Wednesday, September 2, 2020

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 4

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 4


भाग 16 ते 20



क्रमशः    भाग 16


    नृसिंह जयंती आणि वैशाखी हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडेच असल्याने याला थोडसं सणाचं स्वरुप येतं . गेल्या 30 वर्षात फक्त जवळच्या नातेवाईकाच्या लग्न/मुंजीला गेल्यामुळे 2/3 वेळी मी नव्हते . नाहीतर आम्ही सगळे एकत्र वैशाखी करतो विशेष म्हणजे आत्याकडे ( मुलांची प्रतिभा आत्या ) नसल्यामुळे त्या दरवर्षी येत असतात . त्यांची उन्हाळ्याची सुट्टी परांड्यात असते . पण लॉकडाऊनमुळे त्याही पुण्याहून येऊ शकल्या नाहीत .सध्या काका-काकी मात्र नेहमीप्रमाणे त्यांची वाट पहातात . लॉकडाऊन कधी संपणार विचारतात . काय सांगावे त्यांना  ?  बालपण आणि म्हातारपण सारखेच असतं म्हणतात . त्यामुळे मुलांच्या भेटीसाठी त्यांनी अतुर आसणं सहाजिकच आहे पाहू आता सुरळीत होण्याची वाट पहाणे .
      पुर्वी सणाला आम्ही परांड्याला जायचो हल्ली सगळे बार्शीला असतात . काका-काकी परांड्यात आम्ही बार्शीत असं कधी होत नाही . हल्ली मुलांच्या रजा /परिक्षा यामुळे त्यांना कधीकधी यायला जमलं नाही पण एकत्र असण्याचीच सवय आहे . यावेळी आशिष-किर्ती आकांक्षा घरी आहेत पण काका-काकी नाहीत ती रुखरुख मनाला लागली . फोनवरून बोलणं झालं फक्त  . 
       तसं काकींच कडक सोवळं , व्रत-वैकल्य , कडक उपवास आशी धाटणी होती . कट्टर मराठवाडी बाणा !  त्या नेहमीच  आत्मकेंद्रीत राहिल्या . फारसं स्पष्टपणे बोलणं नाही .पण त्यांनी मला हे करण्याचा आग्रह कध्धीच केला नाही . त्या स्वतः करत रहायच्या . तयारी करुन ठेवायच्या करावे आशी अपेक्षा मात्र स्पष्ट जाणवायची . मी पण ते आनंदाने केलं आजुनही करते . आता काळही बदलला आहे व्याप वाढला आहे . मग मी पण त्यात सोयीस्कर बदल करत आणले आहेत . पण मी करेल ते चालवून घेतात सगळेजण . काळानुरुप चालणं गरजेचं आहे हे सर्वांना पटते त्यामुळे सणवार पण एखाद्या समारंभासारखा करण्याचा माझा प्रयत्न आसतो . थोडाफार पुढच्या पिढीचा पण विचार करायला हवा . कोणतही औडंबर न वाटता समाधान मिळालं पाहिजे ! आईचं थोडफार सोवळं असायचं ते लहानपणी  पाहिलेले . एकूणच  सुवर्णमध्य साधण्याचा माझा प्रयत्न आहे .
       काकांच मात्र बिनबोभाटपणे काम सुरु असतं . याही वयात ते स्वस्थ बसत नाहीत त्यामुळे त्यांची तब्बेत व्यवस्थित असते . थोडा अस्थम्याचा त्रास पहिल्यापासून आहे . 70 वर्षापूर्वीचे ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजचे ग्रॕज्युएट आहेत . इंग्लिशवर चांगली कमांड आहे . काकी पण त्यांना सातवीत मिळालेल्या स्कॉलशिपवर केलेली ही अंगठी आहे असं बोटातली आंगठी दाखवून म्हणत असतात . गेल्या 30 वर्षापासून मी पहाते या दोघांच्याही तब्बेती आशाच तुडतुडीत आहेत . आत्या व काका पण तशेच . आमच्या घरातला एक निखळलेला तारा म्हणजे काका ( सुनिल भाऊजी )  . त्यांच्या आकाली जाण्यांने उलटसुलट घडल्यांने नको त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले .आशिषच्या लग्नाच्यावेळी आई-काका व सुनिल भाऊजी-सुखदा यांच्या उणीवा प्रकर्षाने जाणवल्या . त्यात्यावेळच्या भावना पण मी लिहून ठेवल्या आहेत . भाऊजींची मात्र उणीव नेहमीकरता भासतच रहाते . उतारवयात काका-काकींना रुखरुख आहे . पाडवा , वैशाखी , गौरी-गणपती , दसरा , दिवाळी या सगळ्या सणाला आम्ही एकत्र आसतो . मुलांशी काकाच आतूट नातं होतं . त्यामुळे आशाप्रसंगी मनात घालमेल होते व या सगळ्या  आठवणी प्रकर्षाने होतात. काळ हेच यावरचं औषध आहे !
     पण यावर्षी घरात आकांक्षा , नविन जोडी असल्याने वातावरण छान होतं . कोरोनामुळे सगळे सोपस्कार  घरातल्या घरात पार पडले तरी नृसिंह जयंतीला सगळ्यांनी छान आवरुन तयार झालो सगळ्यांनी उपास केलेला मग थंडगार खरबूज पन्हं  थोड्या गप्पा रात्री जेवण असा कार्यक्रम पार पडला . कीर्तीला हे सगळं नविन होतं  पण सगळीकडे कुतुहलाने निरीक्षण व शंका विचारणं सुरु होतं . दुसरेदिवशी पुरण होत त्यामुळे मग ते तर तीच करणार हे तिने ठरवून टाकलेलं .याठिकाणी आपला नंबर लागू शकत नाही हे आकांक्षाला माहित होत म्हणून आदले दिवशीचं मी करणार हे तिने ठरवलं . त्याप्रमाणे दोघींनी आपला नंबर येण्याची वाट पाहिली . त्यामुळे यावर्षी स्वयंपाकाला बाई नव्हती तरी उत्साहानं स्वयंपाक झाले तेही उत्तम !!चला कोरोनाच्या निमित्ताने हाही एक प्रयोग !! काम टाळण्यासाठी नाही तर करण्यासाठी दोघांचीही चढाओढ आसते . कीर्तीकडून नेहमीच काहीतरी केलेलं ऐकायला मिळतं त्यामुळे केतकी आई-बाबा , आजी , आत्या ,मावशा सगळेजण ऐकायला उत्सुक असतात .खुप कौतुक वाटतं सगळ्यांना . आता आम्हांला केव्हा तुझ्या हातचं खायला मिळणार असं बोलणं चाललेले आसतं . ती पण खूप उत्सुकतेने वाट पहातेय मी कधी हे करुन घालणार सगळ्यांना . इकडे आमच्या फॕमिली  ग्रुपवर पण सगळे रोज फोटोची वाट पहात आसतात . आणि मग चर्चांना उधाण येतं . सध्या आमच्या ग्रुपला
 " आम्ही सारे खवय्ये " 
आसं नाव द्यावसं वाटतय .चला आता लॉकडाऊन संपायची वाट पहायची . आता लवकर कोरोना निर्मुलन होऊन जनजिवन सुरळीत व्हायला पाहिजे आसं  वाटतय खरं !!!


क्रमशः   भाग 17


            सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आहे पण कोरोनाबाधित रुग्ण सोलापूर शहरात आहेत त्यामुळे शहर वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये थोडीफार शिथिलता आणली आहे . 3 मे नंतर बार्शीत हळुहळु तुरळक दुकाने उघडत होती . ब-याच दिवसांनी फोन करुन पहिल्यांदा चष्म्याच दुकान गाठलं . फ्रेम तुटल्यामुळे एक महिन्यापासून स्पेअरमधला चष्मा वापरतेय पण रोजच्या सवयीचा चष्मा मला हवा आहे . तो मिळेल आता सोमवारी .  उकाडा वाढतच होता . वैशाख महिन्यात 43/44 तापमान असतेच . त्यामुळे हैराणी होत होती . आशिष-किर्तीला रात्री झोप होईना . पिळून निघाल्या सारखे व्हायचे .आंम्ही दुकानदाराला आधीच फोन करुन ठेवला होता त्याप्रमाणे आम्हांला 3/4 तारखेला एसी आणता आला . त्यामुळे त्यांना  चढता उन्हाळा सुसह्य होऊ लागला . सगळ्यांना हुश्श्य झालं . आणि तापमानांन रोजचा  44 चा पारा गाठला , 8 दिवसांपासून धगधगत्या भट्टीसारखं वातावरण होतं , पण आम्हांला एसी व कुलरमुळे थोडीफार  त्यावर मात करता आली . 
       आज रविवार 10 मे सगळ्यांनाच सुट्टी  ! आज दुपारी परवाच्या राहिलेल्या पुरणाच्या गरम पोळ्याचा बेत होता .पुरण मुरल्यामुळे जायफळ आणि वेलचीचा जरा जास्तच कैफ चढला होता . त्यामुळे सगळ्यांनी दुपारी ताणून दिली . 4 वाजता इतके झाकाळून आलं , विजांचा कडकडाट होऊ लागला ,  सोसाट्याचा वारा सुटला तसे जागे होत सगळेजण कट्ट्यावर येऊन उभे राहिले आणि वातावरणाचा रंग पाहून  चातकासारखी पावसाची वाट पाहू लागले  . काळेकुट्ट ढग मधुनच पळत होते पाऊस पडेल की पळूल जाईल असं वाटत असतांनाच पावसाला सुरुवात झाली . आणि आर्धा तास तुफान पाऊस ! सुरुवातीला तप्त मातीवर पावसाचे थेंब आणि त्याचा येणारा सुगंध हाव-यासारखा सगळ्यांनी घेतला थोड्याच वेळात सगळीकडे पाणीचपाणी ! समोर मैदांनावर रस्त्यावर पाणी सुसाट पळू लागलं . क्षणभर वाटलं  परवाच नृसिंह जन्म झालाय . हिरण्यकश्यपूचा वध केल्याप्रमाणे कोरोनाचा वध तर होत नाही न  ? बघता बघता वाटू लागलं या वाहत्या पाण्यातून कोरोनाला वाहून घालवण्यासाठी हा पावसाचा  घाट घातला आहे का  ? इतका पाऊस पडून आकाश निरभ्र झालंय तशी या पावसात पृथ्वी कोरोनामुक्त होईल का ? काही सांगता येत परमेश्वराची लिला अगाध आहे . माणसांने विज्ञानात खूप प्रगती केलीय , सगळं मुठीत घेतलंय असं म्हणत आसतांना सगळं फोल ठरवत एका झटक्यात मुसक्या आवळल्या गेल्यात जग काही दिवस नव्हे तर अनेक महिने मागं गेलंय . सगळी पृथ्वी माझीच म्हणणा-या  माणसाला त्याची जागा दाखवलीय . असो निसर्गाचा समतोल साधला जावा व पुर्ववत आयुष्य सुरु व्हावे एवढी अपेक्षा . कारण आपण इतका पैसा ,  वीज वापरुन मिळणारा एसीचा थंडावा आणि 10 मिनीटांत निसर्गाने दिलेला गारवा ! आहाहा !! निसर्गाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही .  बार्शीला 3 दिवसांनी पाणी येतं त्यामुळे झाडांना दिवसभर इतकं उन पेलल्यावर रोज सकाळी त्यांच्या बुडाशी आर्धी बादली पाणी मिळायतंय  त्यामुळे कशीबशी  तग धरुन आहेत ती  . पण शेवटी निसर्गच तो ! आर्ध्या तासात  वातावरण इतकं बदललं की माणसं सुद्धा सगळी लहान मुलसारखी उल्हासीत झाली . आकांक्षा-कीर्तीने पहिल्या पावसात भिजायचा आनंद लुटला तर दवबींदू पकडायला मनिषचा कॕमेरा सज्ज झाला . पोर्चमध्ये खुर्चीवर बसून आम्ही दोघेही या आनंद सोहळ्यात सामिल होत होतो . काहीतरी काम करण्याच्या निमित्ताने पावसात पळत जाऊन परत येण्याचा मोह आम्हांला पण नाही आवरता आला . आशिष-किर्ती मधुनच आपल्या पावसाळ्यात ट्रेकींगचं नियोजन केलं आहे त्याचं काय होणार हा विचार करतकरत या क्षणी पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागाले . पावसात सगळे गार झाले आणि जे वातावरण निर्माण झाले ते पाहून अनुभवुन लगेचच आकांक्षाला कदमची भजी , देशपांडे वडेवाले आठवले सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं . पण काहीच मिळणार नव्हते . फक्त चर्चा करुन गाप्प बासावे लागणार होते . मग  एकमेकांकडे पहात सगळ्यांना डोळ्याची भाषा उमगली आकांक्षा-कीर्तीने पळत स्वयंपाक घर गाठलं . घरात ब्रेड होताच मग बघता बघता गरमागरम ब्रेड पकोडे आणि वाफाळलेला चहा तयार झाला त्याचा अस्वाद घेऊन सगळे तृप्त झाले  . पुन्हा कॕरम आणि रात्री कट्ट्यावर बसून आईस्क्रीम आणि गप्पा . पण पुन्हा कोरोनामुक्तीची अपेक्षा करत  सध्यातरी कोरोनासाठी आवश्यक असलेली काळजी घेत काम करण्याचा निश्चय करत शुभरात्री केल ! कारण कालच प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी
" कोरोनाशी लढतांना अर्थाचा भार पेलतांना " 
या संघटनेनी आयोजित केलेल्या फेसबुक संवादात सहभागी होऊन मनोधैर्य वाढवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे  त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेपर्यंत लस निघेपर्यंत वाट पहावी लागणार आहे ! त्यांनी सांगितले आहे तुर्तास 2020 च कॕलेंडर मनात गुंडाळून ठेवा . मनोधैर्य वाढवा , परिस्थिती जेवढी लवकर निवळेल तो आपल्याला मिळालेला बोनस समजा म्हणजे हे बुडतंय अशी रुखरुख नाही लागणार . चला मग सकारात्मकतेने कामाकडे वाटचाल !!



क्रमशः  भाग 18

       कोणत्याही नवीन गोष्टीचा अनुभव घेताना
 " नव्याचे नऊ दिवस "
 म्हणत रोज नवा अनुभव देऊन जातो . आणि कोणतीही मानसिकता तयार व्हायला परिस्थिती मान्य करायला 21 दिवस लागतात असे म्हणतात . कोरोनाच्या बाबतीत तसंच झालं म्हणायला हरकत नाही . ही एक आपत्ती आहे हे सर्वांनाच माहित होतं पण तोही सगळ्यांना पहिलाच अनुभव की  ! सगळे फक्त ऐकून होते .
 " दुरुन डोंगर साजरे " 
या उक्तीप्रमाणे संकट पण लांब असेल तर त्याच्या झळा फारशा नसतातच . 22 मार्चला एक दिवसाचा कर्फ्यु जाहीर झाला . दिवसभर बाहेर न जाता 5 वाजता सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या . पाठोपाठ संकट दारात येऊन उभं ठाकलं म्हणलं की परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पहिला लाॕकडाऊन जाहीर झाला . संमिश्र भावना होत्या सगळ्यांच्या . रोजच रुटीन गर्रकन वळुन पुर्णपणे वेगळीच जिवनशैली सुरु झाली . गरगर फिरणार जिवनचक्र कुठल्यातरी शक्तीने जगच्या जागी रुतवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली . 
       लहान मुल रडरड रडतं मधुनच त्याला आनंद वाटेल असं काही दिसलं की रडतरडत ते हसायला लागत डोळ्याबरोबर नाकातून पाणी गळत असतं रडूनरडून दमलेलं असतं ते . डोळे आणि गाल लालबुंद होतात आणि थकवा येतो मग झोप येते . त्याला काहीच कळत नसतं तशी माणसाची अवस्था कोरोनामुळे या लॉकडाऊनमध्ये झाली . काय होतय तेच कळेना . सगळेच घरात बंदिस्त आहेत काहीच  काम नाही काही  पण भरपूर कामं आहे  . नातेवाईक , स्नेही , सहकारी यांच्याशी फोनवरून  गप्पाटप्पा मेसेजेस वेगवेगळ्या पाककृती , विविध कलाविष्कार, लिखाण , कविता तसंच भावनांच पण होतय . हसताहसता एकदम गंभीरपणा भितीयुक्त वातावरण निर्माण होतं असं एक न दोन अनेक आविष्कार ! व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत एवढ खरं . 
     इकडे जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल तसातसा दुसरा तिसरा आणि आता चौथा लॉकडाऊन सुरु झाला . तोतो  माणसाचा धीर सुटत गेला तेचतेच करायचा कंटाळा पण आला तर इकडे हातावरच पोट असणारांना पोट स्वस्थ बसू देईना . मग गावाकडे जाण्याची धडपड मिळेल त्या वहानाने , गाडीने , सायकलवर प्रसंगी चालत लहान , मोठे,  स्त्री-पुरुष सगळेच प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे आपापले निर्णय घेऊ लागले . शासनव्यवस्थापण तोकडी पडू लागली . माणूसच तो थोड्याफार फरकाने प्रत्येकाची विचारसरणी अशीच होत गेली आज 26 मे म्हणजे जवळजवळ सव्वादोन महिन्यांपासून परिस्थिती अशीच आहे फक्त मानसिकता बदलत गेल्या . पण सध्या इकडे तरी उलटच चाललय सगळं . कोरोना वाढतोय तसं वातावरण शिथिल होत चाललंय पण एक मात्र नक्की  माणूस  स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला , कोरोनासह जगायला शिकायची धडपड करताना दिसू लागलय . परिणाम  काय होईल हे आज तरी सांगता येत नाही पण जनजिवन सुरु करावं लागणार हे नक्की . कारण आपल्या रोजच्या व्यस्ततेतून  2/3 दिवस वेळ काढायला सुद्धा  तयार नसणारी माणसं 2 महिन्यांपासून जागच्या जागी थांबलीत ,  घरात आहेत . 
      आशिष-कीर्ती , आकांक्षा आणि आम्हीसुद्धा याला अपवाद असू शकत नाही  . यापरिस्थितीत  एकत्र आहोत , नविन नाती जगता येतात नवनवीन पाककृती शिकायला व शिकवायला मिळतात त्याचा आनंद आहे . विचारात व परिसरात मोकळेपणा आहे लांब असण्याची काळजी नाही . तशी कामं सगळ्यांना आहेत . पण रोज तेच कपडे घालायचे व समोर लॕपटाॕप घेऊन घरातच आपापल्या जागेवर बसायचं . तसा टाईमपास पण चांगला होतो कॕरम ,पेटी , टीव्ही गाणी .  तसं बार्शीत तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये  बरीचशी शिथिलता होती . इकडे रुग्णसंख्या ठराविक ठिकाणी  वाढतेय पण वातावरण आणि परिसरातील स्थिती पाहून नियमात शिथिलता येतेय . बार्शी तसं सुरक्षित आहे पण परगावच्या लोकांची ये-जा वाढली त्यामुळे काळजी पण वाढते . पाठोपाठ चौथा लॉकडाऊन जाहीर झाला पण बाहेर लोकांचे व्यवहार ब-यापैकी सुरळीत झालेत . घरात मात्र तेचतेच करायचा कंटाळा येऊ लागला आहे . फारसं नविन काही घडत नाही तर रोज तेच काय लिहावं म्हणत माझ पण लिखाण बंदच आहे .  
      परवा सहज गप्पा मारत बसलो . लग्नानंतर कीर्तीची मिरजेला 2 दिवस  येतीजाती झाली व तिचे आई-बाबा पुण्याला अगदी धावती भेट देऊन गेले त्यानंतर प्रत्यक्ष भेट कोणाचीच झाली नाही . केतकी तर लगेचच कोकणात गेली . माहेरी गुजगोष्टी , हितगुज करायला कीर्तीला वेळच मिळाला नाही . मध्येच केतकी तिकडे आजारी पडली मग बाबा व पुन्हा आई असे आजारपणाचे सगळ्यांचे नंबर झाले . फोन झाला की मला सगळं सांगायची . बाबांची तब्बेत बरी नव्हती तेव्हा म्हणाली नेहमीसारखं असतं तर विकेंडला मिरज ट्रीप झाली असती . तेही बरोबरच आहे लांब असलं की हुरहुर लागते मनाला तेच प्रत्यक्ष भेटीने समाधान होते तिची तगमग मला उमजत होती . मला वाटलं थोडी घालमेल तर होतच असणार तिची म्हणून तिच्या  मनात हळुवारपणे  डोकावायचा प्रयत्न केला . जरा गप्पा मारल्या थोडेसे मग तिला जरा बोलतं केलं . पण परिस्थितीप्रमाणे विचार करते ती असं जाणवलं . आणि एकूणच आम्ही गप्पा मारतांना , मैत्रिणी ,  नातेवाईक यांच्याशी बोलताना आत्ताच्या घडीला आपला लग्न समारंभ झाला , फिरुन येणं अगदी व्यवस्थित पार पडलेय सगळे सोपस्कार पार पडलेत त्यामुळे तसा ताण कोणाच्याही मनावर नाही व आतातर बार्शीत एकत्र रहाता येतय हेच खूप महत्त्वाचे आहे स्थिरता तर आहे होईलच की हळुहळु सुरु अशा तिच्या भावना आहेत . बरं वाटलं मला पण मोकळेपणानं बोलल्यामुळे . नविन आहे निश्चिंतपणे तिने रहावं असेही वाटते .आई-बाबांशी फोनवर होतात गप्पा . भेट झाल्यासारखे वाटावे तेवढंच मनाचं समाधान म्हणत कधीकधी video call कधीमधी आजी ,  आत्या , मावशीबरोबर गप्पा होतात . पण एकंदर खुष आहे काळजी नाही हे जाणवलं . 
      दुकाने उघडली म्हणल्यावर मागच्या आठवड्यात आम्ही दुपारी जरा बाहेर जाऊन आलो . तेचतेच कपडे त्यांना घालायचा व मला पहायचा कंटाळा आला म्हणून थोडीफार खरेदी केली . आल्यापासून मनिष तर बाहेर गेलाच नव्हता . सगळे फिरुन आले म्हणल्यावर त्याला पण  काहीतरी वाटलं आणि बसल्या बसल्या रविवारी तो म्हणाला 
काय बाबा कायकाय ठरवलेलं मी  विकेंडला पिक्चर पहायचा  , हॉटेलमध्ये जायचं आता पावसाळा सुरु झाला की मस्त ट्रेकिंगला जायचं गाडीवर बसून लांब फिरुन यायचं तर कधी फोर व्हीलरनं लाँग राईड मारायची . ते एकदम बंद आणि हे काय झालं बाबा कंटाळा आलाय आत्ताच्या आत्ता बाहेर जावसं वाटतंय  . म्हणलं उठ आणि गाडीवर गावाबाहेरुन एक चक्कर मारुन या दोघेजण .या घडीला तर तेवढंच शक्य आहे मग जाऊन आले दोघेजण बायपासवरुन चक्कर मारुन . फार बरं वाटलं बाहेर चक्कर मारल्यावर म्हणाला  .
     मागचे  8/10 दिवस झाले कीर्ती-आकांक्षा माझ्या  मागे लागल्यात क्रमशः  पुढचा भाग येत नाही का लिहीत नाही  . आलाच पाहिजे . कीर्ती तर म्हणाली सुगारणपणा छान लिहीलात आता बिघडलेलं पण लिहा की  . भविष्यात ते वाचायला मजा येईल . आणि हो ते तुमच्या भाषेत सांडग्याची माझ्याकडून झालेली  "राखुंडी" किंवा पोळीभाकरीच   
" दुपटं " हे पण वाचायला आवडेल . तसे माझे असे  अनेक शब्द आहेत की जे आईकडून वारसा हक्काने आलेत ते आम्हा बहिणींमध्ये ! सगळे एकत्र जमलो की हमखास ते शब्द ती वाक्य वापरल्याशिवाय भेट झाल्यासारखे वाटत नाही . आमची मुलं तर त्याच्या पुढची पायरी आहे . हळुहळु अनुश्रीला माहित झालंय पण सलग दोन महिने सहवासात आल्यामुळे कीर्तीला माझे बरेचसे ठेवणीतले शब्द काही वाक्यं माहित झालीत .  काहीकाही किस्से फोड करुन सांगावे लागतात . तिला त्याच्या मागचे किस्से सांगितले की मग मजा येते . मनिष म्हणतो आई ब-याच गमतीजमती हीला माहिती व्हायला 2/3 वर्षे लागली असती पण हीला तर सहा महिन्याच्या आत सगळे माहित होतय . आसुदे म्हटलं  " ठब्ब  " परिवारात लवकरच मिक्स होतीय ती ! ठब्बचीही वेगळीच कथा आहे !!
         ठीक आहे उद्या लिहिते  म्हटलं आगोदर मला जरा आलेली मरगळ तरी झटकू दे . मग ताजतवान होऊन तुझ्या बिघडलेल्या पदार्थांचा स्वाद पुढच्या भागात चाखू  !!



क्रमशः  भाग 19

माझी आई आणि पाककलेच शास्त्र !!


      माझी आई म्हणजे साक्षात अन्नपुर्णेचा वरदहस्त लाभलेली जणू लक्ष्मीच ! साधा शिळ्या पोळ्याचा चुरा करुन कांदा ,  भरली मिरची घालून चरचरीत फोडणी टाकली तर आहाहा काय खमंग वास येतोय म्हणत सोप्यात बसलेल्याने स्वयंपाकघरात आलच पाहिजे . किंवा तोंडाला चव नाही म्हणत काही न खाता वाड्यात झोपलेल्या आजारी माणसाला तिने पेज करुन दिली तर ती पिऊन तरतरी आली बाबा  म्हणत त्यांन उठून बसलंच पाहिजे . तसंच काही सण समारंभाला केलेला साग्रसंगीत स्वयंपाक असो की साधं लसूण मेतकूट घालून केलेलं खुमासदार भडंग असो . मसाले , मेतकूट , चटणीपूड , सांडगे ,  मुरांबे लोणच्यासारखे वार्षिक पदार्थ असो की दिवाळीचा तिखट-गोड फराळ असो  . एक न दोन कित्तीतरी पदार्थ तिने करावे आणि खाणाराने तृप्तीची ढेकर द्यावी .  प्रत्येक पदार्थाला तिच्या हातची खास चव असायची . मन लावुन करण्याची तिची पद्धत होती . त्याहीपेक्षा समोरच्याने मनापासून खावे व तृप्तीची ढेकर द्यावी अशी त्या नवराबायकोत ( आई-काकामध्ये ) जणू स्पर्धा असायची . बाजार आणण्याचा काकांचा उत्साह तर त्याचं अमृत करुन समोरच्याला तृप्त करण्याचा आईचा स्वभाव . 
घराजवळून जातायेता दिसणारी एखादी सून असो लगेच तिला 
"बस दोडा 2 घास खाऊन जा "
असं म्हणत हाताला धरुन बसवुन खायला घालायचं नाहीतर एखादी माहेरवाशीण आलेली दिसली की
" नवजुनं दिसतंय तुझ्याकडे बस दोडा घटकाभर खाऊन जा " 
असं म्हणत काहीतरी डीशमध्ये घालून डीश पुढ्यात ठेवली जायची पुन्हा 
" घे आजून एक तुकडा " 
म्हणत आग्रह करायची . कामाच्या बायकांना
 " आधी दोन घास पोटात घाल मग पाणी पिऊन काम कर "
असं म्हणणार . सढळ हाताने करण्याची दोघांचीही वृत्ती तिथे त्यांनी हिशोब कधी केलेला मी पाहिलाच नाही . 
        आपण कोणताही पदार्थ करताना सात्त्विक भाव ठेवावा जशी आपली मनाची अवस्था असते तीच चव पदार्थात उतरते असं ती  म्हणायची . म्हणून घरच्या बाईने समाधानी वृत्ती ठेवली तर घर समाधानी असतं असं बारिकसारिक गोष्टी तिने मनावर लिलया बिंबवल्या .      संस्कार असेच घडत असतात हाताला धरुन नाही करावे लागत . आईचं अध्यात्माचं अफाट वाचन  होतं कोणतही औडंबर न करता  काळाबरोबर चालणारी सर्वसमावेशक वृत्ती असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते तिचे . 
        तिच्याकडून पदार्थ करायला शिकायचं हे मुली म्हणून आम्हीच  नाही तर पुतण्या ,  सुना , जावा , नाती , शेजारी , स्नेही आणि कोणीही उत्सुक असायचं . कोणीही घरी आलं तर ते दोन घास खाल्याशिवाय परत जात नसे व मुख्य म्हणजे खाणाराच्या ते स्मरणात रहात असे . मग त्याला ते शिकण्याची आस लागे अशी सुग्रण आई होती माझी . 
         तिला शिकवायला पण फार आवडायचं  .  ते शिकवत असतांना अनेक टीप्स द्यायची ती  2/3 वेळेला शिस्तीत समजून ते सांगत असतांना काय करु नये तसं केलं तर पदार्थ कसा बिघडतो हे तिच्या खास शैलीत हसतखेळत सांगायची की शिकणाराला ते अगदी लक्षात रहायचं . मायाळु होती तसेच  शिस्तीचा दंडूका पण होता तिच्याकडे  मजा घेत शिकायचं असं पाककलेचं शास्त्र  शिकवणारं जगातलं भारी विद्यापीठ होतं ते .
            वारसाहाक्काने आईच्या पाककलेबरोबर शब्दभांडारपण माझ्यातच नव्हे तर तिच्याकडून शिकणा-या प्रत्येकात आलं आहे . मुली , नातींमध्ये तर भिनलय ते .
       कोणतीही वस्तू भाजतांना किंवा तळतांना त्याला आच कशी द्यावी म्हणजे तो पदार्थ कसा 
" खमंग "
 होतो ,  कमी आच झाली तर कसं कच्च होतं तर
 "फराफरा स्टोव्ह किंवा गॕस " सोडला तर कशी
 "राखुंडी" 
होते हे ती सांगायची .
पोळी कशी
" आलवार लाटावी "  लाटताना
 " खटांगखटांग " 
 आवाज करु नये किंवा भाकरी कशी 
" न्ह्याsssर"  
थापावी 
" गौ-या बडवू नयेत "
 पचल्याशिवाय उलथणाने उलटू नये असं सरळ न सांगता 
" लगेच खुरप खुपसू नये "
असं म्हणायची .  पोळी/भाकरी फार पातळ केली तर 
 " पापड किंवा पानगी "  
झाली म्हणायची तर जास्त जाड झाली तर  
" दुपटी बडवून ठेवली " 
असं म्हणायची .
कोणतीही वस्तू भाजतांना ती हलवण्याचं कौशल्य पणाला लागायचं तिच्यासमोर . सुरवातीला मोठा गॕस मग भाजतांना जरा
 "हात सरासरा  हालवावा "
   " टराटरा " भाजायचं नाही
 " टाँगटाँग " आवाज करायचा नाही . भाजत भाजत वस्तू हलकी होते हालवतांना तसं जाणवतं . अशा खास ठेवणीतले शब्दप्रयोग , वाक्यप्रचार असायचे तिचे . नंतर नंतर तिला दिसणं कमी झालं होतं तर वस्तूच्या वासावरुन व ती हलवतांना जाणवणा-या  हलकेपणावरुन ती भाजल्याचं तिला ओळखता यायचं . मग मंद आचेवर भाजून गॕस बंद करुन तसंच ठेवले की वस्तू
 " खमंग "
होते . असं भन्नाट गणित होतं तिचं . 
असे प्रत्येक कृतीसाठी 
" आडीच घरं तिरके चालणारे "
 शब्द वापरायची .  त्यात दबाव किंवा कुजकेपणाचा लवलेश नसायचा . गंमतजंमत करत शिक्षण असायचं ते . तिच्याकडून  100%  मार्क मिळवायचे म्हणजे भरुन पावल्यासारखं वाटायचं . तिच्या वयाच्या बायकांपासून अगदी परवापरवापर्यंत आकांक्षाकडून  सुद्धा सुग्रणपणाचे धडे तिने गिरवून घेतलेत . या सगळ्या बिघडलेल्या पदार्थांना किंवा करण्याच्या चुकीच्या पद्धतीला तिचा खास शब्दप्रयोग होता.
" उंडग्याचा येभाव "
 तो आमच्याकडे प्रसिद्ध आहे अगदी भाजी मोठी चिरलेली दिसल्यावर मी नुसतं शोभा म्हणून हाक मारली की ती हसत विचारते 
 " वैनी येबाव झाला का हो "
      तिच्या सुग्रणपणाबरोबर तिचे खास शैलीतील शब्द भांडार पण मला माझ्यातच नव्हे तर आम्हा  सगळ्यात असल्याचे जाणवते  व मग जात्यावर बसली की ओवी आठवते तस प्रसंगानुरुप तिचे शब्द  ओघाने येतात .
       सध्या लाॕकडाऊनमुळे घरात रोज पाककलेचे ज्ञान पाजळलं जातंय त्या निमित्ताने आईची प्रकर्षाने आठवण होते .  माझ्या लहानपणी ती तरुण होती . गोंडाळ शरिरयष्टी , गोरा रंग , आंबाडा , नऊवारी साडी आणि समाधानी सात्त्विक वृत्ती . डावा गाल थोडासा वर उचलत हसण्याची लकब होती तिची . खेड्यात रहाणं होतं शेती त्या अनुषंगाने येणारा राडा , जनावरांचा राबता असे असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत तिचं ठरलेलं असायचं . केस पुसायला पांढरा स्वच्छ पंचाच असायचा तर शक्यतो मलमलचे पांढरे ब्लाऊज घालण्यावर भर असे . गबाळेपणा , आळशीपणा तिच्या आसपास फिरकत नसे . प्रसंगानुरुप निटनेटकं , प्रसन्न  रहायचा शिरस्ता होता तिचा . तसंच खाण्यात पण चविष्ट , सात्त्विक असलं पाहिजे . काका गेल्यानंतर पुढे आठ वर्षे होती ती पण फार समजुतीनं आणि धोरणानं वागणे होतं तिचं . नाविण्याची आस असल्यामुळे अगदी नातवंडांबरोबर तिचे मित्रत्वाचे संबध होते . जुनाट विचार तिला स्पर्श पण करत नसत . आई म्हणजे असं भन्नाट व्यक्तिमत्त्व होत.
      आशिषचे लग्न जमल्यापासून क्षणोक्षणी तिची आठवण येत राहिली अजूनही येतेय . आत्ता समजा कीर्तीसोबत तिला रहायला मिळालं असतं तर कोण कौतुक वाटलं असतं तिला .
      परवा मजा अशी झाली सकाळी मी भाजी करायचे शेजारी कीर्ती पोळ्या करायची गप्पागोष्टी चालू असायच्या हाताबरोबर माझं तोंडही चालू असायचं  ( भाजीच्या कृतीसंदर्भात ) आणि तिला पण भाजी केल्याचा फील यायचा . एक दिवस आळूची भाजी करायची होती सगळी तयारी करुन ठेवली व तोंडी कृती सांगून गेले . पण करताना तिला गडबडायला  होऊ लागली .10/12  मेसेजेश आले तिचे मला . मग सविस्तर कृती लिहून पाठवली . भाजी छान झाली . मी घरी आल्यावर गप्पा मारत बसलो हसुनहसुन बेजारी .
परत एकदा सांडग्याची भाजी करायची होती . मी करतांना तिने  पाहिली होती परत एकदा कृती  सांगितली आधी सांडगे तळून घे व त्यातच कांदा फोडणी टाक . मी बाजूला सरकले . कढई जरा जास्त तापली असावी त्यामुळे  तेल जास्त तापलं तिने गडबडीने सगळे सांडगे एकदमच त्यात टाकले . मी चहा पीत होते वास आल्यावर  पटकन  उठून मी सांडगे काढले अन ओघातच म्हणून गेले आग आग 
" सांडग्याची राखुंडी झाली बघ " 
आणि पुढची कृती सांगून मी 
वेळ झाल्यामुळे बँकेत गेले . आम्हांला दोघींनाही अंदाज आला होता पण दुपारी जेवताना आम्ही एकमेकींकडे हळुच पाहिलं व हसत गप्पच बसलो . भाजी ब-यापैकी करपट लागत होती . जेवतांना मनिष पटकन म्हणाला 
"वेगळी लागतीय न भाजी " 
मग आम्ही हसायला लागलो कीर्तीनं उत्तर दिलं 
" आरे सांडग्याची राखुंडी झाली"
 मग एकच हाशा पिकला . मग लक्षात आलं की मी शेजारी असले की लक्ष दिलं जातं  तिला सांगितले जातं मग आमच ठरलं की  सगळी तयारी करुन ठेवायची पण मी गेल्यावर तिने भाजी करायची . व भाजी करत असतांना मोबाईल बाजूला ठेवायचा . आणि आजून एकदा सांडग्याची भाजी तिने करायची. 
      पुन्हा एकदा भाकरी करता करता पीठ घट्ट झाल्याने भाकरी पसरेचना चांगलीच जाड झाली पटकन मी म्हणून गेले  पीठाला थोडेसे पाणी लावायला हवं होतंस पीठ घट्ट झालंय आणि भाकरी झाल्यावर हातात धरुन 
" आगं दुपटं झालंय हे "
असं सहजच बोलून गेले .
असे आईचे शब्द ओघाने येत रहातात मग कीर्ती विचारत रहाते 
" म्हणजे काय " 
मग तिला विस्ताराने आजीचा किस्सा सांगावा लागतो . अच्छा असं आहे काय म्हणत ती चूक सुधारण्याचा प्रयत्न असतो तिचा . पुढच्या भाकरी मात्र चांगल्या जमल्या .
         असे मधूनमधून काही किस्से घडतात . पुढे 1/2 दिवस चघळायला तो विषय असतो आमच्याकडे . मग परवा कीर्तीच म्हणाली बिघडलेल्या केकचं वर्णन ऐकायला आणि पुन्हा पुन्हा वाचायला व आठवायला मजा येते . राखुंडी आणि दुपटं तर स्मरणात राहिलच पाहिजे तुम्ही लिहाच मग तिच्या हट्टापायी  हा लेखनप्रपंच !!!



क्रमशः   भाग 20


कोरोनासह जगणं हळुहळु आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय असं काहीसं सध्याचे वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही . कारण 4 लाॕकडाऊन झाले आणि आता अनलाॕक 1.0  सुरु झालेय . आता पुर्ण अनलाॕकची वाट पहायची त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे तोपर्यंत कोणीच त्याविषयी काहीच वक्तव्य करु शकत नाही किंवा हमी देऊ शकत नाही हे तितकेच खरे . 
          इतके दिवस सुरक्षित असलेल्या बार्शीला आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागात नविन रुग्ण सापडू लागले आहेत . चिंता वाढतेय पण लोक आपणहून स्वतःची  काळजी घेत आहेत . सोशल डिस्टनसींग , मास्क , सॕनिटायझर हे जिवनाचे अविभाज्य घटक मानत जनजिवन सुरळीत व्हायला लागले आहे . आणि तेच गरजेचे आहे कारण सक्तीपेक्षा स्वेच्छा प्रभावीपणे काम करते . माझी आयुर्वेदीक औषधे परवा मिळाली त्याच्याबरोबर ज्योतींने वेळेत सुचीत केल्याप्रमाणे सगळ्यांसाठी अँटीव्हायरसचा डोस पण मिळाला आहे . त्यामुळे थोडंस निश्चिंत वाटतेय . बाकी उद्योग व आॕफिसेस पण टप्प्याटप्प्यांनी सुरु व्हायला लागले आहेत . IT वाले WFH करु शकतात पण Mech वाल्यांना प्रत्यक्ष जाव लागू शकतं . गेल्या आठवड्यात मनिष म्हणाला कीर्तीच्या  एका मैत्रिणीला पुण्यात यायला सांगितले आहे ती रत्नागिरीहून पुण्याला जाईल रविवारी येत्या  . कीर्तीला अजून नाही पण 10/12 दिवसात जाव लागू शकतं . ते ऐकुन अचानक मला उगाच पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं . मोहात आडकणे चांगले नव्हे व मोहात आडकवणे त्याहून योग्य  नाही . समजते पण उमजत नाही असं काहीसं म्हणावे लागेल . पण लगेचच मी स्वतःला सावरलं .
तसं तर आशिष-आकांक्षा कित्येक दिवसांनी इतके दिवस बार्शीला राहिले यावेळी सोबत कीर्ती आहे .आडीच महिने एकत्र रहायची सवय झाली . माझी जिवनशैली काय होती हे पुर्णपणे विसरलेय मी व सध्याचा दिनक्रम आंगवळणी पडलाय माझ्या  . घरकामाचा ताण पडतोय पण सहवासाच्या आनंदापुढे तो फिका वाटतोय . घरात सगळ्यांना कीर्तीने खुप लळा लावला आहे . छान वाटतं सगळे मिळून रहायला हे जरी खरं असलं तरी त्यांच-त्यांच काम , रुटीन सुरु होणे हेही महत्त्वाचेच की !! त्यामुळे मनाला समजावून सांगितले .
     आता 1 जुनपासून माझी बँक 10 ते 5 सुरु झाली त्यामुळे पुन्हा आमची जोडगोळी 1 तास कट्ट्यासमोर उभी रहातेय . मुख्य म्हणजे माझी सकाळची धावाधाव कमी झाली . 
         पाडवा झाला , वैशाखी झाली आता वटपौर्णीमा !
काल ठरल्याप्रमाणे कीर्ती सकाळी 6.30 लाच खाली आली छान आवरुन आम्ही दोघींनी पुजा , आरती , कहाणी 8.30 वाजता सगळं झालं आमचं !! मग कहाणीवर चर्चा ,  फोटो नेहमीप्रमाणे सुरु . एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या नविन पिढीला सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे , त्यानिमित्ताने जिवनक्रम बदलतो , नविन कपडे घालायला मिळतात , खाण्यात वैविध्य येतं फक्त हे नव्या पिढीला  कसं पचनी पडेल त्या पद्धतीने द्यावं हे मात्र घरच्या मोठ्यांच कसब आहे . कारण change of work is rest या उक्तीप्रमाणे कोणतच औडंबर न करता मजा घेत जिवनाची लज्जत वाढवली पाहिजे मग  समाधान मिळतं .
परवा कीर्ती म्हणाली लग्नानंतर मी दीड महिना पुण्यात व  आडीच महिन्यापासून बार्शीत रहातेय . आगदी काहीही सांगितले तरी मी कुठे काय आहे ते सांगू शकते वर असेल तर घेऊन येऊ शकते फक्त जिन्यात मांजर नसले पाहिजे !!
      " मांजर आणि कीर्ती "
हे एक अजब समिकरण आहे . मुली पाल झुरळ पाहून किंचाळतात , पळत सुटतात हे माहित होतं . पण हीला मांजर दिसले की ही पळत सुटते .  खुर्चीवर , बेडवर जाऊन उभी रहाते खुप घाबरते . तिला लहानपणी मांजराची भिती बसलेली आहे . बार्शीत तर जिन्यातून , खिडकीतून आसपास  ब-यापैकी मांजरांचा वावर आहे . तिची भिती मोडावी म्हणून मी अनेक प्रयोग करतेय .  परवा कंपाऊंड वालच्या पीलरवरआंब्याच्या सावलीत  मांजर झोपलं होतं . आम्ही सगळे होतो तीला चल पहायला म्हणलं तर लहान मुलं पडायच्या भितीने कसे घट्ट पकडतात तसं पकडून ती बाहेरच्या कट्ट्यावर उभी राहिली. तिला मांजर चालताना बिबट्या चालतो असा भास होतो म्हणाली . मांजर मान कशी करतं पहातं कसं याची मजेदार प्रात्यक्षिके ती करुन दाखवते त्याचबरोबर लहानपणी केतकीने मांजरावरुन कसं ब्लॕकमेल केलं हेही किस्से तिने सांगितले . जसं की तिच्याबरोबर अंगणात यायचं असेल तर केतकीची सायकल काढून ठेवणे , तिच्या वाटणीची कामे हीने करणे अशा गंमती जमती सांगितल्या . बाहिणी-बहिणींची भांडणं आणि प्रेम याला कशाचीच उपमा नाही देता येत हे मात्र खरं . 
      मग तिला म्हणलं कट्ट्यावर आलीस की मांजर दासते म्हणतेस मग बागकाम कसं करणार ? कारण ती 15 दिवसापासून माझ्या मागे लागलीय आपण भाजी लावू . परवा छान पाऊस झालाय , वातावरण बदललय आता लावू शकतो आपण . मग एकीकडे मी व एकीकडे आकांक्षा ही मध्ये उभी राहून मोठ्या हौसेनी मेथी , कोथिंबीर , वांगी व भेंड्या याच्या बिया लावल्यात . आज सकाळीच कोथिंबीरीचे छान कोंब पण दिसले . पाहू आता कशी भाजी येते मुलांना कितपत खायला मिळते !

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 3

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 3


भाग 11 ते 15


क्रमशः भाग 11


सकाळी 8 ची बँक आता पुढील निर्देश येईपर्यंत रहाणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बँकेत फारशी गर्दी नसते मुळात लोकांना 10 च्या पुढे बँकेत यायची सवय आहे त्यामुळे पहिला एकदीड तास असाच जातो . घरातून येईपर्यंत मात्र माझी गडबड सुरुच रहाते  . सकाळच्या पोळ्यांना काही माझा हात नाही लागत . पण अगदी उत्स्फुर्तपणे कीर्ती आणि आकांक्षा दोघीजणी वाटून घेऊन काम चाललेलं असतं . 
      मागच्या आठवड्यात सोलापूर मधील करोनाबाधितांची संख्या  अचानक वाढत गेली . ग्रीन झोनमध्ये आसलेला जिल्हा रेड झोनमध्ये गेला . सोलापूर शहर 3 दिवसांसाठी बंद पुकारलं गेलं . खबरदारी म्हणून पंढरपूर मग बार्शी बंदचे जनादेश निघाले . बँका अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु होत्या . 
   आज सकाळी 6 वाजता मी गेट उघडत होते तेव्हा  नगरपालिकेच्या 2 झाडूवाल्या मला पाहून दारासमोर आल्या .  आयटक अॉफिसला मी जात असते . जेव्हा भारत बंदची हाक असते तेव्हा बार्शीत सर्व कामगार संघटनांचा एकत्रित मोर्चा आसतो. त्या बायका मला पाहून थांबल्या ,  थोड बोलल्या . त्यांना थोड मन मोकळं करावसं वाटलं . हातावर ज्यांच पोट आहे त्यांची भयानक अवस्था आहे . कमवायला बाहेरच पडता येत नाही त्यांनी काय करावं . त्या म्हणत होत्या तुम्ही TV वर बघता एक प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी आहे. हे माहित होतच . पण प्रत्यक्ष   भरडल्या जाणारांकडून विदारक सत्य ऐकायला मिळालं मन सुन्न झालं . आता आणखी काही दिवस जर ही परिस्थिती राहिली तर या अशा करोडो लोकांच कसं होणार  ? आजचं काम बुडलं की कमाई बुडली पण पोट भरायला काय करायचं हा अनुत्तरीत प्रश्न आहे.
    लॉकडाऊनला तर पर्याय नाहीच पण हे काय झालय "करे कोई भरे कोई "  
किंवा 
" कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे " 
असं होऊन बसलय सगळं . राज्य सरकार केंद्र सरकार पराकोटीचे प्रयत्न करत आहेत पण निर्माण झालेल्या परिस्थितीत ते अत्यंत तोकडे पडत आहेत . माणसाच्या 
 "अन्न , वस्र व निवारा " 
या मुलभूत गरजा
 "भागवणे"  
मुष्कील झालं आहे . माणूस सगळं सहन करु शकतो पण त्याचं पोट त्याला स्वस्थ नाही बसू देत .
     परवा आमच्या युनीटची संघटनेची मिटिंग ड्यु होती . पण एकत्र जमणे कठीण होते  म्हणून रविवारी पहिल्यांदाच आमची अॉफिस बेअररर्सची  झुम मिटिंग झाली . एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला गेला . त्याहीवेळी असंघटीत क्षेत्रातील लोकांच्या एकूणच परिस्थितीवर चर्चा झाली . अनेक ठिकाणी गरजू  लोकांना अन्नधान्य वाटप सुरु होते .  20 एप्रीलला AIBEA या संपुर्ण बँकिग क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या  संघटनेला 75 वर्षे पुर्ण झाली . अमृत महोत्सवी वर्ष !  त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होतं  . पण 20 एप्रिलला काही करता आलं नाही . भविष्यात काहीतरी करावे असे ठरले .
         देशात करोनासारखं महासंकट असतांना सुद्धा सरकारने मात्र जाहीर केल्याप्रमाणे  1 एप्रीलला सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांच्या एकत्रीकरणाचा घातलेला घाट पार पाडून घेतला . त्याला विरोध म्हणून 27 मार्चला आमचा संप होता . पण करोनाचं वादळ पहाता तो झाला नाही . पण एकत्रीकरण झाले !  पुन्हा बडे भांडवलदार आधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत जाणार आहेत . खरं तर बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला मोठा इतिहास आहे . तसेच प्रत्येक बँकेला भूगोलही आहे . जसं की बँक अॉफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तसंच प्रत्येक बँकेला त्या त्या प्रादेशिक भागात महत्त्व आहे मुख्य म्हणजे त्यात्या ठिकाणच्या जनतेशी वेगळं नातं आहे . नाळ जोडली गेलेली आहे . पण या सगळ्याची पायमल्ली करत सरकारची ही कृती आहे  . सध्याच्या या परिस्थिती नंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करायचा असेल तर एकत्रीकरण व हळुहळु खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल ही धोकादायक आहे . मुख्य म्हणजे ही मागणी ना बँकांची आहे ना कर्मचाऱ्यांची आहे ना ही आम जनतेची आहे . फक्त बड्या भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. की जो धोकादायक आहे . सरकारच्या या कृतीची किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे . आणि पुन्हा चुकलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल तोवर होणाऱ्या हानीला कोण जबाबदार ?
आज बँकेच्या एकूण व्यवहारापैकी जवळजवळ दोन तृतीयांश व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकामार्फत होत आहेत . सर्वसामान्यांच्या पैपै जमा केलेल्या बचतीतील पैसा लोक बँकेत ठेवतात . यांची मालकी सरकारी आहे म्हणूनच झिरो बँलन्स खाती उघडली जातात . जनतेचा पैसा जनतेसाठी आहे . तो कोण्या भांडवलदारांच्या लूटीसाठी नाही . पण आजची बँकेची जी दुरावस्था आहे त्याला फक्त बडे भांडवलदार आणि त्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असो ! बँकांच शोषण होतंच आहे . या धनदांडग्या कर्जबुडव्यांच्या मुसक्या आवळल्या की आपोआपच बँकेची परिस्थिती सुधारेल . आणि त्यांच राष्ट्रीयीकरण अबाधीत राहिलं तर आणि तरच सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित राहू शकतो . अन्यथा त्याला सुरुंग लागायला वेळ नाही लागणार . त्यामुळे या लढाईत सर्वसामान्य जनतेने  या सर्व गोष्टींकडे डोळे उघडे ठेऊन पाहिलं पाहिजे . या लढाईत बँक कर्मचारी संघटनांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे . कारण संकट तुमच्या दाराशी येऊन ठेपलय !
       सध्याच्या करोनाच्या महामारीत आख्खा देश नव्हे तर जग लॉकडाऊन मध्ये आहे पण बँका तळागाळाच्या लोकांपर्यंत जनधन खात्याच्या माध्यमातून मदत पोहोचण्याचं काम करत आहेत . त्यांच्या सुरक्षीततेची आपेक्षा!!


क्रमशः   भाग 12


        साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त  म्हणजे "अक्षयतृतिया"  ! कीर्तीचा बार्शीला  पहिला पाडवा झाला , चैत्रागौर झाली आता दोन दिवसात बसेल ते कुलदैवत श्रीनृसिंहांच नवरात्र मग नृसिंह जयंती त्यादिवशी अभिषेक सायंकाळी जन्म मग वसंत पूजा आणि दुसरे दिवशी पौर्णिमेला  पारणं त्याला  "वैशाखी " म्हणतात . या सगळ्यासाठी दरवर्षी मुंजा, सवाष्ण-ब्राम्हण , गुरुजी असतात . पण यावर्षी कोरोनामुळे हे बहुदा घरापुरतेच मर्यादित ठेवावे लागणार असे दिसते . पण एक विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं कीर्तीला आनुभवायला मिळणार आहे . तसं बहुतेक वेळा आशिष आकांक्षा जयंतीला आलेलेच असतात पण तिघेपण नवरात्र बसण्यापासून घरी असणार आहेत , परमेश्वराची इच्छा ! पण जिल्हाबंदी असल्यामुळे काका-काकींना परांड्यातून आणण्यात अडचणी येताहेत  . आता पोलिस परवानगी घेतल्याशिवाय इलाज नाही तो प्रयत्न चालू आहे . पाहू काय होतं ते . सध्या सगळं घरातल्या घरात चालू आहे बाहेरचं चटक मटक खादगी नाही मुख्य म्हणजे पाणीपुरी आणि आईस्क्रीम नाही ! कीर्ती आणि आकांक्षा दोघींचीपण हे दोन पदार्थ मिळविण्यासाठी चाललेली धडपड आणि तगमग !  काहीतरी करतात पण सगळं साहित्य उपलब्ध नाही  म्हणून मग आकांक्षा आणि कीर्ती थोड्या अस्वस्थ असतात , त्यावर उपाय म्हणून सुरु असतं काहीबाही करणं . पण मनासारखा काही मेळ बसलेला दिसत नाही . मी आपली निवांत पहात बसते .  बघा म्हणलं थोडी कळ काढायला शिका . आसो . 
           यावर्षी पावसाळा अनियमीत झाला त्यामुळे इकडच्या भागात आंब्याला मोहोरच नाही आला तर आंबे कुठून येतील . दारात एवढं मोठ्ठ आंब्याच झाड पण आंबा नाही हे जरा  चुकल्यासारखं होतय . कारण या दिवसात कैरीच्या पदार्थाची रेलचेल आसते घरात आधी छोटीशी कैरी मग तिखटमीठ लावलेल्या फोडी,  नंतर लोणच , चटणी , कायरस , मेथांबा , छुंदा ,आंब्याचा शिरा , ओला नारळ घालून वड्या , गुळांबा , साखरांबा रोज रस आणि कधीमधी जोडीला भजी शेवटी आंबा पोळी ! कित्ती पदार्थ ते , प्रत्येकाची चव न्यारीच !  पण निसर्गच तो थोडाच आपल्या मनाप्रमाणे चालेल ?  यावर्षी इकडच्या भागात बाजारात पण कैरी नाही असो . पुढच्या वर्षीची वाट पहायची दुसरं काय .
      निसर्गाच दुसरं रुप मात्र सध्या न्याहाळता येतय . हल्ली हल्ली पक्षांचा वावर खूप कमी झाला होता . पुर्वी खूप  वावर असायचा . 12/15 वर्षापूर्वी एकदा दारातल्या झाडावर  चिऊताईनं घरटं बांधल होतं . त्यात 3 अंडी घातली होती छोटी छोटी पिल्ल पण पहायला मिळाली तेव्हा . मनु आकांक्षाचा तेव्हा रोज निरिक्षण करणं हा छंदच झाला होता आणि तो सगळा अनुभव घेतांना मला खूप आनंद व्हायचा . पण हल्ली हळुहळु  चिमण्यांची किलबीलच बंद झाली होती . पण करोनाच्या शांततेमुळे पुन्हा पक्षांचा वावर वाढला आहे . परवा तर वरच्या घरात रात्री चिमणी हॉलमध्ये येऊन बसली होती . आम्ही लहान असतांना हा अनुभव रोज घ्यायचो. घेरडीत धाब्याच घर होत . आणि दरवाज्याच्या वर हवा येण्यासाठी सळया लाऊन झरोका सोडलेला असायचा . त्यातून हक्काचं घर असल्याप्रमाणे मुक्कामाला 3/4 चिमण्या यायच्या . आढी खांब याच्या वळचणीला बासायचं व सकाळ झाली की निघून जायचं हा त्यांचा नियम होता . सोप्यात दरवाज्यावर काकांनी मोठ्ठा आरसा लावलेला होता. सकाळी आरशाच्या फ्रेमवर चिमणी बसायची आणि तिच्याच प्रतिबींबाशी टोच्या मारत बसायची . कधी कधी तर इतकी ओरडायची आणि जोरजोरात चिवचिव करत भांडण करायची मग आम्हांला तिला हुसकून लावायला भाग पडायच कधीकधी . पण त्यांच प्रतिबींबाशी चाललेलं द्वंद्व पहायला काही वेगळीच मजा वाटायची .   
        आता हे आनुभव लुप्त झालेत पण सध्याच्या लॉकडाऊनच्या शांततेमुळे पहाटे दार उघडलं की आल्हाददायक गारवा त्यातच चैत्र पालवी फुटलेला आंब्याच्या पोपटी पानांचा हिरवट  सुवास पारिजातकाच्या पालवीचा सुवास मन मोहून टाकतो . आणि त्याचवेळी आंगणात चिमण्यांची चिवचिव , कोकीळा कुजन,  मधुनच खूपदिवसांनी भारद्वाज पक्षाची फडफड निरनिराळे रंग वेगवेगळे आवाज आणि सुवास मन प्रफुल्लीत करतं . पाणी कमी असलं की उन्हाळ्यात झाडांना बादलीनं पाणी घातलं जातं . दारात सडा आणि झाडांना पाणी कामवाली नसल्यामुळे  कित्येक वर्षांनी हे काम माझ्याकडे आलय . पण तोही अनुभव खूप मस्त आहे . पाणी घालतांना झाड आपल्याशी बोलतात असं वाटतं . ती डोलायला लागली की नृत्य करतात असा भास होतो. दुपारी तप्त उन्हाच्या काहिलीवर सकाळच्या प्रसन्न , शितल गारवा मिळाला की येणारा दिवस सुसह्य होतो .



क्रमशः    भाग 13

    सध्या साधारणपणे रोजचं रुटीन सारखच होऊन बसलयं . महत्प्रयासाने परवा छोटे छोटे 4 आईस्क्रीम मिळाले तर ते पाहून  या पोरांना परमानंद झाला . सहज मिळतं तेव्हा इतकं आप्रुप कधीच वाटत नाही . मनात येईल तेव्हा व हवं तितकं खायचं हे सगळ्यांचच आहे पण सध्या परिस्थिती वेगळी आहे . तिघजण ते आणि आईस्क्रीम चार झाले . एक एक्स्ट्रॉ कोण खाणार आशा नजरा भिरभिरायला लागल्या . प्रत्येकजण एकमेकांना आग्रह करतोय पण स्वतःला मिळालं तर बरं आसं प्रत्येकाला वाटतय . सगळेच लहान झालेत आसं वाटलं मला ! तसंच खाण्याचं पण झालंय सगळं घरी बनवलेलं पारंपारिक खाणं सुरु आहे . काहीतरी वेगळं करायचं आसेल तर एखादं काही मिळत तर काही मिळत नाही . तसं मॕफको मटार ,  पनीर , क्रीम , बटर , फ्लॉवर , ढोबळी , दुधी किंवा बाहेरुन येणाऱ्या काही  भाज्या  जरा मिळतच नाही . परवा किराणा आणतांना पाणी पुरीचे दोन पॕकेट मिळाले या दोघींना काय आनंद झाला .पण रगडा करायला मटार नाही . कांदे , बटाटे , टोमॅटो , वांगी , शेवगा आणि पालेभाजी एवढं रोज मिळते . तेच आलटून पालटून करायचं . कडाधान्यं करायची . तसच कामं पण स्वतःच करत असल्याने काही कामं लक्षातपण नाही येत. सध्या भाज्यापण फारशा  नसल्यामुळे फ्रीजकडेपण फारसं नाही पाहिलं जात त्यामुळे तो डिफ्रॉस करायचा राहून गेला . आईस्क्रीमचा गोंधळ पाहून परत दुसरे दिवशी मिळु शकेल  म्हणाल्यामुळे आज यांनी पुन्हा जाऊन 4 आईस्क्रीम आणले जास्त मिळेना . आणुन ठेवलेले आईस्क्रीम खायला  काढण्यासाठी मनिषने फ्रीजर उघडला तर त्याला बर्फाचा हिमालय झालेला दिसला . त्यांन कुलरला वापरु म्हणून स्क्रु ड्रायव्हरने तो बर्फ उचकला हे पण होते त्याच्याबरोबर आणि तो जोरात ओरडाला आई तुला भाजीला मटार सापडले .आम्ही तिघीजणी  
" आणि काय हवं " मधला "पुरणपोळी " 
हा भाग पहात बसलो होतो . हे बाहेर आले आणि म्हणाले आता मटारची उसळ वगैरे होईल 1/2 वेळा पुरतील एवढे मटार सापडलेत बघ फ्रीजमध्ये . खजाना हाती लागला की काय असं आकांक्षा-कीर्ती पळत फ्रीजकडे आल्या . पाठोपाठ मी पण आले पाहिलं तर चांगले एकदीड किलो मटार असतील ते . दोघीजणी खूष ! चला आता पाणीपुरीचा मस्त रगडा होतोय तर ! मनिष म्हणतोय बरं झालं ना आता भाजीला ? मी म्हणलं वेड्या भाजी कसली म्हणतोयस आता याचा 4/5 वेळेस तरी नक्की उपयोग होणार 2/3 वेळा रगडा एकदा पावभाजी . तर हळुच म्हणतोय मटारच्या करंज्या होतील काय ? बघा मग कसं वाढत चाललं सगळं .
      मला पुर्वी एक "SSY" म्हणजे सर्व सिद्धी समाधी योग असा क्लास होता त्याची  आठवण झाली 21 दिवसांचा कोर्स असायचा शेवटचे 3 दिवस ते ठिकाण न सांगता मुक्कामी न्यायचे सगळं त्यांचच असायचं . खायला अगदी मोजून दिलं जायचं . सगळेजण ताट स्वच्छ करायचे कारण काय तर अन्न कमी दिलं जायचं . भरपूर फी भरुन आरोग्यासाठी लोक करायचे हा कोर्स ! परत आल्यावर मात्र प्रत्येकजणाला अन्नाची किंमत कळायची . तसं काहीसे झालेय या कोरोनामुळे . सगळी मुल्यं समजु लागली आहेत . सर्व काही पैशाने होत नाही जनजिवन सुरळीत असलं पाहिजे निसर्गचक्र व्यवस्थित चाललं पाहिजे . कशाचाच अतिरेक नसला पाहिजे . तसच
 मनावर पण ताबा ठेवता आला पाहिजे .


क्रमशः भाग 14


        या लॉकडाऊनमुळे काय  अनुभव यायला लागलेत खरं पण मजा आहे ! 30 एप्रिल हा माझा जन्मदिवस ! तसं लहानपणापासून वाढदिवस साजरा करणे असं काही फारसं माहेरी नव्हतं आणि लग्नानंतर पण इकडे सासरी तसंच . त्यामुळे सेलिब्रेशन किंवा केक करणे या भानगडीत मी कधी पडले नाही . मनिषचा जन्म श्रावणी पोळ्यादिवशीचा, पिठोरीचं वाण असतं त्यादिवशी आमच्याकडे त्यामुळे दरवर्षी पुरण आणि वाण ठरलेलं आसतं . तोच वाढदिवस म्हणतो आम्ही तर आकांक्षा दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेची ! वाढदिवसाचा म्हणून एखादा जास्तीचा ड्रेस दिवाळीतच घेऊन ठेवायचा आणि रविवारी पाणीपुरी करायची . ती फार भुणभुण करायची आपण का नाही करत वाढदिवस म्हणून. पण आजकाल पुण्यात गेल्यामुळे  होस्टेलवर मैत्रिणी करतात त्यामुळे बरं आहे .
     आता लॉकडाऊनमुळे सगळे बार्शीला आहेत, तर करु काहीतरी खायला असा मी विचार केलेला. सध्या बँकेत काम कमी म्हणून पुन्हा रोटेशननी काम करुयात तर हो-नाही चाललेलं . काय ठरते ते मला कळवा आसं सांगून मी 29 ला बँकेतून घरी आलेले सुट्टीचं नक्की नाही म्हणून कोणालाच बोलले नाही. 
     सकाळी उठले तर मँनेजरचा msg होता आज तुम्ही  येऊ नका म्हणून, बरं झालं म्हणलं . तोवर कीर्ती आली मला शुभेच्छा दिल्या . मी तिला सांगितले मला सुट्टी आहे तर होका एवढच म्हणाली . मी लवकर जाते बँकेत ,तोवर मनु आकांक्षा उठत नाहीत  , तर आज  7.30 लाच मनिष खाली आला तु बँकेत जाशील म्हणून तुला शुभेच्छा द्यायाला उठलो म्हणाला , मी सुट्टी घेतली म्हणलं तर होका म्हणाला . 10 मिनिटांत आकांक्षाच पण तसंच झालं . मी सुट्टी सांगतेय आणि,हे तिघे एकमेकांकडे बघतात मला कळेना . पुन्हा स्वयंपाक घरात माझं काम सुरू झालं कीर्ती म्हणाली आज मी सँडवीच करणार तुम्ही खावा मीच करणार सगळं,  बरं म्हणलं . मग स्वयंपाक पण झाला . मी आतच होते मग आकांक्षा म्हणाली " तू अचानक सुट्टी घेऊन आमचा पोपट केलास आता तिकडे जाऊन बस आम्हांला काहीतरी करायचय तु बघायचं नाहीस " मग लक्षात आलं  मी 2 वाजता परत येईपर्यंत काहीतरी करायचा यांचा प्लँन होता . यांना माझी अडचण झाली दिसतय  . असो म्हणून मी हॉलमध्ये बसले 2/3 तास त्यांचे अथक परिश्रम चालू होते. मनिषची पण लुडबुड सुरु होती . पुन्हा जेवायची वेळ झाली सगळे बसलो जेवायला . तर सकाळी केलेलं सगळं तेच होतं . आरे काय केलय दाखवा तरी म्हणलं तर 4 वाजता बघ आता तु आराम कर म्हणाले .बरं , आसुदे म्हणलं परत झोपले . मग मला whatsapp  करतात या दोघी आपली गरज आहे या इकडे. मी गेले तर दोघीपण छोटासा चेहरा करुन बसलेल्या . ओमफस्स झालंय काहीतरी हे लक्षात आलं माझ्या .
       पाहिलं तर मनिष फींगर चीप्स आणि या दोघी केक करणार होत्या . एक केक बिघडला म्हणून जेवणानंतर त्यांनी दुसरा केलेला तर दोन्ही केक दगड होऊन बसलेले ! आता काय करावं ?   दोघी रडकुंडीला आल्या .  मी तर कध्धीच केक केलेला नाही आकांक्षाला पण येत नाही कीर्तीला पण नाही पण ज्योती आणि युट्युब follow करुन केलेला केक पुर्ण बिघडला होता .केक, ढोकळा ,सुरळीच्या वड्या आणि चायनीज याच्या मी नादी लागत नाही . 1/2 वेळि केलेला प्रयत्न फसल्यामुळे पुर्वीच नाद सोडला मी . याचं आकांक्षाला फार वाईट वाटतं ती सारखी माझ्या मागे असते . सगळे करताता आई आपण पण करु . बरोबर दोन वर्षापुर्वी तिने याकारणास्तव ओव्हन घ्यायला लावला . पण तो सध्या cover घालून वरच्या घरात असतो . आकांक्षाला आता कीर्तीची जोड मिळाली आणि ठरवला त्यांनी बेत . 4 वाजता सुंदर केक कापतांना फोटो काढून ग्रुपवर , स्टेटसला टाकायचं असं  त्यांच ठरालेलं . रोज सगळ्यांचे फोटो स्टेटस बघुन चर्चा त्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं .म्हणून आगदी हिरिरीने दोघींनी युद्धाच्या तयारीसारखी तयारी केलेली पण स्वप्न भंग पावलं त्यांचे 
सगळी मेहनत पाण्यात !  मुख्य  म्हणजे सगळे फँमिली ग्रुप काहीतरी सरप्राईजची वाट पहात आसणार सगळा पचका झाला आसं त्या तिघांना वाटू लागलं . मला एकदम मी आणि मायडीनं बदलापूरला केलेल्या तिळगुळाच्या वड्यांची आठवण झाली . संक्रांतीच्या हळदीकुंकासाठी  आम्ही पण महत्प्रयासाने दुपारभर राबराबून वड्या केल्या कशातरी त्या झाल्या . भाऊजींच्या येरझा-या सुरु होत्या . काहीतरी बेत फसलाय हे लक्षात आलेलं त्यांच्या  . आम्ही त्या वड्या  स्टीलच्या कुंड्यात भरुन ठेवल्या थोड्या वेळांनी भाऊजींनी वरची वडी घेण्याचा प्रयत्न केला तर आख्खा कुंडा उचलला गेला . भाऊजी आम्हांला चिडवू लागले काय घातलाय बहिणी बहिणींनी गोंधळ
 " बजरंग बली की जय "
  म्हणून उचलावी लागतेय वडी !  असंच काहीसं आजच्या केकचं झालंय. हासून हासून पुरेवाट झाली तेव्हाही आणि आजही ! परवा मागच्या आठवड्यात ढोकळा पण साधला नव्हता . यावेळी मग ठरवलंय केक आणि ढोकळा जमलाच पाहिजे आपल्याला काय चुकतं ते आपण पाहू . 
       मग फक्त फिंगर चिप्स खात फोटो काढायचं ठरलं . मग पुन्हा छान आवरुन बसायचा आग्रह . आम्ही खात असतांना आकांक्षा व कीर्ती उठुन आत गेल्या . दीड महिन्यापासून सगळे घरातच असल्यांने गीफ्टची शक्यता नव्हती . तरी उत्सुकता ताणली गेली. हात मागे बांधुन दोघी बाहेर आल्या . मग एक सुदंर पाकिट दोघींनी माझ्या हातात दिलं आणि सांगितले हे पाकिट घरातल्या कागदापासून अतिशय कल्पकतेने आकांक्षाने बनवलय आणिआतलं आहे ती कीर्तीने ! काय आहे बघ आमची उत्सुकता ताणली गेली . मग पाकिट उघडलं तर आतमध्ये चार पानी पत्र "सौ. कीर्तीकडून सौ .आईनां! "
मग ते उघडून मी वाचलं आमच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रवास आणि त्यात्या वेळच्या तिच्या भावना खूप सुंदर लिहिल्या आहेत तिने त्या . सुंदरशा पत्राची भेट ! कल्पनाच इतकी भन्नाट वाटली न मला. यापेक्षा सुंदर गीफ्ट काय आसू शकतं माझ्यासाठी  ?
मग त्याच वाचन केलं मी थोडा वेळ भारावल्यासारखं झालं वातावरण . कीर्तीला लिहायची सवय आहे . वाचनही भरपूर आहे . त्याची झलक दिसली . मी पण परमेश्वराकडे हे एकच मागणं केलं देवा सर्वांना चांगली बुद्धी दे नात्यातला गोडवा समृद्ध होऊ दे . सर्वांना सुखी ठेव !
      मग आमच्या कुटुंबाला प्रीय असलेला फक्कड चहा झाला . आज ज्योतीला फोन करुयात ढोकळा आणि केक उद्या जमलाच पाहिजे हा निश्चय केला .पुन्हा हास्स्याचा कल्लोळ सुरु झाला . कँरम निघाला आणि उद्याचा केकचं नियोजन करत  खेळ सुरु झाला.



कीर्तीकडून मिळालेलं पत्र


30/04/2020



Dear mom-in-law 

( आहो आई )



आशिषची आई , माझ्या होणाऱ्या सासुबाई , mom-in-law , अग्गबाई सासुबाई आणि आता आहो आई असा आपला प्रवास!
       एप्रिल महिन्यात तुमचा वाढदिवस आणि आपल्या भेटीचासुद्धा !  सासुबाई ह्या व्यक्तीमत्वाचा खरं तर बागुलबुवा होता माझ्या मनात . मैत्रीणी , बहिणी ह्यांच्याकडून ऐकून एक व्यक्तीरेखा तयार होत गेली होती . त्या प्रतिमेला तडा देत मला भेटलात तुम्ही ! Cool सासुबाई !
       पहिल्या भेटीतच 
" शगुन के कंगन " 
म्हणत हातात बांगड्या घालून मिठी मारली ना तेव्हाच समजलं मला की मज्जा येणार आहे खुपच ! हे रसायन काही वेगळंच आहे :-)
           पहिल्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत दडपण कधी येऊनच नाही दिलं मला कोणताही event असो , तुमचा उत्साह आम्हां तरुणांना लाजवेल असा असतो . सुनेच्या 25 व्या वाढदिवसाला 25 गिफ्ट्स करुन सरप्राईज देणाऱ्या सासु आणि नणंद असतात का कुठे ? मैत्रीणीच आहात तुम्ही माझ्या !
मग आला साखारपुडा .
" केले की जमतेच " 
हे तुमचे ब्रीदवाक्य : आमची केतकी नाचु शकते ? ते ही इतके छान ? मानलं राव तुम्हाला ! कार्यक्रमाला रंगत आणाली ती तुमच्या कवितेने . सर्वांनाच डोळ्यासमोर आमची Arranged Love story  अगदी Film सारखी दिसली .
       एकच वर्ष झालंय तसे . पण आठवणी उफाळून येत आहेत . ब्लाऊजवरुन झालेला राडा तर आठवायलाच नको ! बाळासारखी समजूत घातलीत तुम्ही माझी  . माझी आई असती तर रागावली असती शिस्तीत . आणि खरंच तुम्ही म्हणालात  तसं आता एक नंबरचं ब्लाऊज वाटतेय ते मला .
         लग्नाची धामधूम सुरु करायच्या तयारीत असतांना एकदम मी अजारी पडले . ह्यापुर्वी कधी ताप न आल्यांने जरा घाबरलेलेच होते मी . आई-बाबा सुद्धा टेन्शनमध्येच होते . तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलेले . आज ही मी अधूनमधून वाचते. धीर येतो वाचतांना खरच . घाबरायचं नाही आजिबात हे शिकते आहे मी तुमच्याकडून . जशी एक आकांक्षा तशीच दुसरी कीर्ती हे नुसते लिहीण्यापुरतं वाक्य 
नाहीच . ते प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतसुद्धा होतं मला . 
           आई-बाबा पण नेहमी उल्लेख करतात की काळजींच नाही इतकं छान सासर मिळाले आहे तुला असंच म्हणतात नेहमी . शंभर टक्के सत्य !
    कुठल्याशा serial मधल्या त्या शुभ्रावरुन आपलं सुरु झालं अग्गबाई सासुबाई पर्व ! रोजचे GM चे मेसेज चुकत नाहीत आणि दिवसभर गप्पाटप्पा नाही झाल्या तर चुकल्यागत वाटते . असे करत लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पळत होते . लग्न महिन्यावर  आले आणि चक्क तुम्ही आशिषला pre-wedding shooting साठी आग्रह केलात . खरंच परत कधीच झालं  नसतं की ! मज्जा आली हो खूप.
     हा हा म्हणता लग्न झालं की .... चि.सौ.कां.ची  झाले मी सौ.कुलकर्णी ! तसा बार्शीमधला मुक्काम धावपळीतच गेला . एकटं awkward किंवा नविन अशा भावनांचा लवलेशच नाही कुठे. 
         न्युझीलंड ट्रीप पुर्ण करुन घरी परत येणे जीवावर आलेलं. आरे संसार संसार सुरु करणे सोप्प आहे का ?  तरी तुम्ही येते म्हणालेलात त्यामुळे काळजी नव्हतीच . प्रदीर्घ प्रवास करुन एकदा घर आलेलं तेव्हा इतकं बरं वाटलं . पहाटे 6 ची वेळ पण उत्साहाला वेळकाळ असते का ? चक्क डोळे चोळत फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही , पप्पा आणि आकांक्षा तयार होते स्वागताला .......मस्त वाटलं ओ ! शीणच ओसरला प्रवासाचा . 
         पुढचे दिवस मस्त घरात सामान लावणे , स्वयंपाकाच्या काकू ठरवुन देणे अशी मस्त घडी बसवून दिलीत. सर्व डाळींपासून ते किसलेल्या गुळापर्यंत सगळं आणलेलं . प्लँनिंग किती perfect करायचं असतं हे पण शिकते आहे मी तुमच्याकडून !
         संध्याकाळी आल्यावर कुलुप बघायची सवय लगेच 5/6 दिवसात मोडलीच की . व्यायाम करायचा , चहा प्यायचा , गप्पा मारायच्या बार्शीला गेलात ना तेव्हा घर खायला उठलेलं मला आणि आशिषला.
पाकशास्त्रामध्ये माझे प्रयोगातून विज्ञान सुरू होतेच. कोरोना मुळे इकडे बार्शीला आले तसे सुरू झाले अहो आईं चे पर्व.
बाकी जग ठप्प झाले असले. तरी ह्या कोरोना मुळे मिळालेला वेळ आपल्या दोघींसाठी सुवर्णसंधी ठरली.
मला जमेल की नाही किंवा मला जमतच नाही... अशी माझी सुरुवात असते नेहमीच. तुम्ही मला इतकं मस्त motivate केलत ना..
पाककला सोप्पी मुळीच नाही पण अवघड मात्र नक्कीच नाही.. हे वाक्य बिंबवले माझ्या मनात.

पापडासारख्या पोळ्या बनवणारी मी हा हा म्हणता पदार्थ बनवायला शिकले की ओ! उडीद वडे, साधी पोळी, वरण फळे, थालीपीठ, भाकरी आणि साग्रसंगीत पुरणपोळी सुद्धा!! अबब..! माझी आई, आजी, मावश्या विस्फारून माझे पदार्थांचे फोटो बघत असतात. अनिरुद्ध ने तर पुण्यात आमच्याकडे राहायला येणार असेच सांगितले. पाककलेच माहीत नाही पण confidence नक्कीच वाढलाय माझा
All credit to अर्थातच: अग्गबाई सासूबाई!
आणि तुम्ही मला इतकं लाडावून ठेवलंय ना.. ऑफिसच ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ice cream देणार म्हणून promise केलं आणि लाॕकडाऊनच्या काळात काहीच मिळत नसतांना खरंच एकदम ice cream आणलं सुद्धा. त्या ice cream ची मज्जा काही औरच! Ice cream मधे लाड आणि प्रेम उतरलं होते भरभरून!
सौ बातो की एक बात: लाडकी लेक, लाडकी बहिण सगळ्याच असतात. लाडकी सून बनायला भाग्य लागते. अशा भाग्यवान सूनेकडून सुपर डुपर मस्त सासूबाईंना पहिल्यावहिल्या पत्रातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
तुमचीच,


लाडकी सूनबाई!!




क्रमशः   भाग 15


        एकूणच माझा वाढदिवस स्मरणात राहिल असा साजरा झाला . दिवसभर फोन चालूच होते. संध्याकाळी  ज्योतीचा फोन आलाच . केक , ढोकळा , सुरळीच्या वड्या व चायानीजसाठी तिच्याकडे ट्रेनिंग घेणार हे ठरवून झालं. आदलेदिवशी या दोघींचा फोन झालेला होता मग काय झालं विचारणा सुरु होती. आम्ही दोघी बोलल्यावर हे लक्षात आलं की प्रत्येक वेळी बेकींग पावडर ही फ्रीजमध्ये ठेवलेली बरीच जुनी वापरण्यात येत होती . पुन्हा रात्रीच मी जाहिर करुन टाकलं उद्या सकाळी मनिष बेकिंग पावडर व सोडा आणेल व आम्ही रव्याचा केक करणार . 1 मे कामगार दिनाची सगळ्यांना सुट्टी होती . आज पहिल्यांदा हापूस आंबा मिळाला होता . आणि कै-या पण .सोडा व बेकिंग पावडर या  छोट्या दोन वस्तूंसाठी  सकाळी दुकानासमोरच्या मोठ्या रांगेत मनिषला उभं रहावं लागलं . म्हणलं बरोबर आहे केक तर आठवणीत राहिलाच पाहिजे .रसाचा बेत केला . आणि आम्ही केक करायला 4.30 वाजता सुरुवात केली . उगाचच सगळ्यांची उत्सुकता वाढली होती .सुट्टी होती त्यामुळे कैरीची चटणी, पन्हं मेथांबा आणि उपासासाठी शेंगदाण्याचे लाडू इतक्या कामाचं नियोजन होतं.  मनिष आणि हे इतक्या उकाड्यात उगाचच केक बघायला स्वयंपाकघरात येऊन बसले . केकचा कुकर व्हायला वेळ लागत होता.उगाचच  मनिषला चैन नव्हती  एवढावेळ बसण्यापेक्षा सगळ्यांसाठी उखळात कुटुन  लाडू करण्याची जबाबदारी त्यांने स्वतःहून घेतली .आणि तेल सुटेपर्यंत शेंगदाणे कुटून मस्त लाडू केले . तोवर केक काढायची वेळ झाली . परवा महाभारतात वस्त्रहरणाच्या सीनमध्ये लज्जारक्षणासाठी  द्रौपदी जसं डोळे झाकून  "हे श्रीकृष्ण " म्हणत होती तशी प्रार्थना  आकांक्षाने कुकरभोवती प्रदक्षिणा घालून केली .
 "आमच्या केकची ख्याती खूप गाजलेली आहे आमच्या आईने सर्वदुर आजच्या केकचा डंका पिटला आहे हे श्रीकृष्णा वाचव केक चांगला  फुगू दे " 
आणि कुकरच टोपण उघडले असता लुसलुशीत टम्म फुगलेला केक पहायला मिळाला आणि आनंदाने दोघी उड्या मारु लागल्या . 
त्यानंतर आता विविध प्रकारच्या केकची आणि ढोकळ्याची घोषणा झालेली आहे . यथावकाश तेही पदार्थ घरी तयार होतीलच . कारण 3 मे ला लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी तिसरा लॉकडाऊन जाहिर होणार आहे त्यामुळे पुढच्या 15 दिवसांसाठी नविन खादगी शिकायला आणि खायला मिळणार . या आठवड्यात आता पहिला आठवडा म्हणून मला भरपूर काम आहे . पेन्शन , पगार , जनधन मदत तसेच नृसिंह-जयंती पण आहे . सोलापूरला करोनाची संख्या रोज वाढतेय त्यामुळे बार्शी बरेच कडक केलंय त्यामुळे ह्यांना परांड्याला जाता येत नाही . त्यामुळे जयंतीला काका-काकी येणं कठीण वाटु लागलय .दोन्ही जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागते .विविध प्रमाणपत्र लागत आहेत शिवाय  प्रवासासाठी वयाचीपण अट  आहे  65 पेक्षा जास्त वयाला प्रवास नाही करता येत .पाहू कसं मँनेज करता येतंय ते . नाहीतर 18 मे पर्यंत शांत बसणे . इलाज नाही 
         केक चवीला पण छान लागला दिसायला पण छान दिसला . चला तर मग अजुन एका पदार्थात वाढ !

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 2

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 2


भाग 6 ते 10


क्रमशः   भाग 6



आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन  !!  आज पुन्हा मनिष म्हणतोय आई काहीही असो तेव्हा जरा झाली चिडचीड पण बार्शीला आलो ते फार बरं झालं बाबा ! आकांक्षा व  कीर्तीला पण असच वाटतय . इकडे आल्यामुळे खुप काही साध्य झालं असे वाटतेय सगळ्यांना . थोडासा इकडचा उन्हाळा त्रासदायक आहे .विशेषतः कीर्तीला हे नविन आहे. पाणीप्रश्न आणि उन्हाळा ! सरबत ,थंड कलिंगडं , द्राक्ष याचा मारा व कुलर एवढाच एक उपाय करु शकतो .यांचे बार्शीला इतके रहाणे पडेल असे कधी वाटलेच नाही. नाहीतर एसी बसवून घेतला असता.  खरा उपयोग पुण्यात होणार आसे वाटले होते . आता सध्यातरी दुकाने बंदच त्यामुळे काहीच करता येत नाही आसो.सध्या परिस्थितीत जे आहे ते खुप चांगले आहे आसुदेत असे म्हणतात मुले. आता माझी रोज सकाळी 8 ची बँक ! आता पुन्हा रुटीन चेंज केलं . रात्रीच कट्टा पुसून सगळी सकाळची जय्यत तयारी कट्ट्यावर व फ्रीजमध्ये करुन ठेवायची  . हे पण आशिष-कीर्तीला आतिशय उपयोगी पडणारे प्रात्यक्षिकच होतं . कारण काकू नसतील तर त्यांना  हेच करावे लागणार . त्यामुळे अच्छा असं केल तर होतय की असा त्यांचा संवाद होतोय . सकाळचा चहा  5 जणांचा नाष्टा , भात-आमटी , भाजी व 2 पोळ्या एवढं सगळं 7.30 ला तयार असावं लागतेय . मग राहिलेल्या पोळ्यात आकांक्षाची मदत आसं काहीसे होतेय .तेही 1/2 दिवसात छान बसले रुटीन . मी बँकेत जायला निघते तर लोक दारात ब्रश करायला उभे राहिलेले दिसतात. असो. मला घरी जायला दुपारचे  2.30 वाजतात. त्यानिमीत्ताने रोज एक वेगळी जबाबदारी तिच्यावर सोपवायचं काम चालू आहे. पालेभाजी तिला आवडत,  नाही पण करेल तेव्हा मी खाणार आसं तिने सांगून ठेवलय त्यामुळे कोणालाही काहीच न विचारता शक्य असेल ते करणे चालू आहे त्यामुळे कोणालातरी नआवडणारा तोच दुस-याला खूप आवडणारा पदार्थ होतो . चला त्यातही मजा आहे . मनाला मुरड घालणे हे फक्त सगळे एकत्र असतील तरच शक्य होतं .एरव्ही आपण स्वतःच्या आवडीचच करतोच की ! मला पुर्वीचा जमाना आठवायला लागला . मी आत्त्याकडे शिकायला होते त्या सांगायच्या आम्ही सात जावा होतो.अबब!! खुप काही सांगायच्या त्या . लहानपणी सुद्धा घेरडीत सुट्टीत आतेमामे भावंड येणं आम्ही मामाकडे सुट्टीला जाणं असायचं.मामा पण यायचा आक्की , तायडी सहकुटुंब यायच्या आंब्याचा रस पोळ्या , भजी, हुरड्याच्या घुग-या , पापड कुरडया . आईच्या हातचं रोज काहीतरी नविन चटकदार जेवण. काका , फक्कड काका, मोहन आण्णा , पंत काका सगळ्यांनी आंबे डालींनी घेणं आणि त्याची आढी घालणं . सगळ्यांना एकत्र जमा करायचा आट्टाहास काकांचा असायचा आई पण खुश असायची पण कष्ट खूप पडायचे तिला . सगळे आले न रस भजी असली की मोठी पोळ्यांची चवड लागायची. दमायला व्हायचं तिला . सगळ्या मुलींनी करायचं असा काकांचा शिरस्ता असायचा पण कमीजास्त आहे नाही पहाणं जबाबदारी तिच्यावर असायची. पुन्हा आक्की वारली . मग मायडीचं लग्न झालं ती पण सहकुटुंब आंब्याच्या दिवसात असायची स्वतःच्या 5  मुली 6 नाती 1 नातू आणि इतर पाहुणे वेगळेच 5 खणी स्वयंपाक घर 4 खणी सोपा आंगण समोर एकावर एक दोन खोल्या एवढं घर आणि खुप सारी माणसं असायची . रात्री लाईट नसणं वाड्यातल्या सगळ्यांनी महादेवाला जाऊन आलं की  आंगणात संध्याकाळी 7 वाजताच आपाआपली जागा पकडून ठेवणं. आम्ही लहान होतो तेव्हातर  गुलाब आण्णा किंवा मावशींनी गोष्टी सांगायच्या . आम्ही सगळ्यांनी त्यांच्याभोवती घोळका करुन बसयचं हा नित्यनेम होता . आजकालच्या मुलांना वाडासांस्कृती अनुभवायला नाही मिळत पण या करोनामुळे कुटुंबाला तरी एकत्र रहायला आलं. या बंदमुळे खुप नुकसान होणार असं म्हणतात पण विचार केला तर हेही नक्की आहे की आपण ठरवुनसुद्धा आशा प्रकारे जिवन जगणे केवळ कल्पनातीत राहिलं असतं . पैसा मिळवायला उभ आयुष्य आहे . सध्या जे अमुल्य क्षण उपभोगता येतात ते का घालवावे . मनमुराद आनंद लुटावा त्याचा !!


क्रमशः  भाग 7


   आज बँकेतुन दुपारी घरी गेले. आंघोळ झाली . मला कीर्ती समोर दिसली नाही म्हणून मी रुममध्ये डोकावलं . तर ती काम करत होती म्हणलं असेल थोडफार जास्तीच काम . पण चेहरा पण छोटासा वाटला तिचा. तब्बेत बरी नसावी असं वाटलं . मी तिथेच थांबले तर मनिषने सांगितले तिच्या मानलेल्या आजोबांचे म्हणजे भाऊकाकांच आज दुपारी पुण्यात निधन झाले आहे . आणि लॉकडाऊनमुळे कोणालाच जाता येणार नव्हते . थोडफार तिच्याशी बोलले . मग मीपण आराम करायला गेले. 
    हल्ली आम्ही ब-याचदा कामं करतकरत मिरज घेरडी परांडा अशा खूप गप्पा मारल्यात. ह्याच आजोबांविषयी ती भरपूर सांगत होती मला
भाऊकाका आसं त्यांना म्हणायचे. ते तिच्या आजोबांचे मित्र ! कीर्तीची आजी लवकरच गेल्यामुळे घरात तिचे आजोबा काका आत्या आणि बाबा होते. भाऊकाकांनी लग्न केलेलं नव्हते. ब्रम्हचारी होते ते मग मित्राला मदत करण्यासाठी ते यांच्याकडे रहायला आले. सर्वांत लहान कीर्तीचे बाबा होते आई नसल्यामुळे त्यांना भाऊकाकांचा खुप लळा लागला . आत्या व काकांचे लग्न झाले . दोघे मित्र सगळं करायचे पुढे बाबांच लग्न झाल्यावर आजोबा, भाऊकाका वआईबाबा एकत्र रहायचे . कीर्तीने जन्मापासूनच घरात दोन आजोबांना पाहिलय अनुभवलय . तिचे आजोबा गेले तरी यांनी भाऊकाकांना जाऊ दिलं नाही. केतकीला तर फक्त भाऊकाका हे एकच आजोबा म्हणून आठवतात. त्यांची शिस्त खूप होती . माया प्रेम पण तितकच दिलं . एवढेच नाही तर भांडणं ,  रुसणं पण व्हायचं घरात इतके ते घरचे सदस्य झाले होते. आलीकडे मुली मोठया झाल्यावर जवळच ते स्वतंत्र राहू लागले . पण रोजचं जाणयेण असायचं . लहानपणी आईची सकाळची कामं होईपर्यत या दोन्ही मुलींना घेऊन  देवळं फिरुन व्हायची त्यांची . रात्री 8 वाजले की शिस्तबद्ध गादी, मच्छरदाणी लावुन द्यायची मग हीने झोपायचे. त्यामुळे मला लवकर झोपायची सवय आहे आसे कीर्ती म्हणते. असे अनेक लाड त्यांच्याकडून  करुन घेतलेल्या आठवणी तिने परवाच सांगितल्या . यांच्या एका कुटुंबालाच नव्हे तर  आत्या , काका आणि बाबांच्या  पुर्ण मित्रपरिवारात ते सर्वांना आपलेसे वाटायचे. सर्वसमावेशक आसा त्यांचा स्वभाव होता.   संपुर्ण आयुष्य त्यांचे मिरज सांगलीत गेल. आता 90 च्या पुढे वय गेलय, लकवा झाला. त्यांना एकटे ठेवायला नको म्हणून परवाच दीड महिन्यापुर्वी त्यांच्या भावाने त्यांना पुण्यात हलवलं . त्यांना अजिबात पुणे नकोस वाटतं असं ते सांगू लागले आणि लगेचच करोनाचं संकट आलं होतं . त्यामुळे कोणालाही काहीच करता येईना. हे सगळं ऐकून मला पण खूप कुतुहल वाटलं. अशाप्रकारे नात्यांची जपणूक विरळच ! क्वचितच असं पहायला मिळत . आणि तेच आजोबा गेल्याचं दुपारी समजलं होतं  .  झालं ते त्यांच्या दृष्टीने चांगले झालेय शरीर यातना नाही झाल्या त्यामुळे त्यांच सोनं झालं पण उगाचच 1/2 महिन्यासाठी ते पुण्यात गेले असं वाटतय सगळ्यांना . विशेष म्हणजे लग्नानंतर आशिष-किर्ती त्यांना भेटून पण आले. आशिषला ते बोलले सुद्धा होते !
   आशिष हळुच सांगून गेला आई ती खूप रडली . हे पण म्हणाले ती अस्वस्थ आहे बोललीस का तू ? अजून नाही पण बोलते म्हणलं .मी उठून 4 वाजता सरबत प्यायला कीर्तीला बोलावले . तशी जरा गप्पच होती ती मग मीच तिला थोडेसे बोलत केलं .झालं हे ठीक आहे त्यांना क्लेश झाल्यापेक्षा ठीक आहे. वय पण खूप झालेय पण या परिस्थितीत असं व्हायला नको होतं. कोणीच जाऊ शकत नाही याची रुखरुख लागलीय तिला.हेच बाबांनी खूप मनाला लावून घेतलं असणार म्हणून  तिला बाबांची काळजी वाटत होती . बाबा घडघड बोलत पण नाहीत पण खूप हळवे आहेत म्हणाली. थोड्या वेळाने फोन कर आईबाबांना मग तुला पण बरं वाटेल म्हणलं . तिचा फोन झाला आईंशी मी पण बोलले आमचं पण चहापाणी झालं . मग थोडी नॉर्मल वाटली ती . अशा घटनांचा विसर पडायला , पचनी पडायला काळ हेच औषध असते!
    रात्री मग रोजच्याप्रमाणे झालं वातावरण . आज आकांक्षाने मी भाकरी करणार हे जाहिर केलं . ती पण भाकरी पहिल्यांदा करणार होती. झालं मग प्रयोग सुरु झाले आणि वातावरण निवळलं . हशा पिकला . बरं झालं आसं मला वाटलं .


क्रमशः  भाग 8


आज तिसरा शनिवार त्यामुळे मला  बँक तर  आकांक्षाला क्लास होता. 2 दिवस सुट्टी देऊन पुन्हा क्लास सुरु झाल्यामुळे तीला थोडा लोड होता .
आशिष-किर्तीला सुट्टी . त्यामुळे माझ्या एकटीपुरतं नाष्ट्याला थालीपीठ करुन घेतलं  बाकी काय करायचं ते कट्ट्यावर ठेवलं . कसं करायचं याच्या टीप्स दिल्या आहेत. सगळेजण मिळून करणार पण चार्ज कीर्तीकडे असणार .ह्यांचा शनिवार आहे त्यामुळे ह्यांना वेफर्स व तिघांचा नाष्टा आणि  5 जणांचा स्वयंपाक आकांक्षा व कीर्ती दोघी मिळून या दोघांना मदतीला घेऊन करणार आहेत . नाष्ट्याला  घावन मिक्सींग करुन ठेवलय ते आज मनिष करणार आहे . तर जेवायला पोळी, आख्ख्या मसूरची भाजी, भात , गाजराची कोशिंबीर असा बेत आहे . 
            कालपासून कीर्तीच्या आजोबांचा विषय डोक्यात घोळत होता.मी विचारमग्न होत गेले की रक्ताच्या नात्याइतकीच किंबहुना काहीवेळा जास्तच जोडलेली नाती ही खूप घट्ट असतात का?  काही कारणांनी भेट झाली नाही तरी अंतरीक ओढ किंवा जोडलेला धागा असतो तो हृदयाची तार छेडायची भूमिका करत असतो. 30 वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने बार्शी व मुलांसाठी म्हणून आमच्या आयुष्यात देशपांडे वाडा व कृष्णा आज्जी अविस्मरणीय आहेत. पुर्वी मँटर्नीटी लीव्ह 3 महिने असायची. मनिषचा जन्म झाला आडीच महिने मजेत गेले . बालपण , बारसं,  कोडकौतुक घेरडी आणि परांडा ! आता जॉईन व्हायला फक्त  8 दिवस बाकी आसतांना रुटीन बसवायला बार्शीला आम्ही तिघे आलो . काहीही ठरवलेले नव्हतं , फारसं कळत पण नव्हतं . देशपांडे वाड्यात भाड्याने रहायचो. वाड्यात वातावरण घेरडीसारखं होत .  घरमालकांना मुलबाळ नव्हते त्या एकूण 6 जणी जावा व 3 नणंदा असा मोठ्ठा परिवार होता . सगळेजण त्यांना बाबा-मम्मी म्हणायचे . नविनच लग्न होऊन आल्यामुळे त्यांनी आम्हांलापण त्यांच्या बहिणभावाच्या मुलांप्रमाणे मानलं . मगआमचेपण ते मम्मी बाबा झाले. मम्मींची एक जाऊ म्हणजे वर्षा काकू ! मग त्यांच कुटुंब तात्या, प्रसन्न आणि गौरी.मम्मी व वर्षा काकू ह्यांच्याबरोबर आमचा खूप स्नेह जडला होता. त्यामुळे बाळाला घेऊन परत आले की ही दोन कुटुंब आणि बाकीच्या जावा त्यांची मुलं , सागडे ताई , दिवटे काकू , सिंधूताई असे शेजारी सगळे जणू आदल्या जन्मीचे सोयरेच !  मग मी त्यांना बाळाला सांभाळायला बाई बघायला सांगितले . शोधत शोधत 8 दिवस नीघून गेले मम्मी म्हणाल्या आपण बाई पाहू ती मिळेपर्यंत तू माझ्याकडे मनिषला  सोडून जा. 3 महिन्याच आतिशय खेळकर बाळसेदार गुटगुटीत बाळ घरी ठेवून ड्युटी सुरु झाली. मम्मी याला दिवसभर सांभाळायच्या वर्षा काकूंनी पण तितक्याच प्रेमाने अगदी वेळ काढून यायचं. सागडे ताईंनी त्याला फिरवून आणायचं आणि खेळवायला गौरी प्रसन्ना बाकी मुलं आसायची. जगमीत्र आहे तुझं बाळ असं म्हणायचे सगळे.  मधल्या सुट्टीत मी घरी येऊन जायचे. बाई पहाण्यात 8 दिवस गेले माझ्या आधी मम्मी व वर्षा काकूंनाच बाई मनास येत नव्हती . काय कराव मोठ्ठा प्रश्न होता. रविवारी बोलत बसल्यावर मम्मीनी जाहिर करुन टाकलं एवढं छान बाळ कोणाच्याही हातात द्यायला मन धजत नाही . आणि आताच्या 8 दिवसाच्या अनुभवावरुन मी त्याला सांभाळू शकते असा मला विश्वास आहे . वर्षा आहे मदतीला कधी आम्ही दोघी गावाला गेलो तर प्रश्न पडेल अन्यथा तू चिंता सोड मनिष बाहेर कुठेही जाणार नाही ! आमचा आनंद गगनात मावेना. समर्थांवर सगळा भार सोपवला होता . त्यांनीच मार्ग काढला. आणि हे तीन महिन्याच बाळ मोठ्या गोतावळ्यात वाढू लागलं . तसं मम्मींच्या मोठ्या वहिनी नोकरी करत होत्या त्यांच्या  तिन्ही मुलांचा सांभाव मम्मीनीच केला होता .आलिकडेच सगळे विभक्त रहायला लागले होते त्यामुळे त्यांना करमत नसे . त्या मनापासून मनिषला सांभाळू लागल्या . त्याचा गोंडसपणा वाढू लागला.  6 महिन्याच बाळ 9 महिन्याच म्हणून सांगायचं अशी सक्त ताकीद होती मम्मीची. त्याच्या बाळलीलामध्ये सगळे गुंग होते मला पण निर्धास्त वाटत होते. पुढे 3 वर्षात आमचा बंगला बांधूनआम्ही  रहायला आलो. पण मनिषला रोज देशपांडे वाड्यात सोडायचं त्याचा शिशुविहारचा टांगा सुद्धा वाडा-शाळा-वाडा असा होता. रविवारी  व सुट्टीदिवशी 5 वाजता त्याला वाड्यात न्यावच लागायचं इतकी सवय झाली होती. दुस-याचं  बाळ रोज सांभाळणं म्हणजे तसं समाजात अवघडच की ! आणि देशपांडे कुटुंब गर्भश्रीमंत होतं . विघ्नसंतुष्टी लोक आसतातच की. तुम्ही मुलं सांभाळता का आसं विचारतात  लोक असं कोणीतरी मुद्दाम विचारायचे.   पण मम्मी ठाम होत्या कोणाचे सांभाळायचं असेल तर पाठवा माझ्याकडे पाहून घेईन मी म्हणायच्या. त्या खूप गुंतल्या होत्या मनिषमध्ये पण कटाक्षाने मी गुंतणार नाही असं सांगायच्या त्या . पुढेपुढे तर मम्मीपेक्षा बाबाच त्याच्यावर जीव ओवाळून टाकू लागले. 5 वर्षे हे रुटीन छान चालले आणि एक दिवस मम्मींना गाईने मारल्याचं निमित्त झालं शुगर डिटेक्ट झाली पण त्यांची औषधे चुकली त्या आजारात गुंततच गेल्या एकानंतर एक आजार उद्भवले. दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला. त्यांनी आधीच सांगितलं मनीषचं करते पण आता लहान बाळाचं मला जमायचं _अवघड आहे . पुन्हा प्रश्न ! सहज वर्षा काकूंना बोलले . त्या लगेच म्हणाल्या मम्मींना शक्य नसेल तर सोड माझ्याकडे . मम्मींची तब्बेत खालावत गेली . मनिषची शाळा आता 11 ते 5  झाली रोज आकांक्षा आणि वेळ पडेल तसं मनिष दोघेपण_ वर्षाकाकूकडे . इथुन पुढे वर्षा काकूचं पर्व सुरु झालं.


क्रमशः भाग 9

मम्मीकडे मनिष 5 वर्षाचा कसा झाला समजले नाही. नंतर मात्र  दिवसेंदिवस मम्मीचं आजारपण, दवाखाना वाढतच गेला त्यांच पहायला  , मदतीला वर्षा काकू असायच्या तेव्हा तात्या नोकरीनिमीत्त  कोकणात होते. वर्षा काकूंचा भाऊ खेड्यात होता त्यामुळे त्यांचे  2 भाचे, 1 भाची, गौरी , प्रसन्ना असे 6 जणं  मिळून ते रहात होते. मम्मीचं करायचं आणि मनिषला पहायचं काम ब-यापैकी बाबा करायचे आणि कमीजास्त वर्षा काकू असं रुटीन झालं. आमचा काहीतर  ऋणानुबंध असणार असे म्हणायचे सगळे . दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला. ती जन्मता नाजूक होती.त्यावेळी बाळंतपणासाठी  आई-काका व संजू बार्शीला येऊन राहिले होते. आम्ही वडिलांना काका म्हणायचो. प्रत्येकाच्या जिवनात आईवडिलांना विशेष  महत्त्व असते नव्हे आयुष्याची , जिवनाची सुरुवाच त्यांच्या  बोटाला धरुन होत असते. पण मला माझे आईवडील  खूप वेगळे असल्याची नेहमी जाणीव होत रहाते. मी त्रयस्तपणे त्यांचा जिवनपट चाळत असते . मला तो छंदच जडलाय. चारचौघांसारखे ते मला कधी वाटलेच नाहीत त्यांची जिवनशैली म्हणण्यापेक्षा मानसिकता हटके होती . त्यामुळेच की काय त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या आम्ही 6 मुली म्हणजे त्यादोघांच अस्तित्व म्हणजे चमकदार हि-याच कोंदण आणि आम्ही मुली म्हणजे कोंदणाभोवती मोत्याची कुडी होतो. दुर्दैवाने एक मोती निखळला . काळाप्रमाणे कोंदण लुप्त झालंय पण त्याची किरणे मात्र मोत्यावर चमकतात त्या आम्ही पंचकन्या . हे कोंदण त्यांचे जिवन त्यांनी घालून दिलेले आदर्श मला विस्तृत स्वरुपात  जगासमोर आणायचं आहेत .स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय ? याचा कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीतून तो ते कसे जगले व कसे घडविले हा एक आजच्या काळात चिंतन करण्याचा भागा आहे . पाहू कसा योग येतो ते समर्थांनी बळ दिलं की सारं काही साध्य होतं . आसो. 
तशी  मी रजा आधीच घेतली होती पण 1 महिन्यांनी आकांक्षाचा जन्म झाला. खूप नाजूक पण खणखणीत आवाज विशेष म्हणजे 5 व्या दिवसापासून ती मनिष आणि पप्पांना ओळखू लागली, हसू लागली . सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आम्ही प्रयोग करुन पाहिले पण तिला खरचंच समजत होतं. काका म्हणायचे पोटातला एक महिना पकडा तिचा तिची बुद्धी एक महिन्यांनी मोठी आहे !! मजा यायची . मनिष फार खूश होता . इकडे बंगल्यात रहायला आल्यामुळे त्याला एकटं एकटं वाटायचं .मला खेळायला आली रे आसं म्हणायचा.
आकांक्षा 4 महिन्याची झाल्यावर मी  जॉईन झाले. तोवर वर्षा काकूंंशी बोलणं झालं होतं. त्यांच्याकडे 8 वी ते 12 वीच्या दरम्यानचे ते 5 जण होते. त्यात दिवसभर आकांक्षा व शाळेच्या आधी नंतर सुट्टीदिवशी मनिष  कधी त्यांच्याकडे कधी मम्मीकडे जायचा.असं रुटीन सुरु झालं .


क्रमशः  भाग 10

आता स्वयंपाकाचं चक्र व्यवस्थित बसलं होतं . पण नेहमीची जिवनशैली व लॉकडाऊनमुळे जगत असलेली जिवनशैली यात जमिन अस्मानचा फरक जाणवत होता. माणूस यंत्रवत झालाय . मुख्य म्हणजे पैशाच्या बळावर आपल्या मनाला येईल तसं वागत आहे. पण करोनाने सगळ्यांना काही बाबतीत तरी एका समान पातळीवर आणून ठेवलंय . आपली स्वतःचीच कामं स्वतः करायला जड जाते . माणूस पैसा कमावतोय पण स्वावलंबीपणा लुप्त झालायं हे खरं !  जुन्या पिढीला थोडंस नावं ठेवत का होईना आपण आळशी झालो आहोत आसं वाटतंय . पण हे तात्कालिक असू शकते  भविष्यात आपली मानसिकता पुर्वपदावर येणार नाही याची खात्री नाही . नव्हे स्वावलंबीपणाचे आत्ता गायलेले गोडवे तेव्हा टोचणार . पण करोना जिवनाची मुल्यं  शिकवून मात्र नक्कीच जातोय !
      आशिषला फोटोग्राफी आवडते . फक्त एवढेच आम्ही म्हणायचो  . सध्या त्याचे रोज चाललेले प्रयोग पाहून मला तरी हरकायला होतं . पाणी , ग्लास,चाळणी किंवा  शोभेसाठी म्हणून घेतलेला हत्ती ! तो गच्चीत नेऊन सुर्यास्त वेगवेगळ्या प्रकारे हत्तीभोवती पकडणे ! पाण्याच्या थेंबात सुर्य पकडणे . आडकित्त्यात सुर्य पकडणे आणि एक क्षण पकडण्यासाठी तासंतास गच्चीवर घालवणे .व्वा ! भन्नाट कल्पना वाटली मला ती . माणसाने कधीतरी स्वतःमध्ये पण डोकावायला वेळ दिला पाहिजे याची प्रचीती आली. काळाच्या ओघात स्वतःच्या छंदांना जोपासता आलं तर माणसात दडलेलं  मूल तसंच रहातं . आता हेच पहा घरात खास  सोलापूरला जाऊन हौसेनी आणलेला कँरम बोर्ड !  त्यांन घरातला कोपरा केव्हा  गाठला लक्षातच नाही आलं .  पण गेला महिनाभर झालं तो रोज निघतो आहे आणि या तिघांबरोबर हास्यकल्लोळात रोज एखादा तास यांचा कसा जातो समजत पण नाही . 7 वाजायची वाट पहात असतात ते  . मानिष लहान असतांना त्याला शिकवत हे खेळायचे . सर्वसामान्यांप्रमाणे  आमचं चौकौनी कुटुंब. मुलांचा आभ्यास घेणे . दोघांचीही नोकरी म्हणून यांनी सातत्याने मला मदत करणे . बंगला गावाबाहेर असल्याने गाडीशिवाय पर्याय नाही म्हणत 30 वर्षापूर्वी बार्शीत मला गाडी शिकण्यास प्रवृत्त करणे . पुढे शिक्षणानिमित्त मुलं बाहेर गेल्यावर माझी आवड लक्षात घेऊन मी पेटी वाजवणे,  संघटनेत सक्रियपणे काम करणे सुरु केले .  मी जे करते त्याला प्रोत्साहन देणे .  अडथळा न आणता जमेल ती मदतच करणे . संजूसारख्या माझ्या  बहिणीसाठी आतिशय मनापासून काही जबाबदाऱ्या उचलणं . तिच वागण्याची लकब परांडा कुटुंबातील प्रत्येकासाठीच आई-वडील , बहिण-भाऊ आणि त्याची कुठेही वाच्यता न करणं . ह्यांच जिवन सामान्य नव्हतं काही न काही कारणांमुळे आडथळ्यांची शर्यत झालं होतं .त्यामुळे आई-काका आणि हे या तिनही व्यक्तींच की ज्यांच्या  वाट्याला चारचौघांसारखे नाही तर वेगळं जिवन आलं आणि ते जगले मी जवळून पाहिलं , अनुभवलं  त्यांना माझ्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
    ह्यांच्यातला मला टोचणारा भाग म्हणलं तर माझ्या दृष्टीने ह्यांची आतिस्वच्छता व इतरांच जीव ओतून सगळं पहायचं पण स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष ! या दोन गोष्टी जर त्यांनी बदलल्या तर इतरांपेक्षा त्यांना स्वतःला त्याचा फायदा होईल.
    पण हे मात्र नक्की की या सगळ्याचा परिणाम मुलांच्यात दिसून येतो . सुसंस्कृतपणा आपोआप त्यांच्यात उतरला आहे .तशीच कीर्तीसारखी जोड हीपण परमेश्वराचीच इच्छा आणि कृपा पण !!

लाॕकडाऊन डायरी प्रकरण 1

 लाॕकडाऊन डायरी प्रकरण 1


भाग 1 ते 5

कोरोनाचं संकट आणि नविन नात्याची गुंफण  , कुटुंबातील वाढता आपलेपणा



धुमधडाक्यात आशिषचं लग्न होऊन आता दीड महिना होऊन गेलाय. अजुनही रोज वेगवेगळे आणि तेचतेच फोटो पहाणं , video पहाण कोणत्याही नातेवाईकाशी किंवा स्नेह्याशी लग्नाच्या गप्पा मारणं आणि तीच मधुर चव जिभेवर रेंगाळणं सुरुच आहे. त्यांचा नविन संसार पहातांना ऐकतांना काही होत असलेली फजिती ऐकतांना मन एकदम 30 वर्षे मागे जातं आणि फिल्म रिवाईंड होतेय आसं वाटतं. थोडा पिढीतला बदल बाकी नाविण्याचा अनुभव तोच की !!

सगळे आपापल्या ठीकाणी गेले आहेत. आकांक्षाचा क्लास पण जोमानं सुरु झालायं . काका-काकीपण 6 महिने बार्शीला राहिले त्यांना परांड्यात थोडे दिवस जावस वाटलं म्हणून त्यांना  परांड्याला सोडून आम्ही पण 8 दिवस पुण्याला जाऊन आशिष-किर्तीचा नविन संसार लावुन आलो . येतीजाती व मामेभावाच्या मुंजीचं गृहमख यासाठी दोघे मिरजेला जाऊन आले. कीर्तीचे आई-बाबा पण लेकीचा संसार आगदी धावती भेट देऊन पाहुन गेले. डिसेंबरपासून यांच पण शेताकडे लक्ष नव्हते .कलिंगडं मिरच्या लावल्यात त्यांनी पण आता शेताकडे मोर्चा वळवलाय. सगळ्यांच छान रुटीन सुरु झालय.
     आता पाडव्याला नविन वर्ष सुरु होतेय . पहिला सण . कीर्तीला छानसा पांढरा ड्रेस शिवायला ज्योतीला सांगितले . आकांक्षा पाडव्याला यायला जमणार नाही म्हणाली पण आशिष-किर्ती व काका-काकी येतील. चला मग आपण 6 जण करु पाडवा. सगळी तयारी व्यवस्थित करु बायका तर सगळ्या सांगून ठेवल्यात . मंगळागौरीचं नियोजन पण आत्ता केलं तरच ललिता ,  संस्कार-भारतीचा ग्रुप ठरवता येईल. तसं बार्शीला  दुसरी मंगळागौर करावी असा मानस मी विहिणबाई व कीर्तीला बोलुन ठेवलाय पण ती पाडव्याला आली की प्रत्यक्षात बोलुन ठरवता येईल. आत्ता तिच्या डोक्यात पाडव्याला कायकाय घालावं ? दोन मैत्रीणींची लग्न आहेत त्याला काय घालाव याचं प्लॉनिंग चालु आहे .बार्शीला  आली की माझा सगळा खजाना बघ आणि ठरव काय काय हवं ते असं तिला  सांगायचं आसं मी ठरवलंय .
           आता पुण्यात त्या दोघांचही रुटीन चांगलं सुरु झालय . पुण्यात कीर्तीला विचारुन स्वयंपाक करायला कुवळेकर काकुनां लावल तसं ती सकाळी फक्त लावाव व रात्रीचे मी घरी करेन असं  म्हणाली पण तिला आता नारायणबागेतून जा-ये करावी लागेल तस लांब होतय ,  ब-यापैकी मोठा ब्लॉक , नविनच लग्न झालेले , शिवाय मोठी रजा झाल्याने आॕफिसमध्ये साठलेली  कामे हे सगळंच एकदम अंगावर पडले तर आजारी पडेल म्हणून मीच कुवळेकर काकुंना दोन्ही वेळेचं ठरवून आले. जेमतेम 3 आठवडे व्यवस्थित चालले असेल अचानक कुवळेकर काकुंचे सासरे आजारी पडले म्हणून त्या गावाला गेल्यामुळे स्वयंपाक करण्याचं कीर्तीला काम सुरु झालं . फारशी सवय / सराव नसल्यामुळे तिची दमछाक व्हायला लागली  . चारपाच दिवसांनी वरकामाच्या मोहिते काकु पण गावाला गेल्या आणि या दोघांचीही फाजिती व्हायला लागली . काय करावं मनूला पण कळेना .सकाळ संध्याकाळ फोनवर काहीतरी सांगावे आणि प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी कराव असं होऊ लागलं . तसं adjust करायचा  दोघांचापण प्रयत्न चालू होता. त्यादरम्यान भारतात कोरोनाचा प्रसार होऊ लागाला. पुणे शहर रडारवर आलं . या दोघांचीही कामे घरुन सुरु झाली . आकांक्षाच सी-डॕक खूप जोमात सुरु होतं.  मला कशात  गृहीत धरु नका 6 महिने ,असे ती म्हणायची . पण कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला की आकांक्षाला 15  ते  25 मार्च क्लासला सुट्टी दिली गेली . पुन्हा प्रवासाचा धोका नको म्हणून ती पण नारायणबागेत रहायला आली. आता घरात कामाला  कोणीच नाही आणि या तिघांच घरुन काम आणि घरातल काम असे बऱ्यापैकी सुरु झालं . आकांक्षा आल्यामुळे कीर्तीला थोडसं हायसं वाटलं मनिष पण म्हणू लागला जरा जमतय व्यवस्थित म्हणून . इकडे
कोरोनाच्या उलटसुलट बातम्या कानावर पडू लागल्या . सतत नवनव्या घोषणा होऊ लागल्या आणि 31 मार्चपर्यंत बऱ्यापैकी एकएक बंदचा फतवा निघाला . कलिंगड्याची तीन महिन्याची मेहनत , खर्च केलेले फळ हातातोंडाशी आलं आहे . आणि अशी परिस्थिती त्यामुळे ह्यांची अस्वस्थता वाढलेली. आता काय करावं हा यक्ष प्रश्न ! 
      तस आता पाडव्यासाठी आशिष-किर्ती बार्शीला येणारच होते. आकांक्षाला पण 31 पर्यत सुट्टी जाहीर झाली. म्हणून 18/19 मार्चला मी आशिषला तुम्ही तिघेपण 21 तारखेला बार्शीला गाडीतून या व पाडवा झाल्यावर 31च्या आधी परत जा असं सांगितले . तसं ठरल सुद्धा ! पण  20  तारखेला दुपारपासून खुप उलटसुलट बातम्या  ऐकायला यायला लागल्या संचारबंदी करताहेत , फिरु देत नाहीत आणि दुपारी आशिषचा फोन आला आम्ही येत नाही  . 15 दिवस पुरेल एवढा किराणा आणतो आणि तिघेजण इथेच रहातो. मला खुप भिती वाटली .  यांना 5/6 दिवस इतके त्रासदायक गेलेत समजा इतर देशासारखं लॉकडावुन झालं तर काय करावे . नकोनको ते विचार घोंगावु लागले. हे चीनने मुद्दाम केल आहे. काय कराव आपण इथे मुलं तिथे . तसही 22 तारीख कर्फ्यु जाहीर केलाय. मी माझी चिकाटी सोडली नाही काहीही कर उद्या येता येत नसेल तर आज 5 वाजता  निघा रात्री 10 पर्यंत  घरी याल असं सांगितले . इकडे बँकेत पण 50% लोकांनी बँकेत यायचं असं सर्क्युलर आल . मी 23/24 अॉफ घ्यायचं ठरवलं  आणि घरी आले . आशिष येत नाही म्हणायचा मी यायचा आग्रह करायचे . दोन्ही जिल्ह्याच्या ओळखीच्या पोलिसांना फोन लावले . त्यांनी प्रवासात काही  अडचण येणार नसल्याचे सांगितले . दोन्हीकडे वातावरण तंग झालं . रात्री 8 वाजता आशिषचा त्रोटक फोन आला आम्ही सकाळी लवकर निघतो , येतोय बार्शीला  . आणि जीव भांड्यात पडला. डोक्यात अनेक विचार येऊन गेले. तिसरे महायुद्ध होईल का ? पुणे धोकादायक आहे का ? काही असो चिडचीड करतील पण डोळ्यासमोर असतील आठवडाभर मग वातावरण निवळलं की जातील . असो पाहुयात.
शनिवारी मी बँकेत आले आणि हे तिघे सकाळी 7 वाजता गाडीतून पुण्याहून निघाले . तासातासाला कीर्ती  msg करत होती. 11 वाजता घरी पोहोचलो असा msg आला आणि निवांत वाटलं . इकडे ठरवल्याप्रमाणे पाडव्याची काहीच तयारी केली नव्हती काका-काकींना  सोमवारी आणायचं ठरलं . रविवारी उडीद वड्याचा बेत ठरला . कर्फ्युमुळे सगळे घरीच असणार होते.रविवारी दिवसभर आशिष फुगलेला होता. तु हट्टी आहेस असं मला म्हणत होता . चुक की बरोबर कोणालाच कळत नव्हते . कीर्ती आणि आकांक्षा आम्हांला मध्ये घेऊ नका असं म्हणत होत्या . हळुच झालं असतं पुण्यात मॉनेज , आम्ही सामान आणलं होतं असही म्हणत हसायच्या. कीर्ती मात्र लक्ष देऊन चिकाटीने उडीद वड्याच्या मागे लागली . थोडफार आपल्याला जमलच पाहिजे हा तिने निश्चय केला होता . रात्री तर मी हॉलमध्ये बसायचं आणि ती वडे करणार आणि आम्ही वडे खायचे असं सांगण्या इतपत तिचा confidence वाढला. आणि आता पुण्यात मी एकटी वडे करणार हे तिने declear केलं . मिरजेत आईला  उडीदवड्याचं पात्र आणून ठेवायला फोन झाला. 
22 तारखेचा कर्फ्यु वाढत त्याच रुपांतर 21 दिवसांच्या  लाॕकडाऊन मध्ये झालं .पुन्हा एकदा इतकी भिती वाटली बापरे आपलं सगळं पार पडलं . ही पोर कुठ लांब जाऊन परत आली . समर्थांचीच कृपा म्हणाव लागेल . नाहीतर काय खरं होतं . साखरपुड्याचाच अनुभव होता .देवा तुझीच कृपादृष्टी म्हणावी लागेल . आता मात्र आशिष-किर्ती आकांक्षा तिघेपण हसायला लागले बरं  झालं बाबा बार्शीला आलो ते. नाहीतर अडकलो असतो तर काय करावे समजले नसते. मग कीर्ती हळुच म्हणते आपण बार्शीला जाऊ असा निर्णय मी घेतला. मग पहिला नंबर माझा न दुसरा तिचा असं म्हणत हशा पिकला , आशिषचा राग कुठल्या कुठे पळून गेला.असो , इकडे मात्र  काका-काकी परंड्यात आडकले. आम्ही 5 जणं बार्शीला !  तसं फारशी काळजी करण्यासारखं नव्हते गरज पडलीच तर अर्ध्या तासात पोहोचु एवढ्या अंतरावर आहेत . फक्त कामाला बायका यायला पाहिजेत आणि त्यांची औषधे वेळेवर पोहोचली पाहिजेत . तसही ते बाहेर जात नाहीतच. शेताकडची चिंता मात्र सतावु लागली काहीच मार्ग निघत नव्हता  . पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की कोणीही काहीही करु शकणार नव्हते. फक्त  बार्शीला घरात मात्र सगळे एकत्र , अगदी ठरवुनसुद्धा आम्हांला कुठेच इतके दिवस एकत्र रहाणे शक्य नव्हते ते साध्य झाले या बंदमुळे ! हा एक प्लस पॉईट होता . तो असा गप्पा मारत सगळ्यांना पटला . मग ठरवलं की ही आपल्याला मिळालेली संधी आहे त्याचा योग्य वापर करु. नविन सून जवळ रहाणं कोणाला नको असतं .मनं जुळायला तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल . तसं आकांक्षाच तिच अगदी मैत्रीचे नात झालय चला आता कुटुंबातील एकरुपता आपोआपच वाढणार  शिवाय त्यांची अॉफिसची कामं घरुन चालूच रहाणार होती त्यामुळे ठीक आहे. पुण्यापेक्षा बार्शी केव्हाही चांगल . मोकळी हवा, मोठी जागा , घरात माल भरलेला आहेच आनंदानं दिवस घालवु . फक्त थोडेसे पाणी जपून वापरावे लागणार आणि इकडचा उन्हाळा !! पाहू.  आहेत कुलर करु काही मॉनेज ! पण मुलं बार्शीला आली आहेत म्हणल्यावर सगळ्यांनाच हायस वाटलं . विहिणबाई तर फोन करुन म्हणाल्या एकीची तरी काळजी मिटली बार्शीला आलेत म्हणल्यावर आगादी निर्धास्त झालो आम्ही .केतकीचा इलाजच नाही पण काळजी वाटते. कीर्तीला पण बाबा आणि केतकीची खूप काळजी वाटायची.पण काय करावं. 
    तसा इकडे कीर्तीला आठदहा दिवसांचा घरकामाचा चांगलाच अनुभव आला होता. त्यामुळे तिने स्वयंपाकघरात पुर्ण लक्ष द्यायचं आणि सगळं शिकुन घ्यायचं हा चंगच बांधला . दुसरे दिवशी ईडली झाली. मग घावन . की लगेच पाडवा आला . ललिताला  येऊ नको म्हणून सांगितले . मंदा शोभाला  सुट्टी आणि आमचा पुरणाचा बेत ठरला ! घरात मात्र सगळेजण काम करत होते अगदी झाडून काढणं भांडी घासणं फरशा पुसणे धुणं . सगळ्या कामात मदत होती. वहिनी असल्यामुळे व अभ्यासामुळे आकांक्षाला वेळ कमी मिळत होता तरी लुडबुड आसायची.
    सकाळी लवकर उठुन आहे त्यात सगळं करायचं ठरलं . छान गुढी उभी केली आणि पुरण सुरु झालं . कीर्तीने स्वयंपाकघर सोडलं नाही . सगळ्या कामात मदत आणि निरिक्षण सुरु होतं तिचं . तिचा स्वभाव , सवयी, चिकाटी मुख्य म्हणजे मानसिकता  बऱ्यापैकी आकांक्षाशी मिळत्याजुळत्या वाटल्या मला. त्यामुळे तिला टिप्स द्यायला अवघड नाही गेलं . सगळं करत असलेले फोटो न video सगळीकडे पाठवत होते. सगळे खुष आणि कौतुकाचा वर्षाव त्यामुळे ती पण खुष. पुरणाचा स्वयंपाकतिला मी दोन टप्प्यात शिकवला  . पाडव्यादिवाशी पुरण आणि एकदोन दिवसांनी फक्त पोळ्या करण्याचा सराव . मला खात्री होती ती करेल याची.  पण जेव्हा  भरपूर पुरण घालून केलेल्या पोळ्या टुमटुम फुगल्या तेव्हा सगळ्यांना खुप आनंद झाला तिचा तर आनंद गगनात मावेना . मन्या तर नाचायला लागला  माझी बायको सुगरण म्हणत . सगळ्यांकडून सुगरणपणाची पावती मिळाली. कीर्ती खुष!!!
मला खात्री होती आजकालच्या मुली जिद्दी असतात. एवढं उच्च शिक्षण घेतात ज्या मुली चिकाटीने करतात तर ही  शिकणारच. फक्त करण्याची तयारी असली पाहिजे.मानसिकता आसली  पाहिजे. पाककला काही सोपी नाही पण अवघड तर मुळीच नाही करणाराला जमतेच आणि ही करणारच आशी खात्री होती. मुख्य म्हणजे तिचे बाबा आणि पप्पा आगदी लक्ष देऊन विचारणा करणे दाद देणे सुरु होते. आई आजी सगळे फॕमिली ग्रुप अगदी तोंडभरुन कौतुक चालु होत !! 
आता रोज घरची सगळी कामं आणि काहीतरी नविन पदार्थ खायला करणे यात खीर, भजी, मिसळ , सांजा , मलिदा , कोथिंबीर वडी भाताचे विविध प्रकार ,  वरणफळं उकडशिंगोळे , पाकातल्या पुऱ्या , पाणीपुरी भेळ.........आणि बरच काही !! आजून ढोकळा,  एकदा कीर्ती स्पेशल पुरणाची ट्रायल  , खव्याचे पदार्थ व्हायचे आहेत.  वेगवेगळ्या भाज्या रोजचा खाण्याचा नविन बेत आणि संध्याकाळी आशिष-किर्ती आकांक्षा तिघांनी टेरेसवर जाणे फोटो काढणे , पेटी वाजवणे ,ब्रम्हविद्या , टीव्हीवर  30 वर्षांनी पुन्हा रामायण महाभारत सुरु झालं. ते सगळ्यांनी एकत्र बसून पहाणे कँरम खेळणे असं रुटीन सुरु झालं . सगळे एकत्र बसले की हशा पिकतो पण समोर टीव्ही वर करोनाच्या  बातम्या पहिल्या की सगळे शांत होतात . प्रत्येकाच्या मनात भविष्यात काय होणार ही भिती आहेच. विशेषतः आकांक्षाच मन था-यावर नाही काय होणार ? असं वाटत तिला . आपल आजून काहीच झालं नाही ही काळजी वाटते तिला. घरात बसून कामाला सगळेच कंटाळून गेलेत. डांबून घातल्यासारखं होतेय . सारखे हात धुवा बाहेरून काही आणले की संशयाने पहा. मला आता रोज बँकेत याव लागतेय कधीकधी खूप भिती वाटते आपण बाहेर जातोय लोकांच्या ,नोटांच्या संपर्कात येतोय पुन्हा मनाची समजूत घालायची शक्य तेवढी काळजी घ्यायची  व कामाला लागायचं . इकडे कीर्तीची चुळबुळ सुरु झालीय . अत्यावश्यक सेवेत आम्हाला समाविष्ट केलेय काय कराव लागेल माहित नाही म्हणते. ती आणि आकांक्षा आपापले रुटीन कधी सुरु होईल याला अधिर झाल्या आहेत. त्यांना काहीही वाटू देत . पुर्णपणे सुरक्षित वाटल्या शिवाय मी काही परवानगी देणार नाही मनिष आणि हे पण असंच म्हणतात रुटीन सुरु व्हाव असं तर सगळ्यांनाच वाटतेय. पण परिस्थितीच गांभिर्य पाहून निर्णय घ्यावे लागतील.
मी तर विचार करते की माणसाला किती गोष्टी ठरवुन ठेवायचा सोस असतो पण भविष्याच्या उदरात काय दडलय हे कोणालाच कळत नाही हे खरं . सगळ्या गोष्टी  आपल्या हातात नसतातच. विधित्यांने कशाचाच अंत लागू दिलेला नाही. परिस्थिती मुळ पदावर यायला किती काळ लागेल हे आत्ता तरी सांगू शकत नाही. हे कळायला पण थोडी प्रगल्भता यावीच लागते की . आणि वयाप्रमाणे आसणार यात वाद नाही.
काहीही असो मी तर सध्या खुष आहे . नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे . आहे त्यात समाधान शोधले पाहिजे. आर्धा ग्लास भरलेला पहायचा का रिकामा पहायचा हे ठरवणे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. पण परिस्थितीला आपल्यावर आरुढ होऊ न देता परिस्थितीवर मात करता आली तर जिवन यशस्वी होऊ शकतं हे नक्की !!!
आज आता 7  एप्रील आहे. लॉकडाऊनचे 15 दिवस संपलेत  रोज नविन अनुभव येतोय . सकाळी अॉफिसच्या कामाची सुरुवात करण्यापुर्वी कणिक तिंबणे , कमीतकमी  पाचसहा पोळ्या करणे , नाष्टा , भाजीत मदत करणे हे करायचच असं  कीर्तीने ठरविले आहे. तिने इतकं मनावर घेतलं आहे तर मग रोज थोडथोड सांगत रहायचं शिकवायचं असे मीही ठरवलंय . पाहु आता किती दिवस रहायला मिळते. सहवास घडतो ते. आणि रोजचा अनुभव काय येतो लिहीत राहू.


क्रमशः  भाग 2


प्रत्येक आईला आपलं मुल गुणी वाटतच पण खरचच आशिष गुणी मुलगा आहे . फक्त थोडासा आळशी आहे.  पण या करोनाच्या परिस्थितीत आपण बार्शीला आहोत ही त्याच्यासाठी आता समाधानाची गोष्ट आहे मुख्य म्हणजे निश्चिंत असल्याचे वाटतंय असं म्हणतो .  कामाची तशी फारशी सवय नाहीच आणि जवळजवळ 13/14 वर्षे झाली एकटाच रहायची सवय झालीय त्यामुळे कुटुंबातील शिस्तबद्धता जरा त्याला टोचतीय . तरी पण सध्या घरात दिसत असलेल्या कामात खारीचा वाटा उचलायची तयारी तरी नक्कीच आसते. WFH मुळे त्याच काम  full  चालू आहे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. पण एकूणच नविन जोडप्याचा घरातील वावर खुप मस्त वाटतो. आपणच 10 वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटते.घरात  खळखळुन हस्याचे फवारे उडतात. घरात तरुणाईचा वावर मनाला प्रफुल्लीत करतो हे खरं!!
आता सगळेजण एकत्र रहायला लागून 15/20 दिवस होऊन गेले. सगळच रुटीन चेंज झाल आणि हे नविन रुटीन साधारणपणे रोजचं तेच आता सुरु झालं. मला पण घरकामाची तितकीशी सवय नाही . कीर्तीला तर हे सगळ नविनच आहे . पण आता पर्याय नाही करणे क्रमापाप्त आहे म्हणतो आणि पुन्हा हसत कामाला लागतो  . उद्या काय करायचं यावर रात्री चर्चा होते. सकाळी नाष्टा , पोळी-भाजी दुपारी सरबत, कलिंगडं काहीतरी चाणाचुणा व रात्री one dish meal यावर सगळीकडुन शिक्कामोर्तब झालय.
       सकाळी छान कणिक मळणे आणि 4/5 पोळ्या करणे हा कीर्तीचा  निश्चिय आहे त्यामुळे विवीध आकाराचे नकाशे , पापड ते लुसलुशीत गोल टुमटुमीत फुगलेली पोळी असं तिचं स्वतः च निरिक्षण नोंदवत खुषीत सकाळी कट्ट्याजवळ तिचा अर्धा तास जातो . यात एखादा चहा करणे मग नाष्ट्याला भाजीला थोडी मदत आणि गप्पा असतात . ती स्वतः शीच खुष असते खुप कमी वेळात बरच काम होतय असं तिचं म्हणण आहे . आणि प्रत्येक पदार्थाला आशिषकडुन  "माझी बायको सुगरण " म्हणत मिळणारी मिठी तिला खुष करते.  
"practice makes man perfect  " 
हे इथे लागु होतं असं मी सांगितले आहे तिला . सासु डबा बाटली घेऊन अॉफिसला जाते. सासरेबुवांची घरकामात ब-यापैकी मदत मुख्य म्हणजे रोज न चुकता दुपारी कलिंगडं चिरुन बीया साल काढुन मोठ्या डब्यात फोडी करुन ठेवायच्या आणि भरदुपारी प्रत्येकाने गारेगार डीश भरुन खायच्या .एखाद्या दिवशी कोरडी भाजी दिसते म्हणून त्यांच्या बॉचलरपणातला रविवारचा मस्तपैकी कोशिंबीरीचा बेत करायचा आणि त्या चौघांनी ताव मारायचा मला मेसेजेस करायचे असं काहीसं मजेशीर चीत्र आहे सध्या घरात.  आम्ही त्याचा पण आनंद घेतोय.


क्रमशः  भाग 3


दिवसेंदिवस कोरोनाचे बाधित वाढतच होते. आजुन 30 एप्रील पर्यंत वाढण्याची शक्यता होती. एकूणच सामाजिक परिस्थिती अवघड होत होती . इकडे बँकेत जनधन खात्यावर 500 रु. जमा झाल्याने बँकेत गर्दी वाढत होती. ते तरी काय करणार हातावर पोट आसणारे लोक होते ते. काम बंद पैसा नाही. शेतकऱ्यांचे वेगळेच हाल ! कवडीमोल भावात पिकवलेला माल जात होता . रोजचे कस्टमर खुप कमी यायाचे बँकेत . मेडीकलवाल्यांचा फक्त रोज भरणा आसायचा . एक दुधाचा व्यापारी सांगत होता 25 जनावरं  आहेत घरी 100 लिटर दुध रोज ओतुन द्याव लागतं . जनावरांना चारापाणी तर द्यावे लागतेच वर स्वच्छता रोज धारा सगळं करावे लागते. काय करणार  ? मला पण रोज मास्क हँडग्लोज घालुन सगळ्या तयारीनिशी बँकेत  जायच , उन्हाळ्याच्या झळा होत्याच , चहा नाही , सारखे हात धुवायचे सँनिटायझर वापरायचं घरी आलं की सगळं धुवायचं डोक्यावरून आंघोळ अशी कामापेक्षा इतर कामच खुप झालं होतं . पण हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं . आख्ख जगच जागेवर थांबलय आपण काय करावे. 
      इकडे घरातलं ब-यापैकी रुटीन सुरु आहे . तीन आठवडे झालेत . त्याचत्याच भाज्यांचे पुन्हा पुन्हा नंबर आले की ती कीर्तीने  एकटीने करायचं मी खुर्चीवर बसुन फक्त पहायचं हा नियम होऊन बसला .
परवा भाकरी करायचा बेत ठरवला . यापुर्वी मीच भाकरी केव्हा केली हे मलाही आठवत नव्हते . पण करायचं ठरवलंय .कारण खुप कामे हल्ली केलेलीच नाहीत विसरल्यासारखं झालय . परावलंबीपणा खुप वाढालाय . पण त्याला इलाजच नाही .सगळं नाही करु शकत . पण घरकाम उरकत नाही .खुप वेळ लागतोय कामाला . दमायला होतय . परवा मला वाटलं की ही कामं करणाऱ्या लोकांचे पांढरपेशा वर्ग शोषण करतोय . आपला त्यांचाकडे पहाण्याचा दृष्टिकोन चांगला नाही . त्यांचे कष्ट आणि त्यामानाने दिला जाणारा मोबदला खूप कमी आहे पुर्ण महिनाभर भांडी घासली तर 500 ते 900 रुपये दिले जातात . तेही भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे . पण मला वाटतं हे माझं म्हणणे पटलं तरी रुचणार नाही ब-याचजणांना . पण आपल्याला किती कष्ट पडतात हे तरी मान्य आहे का ??
आरे हो भाकरीचं आर्धच झालं. युद्ध करायच्या तयारीनीशी खुप आत्मविश्वासाने कीर्ती उभी राहिली एक भाकरी मी केली मस्त झाली . मनोमन माझ्यावरच  मी  खुश झाले. तीचा पण जरा स्वयंपाकघरात वावर सहज होऊ लागलाय आणि ज्या सहजतेने एकएक करत मोठ्या पातळ आगदी माझ्या आईसारख्या 7 भाकरी तिने केल्या . तिच्या आजीलापण खुप आनंद झाला. कांद्याची चटणी , हरभ-याची भाजी , दही आणि भाकरी असा फक्कड बेत होता ! सगळे खुश. भाकरी करतानाचा video अगदी कीर्तीच्या मैत्रिणीपर्यंत गेला . सगळीकडुन कौतुक झाल्याने कीर्ती आणि मी पण खुष झालो. चला कोरोनाचा हा दुसरा परिणाम चांगला झाला म्हणलं !!



क्रमशः  भाग 4

आज चैत्रा गौरीची मधली तीज होती. मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की गौर बसवतांना कीर्ती असेल पण या परिस्थितीमुळे पहिली तीज आता दुसऱ्या तीजेची पण पुजा तिच्याकडून ! आज कैरीची डाळ खीर आणि कलिंगडं होत नैवेद्याला. 
आत्ता मलापण तीन दिवस सुट्टी लागून आलेली. लॉकडाऊन 30 एप्रीलपर्यंत वाढलं. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता ही एक जमेची बाजू होती. पुन्हा 1/2 दिवस गव्हाची खीर बीट परोठे झाले. एक महिना पुरेल एवढा किराणा दोघांनी जाऊन मोठ्या गाडीतून आणला. आता फक्त भांड्याला मंदा सकाळी येऊ लागली . साबणाने हात धुऊन घासलेली भांडी उन्हात दिवसभर ठेऊन आत घेऊ लागलो थोडी ओढाताण कमी झाली.
     मध्ये एकदा काका-काकींची औषधे पोहोच करण्यासाठी डॉक्टरांची फाईल सोबत घेऊन हे परांड्याला टुव्हीलरवर जाऊन आले.तेवढेच तिथे काय कमीजास्त आहे पहाता आलां सगळं ठीक होतं . प्रत्यक्षात भेट घडली . सहजासहजी जाता येत नव्हते पण . मग शेताची परिस्थिती काय तेही पाहून आले होते. पुन्हा आज गेले आणि खुप वाईट वाटलं , कलिंगड्याच्या  22/23 टन मालापैकी 3 टन माल कवडीमोल किंमतीत विकला गेला होता आणि सव्वा एकरात जवळजवळ 18/19 टन मोठाली कलिंगडं नासून बसली होती वेल सुकुन गेले होते.इलाज नव्हता . नैसर्गिक आपत्तीच की ही ! आता मिरच्या लकडल्या आहेत उद्यापासून तोडा करायचा आहे पाहू त्याला कशी मिळते बाजारपेठ ते.
   इकडे बँकेत जनधनची गर्दी वाढते सोशल डिस्टनसींगमुळे लोकांना उन्हात थांबावे लागते म्हणून फक्त सोलापूरच्या कलेक्टरंनी बँक सकाळी 8 ते 2 ठेवावी असा आदेश काढला. तसा बँकेचा पण msg आला म्हणजे उद्या 7.45 ला घर सोडावे लागणार तर ! तेवढ्यात सोलापूरमध्ये पहिला करोना रुग्ण सापडला तो मृत झाल्यानंतर करोना  positive आल्याचे समजले. पुन्हा संकट इकडे आलं . पाहू आता काय परिस्थिती होणार ते.
आकांक्षा पण खुप अस्वस्थ होती . काही मुलांनी online class ला objection घेतले होते. त्यामुळे उद्या class होणार नव्हता . खरं तर अभ्यासाची लींक चालू राहिली असती तर बरं झालं असतं . पाहुया आता कायकाय होतं  ते.



  क्रमशः भाग 5


सकाळी 8 वाजता बँक अशी परिस्थिती 30 वर्षात पहिल्यांदाच आली.हेच शेड्यूल आता 30 एप्रीलपर्यंत रहाणार असं समजतय. तसं सगळीकडे बरच कडक वातावरण आहे. शाखेतपण रोज सॉनिटायझींग केलं जातय . शक्य ती काळजी घेतली जातेय. आता माझी आयुर्वेदीक औषधे संपलीत त्याचे टेन्शन आलेय पण डॉ. निलिमाने डायेट आणि व्यायामावर कंट्रोल करु शकता म्हणून सांगितले आहे.पाहु कसं होतं ते. याबाबतीत कीर्ती जरा जास्तच काटेकोर आहे.बाबांच्या पथ्याची तिला सवय आहे चहा आणि गोडावर करडी नजर ठेवतीय माझ्या. सारखा ग्रीन टी किंवा डीपडीप चहा देऊ का चालू असते. ते मला जड जातय पण माझ्या चांगल्यासाठी आहे असो.   रात्रीच आम्ही उद्याचं बरचसं नियोजन करुन ठेवलं होतं . त्याप्रमाणे पहाटे 5.30 ला उठले . कीर्तीपण लवकरच खाली आली . तिला लवकर जाग येते म्हणते . रात्री मात्र 9 वाजले की तिची घंटा वाजते झोपेची. याउलट आशिषचं रात्री उशीरापर्यंत जागं रहायचं सकाळ होईल तशी याची साखरझोप सुरु होते. मला खूप हसु येतय हे सगळं ऐकून .आता कॉरममध्ये सगळ्यांना मजा येतेय . यांचा तो खूप आवडता खेळ आहे. पुर्वी बँक सुटली सगळे staff लोक खेळायचे . बार्शीला तर बँकेच्या स्पर्धा व्हायच्या . ते दिवसच खूप वेगळे होते . काम सगळ हाताने लिहून आसायचं. भरपूर staff असायचा , कामाचं स्वरुप वेगळं होतं मजा यायची. त्यामुळे सध्या यांना पण मजा येतेय थोडसं भूतकाळात रमलेत ते . 8 वाजले की बोर्ड हॉलमध्ये मांडून वाट पहात बसतात.लहानपणी खेळल्यामुळे मनिष छान खेळतो. आकांक्षाला व कीर्तीला फारसं येत नव्हते हे शिकवतात त्यांना  ब-यापैकी जमू लागलय तिघांचा खूप गोंधळ , आरडाओरडा ,भांडाभांडी, चिडाचीड  सुरू असते. मनिष खेळात भिडू नको असतो या दोघींना आपल्या मनाप्रमाणे खेळू देत नाही तो असं म्हणून या दोघी एकत्र असतात. मग छान रंगतो त्यांचा खेळ .  नेटवरुन पण यांची सारखी भांडण सुरु असतात , स्लो झालं नेट की प्रत्येकजण एकमेकांना तुझं बंद कर म्हणतात .सारखे मीच का ? आसं सुरु असते . मला मजा येते बघायला . काय कारणं आहेत वादाची असं वाटतं आणि हसायला येतं. तस जरा घरात बसून त्यांना  कंटाळा पण आला असणार . मनिष-आकांक्षा लहान असल्यासारखे चक्क मारामारी पळापळी पण करताहेत .फोटोग्राफी मात्र खुप सुरेख चालू आहे त्याची.  रोज सनसेटला गच्चीत जातात . सुर्याचे खुप कल्पकतेने विविध फोटो काढलेत त्यांने मॉडेल म्हणून दोघी हजरच असतात.आणि सध्या भेडसावणारा प्रश्न म्हणजे खादगी. बाहेरचं खाणं आजिबात नसल्यामुळे तीनत्रीकाळ काय द्याव हा प्रश्न पडतोय . सकस , चविष्ट फक्त घरचच मिळते .

Saturday, August 1, 2020

पाककला

पपा काकी आणि पंचकन्या स्पेशल

1) अनारसे 

रेशनचे / जुने तांदूळ असल्यास चांगलेच .
तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवावे , झाकण म्हणून दुधाची जाळी वापरावी . रोज सकाळी संध्याकाळी पाणी बदलावे .
चौथे दिवशी तांदूळ धुवून जाळीत उपसून ठेवावे पूर्ण निथळल्यावर सुती कपड्यावर पसरुन ठेवावे .
3/4 तास सुकले की गार असतानाच मिक्सरमधून काढावे . पीठ चाळून घ्यावे .
पिठाचे तीन भाग करावे एका भागा एवढा चिरलेला / किसलेला गूळ पिठात छान मिक्स करावा . त्याचे लाडू करून ठेवावे .
वातावरणाप्रमाणे पीठ बाहेर किंवा फ्रिजमध्ये ठेवावे शक्यतो बाहेर ठेवावे .
मिक्स केलेलं पीठ किमान एक दिवस मुरू द्यावे .
पीठ खूप कोरडे असल्यास दुधाचा हात लावावा आणि पीठ मळून घ्यावे .
पेढ्याऐवढे गोळे करून हाताला तेल लाऊन हातावर गोळा करावा आणि थोडंसं पुरीसारखा करावा आणि खसखशीवर थापावा बोटाला तेल लावावे .
खसखस बाजू वर ठेऊन छान गरम तेलात सोडावे आणि झाऱ्याने त्यावर तेल ढकलत राहावे मंद आचेवर अनारसा तळून जाळीत उभा करावा . अनारसा थंड झाल्यावर तेल निथळल्यावर बंद डब्यात ठेवावा .


2) गुलाबजामून


एक किलो खवा , पाव किलो मैदा चहाचा चमचा भरुन बेकिंग पावडर 
सगळे छान मळून ठेवायचे .
एक किलो साखरेचा कच्चा पाक करायचा त्यात वेलची पूड घालायची .नंतर छान जामून वळायचे तेल तापवून झाले की मंद आच करून त्यात तळून गरम गरम पाकात टाकायचे
गॅस बारीक मोठा करत राहायचं . हीट लागली पाहिजे पण चॉकलेटी नाही करायचे

3) काळा मसाला

4) मेतकूट

5) चटणीपूड


साहित्य :-
हरभरा डाळ एक वाटी
उडीद डाळ एक वाटी 
खोबऱ्याचा कीस एक वाटी
तीळ आर्धी वाटी
आर्धी वाटी चिंच 
आर्धी वाटी गुळ 
छोटी वाटी धने
अर्धी छोटी वाटी जिरे
छोटा चमचा मेथ्या , खसखस
एक वाटी कढीपत्ता
लाल तिखट / सुक्या लाल मिरच्या , मीठ

कृती :-
दोन्ही डाळी खमंग भाजून घ्याव्या , तीळ खोबरे गुलाबी होईस्तोवर भाजावे , धने , जिरे , चिंच , मेथ्या, कढीपत्ता तळून घ्यावे . ( सर्व पदार्थ तळून सुद्धा चटणी पूड करता येते पण जास्त दिवस टिकत नाही वास येतो . लगेच संपणार असल्यास तळून करावी फारच खमंग होते ).
सर्व पदार्थ गार झाल्यावर वेगवेगळे मिक्सर मधून काढून एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरवर हलकेच फिरवावे .

6) डांगर


एक वाटी उडीद डाळ , पाव वाटी चणा डाळ अर्धीपावं वाटी धने , त्याच्या निम्मे जरे आणि जिऱ्या एवढेच तांदूळ...
चवीप्रमाणे लाल सुक्या मिरच्या किंवा विकतचे लाल तिखट आणि मीठ 
वरील सर्व पदार्थ वेगवेगळे खमंग भाजून घेणे . सर्व पदार्थ मिक्सर मधून रवाळ काढणे . 
बारीक कांदा अन भरपूर कोथिंबीर चिरून चिंचेच्या कोळात किंवा दह्यात आर्धा तास भिजवून ठेवावे वरुन चरचरीत हिंग कडीपत्ता घालून फोडणी द्यायची . आवडत असल्यास चवीला गुळ किंवा साखर घालावी . भाकरीबरोबर खाण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून हा एक उपाय आहे .
उडीद डाळीऐवजी आख्खे उडीद खमंग भाजून थोडं भरडून साल काढून वापरल्यास डांगर जास्त खमंग लागतो .

7) भरली मिरची


साधारणपणे जानेवारी ते मार्च दरम्यान या मिरच्या कराव्यात . लांब , सरळ , जाड हिरव्या ताज्या मिरच्या दोन किलो . दोन वाट्या मोहरी ,


 

8) डींकाचे लाडू


9) आळीवाचे लाडू


10) मेथांबा


साहित्य : - कडक आणि  तयार आंबट कैरी , अर्धा किलो गूळ , एक पळी मेथ्या , दोन तोळे खडा हिंग , अंबरी लाल तिखट , मीठ , हळद , तेल , जिरे , मोहरी .

कृती : सर्वप्रथम गुळ फोडून घ्यावा गुळाच्या ढीगाच्या तिप्पट कैरीच्या चकत्या घ्याव्या . साल काढलेल्या कैरीच्या थोड्याशा जाडसर चकत्या करून घ्याव्या .
तेल तापवून त्यात मेथ्या तळून घ्याव्या गरम तेलात हिंग खडे टाकावे ते थोडेसे फुलवून घ्यावे . गार झाल्यावर आधी हिंग मिक्सर मधून रवाळ पूड करून काढावी नंतर मेथ्याची जाडसर पूड करून घ्यावी . मेथीची 1/4 पूड आणि निम्मं लाल तिखट कैरीच्या चकत्यावर टाकून ते मिक्स करून ठेवावे .
गुळात तिप्पट पाणी घालून बारीक गॅसवर हलवत राहावे . दुसऱ्या गॅसवर पातेल्यात तीन ते चार डाव तेल घालावे तेल चांगले गरम झाल्यावर मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करावा मग फोडणीत जिरे , हळद , हिंग , राहिलेले निम्मे लाल तिखट , 3/4 मेथी पूड क्रमाने घालावे आणि लगेच कैरीच्या चकत्या घालून परतत राहावे आता त्या मिश्रणावर  मीठ घालावे आणि परतावे . फोडींचा रंग बदलल्यावर त्यात गुळाचे उकळते पाणी ओतावे . 
गॅस मोठा करून एक उकळी येऊ द्यावी व गॅस बारीक करावा . चव पाहून आवश्यकतेनुसार तिखट मीठ गूळ घालावे . मंद आचेवर 10 मिनिट उकळू द्यावे . पाण्याला दाटपणा आल्यावर गॅस बंद करून वर जाळी टाकून ठेवावी .
दुसरे दिवशी मोठ्या तोंडाच्या काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये ठेवावा . स्थिर झाल्यावर वापरण्यासाठी छोट्या बरणीत काढताना तेलाचा तवंग बाजूला सारून काढावा .
तेल वरती असेल तर सहा महिने मेथांबा टिकतो .

11) करंजी 

12) खव्याच्या वड्या

13) सुरळीच्या वड्या

14) सांडगे


   1 : मसाले बनवा घरच्या घरी


1) गोडा मसाला (काळा मसाला)
साहित्य :- धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम. कृती :- खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा. 

 
2) पंजाबी गरम मसाला
साहित्य :- 1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ. 
कृती :- जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.)  नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. टीप - हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा. 
 
3) कांदा लसूण मसाला
साहित्य :- 2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्‍या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ. 
कृती :- वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरवर बारीक करा. (विविध प्रकारच्या रस्साभाज्या व मांसाहारी पदार्थांसाठी उपयोगी.) 
 
4) स्पेशल गरम मसाला
साहित्य :- पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले). 
कृती :- सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
 
5) मालवणी मसाला
साहित्य :- अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे. 
कृती :- सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा. 
 
6) कोकणी मसाला
साहित्य : - पाव किलो लाल सुक्‍या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप. 
कृती :- वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा. 
 
7) कच्चा मसाला
साहित्य :- अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
कृती :- सर्व साहित्य कच्चेच मिक्सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी. 
 
8) चहाचा मसाला
साहित्य :- 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ. 
कृती :- वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारीक करा. 
 
9) दूध मसाला
साहित्य :- बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड. 
कृती :- वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा. 
 
10) सांबार मसाला
साहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे. 
कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.
 
11) पावभाजी मसाला
साहित्य :- लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून, सुंठ पावडर 2 टी स्पून. 

कृती :- सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. (कधी कधी बदल म्हणून नेहमीच्या भाज्यांमध्येही वापरता येतो.
 
12) चाट मसाला 
साहित्य :- दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ.
कृती :- हिंगपूड थोडीथोडी तेलावर परतून घ्या. बाकी सर्व पावडरी सोडून इतर साहित्य किंचित भाजून घ्या व एकत्र करून गार झाल्यावर मिक्सरवर बारीक करा. 
(फ्रूटचाट अगर सॅलडसाठी वापरा.)....