव्हते ही गोष्ट माझे क्लास टीचर पठाण सरांनी काकांना पेठेत बोलून दाखविली होती व घरी मुली पाठवून त्यांनी मला शाळेत बोलावून घेतलं व ते मला म्हणाले
" आज पंधरा जानेवारी आहे सहामाही परिक्षेत वर्गात पहिली आलीयस व फर्स्टक्लास मिळाला होता आता 21 तारखेपासून पुर्वपरिक्षा आहे व दोन महिन्यांवर वार्षिक परिक्षा आलीय . तुझा अभ्सास वाढण्याऐवजी कमी झाला होता व या पंधरा दिवसांत तर काहीच झाला नाही . तू अभ्यासाला व शाळेत यायला सुरुवात कर ".
ही गोष्ट पण खरी होती दिवाळीपासून आक्कीचा दवाखाना सुरु झाला होता तेव्हापासून तिच्या मुलींना पहाणे व आईला मदत करणे यात माझा अभ्यास होत नव्हता . फक्त शाळेत जाऊन येत होते पण जादा तास व शिकवणीला जायला मला जमतच नव्हते घरी अभ्यास तर अजिबात होत नसे .
त्यादिवशी आई-काकांंच्या पण लक्षात आले की माझं दहावीचं महत्त्वाचे वर्ष आहे आणि माझा अभ्यास होत नाही . त्यांनी मला सांगितले
" तुझं तू शाळा शिकवणी सुरु कर समोर माडीवर अभ्यासाला जाऊन बसत जा . घरी येणाराकडे लक्ष देऊ नकोस ."
पण तसं होत नसे , मी माझ्या रुटीनला सुरुवात केली पण कोणीही भेटायला घरी आलं की रडारड व्हायची पुन्हा गप्पांचा आवाज यायचा आठवणी निघायच्या मग माझं पण अभ्यासांत लक्ष लागत नसे .
आमच्या वाड्याशेजारी डोंगरे वाडा होता . तिथे नेहमी भजन , पोथीवाचनाचे कार्यक्रम व्हायचे वयस्कर दांपत्य होतं पण त्यांना सारा गाव दादा वहिनी म्हणायचा . एक दिवस डोंगरे दादा आईसाठी
" एकनाथी भागवत , ज्ञानेश्वरी , तुकारामाची गाथा , दासबोध "
ह्या सगळ्या पुस्तकांचे बाड घेऊन आले . आई-काकांंना भेटणं , बोलणं हा त्यांचा उद्देश होता . त्यांनीपण बऱ्यापैकी संबोधन केले व आईला पाहिजे तो ग्रंथ/ पुस्तक ठेवून घ्या व वाचा असे सांगितले . मग आईने पण त्यात मन रमवायला सुरुवात केली . तिने दुपारच्या वेळी वाचन सुरु केले मग वाड्यातून पण मावशी , प्रभा काकू , मोठ्या काकू व ताई आत्या ऐकायला येऊन बसू लागल्या त्यांची पोथीवाचनानंतर खूप चर्चा व्हायची . सगळ्यांनी मिळून आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठीचा हा प्रयत्न होता . खेडेगाव होते तरी एकोपा खूप होता एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा तो जमाना होता .
प्रत्येक शनिवारी गोंदा मामा पण यायचा मग तेवढाच बदल बरा वाटायचा . सण आला की आई-काका दुःखी व्हायचे पण काळ हेच त्याच्यावरचं औषध होतं . मार्चच्या पहिल्या आठवड्यात मायडीची बारावीची परिक्षा संपली व ती घेरडीत आली व माझी दहावीची परिक्षा सुरु झाली सगळ्यांच्या परिक्षा संपल्या . मग मे महिन्यात तायडी घेरडीला आली मग आक्कीच्या मुलींना आणायचं ठरलं पण गायत्री खूपच लहान होती आता तिला तिच्या काका-काकूची सवय लागली असणार थोडी कळती झाल्यावर आणू असे म्हणून अंजूला एकटीलाच घेरडीला आणायचं ठरलं नेहमीप्रमाणे मला मेडशींगीला पाठवायचं ठरलं यावेळी मात्र मी रडतरडत काकांना सांगून टाकल
" मी आता कधीही मेडशींगीला जाणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणालाही पाठवा ".
मग या कामासाठी लहानग्या ज्योतीला तयार केलं . वायाने अंजू , मंजू ज्योतीला मैत्रिणीसारख्या वाटायच्या खेळायला मिळेल असे वाटून ती पण जायला तयार झाली मग लहान आहे म्हणून तिला सोबत म्हणून बबलूला पाठवून अंजूला आणलं तिला पाहिलं की पुन्हा आठवणींचे कढ निघाले , ती भळभळती जखमच होती .
सुट्टी संपेपर्यंत सगळे घेरडीतच होते . पुन्हा अंजू जातांना दप्तर गणवेश बरोबर देऊन ज्योती पोहोच करुन आली . आता रिझल्टनंतर मला पण शिक्षणासाठी बाहेर पडावं लागणार होतं . मग आता राणीचं लग्नाचं पहावं लागेल तसेच सांगोल्यात जर ती राहिली तर शनिवारी घेरडीत घरी येऊन रविवारी परत जाईल तेवढाच आईला आधार होईल मग जवळच असलेली बरी म्हणत मायडीला सांगोल्यात आत्याकडे व मला किर्लोस्करवाडीला तायडीकडे शिकायला ठेवायचं ठरलं . जून महिना आला तसे रिझल्टचे वेध लागले आधी मायडीचा लागला नंतर माझा होता . आमची बॕच जरा रद्दड होती त्यामुळे वर्गात सुधीर व मी आम्हांलाच बरे मार्क्स असायचे . पण सहामाहीनंतर माझा अभ्यास झालाच नव्हता त्याचा परिणाम रिझल्टवर झाला होता . फक्त 56% मार्क्स मिळवून मी वर्गात पहिली आले होते . मला पहिल्या नंबरची अजूनही लाज वाटते कारण आमच्या शाळेत आॕफिसमधल्या बोर्डवर दहावीत पहिला नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव व मार्क्स लिहीले जायचे व त्या बोर्डवर एवढे कमी मार्क्स मलाच होते . मोहन आण्णाला शिक्षणाच्या बाबतीत फार रस असायचा मार्क्स कितीही आसू देत पण पहिला नंबर आला आहे तर शरुचं कौतुक झालंच पाहिजे म्हणत मोहन आण्णांनी स्वतः पेढे आणून सगळीकडे वाटले होते .
जूनमध्ये ठरल्याप्रमाणे मी किर्लोस्करवाडीला शिकायला गेले . सुरुवातीला दोन महिने मला अजिबात करमत नसे रडायला यायचं . आई-काका , ज्योती , संजू यांची आठवण यायची हे पाहून तायडीने मला काही दिवस समजावण्याचा प्रयत्न केला पण मी रडायचीच मग मात्र तिने मला खडसावूनच सांगितले
" तुला नेमकं काय पाहिजे ते तू एकदा शांतपणे ठरव . इथे राहिलीस तर शिकशील घेरडीत रहायचं असेल तर शिक्षण सोडावं लागेल काय करायचं ते ठरव . आठवण तर येणारच पण आठवण आली की पत्र लिहावं मग बरं वाटेल तुला . बघ काय ते तूच सांग त्याप्रमाणे आपण करुयात . "
तिचा डोस चांगलाच लागू पडला मी पण विचार केला रडण्यात काही अर्थ नाही म्हणत स्वतःला सावरलं व आठवड्यातून एकदा आई-काकांंना पत्र लिहायचे ठरवले . पुन्हा पुन्हा मैत्रिणी झाल्या मग मी रमले .
इकडे घेरडीला गोंदा मामा नेहमी यायचा सण झालेला असला की आईची मनःस्थिती फारशी चांंगली नसायची . मग मामांने दसऱ्यातच काकांना एक प्लॕन सांगितला तो म्हणाला
" भाऊजी , यावर्षी तुम्ही दिवाळीचं काहीच करु नका सगळेजण माझ्याकडे मुचंडीला या , आपण दिवाळी झाली की दुसरे दिवशी ट्रीपला जाऊ ."
मग काकांनी पण विचार केला रडारडीपेक्षा हे ठीक राहिल आणि मग आमचं ट्रीपला जायचं ठरले त्याप्रमाणे आम्ही मुचंडीला गेलो . दिवाळी झाली व दुसरेच दिवशी मामा , मामी , त्याची दोन मुलं ,एक मुलगी तर आम्ही चौघी बहिणी आणि आई-काका असे आकराजण मिळून विजापूर , बदामी , शिर्डी , नाशिक , त्र्यंबकेश्वर , तुळजापूर सोलापूर असे आठवडाभर फिरुन आलो तेवढाच बदल झाला त्यामुळे आई जराशी समाधानी वाटली . आता संजू दीड वर्षाची झाली होती ती दिसायला एकदम गुटगुटीत , गोरीपान छान दिसायची त्यामानाने तिची प्रगती झाली नव्हती , तिचं चालणं बोलणं ज्या गतीने व्हायला हवं होतं तसे नाॕर्मल मुलांच्या गतीने होत नाही हे आई-काकांंच्या लक्षात आले होते . आईच्या डायबेटीसमध्ये झालेलं बाळ आहे असे आईला वाटायचे . मग आईपेक्षा काकाच संजूकडे जास्त लक्ष देऊ लागले .
बघता बघता आक्कीला जाऊन एक वर्ष पुर्ण झालं होतं एकही दिवस तिच्या आठवणीवीना जात नसे . आख्खं वर्ष दुःखात गेलं होतं पण आपापले उद्योग सुरु झाले होते . आई नेहमी म्हणायची .
" जो जातो तो चार घासाला मुकतो जगरहाटी सुरुच रहाते . "
सुरुवातीला काही दिवस फक्त अंजूला आणलं जायचं पण पुढेपुढी गायत्री पण तिच्याबरोबर येत असे . उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळीच्या सुट्टीत मंजू मेधा माझ्याबरोबर घेरडीला यायच्या नंतर तायडी यायची मग ज्योती जाऊन अंजू गायुला घेऊन यायची आलेल्या दिवशी रडारडी व्हायची हे असे पुढे अनेक दिवस चालत राहिले पुढेपुढे त्या दोघींना बसवून दिलं की येणे जाणे व्हायचे . पण सध्या तरी 1982 साल हे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आमच्या घरातील प्रत्येकासाठी वाईट आठवणीसाठी स्मरणात राहिलं . पुढे कित्येक वर्षे सारे जग नविन वर्षीचे स्वागत उत्साहाने करत असतांना आम्ही मात्र खट्टू असायचो . काळाच्या ओघात दुःखाची तिव्रता फक्त कमी झाली पण कटू आठवणी कुठेतरी खोलवर काळजात रुतलेल्या आजही जाणवतात .
1983 साल पण काही फारसा बदल झाला नाहीच . आहे ते रुटीन फक्त सुरु होते . बघता बघता आक्कीला जाऊन दोन वर्षे झाली . 84 साल उजाल्यावर मात्र थोडेफार विचार करायला सुरुवात केली . आता काकांना मायडीचा विषय डोक्यात घोळू लागला होता तसं तिचे आजून दीड वर्ष राहिले होते मग आईनेच सांगितले
"तिच शिक्षण पुर्ण होईपर्यंत घाई करु नका "
पण काकांच म्हणणं होतं पहात पहात एखादं वर्ष जातं . काहीका असेना पण वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं होतं त्यामुळे वातावरणातील ताण काहीसा कमी झाला होता . त्यातच तायडीला दिवस गेल्याचे समजले होते . मग वातावरण पुर्ण बदलून गेलं . आता नविन मेंबरची वाट सर्वजण पहात होते !!!
No comments:
Post a Comment