महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत सोलापूर येथे 19 मार्च 2017 रोजी जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमांमध्ये सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे , बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मेनेजर मृदल जोगळेकर यांचा सत्कार केला तर वंचित घटकासाठी काम करणाऱ्या सौ. अनु प्रसाद मोहीते हिला सन्मानित करण्यात आले . त्या दरम्यान या मुलीच्या कार्याची माहिती मिळाली व तिचे भविष्यातील ठरलेले नियोजन समजले . हे ऐकत असताना ह्या कार्याची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून सर्व प्रसंग लिहून
" मिळून साऱ्याजणी "
या मासिकात प्रसिद्धीस देण्यासाठी पाठविला होता तो फेब्रुवारी 2018 च्या अंकात छापून आला होता .
वंचितांची शाळा : एक पाऊल प्रगतीकडे
" खंरतर हा पुरस्कार नसुन ही एक जिम्मेदारी आहे की आम्ही जे काम करतो ते आणखी चांगल्या पध्दतीने व्हावं आणि अविरत व्हावं , समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करताना खऱ्या अर्थाने मन दु:खी होतं आहे . कारण आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना एकीकडे अन्नाच्या घासासाठी कचराकुंडी हुडकणारे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे चिमुकले हात…..रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण…..भिकारी……वृध्द……माणसाला एका घासासाठी तरसावं लागतं यासारखी दुसरी शोकांतिका नाही . पण कधी कधी हे समाधान वाटतंय की या दुर्लक्षित , वंचित घटकांची आपण सेवा तरी करतोय . फार मोठ काही नका नसेना पण त्यांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न तरी करतोय . मित्रानों हे काम कोणी एकटा करु शकत नाही यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे . समाजातील सर्वांनी ही आपली जिम्मेदारी आहे या दृष्टीकोनातून विचार केला तर समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही . पण आमच्यातली माणुसकी कुठेतरी संपत चालालेली दिसत आहे. तीच माणुसकी आपण जपायला हवी ".
पंचवीस वर्ष वयाची बी ए एमएसडब्ल्यु झालेली सौ. अनु मोहीते तळमळीने व्यासपीठावर बोलत होती . निमित्त होते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॕईज फेडरेशन महिला आघाडी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या महिलादिनाच्या कार्यक्रमाचे ! या संघटनेच्या सोलापुरात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या महिलेला सन्मानित करायचे ठरले होते. त्यासाठी सोलापुर मधेच सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. नभा काकडे यांची मदत घेण्याचं ठरवलं . नभाला हा विषय बोलून दाखवताच तिने अनुच्या कार्याबद्दल माहिती दिली . ती ऐकून भारावून गेल्यासारख झालं आणि वाटलं ही करते ते कार्य समाजासमोर आलं पाहिजे. नभाने तिची माहिती दिली जणु सन्मान पत्रच !
समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे हा अनुचा ध्यास ! वंचितांची शाळा " एक पाऊल प्रगतिकडे " हे तिच्या प्रकल्पाचे नाव आहे हा प्रकल्प वंचित मुलांसाठी असुन जी मुल रस्त्यावर भीक मागतात , राहायला घर नाही , जागा मिळेल तिथे त्यांचे आईवडील झोपडी बांधून रहातात . झोपड्या महापालिकेने काढा म्हणले की काढतात . फुटपाथवर राहतात . अशा मुलामुलींना शोधून एकत्र करुन शाळा चालवते . सुरूवातीला मुलांना हे विचित्र वाटायचं , ती दगड मारायची , मरामारी करायची नुसतं हसत रहायची . पण समाजाच्या मुख्य प्रवाहात या मुलांना आणायला या ध्येयाने पतीच्या सक्रीय साथीने अनु हे काम करत आहे . सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळा चालवते .
याच प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यावर भीक मागणारे मनोरुग्ण यांनाही आधार देण्याचा हे दोघे प्रयत्न करतात . अनेक मनोरुग्णांना इस्पितळात नेणे , त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे , थंडी , ऊन , पाऊस यापासून सरंक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही पण कामे ही दोघे करतात . महापालिका व पोलिस खाते यांच्या सहकार्याने त्यांना सिध्देश्वर शाळेसमोरील पोलिस चौक हाच कॅम्पस शाळेसाठी मिळाला आहे तर दुसरी शाळा हैद्राबाद रोडवरील पण्याच्या टाकीजवळ आहे . उघड्यावर
" गुरूकुल " या पध्दतीने या शाळा चालतात ती एमएसडब्ल्यु झाली आहे याचा ती खरोखरच समाजकार्यासाठी उपयोग करते . आपल्या आसपास कुटुंबाचा भार वाहणाऱ्या दिवसरात्र कष्ट करणाऱ्या , रुढी परंपरांनी पिचलेल्या स्त्रीया आपण पाहतोच . पण याच स्त्रिया समाजाचाही भार वाहून , कष्ट करून रूढी परंपरांच्या बंधनाला भिरकावतात याचं एक उदाहरण म्हणजे अनु आहे . प्रसाद मोहिते याच्याशी तिने परवाच सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं आणि वाचलेला पैसा त्यांच्याच शाळेतील पाच मुलींच्या नावे एफडी करून ठेवले . सासरचे पहिले स्वागत आपल्या विधवा सासुच्या हातूनच झालं पाहिजे आणि आपली ओटी पण त्यांनीच भरली पाहिजे हा अनुने आग्रह धरला ! सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळचे इर्लेवाडी हे प्रसादाचे ग्रामीण भागातील गाव आहे . लोकांनी खूप विरोध केला , अशुभ होईल म्हणून भीती घातली परंतु अनुचे उत्तर होते की ज्या आईने शेतीकर्जामध्ये आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात मुलाला शिकवलं , सामाजिक संस्कार केले , मोठ केल ती प्रसादची आई माझ्यासाठी अशुभ असूच शकत नाही . उलट तिचेच आशिर्वाद माझ्यासाठी प्रथम महत्वाचे आहेत . अशी ही बंडखोर , प्रेमळ , कष्टाळु आणि समाजमन जाणणारी अनु हीचा आज आम्ही सत्कार करत आहोत . तिचा हा सत्कार समाजात तिच्यासारखे काम करणाऱ्या तमाम महिलांच्या कार्याचा सन्मान आहे भविष्यामध्ये वंचित घटकांसाठी कायमस्वरुपी प्रकल्प उभारण्याचा मोहिते पतिपत्निचा मानस आहे . त्यास मनापासून शुभेच्छा !
कार्यक्रमामध्ये आनुचा परिचय दिला आणि एकप्रकारची गंभीर शांतता पसरली होती . अंतर्मुख व्हायला होत होतं . पण अनु अगदी सहजपणे व्यासपीठावर आली व आपले अनुभव आणि अपेक्षा उकलत होती . हिच्या शाळेच्या आसपासच एक जागा आहे की ज्याठिकाणी लोक उतारे टाकतात . ती सांगत होती हिच्या शाळेतल्या मुलांना हे चांगलाच माहिती आहे आणि ते एवढ मोठ चांगल अन्न लोक उतारे म्हणून टाकतात आणि ही मुल तो उतारा घेऊन येतात आणि खातात . आनु म्हणली
" अशा आंधश्रध्दामधून जर मुलांची पोटं भरणार असतील तर त्या चाललेल्या बऱ्या ! आईवडिल मुलांना वाढवत असतांना आईवडिलांना बजेटचा कधीच प्रश्न पडत नाही पण त्याच आईवडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा बजेटचा प्रश्न कसा काय उद्भवू शकतो ? आणि वृध्दाश्रमात कसे काय चालु शकतात? माझ्या कुटुंबाच मासिक उत्पन्न रु सात असून त्यात आमच तिघांचं व्यवस्थित भागते पण लोकांना पैसे कसे काय पुरत नाहीत हे मला न उलगडलेलं कोड आहे .
आपण रस्त्यावर भीक मागणारे लोक तसेच व्यसनाच्या आहारी गेलेले मनोरुग्ण पाहतो . पण आपण त्यांचा विचार करत नाही कारण आपण आपल्याच जीवनात इतके व्यस्त झालेले असतो की आपल्याला आसपास काय चालले आहे याच्याकडे पाहायला कुठून वेळ आणणार ? खरे तर हे लोक खूप दिवस अंघोळ करत नाहीत , स्वच्छतेची काळजी घेत नाहीत , नखे , केस न कापणे दात न घासणे भरपुर बिड्डया सिगरेट पिणे मग ही माणसं समाजातुन बाहेर फेकली जातात . त्यांच अंतर्मन जाणुन घेता आलं पाहिजे त्याचं दु:ख आपलसं करता आलं पाहिजे . तर कुठे या गोष्टी शक्य होतील . असे लोक दिसले तर त्यांना मदत जर करणे तुम्हाला जमणार नसेल तर करु नकात पण त्यांचा तिरस्कार तरी करु नकात . आम्ही अशाच लोकांसाठी काम करतो . मैत्रिणिनों हा शिवधनुष्य पेलणे हे एकट्याचे काम नाही जर आपला हातभार लागला तर नक्कीच हे शिवधनुष्य पेलण्यास मदत होणार आहे . आणि एकही माणूस उपाशी राहणार नाही .
तिने केलेलं आव्हाहन हे ऐकत होत्या त्या बऱ्यापैकी कमवत असलेल्या भगिनी होत्या . बऱ्याचजणींनी त्या कार्यक्रमानंतर आपले मानस बोलुन दाखवले . कोणी वाढदिवसाची घोषणा तर कोणी स्मरणदिनाचे औचित्य साधण्याचा मानस बोलुन दाखवत होत्या आणि कार्यक्रमाचे सार्थक होत आसल्याचे जाणवत होते . थोडासा आशेचा किरण दिसू लागला होता…….
कॉ. सरिता कुलकर्णी
वूमन कौन्सिल कन्व्हेनर
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन औरंगाबाद युनिट
मोबाईल :- 9421607248





