*"महिलांच्या" च्या नजरेतून औरंगाबाद युनिट .........*
1980 नंतर एकूणच बँकातून मोठ्या प्रमाणात भरती झाली त्यात बऱ्यापैकी महिलांचा ओघ वाढला होता . पण त्याकाळात महिलांना जाणीवपूर्वक शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग दिली जायची . 1985 नंतर मात्र चित्र बदलत गेले जशा व्हेकन्सीज असतील त्याप्रमाणे पण त्यातल्या त्यात सोयी असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी पोस्टिंग दिली जाऊ लागली आणि पुढेपुढे चित्र बदलत गेले महिलांची संख्या वाढू लागली आणि हळूहळू ग्रामीण भागात महिलांना पोस्टिंग मिळू लागली . आज बँकेत सर्वत्र आणि सर्वच केडरमधून मोठ्या संख्येने महिला दिसून येत आहेत . 2013 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी 21.73% होती ती 2024 मध्ये 28.12 इतकी झाली आहे .
महिलांची बँकेतील पर्यायाने संघटनेतील वाढती संख्या लक्षात घेत दूरदर्शीपणा ठेवत AIBEA नी 1995 पासून मेट्रो सिटीमध्ये Women convention घेतले आणि 2014 मध्ये प्रत्येक बँकेत , प्रत्येक लेव्हलवर Women's Council असावे आणि त्यांची कार्यप्रणाली कशी असावी याविषयी ठराव पास केला . महिलांना दुहेरी भूमिकेत काम करत असताना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता , स्वच्छतागृह तसेच यात काही नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना येणारा ताण यावर मोकळेपणाने चर्चा व्हावी , मंथन व्हावे आणि सेवाशर्तींमध्ये योग्य त्या सुधारणा घडवून आणाव्यात हा त्यामागचा मुख्य उद्देश होता .
यावर तातडीने बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद युनिटच्या 4-5 जानेवारी 2014 रोजी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या अधिवेशनात महिला मेळाव्यामध्ये AIBEA च्या जॉइंट सेक्रेटरी कॉ. ललिता जोशी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद युनिटच्या Women's Council ची स्थापना करण्यात आली आणि औपचारिकता म्हणून फक्त नावापुरती स्थापना न करता महिलांचा सक्रिय सहभाग कसा राहील यावर जाणीवपुर्वक भर दिला . यावेळी कॉ. उमा पिंगे , कॉ. संजीवनी कुलकर्णी आणि कॉ. रोहिणी दुस्सल सारख्या महिला प्रतिनिधी आघाडीवर होत्या . तिन्ही रिजनमध्ये ज्याज्या शाखेत महिला कर्मचारी आहेत त्याठिकाणी महिला प्रतिनिधींनी शाखाभेटी करत त्याठिकाणी महिला म्हणून काम करत असताना येत असलेल्या अडचणी प्रामुख्याने स्वच्छतागृह याविषयी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला . प्रत्येक अधिवेशनात स्वतंत्र महिला मेळाव्याचे आयोजन हे या युनिटचे खास वैशिष्ट्य आहे . याठिकाणी युनिटकडू वेगळी वाट चोखंदळलेल्या कॉ. अमरजीत कौर सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न राहिला . प्रत्येकवेळी नेहमीच या युनिटकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊनच निघायला व्हायचे . आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना याठिकाणी नक्कीच वाव मिळतो हा अनुभव आहे . जिल्ह्याच्या ठिकाणी महिलादिन फक्त साजरे न करता प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा अंतर्भाव करत महिलांना आत्मभान देण्याचा प्रयत्न केला गेला आणि आजही केला जातो . महिलांचा चळवळीत सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहनात्मक मांडणीवर लक्ष केंद्रित केले गेले . आज तुम्ही जर उच्चशिक्षित होऊन भविष्य घडवण्यासाठी काही स्वप्ने उराशी बाळगत बँकेत येत असाल तर येणाऱ्या अडचणी या तक्रारीच्या सुरात , रडकेपणाने न मांडता आपले अधिकार लढवय्या भूमिकेतून कसे मांडले पाहिजेत याचे प्रात्यक्षिक औरंगाबाद युनिटमध्येच मिळू शकते .
" Women's Empowerment if not we then who ?"
यासारख्या विषयावर चर्चासत्र घडवून आणणे त्यासाठी मुलींना प्रश्नावली आधी पुरवणे यासारखे दर्जेदार प्रयोग याच युनिटमध्ये घडतात हे नक्की . हे इतरठिकाणी गेल्यावर प्रकर्षाने ऐकायला मिळते आणि अनुभवायला पण मिळते .
कार्यकर्त्यांचे शिबिर अनेक ठिकाणी घेतले जाते तसे इथे पण घेतले गेले आहेत पण आनंदवन , हेमलसा अशा ठिकाणी चाळीस एक महिला-पुरुष कार्यकर्त्यांची सामाजिक सहल ही औरंगाबाद युनिटमध्येच झाली असावी असे मला वाटते आणि त्याचा अभिमानदेखील ! पण आज एका गोष्टीची खंतही वाटते की ज्याप्रमाणे संघटना महिलांचा विचार करत महिलांनी मागण्यापुर्वी त्यांच्या एकूणच गरजा ओळखत सेवाशर्ती सेट करत आहे , त्याप्रमाणात नवीन सभासद झोकून देऊन संघटित कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत . त्यांची कार्यपद्धती आत्मकेंद्रित होत आहे की येणाऱ्या परिस्थिती त्यांच्याचसाठी घातक आहे . पण हे चित्र सर्वत्र असेच आहे असेही नाही पण अशा मानसिकतेच्या सभासदांनी त्यांच्या मानसिकतेत बदल करत संघटनेची बळकटी वाढवणे ही काळाची गरज आहे हे ध्यानात ठेवायला हवे .
औरंगाबाद यूनिटच्या स्थापनेपासून कॉ. प्रभाकर यादव , कॉ. देविदास तुळजापूरकर , कॉ. धनंजय कुलकर्णी कॉ. ए. बी. कुलकर्णी , कॉ. उत्तम होळीकर आणि अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हे युनिट घडले आहे . बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद युनिट हे एक मार्गदर्शक , नाविण्याचा आविष्कार घडवणारे आदर्श युनिट म्हणून पाहिले जाते . संघटनेत काम करत असताना मला या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे . आज बँकेत असणारी युवापिढी ही कारकीर्द ऐकत , टिपत , आत्मसात करत तो वारसा पुढे नेत आहे.
यावेळी संघटनेचे चौदावे अधिवेशन संभाजी नगरमध्ये संपन्न होत आहे . शहरामध्ये बहुतांश महिला सभासद आहेत इथले चित्र खूप वेगळे आहे , जसे अधिवेशन ठरले आहे त्यादिवसापासून शहरातील महिलांनी कंबर कसलेली आहे . तन , मन ,धन ओतून इथली प्रत्येक महिला ही जबाबदारी माझी आहे असे समजून जोमाने तयारीला लागली आहे . दिग्गजांच्या मार्गदर्शनात महिलांच्या पुढाकाराने होणारे दिमाखदार अधिवेशन हे औरंगाबाद युनिटमध्ये महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाला आलेले सर्वात मोठे यश असेल !
कॉ. सरिता कुलकर्णी
जॉईंट सेक्रेटरी
मो. 9121607248
No comments:
Post a Comment