आक्की म्हणजे ऐन पंचवीसीतलं आई-काकांंच्या छत्रछायेत , खडकावर नंदनवन फुलवण्याची आस उराशी बाळगून वाटचाल करणारं पहिलं आपत्य होतं की जे काळाने हिरावून नेलं होतं ते दुःख पचवणं तशी काही साधी गोष्ट नव्हती . 82 साल आतीव दुःखात गेलं , कित्तेक दिवस लोक भेटायला येत होते . काय होतंय कोणालाच कळत नव्हतं . सततच्या रडण्यामुळे आईच्या दृष्टीवर त्याचा परिणाम झाला होता . आईने स्वतःला आध्यात्मिक वाचनात बऱ्यापैकी गुंतवून घेतलं होते . काकांना पण बरेच उद्योग होते नोकरी , शेतीचा व्याप शिवाय आक्की गेली होती तरी तिच्या दोन मुली होत्या त्यांची काकांना फार काळजी वाटत असे . एक वर्षानंतर मात्र आई-काकांंना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या सर्व मुलींचे भवितव्य आपल्या दोघांभोवती आहे लग्न झालेली तायडी असो वा बाकी सगळ्या असो ! आपण जर गळाठलो तर कोणीच उभारी धरणार नाही त्यामुळे एक वर्षानंतर त्यांनी दुःखातून बाहेर यायचं ठरवले . आपल्या चार मुलींचे सगळं व्हायचं आहे त्यात आता आक्कीच्या दोन मुलींची भर पडली . आपणच असे गळाठून बसून चालणार नाही हे त्यांना कळून चुकलं . पण जादूची कांडी फिरल्यासारखे ते सुरळीत होणार नव्हते त्यासाठी काळ हेच त्यावर औषध होते . त्यांनी मन दुसरीकडे गुंतवायला , वळवायला सुरुवात केली . काकांनी शेताचा व्याप वाढवलेला होता उत्पन्न पण चांगलं निघत होतं . काका लक्ष देतच होते आई मात्र फारसं मनापासून किंवा उत्साहाने करत नव्हती . हल्ली तिने हा सूर लावला होता
" देवाच्या दयेने आपल्याकडे भरपूर आहे .आता आणाखी कशाला वाढवता इतका व्याप , लग्न होऊन मुली आपापल्या घरी जातील त्यांना शिकवावं चांगली मुलं पाहून द्यावं आपण फारशी दगदग करु नये ".
पण काकांना ते फारसं मान्य होत नव्हतं . त्यांच्यातली उद्योगी वृत्ती त्यांना शांत बसू देत नव्हती . त्यांनी जर्सी गायी घेतल्या त्यानुषंगाने आईचं काम वाढायचं . आपण आपल्यासाठी जगतो असे काका म्हणायचे . आता रेखा नाही हे मान्य करुन आपण आपलं जिवन जगायला हवं . मुलींना उच्च शिक्षण देऊ त्यांना अधुनेकतेची कास धरायला मदत करु . एवढंच काय तर काकांनी घरातसुद्धा सुधारणा करायचं थांबवलं नाही . एकदोन महिन्यांतून त्यांची किर्लोस्करवाडीला चक्कर असायची तिथे जेजे नविन वाटायचे तेते काका घेरडीत आणायचे घरातली जुनी भांडी , फळ्या काढून अगदी लोखंडी रॕक , स्टीलचे डबे सगळं आणलं तोतो आईला वाटायचं का वाढवताहेत हे संसार . पण वातावरण थोडंस प्रसन्न करण्याचा तो त्यांचा प्रयत्न असे . आईची तगमग , निरुत्साहीपणा त्यांना बोचत असे . मग काय केलं तर ती खुश होईल याचे मार्ग ते शोधत असत . वाहत्या झऱ्याप्रमाणे असलेला आईचा उत्साह लोप पावला होता . तो पुर्ववत झाला पाहिजे , तिने स्वतःला सावरावं यासाठी हरतऱ्हेने काकांचे प्रयत्न चालू असायचे . काका तिला म्हणायचे
" हे काही दुसऱ्यासाठी नाही करत आपण . आपल्यासाठी हे आणतोय त्याचा उपभोग तू घ्यायला शीक . तुलाच स्वच्छता करायला त्रास होतो म्हणून सगळं नविन आणतोय घर छान वाटतं ".
पण आई थोडीशी अध्यात्माकडे वळली होती त्यानुषंगाने विरक्तीची भावना बळावत होती . थोडंस स्थितप्रज्ञ रहायला ती शिकली होती . घरात आई-काका ज्योती व संजू असायचे मायडी सुट्टीदिवशी येत असे . ज्योती तशी चुणचुणीत व खोडकर होती सगळ्या मुलींच्या तुलनेत संजूचा मंदपणा जाणवत होता व हल्ली ती चिंता आई-काकांंना सतावत होती , तिला बराचसा दवाखाना पण त्यांनी सुरु केला होता पण दिसायला खूप छान दिसायची तसं सगळ्या मुलींवर काकांच प्रेम होतंच पण संजूविषयी ते जास्त भावनिक व्हायचे आईच्या डायबेटीसमध्ये ती झाली त्यात तिचा काय दोष असे त्यांना वाटायचं .
आम्हा मुलींना मात्र घरात छान छान वस्तू आणलेलं आवडायचं . आम्ही पण नविन नविन दिसेल ते आणायचो ग्लासचे , कपबशांचे सेट आणायचो . मायडी सांगोल्यात मी किर्लोस्करवाडीत शिकत होतो तर आई-काका आमच्यासाठी त्यावेळच्या फॕशनप्रमाणे मॕक्सी , चुडीदारसाठी सोलापूरहून कपडे आणायचे तेही एकदम चारचार आणायचे . भाऊकाका मुलींसाठी खूपच खर्च करतात असं लोक म्हणायचे पण आई-काका म्हणत असत
" लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला जे हवं ते आपण करतो कोणाच काय जातं ? तुम्ही फक्त शिका त्यासाठी काय हवं ते पुरवायला आम्ही खंबीर आहोत ".
मग आम्हांला पण हुरुप यायचा मायडी शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची तसेच ती खेळातही असायची त्यावेळी ती काॕलेजमध्ये बास्केट बाॕल चँपियन होती . मी मात्र अभ्यासात लक्ष घालायचं ठरवलं होतं . दहावीत अभ्यास झाला नाही आणि आकरावीला पण पहिली टर्म अशीच गेली . आकरावीला फारसे मार्क्स मिळाले नव्हते मग काकांनी मला स्पेशल पत्र लिहिले होते व त्यात शेवटी एक वाक्य त्यांनी लिहीलं होतं
ते मी मनावर घेतलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये मनापासून अभ्यास सुरु केला व बारावीचा अभ्यास व्हेकेशनमध्ये सुरु केला त्याचा परिणाम बारावीच्या पहिल्याच टेस्टपासून दिसून आला . मी चांगल्या मार्क्सने वर्गात पहिल्या तीनमध्ये असू लागले . तायडीला त्याचं फार कौतुक वाटायचं ती म्हणायची
" घेरडीसारख्या खेड्यातून येऊन सगळ्यांना मागे टाकून पुढे जातीस याचा मला फार अभिमान वाटतो तू फक्त आभ्यास कर ".
तायडी सर्वतोपरी मला मदत करायची . मी नोट्स काढत बसायचे तर तायडी मी काय करते ते बघत जवळ बसायची . एकदा मला म्हणाली
" शरु तुझं ते अकांऊन्टन्सी काही जमायचं नाही मला , पण मी तुला अर्थशास्त्राच्या नोट्स काढून देईन ".
मी तिला वही पुस्तक देऊन काॕलेजला गेले आणि गंमत म्हणजे मी काॕलेजमधून येईपर्यंत दोन धड्यांच्या नोट्स तिने काढून ठेवल्या ! एखादी गोष्ट तिला करावीशी वाटली की ती करायचीच अशी हुशार व्यक्तिमत्त्व असलेली तायडी ! तिला स्वतःला शिकायला मिळालं नाही याचं शल्य तिला होतंच पण लहान बहिणींनी शिकावं चांगलं रहावं याविषयी ती जागरुक असायची . मी जेव्हा किर्लोस्करवाडीला रहायला गेले तेव्हाचं माझं रहाणीमान कसं होतं हे आजही मला आठवतंय . तेल लाऊन दोन वेण्या त्याला रिबन बांधलेली असायची कपाळावर मधोमध गंध लावलेले असे आणि फुलाफुलांच्या डिझाईनचे परकर ब्लाऊज त्याचबरोबर दोन नविन हाफ मॕक्सी पण शिवलेल्या होत्या . सोलापूरहून शबनम आणलेली होती ती घेऊन मी काॕलेजला जात असे . बऱ्यापैकी खेडवळ बोलणं असायचं . तसं तायडीला वाडीला रहायला जाऊन पाच वर्षे झाली होती मग तीच मला समजून सांगायची
" शरु तू हे परकर ब्लाऊज बाहेर वापरु नकोस फक्त मॕक्सी वापर आणि दोन भुवयांच्या मध्ये थोडंस खाली छोटसं गंध लावत जा . आपण तुझे केस खालून कापू वेण्या घालून रबर लावायचं आणि आणि बोलतांना ' हाय न्हाय ' असं न बोलता ' आहे नाही ' एवढा जरी बदल केलास तर शुद्ध वाटेल ऐकायला चांगलं वाटेल ".
तसं मलाही आपण खूपच खेडवळी वागतो हे जाणवत होतंच पण घेरडीत सगळ्या मुलींच रहाणं बोलणं तसंच होतं पण वातावरणात बदल झाला तसं रहाणीमानात पण काही बदल मुद्दाम केले काही आपोआप झाले . मायडी दोन वर्षे वाडीत राहून सांगोल्यात आली होती तर ती सांगोल्यातल्या मुलींमध्ये आधुनिक वाटायची .
किर्लोस्करवाडी तसं कारखान्यामुळे वसवलेली औद्योगिक वसाहत होती मग तिथे सगळे कंपनीत काम करणारे लोक नोकरीनिमित्त येऊन स्थायिक झालेले होते . आणि त्यानुषंगाने मराठी , इंग्लिश दोन्ही माध्यमांच्या शाळा काॕलेज होते . वाहतूकीसाठी रेल्वेची सोय होती . सांगली-मिरज एकीकडे तर कराड-सातारा एकीकडे असलेले मध्यवर्ती वसवलेलं गाव होतं पण बाकी सगळ्या सोयी होत्या सगळे सुशिक्षित होते त्यामुळे गाव असलं तरी शहर होतं . वाडीत गेलं की एकदम मोठ्या शहरात आल्याचा भास होई कारण नियोजन करुन लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कारखान्यासाठी वसवलेलं ते शहर होतं मग कारखाना , त्यानुषंगाने त्याचे विविध विभाग मग कर्मचारी , अधिकार , एक्झीकीट्युझ यांची क्वार्टर्स , बंगले या सर्वांसाठी क्लब त्याच्याशेजारी मोठ्ठ ग्राउंड दोनतीन प्रकारच्या बागा त्यातली एक बाग सर्वांसाठी खुली असायची सगळीकडे हिरवळ व विवीध आकारात कात्रण केलेली शोभेची झाडं त्या बागेत होती . तसेच लहान मुलांसाठी झोपाळे घसरगुंड्या आणि बरंच काही होतं . तर दुसरी एक मोठ्ठी बाग होती त्यामध्ये अनेक रंगाचे गुलाबाचे ताटवे होते . तिला मात्र तारेचं कंपाउंड होतं . त्याभोवती चक्कर मारली की डोळ्यांची तृप्ती होत असे . पिक्चरमधाला सीन वाटायचा तो ! कारखान्याचं मोठ्ठ कँन्टीन होतं तेही फक्त कारखान्यातील लोकांसाठी असे तिथली एक खास गोष्ट असायची ती म्हणजे स्टाफसाठी आतिशय माफक दरात शेव आणि विवीध प्रकारच्या चिवड्यांच्या अगदी उपासाच्या सुद्धा छोट्या छोट्या पुड्या मिळायच्या आणि भाऊजी त्या घरी घेऊन यायचे कितीही आणल्या आणि खाल्ल्या तरी समाधान होत नसे . घेरडीला जायचं ठरलं की आधी आठ दिवस तायडी त्या पुड्या साठवून ठेवायची सगळ्यांना मनापासून आवडणारं ते खाद्य होतं .
तिथे गणेशोत्सव पण फार मस्त असायचा क्लबमध्ये गणपती बसवलेला असायचा संध्याकाळी सातला आरती असायची तर सहा वाजल्यापासून परिसर माणसांनी फुलून जायचा . घरातून जातांना सगळे मिळून जायचे आणि तिथे गेलं की बायका , पुरुष , मुलं आणि मुली असे ग्रुप व्हायचे . मग मुलं कोणी टेबल टेनिस खेळायची , कोणी पळापळी करायचे तर मोठी माणसं निवांत हिरवळीवर बसून गप्पा मारायचे . दहा मिनीट आधी ठरावीक धून वाजली की सगळे आतमध्ये येऊन उभे रहायचे आणि आरती ते मंत्रपुष्पांजली इतक्या प्रसन्न वातावरणात व्हायचं आर्धा पाऊण तास कसा जायचा समजायचं नाही . आणि या उत्सवात पास मिळायचे आणि पावसाळा संपला की दिवाळीनंतर नाटक , आॕर्केस्ट्रा असे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री साडेआठला असायचे शाल वगैरे पांघरुन स्वेटर घालून आम्ही जायचो हे सगळं वातावरण अनुभवायला फार मजा यायची . घेरडीत हे कधी अनुभवता आलं नाही पण आम्हांला तायडीकडे रहायला गेल्यामुळे इतके छान अनुभव घेता आले .
तसा तायडीचा स्वभाव काटकसरी होता . तिला काही वाया घालवलेलं आवडत नसे . आईसुद्धा नेहमी म्हणायची
" नेटका निगूतीनं संसार कसा करावा हे मात्र तुम्ही पोरींनी बेबीकडूनच शिकाव ".
तीने लग्नापुर्वी शिवणक्लास केलेला होताच पण पुन्हा एकदा नविन-नविन फॕशनचे कपडे शिवता यावेत म्हणून तिने क्लास केला ती मुलींचे कपडे , स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायची . एमबीके भाऊजी म्हणजे स्वभावाने देव माणूस ! ते अत्यंत सरळ , साध्या आणि शांत स्वभावाचे . ते नात्याने भाऊजी असले तरी नेहमीच आम्ही त्यांच्याकडे वडिलकीच्या नात्याने पहात आलो आणि तेही तसेच वागत राहिले . तसे त्यांचे वडिल लहानपणी गेल्यामुळे ते मायेला पारखे झाले होते ती माया त्यांना इकडे मिळू लागली मग ते पण तसंच वागत होते . जावयांच्याकडे मुलगा यादृष्टीने पाहिलं जाऊ शकतं हे आई-काकांंना त्यांच्यामुळेच वाटलं. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत कित्येक वर्षे तायडीचं कुटूंब घेरडीत असायचं . मग काका आंबे व दिवाळीसाठी मुबलक सामान आणून टाकत व आई पण अगदी हौसेनं व मायेनं विविध प्रकार करत असे आम्हांला पण सुट्टीला तायडी येणार याचा आनंद व्हायचा . आम्हा बहिणीपेक्षा आईबरोबरच तिचे मैत्रीचे नाते होतो . आम्ही तिला घाबरायचो पण प्रेमळ धाक असायचा तिचा . मी तर दहावीपर्यंत दूध पोळी खात होते भाज्या खायला तिच्याकडे गेल्यावर शिकले तसा तिचा धाकच होता . तिचं करणं पण आईसारखं सुगरणपणाचं असायचं . अंदाजाला मात्र तिचा हात आजूनही कोणी धरु शकत नाही .
तायडी तशी बऱ्यापैकी सावळी आणि भाऊजी देखणे मुलं सगळी भाऊजींवर गेली . पण भाऊजींना तायडीविषयी खूप प्रेम ! ते मनापासून म्हणायचे
" आमची ही जया प्रदापेक्षा छान दिसते ".
आम्ही यावरुन खूप चिडवायचो . भाऊजी सकाळी सव्वासातला कंपनीत जायला निघायचे तर तायडीला गारठा सहन होत नव्हता खोकला यायचा म्हणून लवकर उठून आंगण झाडणे , स्वतःचे आवरुन सगळ्यांसाठी चहा करण्याच काम भाऊजी करायचे . मुली मंजू व विशेषतः मेधाला माझा खूप लळा लागला होता . त्या मी काॕलेजमधून यायची वाट पहात बसायच्या . आल्यापासून मागे मागे असायच्या . दोघीपणा नाकीडोळी देखण्या मंजू गोरीपान नाजूक तर मेधा सावळी पण गोबऱ्या गालाची दोघींचे पण नारद मुनीसारखे जुट्टे बांधलेले असायचे . तायडीकडे शिकायला गेल्यावरच्या अनेक आठवणी आहेत लहानपणी माझ्या पायाला लागल्यावर परत फारशी सायकल मी चालवली नव्हती मग वाडीत मी भाऊजींची सायकल चालवत असे . भाऊजींना मंगळवारी सुट्टी असायची मग त्यादिवशी मंजूला शाळेत सायकलवर सोडायला गेलं की दोघींनाही खूप आनंद व्हायचा . एकदा माझ्या मैत्रिणीची सायकल घेऊन आम्ही घरी आलो होतो . परत जाताना ती मला म्हणाली आता तू घे सायकल मी मागे बसते . मी सायकल चालवू लागले व ती पाठीमागून पळत येऊन उडी मारुन कॕरेजवर बसली तसं हँडल एकदम जोरात हललं आणि समोर रस्त्यावरून डोक्यावर मोठं गाठोडं आणि हातात काठी घेऊन सुया बीबे विकायला निघालेल्या बाईला पुढचं चाक जोरात लागलं तसं तिचं गाठोडं पडलं . मागच्या मागे माझ्या मैत्रिणीने उडी मारली . ती बाई इतकी चिडली तीने गाठोड उचललं आणि शिव्या देत काठी आपटत पळू लागली मी सायकलवर धूम ठोकली आणि मैत्रिण मात्र तिच्या तावडीत सापडली ! पुढे काय झालं याची कल्पनाच न केलेली बरी .
इकडे घेरडीत सुट्टीदिवशी सांगोल्याहून मायडी यायची . आई-काकांंना मायडीच्या लग्नाचा विषय डोक्यात होताच पण शिक्षण पुर्ण व्हायची ते वाट पहायचे गोंदा मामा आठवड्याला यायचा तो म्हणायचा .
" भाच्यांची लग्न जमवणं हे काम मीच करणार , केव्हा पहायचं फक्त सांगा ".
आता त्याची बदली सोलापूरला होती त्यामुळे सुट्टीत मी व मायडी सोलापूरला जायचो . माझी बारावी सुरु झाली व एमबीके भाऊजींनी मला पैज लावली
" तू जर काॕलेजमध्ये पहिली आलीस तर तू म्हणशील तसा ड्रेस बक्षीस म्हणून मी तुला घेईन "
तो तो मी जोमाने आभ्यासाला लागले . पुन्हा दिवाळीच्या सुट्टीत सगळे घेरडीत जमलो ज्योतीने मेडशींगीला जाऊन अंजूला आणले . सगळे एकत्र जमले की रडारडी व्हायचीच . तशातच 84 साल उजाडला आता आक्कीला जाऊन दोन वर्षे झाली होती . थोडंथोडं वातावरण बदलत होतं आणि फेब्रुवारीमध्ये तायडीला पुन्हा दिवस गेल्याचे समजले आणि घरातलं वातावरण आणखीनच बदललं उन्हाळ्याच्या सुट्टीत ती घेरडीला आली तर तिचे कौतुक करण्यात आईला दुःखाचा विसर पडला . प्रभा काकू , मावशी वाड्यातल्या बाकी बायका तायडीच्या लक्षणाविषयी विचारायच्या उद्देश एवढाच की आता बेबीला तरी होईल का मुलगा ? आजुबाजूचे पण वासावर असायचे
"आईला सगळ्या मुली आहेत बेबीला पण पहिल्या दोन मुली आहेत आता काय होतं कुणास ठाऊक "
पण एकूणच आनंद झाला होता . त्यादरम्यान मला चष्मा लागला आणि तोही घेरडीत चर्चेचा विषय झाला होता . आधीच शरुचे दात पुढे आहेत त्यात चष्मा लागलाय हीचं लग्न ठरवणं म्हणजे भाऊकाकांना अवघडच काम आहे असे तोंडावर म्हणायचे . घरचे काही बोलायचे नाहीत पण बाकीच्यांनाच सगळी उठाठेव असायची त्या काळात एकूणच मुली म्हणजे जबाबरी हेच गणित असे . तसेच प्रत्येकाला एखादा तरी मुलगा असला पाहिजे हीच मानसिकता होती . पुढे जूनमध्ये माझा बारावीचा रिझल्ट लागला आणि 70% मार्क्स मिळवून मी काॕलेजमध्ये फर्स्ट आले आणि अकांउन्टन्सीला मी 96 मार्क्स मिळवून त्या काॕलेजचं रेकाॕर्ड ब्रेक केलं होतं . आनंदी-आनंद झाला होता ही बातमी एमबीके भाऊजींनी घेरडीला तार करुन कळवली होती . याहीवेळी मोहन आण्णाने पेढे वाटून आनंद साजरा केला . आण्णा-वहिनी नेहमीच आम्हा मुलींच्या बाजूने असायचे , अभ्यासाबाबत प्रोत्साहन देणे कौतुक करणे याकडे त्यांच कटाक्षाने लक्ष असायचं . एमबीके भाऊजी तर कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते तर तिथूनच त्यांनी मला पैज लावल्याप्रमाणे भारीतला चुडीदार ड्रेस आणला होता .
इकडे घेरडीत फक्कडकाकांच्या विद्याचं लग्न ठरले व ते ठरविण्यात बराचसा पुढाकार आई-काकांंनी घेतला होता . मग तिच्या लग्नाचं सोनं सांगलीहून घ्यायचं ठरलं ते काम त्यांनी आई-काकांवर सोपवलं होतं . तेव्हा तायडीचे दिवस भरत आले होते व आई तायडीच्या बाळंतपणासाठी किर्लोस्करवाडीला येणार होती . मग जातांना सांगलीत पु . ना . गाडगीळांकडे खरेदी करुन पुढे जायचं ठरलं .
सध्या शेतीचं उत्पन्न भरपूर निघत होतं मग काका पैसे बाळगून असायचे . काका बनियन शिवून घ्यायचे त्याला ते
" गंजीफ्राक " असं म्हणायचे व त्याला सुरक्षित असा खास खिसा शिवलेला असायचा कुठेही गावाला चाललं की नोटांची त्या आतल्या खिशात पुडकी ठेवत असत किंवा आई बरोबर असेल तर आईच्या साडीच्या घोळात ( ओच्यात ) पैसे दागिने ठेवायची . याहीवेळी काका बरोबर जास्तीचे पैसे घेऊन गेले होते आता आपल्या मुली पण लग्नाला आल्या आहेत , आपणही सोनं घेऊ म्हणत सोनं खरेदी झाली व काकांनी अचानकच दुकानात आईसाठी श्रीमंतहार घेतला होता . सगळ गबाळ आईने घोळात ठेवलं आणि रात्रीच्या रेल्वेने ते किर्लोस्करवाडीला आले . तो हार पाहून आई तर खूष झाली होतीच पण पहाणारा पण कौतुकाने तोंडात बोट घालायचा . आता दोन मुलींची लग्न झालीत तरी काका किती हौस करतात असे वाटायचं सगाळ्यांना . आईपण मग कधी मागे हटत नसे त्यांच्या बरोबरीने बाहेर जायला निघायची , निटनेटकं रहायची .
इकडे तायडीच्या सासुबाई शांताक्का तायडीचे दिवस भरत आले म्हणून त्या पण वाडीत आल्या होत्या आणि त्याच दिवशी सकाळी तायडीला दवाखान्यात नेले होते . दुपारी भाऊजी घरी आले व तायडीला मुलगा झाला व दोघांचीही तब्बेत चांगली असल्याचे त्यांनी सांगितले . माझा आनंद गगनात मावेना काय करावे मला समजेना . मी भाऊजींची घरी येण्याची वाटच पहात होते . ते आले की मी दुपारीच दवाखान्यात आले आणि गोरपान बाळसेदार पाहून आई-काका केव्हा येतात आणि केव्हा त्यांना ही बातमी सांगते असं मला झालं होत . आई सांगलीत होती माहित होतं पण तिला कसं कळवणार ? हा प्रश्न होता रात्री साडेआठला रेल्वेचा आवाज आला तसं मी आंगणात फेऱ्या मारायला सुरुवात केली दहा मिनीटांत रिक्षा आली तर मी पळत रिक्षाजवळ गेले व लगेच आई-काकांंना सांगितले
" आज दुपारीच तायडीला मुलगा झाला व तायडी दवाखान्यात आहे बाळ मस्त आहे ".
" आगोबाई , पोरगं धन घेऊन आलंय त्याचं नाव आपण धनंजय ठेऊ , आणि धनंजय हे अर्जुनाच नाव आहे . आता आपण हीच रिक्षा दवाखान्यात नेऊ "
काकांना पण खूप आनंद झाला होता आणि आईला इतकं आनंदी पाहून ते पण खूष झाले आणि आईला म्हणाले
"आपण आधी घरात सामान ठेऊ मग दवाखान्यात कधी जायचं ते ठरवू ".
मग जेवणं , गप्पा झाल्या व सकाळी लवकर उठायचं ठरलं . आई मोठ्या उत्साहात पहाटेच उठून तायडीचं पथ्य करुन दवाखान्यात जायला तयार झाली . आई-काका आवरुन बाहेर आले नवरात्राचे दिवस होते त्यामुळे आंगणात सगळ्या फुलझाडांना बहर आला होता शुभ्र शेला पांघरल्यासारखा चमेलीचा वेल सुवासीक फुलांनी बहरला होता . देखण्या रुपात आबोली उभी होती तर फिकट गुलाबी रंगाच्या देशी गुलाबावर जणू गुच्छच आहेत अशी गुलाबाची भरगच्च फुलं लागलेली दिसली त्यातलंच एक टपोर फूल काकांनी खुडून आईसमोर धरलं . तायडीचे शेजारी , भाऊजी समोरच होते त्या म्हणाल्या
" बघा , काका या वयातसुद्धा किती हौशी आहेत . याही वयात बायकोसमोर फूल धरतात "
आता मात्र आई तिच्या नेहमीच्या स्टाईलने डावा गाल वर उचलत उजवा हात उंचावत थोडीशी लाजतच हसली व
असे पुटपुटली . सगळेच हसू लागले आणि तो क्षण पाहून , आई-काकांंच्या समाधानी चेहऱ्याकडे पाहून वाटलं आत्ता गाडी रुळावर आली . मग मी पण आईबरोबर दवाखान्यात गेले आईने बाळाला पाहिलं तिचा चेहरा आनंदाने , समाधानाने उजळून निघाला होता . ते पाहून तायडी , मी काका खूष झालो . आमच्या घरातला तो पहिला मुलगा ! पुढे दोनतीन दिवसांनी तायडीला घरी आणलं मग आईचं एकएक पथ्य करुन तायडीला खाऊ घालणं बाळाचं कोडकौतुक करणं सुरु झालं . आई त्यात पुरती बुडून गेली होती . एकूणच वातावरण बदललं होतं आनंदीआनंद झाला होता . त्यावर्षी सगळ्यांची दिवाळी वाडीलाच झाली , थाटामाटात बाळाचं बारसं झालं आणि आईच्या इच्छेनुसार
नावावर शिक्कामोर्तब झालं व आई घेरडीला आली . तर यावेळची घेरडीसाठी खरेदी झाली ती गोदरेज कपाटाची ! तेही एकदम सहा ! कारण घेरडीत हल्ली आमच्या घरात ज्या वास्तू यायच्या तो चर्चेचा विषय असायचा . पुन्हा पुन्हा मग सगळे जण पण खरेदी करायचे . त्यामुळे कपाट घेणार ही चर्चा घेरडीत आधीच झाली होती मग आमच्याबरोबर मोहन आण्णा , रमेश आण्णा व आंता काका आणखी दोघांनी खरेदी केली सगळी कपाटं ट्रकमध्ये घालून आई-काका ट्रकने घेरडीत आले आणि आता घेरडीच्या सोप्यात कपाट पण आले त्याचा पण कोण आनंद आम्हांला झालेला ! आई घेरडीला आल्यावर वाड्यातले सगळे घरी आले . पहिला नातू झाला मग त्यासाठी सगळे कौतुक करु लागले . आईचा श्रीमंतहार पाहून सगळे थक्क झाले . मावशी प्रभा काकू काकांच्या हौशीपणाचं तोंडभर कोतुक करु लागल्या . आई पण दोन अडीच वर्षांनी उत्साही वाटू लागली मग मावशी , काकू , सगळ्या वहिनी गावातले सगळ्यांनाच जरा बरं वाटलं . सगळीकडे मोठ्या उत्साहात पुढाकार घेणारी आदर्श व अधुनीक जोडी म्हणून आई-काकांकडे पाहिलं जायचं पण आक्कीच्या जाण्यांने वातावरण जागच्या जागी गोठलं होतं दुःख तर होतंच पण तो ताण काहीसा म्हणण्यापेक्षा बराचसा निवळला होता . आता आई-काकांंना मायडीच्या लग्नाचे वेध लागले होते .
प्रकरण 19 वे
मायडीचं लग्न ठरलं
13 डिसेंबर 2020
आता मायडीची शेवटची टर्म राहिली होती . काकांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केले पण परिक्षा झाल्याशिवाय लग्नाचं पहायचं नाही असं तिचं म्हणणं असायचं . कुठे कार्यक्रमाला जायचं म्हणलं की ती फुगून बसायची . तिला समजावता समजावता आईची पुरेवाट व्हायची . आई-काकांना वाटायचं बघत बघत दिवस जातात जमवून ठेवलेलं बरं . आधीच शिक्षण पुर्ण होईपर्यंत वीस वय होतंय . वीस म्हणजे तेव्हा जास्त वाटायचं . आईने तिच्यासाठी छान साड्या पण आणलेल्या पण ती त्याच्याकडे डुंकूनही पहायची नाही . ती दिसायला देखणी दिसायची . आई-काका तर मुलीचं वर्णन
" नाकीडोळी निटस , लांबसडक केस , गहूवर्णी , नाजूक , स्मार्ट , सडपातळ "
असं अभिमानाने करायचे आणि ती होती पण तशीच . तिच्यापेक्षा मी मोठी वाटायचे . बघत बघत तिचं ग्रॕज्युएशन झालं व आम्ही दोघी गोंदा मामाकडे सुट्टीला गेलो . आता मामाची मुलं पण मोठी झाली होती त्यामुळे गोंधळ घालायला आमचा मस्त ग्रुप तयार झाला होता . मामा पण पहिल्यांदाच कुटुंब घेऊन सोलापूरात राहिला होता मग आम्ही गेलो की सिनेमा , नाटक , हाॕटेलींग , फिरायला जाणं अगदी हौसेनी करायचा . मामा-मामी , महेन्द्र-रविन्द्र-कांचन ही त्याची मुलं मग सुट्टीत आम्ही त्यांच्याकडे व ते आमच्याकडे असा खोखोचा खेळ चालायचा . आंब्याचा रस , भजी , पोळ्या , आईस्क्रीम आणि बरंच काही अशा मेजवान्या चालायच्या . याच सुट्टीत प्रभाकर पणशीकरांच
" तो मी नव्हेच "
हे नाटक पहाण्याचा योग आला . तसं खेड्यात रहाणं असल्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी आप्रुप असायच्या . पण किर्लोस्करवाडीत राहिल्यापासून थोडंस पिक्चर , नाटक पहायला मिळायचं . गोंदा मामा पण आमचे लाड करायचा पण यावेळच्या सुट्टीत मामाचं मुख्य काम होतं
" राणीसाठी वरसंशोधन "
त्यांने पत्रिका देणे , फोटो देणे , चौकशा करणे असा सपाटाच लावाला . त्याच सुट्टीत त्याच्या आॕफिसमधील मित्राने एक स्थळ सुचवले आणि त्याला ते एकदम पटले . त्यांन लगेच काकांना पत्र पाठवून माहिती कळवली .
मुलगा मुळ कुर्डवाडीचा असून ठाण्यात ग्लॕक्सो या औषधाच्या नामांकीत कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे , भक्कम पगार आहे . मुलाचं शिक्षण बीएससी डीस्टींक्शन असून रहायला बदलापूरला मोठ्या भावाजवळ आहे , उंच , सडपातळ असून पत्रिका पण चांगली जमली आहे आई वडील कुर्डवाडीत आहेत पुढील हलचाली कराव्यात .
मामाला अजिबात चैन नव्हती धडपड करुन त्यांने मेळ घातला . जुळवाजुळवीचा अटापीटा केला आणि आठदहा दिवसांत कुर्डवाडीत पहाण्याचा कार्यक्रम ठरला आई-काका , मामा , मायडी इकडून कुर्डवाडीला गेले तर मुलगा त्याचे तीन भाऊ , भावजया , आई-वडील ,मोठी बहिण या सगळ्यांच्या उपस्थितीत पहाण्याचा कार्यक्रम झाला आठवडाभरात एकमेकांची पसंती समजली व पुन्हा एकदा लग्न जमवण्याच्या तयारीनेच सोलापूरला भेटायचं ठरलं . तेव्हा आई-काका मायडीला घेऊन मामाकडे गेले . गोंदा मामाचा आनंद गगनात मावेना
" ताईच्या मुलींची लग्न मी जमवतो "
असे तो म्हणायचा . मग सोलापूरला मामाकडे मुलासहित त्यांच्याकडील सगळे लोक पण आले त्याच दिवशी मायडीचा फायनलचा रिझल्ट होता तर रिझल्टदिवशी म्हणजे ज्या दिवाशी ती ग्रॕज्युएट झाली त्याच दिवाशी मायडीचं लग्न ठरलं ! आता लग्नाचा सिझन संपत आला म्हणत दिवाळीनंतरचा मुहूर्त काढायचं ठरलं . लग्न मिरजेत करुन देणार हे काकांनी सांगितलं . तोवर मग साखरपुडा , कपडा खरेदीसाठी मधूनमधून भेटायचं ठरलं . रिझल्ट लागला , लग्न ठरलं म्हणत नवरानवरी रिक्षाने देवाला पण जाऊन आले ! आई-काका मायडीसह घेरडीला परत आले की आनंदाची बातमी सगळ्यांना सांगण्यासाठी सोप्यात सतरंजी अंथरुन वाड्यात सगळ्यांना चहाला आमंत्रण गेलं सुद्धा !!!!
सध्या घरात सर्व बाजूंनी वातावरण प्रफुल्लीत होत होतं , एकएक करत सगळं मार्गी लागत होतं . पाठीवर टाकत चालणं हे आई-काकांच तत्व याठिकाणी लागू पडलं .
" show must go on "
या उक्तीप्रमाणे वाटचाल सुरु झाली होती . त्यामुळे मुळातच नाविण्याचा शोध घेण्याची वृत्ती असणारे काका सतत धडपड करायचे फिनीक्स पक्षाप्रमाणे नव्याने भरारी घेण्याची आस बाळगून होते . हळूहळू आई पण स्थिरावली होती मग पुन्हा हुंबाडीन तिने उभारी धरली खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची वृत्ती बळावू लागली . भळभळती जखम हृदयाशी कवटाळत वातावरण निवळतं ठेवण्याचा दोघेही प्रयत्न कृरु लागले .
त्यादरम्यान माणसांच्या वहतूकीसाठी जीपचा वापर व्हायला सुरुवात झाली होती आणि व्यवसाय यादृष्टीने त्याकडे पाहिलं जायचं . मग काकांनी पण एक जीप घेतली , गाडीवर ड्रायव्हर ठेवला आणि भाड्याने घेरडी-सांगोला-घेरडी अशा गाडीच्या ट्रीप्स होऊ लागल्या . आता मायडीचं शिक्षण संपलं होतं दिवाळीनंतर लग्न होईल मग सांगोल्यातलं काॕलेज पण चांगलं आहे तीच्या मागोमाग माझं पण लग्नाचं पहाता येईल म्हणत मला एस वायचं अॕडमीशन सांगोला काॕलेजमध्ये घेतलं . तेव्हा सांगोल्याच्या आत्त्यांच्या डोळ्याचं आॕपरेशन झालं होतं आणि मायडीचं लग्नपण आहे तर आत्त्याकडे रहाण्यापेक्षा सध्या रोज जाऊन येऊन करावं असं ठरलं आणि मी घेरडीत रहायला आले . हल्ली बऱ्यापैकी मुलं घेरडी-सांगोला बसने जाऊन-येऊन करत होती . त्यात फक्कड काकांचा मुलगा सुधीर पण होता बाकी सगळी मुलं होती व ती आर्ट्सला होती आणि मुलींमध्ये मी एकटीच होते व काॕमर्सला होते . काॕलेज साडेसातला होतं व आम्ही सांगोल्यात नाक्यावर साधरण सव्वाआठला पोहोचायचो मग माझा पहिला तास बुडायचा तो स्टॕटचा असायचा . तर तेव्हा आम्ही सगळे मिळून काॕलेजच्या वेळेत बस सुरु करावी म्हणून आमदार गणपतराव देशमुखांना निवेदन घेऊन भेटायला गेलो होतो त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली तर लगेचच त्यांनी घेरडीतून साडेसहाला बसची व्यवस्था केली . गाडी सांगोल्यात नाक्यावर सव्वासातला पोहोचायची व तिथून दीड किलोमीटर काॕलेजला चालत कसलं आम्ही पळतच सुटायचो . तर तेव्हा आमची घरची जीप बसच्या पुढे असायची व स्टँडवर पॕसेंजरना सोडून परत आम्हांला गाठायची हे काकांनीच ड्रायव्हरला सांगितलेले असायचे . मग आम्ही काॕलेजला जाणारे सगळे जीपमध्ये बसायचो व ड्रायव्हर आम्हांला काॕलेजला सोडून यायचा . साडेसातच्या आधी काॕलेजच्या गेटवर गच्च गर्दी असायची आणि स्वतःच्या जीपमध्ये मी समोर बसलेली असायची मग दिमाखात उतरायला फार भारी वाटायचं .
तसं घेरडीतून बाहेर पडल्यापासून मायडीमध्ये , माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता . रहाणीमान ,कपडे , वागणं , बोलणं पुर्णपणे बदललं होतं . वागण्यात अधुनिकता डोकावत होती तर बोलणं शुद्ध झालं होतं . मी तर वाडीमध्ये मला जितके पंजाबी ड्रेस होते तितक्या मॕचिंग बांगड्या व हेअरपीनचे सेट घेतले होते . तायडी मजेनं म्हणायची
" आधी तुला नीट रहायला सांगावं लागायचं आता थांब म्हणून सांगायची पाळी आली . "
फक्त रहाणीमानच नाही तर स्वयंपाकात सुद्धा तिच्याकडून बरंच काही शिकून घेतलं होतं इडली-सांबार , आंबोळी , डोसा हे खास करुन त्यावेळी त्या भागात असायचे ते सगळे पदार्थ पण शिकून घेतले होते आईकडून सुगरणपणाचे धडे गिरवले होतेच त्यात तायडीकडून भरच पडली . तसं तायडीकडे भाडेकरु जे होते ते पण अगदी घरच्यासारखे होते . खेळीमेळीचं वातावरण असायचं . एस वाय , सी व्ही , गिड्डे , जोशी , फल्ले , धोपाटे इतक्या जणांशी अगदी घरगुती संबध असायचे . खूपदा रात्री आंगणात एकत्र जेवायला बसण्याइतपत जवळीक होती . एकूणच या वातावरणात राहून आल्यामुळे आमच्या वागण्यात बदल झाला होता .
आता मायडीचा साखरपुडा श्रावणात घेरडीत करायचा ठरला . मुलाचं नाव शरद काशिनाथ चिंचवडकर असल्यामुळे मोठे भाऊजी एमबीके भाऊजी तर त्यांच नाव मी एसके भाऊजी असं पाडलं . दर आठवड्याला एसके भाऊजींच मायडीला पत्र यायचं दुपारच्या बसने मी घरी यायला आणि पोस्टमन यायला वाड्याबाहेरच गाठ पडायची मग त्याच्याकडून मी पत्र घ्यायची व ते मायडीला दाखवून बराच वेळ हुलकावणी देत असे मला मजा यायची . त्यांच्या बऱ्याच गमतीजमती मला माहित असायच्या . तेव्हा
" सागर "
हा नविन पिक्चर होता तो त्यांनी दोघांनीही आपापल्या ठिकाणी पाहिला होता तर मी त्यावरुन तिला चिडवत असे . साखरपुड्याला घेरडीत येताना सांगोल्यातून त्यांच्या वहानापुढे आमची जीप असणार असे ठरले होते तर मी सारखं मायडीला चिडवायचे
" आपला ड्रायव्हर तुझ्या नवऱ्याला जीपच्या टपावर बसवून आणणार " .
मजा यायाची . साखरपुड्याला आल्या आल्या इतक्या माणसात भाऊजी मायडीकडे पहात भुवया उंचावत खूणेने बोलून हसले होते व साखरपुडा झाल्यानंतर समोरच्या घरात दोघेच गप्पा मारत बसले होते . आख्ख्या वाड्यात तो चर्चेचा विषय झाला होता
" मुलगा मुंबईला रहातो , फारच सुधारीत आहे बाई राणीचा नवरा ! हौशी आहेत सगळी माणसं ".
असे चर्चेला उधाण आलं होतं .
तुम्ही काय बोलला हे मला सांगितलेस तरच मी पुढच पत्र तुला देईन म्हणत तिला मी त्रास द्यायचे . मग लग्नानंतर हनिमूनला कुठे जायचं म्हणून चर्चा करण्यासाठी आम्ही बोलत बसलो होते . आम्ही म्हैसूर बंगलोर उटीला जाणार आहोत हे तीने मला सांगितले मग तेवढंच मला तिला चिडवायला पुरेसं झालं होतं . तिचा साखरपुडा मोठा दणक्यात झाला होता . दोन्हीकडून भरपूर माणसं जमली होती कांजिवरम साडी , कलर फोटो , पंढरपूरहून हार-तुरे , गजरे असा थाट होता एकूणच वातावरण छान होतं . बरेच दिवस पुढे साखरपुड्याची चर्चा व्हायची .
तसं लहानपणापासून आमची दोघींची सतत भांडणं असायची आता थोडंस कळती झालेली ज्योती पण घरात असायची मग तिला मध्ये घेऊन आम्ही भांडायचो . ज्योती मात्र संधीसाधूपणा करत तिला हवं त्याची बाजू घ्यायची . संजू तर लहानच होती व काकांचा तिच्यावर अतीच जीव होता त्यामुळे सगळेजण तिला सांभाळून घेत असत . आमचे चालू फॕशनचे कपडे वापरणे असो किंवा तायडी , गोंदा मामा शहरात असायचे मग आमचा वावर पण शहरात वाढल्यामुळे रहाणीमान बऱ्यापैकी उंचावलेलं होतं तर आई-काकांंची दोघांचीही यासाठी मनापासून परवानगी असायची . मुलींनी शिकावं , आधुनिक रहावं यासाठी त्यांच्याकडून नेहमीच पाठींबा असायचा . तोही घेरडीत चर्चेचा विषय होत असे . मोहन आण्णाचं कुटुंब मात्र आमच्यात सामील असायचं . माझ्या पाठोपाठ आण्णाची मुलगी जिला आम्ही चिमू म्हणतो त्या विनयाला सांगोल्यात घर करुन शिकायला ठेवलं होतं . गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जवळजवळ प्रत्येक घरातल्या मुलाला शिकायला बाहेर ठेवलं जायचं पण मुलींना बाहेर शिकायला ठेवण्याची सुरुवात आई-काकांनी केली होती , त्याकाळात आमच्याकडे तोही एक चर्चेचा विषय होता .
एकूणच राणीला छान स्थळ मिळालंय अशी चर्चा घेरडीत होत होती . पण एक गोष्ट आई-काकांंच्या लक्षात आली होती ती म्हणजे मुली जर शिकल्या तर त्यांच भवितव्य नक्कीच प्रकाशमय होऊ शकतं . मग त्यांनी कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली . आपलं जे आहे ते सर्व मुलींचच आहे वेळेप्रमाणे निर्णय घ्यायचे व करत रहायचं . त्यांनी भविष्याबाबत धोरणात्मक नियोजन करायला सुरुवात केली .
मग मायडीच्या लग्नात काकांनी पण कशातच कमतरता ठेवली नाही भारी भारी साड्या , दागिने खरेदी सोलापूर-सांगली अशा ठिकाणी केली . मायडीच्या लग्नाची तारीख काढली 13/12/1985 आणि
" काशिकर मंगल कार्यालय मिरज " याठिकाणी लग्न करुन देण्याचं पक्क झालं . त्यानुषंगाने पत्र पाठवणे पत्रिका छपाई आमंत्रणं ही कामं सुरु झाली . मायडीच्या मैत्रिणींचा ग्रुप सांगोल्यात होता तर त्या सगळ्याजणी बोलावता येईल तसंच साड्या फाॕल पीको , ब्लाऊज शिवणे व इतर खरेदी करता येईल म्हणून आम्ही दोघी दोनतीन दिवस सांगोल्यात आत्त्याकडे रहायला गेलो . मी काॕलेजला व ती मैत्रिणींकडे असं सुरु झालं .दोन दिवस फीरफीर फिरलो मैत्रिणींकडे गप्पागोष्टी चेष्टामस्करी खूप झाली सगळ्यांना आमंत्रणं दिली आणि घेरडीला परत जायचं ठरलं . तेव्हाची घटना मला अजूनही आठवते आम्ही साड्या पीको फाॕल करायला दिलेल्या आणायला गेलो तर फाॕलवाल्याने मायडीची हळदीची म्हणून घेतलेली साडी मध्ये फाटलेली आहे म्हणत उकलून दाखवली व ते पाहून मायडीला चक्कर आली ती जवळजवळ कोसळलीच . मी घाबरुन गार झाले आसपास लोक जमले पाणी तोंडावर मार , कांदा नाकाला लाव असे प्रकार सुरु झाले ती शुद्धीवर आली तसं रडतच मी तिला समजावू लागले
" तू माझी साडी घे किंवा आपण साडी बदलून आणू , नविन आणू पण आता घेरडीला जाईपर्यंत तू थोडंस शांत रहा ".
घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता . मग घरी आल्यावर मी आई-काकांंना घडला प्रकार सांगितल्यावर त्यांनी पण तिला समजावून सांगितले
" आपण बदलून आणू साडी तू काळजी करु नको "
व आई म्हणाली
" दिवसभर फिरली असशील चहा जास्त झाला म्हणून तसं झालं असेल कदाचित ".
तिला समजावलं खरं पण आईला अजिबात चैन नव्हती ती मला घेऊन अरविंद काकींकडे गेली व काय काय झालं ते काकींना सांग म्हणाली मी जे घडलं ते सांगितलं सगळं ऐकून घेतल्यावर त्या आईला म्हणाल्या
" पपा काकी तुम्ही उगाच घाबरताय , राणीची तब्ब्येत नाजूक आहे काल जरा ताण आला असेल . तुम्ही असं करा जरा तिला खुराक द्या खारीक बदाम घालून दुध द्या म्हणजे ताकद येईल ".
आईने घरी येऊन काकांना सगळं सांगितले की लगेच काकांनी बाहेर जाऊन सुका मेवा आणून दिला व स्वतः आडकित्त्याने बारीक करुन डब्यात भरुन ठेवला . असं आई-काका न बोलता मुलींची काळजी घ्यायचे . आई रोज ते दुधात घालून उकळून द्यायची . आईने तर मला तंबीच दिली होती .
" भांडण अजिबात करायचं नाही काम तू जास्त केलंस तर बिघडत नाही आता ती लग्न होऊन लांब चाललीय तिला त्रास होईल असं काही वागू नका ".
इतरवेळी आम्ही भांडलो की आई नेहमी सहजच बोलून जायची
" जावा खड्ड्यात "
पण आक्की गेल्यामुळे आई थोडीशी हळवी झाली होती ती म्हणायची
" या तोंडानं आता नाही म्हणणार खड्ड्यात जावा म्हणून एक गेली तेच नीस्तारणं होईना ".
असे जरासे कुठले तरी संबंध कुठेतरी लावले जायचे वरवर जरी सगळं अलबेल दिसत असलं तरी खोलवर रुतलेली जखम होती ती ! घरात कोणाचीही तब्ब्येत बिघडली की तिचा जीव कासावीस होत असे . तसं तर सुगरणपणा व आजीबाईचा बटवा या दोन्हीमध्ये आई माहीर होती . कुणाकडेही काही कार्यक्रम असला किंवा नविन पदार्थ करायचा असला की त्याठिकाणी आई गेल्याशिवाय पान हलत नसे . तसंच कोणाची तब्ब्येत बरी नसली की बायका घरी येऊन सल्ला विचारायच्या तर घरात असलेल्या जिन्नसमधून काहीतरी करुन द्यायला सांगायची . परत ते घरी येऊन बरं वाटलं म्हणून सांगायचे .
मायडीच्या लग्नाच्या तयारीनं आता जोर धरला होता त्याचदरम्यान काकांच आधिवेशनासाठी नगरला जायचं ठरलं . नगरला साड्या , पैठण्या छान मिळतात अशी चर्चा काकांच्या ग्रुपमध्ये झाली त्याप्रमाणे सगळे पहायला म्हणून दुकानात गेले तर काकांनी तिथून आईसाठी गडद जांभळ्या रंगाचे जरीचे काठपदर असलेली मोती कलरची नऊवारी पीवर पैठणी घेतली ! त्यांचे सहकारी सगळे आश्चर्याचकीत झाले का तर तेव्हा काकांचा पगारा सहाशे रुपये होता आणि पैठणीची किंमत साडेसातशे होती . नेहमीप्रमाणे नोटांच पुडकं त्यांच्या गंजीफ्राकच्या खिशात होतच ! मग किंमत काय याचा त्यांनी विचारच केला नाही . आवडली आणली बास !! काकांनी दबकतच आईला ती पैठणी दाखवली आईंने कपाळाला हात लावला आणि म्हणाली
" आहो लग्न राणीचं आहे . आपण नवरीचे आईबाप आहोत आणि तुम्ही श्रीमंतहार , पैठणी ही माझ्यासाठी खरेदी केलीय काय लावलंय "
काका म्हणाले
" काय बिघडलं आपण अजून तरुण आहोत हौसेला मोल नसतं . आपल्या लग्नात परिस्थितीमुळे असेल किंवा काहीही असेल तुला शालू घेतला नव्हता माझ्या मामींचे दागिने घालून मांडवशोभा केली . तुला सत्य सांगितल्यावर समंजसपणे काढून दिलंस . आता माझ्यात ऐपत आली केलं ".
एवढं ऐकून आईपण समाधानाने लाजतच हसली त्यावेळी मात्र
" ओ मेरी जोहरा जबी
तुझे मालूम नही
तू अभी तक है हँसी
और मै जवान "
हे गाणं कुठेतरी लागलंय असा भास झाला . मग आई पण नव्या जोमानं कामाला लागली . आता लग्न आगदी तोंडावर आलं होतं . लग्नघर म्हणलं की कामं काही थोडी आसतात का ?
प्रकरण 20 वे
थाटामाटात झालं मायडीचं लग्न
23 डिसेंबर 2020
लग्नाची धामधूम सुरु होती वातावरण एकदम आनंदी होतं . पैपाहुण्यांना पत्रपत्रिका व आग्रहाची आमंत्रणं गेली होती . त्याप्रमाणे देवब्राम्हणाच्या आधीच नागर आत्या , सांगोलच्या आत्या , गोंदा मामा मामी हे सगळे येणार हे ठरलेले होते . मोतीचूर बुंदी लाडू किर्लोस्करवाडीत छान तयार करतात म्हणून लाडू व चिवडा तिकडूनच करुन आणला होता . नेहमीप्रमाणे ज्योतीला पाठवून आक्कीच्या मुलींना आणलं होतं अंजू व गायु आईविना पोरक्या मुली वाटायच्या त्या मेडशींगीत रहात होत्या त्यामुळे त्यांना खेडवळी वळण लागत गेलं . काकूच्या हाताखाली लहान वयातच त्यांना अभ्यासापेक्षा बऱ्यापैकी घरकामाचीच सवय लागली हे जाणवत होतं पण आई काही त्यांची जबाबदारी घेऊ शकत नव्हती तिला मुलींना डोळ्यांसमोर पाहिलं की त्रास व्हायचा . पण तिच्या आवाक्यात काहीच नव्हतं तिचा स्वतःचा वाढलेला संसार सावरायलाच तशी तिची दमछाक व्हायची . त्यातच तिला सुरु झालेली डायबेटीसची व्याधी त्यामुळे काका पण शांत बसायचे . दोन्ही सुट्यात मुलींना आणायचं खाऊपीऊ घालायचं . दप्तर , कपडे घेऊन द्यायचं व हवंनको ते पाहून आठपंधरा दिवसांनी सोडून यायचं ही पद्धत पडली . आनंदाच्या प्रसंगी आक्कीची प्रकर्षाने आठवण होत असे . आई-काकांंच्या सुखी संसाराला लागलेली ती दुःखाची झालर होती . प्रसंगानुरुप मग दुःखाचे कढ यायचे . आईइतकच दुःख काकांना पण होतं पण एकूणच भविष्यात असलेल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पहाता दुखरी नस लपवत काकांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक सावरलं होतं आणि ते करत असतांना आईचा हात त्यांनी जणू घट्ट पकडला होता . आई तशी भौतिक सुखाला फारसं महत्त्व देणाऱ्यातली नव्हती पण एकूणच काकांची तगमग पहाता तिनेही पवित्रा बदलला होता काका काय करतील त्याला ती उत्साहाने साथ द्यायची . असे एकमेकांच्या मनातलं ओळखणारं , एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारं आणि एकमेकांसाठी जगणारं विलक्षण जोडपं होतं ते . काकांनी नोकरीबरोबरंच शेतीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतंच त्यामुळे चांगलाच पैसा मिळत होता पण हे करत असतांना त्यांची जिवन जगण्याची , हिशेब करण्याची एकूणच पद्धत भन्नाट होती . आता आपल्या मुली आपल्यासाठी सर्वस्व आहेत ही खूणगाठ त्यांनी बांधली होती . आर्थिक सुबत्ता आहे , निर्णयक्षमता आहे तर वेळेप्रमाणे आपण विचारविनिमय केला पाहिजे हे काकांनी ओळखलं होतं व जाणिवपुर्वक या सगळ्या चर्चा ते आईबरोबर करायचे व निर्णय घ्यायचे . त्यात्यावेळी जे सर्वात बेस्ट आहे तेते त्यांनी केलं होतं . खूप थाटामाटात दारातच पहिलं लग्न आक्कीचं झालं होतं . त्यावेळी दमछाक झाली पण तरुणपणाच्या जोरावर ती वेळ निभून गेली होती . त्यामुळे त्यांनी पवित्रा बदलत तायडीचं लग्न थोडासा पैसा खर्च करत अधुनिक पद्धतीने मिरजेला करुन दिले . मला व मायडीला शिक्षणासाठी बाहेर ठेवलं व काळाप्रमाणे बदलत धोरणांने वागण्याची दिशा ठरवत वळण बांधायची खाशीयत होती त्यांची . विशेष म्हणजे स्नेही व आप्तेष्ट काकांच अनुकरण करत असत . आता आठनऊ वर्षांचा कालावधी लोटला होता त्यांच्या वयाप्रमाणे विचारातही थोडा पोक्तेपणा आला होता . चार गावं फिरले होते , बरंचस पाणी पुलाखालून गेलं होतं . हातात चांगालाच पैसा खेळत होता त्यानुषंगाने आधुनिकतेची झळाळी आली होती . त्याचा परिणाम सगळीकडे दिसत होता . घरात चकचकीतपणा आला होता , ऐश्वर्य डोकावत होतं . मायडीचं लग्न जमल्यापासून तसा वेळपण भरपूर मिळाला होता त्यामुळे लग्नाचं नियोजन खूप व्यवस्थित झाले होते . सगळ्यांसाठी कपडे-दागिने खरेदी अगदी झकपक झाली होती . लग्न आठ दिवसावर आलं तसं तिथल्या प्रथेप्रमाणे एक दिवस सकाळीसकाळी कोळ्याच्या पांडाला माडीवर पाठवून एक चुन्याच्या पाण्याचा व एक कावमिश्रीत पाण्याचा तांब्या थोड्या थोड्या अंतराने कुंभ्यावरुन तो ओघळ भिंतीवर येईल अशा पद्धतीने संपूर्ण वाड्याभोवती ओतून घेतला . लगेचच आंगणात पंत काका , फक्कड काका , मोहन आण्णा येऊन उभे राहिले . लग्नघराची ती खूण असे . देवब्राम्हणादिवशी सकाळीच समोरच्या दारावर गणपतीच्या फोटोचे कागद डकवून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधून वाड्यात ठिकठिकाणी आंब्याचे फाटे अडकवले सगळीकडे हळद कुंकू लावून उखळ , मुसळ , डेरा , जातं आणि मुहूर्तमेढही सगळे सोपस्कार करुन सजून बसले . खालच्या सोप्यात सतरंजी टाकून बांगड्यांचे पूठ्ठे आसलेली पिशवी घेऊन पॕरन येऊन बसली . तायडीची तीन लहान मुलं असल्यामुळे तिला मायडीच्या लग्नात जबाबदारीची कामं देता येत नव्हती . ज्योती लहान होती त्यामुळे बरीचशी महत्त्वाची पँकिंग आणि ती वेळेत काढून देण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी केंद्रस्थानी होते , बरचसं काम माझ्यावर अवलंबून होतं . गोंदा मामा मामी , मोहन आण्णा , उषा वहिनी ही मंडळी होतीच . चार दिवस आधीच पाहुणे मंडळीनी घर गच्च भरलेले होते . लहान मुलांचा किलबिलाट , बायकांचे चेष्टामस्करी करत हसण्याचे आवाज यांनी घर भरुन गेलेल ! आईला वाटायचं इतकं सगळं करायचं आणि देवघरात कुलदैवताच्या मुर्ती नाहीत . मुलगा नाही कशाला वाढवायचं याउद्देशाने ते टाळलं होतं . पण तिने काकांना बोलून दाखविले
" आपण काहीच करायचं सोडतो नाही सगळं तर हौसेनी करतो मग देव का करु नयेत आपलं आयुष्य असंच घालवायचं का ? "
काकांनी तिची इच्छा उचलून धरली होती व देवब्राम्हणादिवशी घरात कुलदैवताची स्थापना करायची ठरलं होतं . त्यामुळे आईला वेगळच बळ आलं होतं खूप हिरिरीने तिने सगळी तयारी केली होती . दबक्या आवाजात चर्चा व्हायची
" कोण चालवणार पुढे कशाला वाढवायचं " ?
पण आईला हे गृहित होतेच तीने तशी मनाची तयारी करुन ठेवली होती ती ठसक्यात म्हणायची
" आम्ही हौस मौज , खाणपीणं , काहीच सोडत नाहीत . जो हे सगळं भरभरुन देतो तो या घरात असलाच पाहिजे . आमचे देव आमच्यापुरते , आम्ही कोणावर ते लादणार नाही ."
मग जातीपूजन व लग्नाचे बाकी सोपस्कार आनंदाने पार पडले . रुखवत , बांगड्या , मेहंदी , उखाणे या सगळ्या कार्यक्रमामुळे आनंदाला उधाण आलं होतं वाड्यातील सर्व मंडळी , आत्या , मामी सगळे उत्साहात सहभागी होते . वऱ्हाड निघताना मायडीच्या काॕलेजच्या दहाबारा मैत्रीणीपण घेरडीत आल्या होत्या . आता वऱ्हाड गावाची वेस ओलांडून जाणार मग नारळ लींबू आणून ठेवले . आमच्या घरच्या जीपमधून मी व मायडी आणि सोबत सगळ्या मैत्रीणी होतो ! चाकाखाली लींबू चिरडून जीप निघाली वेस ओलांडण्यापूर्वी मारुतीचं दर्शन घेतलं गोंदा मामाने नारळ फोडला दूसरा नारळ ओढ्यात उतरुन टाकला व धमाल करत गाणी भेंड्या म्हणत आम्ही मिरजेला पोहोचलो . भाऊजींचे दहाबारा मीत्रही मुंबईहून खास लग्नाला आले होते तसेच मायडीच्या सासरचे लोकही पुणे मुंबई नागपूर इथे रहात असल्यामुळे सगळ्याच कार्यक्रमात खूपच आधुनिकता होती . मोकळेपणाने चेष्टा मस्करी चालू होती होतं . एकूणच नाविण्याचा अविष्कार पहायला मिळत होता . आई-काकांंनी मायडीसाठी वेगळ्याच धाटणीतला जांभळे काठ व बुट्ट्या असलेला बसंती रंगाचा शालू घेतला होता तर जावयासाठी थ्री पीस घेतला होता आणि सालंकृत कन्यादान करुन दिलं होतं ! नविन जोडपं संस्थानिकाप्रमाणे दिसत होतं . अशाप्रकारे 13/12/1985 ला मोठ्या उत्साहाने लग्न लागले . आजूबाजूला मित्र मैत्रीणींचा घोळका असल्याने हस्याचे फवारे उडत होते . त्याकाळात एकाच बाटलीत दोन स्ट्राॕ घालून एकाचवेळी नवरानवरीला थम्सअप प्यायला लावणे म्हणजे फारच कौतुकाचा विषय होता . उपवर वधुवर मात्र आपल्याला साजेसा जोडीदार कोणी इथे असू शकेल का या दृष्टीने लटकेच नजर भीरभिरवत आसत . चिडवाचिडवीला तर उधाण आलं होतं .
आमच्या आईचा थाट तर फारच उठून दिसणारा होता . जांभळ्या काठाची मोती कलरची भारदस्त नऊवार पैठणी , गळ्यात श्रीमंतहार , नाकात नथ , बाकी भरपूर दागिने , भरगच्च गजरा घातलेला तिच्याच स्वतःच्या केसांचा मोठा आंबाडा अशी खानदानी महाराणीच वाटत होती ती ! सगळेजण काकांच्या हौशी स्वभावाचं तोंडभर कौतूक करत होते . काकांचे सोलापूरचे नारायण मामा व मामी तर भाच्याचं इतक कौतुक करत होते की बास ! आईच्या जोडीने शोभेल असा साजेसा पेहराव करत रुबाबदारपणे काका पण कधी शुभ्र पांढरं ब्रासलेटचं धोतर व नेहरु शर्ट टोपी घालून तर कधी पँट शर्ट घालून काखोटीला पैशाने भरलेली लेदरची बॕग घेऊन खूप हौसेनी मिरवत होते . मधूनच आईकडे मोठ्या कौतुकाने पहायचे मग आईपण तिच्या खास शैलीत हलकेच हसायची तो बोलता चाललेला त्यांचा संवाद असे . आम्ही बहिणी पण तशाच ! गोंदा मामाचा दिमाख काही औरच होता . मी राणीसाठी कसलं भारी स्थळ शोधलं या दिमाखात तो वावरत होता . एकूणच धूमधडाक्यात लग्न झाले . वऱ्हाड कुर्डवाडीला पोहोचायला रात्र होणार हे गृहित धरुन मुलाकडची मंडळी अगदी लक्ष्मीपूजनाच्या तयारीनेच आली होती . भाऊजींनी स्वतःच्या पसंतीने मायडीला चिंतामणी कलरची सुंदर नर्गिस बुट्टा साडी आणली होती . दिवसभराची सगळी धावपळ संपल्यामुळे मायडीपण पुन्हा हलकासा मेकअप करुन लांबसडक वेणीचा शेपटा त्यावर पांढऱ्या व अबोलीच्या फुलांचे गजरे सोडून तयार झाली होती . कळसाच पाणी पडल्यामुळे आलेलं तेज आणि नवेकोरे दागिने घालून नटलेली नवरी आधीच देखणी असलेली मायडी जास्तच नजरेत भरु लागली . तिला पाहून सगळेजणच
" खूपच छान दिसतेय नवरी "
असे म्हणत होते . आईला तर तिच्याकडे पाहून मायेचे आणि कौतुकाचे उमाळे येत होते . लक्ष्मीपूजन झाले व आमच्या पाहूण्यांना सगळेच विशेष वाटत होते . तसे सगळे जुन्या रितीरिवाजांना घट्ट पकडून होते त्यामुळे नव्या नवरीचे लक्ष्मीपूजन कार्यालयात हाही चर्चेचा विषय झालं . त्यामुळे राणीच्या सासरचे अधुनिक विचारसरणीचे लोक आहेत असं सगळे म्हणू लागले . आईला हे सारे आवडत असे . वेळेप्रमाणे निर्णय बदलणे तिला आवडत आसे . जुन्या परंपरांना चिकटून रहाणे तिला फारसे पटत नसे त्यामुळे जावयांप्रती तिच्या मनात कौतुकंच वाटायचे . सगळे पार पडल्यानंतर मायडीच्या जावा , नणंदा नवऱ्याकडची बरीचशी मंडळी नवरानवरीला घेऊन पाया पडायला , निरोप घ्यायला वधुपक्षाकडे आली . मुलगा मुंबईला असतो म्हणजे राणी पण लांब जाणार असे आई-काकांना वाटत असे . तसं त्याकाळात वाहतूकीसाठी मर्यादित सोयी होत्या त्यामुळे राणी लांब जाणार असे आई-काकांना वाटत होते . आधी रेल्वेने कुर्डवाडी मग घेरडी किंवा आधी रेल्वेने पुणे मग पुण्याहून घेरडी असे काहीतरी करावे लागणार होते . आई , आम्ही बहिणी , आत्या मामी स्त्रीसुलभतेने साश्रु नयनांनी तिला निरोप देत होतो तर काहीतरी काम करण्याचा बहाणा करत चेहरा लपवत काका इकडून तिकडे फिरत होते . त्यांची शरीरयष्टी , आवाज , बोलणं ऐकलं तर ते करारी असतील असं वाटायचं पण प्रत्यक्षात वरुन काटेरी दिसणाऱ्या फणसात गोड गरे निघतात त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव होता बायको व मुलींच्या बाबतीत ते खूप हळवे होते . शेवटी निघतांना मायडी पाया पडू लागली तसं ते नाक फुगवत नाकातून हूं हूं आवाज करत डोळ्यातले आश्रु लपवत तिच्या पाठीवर अश्वासक हात फिरवत तिला निरोप देत होते .
नवरीला निरोप देऊन आमचं वऱ्हाड घेरडीला परतले . येताना मात्र सगळे ढेपाळले होते . बरेचसे पाहुणे आधी आल्यामुळे मिरजेहून परस्पर गेले . तरी आत्या मामा असे दहाबाराजण घरी आलो होतो . या पाचसहा महिन्यात मी घेरडीतूनच जाऊनयेऊन करत होते त्यामुळे आम्ही चौघी मुली व आई-काका असे सगळे एकत्र रहाण्याची सवय लागली होती त्यामुळे लग्न झाल्यावर घरात सुनंसुनं वाटत होतं . दुसरे दिवशी सकाळी सगळे सोप्यात गप्पा मारत बसले होते . आईने मला चहा करायला सांगितला मी तो करुन सर्वांना दिला . काॕटवरुन काका हातात कप घेऊन उठले व एक हात मागे बांधून चहा पीत दरवाजापर्यंत जाऊन परत येऊन काॕटवर बसले . असे का म्हणून सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तर रडवेला चेहरा करत हसण्याचा आव आणत ते म्हणाले
" च्यामारी , राणी दुधाचा ग्लास घेऊन सोप्यात असं फिरत दुध प्यायची , जेवण पण तसंच एवढूसं करायची कधी कच्चून खात नव्हती कसं व्हायचं तिचं आता , कोण तिच्या मागं लागणार . आणि आता तर लांब मुंबईला चाललीय ".
हे त्यांच बोलणं ऐकलं तसं सगळ्यांनाच भरुन आलं पाचदहा मिनिटं शांतताच होती तसं आईच एकदम म्हणाली ,
" हे असं असतं यांच ! अती प्रेम करतात मुलींवर . ती काय घरात ठेवायची वस्तू आहे का ? आहो लग्न झालं आता तिचं , आनंदाने , पुढच्या ओढीनं नवऱ्याच्यामागे उड्या मारत नवरी गेलीय . वळणाचं पाणी वळणानंच धावतं . तिला जसं पाहिजे होतं तसं स्थळ मिळालं आहे , काही काळजी करु नकात . आपण जाणारच आहोत परवा कुर्डवाडीला तेव्हा लक्षात येईलच तुमच्या तिची खुशी ".
तोवर उषा वहिनी मोहन आण्णा , प्रभा काकू फक्कड काका सगळेच सोप्यात जमले . सगळेच त्या चर्चेत सामिल झाले . पुन्हा आई-काकांंच्या मुलींच कौतुक करण्याच्या पद्धतीचे सगळेजण कौतुक करु लागले हौशी आई बाप आहात तुम्ही . तुमच्या पोटी जन्म घेतलेल्या मुली नशिबवान आहेत असं सारेजण म्हणू लागले . राणी शिकली म्हणूनच शिकलेला , चांगल्या नोकरीवाला मुलगा मिळाला आहे शहरात गेली मुलगी . बरोबर आहे काकांचच , आता शरुचही शिक्षण होऊद्या असं बोलत मग गप्पा रंगल्या काका म्हणाले मी वेळेप्रमाणे व गरजेनुसार मुलींसाठी खर्च करणार आमचं जे आहे ते त्यांचच तर आहे . दोन दिवसांनी आई-काका कुर्डवाडीला जाऊन आले व आल्यावर आई कौतुकाने वाड्यात सगळा वृत्तांत सांगत बसली
" जावईबापूंनी आधीच रेल्वेची तिकीटं काढून ठेवलीत आणि आता ते लांब म्हैसूर बेंगलोरला फिरायला जाणार आहेत , हनिमून का काय म्हणे आता ती दोघं तिकडून फिरुन आल्यावर जावई जातील मुंबईला कामावर आणि मग राणीला आणायचं तिची संक्रांत आणि येतीजातीला एकदाच होईल आता ".
सगळ्यांना हनिमूनचं पण कौतुकच वाटलं . आणि लग्नानंतर एक महिन्यांनी येती जाती होणार हा चर्चेचा विषय झाला . मग आईच म्हणाली
" आयुष्यभर इथेच राहिलीय की ती ! येऊदे थोडी मजा करुन . हे दिवस काही पुन्हा येतात का ? करतात हौस तर बरंच आहे की !"
आईला कोणी बोलायची हिम्मत करत नसत . एकदोन दिवसात प्रत्येकाचे आपापले उद्योग सुरु झाले . आता माझंपण दुसरं वर्ष सुरु होतं काॕलेज थोडंस बुडलंच होतं . सांगोलच्या आत्त्या जातानाच काकांना सांगून गेल्या होत्या
" भाऊ , आता दे शरुला आमच्याकडे रहायला पाठवून , आताचे पाचसहा महिने व शेवटचं वर्ष राहिलं आहे तिचं ,राहूदे तीला माझ्याकडे ".
अशा तऱ्हेने मायडी गेली की मीपण घेरडी सोडली . घरात पुन्हा आई-काका , ज्योती व संजू चौघेजणच राहू लागले .
प्रकरण 21 वे
उपवर मी
29 मार्च 2021
मायडीचं लग्न झालं ! ती संक्रांतीच्या दरम्यान घेरडीला येतीजातीला आली आणि त्यांनी रेल्वेने केलेल्या म्हैसूर बेंगलोर ट्रीपचा वृत्तांत , नवलाई ऐकतांना घरात एकूणच आनंदी आनंद होता . नव्या नवरीचा घरात वावर म्हणजे रंगीबेरंगी कारंजे थुईथुई नाचतात असा होता . थोडे दिवस मायडी घेरडीत राहिली मग तिला घरची जीप घेऊन कुर्डवाडीला सोडायाला काका निघाले त्यांच्या बरोबर मी पण गेले . आता मात्र एकदोन दिवसातच भाऊजी येऊन मायडीला बदलापूरला घेऊन जाणार होते . त्यामुळे आता राणी लांब जाणार हे आई-काकांंना वाटतच होते . तिथे तिच्या मोठ्या दिरांचे कुटूंब व हे दोघे एकत्र रहाणार होते . ती गेली की एका महिन्यातच काका व गोंदा मामा बदलापूरला कसं काय आहे ते पहायला गेले . दोन रुममध्ये या दोन भावांचा संसार थाटलेला होते . तीथे खूपच अडचणीत सगळे रहातात असे काकांना वाटले . त्यांचा चिंताग्रस्त वाटणारा चेहरा पाहून भाऊजी काकांना म्हणाले
" काका , इकडे जरा असंच असतं , इथे भाडं जास्त असतं कमी जागेतच रहावे लागते तरी पण आम्ही परवाच भाड्याने फ्लॅट पाहून आलोय तिकडे शिफ्ट होतोय तिथे मोठी जागा आहे ,सेपरेट रुम आहेत काळजी करु नका " काका घेरडीला येऊन आईला सांगू लागले
" बाकी सगळं चांगलं आहे ग , एसके ( जावई ) एकदम चांगला मुलगा आहे पण जागेचे वांदे आहेत लहान जागेत वावरावं लागतं . तिथं भाड्याला खूप पैसे जातात त्यांनी स्वतःचं घर घेतलं पाहिजे तसं जागा बघत रहा असे मी त्यांना बोलून आलोय ".
हे ऐकून आई आवाकच झाली ती म्हणू लागली
" आहो , हे काय ? तुम्ही लगेच त्यांना असं कसं बोलून आलात . मुंबईत जागा घेणं सोपं आहे का ? काय वाटेल त्यांना ? "
पण काका मान हलवत म्हणाले
" मी म्हणतो तेच बरोबर आहे , तसंच काहीतरी कराव लागणार आहे , पाहूया ".
दोनतीन महिन्यात मायडीकडे गोड बातमी असल्याचे समजले . आता पुन्हा आईला उसंत असणार नव्हती . मायडीची पहिली मंगळागौर , मग पहिली दिवाळी की लगोलग तिचे बाळंतपण येणार होते .
माझं शेवटचं वर्ष सुरु झालं होतं माझा नेहमीच फर्स्ट क्लास व वर्गात दुसरा नंबर ठरलेला होता . मी काॕलेजबरोबर इंग्रजी टायपींग पण सुरु केलं होतं . मायडीचं लग्न ठरलं तेव्हा बँकेच्या परिक्षा निघाल्या म्हणून तो फाॕर्म मी व मायडीने भरला होता व ती परिक्षा आम्ही काहीही तयारी न करताच सोलापूरला जाऊन दिली होती , काहीच पॕटर्न माहित नव्हता त्यामुळे परिक्षा अवघड गेली होती . त्यावेळी आम्ही गोंदा मामाकडे रहायला गेलो होतो मायडीच्या लग्नाच्या खरेदीच्या निमित्ताने आई-काका पण बरोबर होते . परिक्षा झाल्यावर आम्ही सगळे नारायण मामांकडे गेलो होतो व हसतच कसली अवघड परिक्षा होती हे त्यांना सांगितले . काका त्यांना म्हणाले
"आता राणीचं लग्न जमलंय तिचे काही नाही पण शरुचा जरा नोकरीचा नाद आहे म्हणून परिक्षेला आलो होतो पण अवघड गेली म्हणतेय ".
नारायण मामा खूपच चौकस होते त्यांचा मुलगा म्हणजे चंदू काका हा स्टेट बँकेत होता . ते टाळी वाजवत मला समोर घेऊन बसले . अनेक प्रश्न विचारत त्यांनी माझी सगळी चौकशी केली व ते काकांना म्हणाले
" भाऊ , पोरगी हुशार आहे पण तिला दिशा नाही . मी चंदूकडून एक पत्ता देतो तुला , तिकडे पैसे पाठव आणि टपालामार्फत तो कोर्स हीला पुर्ण करु दे . दरवर्षी परिक्षा असतात , हिला तयारी करुदे व पुढच्या वर्षी परिक्षेला बसू दे , पैसा जाईल तुझा , पण हीने जर नीट अभ्यास केला तर होऊन जाईल हीचं काम याची खात्री आहे बघ मला , लहान आहे ती अजून प्रयत्न कर म्हणावं तिला ".
त्या कोर्सची फी होती साडेतीनशे रुपये आणि संस्था होती दिल्लीची
" नॕशनल स्कूल आॕफ बँकिग "
संध्याकाळी चंदू काका घरी आल्यावर तोही काकांना तसेच बोलला व त्यांने माझ्याकडे तो पत्ता दिला . त्याचं एक पुस्तक पण त्यांने दिले . आम्ही घेरडीला आलो व ही गोष्ट पुन्हा मागे पडली . कारण माझं शेवटचं वर्ष सुरु झाले होते वय पण एकोणीस पुर्ण झाले होते . घोगरा आवाज , बेताचं रुप त्यात दात पुढे आणि मुख्य म्हणजे मला चष्मा होता . मायडीचं लग्न झाले तशी उपवर मुलगी म्हणून मी आई-काकांना डोळ्यांसमोर दिसू लागले होते . मुलगी उपवर झाली की तिच्या रंग-रुपातील कमी त्यांना ठळकपणे जाणवत असे .
" बाकीचं कसं का असेना पण हीला चष्मा म्हणजे कोण तयार होईल हिच्याशी लग्नाला जरा कठीणच आहे ? "
या आणि अशा प्रकारचे संवाद आई-काकांंच्या कानांवर येत असत त्यावर ते दोघेही काही बोलत नसत पण माझी चिंता मात्र त्यांना सतावत होती हे मला स्पष्टपणे जाणवत असे . आता काका माझा फोटो पत्रिका सतत जवळ ठेवत व कुठे जाईल तिथे त्यांनी ती द्यायला सुरुवात केली
" लग्नाची मुलगी आहे स्थळ असेला तर सुचवा "
असे ते सांगत असत . मायडीच्या लग्नाच्या वेळेपासून काकांनी एक डायरी केली होती त्यांना जी समजतील ती स्थळे त्यात ते लिहून घेत असत व ज्यांना हवं त्यांना सुचवत असत . आता माझ्या लग्नाचा विचार मात्र त्यांच्या डोक्यात सतत असायचा .
मायडीला मंगळागौरीला घेरडीत आणलं होतं पण ती स्वतःच अवघडलेली असल्यामुळे मंगळागौर आणि हळदी-कुंकू झाले खेळाचा घाट काही घातला नाही . पुन्हा थोडे दिवस तिला बदलापूरला पाठविले आणि लांबचा प्रवास , जागा लहान , जवळ सासू किंवा आई असं मोठ माणूस कोणी नाही म्हणत सातवा महिना संपत आला की लगेच तिला घेरडीला आणलं . थाटामाटात डोहाळेजेवण झालं . पहिली दिवाळी म्हणून नविन जावयाला बोलावले त्याबरोबरच तायडीचं कुटूंब , अंजू गायु सगळे पुन्हा एकत्र आले होते . गोंदा मामा पण नेहमीप्रमाणे हजर होता . मजेत दिवाळी झाली आणि एमबीके भाऊजींप्रमाणे एसके भाऊजी पण सगळ्यांमध्ये मिसळुन गेले होते . त्यामुळे आई-काका जावयांच्यावर एकदम फिदा होते . लेकी आणि जावयांची हौसमौज करण्यात ते काहीच कमतरता ठेवत नसत कपडा दागिने थाटामाटात सगळा सोहळा असायचा .
दरम्यान दिवाळीत मी टायपींगची तीस स्पीडची परिक्षा डिस्टींगशननी पास झाले . लगेचच बँकेची जाहिरात निघाली मी टाईपीस्ट व क्लार्क या दोन जागांसाठी फाॕर्म भरला आणि काकांच्या मागे लागून तो पोस्टल कोर्स मागवायचं ठरवलं . त्याचं पहिल्यांदा माहितीपत्रक मागवले जानेवारीत ते मार्च असा तीन महिन्यांचा तो कोर्स होता . बँकेची परिक्षा मे अखेर होती . एप्रीलमध्ये सुरुवातीला शेवटच्या वर्षाची परिक्षा व एप्रीलअखेर टायपींगच्या चाळीस स्पीडची दुसरी परिक्षा होती . मी इतकं परिक्षांमध्ये गुंतवून घेऊ नये असे काकांना वाटत असे पण आईला मी खूप तळमळीने बोलत असे मग ती माझ्या बाजूने असे , काकांना पटवायचं काम ती करायची . हो नाही करत सगळे मागवायला होकार मिळाला होता . यात मोहन आण्णाचा फार पाठिंबा होता . त्याला व वहिनीला मी सगळं सांगत असायची तो घरी विचारायला यायचा
" काकी , मी सांगोल्याला जाणार आहे शरु सुट्टीला घेरडीत आहे काही काम आहे का "
मग आई म्हणायची
" विचार तिलाच काही आणायचं असेल तर " .
मी लगेच लिस्ट सांगायचे मग काका पैसे द्यायचे आणि आण्णा हसायचा . मोहन आण्णानेच परिक्षेचा व पुस्तकांचा डीडी काढून आणणे व पुन्हा फाॕर्म भरुन तो रजिस्टर पोस्टाने पाठवून देणे ही कामे केली . मला खूप आनंद झाला व मी जोमाने आभ्यासाला लागले .
इकडे दिवाळीनंतर महिन्यांनी मायडीचे दिवस भरले होते . तेव्हा घरीच बाळंतपणं केली जायची गावात अरविंद काकी होत्याच . पण यावेळी अनुभव वेगळाच आला . मायडीला खूपच त्रास झाला . शेवटी शेवटी घरची जीप असूनही दवाखान्यात नेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . तिची तब्बेत नाजूक असल्याने अरविंद काकी पण अगदी हवालदील झाल्या आणि दोन दिवसांनी सुखरूपणे तिचे बाळंतपण झाले . तोवर आई-काकांं मात्र खूपच घाबरे घुबरे झाले होते . तिला कन्यारत्न झाले बाळ बाळंतीण छान आहेत म्हटल्यावर सगळ्यांनी निश्वास सोडला . यानंतर आता घेरडीत घरी कोणाचही बाळंतपण करायचे नाही असे आईने ठरविले . याहीवेळी भाऊकाकांकडे मुलगी झाली हा गावात आणि वाड्यात पाहुण्यांत चर्चेचा विषय होताच पण आमच्या घरात तो विषय गौण मानला जाऊ लागला . अगदी थाटामाटात बाळाचं बरसं झालं . भाऊजी तर फोटो काढण्यासाठी कॕमेरा घेऊन आले होते . चिंचवडकराकडे पहिली मुलगी होती ती . मायडी कादंबऱ्या वाचायची त्यामुळे नवनवी नावे ती शोधून काढत असे तिने बाळाचे
" पृथा " असे नाव ठेवले .
यांच्या घरी मुलींचे प्रमाण वाढत आहे असे बाकीच्यांना वाटायचे पण मुलींचे कौतुक करण्याचे प्रमाण आमच्याकडे मात्र वाढतच होते . आई-काका बाळांची जिवापाड माया करत असत . बाळाला घेऊन मुलगी निघाली की त्यांना चैन नसायची . पण जाव तर लागायचच न . मायडीला पण भाऊजी जातांना बरोबर घेऊन गेले . यावेळी जाताना मात्र काकांनी भाऊजींना नविन फ्लॕट पहात रहाच असा रेटा सुरुच ठेवला .
आता मायडी गेल्यावर पुन्हा घरात सगळे वातावरण शांत झाले . चार महिन्यात माझं शिक्षण पुर्ण होणार होतं आणि माझं वय वीस वर्ष पुर्ण होणार होते . त्यामुळे काकांची वरसंशोधन मोहिम जोरदार सुरु झाली होती . माझी परिक्षा झाली की लग्न व्हायला पाहिजे असं त्यांच गणित होतं .
मी मात्र अगदी नियोजनपूर्वक अभ्यास करत होते . सांगोल्यात आत्याकडे लाईट नव्हती , त्यांनी भाड्याच्या घराला कुळ लावलं होतं म्हणून घरमालकांनी लाईट तोडलेली होती . सांगोल्यातील वास्तव्य हे एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकतं.
बी.काॕम फायनल व बँकेची परिक्षा त्याबरोबरच टायपींगचा क्लास होता . या दोन्ही परिक्षा संपल्यावर मे महिना पुर्ण मला बँकेचा अभ्यास करता आला . त्या पोस्टल कोर्सचा मी पुरेपूर आभ्यास केला . आणि परिक्षेला मी सोलापूरला गेले गोंदा मामाकडे राहिले परिक्षा माझ्या मनासारखी झाली होती . आता सगळ्या परिक्षा संपल्या होत्या मी निकालाची वाट पहात होते . तोवर काकांनी इकडे भरपूर स्थळांशी संपर्क साधला होता . दाखवायला न्यायचा धडाका लावला होता . मला बरेच नकार आले व जिथून पसंती यायची ते आई-काकांंच्या मनास येत नव्हते . एका ठिकाणी तर मुलाच्या वडिलांनी विचारले
" आम्हांला मुलगी पसंत आहे पण आमचं खेडेगाव आहे मुलगी चष्मा वापरणार नसेल तर पुढे बोलू काय ते कळवा ".
काकांनी त्यांना
" आपला योग नाही "
असे कळवले .
असे वेगवेगळे अनुभव येऊ लागले आई-काकांना त्याचा त्रास व्हायचा . त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळांतपणानंतर गेलेली मायडी व भाऊजी बाळाला घेऊन आले . तायडीचं पण कुटूंब आले .घेरडीत उन्हाळ्यात आंबे प्रकरण भारी असायचं एसके भाऊजींना हे नविन होतं पण एमबीके भाऊजी व ते जोडी मस्त जमली . पण सुट्टीत घरी विषय मात्र माझ्या लग्नाचा होता . दोन्ही भाऊजींकडे पण काकांनी स्थळं पहाण्याची , नाव नोंदवायची कामगीरी सोपवली . भाऊजींना जातांना काकांनी लवकरच फ्लॕट बघण्याविषयी सांगितले . माझा काॕलेजचा व टाईपींगचा रिझल्ट आला . दोन्हीकडे फर्स्टक्लास मिळाला होता . मी बँकेच्या परिक्षेच्या रिझल्टची वाट पहात होते . केव्हा असतो , कसा लागतो याची काहीच माहिती नव्हती .पण मला कुठे नोकरी मिळेल का याचा मात्र मी सतत विचार करायचे . त्याचदरम्यान अजून एक स्थळ आले बाकी सगळं चांगलं होतं मुलगा इंजिनियर होता पण त्याला दुर्बीणीएवढ्या जाड भिंगाचा चष्मा होता . मला काही मनापासून ते स्थळ आवडलं नव्हते आणि नाही म्हणण्यासारखे त्यात काही नाही असे काकांचे मत होते .
त्यावरुन काका माझ्यावर रागावले होते आधीच कुठून होकार येत नाही स्वतःला चष्मा आहे आणि ही चष्मेवाल्याला नकार देतेय हे बरं नव्हे असे त्यांना वाटत असे . त्यांनी मला पटवण्याचे बरेच प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही . जुलै संपत आला तरी बँकेचं काही समजलं नाही म्हणून मी एम काॕम साठी पंढरपूरला अॕडमीशन घ्यायचं विचारलं .पण आता मात्र काका रागावले
" आता कशाच्या नादी नाही लागायचं , फक्त लग्नाचं पहायचं . फर्स्टक्लास खूप जणांना मिळतो पण सगळ्यांना नाही नोकरी मिळत त्यामुळे आता हे सगळं बंद हीचं जेवढं शिक्षण होईल त्यापेक्षा जादा शिकलेला मुलगा पहावा लागतो मग ते काम अवघड होऊन बसतं ".
तरी मी आईच्या मागे पालूपद लावलंच होतं . मग आईने
" हीच्या डोक्याला काहीतरी खाद्य असू द्या असे म्हणत काकांच मन वळवत सुवर्णमध्य काढला मी पंढरपूरला अॕडमिशन घ्यायचं पण घरी बसून अभ्यास करायचा परिक्षेला फक्त जायचं आणि लग्नाचं पहात रहायचं .असे ठरले मला खूप आनंद झाला . मी लेट फी भरुन तसे अॕडमिशन घेऊन आले व घरुनच अभ्यास सुरु केला . इकडे काकांना शेतीची धावपळ होईना म्हणून त्यांनी थोडी शेती विकली . तो व्यवहार झाला तर मी खूप रडले मी आईला म्हणाले
" तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही शेती विकता ना ? "
मी असे म्हणल्यावर काका हसू लागले व मला म्हणाले
" आपण शेती विकून खाणार नाहीत इस्टेट विकून इस्टेटच घ्यायची फक्त जिथे गरज असेल तिथे . आणि तू रडू नको तुझ्यासाठी नवरा बघतांना शेती पण असलेला बघू आता मला दगदग होत नाही कोण बघणार हा सगळा व्याप ."
त्यांचा हिशोब वेगळाच चालत असे . ते फार पुढचा विचार करत असत आणि व्यवहार झाला . त्यावेळेस मायडीचा पण फ्लॕटचा व्यवहार ठरला भाऊजींनी तो बुक केला व काकांनी त्यांनी ठरवलेली मदत त्यांना पाठवून दिली . काका बदलापूरला पण जाऊन आले .
त्याच दरम्यान मोहन आण्णाच्या आयुष्यात दुर्घटना घडली .
" मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही तर केस पांढरे होतात त्यासाठी शिर्षासन हा रामबाण उपाय आहे "
असे त्याला कोणीतरी सांगितले व बाहेरुन येऊन त्यांने अचानकच शिर्षासन केले तो चक्कर येऊन खाली पडला ते त्याला उठताच येईना . पुन्हा संकट आले त्याला हलताच येईना म्हणून त्याला सोलापूरला नेले तिथे त्याला अर्धांगवायु झाला असे सांगितले व दोनतीन महिने त्यावरच औषधे दिली पण फरक काही पडेना . चुकीचे उपचार झाले काकू , उषा वहिनी व लहान वयाची आण्णाची तीन मुलं त्यामुळे पहायला त्यांच कोणीच नव्हते सगळी धावपळ काकाच करत होते उषा वहिनींचे भाऊ मदतीला यायचे . शेवटी त्याला नाना काकांच्या मदतीने पुण्याला न्यायचे ठरले .केईएम ला त्याला अॕडमीट केले तिथे त्याच्या मानेच्या मणक्यांना इजा झाल्याचे निदान झाले वहिनी आण्णाजवळ तर काकू मुलांजवळ होत्या . काका खूप धावपळ करत होते . त्यातच माझ्या लग्नाचा मेळ आजून बसलेला नव्हता त्याचा आई-काकांंना खूप त्रास व्हायचा .
मायडीचा फ्लॕटचा ताबा मिळाला व ते दोघेजण पृथाला घेऊन रहायला आले . भाऊजींची शिफ्ट ड्युटी असायची . ते एकत्र रहात होते तेव्हा काळजी नव्हती इकडे नविन बिल्डिंगमध्ये सगळे अजून रहायला पण आले नव्हते माणसं कमी वाटत होती . आता माझं पण आजून लग्न जमत नव्हते . पुण्यात दवाखान्यात आण्णाजवळ एकट्या उषा वहिनीला खूप ताण पडतो म्हणून त्यांच्या मदतीला हातभार लागावा म्हणून मला पंधरा दिवस पुण्यात ठेवायचं ठरले . त्याचवेळी नाना काकांच्या काकूंनी चष्म्याला पर्याय म्हणून शरुला लेन्स बसवून घ्याव्यात असे सांगितले होते काकांनी लगेचच ते काम व पैसे काकूंकडे सोपविले त्यांना माझ्या लग्नाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे आता एकवीस पुर्ण होतील तर आता तरी लग्न जमलेच पाहिजे ही चिंता होती नंतर राणीला सोबत म्हणून एक महिना मला बदलापूरला ठेवायचं व तिथे विवाहमंडळात नाव नोंदवावे . मुंबईत वधुवर मेळावे असतात जमले तर तिथेही प्रयत्न करावा असे ठरले ! का तर उपवर मुलगी घरात रोज समोरासमोर पाहून त्यांना काळजी वाटायची व त्याचा मला त्रास व्हायचा म्हणून एकदोन महिने दोघेही एकमेकांच्या नजरेसमोर नको लग्न झाल्यावर कुठे जाणं होत नसते रिकामी आहेस तर फिरुन येईल असे आईला वाटायचे त्यावर आईने काढलेला उपाय होता हा !
प्रकरण 22 वे
मला बँकेची आॕर्डर आली
31/03/2021
मोहन आण्णाचे आॕपरेशन झाल्यापासून आईला त्याला पहायचे होते त्यासाठी तिची तगमग सुरु होती . आणि उषा वहिनींची खूप धावपळ होते त्यांना थोडीशी उसंत मिळावी म्हणून त्यांच्या मदतीला मला पुण्यात सोडायचे ठरले होते . मायडी पण आण्णाला पहायला पुण्यात येणार होती मग तिच्याबरोबर मी पुढे बदलापूरला जाईन असे ठरले . घेरडीतून आई-काका , मी , ज्योती व संजू पुण्यात गेलो . मोहन आण्णाची अवस्था बिकट होती , त्याच्या मानेच्या मणक्याचे आॕपरेशन झाले होते व मान हलू नये म्हणून त्याच्या डोक्याभोवती रींग व अंगात फायबरचं चिलखत दोन्ही पट्ट्या टाकून जोडले होते व डोक्यात स्क्रुंनी ते आवळले होते . तो बेडवरच होता त्याला पाहिलं की कळवळायला व्हायचं . त्याला प्रचंड यातना व्हायच्या . नाना काकांच्या घरचे आळीपाळीने दवाखान्यात असत पण वहिनींना खूपच थकवा आला होता . मी पुण्यात राहिले तर त्यांना थोडासा आराम मिळेल व मला चष्म्याला पर्याय म्हणून लेन्स घ्यायच्या होत्या मग तेही काम होईल म्हणून मला पुण्यात सोडलं व आई-काका पुन्हा घेरडीला आले . मी चांगली पंधरा दिवस नाना काकांकडे राहिले , रोज सकाळी मी दवाखान्यात जायचं दिवसा मी थांबायचं मग वहिनीला थोडी सवड मिळायची . संध्याकाळी पाचला काकांची मुलगी नंदा मला लेन्स क्लीनीकला घेऊन जायची . तेव्हा नुकतच चष्म्याला पर्याय म्हणून लेन्सकडे पहायला सुरुवात झाली होती . खर्चीक ट्रीटमेंट होती तरी काकांनी ती ट्रीटमेंट मला सुरु केली होती का तर चष्मा जाईल ! पण मला त्याचा फार त्रास होत असे . डोळे लालभडक व्हायचे , चुरचुरायचे , डोळ्यांतून सतत पाणी यायचं . पण मी प्रॕक्टीस केली . पुढे पंधरा दिवसांनी मायडी आली व मी तिच्याबरोबर बदलापूरला गेले . मायडीचा नुकताच घेतलेला फ्लॕट तिसऱ्या मजल्यावर होता . हाॕल , किचन, बेडरुम , गॕलरी , संडास-बाथरुम मुख्य म्हणजे जागोजागी नळ व नळाला चोविस तास पाणी असा सर्व सोयींनी युक्त हवेशीर फ्लॕट होता . मायडी व भाऊजी पडदे शोपीस लावून नविन घर सजवण्यात गुंग होते . फक्त आसपासचे अजून कोणी रहायला आले नव्हते . मी चांगली महिनाभर तिथे राहिले पृथा एक वर्षाची होती त्यामुळे मला छान करमायचे . त्यावेळी भाऊजींबरोबर माझ्या खूप गप्पा व्हायच्या माझी नोकरी करण्याची धडपड पाहून त्यांनी मला दोनतीन कंपन्यांचे फाॕर्म पण भरायला लावले . त्याच दरम्यान मुंबई पहाणे , लग्नासाठी नाव नोंदवणे व नोकरीसाठी प्रयत्न करणे या कामांसाठी कल्याण , ठाणे , दादर याठिकाणी मायडी व भाऊजी बरोबर मी भरपूर फिरले . पण एकूणच तिथली गर्दी व कोंदट हवा यामुळे मला मुंबई फारशी आवडली नाही . मी भाऊजींना सांगून टाकले तुम्ही काही माझ्यासाठी इकडचं स्थळ काकांना सांगू नका आणि मला कंपनीत नोकरी पण नाही करायची ! ते दोघेही हसू लागले मला आता घेरडीला जावेसे वाटू लागले . मी आठवड्यातून एक पत्र घेरडीला पाठवत असे , आता मला जायचे वेध लागले होते . मुंबई-घेरडी गाडीत बसवून दिले तर मी एकटी जाऊ शकते असे मला वाटू लागले . फक्त आधी तसे एकटीने येऊ दे का हे काकांना विचारावे लागेल हे मला माहित होतं , कारण तेव्हा मुलींना एकटी प्रवासाला परवानगी नसे . किर्लोस्करवाडीहून सुद्धा तायडी किंवा मायडीला जातायेता काका किंवा भाऊजी बरोबर असायचे . मी आकरावीत पहिल्यांदा वाडीतून घेरडीला एकटी येते असे पत्र लिहून आई-काकांंना कळवले होते नेहमीच जाणंयेणं मी एकटी करत होते . सुरुवातीला भाऊजी मिरजेपर्यंत यायचे . त्याचंपण सगळ्यांना फार कौतुक वाटायचं . मग मी घेरडीला पत्र पाठवून काकांना मी एकटी येऊ का असे विचारले त्यावर ठीक आहे असे त्यांचे उत्तर आल्यावर मी येण्याची तारिख घेरडीला कळविली व बदलापूरहून मायडी व भाऊजी मला खोपीलीला घेऊन आले तिथे फक्कड काकांच्या विद्याकडे एक दिवस राहिलो व सकाळी तिथून मला मुंबई-घेरडी गाडीत खायला व पाणी बरोबर दिले व गाडीतून न उतरण्याच्या आणि इतरही अनेक सुचना करत बसवून दिले व पुर्ण दिवसभर प्रवास करत जागची न उठता मी साडेपाचला सांगोल्यात पोहोचले तर तिथे स्टँडवर आमचे काका व आंता काका दोघेजण माझी वाट पहात उभे होते . बस उभी राहिली तसे मी कुठे दिसते का असे काका डोकावून पहाताना मला दिसले . मी खाली उतरले तसे आंता काका माझं कौतुक करु लागले व हसतच म्हणाले
" व्वा शरु मुंबईनं एकटी आलीस की , धाडशी आहेस की मग पण तुझ्या काकाला काही चैन पडत नव्हती बघ तुला बघेपर्यंत . आर्धा तास झाला येरझाऱ्या घालत आहेत ".
मग काका हसून म्हणाले
" तसं नाही ओ , गाडी जेवायला थांबल्यावर ही उतरली न लवकर नाही चढली , गाडी निघून गेली तर काय करावं ? असं उगच वाटायचं हो ."
मग स्टँडवरच्या कँन्टीनमध्ये चहा घेऊन आम्ही पुन्हा त्याच गाडीत बसून सगळे घेरडीला आलो तर इकडे आई पण माझी वाट पहात आतबाहेर येरझाऱ्या घालत होती . मला पाहिलं की तिला पण हुश्श्य झालं . ती म्हणे
" बाकी काही नाही पण गाडी कुठं मधेआधे बंद पडली तर ? असं मला उगाच भिती वाटली "
पण मी एकटीने मुंबईहून सुखरुपपणे येऊन पोहोचले होते . एकटीने येणे हा वाड्यात आणि घेरडीत पण चर्चेचा विषय झाला होता . कारण त्याकाळात वातावरणच तसे होते मुलींना एकटं सोडलं जात नसे . पण मी थोडंस बंड करायला सुरुवात केली होती . मला आई मजेने म्हणायची
" तू चुकून पोरगी झालीस पोरींसारखा नाजूकपणा काही नाही . तुझ्या भसाड्या घोगऱ्या आवाजाला घाबरुन तुझ्या कोणी वाटे जायचं नाही ."
मी बदलापूरला गेल्यामुळे वातावरणातील ताण थोडास निवळला होता . वरसंशोधन सुरुच होतं .
" बाशिंगबळ जरा जडच आहे दोडाचं बघूया , जमेलच की योग असेल तेव्हा ".
असे आई म्हणायची . काकांचे लग्नासंदर्भात सतत कुठे न कुठे पत्रव्यवहार सुरुच होते . त्यावेळी मुलीचे वडिल मुलाकडे एका टपालावर मुलीची सगळी माहिती लिहून कोऱ्या कार्डावर आपला पत्ता लिहून ते जोडकार्ड मुलाकडे पाठवून देत असत . मग मुलाचे वडिल त्या कार्डावर
"पत्रिका जमते , जमत नाही , पुढची हालचाल करु किंवा योग नाही "
अशा आशयाचं उत्तर देत असत काहीजण उत्तर पाठवायची तसदीपण घेत नसत . पण जोडाकार्ड लिहून पाठवणे व उत्तराची वाट पहाणे हा काकांचा रोजचा उद्योग होता . समाजात मुलींच्या आई-वडिलांना त्याकाळात असा त्रास होत असे . काकांच तेव्हा नोकरीचं गाव सोनंद हे होते . आॕफिसचं काम संपवून घरी आले की त्यांचा आईला पहिला प्रश्न असायचा
" आज काय टपाल ?"
मग एखाद उत्तर आलेलं असलं की त्यांची त्यावर चर्चा होत असे . आई-काकांंची ती तगमग पाहून मला खूप त्रास व्हायचा आणि रागही यायचा . आई-काकांंना आपला खूप त्रास होतो असे वाटायचे . मी बदलापूरहून आल्यावर आठ दिवसातच एक दिवस आमचा पोस्टमन हाक मारतच घरी आला
" शरु ताई बँक आॕफ महाराष्ट्रचा लिफाफा तुमच्या नावचा आलाय नोकरी लागली काय बघा ".
मी परिक्षा दिलेली आहे आणि रिझल्टची वाट पहातेय हे जवळजवळ सगळ्यांना माहित होतं .
मी पळतच गेले व म्हणाले
" आरे नोकरी नाही आत्ता रिझल्ट लागलाय बघू काय आहे ते आधी बघूदे मला . "
असे म्हणत मी ते पाकीट फोडलं आणि आनंदाने उड्याच मारु लागले ओरडून आईला हाक मारली व जोरात ओरडले
" आई ग मी बँकेची परिक्षा पास झाले मला पुढच्या टायपींगच्या परिक्षेला पुण्याला बोलावलय "
ओरडत आख्खा वाडा गोळा केला माझा आनंद गगनात मावेना . कधी एकदा काका येतात न मी त्यांना सांगते असे मला झाले . मी काकांची वाट पहात बसले तर काकांना पेठेतच समजले की शरुला बँकेचे काहीतरी पत्र आलंय . काका घाईघाईने घरी आले पटकन मी ते पाकीट त्यांच्या हातात ठेवले . त्यांनी ते वाचले त्यांचा चेहरा आनंदानं एवढा खुलला होता विचारता सोय नव्हती . संध्याकाळी आईने खायला गोड शिरा केला मग काकांनी रात्रीच तायडी , मायडी व गोंदा मामाला पत्रं लिहून ही बातमी कळवली . आई-काका व मी सोप्यात बसलो होतो काका नाक फुगवत हसतच बोलू लागले
" च्यामारी भलतीच वेळखाऊ प्रोसेस दिसते बँकेची . दहा महिने झाली परिक्षा होऊन आणि आत्ता रिझल्ट लागलाय . आता स्पीड टेस्टला हिला बोलावलंय त्यात पास झाल्यावर इंटरव्ह्यू असणार जरा वेळखाऊ काम आहे . पण मला वाटतय शरुला ही नोकरी मिळणार . आता आपल्यालाच हीचं लग्नाचं बघणं थोडंस थांबवावं लागणार . आधी आता हीला सांगोल्याला पाठवावं लागेल . शरु तू दोन महिन्याचा पास काढ आणि टायपींगची प्रॕक्टीस सुरु कर , तुमच्या काॕलेजमध्ये ज्या सरांनी क्लास घेतला त्यांना भेटून ये आणि त्या पोस्टल कोर्समध्ये इंटरव्ह्युची काय तयारी करायला सांगितलंय तेही पहा जरा तयारी कर ".
मी तर करतच होते पण काका इतकं सांगत होते त्याचा मला खूप आनंद झाला . घरातील वातावरण खूप बदललं सगळं पारडंच फिरलं होतं . आख्ख्या गावात तो चर्चेचा विषय झाला होता . आई-काकांना इतकं आनंदी पाहून मला फारफार बरं वाटलं होतं .
मी लगेचच सांगोल्याला जाऊन दोन महिन्यांचा बसचा पास काढला , प्रॕक्टिससाठी टाईपींगचा क्लास लावला आणि काॕलेजमध्ये जाऊन सरांना भेटले . बँकेच्या परिक्षेच्या आधी काॕलेजने पंधरा दिवसाचा क्लास घेतला होता . त्यांनी बऱ्याच टीप्स दिल्या .आमच्या काॕलेमधून मी एकटीच सिलेक्ट झाले होते . एप्रीलमध्ये महाराष्ट्र बँकेच्या प्रभात रोडला असलेल्या ट्रेनिंग काॕलेमध्ये माझी टाईपींगची स्पीड टेस्ट होती . आता मोहन आण्णाला डिसचार्ज मिळाला होता . त्याची आमच्या खालच्या घरात सोय केली होती . स्पीड टेस्टसाठी पुण्याला माझ्या बरोबर काका आले होते . काका शांत बसत नसत आसपास हिंडून त्यांनी एकूणच प्रोसीजरची खूप माहिती काढली . किती जागा आहेत , आता पुढे काय असेल , पोस्टींग मिळायला किती दिवस लागू शकतील , कुठे मिळू शकते , त्यात बदल करुन हवा असेल तर कोणाला भेटावं लागेल . मी टेस्ट देऊन आले की काका खाली उभे होतेच . त्यांनी मला त्यांचं समाधान होईपर्यंत टेस्ट संदर्भात खूप प्रश्न विचारले . ते सगळा आभ्यास करायचे . मे महिन्यात पुन्हा या टेस्टचा रिझल्ट लागला आणि जूलैमध्ये मला इंटरव्ह्युसाठी पुन्हा पुण्यात बोलावलं . आता मात्र माझ्या बरोबर काकापण खूप अस्वस्थ असायचे त्यांना चैनच पडायची नाही . हवं नको अगदी लक्ष द्यायचे , मधूनच हसत म्हणायचे
" खरंच हुशार आहेस की , तुला फर्स्टक्लास मिळाल्याचा अभिमान आहेच , पण एवढं सोप नाही बरं हे बँकेत सिलेक्शन होणं हे मात्र खरं " .
मला रोज काका म्हणायचे
" तुझ्या अभ्यासाबरोबर पेपर वाचत जा , बातम्या ऐकत जा , मंत्रिमंडळ लिहून ठेव ".
त्यांच डोकं सतत काम करायचं माझ्या सगळ्या कागदपत्रांच्या झेराॕक्स काढून फाईल तयार केल्या का ? त्यावर सह्या आणल्या का अशा बारीक सारीक गोष्टी ते लक्षपूर्वक विचारत असत . आई-काका गप्पा मारायचे काका आईला माझ्याबद्दल काही सांगू लागले की आई हसतच म्हणायची
" तिची हुशारी , धडपड मला पहिल्यापासून माहितीय तुम्हांलाच आत्ता दिसली ".
याहीवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत तायडी मायडी सहकुटूंब आल्या होत्या . आता मला नोकरी लागली तर कदाचित घर हलवावे लागेल हे एक कारण , दुसरे म्हणजे भाऊजींची शिफ्ट ड्युटी असते मायडीला लहान बाळाला घेऊन एकटीलाच रहावे लागते तिला सोबत हवी , आणि तिसरं म्हणजे आता ज्योती नववीत गेली होती घेरडीत हल्ली शाळेत वातावरण फारसं चांगलं नव्हतं आणि ज्योती छान दिसायला लागली होती , दहावीनंतर तरी बाहेर ठेवावच लागेल त्यापेक्षा नववीतच जर तिला बदलापूरला शिकायला ठेवलं तर हे सगळंच साध्य होईल म्हणून चर्चा करुन ज्योतीला नववीसाठी बदलापूरला ठेवायचं ठरलं आणि त्याप्रमाणे तिचा घेरडीतला बाडबिस्तार गुंडाळून मायडीबरोबर तिला बदलापूरला पाठविले .
जुलैमध्ये इंटरव्ह्युला आम्ही पुण्यात गेलो . तोही प्रभात रोडलाच होता . सकाळी लवकर जायचे होते त्यामुळे पेपर वाचायला मला वेळ मिळाला नव्हता . मग माझं आवरेपर्यंत काकांनी स्वतः पेपर वाचले होते व त्यातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या त्यांनी मला रिक्षात सांगितल्या
" आज आषाढी वारी आहे , सहा लाख वारकरी पंढरपूरात दाखल ......"
असं सगळं एकएक ते मला सांगत होते .आमच्या बरोबर काकांची नंदा पण आली होती तीला काकांच वागणं पाहून खूप कौतुक वाटले . सेंटरला पोहोचलो तर त्याठिकाणी ते सगळं निरिक्षण करत होते .माझं डाॕक्युमेंट व्हेरीफिकेशन झाले की फक्त उमेद्वारांना वरच्या मजल्यावर नेलं . काका व नंदा खालीच थांबले . इंटरव्ह्यू झाला की बाहेर पडण्याचा रस्ता दुसऱ्या बाजूने होता . काका तिकडे जाऊन उभे राहिले व प्रत्येकजण आत किती वेळ थांबतो ते पहायचे , बाहेर येणाराला सगळे पालक घोळका करतच काय विचारलं अशी चौकशी करायचे . मी बाहेर आले की काका मला म्हणाले तुझा इंटरव्ह्यू सतरा मिनीटं झाला बघ ! कायकाय विचारलं हे जाणून घेतलं आणि पुण्याहून बदलापूरला गेलो दोन दिवस राहून आम्ही वाडीला गेलो तिथे तायडी म्हणाली
" आता हिला नोकरी लागेल मग लग्न ठरेल पुन्हा हीला रहायला मिळणार नाही आता राहूदे तीचं ती एकटी घेरडीला येईल ".
मग तिच्याकडे पंधरा दिवस राहिले व घेरडीला परत आले . आम्ही रोज वाट पहायचो पण आॕर्डर काही येईना . त्यादरम्यान सांगली बँकेची जाहिरात निघाली त्या बँकेची शाखा घेरडीत होती मग काकांनी मला त्याचा पण फाॕर्म भरायला लावला . नेमकी महालक्ष्म्या जेवतात त्यादिवशी ती परिक्षा होती . नेमकं परिक्षेच्या आधी खूप पाऊस पडला आणि पूर आला होता व पंढरपूर-सोलापूर रस्ता बंद झाला होता . काका म्हणाले
" दोन महिने झाले अजून आॕर्डर नाही तुझा आभ्यास झालाय ही परिक्षा दे पाहू पुढच्या पुढे ".
एवढा मोठा सण होता तर आईला म्हणाले
" एवढी वेळ तू एकटीने भागव पूर आला आहे मी शरुला परिक्षेसाठी रेल्वेने कुर्डवाडीमार्गे सोलापूरला नेऊन आणतो ".
आईने पण आनंदाने परवानगी दिली . आम्ही परिक्षा देऊन परत आलो . मायडी लक्ष्म्याच्या सणासाठी कुर्डवाडीला आली होती मग तिला घेरडीला आणायचं होतं . दोन दिवसांनी तिला आणायला काका गेले तर येताना सांगोला स्टँडवर पेपरवाल्यांने काकांना हाक मारुन महाराष्ट्र टाईम्स दाखवला . त्यात नॕशनल स्कूल आॕफ बँकिंग ची जाहिरात होती व खाली यशस्वी विद्यार्थ्यांची लीस्ट होती त्यात घेरडीतील मुलीचं नाव त्याला दिसलं होतं व काकांना तो ओळखत होता त्यामुळे सांगोला तालुक्यातील तुमच्या गावाचं नाव आहे म्हणून त्यांने दाखविले होतं . ते तर माझं नाव होतं ते पाहून मायडी व काकांना इतका आनंद झाला की तो पेपर व रिझल्ट लागला ही बातमी घेऊन खुशीतच घरी आले . मग चारआठ दिवसात सिव्हिल सर्जनचे फीटनेस सर्टीफिकेट सबमीट करण्यासाठी बँकेकडून पत्र आले तसेच बँकेकडून सांगोला पोलीस स्टेशनला पण इनव्हेस्टीगेशनचं पत्र आलं तिथून घेरडी पोलीस स्टेशनला माहिती मागवली आहे असे घेरडीतील पोलीसांनी काकांना सांगितले . थोडक्यात सिलेक्शन झालेय आता फक्त आॕर्डर येणं बाकी आहे हे आम्हांला समजले होते . यावेळी काकांनी एक निर्णय घेतला त्यांची अजून दोन वर्षे नोकरी होती पण त्यांनी व्हीआर एस घेणार असल्याचे सांगितले
" माला आता नोकरीचा कंटाळा पण आला आहे व जावे लागले शरुबरोबर तर आम्ही रिकामे असायला पाहिजे ".
तोवर दिवाळीत तायडी , मायडी घेरडीला आल्या खूप उत्साहाने दिवाळी झाली . पण सध्या लग्नाची चर्चा बंद होती कारण अजून आर्डर येणे बाकी होते व मला कोणतं गाव मिळेल त्यानुसार स्थळ पहायचा असा निर्णय घ्यायचं काकांनी ठरवलं होतं .
काका मला कोणतं गाव मिळेल या विचारांने खूपच अस्वस्थ होते , त्यांना तेव्हा समजले की आॕर्डर निघतांना युनियनचा मोठा सहभाग असतो . मग काकांनी तिथल्या पुढाऱ्यांची ओळख काढली व मला पोस्टींग जर किर्लोस्करवाडीला मिळाली तर सोयीचे होईल व लक्ष घाला असे सांगून आले . त्यांनी पण प्रयत्न करतो असा काकांना शब्द दिला पण सध्या आॕर्डर्स निघाल्या असतील तरी दोनचार महिन्यांनी तुम्हांला मॕनेज करुन देऊ असा त्यांनी काकांना शब्द दिला . आता आम्ही रोज टपालाची वाट पहात बसायचो . मागच्या दाराकडून पोस्टमन येताना आधी दिसतो नंतर वाड्यात येतो म्हणून मी दुपारी मागच्या दारात बसत असे . सोमवारी दुपारी असेच दोन वाजता वाट पहात बसले होते व त्यादिवशी पोस्टमन रामा लवकरच हातात लिफाफा घेऊन आला व मला मागच्या दारांतूनच हाक मारुन म्हणाला
" शरुताई , आली बघा तुमची आर्डर या लवकर " .
त्यांने पाकीट माझ्याकडे दिले व वाड्याच्या मोठ्या दरवाजांने बाजारात भेटेल त्याला सांगत गेला . काका बाजारात होते त्यांना बाहेरच रामाने शरुताईची आॕर्डर आली मी टपाल देऊन आलो असे सांगितले . मग काका येतांनाच भाड्याने जीप ठरवून आले . काकांची जवळ्याच्या म्हसोबावर खूप श्रद्धा होती . त्यांनी माझी आॕर्डर आली की मला घेऊन जाऊन आकरा नारळांच तोरण बांधायचं ठरवलं होतं . काकांनी आॕर्डर पाहिली माझी आॕर्डर बार्शीची आली होती . त्यात माझा बेसिक 583 तर महागाई भत्ता 602 असा एकूण पगार 1185 रुपये दाखवला होता . एकही पैशाची लाच न देता एक हजार पेक्षा जास्त मला पहिला पगार मिळणार होता . त्यावेळी पैसे भरुन डीएड , बीएड ला अॕडमिशन घ्यायचं व पैसे भरुनच संस्थेत नोकरी लावणे हे प्रकार सर्रास चालत होते . आई-काका अगदी आभिमानाने सांगत
" अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत दीड वर्ष तीन चार चाळण्यातून तिची ही निवड झाली आहे " .
आणि ते ऐकतांना माझा उर अभिमानाने भरुन येत होता .
मग काकांनी सांगून टाकले
" उद्या सगळी आवराआवरी करायची व बुधवारी बार्शीला जायचे आणि मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारी जाॕईन व्हायचे ! बार्शीला माझ्या तुंगतच्या मावशीचा मुलगा म्हणजे पद्माकर काका आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊ आणि नारायण मामाचा मुलगा चंदू त्याची बदली परवाच बार्शीला झालीय बघू त्याला भेटून कसं करायचं ते ठरवू !"
आणि आम्ही पूजेचं साहित्य घेऊन म्हसोबाला निघालो !
बार्शी हे गाव मी कधीच पाहिलेले नव्हते . मी माझ्या मनातच बार्शीचं व महाराष्ट्र बँकेचे चित्र पहात होते !
प्रकरण 23 वे
वरसंशोधन मोहिम
31/03/2021
माझी बँक आॕफ महाराष्ट्र बार्शी शाखेची आॕर्डर आली ही बातमी हाहा म्हणता गावभर पसरली . सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर मला कुठे न कुठे चहा व नाष्ट्याला आमंत्रण होतं . वाड्यात प्रत्येकाच्या घरी , आंताकाका , अरविंद काकी , देशपांडे सर , थिटे वहिनी महाजन वहिनी आणखी खूप जणांनी बोलावलं होतं . कुठे कुठे नुसत्या गप्पा मारुन निरोप घेत शेवटी रात्री घरी आले . जणूकाही लग्न होऊन मी सासरी चालले असंच प्रत्येकजण बोलत होते . मला तो वेगळाच अनुभव होता .मग सगळी आवराआवरी केली आणि माझ्या कपड्यांची मोठी सुटकेस भरुन ठेवली . सगळ्यांचा निरोप घेऊन मी व काका बुधवारी दुपारी जेवणे करुन बार्शीला निघालो . वाड्यातील एकूण एक माणूस , भामा , भागाबाई , शांता , थिटे वहिनी , डोंगरे वहिनी, देशपांडे वहिनी आसपासचे असे खूपजण मला निरोप देण्यासाठी ताई आत्यांच्या कट्ट्यावर डांबाजवळ जमले होते . एकीकडे मला आनंद होत होता तर एकीकडे इतक्या प्रेमाच्या माणसांना सोडून जाणं माझ्या जिवावर आलं होतं , पण भविष्य मला खुणावत होतं . उराशी स्वप्नं बाळगून मी निघाले होते . आता नोकरी तर लागली नविन नविन तर रजा मिळणार नाही पुन्हा मला घेरडीला कधी यायला मिळेल असा विचार आला व मलाही भावनावश व्हायला झालं . सांगोल्यात आलो की आम्हांला बार्शी गाडी मिळाली दुपारी चार वाजता बार्शी स्टँडवर उतरलो आणि रिक्षा करुन पद्माकर काकांच्या घरी जाणार तोच समोर स्टेट बँक दिसली . काका म्हणाले
" बहुतेक या बँकेतच चंदू असावा , तो आहे का हे मी बघून येतो तू जरा इथेच थांब ".
मी स्टँडवरच बसून राहिले , आर्ध्या तासांने ते दोघेजण आले आणि आम्ही तिघेजण रिक्षांने पद्माकर काकांकडे पोहोचलो . पद्माकर काका घरी नव्हते ते उशीरा येणार होते . त्यांची मुलगी रजू , मुलगा बाळू व काकू होत्या त्यांच्या घरी चहापाणी झाले व मी आणि रजू बाहेर जाऊन बँक कुठे आहे ते पाहून आलो . रात्री गप्पा , जेवणं झाली . बऱ्याच उशीरानी पद्माकर काका आले आम्हांला दोघांना पाहून ते काकांंना विचारु लागले
" केव्हा आले भाऊसाहेब , मुलीला घेऊन आलास वाटतं , कुठलं स्थळ आहे ? आणि कुठे दाखवायला जायचंय ? काय करतो मुलगा ? "
काका हसत म्हणाले
" ते काम नाही , हीला महाराष्ट्र बँकेत नोकरी लागलीय , बार्शीत पोस्टींग मिळालीय . आणि उद्याच जाॕईन व्हायचंय ".
हे ऐकताच पद्माकर काका एकदम खूष झाले , त्यांना आश्चर्य वाटले त्यांना माझं कौतुक पण वाटलं . ते आम्हांला दोघांना म्हणू लागले
" आमच्या जवळ आलात राव तुम्ही ऱ्हावा आता बार्शीत "
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग उद्या लवकर उठावं लागणार म्हणत सगळे झोपी गेले . मला मात्र रात्रभर झोप लागली नाही . मला सारखी डोळ्यासमोर बँक दिसू लागली . सकाळी लवकर उठून आवरुन झालं की आम्ही लवकरच बाहेर पडलो . आग्रवालचे पेढे घेतले व ग्रामदैवत असलेल्या भगवंताला जाऊन आलो . जेवण केलं आणि दहालाच बँकेत जायला निघालो . बँकेची वेळ आकराची होती आणि आम्ही सव्वादहाला बँकेत हजर होतो ! उत्सुकता , आनंद , भिती , दबाव अशा संमिश्र भावना होत्या माझ्या .
15/12/1988 हा माझ्या नोकरीचा पहिला दिवस आजही जसाच्या तसा मला डोळ्यांसमोर दिसतो . एकूण तीसबत्तीस स्टाफ होता पण बँकेत एकही महिला नव्हती . पण माझ्याशी सगळेजण आपुलकीने मोकळेपणानं बोलत होते . काकांनी सगळ्यांच्या ओळखी करुन घेतल्या , सर्वांसाठी चहा सांगितला . नविन काम शिकताना दिवस कसा गेला मला समजले नाही . पद्माकर काकांनी त्या दिवशीपण रात्री चंदू काकाला जेवायला व गप्पा मारायला बोलावलं होतं . बँकेतील पहिला दिवस कसा गेला ही चर्चा करत रात्री सगळेजण गप्पा मारत बसलो तर आमचे काका दोन्ही काकांना सांगू लागले
" आता मी काय सांगतो ते जरा नीट ऐका , मी गेल्या दहा महिन्यापासून शरुसाठी मुलगा पहायचं थांबवलं होतं , आता तिला एकवीस पुर्ण होऊन बावीसावं सुरु आहे आधीच उशीर झालाय आता लग्नाची गडबड करावी लागणार . मी तिचं पोस्टींग कुठे मिळतंय ती वाट पहात थांबलो होतो . यांच्या बदल्या लवकर होत नाहीत असे मला समजले आहे . आता चंदू तू एक काम कर तुझ्या ओळखीने तू चौकशी कर आणि बार्शीत जेवढ्या सरकारी बँका आहेत त्यात कोणी लग्नाचं आहे का ही माहिती काढ . शक्यतो मुलगा बार्शीत नोकरीला असावा मोठ गाव आहे त्यामुळे मुलं असणारच . फार तर कुर्डवाडी , सोलापूर व पंढरपूर या ठिकाणी पण पाहू माहिती काढून ठेऊ पण आधी बार्शीत पाहू . नोकरीचं ठिकाण आणि सरकारी बँक या दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात बाकी फारशी अपेक्षा नाही . काहीही झालं तरी दोघांना एकत्र रहाता आलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे . पुढं अडकून रहायला नको . पैशासाठी कुटुंबाची वाताहात नकोय . मी दोन्ही बाजूंनी सालंकृत कन्यादान करुन द्यायला तयार आहे तेव्हा तुम्ही दोघं जरा लक्ष द्या . आता आधी उद्या परवा मी इथं भाड्याने घर बघतो , ते मिळालं की ताब्यात घेऊन घेरडीला जातो आणि आमचं बिऱ्हाड घेरडीवरुन इथे घेऊन येतो ".
हे ऐकून दोन्हीही काका हसू लागले पद्माकर काका म्हणाले
" किती घाई करताय राव ? आत्ता तर पोरीला नोकरी लागलीय जरा थांबा की , मी तर हिच्याबरोबरची असलेल्या आमच्या अंजूच्या लग्नाचा तर साधा विचार पण केलेला नाही अजून ".
त्यावर आमचे काका म्हणाले
" चुकताय तुम्ही ! नसली केली सुरुवात तर करा , निवांत बसून चालत नसतं . लग्नाचा बाजार फार विचित्र असतो. चौथा अनुभव आहे माझा वेळ कशी निसटून जाते समजत नसतं आणि तिची नोकरी , पैसा व लग्न याचा काहीही संबध नाही तीन मुलींची केली तसंच हीचं पण करुन देणार . "
अशा गप्पा माझ्यासमोरच चालू होत्या . माझं रुटीन सुरु झालं , काका व पद्माकर काकांनी दोन दिवस फिरुन एक भाड्याचं घर ठरवलं आणि काका बिऱ्हाड घेऊन यायला घेरडीला गेले .
काकांनी घेरडीत गेलं की सगळ्यांना सांगून टाकलं शरुला बार्शीत जर एकटीला ठेवलं तर तिच्या लग्नाचं बघायचं लांबत जाईल शिवाय एकटीला ठेवणं पण कठीणच आहे . आता माझ्या नोकरीचा तर राजीनामा दिलेलाच आहे , शेताचा पण व्याप जरा आवरता आणला आहे ते थोडंस करायला लावतो आणि आम्ही सगळेच बार्शीला रहायला जातो . सगळ्यांसाठी ते सोयीचं ठरेल . घेरडीतलं बरचसं मार्गी लाऊन आम्हांला चौघांना रहायला लागणारं सामान घेऊन आई-काका संजूला घेऊन आठ दिवसात बार्शीला आले . संजूला याचवर्षी शाळेत घातलं होतं व तिच्या बुजऱ्या स्वभावामुळे ती शाळेत जायला घाबरायची बरोबरीच्या मुलींमध्ये मिसळत नसे . तिला माझी खूप सवय होती . मग तिला परिक्षेपूरतं घेरडीला घेऊन येऊ व तिचा अभ्यास आम्ही घरी घेऊ हे शाळेत सांगितलं होतं .
घेरडीहून आल्यावर आई मला सांगू लागली
" काय सांगू तुला आगं , आज आम्ही निघताना पण आर्धा गाव जमा झाला होता , बरीच रडारडी झाली . तुझ्या जन्माला घेरडीत रहायला गेलो , एकवीस वर्षे झाली सवय झालीय सगळ्यांना . वाड्यात आपलं घर बंद असलं की करमत नाही म्हणतात सगळे . पण सगळे असही म्हणत होते की भाऊकाका काही शांत बसणारातले नाहीत सहा महिन्यात शरुचं लग्न लाऊन येतील घेरडीला परत ".
मग बार्शीत एकदोन दिवसात सामान लागलं आई-काका दोघेही खूष होते . बार्शी मोठ शहर होतं देवाधर्माचं भरपूर प्रस्थ होतं इथे . पद्माकर काका व त्यांच्या भावाचं अशी दोन घरं नत्यातली होती . संध्याकाळच्या वेळी बाहेर जाता येत असे . दोन दिवसांनी संध्याकाळी काकांनी पद्माकर काका व चंदू काकाला जेवायला बोलावलं . चंदू काका शनिवारी व बुधवारी सोलापूरला जायचा . इतरवेळी तो बार्शीत जेवायला मेसला जात असे त्याठिकाणी असेच एकटे एकटे असणारे इतर बँकेतील लोक असायचे . त्याठिकाणी बार्शीत चारपाच स्थळं असल्याचे त्याला समजले होते . तसंच इतर बँकेची कॕश भरायला लोक त्याच्याकडे यायचे . काकांनी जसं त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांने अनेकांना माझ्याविषयी सांगून ठेवले होतं .जिथे ठीक वाटतं तिथे फोटो पत्रिका पण देऊन ठेवल्या होत्या . काका घेरडीला गेले होते तेव्हा सोलापूरहून एक वयस्कर जोडपं मला पहाता येईल व लग्नासाठी चौकशी पण करता येईल म्हणून आमच्या बँकेत आले होते मला बोलल्यावर मी त्यांना वडिल गावाला गेलेत त्यांच्याशी बोला म्हणून सांगितले . बँकेत पाटील म्हणून होते ते मला व काकांना भरपूर बोलत असत . त्यांच्याकडे त्यांच्या बँकेत असलेल्या मुलाची माहिती व पत्ता माझ्या वडिलांकडे देण्यासाठी देऊन गेले होते . एकदोन दिवसात एकजण तर घरी आले व त्यांचा मुलगा नाशिकला बँकेत आहे व त्याच्यासाठी बँकेत नोकरी करणारी मुलगी हवी आहे तुमच्या मुलीचा फोटो पत्रिका द्या म्हणू लागले . आठदहा दिवसात जवळजवळ दहाबारा स्थळांकडून विचारणा झाली होती . इकडे चंदूकाका कडून समजलेल्या स्थळापैकी सेंट्रल बँकेतील एका मुलाला भेटायचं काकांनी ठरवलं .पद्माकर काका व काका दोघेजण बँकेत जाऊन चौकशी करुन आले . जालन्याहून चारच महिन्यापुर्वी मुलाची बार्शीला बदली झाली होती . घर परांड्यात होतं व बार्शी-परांडा रोडवर मूळ गाव आसू होतं शेती होती तिथे . काकां दोनतीनदा त्याला भेटले पत्रिका चांगली जमली होती पंधरा दिवसांतच बघण्यापर्यंत गोष्टी आल्या . तोपर्यंत ज्यांना विचारलं होतं ते आणि आपण स्वतःहून चौकशी करणारी पण बरीच स्थळं येत होती . काकांना हा अनुभव नविन होता . मुलांच्या स्थळामागे लागून वैतागलेले काका इथे लोक आपणहून विचारायला येत होते हे पहिल्यांदा त्यांना पचनीच पडलं नाही पुन्हा समजून चुकले की नोकरीवाल्या मुलीला लोक मागणी घालतात ते ! पण त्यांना तेही आवडलं नव्हतं पैशासाठी लोक मागे लागतात असे त्यांना वाटायचे . जरा वेगळच प्रकरण आहे म्हणत तोही घरात एक चर्चेचाच विषय झाला होता आई-काकांना या गोष्टीच नवल वाटत होतं . आता कोणतं स्थळ बघायचं हे आपल्या मनावर आहे हा अनुभव त्यांना सुखावणारा वाटत होता . इतक्या दहाबारा स्थळांमध्ये काकांच्या मनात सेंट्रल बँकेतला मुलगा भरला होता . तो परांड्याला जायला किती वाजता निघतो याची चौकशी करुन बरोबर बँक सुटायच्या वेळेस आईला घेऊन काका स्टँडच्या बाजूला फिरायला गेले व लांब उभे राहून आईला त्यांनी मुलगा दाखवला होता . दोघांनाही मुलगा आवडला होता . मग शुक्रवारी अमावस्या पुन्हा शनिवारी पौष महिना लागतो तर आधिच बघुया म्हणत मी बँकेत लागल्यावर बरोबर पंधराच दिवसांनी म्हणजे 29 तारखेला मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी परांड्याला दाखवण्याच्या कार्यक्रम ठरवला . आम्हांला परांड्यातून यायला शेवट गाडी आडेआठला होती मग लवकरच जाऊ म्हणत काकांनी बँकेत येऊन त्या पाटलांना सांगून मला चार वाजताच घरी नेलं व आम्ही सहा वाजता परांड्यात त्यांच्या घरी पोहोचलो . आणि पहाण्याचा कार्यक्रम झाला ! आणि घरात आल्यावर चर्चा सुरु झाली . काकांना मुलगा पसंत होता व मुलाकडून पण पसंती आहे हे त्यांच्या लक्षात आले होते . गाव व माणसं मराठवाड्यातली होती . मराठवाडा म्हणजे मागासलेली विचारसरणी . काका म्हणायचे
" मराठवाडा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत 33% विचारसरणी असते . सोवळं ओवळं व रितीरिवाज जास्त पाळतात . हुंडा देणंघेणं जास्त असतं , घरचा फारसा अंदाज आला नाही मुलगा व त्याचा भाऊच जास्त बोलले आई वडिल फारसं बोलले नाहीत . पण मी मुलाशी बोलातांना मला मुलगा स्वतंत्र विचाराचा , हुशार व चार गावचं पाणी पिला असल्याचे जाणवले . त्याचा धाकटा भाऊ पण बँकेत आहे . लग्नाची एक बहिण आहे सगळेच लग्नाचे आहेत त्यामुळे एखाद्या वर्षात तिघांचीही लग्नं होण्यासारखे आहेत . मराठवाड्यातील स्थळ असलं तरी पण एकूण सुशिक्षित फॕमिली आहे . भविष्याचा विचार केला तर शरुसाठी विचार करायला या सगळ्या आलेल्या स्थळात हे स्थळ विचार करण्यासारखं आहे मुख्य म्हणजे दोघांच्या नोकरीच गाव बार्शी आहे आणि दोन्हीही सरकारी बँका आहेत , मुलाची पाच वर्षे नोकरी झालीय त्यामुळे त्याला सगळी माहिती आहे . रजा नसते लग्न ठरलं तरी सहा महिने थांबावे लागणार असे तोच म्हाणालाय पाहू काय योग असेल तसं घडेल ".
दुसरे दिवशी आमावस्या की लगेचच पौष महिना लागला . एकूणच कार्यक्रमापुर्वीच पौष महिन्याविषयी परांडेकरांचे मत माहित असल्यामुळे हा महिना तरी निवांत बसावं लागणार हे आई-काका जाणून होते . त्यांच्यात चर्चा चालली .
" हाच काय तो मराठवाडा व आपल्या विचारसरणीतला फरक आहे इकडे पौषात , आषाढात लोकं लग्नं करतात आणि हे लोकं साधं लग्नाविषयी बोलत पण नाहीत ".
कारण लग्न ठरविणे हा काकांचा आवडीचा विषय होता लोकांची लग्न जमवण्यात सुद्धा ते पुढाकार घेत असत .
इकडे मायडीचे दुसऱ्यावेळेस दिवस भरले होते पृथा दोन वर्षांची होती व आई तिच्या बाळंतपणासाठी बदलापूरला जाणार होती . आई काकांना म्हणाली
" आता तुम्ही जरा शांत बसा , मी राणीचं बाळंतपण करुन येते . तुम्ही जाऊन मुलाची गाठ घेऊन त्यांच्याकडचा विचार काय आहे ते पहा मग पाहूयात ".
चंदूकाकाच्या मित्राने हे सुचविले असल्यामुळे त्याला पण चैन नव्हती त्या मित्राकडून मुलाचा विचार त्यांने जाणून घेतला . त्यांनी सांगितले
" पुढची बोलणी करण्यासाठी पौष महिना संपल्यानंतर वडिल पत्र पाठवणार आहेत ".
तोवर इतर स्थळांकडून दाखवायला येण्यासंबधी निरोप येत होते . पंढरपूर व सोलापूर दोन ठिकाणी आम्ही जाऊनपण आलो होतो . पण एकूणच परांड्याच्या मुलाविषयी आमच्याकडे एकमत झाले होते पण अजून पक्के झाले नव्हते . काकांना चैन नव्हती . त्यांना वाटले यांच्या नादात इतर स्थळांकडे दुर्लक्ष करतोय समजा इकडचा मेळ बसलाच नाही तर चालून आलेली पण चांगली स्थळं हातची जातील . ती दोन्ही मुलं बार्शीत नोकरीला नव्हती हाच फक्त अडचणीचा मुद्दा होता . व बाकी दोनतीन स्थळं बार्शीची होती त्यात गोत्र पत्रिका या अडचणी होत्या . त्यामुळे या स्थळाचं काय होतं ते पाहून बाहेरगावी मोर्चा वळवावा लागणार होता . प्रत्यक्षात त्याचे वडिल किंवा मुलाशी बोलणे झाले नव्हते . एक दिवस काका पद्माकर काकांना घेऊन मुलाचा तरी आंदाज घेऊ म्हणून पुन्हा एकदा सेंट्रल बँकेत गेले .
एकूणच मुलाचा बोलण्याचा सकारात्मक आंदाज दिसला व पोष महिना संपण्याची वाट पहावी लागणार हे स्पष्ट झाले .
काकांनी ठरवून टाकले आता त्यांच्याकडून काही येत नाही तोवर पुन्हा जायचे नाही . सध्या आई पण बार्शीत नाही .
13/1/1989 ला मायडीला दुसरी मुलगी झाली . काका बदलापूरला जाऊन आले . घेरडीत सुगीचे दिवसपण आले होते . माघ महिन्यात परांड्याहून पत्र आले आम्हांला मुलगी पसंत असून पुढील बोलणीसाठी यावे . आईपण अजून आलेली नव्हती तीला जाऊन आणावे . गोंदा मामा व फक्कड काकांना बोलवावे असा विचार करुन काकांनी पंधरा दिवसानंतरची तारीख त्यांना कळवली व स्वतः प्रत्यक्षात मुलाला भेटून कच्ची बोलणी करुन आले . त्यांनी मुलाला स्पष्टपणे सांगितले
" मी मुलामुलीचे कपडे व दोन्ही बाजूने लग्न करुन देईन , मुलीच्या अंगावर सोनं घालीन पण एकही पैसा हुंडा देणार नाही . पहिल्या तीन मुलींनाही मी हुंडा दिला नाही . मराठवाड्यात ही पद्धत आहे म्हणून सांगायला आलो आहे ".
यावर मुलांनेही यांना स्पष्टपणे सांगितले की आमचे पाहूणे हुंड्याची चर्चा करतील पण मी सांगून ठेवेन तुम्ही म्हणता तसंच लग्न ठरेल ".
हे बोलणे ऐकून काकांना खूप आनंद झाला ते म्हणाले
" रितीरिवाज , जुन्या चालीरिती पाळणारे लोक असेनात का पण योग्य अयोग्य पहाण्याची व निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये आहे हीच गोष्ट महत्त्वाची आहे ".
काकांनी गोंदा मामास याद्यांसाठी येण्यास कळविले व खळ्यासाठी घेरडीला गेले सगळ्यांना आता शरुचे लग्न जमवतोय असे सांगून फक्कड काकांना येण्यास सांगून तिकडूनच बदलापूरला आईला आणण्यास गेले.
मायडीचे बाळ खूप देखणं होतं . तिच्या बाळाचे नाव असेच तिने ठेवणीतले शोधून काढले
"दाक्षायणी "
तिथेही माझ्या लग्नाची चर्चा झाली . बारसं झालं आणि काका आईला घेऊन बार्शीला आले . ठरल्या दिवशी गोंदा मामा व फक्कड काका बार्शीला आले . मोहन आण्णाला प्रवासाची दगदग होत नव्हती म्हणून त्याला बोलावले नव्हते . पद्माकर काका , भगवान काका व हे तिघे परांड्याला जाऊन लग्न ठरवून आले . सहा महिन्यांचा माझा प्रोबेशन पिरीयड संपल्यानंतरची म्हणजे पंधरा जूननंतर लग्नाची तारिख काढायची तर तोवर उन्हाळ्याच्या सुट्टीत साखरपुडा व शालमुदीचा कार्यक्रम करण्याचे नक्की झाले !
अशा प्रकारे नोकरी लागली की दोनच महिन्यात माझे लग्न ठरले व तो आमच्या बँकेत चर्चेचा विषय ठरला !!
हे सर्व पाहून पद्माकर काकांनी अंजूसाठी स्थळ पहायला सुरुवात केली व पाठोपाठ तिचेही लग्न जमले !
प्रकरण 24 वे
17/04/2021
अविस्मरणीय आठवणी
काका जशी खटपट करत होते तसा योग जुळून आला होता . बार्शीपासून परांडा हे तीस किलोमीटरवर रहाण्याचं गाव तर आसू हे शेती असलेले मूळ गाव सोळा किलोमीटवर असलेल्या अनिल कुलकर्णी यांच्याबरोबर माझं लग्न ठरले आमच्या दोघांच्याही बँका बार्शीत त्यामुळे आम्ही बार्शीत राहू शकणार होतो व बार्शी तसे एकूणच भविष्याचा विचार करता स्थायिक होण्यासाठी सगळ्या दृष्टीने चांगले आहे असे काका म्हणायचे . आधी काका यांना " परांडकर " असे म्हणायचे नंतर सगळेजणच यांना परांडकर या नावाने संबोधू लागले . ग्रॕज्युएशन झाल्यानंतर जवळजवळ दीड वर्ष काकांनी माझ्यासाठी वरसंशोधन केले होते व हाती काही लागले नव्हते . एक वर्षाच्या गॕपनतंर मी बँकेत नोकरीला लागले की अनेक स्थळे समोरुन येऊ लागली व दीडच महिन्यात अगदी मनासारखे स्थळ जुळून आले त्यामुळे मी , आई-काका आणि सारे कुटुंब अगदी मनापासून खूष होतो . सर्वांसाठी हा एक नविनच अनुभव होता .
मला नोकरी लागून तीन महिने झाले होते . एक दिवस काकांनी मला समोर बसवले व म्हणाले
" तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कायम ध्यानात ठेव . तुला आता चांगली नोकरी लागली आहे त्यामुळे तू ती आयुष्यभर करशील आणि करावीस पण ती करत असतांना स्वतःच्या जिवाची हेळसांड करायची नाही . त्यासाठी मिळणाऱ्या पगाराचं नियोजन केलं पाहिजे . तुझा पैसा आम्हांला अजिबात नको आहे . इतर मुलींप्रमाणे तुझं सगळं आमचे आम्ही करणार . पण काही तत्व आयुष्यभरासाठी व तुझ्या भल्यासाठी लक्षात ठेव .
1) 25% पगार स्वतःसाठी वापरायचा . नोकरीच्या निमित्ताने होणारे कष्ट व लागणारा वेळ नेहमी मोजायचा . शारिरीक कष्टाची कामे स्वतः करायची नाहीत ती करवून घ्यायची आणि आपल्या जिवनमानाचा दर्जा त्याप्रमाणे ठेवायचा दमाछाक करुन घ्यायची नाही .
2) 25% पगाराची बचत झाली पाहिजे व ती बचत नेहमीच्या खर्चासाठी नाही वापरायची फक्त महत्त्वाच्या कामासाठी वापरायची .
3) 50% पगार तुमच्या मार्जीने खर्च करा .
हे काका सांगत असताना आई पण जवळ बसली होती . ती पण म्हणाली
" हे सांगतात ते अगदी बरोबर आहे आपल्या कष्टाची नेहमी आपणच किंमत केली पाहिजे . हे दोन वर्ष आधी रिटायर झाले तर पेन्शन व पगारातला फरक म्हणजे माझ्या शारीरिक व मानसिक त्रासाची किंमत आहे असं हे लोकांना सांगायचे . आणि अजून एक दुसरी बाजू पण लक्षात ठेव पैसा मिळवतेस त्याचा तोरा कधीही मिरवायचा नाही . सगळ्यांशी मिळून-मिसळूनच रहायचं . पैशाच्या जोरावर जर काही कुरापती काढशील तर त्यासाठी माहेरी थारा नाही . जिथल्या तिथं नीटच वागायचं ."
मी आपली लक्ष देऊन दोघांचेही सल्ले ऐकत होते व कायमस्वरुपी वागण्यात ताळमेळच घालत आले तसेच काकांचा सल्ला पण मी कायमस्वरुपी माझ्या मनावर कोरुन ठेवला आहे आणि ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून सिद्ध झालेय . आम्ही दोघेही बँकेत असल्यामुळे खूपजणांना आमचा प्रेमविवाह आहे का असेही वाटत असे . अगदी तोंडावर सुद्धा लोक तसं विचारत असत .
लग्नाला अजून चारपाच महिने अवकाश होता . यांचे रहाणे परांड्यात असले तरी बँकेसाठी रोज बार्शीला येणे होतेच . काका व पद्माकर काका एकदोनदा उगाचच त्यांच्या बँकेत जाऊन गप्पा मारुन आले होते . यांना काहीच न सांगता आमचे काका पद्माकर काकांना बरोबर घेऊन सहजच परांड्याला गेले होते तर नेमके हे त्यादिवशी रजेवर होते व समोर हेच आले . खरं तर काकांना थोडंस घरच्या लोकांशी बोलायचं होतं . पण सगळा पाहूणचार यांनीच केला ! काकांना थोडंस घरच्या लोकांच कमी बोलणं खटकत असे . तसं ते बोलूनही दाखवत .
त्यावेळी बँकेला शनिवारी हाफ डे असायचा त्यामुळे तीन वाजता बँक सुटत असे . एका गुरुवारी आई-काका व पद्माकर काका सहजच गप्पा मारत बसले होते विषय तर आमचाच होता . माझ्यासमोर काका आईकडे पाहून म्हणाले
" उद्या बँकेत जाऊन परांडकरांना शनिवारी बँक सुटल्यावर चहा घ्यायला घरी या असे सांगाव काय ? "
काय बोलतात याकडेच माझं सगळं लक्ष होतं पण मला काहीच माहित नाही अशा अविर्भावात मी संजूशी काहीतरी चाळा करत बसले होते . मग आई म्हणाली
" काय ग शरु ? बोलवायचं काय शनिवारी परांडकरांना घरी चहाला ?"
मी हसूनच माझी मूक संमती दिली . दोन दिवस मात्र मला उगाचच हुरहुर लागून राहिली कारण 29 डिसेंबरला पहाण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर मध्ये अडीच-तीन महिने सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या पण आम्ही दोघे त्यानंतर आजच भेटणार होतो . शनिवारी मी तीन वाजता बँकेतून घरी आले , साडी नेसलेली होतीच फ्रेश होऊन आवरुन वाट पहात बसले . तसं माझं काॕलेज संपल्यापासून साडी नेसणं मला बंधनकारक होतं . बँकेत जायचं तर रोज एक साडी नेसता यावी म्हणून काकांनी मला पाचसहा साड्या एकदमच घेतल्या होत्या . सकाळीच ठरवून मी त्यातली माझ्या आवाडीची आकाशी रंगाची साडी नेसलेली होती . आम्ही महाद्वार चौकात रहात होतो स्टँडपासून आमचं घर बरंच लांब होतं त्यामुळे भाड्याची सायकल घेऊन हे साडेतीन वाजता घरी आले . अशाप्रकारे दाखवण्याच्या कार्यक्रमातील भेट पहिली व सगळं पक्क झाल्यानंतर आमची दुसरी भेट झाली !!
आई-काका व आम्ही दोघे बराचवेळ गप्पा मारत बसलो चहापाणी झालं . यांचा स्वभाव थोडासा भीडस्त जाणवत होता पण बँक हा चर्चेचा एक विषय होता त्यामुळे बोलतबोलत दोघांचीही थोडी भीड चेपली होती . पुढे मग काकांनी त्यांना शनिवारी बोलवायचं आणि त्यांनी कधी फळं , तर कधी पेढा-कुंद्याचे बाॕक्स घेऊन यायचं हा जणू पायंडाच पडला . काका ते गेले की
" आजची भेट परांडकरांना .... एवढ्या रुपयांना पडली "
असे मजेने म्हणायचे . 1 मे ला आमचा साखरपुडा करायचं ठरलं . मायडी एप्रीलमध्ये पहिल्यांदा बाळाला बार्शीला घेऊन येण्याचे ठरले होते व बार्शीचा उकाडा आम्हांलाच असह्य होत होता मग बाळाला त्रास होईल म्हणत कुलर घ्यायचा ठरला तर तोही काकांनी यांच्या पसंतीने घेतला . मायडी आल्यानंतर मग माझ्या पसंतीने तिच्या अनुभवाने साखरपुड्याची साडी , आंगठी ही सगळी खरेदी झाली . पुन्हा सुट्ट्या , साखरपुडा म्हणून तायडी पण बार्शीला आली मग तिला भेटायला म्हणत असं काही ना काही कारणांनी काका यांना घरी बोलवायचे त्यामुळे आमच्या खूप गप्पा व्हायच्या .
"आग्रवालची रबडी "
हा जेवणासाठी बेत ठरलेला असायचा त्यामुळे लग्नापुर्वीच आमची चांगलीच ओळख झाली त्याकाळात असे मुलामुलींचे भेटणे क्वचीतच होई . तायडीच्यावेळी भाऊजींच पत्र यायचं तर मायडीला पण पत्रं यायची शिवाय दोनतीनवेळा त्यांच्या भेटीपण झाल्या होत्या . पण माझी मात्र आठवड्यातून एकदा तरी यांच्याशी भेट होत असे . एका गावात असल्यामुळे ते शक्य झाले होते पण चिडवण्यासाठी सगळ्यांना तो एक विषय मिळाला होता . लग्न होईपर्यंतचे अनेक गमतीदार प्रसंग आज जरी आठवले तरी भूतकाळात रमायला होतं . तायडी आली तेव्हा मायडी आधीच आलेली होती हे आल्यावर आम्ही दोघं बाहेरच्या घरात गप्पा मारत बसलो होतो आधी तायडी मग मायडी दोघीजणी बाहेर येऊन बसल्या मग आमचं बोलणं थांबलं व हे पेपर चाळू लागले मग दहा मिनीटांनी तायडी यांना म्हणाली
" परांडाकर तुम्ही पेपर उलटा धरलाय ".
आणि एकच हशा पिकला .
लग्नाच्या बाबतीत आमच्या घरातील वेगाने होणाऱ्या घडामोडी पाहून पद्माकर काका थक्क झाले होते . ते काकांना म्हणायचे
" इतके पटापट निर्णय कसे घेता तुम्ही , मला आश्चर्य वाटतं राव !"
काका त्यांना म्हणे
" मी घाई नाही करत , बरोबरच करतोय तुम्हीच थंड बसलात राव . तुम्ही आता अंजूचं लग्नाचं पाहायला हवं . तर वेळेत होईल बघा ."
आणि गंमत म्हणजे त्यांनी त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली व माझ्या पाठोपाठ अंजूचं पण लग्न ठरले त्यातही बराचसा पुढाकार आमच्या काकांनीच घेतला होता व तिचाही साखरपुडा आणि लग्न माझ्या मागोमाग झाले होते.
आमच्या साखरपुड्याला घेरडीहून उषा वहिनी व कुंदा तर गोंदा मामा मामी सोलापूरहून आले होते . परांड्याचेही बरेच लोक आले होते यांचे सगळे मामा मावश्या व घरचे ! यांची बहीण मात्र आली नव्हती हे अगदी सर्वांना विशेषतः मला खूप खटकलं होतं . घेरडीच्या मानाने बार्शीत खूपच सोयी होत्या . सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत होत्या त्यामुळे हार , तुरे , सनई अशा सगळ्या जामानिम्यात साखरपुडा अगदी दणक्यात झाला यावेळी नवऱ्या मुलाला सासुरवाडीहून अंगठी व ड्रेस केला जातो त्याला मराठवाड्यात
" शाल मुदी "
या नावाने संबोधले जाते तोही कार्यक्रम अगदी दणक्यात झाला . आमच्याकडे सर्वांसाठी हा शब्द मात्र नविन होता .
साखरपुड्याच्या दुसरे दिवशी मायडी जाणार होती मग तिच्याशी फॕशनेबल साड्यासंदर्भात काहीतरी बोलायचं राहिलं होतं म्हणून सकाळी दहालाच हे बँकेतील मित्राची लुना घेऊन घरी आले . घरात कुजबूज सुरु झाली
" काल साखरपुडा झालाय आता शरुला गाडीवर न्यायला काय हरकत म्हणूनच परांडकर आले असावेत . पण एकदा गाडीवर न्यायची मुभा दिली तर सारखेच गाडी घेऊन आले तर काय करावं त्यापेक्षा काही बोलूच नये . "
असा एकमतानी स्वयंपाकघरात विचार झाला . फक्त हवापाण्याच्या गप्पा झाल्या व त्यांची बँकेची वेळ झाली की ते निघाले व नंतर मी माझ्या बँकेत चालत गेले हे थोडं की काय म्हणून जाताजाता ज्योतीला क्लासपर्यंत न्यायची सुचना झाली . खरंतर जाताना रस्त्यावर आधी माझी बँक होती . पण सर्वांच्या धाकाने आम्ही गुपचूप बसलो ! आणि घरात एकच हशाचा गोंधळ झाला .
असाच अजून एक मजेशीर किस्सा !
आमच्या बँकेत हत्तीवाले म्हणून मुसलमानाचे एक सहकारी होते . मे मध्ये रमजान ईदचा सण होता . ते दरवर्षी सर्वांना ईददिवशी घरी बोलवयचे , यावर्षी मी नविन आलेली होते तर माझे लग्न ठरले आहे शिवाय क्लेरींगच्या निमित्ताने यांची व त्यांची स्टेट बँकेत दोनदा भेटपण झाली होती तर आता हे महाराष्ट्र बँकेचे पाहूणे झाले तुम्ही दोघांनी सगळ्या स्टाफबरोबर आलं पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडून झाला . त्यादरम्यान मी शिवाजीनगर शाखेत डेप्युटेशनवर होते . ती शाखा दोन शिफ्टमध्ये होती व संध्याकाळी साडेसात वाजता सुटायची . काका शेतीच्या कामानिमित्त घेरडीला गेले होते बार्शी तसं आम्हांला नविन होतं म्हणून हे मला न्यायला बँकेत यायचे रिक्षाने घरी सोडून मग स्टँडला जायचे . ज्योतीचे बार्शीतच दहावीचे व्हेकेशन क्लास सुरु होते . मी आधीच ईदच्या आमंत्रणाविषयी घरी सांगितले होते व त्यादिवशी दुपारी बँकेत जातांना पण हत्तीवालेंच्या घरी जायचंय असे आईला सांगून गेले होते . हे त्यांची बँक संपली की साडेसहाच्या दरम्यान माझ्या बँकेत आले , हत्तीवालेंचे घर बँकेच्या जवळच होते आम्ही सगळेजण लवकरच काम संपवून मिळूनच चालत हत्तीवालेंच्या घरी गेलो होतो . तिथे दोन्ही शाखेतील सगळा स्टाफ होता सगळेजण चेष्टा मस्करी करत गुलगुले , भजी , शिरखुर्म्यावर ताव मारत होते . गप्पात भरपूर वेळ गेला . यांना शेवट गाडी दहाला होती म्हणून आम्ही घाईघाईने साडेनऊला निघालो . रिक्षा मिळेपर्यंत गप्पा मारत चालत निघालो बराच वेळानी रिक्षा मिळाली आम्ही रिक्षात बसणार तोवर समोर सायकलवर पद्माकर काकांचा बाळू मी अजून कशी बँकेतून आले नाही म्हणून मला पहायला आईच्या सांगण्यावरुन आला होता . तो म्हणाला
" चल चल बँकेत आज खूप उशीर झालाय तुला , काकू काळजी करत बसल्यात , वाट पहात आहेत तुमची "
आम्हांला काहीच समजले नाही . आम्ही रिक्षाने घरी आलो दारातच रिक्षा थांबवून हे खाली उतरले . समोर आई , ज्योती , संजू , पद्माकर काका व त्यांची मुलगी रजू असे सारेजण चिंतातूर नजरेने माझ्या वाटेकडे डोळे लावून उभे असलेले दिसले. आम्हांला काही समजेना . यांच्या गाडीची वेळ होत आली होती त्यामुळे हे म्हणाले
" सगळा स्टाफ होता हत्तीवालेंकडे , मग गप्पांमधून उठता पण येईना शेवटी माझी शेवट गाडी दहाला आहे म्हणून निघता आलं , गाडीची वेळ झालीय निघतो मी ".
असे म्हणून हे रिक्षात बसून निघून पण गेले .
आम्ही हत्तीवालेंकडे जाणार हे आई पुर्णपणे विसरुन गेली होती व रोज आठ वाजता शरुला परांडकर घरी सोडून परांड्याला जातात . आज खूप उशीर झाला एकतर काका घरात नाहीत नविन गाव म्हणत नऊ नंतर तिचा धीर सुटला म्हणून तिने पद्माकर काकांचे घर गाठले होते व तिथे जाऊन काकांच्या मुलाला तिने मला पहायला पाठवले होते व घरी परत येऊन सगळेजण माझी वाट पहात होते . यांच बोलणं ऐकलं व एकदम आईच्या लक्षात आलं की आज हे हत्तीवालेकडे जाणार होते आणि ती एकदम डोक्याला हात लाऊन मीच विसरले असे म्हणत हसू लागली . त्या सर्वांना समजले पण मला काहीच कळेना मग पद्माकर काका म्हणाले
" भाऊसाहेब घरी नाहीत आणि रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही हिंडत बसलाय असा वहिनी म्हणाल्या म्हणून मी पण काळजीने आलो बघ ".
बाळू , रजू , ज्योती सगळे लहान होते पण सगळ्यांना समजत होते . झाला प्रकार सगळ्यांना समजला आणि एकच हशा पिकला चिडवाचिडवी सुरु झाली .
आमच्या लग्नाची तारीख माझा प्रोबेशन पिरीयड संपल्यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतरची काढली 27 जून 1989 रोजी दोन्हीकडच्या लोकांना सोलापूर सोयीस्कर होईल म्हणत सोलापूरला लग्न करुन द्यायचे ठरले . माझ्या साड्या व यांचे कपडे काकांनी सोलापूरला खरेदी करायचे ठरविले . त्यानिमित्ताने सोलापूरला जाणं व्हायचे आम्हांला चंदू काका व गोंदा मामा ही दोन घरे होती . हे व त्यांचे भाऊ म्हणजे सुनिल भाऊजी कपडा पसंतीसाठी आले होते तो दिवसभर आम्ही फिरत होतो . सोनं खरेदी मात्र सांगलीला गाडगीळांकडे तायडीच्या पसंतीने झाली .
अजून एक किस्सा , असेच एका शनिवारी हे घरी आले होते व छोट्याशा स्टूलवर टेबल फॕन लावलेला होता मी यांना चहा देऊन मागे वळले तसा माझा पदर फॕनमध्ये अडकला व मी ओढली चालले तसं पटकन यांनी बटण बंद करुन मला सावरलं तर आई म्हणाली
" आता काय करावं बाई सगळं सिनेमा स्टाईलनच सुरु आहे बाबा लवकर लग्न व्हायला पाहिजे . "
तोही एक चर्चेचा विषय झाला .
लग्नापुर्वी आठवडाभरापासून हे रजेवर होते त्याआधी शनिवारी हे घरी आले होते . आता लग्नातच भेट होणार असे वाटले होते . थोडीशी खरेदी करायची राहिली म्हणून आई-काका मंगळवारी सोलापूरला जाणार होते व बोलतबोलत काकांनी यांना सांगितले . हे गेल्यावर काकांना उगाच वाटलं आपण नसतांना मंगळवारी जर परांडकर आले तर ? त्यापेक्षा शरु बँकेतून यायच्या वेळेला पद्माकर काकांच्या बाळूला घरी येऊन बसायला सांगावे असं ठरवून त्यांनी त्याप्रमाणे बाळूला सांगूनपण ठेवले . मी तीन वाजता लंच ब्रेकला अर्धा तास घरी येत असे त्याप्रमाणे मंगळवारी मी घरी आले माझं खाणं झाल आणि दारावरची कडी वाजवलेला आवाज आला मला वाटलं बाळूच आला मी दार उघडलं तर दारात हे उभे ! मी जरा गडबडून गेले व त्यांना मी म्हणाले
" तुम्ही रजेवर असताना कसे काय बार्शीला आलात "
ते म्हणाले
" गप्पा मारायला आलोय . येऊ का घरात ?"
मी याया चहा करते असं म्हणाले पण माझी पुरती गाळण उडाली होती . मी चहा ठेवला व डब्यातली चहा पावडर संपली होती घरभर शोधलं तर पावडरचा मोठा डबा काही मला सापडेना . ते पाहून हे म्हणाले
" एवढं घाबरायचं कारण नाही , मी जाऊ का ? का चहा पावडर विकत आणून देऊ "
मला कसतरी वाटलं पण यांनी पावडर आणायला गेलं तर बर होईल असं वाटून चहा पावडर आणायला त्यांना बाहेर पाठवलं आणि मला हुश्श्य झालं . ते येईपर्यंत मला घरात पावडर सापडली मी ते येईपर्यंत चहा तयार केला . त्यांनी पाव किलो पावडरचा पुडा माझ्या हातात ठेवला व मी दुसऱ्या हाताने चहाचा कप त्यांच्या हातात ठेवला . तोवर माझी बँकेत जायची वेळ झाली . मी त्यांना म्हटलं बँक सुटल्यावर गप्पा मारायला या ते हो म्हणून गेले व मी बँकेत गेले . मी बँक सुटल्यावर घरी आले पाठोपाठ हे आले मी दार उघडत होते तोवर पद्माकर काकांचा बाळू पण हजर झाला !!
आई-काका रात्री आल्यावर मी सगळं सांगितल्यावर सगळे हसू लागलो काका म्हणाले
" चला परांडकरांना पाव किलो चहा पावडरच्या किंमतीत एक कप तयार चहा मिळाला !"