बालपणीचा श्रावण
सांगोला तालुक्यातील छोटंसं , टुमदार गाव म्हणजे माझं माहेर घेरडी ! जेमतेम साडेनऊ हजार लोकसंख्या असलेलं आणि अजूनही दहावीपर्यंत शाळा असलेले ते गाव ! शाळा , बँक या निमित्ताने राहायला आलेली मंडळी म्हणजे देशपांडे सर , वाईकर सर , महाजन सर , बँकेचे कुलकर्णी साहेब अशी चारपाच घरे आणि डोंगरे-पतकी अशी मोजकी घरे सोडली तर वीस एक घरे तर आमच्या भावकीचीच होती .
त्यामुळे अगदी चैत्राचं हळदीकुंकू , श्रावणातील चारी सोमवार , शुक्रवार , नागपंचमी , महालक्ष्मी , नवरात्र , दसरा , दिवाळी , संक्रांत या सगळ्या दिवसांना उत्साही वातावरण असे .
सगळ्या वहिनी , काकू , मोठ्या बहिणी आम्ही सगळी भावंडं आणि आमच्यात लुडबुड करणारी भाचे कंपनी यांनी वाड्याच गोकुळ झालेलं होतं .
श्रावण येणार म्हणलं की सगळ्या बायकांची आधीच लगबग सुरू झालेली असायची . जाळया जळमटं काढून घरं स्वच्छ केली जायची मग खरकटे मरकटे हात लागले म्हणत आधी डबे घासून पुसून लख्ख व्हायचे मग सगळी पिठं दळून आणणे , साखर दळून आणणे , धन्याजिऱ्याची पूड , वेलदोडे पूड , खसखस पूड , उपवासाची भाजणी , थालीपीठ भाजणी अशी सगळी ताजीताजी जय्यत तयारी केलेली असायची .
त्यात मोठा कार्यक्रम हा लाह्या फोडायचा असायचा . थोडीशी पावसाची उघडीप पडली की वाड्यात सगळ्यांनी एकाच वेळी आपापल्या घरी लाह्यासाठी कावळीच उमलं घातलेलं असायचं कारण एका वेळी सगळ्यांनी लाह्या केल्या तर गरम गरम लाहया गिरणीत दळणे दस्तगीर पठाणला सोयीचे व्हायचे . मग गिरणीत दळलेल्या लाह्याच्या पिठाचा गरम डबा कडेवर घेऊन घरी आले की पहिल्यांदा दूध गुळात आणि पीठ गार झाल्यावर ताक साखरेत कालवून खायला जी मजा यायची तशी चव अजून तरी कशालाच आलेली नाही !
ते पीठ मग पंचमीच्या भावाच्या उपवासाला , आईच्या शुक्रवारच्या भाजणीच्या उपवासाला , मंगळागौरीच्या पोरींसाठी ते आगदी हरितलकेच्या उपवासापर्यंत नाश्त्याला वापरले जाई .
अजून एक मजा श्रावणात यायची ती म्हणजे सक्काळी सहा वाजता सगळ्या मुलींचं एक मोठ्ठं काम आसायच ते म्हणजे विठू देशपांडे सरांच्या वाड्यातून जाईची फुले तोडून आणणे ! हातात कुंडा घ्यायचा आणि फुले आणायला पळत सुटायच . त्यांच्या दरवाजाला खेटून दाटीवाटीने दहा बारा पोरी उभारलेल्या असायच्या . आत वेलाला मोठा मंडप केलेला होता आणि चांदण्या दिसाव्यात असा सुवासिक फुलांनी मांडव गच्च भरलेला असे . अगदी दाराजवळ उभी असणारीने फटीतून आत डोकावून पाहायचं आणि आत काय चालू आहे ते मागे असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं .
" आज खूप फुलं आहेत .
आता दार उघडून मामी बाहेर आल्या .
पाठोपाठ मामा पण आले आहेत .
दोघेजण घरच्या साठी फुले तोडून ठेवत आहेत .
आता घरातून रुक्मिणी वहिनी आल्या . "
आस सांगितलं की सगळ्यांना आनंद व्हायचं कारण आता त्या वहिनी दराचा दांडू काढायच्या मग सगळ्यांना आत प्रवेश मिळायचा . त्या हसत हसत दार उघडायच्या तर मामा-मामी हातात काठी घेऊन कट्ट्यावर बसायचे . कोणी कळ्या तोडल्या किंवा फाटे खाली ओढले की पाठीत काठी बसे . वहिनींनी दार उघडले की पळत जाऊन वेलीच्या कडेनी गोल करून फुलं तोडायला सगळ्यामध्ये चढाओढ लागे .
गंमत म्हणजे त्यांची छोटी मुलगी पिली पण आमच्याबरोबर फुले तोडायला सामील होत असे . आपला कुंडा भरला की मागे नेऊन ठेवायचा आणि फ्रॉक / परकर काय असेल त्याचा ओचा करून दोन्हीदोन्ही हातानी भराभर फुले तोडायची . पावसाची सर येऊन गेलेली असली की वेलीवरच्या बिंदूनी सगळ्या अंगावर पाणी पडायचं . फुलं संपली की तुझी किती माझी किती हे बघायची लटपट असायची . सगळ्यात जास्त फुले विद्याकडे असायची कारण ती उंच होती वरची फुले फक्त तिच्या हाताला यायची तर सगळ्यात कमी फुले चीमीकडे असायची तिच्या हाताला फुले यायची नाहीत ती हिरमुसून बसायची मग आमच्यात समझोता व्हायचा सगळ्यांनी थोडी थोडी फुले चीमीला द्यायची अशी गंमत व्हायची . चीमी लहान होती पण तिच्याबरोबरचे कोणी नव्हते मग ती बऱ्याचदा माझ्या मागे असायची . घरी येऊन गजरे करायचे सकाळी एक आणि संध्याकाळी महादेवाला जाताना एक असे घालायचे .
घेरडीतील महादेव हे एक प्रसन्न वाटणारे प्रकरण आहे . महादेव स्वयंभू आहे त्यामुळे अजूनही पंचक्रोशित त्याचं महत्त्व खूप आहे . श्रावण सोमवारी सकाळची आवराआवर झाली की नऊच्या दरम्यान महादेवाला जायचं हे रविवारीच ठरलेलं असे . उद्या शिवामूठ कशाची आहे याची पण चर्चा झालेली असायची त्याप्रमाणे सगळ्या काकू , वहिनी शुचिर्भूत होऊन शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय आहे मग साधारण तशी तयारी करून सगळ्या निघायच्या मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली पण जायचो तसं तर महादेवाच्या मंदिराचे बांधकाम आलीकडे झाले आहे पूर्वी फक्त दिवा लावायला आडोसा होता बाकी उघड्यावर महादेव असे . गावापासून एक कोस दूर माळरानावर ते ठिकाण आहे . जवळजवळ पाच फूट काळीभोर पाषाणाची मोठी मूर्ती आहे मधोमध भली मोठी पिंड आहे . त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पिंड नेहमी पाण्यात आसते तिथला झरा कधीच आटत नाही . कर्नाटकातील एक महाराज तिथे सेवेला येऊन राहिले होते . मागच्या बाजूला एक खोप करून ते त्यात राहत असत . अंगात भगवी कफनी कपाळावर इबिताचा पट्टा ओढून हातात काठी घेऊन ते ताडताड चालत निघत आणि गावात पाच घरी
" रेवण सिध्देश्वर कांतीभिक्षा "
ओम भवती भिक्षांदेही"
अशी खणखणीत आवाजात भिक्षा मागून आणायचे ते त्यांचे जेवण असे . महादेवाच्या मागे एक विहीर होती . मग आसपास झेंडू , गोकर्ण , गुलबक्षी अशी फुलबाग त्यांनी लावलेली असायची समोरच्या बाजूला वडाचे झाड होते . जवळ सोनार मळा आहे तिथे आंब्याची झाडे होती . गावाबाहेर पडले की ओढा ओलांडून वर जावं लागे . ओढ्यात मोठे मोठे दगड असायचे दगडावरुन उड्या मारत ओढा पार करायला मजा यायची . ओढा ओलांडून थोडंसं वर चढले की रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहे आणि तिथे मोर आहेत . संध्या काळच्या वेळी असे समोरून मोर जाताना पाहून हरकायला व्हायचं ! घेरडीत फिरायला जाण्याचे महादेवाचे देवस्थान हे एकमेव ठिकाण आहे . कोणाकडेही पाहूणा आला तर महादेवाला जाण्याचा कार्यक्रम असतोच . तिथे गेलं की अजूनही रम्य वाटते .
श्रावणी शुक्रवार म्हणजे घरोघरी जिवतीची पूजा , आमच्याकडे गंगागौर असल्यामुळे तांब्याला काव लाऊन ते वळले की त्यावर
चुना आणि बुक्का वापरून नाक , डोळे , मंगळसूत्र आगदी काडीने , सुईने कलात्मकतेने रेखाटायचे आणि जेष्ठा गौर घरोघरी तयार
होत असे मग आगदी उत्साहात
तिचं आगमन होत असे . ताटात शुभ्र कापसाची हळदी कुंकवाने रंगवलेली माळा-वस्त्र , हिरव्यागार आघाडा-दुर्वा , धोंडीआप्पा गुरवाने दिलेली बेल , फुटाण्याची पिवळी धम्मक तर चाफ्याची पांढरी अशी विविधरंगी फुले असा सगळा पूजेचा साग्रसंगीत थाट असायचा तर पुरणावरणाचा चविष्ट स्वयंपाक , जेवायला सवाष्ण ठरलेली असायची . चार वाजले की घरं झाडझुड करून सतरंजी टाकून खुर्चीवर ताटात हळदीकुंकाचे पंचपाळे , फुटाणे , दुधाचे फुलपात्र त्यात मोठा गोल चमचा अशी तयारी करून आपलं आवरून सावरून बसायचं . निमित्त हळदी कुंकाच असायचं पण उखाणे , चेष्टा मस्करी , गप्पा यांना भरत येत असे . आई , मोठ्या काकू , प्रभा काकू , मावशी , उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी या वाड्यातील बायका तर रमा काकू , अरविंद काकी , दिनकर काकू , डोंगऱ्याच्या आणि सोनाराच्या बायका , वरलीकडच्या उषा काकी , माई मावशी , छाया ताई असे सगळे जमले की वाडा फुलून जाई आणि उखण्यांची चढाओढ लागे . एकेकजणी चार चार उखाणे घ्यायच्या कोणी तिथल्या तिथे तयार करून घ्यायच्या तर उषा वहिनींचा गाण्यातील उखाणा ठरलेला असायचा .
कोणाच्या लेकीच नवीन लग्न झालेलं असलं की तिला पंचमीच्या आधी माहेरी आणायचं आणि पहिली मंगळागौर करून मग सासरी पाठवले जाई .
घेरडीत नागपंचमीचा सण फारच उत्साहात व्हायचा . आमच्या वाड्याच्या आणि डोंगरे वाड्याच्या मधे मोठ्ठं पटांगण आहे . ताईआत्याच्या दारासमोर मोठा कट्टा आहे आणि समोर लाईटचा पोल आहे . त्या जागेला आमचं खास नाव आहे
" डांबाजवळ !"
पंचमीच्या आधी गवत काढून त्या पटांगणाची साफसफाई केली जायची . सुताराकडून एक लाकडी चक्करघाणा तयार केलेला होता तो वर्षभर डोंगरे वाड्यात ठेवलेला असायचा तो पंचमीच्या आधी बाहेर आणून पटांगणात मधोमध मोठ्ठा खड्डा खणून रोवला जाई त्यावर कावडीसारखी आडवी दांडी त्याला दोन्ही बाजूला कासरे बांधून झोके तयार केले जायचे . आमच्या गल्लीत कासराची दुकाने होती मग पंचमीला बांगड्या भरायला आख्ख्या गावातील , वस्त्यावरील मुली , बायका यायच्या त्या बांगड्या भरल्या की तिकडून इकडे यायच्या आणि चकारीवर बसूनच घरी परतत असत . चकारी फिरवायला ज्याच्या त्याच्या घरातील मुले असायची . त्या आठवड्यात संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तिथे उभे राहायला जागा मिळत नसे . वाड्यातील बायका मुलींसाठी ताई आत्याच्या कट्ट्यावर राखीव जागा असे . डोंगरेच्या वाड्यात पंचमीच्या आधी आणि नंतर असे चांगले आठ दहा दिवस फेर धरून गाणी म्हणणे वेगवेगळे खेळ खेळणे असा कार्यक्रम असायचा .
झिम्मा , फुगडी , लंगडी , कोंबडा , घसर फुगडी , किस बाई किस , काटवट कणा , केळ केळ घूम , आगोटा पगोटा , नाच ग घुमा , मगर माशानो द्या माझी घागर
असे एक न दोन अनेक पारंपरिक खेळ खेळले जायचे . तर
" हरीच्या नैवेद्याला केली जिलेबी बिघडली "
" कृष्णा घालितो लोळण "
" धौम्य ऋषी सांगतसे "
"पाच फड्याचा नागोबा"
" पोरी पिंगा ग "
" हाहाहा हू सजणी तू "
" कीकीच पान बाई कीकी "
आशी अनेक गाणी
उषा काकी , दिनकर काकी , रमा काकू , आई , उषा वीवहिनी बाकी बायका म्हणायच्या मग सगळे फेर धरुन , खेळत सगळे त्यांच्या मागे म्हणायचे .
अरविंद काकी तब्ब्येतीने चांगल्याच जाड होत्या पण खेळ खेळण्यात त्यांचा कोणी हात धरत नसत . पंचमीच्या दिवशी चांगला अडीच तीन तास हा कार्यक्रम डोंगरे वाड्यात व्हायचा . घरी यायला रात्री आठ वाजत . पण त्यातून जी ऊर्जा मिळायची न ती पुढे अनेक दिवस पुरायची . मंदा आक्का , शोभा , पुष्पा , आक्की , तायडी , पतक्याची शरू , शकू यापैकी कोणीतरी माहेरी आलेल्या असत तर सुधीर , सुनील , पंप्या , सचिन , बबल्या , छबल्या इतकी वाडीतील मुले आणि विद्या , कुंदा , मी , मायडी , नंदा , चिमी, ज्योती , पिंकी , हरणी , बाळी , सारिका , मिनी , स्वाती , चंबी , संजू इतक्या मुली असा वाडा मुलामुलींनी , बायका माणसांनी खचाखच भरलेला असे . झाडूवाली शिवा , परटाची शांता , कोळ्याची भागाबाई , भामा या तर आमच्या वाड्याचा एक अविभाज्य घटक होत्या तर शेतातील गडी बायका हे आपल्याच कुटुंबातील वाटत असत . आत्ता सुद्धा त्या आठवणीने पण उर भरुन येतो .
नवीन लग्न झालेल्या लेकीची किंवा सुनेची पहिली मंगळागौर असली की त्या घरी पहाटेपर्यंत जागरण केलं जायचं . चारी शुक्रवारी सगळ्या बायका मुली नटून थटून साजरा करायचा . असा अख्खा श्रावण विविध प्रथानी ओथंबलेला असे. घेरडी
गाव छोटंसं आसले तरी गावातील रीतिरिवाज फार मोठे होते . त्या संस्काराची शिदोरी घेऊन त्याच गावात मला लहानाचे मोठे होता आले यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते .
सौ. सरिता अनिल कुलकर्णी.
saritakulkarni67@Gmail.com
9421607248
बार्शी
शाळेतील गणेशोत्सव
घेरडी आमचं छोटंसं गाव त्यातली
" जवाहर विद्यालय घेरडी "
ही माझी शाळा !
छोटीशी , कौलारु , टुमदार शाळा पण त्या शाळेतील आठवणी मात्र आभाळा एवढ्या मोठ्या आहेत . प्रत्येक प्रसंगाच्या आठवणी या सुवर्णाक्षरांनी कोरल्यासारख्या स्मृतीपटलावर लख्ख आहेत . प्रजासत्ताक दिन असो अथवा स्वातंत्र्य दिन असो त्याचं निखळ वेगळेपण आम्हाला खूप अनुभवता आले . आमच्या शाळेत पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत . सलग पाच वर्गखोल्या आणि दोन्ही बाजूला दोन खोल्या एका बाजूला ऑफिस दुसऱ्या बाजूला स्टाफ रूम . एक वर्ग भरण्यास जागा कमी पडते म्हणून छोटी पटसंख्या असलेला वर्ग शाळेच्या खालच्या बाजूला असलेल्या एका खोलीत भरायचा . शाळेसमोर खेळासाठी मोठ्ठं मैदान आहे , त्याच्या बाजूला प्रयोगशाळा त्याच्या शेजारी खेळाच्या आणि कावयतीच्या सामानाची एक खोली . चोहोबाजूंनी महानंदाची झाडे आहेत .
उमेश डोंगरे सर हे हेडसर कोणाला कधी फारसे बोलायचे नाहीत पण उंचे पुरे धिप्पाड ते वर्गावरुन चालले तरी वर्ग एकदम चिडीचूप व्हायचा . तसाच धाक देशपांडे सर आणि खटकाळे सरांचा वाटायचा . पठाण सर , महाजन सर , वाईकर सर आणि डी. व्ही. सर हे त्यामानाने मवाळ होते . काही काळ आमचा भाऊ नंदू आणि आक्कीची मैत्रीण शकू मॅडम हे दोघे पण शिकवायला होते . नंदू सर शाळेत खूप स्ट्रीक्ट असत घरी आलं की भावाप्रमाणे ! कधीच कोणाशीही बोलताना न दिसलेले क्लर्क म्हणजे विठू देशपांडे सर ! तसेच शाळेत सुधाकर , राजाराम आणि विलास हे तीन शिपाई होते . सुट्टीची नोटीस आणणारे खेळासाठी रिंग , दोऱ्या , डंबेल्स , लेझिम , देणारे कोणालाही खेळताना लागले तर लगेच आयोडीन आणि कापूस देणारे आमचे शिपाई गावातीलच असल्यामुळे ते आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे वाटायचे . तसे तर बरेचसे शिक्षक पण गावातील होते . त्यावेळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्हाला जवळ्याला जावं लागायचं तर वेळेत एस टी बस नसायची म्हणून दहा दिवस आमचा मुक्काम जवळ्यात असे आणि आमचे जेवणाचे डबे शिपाई पोहोच करत असे रोज एक शिक्षक येऊन जात आसत आमची व्यवस्था नीट आहे न हे पाहण्यासाठी . एकूणच विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही जबाबदारी पलकांबरोबर शाळा , शिक्षक तितक्याच प्रेमाने पर पाडत असत .
आमच्या शाळेची प्रार्थना
" हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते
माझे मन पावन होते "
ही होती . उभ राहून ती एका तालात म्हणाताना आपसूकच मागेपुढे डुलत म्हणली जायची . शाळेत जायला उशीर झाला की प्रार्थना होईपर्यंत शाळेच्या बाहेर उभे राहावे लागे . बहुदा हे शनिवारच्या सकाळच्या शाळेला होई मग उशीर झाला म्हणून कडाक्याच्या थंडीत जोरात दात खाऊन हळूच छडी मारणारे कोळेकर सर आणि त्याच सरांचा शनिवारी पीटीचा तास असे . तो होत असताना हातवारे करत तोंडात असलेल्या शिट्टीने सूचना देत होणारा पीटीचा तास मधूनच तोंडातील शिट्टी काढून ज्या मुली उड्या मारत नसतील त्यांना
" ए जाफराबादच्या म्हशीनो "
असे रागवत ते हातातच छडी फिरवत मागेपर्यंत चकरा मारत असत आणि सगळ्यांना कवायत करायला लावत असत त्या सरांचा भारी धाक वाटत असे .
आमच्या शाळेत होणारा गणेशोत्सव आणि त्याचं वेगळेपण हे अधोरेखित करण्यासारखे आहे . तसा तर महाराष्ट्रात घरोघरी , गावोगावी मंडळे करुन गणेशोत्सव साजरा केला जातो पण त्याची आमच्या शाळेत जी मजा आम्ही आनुभवली तशी मजा मला पुन्हा कुठेही दिसली नाही हे मात्र मी खात्रीलायक सांगू शकते .
गणेशाचे आगमन , प्रतिष्ठापना , मिरवणूक , दहा दिवस आरत्या , प्रसाद हे तर सगळीकडे उत्साहात होतच असते . पण आमच्या शाळेत होणारा सांस्कृतिक कार्यक्रम मात्र मला खूप ठळकपणे आठवतो तो तितकाच आनंद देणारा आणि विस्मयचकित करणारा आहे .
आमच्या शाळेत या उत्सवादरम्यान शाळेच्या प्रत्येक वर्गाला एक दिवस देखाव्यासाठी ठरवून दिलेला असायचा . त्याला आम्ही
" आमचं डेकोरेशन "
असे म्हणत आनंदाने तयारीला लागायचो .
यामधे त्या त्या वर्गासाठी विशिष्ठ विषय ठरलेले असत उदा
" सीतेचे हरण "
" संतोषी माता "
" श्रावण बाळ आणि आईवडील "
आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे देखावे हे काही वस्तू वापरुन न करता ते मुलामुलीमधून निवड करुन केले जायचे . यामधे मुख्य पात्रासाठी साजेशी ठरविक मुलामुलींची निवड केली जायची यामधे दरवर्षी एक देखावा खूप गाजलेले होता तो म्हणजे
संतोषी माता .
यासाठी एकच ठरलेली मुलगी होती ती म्हणजे माळ्याची शांता !
उंचीपुरी , गोरीपान , तरतरीत नाक , लांबसडक काळेभोर केस तिला सहज जरी पाहिले तरी तिचा चेहरा लक्ष्मीचा मुखवटा असल्यासारखे वाटत असे .
तिला नऊवार साडी नेसवून , बटवेणी घालून केस मोकळे सोडून कपाळावर टोप घालून सजवायचं तिच्या एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू देवून उभे करायचे आणि तिला आठ हात दिसले पाहिजे म्हणून तिच्या मागे तीन मुली फक्त हातात तिच्यासारख्या बांगड्या घालून हात बाहेर काढून उभ्या केल्या जायच्या ती समोरून अष्टभुजा देवी दिसत असे . तिच्यासमोर मग बाकी मुली कोणी आरतीचे ताट घेऊन , कोणी हात जोडून नमस्कार करत आहे अशी सहा पात्र केली जायची व तिच्या दोन बाजूला तीन तीन मुली उभ्या केल्या जायच्या . कमी उंचीच्या मुली बाळे होऊन उभ्या राहायच्या . विशेष म्हणजे हा देखावा साधारण सायंकाळी सात वाजता सुरु व्हायचा तो रात्री साडेदहा पर्यंत असे . त्यावेळी वर्गात पंखे नसत मग नवीन कपडे , लाईट यामुळे त्या घामाघूम व्हायच्या , नाकात नथ घातल्यामुळे मध्येच कोणाला शिंक यायची मग सप्लिमेंट लाऊन वाढवलेली वेणी निसटायची . तशातच मग थोडी गर्दी कमी झाली असे वाटले की शकू मॅडम , पानसकर बाई या दार लाऊन घ्यायचं मुलींना पाणी , थोडंसं बिस्कीट केळी खायला द्यायच्या , काहीतरी मेकअप निघालेला , साडीचा पदर , निसटलेली निरी नीट करायची , कोणाचं कानातल गळ्यातील पडलेलं आवरायचं आणि बाहेर गर्दी वाढली की पुन्हा पटापट प्रत्येकानी आपल्या ठरलेल्या स्थितीत जाऊन उभ रहायचं काहीवेळेस मागे हात बाहेर काढून पाठीमागे उभ्या आसलेल्या मुली आवघडल्या की त्यांना बदलायच . पण मुख्य पात्र असलेले चेहरे बदलता येत नसत . हा देखावा पूर्ण गणेशोत्सवात सर्वोत्तम ठरे !
असाच दुसरा देखावा ठरलेला असे तो म्हणजे
सीतेचे हरण
यात एखादी मुलगी सीता होई , तिला भगवे कपडे घालून तयार केले जाई . बाकी राम , लक्ष्मण , रावण असे मुलांना केले जाई .
अशाच प्रकारचा सुंदर देखावा मुलांच्या मराठी शाळेतपण होत असे . तिथे मोहन आण्णा आणि रमेश आण्णा गुरुजी म्हणून होते तर आंता काका मुख्याध्यापक होते . अंता काका म्हणजे धोतर , नेहरु शर्ट आणि टोपी असा त्यांचा ठरलेला पेहराव होता . अत्यंत शांत , अतिशय हुशार आणि शिस्तबद्ध म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते . मागे हात बांधून शाळेत काहीही न बोलता चक्कर मारली तरी मुले त्यांना घाबरत असत . त्याच पद्धतीने मोहन आण्णा आणि रमेश आण्णा हे दोघेही होते . त्यामुळे त्यावेळी मराठी शाळेतील मुले खूप नावाजलेली , तरबेज असत . आमच्या गावात सातवी पर्यंत मुलांची आणि चौथी पर्यंत मुलींची मराठी शाळा आहे .
त्यांचा देखावा ठरलेला असे तो म्हणजे श्रावण बाळाचा !
काठया , दोर आणि पुठ्ठ्यांचा वापर करून कावड केली जायची . मुलांची शाळा असल्यामुळे श्रावण बाळाचे आईवडील दोन्ही मुलेच असत आई ज्याला केलेली असे त्याला बाईचे मेकअप केलं जाई आणि डोक्यावरून पदर देऊन ती दोन्ही मुले डोळे झाकून पुठ्ठ्याच्या कावडीत बसवले जायचे . कोपऱ्यात टेबलवर खुर्ची ठेऊन पुढे आंब्याचे फाटे लावून डोक्यावर टोप गळ्यात माळा घालून हातात धनुष्यबाण घेऊन दशरथ राजा उभा असे तर दुसऱ्या कोपऱ्यात दगड माती लावून खऱ्या पाण्याचा झरा केला जाई त्याच्या शेजारी कळशीतून पाणी घेत असलेला श्रावण बाळ असे आणि संपूर्ण वर्गात वेगवेगळ्या झाडांचे फाटे लावून ते जंगल तयार केलं जाई . दुसरे दिवशी वाड्यात हे दोन्ही आण्णा , ककमरे गुरुजी , पालसांडे गुरुजी आणि आम्ही सगळ्या बहिणी उगाचच वाद घालत बसायचो विषय म्हणजे
" देखावा कोणाचा चांगला झाला "
यावरुन बरीच चर्चा रंगत असायची .
या देखव्यामध्ये आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असे पण ती सगळ्यांना मिळत नसे ज्या मुलांमुलींची यासाठी निवड होई ती आगदी आनंदाने यासाठी तयार होत आसत . अवघडून बसणे , उभे राहणे यात त्यांना आनंद होत असे . गावातील लोक संध्याकाळी आपापल्या सवडीने देखावा पाहायला येत आसत . आख्खा वर्ग स्वयंसेवक म्हणून आसपास फिरत असे . आपल्या ओळखीचे , घरचे लोक पाहायला येत असताना दिसले की आनंदी आनंद होई . घरचे लोक लवकर दिसेना झाले की मधूनच घरी पळत जाऊन यायचं
" चला की लवकर आमचं डेकोरेशन पाहायला "
असा निरोप घरी , शेजारी , मैत्रिणींच्या घरी देऊन परत येऊन स्वयं सेवकासारखे उभे राहायचे . इकडे ज्यांना पात्र करायला मिळालं त्यांना मात्र तीन तीन तास शेवटपर्यंत आजच्या भाषेत
" स्टॅच्यु "
होऊन उभे राहाव लागे तेही आनंदाने आपली भूमिका पार पाडत असत पण असे सजीव माणसांचे देखावे नंतर मला कुठेही पाहायला मिळाले नाही हे मात्र खरे !
हे संपले की गणेश विसर्जनाच्या आदले दिवशी शाळेच्या स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा यामधे छोट्या छोट्या नाटिका , नकला , गाणी , नृत्य याचे सादरीकरण व्हायचे त्यात मुलामुलींना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळायची . यासाठी मुलींबरोबर पानसकर बाई , त्यांचा मुलगा दीपक , सुतराच्या शकू मॅडम खूप कष्ट घ्यायचे . गावातील लोक प्रेक्षक म्हणून बहुतेक आम्हा मुलांचे पालकच असत ते शाळेच्या मैदानात आपापलं बस्कर घेऊन येऊन बसत असत . त्यातच पाऊस येणं , लाईट जाणं असे प्रकार व्हायचे . टाळ्या शिट्ट्या याचा जल्लोष असायचा पण त्यात मजा असायची , उत्साह असायचा . घर , स्टेज , मेकअप करण्यासाठी मिळालेला वर्ग , सामानाची नेआण यासाठी पळापळ करतांना एकप्रकारचा कैफ चढलेला असायचा . रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम व्हायचा तरी दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे तेही बेंबीच्या देठापासून
" गणपती चाल्ले गावाला
चैन पडेना जीवाला " अशा घोषणा देत बाप्पांचं विसर्जन आणि खिरपतीचे वाटप झाल्यावरच वातावरण थंड होई . हे सगळं करताना गावातील मुलं मुली एकत्र असत त्यात बहुतांश मुलं आमच्या वाड्यातील , गल्लीतील होती . म्हणजे आम्ही सगळी भावंडं , भाचे कंपनी ही सगळी शाळेच्या वेळेत शाळेत आणि इतर वेळी वाड्यात असत त्यामुळे आमचं बालपण हे गोकुळात गेल्यासारखे आहे . सगळीकडे गर्दी असली तरी वाटून खाणे आणि मिळूनमिसळून राहणे यासरखे सुख कशातच नाही .
" बालपणीचा श्रावण " सगळ्यांना खूप आवडला मग येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मन भूतकाळात गेले . खेड्यातील बालपण ज्यांना अनुभवता आले तो एक अनमोल ठेवा आहे त्याची उजळणी केली तर मनाला तरतरी येते मग तेही शब्दबद्ध करावेसे वाटले आजही हे सगळं आठवलं तर त्याकाळात रमायला होतं .
सौ सरिता अनिल कुलकर्णी
9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी
सोन्यासारखा दसरा
घेरडी गावात बारा बलुतेदार गुण्या गोविंदाने नांदत होते . प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत धनगर समाज पण जास्त आहे . घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी त्यांची शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये आहे त्यामुळे तिथले लोक सधन आहेत . घेरडीत दसऱ्याचं खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आमचे कुलकर्ण्यांचे कुलदैवत आहे . त्यामुळे वाड्यात पण नवरात्र व दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .
तशी तर दसऱ्याची पूर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतलेला असायचा . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची तिला पैशात रोजगार द्यायचा व दिवसभर आपल्याबरोबर चहा, नाष्टा , जेवण सगळं आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की पैसे नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची आई ओळखायची आज हीच्याकडे काही नाही लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची व जेवण करुन जा म्हणायची तिला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , सारवणे , रंग देणे आशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात नीलाबाईला हाताशी धरले जाई . नवरात्रात बायकांचे उपास आसत तर देवापुढे दिवा तर खारीक खोबरे दोऱ्यातओवून मंडपीला बांधून मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडीआप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्याने काका आरती करायचे . नैवेद्याला हरभरा डाळ व गहू भाजून केलेलं पीठ दूध गुळात कालवून ठेवलेलं असे . फार खमंग चव असे त्याची . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत काय असा भास होई . हे सलग सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला जाऊन कडकण्याचा नैवेद्य , खणा नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो आई क्वचित यायची . सकाळी सातला जत गाडी असायची पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही शंकर मामांकडे जायचो त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . आम्ही सगळे आधी बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . देवीचे मंदिर बनात आहे . मोठाल्या चिरेबंदी विहिरी त्यावर रहाट विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे स्वच्छ पाणी . रहाट फिरताना विशिष्ट तालात येणारा आवाज खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . इथे मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी आणलेलं असायचं . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते प्रत्येकाने बरोबर काहीतरी आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे उपवास काही वेगळेच असत . शेवटाची तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई .
दुसरे दिवशी नवमी की दासरा असायचा .
" दसरा सण मोठा "
या उक्तीप्रमाणे आमचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरचं आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के लाऊन बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बहेर जायचे . मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा, दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे.
घरी आईचा पण उत्साह भारी असायचा . दुपारी चार वाजताच मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच केवड्याचं पान ठेवलेलं असे ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण
" मला मला "
करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो . साडी नेसून नीटनेटकं आवरुन ती नऊवार साडी छान काठ काढून नेसत असे मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी पाटल्या , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे . काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .
वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं .
सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद ओवाळून टाके . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं कडकण्या खायला द्यायच्या .सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो . मग एक एक ढोल यायचा त्यांचा मधल्या आंगणात नाच होत आसे . ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्या , उन्नती आणि भरती ही पण समिल व्हायची तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत . त्यापण वाड्याशेजारी रहायच्या त्यापण आशावेळी वाड्यात येऊन बसत .
आमच्या लहानपणी सणाचा उत्साह असा माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेला असे .
सौ सरिता अनिल कुलकर्णी
saritakulkarni67@Gmail.com
9421607248
बार्शी
सोन्यासारखा दसरा
घेरडी गाव बारा बलुतेदारांचा !
प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत कुलकर्णी , पाटील , धनगर , सनगर जरा जास्त आहेत तिथले पाटील हे मुसलमान आहेत . पण सगळे गुण्या गोविंदाने राहतात धनगर समाजाची घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये कामाला आहे त्यामुळे घेरडीचे धनगर लोक सधन आहेत . त्यामुळेच गणपतराव देशमुखांच्या प्रयत्नांनी पंचेचाळीस वर्षांपुर्वी
" घेरडी - मुंबई "
गाडी सुरु झाली आजही छोट्याशा खेड्यातून डायरेक्ट मुंबई गाडी मोठ्या दिमाखात चालू आहे . घेरडीत सगळ्याच सणाचे , उत्सवाचे विशेष वैशिष्ठ आहे त्याचप्रमाणे दसऱ्याचं पण खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आम्हा कुलकर्ण्यांचे कुलदैवत , त्यामुळे वाड्यात पण नवरात्र आणि दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .
तशी तर दसऱ्याची पुर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतला जाई . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची तिला पैशात रोजगार द्यायचा आणि दिवसभर आपल्याबरोबर चहा, नाष्टा , जेवण सगळं तिला आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की तिच्याकडे पैसे नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची आई ओळखायची आज हीच्याकडे पैसे नाहीत लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची आणि जेवण करुन जा म्हणायची
तिला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , घरे सारवणे , रंग देणे अशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात सगळ्यांच्या घरी नीलाबाईला हाताशी धरले जाई .
नवरात्र सुरु झाल्या दिवसापासून रोज सकाळी साडेसातला गावात देवीचे गोंधळी होते ते त्यांच्या खास पोशाखात , कपाळावर कुंकवाचे ठसठशीत पट्टे ओढून , गळ्यात कवड्यांची माळ घालून देवीचे भोपी होऊन पहाडी आवाजात देवीची गाणी म्हणत घरोघरी जात असत साथीला खणखणीत संबळ आणि दिमडी वाजवत वाड्यात प्रत्येकाच्या दारासमोर गाणी म्हणत वातावरण भारावून टाकत असत . वाड्यातील सगळे लोक आंगणात येऊन ते ऐकत असत . हा कार्यक्रम नऊ दिवस रोज होत असे .
नवरात्रात बायकांचे भाजणीचे उपास आसत मग भाजणीची पिठे दळली जायची तर रोजच्या नैवेद्यासाठी डाळ आणि गहू भाजून पीठ दळले जाई ते दूध-गुळात कालवून रोज त्याचा नैवेद्य केला जाई . फार खमंग चव असे त्याची . नऊ दिवस देवापुढे दिवा तर सुरुवातीला खारीक खोबरे दोऱ्यात ओवून मंडपीला बांधून ती मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडी आप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्या दिवटीने काका आरती करायचे . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत की काय असा भास होई . स्वच्छ्ता , सात्विकता यांनी वातावरण भारावलेले असे त्यामुळे यादरम्यान काका
" गुरुचरित्राचे पारायण "
करत असत .
पाचव्या माळेला आई , प्रभा काकू , मावशी , आमच्या काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या मिळून भावकी सोडून इतर पाच घरी जोगवा मागायला जायच्या . त्यात माई मावशीच्या मळ्यात , डोंगऱ्याची दोन घरे , विठू देशपांडे , देशपांडे वहिनी , महाजन वहिनी अशी घरे ठरलेली असत . सकाळी साडेनऊला जाऊ असां ठरलेली निरोप रमा काकू , वरलीकडच्या उषा काकीना गेलेला असे . गावाबाहेर ओढ्याच्या वर गेलं की माई मावशींचा मळा होता मग सगळेच बरोबर त्यावेळेत त्यांच्या मळ्यात हजर व्हायचे . तिथे छाया ताई अंगणात मोठी सतरंजी टाकून वाट पाहत थांबलेली असायची . आम्ही मुली पण बायकांच्या मागेमागे जायचो तिथे खास आदरातिथ्य , आगत्य होत आसे . मळ्यात गच्च भरलेली चिरेबंदी विहीर त्या विहिरीचं पाणी घराजवळ असलेल्या पाटातून सगळ्या मळ्यात वाहत जात असे . मळ्यात देशी केळीची बाग , विड्याच्या पानाचा मळा , विविध रंगी फुलझाडे होती . खास करून पिवळ्या धम्मक फुटण्याच्या फुलांनी झाड बहरलेले असे .
एकमेकींना बसण्याचा आग्रह होई मग देवीची जोगव्याची गाणी म्हणली जायची आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चढाओढीत उखाणे घ्यायचे . गप्पागोष्टी , हास्य कल्लोळ होत असे . छोटीशी पण चविष्ट अशी देशी केळी , दूध सगळ्यांना दिले जायचे
दोन तास कसे जायचे समजत नसे . येताना मग बायका नवरात्रात ब्लाऊज , बांगड्या नवीन घालायचं म्हणून हसन पाठणाकडे महिन्यापूर्वी टाकलेलं ब्लाऊज
" झालं का बाबा "
म्हणत डोकावायच्या तर हमखास ते झालेले नसे " आज दुपारी नक्की पाठवतो "
असे तो सांगे
" आज नाही दिलेस तर पुन्हा तुझ्याकडे टाकणार नाही बघ "
असा नेहमीप्रमाणे लटकेच रागवून बायका निघायच्या .
पुढे वाड्यालगत असलेल्या मणेऱ्याच्या गल्लीत मालन , प्यारन शहाजानची बायको अशा ठरलेल्या बांगडेवाल्याकडे सगळ्याजणी बांगड्या भरत असत . असा तो त्या दिवसाचा सकाळचा सोहळाच असे .
जोगव्यात भाजणीची मिक्स पिठे येत आसत मग त्या मिक्स झालेल्या पिठात ताक घालून आई त्याची थालीपीठ करत असे ती फार खमंग लागायची . सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे देवीचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला कडकण्याचा नैवेद्य , खणा-नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो आई क्वचित यायची . सकाळी सातला बनाळीला जायला जत-घेरडी गाडी असायची पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही आईचे मामा म्हणजे शंकर मामांकडे जायचो अष्टमीदिवाशी त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . घरी थोडा वेळ थांबून आम्ही सगळे बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . बनात चिरेबंदी दगडाचे देवीचे मंदिर आहे . त्या परिसरात दोन तीन मोठाल्या चिरेबंदी विहिरी आहेत त्यावर रहाट बसवलेले आहेत विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी असे . उन्हाळ्यात गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडत पण बनातल्या बारवेचं पणी कधी आटत नसे . रहाट फिरताना विशिष्ट लयीत येणारा आवाज , विविध प्रकारची फळा फुलांची झाडे , मोर , विविध रंगी पक्षी असा खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . बनात केवड्याची पण झाडे आहेत . केवड्याच्या झाडाखाली नाग असतो म्हणून तिकडे सहसा कोणाला फिरकू देत नसत . पण केवड्याची पिवळी धम्मक कणसे मात्र तिथे मिळत आसत . आख्ख कणीस विकत घेऊन त्याची पाने घरोघरी बायकांना दिली जायची . बायका पण त्याची विशिष्ठ प्रकारे घडी घालून पिनेतूने वेणीत किंवा अंबड्यावर घालत असत . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन परत गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . देवीला आलेले भरपूर पाहुणे घरी येतात म्हणून मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी , फळे आणलेली असायची . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . हरी मामा , विद्या मामी , मुरला मामा , शामा मामी पुण्याहून आलेले असत . डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते जवळजवळ सगळ्यांच्या त्याठिकाणी गाठीभेटी होत असत मग भरभरून गप्पांना उधाण येतं असे . प्रत्येकाने बरोबर काहीतरी फराळाचं आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे निर्जळी उपवास असत . शेवटचे तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे परत घेरडीला यायला निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई .
दुसरे दिवशी नवमी किंवा दासरा असायचा .
" दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा "
या उक्तीप्रमाणे आमच्या गावचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरच्या आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या वर चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा संध्याकाळचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के मागे भिंतीला लाऊन बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , किलोभर सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .
दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . यात रंगा माळी आणि बुरंगेच्या ढोलाची चढाओढ असे जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा .
पंधरा दिवस आधी प्रत्येक पथकाची प्रॅक्टीस सुरु झालेली असायची . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे त्यांच्या पाठोपाठ गावकरी निघत असत . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे .
घरी आईचा पण
उत्साह भारी असायचा . दुपारी जेवायला पुरणा वरणाचा स्वयंपाक करुन सगळ आवरुन पुन्हा चार वाजताच आवरायला घ्यायची . मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच कधीतरी केवड्याचं पान ठेवलेलं असे ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण
" मला मला "
करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो . नीटनेटकं आवरुन नऊवार साडी छान काठ काढून ती नेसत असे मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी , श्रीमंत हार , पाटल्या , बिलवर , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे . काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .
वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे सगळ्यात जेष्ठ पण एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून दोन बोटात पेटलेली बिडी असे मग मधूनच त्याचा झुरका घेत वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . त्यांच्याकडे सगळेजण आदरयुक्त भीतीने पाहत असत . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर मस्त झोप काढून फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू , सख्याहरी ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा नाम, डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं . आम्ही मुली नवीन कपडे घालून तयार व्हायचो कुणाला लहर आली तर उगाच साडी नेसायची सगळं आवरुन सावरुन आम्हा मुलांची पळापळी सुरू असे . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बाहेर जायचे .
सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद त्यावर गुलाल घालून ओवाळून टाके , दरात आलं की प्रत्येकाच्या पायावर पाणी घातले जाई जस काही युद्ध जिंकून आले असे वातावरण तयार होई . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं कडकण्या खायला द्यायच्या . सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर येऊन बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो .
मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा, दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे . वाड्यात ढोल आले की मधल्या आंगणात त्यांचा खेळ रंगे . रंगा माळ्याच्या पथकामध्ये वाड्यातील अगदी मोहन आण्णापासून छोट्या मुलापर्यंत सगळे सामील व्हायचे या ढोलाबरोबर डोंगऱ्याचा सुरेश आवर्जून येत असे आणि मग तो नाच जो रंगे त्याला तोड नसे .
" आडीपांग डीप्पांग "
अशा ढोलाच्या तालावर गोलाकार उभे राहिलेले लोक डावा पाय जागेवर नाचवत उजवा पाय एकदा मागे एकदा पुढे करत नाच सुरु होई मधूनच उलटी सुलटी गिरकी घ्यायची , मधूनच जोर काढायचा असे करताना प्रत्येकाच्या हातात असलेल्या पितळी झांजेचा , लेझिमचा आवाज कमीकमी करत न्यायचा आणि पुन्हा एकदम आवाज वाढवत तालाची लय वाढवत न्यायचा आणि त्याच कैफेत रंगा माळ्याने उड्या मारत जो नाच केलेला असे त्याला तोड नसे . कमरेला बांधून हातात गमशे घेऊन तालात त्यांचा रंगलेला सोहळा पाहून क्षणभर गोकुळात कृष्ण सवंगड्याबरोबर दंग झाला की काय असे दृश्य दिसे . खेळून झालं की प्रत्येकाने बैठकीवर यायचे सगळ्या काकांना सोनं द्यायचं त्यांना सगळ्यांना पानसुपारी द्यायची , मानकऱ्याना नारळ द्यायचा आणि उभे राहून प्रत्येकाच्या गळाभेटी व्हायच्या अगदी नयनरम्य सोहळा असे तो . थोड्या गप्पा गोष्टी होतात तोवर दुसरा ढोल वाजत गाजत वाड्याबाहेर आलेला असे . रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हा उत्सव सुरु असायचा .
ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्याहरी , उन्नती आणि भारती ही पण सामील व्हायची तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वाड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत . त्यापण वाड्याशेजारी रहायच्या त्यापण आशावेळी वाड्यात येऊन बसत . आमच्या वाड्यात बरीच मुलं मुली असल्यामुळे डोंगऱ्याची मुलं-मुली , अवी-रवी ,
आमच्या वाड्यात यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो रात्री बराच उशीरपर्यंत हे चालायचे . लहानपणी सणाचा उत्साह असा माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेला असे त्याची ऊर्जा पुढे पंधरा पंधरा दिवस मनाला प्रफुल्लित ठेवत असे हे सगळं वैभव आम्हाला घेरडी गावाने दिले त्यामुळे आई-वडील यांच्याइतकेच त्या गावचे आमच्यावर ऋण आहे हे नक्की !!
सौ. सरिता अनिल कुलकर्णी
मो . 9421607248
saritakulkarni67@gmail.com
बार्शी
घेरडीतील महाशिवरात्र
घेरडीचा महादेव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ! त्यामुळे महाशिवरात्र म्हणजे घेराडीत तसा मोठा सोहळाच असे . नेहामीकरता तिथला आठवडा बाजार सुद्धा त्यामुळेच सोमवारी असतो की काय कोण जाणे . महाशिरात्रीनिमित्त तयारी महिनाभर आगोदरच सुरु होत असे . ग्रामपंचायती कडून त्याची पूर्वतयारी केली जात असे . त्या महादेवाच्या कथा ऐकतच आम्ही घेरडीत लहानाचे मोठे झालो आहोत . त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्र आली की मन फुलपाखराप्रमाणे घेरडीमध्ये जाऊन आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलत राहते .
कारण त्याची कथाही तशीच रंजक आहे ! घरातील मोठयाकडून , आत्याकडून , वाड्यातील सर्वाकडून ती बरेचदा ऐकली आहे . ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती व्हावी म्हणून मी याठिकाणी ती लिहिण्याचा प्रयत्न करते आहे .
साधारणपणे 1958 च्या दरम्यान गावात एक घटना घडली . गावाच्या बाहेर ओढा होता , तो ओलांडून गेलं की चढ होता तिथे पतक्याचा मळा पुढे एकदीड किलोमीटर आंतरावर जनावरं टेकडीवर चरत आसायची . तिथे थोडा खोलगट भाग होता आणि त्या खड्ड्यात गोड पाण्याचा जिवंत झरा होता .गुरख्याचा तिथे पाणी पिण्याचा नित्यक्रम झाला होता . एक दिवस गुराख्यांने सहजच तो खड्डा खणायचा प्रयत्न केला तर त्याला पाषाणाचा घडवलेला भाग हाताला लागला . त्याला त्याचे कुतूहल वाटले म्हणून त्याने गावात येऊन ही घटना गावातील पाटील , कुलकर्णी , सोनार , डोंगरे यांच्या कानावर घातली . गावातील पंच मंडळी व प्रतिष्ठित लोक काय आहे पाहू तरी म्हणून पहायला गेले . गावकऱ्यांनी पण कुतूहलापोटी तो खड्डा आणखी खोदण्याचे काम सुरु केले तर काळाभोर घडीव पाषाण दिसू लागला मग गावकऱ्यांच्या विचार विनिमयाने अलगदपणे ते खोदकाम चालू ठेवले तर तिथे पाषाणाची भली मोठी महादेवाची घडीव पींड असल्याचे लक्षात आले . ती जागा मुस्लिम समाजाच्या मालकीची होती . घेरडीतील सर्व पाटील मुस्लिम आहेत पण पूर्वीपासूनच तिथं हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात . मग ती पींड तिथून काढून दुसरीकडे त्याची प्रतिष्ठापना करायची असे ठरले त्याप्रमाणे काम सुरु झालं पाच फूट दक्षिणोत्तर कोरीव काम केलेला पींडीच्या बाहेरील भाग आणि मधे जवळजवळ एक फूट उंच आडवी गोलाकार पींड होती . कडेला जिवंत पाण्याचा झरा . ती पींड फक्त थोडी हलायची . कडेनी भरपूर खोदकाम करुन मोठ्या पहारी वापरुन पुर्ण मुर्ती काढण्याचा प्रयत्न केला जवळजवळ एकवीस दिवस ते प्रयत्न झाले पण पींड काही जागची हलेना मग ती पिंड स्वयंभू असल्याचे सर्वांचे म्हणणे येऊ लागले . शेवटी गावपंचायत बसली व आहे तिथेच ती पींड ठेवण्याचा निर्णय झाला फक्त जमिन मिळेपर्यंत मंदिर बांधायचे नाही असे ठरले . कारण पाठीमागे शंंभर मिटरवर पीरबाबाचा दर्गा होता . जर दोन्हीही उत्सव एकत्र आले तर गोंधळ होऊन नको त्या वादाला तोंड फुटू नये म्हणून हा निर्णय घेतला . बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि स्वयंभू पींड म्हणून भक्तिभावाने पंचक्रोशीतील लोक महादेवाच्या दर्शनाला येऊ लागले . त्यावर्षी शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरली व ती प्रथा आजतागायत आहे . आजही पींडीभोवती जिवंत पाणी आहे कधी आटत नाही . अनेक वर्षे टेकडीवर उघड्यावर महादेव होता आलिकडील काळात ती जमीन देवस्थानला मिळाली व मंदिर बांधले गेले आणि परिसर आधुनिक केला आहे .
या महादेव विषयी ऐकून कर्नाटकातील एक महाराज त्यावेळी घेरडीत आले व महादेवाची सेवा करण्यासाठी तिथेच राहिले . पूजा व परिसर स्वच्छ करण्याचे काम करु लागले . पाच घरी रोज भिक्षा मागायचे व जेवण करायचे . मंदिराजवळ एक खोपटी बांधून ते तिथेच राहू लागले . मंदिराच्या मागे विहिर होती त्यामुळे परिसरात त्यांनी बेल , झेंडू , गुलबक्षी , सदाफुली , गोकर्ण , चाफा , जाईजुई , फुटाणा अशी बरीच फुलझाडे लावली होती व स्वच्छता ठेवली होती . समोर एक वडाचे झाड होते त्यामुळे तो परिसर रम्य वाटायचा . घेरडीतील लोकांना फिरायला जाण्याची ती एक मस्त जागा झाली होती . उन्हाळ्याच्या सुट्टीत , कोणी पाहुणे आले तर , व्यायाम म्हणून संध्याकाळी महादेवाला जायचं एवढच काय नवीन लग्न झालेल्या जोडप्याला फिरायला जाण्यासाठी सुद्धा हे ठिकाण होते . त्यामुळे महादेव हा सगळ्यांसाठी आवडीचा विषय होता . कारण जाताना ओढा त्यातल्या दगडा दगडावर उड्या मारत पार करायचा . दुतर्फा महानंदाची झाडी होती सोनाराच्या मळ्यात बांधावर आंब्याची झाडे होती . पुर्वी वाहनांची वर्दळ नसे त्यामुळे रस्त्यावर मोर दिसायचे . महादेवाचे दर्शन झाले की पकडापकडीचे खेळ रंगायचे . कधी कधी तेल मेतकूट लावलेले चुरमुरे खायला न्यायचे अशी धमाल चालायची . सगळ्या वयोगटातील लोक असायचे तिथे .
खेडेगाव असल्यामुळे घेरडीत मनोरंजनाचे फारसे काही कार्यक्रम नसायचे त्यामुळे यात्रा आली म्हणलं की गावात उत्साहाला उधाण यायचे . यात्रेत चारपाच दिवस सांगोल्याहून सिनेमाच्या टॉकिज यायच्या आसपासच्या गावातून विशेषतः जवळ्यामधून किराणा , कपडा , जनरल स्टोअर्स , बांगड्यांची दुकाने , अशी विविध दुकाने , हॉटेल्स यायची . तेवढ्या काळात आठवडाभर धामधूम असायची . महाशिवरात्रीच्या आधीच्या रविवारी सगळी दुकाने आणि हॉटेल्स , सिनेमाचा तंबू महादेवाच्या टेकडीवर लागायचे . सोमवारचा बाजार गावात न भरता तिकडे भरत असे गावातली पण दुकाने तिकडेच लागत असत . त्यामुळे ओसाड टेकडी गजबजून जात असे . शाळा सुटली की आम्ही तडक तिकडे पळत सुटत असायचो .
भाजीपाला , फळभाज्या विशेष म्हणजे मोठाली पांढरी आणि लाल रताळी पोत्यानी बाजारात यायची .
" पाच महिन्याची रताळी "
आशी आरोळ्या ठोकत विक्री चालायची . उन्हाळी कामाची सुरुवात उकडलेल्या रताळीच्या किसाने होत असे . वाड्यात पोत्यानी रतळाची खरेदी होत असे . महाशिवरात्री दिवशी
"रताळाची हंडी "
हा स्पेशल कार्यक्रम असे रामू कोळी सगळ्यांची रताळी गोळा करून नेत असे ती धुवून जुन्या डेऱ्यात घालायची डेरा गच्च भरला की वर ओल फडके टाकायचं आणि त्यावर गच्च बसेल असे ताट ठेऊन पेटविलेल्या शेकोटीत तो डेरा पालथा घालायचा वरून पुन्हा जाळ घालायचा आणि पहाटेच ती शेकोटी लावली जायची बराच वेळ त्या आरावर ती रताळाची हंडी उकडायची . थोड थंड झाल्यावर भागाबाई आणि रामू कोळी दोघे नवरा बायको ती हंडी काढून सगळ्या वाड्यात घरोघरी रताळाचे ताट पोहोच करायचे . ती उकडलेली रताळी नुसती सोलून खायला , दूध गुळात किंवा ताक मीठ साखर घालून कुस्करून खायला जी मजा यायची ती चव आजपर्यंत कुठेच मिळू शकली नाही .
महाशिवरात्रीच्या दिवशी वातावरण सणासारखं होत असे . नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असे त्यामुळे आदले दिवशीच वाड्यात सगळ्या बायकांचे सकाळी 8 वाजता महादेवाला जायचे ठरलेले असे . आई , प्रभा काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या अगदी ठरवून बारीक बुंदके असलेल्या पांढऱ्या रंगाच्या साड्या त्यावर चिकनचे पांढरे ब्लाउज , पांढऱ्या फुलांचा गजरा घालून हातात पंचीपाळे , धोंडी अप्पांनी दिलेली पांढरी फुले आणि बेल घेऊन अंगणात येऊन एकमेकींना हाका मारत उभ्या असायच्या . आम्ही मुली पण त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी तयार असायचो . बायका महादेवापर्यंत येईस्तोवर आम्हा मुलांचे पळतपळत दोन हेलपाटे तरी व्हायचेच . यात्रेत काय काय आले आणि गावातील कोण कोण बायका आपल्या आधी आल्यात हे धापा टाकत सांगायचे . सोनाराच्या बायका , रमा काकू , दिनकर काकू , अरविंद काकी , उषा काकी , डोंगऱ्याच्या वहिनी शिक्षक मंडळी , आसपासच्या वस्त्यांवर राहणारी मंडळी सगळे त्याठिकाणी जमलेले असत . त्याचवेळी 9 ची गाडी आली तर ती तिथे थांबत असे सांगोला , जवळा याठिकाणचे पुरुष बायका आलेले असत . तुंबळ गर्दी होत असे महादेवाची मूर्ती त्यादिवशी पिवळ्या पांढऱ्या फुलांनी अच्छादलेली असायची . अभिषेक , धूप , दीप , भजन कीर्तन यांनी परिसर दणाणून जाई . नयनरम्य सोहळा पाहून मान तृप्त होई . त्याठिकाणी जमलेले ओळखीचे लोक घोळक्या घोळक्याने गप्पा मारत बसायचे . एखादा उसाच्या रसाचा चरखा तिथे लागलेला असे . ऊन वाढू लागायचं , पळापळी करुन दमायला व्हायचं त्यात मग रस प्यायला मिळाला की परमोच्च आनंद होई . गारेगारच्या रंगीत कांड्या , गोळा बर्फ याचे गाडे लागलेले असत . पण आजारी पडता म्हणत गारेगार कधी खायला मिळायचा नाही .
घरी आले की खिचडी , भगर , शेंगदाण्याची आमटी , शाबुदाण्याच्या पापड्या , खजूर , लाडू , ताक , दही वेगवेगळी फळे अशी फराळाची घरात रेलचेल असे . घरोघरी पाहुणे आलेले असत . बनाळी डीकसळ इथून अनेक जण आलेले असत . मग चहा पाणी , सरबत आणि गप्पा रंग भरत असे . थोड शांत झाले की आई शिवलीलामृत वाचत असे . आई महादेव भक्त होती , तिने सोळा सोमवारचे व्रत केले होते . त्यामुळे आम्ही काही गोष्टी लहानपणापासून तिच्याकडून ऐकून आहोत . सोमवारी तूप कढवायचे नाही , वाती वळायच्या नाहीत , आई सोमवारी भगर खात नसे . अशा बऱ्याच गोष्टी ती पाळायची .
त्याकाळात आम्हा मुलांना सिनेमाचे फार अप्रूप असे . यात्रेसाठी दोन तीन सिनेमा आणायचं ठरलेले असे यात प्रामुख्याने सुरेश डोंगरेचा पुढाकार असे त्याला रंगा माळी , गावचे पाटील म्हणजे छोटेपीर पाटील यांची साथ असे . शेलाटी अंगकाठी , गोरापान रंग , पांढरी दाढी आणि लुंगी नसलेले छोटेपीर हे गावातील अजब व्यक्तिमत्त्व होते . रजा मुराद सारखा त्यांचा आवाज होता . अशा सार्वजनीक कार्यक्रमात ते पुढे असत पेठेत ओरडले तरी लांबपर्यंत त्यांचा आवाज येत असे .त्यामुळे सिनेमा ज्यादिवशी असेल त्यादिवशी त्यांचा आवाज घुमत असे . एकदोन सिनेमे महादेवाच्या टेकडीवर होत असत रात्री आठ वाजता सुरू होणारा सिनेमा सुरू व्हायला दहा तर कधी आकरा वाजत मग सुटायला मध्यरात्र होत असे . त्यामुळे वाड्यातील सगळेजण मिळून जायचे त्यात सगळी जबाबदारी मोहन आण्णा आणि उषा वाहिनीवर असे . आई काका कधी येत नसत . जाताना पळापळी करत नेलेली मुले अर्धवट झोपेत परत आणायची ही वाहिनी लोकांना कसरत असायची . त्यातला एखादा राहिलेला सिनेमा यात्रा संपल्यावर गावात दाखवला जाई . तोही मारुतीच्या मंदिराला पडदा लावला जाई आणि बाजार भरत असे तिथे बसण्याची सोय ! बसायला आपलं आपलं पोत घेऊन लवकर जायचं आणि जागा पकडून ठेवायची . स्पिकरवर प्रत्येक अर्ध्या तासाने
" दहा मिनिटात सिनेमा सुरू होईल "
अशी घोषणा तीन चार वेळेस व्हायची . सिनेमाची पेटी नऊच्या हांगिरगे गाडीने यायची गाडी आली की कोण आनंद होत असे . कसतरी दहा वाजेपर्यंत सगळ लाऊन झाले की रीळ फिरवले जाई आणि चित्रे दिसायला सुरुवात झाली की लाईट जायची पुन्हा गोंधळ , शिट्ट्या , आरडा ओरडा होई लोक जागेवर उठून इकडे तिकडे करायचे सगळी धूळ उठायची . मग कसतरी आकरा वाजता सिनेमा सुरू होई . तो बघण्यात जी मजा केली तशी आता एसी थेटर मध्ये पण येत नाही .
हे सगळं होत असताना आमचे काका , फक्कड काका , रमेश आण्णा , राजाभाऊ दादा ही सगळी वाड्यातील मंडळी तर अंता काका , डोंगरे कंपनी , सोनार कंपनी , शिक्षक मंडळी , पाटील , मणेरी आसपासच्या वाड्या वास्यावरील मंडळी असा अख्खा गाव त्यात सामील होत असे त्यामुळे घेरडीतील महाशिवरात्र हा आमच्या गावचा सण असल्याप्रमाणे साजरा होत असे . त्याकाळी फार काही झगमगाट नसला तरी प्रेम , बंधुभाव , आदर , एकोपा या सगळ्या गुणांची शिदोरी त्या माझ्या छोट्याशा गावाने दिली याचा मला सार्थ अभिमान आहे .
सरिता कुलकर्णी
बार्शी
9421607248
घेरडीतील चैत्रागौर
तसं दहावीनंतर शिक्षणाच्या निमित्ताने मला घेरडी सोडून चाळीस वर्षे होऊन गेली . पण घेरडीचे नाव निघाले की मन एकदम प्रफुल्लीत होते आणि फुलपाखराप्रमाणे विहार करते . घेरडीतील प्रत्येक सणाच्या , प्रत्येक प्रसंगाच्या आठवणींनी मन आगदी तुडुंब भरलेलं आहे . मग तो दसरा असो की दिवाळी किंवा श्रावण असो की महाशिवरात्र घेरडी सारख्या सणाच्या आठवणी कुठेच नसतील असं माझं भाबडे मन म्हणते .
आत्ता चैत्र महिना सुरु झाला आणि कुठे कुठे होणारे हळदीकुंकू , देखावे प्रत्यक्ष आणि व्हॉट्सॲप मुळे तर अगदी हातातच पाहायला मिळतात . असाच आज प्रत्येक पौर्णिमेची महती सांगणारा देखावा मायडीने पाठवला . दोन दिवस सुट्टीमुळे मी पुण्याला निघाले होते , ट्रेनमध्ये सहज मोबाईल चाळत असताना मी तो पहिला आणि मी एकदम भूतकाळात गेले . चैत्रागौर म्हणलं की अनेक आठवणींनी माझ्याभोवती फेर धरला . चित्रपट सरकावा त्याप्रमाणे ते दिवस माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले . मला पुण्याला पोहोचायला चार तास लागणार होते म्हणलं चला आपण त्या आठवणी प्रवासात जाता येता लिहूनच काढाव्या आणि लगेच मी लिहायला सुरुवात केली .
घेरडीमध्ये कोणताही सण आला की त्याची सार्वजनिक चर्चा वाड्यात मधल्या अंगणात सायंकाळी पाच वाजता सगळ्या बसल्या की ठरलेली असे . चार दिवसावर पाडवा आला की लगबग सुरु होई . आता पहिल्या तिजेला गौर बसवायची आणि पुढे तिचं मोठं हळदी कुंकू करायचे हा प्रघातच होता . त्याची पूर्वतयारी म्हणजे पाडव्यापूर्वीच घराची स्वच्छता केली जायची . गौरीचा लाकडी साचा वर्षभर घरात खणाला लोखंडी कडीला सुतळीने बांधून टांगलेला असे तो साचा पाडवा झाला की खाली काढून घेतला जाई . मग पहिल्या तिजेला आईचं स्वतःच आणि मुलींचे पण न्हाऊन माखून होई मग तेवढ्याच प्रेमाने जणू माहेरवाशीण असल्याप्रमाणे त्या लाकडी साचाला आई तेल लाऊन कोमट पाण्याने धूत असे . देवाची पूजा झाली की त्याच्या शेजारी छोट्या पाटावर ती गौर खण पांघरुन बसवली जाई . तिला कुंकू लाऊन गळ्यात साखरेच्या गाठीचा हार , मंगळसूत्र , गेज वस्त्र , सुवासिक फुलांचा गजरा असा साज करुन तिचे रुपडे सजवून तिची प्रतिष्ठापना केली जाई . तिला नैवेद्याला वळवटाची खीर आणि मुरडीचा कानोला केला जाई त्याचबरोबर कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ असे . त्यामुळे दुपारच्या जेवणाचा बेत फक्कड होत असे , नुकत्याच आमच्या परीक्षा संपलेल्या असत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झालेल्या असायच्या . कधी कधी आक्की , तायडी त्यांची छोटी छोटी बाळं घेऊन आलेल्या असायच्या . थोडी विश्रांती झाली की दुपारी दोन अडीच नंतर आम्ही वाड्यातील सगळ्या मुली मी , मायडी , ज्योती , विद्या , कुंदा , हरणी , चिमी , बाळी , मिनी , स्वाती अशा सगळ्या बहिणी भाच्या वाड्यात एकत्र जमायचो आणि एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे शेतं लावण्याचा !
त्याकाळी गौरीच्या देखाव्यात खरीखुरी शेतं ठेवण्याची पद्धत होती . त्यासाठी पंधरा दिवस आधी दोन समान आकाराचे खोलगट कुंडे किंवा थाळ्या त्यात उन्हात रापलेली काळी माती पसरून एकात शक्यतो जोडगव्हाच्या खपल्या टोचल्या जायच्या आणि दुसऱ्या भांड्यात कोणतेही धान्य असे ओळीने जवळजवळ टोचायचे आणि हलक्या हाताने पाणी घातले जाई . सकाळच्या वेळी त्याला ऊन मिळावे म्हणून अंगणात ठेवले जाई . वसंत ऋतू असल्यामुळे तिसरे दिवशी त्याला धुमारे फुटलेले असत ते पाहून आगदी हरकायला होई . आम्ही सगळ्या मुली एकमेकींकडे जात
" तुझं शेत केवढे आले माझे केवढे आले "
अशी चर्चा करत असायचो . साधारण पंधरा दिवस हा उद्योग चालायचा , धान्य थोडंसं मोठं झाले की आई तर तृप्त चेहऱ्याने , कौतुकाने त्या हिरव्याकंच शेताकडे पाहून म्हणायची
" यावर्षी शेतात धान्य कसे येणार त्याचे हे प्रात्यक्षिक आहे बरं ".
कोणी गावाला जाणार असेल तर त्यांचे हळदीकुंकाचे नियोजन लवकर असे नाहीतर शक्यतो मधली तिज झाल्यावर तो घाट असे . चांगला दिवस पाहून त्यादिवशी ठरवले जाई . ती तयारी सुद्धा अगदी आठवडाभर चालायची . आई आवर्जून चाफा हरभरा आणायची आदले दिवशी मोठ्या पितळेच्या पातेल्यात आडशीरी हरभरे पाण्यात टाकायची सकाळी मागच्या दाराला ते उन्हात ठेवायचे दुपारी तीन वाजेपर्यंत हरभरे टम्म फुगायचे ते दूरडीत उपसून ठेवायचे . कैरीची डाळ करण्यासाठी सकाळीच हरभरा डाळ भिजत घातलेली असायची ती पण उपसून ठेवायची आणि इकडे गौरीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम होई . समईला तो साचा बांधून काठापदाराची साडी नेसवली जायची मग मेण लाऊन नथ , मेण लाऊन कुंकू , गळ्यात कोल्हापुरी साज घालून गौर सजवली जाई . मग बाकी तयारी जसं समईत तेलवात करुन ठेवणे , अंगणात मोठा बल्ब सोडणे त्याचबरोबर हमखास वादळवारा सुटतो , अवकाळी पावसाचा सडाका येतो मग लाईट जातात म्हणत कंदील , चिमण्या पण स्वच्छ करुन , वाती काढून , रॉकेल भरुन ठेवल्या जायच्या !
आमची भावकीची घरे , बाकी नोकरीच्या निमित्ताने गावात असलेली शिक्षक मंडळी , बँकेचे लोक , सोनाराची चारपाच घरे असे जवळजवळ चाळीसएक बायका , मुली हळदी कुंकाला यायच्या . बरेचदा एका दिवशी अनेक ठिकाणी हळदीकुंकू असे . गौरीईचे हळदीकुंकू म्हणजे छोटीशी दिवाळीच जणू !
रव्याचे लाडू , करंज्या , शंकरपाळ्या हे पदार्थ समोर ठेवण्यासाठी केले जायचे तर खायला तिखट काहीतरी बरोबर हवे म्हणून चिवडा , चकली , शेव पण केली जायची .
इकडे दुपारी दोन नंतर काकांच्या मदतीने आम्ही मुली सोप्यात खुंट्याना दोऱ्या बांधून त्यावर साड्या टाकून मखर तयार करण्याची सुरुवात करायचो . कमरेच्या उंचीचे धान्याचे पिप ठेऊन त्यावर पाट ठेऊन मुख्य आसन तयार होई समोर भली थोरली लोखंडी पेटी पुढे क्रमाने छोट्या पेट्या ठेऊन पायऱ्या करायच्या त्यावर छानशी शाल टाकायची आणि सुंदर मखर तयार होई . वाड्यात ज्यांच्या घरी त्यादिवशी हळदीकुंकू नसेल त्या मुली रांगोळी आणि सजावटीसाठी मदतीला असायच्या . आदले दिवशीच संध्याकाळी महादेवाला गेले की येताना सोनाराच्या मळ्यात मिळाल्या तर दोन तोतापुरी कैऱ्या किंवा पाच वाजता भाजीवालीकडून चोच असलेल्या दोन कैऱ्या आणायच्या त्याला थोडसं मेण लावून त्यावर कुंकू लावायचे , काजळाचे नाक डोळे काडीने काढायचे आणि काचेच्या ग्लासमध्ये गहू घालून त्यावर त्या पोपट म्हणून दोन्ही बाजूला ठेवायच्या , मोठ्ठे कलिंगड आणून ते कलात्मकतेने कापून दोन्ही बाजूला ठेवायचे . दोन्ही बाजूला स्टीलचे डबे ठेवून त्यावर आईने तिच्या लग्नात विणलेले पांढरेशुभ्र वेलदोडा डिझाईनचे रुमाल टाकायचे त्यावर लाडू , करंजीच्या डिश ठेवायच्या . कपाटावर पेटीत कपड्यात बांधून ठेवलेली खेळणी समोर मांडण्यासाठी निघत . साधारण अशी तयारी घरोघर होत असे . पण हटके काहीतरी करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा . मग कोणी परातीत पाणी घालून ते संथ झाले की त्यावर बुक्का चाळायचा आणि त्यावर पांढरी शुभ्र रांगोळी काढायची , तर कोणी छोटासा झोपाळा करुन त्यावर गौर बसवायचे , तर कोणी आंब्याचे फाटे लाऊन आमराईत गौर बसवायचे आशा वेगवेगळ्या कल्पना करुन सजावट केली जायची .
खिरापतीसाठी कैरीची डाळ असे आईची डाळ पण फार खमंग असे . डाळ मोठसर वाटून त्याला थोडासा कैरीचा कीस लावायचा चवीप्रमाणे मीठ , साखर , कोथिंबीर घालून तिची खास भरलेल्या मिरचीची हिंग , जिरे घालून चरचरीत फोडणी द्यायची .
सगळे आवरलं की कोपऱ्यात स्टूल ठेवायचा त्यावर पण कशिद्याने विणलेला रुमाल टाकून ताट ठेवायचे त्यात स्वच्छ पितळी पंचपाळे , चांदीची अत्तारदाणी , गुलाबदाणी , पान सुपारी तर ट्रेमध्ये कैरीची डाळ घालून पाने आणि स्टीलच्या पाटीत ओटीसाठी हरभरे भरुन ठेवलेले असत . सकाळीच कोळ्याच्या भागाबाई , लाह्यव्वा किंवा परटाची शांता यांच्याकडून घरोघरी हळदीकुंकवाची आमंत्रणे जात असत . आईची चार वाजेपर्यंत सगळी मांडामांड व्हायची आणि स्वतःची आवर आवर करुन आई गौर मखरात आणून बसवायची समोर मंद समई लावायची मनोभावे पूजा , नैवेद्य करुन येणाऱ्या बायकांच्या स्वागताला ती पाच वाजता नटून थटून सज्ज असे .
सात्विकतेचा शृंगार ल्यायलेले ते दृश्य मनोहर भासे ! आम्ही मुली पण सागरवेणी , पाचपेडी वेणी किंवा काहीतरी केसांची फॅशन करायचो , मनात आले तर साडी नाहीतर ड्रेस घालून तयार व्हायचो . छाया ताई , सोनाराच्या मळ्यातल्या बायका , डोंगऱ्याच्या गीता वाहिनी शेतातून येत असत मग दिवसाबरोबर परत पोहोचले पाहिजे म्हणत त्या लवकर यायच्या आणि थोडस लांब राहणाऱ्या उषा काकी , दिनकर काकू , रमा काकू , अरविंद काकी साडेपाच सहापर्यंत यायच्या आणि बायकांचे आवाज आले की आवरून तयार असलेल्या वाड्यातल्या प्रभा काकू उषा वाहिनी , पिलू वाहिनी , शांता वाहिनी , पमा वाहिनी , वाड्याच्या आसपास असलेल्या ताई आत्या , नर्सबाई , सुमन वाहिनी , डोंगरे वाहिनी , वृषाली वाहिनी , देशपांडे वाहिनी , वाईकर वाहिनी , महाजन वाहिनी हजर होत आणि एकत्र सगळ्याजणी जमत असत . अंगण आगदी उत्साहाने फुलून येई . निमित्त फक्त हळदी कुंकवाचे असायचे खरं तर ते एक स्नेहसंमेलन असायचे . वाडा गच्च भरायचा आळीपाळीने बायका सोप्यात येऊन हळदीकुंकू घेऊन पुन्हा अंगणात सतरंजीवर येऊन बसत . सगळ्यांच्या आनंदाला भरतं यायचं , चेष्टा मस्करी , निखळ हास्याचे फवारे उडत . आधी बसून गौर पहायची , देखाव्याचे निरीक्षण करत डाळ खायची मग देखाव्याचे , डाळीच्या चवीचे कौतुक करायचे आणि मग मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे उखाणे घेणे . घेरडीच्या बायका भारी हुशार आणि हजरजबाबी होत्या . त्यांचे उखाणे इतके विविधतेने नटलेले असत , काहीजणी शीघ्रकवी असल्याप्रमाणे तिथल्या तिथे तयार करून घेत तर काहींचे अलंकारिक असत , उखाणे घेण्याची जणू चढाओढ लागत असे . आम्ही मुली मग इकडून तिकडे करत मजा लुटत असायचो . एखादी माहेरवाशीण आलेली असे तर नवीन कोणाकडे गोड बातमी आहे ही बित्तंबात चर्चा ठरलेली असे .
संध्याकाळी साडेसात वाजता सगळ्या बायका येऊन गेल्या की वाड्यातील सर्व पुरुषांना गौर पहायला बोलावले जाई मग पंत काका , फक्कड काका , मोहन अण्णा , राजाभाऊ दादा , रमेश अण्णा , सुरेश बापू या मोठ्या मंडळी बरोबर सुधीर , सुनील , पंपू , बबलू , छबलू ही मुलेही असत तसे तर दुपारपासून मुलांच्या येरझाऱ्या असायच्या . या सगळ्यांना कैरीची डाळ आणि हरभरे खायला दिले जायचे मग चहा किंवा सरबत होई . तोपर्यंत आई घरात सहा सात ताटे तयार करी प्रत्येक ताटात सगळं फराळाचे , कैरीची डाळ आणि भिजवलेले हरभरे त्याची उसळ करून ती पण घालून ते वाड्यात सर्व घरी , आसपास एकदोन ठिकाणी , भागाबाई आणि शांता यांना दिले जाई . ही देवाण घेवाण प्रत्येक घरून होत असे . त्यादरम्यान घरी रोजच खिरापत आणि भिजवलेले हरभरे येत असत मग तेल , मीठ घालून हरभरे परतून खाण्याचा आनंद आम्ही घेत असू .
माझं लग्न झाले मग त्यात खंड पडला . एकदोन वर्षांनी मनीष आठ महिन्यांचा झाला तेव्हा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे , महावीर जयंती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आशा मला लागून सुट्ट्या आल्या . आणि आम्ही अचानक घेरडीला जायचे ठरवले . त्याकाळी मोबाईल नव्हते आणि घरोघरी फोन पण नव्हते निरोपाची देवाण घेवाण पत्राद्वारे व्हायची . आम्ही अचानकपणे दुपारी घेरडीत टपकलो . काका बाहेरच भेटले ते मनिषला घेऊन भरभर पुढे गेले वाड्याच्या दरवाजात सगळी बच्चे कंपनी होती
" शरू आत्या आली "
असा गोंधळ ऐकताच आई लगबगीने उठली लगेच भाकरी तुकडा घेऊन दारात हजर . आम्हाला पाहून आई काकांना इतका आनंद झाला मुख्य म्हणजे बाळाला पाहून आईचा आनंद गगनात मावेना . जोडून सुट्ट्या आल्या म्हणून आलात आता आलाच आहात चार दिवस राहाल तर आपण करु हळदीकुंकू असे आईने ठरवले . आणि आगदी उत्साहात , जोषात तिची तयारी सुरु झाली आणि नेहमीप्रमाणे उत्साह होता तो दुप्पट झाला . आनंदात ते हळदीकुंकू पार पडले . नोकरीमुळे माझे फारसे राहणे पडत नसे तर आईने सांगुनच टाकले लागून आलेल्या सुट्टीत घेरडीला येत जावा मग आम्ही पण जायचो . आई काका घेरडीत असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी आम्ही जायचो आणि आई हळदीकुंकू करायची .
आता देवीच्या निमित्ताने घेरडीला जाणे होते पुढची पिढी पण सगळे उत्सव आगदी जोशात साजरे करताना दिसतात . व्हॉट्सअँप ग्रुप आहे त्यात माधुरी , सारिका , अंता काकांच्या सूना , डोंगऱ्याच्या सूना , बाळू काकांच्या सूना , आणि बऱ्याचणी संक्रांत , वेळ अमावास्या , नवरात्र आणि बरेच उत्सव दिसतात ते पहिले की मन प्रसन्न होते एकप्रकारची ऊर्जा मिळते .
सौ. सरिता कुलकर्णी
9421607248