लाॕकडाऊन डायरी प्रकरण 3
भाग 11 ते 15
क्रमशः भाग 11
सकाळी 8 ची बँक आता पुढील निर्देश येईपर्यंत रहाणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बँकेत फारशी गर्दी नसते मुळात लोकांना 10 च्या पुढे बँकेत यायची सवय आहे त्यामुळे पहिला एकदीड तास असाच जातो . घरातून येईपर्यंत मात्र माझी गडबड सुरुच रहाते . सकाळच्या पोळ्यांना काही माझा हात नाही लागत . पण अगदी उत्स्फुर्तपणे कीर्ती आणि आकांक्षा दोघीजणी वाटून घेऊन काम चाललेलं असतं .
मागच्या आठवड्यात सोलापूर मधील करोनाबाधितांची संख्या अचानक वाढत गेली . ग्रीन झोनमध्ये आसलेला जिल्हा रेड झोनमध्ये गेला . सोलापूर शहर 3 दिवसांसाठी बंद पुकारलं गेलं . खबरदारी म्हणून पंढरपूर मग बार्शी बंदचे जनादेश निघाले . बँका अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु होत्या .
आज सकाळी 6 वाजता मी गेट उघडत होते तेव्हा नगरपालिकेच्या 2 झाडूवाल्या मला पाहून दारासमोर आल्या . आयटक अॉफिसला मी जात असते . जेव्हा भारत बंदची हाक असते तेव्हा बार्शीत सर्व कामगार संघटनांचा एकत्रित मोर्चा आसतो. त्या बायका मला पाहून थांबल्या , थोड बोलल्या . त्यांना थोड मन मोकळं करावसं वाटलं . हातावर ज्यांच पोट आहे त्यांची भयानक अवस्था आहे . कमवायला बाहेरच पडता येत नाही त्यांनी काय करावं . त्या म्हणत होत्या तुम्ही TV वर बघता एक प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी आहे. हे माहित होतच . पण प्रत्यक्ष भरडल्या जाणारांकडून विदारक सत्य ऐकायला मिळालं मन सुन्न झालं . आता आणखी काही दिवस जर ही परिस्थिती राहिली तर या अशा करोडो लोकांच कसं होणार ? आजचं काम बुडलं की कमाई बुडली पण पोट भरायला काय करायचं हा अनुत्तरीत प्रश्न आहे.
लॉकडाऊनला तर पर्याय नाहीच पण हे काय झालय "करे कोई भरे कोई "
किंवा
" कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे "
असं होऊन बसलय सगळं . राज्य सरकार केंद्र सरकार पराकोटीचे प्रयत्न करत आहेत पण निर्माण झालेल्या परिस्थितीत ते अत्यंत तोकडे पडत आहेत . माणसाच्या
"अन्न , वस्र व निवारा "
या मुलभूत गरजा
"भागवणे"
मुष्कील झालं आहे . माणूस सगळं सहन करु शकतो पण त्याचं पोट त्याला स्वस्थ नाही बसू देत .
परवा आमच्या युनीटची संघटनेची मिटिंग ड्यु होती . पण एकत्र जमणे कठीण होते म्हणून रविवारी पहिल्यांदाच आमची अॉफिस बेअररर्सची झुम मिटिंग झाली . एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला गेला . त्याहीवेळी असंघटीत क्षेत्रातील लोकांच्या एकूणच परिस्थितीवर चर्चा झाली . अनेक ठिकाणी गरजू लोकांना अन्नधान्य वाटप सुरु होते . 20 एप्रीलला AIBEA या संपुर्ण बँकिग क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या संघटनेला 75 वर्षे पुर्ण झाली . अमृत महोत्सवी वर्ष ! त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होतं . पण 20 एप्रिलला काही करता आलं नाही . भविष्यात काहीतरी करावे असे ठरले .
देशात करोनासारखं महासंकट असतांना सुद्धा सरकारने मात्र जाहीर केल्याप्रमाणे 1 एप्रीलला सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांच्या एकत्रीकरणाचा घातलेला घाट पार पाडून घेतला . त्याला विरोध म्हणून 27 मार्चला आमचा संप होता . पण करोनाचं वादळ पहाता तो झाला नाही . पण एकत्रीकरण झाले ! पुन्हा बडे भांडवलदार आधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत जाणार आहेत . खरं तर बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला मोठा इतिहास आहे . तसेच प्रत्येक बँकेला भूगोलही आहे . जसं की बँक अॉफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तसंच प्रत्येक बँकेला त्या त्या प्रादेशिक भागात महत्त्व आहे मुख्य म्हणजे त्यात्या ठिकाणच्या जनतेशी वेगळं नातं आहे . नाळ जोडली गेलेली आहे . पण या सगळ्याची पायमल्ली करत सरकारची ही कृती आहे . सध्याच्या या परिस्थिती नंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करायचा असेल तर एकत्रीकरण व हळुहळु खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल ही धोकादायक आहे . मुख्य म्हणजे ही मागणी ना बँकांची आहे ना कर्मचाऱ्यांची आहे ना ही आम जनतेची आहे . फक्त बड्या भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. की जो धोकादायक आहे . सरकारच्या या कृतीची किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे . आणि पुन्हा चुकलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल तोवर होणाऱ्या हानीला कोण जबाबदार ?
आज बँकेच्या एकूण व्यवहारापैकी जवळजवळ दोन तृतीयांश व्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकामार्फत होत आहेत . सर्वसामान्यांच्या पैपै जमा केलेल्या बचतीतील पैसा लोक बँकेत ठेवतात . यांची मालकी सरकारी आहे म्हणूनच झिरो बँलन्स खाती उघडली जातात . जनतेचा पैसा जनतेसाठी आहे . तो कोण्या भांडवलदारांच्या लूटीसाठी नाही . पण आजची बँकेची जी दुरावस्था आहे त्याला फक्त बडे भांडवलदार आणि त्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असो ! बँकांच शोषण होतंच आहे . या धनदांडग्या कर्जबुडव्यांच्या मुसक्या आवळल्या की आपोआपच बँकेची परिस्थिती सुधारेल . आणि त्यांच राष्ट्रीयीकरण अबाधीत राहिलं तर आणि तरच सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित राहू शकतो . अन्यथा त्याला सुरुंग लागायला वेळ नाही लागणार . त्यामुळे या लढाईत सर्वसामान्य जनतेने या सर्व गोष्टींकडे डोळे उघडे ठेऊन पाहिलं पाहिजे . या लढाईत बँक कर्मचारी संघटनांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे . कारण संकट तुमच्या दाराशी येऊन ठेपलय !
सध्याच्या करोनाच्या महामारीत आख्खा देश नव्हे तर जग लॉकडाऊन मध्ये आहे पण बँका तळागाळाच्या लोकांपर्यंत जनधन खात्याच्या माध्यमातून मदत पोहोचण्याचं काम करत आहेत . त्यांच्या सुरक्षीततेची आपेक्षा!!
क्रमशः भाग 12
साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त म्हणजे "अक्षयतृतिया" ! कीर्तीचा बार्शीला पहिला पाडवा झाला , चैत्रागौर झाली आता दोन दिवसात बसेल ते कुलदैवत श्रीनृसिंहांच नवरात्र मग नृसिंह जयंती त्यादिवशी अभिषेक सायंकाळी जन्म मग वसंत पूजा आणि दुसरे दिवशी पौर्णिमेला पारणं त्याला "वैशाखी " म्हणतात . या सगळ्यासाठी दरवर्षी मुंजा, सवाष्ण-ब्राम्हण , गुरुजी असतात . पण यावर्षी कोरोनामुळे हे बहुदा घरापुरतेच मर्यादित ठेवावे लागणार असे दिसते . पण एक विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं कीर्तीला आनुभवायला मिळणार आहे . तसं बहुतेक वेळा आशिष आकांक्षा जयंतीला आलेलेच असतात पण तिघेपण नवरात्र बसण्यापासून घरी असणार आहेत , परमेश्वराची इच्छा ! पण जिल्हाबंदी असल्यामुळे काका-काकींना परांड्यातून आणण्यात अडचणी येताहेत . आता पोलिस परवानगी घेतल्याशिवाय इलाज नाही तो प्रयत्न चालू आहे . पाहू काय होतं ते . सध्या सगळं घरातल्या घरात चालू आहे बाहेरचं चटक मटक खादगी नाही मुख्य म्हणजे पाणीपुरी आणि आईस्क्रीम नाही ! कीर्ती आणि आकांक्षा दोघींचीपण हे दोन पदार्थ मिळविण्यासाठी चाललेली धडपड आणि तगमग ! काहीतरी करतात पण सगळं साहित्य उपलब्ध नाही म्हणून मग आकांक्षा आणि कीर्ती थोड्या अस्वस्थ असतात , त्यावर उपाय म्हणून सुरु असतं काहीबाही करणं . पण मनासारखा काही मेळ बसलेला दिसत नाही . मी आपली निवांत पहात बसते . बघा म्हणलं थोडी कळ काढायला शिका . आसो .
यावर्षी पावसाळा अनियमीत झाला त्यामुळे इकडच्या भागात आंब्याला मोहोरच नाही आला तर आंबे कुठून येतील . दारात एवढं मोठ्ठ आंब्याच झाड पण आंबा नाही हे जरा चुकल्यासारखं होतय . कारण या दिवसात कैरीच्या पदार्थाची रेलचेल आसते घरात आधी छोटीशी कैरी मग तिखटमीठ लावलेल्या फोडी, नंतर लोणच , चटणी , कायरस , मेथांबा , छुंदा ,आंब्याचा शिरा , ओला नारळ घालून वड्या , गुळांबा , साखरांबा रोज रस आणि कधीमधी जोडीला भजी शेवटी आंबा पोळी ! कित्ती पदार्थ ते , प्रत्येकाची चव न्यारीच ! पण निसर्गच तो थोडाच आपल्या मनाप्रमाणे चालेल ? यावर्षी इकडच्या भागात बाजारात पण कैरी नाही असो . पुढच्या वर्षीची वाट पहायची दुसरं काय .
निसर्गाच दुसरं रुप मात्र सध्या न्याहाळता येतय . हल्ली हल्ली पक्षांचा वावर खूप कमी झाला होता . पुर्वी खूप वावर असायचा . 12/15 वर्षापूर्वी एकदा दारातल्या झाडावर चिऊताईनं घरटं बांधल होतं . त्यात 3 अंडी घातली होती छोटी छोटी पिल्ल पण पहायला मिळाली तेव्हा . मनु आकांक्षाचा तेव्हा रोज निरिक्षण करणं हा छंदच झाला होता आणि तो सगळा अनुभव घेतांना मला खूप आनंद व्हायचा . पण हल्ली हळुहळु चिमण्यांची किलबीलच बंद झाली होती . पण करोनाच्या शांततेमुळे पुन्हा पक्षांचा वावर वाढला आहे . परवा तर वरच्या घरात रात्री चिमणी हॉलमध्ये येऊन बसली होती . आम्ही लहान असतांना हा अनुभव रोज घ्यायचो. घेरडीत धाब्याच घर होत . आणि दरवाज्याच्या वर हवा येण्यासाठी सळया लाऊन झरोका सोडलेला असायचा . त्यातून हक्काचं घर असल्याप्रमाणे मुक्कामाला 3/4 चिमण्या यायच्या . आढी खांब याच्या वळचणीला बासायचं व सकाळ झाली की निघून जायचं हा त्यांचा नियम होता . सोप्यात दरवाज्यावर काकांनी मोठ्ठा आरसा लावलेला होता. सकाळी आरशाच्या फ्रेमवर चिमणी बसायची आणि तिच्याच प्रतिबींबाशी टोच्या मारत बसायची . कधी कधी तर इतकी ओरडायची आणि जोरजोरात चिवचिव करत भांडण करायची मग आम्हांला तिला हुसकून लावायला भाग पडायच कधीकधी . पण त्यांच प्रतिबींबाशी चाललेलं द्वंद्व पहायला काही वेगळीच मजा वाटायची .
आता हे आनुभव लुप्त झालेत पण सध्याच्या लॉकडाऊनच्या शांततेमुळे पहाटे दार उघडलं की आल्हाददायक गारवा त्यातच चैत्र पालवी फुटलेला आंब्याच्या पोपटी पानांचा हिरवट सुवास पारिजातकाच्या पालवीचा सुवास मन मोहून टाकतो . आणि त्याचवेळी आंगणात चिमण्यांची चिवचिव , कोकीळा कुजन, मधुनच खूपदिवसांनी भारद्वाज पक्षाची फडफड निरनिराळे रंग वेगवेगळे आवाज आणि सुवास मन प्रफुल्लीत करतं . पाणी कमी असलं की उन्हाळ्यात झाडांना बादलीनं पाणी घातलं जातं . दारात सडा आणि झाडांना पाणी कामवाली नसल्यामुळे कित्येक वर्षांनी हे काम माझ्याकडे आलय . पण तोही अनुभव खूप मस्त आहे . पाणी घालतांना झाड आपल्याशी बोलतात असं वाटतं . ती डोलायला लागली की नृत्य करतात असा भास होतो. दुपारी तप्त उन्हाच्या काहिलीवर सकाळच्या प्रसन्न , शितल गारवा मिळाला की येणारा दिवस सुसह्य होतो .
क्रमशः भाग 13
सध्या साधारणपणे रोजचं रुटीन सारखच होऊन बसलयं . महत्प्रयासाने परवा छोटे छोटे 4 आईस्क्रीम मिळाले तर ते पाहून या पोरांना परमानंद झाला . सहज मिळतं तेव्हा इतकं आप्रुप कधीच वाटत नाही . मनात येईल तेव्हा व हवं तितकं खायचं हे सगळ्यांचच आहे पण सध्या परिस्थिती वेगळी आहे . तिघजण ते आणि आईस्क्रीम चार झाले . एक एक्स्ट्रॉ कोण खाणार आशा नजरा भिरभिरायला लागल्या . प्रत्येकजण एकमेकांना आग्रह करतोय पण स्वतःला मिळालं तर बरं आसं प्रत्येकाला वाटतय . सगळेच लहान झालेत आसं वाटलं मला ! तसंच खाण्याचं पण झालंय सगळं घरी बनवलेलं पारंपारिक खाणं सुरु आहे . काहीतरी वेगळं करायचं आसेल तर एखादं काही मिळत तर काही मिळत नाही . तसं मॕफको मटार , पनीर , क्रीम , बटर , फ्लॉवर , ढोबळी , दुधी किंवा बाहेरुन येणाऱ्या काही भाज्या जरा मिळतच नाही . परवा किराणा आणतांना पाणी पुरीचे दोन पॕकेट मिळाले या दोघींना काय आनंद झाला .पण रगडा करायला मटार नाही . कांदे , बटाटे , टोमॅटो , वांगी , शेवगा आणि पालेभाजी एवढं रोज मिळते . तेच आलटून पालटून करायचं . कडाधान्यं करायची . तसच कामं पण स्वतःच करत असल्याने काही कामं लक्षातपण नाही येत. सध्या भाज्यापण फारशा नसल्यामुळे फ्रीजकडेपण फारसं नाही पाहिलं जात त्यामुळे तो डिफ्रॉस करायचा राहून गेला . आईस्क्रीमचा गोंधळ पाहून परत दुसरे दिवशी मिळु शकेल म्हणाल्यामुळे आज यांनी पुन्हा जाऊन 4 आईस्क्रीम आणले जास्त मिळेना . आणुन ठेवलेले आईस्क्रीम खायला काढण्यासाठी मनिषने फ्रीजर उघडला तर त्याला बर्फाचा हिमालय झालेला दिसला . त्यांन कुलरला वापरु म्हणून स्क्रु ड्रायव्हरने तो बर्फ उचकला हे पण होते त्याच्याबरोबर आणि तो जोरात ओरडाला आई तुला भाजीला मटार सापडले .आम्ही तिघीजणी
" आणि काय हवं " मधला "पुरणपोळी "
हा भाग पहात बसलो होतो . हे बाहेर आले आणि म्हणाले आता मटारची उसळ वगैरे होईल 1/2 वेळा पुरतील एवढे मटार सापडलेत बघ फ्रीजमध्ये . खजाना हाती लागला की काय असं आकांक्षा-कीर्ती पळत फ्रीजकडे आल्या . पाठोपाठ मी पण आले पाहिलं तर चांगले एकदीड किलो मटार असतील ते . दोघीजणी खूष ! चला आता पाणीपुरीचा मस्त रगडा होतोय तर ! मनिष म्हणतोय बरं झालं ना आता भाजीला ? मी म्हणलं वेड्या भाजी कसली म्हणतोयस आता याचा 4/5 वेळेस तरी नक्की उपयोग होणार 2/3 वेळा रगडा एकदा पावभाजी . तर हळुच म्हणतोय मटारच्या करंज्या होतील काय ? बघा मग कसं वाढत चाललं सगळं .
मला पुर्वी एक "SSY" म्हणजे सर्व सिद्धी समाधी योग असा क्लास होता त्याची आठवण झाली 21 दिवसांचा कोर्स असायचा शेवटचे 3 दिवस ते ठिकाण न सांगता मुक्कामी न्यायचे सगळं त्यांचच असायचं . खायला अगदी मोजून दिलं जायचं . सगळेजण ताट स्वच्छ करायचे कारण काय तर अन्न कमी दिलं जायचं . भरपूर फी भरुन आरोग्यासाठी लोक करायचे हा कोर्स ! परत आल्यावर मात्र प्रत्येकजणाला अन्नाची किंमत कळायची . तसं काहीसे झालेय या कोरोनामुळे . सगळी मुल्यं समजु लागली आहेत . सर्व काही पैशाने होत नाही जनजिवन सुरळीत असलं पाहिजे निसर्गचक्र व्यवस्थित चाललं पाहिजे . कशाचाच अतिरेक नसला पाहिजे . तसच
मनावर पण ताबा ठेवता आला पाहिजे .
क्रमशः भाग 14
या लॉकडाऊनमुळे काय अनुभव यायला लागलेत खरं पण मजा आहे ! 30 एप्रिल हा माझा जन्मदिवस ! तसं लहानपणापासून वाढदिवस साजरा करणे असं काही फारसं माहेरी नव्हतं आणि लग्नानंतर पण इकडे सासरी तसंच . त्यामुळे सेलिब्रेशन किंवा केक करणे या भानगडीत मी कधी पडले नाही . मनिषचा जन्म श्रावणी पोळ्यादिवशीचा, पिठोरीचं वाण असतं त्यादिवशी आमच्याकडे त्यामुळे दरवर्षी पुरण आणि वाण ठरलेलं आसतं . तोच वाढदिवस म्हणतो आम्ही तर आकांक्षा दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेची ! वाढदिवसाचा म्हणून एखादा जास्तीचा ड्रेस दिवाळीतच घेऊन ठेवायचा आणि रविवारी पाणीपुरी करायची . ती फार भुणभुण करायची आपण का नाही करत वाढदिवस म्हणून. पण आजकाल पुण्यात गेल्यामुळे होस्टेलवर मैत्रिणी करतात त्यामुळे बरं आहे .
आता लॉकडाऊनमुळे सगळे बार्शीला आहेत, तर करु काहीतरी खायला असा मी विचार केलेला. सध्या बँकेत काम कमी म्हणून पुन्हा रोटेशननी काम करुयात तर हो-नाही चाललेलं . काय ठरते ते मला कळवा आसं सांगून मी 29 ला बँकेतून घरी आलेले सुट्टीचं नक्की नाही म्हणून कोणालाच बोलले नाही.
सकाळी उठले तर मँनेजरचा msg होता आज तुम्ही येऊ नका म्हणून, बरं झालं म्हणलं . तोवर कीर्ती आली मला शुभेच्छा दिल्या . मी तिला सांगितले मला सुट्टी आहे तर होका एवढच म्हणाली . मी लवकर जाते बँकेत ,तोवर मनु आकांक्षा उठत नाहीत , तर आज 7.30 लाच मनिष खाली आला तु बँकेत जाशील म्हणून तुला शुभेच्छा द्यायाला उठलो म्हणाला , मी सुट्टी घेतली म्हणलं तर होका म्हणाला . 10 मिनिटांत आकांक्षाच पण तसंच झालं . मी सुट्टी सांगतेय आणि,हे तिघे एकमेकांकडे बघतात मला कळेना . पुन्हा स्वयंपाक घरात माझं काम सुरू झालं कीर्ती म्हणाली आज मी सँडवीच करणार तुम्ही खावा मीच करणार सगळं, बरं म्हणलं . मग स्वयंपाक पण झाला . मी आतच होते मग आकांक्षा म्हणाली " तू अचानक सुट्टी घेऊन आमचा पोपट केलास आता तिकडे जाऊन बस आम्हांला काहीतरी करायचय तु बघायचं नाहीस " मग लक्षात आलं मी 2 वाजता परत येईपर्यंत काहीतरी करायचा यांचा प्लँन होता . यांना माझी अडचण झाली दिसतय . असो म्हणून मी हॉलमध्ये बसले 2/3 तास त्यांचे अथक परिश्रम चालू होते. मनिषची पण लुडबुड सुरु होती . पुन्हा जेवायची वेळ झाली सगळे बसलो जेवायला . तर सकाळी केलेलं सगळं तेच होतं . आरे काय केलय दाखवा तरी म्हणलं तर 4 वाजता बघ आता तु आराम कर म्हणाले .बरं , आसुदे म्हणलं परत झोपले . मग मला whatsapp करतात या दोघी आपली गरज आहे या इकडे. मी गेले तर दोघीपण छोटासा चेहरा करुन बसलेल्या . ओमफस्स झालंय काहीतरी हे लक्षात आलं माझ्या .
पाहिलं तर मनिष फींगर चीप्स आणि या दोघी केक करणार होत्या . एक केक बिघडला म्हणून जेवणानंतर त्यांनी दुसरा केलेला तर दोन्ही केक दगड होऊन बसलेले ! आता काय करावं ? दोघी रडकुंडीला आल्या . मी तर कध्धीच केक केलेला नाही आकांक्षाला पण येत नाही कीर्तीला पण नाही पण ज्योती आणि युट्युब follow करुन केलेला केक पुर्ण बिघडला होता .केक, ढोकळा ,सुरळीच्या वड्या आणि चायनीज याच्या मी नादी लागत नाही . 1/2 वेळि केलेला प्रयत्न फसल्यामुळे पुर्वीच नाद सोडला मी . याचं आकांक्षाला फार वाईट वाटतं ती सारखी माझ्या मागे असते . सगळे करताता आई आपण पण करु . बरोबर दोन वर्षापुर्वी तिने याकारणास्तव ओव्हन घ्यायला लावला . पण तो सध्या cover घालून वरच्या घरात असतो . आकांक्षाला आता कीर्तीची जोड मिळाली आणि ठरवला त्यांनी बेत . 4 वाजता सुंदर केक कापतांना फोटो काढून ग्रुपवर , स्टेटसला टाकायचं असं त्यांच ठरालेलं . रोज सगळ्यांचे फोटो स्टेटस बघुन चर्चा त्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं .म्हणून आगदी हिरिरीने दोघींनी युद्धाच्या तयारीसारखी तयारी केलेली पण स्वप्न भंग पावलं त्यांचे
सगळी मेहनत पाण्यात ! मुख्य म्हणजे सगळे फँमिली ग्रुप काहीतरी सरप्राईजची वाट पहात आसणार सगळा पचका झाला आसं त्या तिघांना वाटू लागलं . मला एकदम मी आणि मायडीनं बदलापूरला केलेल्या तिळगुळाच्या वड्यांची आठवण झाली . संक्रांतीच्या हळदीकुंकासाठी आम्ही पण महत्प्रयासाने दुपारभर राबराबून वड्या केल्या कशातरी त्या झाल्या . भाऊजींच्या येरझा-या सुरु होत्या . काहीतरी बेत फसलाय हे लक्षात आलेलं त्यांच्या . आम्ही त्या वड्या स्टीलच्या कुंड्यात भरुन ठेवल्या थोड्या वेळांनी भाऊजींनी वरची वडी घेण्याचा प्रयत्न केला तर आख्खा कुंडा उचलला गेला . भाऊजी आम्हांला चिडवू लागले काय घातलाय बहिणी बहिणींनी गोंधळ
" बजरंग बली की जय "
म्हणून उचलावी लागतेय वडी ! असंच काहीसं आजच्या केकचं झालंय. हासून हासून पुरेवाट झाली तेव्हाही आणि आजही ! परवा मागच्या आठवड्यात ढोकळा पण साधला नव्हता . यावेळी मग ठरवलंय केक आणि ढोकळा जमलाच पाहिजे आपल्याला काय चुकतं ते आपण पाहू .
मग फक्त फिंगर चिप्स खात फोटो काढायचं ठरलं . मग पुन्हा छान आवरुन बसायचा आग्रह . आम्ही खात असतांना आकांक्षा व कीर्ती उठुन आत गेल्या . दीड महिन्यापासून सगळे घरातच असल्यांने गीफ्टची शक्यता नव्हती . तरी उत्सुकता ताणली गेली. हात मागे बांधुन दोघी बाहेर आल्या . मग एक सुदंर पाकिट दोघींनी माझ्या हातात दिलं आणि सांगितले हे पाकिट घरातल्या कागदापासून अतिशय कल्पकतेने आकांक्षाने बनवलय आणिआतलं आहे ती कीर्तीने ! काय आहे बघ आमची उत्सुकता ताणली गेली . मग पाकिट उघडलं तर आतमध्ये चार पानी पत्र "सौ. कीर्तीकडून सौ .आईनां! "
मग ते उघडून मी वाचलं आमच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंतचा प्रवास आणि त्यात्या वेळच्या तिच्या भावना खूप सुंदर लिहिल्या आहेत तिने त्या . सुंदरशा पत्राची भेट ! कल्पनाच इतकी भन्नाट वाटली न मला. यापेक्षा सुंदर गीफ्ट काय आसू शकतं माझ्यासाठी ?
मग त्याच वाचन केलं मी थोडा वेळ भारावल्यासारखं झालं वातावरण . कीर्तीला लिहायची सवय आहे . वाचनही भरपूर आहे . त्याची झलक दिसली . मी पण परमेश्वराकडे हे एकच मागणं केलं देवा सर्वांना चांगली बुद्धी दे नात्यातला गोडवा समृद्ध होऊ दे . सर्वांना सुखी ठेव !
मग आमच्या कुटुंबाला प्रीय असलेला फक्कड चहा झाला . आज ज्योतीला फोन करुयात ढोकळा आणि केक उद्या जमलाच पाहिजे हा निश्चय केला .पुन्हा हास्स्याचा कल्लोळ सुरु झाला . कँरम निघाला आणि उद्याचा केकचं नियोजन करत खेळ सुरु झाला.
कीर्तीकडून मिळालेलं पत्र
30/04/2020
Dear mom-in-law
( आहो आई )
आशिषची आई , माझ्या होणाऱ्या सासुबाई , mom-in-law , अग्गबाई सासुबाई आणि आता आहो आई असा आपला प्रवास!
एप्रिल महिन्यात तुमचा वाढदिवस आणि आपल्या भेटीचासुद्धा ! सासुबाई ह्या व्यक्तीमत्वाचा खरं तर बागुलबुवा होता माझ्या मनात . मैत्रीणी , बहिणी ह्यांच्याकडून ऐकून एक व्यक्तीरेखा तयार होत गेली होती . त्या प्रतिमेला तडा देत मला भेटलात तुम्ही ! Cool सासुबाई !
पहिल्या भेटीतच
" शगुन के कंगन "
म्हणत हातात बांगड्या घालून मिठी मारली ना तेव्हाच समजलं मला की मज्जा येणार आहे खुपच ! हे रसायन काही वेगळंच आहे :-)
पहिल्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत दडपण कधी येऊनच नाही दिलं मला कोणताही event असो , तुमचा उत्साह आम्हां तरुणांना लाजवेल असा असतो . सुनेच्या 25 व्या वाढदिवसाला 25 गिफ्ट्स करुन सरप्राईज देणाऱ्या सासु आणि नणंद असतात का कुठे ? मैत्रीणीच आहात तुम्ही माझ्या !
मग आला साखारपुडा .
" केले की जमतेच "
हे तुमचे ब्रीदवाक्य : आमची केतकी नाचु शकते ? ते ही इतके छान ? मानलं राव तुम्हाला ! कार्यक्रमाला रंगत आणाली ती तुमच्या कवितेने . सर्वांनाच डोळ्यासमोर आमची Arranged Love story अगदी Film सारखी दिसली .
एकच वर्ष झालंय तसे . पण आठवणी उफाळून येत आहेत . ब्लाऊजवरुन झालेला राडा तर आठवायलाच नको ! बाळासारखी समजूत घातलीत तुम्ही माझी . माझी आई असती तर रागावली असती शिस्तीत . आणि खरंच तुम्ही म्हणालात तसं आता एक नंबरचं ब्लाऊज वाटतेय ते मला .
लग्नाची धामधूम सुरु करायच्या तयारीत असतांना एकदम मी अजारी पडले . ह्यापुर्वी कधी ताप न आल्यांने जरा घाबरलेलेच होते मी . आई-बाबा सुद्धा टेन्शनमध्येच होते . तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलेले . आज ही मी अधूनमधून वाचते. धीर येतो वाचतांना खरच . घाबरायचं नाही आजिबात हे शिकते आहे मी तुमच्याकडून . जशी एक आकांक्षा तशीच दुसरी कीर्ती हे नुसते लिहीण्यापुरतं वाक्य
नाहीच . ते प्रत्येक गोष्टीमध्ये जाणवतसुद्धा होतं मला .
आई-बाबा पण नेहमी उल्लेख करतात की काळजींच नाही इतकं छान सासर मिळाले आहे तुला असंच म्हणतात नेहमी . शंभर टक्के सत्य !
कुठल्याशा serial मधल्या त्या शुभ्रावरुन आपलं सुरु झालं अग्गबाई सासुबाई पर्व ! रोजचे GM चे मेसेज चुकत नाहीत आणि दिवसभर गप्पाटप्पा नाही झाल्या तर चुकल्यागत वाटते . असे करत लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पळत होते . लग्न महिन्यावर आले आणि चक्क तुम्ही आशिषला pre-wedding shooting साठी आग्रह केलात . खरंच परत कधीच झालं नसतं की ! मज्जा आली हो खूप.
हा हा म्हणता लग्न झालं की .... चि.सौ.कां.ची झाले मी सौ.कुलकर्णी ! तसा बार्शीमधला मुक्काम धावपळीतच गेला . एकटं awkward किंवा नविन अशा भावनांचा लवलेशच नाही कुठे.
न्युझीलंड ट्रीप पुर्ण करुन घरी परत येणे जीवावर आलेलं. आरे संसार संसार सुरु करणे सोप्प आहे का ? तरी तुम्ही येते म्हणालेलात त्यामुळे काळजी नव्हतीच . प्रदीर्घ प्रवास करुन एकदा घर आलेलं तेव्हा इतकं बरं वाटलं . पहाटे 6 ची वेळ पण उत्साहाला वेळकाळ असते का ? चक्क डोळे चोळत फुलांचा गुच्छ घेऊन तुम्ही , पप्पा आणि आकांक्षा तयार होते स्वागताला .......मस्त वाटलं ओ ! शीणच ओसरला प्रवासाचा .
पुढचे दिवस मस्त घरात सामान लावणे , स्वयंपाकाच्या काकू ठरवुन देणे अशी मस्त घडी बसवून दिलीत. सर्व डाळींपासून ते किसलेल्या गुळापर्यंत सगळं आणलेलं . प्लँनिंग किती perfect करायचं असतं हे पण शिकते आहे मी तुमच्याकडून !
संध्याकाळी आल्यावर कुलुप बघायची सवय लगेच 5/6 दिवसात मोडलीच की . व्यायाम करायचा , चहा प्यायचा , गप्पा मारायच्या बार्शीला गेलात ना तेव्हा घर खायला उठलेलं मला आणि आशिषला.
पाकशास्त्रामध्ये माझे प्रयोगातून विज्ञान सुरू होतेच. कोरोना मुळे इकडे बार्शीला आले तसे सुरू झाले अहो आईं चे पर्व.
बाकी जग ठप्प झाले असले. तरी ह्या कोरोना मुळे मिळालेला वेळ आपल्या दोघींसाठी सुवर्णसंधी ठरली.
मला जमेल की नाही किंवा मला जमतच नाही... अशी माझी सुरुवात असते नेहमीच. तुम्ही मला इतकं मस्त motivate केलत ना..
पाककला सोप्पी मुळीच नाही पण अवघड मात्र नक्कीच नाही.. हे वाक्य बिंबवले माझ्या मनात.
पापडासारख्या पोळ्या बनवणारी मी हा हा म्हणता पदार्थ बनवायला शिकले की ओ! उडीद वडे, साधी पोळी, वरण फळे, थालीपीठ, भाकरी आणि साग्रसंगीत पुरणपोळी सुद्धा!! अबब..! माझी आई, आजी, मावश्या विस्फारून माझे पदार्थांचे फोटो बघत असतात. अनिरुद्ध ने तर पुण्यात आमच्याकडे राहायला येणार असेच सांगितले. पाककलेच माहीत नाही पण confidence नक्कीच वाढलाय माझा
All credit to अर्थातच: अग्गबाई सासूबाई!
आणि तुम्ही मला इतकं लाडावून ठेवलंय ना.. ऑफिसच ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ice cream देणार म्हणून promise केलं आणि लाॕकडाऊनच्या काळात काहीच मिळत नसतांना खरंच एकदम ice cream आणलं सुद्धा. त्या ice cream ची मज्जा काही औरच! Ice cream मधे लाड आणि प्रेम उतरलं होते भरभरून!
सौ बातो की एक बात: लाडकी लेक, लाडकी बहिण सगळ्याच असतात. लाडकी सून बनायला भाग्य लागते. अशा भाग्यवान सूनेकडून सुपर डुपर मस्त सासूबाईंना पहिल्यावहिल्या पत्रातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
तुमचीच,
लाडकी सूनबाई!!
क्रमशः भाग 15
एकूणच माझा वाढदिवस स्मरणात राहिल असा साजरा झाला . दिवसभर फोन चालूच होते. संध्याकाळी ज्योतीचा फोन आलाच . केक , ढोकळा , सुरळीच्या वड्या व चायानीजसाठी तिच्याकडे ट्रेनिंग घेणार हे ठरवून झालं. आदलेदिवशी या दोघींचा फोन झालेला होता मग काय झालं विचारणा सुरु होती. आम्ही दोघी बोलल्यावर हे लक्षात आलं की प्रत्येक वेळी बेकींग पावडर ही फ्रीजमध्ये ठेवलेली बरीच जुनी वापरण्यात येत होती . पुन्हा रात्रीच मी जाहिर करुन टाकलं उद्या सकाळी मनिष बेकिंग पावडर व सोडा आणेल व आम्ही रव्याचा केक करणार . 1 मे कामगार दिनाची सगळ्यांना सुट्टी होती . आज पहिल्यांदा हापूस आंबा मिळाला होता . आणि कै-या पण .सोडा व बेकिंग पावडर या छोट्या दोन वस्तूंसाठी सकाळी दुकानासमोरच्या मोठ्या रांगेत मनिषला उभं रहावं लागलं . म्हणलं बरोबर आहे केक तर आठवणीत राहिलाच पाहिजे .रसाचा बेत केला . आणि आम्ही केक करायला 4.30 वाजता सुरुवात केली . उगाचच सगळ्यांची उत्सुकता वाढली होती .सुट्टी होती त्यामुळे कैरीची चटणी, पन्हं मेथांबा आणि उपासासाठी शेंगदाण्याचे लाडू इतक्या कामाचं नियोजन होतं. मनिष आणि हे इतक्या उकाड्यात उगाचच केक बघायला स्वयंपाकघरात येऊन बसले . केकचा कुकर व्हायला वेळ लागत होता.उगाचच मनिषला चैन नव्हती एवढावेळ बसण्यापेक्षा सगळ्यांसाठी उखळात कुटुन लाडू करण्याची जबाबदारी त्यांने स्वतःहून घेतली .आणि तेल सुटेपर्यंत शेंगदाणे कुटून मस्त लाडू केले . तोवर केक काढायची वेळ झाली . परवा महाभारतात वस्त्रहरणाच्या सीनमध्ये लज्जारक्षणासाठी द्रौपदी जसं डोळे झाकून "हे श्रीकृष्ण " म्हणत होती तशी प्रार्थना आकांक्षाने कुकरभोवती प्रदक्षिणा घालून केली .
"आमच्या केकची ख्याती खूप गाजलेली आहे आमच्या आईने सर्वदुर आजच्या केकचा डंका पिटला आहे हे श्रीकृष्णा वाचव केक चांगला फुगू दे "
आणि कुकरच टोपण उघडले असता लुसलुशीत टम्म फुगलेला केक पहायला मिळाला आणि आनंदाने दोघी उड्या मारु लागल्या .
त्यानंतर आता विविध प्रकारच्या केकची आणि ढोकळ्याची घोषणा झालेली आहे . यथावकाश तेही पदार्थ घरी तयार होतीलच . कारण 3 मे ला लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी तिसरा लॉकडाऊन जाहिर होणार आहे त्यामुळे पुढच्या 15 दिवसांसाठी नविन खादगी शिकायला आणि खायला मिळणार . या आठवड्यात आता पहिला आठवडा म्हणून मला भरपूर काम आहे . पेन्शन , पगार , जनधन मदत तसेच नृसिंह-जयंती पण आहे . सोलापूरला करोनाची संख्या रोज वाढतेय त्यामुळे बार्शी बरेच कडक केलंय त्यामुळे ह्यांना परांड्याला जाता येत नाही . त्यामुळे जयंतीला काका-काकी येणं कठीण वाटु लागलय .दोन्ही जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागते .विविध प्रमाणपत्र लागत आहेत शिवाय प्रवासासाठी वयाचीपण अट आहे 65 पेक्षा जास्त वयाला प्रवास नाही करता येत .पाहू कसं मँनेज करता येतंय ते . नाहीतर 18 मे पर्यंत शांत बसणे . इलाज नाही
केक चवीला पण छान लागला दिसायला पण छान दिसला . चला तर मग अजुन एका पदार्थात वाढ !