Sunday, April 12, 2026
*भारताला स्वातंत्र्य मिळाले*
आणि देश स्वातंत्र्य , समता , बंधुता या लोकशाही तत्वाने पेटून उठला . विकासाला चालना मिळावी म्हणून विविध प्रयत्न केले गेले . पायाभूत व मूलभूत उद्योगांना चालना देणे हा त्याचाच एक भाग होता .
यामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा रोल अतिशय महत्वाचा ठरत गेला .
कारण यापूर्वी सावकारी हा जोमाने चालणारा धंदा होता .
मनमानी व्याज आकारात जमीन मालमत्ता गहाण ठेऊन त्याबदल्यात कर्जे दिली जात त्यात कर्जदार पिचून जात असे . आणि म्हणूनच देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वित्तीय संस्था त्यावर जनतेची मालकी असावी त्या *सरकारी मालकीच्या असाव्यात म्हणून 1969 साली प्रथम 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले* . जाणीवपूर्वक बँकांचे जाळे खेड्यापाड्यात , तळागाळापर्यंत पोहोचण्यात आले . जनतेच्या ठेवी गोळा करत देशभरातील बेरोजगार , गरीब जनता , शेतकरी , शेतीला पूरक उद्योग , छोटमोठे उद्योगांना माफक दरात कर्जपुरवठा केला जाऊ लागला , बँकांच्या कक्षा रुंदावल्या सामान्य माणूस बँकिंग वर्तुळात आला . मूलभूत व पायाभूत उद्योगांना कर्जपुरवठा केला जाऊ लागला आणि देशाची विकासाकडे वाटचाल होऊ लागली . हरितक्रांती , धवलक्रांती घडून आली . बँकांची भूमिका लक्षात घेत पुढे 1980 साली आणखी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले .
या समस्यांचे पूर्णपणे निराकरण झाले नाही पण काही अंशी त्यावर मात करण्यात आली . सावकारी पाशातून लोकांची थोडीफार सुटका झाली .
अलीकडच्या काळात *कल्याणकारी योजना*
शिक्षण
आरोग्य
अनुदान
वित्तपुरवठा
या बाजूला पडत चालल्या आहेत दिवसेंदिवस देशामध्ये शिक्षण क्षेत्रात अर्थसंकल्पीय तरतूद कमी होत चालली आहे , त्याचा परिणाम म्हणजे सरकारी शाळांची गुणवत्ता घसरते , आजकाल सरकारी दवाखान्यांची अवस्था केविलवाणी होत चालली आहे . सगळ्या सेवा सुविधांचे खाजगीकरण होत चालले आहे मग ते light , bus , gas ya दैनंदिन गरजा ज्या आहेत त्यांच्या किंमती भरमसाठ झाल्या आहेत आणि त्या वाढत आहेत . सामान्य आणि गोरगरीबाना रोजचे जीवन जगणे मुश्किल होत आहे .
घरातील कोणाला तरी गंभीर आजार झाला तर महागडे खाजगी रुग्णालय गाठावे लागते . मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी भरमसाठ फी भरावी लागते . याशिवाय पर्यावरणातील बदल , शेतमालासाठी शेतकऱ्यांना मिळणारा अनिश्चित भाव , मुलांची लग्ने , पारंपरिक रितीभाती दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे अपुरे पडतात . मग पैशासाठी मार्ग शोधले जातात .
2010 च्या दरम्यान देशभरात स्वयंसहायता बचत गटांची चळवळ पुढे आली यामध्ये दहा महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन करावा सर्वांची बचत एकत्र कारवी आणि गरजू महिलेला थोडेफार व्याज घेऊन ती मदत द्यावी , एकदीने काही लघुउद्यग सुरू करून स्वावलंबी बनावे असे करत बचत गटाने गावोगावी बाळसे धरले . जवळजवळ प्रत्येक घरातील महिला बचत गटाची सभासद असेच असे . अनेकांची आयुष्ये यातून बदलली . बँका कारण आणि तारण पाहून कर्ज द्यायच्या पण इथे थोडेफार व्याज देत विनाकारण विनातारण कर्ज मिळू लागले आणि नेमके याचवेळी कोट्यवधी लोकांची गरज ओळखत
" *नॉन बँकिंग फायनान्स* " क्षेत्रातील वित्त कंपन्यांनी कर्जपुरवठा करण्यात उडी घ्यायला सुरुवात केली . सुरुवातीला आंध्र प्रदेशात मायक्रो फायनान्सचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आणि नंतर देशभर झपाट्याने यांची संख्या वाढत गेली . बँकिंगचे कर्जपुरवठा करताना कारण आणि
*तारण पाहून कर्ज ही मूळ तत्व बाजूला सारत विनाकारण विनाकारण कर्जपुरवठा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पाय रोवायला आणि फोफावला सुरुवात झाली*
नड भागवण्यासाठी बँक कर्ज देत नाहीत पण त्याच कारणासाठी जास्त व्याजदरात सुलभपणे फायनान्सचे कर्ज उपलब्ध होऊ लागले .
*मुळात मायक्रो फायनान्सला देशभर पसरू देणे हा राजकीय व्यवस्थेचा निर्णय आहे तो समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे* .
देशामध्ये कल्याणकारी योजना कमी होऊ लागल्या , शासन आपली मायबापची भूमिका सोडत गरीबांना कर्जपुरवठा करणाऱ्या
*मायक्रो फायनान्स सारख्या क्षेत्राला खतपाणी घालते त्याचे जाळे देशभर पसरेल याची खबरदारी घेते , त्यांच्या व्याजदरावर कोणतेही नियंत्रण नाही . त्यांची कर्जवसुलीची पद्धत म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी आहे . वसुली करत असताना धाकदपटशा , अपमान करणे , मालमत्ता ओढून नेणे अशी अमानवी कृत्ये केली जातात त्याची कोठेही दाद मागण्याची सोय नाही डायरेक्ट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करावी लागते आणि आधीच कर्जबाजारी झालेली मानहानी झालेली व्यक्ती ही पाऊल उचलू शकत नाही* .
*गरीब जनता एक ते फेडण्यासाठी दुसरे तिसरे चौथे असे व्याजदर वाढवत वाढवत कर्जाच्या जाळ्यात घट्ट अडकली जाते* .
साधे उदाहरण घ्या मुलाला *एक मोबाईल* घ्यायचा असतो त्यासाठी 16500 रु. कर्ज घेतले जाते त्याचे 50 हप्ते व्याजदर 19.50% , प्रक्रिया शुल्क 411 , विमा हप्ता 116 , gst 44.98 रु म्हणजे 11% म्हणजे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जमा होण्याआधी इकडून गेले .
महिलांनी कर्ज घ्यावे म्हणून 100 पैकी
*एक महिला जी कर्ज घेऊन यशस्वी*
झालेली असते तिची यशोगाथा गावोगावी पोहोचवली जाते पण अयशस्वी ठरलेल्या कर्जबाजारी 99 महिलांविषयी काहीही सांगितले जात नाही .
मुलीच्या *लग्नाला* कर्ज द्यायचे , पुन्हा सणवारासाठी आणखी कर्ज पुन्हा लेकीचे बाळंतपण मग मोठ बारसे यासाठी नवी जुनी करत कर्जे घ्यायची त्यासाठी मग काही गुंठे जमीन गहाण ठेवायची . पहिल्या कर्जाचे 2/3 हप्ते थकले की ती रक्कम 5000 होते पुन्हा ते फेडण्यासाठी जादा व्याजाने 8000 कर्ज घेऊन आता दोन हप्ते सुरू होतात पुन्हा तिसरे कर्ज पुन्हा नाईलाजाने चौथे कर्ज काढायचे शेवटी मालकीचा असलेला थोडासा शेताचा तुकडा विकून कर्ज भरायचे आणि मग मोलमजुरी करायला घरातल्या सगळ्यांनी बाहेर पडायचं .
*घरकुल* योजने अंतर्गत प्रकरण करायचे कर्ज काढून बांधकाम सुरू करायचे , अनुदानाचे पैसे मिळवेपर्यंत चिरीमिरी पैसे वाटत रहायचे . घराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत एवढ मोठ कर्ज होते पुन्हा ते फायनान्स कडे गहाण ठेवायचं पुन्हा त्याचे हप्ते थटले की अशीच कर्जे काढायची शेवटी घर विकून टाकायचं .
*अशी घरगुती वस्तू म्हणजे फ्रिज , टीव्ही , गाडी*
दुकानातच तुम्हाला कर्ज मिळण्याची सोय झालेली असते . छोट्या व्यवसायासाठी , शिक्षण , आजारपण , लग्न , सण अशा एक न दोन विविध कारणासाठी कर्ज घेतली जातात आणि त्याच्या गर्तेत एकदा सापडलं की सुटका होणे मुश्किल आहे .
मायक्रो फायनान्स चे कर्ज म्हणजे
*कार्पोरेट रुपी आजगराचा* विळखा आहे आणि त्याला
शासनाचे वरदानआहे .
एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे की सरकारी बँका जर विना तारण विना कारण कर्ज देत नसतील तर या मायक्रो फायनान्स कंपन्या अशी कर्जे कारण आणि तारण का पाहत नाहीत ?त्यांचा
*गरीबांप्रति कल्याणकारी आणि मानवतावादी दृष्टिकोन आहे का* ?
तर तो मुळीच नाही जी कोट्यवधी जनता बँकिंग वर्तुळाच्या बाहेर राहिली त्याच बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कोट्यवधी जनतेला या फायनान्स कंपन्यांनी आपल्या कवेत ओढलं .
एकीकडे कमी उत्पन्न आणि दुसरीकडे जास्त खर्च याचा ताळमेळ बसत नाही
*आमदनी आठंन्नी खर्चा रुपय्या*
यातूनच मग कुटुंबप्रमुखाची आत्महत्या यासारखे धोके उद्भवतात .
महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ते म्हणजे
*पेपर आणि काही टाचणे* याआधारे काही आकडेवारी मी याठिकाणी सांगते
2025 च्या अहवालानुसार देशभरातील कर्जवितरणात या कंपन्यांचा हिस्सा 4.43 लाख कोटीचा आहे 2024 च्या तुलनेत त्यात 17% वाढ झाली . तर संसदेत या प्रश्नाचे लेखी उत्तर देण्यात आले त्यात सरकारने 2024 ते 2025 दरम्यान यात 6.2% वाढ झाल्याचे सांगितले आहे . महाराष्ट्रात या कंपन्यांचा हिस्सा 124.70 कोटींचा आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे . यातील 94% कर्ज ही व्यवसायासाठी दिली जातात असा दावा केला जातो तर 28 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात मायक्रो फायनान्स कर्ज वितरित करते . त्याच्या व्याजदरावर नियंत्रण नाही .
इकडे सांगताना असे सांगितले जाते की बँकांचे व्यवहार विस्तारत आहेत , महिला बचत गटांच्या माध्यमातून सुधारत आहेत असे सांगितले जाते पण कर्ज तितक्या सुलभतेने उपलब्ध होत नाही . बँकिंग व्यवसायातून आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये किती नफेखोरी करायची हा मूलभूत प्रश्न जर सरकारला पडला तर बरे होईल .
*थोडसं बँकिंग विषयी*
आधी 14 नंतर 6 अशा 1980 पर्यंत 20 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते . नंतर कल्याणकारी योजना बंद करण्यात आल्या आणि कर्जवाटपात राजकीय हस्तक्षेप सुरू झाला मोठमोठ्या भांडवलदारांना कर्जे वाटप करण्यात आली आणि ती हेतुपुरस्कर ठरवण्यात आली त्यामुळे बँकांचे कंबरडे मोडले . मुंबईत बोटावर माती बसेल एवढी पण जमीन शिल्लक नाही परंतु सर्वात जास्त शेती कर्ज मुंबईत आहे . वर्गीकरण चुकीचे करत ही आकडेवारी दाखवली जाते पुन्हा तिकडे थकीत दाखवून बुडीत घोषित करून बँकांना वेठीस धरायचं आणि बँकांची कुवत नाही म्हणत ती करणे पुढे करत राष्ट्रीयकृत बँकाच्या खाजगीकरणाचा आणि एकत्रीकरणाचा रेटा पुढे आला . त्यातूनच 2017 मध्ये पहिल्यांदा स्टेट बँकेत तिच्या सहा सबसिडरी बँका विलीन करण्यात आल्या नंतर 2019/20 मध्ये BOB मध्ये आणि PNB मध्ये इतर नावांचे विलिनीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 12 झाली परिणामी जवळजवळ असणाऱ्या शाखा बंद करण्यात आला अतिरिक्त स्टाफ म्हणत नोकरभरती बंद केली .
याविरोधात जर आवाज उठवायचा असेल तर आम जनतेला सहभागी करून घ्यावं लागेल .
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर म्हणतात
1) राजकीय धोरणात्मक हस्तक्षेपामुळे अर्थव्यवस्थेच्या इतर उपक्षेत्राप्रमाणे फायनान्स कंपन्यां जनकेंद्री बनल्या आहेत .
2) मायक्रो फायनान्स क्षेत्राला देशभर पसरू देण्याचा निर्णय हा राजकीय व्यवस्थेचा आहे तो बँकिंग किंवा वित्तक्षेत्रातील व्यवस्थापकांचा नाही .
3) मायक्रो फायनान्सच्या फील्ड स्टाफ किंवा एजंटच्या जाळ्यात गरीब जनता ओढली जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती राजकीय अर्थव्यवस्था निर्माण करते . गरीबांना हतबल करणाऱ्या अनेक प्रक्रिया राजकीय अर्थव्यवस्थेत घडवल्या जातात , आपले राहणीमान टिकवण्यासाठी गरीब जनता मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात ओढली जाते .
4 ) विविध पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जनकेंद्री वित्तक्षेत्राच्या मागणीचे प्रतिबिंब पडेल असे प्रयत्न करता येतील .
5).........
यावरून एक निष्कर्ष काढता येईल तो म्हणजे आपण स्वतः होऊन काही बंधने पाळली पाहिजेत .
पहिलं म्हणजे आपल्याकडे *पाच वर्षातून एकदा मतदानाचे हत्यार*
येते त्याचा वापर करताना या गोष्टी विचारात घ्याव्यात . आपलं अमूल्य मत कोणाला द्यावं याचा पाच वर्षे विचार करून ती एक क्षणाची कृती करावी .
सध्या परिस्थितीत आम जनतेने एकत्रितपणे *सरकारला कल्याणकारी , जनहिताच्या गोष्टी करण्यास भाग पाडावे* ,
प्रामुख्याने बेकारी दूर व्हावी , कामाचा योग्य मोबदला मिळावा , शेतकऱ्याला हमीभाव मिळावा , gas सारख्या नित्योपयोगी वस्तू माफक दरात मिळाव्यात यासाठी *जनआंदोलन* व्हायला हवी , सरकारला यागोष्टी करण्यास भाग पाडावे .
*लाडक्या बहिणी* म्हणत तोंडाला पाने पुसण्याचा कृती धुडकावून लावाव्या .
कारण आपणच मोठ्या उद्योगपतींच्या धंद्याला खतपाणी घालतो . *सेवा शुल्क आणि विविध प्रकारचे कर* म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री आहे . प्रत्येक ठिकाणी विमा म्हणत तो पैसा गोळा करण्याचा मार्ग आहे . यातून विमा कंपन्या धनदांडग्या होत आहेत . त्या चालवणारे मोठमोठे कार्पोरेट आहेत . तीच गोष्ट मोबाईल कंपन्यांची आहे . BSNL सारख्या प्रचंड जाळे असणाऱ्या कंपनीला डबघाईला आणायचं आणि अंबानीसारख्याची jio ला आपल्या मदतीने धनदांडगे बनवायचं ऊर्जितावस्था आणायची हे सरकारचे छुपे आजंडे आहेत . ते उलथवले पाहिजेत , आपण स्वतः साक्षर झालं पाहिजे , *आपल्या विचारशक्तीला चालना दिली पाहिजे* .
*महात्मा गांधींची खेड्याकडे चला* ही शिकवण विसरू नये . बापजाद्याने सांभाळून ठेवलेली जमीन कसावी नाही ती विकू नये , गहाण ठेऊ नये , छोटा मोठा उद्योग करावा , कष्ट करावे प्रत्येकाने पुणे मुंबई गाठायची गरज नाही तिथे पण फार पैसे मिळतो असे नाही .
अंथरूण पाहून पाय पसरावे , अनावश्यक कारणासाठी , अनुत्पादक कारणासाठी कर्ज काढू नये .
शेजारणीने सोन्याची सरी घातली म्हणून आपण दोरी घालू नये तिने घातली तर घालुदे आपण आपल्या गळ्याभोवती दोरीचा फास नाही तयार करायचा .
ऐपत नसताना महागड्या वस्तू घेणे टाळावे , यामध्ये प्रामुख्याने गाड्या आणि मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो .
एक लाखाची गाडी पण आपल्याला कामाच्या ठिकाणी पोहोचवते आणि अडीच लाखाची गाडी पण तेच काम करते पण त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग हप्ता म्हणून आपण देतो आणि इकडे अत्यावश्यक कारणासाठी पैसे अपुरा पडतो तीच गोष्ट मोबाईलची तीच गोष्ट टीव्हीची .
*राहणीमान उंचवाव पण हिशोबाने वागावे* .
सारांश म्हणाल तर आपणही स्वतःवर काही बंधने घालून घ्यायला हवीत .
मृगजळाच्या पाठी न धावता कारणाशिवाय कर्ज काढू नये . *शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे तसे फायनान्स chya चक्रव्युहात अडकू नये* त्याचप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरावे . अनावश्यक गोष्टीसाठी , अनुत्पादक कारणासाठी मायक्रो कंपन्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकू नये .
आणि प्रामुख्याने व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न स्वतःला करता नाही आले तरी ते बदलण्यासाठी जिथे जिथे आंदोलन केले जाते तिथे तिथे आपण सामील व्हायला पाहिजे . कारण माझे भविष्य आणि माझी पुढची पिढी सुरक्षित ठेवणे हे माझे कर्तव्य आहे !
Saturday, March 7, 2026
आईच्या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा*
*आईच्या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा*
सध्याच्या वातावरणात महीला सबलीकरणाचे ढोल वाजवले जातात . त्यानिमित्ताने का होईना महिलांवरील अत्याच्याराला वाचा फोडली गेली आहे. सजग माणसाच्या मनातली तार छेडली गेली आहे. कायद्यात बदल, संस्कृतीत बदल, शिक्षणात बदल, प्रसारमाध्यमात बदल हे बदलाचे वारे वाहू लागले आहे , स्त्री-पुरुष समानता हा ऐरणीवरचा मुद्दा झाला आहे . पण एवढे मात्र नक्की की ही बदलाची आग धगधगती राहीली तरच समाजपरिवर्तन घडून येऊ शकेल.
माणूस घडत असताना त्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्या जडणघडीवर आपसूकच परीणाम होत असतो. जस लहान मुल चालू बोलू लागतं तस त्याच्या कानावर जे पडेल त्या बऱ्यावाईट गोष्टी त्याच्या मनावर कोरल्या जातात. आणि प्रसंगानुरूप आपोआपच त्याच्या वागण्या बोलण्यातून बाहेर येतात . त्यालाच संस्कार असे म्हणतात .
एक बारीक निरीक्षण जर केलं तर एक गोष्ट लक्षात येते . आपण रस्त्याने चाललो तर माणूस सहज बोलताना , रागाने बोलताना , भांडण करताना शिवीगाळ करतो व त्याची ती शिवी आई व बहीण यांना घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही हे कशाच द्योतक आहे. मी म्हणेन स्त्रीला अत्यंत हीन समजण्याचे ध्योतक आहे . आईवरून शिवी देणं तिच्या अवयवाना हिणावणे विकृत आहे आणि ते म्हणजे समाजाच्या मानसिकतेत स्त्रीविषयी खोलवर रुजलेली विषवल्ली आहे .अशा शिव्यांमधून स्त्रीला अपमानाचं साधन बनवलं जातं . हे लैंगिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर घातक आहे . आईवरून शिवी देणं ही “ताकद” नसून ते एक मानसिक कमकुवतपणाचं लक्षण आहे. हे इतकं भिनलंय न , माणसाच्या इतकं अंगवळणी पडलंय की कोणाच्या लक्षातही येत नाही की ज्या आईला आपण प्रेमस्वरूप आई , वात्सल्यरूप आई म्हणतो . स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतो . आदिमाता , आदिशक्ती म्हणून जिची पूजा करतो , त्याच आईच्या नात्याला इतकं हीन लेखतो आहोत. ज्याप्रमाणे सती जाणं ही एक अनिष्ठ प्रथा होती त्यात तिच्या मनाविरूध्द बळी दिला जायचा त्याचप्रमाणे आईवरुन शिवी ही सुध्दा अनिष्ट प्रथा आहे . यात तिच्या स्त्रीत्वाचा खून होतो. तिच्या सन्मानाला तडा जातो . शिव्या ऐकताना कानावर अत्याचार होतात लाज वाटते.
संताप व्यक्त करताना आणि शिवी देताना समोरच्याला जास्तीत जास्त दुःख कसे होईल ह्याचा विचार केला जातो.
त्याच त्वेषाच्या भरत कोणत्याही व्यक्तीचे सगळ्यात पाहिले आणि जवळचे नाते - "आई" ह्याला ठेच पोचवायचा प्रयत्न होतो आणि अशीच सुरू होते मातृत्वाची उघड चेष्टा!
अलीकडे स्त्रीवाचक शिव्यांचा वापर तितक्या अतिसंतप्त टोकाच्या क्वचित होणाऱ्या आणि असंस्कृत वादासाठी राहिलाच नाहीये! ह्या शिव्यांचा प्रयोग आपल्या सभ्य समाजात इतका रुळला आहे की सहज गप्पा मारता मारता स्त्रीत्वाचे(आईचे, बहिणीचे) वाभाडे निघतात.
लाज वाटावी अशी भाषा अलीकडे भूषण आणि शक्तिप्रदर्शन म्हणून मिरवली जाते.
हे अधःपतन फक्त मराठी भाषेपुरते नाही , जगभरात सर्व भाषा ह्याला बळी पडल्या आहेत.
एकंदरीत समाज म्हणून आपण आपल्या भाषेसाठी आणि पर्यायी स्त्रीसाठीच्या आदरासाठी अपयशी ठरत आहोत
कुठतरी बदलायला हवं ! सामाजीक सुधारणा या राजकीय क्रांतीप्रमाणे कधीही एकदम होत नाहीत . सामाजीक सुधारणाची गती मंदच असते. परंपराप्रियता हा कोणत्याही समाजाचा महत्वाचा विषय असतो . त्यामुळे सातत्य व परिवर्तन याचे चक्र फिरत फिरत समाजात बदल होत असतात.
याचाच एक भाग म्हणून ८ मार्च या जागतिक महिलादिनाला वेगळं स्वरूप द्यावं अस वाटतं. हे करण्यासाठी तमाम समाजबांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. थोडसं अंर्तमुख होऊन विचार करा. शिवी उच्चारण्यापूर्वी तुम्ही थोडसं तरी थांबलात तर नक्कीच तुमच्यातला माणूस जिवंत आहे आणि तुमचे तुम्हालाच पटेल की बापरे हे तर बरोबर आहे . आपण केवढे महापाप करतो आहोत. आणि मग प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला पाहीजे, जाणीवपूर्वक बदलायला पाहीजे .
कालातंराने या बदलाला कायद्याचंपण संरक्षण घ्यावं लागेल. सुरूवातीला काही काळ नैतीक बदलाला द्यावा लागेल . नंतर मात्र काठोर कारवाई करावी लागेल .
सरकारी पातळीवर पण यासाठी अभियान राबविले पाहिजे ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान , हागंदारीमुक्त अभियान , साक्षरता मोहीम रबविली जाते त्याप्रमाणे शिविमुक्त घर , गल्ली , गाव , तालुका , जिल्हा , राज्य , देश आणि जगभारत या सर्व पातळ्यावर काम करायला हवं .
“ वुमेन्स ॲट्रॉसीटी ॲक्ट कलम ….. नुसार ” अशा प्रकारची शिवी देणारा दोषी ठरवता येईल या कायद्यात कशी तरतूद करता येईल ?
या कामासाठी तमाम कायदेपंडीतांनी , समजसुधारकांनी , नेते मंडळीनी , विचारवंतांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत .
ह्या कायद्याने शिव्या कदाचित पूर्णपणे बंद होणार नाहीत पण किमान समाजाला अंतर्मुख तर करेलच !
सरिता कुलकर्णी
उपाध्यक्ष
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज
युनियन संभाजीनगर युनिट
मोबाईल नंबर
9421607248
Friday, January 2, 2026
निर्भयाचे कुमारवयीन समाजास पत्र*
*निर्भयाचे कुमारवयीन समाजास पत्र*
आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक
तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक
होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय
लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली
आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला
आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय
जरा उशीरच झालाय , माहितीय मला
मला हेही माहितीय की , घालमेल चाललीय तुमची
काय घडतंय आजूबाजूला
आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी
तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार
म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला
तुमचं बाळ जन्माला आलं न ,
की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या
म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,
ते मुल मोठं केल्याचा
आभिमान वाटेल तुला
जमलं तर हेही कर
त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा
तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून ,
स्त्री आणि पुरुष , ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं
निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी , विज्ञानयुगातसुद्धा
त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं
तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस
असं ठसवंच त्याच्या मनावर
खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील
तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला
मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस ,
असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस
फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ
एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,
होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी
तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना
तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला
सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला
त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .
तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी
प्रेम , माया , शिक्षण , संस्कार
वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं
आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण
आणि होऊदे
सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार
अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं
आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला
आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्याला .
---------------------------------------------
Tuesday, December 23, 2025
हार्मोनियम विशारद
*हार्मोनियम विशारद होण्याचा परमोच्च आनंद शेवटी मिळाला*
22/06/2025
" कुठे आहात ? हार्मोनियम विशारद झालात तुम्ही , बँकेतून घरी जातांना पेढे घेऊन या क्लासमध्ये "
असा अगदी उत्साहात आमच्या श्री. स्वामी समर्थ संगीत क्लासेसच्या प्राचार्या सौ. दीपाली सहस्त्रबुद्धे यांचा फोन आला . ते ऐकले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला . कारण याहीवेळी थोडी धाकधुक होती पण काही का असेना अनेक वर्षापासून मी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं होतं . तसं तर हार्मोनियम वाजवायला माझी सुरुवात खूपच मजेशीरपणे झाली होती.
आशिष लहान असताना त्याचे मित्र तबल्याच्या क्लासला जातात म्हणून तो म्हणाला
"आई मी तबल्याचा क्लास लावणार आहे ."
तो क्लासला जाऊ लागला आणि तो गाणं पण छान म्हणायचा . आकांक्षा खुपच लहान होती ती पण त्याच्याबरोबर गाणे म्हणायची तेव्हा तिचा पण आवाज गोड आहे हे मला जाणवले . आमच्या घराजवळ आमच्याच बँकेतील पी. डी. देशपांडे राहात होते ते तबला वाजवायचे आणि त्यांची मुलगी गाणं गायची . त्यांच्याकडे माझं जाणं येणं होतं त्या दोघांना पाहून मला त्याचं फार अप्रूप वाटे , त्या बापलेकीच्या गाण्याची आणि तबला वाजवण्याची बँकेतपण खूप चर्चा व्हायची . त्यांच्या मुलीने छोट्या मुलांसाठी गाण्याचा क्लास सुरु केला मग मी आकांक्षाला तिच्याकडे गाण्याचा क्लास लावला . एकदोन महिन्यात ती म्हणाली
" काकू आता बाबांची बदली होणार मग आम्ही तळेगावला शिफ्ट होणार आहोत . आकांक्षाचा आवाज खूप गोड आहे तिचे गाणे सुरु ठेवा . माझे एक गुरुबंधू आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे म्हणून आम्ही गायन एकत्र शिकलो आहोत परवाच त्याचं लग्न झाले आहे त्याची बायको पण संगीत विशारद आहे आणि त्यांनी आता नवीनच संगीत क्लासेस सुरु केले आहेत तुम्ही त्यांना भेटा ."
आकांक्षा शिशुविहारला जात होती तिच्या मॅडमना पण तिचा आवाज गोड आहे हे लक्षात आले होते त्यांनी पण मला आवर्जून बोलावले आणि म्हणाल्या
" आकांक्षाचा आवाज छान आहे , आपल्या शाळेतील सहस्त्रबुद्धे मॅडमना तुम्ही भेटा गाण्याच्या बाबतीत त्या तुम्हाला माहिती देतील आणि मार्गदर्शन पण करतील . "
मी त्यांच्याकडे गेले ,सहस्त्रबुद्धे मॅडम आणि त्यांचे मिस्टर नेहमीच आमच्या बँकेत यायच्या त्यामुळे माझा त्यांचा चांगला परिचय होता , मी त्यांच्याकडे गेले . त्यांना लहान मुलांच्या गुणाचे भारी कौतुक होते लगेच प्रेमाने आकांक्षाला जवळ घेत त्या म्हणाल्या
" अहो खरंच आकांक्षाचा आवाज खूप छान आहे , मी ऐकले आहे तिचे गाणे , तुम्ही तिला गाण्याच्या क्लासला घाला . माझ्या मुलाने संगीत क्लासेस सुरु केलेले आहेत . आत्ताच त्याचं लग्न झाले आहे आणि माझी सून पण विशारद आहे . दोघांनी मिळून क्लास सुरु केलाय जावा तुम्ही त्यांच्याकडे छान तयारी करून घेतील ते . "
त्यांनी पण मला त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या गाण्याच्या क्लासबद्दल अगदी भरभरुन सांगितले . या मॅडम पी. डी. देशपांडे या दोघांच्याही अगदीच जवळचा क्लास निघाला त्यामुळे मला जरा घरचेच असल्यासारखे वाटले आणि मी आकांक्षाला घेऊन क्लासमध्ये गेले .
" श्री. स्वामी समर्थ क्लासेस
प्राचार्या सौ. दिपाली सहस्त्रबुद्धे आणि श्री. प्रसाद सहस्त्रबुद्धे "
मी क्लासमध्ये गेले , अगदी हसतमुखाने दोघांनी आमचं स्वागत केलं . त्या दोघांशी मी चर्चा केली मला मॅडमचा मुलगा एकदम मनमोकळा वाटला तर सून थोडीशी स्ट्रिक्ट वाटली कदाचित नवीनच लग्न झालेलं होतं त्यामुळे असेल कदाचित असे मला वाटले . मी आकांक्षाचा क्लास सुरु केला आणि तिचं गाणं सुरु झालं . रोज जाण्याने ओळख वाढत गेली मग आकांक्षाला क्लासला न्यायचं आणायचं हे काम करताना मधला वेळ कुठे घालवायचा म्हणून मी क्लासमधेच बसू लागले . मला पण गाण्याची भरपूर आवड होती मी तानसेन नसले तरी कानसेन होते . मला क्लासमध्ये बसायला खूप आवडलं , त्या नवीन जोडप्याने क्लासचा जम फार सुरेख बसवला होता . एकमेकांचा आदर करत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते , क्लासमध्ये मी रमत होते , मला ते वातावरण खूप भावले आणि असं वाटलं की आपण गाणं गाऊ शकलो नाही तरी पेटी नक्कीच वाजवू शकू . आणि थोड्याच दिवसात बसून राहण्याऐवजी मी पेटीचा क्लास लावण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी माझं पेटी वादन सुरु झाले !
क्लास नवीन असल्यामुळे परीक्षा केंद्र अजून नव्हते . क्लासमध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी होते आहे , त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत , हे लक्षात घेत परांडा केंद्रातून आमचे फॉर्म भरुन घेऊन सर्वाना परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले गेले . त्यादरम्यान आकांक्षाच गाणं आणि माझं पेटी वादन सुरु राहिलं मला त्यात आवड निर्माण झाली , घरी प्रॅक्टिस करता यावी म्हणून मी पेटी खरेदी केली . आमच्या दोघींच्या पण तीन-तीन परीक्षा झाल्या आणि त्याच वर्षी आकांक्षाच्या मैत्रिणी भरतनाट्यमच्या क्लासला जाऊ लागल्या , तिचा कल तिकडे ओढ घेऊ लागला , तिचा शाळेतील अभ्यास वाढला एमटीएस , स्कॉलरशिप , चित्रकला असे अनेक उपक्रम वाढले आणि तिला गाण्याला वेळ कमी पडू लागला पर्यायाने तिचं गाणं बंद झालं , तिचा क्लास बंद झाला पण माझे क्लासबरोबर छान सुरु जुळले होते , छान ग्रुप तयार झाला होता त्यामुळे माझं पेटी वादन तसेच सुरु राहिले ! मी अगदी तन्मयतेने अभ्यास करू लागले . तोवर क्लासला पाच परीक्षा पर्यंत केंद्राची मान्यता मिळाली आणि मी आमच्या केंद्रातून परीक्षा दिली . पुढेपुढे अभ्यासक्रम पण वाढत गेला आणि माझी गोडी पण तेवढीच वाढत गेली . क्लासचा ग्रुप वाढत गेला , माझ्या वेळेप्रमाणे मी क्लासला जाऊ लागले अभ्यास करु लागले सर आणि मॅडम दोघांनी मला खूप मार्गदर्शन केले मुख्य म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे मला ऍडजस्ट करून मिळत होते त्यामुळे मी 2009 मध्ये मी उपांत्य विशारद झाले . पुन्हा ही परीक्षा परंडा केंद्रातून दिली , आता अजून दोन परीक्षाची केंद्र मान्यता मिळणे बाकी होते आणि विशारदचा अभ्यासक्रम पण भरपूर होता विशारद पुर्णचे सर्व राग मी शिकले आणि त्या दोघांना म्हटलं
" आपल्या क्लासला आता विशारद पर्यंताच्या परीक्षा केंद्राची मान्यता मिळवून घ्या तोवर मी विशारदचा जरा सखोल अभ्यास करेन आणि आपल्याच केंद्रातून हार्मोनियमची विशारद होईन एखाद्या वर्षाचा गॅप घेईन ."
आणि गॅप घेतला ही माझी चूक झाली , 2010 नंतर माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या घरात काहीबाही अडचणी आल्या , जबाबदाऱ्या वाढल्या मुख्य म्हणजे बँकिंग बदलले , बँकिंगमध्ये ड्रास्टिक चेंज झाला , वातावरण बदलले कामाचे प्रेशर वाढले , मी संघटनेत सक्रियपणे काम करायला सुरुवात केली मग वेळ अपुरा पडू लागला परिणामी माझा क्लास बंद झाला आणि पेटीची प्रॅक्टिस पण बंद झाली घरी वाजवत असे पण सहजच . पण क्लास बरोबर माझी नाळ जोडलेली राहिली गेली मधून अधून जात असे . क्लास सुरु होता तेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त गाण्याच्या साथीला पेटी वाजवली जायची पण क्लास बंद झाला आणि माझं वादन थोडसं दुर्लक्षित झालं . अशीच 8/10 वर्षें निघून गेली ......
" आई तू उपांत्य विशारद झाली आहेस फक्त एका परीक्षेत का अडकवलेस आहेस ? एक परीक्षा दे आणि विशारद हो म्हणजे पदवी तरी मिळेल ".
पण मी काही फारसे मनावर घेतले नाही . विरंगुळा म्हणून एकटीच वाजवत बसे . कोरोना नंतर 2021 मध्ये मुलांनी गंमत केली माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सरांना संपर्क साधून कीर्तीने माझ्यासाठी मोठी नवीन पेटी मिरजेतून तयार करुन घेतली आणि आकांक्षाने तालयंत्र खरेदी केली आणि दोघींनी मिळून मला ते सरप्राइज प्रेझेंट दिलं आणि
" आता मात्र विशारद झालंच पाहिजे ! "
अशी प्रेमळ धमकी दिली मी मनाची तयारी केली पण पुन्हा काकी गेल्या लगेच काका गेले मी गुरफटतच गेले . माझा क्लास काही सुरु झाला नाही , मधूनच आशिष चिडवे
" काय मग विशारद मॅडम कधी होता विशारद ".
मी हसून म्हणे
" काही खरं नाही बघ मला वेळच मिळत नाही ".
अचानक डिसेंबर 2024 मध्ये एक दिवस मला व्हाट्सअप वर एका ग्रुपला ऍड केलेलं दिसल . ग्रुपचं नाव होतं .
" श्री स्वामी समर्थ संगीत क्लासेस "
आणि त्यावर सहस्त्रबुद्धे सरांचा एक मेसेज होता .
*"🙏श्री स्वामी समर्थ संगीत क्लासेस , बार्शी.*
स्थापना - ५ जून २०००
क्लासचे सर्व आजी-माजी सदस्य यांना कळविण्यात येते की , आपल्या क्लासचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने क्लासच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा आणि संगीत मैफिल २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
तथापी आपल्या सोबत कोण-कोण क्लासला येत होते त्यांचे संपर्क क्रमांक या ग्रुपला जोडावेत. जेणे करून ते सर्व संपर्कात येतील.
🙏 धन्यवाद ".
हा मेसेज वाचला आणि मला मनातून खूप आनंद झाला मी बँकेतून येताना आज क्लासला जायचंच असे ठरवलं . आणि दिवसभर माझ्या डोळ्यासमोर तो मेसेज तरळत होता . 25 वर्षांपूर्वीचा दिवस आठवत होता जेव्हा मी पहिल्यांदा क्लासला गेले होते , छोटेसे रोपट होतं ते ! आज त्याचा वटवृक्ष झालेला होता शेकडो विद्यार्थी तिथून संगीत कला अवगत करून गेले होते बँक संपल्यानंतर मी सरळ क्लास गाठला . सर आणि मॅडम होते आम्हाला सर्वांनाच एकमेकांना भेटून खूप आनंद झाला . मी त्यांना सांगितले
" मी आता क्लास जॉईन करणार आहे , क्लासला 25 वर्षे झाली आहेत मी क्लास जॉईन करुन पण पंचवीस वर्षे झाली आहेत आणि 2025 साल सुरू होईल तर यावर्षी मला विशारद पूर्ण करायचा आहे होऊ शकेल का "?
लगेच त्या दोघांनी सांगितले
" आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करु , तुमचा गॅप भरपूर पडलेला आहे शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील ."
माझ्या वेळेचा भरोसा नसल्याचे मी सांगितले . तर
" तुम्हाला जमेल तसें या आपण करुन घेऊ ".
अशी नेहमीप्रमाणे खुली कमिटमेन्ट त्यांनी मला दिली आणि मी लगेच क्लास जॉईन केला . पहिल्या परीक्षेपासूनचा पुर्ण अभ्यासक्रम होता . सगळे मटेरियल माझ्याकडे होते पण प्रॅक्टिस नव्हती मग एप्रिलची टर्म जाऊ दिली पुन्हा डिसेंबर टर्म सुरु झाली आणि फॉर्म भरायचा दिवस आला ! वर्षभरामध्ये क्लासबरोबर पुन्हा शास्त्रीय संगीताबरोबर श्रावणधारा , नवरात्र , दिवाळी पहाट या कार्यक्रममानिमित्त प्रॅक्टिस व्हायची मी मला हवा तेवढा वेळ प्रॅक्टिससाठी क्लासमध्ये बसत असे . प्रत्यक्ष कार्यक्रमात पण साथ करण्याची संधी मिळाली . त्याचा मला परमानंद होई . पण परीक्षेचे टेंशन वेगळेच होते .
मी 2025 साली , क्लासच्या आणि माझ्या शिक्षण्याच्या 25 व्या वर्षी विशारद व्हायचं हे अगदी छातीठोकपणे घोषित केले होते . हो नाही करत शेवटी काय होईल ते होईल म्हणत मी जून मध्ये डिसेंबरच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला . पहिली अडचण होती ती म्हणजे लेखी पेपरची , तीनतीन तासांचे दोन पेपर एकाच दिवशी असणार आणि अलीकडे पेनाने लिखाण लिहितच नाही . एवढे सहा तास कसे लिहिणार बरं त्यासाठी आधी तेवढा अभ्यास करावा लागणार हे मोठे टास्क होते माझ्यासाठी .
क्लास सुरु करुन 25 वर्षें झालेली होती त्यामुळे क्लासमध्ये सुद्धा आमुलाग्र बदल जाणवत होता . सर आणि मॅडम यांची गायनशैली पण परिपक्व जाणवत होती . दोघांचे स्वभाव पण साथीमुळे बदललेले जाणवले सर थोडेशे स्ट्रिक्ट झालेत तर मॅडम एकदम हसतमुख झाल्यात . त्यादोघांनी अभ्यासपूर्वक संप्रदायिक कीर्तन , भारुड , दिंड्या , वर्षभरतील प्रत्येक सण , समारंभ , विविध कार्यक्रम , शालेय कार्यक्रम , असे बार्शी शहरांत , आसपास अनेक कार्यक्रम केले त्यात विद्यार्थ्यांना पण संधी मिळत असे . पंचक्रोशीत त्यांना लोक ओळखतात .
14 डिसेंबर रविवार शेवटी माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला सकाळी आठ वाजता माझी परीक्षा होती . अगदी परीक्षार्थी प्रमाणे , शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न केले होते तेवढ्याच दृढ निश्चयाने परीक्षेला गेले . बाकी परीक्षा शनिवारी सुरु झाल्या होत्या त्यामुळे परीक्षक कसे आहेत हे शनिवारीच समजले होते . परीक्षक म्हणून आलेले श्री. अंगापूरकर सर आले होते , या सरांच्या अपेक्षा फारच होत्या . आत्तापर्यंत आलेल्या परीक्षकांपैकी अत्यंत चिकित्सक परीक्षक होते . त्यांना संगीत विषयात डुंबणारे विद्यार्थी हवे होते . तसे ते बोलत होते . माझी परीक्षा झाली परीक्षा तर चांगली झाली होती पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कितपत मी दिलं याचा मला अंदाज येत नव्हता त्यामुळे अगदी रिझल्ट येईपर्यंत काहीच शाश्वती नव्हती पण सर मॅडम दोघेही परीक्षा चांगली झाली म्हणत होते . पण एकाअर्थी चांगलं झालं असं वाटलं . आपण एवढा आटापिटा करत आहोत तर त्या निकशाला उतारायला पाहिजे असे वाटले . आणि व्हायचं ते झालं मी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले पण प्रॅक्टिकल मध्ये नाही झाले . थोडीशी खट्टू झाले तीन चार दिवस मूड गेला पुन्हा क्लासमध्ये गेले , गप्पा झाल्या त्या दोघांचेही म्हणणे असे आले की आत्ता एवढा अभ्यास झालाय तर तुम्ही तावातताव मे मध्ये परीक्षेला बसणार काय पहा . आता तुम्हाला पास क्लास चालणार असेल तर लेखी परीक्षा न देता फक्त प्रॅक्टिकल दिली तर चालणार होती . तसेही मला यात काही करिअर करायचे नाही पण एवढे केलं आहे तर त्यातील प्राविण्य मिळवलेल्या पदवीचा मानाचा तुरा खोवायला मिळाला तर मला आनंद होणार होता , ती एक सुप्त इच्छा होती शेवटी त्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला , घरी सगळेच म्हणू लागले देऊन टाक परीक्षा ! मग पुन्हा फक्त प्रॅक्टिकल परीक्षेचा फॉर्म भरला पुन्हा प्रॅक्टीस सुरु केली यावेळी मला फक्त पेटी वाजवण्याची प्रॅक्टीस करायची होती परीक्षेची तारीख आली 10 मे याहीवेळी मी प्रामाणिक प्रयत्न केले . पहाटेच्यावेळी रियाज केला तासनतास क्लासमध्ये बसले आणि परीक्षेचा दिवस उजाडला . यावेळी परीक्षक म्हणून आष्टा जिल्हा सांगली येथील मनिषा जोशी मॅडम आल्या होत्या . मोठ्या परीक्षेची मी एकटीच होते त्यामुळे सुरुवातीला सकाळी 8 वाजता मंच घेऊ असे त्या म्हणाल्या . दरबारी कानडा आणि मुलतानी याचे बडे ख्याल वाजवले पुन्हा मालकंस वाजवला त्यात नवक्का तिहाई घेतली , मर्मबंधातली ठेव ही हे नाट्यगीत वाजवले आणि परीक्षक खूश झाल्या . उर्वरित परीक्षा इतर परीक्षा झाल्यावर घेऊ म्हणाल्या त्याप्रमाणे पुन्हा दुपारी 12 नंतर ती परीक्षा झाली पण चर्चेत त्यांनी मला बरचसं ताणल होतं त्यामुळे मी यावेळी रिझल्टची वाट पहायची नाही असे ठरवले होते .
मला भावगीत , भक्तीगीत , शास्त्रीय संगीत , नाट्यगीत , लावण्या , जुनी हिंदी मराठी गाणी हे ऐकण्याची प्रचंड आवड आहे . लहानपणापासून अगदी आजही सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे रेडिओ ! विविध भारती , आणि मराठी केंद्रे ! आजही सकाळी उठल्यापासून दहा वाजेपर्यंत घरात रेडिओ सुरु असतो त्याच्या जोडीला पूर्वी टेपरेकॉर्डर त्याच्या कॅसेट्स नंतर सी डी प्लेअर त्याच्या सी डी घरात खचाखच भरलेल्या असत . माणिक वर्मा , बकुळ पंडित , वसंतराव , सुमन कल्याणपूर , सुलोचना चव्हाण , मुकेश , सर्व मंगेशकर , श्रेया घोषाल आणि कितीतरी गायकाना वाफाळलेला दुधातील चहा घेत कुठेतरी एकांतात , निवांत गाणी ऐकत बसायला फार आवडते आत्ता खरा माझा संगीत क्षेत्रात प्रवेश झाला आहे , आता तर केव्हाही , कुठेही हवं ते कोणत्याही प्रकारचे आणि कोणत्याही गायकाचे गाणं ऐकणे मोबाइलमुळे सहज शक्य होते . त्यामुळे आता फक्त ऐकणे , आत्मसात करणे आणि एक मुख्य म्हणजे सहजपणे कोणत्याही गायका बरोबर पेटी वाजवणे , वेगवेगळ्या धून , सोलोवादन , सर्व प्रकारचे वादन हे माझे आगामी ध्येय आहे . त्यासाठी सातत्याने फक्त आणि फक्त सराव गरजेचा आहे .
पुनःश्च एकवेळ श्री. स्वामी समर्थ संगीत क्लास , सर , मॅडम , सर्व गायक तब्बलजी सहकाऱ्यांचे आणि माझ्या कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद !!
🙏🙏
Tuesday, November 25, 2025
विशारद पुर्ण लेखी अभ्यास
खालील संकल्पना स्पष्ट करा
देशी म्हणजे प्रांत किंवा प्रदेश, प्रादेशिक पातळीवर जे संगीत विकसित झाले आणि लोकजीवनांशी लोकभावनांशी जोडले गेले त्याला देशी संगीत असे म्हणतात मार्गी संगीतातील कठोर नियमांपेक्षा हे मोकळे , साधे आणि लोकसंगीताशी निगडित असते .
Monday, October 27, 2025
आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन* *एक गोड आठवण*
*आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन*
*एक गोड आठवण*
तसं तर आईकाका गेल्यापासून वर्षातून एक दिवस म्हणजे आईकाकांचा स्मृतीदीन 9 जुलै यादरम्यान आम्ही पंचकन्या एकत्र जमण्याचा निश्चय केलेला आहेच . पण 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 हे वर्ष आमच्या फॅमिलीसाठी जरासे वेगळे होते . यावर्षी तशी वेगवेगळी कारणे पण होती . आम्ही सर्वजण भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रभर विखुरलेले आहोत , मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या मागे प्रचंड व्याप आहेत , प्रत्येकजण खूप बिझी आहे , फक्त कार्याच्या निमित्ताने एकमेकांकडे जाणे होते . मग एवढे Events कसे काय करावे असा प्रश्न मनात घर करुन होता . त्याप्रमाणे मुलांशी संपर्क साधू आणि पाहू काही हटके करता येईल ते , एखादा पॉईंट ठरवावा प्रत्येकाने स्वतः तिथे यावे गेट टुगेदर आणि सेलिब्रेशन करावे आणि तिकडूनच आपापली घरे गाठावी असे केल्यास सर्वांना सोयीचे होईल मुलांना पण मजा येईल वीकेंड एन्जॉय केल्याचा आनंद होईल. कारण आजकालची पिढी वेळ द्यायला तयार नसते त्यांच्या आवडीचा विचार केला तरच त्यांनाही एकत्र जमण्याची गोडी लागू शकेल असे काहीतरी ठरवण्याचा विचार होता कारण जबरदस्ती करुन उपयोग नाही त्यांना आवडेल असे केले तरच उत्स्फूर्तपणे ती सामील होतील , तसे तर मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यांची ध्येये वेगळी , परिस्थिती वेगळी , धकाधकीचे जीवन त्यात त्यांना आवडेल असे काही केले तरच ती वेळ देणार त्यामुळे तसे काहीतरी मुलांच्या वेळा पाहून ठरवू असे ठरवले. प्रत्येकाला सवड म्हणलं तर हे फक्त दिवाळीच्या आसपासच होऊ शकेल. कसे करता येईल ते पाहू असे मी मनाशी ठरवले .
पहिल्यांदा मी यज्ञेश बरोबर बोलले , त्याला त्याच्या आईचा पन्नासावा वाढदिवस तर मोठा करायचा आहे पण काय करावे हे समजेना अशी त्याची अवस्था झाल्याचे मला जाणवले . तो मला म्हणाला " करायचा तर आहे पण मला काय करावे ते समजत नाही."
पुन्हा दाक्षूला बोलले तर तिचीही काहीतरी करण्यासाठीची धडपड आणि मनोरे रचण्याची उत्सुकता मला तशीच जाणवली.
कारण 1 नोव्हेंबर म्हणजे ज्योतीचा वाढदिवस असतो. यावर्षी तिला पन्नास वर्षे पुर्ण झाली त्यामुळे तीचे चालू वर्ष
" सुवर्ण महोत्सवी वर्ष "
म्हणून आम्हाला करायचे होते.
15 नोव्हेंबर पुरंदरेना साठ वर्षे पुर्ण झाली म्हणजे त्यांची
" शष्ठ्याब्धीपुर्ती "
झाली त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे याचवर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . संजू म्हणजे काकांचा प्राण ! बाकी संपुर्ण फॅमिलीच्या पण केंद्रस्थानी ती असते . त्यांचं काहीतरी व्हायला पाहिजे हे डोक्यात होते .
21 एप्रिलला मायडीची
" शष्ठ्याब्धीपुर्ती "
झाली , तर आमच्या फॅमिलीतील सर्वात मोठे सदस्य म्हणजे एम बी के भाऊजीना 2 जूनला पंचाहत्तरावे वर्ष सुरु झाले म्हणजे त्यांचा
" अमृत महोत्सव "
आता काकांची तिसरी पिढी असलेल्या मंजुच्या लग्नाला 22 डिसेंबरला पंचवीस वर्षे पुर्ण झाली . म्हणजे त्यांचा
" रौप्य महोत्सव !"
अशी भली मोठी इवेंट्सची यादी होती.
आम्ही सर्वजण पुणे , मुंबई , कोल्हापूर , किर्लोस्करवाडी आणि बार्शी अशा विविध ठिकाणी राहतो. आता कसा बसवायचा सगळ्यांचा मेळ हा मोठा प्रश्न होता. त्यावर गेट टुगेदर हाच मस्त उपाय आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होत होते. तसे मी एकेकाला पर्सनल msg टाकत राहिले.
मग एका रविवारी दाक्षूने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि त्याला तिने काकांचे नाव दिले
"आर के'ज ग्रँड सेलिब्रेशन "
त्याला ह्या उत्सवमुर्ती सोडून बाकी सगळे add केले आणि त्यावर तिने msg टाकला त्याला उत्तर म्हणून मी एकूण पाच प्रोग्रॅम , आणि outing चा प्लॅन असा सविस्तर msg टाकला . आणि काय आश्चर्य सगळे एकदम एक्साईट झाले , महाचर्चेला उधाण आले . अनेक रिसॉर्टची नावे समोर आली , प्लॅन जमू लागले . माझ्या गृहिताप्रमाणे दुसरे दिवशी ग्रुप थंडगार , मग मीच एखादा msg टाकला की त्याला प्रतिसाद मिळे पण प्रत्येकजण आपापल्या व्यापात गर्क होता . पण दाक्षायणी आणि मी मात्र सतत संपर्कात होतो मध्ये मध्ये यज्ञेश असे . जसा वेळ मिळेल तशा चौकशा करत ती मला अपडेट्स देत होती .
आता डेट ठरवायची होती त्यातही दोन गट पडले 25/26 ऑक्टोबर की 1/2 नोव्हेंबर दोन आठवडे कीस पाडून शेवटी 25/ 26 ऑक्टोबर फिक्स झाले मग रिसॉर्टची शोधाशोध सुरु झाली , बजेट बघत फायनली तेही पक्के केले आणि आता कार्यक्रम 100% होणार या भावनेने माझा जीव भांड्यात पडला .
मग पुन्हा उत्सवमुर्ती साठी गिफ्ट , डेकोरेशन , प्रत्यक्षात कार्यक्रम त्याचे सूत्र संचालन , सांस्कृतिक कार्यक्रम , एकूण येणारा खर्च त्यानुषंगाने contribution या चर्चा होत राहिल्या . कारण गेट टुगेटर 24 तासांमध्ये सगळे व्यवस्थित आणि सुटसुटीत बसवायचे होते .
आणि दिवाळीपूर्वी एकूण कार्यक्रमाचे नियोजन पुर्ण झाले . सर्वांनी 25 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या , तोरणा राजगडच्या सान्निध्यात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पासली या गावातील ब्रम्हे यांच्या " निसर्गायन " रिसॉर्टवर भेटण्याचे ठरले आणि सर्वजण दिवाळी , खरेदी , फराळ भेटीगाठी यात गुंगले .
दिवाळी संपली आणि पुन्हा ग्रुपवर msg चे फटाके उडू लागले . 25 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून आम्हा पाच बहिणींचा मुले , मुली , सुना , जावई , नातवंडे असा एकूण सत्तावीस जणांचा मोठा परिवार आपापल्या ठिकाणांहून निघाल्याचे msgs आले . आमची गाडी 1 च्या दरम्यान नसरापुर फाट्याला वळली आणि अर्ध्या तासामध्ये सगळेच मागे पुढे होते असे समजत होते . वेल्हेच्या पुढे मात्र आगदीच डोंगरातून घाट माथ्यावर गाडी चढू लागली . जियो सोडता सर्व मोबाईलची रेंज गेली पण रस्त्यातच सर्वांच्या भेटी झाल्या आणि पुढचा 14/15 किलोमीटरचा प्रवास गोंधळ , मजा मस्ती , फोटोग्राफी करत आम्ही एकेक करत डेस्टिनेशनला पोहोचलो . तिकडे सगळीच चोख व्यवस्था होती .
दाक्षू आणि धनुने माईकचा ताबा घेत मस्तपैकी कार्यक्रमाची सुरुवात केली . लगेच दाक्षूची
" वडा वडा , चाय गरम " ची आरोळी आली आणि वातावरण एकदम फनी मूडमध्ये आलं . आत्रेय, इनिका आणि अवनी या बच्चे कंपनीकडून
" आर के'ज गेट टुगेदर अँड ग्रँड सेलिब्रेशन"
या फलकाचे अनावरण करत टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली . मी विस्तृत प्रस्तावना करत एकूण कार्यक्रमाचे नियोजन सांगितले . सगळेचजण एकदम भरवून गेले होते . सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता ओसंडून वहात होती .
प्रथम विविध कलाकारांप्रमाणे उत्स्फूर्तपणे केलेला विविधगुण दर्शनाचा कार्यक्रम सुरु झाला यामध्ये आत्रेयच्या
" चिव चिव चिमणे "
गाण्याने बहार आणली . इनिकाच्या गणेशाराधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . भरतनाट्यमच्या दोन गाण्यावर तिचा उत्कृष्ट परफॉर्मन्स झाला . एखाद्या सराईत नृत्यांगनेसारखे अवनीचे दोन परफॉर्मन्स झाले . धनु , मनू , ज्योती , मुकुंद , मंजू यांनी गीत गायन केले त्याचा सर्वांनी आनंद लुटला .
आर केंचा एवढा मोठा परिवार एकत्र जमला आहे तर त्याला साजेसा
" वऱ्हाड निघालं लंडनला "
या एकपात्री प्रयोगातील एक प्रसंग सादर करत कार्तिकने धमाल उडवून दिली .
तर आकांक्षाने
_. " उन उन खिचडी साजूक तूप "
या कवितेचे वाचन केले .
उत्स्फूर्तपणे अमोलने नटसम्राटमधील एक भन्नाट परफॉर्मन्स केला तर तायडीने पण तिच्या स्टाईलने तिच्या पोतडीतील नवरा बायकोच्या संबंधावर एक मजेदार किस्सा वाचून दाखवला .
कार्यक्रमाची रंगत वाढत होती पण वेळ अपुरा वाटला इकडे जेवण तयार झाले होते . येणाऱ्या खमंग वासाने भूक चाळवत होती .
मग आम्ही या सर्वांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली . यात हार , बुके , crown , हातात अंक दर्शक , गळ्यात पट्टी , दिव्यांची ताटे , केक , फुलांची , पणत्यांची रांगोळी , फुगे , लाईटच्या माळा अशी भरगच्च तयारी केली होती . त्यांच्यापैकी कोणालाच याची कल्पना नसताना असा सत्कार करुन घेताना त्यांना सर्वांनाच भरुन येत होते . अत्यंत उत्साहात जवळजवळ दोन अडीच तास कार्यक्रम झाला नंतर जेवणे झाली . पुन्हा गप्पांची मैफिल , पत्ते , गाणी , भेंड्या करत रात्री एक वाजता सर्वजण झोपी गेले आणि पुन्हा पहाटे साडेपाच वाजल्यापासून एकेकजण उठले . मोठाले दोन लॉन्स , डोंगरांनी मस्त धुक्याची चादर लपेटली होती. मधूनच लालबुंद आभाळ दिसत होते , बदलत्या रंगछटा न्याहाळत , उगवत्या सुर्याला नमस्कार करत निसर्गाच्या सान्निध्यातली ती पहाट फारच प्रसन्न वाटत होती . सकाळचा चहा , नाष्टा आणि गप्पांची मैफिल आणि रात्रीचे राहिलेले सेशन पुढे सुरु झाले .
नेमक्या या प्रसंगाला अनुसरून कीर्तीने तिचे मनोगत व्यक्त केले , तशी RK फॅमिली मध्ये नवीनच असणारी ती पण तिला या ग्रुपमध्ये नात्यापेक्षा मित्रत्वाचा जास्त भास होत असल्याचे , जाणवल्याचे तिने सांगितले आणि पु. ल. देशपांडे यांच्या मैत्री या कवितेचे तिने वाचन केले . मायडीने तिच्या छान शैलीत सर्व उत्सवमुर्तींच्या वतीने कार्यक्रमाचे कौतुक आणि आभार व्यक्त केले तर चीनून
" दोन दिवसांपासून सर्वांचे कलागुण दर्शन मी पाहत आहे या चालू धकाधकीच्या जीवनात कोणतीही कला जोपासणे महत्वाचे आहे आपले पुढील गेट टुगेदर होईल तेव्हा मी नक्कीच काहीतरी सादर करेन "
अशी इच्छा व्यक्त केली .
त्याच दरम्यान ज्योतीने मिरजवरुन ऑर्डर केलेली हार्मोनियम आमच्याबरोबर आणली होती . हा संपूर्ण सोहळा अनुभवता माझ्या मनात एक नाट्यगीत रुंजी घालू लागले
" मर्मबंधातली ठेव ही "
ते मी पेटीवर वाजवले ते ऐकून सर्वजण धुंद झाले . पुन्हा सर्वजण फ्रेश झाले आणि हिरवळीवर , डोंगराच्या पायथ्याला , झाडीत फोटोग्राफी सुरु झाली .
चेरी ऑन द टॉप म्हणजे हे दोन दिवसातले सगळे प्रसंग ओजसने त्याच्या कॅमेऱ्यात अतिशय कल्पकतेने कैद करुन ठेवले आहेत . त्याची लिंक त्याने सर्वांना शेअर केली आहे ती पाहताना पुन्हा आपण तिथे असल्याचा भास होतो . मग कायमच सर्वांना आनंद देणारा हा प्रसंग शब्दबद्ध करावासा वाटला . कार्तिकने त्याच्या गुरुवारच्या व्हिडिओसाठी छान शूटिंग आणि फोटोग्राफी केलेली आहे लवकरच तेही आपल्याला पहायला मिळेल !
पुन्हा जेवणे झाली दुपारचा एक वाजला आणि सर्वांना परतीचे वेध लागले पण प्रत्येकजण रेंगाळत होता . जोडीला रिसॉर्टवाले ब्रम्हे यांनी पण स्वच्छता , जेवण , नाष्टा , चहा हे अगदी छान पद्धतीने पुरविले होते . शेवगा सूप , पालक सूप , दडपे पोहे , गरम वडे , मिसळ पोहे , बाकर वडी , पिठलं भाकरी , कढी खिचडी , अनेक प्रकारच्या चटण्या , पोळी , भाज्या , दलिया खीर अशी थंडगार वातावरणात वाफाळत असलेली गरमागरम भरगच्च खादगी ! अहाहा !!!!
विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला विशेष सहाय्य केले ते म्हणाले
" आमचे रिसॉर्ट झाल्यापासून लोक इथे अनेक सेलिब्रेशन करण्यासाठी येतात . पण अशा प्रकारचं , इतक्या लोकांनी एकत्र येऊन पाच पाच कार्यक्रमांचे सेलिब्रेशन पहिल्यांदाच होत आहे आणि त्याचा मला पण खूप आनंद झाला आहे " .
छान आठवणींची सुगंधी कुपी घेऊन पुन्हा नक्कीच असे गेट टुगेदर करु असा निश्चय करुन आनंद , उत्साह , कृतज्ञता , आनंदाश्रु , हळवेपणा अशा सर्व भावनाची रसमिसळ घेऊन प्रत्येकजण परतीच्या प्रवासाला लागले . मुख्य म्हणजे आमच्याच कुटुंबातील काहीजण अडचणीमुळे येऊ शकले नाहीत ते आता लवकरच पुढचे गेट टुगेदर ठरवूया असे म्हणत आहेत . मीही नियोजनाची जबाबदारी आता दुसऱ्या दोघांकडे देणार आहे . पाहू आता पुढचा योग कधी येतो ते !!





