Sunday, December 1, 2024

बुलेटिन माझे मत

 चिंतेची बाब 

सप्टेंबर 2024


सरकारी बँका या सर्वसामान्यांसाठी आहेत . सरकारच्या विविध योजना या बँकांमार्फत राबविल्या जातात आणि सध्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ग्राहकांचे आणि कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होतात . ते नेहमीचेच आहे अशीच भावना सध्या रुढ झाली आहे . 

   पण मुख्य चिंतेची बाब ही आहे की यातून ज्या ग्राहकांना पर्याय उपलब्ध आहेत असे पैसे असणारा मध्यम वर्ग , व्यापारी , नोकरदार वर्ग हे सध्या सरकारी बँकेतून काढता पाय घेत आहेत . याचा परिणाम आता तर होत आहेच पण भविष्यात त्याचे वाईट परिणाम दिसतील ते म्हणजे व्यवसाय वृद्धी तर होत आहे पण वर्षानुवर्षे सरकारी बँकांकडे असलेला आयता आणि उच्च प्रतीचा , हमी असलेला व्यवसाय आक्रसत चालला आहे . 

मग पुन्हा व्यवसाय वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याप्रमाणे व्यवस्थापनाचा रेटा असतो तर आपण त्या ग्राहकाकडे पुन्हापुन्हा गेलो तर त्यांच्याकडून स्पष्टपणे नाराजी ऐकायला मिळते . ज्यांना पर्यायच नाही असा वर्ग गर्दी करतो . मोठेमोठे भांडवलदार त्यांना वेगळ्या प्रकारे सेवा मिळते . पण मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्ग , पांढरपेशा वर्ग सरकारी बँकापासून दूर राहणे पसंत करत आहे .

तर दुसरीकडे नव्याने येणारे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ आहेत , पर्याय उपलब्ध होताच बँक सोडणे पसंत करतात ही पण मोठी चिंतेची बाब आहे . हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्यापेक्षा संघटनेलाच यावर मोठे पाऊल उचलावे लागणार आहे . नवीन भरतीसाठी प्रयत्न आहेतच पण 

" देर ना हो जाये ".

आणि कर्मचाऱ्यांनी पण 

" काही उपयोग नाही "

असा निर्वाणीचा विचार न करता प्रसंग बाका हे तारू आपल्याला पेलायचे आहे शेवटी विजय आपलाच आहे ही खूण मनाशी ठेवावी .

त्यासाठी आपली अभेद्य एकजुटच आणि संघर्षच काम करु शकणार आहे .

कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य 

9421607248



" देर आये लेकीन दुरुस्त आये "

डिसेंबर 2024


सध्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये व्यवस्थापन कोणत्या ना कोणत्या दिवसाचे औचित्य साधत व्यवसाय वृद्धीची विविध उद्दिष्टे ठरवत आहे . विशेषतः कासावर भर दिला जातोय , कोअर बिझनेसवर भर दिला जातोय . 

" देर आये लेकीन दुरुस्त आये "

असे का असेना पण योग्य ट्रॅकवर वाटचाल ही नेहमीच सर्वांसाठी हितावह असते . बँकिंगची मूळ उद्दिष्टे ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे ही आहेत . भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताचा विकास व्हावा ह्यादृष्टीने विविध धोरणे आखली गेली , त्याची अंमलबजावणी झाली . औद्योगिक क्रांती , हरितक्रांती , धवलक्रांती घडू लागली . आणि त्यासाठी भांडवलाची गरज भासू लागली मिळणारे उत्पन्न सुरक्षित राहिले पाहिजे ही जाणीव होऊ लागली त्यासाठी अर्थव्यवस्थेवर सरकारी नियंत्रण निकडीचे झाले आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या विकासाला हातभार लागावं यादृष्टीने बँकिंग क्षेत्राचे राष्ट्रीयकरण केले गेले आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडत गेले , भारताची विकासाकडे वाटचाल सुरु झाली . यामध्ये बँकिंग क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे . बँकिंग क्षेत्रात अत्यंत डोळसपणे आणि भविष्याचा वेध घेत काम करणारी संघटना म्हणून AIBEA ची ओळख आहे आणि त्याप्रमाणे संघटना पहिल्यापासून काम करत आहे . 

        माझी जॉईनिंग डिसेंबर 1988 ची त्यावेळी सर्वत्र भरगच्च स्टाफ होता माझ्या सुरुवातीच्या काळात सीनियर्स मध्ये सर्वात ज्युनियर म्हणून मी अनेक वर्षे काम केले . अजून बँकिंग उमगले नव्हते तोच 1990 च्या आसपास बँकिंग ध्येय धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले , मूळ तत्वे बाजूला सारत बँकिंग वापरले गेले परिणामी बँकिंग धोक्यात येऊ लागले . एनपीए नॉर्मस सुरु झाले आता बँकांचे काही खरे नाही बँकिंगचे एकत्रीकरण होणार , खाजगीकरण होणार यासारख्या चर्चांना उधाण आले . पण त्याचवेळी संघटना म्हणून AIBEA ची भूमिका स्पष्ट होती . माझे प्रश्न बाजूला राहिले तरी चालतील पण पहिले माझी संस्था वाचली पाहिजे कारण तो माझ्या रोजी रोटीचा प्रश्न आहे याचं भान संघटनेला होते आणि तीच जागृती सभासदांमध्ये केली जायची . मला मात्र नेमकं काय आहे हे समजत नव्हते पण AIBEA आणि सीनियर्स जे सांगतात ते हिताचे आहे एवढी समज नक्कीच आलेली होती आणि ती बरोबर असल्याचे प्रत्ययास येत होतेच . तो संघर्ष असो की बँक ऑफ महाराष्ट्रचा 2010 मधील PCA मधून तावून सुलाखून निघण्यासाठी AIBEA ने जी धोरणे ठरवली , आपला रेटा नेटाने पुढे ढकलला तो संघर्ष असो त्याला तोड नाही . 

" प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असणे हा त्याचा मूलभूत अधिकार ठरवणे "

 हा ठराव किंवा 

" जनतेचा पैसा जनतेसाठी , नाही कोणाच्या लुटीसाठी " 

या AIBEA च्या घोषणा असो त्या फक्त नावापुरत्या राहत नाहीत तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी संघटना म्हणून डोळसपणे ध्येय धोरणांची आखणी केली जाते . AIBEA चे दुसरे नाव संघर्ष असे आहे तो करायचा म्हणून केला जात नाही अभ्यासपूर्वक केला जातो . पूर्वीचे प्रश्न वेगळे होते लढाई पण वेगळ्या प्रकारे करावी लागली . आज पण प्रश्न नाहीत असे नाही फक्त त्याच स्वरुप बदलले आहे त्यामुळे हत्यारे पण बदलावी लागतात . आज पूर्वी संघर्ष करुन मिळवलेले टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे . सध्या कामाचा प्रचंड ताण आणि अपुरी कर्मचारी संख्या हा कळीचा मुद्दा बनला आहे . सातत्याने येणाऱ्या नवनवीन योजना आणि रोजच नवनवीन आवाहनाला तोंड देताना दमछाक होते . पण आपले प्रश्न सोडवायचे असतील , आपल्या संस्थेचे आणि आपले अस्तित्व अबाधित राहिले पाहिजे असेल तर मी पुढे आलं पाहिजे . आज व्यवस्थापनाने एक पाऊल पुढे टाकत सर्व योजना यशस्वीरित्या पार पडल्या जाव्यात यासाठी संघटनेला आवाहन केलं कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन दिले यात संघटना दोन पावले पुढे आली आणि सर्व सभासदांमध्ये याविषयी जागृती केली . आज बँकेत बहुतांश नवीन जनरेशन आहे त्यात मी सिनिअर म्हणून काम करते 2011 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे . त्यांना आपले हित कशात आहे हे उमगले आहे आणि म्हणूनच सोलापूर रिजन असो , औरंगाबाद युनिट असो की भारतभर सर्व शाखांमध्ये असो आपण उद्दिष्ट पूर्तीसाठी आग्रेसर राहिलो आहे त्यासाठी सर्व नवीन सभासदांचे अभिनंदन . पण त्यांना एवढंच सांगणे आहे अभ्यास करा उमगले ठीक नाही उमगले तर आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि त्याला बळकटी दिली तर स्वतःचे भविष्य उज्वल राहील , माझ्या अस्तित्वाच्या लढाईत मी अग्रेसर राहिले पाहिजे ही खूणगाठ मनाशी बाळगा .


कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य शाखा

9421607248




सेवाशुल्काच्या गोंडस नावाखाली बँकांच्या हाती आल्लाउद्दीनचा दिवा !!


जानेवारी 2025


नेहमीप्रमाणे परवाच बँकेनी सेवशुल्कात अव्वाच्या सव्वा वाढ होणार असल्याचे परिपत्रक काढले . ठेवी गोळा करणे आणि कर्जे देणे त्यातून नफा कमावणे ही बँकिंगची मूलभूत तत्वे आहेत . या राजमार्गने नफा कमवायचा सोडून त्याला बगल देत आलिकडच्या काळात बँकांनी त्यांची काम करण्याची पद्धत बदलली आहे . कारण कर्जवाटपाची धोरणे बदलली . धनदांडग्या भांडवलदारांनी , कर्जदारांनी बँकांची कर्जे थकवणे आणि कालांतराने बुडवणे या राजरोस दरोडेखोरीने बँकांचे कंबरडे मोडले त्यामुळे बँकांना ज्या खाईत लोटले गेले आहे त्याची भरपाई करण्यासाठी बँकांनी एक चोरवाट शोधली आहे ती म्हणजे 

 " सेवाशुल्क "!

आणि यामार्गाने कमवलेल्या उत्पन्नाची कोणीही विचारपूस करायला येत नाही हे लक्षात आल्यावर राजरोसपणे ही लुटमार सुरू आहे आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ केली जात आहे . सर्वसामान्य जनतेने दैनंदिन व्यवहारासाठी बँकेत खाती उघडली , छोटे छोटे व्यापारी , उद्योजक बँकांच्या मार्फत आपले रोजचे व्यवहार करतात पण त्यांना पैसे भरले तर चार्जेस , पैसे काढले तर चार्जेस , एटीएम चार्जेस , एसएमएस चार्जेस असे कितीतरी वेगवेगळे चार्जेस बँक लावत आहे आणि वारंवार ते वाढवत आहे .

यातून बँकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची आकडेवारी यापुर्वीच कामगार संघटनांनी , अभ्यासकांनी मांडलेली आहे . पण याकडे कोणीच लक्ष देत नाही . उंदराला मांजर साक्ष असल्याप्रमाणे सगळेच मूग गिळून गप्प बसतात . याठिकाणी सामान्य माणसाची मात्र पिळवणूक होते त्याच्या खिशाला कात्री लागत आहे . वर्गणी गोळा केल्याप्रमाणे बँका खातेदारांचा पैसा ओरबाडतात . कर्जाला माफी आणि ठेवीदारांची लूट हा अन्याय आहे .

यावर एकच उपाय होऊ शकतो तो म्हणजे सामान्य जनतेला जागृत करणे आणि संघटितपणे त्याची मांडणी करणे त्याला विरोध करणे . यावर कर्मचारी म्हणून आपण आपले विचार संघटनेकडे जरुर मांडावेत त्यावर उपाययोजना कशा प्रकारे केली जावी याचेही मंथन होणे गरजेचे आहे तरच लोकांना खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यातील फरक प्रकर्षाने जाणवेल आणि त्यानंतरच सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक बँका या अधिक जवळच्या वाटतील त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम जनतेचा मोलाचा वाटा राहिल .


कॉ. सरिता कुलकर्णी

बार्शी 9421607248


 जागतिक महिला दिनानिमित.....
मार्च 2025


 8 मार्च 1914 रोजी सर्वप्रथम महिलादिन साजरा करण्यात आला . महिलादिनाला क्रांतिकारी इतिहास आहे . अमेरिका आणि युरोपसह जगभरामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता . 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली . त्यामध्ये क्लारा झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 

" सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे "

अशी घोषणा केली . 

8 मार्च 1908 रोजी न्युयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली . प्रमुख मागण्या होत्या कामासाठी दहा तासांचा दिवस असावा ( 16 तास काम करावे लागे ) , कामाच्या जागी महिलांना सुरक्षितता आणि सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे !!!

यावेळी महिलांवर लाठीमार करुन हा संघर्ष मोडण्यात आला .

1910 मध्ये विविध देशातील महिलांची कोपनहेगन येथे परिषद झाली . या परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस 

" जागतिक महिला दिन "

म्हणून घोषित करावा असा प्रस्ताव क्लारा झेटकीन यांनी मांडला . यावेळी ज्या विविध मागण्या केल्या गेल्या त्या मागण्यांचे 

" ब्रेड अँड रोजेस " 

हे ब्रीदवाक्य होते . महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून

 ' ब्रेड ' तर जगण्यासाठी उत्तम दर्जाची वागणूक मिळावी म्हणून 

' गुलाब ' हे प्रतीक होते .

त्यावेळी महिलांना जनावरप्रमाणे न वागवता माणसाप्रमाणे वागणूक द्यावी असा ठराव पास झाला . या प्रस्तावाला 19 मार्च 1911 रोजी मान्यता मिळाली . त्यानंतर युरोप अमेरिका या देशांमधून सार्वत्रिक मतदान हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या , या झाल्या जागतिक घडमोडी .

     भारतात पहिला महिला दिन 1943 मध्ये साजरा केला गेला . 8 मार्च 1971 रोजी पुण्यात एक मोठ्ठा मोर्चा काढण्यात आला तर 1975 हे वर्ष युनोने 

" जागतिक महिला वर्ष "

म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समोर येत गेल्या आणि विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्या मांडण्यात येत आहेत . त्यावर मंथन होते उपाययोजना करण्यात येतात .

बँकिंग क्षेत्रात डोळसपणे नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना म्हणून AIBEA ची ओळख आहे . त्यामुळे बँकिंगमध्ये आणि पर्यायाने संघटनेत महिलांचा वाढता ओघ लक्षात घेता संघटनेने महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन दिले . महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाव्य प्रश्न आणि त्यावरील उपाय याचे मंथन केले जाते त्याप्रमाणे व्यवस्थापनाला  वेळोवेळी त्यात बदल सुचवले जातात . सेवाशर्तीच्या बाबत विचार केला तर इतर कोणत्याही क्षेत्रातील महिलांच्या तुलनेत बँकिंग क्षेत्रातील महिला या सुरक्षित आहेत .

     भारतात एकूण महिलांच्या 20% महिला या संघटित क्षेत्रात काम करतात त्यांना सर्व सेवा सुविधा मिळतात पण जवळपास  80% महिला या वर्तुळाबाहेर आहेत . मोलमजुरी आणि शेतमजुरी करणारांची संख्या जास्त आहे . महिलादिन साजरा करत असताना यावरही विचार करणे गरजेचे आहे . 

   आजकालची एकूणच समाजव्यवस्था पाहता असे जाणवते की महिलादिनाचा क्रांतिकारी इतिहास कुठेतरी बाजूला होत एक दिवस महिलादिन उत्सव म्हणून साजरा करायचा आणि उरलेले 364 दिवस तीचे अस्तित्व पुन्हा एकदा स्त्री , महिला , नारी , मादी या शब्दापाशी येऊन थांबत आहे ' ती ' या शब्दाशी निगडित आहे . त्याविषयी पुन्हा एकदा प्रखरपणे विचार मांडण्याची गरज निर्माण झाली आहे . कायद्याने समानता दिलेल्या स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे . कायद्याने संरक्षण दिले असले तरी त्याला अनेक पळवाटा आहेत . स्त्रीभ्रूणहत्या , बलात्कार , अत्याचार , राजरोसपणे चाललेले हुंडा प्रकरण हे ऐरणीवर आलेले प्रश्न आहेत . तिला ना वयाच ना जागेच बंधन आहे . आगदी 3 वर्षापासून 70 वर्षापर्यंत वय , निरक्षरापासून अत्युच्च शिक्षण घेत असलेल्या महिला या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही ठिकाणी सुरक्षित नाहीत . सध्या अवतीभोवती घडणाऱ्या असंख्य घटनांपैकी मोजक्याच घटना प्रखरपणे उजेडात येतात . कित्येक प्रकरणे जीवाचा अकांत करुन त्याचा कोणालाही थांगपत्ता न लागता विरुन जातात . मनुष्य म्हणून जन्माला आलेली पाशवी वृत्तीची माणसे समाजात बुरखा पांघरुन वावरत आहेत . आणि संधी मिळताच सावज सापडल्याप्रमाणे ती घाला घालतात , शिकार करतात .

हे कमी की काय म्हणून झालेल्या घटनेला बगल देत त्याला राजकीय , धार्मिक आणि जातीय रंग दिले जातात . पुरुषसत्ताक संस्कृती वगैरे म्हणणे गैर आहे . त्यामुळे स्त्री पुरुष असा संघर्ष , भेदभाव तर नाहीच म्हणू शकत उलट समविचारी स्त्रीपुरुषच एकत्रितपणे यावर उपाय करु शकतात . म्हणून हा विषय अत्यंत गंभीर समजून त्यावर होणारे राजकारण बाजूला ठेवून सरकार , लोकप्रतिनिधी , कायदेपंडित , समाजसुधारक यांनी एकत्रित येऊन सुज्ञपणे कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे . स्त्रीपुरुष समानता या विषयावर समारंभापुरत्या बाता मारणे व त्यातून स्वतःचा काही फायदा होतो का पाहणे ह्या बळावत चाललेल्या  प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे . तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा आचार आणि विचाराची अंतर्बाह्य पुनर्रचना होणे गरजेचे आहे . सच्चेपणाने काही निर्णय घ्यायला हवेत . समित्या गठित करायला हव्यात . त्यावर चिंतन व्हायला हवे , तिला सन्मान वाटला पाहिजे , तीन आत्मनिर्भर व्हावे , स्वयंरोजगार मिळवला पाहिजे यासाठी तिने प्रेरित झालं पाहिजे  अशा काही योजना जाणीवपुर्वक निर्माण केल्या पाहिजेत .

यासाठी भारताच्या इतिहासात थोडंसं डोकावून पाहायला हवं आणि जाणीवपुर्वक त्याची पुनरावृत्ती व्हायला हवी .

स्वराज्याचा ध्यास शिवाजी महाराजांना होता अष्टपैलू व्यक्तिमत्व आसलेला जनतेचा राजा , स्त्रियांना आदराने वागणूक मिळायची कोणी आगळीक केलीच तर जिवानिशी जाण्याची दहशत होती ! 

स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणारे फुले दाम्पत्य , समाजसुधारक आगरकर आणि स्त्रियांसाठी , पिचलेल्या दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला तीव्र उठाव , भलं मोठं आंदोलन . यासारखी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली आणि यांच्यासारख्या अनेक आदर्श व्यक्तींच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात आपण धन्यता मानतो हे चुकीचे आहे . त्यांचे विचार जाणीवपूर्वक आचरणात आणायला हवेत . 

या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करुन पिचलेल्या स्त्रिजातीसाठी ,  स्त्रीउद्धारासाठी नव्याने विचार करण्याची गरज आहे , नव्याने शाहू फुले आंबेडकर निर्माण होण्याची गरज आहे असे वाटत आहे . 

आजकाल स्त्रिया शिकल्या , मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या , राजकारणात वावरू लागल्या , नवनवीन तंत्रज्ञान शिकून आकाश कवेत घेऊ लागल्या या आणि अशा प्रकारच्या वाक्यांची लाज वाटू लागली आहे . वेळ पडली की झर्रकन तिच्या स्त्रित्वाची लक्तरं ओरबाडली जातात तिला आणि तिच्या स्त्रित्वाला रक्तबंबाळ केलं जातंय . त्यावर उपाय होणे ही काळाची गरज आहे त्यासाठी दहशत बसेल असे कायदे आणि त्याची ठराविक कालावधीत अंमलबजावणी जाणीवपूर्वक करायला हवी . स्त्रीपुरुष समानतेची पुनर्रचना होणे गरजेचे आहे . संस्कृतीत जाणीवपुर्वक बदल घडवणे गरजेचे आहे . नवीन पिढी त्याप्रकारे होणे गरजेचे आहे .

' ति ' ला मुक्तपणे , निर्भयपणे संचार करता आला पाहिजे . अशी मानसिक , राजकीय , सामाजिक परिस्थिती निर्माण होईल का ? तिला निर्भयतेचा , स्वाभिमानाचा , स्वावलंबनाचा , निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल का ? 

एवढीच या महिलादिनानिमित्त अपेक्षा !!!



कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी शाखा 

जॉईंट सेक्रेटरी 

बीओएमईयु औरंगाबाद युनिट

मो. 9421607248

saritakulkarni67@gmail.com



*संघटनेत सक्रिय सहभाग म्हणजेच संघटनेचे व पर्यायाने स्वतःचे सक्षमीकरण* 


एप्रिल 2025

  बँक ऑफ महाराष्ट्र आणि एकूणच बँकिंग क्षेत्र सध्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहे . त्याला अनेक कंगोरे आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा नोकर भरती हा आहे. सध्या 80% सभासद हे युवा आहेत .AIBEA तर आता 80 व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे . 

आज टेक्नॉलॉजीचा जमाना आहे कोणतीही माहिती हवी असेल तर दुसऱ्या क्षणाला ती मिळू शकते इतके आजचे युग वेगवान आहे . आता गरज आहे ती नवीन पिढीने गुगलचा व तंत्रज्ञानाचा वापर करत पुस्तके वाचण्याचा ध्यास घेत संघटनेचा इतिहास अभ्यासण्याची आणि तो अंगीकरण्याची ! आपली संघटना काही अशीच बलाढ्य झालेली नाही त्यासाठी अनेकांचे बलिदान , आयुष्य , कष्ट , श्रम खर्ची पडलेले आहेत ते कुठेतरी अंगिकारलं पाहिजे . कारण सध्या व्यवस्थापन आणि सरकार दोघेही बँकांची आणि बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची पिळवणूक करत आहेत , शोषण करत आहेत,त्यांना पीचवत आहे . त्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनात सभासद म्हणून मी स्वतःहून त्वेषाने या सर्व घटनांमध्ये सामील असायला हवं . आणि नेमकी याचीच कुठेतरी कमतरता भासत आहे . सिनिअर लोकांनी किंवा ठराविक त्याच त्याच लोकांनी संघर्षासाठी पुढे यायचं बाकीच्यांनी औदासीन्य दाखवायचं हे बरोबर नाही . माझ्या अस्तित्वाची लढाई जिंकायची असेल तर पहिल्यांदा मी स्वतः कोणाच्याही आवाहनपूर्वी उत्स्फूर्तपणे संघटित कार्याला बळकटी देण्यासाठी विचारपूर्वक पुढे येणे गरजेचे आहे .आज संघटनेच्या माध्यमातून मिळवलेल्या तरतुदीनुसार आर्थिक स्थैर्य आहे पण तरीही आज आपण पिचत चाललो आहोत आणि तो दबाव वाढत आहे . जर त्यासाठी संघर्ष करायचा असेल , लढा द्यायचा असेल तर मला मरगळ झटकावी लागेल. विशेषतः हे औदासिन्य अधिकारी वर्गातून जास्त दिसते आणि त्यांची आजकालची बँकेतील एकूण टक्केवारी वाढते आहे आणि ही बाब जास्त चिंताजनक आहे . 


 

जेव्हा एखादी परस्थिती बदलता येत नसते तेव्हा त्यापेक्षा मोठी रेघ ओढावी लागते . कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची असेल व होणारे शोषण थांबवायचे असेल तर प्रत्येक सभासदाने सक्रियपणे पुढे येत व संघर्ष करत संघटनेची ताकत वाढवणे गरजेचे आहे . एखादे आंदोलन संपले की हुश्य करत ताकद संपल्याप्रमाणे मटकन खाली न बसता पुढच्या आंदोलनाची वाट पाहत प्रत्येकाने मिळालेल्या वेळेत श्वास भरुन त्वेषाने पुन्हा उडी मारण्यासाठी पवित्रा घेण्याची आज गरज आहे तरच भविष्यकाळ सुसह्य आणि सुरक्षित होईल .

 कॉम्रेड सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य शाखा


*अथकपणे टोळधाड हाकत रहा आणि बँक राष्ट्रीयकरण वाचवा*

जुलै 2025


     19 जुलै 1969 रोजी देशाच्या हिताची उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून , स्वतंत्र भारताची विकासाकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले . पायाभूत व मुलभूत उद्योगांना जाणीवपुर्वक चालना देणे हा त्याचाच एक भाग होता. आणि यामध्ये वित्तीय संस्थांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती . या महत्वपूर्ण उद्योगावर जनतेची मालकी व नियंत्रण असलं पाहीजे म्हणून बँकीग उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला . जनतेच्या मालमत्तेवर जनतेचा अधिकार हा त्यातला गाभा होता . 

आज राष्ट्रीयकरण हे साठीकडे म्हणजेच ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे . त्यानुषंगाने हा उहापोह करण्याचा प्रयत्न . 

आम जनतेच्या पैशाचे संवर्धन करत बँकांनी स्वतःचा आणि देशाचा विकास केला . यासाठी बँक कर्मचारी हा दोन्हींमध्ये दुवा होता आणि आहे . बँकिंग उद्योगाला येणारी फळे ही ठळकपणे दिसू लागली की टोळधाडीच्या घिरट्या वाढू लागल्या , काहीवेळा एकत्रीकरणाचे हल्ले पण झाले . पण बँकिंग उद्योगातील संघटना विशेषकरुन AIBEA च्या महत्वपुर्ण ध्येयधोरणांच्या आखणीमुळे आपण हे हल्ले थोपवू शकलो , परतवू शकलो . 

आज बँकेमध्ये काम करणारी पण तिसरी पिढी आहे त्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि टोळधाड हाकलण्यासाठी , परतवून लावण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे , अष्टावधानी राहिले पाहिजे रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे साम , दाम , भेद दंड या चतुःसुत्रीचा वापर करत , आम जनतेला बरोबर घेत ही लढाई चालूच ठेवावी लागणार आहे कारण बाग बहरलेली आहे त्यामुळे तिला धोका तर आहेच !!


कॉम्रेड सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य शाखा


अधिवेशन स्पेशल अंक 

संघटनेची 40 वर्षे 

मागे वळून पाहताना

13-14 सप्टेंबर 2025

*"महिलांच्या" च्या नजरेतून औरंगाबाद युनिट .........*


1980 नंतर एकूणच बँकातून मोठ्या प्रमाणात भरती झाली त्यात बऱ्यापैकी महिलांचा ओघ वाढला होता . पण त्याकाळात महिलांना जाणीवपूर्वक शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग दिली जायची . 1985 नंतर मात्र चित्र बदलत गेले जशा व्हेकन्सीज असतील त्याप्रमाणे पण त्यातल्या त्यात सोयी असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी पोस्टिंग दिली जाऊ लागली आणि पुढेपुढे चित्र बदलत गेले महिलांची संख्या वाढू लागली आणि हळूहळू ग्रामीण भागात महिलांना पोस्टिंग मिळू लागली . आज बँकेत सर्वत्र आणि सर्वच केडरमधून मोठ्या संख्येने महिला दिसून येत आहेत . 2013 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी 21.73% होती ती 2024 मध्ये 28.12 इतकी झाली आहे . 

      महिलांची बँकेतील पर्यायाने संघटनेतील वाढती संख्या लक्षात घेत दूरदर्शीपणा ठेवत AIBEA नी 1995 पासून मेट्रो सिटीमध्ये Women convention घेतले आणि 2014 मध्ये प्रत्येक बँकेत , प्रत्येक लेव्हलवर Women's Council असावे आणि त्यांची कार्यप्रणाली कशी असावी याविषयी ठराव पास केला . महिलांना दुहेरी भूमिकेत काम करत असताना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता , स्वच्छतागृह तसेच यात काही नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना येणारा ताण यावर मोकळेपणाने चर्चा व्हावी , मंथन व्हावे आणि सेवाशर्तींमध्ये योग्य त्या सुधारणा घडवून आणाव्यात हा त्यामागचा मुख्य उद्देश होता .

         यावर तातडीने बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद युनिटच्या 4-5 जानेवारी 2014 रोजी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या अधिवेशनात महिला मेळाव्यामध्ये AIBEA च्या जॉइंट सेक्रेटरी कॉ. ललिता जोशी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद युनिटच्या Women's Council ची स्थापना करण्यात आली आणि औपचारिकता म्हणून फक्त नावापुरती स्थापना न करता महिलांचा सक्रिय सहभाग कसा राहील यावर जाणीवपुर्वक भर दिला . यावेळी कॉ. उमा पिंगे , कॉ. संजीवनी कुलकर्णी आणि कॉ. रोहिणी दुस्सल सारख्या महिला प्रतिनिधी आघाडीवर होत्या . तिन्ही रिजनमध्ये ज्याज्या शाखेत महिला कर्मचारी आहेत त्याठिकाणी महिला प्रतिनिधींनी शाखाभेटी करत त्याठिकाणी महिला म्हणून काम करत असताना येत असलेल्या अडचणी प्रामुख्याने स्वच्छतागृह याविषयी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला . प्रत्येक अधिवेशनात स्वतंत्र महिला मेळाव्याचे आयोजन हे या युनिटचे खास वैशिष्ट्य आहे . याठिकाणी युनिटकडून वेगळी वाट चोखंदळलेल्या कॉ. अमरजीत कौर सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न राहिला . प्रत्येकवेळी नेहमीच या युनिटकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊनच निघायला व्हायचे . आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना याठिकाणी नक्कीच वाव मिळतो हा अनुभव आहे . जिल्ह्याच्या ठिकाणी महिलादिन फक्त साजरे न करता प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा अंतर्भाव करत महिलांना आत्मभान देण्याचा प्रयत्न केला गेला आणि आजही केला जातो . महिलांचा चळवळीत सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहनात्मक मांडणीवर लक्ष केंद्रित केले गेले . आज तुम्ही जर उच्चशिक्षित होऊन भविष्य घडवण्यासाठी काही स्वप्ने उराशी बाळगत बँकेत येत असाल तर येणाऱ्या अडचणी या तक्रारीच्या सुरात , रडकेपणाने न मांडता आपले अधिकार लढवय्या भूमिकेतून कसे मांडले पाहिजेत याचे प्रात्यक्षिक औरंगाबाद युनिटमध्येच मिळू शकते . 

" Women's Empowerment if not we then who ?"

यासारख्या विषयावर चर्चासत्र घडवून आणणे त्यासाठी मुलींना प्रश्नावली आधी पुरवणे यासारखे दर्जेदार प्रयोग याच युनिटमध्ये घडतात हे नक्की . हे इतरठिकाणी गेल्यावर प्रकर्षाने ऐकायला मिळते आणि अनुभवायला पण मिळते .

कार्यकर्त्यांचे शिबिर अनेक ठिकाणी घेतले जाते तसे इथे पण घेतले गेले आहेत पण आनंदवन , हेमलसा अशा ठिकाणी चाळीस एक महिला-पुरुष कार्यकर्त्यांची सामाजिक सहल ही औरंगाबाद युनिटमध्येच झाली असावी असे मला वाटते आणि त्याचा अभिमानदेखील ! पण आज एका गोष्टीची खंतही वाटते की ज्याप्रमाणे संघटना महिलांचा विचार करत महिलांनी मागण्यापुर्वी त्यांच्या एकूणच गरजा ओळखत सेवाशर्ती सेट करत आहे , त्याप्रमाणात नवीन सभासद झोकून देऊन संघटित कामकाजात सहभागी होताना दिसत नाहीत . त्यांची कार्यपद्धती आत्मकेंद्रित होत आहे की येणाऱ्या परिस्थिती त्यांच्याचसाठी घातक आहे . पण हे चित्र सर्वत्र असेच आहे असेही नाही पण अशा मानसिकतेच्या सभासदांनी त्यांच्या मानसिकतेत बदल करत संघटनेची बळकटी वाढवणे ही काळाची गरज आहे हे ध्यानात ठेवायला हवे .

        औरंगाबाद यूनिटच्या स्थापनेपासून कॉ. प्रभाकर यादव , कॉ. देविदास तुळजापूरकर , कॉ. धनंजय कुलकर्णी कॉ. ए. बी. कुलकर्णी , कॉ. उत्तम होळीकर आणि अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हे युनिट घडले आहे . बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद युनिट हे एक मार्गदर्शक , नाविण्याचा आविष्कार घडवणारे आदर्श युनिट म्हणून पाहिले जाते . संघटनेत काम करत असताना मला या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे . आज बँकेत असणारी युवापिढी ही कारकीर्द ऐकत , टिपत , आत्मसात करत तो वारसा पुढे नेत आहे.    

        यावेळी संघटनेचे चौदावे अधिवेशन संभाजी नगरमध्ये संपन्न होत आहे . शहरामध्ये बहुतांश महिला सभासद आहेत इथले चित्र खूप वेगळे आहे , जसे अधिवेशन ठरले आहे त्यादिवसापासून शहरातील महिलांनी कंबर कसलेली आहे . तन , मन ,धन ओतून इथली प्रत्येक महिला ही जबाबदारी माझी आहे असे समजून जोमाने तयारीला लागली आहे . दिग्गजांच्या मार्गदर्शनात महिलांच्या पुढाकाराने होणारे दिमाखदार अधिवेशन हे औरंगाबाद युनिटमध्ये महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाला आलेले सर्वात मोठे यश असेल !


कॉ. सरिता कुलकर्णी 

जॉईंट सेक्रेटरी 

मो. 9121607248



*निसर्गाचे रौद्र रुप आणि त्याच्याशी दोन हात करताना .......*

ऑक्टोबर 2025

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टीने जे रौद्र रुप दाखवले त्याने होत्याचे नव्हते झाले . अनेक कुटुंबे , निवारे उध्वस्त झाले , बळीराजाची जनावरे आणि हातातोंडाशी आलेली पिके तर गेलीच पण पुढे उत्पन्न घेऊ शकू या अवस्थेत काळी आई यायला किती काळ लागेल हेही सांगू शकत नाही . हाहाकार मजला आहे , एकूणच परिस्थिती हाताबाहेर आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे .

          नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही यामध्ये दुष्काळ , अतिवृष्टी , वेगवेगळ्या साथी हे यापुर्वीही आलेल्या आहेत . आपला देश कृषिप्रधान आहे 70% जनता खेडोपाडी राहते मग या येणाऱ्या आपत्ती , त्याची कारणे आणि उपाय यावर कोणतेही राजकारण न करता जाणीवपुर्वक आणि अभ्यासपुर्वक लक्ष केंद्रित करायला हवं . निसर्गतः निर्माण होणारी परिस्थिती हवामान बदल , चक्रीवादळ त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे बिघडलेला समतोल हाही तितकाच किंबहुना जास्त जबाबदार आहे , याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे .

      पृथ्वीचे वाढते तापमान व त्यामुळे निर्माण होणारी आर्द्रता , वरच्या भागात बर्फ वितळणे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढणे पूर येणे परिणामी होणारे जास्तीचे बाष्पीभवन त्यामुळे पावसाचे वाढते प्रमाण .

वारेमाप वृक्षतोड , जंगलतोड त्यामुळे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता संपून तातडीने पाणी वाहून जाते . जमिनीची धूप होऊन नद्या तलावांमध्ये गाळ साचणे , गावोगावचे नाले-ओढे प्लास्टिक , टाकाऊ साहित्य आणि कचऱ्याने खचाखच भरलेले असणे ड्रेनेज सिस्टिमचा अपुरा विकास , नदीच्या पात्रातील अतिक्रमणे , ही यादी वाढत जाते .

      कोणत्याही कल्याणकारी योजना सुरु केल्या , त्याची घोषणा केली तरी त्या काहीवेळेस सुरुच होत नाहीत , झाल्याचं तर कालांतराने त्या बंद पडतात आणि नंतर त्या नियोजनाबाहेर जातात , त्यातले सातत्य राहत नाही . 

यासाठी उपाययोजना करताना 


तत्कालीन उपाययोजना 


माध्यमकालीन उपाययोजना 


दीर्घकालीन उपाययोजना 


या फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यावर भर दिला पाहिजे .  

यासाठी त्यात पारदर्शकता , ममत्व , सहकार्याची भावना असली पाहिजे . त्याला कोणतेच रंग आले नाही पाहिजेत . जात , धर्म , राजकारण यापासून या योजना कोसो दूर राहिल्या तर आणि तरच आपत्कालीन परिस्थितीत काहीतरी करु शकू . कोणत्याही योजना भांडवलदारांना झुकते माप देऊन करणे योग्य नाही . यामुळे गरीब श्रीमंत यातील दरी रुंदावत जाते .

      याचबरोबर आपल्यासारख्या पांढरपेशानी अलिप्त न राहता कोणी काही सांगण्याच्या आधी स्वतः विचार करायला हवा . तसे आपण सुखवस्तू आहोत त्यामुळे आपल्या मिळकतीतला काही टक्का , आपल्या बुद्धीचा काही भाग आपल्या वेळातील काही वेळ हा नेहमीकरता राखीव ठेवायला हवा . आपण स्वतः प्रत्येकवेळी पुढाकार नाही घेतला तरी ज्याज्याठिकाणी असे उपक्रम राबवले जातात त्यात्याठिकाणी आपण जॉईन होणे हीदेखील मोठी उपलब्धी होऊ शकते . सामान्य माणसांनी बोललं पाहिजे परिस्थितीचे आकलन करुन घेऊन व्यक्त झालं पाहिजे , शांतता ही घातक ठरु शकते . 


कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य शाखा

9421607248



*हिटलरशाहीला आवरा* 
डिसेंबर 2025


21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रचलित 29 कायदे रद्द करुन चार नवीन कायदे अंमलात आणल्याची घोषणा सरकारने केली . ते करत असताना नवीन कायदे कसे सुधारीत आहेत , त्यात कसा सुटसुटीतपणा आहे , सर्वसामान्यांची कशी काळजी घेतली आहे याची साखरपेरणी केली असली तरी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन पायाभूत कायद्यांची निर्मिती केलेली होती त्याची पायमल्ली करत हे नवीन चार कायदे लादले आहेत .

सर्वसामान्यांसाठी याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट आहेत . या नवीन कायद्यात प्रत्येक शब्दाच्या मूळ व्याख्या बदललेल्या आहेत . उद्योग कशाला म्हणायचे , कायम कामगार कोण राहू शकेल , त्याच्या किमान वेतनाच्या कायद्यात तो बसेल का , सेवाशर्ती काय असाव्यात या आणि यासारख्या कायद्याची कवच कुंडले असणाऱ्या अनेक संकल्पना बदलल्या आहेत त्याचे होणारे परिणाम म्हणजे गरीब आणखी गरीब होणार आणि बडे उद्योगपती आणखी श्रीमंत होणार . मुठभर लोकांच्या हातात देशाचे भवितव्य जाणार थोडक्यात आर्थिक पारतंत्र्य येणार ! लोकांना कोणत्याही प्रकारचे स्थैर्य लाभणार नाही . याचा फटका असंघटित क्षेत्रातील लोक , गरीब जनता यांच्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे .

यावर आता विचारवंत , अभ्यासक , वकील यांचे विश्लेषण येईलच . 

          सध्या प्रत्येक 

ठिकाणी वेगवेगळी कारणे दाखवत अनेक क्षेत्रात बदल केल्याच्या , कायदा बदलल्याच्या धाडकन घोषणाच ( नोटबंदीचे तर ज्वलंत उदाहरण आहे ) केल्या जातात आणि हे काही लोकशाही अबाधित असल्याचे लक्षण नव्हे . हातात सत्ता आली की दिल्लीहून दौलताबाद आणि दौलताबादहून दिल्ली हा आपला इतिहास आहे त्यात मग सामान्य जनतेची ससेहोलपट झाली तरी बेहत्तर !

    पण या गोष्टी इतक्या हलक्यात घेऊन चालणार नाही . आपल्यासारख्या संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या त्यामानाने खूपच कमी आहे . पण आपण जर विचारशील , सुशिक्षित आणि सच्चे कॉम्रेड असू , AIBEA चा इतिहास आपल्याला सामाजिक बांधिलकी शिकवतो . त्यामुळे तटस्थपणे सुस्तावल्यारखे आपण आजच्या परिस्थितीत राहू शकत नाही .आपण सुरक्षित आहोत या भ्रमात न राहता संवेदनशीलतेने , पोटतिडकीने आपण असू तिथे अशा निर्णयाविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनात , होणाऱ्या कृतीत आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि एकूणच संघर्षाची ताकद जाणीवपूर्वक वाढवली पाहिजे , ही काळाची गरज आहे .


कॉ. सरिता कुलकर्णी 

बार्शी मुख्य शाखा

 

Friday, March 1, 2024

महिला सत्र लेख

26/27 नोव्हेंबर 2022 बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद युनिट 

तेरावे द्वैवार्षिक अधिवेशन सोलापूर 

डॉ. श्रुती तांबे यांचे विशेष व्याख्यान

बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य संघटना म्हणून एआयबीईएची ओळख आहे . ती एक प्रागतिक विचारावर आधारित ट्रेड युनियन चळवळ आहे . एआयबीईएने समाजातील महिलांचे स्थान ओळखले आणि बँकिंगमध्ये पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता ओघ लक्षात घेत राष्ट्रीय , राज्य आणि बँक पातळीवरील महीला परिषदेची स्थापना करुन त्यांना संघटनेतील सक्रिय सहभागासाठी एकत्रित केले . 1995 मध्ये मुंबई येथे पहिली आखिल भारतीय महिला बँक कर्मचारी परिषद आयोजित करण्यात आली होती . तर 2000 साली मुंबई येथे आयोजित केलेल्या एआयबीईएच्या 24 व्या परिषदेत कॉ. ललिता जोशी या पहिल्या महिला पदाधिकारी झाल्या त्या आजही एआयबीईए पदाधिकारी आणि अखिल भारतीय महिला परिषदेच्या संयोजक आहेत . तर सोलापूरच्या अधिवेशनात त्यांची विशेष उपस्थिती आहे ही अभिमानाची बाब आहे . 


या अधिवेशनात रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांचे 


" जगण्यातील संतुलन - जबाबदारी कोणाची ? " 


या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . ते सर्वासाठी खुले आहे .    वेळोवेळी संघटनेच्या कार्यक्रमांमधून महिला मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे आता तो मेळावा महीलापुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी मंथन या स्वरुपात सादर करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत .


जुन्या पिढीने तारेवरची कसरत करत , सुपर वुमनचा रोल करत , फारसे झुगारून देण्याची ताकद म्हणण्यापेक्षा वृत्ती नसल्यामुळे , बंडखोरीची इच्छा असूनही अनामिक भीती असल्यामुळे जगण्याचे संतुलन ही महिलांची जबाबदारी या पद्धतीने केले आहे . ती संख्या आज खूप कमी आहे . आज बँकेत आणि इतर सर्वच क्षेत्रात उच्चशिक्षित , टेक्नोसेव्ही असलेल्या , नाविन्याची कास धरलेल्या , स्वप्न उराशी बाळगून अनेक मुली करियर करण्यासाठी झेपावलेल्या दिसतात सर्वच क्षेत्रात महिला मोठ्या पदावर काम करतात पण रीतिरिवाज आहे तेच राहिलेत उलट वाढत आहेत . आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली तिची कुठेतरी घुसमट होते का ? त्यातही दोन प्रकारच्या मुली दिसतात होत असलेली घुसमट न झुगारता प्रचंड तणावाखाली सगळच साध्य करण्यासाठी धडपडतात त्याचा त्यांना स्वतःला थकाव येतो . परंपरांचे जोखड , चालीरीतीच्या उतरंडी तिने स्वतःच उतरवायला हव्यात ते करण्याची हिम्मत होत नाही . तर काहीजणी बंडखोरी करत झुगारून देऊन आपली जीवनशैली ठरवतात तर त्याचा कुटुंबव्यवस्थेला , समजव्यवस्थेला कुठेतरी तडा जाताना दिसतो मग त्या ठिकाणी भुवया उंचावल्या जातात . आता मुलींनी पण आत्मपरीक्षण करायला हवं , लांब कसारा गळ्यात टाकून हुंदडायला सोडलेल्या वासरासारखी आपली गत झाली आहे का ? ठराविक परीघ संपला की मानेला झटका बसतो का ? आपणच आपल्याला करकचून बांधून घेतलं आहे का ? एकटी ती नाही तर आता नवीन पिढीने परंपरागत मानसिक दबावाचे जू आपल्या खांद्यावर आहे ते झुगारून द्यायचे का ? स्वमग्न न राहता सजग व्हायचं का ? याच कुठेतरी मंथन होणे गरजेचे आहे . जगण्यातील संतुलन जर राखायचे असेल तर ती जबाबदारी कोणाची ? जगण्याचे संतुलन ती एकटी कशी काय शकेल यासाठी त्याचीही काही जबाबदारी आहे . परस्पर सामंजस्याने जर यावर चर्चा झाली , मंथन झाले तर त्यावर तोडगा निघू शकतो . म्हणजे पूर्ण समाजव्यवस्था जर बदलायची असेल तर कायदे नाही तर संस्कृतीत बदल घडला पाहिजे तो जाणीव पूर्वक केला पाहिजे यासाठी आणि त्यावर आपल्याला काही मार्गदर्शक सूत्रे मिळावीत यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .


 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकूणच समाजातील महिलांचे स्थान अंतर्मुख करायला लावणारं आहे हे नक्की . एका निकषाप्रमाणे महीलावर्गाची विभागणी दोन गटात करता येईल संघटित क्षेत्रात काम करणारी महिला आणि असंघटित क्षेत्रात काम करणारी महिला . या प्रमाणानुसार फक्त सहा ते सात टक्के महिलावर्ग हा संघटित क्षेत्रांतर्गत येतो . बँकिंग सेक्टर मधील महिला या संघटित क्षेत्रात येतात , एकूणच सेवा-शर्तीचा भाग पहता तो एक कंफर्ट झोनमध्ये काम करणारा वर्ग आहे , तीचा आर्थिक , शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे . पण तिचा घरगुती , सामाजिक , मानसिक , आर्थिक वावर कसा आहे , स्तर कसा आहे याचे निरीक्षण होणे , मंथन होणे गरजेचे आहे . हा विषय फक्त बँकेतील महिलांचा नसून एकूणच समाजाचा आहे . याठिकाणी दोन दृष्टिकोनातून विभाजन होणे गरजेचे आहे . 


एक स्वतः तिने स्वतःला किती जखडून घेतले आहे आणि दुसरे तिच्यावर लादले किती आहे .


उच्चशिक्षण घेतले , केशभूषा , वेशभूषा बदलली की स्त्रीस्वातंत्र्य झाले का ?


स्त्री-पुरुष यातील निसर्गदत्त विभाजन हा एकच निकष सोडता माणूस या निकषावर जेव्हा समाजरचना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने समानता या विषयावर पडदा पडू शकतो .


ज्याप्रमाणे हे काम करण्यासाठी समान विचारसरणीच्या लोकांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावलेला आहे त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे , त्याहीपुढे जाऊन असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी काम केले पाहिजे . 


स्त्री स्वातंत्र्य , स्त्रीमुक्ती , महीला सबलीकरण , समानता हे विषय घेऊन स्त्रियांचे बाजारीकरण चालले आहे त्याचा पडदा फाश करण्यासाठी त्याविरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे . महत्वाच्या कौटुंबिक निर्णयात महिलांना जाणीवपूर्वक सामावून घेतले पाहिजे . महिलेवर होणाऱ्या अत्याचाराची वाच फोडली गेली पाहिजे . ज्याप्रमाणे दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली त्याच पद्धतीने स्त्रियांच्या उद्घरासाठी चळवळ होणे ही काळाची गरज आहे आसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . अजूनही स्त्रिया दुय्यम स्थानावरच आहेत . प्रत्येक स्त्री जोपर्यंत स्वची लढाई लढायला पुढे येत नाही तोपर्यंत त्यात अपेक्षित बदल होऊ शकत नाही .


आज बँकिग क्षेत्र सुद्धा एका विशिष्ठ दुष्टचक्रात अडकले आहे . बँकांचे खाजगीकरण हा कळीचा मुद्दा होऊन बसला आहे . सध्या परिस्थितीत बँकेमध्ये प्रत्येक श्रेणीत महिलांचा वाढता ओघ आहे . संख्येने जर आपण जास्त असू तर आपल्या अस्तित्वाची लढाई सुद्धा आपल्यालाच लढावी लागणार आहे हे प्रत्येक महिलेने ध्यानात घेणे गरजेचे आहे . बँकाभोवती येऊ पाहत असलेले खाजगीकरणची टोळधाड हाकून लावायची असेल तर कोणी आमंत्रण देण्याची वाट न पाहता तयारीनिशी स्वतः सज्ज राहायला हवे . ही स्वतःसाठीची लढाई असल्याची मनाशी पक्की खूणगाठ बांधली तर गोष्टी सोप्या होतील .


त्यामुळे महिलांनी स्वमग्न न राहता आपल्या नजरेसमोर आपणच तयार केलेले अंधःकराचे वलय हटवल्यास नेमके ध्येय स्वच्छ दिसेल .


ही लढाई एकट्या दुकट्याने लढण्याईतकी सोपी नाही त्यासाठी समाजाचा पाठिंबा मिळणे अत्यावश्यक आहे . यासाठी एकूणच सामजिक बांधिलकी जपणे हीपण बँक कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे . कर्मचाऱ्यांमध्ये जर संख्येने महिला जास्त असतील तर संघटनेने


 " बँकांचे लोकशाहीकरण "


हा उचललेला विडा सर्वार्थाने नेटाने रेटला पाहिजे , दक्ष राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे . आपल्यासाठी सर्वजण हवे असतील तर पहिल्यांदा सर्वांसाठी आपण आहोत याची ठळकपणे जाणीव करुन देणे गरजेचे आहे .




बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन 

औरंगाबाद युनिट

वुमेन्स कौन्सिल कनव्हेनर

कॉ. सरिता कुलकर्णी


महिलादिन प्रास्ताविक

09/03/2024


सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद आणि महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आयोजित आजच्या या कार्यक्रमांत सर्वांचे स्वागत आहे आणि याठिकाणी उपस्थित सर्व स्त्री पुरुषांना महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा !!

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व कॉम्रेड बंधू आणि भगिनींनो 

8 मार्च या दिवसाला क्रांतिकारी इतिहास आहे . 1911 साली 8 मार्च हा महिलादिन ओळखला जावा म्हणून मान्यता मिळाली पण प्रत्यक्षात तो 1914 साली प्रथम साजरा करण्यात आला . महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून ब्रेड , तर उत्तम दर्जाची वागणूक मिळावी म्हणून गुलाब हे प्रतीक होते . त्या कालावधीत महिलांना कामाचे नियमित तास असावेत , मतदानाचा हक्क असावा अशा मूलभूत हक्कांसाठी लढाई करावी लागली म्हणून आपण हा दिवस क्रांतिकारी म्हणून ओळखतो या झाल्या जागतिक घडामोडी .

      भारतात कायद्याने समनाता दिलेल्या स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे . कायद्याचे संरक्षण असले तरी त्याला अनेक पळवाटा आहेत . हुंडाबळी , स्त्रीभ्रूण हत्या , बलात्कार अत्याचार कधी नव्हे इतकी महिलांची सुरक्षीतता हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे , याची संवेदनशीलता वाढलेली आहे . रोज नवनवीन प्रकार आपल्या कानावर येत असतात , आता तरी काय कोणतीही घटना घडली तर मूळ प्रश्नाला बगल देत त्याला राजकीय आणि धार्मिक रंग दिले जातात

ही बाब जितकी गंभीर आहे तितकीच क्लेशदायक आहे . या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे वाटत , यामध्ये समाजाबरोबर आपली मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे . मानसिकता बदलायची म्हणजे काय करायचं ? तर सिस्टीम मध्ये राहूनच आपल्याला सिस्टीम बेल्ट करायची आहे , सिस्टीममध्ये आपल्याला जागा निर्माण करायची आहे . ठराविक ठिकाणी ठराविक फोरमवर हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात . मग आता प्रश्न आहे की आपण याला जॉईन होणार का ? आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्याला इतिहासात डोकावला हवं .

      150 वर्षांपूर्वी सावित्रीबाईं फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली तेव्हा कुठे या 30/40 वर्षात महिलांना शिक्षण ही सहज प्रक्रिया झाली आहे . रमाबाई रानडे , पंडिता रमाबाई , आनंदीबाई जोशी आणि त्यांचे समविचारी पुरुष जे स्त्रियांच्या हक्कासाठी लढले ते ज्योतिबा फुले , महादेव रानडे , समाजसुधारक आगरकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा प्रवास हा खडतर होता . त्यात्या वेळी त्यांनी वेगळी वाट चोखाळली होती , त्यांनी काही त्याग केला आणि म्हणून आजची परिस्थिती आपल्याला उपलब्ध आहे . आणि हे जर आपण पाहिलं त्याची उजळणी केली तर नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते . मग आपण त्यात काही बदल करणार का , त्याग करणार का , अभ्यास करणार का मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ देणार ?  का हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत . त्यासाठी बदलाची गरज आहे . मला माझं व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक बदलण्याची गरज आहे त्यासाठी अशा दिवसांचे औचीत्य साधायचे असते , प्रेरणा मिळवायची आसते .

    कामगार संघटना हे समाजपरिवर्तनाचे मध्यम आहे AIBEA ही आता 8 दशकाकडे वाटचाल करणारी  बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य अशी पथदर्शक संघटना म्हणून ओळखली जाते . सभासदांचे आणि वित्तसंस्थांचे प्रश्न एवढ्यापुरतच विचार न करता समाजामध्ये विषमतेविरुद्ध जी काही बंड पुकरली जातात त्यात कृतिशील प्रयत्न करण्याचे काम AIBEA करते आणि म्हणूनच बँकिंग क्षेत्रात पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता वेग लक्षात घेता त्यांना जास्त स्पेस दिली जाते , जाणीवपूर्वक सकस कार्यक्रमाचे आयोजन केले जातात .

    पुणे मुंबईसारख्या ठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमाच्या विचारधारेपासून  बाहेरगावच्या , ग्रामीण भागातील महिला वंचित राहतात म्हणूनच आज मराठवाडा परिसरातील महिलांना एकत्रित करुन  BOMEU औरंगाबाद युनिट आणि MSBEF यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही संघटनाचे जनरल सेक्रेटरी आपले दोन दिग्गज नेते कॉ. देविदास तुळजापूरकर आणि कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी प्रयत्नपूर्वक नियोजन बद्ध पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे . 

  आजच्या क्रंतिदिनाच्या निमित्ताने आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास प्रेरणा मिळेल असे व्यक्तिमत्व याठिकाणी उपलब्ध झालेले आहे ते म्हणजे गायत्री आपटेकर !

मला एक मिनिट यांच्या आजच्या विषयाविषयी बोलायचं आहे . त्यांचा आजचा विषयच इतका सुंदर आहे तो म्हणजे 


" मीच ओलांडले मला "


हे ऐकताच क्षणभर मला अंतर्मुख व्हायला झालं आपण सर्वांनी मध्यंतरी रमाबाई रानडे यांचे चरित्र असलेली

 उंच माझा झोका 

ही serial पहिली असेलच या serial चे अरुण म्हात्रे यांचे tital song खूप सुरेख होते 

त्यातल्या या चार ओळी


" आरतीत तेवे माझ्या

 मंद या व्रताची समई

 तुळशीचे रोप माझे 

उंच आभाळात जाई

 मीच ओलांडले मला

सोबतीस माझा सखा 

येई कवेत आकाश 

झुले उंच माझा झोका "


या संपुर्ण गीतांमध्ये त्यांनी रमाबाई रानडे यांचं व्यक्तिमत्त्व उकलवून दाखवण्याचा प्रयत्न केला . रमाबाई रानडे यांनी त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कसा केला , सिस्टीम कशी बेल्ट केली हे बहुतेक सर्वांना माहिती आहे . आज या निमित्ताने एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर तरळून गेले .

आता मी आपला जास्त वेळ घेत नाही . आजच्या प्रमुख वक्त्या आता  आपल्याला काय काय मेजवानी देणार आहेत यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तर त्यासाठी आपण सज्ज होऊ या . याठिकाणी मी माझी प्रस्तावना थांबवते . धन्यवाद !


Wednesday, December 6, 2023

कीर्ती

 प्रिय तीन दिवसांचे पिल्लू उर्फ गणू

30/06/2023

मायना काय लिहू ह्या विचारात घोळत बसले मी. तसे आपले नाते अगदी काही तासांचे ताजे ताजे आणि तसे पाहीले तर ९ महिन्यांचा अखंड सहवास!!

सहज मजेत ५ महिन्याच्या गर्भाला आशिषने गणू म्हणून हाक मारली आणि झालास की तू सगळ्यांचाच गणू. मुलगा आहे की मुलगी हे माहीत देखील नसताना घरातले सगळेजण तुला गणू म्हणायला लागले. आता नाव फायनल होईपर्यंत टोपणनाव फायनल आहे.

पिल्लू, आत्ता तुला माझ्या कुशीत गाढ झोपलेलं बघून आपला प्रवास डोळ्यांसमोर तरळतोय. अगदी काल परवा तर आम्हाला तुझ्या येण्याची चाहूल लागली होती. लांब लांब अंदमानच्या समुद्रकिनारी आम्ही ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली. दोन्ही आजी-आजोबा, आत्या आणि मावशी सगळ्यांना जणू हर्षवायुच झाला! 

गेले २ महिने स्कुबा डायव्हिंग करायला उत्सुक असलेली मी अचानक २ पायऱ्या सुद्धा खूप जपून उतरू लागले.

मला आणि तुझ्या बाबाला  मात्र आता तुला पहायची घाईच झाली. ट्रिप झाली की तुझ्या आगमनाची निश्चिती!!

पुण्याला येताच तडक गाठला तो दवाखानाच!

त्या सोनोग्राफी मधे दिसणारा इवलासा पांढरा ठिपका म्हणजे तू!!! आम्ही क्षणभर बघतच राहिलो. ही तुझी आणि माझी पहिली भेट. रिपोर्ट मध्ये Cardiac activity is seen हे वाचून माझ्या आत एक नाजूकसे हृदय धडधडत आहे  ह्याची लख्ख जाणीव झाली. 

३ महिने कोणालाही ही गुड न्यूज़ सांगायची नाही

आता संयमाचा खरा कस लागणार होता! कधी एकदा हा आनंद सगळ्यांना सांगता येईल ह्याची वाट पाहत दिवस जाऊ लागले.

एरवी ट्रॅफिफ मधे गाडी काढायचा कंटाळा करणारा तुझा बाबा आता माझा हक्काचा ड्रायव्हर झाला! 

फक्त माझा नव्हे.. आपला😇 

पौष्टिक खा, दगदग नको अशा दोन्ही आज्यांच्या सूचना सुरूच होत्या. 

बघता बघता ३ महिने झाले, मिरजेला चोर ओटी भरली आणि मग मी गडबडीने सर्व भावी मावशांना ही news दिली.

 पिल्लू, तुझ्या येण्याची केवळ चाहूलच काय धामधूम घेऊन आली माहिताय? 

सगळ्या आज्या,आजोबा, मामा, काका, मावश्या, आत्या आणि इतर अनेक मंडळी कंबर कसून तयारच झाले तुझ्या स्वागताला... अगदी बाप्पाच्या आगमनाइतका उत्साह संचारला सगळ्यांच्यात. सगळ्यांना वेध लागले ते २ जुलैचे! 

दर आठवड्याला डॉक्टरकाका बोलवत होतेच तुझा फोटो बघायला. 

पाहता पाहता ५ महिने झाले आणि तुझा चेहरा, एवढेसे हात पाय सगळं दिसू लागलं!  प्रत्येक स्कॅन मधे काहीतरी वेगळं दिसायचं आणि आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे आमच्या. वाटायचं की ह्याहून भारी काहीच नाही... पण तोवर पुढचा स्कॅन यायचा आणि त्याहून भारी फीलिंग!!


दर आठवड्याला तुझी प्रगती बघत दिवस भराभर पळत होते! 

इथून सुरू झाले ते डोहाळेजेवणांचे पर्व..

पुण्याच्या ज्योती मावशीआजी आणि प्रतिभा आत्याआजी ह्या दोघींनी मस्त खादगीचा बेत करुन आपले भरपूर लाड केले बर का!

तुझा जन्म मिरजेत म्हणजे तुझ्या आजोळी planned होता. एप्रिल महिना आला आणि पुण्याला टाटा बाय बाय करून आपण दोघे निघालो की मिरजेला.

मिरजेत आजी आजोबांनी एकदम झकास असा सेटअप केलेला. आपल्या मिरजेच्या घरात मला धुळीचा त्रास होतो म्हणून चक्क नवीन २ फ्लॅट मध्ये तात्पुरते शिफ्टिंग केलेलं! असा आहे साहेब तुमचा थाट!

७ एप्रिल रोजी आजीने सुरेख प्लॅन करुन डोहळेजेवण केलं. आपण त्या दिवशी पंचपाकवन्नाचे जेवण भरपुर हाणले😇

हा सगळ्या घरच्या मंडळींचा उत्सा...तर ऑफिसमधल्या सर्व मामा मावश्यांनी एक ऑनलाइन म्हणजे virtual babyshower केला😂 

आई होणार म्हणून माझे आणि पर्यायी तुझे खूप लाड सुरू झाले. मंजू मावशी आजी खास दहिवडे करायला मिरजेला येऊन गेली! उल्का आत्याआजी कडे जाऊन दिवसभराची खाद्यजत्रा केली..

मिरजेच्या आजीला तर आपण नुसत्या बसून फर्माईशी केल्या! 

मिरजेतल्या आजी आजोबांच्या मित्रपरिवारांनी सुद्धा खाण्यापिण्याचे भरपूर लाड केले. भिशीतल्या आज्यांनी तर दणक्यात डोहळेजेवण सुद्धा केलं.

ह्या सगळ्यात दुधात साखर म्हणूनच की काय माझ्या ४ जवळच्या मैत्रिणी म्हणजेच तुझ्या मावशा सुध्दा नवीन पाहुण्याची बातमी घेऊन तयार होत्या! आसावरी मावशी, अक्षता मावशी, ऋता मावशी आणि श्वेता मावशी!!!

आमची online डोहाळ्यांची देवाणघेवाण सुरूच होती. 

२ मेला तुझा मित्र अगस्त्य याचा जन्म झाला. 


आता तुझ्या आगमनाला अवघे २ महिने राहिले आणि पोटात तुझा वांडपणा वाढत चालला होता.

१-२-३-४... अशा सलग २०-२० लाथा मला जाणवू लागल्या. प्रत्येक लाथेगणिक एक सुखद लहर मनात उमटू लागली. हळूहळू तू पोटात गोल गोल फिरत आहेस हेही मला कळू लागलं. गर्भातल्या माझ्या पिल्लाला भेटायची उत्सुकता शिगेस पोचली होती.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला आणि तुझी भेट अगदी नजीक येऊन ठेपली😇

२४ जूनला ठरले की २७ जूनला चिमुरड्याला बाहेरच्या जगात आणायचे आहे🫣 

धडधडत्या छातीने मी तुझ्या बाबाला ही बातमी दिली तर तो पुढच्या क्षणी गाडी काढून पुण्यातून निघाला सुद्धा! बार्शीचे आजी आजोबा, पुण्यातून आत्या आणि बेळगाव मधून मावशी अशा सर्व दिशांनी तुझे fans पळत सुटले😂 इथून मात्र दिवस म्हणावं तर पटकन आणि म्हणावं तर मुंगीच्या गतीने पळाले.

पाहता पाहता तो दिवस -२७ जून २०२३ उजाडला! सकाळी १२ वाजता आपले आगमन ठरले होते. वरकरणी शांत चेहरा असला तरी माझ्या मनात काहूर उठले होते. उत्सुकता, हळवेपणा, हुरहूर, अस्वस्थता अशा एका विचित्र मनस्थितीमध्ये भीती मात्र मुळीच नव्हती. इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली, ज्या भेटीची आस धरली आणि ज्या मिठीची स्वप्ने बघितली... तो क्षण असा माझ्या उंबरठ्यावर येऊन उभा होता.

ऑपरेशन थिएटरच्या आत जाताना सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आत टेबलावर पहाडल्यानंतर डॉक्टर काकांच्या गप्पांनी उरलीसूरली चिंतासुद्धा पळून गेली. काही क्षणात ट्याहा ट्ट्याहा करत एक अत्यंत खणखणीत असा आवाज ऐकायला आला आणि माझ्या तोंडभर हसू पसरले! एक छोटासा आनंदश्रू माझ्या गालावर ओघळला... डॉक्टर काकानी चपखल पणे एक डायलॉग मारला "million dollar smile"

त्याइतका आनंद खरच नव्हता रे झाला ह्यापूर्वी. थोडया वेळात मला तो एवढासा मांसाचा गोळा आणून दाखवला "congrats, it's a baby boy" हा क्षण माझ्या स्मृतीत पक्का कोरला गेला.

गेले ९ महिने नाळेने बांधले गेलेले आपण त्याच क्षणी विलग झालो आणि कायमचे मायलेक म्हणून जोडले गेलो.

आज तुला येऊन ३ दिवस झालेत. जागरण, औषधे ह्यांनी खूप खूप थकली आहे रे मी पण एक अनामिक ऊर्जा आहे आतून.

आईची माया ही एक शक्ती आहे ह्याची प्रचिती येती आहे.

दिवस पळतील आणि तू झपाट्याने मोठा होशील. ह्या क्षणाला मागे टाकणारे अनेक परमानंदाचे क्षण तू आम्हा दोघांना देशीलच. तेव्हा ही आपली पाहिली भेट धूसर होत जाईल म्हणून च हा लेखन प्रपंच!


तुझीच

ताजी ताजी ३ दिवसाची आई



खदखद!!


आज ४ डिसेंबर २०२३! 

बरोबर १ आठवड्यात माझी maternity leave संपेल. मला ११ डिसेंबर रोजी join व्हायचे आहे. ऑफिस मधले सहकारीसुद्धा कीर्ती back in action पाहायला उत्सुक आहेत. 

मी तशी सुरुवातीपासून career-minded, महत्त्वाकांक्षी वगैरे आहे. माझं काम अतिशय आवडीचे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कामाला, तिथल्या शिस्तीला, deadlines ला प्राधान्य द्यायला मला मनापासून आवडते. ते कधीच मला बंधन किंवा ओझे नाही वाटले. 

असे सगळे असतानाही आज नको नको नको म्हणत असतानाही तो विचार मनात डोकावलाच!! ज्याची धास्ती होती आणि जे मला शक्यच नाही असे वाटत होते त्या कल्पनेने डोक्याचा एक कोपरा हळूच व्याप्त केला होता.

तो विचार म्हणजे... काही दिवस सोडावी का नोकरी? घ्यावा का ब्रेक? आहे का गरज एवढी ओढाताण करायची?


ह्याच कारण म्हणजे माझ्याकडे बघून हातपाय नाचवत खुदुखुदू हसणारे आणि मी कडेवर घेईपर्यंत भोकाड पसरून घर डोक्यावर घेणारे माझेच बाळ- आत्रेय!

विश्वासच नाही बसत की ६ महिने असे संपले सुद्धा.. 

मन म्हणते,

"अरे कालच नाही का तू ह्या जगात आला! आणि

परवाच तर मी शिकले लंगोटी बांधायला आणि पाठीवर हात फिरवून ढेकर काढायला!

अरे काल नाही का तू आणि मी पूर्ण रात्र जागून काढली! आणि परवाच नाही का तुझी पहिली लस दिली!

अरे कालच तर आपण तुझे कान टोचले! आणि परवाच नाही का बाबाने नवीन पाळण्यात घालून तुझे फोटो काढले!

अरे काल तर तुला माझी ओळख पटायला लागली! आणि परवाच नाही का मला तू गोड अशी first smile दिलीस!

अरे कालच तर तू लांब लांब हुंकार देऊ लागलास! आणि परवाच नाही का तू थेट पालथाच पडलास!"


हे सगळं असे कालपरवा होत असताना अचानक असा "आज" येऊन ठेपला आणि बाळाला बाजूला सारून काम जवळ घ्याव लागते ह्या कल्पनेने माझे धाबे दणाणले! 

हा सगळा वेळ केव्हा संपला? जागरण होतंय ह्याचे रडगाणे गाता गाता अचानक ६ महिने झाले पण!!! आता हे माझे पिल्लू लगेच काही महिन्यात एक वर्षाचे पण होईल का? मला समजेल ना हा प्रवास?

असा reality hits सुरू असताना मी स्वतःला सावरले. स्वतःशी संवाद साधला. नेमक वाईट कशाचं वाटतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आता "मी काम करणे" हा बाळावर अन्याय आहे वगैरे विचार नाहीच आले उत्तरात! 

उत्तर एकच होत : आपल्या हातून त्याच बालपण निसटू लागलंय ही एकमेव तीव्र भावना... गेले ६ महिने माझे आयुष्य आत्रेयमय झालेल आहे. त्याच्या बाललीला पाहत जागरणाचा थकवा विसरुन जायची आता सवयच लागली आहे.

हे सगळं अचानक थांबवून समोर तो शुष्क लॅपटॉप उघडून दिवसभर काम करणे अशक्य वाटू लागलंय. मी नाही म्हणून हा १ तास रडेल, १ दिवस त्याला माझी आठवण येऊन येऊन रडू फुटेल पण मग १ दिवस त्याला सवयसुद्धा होईलच की माझ्या नसण्याची... सगळच हातातून निसटून जातंय असे वाटत आहे. 

पण हे असे नसणार! 

हो , मला आता त्याचे तान्हया बाळाचे रूप नाही मिळणार पाहायला!

पण तो घरभर रांगेल तेव्हा त्याच्यामागे मीच तर पळणार आहे. रोज कॉल्स घेऊन किटलेले माझे कान ,आत्रेयचे पहिले बोबडे बोल ऐकायला तेवढेच आसुसलेले असणार आहेत. लॅपटॉप बडवून दमलेल्या माझ्या बोटांना आराम म्हणून एक घास चिऊचा भरवायचा आहेच! 

अजून तर हा चालायचा आहे, पळायचा आहे आणि धडपडायचा सुध्दा आहे.

हे तर पुस्तकाच पहिले पान आहे. मोठ्या ग्रंथातील पहिला श्लोक आहे. एका मस्त thriller आणि action वाल्या movie चा हा फक्त trailer आहे!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

त्यामुळे आता मी ताज्या दमाने ऑफिस जॉइन करणार आहे. कारण आता फक्त कीर्ती back in action नसून आत्रेयची आई कीर्ती back in action आहे!

😇


*स्तनपानाचे पान उलटताना*


आनंदात सर्व आणि साजरे होई त्याचे आगमन 

नाळेचे तुटले नाते म्हणून मात्र सैरभैर तिचे मन 


विचारांचे वादळ डोक्यात आणि हात पोटाकडे जाई

नवा नवा जीव तो आणि नवखीच की ती आई 


मनातून आतुरता फक्त पिल्लूच्या भेटीची 

पण चिंता तिला पडली आता त्याच्या भुकेची 


टयाहा टयाहा आले कानी आणि चटकन बसली आवरून 

"कुठे आहे बाळाची आई" ऐकून स्वतःला घेई सावरून 


भरून आले डोळे आणि फुटला तिचा पान्हा 

मांडीवर तिच्या जेव्हा आला इवलासा तो कान्हा 


बहरला आसमंत आणि क्षणात शांत झाली ती

स्तनपानाची सुरू झाली आता दैवी अनुभूती 


अहोरात्र सुरू झाला आता तहानभूकेचा खेळ 

थकून गेली ती बिचारी बसवून झोपेचा मेळ 


सरला काळ आणि खाऊ लागला तो चिऊकाऊचे घास 

मायलेकाचा उरला आता फक्त रात्रीचा सहवास 


दिवस जवळ आले आता तिचे घरट्याबाहेर उडायचे 

ठरलेच की मग आता अंगावरचे सोडवायचे 


तशी न डगमगणारी ती पण आज वेगळाच होता नूर 

स्तनपानाच्या निरोपाची तिला नुसतीच हुरहूर 


रडवेल्या बछड्याने तिच्याकडे केला खूप हट्ट 

पण वाघीण अशी ती की दूर उभी राहिली घट्ट 


रडण्याच्या आवाजाबरोबर वाढे अंतर त्यांच्या मधले 

नाराजीने का होऊन वाटी-चमच्याला केले त्याने आपले 


बाळ होई मोठे आणि विस्मरणात जाई ह्या यातना 

आई घेते नवा जन्म स्तनपानाचे पान उलटताना...!!


नशीबवान आहेस!


आज रोजी १४ मार्च २०२५! 


काय पटापट दिवस पुढे सरकत आहेत... बघता बघता आत्रेय दीड वर्षाचा झाला! पूर्वी मी मनातली खदखद लिहून व्यक्त केली आहे. पण आज वेगळ आहे! आज मनात कृतज्ञता दाटून आली आहे आणि त्यामुळे गतवर्षाचा थोडा आढावा...


नोव्हेंबर-२०२३ आला आणि आता महिन्याभरात पिल्लूची आणि माझी नवीन घडी बसवायचे नियोजन सुरू झाले.

तेवढ्यात कंपनीने विचारले की १५ दिवस आधी जॉइन करू शकतेस का? पुढे रजा adjust करता येईल. संधी चांगली होती पण काय करावे असा माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला.

चेहऱ्यावर भले मोठठे प्रश्नचिन्ह घेऊन सासू सासऱ्यांना हे update दिले! चाय पे चर्चा रंगली आणि नेहमीप्रमाणे माझ्यामागे ते दोघे खंबीरपणे उभे राहिले. माझ्या सासूबाई बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरी फक्त मी आणि retired सासरे! 

तरीही त्यांनी "करू आपण मॅनेज" म्हणून मला जॉइन करायला सांगितले. आशिषला वर्क फ्रॉम होम नसल्याने त्याला पुण्याला जावे लागले. 

मी जॉइन झाले. पहिला कॉल सुरू झाला आणि colleague कडून पहिला प्रश्न हाच आला की अग तू सासरी आहेस? आशिष नाहीये? मग बाळाकडे कोण?? 

मी जेव्हा अभिमानाने उत्तर दिले की "माझे सासरे! "

तेव्हा बाकी सगळे थक्कच झाले . 

मला माझी मैत्रीण म्हणाली "नशीबवान आहेस!!"


महिन्यभरात मी पुण्याला निघाले. थोड्या मुश्किलीनेच पण पुन्हा एकदा माझ्या नशिबाने आत्रेयला सांभाळायला अगदी आईसारखे प्रेम करणारी nanny मिळाली. वैशालीताईंची कामाची पद्धत आणि निटनेटकेपणा पाहून पुन्हा सगळे हेच म्हणाले "नशीबवान आहेस"


आत्रेय मोठा होऊ लागला. त्याला वेगवेगळ्या चवी खायला घालणे आणि स्वतःच्या हाताने खायची सवय लावणे (baby led weaning) हे अजिबातच सोपे नव्हते. 

पुन्हा एकदा नशिबाने माझ्या नणंदेचे आकांक्षाचे लग्न अजून ६ महिन्यांवर होते. ती आमच्याबरोबर होती. तिने हा विडा उचलला. आम्ही प्रवाहाविरुद्ध काहीतरी करू पाहत होतो! प्रचंड गोंधळ आणि अमर्यादित patience चा हा खेळ होता. पण आकांक्षाच्या मदतीने आम्ही थकून भागून का होईना ही प्रगती करू लागलो.

आज १.५ वर्षाचा आत्रेय जेव्हा आपापला जेवू पाहतो आहे तेव्हा मला पुन्हा एकदा सगळे म्हणतात "नशीबवान आहेस"


वैशाली ताई आणि माझे workfromhome हे गणित एकदम चपखल बसले होते. पण आता मला work from office करायला लागणार होते. वैशाली ताईंना जड अंतःकरणाने निरोप देऊन आत्रेयचे पाळणघर- आजोळ सुरू करावे लागले. तो तिथे छान रमू लागला पण थोडी नाजूक तब्येत असल्याने खूप आजारी पडू लागला. आमच्या दोघांचेही ऑफिस सुरू झाले असल्याने राजांचा प्रश्न येऊ लागला. अशावेळी आमचा हुकमी एक्का ठरली माझी आई! एक फ़ोन करायचा अवकाश आणि हातातली सगळी कामे सोडून माझे आईबाबा किंवा एकटी आई पुण्याला हजर होऊ लागले. सासूबाईंना बँक आहे, त्यांना रजा नाही मिळत त्यामुळे आईला यावे लागते आहे ह्या विषयांची चर्चा सुद्धा नाही झाली. 

समाजात अकारण कटू असलेले विहिण हे नाते आणि ह्या दोघी विहीणींचे मैत्रिणीसारखे नाते पाहून पुन्हा एकदा ऐकू आलेच "नशीबवान आहेस"


सगळी घडी बसली. रूटीन सुरू झाले. अत्रिच्या खोड्या आणि प्रगती पाहत दिवस पळत होते. जॉइन करून १ वर्ष झाले आणि माझी official tour प्लॅन होऊ लागली.

पुन्हा एकदा माझ्या पोटात गोळा आला आणि पुन्हा एकदा माझी सपोर्ट सिस्टम मदतीसाठी सरसावली. २ आठवड्यांच्या माझ्या टूरची तिकिटे होण्याआधीच दोन्ही आजी -आजोबांचा प्लॅन फिक्स झाला. १ आठवडा आत्रेय बार्शीला जाणार आणि १ आठवडा माझे आई बाबा पुण्याला येणार! तू काही टेन्शन घेऊ नकोस .

मला confidence यावा म्हणून माझ्या सासूबाई १ आठवडा पुण्याला आल्या आणि रोज आत्रेय आजी आबांकडे झोपला. एक रात्र तर फक्त आम्हाला आश्वस्त वाटावे म्हणून आत्रेयला घेऊन आजी-आजोबा आकांक्षा कडे गेले आणि एक पूर्ण दिवस त्याला छान सांभाळले!

एवढा सगळा खटाटोप फक्त ह्यासाठी की आम्हाला निश्चिंती असावी...

शिक्षण सुरू असल्याने एरवी कोणत्याच गणितात नसणारी माझी बहीण अचानक मदतीला म्हणून शनिवार रविवार पुण्याला यायला तयार झाली.

कसे मॅनेज करणार म्हणता म्हणता सगळे सज्ज झाले आत्रेय बार्शीमध्ये आजीच्या कुशीत गाढ झोपू लागला आणि आज मी निघाले सुद्धा!

आता कोणीही म्हणायची सुद्धा गरज नाही इतकी मी नशीबवान आहे ! ♥️

  


27/06/2025


Halloo आई व पप्पा

आज डबल धमाका असतो आपल्याकडे... तुमचा लग्नाचा वाढदिवस आणि आत्रेयचा वाढदिवस ! 

आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली त्यामुळे मला नेमका संसार काय असतो आणि तो कसा करायचा ह्याचा उलगडा हळूहळू होत आहे. 

पण ह्या ५ वर्षात मी तुम्हा दोघांना आणि तुमच्या एकमेकांना पुरक अश्या संसाराला जवळून अनुभवत आहे! बोलता बोलता सहजपणे तुम्हाला compliments दिल्या जातात पण पप्पांविषयी व्यक्त होणे राहून जाते. त्यामुळे हे खास anniversary special पत्र!

सासू सासरे आणि सून ह्या नात्याबद्दल आत्तापर्यंत एक कटकट आणि अपरिहार्य गोष्ट असेच बघितले जाते.

अशा ह्या अकारण कटू असलेल्या नात्याला पूर्णपणे challenge करायला मला हे सासर मिळाले आहे. माझे मित्र मैत्रिणी थक्क होऊन माझ्या stories ऐकात असतात. माझे काही मित्र त्यांच्या आई बाबांना तुम्हा दोघांच उदाहरण सुद्धा देतात. अश्यावेळी मनापासून अभिमान वाटतो मला तुमचा ..

लग्नानंतर माझे आई बाबा इतके निर्धास्त आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या friendly आणि frank support मुळेच! आईतर नेहमीच म्हणते ह्या विहीणबाई माझी छान मैत्रीण झाल्या आहेत तशाच दुसऱ्या मिळाव्या 😜

ह्या पत्रात काय लिहावे आणि काय वगळावे असे झाले आहे. एकदोन किंवा बोटावर मोजण्याइतक्या घटना नाहीतच...आपल्या कुटुंबाची पुर्ण जीवनशैलीच तुम्ही दोघांनी प्रयत्नपुर्वक घडवलेली आहे. 

लग्न झाल्यावर मुलीना तसे सगळे बदलते असे म्हणतात. मला थोडी धास्ती वाटली होती. पण ते तुम्ही होऊच दिले नाही 

" तुझ्या पद्धतीने चालू दे " 

असे म्हणत माझे मला पुर्ण freedom दिले. त्यामुळे तो मोकळेपणा आणि आपलेपणा माझ्याकडून सुद्धा सहजच आला. 

विशेष म्हणजे मी lockdown मुळे बार्शीत लगेचच सलग राहायला आले. स्वभाव वगैरे नीट कळायच्या आतच आपला सगळ्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. पण this was the best thing that happened to me! 

कामामुळे आम्ही तिघेही दिवसभर वरच्या खोल्यात असायचो. तेव्हा मी सून म्हणून काही वेगळ्या अपेक्षा किंवा गृहीत धरणे असे काहीच कुठेच नव्हते... उलट जास्तीत जास्त privacy सहजपणे देत होतात.

नेहमीच्या बायका वगैरे घरी येत नसतानाही माझीच जास्त काळजी घेतली जात होती... घरी लागणारे सामान, मला नव्यानेच समजलेला जलोत्सव (🤣पाणी भरणे) आणि इतर सर्व गोष्टी तुम्ही दोघे काही कळूही न देता करून टाकायचात.

मला पालेभाजी विशेष आवडत नाही म्हणून जेवायच्या आधी हळूच थोडीशी कोशिंबीर करणारे हे सासरे फक्त मलाच मिळाले आहेत! 

वर्ष २ वर्षे बार्शीत घरी राहिल्याने सगळे सणवार एकत्र साजरे झाले. पण देव, नैवद्य, सोवळे ह्याचे अवडंबर न करता, मुख्य म्हणजे जीवाचा आटापिटा न करता ते उत्साहाने कसे साजरे करायचे हेच मी पाहिले. पाहुणेरावळे, रीतिरिवाज, घरगुती कार्यक्रम, सोहळे ह्याची माझ्या कलाने आणि माझ्या पद्धतीने ओळख होऊ दिली. 

मला वाटत त्यामुळे मी सहजपणे सामावत गेले.

सगळे आधीचे बरेवाईट झटकून एकदम एक नवीन सासरची "brand new सून" होण्याचा आग्रह (दुराग्रह?) कोणीच नाही धरला... आणि त्यामुळेच मी चटकन बार्शीकर कुलकर्ण्यांच्या प्रेमात पडले! ♥️


मी माझ्या कित्येक मैत्रिणी बाळ झाल्यावर जॉइन करताना इतक्या त्रस्त आणि अस्वस्थ झालेल्या पाहिल्या आहेत. पण माझा तुम्हा दोघांच्या प्रेमावर आणि काळजी घेण्यावर इतका विश्वास होता की त्यामुळेच मी आत्रेय लहान असताना त्याला घेऊन बार्शीत राहिले. पप्पा तर स्वतःहून इतके करतात की कधीकधी मला आश्चर्य, अभिमान आणि कौतुक सगळं एकत्रच वाटायच! आत्तासुद्धा आत्रेय आजारी पडला की आबा पुढच्या गाडीने पुण्यात दाखल! 

एकूणच दोघांनीही खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहून आम्हाला boost दिले आहे . मग ती आर्थिक , मानसिक , शारीरिक कोणतीही मदत करण्यास, आम्हाला उभे करण्यात कसूर ठेवली नाही आणि त्याचा गाजवजा तर अजिबातच नाही . त्याचमुळे पाच वर्षात आमची एवढी मजल गेली , आम्ही settle झालो. 

नव्याची नवलाई संपली, मी रुळले. पण तुम्हा दोघांच्या समजूतदार स्वभावाचे अनेक पैलू मला माहीत होत गेले. आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस तर साजरे करण्याची आईंची पद्धत मला फार आवडते ती म्हणजे पत्रलेखन! 

आई म्हणतात " तुमच्या खास दिवशी आम्ही disturb करत नाही , तुम्ही Enjoy करा!" 

कोण करते असे? 

खाण्यापिण्याची चंगळ... ह्या विषयावर तर पुस्तकच लिहावं लागेल. 

पप्पांना निवडक सामान आणायची आवड तर आईंना विविध पदार्थ करून द्यायचा नाद!

वेगवेगळ्या चटण्या , लोणची , घावन पीठ , थालीपीठ भाजणी पीठ , कित्येक दिवस शेंगदाण्याचे कूट , खाऊचे पदार्थ , एक ना दोन कितीतरी पदार्थ अजूनही मी केलेले नाहीत आणि करावे लागत नाहीत . स्वस्थ बसणे तर माहितच नाही... बँक, शेत आणि इतर सगळे दोघे मिळून ठरवून तयारी करता , बार्शीतून येताना प्रत्येकाच्या आवडीचे काहीतरी करुन आणलेले असतेच , जडच्या जड उचलणार नाहीत इतक्या पिशव्या खचाखच भरुन आणायच्या!

आता गेल्या वर्षीपासून तर हे सगळं दुप्पट झाले ( Rahatani special )😍

generally मुली सासू आली की नाक मुरडतात... मी मात्र राणीसारखा आराम करू घेते. 

ऑफिस झाले की कंटाळा आलेला असतो स्वैपाकघरात जायचाच. कामाला बायका असल्या की काम हलके नक्कीच होते पण त्यांना manage करणे हे काही सोप्प नाही! 

आई आल्या की मात्र त्या किचन पूर्ण हाताळतात! काय करायचे, किती करायचे आणि आत्रेयला काय द्यायचे हे सगळं त्या बघतात.. माझी कोणतीही आई आली तरी मी थेट पानात वाढल्यावरच मेन्यू बघते😜

शिवाय तेव्हा ताटात १-२ नवीन पदार्थांची पर्वणी वेगळीच... पप्पा आले की भाजी, फळे, किराणा आणायला लागणार नाही म्हणून आशिष खुश असतो ! 

 काय सुख असते त्यात म्हणून सांगू . 😍

खाण्यापिण्याची इतकी आवड असतानाही आपली 

तब्ब्येत आणि पथ्य पाणी कसे सांभाळायचे हे तुम्हाला गवसले आहे. आजारपणाचा थांगपत्ता लागू देत नाहीत , दवाखाना कधी करतात कळू देत नाहीत .

माझ्या मावश्या , आजी , आत्या एवढेच काय मिरजेतील घरकाम करणाऱ्या बायका , पुण्यातील काम करणाऱ्या बायका मला नेहमी म्हणतात की तू खूप नशिबवान आहेस .

सणवार तर त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने करण्याची पद्धत बदलत नवीन सुरू केली की त्यामुळे सणांची मी तर वाट पाहत असते . त्यावेळी सगळे घरी असणार , जाचक प्रथा त्यांनी हद्दपार केल्या आहेत. सण म्हणलं की तरुणांना लाजवेल असा दोघांचा उत्साह असतो. पप्पांनी पूजेचे सगळे तयार करून ठेवलेले असते . जणू एखाद्या event mnaagement कंपनी ने करावे अशी तयारी असते.

अगदी साडी आणि त्यावर ज्वेलरी सेटचे बरेच option सुद्धा तयार असतात!

आम्ही आलो की हे इथे आहे ते तिथे आहे घ्या , घाला मजा करा. त्यामुळे दिवाळी , महालक्ष्मी , नृसिंह नवरात्र ह्याचे दडपण कधीच वाटत नाही.

मी नेहमी आईना women council चे काम करताना पाहिलं आहे . बँकेतील मुलींना मुलांना फोनवर बोलताना ऐकले आहे . नंतर त्यांचे किस्से ऐकले आहेत . जवळजवळ आई त्यांच counselling च करत असतात , त्यांचे विचार ऐकले की मला थक्क व्हायला होते. त्या काळाबरोबर तर आहेतच पण मला तर त्या काळच्या पुढे वाटतात . काळाच्या ओघात त्या नवीन गोष्टी adopt करायला खूप flexible आहेत . आमच्या काळात आम्हाला superwoman बनाव लागलं तुम्ही अजिबात बनू नका असे त्यांचे म्हणणे असते . शिक्षण घेतलं , एवढ्या जबाबदारीचे job करायचे ही काही खाऊची गोष्ट नाही असे त्या म्हणतात . सून बनण्यात मला कोणतीही डोकेदुखी झाली नाही इथून पुढेही होणार नाही ही खात्री आहे . पत्र मोठ झालं आहे पण 10% पण लिहून झाले नाही पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे मला कसा अनुभव आला हे मला लिहायचं होतं एकूणच अशा पद्धतीचे वातावरण मला मिळालेले आहे . 

वेळोवेळी सगळ्याच प्रकारच्या सल्ल्याची मलाच आवश्यकता आहे आपण नेहमीच आपली उच्च level ची चर्चा करत राहू . 


Wish you a very happy anniversary!



तुमचीच 

सगळेच म्हणतात तशी लिखाणात शोभणारी सासूची सून 😍😍


हॅलो सुनबाई 

धन्यवाद बाळा 

एकदम सिक्सर मारलात की हो ! किती बारीक बारीक लक्षात आहे तुझ्या छान वाटलं वाचून मला . आमच्या वागण्यातून तुला सुख मिळत असेल तर यापेक्षा जास्त सुख कशात आहे ग .

छान छान आपण असेच give and take policy follow करु आणि सुखी राहू . 

त्याबरोबर आपल्या कुटुंबालाही समाधानी ठेऊ .

एकमेकांना समजून घेण्यात जे सुख आहे ते दुसरे कशात नाही हे खरे ! पु. ल. देशपांडे यांची मैत्रीवर एक कविता आहे तीच नात्यात सुद्धा लागू होते असे मला वाटते असो असाच मोकळेपणा राहू दे . समजलेच नाही तर दिलखुलासपणे व्यक्त होत जा हा नेहमीचा सल्ला आहे .

खूप आनंद वाटला 

आणखी एकदा धन्यवाद !

😍😍😍

तुझेच आई पप्पा

Monday, July 24, 2023

बाळासाठी गाणी

 तू खायबा साखर लोणी


माझिया बाळा

तू खायबा साखर लोणी

चक्री भोवर विटी दांडू

रंगीत गोट्या भवरी चेंडू

खेळसी खेळा तू.....माझीया ...


नवलक्ष गोपाळ गडी 

वाट पाहती यमुना स्थळी

मिळूनी मेळा तू.....माझीया .


बाळ मुकुंद खातो लोणी

कौतुक पाहे नंद राणी

भरुनी डोळा तू.....माझीया ...


भानुदास विनंती करी

प्रसाद द्यावा मज श्रीहरी

त्रिभुवन बाळा  तू.....माझीया ...


डाव्या गुढग्याने रंगतो

Friday, April 7, 2023

पारंपरिक ठेवाl


पारंपरिक ठेवा 

लग्नाची गाणी 


1) घाणा भरणे गीत

1) आधी मूळ धाडा गणेश मोरायला 

आधी मूळ धाडा अंबिका मातेला

यावे चिंतील्या कार्याला 

यावे चिंतील्या कार्याला 

मांडव घातीला चारी कोपरे साधून

उभा कंबर बांधून

गणराया उभा कंबर बांधून उभा कंबर बांधून 


मांडवाच्या दारी चिखल का ग झाला

नवऱ्या मुलीचा बाप न्हाला

मांडव घातीला नुसत्या जाईचा / चाफ्याचा 

छंद मुलीच्या आईचा / वहिनीचा

मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण 

नवऱ्या मुलीला केळवण

मांडवाच्या दारी कोण ग मिरवली

नवऱ्या मुलीची कुरवली

कोण ग आहे हौशी 

नवऱ्या मुलीची मावशी



2) पाच पानाचा ग विडा ,

त्यावर मोतियाचा घोस,

वर नेमिला गणेश , वर नेमीला गणेश,

ग गणपती आधी l

पाच पानाचा ग विडा,

वर चिकण सूपारी ,

आधी नेमिला व्यापारी, आधी नेमिला व्यापारी,

ग गणपती आधी l

मांडवाच्या ग दारी,

पहिली चिठ्ठी देव्हाऱ्याला,

मग समस्त सोयरयाला ,ग समस्त सोयरयाला

ग गणपती आधी. l


 2) हळदीचे गाणे 

U Tube

1) गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाली 

2) पिवळी पिवळी हळद लागली 

3) गुलाबाची कली बघ हलदीन माखली


3) लग्नाची मंगलाष्टक 


या हो या तुम्ही या कार्याला या हो या तुम्ही या कार्याला 

शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला ll धृ ll


प्रथम नमुया गजाननाला 

द्वितीय नमन ते सरस्वतीला 

कुलदेवता त्याही स्मरुया 

आशीर्वाद तोही घेऊया

शुभ या कार्याला 

बोला sssss ll 1 ll


पिता वधूचे.....असती

माता वधूची....असती

बहीण...आणि....असती

भाऊ वधूचा .....असतो

शुभ या कार्याला

 बोला ssss ll 2 ll


......... तूम्ही दोघे

आनंदाने स्वानंदाने

संसार करावा छान आपुला

नेहमी जागणे कर्तव्याला

हेतू मनी बाळगा sssss

बोला sssss ll 3 ll

 4 ) आंबा शिंपणी 

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । 

फळाचा राजा कसा l अमरुत बरसतो

दारी ग माझ्या आई l कसा सावली धरतो ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । ।१।।

घाल तोंडात साखर ।ओटीत अन्नपूर्णा ।

ओटी भर ग आई आता l नाजूक मालत्याने।

तोषवण्या घरदारा l मन मुरडीन मालत्यासम 

शिंपीला आई अंबा l शिंपीला अंबा ।। २ ।।

शेल्याचे टोक बाई l करते ग घाईघाई

 वंदून ग तुम्हाला l येते ग आता आई ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा ।। ३।।

लंगड्या श्रीरंगाला l पतीराजाने लपवीले ।

गुढ संसाराचे l आपसूक कळले ।

शिंपीला अंबा बाई शिंपीला अंबा ।।

रचना - © मानसी केसकर

  दि. १८/१२/२०२२


5 ) सुनेचा गृहप्रवेश 

U Tube

मुली तू आलीस आपुल्या घरी


मुंजीची गाणी

मातृ भोजन 

ओम भवती भिक्षा म्हणती

भाग्य तुझे किती 

घालोनी लांगोटी दंड उभा घे हाती

मग म्हण रे ओम भवती भाग्य ...ll धृ ll

चटण्या अन कोशिंबिरी बहुप्रकारे केल्या खिरी

भोजनास गर्दी किती भाग्य तुझे किती ll 1 ll


मातेच्या ताटातूनी घास घे तू प्रेमाने

आजपासूनी उच्चिष्ट कधी न तुझ मिळे ll 2 ll


विनाविती तव पदकमाला मोद द्याल भगिनीला 

ममकाला शुभबाला भाग्य तुझे किती ll 3 ll


मुंजीची मंगलाष्टक


प्रथम वंदूनी निमंत्रिले त्या गिरिजा पुत्रा ते

शुभमंगल व्रतबंध बटूचे आज योजिले हे ll धृ ll


जमली सारी आप्त मंडळी गृह हर्षे भरले

मातपित्याचे हात आजला स्वागतास सजले

आनंदाने भरले डोळे

आनंदाने भरले डोळे अनुश्री मायेचे

शुभ मंगल.....ll 1 ll


मातृभोजनी माता भरवी प्रेमे पुत्रा ते

आराध्य रे तव आज पासूनी बाल्य सरायाचे

गायत्रीच्या मंत्र बळे तुज पुढेच जाण्याचे 

शुभमंगल......ll 2 ll


अवनी धरिती कोमल हस्ते मंगल कलशा ते

मंगल आक्षत उधळीत सारी देती आशिषा ते

कानी पडती मंगल स्वर हे सुरेल सनईचे

शुभमंगल......ll 3 ll


कानमंत्र हा धनू देतसे बाळ आराध्या रे

धर्माज्ञेचे पालन करुनी उचली पाऊला ते

बलशाली आन कीर्तिवंत तुज जगी व्हावयाचे 

शुभ मंगल...... ll 4 ll


प्रथम आश्रमी टाकी पाऊल 

प्रथम आश्रमी टाकी पाऊल घेऊनी दंडाते

भिक्षा पहिली मागण्यास तू न धरी लज्जे ते

दिसे आराध्य हा गोजिरवाणा रुप सावळ्याचे

शुभ मंगल .......ll 5 ll


मंगळागौरीची गाणी


रहिबाई ग रहिबाई  ग तुझा गजनी वाडा

वाड्याला वाड्याला

तुझ्या खिडक्या चार

खिडकीला खिडकीला

कुणी लाविले मोर 

मोराला मोराला 

तुझ्या रेशमी गोंडा 

हलतो कसा झुलतो कसा


माळ्याच्या मळ्यामंदी गोफण काठी

वांगी भरलेत देठोनदेठी

वांगी तोडून भरलाय हरा 

त्यावर झाकला साखरशेला 

साखरशेला वाऱ्याने गेला 

पगड फु बाई पगड फू

( भेंडी , काकडी , दोडका , भोपळा )


गोफ वीणू बाई गोफ वीणू

आर्ध्या रात्री गोफ विणू

गरे घ्या गरे पोटाला बरे

ना खाईल त्याची म्हातारी मरे

मेली तर मेली कटकट गेली


तिखट मीठ मसाला 

फोडणीचे पोहे कशाला 

आज वार सोमवार

शंकराला नमस्कार ....


मगर मशानो द्या माझी घागर

घागर बुडाली चुंबळ तरली

घरी माझी सासू खट्याळ 

मजला मारील 


आई मी येऊ का 

नको रे राजा 

बाजारात जाईन

केळ मी खाईन

साल तुला देईन 

चालेल तुला 


खुर्ची का मिरची जाशील कैसी


खीस बाई खिस


आडवळ घुम पडवळ घूम


किकीच पण बाई किकी

सुदंर मासा सुसू 

आल्या ग बाई गुजरणी गुजरणी

कापूस घ्या ग पिंजरूनी पिंजारूनी

कापूस पडला सरकीचा सारकीचा

पाऊस पडला मोत्याचा मोत्याचा


सलाम सालकी तुझी माझी पालखी

पगड फू बाई पगड फू

गेले होते रानी विसरले पाणी

पगड फू बाई पगड फू


लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या 

मामांनी दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या

एक सू सू दोन सू सू

आपण दोघी मैत्रिणी हिरवी साडी नेसू हिरवी साडी नेसू 


आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा

मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते 

लाल साडी नेसिन म्हणते 

आगोटा पागोटा


दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी

भीती तोड ग पोरी तू तर लई भारी


कटवट कणा 


नाच ग घुमा कशी मी नाचू 

या गावाचा त्या गावचा कासार नाही आला बांगडी नाही मला 

कशी मी नाचू


आग आग सुनबाई काय म्हणता सासूबाई 

माझ्या पाटल्या चोरल्यास का ग ,

का ग , का ग .


डोहाळ जेवण गाणी

1)  मोद होईल सखीला

 मोद होईल सखीला

नूतन गर्भिणीला ll धृ ll


पहिले दुसरे मासी तिजला

अन्नाचा तो विटची आला

भक्षी आम्रफला ll 1 ll


जाईजुई शेवंती आवडे

गुलाब निशिगंध नी केवडे

सुंदर बकुलफूला ll 2 ll


बागेमध्ये बांधून झुला प्रे

मे गाती ईश्वरीलीला 

वायू हलवी झुला ll 3 ll


विजयी बालक जन्मा यावे

स्वकुल उद्घरी सुस्वभावे

ही विनंती ईशाला ll 4 ll

 रचना:- पपा काकीच्या पोतडीतून

🤶🤶🤶🤶🤶🤶


2)  सांग गडे सांग काय आवडे तुला

सांग गडे सांग काय आवडे तुला 

तुजसाठी सजवूनिया बांधिला झुला ll धृ ll


बैस आशी थाटमाट पाहुदे मला

दृष्टीची तीट गडे लाऊदे तुला

मोदभरे सावकाश हलवी हिंदोळा ll 1 ll

मांगल्य दर्शवीती हिरवी कंकणे

गांधयुक्त पुष्पांची विविध भूषणे

चंदेरी शालूचा पदर झळकला ll 2 ll


विगुणीत हे भाग्य असे आज जाहले 

उदरी तुझ्या वाढतसे बाळ चिमुकले 

आनंदे सांभाळी वंश आपुला ll 3 ll


सौख्य सागरास तुझ्या भरती येऊदे 

कुलवंत शिलवंत बाळ होऊ दे

प्रार्थना अशी करुया भक्त वत्सला ll 4 ll


🤶🤶🤶🤶🤶🤶

🥰🥰🥰🥰🥰🥰


लाडक्या सुनेसाठी, सह्दयी सासूने

म्हटलेले .... " डोहाळे "


लिंबलोण उतराया या ग माझ्या सयांनो

आज माझी सोनसळी माहेराला जाय गो ।


मधुमास हुंगूनिया नार मुग्ध झाली

फळभार पेलूनिया सखी कशी डवरली ।


कातावली, खंतावली मास दोन होता 

कसनुशी मुद्रा झाली , खाता ग पीता ।


'नको' ' होय', अजीजीने हट्ट तीचा पुरवला

'कांत' हसे मनामधे, धन्यत्व तो पावला ।


तीनचार मासामासी घाबरली, बावरली

बाळाच्या चाहूलीने लेक कशी सुखावली ।


भारी वाटे, जड वाटे, फिरे गरागरा

काय दिसे कसे दिसे पुसते ती सानथोरा ।


पाचसहा मासी तिज जाणवली माया

थोड्याफार श्रमाने ती टिपते ग काया ।


शुष्क झाली, म्लान झाली, जडावली बाय

उष्ण जल आणा की ग शेकूदे ग पाय ।


सातव्याची छाया पडता सयी आतूरली

काही नको तुमचे आता भेटवा ग माऊली ।


जडभार ओटीपोट, सांभाळून जायsss 

'कुलदीप' लाव सदनी सांगते मी माय ।


या ग माझ्या सखयांनो आई ताई माई

ओटी भरुनी औक्षवा ग विनिते मी सई ।


सार्यांना ग लवूनी तू, पड त्यांच्या पाया

कुशी तुझ्या नांदतो ग " प्रभू रामराया " ।


. © मानसी केसकर

भ्रमण ७५८८३७५४३९


( सदर ओव्यांना पारंपरिक चाल आहे. त्या माझ्याच आहेत. नावासह शेयर 

केल्यास हरकत नाही. डोहाळे म्हणूनच

सादर करण्यासाठी रचल्या आहेत. )

🤶🤶🤶🤶🤶🤶


🥰🥰🥰🥰🥰🥰



बारशाची गाणी

1) आकाशाचा निळा पाळणा 

आकाशाचा निळा पाळणा वासुदेव झुलवी

अनंत रुपे जननी जगाची अनंतास डुलवी

बाळा जो जो रे 

बाळा जो जो रे ll धृ ll


निराकार तव ये साकारुनी

माय प्रसवते बाळ रुपातूनी

बोल बोबडे गोड ऐकुनी धरा तृप्त होई

अनंत रुपे......ll 1 ll


वात्सल्याची माय भवानी

बाळरुप भगवंत शोभती

आदिदेव तो धर्मासाठी पुन्हा जन्म घेई 

अनंत रुपे .....ll 2 ll


झुलवा झुलवा सखे पाळणा 

जन्म दिनी या रिझवी कृष्णा

गोपाळा गाऊनी महिमा मिळावा पुण्याई 

अनंत रुपे ......ll 3 ll


2) किती भाग्याचा पहिलाच पाळणा


किती भाग्याचा पहिलाच पाळणा

चिमुकला ग लाल बाळ तान्हा

दिला देवाने तुला नजराणा ll धृ ll


तुझ्यासाठी हा पाळणा कराचा

आणि करीन दिवा नेतराचा

रात्रंदिन रुपिन फुलावाणी जपीन

काळजाचा करीन मी बिछाना ll 1 ll


आली खुशीत बाळाची मावशी 

बघा दिसतेय भारीच हौशी

कडे तोडे करी अंगडी टोपडी भारी

बघा आणीला चांदीचा पाळणा ll 2 ll


या लाडात म्हणती साऱ्या नंदा 

वहिनी सुचत नाही काम धंदा 

खट्याळ दादाचा बाळ तुझ्या पोटी आला 

आला आला ग हा कृष्ण तान्हा ll 3 ll


म्हणे प्रेमाने बाळाचा चुलता 

असा चिमणा मी पाहिला नव्हता 

चंद्रावाणी सुकुमार राजा बिराजदार

माझ्या घरी आला ग नवा पाहुणा ll 4 ll


3) दत्ताचा पाळणा 

जो जो जो जो रे गुरुवर्या

बाळा दत्तात्रया 

जो जो जो जो रे ll धृ ll


अनुसुया माता पतिव्रता

अत्रि ऋषींची कांता 

धन्य त्रीलोकी 

गृही असता

श्रीहरी शंकर धाता 

येती अतिथी पहाया

बाळा ssssss ll 1 ll


त्रिवर्ग भुकेने पिडीलो

तुझ्या द्वारी ठाकलो 

मध्यान्ह समया 

बहु थकलो

म्हणसी माते आलो 

देई सिध्दान्न भाक्षाया 

बाळा ssssss ll 2 ll


अतिथी त्रैमुर्ती ओळखोनी 

बैसविले आसनी 

आर्ध्य पाद्य पूजा अर्पूनी

विनवी साष्टांग नमुनी

इच्छित पुरविन हो स्वामिया 

बाळा ssss ll 3 ll


भुललो तव रुपा सुंदरी

वाढी दिगंबरी 

होतो विन्मुख 

वद लौकरी

असाध्य वाटे जरी

आलो तव सत्व पहाया

बाळा ssss ll 4 ll


धन्य पतिव्रता निर्मळ

म्हणे अतिथी बाळ

प्रार्थुनी बैसाविले निश्चळ

फेडूनी वस्त्रे सकळ

आली नग्नरुपे वढाया

बाळा sssss ll 5 ll


विस्मित त्रैमुर्ती

बाळ होसी

स्तनपान मागसी

वंदी अनुसूया पायाशी

माता म्हणाविशी

सत्य करावे बोलाया

बाळा ssssss ll 6 ll


आधी गुरुदत्त अवतरला

सुरवरा आनंद झाला 

जगभ्रांती तुटली

बाळ आला

भक्तमेळा सजला

दत्तभजन कराया

बाळा ssssss ll 7 ll


दृष्ट 

कोणाची झाली दृष्ट माझ्या ग.....

लिंबलोण उतरिते ओवाळून काया ll धृ ll

 

साधुसंत येतो जाती दृष्ट त्यास लाविविती

वरियाच्या मोहनमाळा कोणाची झाली...ll 1 ll


जनाबाई काढी दृष्ट भक्तीने ती मोहरा मीठ

लावितसे गालबोट कोणाची झाली ....ll 2 ll


उखाणे

1) झुण झुण जात

झुण झुण जाते खिडकीतून पाहते

खिडकीला तीन तारा

अडकित्त्याला घुंगर बारा

तिकडून आला व्यापारी

त्याने दिली सुपारी

सुपारी देते वण्याला

हंडा आणते पाण्याला

पाणी आणते गंगेचं

वाडा बांधते भिंगाचा 

वाड्यात वाडा सात खोल्या

मधल्या खोलीत कॉट

कॉटवर गादी

गादीवर उशी

उशीवर बशी 

बशीत घड्याळ घड्याळात वाजला एक.

बशीत ओल्या नारळाचे सारण ....नावाला ....कारण

 

2) वसंताची लागता चाहूल

वसंताची लागता चाहूल 

गुढी उभी केली आणि

चैत्रागौर धावत आली 


दारी सजल चैत्रांगण

गौराईचं डाळ पन्हं

तोच झाले अक्षय तृतीयेचा येणे 


वैशाख वणव्यात दरवळला सुगंध मोगऱ्याचा 

हलकेच मनाला थंडाऊन गेला

गंध रोहिण्यातील मातीचा


लागता चाहूल मृगाची 

धरणीमाय अंकुरली

श्रावण सरीत चिंब होऊनी

सृष्टी सारी बहरली 


झिम्मा , फुगडी मंगळागौर 

नाचगाण्याना आला पूर


गणेशाबरोबर आल्या माहेरवाशिणी

त्यांची करते पाठवणी


स्वच्छ्ता करून करते

नवरात्राची तयारी 


तोच

लगबगीने धावत दिवाळी आली दारी

भाऊबीज पाडवा वाढवी नात्यातील गोडवा


कणभर तिळ मणभर गूळ 

तुमच्या माझ्यातील स्नेह असाच वाढवा


कारण अनिल रावांच नाव घेऊन सांगते कुलकर्णी-देशपांडे परिवारात आता चिमुकला पाहुणा येत आहे नवा 


🥰🤶🥰🤶🥰🤶🥰🤶


 3) कांडून कुटून केली पंचमी 

कांडून कुटून केली पंचमी 

सण आला पोळा

पोळ्याची वाटते डाळ 

तोवर आली घटाची माळ

शिलंगणाच सोन

अन दिवाळीनं केलं येणं

दिवाळीची लावते पणती

तोवर संक्रांत आली बाई नेमकी

संक्रांतीचं सुगड

आणि पूनव आली दुगड

पूनवेला केले वड्यान पाट

तेवढ्यात शिमगा आला गजानघाट

शिमग्याला केली खीर

अन रंगपंचमीन दिला धीर

रंगपंचमीचा लावते रंग 

तेवढ्यात पाडवा आला जबर दंग

पडव्याची उभारते गुढी

तोवर अक्षय तृतयेने मारली उडी

अक्षय तृतीयेचा तोरा

........रावांच नाव घेते कारवणी पर्यंत जरा दम धरा 


4)

गोठ घेतले पाटल्या घेतल्या 

घेतला राणीहार 

ठुशी घेतली चिंचपेटी घेतली

घेतला लक्ष्मीहार 

आंगठी घेतली वेल घेतले

बाजूबंद आणि वाकी 

आंबड्यातली फुलेही घेतली

राहिले नाही काही बाकी

नाकातील नथ घेतली 

तन्मणी आणि तोडे

सोन्याचांदीचे घेऊन झाले 

म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे 

जोडवी जोड मासोळ्या 

पैंजण घेतले पायी

छल्ला मेखला घेतला आता 

राहिले नाही काही बाकी

झाली सगळी खरेदी

आता मी करते नट्टापट्टा 

आगबाई घाईघाईत तर घ्यायचाच राहिला

बिंदी आणि कंबरपट्टा

तोही घेतला , बाजारात गेले आणि तोही घेतला

झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली 

आणि अनिल म्हणतात कसे 

आग उठ सरिता पहाट झाली









Tuesday, November 22, 2022

रॅपिड

तुळजापूरकर

* शाळेत तुमचा सर्वात पक्का आणि सर्वात कच्चा असलेला विषय कोणता ?

* तुमच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणी मध्ये जास्त वाटा कोणाचा असे तुम्हाला वाटते 

पालक - बँक का तुम्ही स्वतः

* लोकांना भेटी द्यायला आवडतात की लोकांनी भेटायला आलेले आवडते

* मुड चांगला करण्यासाठी लाँग ड्राईव्हला जायला आवडते की संगीत ऐकायला 

* बँकिंग करियर केले नसते तर दुसरे कोणते क्षेत्र आवडले असते

* एम्प्लॉयमेंट की रिटायरमेंट जास्त आनंद कशात वाटतो

* आजपर्यंत तुम्हाला मिळालेली सर्वात बेस्ट compliment कोणती 

* कुटुंबाबरोबर केलेली शेवटची ट्रिप कोणती

* लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज लग्न करताना जोडीदारामधील कोणता गुण आवडला

* कधी सिनेमा पाहता का ? आवडती अभिनेत्री कोणती ?




धनंजय 


* अशी एखादी गोष्ट की जी आपण करायला नको होती असे वाटते

* असा एखादा शब्द की जो तुम्हाला

 अजिबात आवडत नाही 

* तुमच्या स्वभावात कोणताही एक बदल करायला सांगितल्यास कोणता कराल  असल्यास 

* सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना संघटना म्हणजे काय हे एका शब्दात कसे सांगाल

* संघटनेच्या भविष्यासाठी गुगल मिट का प्रत्यक्ष मीटिंग

* जास्त काय आवडते डीक्टेशन की रायटींग

* तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण किंवा गोष्ट कोणती ? 

* तुमचे सर्वात आवडते गाणे हिंदी / मराठी

* उत्तम जोडीदार की उत्तम वडील कोणते नाते जास्त भावते

* तुमच्या सौ. नी तुमच्यातील कोणता गुण पाहून तुमच्याशी लग्न केले

*  फार क्वचित काही महत्वाच्या घरगुती कामासाठी घरी येण्याची दिलेली वेळ संघटनेच्या कामामुळे पळता आली नाही तर घरी प्रवेश करताना 

दबकत दबकत करता की मी असाच आहे या आविर्भावात करता 

* घरी कधी कुकिंग करता का ? तुमच्या हातचा कोणता पदार्थ सौ. ना आवडतो ?