Friday, March 1, 2024

महिला सत्र लेख

26/27 नोव्हेंबर 2022 बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद युनिट 

तेरावे द्वैवार्षिक अधिवेशन सोलापूर 

डॉ. श्रुती तांबे यांचे विशेष व्याख्यान

बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य संघटना म्हणून एआयबीईएची ओळख आहे . ती एक प्रागतिक विचारावर आधारित ट्रेड युनियन चळवळ आहे . एआयबीईएने समाजातील महिलांचे स्थान ओळखले आणि बँकिंगमध्ये पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता ओघ लक्षात घेत राष्ट्रीय , राज्य आणि बँक पातळीवरील महीला परिषदेची स्थापना करुन त्यांना संघटनेतील सक्रिय सहभागासाठी एकत्रित केले . 1995 मध्ये मुंबई येथे पहिली आखिल भारतीय महिला बँक कर्मचारी परिषद आयोजित करण्यात आली होती . तर 2000 साली मुंबई येथे आयोजित केलेल्या एआयबीईएच्या 24 व्या परिषदेत कॉ. ललिता जोशी या पहिल्या महिला पदाधिकारी झाल्या त्या आजही एआयबीईए पदाधिकारी आणि अखिल भारतीय महिला परिषदेच्या संयोजक आहेत . तर सोलापूरच्या अधिवेशनात त्यांची विशेष उपस्थिती आहे ही अभिमानाची बाब आहे . 


या अधिवेशनात रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांचे 


" जगण्यातील संतुलन - जबाबदारी कोणाची ? " 


या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . ते सर्वासाठी खुले आहे .    वेळोवेळी संघटनेच्या कार्यक्रमांमधून महिला मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे आता तो मेळावा महीलापुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी मंथन या स्वरुपात सादर करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत .


जुन्या पिढीने तारेवरची कसरत करत , सुपर वुमनचा रोल करत , फारसे झुगारून देण्याची ताकद म्हणण्यापेक्षा वृत्ती नसल्यामुळे , बंडखोरीची इच्छा असूनही अनामिक भीती असल्यामुळे जगण्याचे संतुलन ही महिलांची जबाबदारी या पद्धतीने केले आहे . ती संख्या आज खूप कमी आहे . आज बँकेत आणि इतर सर्वच क्षेत्रात उच्चशिक्षित , टेक्नोसेव्ही असलेल्या , नाविन्याची कास धरलेल्या , स्वप्न उराशी बाळगून अनेक मुली करियर करण्यासाठी झेपावलेल्या दिसतात सर्वच क्षेत्रात महिला मोठ्या पदावर काम करतात पण रीतिरिवाज आहे तेच राहिलेत उलट वाढत आहेत . आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली तिची कुठेतरी घुसमट होते का ? त्यातही दोन प्रकारच्या मुली दिसतात होत असलेली घुसमट न झुगारता प्रचंड तणावाखाली सगळच साध्य करण्यासाठी धडपडतात त्याचा त्यांना स्वतःला थकाव येतो . परंपरांचे जोखड , चालीरीतीच्या उतरंडी तिने स्वतःच उतरवायला हव्यात ते करण्याची हिम्मत होत नाही . तर काहीजणी बंडखोरी करत झुगारून देऊन आपली जीवनशैली ठरवतात तर त्याचा कुटुंबव्यवस्थेला , समजव्यवस्थेला कुठेतरी तडा जाताना दिसतो मग त्या ठिकाणी भुवया उंचावल्या जातात . आता मुलींनी पण आत्मपरीक्षण करायला हवं , लांब कसारा गळ्यात टाकून हुंदडायला सोडलेल्या वासरासारखी आपली गत झाली आहे का ? ठराविक परीघ संपला की मानेला झटका बसतो का ? आपणच आपल्याला करकचून बांधून घेतलं आहे का ? एकटी ती नाही तर आता नवीन पिढीने परंपरागत मानसिक दबावाचे जू आपल्या खांद्यावर आहे ते झुगारून द्यायचे का ? स्वमग्न न राहता सजग व्हायचं का ? याच कुठेतरी मंथन होणे गरजेचे आहे . जगण्यातील संतुलन जर राखायचे असेल तर ती जबाबदारी कोणाची ? जगण्याचे संतुलन ती एकटी कशी काय शकेल यासाठी त्याचीही काही जबाबदारी आहे . परस्पर सामंजस्याने जर यावर चर्चा झाली , मंथन झाले तर त्यावर तोडगा निघू शकतो . म्हणजे पूर्ण समाजव्यवस्था जर बदलायची असेल तर कायदे नाही तर संस्कृतीत बदल घडला पाहिजे तो जाणीव पूर्वक केला पाहिजे यासाठी आणि त्यावर आपल्याला काही मार्गदर्शक सूत्रे मिळावीत यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .


 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एकूणच समाजातील महिलांचे स्थान अंतर्मुख करायला लावणारं आहे हे नक्की . एका निकषाप्रमाणे महीलावर्गाची विभागणी दोन गटात करता येईल संघटित क्षेत्रात काम करणारी महिला आणि असंघटित क्षेत्रात काम करणारी महिला . या प्रमाणानुसार फक्त सहा ते सात टक्के महिलावर्ग हा संघटित क्षेत्रांतर्गत येतो . बँकिंग सेक्टर मधील महिला या संघटित क्षेत्रात येतात , एकूणच सेवा-शर्तीचा भाग पहता तो एक कंफर्ट झोनमध्ये काम करणारा वर्ग आहे , तीचा आर्थिक , शैक्षणिक स्तर उंचावलेला आहे . पण तिचा घरगुती , सामाजिक , मानसिक , आर्थिक वावर कसा आहे , स्तर कसा आहे याचे निरीक्षण होणे , मंथन होणे गरजेचे आहे . हा विषय फक्त बँकेतील महिलांचा नसून एकूणच समाजाचा आहे . याठिकाणी दोन दृष्टिकोनातून विभाजन होणे गरजेचे आहे . 


एक स्वतः तिने स्वतःला किती जखडून घेतले आहे आणि दुसरे तिच्यावर लादले किती आहे .


उच्चशिक्षण घेतले , केशभूषा , वेशभूषा बदलली की स्त्रीस्वातंत्र्य झाले का ?


स्त्री-पुरुष यातील निसर्गदत्त विभाजन हा एकच निकष सोडता माणूस या निकषावर जेव्हा समाजरचना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने समानता या विषयावर पडदा पडू शकतो .


ज्याप्रमाणे हे काम करण्यासाठी समान विचारसरणीच्या लोकांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावलेला आहे त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे , त्याहीपुढे जाऊन असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी काम केले पाहिजे . 


स्त्री स्वातंत्र्य , स्त्रीमुक्ती , महीला सबलीकरण , समानता हे विषय घेऊन स्त्रियांचे बाजारीकरण चालले आहे त्याचा पडदा फाश करण्यासाठी त्याविरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे . महत्वाच्या कौटुंबिक निर्णयात महिलांना जाणीवपूर्वक सामावून घेतले पाहिजे . महिलेवर होणाऱ्या अत्याचाराची वाच फोडली गेली पाहिजे . ज्याप्रमाणे दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली त्याच पद्धतीने स्त्रियांच्या उद्घरासाठी चळवळ होणे ही काळाची गरज आहे आसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . अजूनही स्त्रिया दुय्यम स्थानावरच आहेत . प्रत्येक स्त्री जोपर्यंत स्वची लढाई लढायला पुढे येत नाही तोपर्यंत त्यात अपेक्षित बदल होऊ शकत नाही .


आज बँकिग क्षेत्र सुद्धा एका विशिष्ठ दुष्टचक्रात अडकले आहे . बँकांचे खाजगीकरण हा कळीचा मुद्दा होऊन बसला आहे . सध्या परिस्थितीत बँकेमध्ये प्रत्येक श्रेणीत महिलांचा वाढता ओघ आहे . संख्येने जर आपण जास्त असू तर आपल्या अस्तित्वाची लढाई सुद्धा आपल्यालाच लढावी लागणार आहे हे प्रत्येक महिलेने ध्यानात घेणे गरजेचे आहे . बँकाभोवती येऊ पाहत असलेले खाजगीकरणची टोळधाड हाकून लावायची असेल तर कोणी आमंत्रण देण्याची वाट न पाहता तयारीनिशी स्वतः सज्ज राहायला हवे . ही स्वतःसाठीची लढाई असल्याची मनाशी पक्की खूणगाठ बांधली तर गोष्टी सोप्या होतील .


त्यामुळे महिलांनी स्वमग्न न राहता आपल्या नजरेसमोर आपणच तयार केलेले अंधःकराचे वलय हटवल्यास नेमके ध्येय स्वच्छ दिसेल .


ही लढाई एकट्या दुकट्याने लढण्याईतकी सोपी नाही त्यासाठी समाजाचा पाठिंबा मिळणे अत्यावश्यक आहे . यासाठी एकूणच सामजिक बांधिलकी जपणे हीपण बँक कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे . कर्मचाऱ्यांमध्ये जर संख्येने महिला जास्त असतील तर संघटनेने


 " बँकांचे लोकशाहीकरण "


हा उचललेला विडा सर्वार्थाने नेटाने रेटला पाहिजे , दक्ष राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे . आपल्यासाठी सर्वजण हवे असतील तर पहिल्यांदा सर्वांसाठी आपण आहोत याची ठळकपणे जाणीव करुन देणे गरजेचे आहे .




बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन 

औरंगाबाद युनिट

वुमेन्स कौन्सिल कनव्हेनर

कॉ. सरिता कुलकर्णी


महिलादिन प्रास्ताविक

09/03/2024


सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद आणि महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आयोजित आजच्या या कार्यक्रमांत सर्वांचे स्वागत आहे आणि याठिकाणी उपस्थित सर्व स्त्री पुरुषांना महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा !!

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व कॉम्रेड बंधू आणि भगिनींनो 

8 मार्च या दिवसाला क्रांतिकारी इतिहास आहे . 1911 साली 8 मार्च हा महिलादिन ओळखला जावा म्हणून मान्यता मिळाली पण प्रत्यक्षात तो 1914 साली प्रथम साजरा करण्यात आला . महिलांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून ब्रेड , तर उत्तम दर्जाची वागणूक मिळावी म्हणून गुलाब हे प्रतीक होते . त्या कालावधीत महिलांना कामाचे नियमित तास असावेत , मतदानाचा हक्क असावा अशा मूलभूत हक्कांसाठी लढाई करावी लागली म्हणून आपण हा दिवस क्रांतिकारी म्हणून ओळखतो या झाल्या जागतिक घडामोडी .

      भारतात कायद्याने समनाता दिलेल्या स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे . कायद्याचे संरक्षण असले तरी त्याला अनेक पळवाटा आहेत . हुंडाबळी , स्त्रीभ्रूण हत्या , बलात्कार अत्याचार कधी नव्हे इतकी महिलांची सुरक्षीतता हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे , याची संवेदनशीलता वाढलेली आहे . रोज नवनवीन प्रकार आपल्या कानावर येत असतात , आता तरी काय कोणतीही घटना घडली तर मूळ प्रश्नाला बगल देत त्याला राजकीय आणि धार्मिक रंग दिले जातात

ही बाब जितकी गंभीर आहे तितकीच क्लेशदायक आहे . या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे वाटत , यामध्ये समाजाबरोबर आपली मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे . मानसिकता बदलायची म्हणजे काय करायचं ? तर सिस्टीम मध्ये राहूनच आपल्याला सिस्टीम बेल्ट करायची आहे , सिस्टीममध्ये आपल्याला जागा निर्माण करायची आहे . ठराविक ठिकाणी ठराविक फोरमवर हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात . मग आता प्रश्न आहे की आपण याला जॉईन होणार का ? आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्याला इतिहासात डोकावला हवं .

      150 वर्षांपूर्वी सावित्रीबाईं फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली तेव्हा कुठे या 30/40 वर्षात महिलांना शिक्षण ही सहज प्रक्रिया झाली आहे . रमाबाई रानडे , पंडिता रमाबाई , आनंदीबाई जोशी आणि त्यांचे समविचारी पुरुष जे स्त्रियांच्या हक्कासाठी लढले ते ज्योतिबा फुले , महादेव रानडे , समाजसुधारक आगरकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा प्रवास हा खडतर होता . त्यात्या वेळी त्यांनी वेगळी वाट चोखाळली होती , त्यांनी काही त्याग केला आणि म्हणून आजची परिस्थिती आपल्याला उपलब्ध आहे . आणि हे जर आपण पाहिलं त्याची उजळणी केली तर नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते . मग आपण त्यात काही बदल करणार का , त्याग करणार का , अभ्यास करणार का मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ देणार ?  का हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत . त्यासाठी बदलाची गरज आहे . मला माझं व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक बदलण्याची गरज आहे त्यासाठी अशा दिवसांचे औचीत्य साधायचे असते , प्रेरणा मिळवायची आसते .

    कामगार संघटना हे समाजपरिवर्तनाचे मध्यम आहे AIBEA ही आता 8 दशकाकडे वाटचाल करणारी  बँकिंग क्षेत्रातील बलाढ्य अशी पथदर्शक संघटना म्हणून ओळखली जाते . सभासदांचे आणि वित्तसंस्थांचे प्रश्न एवढ्यापुरतच विचार न करता समाजामध्ये विषमतेविरुद्ध जी काही बंड पुकरली जातात त्यात कृतिशील प्रयत्न करण्याचे काम AIBEA करते आणि म्हणूनच बँकिंग क्षेत्रात पर्यायाने संघटनेतील महिलांचा वाढता वेग लक्षात घेता त्यांना जास्त स्पेस दिली जाते , जाणीवपूर्वक सकस कार्यक्रमाचे आयोजन केले जातात .

    पुणे मुंबईसारख्या ठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमाच्या विचारधारेपासून  बाहेरगावच्या , ग्रामीण भागातील महिला वंचित राहतात म्हणूनच आज मराठवाडा परिसरातील महिलांना एकत्रित करुन  BOMEU औरंगाबाद युनिट आणि MSBEF यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही संघटनाचे जनरल सेक्रेटरी आपले दोन दिग्गज नेते कॉ. देविदास तुळजापूरकर आणि कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी प्रयत्नपूर्वक नियोजन बद्ध पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे . 

  आजच्या क्रंतिदिनाच्या निमित्ताने आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास प्रेरणा मिळेल असे व्यक्तिमत्व याठिकाणी उपलब्ध झालेले आहे ते म्हणजे गायत्री आपटेकर !

मला एक मिनिट यांच्या आजच्या विषयाविषयी बोलायचं आहे . त्यांचा आजचा विषयच इतका सुंदर आहे तो म्हणजे 


" मीच ओलांडले मला "


हे ऐकताच क्षणभर मला अंतर्मुख व्हायला झालं आपण सर्वांनी मध्यंतरी रमाबाई रानडे यांचे चरित्र असलेली

 उंच माझा झोका 

ही serial पहिली असेलच या serial चे अरुण म्हात्रे यांचे tital song खूप सुरेख होते 

त्यातल्या या चार ओळी


" आरतीत तेवे माझ्या

 मंद या व्रताची समई

 तुळशीचे रोप माझे 

उंच आभाळात जाई

 मीच ओलांडले मला

सोबतीस माझा सखा 

येई कवेत आकाश 

झुले उंच माझा झोका "


या संपुर्ण गीतांमध्ये त्यांनी रमाबाई रानडे यांचं व्यक्तिमत्त्व उकलवून दाखवण्याचा प्रयत्न केला . रमाबाई रानडे यांनी त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स कसा केला , सिस्टीम कशी बेल्ट केली हे बहुतेक सर्वांना माहिती आहे . आज या निमित्ताने एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर तरळून गेले .

आता मी आपला जास्त वेळ घेत नाही . आजच्या प्रमुख वक्त्या आता  आपल्याला काय काय मेजवानी देणार आहेत यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तर त्यासाठी आपण सज्ज होऊ या . याठिकाणी मी माझी प्रस्तावना थांबवते . धन्यवाद !


Wednesday, December 6, 2023

कीर्ती

 प्रिय तीन दिवसांचे पिल्लू उर्फ गणू

30/06/2023

मायना काय लिहू ह्या विचारात घोळत बसले मी. तसे आपले नाते अगदी काही तासांचे ताजे ताजे आणि तसे पाहीले तर ९ महिन्यांचा अखंड सहवास!!

सहज मजेत ५ महिन्याच्या गर्भाला आशिषने गणू म्हणून हाक मारली आणि झालास की तू सगळ्यांचाच गणू. मुलगा आहे की मुलगी हे माहीत देखील नसताना घरातले सगळेजण तुला गणू म्हणायला लागले. आता नाव फायनल होईपर्यंत टोपणनाव फायनल आहे.

पिल्लू, आत्ता तुला माझ्या कुशीत गाढ झोपलेलं बघून आपला प्रवास डोळ्यांसमोर तरळतोय. अगदी काल परवा तर आम्हाला तुझ्या येण्याची चाहूल लागली होती. लांब लांब अंदमानच्या समुद्रकिनारी आम्ही ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली. दोन्ही आजी-आजोबा, आत्या आणि मावशी सगळ्यांना जणू हर्षवायुच झाला! 

गेले २ महिने स्कुबा डायव्हिंग करायला उत्सुक असलेली मी अचानक २ पायऱ्या सुद्धा खूप जपून उतरू लागले.

मला आणि तुझ्या बाबाला  मात्र आता तुला पहायची घाईच झाली. ट्रिप झाली की तुझ्या आगमनाची निश्चिती!!

पुण्याला येताच तडक गाठला तो दवाखानाच!

त्या सोनोग्राफी मधे दिसणारा इवलासा पांढरा ठिपका म्हणजे तू!!! आम्ही क्षणभर बघतच राहिलो. ही तुझी आणि माझी पहिली भेट. रिपोर्ट मध्ये Cardiac activity is seen हे वाचून माझ्या आत एक नाजूकसे हृदय धडधडत आहे  ह्याची लख्ख जाणीव झाली. 

३ महिने कोणालाही ही गुड न्यूज़ सांगायची नाही

आता संयमाचा खरा कस लागणार होता! कधी एकदा हा आनंद सगळ्यांना सांगता येईल ह्याची वाट पाहत दिवस जाऊ लागले.

एरवी ट्रॅफिफ मधे गाडी काढायचा कंटाळा करणारा तुझा बाबा आता माझा हक्काचा ड्रायव्हर झाला! 

फक्त माझा नव्हे.. आपला😇 

पौष्टिक खा, दगदग नको अशा दोन्ही आज्यांच्या सूचना सुरूच होत्या. 

बघता बघता ३ महिने झाले, मिरजेला चोर ओटी भरली आणि मग मी गडबडीने सर्व भावी मावशांना ही news दिली.

 पिल्लू, तुझ्या येण्याची केवळ चाहूलच काय धामधूम घेऊन आली माहिताय? 

सगळ्या आज्या,आजोबा, मामा, काका, मावश्या, आत्या आणि इतर अनेक मंडळी कंबर कसून तयारच झाले तुझ्या स्वागताला... अगदी बाप्पाच्या आगमनाइतका उत्साह संचारला सगळ्यांच्यात. सगळ्यांना वेध लागले ते २ जुलैचे! 

दर आठवड्याला डॉक्टरकाका बोलवत होतेच तुझा फोटो बघायला. 

पाहता पाहता ५ महिने झाले आणि तुझा चेहरा, एवढेसे हात पाय सगळं दिसू लागलं!  प्रत्येक स्कॅन मधे काहीतरी वेगळं दिसायचं आणि आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे आमच्या. वाटायचं की ह्याहून भारी काहीच नाही... पण तोवर पुढचा स्कॅन यायचा आणि त्याहून भारी फीलिंग!!


दर आठवड्याला तुझी प्रगती बघत दिवस भराभर पळत होते! 

इथून सुरू झाले ते डोहाळेजेवणांचे पर्व..

पुण्याच्या ज्योती मावशीआजी आणि प्रतिभा आत्याआजी ह्या दोघींनी मस्त खादगीचा बेत करुन आपले भरपूर लाड केले बर का!

तुझा जन्म मिरजेत म्हणजे तुझ्या आजोळी planned होता. एप्रिल महिना आला आणि पुण्याला टाटा बाय बाय करून आपण दोघे निघालो की मिरजेला.

मिरजेत आजी आजोबांनी एकदम झकास असा सेटअप केलेला. आपल्या मिरजेच्या घरात मला धुळीचा त्रास होतो म्हणून चक्क नवीन २ फ्लॅट मध्ये तात्पुरते शिफ्टिंग केलेलं! असा आहे साहेब तुमचा थाट!

७ एप्रिल रोजी आजीने सुरेख प्लॅन करुन डोहळेजेवण केलं. आपण त्या दिवशी पंचपाकवन्नाचे जेवण भरपुर हाणले😇

हा सगळ्या घरच्या मंडळींचा उत्सा...तर ऑफिसमधल्या सर्व मामा मावश्यांनी एक ऑनलाइन म्हणजे virtual babyshower केला😂 

आई होणार म्हणून माझे आणि पर्यायी तुझे खूप लाड सुरू झाले. मंजू मावशी आजी खास दहिवडे करायला मिरजेला येऊन गेली! उल्का आत्याआजी कडे जाऊन दिवसभराची खाद्यजत्रा केली..

मिरजेच्या आजीला तर आपण नुसत्या बसून फर्माईशी केल्या! 

मिरजेतल्या आजी आजोबांच्या मित्रपरिवारांनी सुद्धा खाण्यापिण्याचे भरपूर लाड केले. भिशीतल्या आज्यांनी तर दणक्यात डोहळेजेवण सुद्धा केलं.

ह्या सगळ्यात दुधात साखर म्हणूनच की काय माझ्या ४ जवळच्या मैत्रिणी म्हणजेच तुझ्या मावशा सुध्दा नवीन पाहुण्याची बातमी घेऊन तयार होत्या! आसावरी मावशी, अक्षता मावशी, ऋता मावशी आणि श्वेता मावशी!!!

आमची online डोहाळ्यांची देवाणघेवाण सुरूच होती. 

२ मेला तुझा मित्र अगस्त्य याचा जन्म झाला. 


आता तुझ्या आगमनाला अवघे २ महिने राहिले आणि पोटात तुझा वांडपणा वाढत चालला होता.

१-२-३-४... अशा सलग २०-२० लाथा मला जाणवू लागल्या. प्रत्येक लाथेगणिक एक सुखद लहर मनात उमटू लागली. हळूहळू तू पोटात गोल गोल फिरत आहेस हेही मला कळू लागलं. गर्भातल्या माझ्या पिल्लाला भेटायची उत्सुकता शिगेस पोचली होती.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला आणि तुझी भेट अगदी नजीक येऊन ठेपली😇

२४ जूनला ठरले की २७ जूनला चिमुरड्याला बाहेरच्या जगात आणायचे आहे🫣 

धडधडत्या छातीने मी तुझ्या बाबाला ही बातमी दिली तर तो पुढच्या क्षणी गाडी काढून पुण्यातून निघाला सुद्धा! बार्शीचे आजी आजोबा, पुण्यातून आत्या आणि बेळगाव मधून मावशी अशा सर्व दिशांनी तुझे fans पळत सुटले😂 इथून मात्र दिवस म्हणावं तर पटकन आणि म्हणावं तर मुंगीच्या गतीने पळाले.

पाहता पाहता तो दिवस -२७ जून २०२३ उजाडला! सकाळी १२ वाजता आपले आगमन ठरले होते. वरकरणी शांत चेहरा असला तरी माझ्या मनात काहूर उठले होते. उत्सुकता, हळवेपणा, हुरहूर, अस्वस्थता अशा एका विचित्र मनस्थितीमध्ये भीती मात्र मुळीच नव्हती. इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहिली, ज्या भेटीची आस धरली आणि ज्या मिठीची स्वप्ने बघितली... तो क्षण असा माझ्या उंबरठ्यावर येऊन उभा होता.

ऑपरेशन थिएटरच्या आत जाताना सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आत टेबलावर पहाडल्यानंतर डॉक्टर काकांच्या गप्पांनी उरलीसूरली चिंतासुद्धा पळून गेली. काही क्षणात ट्याहा ट्ट्याहा करत एक अत्यंत खणखणीत असा आवाज ऐकायला आला आणि माझ्या तोंडभर हसू पसरले! एक छोटासा आनंदश्रू माझ्या गालावर ओघळला... डॉक्टर काकानी चपखल पणे एक डायलॉग मारला "million dollar smile"

त्याइतका आनंद खरच नव्हता रे झाला ह्यापूर्वी. थोडया वेळात मला तो एवढासा मांसाचा गोळा आणून दाखवला "congrats, it's a baby boy" हा क्षण माझ्या स्मृतीत पक्का कोरला गेला.

गेले ९ महिने नाळेने बांधले गेलेले आपण त्याच क्षणी विलग झालो आणि कायमचे मायलेक म्हणून जोडले गेलो.

आज तुला येऊन ३ दिवस झालेत. जागरण, औषधे ह्यांनी खूप खूप थकली आहे रे मी पण एक अनामिक ऊर्जा आहे आतून.

आईची माया ही एक शक्ती आहे ह्याची प्रचिती येती आहे.

दिवस पळतील आणि तू झपाट्याने मोठा होशील. ह्या क्षणाला मागे टाकणारे अनेक परमानंदाचे क्षण तू आम्हा दोघांना देशीलच. तेव्हा ही आपली पाहिली भेट धूसर होत जाईल म्हणून च हा लेखन प्रपंच!


तुझीच

ताजी ताजी ३ दिवसाची आई



खदखद!!


आज ४ डिसेंबर २०२३! 

बरोबर १ आठवड्यात माझी maternity leave संपेल. मला ११ डिसेंबर रोजी join व्हायचे आहे. ऑफिस मधले सहकारीसुद्धा कीर्ती back in action पाहायला उत्सुक आहेत. 

मी तशी सुरुवातीपासून career-minded, महत्त्वाकांक्षी वगैरे आहे. माझं काम अतिशय आवडीचे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कामाला, तिथल्या शिस्तीला, deadlines ला प्राधान्य द्यायला मला मनापासून आवडते. ते कधीच मला बंधन किंवा ओझे नाही वाटले. 

असे सगळे असतानाही आज नको नको नको म्हणत असतानाही तो विचार मनात डोकावलाच!! ज्याची धास्ती होती आणि जे मला शक्यच नाही असे वाटत होते त्या कल्पनेने डोक्याचा एक कोपरा हळूच व्याप्त केला होता.

तो विचार म्हणजे... काही दिवस सोडावी का नोकरी? घ्यावा का ब्रेक? आहे का गरज एवढी ओढाताण करायची?


ह्याच कारण म्हणजे माझ्याकडे बघून हातपाय नाचवत खुदुखुदू हसणारे आणि मी कडेवर घेईपर्यंत भोकाड पसरून घर डोक्यावर घेणारे माझेच बाळ- आत्रेय!

विश्वासच नाही बसत की ६ महिने असे संपले सुद्धा.. 

मन म्हणते,

"अरे कालच नाही का तू ह्या जगात आला! आणि

परवाच तर मी शिकले लंगोटी बांधायला आणि पाठीवर हात फिरवून ढेकर काढायला!

अरे काल नाही का तू आणि मी पूर्ण रात्र जागून काढली! आणि परवाच नाही का तुझी पहिली लस दिली!

अरे कालच तर आपण तुझे कान टोचले! आणि परवाच नाही का बाबाने नवीन पाळण्यात घालून तुझे फोटो काढले!

अरे काल तर तुला माझी ओळख पटायला लागली! आणि परवाच नाही का मला तू गोड अशी first smile दिलीस!

अरे कालच तर तू लांब लांब हुंकार देऊ लागलास! आणि परवाच नाही का तू थेट पालथाच पडलास!"


हे सगळं असे कालपरवा होत असताना अचानक असा "आज" येऊन ठेपला आणि बाळाला बाजूला सारून काम जवळ घ्याव लागते ह्या कल्पनेने माझे धाबे दणाणले! 

हा सगळा वेळ केव्हा संपला? जागरण होतंय ह्याचे रडगाणे गाता गाता अचानक ६ महिने झाले पण!!! आता हे माझे पिल्लू लगेच काही महिन्यात एक वर्षाचे पण होईल का? मला समजेल ना हा प्रवास?

असा reality hits सुरू असताना मी स्वतःला सावरले. स्वतःशी संवाद साधला. नेमक वाईट कशाचं वाटतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आता "मी काम करणे" हा बाळावर अन्याय आहे वगैरे विचार नाहीच आले उत्तरात! 

उत्तर एकच होत : आपल्या हातून त्याच बालपण निसटू लागलंय ही एकमेव तीव्र भावना... गेले ६ महिने माझे आयुष्य आत्रेयमय झालेल आहे. त्याच्या बाललीला पाहत जागरणाचा थकवा विसरुन जायची आता सवयच लागली आहे.

हे सगळं अचानक थांबवून समोर तो शुष्क लॅपटॉप उघडून दिवसभर काम करणे अशक्य वाटू लागलंय. मी नाही म्हणून हा १ तास रडेल, १ दिवस त्याला माझी आठवण येऊन येऊन रडू फुटेल पण मग १ दिवस त्याला सवयसुद्धा होईलच की माझ्या नसण्याची... सगळच हातातून निसटून जातंय असे वाटत आहे. 

पण हे असे नसणार! 

हो , मला आता त्याचे तान्हया बाळाचे रूप नाही मिळणार पाहायला!

पण तो घरभर रांगेल तेव्हा त्याच्यामागे मीच तर पळणार आहे. रोज कॉल्स घेऊन किटलेले माझे कान ,आत्रेयचे पहिले बोबडे बोल ऐकायला तेवढेच आसुसलेले असणार आहेत. लॅपटॉप बडवून दमलेल्या माझ्या बोटांना आराम म्हणून एक घास चिऊचा भरवायचा आहेच! 

अजून तर हा चालायचा आहे, पळायचा आहे आणि धडपडायचा सुध्दा आहे.

हे तर पुस्तकाच पहिले पान आहे. मोठ्या ग्रंथातील पहिला श्लोक आहे. एका मस्त thriller आणि action वाल्या movie चा हा फक्त trailer आहे!

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

त्यामुळे आता मी ताज्या दमाने ऑफिस जॉइन करणार आहे. कारण आता फक्त कीर्ती back in action नसून आत्रेयची आई कीर्ती back in action आहे!

😇


*स्तनपानाचे पान उलटताना*


आनंदात सर्व आणि साजरे होई त्याचे आगमन 

नाळेचे तुटले नाते म्हणून मात्र सैरभैर तिचे मन 


विचारांचे वादळ डोक्यात आणि हात पोटाकडे जाई

नवा नवा जीव तो आणि नवखीच की ती आई 


मनातून आतुरता फक्त पिल्लूच्या भेटीची 

पण चिंता तिला पडली आता त्याच्या भुकेची 


टयाहा टयाहा आले कानी आणि चटकन बसली आवरून 

"कुठे आहे बाळाची आई" ऐकून स्वतःला घेई सावरून 


भरून आले डोळे आणि फुटला तिचा पान्हा 

मांडीवर तिच्या जेव्हा आला इवलासा तो कान्हा 


बहरला आसमंत आणि क्षणात शांत झाली ती

स्तनपानाची सुरू झाली आता दैवी अनुभूती 


अहोरात्र सुरू झाला आता तहानभूकेचा खेळ 

थकून गेली ती बिचारी बसवून झोपेचा मेळ 


सरला काळ आणि खाऊ लागला तो चिऊकाऊचे घास 

मायलेकाचा उरला आता फक्त रात्रीचा सहवास 


दिवस जवळ आले आता तिचे घरट्याबाहेर उडायचे 

ठरलेच की मग आता अंगावरचे सोडवायचे 


तशी न डगमगणारी ती पण आज वेगळाच होता नूर 

स्तनपानाच्या निरोपाची तिला नुसतीच हुरहूर 


रडवेल्या बछड्याने तिच्याकडे केला खूप हट्ट 

पण वाघीण अशी ती की दूर उभी राहिली घट्ट 


रडण्याच्या आवाजाबरोबर वाढे अंतर त्यांच्या मधले 

नाराजीने का होऊन वाटी-चमच्याला केले त्याने आपले 


बाळ होई मोठे आणि विस्मरणात जाई ह्या यातना 

आई घेते नवा जन्म स्तनपानाचे पान उलटताना...!!


नशीबवान आहेस!


आज रोजी १४ मार्च २०२५! 


काय पटापट दिवस पुढे सरकत आहेत... बघता बघता आत्रेय दीड वर्षाचा झाला! पूर्वी मी मनातली खदखद लिहून व्यक्त केली आहे. पण आज वेगळ आहे! आज मनात कृतज्ञता दाटून आली आहे आणि त्यामुळे गतवर्षाचा थोडा आढावा...


नोव्हेंबर-२०२३ आला आणि आता महिन्याभरात पिल्लूची आणि माझी नवीन घडी बसवायचे नियोजन सुरू झाले.

तेवढ्यात कंपनीने विचारले की १५ दिवस आधी जॉइन करू शकतेस का? पुढे रजा adjust करता येईल. संधी चांगली होती पण काय करावे असा माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला.

चेहऱ्यावर भले मोठठे प्रश्नचिन्ह घेऊन सासू सासऱ्यांना हे update दिले! चाय पे चर्चा रंगली आणि नेहमीप्रमाणे माझ्यामागे ते दोघे खंबीरपणे उभे राहिले. माझ्या सासूबाई बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरी फक्त मी आणि retired सासरे! 

तरीही त्यांनी "करू आपण मॅनेज" म्हणून मला जॉइन करायला सांगितले. आशिषला वर्क फ्रॉम होम नसल्याने त्याला पुण्याला जावे लागले. 

मी जॉइन झाले. पहिला कॉल सुरू झाला आणि colleague कडून पहिला प्रश्न हाच आला की अग तू सासरी आहेस? आशिष नाहीये? मग बाळाकडे कोण?? 

मी जेव्हा अभिमानाने उत्तर दिले की "माझे सासरे! "

तेव्हा बाकी सगळे थक्कच झाले . 

मला माझी मैत्रीण म्हणाली "नशीबवान आहेस!!"


महिन्यभरात मी पुण्याला निघाले. थोड्या मुश्किलीनेच पण पुन्हा एकदा माझ्या नशिबाने आत्रेयला सांभाळायला अगदी आईसारखे प्रेम करणारी nanny मिळाली. वैशालीताईंची कामाची पद्धत आणि निटनेटकेपणा पाहून पुन्हा सगळे हेच म्हणाले "नशीबवान आहेस"


आत्रेय मोठा होऊ लागला. त्याला वेगवेगळ्या चवी खायला घालणे आणि स्वतःच्या हाताने खायची सवय लावणे (baby led weaning) हे अजिबातच सोपे नव्हते. 

पुन्हा एकदा नशिबाने माझ्या नणंदेचे आकांक्षाचे लग्न अजून ६ महिन्यांवर होते. ती आमच्याबरोबर होती. तिने हा विडा उचलला. आम्ही प्रवाहाविरुद्ध काहीतरी करू पाहत होतो! प्रचंड गोंधळ आणि अमर्यादित patience चा हा खेळ होता. पण आकांक्षाच्या मदतीने आम्ही थकून भागून का होईना ही प्रगती करू लागलो.

आज १.५ वर्षाचा आत्रेय जेव्हा आपापला जेवू पाहतो आहे तेव्हा मला पुन्हा एकदा सगळे म्हणतात "नशीबवान आहेस"


वैशाली ताई आणि माझे workfromhome हे गणित एकदम चपखल बसले होते. पण आता मला work from office करायला लागणार होते. वैशाली ताईंना जड अंतःकरणाने निरोप देऊन आत्रेयचे पाळणघर- आजोळ सुरू करावे लागले. तो तिथे छान रमू लागला पण थोडी नाजूक तब्येत असल्याने खूप आजारी पडू लागला. आमच्या दोघांचेही ऑफिस सुरू झाले असल्याने राजांचा प्रश्न येऊ लागला. अशावेळी आमचा हुकमी एक्का ठरली माझी आई! एक फ़ोन करायचा अवकाश आणि हातातली सगळी कामे सोडून माझे आईबाबा किंवा एकटी आई पुण्याला हजर होऊ लागले. सासूबाईंना बँक आहे, त्यांना रजा नाही मिळत त्यामुळे आईला यावे लागते आहे ह्या विषयांची चर्चा सुद्धा नाही झाली. 

समाजात अकारण कटू असलेले विहिण हे नाते आणि ह्या दोघी विहीणींचे मैत्रिणीसारखे नाते पाहून पुन्हा एकदा ऐकू आलेच "नशीबवान आहेस"


सगळी घडी बसली. रूटीन सुरू झाले. अत्रिच्या खोड्या आणि प्रगती पाहत दिवस पळत होते. जॉइन करून १ वर्ष झाले आणि माझी official tour प्लॅन होऊ लागली.

पुन्हा एकदा माझ्या पोटात गोळा आला आणि पुन्हा एकदा माझी सपोर्ट सिस्टम मदतीसाठी सरसावली. २ आठवड्यांच्या माझ्या टूरची तिकिटे होण्याआधीच दोन्ही आजी -आजोबांचा प्लॅन फिक्स झाला. १ आठवडा आत्रेय बार्शीला जाणार आणि १ आठवडा माझे आई बाबा पुण्याला येणार! तू काही टेन्शन घेऊ नकोस .

मला confidence यावा म्हणून माझ्या सासूबाई १ आठवडा पुण्याला आल्या आणि रोज आत्रेय आजी आबांकडे झोपला. एक रात्र तर फक्त आम्हाला आश्वस्त वाटावे म्हणून आत्रेयला घेऊन आजी-आजोबा आकांक्षा कडे गेले आणि एक पूर्ण दिवस त्याला छान सांभाळले!

एवढा सगळा खटाटोप फक्त ह्यासाठी की आम्हाला निश्चिंती असावी...

शिक्षण सुरू असल्याने एरवी कोणत्याच गणितात नसणारी माझी बहीण अचानक मदतीला म्हणून शनिवार रविवार पुण्याला यायला तयार झाली.

कसे मॅनेज करणार म्हणता म्हणता सगळे सज्ज झाले आत्रेय बार्शीमध्ये आजीच्या कुशीत गाढ झोपू लागला आणि आज मी निघाले सुद्धा!

आता कोणीही म्हणायची सुद्धा गरज नाही इतकी मी नशीबवान आहे ! ♥️

  


27/06/2025


Halloo आई व पप्पा

आज डबल धमाका असतो आपल्याकडे... तुमचा लग्नाचा वाढदिवस आणि आत्रेयचा वाढदिवस ! 

आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली त्यामुळे मला नेमका संसार काय असतो आणि तो कसा करायचा ह्याचा उलगडा हळूहळू होत आहे. 

पण ह्या ५ वर्षात मी तुम्हा दोघांना आणि तुमच्या एकमेकांना पुरक अश्या संसाराला जवळून अनुभवत आहे! बोलता बोलता सहजपणे तुम्हाला compliments दिल्या जातात पण पप्पांविषयी व्यक्त होणे राहून जाते. त्यामुळे हे खास anniversary special पत्र!

सासू सासरे आणि सून ह्या नात्याबद्दल आत्तापर्यंत एक कटकट आणि अपरिहार्य गोष्ट असेच बघितले जाते.

अशा ह्या अकारण कटू असलेल्या नात्याला पूर्णपणे challenge करायला मला हे सासर मिळाले आहे. माझे मित्र मैत्रिणी थक्क होऊन माझ्या stories ऐकात असतात. माझे काही मित्र त्यांच्या आई बाबांना तुम्हा दोघांच उदाहरण सुद्धा देतात. अश्यावेळी मनापासून अभिमान वाटतो मला तुमचा ..

लग्नानंतर माझे आई बाबा इतके निर्धास्त आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या friendly आणि frank support मुळेच! आईतर नेहमीच म्हणते ह्या विहीणबाई माझी छान मैत्रीण झाल्या आहेत तशाच दुसऱ्या मिळाव्या 😜

ह्या पत्रात काय लिहावे आणि काय वगळावे असे झाले आहे. एकदोन किंवा बोटावर मोजण्याइतक्या घटना नाहीतच...आपल्या कुटुंबाची पुर्ण जीवनशैलीच तुम्ही दोघांनी प्रयत्नपुर्वक घडवलेली आहे. 

लग्न झाल्यावर मुलीना तसे सगळे बदलते असे म्हणतात. मला थोडी धास्ती वाटली होती. पण ते तुम्ही होऊच दिले नाही 

" तुझ्या पद्धतीने चालू दे " 

असे म्हणत माझे मला पुर्ण freedom दिले. त्यामुळे तो मोकळेपणा आणि आपलेपणा माझ्याकडून सुद्धा सहजच आला. 

विशेष म्हणजे मी lockdown मुळे बार्शीत लगेचच सलग राहायला आले. स्वभाव वगैरे नीट कळायच्या आतच आपला सगळ्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. पण this was the best thing that happened to me! 

कामामुळे आम्ही तिघेही दिवसभर वरच्या खोल्यात असायचो. तेव्हा मी सून म्हणून काही वेगळ्या अपेक्षा किंवा गृहीत धरणे असे काहीच कुठेच नव्हते... उलट जास्तीत जास्त privacy सहजपणे देत होतात.

नेहमीच्या बायका वगैरे घरी येत नसतानाही माझीच जास्त काळजी घेतली जात होती... घरी लागणारे सामान, मला नव्यानेच समजलेला जलोत्सव (🤣पाणी भरणे) आणि इतर सर्व गोष्टी तुम्ही दोघे काही कळूही न देता करून टाकायचात.

मला पालेभाजी विशेष आवडत नाही म्हणून जेवायच्या आधी हळूच थोडीशी कोशिंबीर करणारे हे सासरे फक्त मलाच मिळाले आहेत! 

वर्ष २ वर्षे बार्शीत घरी राहिल्याने सगळे सणवार एकत्र साजरे झाले. पण देव, नैवद्य, सोवळे ह्याचे अवडंबर न करता, मुख्य म्हणजे जीवाचा आटापिटा न करता ते उत्साहाने कसे साजरे करायचे हेच मी पाहिले. पाहुणेरावळे, रीतिरिवाज, घरगुती कार्यक्रम, सोहळे ह्याची माझ्या कलाने आणि माझ्या पद्धतीने ओळख होऊ दिली. 

मला वाटत त्यामुळे मी सहजपणे सामावत गेले.

सगळे आधीचे बरेवाईट झटकून एकदम एक नवीन सासरची "brand new सून" होण्याचा आग्रह (दुराग्रह?) कोणीच नाही धरला... आणि त्यामुळेच मी चटकन बार्शीकर कुलकर्ण्यांच्या प्रेमात पडले! ♥️


मी माझ्या कित्येक मैत्रिणी बाळ झाल्यावर जॉइन करताना इतक्या त्रस्त आणि अस्वस्थ झालेल्या पाहिल्या आहेत. पण माझा तुम्हा दोघांच्या प्रेमावर आणि काळजी घेण्यावर इतका विश्वास होता की त्यामुळेच मी आत्रेय लहान असताना त्याला घेऊन बार्शीत राहिले. पप्पा तर स्वतःहून इतके करतात की कधीकधी मला आश्चर्य, अभिमान आणि कौतुक सगळं एकत्रच वाटायच! आत्तासुद्धा आत्रेय आजारी पडला की आबा पुढच्या गाडीने पुण्यात दाखल! 

एकूणच दोघांनीही खंबीरपणे आमच्या पाठी उभे राहून आम्हाला boost दिले आहे . मग ती आर्थिक , मानसिक , शारीरिक कोणतीही मदत करण्यास, आम्हाला उभे करण्यात कसूर ठेवली नाही आणि त्याचा गाजवजा तर अजिबातच नाही . त्याचमुळे पाच वर्षात आमची एवढी मजल गेली , आम्ही settle झालो. 

नव्याची नवलाई संपली, मी रुळले. पण तुम्हा दोघांच्या समजूतदार स्वभावाचे अनेक पैलू मला माहीत होत गेले. आमचे वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस तर साजरे करण्याची आईंची पद्धत मला फार आवडते ती म्हणजे पत्रलेखन! 

आई म्हणतात " तुमच्या खास दिवशी आम्ही disturb करत नाही , तुम्ही Enjoy करा!" 

कोण करते असे? 

खाण्यापिण्याची चंगळ... ह्या विषयावर तर पुस्तकच लिहावं लागेल. 

पप्पांना निवडक सामान आणायची आवड तर आईंना विविध पदार्थ करून द्यायचा नाद!

वेगवेगळ्या चटण्या , लोणची , घावन पीठ , थालीपीठ भाजणी पीठ , कित्येक दिवस शेंगदाण्याचे कूट , खाऊचे पदार्थ , एक ना दोन कितीतरी पदार्थ अजूनही मी केलेले नाहीत आणि करावे लागत नाहीत . स्वस्थ बसणे तर माहितच नाही... बँक, शेत आणि इतर सगळे दोघे मिळून ठरवून तयारी करता , बार्शीतून येताना प्रत्येकाच्या आवडीचे काहीतरी करुन आणलेले असतेच , जडच्या जड उचलणार नाहीत इतक्या पिशव्या खचाखच भरुन आणायच्या!

आता गेल्या वर्षीपासून तर हे सगळं दुप्पट झाले ( Rahatani special )😍

generally मुली सासू आली की नाक मुरडतात... मी मात्र राणीसारखा आराम करू घेते. 

ऑफिस झाले की कंटाळा आलेला असतो स्वैपाकघरात जायचाच. कामाला बायका असल्या की काम हलके नक्कीच होते पण त्यांना manage करणे हे काही सोप्प नाही! 

आई आल्या की मात्र त्या किचन पूर्ण हाताळतात! काय करायचे, किती करायचे आणि आत्रेयला काय द्यायचे हे सगळं त्या बघतात.. माझी कोणतीही आई आली तरी मी थेट पानात वाढल्यावरच मेन्यू बघते😜

शिवाय तेव्हा ताटात १-२ नवीन पदार्थांची पर्वणी वेगळीच... पप्पा आले की भाजी, फळे, किराणा आणायला लागणार नाही म्हणून आशिष खुश असतो ! 

 काय सुख असते त्यात म्हणून सांगू . 😍

खाण्यापिण्याची इतकी आवड असतानाही आपली 

तब्ब्येत आणि पथ्य पाणी कसे सांभाळायचे हे तुम्हाला गवसले आहे. आजारपणाचा थांगपत्ता लागू देत नाहीत , दवाखाना कधी करतात कळू देत नाहीत .

माझ्या मावश्या , आजी , आत्या एवढेच काय मिरजेतील घरकाम करणाऱ्या बायका , पुण्यातील काम करणाऱ्या बायका मला नेहमी म्हणतात की तू खूप नशिबवान आहेस .

सणवार तर त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने करण्याची पद्धत बदलत नवीन सुरू केली की त्यामुळे सणांची मी तर वाट पाहत असते . त्यावेळी सगळे घरी असणार , जाचक प्रथा त्यांनी हद्दपार केल्या आहेत. सण म्हणलं की तरुणांना लाजवेल असा दोघांचा उत्साह असतो. पप्पांनी पूजेचे सगळे तयार करून ठेवलेले असते . जणू एखाद्या event mnaagement कंपनी ने करावे अशी तयारी असते.

अगदी साडी आणि त्यावर ज्वेलरी सेटचे बरेच option सुद्धा तयार असतात!

आम्ही आलो की हे इथे आहे ते तिथे आहे घ्या , घाला मजा करा. त्यामुळे दिवाळी , महालक्ष्मी , नृसिंह नवरात्र ह्याचे दडपण कधीच वाटत नाही.

मी नेहमी आईना women council चे काम करताना पाहिलं आहे . बँकेतील मुलींना मुलांना फोनवर बोलताना ऐकले आहे . नंतर त्यांचे किस्से ऐकले आहेत . जवळजवळ आई त्यांच counselling च करत असतात , त्यांचे विचार ऐकले की मला थक्क व्हायला होते. त्या काळाबरोबर तर आहेतच पण मला तर त्या काळच्या पुढे वाटतात . काळाच्या ओघात त्या नवीन गोष्टी adopt करायला खूप flexible आहेत . आमच्या काळात आम्हाला superwoman बनाव लागलं तुम्ही अजिबात बनू नका असे त्यांचे म्हणणे असते . शिक्षण घेतलं , एवढ्या जबाबदारीचे job करायचे ही काही खाऊची गोष्ट नाही असे त्या म्हणतात . सून बनण्यात मला कोणतीही डोकेदुखी झाली नाही इथून पुढेही होणार नाही ही खात्री आहे . पत्र मोठ झालं आहे पण 10% पण लिहून झाले नाही पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे मला कसा अनुभव आला हे मला लिहायचं होतं एकूणच अशा पद्धतीचे वातावरण मला मिळालेले आहे . 

वेळोवेळी सगळ्याच प्रकारच्या सल्ल्याची मलाच आवश्यकता आहे आपण नेहमीच आपली उच्च level ची चर्चा करत राहू . 


Wish you a very happy anniversary!



तुमचीच 

सगळेच म्हणतात तशी लिखाणात शोभणारी सासूची सून 😍😍


हॅलो सुनबाई 

धन्यवाद बाळा 

एकदम सिक्सर मारलात की हो ! किती बारीक बारीक लक्षात आहे तुझ्या छान वाटलं वाचून मला . आमच्या वागण्यातून तुला सुख मिळत असेल तर यापेक्षा जास्त सुख कशात आहे ग .

छान छान आपण असेच give and take policy follow करु आणि सुखी राहू . 

त्याबरोबर आपल्या कुटुंबालाही समाधानी ठेऊ .

एकमेकांना समजून घेण्यात जे सुख आहे ते दुसरे कशात नाही हे खरे ! पु. ल. देशपांडे यांची मैत्रीवर एक कविता आहे तीच नात्यात सुद्धा लागू होते असे मला वाटते असो असाच मोकळेपणा राहू दे . समजलेच नाही तर दिलखुलासपणे व्यक्त होत जा हा नेहमीचा सल्ला आहे .

खूप आनंद वाटला 

आणखी एकदा धन्यवाद !

😍😍😍

तुझेच आई पप्पा

Monday, July 24, 2023

बाळासाठी गाणी

 तू खायबा साखर लोणी


माझिया बाळा

तू खायबा साखर लोणी

चक्री भोवर विटी दांडू

रंगीत गोट्या भवरी चेंडू

खेळसी खेळा तू.....माझीया ...


नवलक्ष गोपाळ गडी 

वाट पाहती यमुना स्थळी

मिळूनी मेळा तू.....माझीया .


बाळ मुकुंद खातो लोणी

कौतुक पाहे नंद राणी

भरुनी डोळा तू.....माझीया ...


भानुदास विनंती करी

प्रसाद द्यावा मज श्रीहरी

त्रिभुवन बाळा  तू.....माझीया ...


डाव्या गुढग्याने रंगतो

Friday, April 7, 2023

पारंपरिक ठेवाl


पारंपरिक ठेवा 

लग्नाची गाणी 


1) घाणा भरणे गीत

1) आधी मूळ धाडा गणेश मोरायला 

आधी मूळ धाडा अंबिका मातेला

यावे चिंतील्या कार्याला 

यावे चिंतील्या कार्याला 

मांडव घातीला चारी कोपरे साधून

उभा कंबर बांधून

गणराया उभा कंबर बांधून उभा कंबर बांधून 


मांडवाच्या दारी चिखल का ग झाला

नवऱ्या मुलीचा बाप न्हाला

मांडव घातीला नुसत्या जाईचा / चाफ्याचा 

छंद मुलीच्या आईचा / वहिनीचा

मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण 

नवऱ्या मुलीला केळवण

मांडवाच्या दारी कोण ग मिरवली

नवऱ्या मुलीची कुरवली

कोण ग आहे हौशी 

नवऱ्या मुलीची मावशी



2) पाच पानाचा ग विडा ,

त्यावर मोतियाचा घोस,

वर नेमिला गणेश , वर नेमीला गणेश,

ग गणपती आधी l

पाच पानाचा ग विडा,

वर चिकण सूपारी ,

आधी नेमिला व्यापारी, आधी नेमिला व्यापारी,

ग गणपती आधी l

मांडवाच्या ग दारी,

पहिली चिठ्ठी देव्हाऱ्याला,

मग समस्त सोयरयाला ,ग समस्त सोयरयाला

ग गणपती आधी. l


 2) हळदीचे गाणे 

U Tube

1) गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाली 

2) पिवळी पिवळी हळद लागली 

3) गुलाबाची कली बघ हलदीन माखली


3) लग्नाची मंगलाष्टक 


या हो या तुम्ही या कार्याला या हो या तुम्ही या कार्याला 

शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला ll धृ ll


प्रथम नमुया गजाननाला 

द्वितीय नमन ते सरस्वतीला 

कुलदेवता त्याही स्मरुया 

आशीर्वाद तोही घेऊया

शुभ या कार्याला 

बोला sssss ll 1 ll


पिता वधूचे.....असती

माता वधूची....असती

बहीण...आणि....असती

भाऊ वधूचा .....असतो

शुभ या कार्याला

 बोला ssss ll 2 ll


......... तूम्ही दोघे

आनंदाने स्वानंदाने

संसार करावा छान आपुला

नेहमी जागणे कर्तव्याला

हेतू मनी बाळगा sssss

बोला sssss ll 3 ll

 4 ) आंबा शिंपणी 

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । 

फळाचा राजा कसा l अमरुत बरसतो

दारी ग माझ्या आई l कसा सावली धरतो ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । ।१।।

घाल तोंडात साखर ।ओटीत अन्नपूर्णा ।

ओटी भर ग आई आता l नाजूक मालत्याने।

तोषवण्या घरदारा l मन मुरडीन मालत्यासम 

शिंपीला आई अंबा l शिंपीला अंबा ।। २ ।।

शेल्याचे टोक बाई l करते ग घाईघाई

 वंदून ग तुम्हाला l येते ग आता आई ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा ।। ३।।

लंगड्या श्रीरंगाला l पतीराजाने लपवीले ।

गुढ संसाराचे l आपसूक कळले ।

शिंपीला अंबा बाई शिंपीला अंबा ।।

रचना - © मानसी केसकर

  दि. १८/१२/२०२२


5 ) सुनेचा गृहप्रवेश 

U Tube

मुली तू आलीस आपुल्या घरी


मुंजीची गाणी

मातृ भोजन 

ओम भवती भिक्षा म्हणती

भाग्य तुझे किती 

घालोनी लांगोटी दंड उभा घे हाती

मग म्हण रे ओम भवती भाग्य ...ll धृ ll

चटण्या अन कोशिंबिरी बहुप्रकारे केल्या खिरी

भोजनास गर्दी किती भाग्य तुझे किती ll 1 ll


मातेच्या ताटातूनी घास घे तू प्रेमाने

आजपासूनी उच्चिष्ट कधी न तुझ मिळे ll 2 ll


विनाविती तव पदकमाला मोद द्याल भगिनीला 

ममकाला शुभबाला भाग्य तुझे किती ll 3 ll


मुंजीची मंगलाष्टक


प्रथम वंदूनी निमंत्रिले त्या गिरिजा पुत्रा ते

शुभमंगल व्रतबंध बटूचे आज योजिले हे ll धृ ll


जमली सारी आप्त मंडळी गृह हर्षे भरले

मातपित्याचे हात आजला स्वागतास सजले

आनंदाने भरले डोळे

आनंदाने भरले डोळे अनुश्री मायेचे

शुभ मंगल.....ll 1 ll


मातृभोजनी माता भरवी प्रेमे पुत्रा ते

आराध्य रे तव आज पासूनी बाल्य सरायाचे

गायत्रीच्या मंत्र बळे तुज पुढेच जाण्याचे 

शुभमंगल......ll 2 ll


अवनी धरिती कोमल हस्ते मंगल कलशा ते

मंगल आक्षत उधळीत सारी देती आशिषा ते

कानी पडती मंगल स्वर हे सुरेल सनईचे

शुभमंगल......ll 3 ll


कानमंत्र हा धनू देतसे बाळ आराध्या रे

धर्माज्ञेचे पालन करुनी उचली पाऊला ते

बलशाली आन कीर्तिवंत तुज जगी व्हावयाचे 

शुभ मंगल...... ll 4 ll


प्रथम आश्रमी टाकी पाऊल 

प्रथम आश्रमी टाकी पाऊल घेऊनी दंडाते

भिक्षा पहिली मागण्यास तू न धरी लज्जे ते

दिसे आराध्य हा गोजिरवाणा रुप सावळ्याचे

शुभ मंगल .......ll 5 ll


मंगळागौरीची गाणी


रहिबाई ग रहिबाई  ग तुझा गजनी वाडा

वाड्याला वाड्याला

तुझ्या खिडक्या चार

खिडकीला खिडकीला

कुणी लाविले मोर 

मोराला मोराला 

तुझ्या रेशमी गोंडा 

हलतो कसा झुलतो कसा


माळ्याच्या मळ्यामंदी गोफण काठी

वांगी भरलेत देठोनदेठी

वांगी तोडून भरलाय हरा 

त्यावर झाकला साखरशेला 

साखरशेला वाऱ्याने गेला 

पगड फु बाई पगड फू

( भेंडी , काकडी , दोडका , भोपळा )


गोफ वीणू बाई गोफ वीणू

आर्ध्या रात्री गोफ विणू

गरे घ्या गरे पोटाला बरे

ना खाईल त्याची म्हातारी मरे

मेली तर मेली कटकट गेली


तिखट मीठ मसाला 

फोडणीचे पोहे कशाला 

आज वार सोमवार

शंकराला नमस्कार ....


मगर मशानो द्या माझी घागर

घागर बुडाली चुंबळ तरली

घरी माझी सासू खट्याळ 

मजला मारील 


आई मी येऊ का 

नको रे राजा 

बाजारात जाईन

केळ मी खाईन

साल तुला देईन 

चालेल तुला 


खुर्ची का मिरची जाशील कैसी


खीस बाई खिस


आडवळ घुम पडवळ घूम


किकीच पण बाई किकी

सुदंर मासा सुसू 

आल्या ग बाई गुजरणी गुजरणी

कापूस घ्या ग पिंजरूनी पिंजारूनी

कापूस पडला सरकीचा सारकीचा

पाऊस पडला मोत्याचा मोत्याचा


सलाम सालकी तुझी माझी पालखी

पगड फू बाई पगड फू

गेले होते रानी विसरले पाणी

पगड फू बाई पगड फू


लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या 

मामांनी दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या

एक सू सू दोन सू सू

आपण दोघी मैत्रिणी हिरवी साडी नेसू हिरवी साडी नेसू 


आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा

मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते 

लाल साडी नेसिन म्हणते 

आगोटा पागोटा


दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी

भीती तोड ग पोरी तू तर लई भारी


कटवट कणा 


नाच ग घुमा कशी मी नाचू 

या गावाचा त्या गावचा कासार नाही आला बांगडी नाही मला 

कशी मी नाचू


आग आग सुनबाई काय म्हणता सासूबाई 

माझ्या पाटल्या चोरल्यास का ग ,

का ग , का ग .


डोहाळ जेवण गाणी

1)  मोद होईल सखीला

 मोद होईल सखीला

नूतन गर्भिणीला ll धृ ll


पहिले दुसरे मासी तिजला

अन्नाचा तो विटची आला

भक्षी आम्रफला ll 1 ll


जाईजुई शेवंती आवडे

गुलाब निशिगंध नी केवडे

सुंदर बकुलफूला ll 2 ll


बागेमध्ये बांधून झुला प्रे

मे गाती ईश्वरीलीला 

वायू हलवी झुला ll 3 ll


विजयी बालक जन्मा यावे

स्वकुल उद्घरी सुस्वभावे

ही विनंती ईशाला ll 4 ll

 रचना:- पपा काकीच्या पोतडीतून

🤶🤶🤶🤶🤶🤶


2)  सांग गडे सांग काय आवडे तुला

सांग गडे सांग काय आवडे तुला 

तुजसाठी सजवूनिया बांधिला झुला ll धृ ll


बैस आशी थाटमाट पाहुदे मला

दृष्टीची तीट गडे लाऊदे तुला

मोदभरे सावकाश हलवी हिंदोळा ll 1 ll

मांगल्य दर्शवीती हिरवी कंकणे

गांधयुक्त पुष्पांची विविध भूषणे

चंदेरी शालूचा पदर झळकला ll 2 ll


विगुणीत हे भाग्य असे आज जाहले 

उदरी तुझ्या वाढतसे बाळ चिमुकले 

आनंदे सांभाळी वंश आपुला ll 3 ll


सौख्य सागरास तुझ्या भरती येऊदे 

कुलवंत शिलवंत बाळ होऊ दे

प्रार्थना अशी करुया भक्त वत्सला ll 4 ll


🤶🤶🤶🤶🤶🤶

🥰🥰🥰🥰🥰🥰


लाडक्या सुनेसाठी, सह्दयी सासूने

म्हटलेले .... " डोहाळे "


लिंबलोण उतराया या ग माझ्या सयांनो

आज माझी सोनसळी माहेराला जाय गो ।


मधुमास हुंगूनिया नार मुग्ध झाली

फळभार पेलूनिया सखी कशी डवरली ।


कातावली, खंतावली मास दोन होता 

कसनुशी मुद्रा झाली , खाता ग पीता ।


'नको' ' होय', अजीजीने हट्ट तीचा पुरवला

'कांत' हसे मनामधे, धन्यत्व तो पावला ।


तीनचार मासामासी घाबरली, बावरली

बाळाच्या चाहूलीने लेक कशी सुखावली ।


भारी वाटे, जड वाटे, फिरे गरागरा

काय दिसे कसे दिसे पुसते ती सानथोरा ।


पाचसहा मासी तिज जाणवली माया

थोड्याफार श्रमाने ती टिपते ग काया ।


शुष्क झाली, म्लान झाली, जडावली बाय

उष्ण जल आणा की ग शेकूदे ग पाय ।


सातव्याची छाया पडता सयी आतूरली

काही नको तुमचे आता भेटवा ग माऊली ।


जडभार ओटीपोट, सांभाळून जायsss 

'कुलदीप' लाव सदनी सांगते मी माय ।


या ग माझ्या सखयांनो आई ताई माई

ओटी भरुनी औक्षवा ग विनिते मी सई ।


सार्यांना ग लवूनी तू, पड त्यांच्या पाया

कुशी तुझ्या नांदतो ग " प्रभू रामराया " ।


. © मानसी केसकर

भ्रमण ७५८८३७५४३९


( सदर ओव्यांना पारंपरिक चाल आहे. त्या माझ्याच आहेत. नावासह शेयर 

केल्यास हरकत नाही. डोहाळे म्हणूनच

सादर करण्यासाठी रचल्या आहेत. )

🤶🤶🤶🤶🤶🤶


🥰🥰🥰🥰🥰🥰



बारशाची गाणी

1) आकाशाचा निळा पाळणा 

आकाशाचा निळा पाळणा वासुदेव झुलवी

अनंत रुपे जननी जगाची अनंतास डुलवी

बाळा जो जो रे 

बाळा जो जो रे ll धृ ll


निराकार तव ये साकारुनी

माय प्रसवते बाळ रुपातूनी

बोल बोबडे गोड ऐकुनी धरा तृप्त होई

अनंत रुपे......ll 1 ll


वात्सल्याची माय भवानी

बाळरुप भगवंत शोभती

आदिदेव तो धर्मासाठी पुन्हा जन्म घेई 

अनंत रुपे .....ll 2 ll


झुलवा झुलवा सखे पाळणा 

जन्म दिनी या रिझवी कृष्णा

गोपाळा गाऊनी महिमा मिळावा पुण्याई 

अनंत रुपे ......ll 3 ll


2) किती भाग्याचा पहिलाच पाळणा


किती भाग्याचा पहिलाच पाळणा

चिमुकला ग लाल बाळ तान्हा

दिला देवाने तुला नजराणा ll धृ ll


तुझ्यासाठी हा पाळणा कराचा

आणि करीन दिवा नेतराचा

रात्रंदिन रुपिन फुलावाणी जपीन

काळजाचा करीन मी बिछाना ll 1 ll


आली खुशीत बाळाची मावशी 

बघा दिसतेय भारीच हौशी

कडे तोडे करी अंगडी टोपडी भारी

बघा आणीला चांदीचा पाळणा ll 2 ll


या लाडात म्हणती साऱ्या नंदा 

वहिनी सुचत नाही काम धंदा 

खट्याळ दादाचा बाळ तुझ्या पोटी आला 

आला आला ग हा कृष्ण तान्हा ll 3 ll


म्हणे प्रेमाने बाळाचा चुलता 

असा चिमणा मी पाहिला नव्हता 

चंद्रावाणी सुकुमार राजा बिराजदार

माझ्या घरी आला ग नवा पाहुणा ll 4 ll


3) दत्ताचा पाळणा 

जो जो जो जो रे गुरुवर्या

बाळा दत्तात्रया 

जो जो जो जो रे ll धृ ll


अनुसुया माता पतिव्रता

अत्रि ऋषींची कांता 

धन्य त्रीलोकी 

गृही असता

श्रीहरी शंकर धाता 

येती अतिथी पहाया

बाळा ssssss ll 1 ll


त्रिवर्ग भुकेने पिडीलो

तुझ्या द्वारी ठाकलो 

मध्यान्ह समया 

बहु थकलो

म्हणसी माते आलो 

देई सिध्दान्न भाक्षाया 

बाळा ssssss ll 2 ll


अतिथी त्रैमुर्ती ओळखोनी 

बैसविले आसनी 

आर्ध्य पाद्य पूजा अर्पूनी

विनवी साष्टांग नमुनी

इच्छित पुरविन हो स्वामिया 

बाळा ssss ll 3 ll


भुललो तव रुपा सुंदरी

वाढी दिगंबरी 

होतो विन्मुख 

वद लौकरी

असाध्य वाटे जरी

आलो तव सत्व पहाया

बाळा ssss ll 4 ll


धन्य पतिव्रता निर्मळ

म्हणे अतिथी बाळ

प्रार्थुनी बैसाविले निश्चळ

फेडूनी वस्त्रे सकळ

आली नग्नरुपे वढाया

बाळा sssss ll 5 ll


विस्मित त्रैमुर्ती

बाळ होसी

स्तनपान मागसी

वंदी अनुसूया पायाशी

माता म्हणाविशी

सत्य करावे बोलाया

बाळा ssssss ll 6 ll


आधी गुरुदत्त अवतरला

सुरवरा आनंद झाला 

जगभ्रांती तुटली

बाळ आला

भक्तमेळा सजला

दत्तभजन कराया

बाळा ssssss ll 7 ll


दृष्ट 

कोणाची झाली दृष्ट माझ्या ग.....

लिंबलोण उतरिते ओवाळून काया ll धृ ll

 

साधुसंत येतो जाती दृष्ट त्यास लाविविती

वरियाच्या मोहनमाळा कोणाची झाली...ll 1 ll


जनाबाई काढी दृष्ट भक्तीने ती मोहरा मीठ

लावितसे गालबोट कोणाची झाली ....ll 2 ll


उखाणे

1) झुण झुण जात

झुण झुण जाते खिडकीतून पाहते

खिडकीला तीन तारा

अडकित्त्याला घुंगर बारा

तिकडून आला व्यापारी

त्याने दिली सुपारी

सुपारी देते वण्याला

हंडा आणते पाण्याला

पाणी आणते गंगेचं

वाडा बांधते भिंगाचा 

वाड्यात वाडा सात खोल्या

मधल्या खोलीत कॉट

कॉटवर गादी

गादीवर उशी

उशीवर बशी 

बशीत घड्याळ घड्याळात वाजला एक.

बशीत ओल्या नारळाचे सारण ....नावाला ....कारण

 

2) वसंताची लागता चाहूल

वसंताची लागता चाहूल 

गुढी उभी केली आणि

चैत्रागौर धावत आली 


दारी सजल चैत्रांगण

गौराईचं डाळ पन्हं

तोच झाले अक्षय तृतीयेचा येणे 


वैशाख वणव्यात दरवळला सुगंध मोगऱ्याचा 

हलकेच मनाला थंडाऊन गेला

गंध रोहिण्यातील मातीचा


लागता चाहूल मृगाची 

धरणीमाय अंकुरली

श्रावण सरीत चिंब होऊनी

सृष्टी सारी बहरली 


झिम्मा , फुगडी मंगळागौर 

नाचगाण्याना आला पूर


गणेशाबरोबर आल्या माहेरवाशिणी

त्यांची करते पाठवणी


स्वच्छ्ता करून करते

नवरात्राची तयारी 


तोच

लगबगीने धावत दिवाळी आली दारी

भाऊबीज पाडवा वाढवी नात्यातील गोडवा


कणभर तिळ मणभर गूळ 

तुमच्या माझ्यातील स्नेह असाच वाढवा


कारण अनिल रावांच नाव घेऊन सांगते कुलकर्णी-देशपांडे परिवारात आता चिमुकला पाहुणा येत आहे नवा 


🥰🤶🥰🤶🥰🤶🥰🤶


 3) कांडून कुटून केली पंचमी 

कांडून कुटून केली पंचमी 

सण आला पोळा

पोळ्याची वाटते डाळ 

तोवर आली घटाची माळ

शिलंगणाच सोन

अन दिवाळीनं केलं येणं

दिवाळीची लावते पणती

तोवर संक्रांत आली बाई नेमकी

संक्रांतीचं सुगड

आणि पूनव आली दुगड

पूनवेला केले वड्यान पाट

तेवढ्यात शिमगा आला गजानघाट

शिमग्याला केली खीर

अन रंगपंचमीन दिला धीर

रंगपंचमीचा लावते रंग 

तेवढ्यात पाडवा आला जबर दंग

पडव्याची उभारते गुढी

तोवर अक्षय तृतयेने मारली उडी

अक्षय तृतीयेचा तोरा

........रावांच नाव घेते कारवणी पर्यंत जरा दम धरा 


4)

गोठ घेतले पाटल्या घेतल्या 

घेतला राणीहार 

ठुशी घेतली चिंचपेटी घेतली

घेतला लक्ष्मीहार 

आंगठी घेतली वेल घेतले

बाजूबंद आणि वाकी 

आंबड्यातली फुलेही घेतली

राहिले नाही काही बाकी

नाकातील नथ घेतली 

तन्मणी आणि तोडे

सोन्याचांदीचे घेऊन झाले 

म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे 

जोडवी जोड मासोळ्या 

पैंजण घेतले पायी

छल्ला मेखला घेतला आता 

राहिले नाही काही बाकी

झाली सगळी खरेदी

आता मी करते नट्टापट्टा 

आगबाई घाईघाईत तर घ्यायचाच राहिला

बिंदी आणि कंबरपट्टा

तोही घेतला , बाजारात गेले आणि तोही घेतला

झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली 

आणि अनिल म्हणतात कसे 

आग उठ सरिता पहाट झाली









Tuesday, November 22, 2022

रॅपिड

तुळजापूरकर

* शाळेत तुमचा सर्वात पक्का आणि सर्वात कच्चा असलेला विषय कोणता ?

* तुमच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणी मध्ये जास्त वाटा कोणाचा असे तुम्हाला वाटते 

पालक - बँक का तुम्ही स्वतः

* लोकांना भेटी द्यायला आवडतात की लोकांनी भेटायला आलेले आवडते

* मुड चांगला करण्यासाठी लाँग ड्राईव्हला जायला आवडते की संगीत ऐकायला 

* बँकिंग करियर केले नसते तर दुसरे कोणते क्षेत्र आवडले असते

* एम्प्लॉयमेंट की रिटायरमेंट जास्त आनंद कशात वाटतो

* आजपर्यंत तुम्हाला मिळालेली सर्वात बेस्ट compliment कोणती 

* कुटुंबाबरोबर केलेली शेवटची ट्रिप कोणती

* लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज लग्न करताना जोडीदारामधील कोणता गुण आवडला

* कधी सिनेमा पाहता का ? आवडती अभिनेत्री कोणती ?




धनंजय 


* अशी एखादी गोष्ट की जी आपण करायला नको होती असे वाटते

* असा एखादा शब्द की जो तुम्हाला

 अजिबात आवडत नाही 

* तुमच्या स्वभावात कोणताही एक बदल करायला सांगितल्यास कोणता कराल  असल्यास 

* सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना संघटना म्हणजे काय हे एका शब्दात कसे सांगाल

* संघटनेच्या भविष्यासाठी गुगल मिट का प्रत्यक्ष मीटिंग

* जास्त काय आवडते डीक्टेशन की रायटींग

* तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण किंवा गोष्ट कोणती ? 

* तुमचे सर्वात आवडते गाणे हिंदी / मराठी

* उत्तम जोडीदार की उत्तम वडील कोणते नाते जास्त भावते

* तुमच्या सौ. नी तुमच्यातील कोणता गुण पाहून तुमच्याशी लग्न केले

*  फार क्वचित काही महत्वाच्या घरगुती कामासाठी घरी येण्याची दिलेली वेळ संघटनेच्या कामामुळे पळता आली नाही तर घरी प्रवेश करताना 

दबकत दबकत करता की मी असाच आहे या आविर्भावात करता 

* घरी कधी कुकिंग करता का ? तुमच्या हातचा कोणता पदार्थ सौ. ना आवडतो ?








Sunday, October 30, 2022

अंदमान एक विलक्षण अनुभव

अंदमान एक विलक्षण अनुभव 


26 ऑक्टोंबर 2022


अशिषाचे लग्न झाल्यापासून एक फॅमिली ट्रिप काढायची अशी आमची नेहमी चर्चा व्हायची पण प्रत्यक्षात काही होत नव्हते . प्रत्येकाला आपापल्या बजेटची तयारी करायची होती . पण आता जर या दिवाळीच्या सुट्टीत प्लॅन झाला नाही तर पुन्हा सगळ्यांचा मेळ केव्हा होईल हे सांगता येणार नव्हते . त्यादृष्टीने अंदमानचा प्लॅन सुरू झाला . पण गेल्या वर्षापासून पोर्टब्लेअर एअरपोर्टचे काम सुरु असल्यामुळे ते दहा दिवसापैकी सहा दिवस सुरु व चार दिवस बंद असते असे समजले . यावर्षी आमच्याकडे दिवाळी पण नव्हती मग मुलांनी अगदी प्लॅनच केला की सगळ्यांच्या सुट्ट्यांचा मेळ बसवू आणि  लक्ष्मीपूजन झाले की आपण अगदी सहा दिवसांचा अंदमान प्लॅन करु . काढलेल्या माहितीप्रमाणे 572 बेटापैकी 36 बेटावर वस्ती आहे 6/7 बेटांवर पर्यटकांना जाता येते आणि पर्यटकांना अभ्यासकांना , निसर्गप्रेमींना कितीही दिवस राहिले तरी समाधान होणार नाही मग सगळाच विचार करून मेळ घालत सहा दिवसाचा आम्ही प्लॅन केला पोर्टब्लेअर आणि हॅवलॉक इथे राहून आसपासची बेटे पाहण्यासाठी सगळ्यांच्या सुट्ट्या , रजा पाहून आम्हाला प्लॅन करावा लागला होता त्यामुळे अगदीच पीक पिरियडमधे आमची ट्रिप निघाली होती . फ्लाईटची तिकिटे आमचे आम्ही काढली होती तर पुण्याचा दिपाली इखे यांचे लेगसी हॉलीडेज यांच्याकडून अंदमानचे पॅकेज घेतले होते . ठरलेल्या प्लॅन प्रमाणे दिवाळी पडव्यादिवाशी पहाटे आमचे विमान पुणे-चेन्नई आणि नंतर चेन्नई-पोर्टब्लेअरसाठी रवाना झाले . गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या अंदमान ट्रीपला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली . आम्ही दोघे , आशिष-कीर्ती आणि आकांक्षा केतकी असा सहा जणांचा ग्रुप होता . ऐनवेळी कीर्तीच्या आईबाबाचे येणे तब्ब्येतीमुळे कॅन्सल झाले त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच अर्र असे झाले कीर्ती तर थोडी खट्टू झाली पण त्यांची ट्रिप तिच्या आत्याबरोबर रीशेड्युल झाली  त्यामुळे ती पुन्हा खुश झाली , मग आम्ही सहाजण निघालो . दोन दिवसापासून पाऊस थांबला होता आणि आचानक थंडी पडली होती पण ट्रिपच्या उत्सहापुढे पहाटे तीनची थंडी पण जाणवत नव्हती सगळ्यांच्या मनात एक अनामिक ओढ होती . सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही सकाळी साडेसातला चेन्नई एअरपोर्टला उतरलो . पुढच्या विमानाला तीनचार तासांचा वेळ होता त्यामुळेे चहा नाष्टा करुन वेळ होता म्हणून आम्ही विमानतळावर फिरत बसलो . चेन्नई विमानतळ तसे पाहायला छान वाटले सुबक नक्षीकाम केलेल्या धातूच्या अनेक मुर्ती तिथे पाहायला मिळाल्या . सहसा कुठे पाहायला न मिळणाऱ्या मूर्ती म्हणजे उभा गणपती , शेषशय्येवरील विष्णू , कार्तिकस्वामी , कामदेवाची मूर्ती आणखी बऱ्याच मूर्ती होत्या . 

बरोबर आकरा वाजता आमचे विमान पोर्टब्लेअरकडे रवाना झाले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला . एक वाजता आमचे फ्लाईट उतरणार होते तर साडेबारापासून आम्हाला खाली पूर्ण पाणी दिसू लागले जसजसे जवळ येऊ लागले तसतशी छोटी छोटी हिरवीकंच बेटे दिसू लागली आणि खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची जाणीव झाली कारण विमान उतरण्यापूर्वी शहरावर असलेले प्रदूषण आपले स्वागत करत असते इथे मात्र आम्हाला स्वच्छ असलेले सर्वात मोठं अंदमानचे बेट सभोवती निळेशार पाणी , किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू , ऊन आणि लाटेमुळे बदलणारे रंग इतक्या उंचीवरुनही नयनरम्य दिसत होते . निसर्गाने अंदमानला बहाल केलेली देणगी पाहून हरकायला होत होते . 



आत्ता तर ही सुरुवात आहे आणखी काय काय पाहायला मिळणार असा विचार करुन लहान मुलासारखे , फुलपाखरासारखे मन भिरभिरायला लागले . एअरपोर्टला बाहेर दिखे मॅडमचा माणूस आलेला होताच . बाहेर आल्यावर एअरपोर्टला महाराष्ट्रीयन असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून स्वाभिमानाने उर भरून आला दोन मिनिट तिथेच शांत उभे राहिलो आणि हॉटेलकडे रवाना झालो .



 चेकईन करून फ्रेश होऊन बरोबर अडीच वाजता आम्ही खाली आलो इथे पाच वाजता सूर्य मावळतो आणि लगेच अंधार होतो म्हणून सनसेटवाला लोकल बीच आणि 1943 मधे पाहिला तिरंगा ज्या ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी फडकवला त्याठिकाणी जाण्याचा प्लॅन केला होता . वेळ जास्त नव्हता आणि सारखे खाणे सुरू होते मग आम्ही जेवण स्कीप करुन बीचवर गेलो . बीचवर स्नॅक्स घेतले , तिथले नियम पाहून ऐकून खूप छान वाटले खूप कडक नियम होते . प्लास्टिक कचरा कुठेही टाकायला पूर्णपणे बंदी होती मुख्य म्हणजे पाण्यासाठी एक लिटरवाली बाटलीच नव्हती . एकतर काचेची बाटली किंवा दोन लिटरची बाटली घ्यावी लागत असे की ज्ययोगे ती पटकन संपवून फेकून देता येऊ नये . प्रत्येकजण निसर्गाचे रक्षण काळजीपूर्वक करतात नियमांचे उल्लंघन केले जात नाही . जागोजागी कचराकुंड्या आहेत आणि त्यातच कचरा टाकायचा हा कडक नियम आहे त्यामुळे इथले बीच अगदी चकाचक आहेत . कुठूनही पहा माणसांची गर्दी असली तरी समुद्र एकदम स्वच्छ आहे . ही खरोखर समाधानाची गोष्ट आहे . रिलॅक्स मूडमध्ये आम्ही बीचवर वेळ घालवला 



त्यानंतर आम्ही 

 " 1943 "

या ऐतिहासिक पॉइंटला आलो समुद्रकाठी भिंतीवर 1943 असे भले मोठे जाडजूड , उंच दगडी अंक त्याच्यासमोर उंच मोठ्ठा झेंडा फडकत होता ते दृश्य पाहून उर भरुन आला त्याक्षणी सलामी द्यावीशी वाटली आणि मी दिली .



 तिन्हीसांजेला एका बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज दुसऱ्या बाजूला झेंडा , 1943 या अंकाभोवती आणि समोर टेकडीवर हिरवळीवर भारताच्या नकाशाचे लाईटिंग बाकी सर्व शांत वातावरणात होते त्यात एक तास कसा निघून गेला समजले पण नाही .

अंदमानची राजधानी असलेले पोर्टब्लेअर हे शहर बेटावर असल्यामुळे नैसर्गिक वाटत होते . वाहनांची फारशी दाटी नाही , माणसांची उर धापापेपर्यंत धावाधाव नाही त्यामुळे रस्त्यावर फार गर्दी नाही , असलेली गर्दी मॅनेज करण्यासाठी तिथे सिग्नल नाहीत , ट्रॅफिक पोलिस हातात " स्टॉप आणि गो " या पाट्या दाखवत ट्रॅफिक मॅनेज करत होते . मनाला समाधान वाटत होते .

आमच्या प्लॅनप्रमाणे सकाळी 8.45 वाजता सेल्युलर जेल पाहण्यासाठी आम्ही निघणार होतो . भल्या पहाटे दोन वाजल्यापासून आम्ही जागे होतो त्यामुळे 8 वाजताच जेवणे आटोपून आम्ही विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो . हॉटेल व्यवस्था पूर्ण आपल्यासारखी होती आम्ही लवकरच झोपी गेलो .

ट्रिप ठरली तशी दोन महिन्यापासून अंदमान विषयी माहिती वाचणे , व्हिडिओ पाहणे , ऐकणे नित्याचे होते . आता उद्या प्रत्यक्षात त्या भूमीवर पाय ठेवण्याचा योग येणार होता . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तर लहानपणापासून ऐकलेले होते पण त्यांनी ज्या तुरुंगातील दहा बाय दहाच्या खोलीत ऐन तारुण्यातील आकरा वर्षे सजा भोगली तीही त्या कालावधीत न डगमगता , स्फुरलेले लेखन भिंतीवर कोरुन पुन्हा ते पाठ  करून ती लिखित स्वरुपत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले ते सारे विचार मनात दाटी करू लागले . मी नुकतेच योगेश सोमण यांचे 

" मी विनायक दामोदर सावरकर "

चे सतरा भाग सलग ऐकले होते तसेच सावरकरा विषयी बरेच वाचलेले होते आम्ही चर्चा पण करत होतो . त्यामुळे जेल परिसरात प्रवेश करताच सगळेचजण भावूक आणि गंभीर झाले होते . प्रवेशद्वाराजवळ नेताजी आर्ट गॅलरी आहे त्याठिकाणी अनेक परक्रमींची सचित्र माहिती वाचायला मिळते . जवळच दोन स्वातंत्र्यज्योती अखंड तेवत आहेत




 त्याठिकाणी रजकैद्याना दिली जाणारी वागणूक कसली ती पिळवणूकच होती ते वर्णन गाईडकडून ऐकताना आपसूकच हाताच्या मुठी वळत होत्या . याठिकाणी अनेक स्वातंत्र्य सेनानीना मरणयातना भोगाव्या लागल्या होत्या . ब्रिटिशांनी अघोरी अत्याचार केले होते .

   जेलमधील खोल्या त्यांची बांधकाम रचना , जाडजूड कड्या-कोयंडे , घाणे , साखळदंड , फाशीची जागा पाहताना कल्पना पण करवत नव्हती . संपूर्ण जेल परिसर , अखंड तेवत असलेल्या दोन ज्योती पाहून झाल्यानंतर जेलमध्ये सावरकरांच्या खोलीत प्रवेश केला . तिथेच शांतपणे बसून त्यांचेच

" ने मजसी ने परत मातृभूमीला "

हे गीत ऐकले , ते सुरु असताना आशिषने नेहमीप्रमाणे तिथे आलेल्या वस्तू की ज्या सावरकरांनी वापरल्या होत्या त्या म्हणजे त्यांची जेवणाची थाळी , पाण्याचा कटोरा , एक फूट उंचीचा लाकडी खाट आणि पांघरायची कांबळ एवढ्या वस्तू जतन करुन ठेवलेल्या आहेत याचा व्हिडिओ केला सगळ मनात साठवले , त्यांना विनम्र अभिवादन करून जड अंतःकरणाने आम्ही तेथून निघालो .



सेल्युलर जेल मात्र मनातून पटकन जाईना . इंग्रजांचा , ब्रिटिशांचा मनातून प्रचंड राग तर येत होताच पण त्याचवेळी कुतूहलही वाटत होते . दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी या जागा शोधून कशा काढल्या आणि इतकी बांधकामे कशी केली असतील . मुंबई , दिल्ली , गोवा ही ठिकाणे नेमकी टिपली कशी आणि त्यातही आपल्याच देशातील देशप्रेमीना शिक्षा देण्यासाठी कैद करुन अंदमान सारख्या बेटावर बंदिवान करुन ठेवले . त्यातूनही चुकून कोणी निसटले तर जिवंत राहण्याची शक्यता नाही कारण बाहेर चोहोबाजूंनी पाणी चुकून किनारा सापडलाच तर घनदाट जंगल . अंदमान आज जरी पर्यटन स्थळ वाटत असले तरी ती शंभर वर्षापूर्वी काळकोठडीच होती ती . विचार करून डोकं सुन्न झाले होते . तशातच आम्ही बाहेर पडलो . 

आता आकरा नंतरचा पूर्णवेळ रिकामाच असणार होता . सध्या जेलमध्ये लाईटचे अपग्रेडेशनचे काम चालू असल्यामुळे दोन महिन्यापासून लाईट शो बंद आहे हे ऐकून थोडासा मूड गेला . मग प्लॅनमधे नसलेले रॉस आयलॅंड आणि चिडिया टापू आम्ही मॅनेज केले . आता इथून पुढे कुठेही जायचे तर बोटीने , फेरीने प्रवास असणार होता आणि प्रत्येकवेळी वॉटरप्रूफ जॉकेट घालून प्रवास असणार ती मजा घेत आम्ही बोटीने पोर्टब्लेअर ते रॉस आयलॅंड हा प्रवास केला . पूर्वी इथे ब्रिटिशांची राजधानी होती अनेक कार्यालयांचे अवशेष दिसतात एक ब्रिटिश सागरी पर्यवेक्षक डॅनियल रॉस याच्या  नावावरून या बेटाला रॉस नाव दिलेले होत त्याला आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव दिले .बेटावर उतरले की याठिकाणी मोर , हरीण आणि सांबर भरपूर आहेत . टेकडीवर बऱ्याच छोट्या छोट्या इमारती आहेत . 2004 च्या त्सुनामी मध्ये या बेटावर बरीच पडझड झाली आहे त्यामुळे आज ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष याठिकाणी दिसतात . बेटावर उंच टेकडी असून टेकडीवर जाण्यासाठी याठिकाणी गाडीची सोय आहे गाडीने आम्ही टेकडीवर गेलो तिथून पुढे दीडशे पायऱ्या उतरुन दीपस्तंभ असलेल्या पॉईंटला जाता येते त्याला . पायऱ्या संपल्या की त्या पॉइंटला जाताना लाकडी पूल आहे त्यावरुन आम्ही गेलो . तिथे पुतळा आणि उंच दीपस्तंभ आहे चोहोबाजूंनी समुद्र आहे आणि समुद्रात मोठाले खडक आहेत सतत त्या खडकावर समुद्राच्या लाटा फेसळत येऊन धडकत असतात . पाणी गेले की खडकावर असंख्य खेकडे चालताना दिसतात पुन्हा पाण्याची लाट येते त्यात ते निघून जातात पुन्हा दिसतात असा सतत खेळ सुरु असतो . कोणत्याही पॉइंटला गेलं की तिथल्या निसर्गसौंदर्याची भुरळ पडत होती . प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण खुणावत होते . पुन्हा तितक्याच पायऱ्या चढून येताना मात्र दमछाक झाली पण तितकाच आनंदही होत होता . वर आल्याबरोबर मटक्यातील मलई कुल्फी खायला जी मजा आली त्याला कशाची तोड नव्हती .



तिथून आम्ही बंदरावर गेलो याठिकाणी एका गोष्टींनी चित्त वेधून घेतले ते म्हणजे माणसाला पाहून कोसो दूर पाळणारे हरीण त्याठिकाणी पक्षी व प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा राव यांनी हाक मारताच धावत येत होती . आरती , बाबू , रामा , पिंकी , छोटू अशा त्यांनी ठेवलेल्या वेगवेगळ्या नावांनी लाडीक हाक मारताच धावत जवळ येतात आणि त्या आपल्या हातात खाऊ देतात तो आपण हरणाना भरवू शकतो . थोडावेळ थांबून पक्षी प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा रावबरोबर आम्ही गप्पा मारल्या . चाळीस वर्षांपासून त्या हेच काम करतात त्यांचे वडील हेच काम करत असत . त्या रोज बोटीने पोर्टब्लेअर जा-ये करतात कधीकधी तिथेच राहतात . 2004 च्या त्सुनामीनंतर हरणांची संख्या एकोणतीस झाली होती आज ती चारशे झाली आहे . त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी त्सुनामी पाहिल्याचे सांगितले त्या करत असलेले वर्णन ऐकून अंगावर शहारा आला .



रॉस नंतर आम्ही पुन्हा पोर्टब्लेअरला आलो जेवण करुन एक तास आराम केला आणि गाडीने 30 किलोमीटरवर असलेल्या चिडिया टापू कडे रवाना झालो . रस्त्यात उंच उंच नारळाची आणि सुपाऱ्याची झाडे दिसत होती . मोठाले नारळ आणि कुतूहल म्हणजे सुपाऱ्याच्या लडीने लकडलेली नारळाच्या झाडाप्रमाणे दिसणारी सुपारीची झाडे पाहताना मजा वाटत होती . ती शेती मात्र खाजगी मालकांची होती . आम्ही बीचवर पोहोचणार तोच काठावर दलदलीत मोठी मगर आम्हला ड्रायव्हरने दाखवली . त्या बीचवर आम्हाला सनसेट दिसणार होता , निरीक्षण केले , नीट कान देऊन आवाज ऐकला तर क्वचित रंगीबेरंगी चिमण्या उडताना दिसत होत्या . आम्ही बीचवर फिरत होतो पण सूर्य ढगाआड होता पण लालबुंद सागर किनारा आणि त्याची समुद्रावर पडलेली किरणे मात्र मोहक होती . सनसेट दिसला नाही पण सुर्यास्ताच्यावेळेचा लालिमा फाकलेला समुद्रकिनारा पाहून आम्ही हॉटेलवर परतलो . दुसरे दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला हॅवलॉक साठी निघायचे होते . इकडे लवकर अंधार पडतो त्यामुळे आठ वाजताच रात्रीची जेवणे आणि पॅकिंग करुन आम्ही नऊ वाजताच झोपलो .

28 ऑक्टोंबर , आज ट्रिपचा तिसरा दिवस ! खऱ्या अर्थाने दोन दिवस आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला जाणार होतो ते ठिकाण म्हणजे हॅवलॉक बेट ज्याचे आताचे नाव आहे 

" स्वराज-द्वीप ".

पोर्टब्लेअरला रोडचा संपर्क तुटला होता तर याठिकाणी रोडबरोबर हवाई संपर्कपण असणार नव्हता फक्त बोटीने ( फेरिने ) प्रवास असणार होता . इथे जसा पाचला सूर्य मावळतो तसा पाचला उगवतो . लवकरच आवरुन आम्ही नाष्टा वगैरे करुन सातलाच हॉटेल सोडले आणि बंदरावर पोहोचलो . त्याठिकाणी विमानतळावर जितके सोपस्कार असतात तितकेच सोपस्कार करावे लागणार होते त्यामुळे नऊच्या बोटीसाठी आम्ही साडेसातला बंदरावर गेलो . " नौटीका " नावाची भाली मोठी फेरी आमच्या स्वागतासाठी समुद्रात हेलकावे घेत उभी होती . लाल , निळी , पिवळी , पांढरी अशा रंगीबेरंगी अनेक फेरी त्याठिकाणी उभ्या होत्या . निळाशार समुद्र , पांढऱ्याशुभ्र रेतीचा किनारा , घनदाट अशी दिमाखात डोलणारी हिरवीगार झाडी आकाशात निळ्या पांढऱ्या विविध छटांचे ढग ! सोबतीला खट्याळ वारा होताच ,आहाहा ! काय ती निसर्गाची कमाल म्हणावी , काय पहावे आणि काय नाही असे वाटत होते . दीडदोन तास या बोटीत बसून अथांग सागरात प्रवास करणार याचा विलक्षण आनंद होत होता .फेरीमध्ये प्रवेश करताच रेल्वेच्या एसी डब्यात प्रवेश केल्यासारखे वाटले ( सुरक्षित ) पण खिडकीतून बाहेर पाहिल्यावर मात्र आपण अथांग सागरात हेलकावे खाणाऱ्या मोठ्या बोटीत आहोत हे जाणवते .   दोन दिवसापासून अवतीभोवती पाणी आणि बोटी दिसत होत्या त्यामुळे पाण्याची भीती कमी झाली होती . हेलकावे खात फेरी पुढे निघाली की पाण्याची तयार होणारी वर्तुळे , पाठीमागे फेसाळत तयार होणारी रेषा , फेरीवर येऊन आदळणारी लाट पाहत कसे दिडदोन तास गेले समजले नाही . 





फेरी बंदराला लागली तेव्हा आकरा वाजून गेले होते . त्याठिकाणी आमचा माणूस गाडी घेऊन तयारच होता . आमचे रिसॉर्ट स्कुबाच्या बीचच्या काठावर होते त्यामुळे मुलांना अत्यानंद झाला . 80% लाकडी असलेल्या कौलारु रिसॉर्टमध्ये आम्ही बीचवर राहणार होतो म्हणजे केव्हाही मनात आलं की समुद्रकाठी आम्ही जाऊन बसणार होतो . 



आज आम्ही दोन वाजता राधानगर बीचवर जाणार होतो दोन तास आमच्याकडे होते आम्ही समान ठेवलं , चहा घेतला आणि रिसॉर्टच्या पाठीमागे बीचवर गेलो . तिथे रेतीत विविध आकाराचे शंख दिसत होते . शंख उचलून हातात घेतला की पटकन आतून शंखाच्या आकाराचे आणि त्याच रंगाचे किडे बाहेर यायचे , बराचवेळ सगळेजण त्यात रमले . अनेक फांद्या असलेली विशिष्ट प्रकारची झाडे पाण्यात होती . त्यामुळे पाण्यातल्या झाडावर उभे राहून विविध पोजमधली फोटोग्राफी झाली . दिडला रिसॉर्टवर आलो अर्धा तास आराम करुन आम्ही राधानगर बीचवर गेलो . 

याठिकाणी सनसेट दिसणार होता दुपारचे दोन वाजले होते सुर्य तळपत होता पण त्याचा त्रास काही जाणवत नव्हता . बीचवर विविध आकारांचे हट्स होते . लाकडी जिने , लकडाचे ओंडके असे बसायला किंवा फोटो काढायला खूप छान बॅकग्राउंड होते त्यामुळे आशिष त्याच्याबरोबर आकांक्षा , कीर्ती , केतकी आगदी चेकळले होते . समुद्रात डुंबण्याचा आनंद तर सगळ्यांनीच लुटला . समुद्राचे पाणी , पांढरी वाळू आणि बीचवरील झाडी असा लपंडाव सगळे खेळत होते . चार वाजले तसे सगळ्यांना सनसेटचे वेध लागले . आणि साडेचार वाजले की तळपणारा सुर्य मात्र ढगाआड लपू लागला त्यामुळे सगळ्यांनाच सनसेट पाहायला मिळणार नाही याची हुरहूर लागू लागली . पाच वाजता स्वच्छ सुर्य काही दिसला नाही पण मावळतीच्या दिशेला दिसणाऱ्या रक्तीमासुद्धा खूपच मोहक दिसत होत्या . तोही एकप्रकारचा विलक्षण आनंद झाला . त्यातील फोटोग्राफी झाली आणि दहा पंधरा मिनिटात तर आंधार गुडूप झाला .





 आम्ही रेसोर्टवर परत आलो तिथल्या लोकांच्या मते आम्ही प्युअर व्हेजीटीरीयन असल्यामुळे खाण्याचा फारसा आनंद घेऊ शकत नाही असे होते . पण आम्हाला त्याचे काही वाटत नव्हते . पनीरचे फार तर चायनीजचे वेगवेगळे प्रकार खाऊन आम्ही खूष असत होतो . उद्या सकाळी सर्वात मोठ आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग आणि सर्वात सुंदर अशा एलेफंट बीचवर आम्ही उद्या जाणार होतो . एलेफंट बीच हेही एक खास आकर्षण होते . गेल्या वर्षीपासून पन्नासपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना स्कुबा करण्यास मनाई होती त्यामुळे माझा मूड गेला होता पण मुले मात्र खूप एक्साईटेड होती . ज्यांना स्कुबा करायचे आहे त्यांनी वयाच्या पन्नाशी पूर्वी प्लॅन करावा तसेच फार लहान मुलांना नेण्यापेक्षा ती कळती झाल्यावर ट्रिप करावी म्हणजे परिपूर्ण ट्रिप होऊ शकते तसेच ग्रुपने मजा येते त्यामुळे दोन फॅमिली असल्यास आनंद द्विगुणित होतो .

स्कुबासाठी सकाळी सहाच्या बॅचचे रजिस्ट्रेशन झाले होते रिसॉर्टच्या पाठीमागेच जायचे होते पण उत्साहात मुलांचे पाचपासून गुड मॉर्निंगचे मेसेज येत होते . आम्ही पण लवकर उठलो सगळेजण पावणेसहा वाजता बीचवर पोहोचलो . आधी फॉर्म भरणे , कपडे चेंज करणे सगळ्या गोष्टी होईस्तोवर पाऊसच सुरु झाला आभाळ गच्च भरुन आलं पण त्याचा काही परिणाम होत नसल्याचे समजले . अत्यंत आनंदात मुले उड्या मारत स्कुबासाठी गेली आम्ही बीचवर बसून पावसातले समुद्राचे सौंदर्य न्यहाळत बसलो आमच्यासारखे बरेचसे पालक तिथे होते थोडीशी हुरहूर प्रत्येकाच्या मनात होतीच . आकांक्षाला पाण्यात पोहायला , खेळायला खूप आवडते तर आशिषपण यासाठी आतुर होता . आशिष कीर्तीचे न्युझीलंडमध्ये बारा हजार फुटावरून स्काय डायव्हिंग झाले होते आता हा अनुभव घ्यायचा होता . केतकी पाण्याला घाबरत होती पण सगळ्यांबरोबर हिम्मत करत होती .

त्यांचा ड्रेस , पाठीवर ऑक्सीजन घेऊन बोटीतून मुले समुद्रात गेली बरच वेळ त्यांचे ट्रेनिंग सुरू होते . आम्ही चहा पीत इकडे तिकडे हिंडत त्यांची वाट पाहत होतो . काळेभोर ढग आणि कोसळणारा पाऊस पाहून अनामिक भीती वाटत होती . बोटीतून समुद्रात मुलांनी उद्या घेतल्यापासून अर्ध्या तासाने ती परत येताना दिसली . उड्या मारत आनंदाने आरडाओरडा करत ते वर आले , अनुभव सांगू लागले खाली पाऊस आहे की नाही काहीच समजले नाही म्हणाली . जवळजवळ चाळीस फूट खोल त्यांना नेलेले होते एका नवख्या युगात ते चक्कर मारुन आलेले होते सगळे फोटो व्हिडिओ मिळणार होते . प्रत्यकाचे अनुभव ऐकताना मजा येत होती आता पाऊस पण थांबला होता .

रिसॉर्ट वर आलो फार गडबड नव्हती जायची फार गडबड नव्हती थोडा आराम केला , नाष्टा केला आणि एलिफंट बीचसाठी तयार झालो सगळेच पिकनिकच्या मूडमध्ये होतो , बरोबर तरुणाई होती त्यामुळे अखंड ट्रिप म्हणजे खळाळता धबधबा सोबत आहे असे वाटत होते . आकरा वाजता आम्ही बंदरावर आलो तर तिथे अनेक वॉटर गेम्स त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही सगळ्यांनी ग्लास बोटिंग आणि मी स्नाॅर्कलिंग करायचे ठरवले आणि बोटीने बीचवर आलो . याठिकाणी सगळे पर्यटक आणि अनेक गेम्स असल्यामुळे थोडी गर्दी वाटली पण बीचचे सौंदर्य वाखाणण्याजोगेच ! वेगवेगळ्या फळांच्या फ्रूट प्लेट्स आणि चाटचे स्टॉल खाचखच भरलेले होते . आम्ही एकत्र बसून काही खाल्ले नाही ज्याला जेव्हा जे खावेसे वाटते ते त्यांनी घेऊन खावं असे ठरवले आणि जेवढे प्रकार होते ते सगळे प्रत्येकाने आळीपाळीने घेतले आणि सगळ्यांनी टेस्ट केले . आता गेम्स होते मी पहिल्यांदा स्नाॅर्कलिंग केले असा भन्नाट अनुभव आला आहाहा ! आपण शोपिस म्हणून रंगीबेरंगी मासे काचेमध्ये पाण्यात बंदिस्त करून ठेवतो तसे विविध रंगी , विविध आकाराचे मासे आगदी थव्याने आपल्याला स्पर्श करुन जातात असा  भारी अनुभव होता तो . पाण्याखाली असलेल्या , किनाऱ्यालगतच्या वेगवेगळ्या वनस्पती , त्यांची घरटी अशी मस्त सफर ते आपल्याला सफाईदारपणे घडवून आणतात . ते करत असताना तिथले स्थानिक समुद्री विश्वाचे , निसर्गाचे आपल्या लेकराप्रमाणे संवर्धन करताना दिसतात . कशालाही धक्का पोहोचणार नाही याची खूप काळजी घेतात म्हणून आज ते सौंदर्य आहे तसे टिकून आहे . स्कुबा करता आले नाही तरी स्नाॅर्कलिंग केल्यामुळे माझी हौस फिटली होती मला पण आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .  यानंतर आम्ही सगळेजण ग्लास बोटिंगसाठी बसलो यामध्ये बोटीत मधे मोठी दुर्बीण असते आणि कडेनी गोलाकार बसायला व्यवस्था असते . बोट थोडी पाण्यात गेली की खोलवर असलेले मासे , वनस्पती , जलचर आपल्याला अगदी काचेजवळ असल्यासारखे दिसते ती सफर पण खूप आनंद देऊन जाते . गेम्स झाल्यानंतर आम्ही बराच वेळ बीचवर वाळूत , पाण्यात झाडीत असे फेरफटके मारत होतो फोटो काढत होतो . साडेतीन वाजता तो बीच बंद करतात सव्वातीन वाजल्यापासून स्पिकरवर त्याप्रमाणे सूचना दिल्या जातात त्याप्रमाणे आख्खी दुपार आम्ही त्या बीचवर घालवली आणि साडेचारला रेसॉर्टवर परत आलो 



रोज वेगळाच बीच , रोज वेगळाच पॉइंट , वेगळेच ठिकाण आणि त्यामुळे येणारी मजा रोज वेगळाच अनुभव देऊन गेली . समुद्र तोच , निसर्ग तोच पण अनुभूती मात्र रोज वेगळी आली . ना प्रवसाचा थकवा जाणवला , ना आपल्या दैनंदिन जीवनाची आठवण . मस्तपैकी सहा दिवस कसे गेले समजले नाही आणखी राहायला मिळालं तर बरं तेच सौंदर्य रोज नव्याने न्याहळावे असे वाटत होते . बोटी पासून क्रुझ पर्यंत सगळ्या जलप्रवसाची हौस याठिकाणी फिटते . आता हुरहूर लागली होती पण तृप्ती होती . आता परतीचे वेध लागले , सगळ्यांच्या रजा सुट्ट्या संपत आल्या होत्या . खूप फोटोग्राफी केली पण अफाट निसर्ग तो कसा कैद होईल शक्य तेवढा नजरेत साठवून परत निघालो . ही माझी पहिली ट्रिप आहे की ज्याठिकाणी मी काहीही खरेदी केली नाही ( पोवळे सोडता ) . अंदमान हे निसर्गाने भारताला बहाल केलेलं एक सुंदर कोंदण आहे म्हणायला हरकत नाही . त्याची जपणूक तिथले स्थानिक ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे पर्यटक म्हणून आपण करणे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते तितकेच महत्त्वाचे आहे .












.