26/27 नोव्हेंबर 2022 बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद युनिट
तेरावे द्वैवार्षिक अधिवेशन सोलापूर
डॉ. श्रुती तांबे यांचे विशेष व्याख्यान
बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य संघटना म्हणून एआयबीईएची ओळख आहे . ती एक प्रागतिक विचारावर आधारित ट्रेड युनियन चळवळ आहे . एआयबीईएने समाजातील महिलांचे स्थान ओळखले आणि बँकिंगमध्ये पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता ओघ लक्षात घेत राष्ट्रीय , राज्य आणि बँक पातळीवरील महीला परिषदेची स्थापना करुन त्यांना संघटनेतील सक्रिय सहभागासाठी एकत्रित केले . 1995 मध्ये मुंबई येथे पहिली आखिल भारतीय महिला बँक कर्मचारी परिषद आयोजित करण्यात आली होती . तर 2000 साली मुंबई येथे आयोजित केलेल्या एआयबीईएच्या 24 व्या परिषदेत कॉ. ललिता जोशी या पहिल्या महिला पदाधिकारी झाल्या त्या आजही एआयबीईए पदाधिकारी आणि अखिल भारतीय महिला परिषदेच्या संयोजक आहेत . तर सोलापूरच्या अधिवेशनात त्यांची विशेष उपस्थिती आहे ही अभिमानाची बाब आहे .
या अधिवेशनात रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांचे
" जगण्यातील संतुलन - जबाबदारी कोणाची ? "
या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . ते सर्वासाठी खुले आहे . वेळोवेळी संघटनेच्या कार्यक्रमांमधून महिला मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे आता तो मेळावा महीलापुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी मंथन या स्वरुपात सादर करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत .
जुन्या पिढीने तारेवरची कसरत करत , सुपर वुमनचा रोल करत , फारसे झुगारून देण्याची ताकद म्हणण्यापेक्षा वृत्ती नसल्यामुळे , बंडखोरीची इच्छा असूनही अनामिक भीती असल्यामुळे जगण्याचे संतुलन ही महिलांची जबाबदारी या पद्धतीने केले आहे . ती संख्या आज खूप कमी आहे . आज बँकेत आणि इतर सर्वच क्षेत्रात उच्चशिक्षित , टेक्नोसेव्ही असलेल्या , नाविन्याची कास धरलेल्या , स्वप्न उराशी बाळगून अनेक मुली करियर करण्यासाठी झेपावलेल्या दिसतात सर्वच क्षेत्रात महिला मोठ्या पदावर काम करतात पण रीतिरिवाज आहे तेच राहिलेत उलट वाढत आहेत . आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली तिची कुठेतरी घुसमट होते का ? त्यातही दोन प्रकारच्या मुली दिसतात होत असलेली घुसमट न झुगारता प्रचंड तणावाखाली सगळच साध्य करण्यासाठी धडपडतात त्याचा त्यांना स्वतःला थकाव येतो . परंपरांचे जोखड , चालीरीतीच्या उतरंडी तिने स्वतःच उतरवायला हव्यात ते करण्याची हिम्मत होत नाही . तर काहीजणी बंडखोरी करत झुगारून देऊन आपली जीवनशैली ठरवतात तर त्याचा कुटुंबव्यवस्थेला , समजव्यवस्थेला कुठेतरी तडा जाताना दिसतो मग त्या ठिकाणी भुवया उंचावल्या जातात . आता मुलींनी पण आत्मपरीक्षण करायला हवं , लांब कसारा गळ्यात टाकून हुंदडायला सोडलेल्या वासरासारखी आपली गत झाली आहे का ? ठराविक परीघ संपला की मानेला झटका बसतो का ? आपणच आपल्याला करकचून बांधून घेतलं आहे का ? एकटी ती नाही तर आता नवीन पिढीने परंपरागत मानसिक दबावाचे जू आपल्या खांद्यावर आहे ते झुगारून द्यायचे का ? स्वमग्न न राहता सजग व्हायचं का ? याच कुठेतरी मंथन होणे गरजेचे आहे . जगण्यातील संतुलन जर राखायचे असेल तर ती जबाबदारी कोणाची ? जगण्याचे संतुलन ती एकटी कशी काय शकेल यासाठी त्याचीही काही जबाबदारी आहे . परस्पर सामंजस्याने जर यावर चर्चा झाली , मंथन झाले तर त्यावर तोडगा निघू शकतो . म्हणजे पूर्ण समाजव्यवस्था जर बदलायची असेल तर कायदे नाही तर संस्कृतीत बदल घडला पाहिजे तो जाणीव पूर्वक केला पाहिजे यासाठी आणि त्यावर आपल्याला काही मार्गदर्शक सूत्रे मिळावीत यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकूणच समाजातील महिलांचे स्थान अंतर्मुख करायला लावणारं आहे हे नक्की . एका निकषाप्रमाणे महीलावर्गाची विभागणी दोन गटात करता येईल संघटित क्षेत्रात काम करणारी महिला आणि असंघटित क्षेत्रात काम करणारी महिला . या प्रमाणानुसार फक्त सहा ते सात टक्के महिलावर्ग हा संघटित क्षेत्रांतर्गत येतो . बँकिंग सेक्टर मधील महिला या संघटित क्षेत्रात येतात , एकूणच सेवा-शर्तीचा भाग पहता तो एक कंफर्ट झोनमध्ये काम करणारा वर्ग आहे , तीचा आर्थिक , शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे . पण तिचा घरगुती , सामाजिक , मानसिक , आर्थिक वावर कसा आहे , स्तर कसा आहे याचे निरीक्षण होणे , मंथन होणे गरजेचे आहे . हा विषय फक्त बँकेतील महिलांचा नसून एकूणच समाजाचा आहे . याठिकाणी दोन दृष्टिकोनातून विभाजन होणे गरजेचे आहे .
एक स्वतः तिने स्वतःला किती जखडून घेतले आहे आणि दुसरे तिच्यावर लादले किती आहे .
उच्चशिक्षण घेतले , केशभूषा , वेशभूषा बदलली की स्त्रीस्वातंत्र्य झाले का ?
स्त्री-पुरुष यातील निसर्गदत्त विभाजन हा एकच निकष सोडता माणूस या निकषावर जेव्हा समाजरचना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने समानता या विषयावर पडदा पडू शकतो .
ज्याप्रमाणे हे काम करण्यासाठी समान विचारसरणीच्या लोकांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावलेला आहे त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे , त्याहीपुढे जाऊन असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी काम केले पाहिजे .
स्त्री स्वातंत्र्य , स्त्रीमुक्ती , महीला सबलीकरण , समानता हे विषय घेऊन स्त्रियांचे बाजारीकरण चालले आहे त्याचा पडदा फाश करण्यासाठी त्याविरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे . महत्वाच्या कौटुंबिक निर्णयात महिलांना जाणीवपूर्वक सामावून घेतले पाहिजे . महिलेवर होणाऱ्या अत्याचाराची वाच फोडली गेली पाहिजे . ज्याप्रमाणे दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली त्याच पद्धतीने स्त्रियांच्या उद्घरासाठी चळवळ होणे ही काळाची गरज आहे आसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . अजूनही स्त्रिया दुय्यम स्थानावरच आहेत . प्रत्येक स्त्री जोपर्यंत स्वची लढाई लढायला पुढे येत नाही तोपर्यंत त्यात अपेक्षित बदल होऊ शकत नाही .
आज बँकिग क्षेत्र सुद्धा एका विशिष्ठ दुष्टचक्रात अडकले आहे . बँकांचे खाजगीकरण हा कळीचा मुद्दा होऊन बसला आहे . सध्या परिस्थितीत बँकेमध्ये प्रत्येक श्रेणीत महिलांचा वाढता ओघ आहे . संख्येने जर आपण जास्त असू तर आपल्या अस्तित्वाची लढाई सुद्धा आपल्यालाच लढावी लागणार आहे हे प्रत्येक महिलेने ध्यानात घेणे गरजेचे आहे . बँकाभोवती येऊ पाहत असलेले खाजगीकरणची टोळधाड हाकून लावायची असेल तर कोणी आमंत्रण देण्याची वाट न पाहता तयारीनिशी स्वतः सज्ज राहायला हवे . ही स्वतःसाठीची लढाई असल्याची मनाशी पक्की खूणगाठ बांधली तर गोष्टी सोप्या होतील .
त्यामुळे महिलांनी स्वमग्न न राहता आपल्या नजरेसमोर आपणच तयार केलेले अंधःकराचे वलय हटवल्यास नेमके ध्येय स्वच्छ दिसेल .
ही लढाई एकट्या दुकट्याने लढण्याईतकी सोपी नाही त्यासाठी समाजाचा पाठिंबा मिळणे अत्यावश्यक आहे . यासाठी एकूणच सामजिक बांधिलकी जपणे हीपण बँक कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे . कर्मचाऱ्यांमध्ये जर संख्येने महिला जास्त असतील तर संघटनेने
" बँकांचे लोकशाहीकरण "
हा उचललेला विडा सर्वार्थाने नेटाने रेटला पाहिजे , दक्ष राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे . आपल्यासाठी सर्वजण हवे असतील तर पहिल्यांदा सर्वांसाठी आपण आहोत याची ठळकपणे जाणीव करुन देणे गरजेचे आहे .
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन
औरंगाबाद युनिट
वुमेन्स कौन्सिल कनव्हेनर
कॉ. सरिता कुलकर्णी
महिलादिन प्रास्ताविक
09/03/2024
सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद आणि महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आयोजित आजच्या या कार्यक्रमांत सर्वांचे स्वागत आहे आणि याठिकाणी उपस्थित सर्व स्त्री पुरुषांना महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा !!
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व कॉम्रेड बंधू आणि भगिनींनो
8 मार्च या दिवसाला क्रांतिकारी इतिहास आहे . 1911 साली 8 मार्च हा महिलादिन ओळखला जावा म्हणून मान्यता मिळाली पण प्रत्यक्षात तो 1914 साली प्रथम साजरा करण्यात आला . महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून ब्रेड , तर उत्तम दर्जाची वागणूक मिळावी म्हणून गुलाब हे प्रतीक होते . त्या कालावधीत महिलांना कामाचे नियमित तास असावेत , मतदानाचा हक्क असावा अशा मूलभूत हक्कांसाठी लढाई करावी लागली म्हणून आपण हा दिवस क्रांतिकारी म्हणून ओळखतो या झाल्या जागतिक घडामोडी .
भारतात कायद्याने समनाता दिलेल्या स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे . कायद्याचे संरक्षण असले तरी त्याला अनेक पळवाटा आहेत . हुंडाबळी , स्त्रीभ्रूण हत्या , बलात्कार अत्याचार कधी नव्हे इतकी महिलांची सुरक्षीतता हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे , याची संवेदनशीलता वाढलेली आहे . रोज नवनवीन प्रकार आपल्या कानावर येत असतात , आता तरी काय कोणतीही घटना घडली तर मूळ प्रश्नाला बगल देत त्याला राजकीय आणि धार्मिक रंग दिले जातात
ही बाब जितकी गंभीर आहे तितकीच क्लेशदायक आहे . या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे वाटत , यामध्ये समाजाबरोबर आपली मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे . मानसिकता बदलायची म्हणजे काय करायचं ? तर सिस्टीम मध्ये राहूनच आपल्याला सिस्टीम बेल्ट करायची आहे , सिस्टीममध्ये आपल्याला जागा निर्माण करायची आहे . ठराविक ठिकाणी ठराविक फोरमवर हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात . मग आता प्रश्न आहे की आपण याला जॉईन होणार का ? आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्याला इतिहासात डोकावला हवं .
150 वर्षांपूर्वी सावित्रीबाईं फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली तेव्हा कुठे या 30/40 वर्षात महिलांना शिक्षण ही सहज प्रक्रिया झाली आहे . रमाबाई रानडे , पंडिता रमाबाई , आनंदीबाई जोशी आणि त्यांचे समविचारी पुरुष जे स्त्रियांच्या हक्कासाठी लढले ते ज्योतिबा फुले , महादेव रानडे , समाजसुधारक आगरकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा प्रवास हा खडतर होता . त्यात्या वेळी त्यांनी वेगळी वाट चोखाळली होती , त्यांनी काही त्याग केला आणि म्हणून आजची परिस्थिती आपल्याला उपलब्ध आहे . आणि हे जर आपण पाहिलं त्याची उजळणी केली तर नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते . मग आपण त्यात काही बदल करणार का , त्याग करणार का , अभ्यास करणार का मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ देणार ? का हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत . त्यासाठी बदलाची गरज आहे . मला माझं व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक बदलण्याची गरज आहे त्यासाठी अशा दिवसांचे औचीत्य साधायचे असते , प्रेरणा मिळवायची आसते .
कामगार संघटना हे समाजपरिवर्तनाचे मध्यम आहे AIBEA ही आता 8 दशकाकडे वाटचाल करणारी बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य अशी पथदर्शक संघटना म्हणून ओळखली जाते . सभासदांचे आणि वित्तसंस्थांचे प्रश्न एवढ्यापुरतच विचार न करता समाजामध्ये विषमतेविरुद्ध जी काही बंड पुकरली जातात त्यात कृतिशील प्रयत्न करण्याचे काम AIBEA करते आणि म्हणूनच बँकिंग क्षेत्रात पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता वेग लक्षात घेता त्यांना जास्त स्पेस दिली जाते , जाणीवपूर्वक सकस कार्यक्रमाचे आयोजन केले जातात .
पुणे मुंबईसारख्या ठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमाच्या विचारधारेपासून बाहेरगावच्या , ग्रामीण भागातील महिला वंचित राहतात म्हणूनच आज मराठवाडा परिसरातील महिलांना एकत्रित करुन BOMEU औरंगाबाद युनिट आणि MSBEF यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही संघटनाचे जनरल सेक्रेटरी आपले दोन दिग्गज नेते कॉ. देविदास तुळजापूरकर आणि कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी प्रयत्नपूर्वक नियोजन बद्ध पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .
आजच्या क्रंतिदिनाच्या निमित्ताने आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास प्रेरणा मिळेल असे व्यक्तिमत्व याठिकाणी उपलब्ध झालेले आहे ते म्हणजे गायत्री आपटेकर !
मला एक मिनिट यांच्या आजच्या विषयाविषयी बोलायचं आहे . त्यांचा आजचा विषयच इतका सुंदर आहे तो म्हणजे
" मीच ओलांडले मला "
हे ऐकताच क्षणभर मला अंतर्मुख व्हायला झालं आपण सर्वांनी मध्यंतरी रमाबाई रानडे यांचे चरित्र असलेली
उंच माझा झोका
ही serial पहिली असेलच या serial चे अरुण म्हात्रे यांचे tital song खूप सुरेख होते
त्यातल्या या चार ओळी
" आरतीत तेवे माझ्या
मंद या व्रताची समई
तुळशीचे रोप माझे
उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला
सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश
झुले उंच माझा झोका "
या संपुर्ण गीतांमध्ये त्यांनी रमाबाई रानडे यांचं व्यक्तिमत्त्व उकलवून दाखवण्याचा प्रयत्न केला . रमाबाई रानडे यांनी त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कसा केला , सिस्टीम कशी बेल्ट केली हे बहुतेक सर्वांना माहिती आहे . आज या निमित्ताने एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर तरळून गेले .
आता मी आपला जास्त वेळ घेत नाही . आजच्या प्रमुख वक्त्या आता आपल्याला काय काय मेजवानी देणार आहेत यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तर त्यासाठी आपण सज्ज होऊ या . याठिकाणी मी माझी प्रस्तावना थांबवते . धन्यवाद !
No comments:
Post a Comment