घेरडीतील चैत्रागौर
तसं दहावीनंतर शिक्षणाच्या निमित्ताने मला घेरडी सोडून चाळीस वर्षे होऊन गेली . पण घेरडीचे नाव निघाले की मन एकदम प्रफुल्लीत होते आणि फुलपाखराप्रमाणे विहार करते . घेरडीतील प्रत्येक सणाच्या , प्रत्येक प्रसंगाच्या आठवणींनी मन आगदी तुडुंब भरलेलं आहे . मग तो दसरा असो की दिवाळी किंवा श्रावण असो की महाशिवरात्र घेरडी सारख्या सणाच्या आठवणी कुठेच नसतील असं माझं भाबडे मन म्हणते .
आत्ता चैत्र महिना सुरु झाला आणि कुठे कुठे होणारे हळदीकुंकू , देखावे प्रत्यक्ष आणि व्हॉट्सॲप मुळे तर अगदी हातातच पाहायला मिळतात . असाच आज प्रत्येक पौर्णिमेची महती सांगणारा देखावा मायडीने पाठवला . दोन दिवस सुट्टीमुळे मी पुण्याला निघाले होते , ट्रेनमध्ये सहज मोबाईल चाळत असताना मी तो पहिला आणि मी एकदम भूतकाळात गेले . चैत्रागौर म्हणलं की अनेक आठवणींनी माझ्याभोवती फेर धरला . चित्रपट सरकावा त्याप्रमाणे ते दिवस माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले . मला पुण्याला पोहोचायला चार तास लागणार होते म्हणलं चला आपण त्या आठवणी प्रवासात जाता येता लिहूनच काढाव्या आणि लगेच मी लिहायला सुरुवात केली .
घेरडीमध्ये कोणताही सण आला की त्याची सार्वजनिक चर्चा वाड्यात मधल्या अंगणात सायंकाळी पाच वाजता सगळ्या बसल्या की ठरलेली असे . चार दिवसावर पाडवा आला की लगबग सुरु होई . आता पहिल्या तिजेला गौर बसवायची आणि पुढे तिचं मोठं हळदी कुंकू करायचे हा प्रघातच होता . त्याची पूर्वतयारी म्हणजे पाडव्यापूर्वीच घराची स्वच्छता केली जायची . गौरीचा लाकडी साचा वर्षभर घरात खणाला लोखंडी कडीला सुतळीने बांधून टांगलेला असे तो साचा पाडवा झाला की खाली काढून घेतला जाई . मग पहिल्या तिजेला आईचं स्वतःच आणि मुलींचे पण न्हाऊन माखून होई मग तेवढ्याच प्रेमाने जणू माहेरवाशीण असल्याप्रमाणे त्या लाकडी साचाला आई तेल लाऊन कोमट पाण्याने धूत असे . देवाची पूजा झाली की त्याच्या शेजारी छोट्या पाटावर ती गौर खण पांघरुन बसवली जाई . तिला कुंकू लाऊन गळ्यात साखरेच्या गाठीचा हार , मंगळसूत्र , गेज वस्त्र , सुवासिक फुलांचा गजरा असा साज करुन तिचे रुपडे सजवून तिची प्रतिष्ठापना केली जाई . तिला नैवेद्याला वळवटाची खीर आणि मुरडीचा कानोला केला जाई त्याचबरोबर कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ असे . त्यामुळे दुपारच्या जेवणाचा बेत फक्कड होत असे , नुकत्याच आमच्या परीक्षा संपलेल्या असत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झालेल्या असायच्या . कधी कधी आक्की , तायडी त्यांची छोटी छोटी बाळं घेऊन आलेल्या असायच्या . थोडी विश्रांती झाली की दुपारी दोन अडीच नंतर आम्ही वाड्यातील सगळ्या मुली मी , मायडी , ज्योती , विद्या , कुंदा , हरणी , चिमी , बाळी , मिनी , स्वाती , सारिका अशा सगळ्या बहिणी भाच्या वाड्यात एकत्र जमायचो आणि एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे शेतं लावण्याचा !
त्याकाळी गौरीच्या देखाव्यात खरीखुरी शेतं ठेवण्याची पद्धत होती . त्यासाठी पंधरा दिवस आधी दोन समान आकाराचे खोलगट कुंडे किंवा थाळ्या त्यात उन्हात रापलेली काळी माती पसरून एकात शक्यतो जोडगव्हाच्या खपल्या टोचल्या जायच्या आणि दुसऱ्या भांड्यात कोणतेही धान्य असे ओळीने जवळजवळ टोचायचे आणि हलक्या हाताने पाणी घातले जाई . सकाळच्या वेळी त्याला ऊन मिळावे म्हणून अंगणात ठेवले जाई . वसंत ऋतू असल्यामुळे तिसरे दिवशी त्याला धुमारे फुटलेले असत ते पाहून आगदी हरकायला होई . आम्ही सगळ्या मुली एकमेकींकडे जात
" तुझं शेत केवढे आले माझे केवढे आले "
अशी चर्चा करत असायचो . साधारण पंधरा दिवस हा उद्योग चालायचा , धान्य थोडंसं मोठं झाले की आई तर तृप्त चेहऱ्याने , कौतुकाने त्या हिरव्याकंच शेताकडे पाहून म्हणायची
" यावर्षी शेतात धान्य कसे येणार त्याचे हे प्रात्यक्षिक आहे बरं ".
कोणी गावाला जाणार असेल तर त्यांचे हळदीकुंकाचे नियोजन लवकर असे नाहीतर शक्यतो मधली तिज झाल्यावर तो घाट असे . चांगला दिवस पाहून त्यादिवशी ठरवले जाई . ती तयारी सुद्धा अगदी आठवडाभर चालायची . आई आवर्जून चाफा हरभरा आणायची आदले दिवशी मोठ्या पितळेच्या पातेल्यात आडशीरी हरभरे पाण्यात टाकायची सकाळी मागच्या दाराला ते उन्हात ठेवायचे दुपारी तीन वाजेपर्यंत हरभरे टम्म फुगायचे ते दूरडीत उपसून ठेवायचे . कैरीची डाळ करण्यासाठी सकाळीच हरभरा डाळ भिजत घातलेली असायची ती पण उपसून ठेवायची आणि इकडे गौरीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम होई . समईला तो साचा बांधून काठापदाराची साडी नेसवली जायची मग मेण लाऊन नथ , मेण लाऊन कुंकू , गळ्यात कोल्हापुरी साज घालून गौर सजवली जाई . मग बाकी तयारी जसं समईत तेलवात करुन ठेवणे , अंगणात मोठा बल्ब सोडणे त्याचबरोबर हमखास वादळवारा सुटतो , अवकाळी पावसाचा सडाका येतो मग लाईट जातात म्हणत कंदील , चिमण्या पण स्वच्छ करुन , वाती काढून , रॉकेल भरुन ठेवल्या जायच्या !
आमची भावकीची घरे , बाकी नोकरीच्या निमित्ताने गावात असलेली शिक्षक मंडळी , बँकेचे लोक , सोनाराची चारपाच घरे असे जवळजवळ चाळीसएक बायका , मुली हळदी कुंकाला यायच्या . बरेचदा एका दिवशी अनेक ठिकाणी हळदीकुंकू असे . गौराईचे हळदीकुंकू म्हणजे छोटीशी दिवाळीच जणू !
रव्याचे लाडू , करंज्या , शंकरपाळ्या हे पदार्थ समोर ठेवण्यासाठी केले जायचे तर खायला तिखट काहीतरी बरोबर हवे म्हणून चिवडा , चकली , शेव पण केली जायची .
इकडे दुपारी दोन नंतर काकांच्या मदतीने आम्ही मुली सोप्यात खुंट्याना दोऱ्या बांधून त्यावर साड्या टाकून मखर तयार करण्याची सुरुवात करायचो . कमरेच्या उंचीचे धान्याचे पिप ठेऊन त्यावर पाट ठेऊन मुख्य आसन तयार होई समोर भली थोरली लोखंडी पेटी पुढे क्रमाने छोट्या पेट्या ठेऊन पायऱ्या करायच्या त्यावर छानशी शाल टाकायची आणि सुंदर मखर तयार होई . वाड्यात ज्यांच्या घरी त्यादिवशी हळदीकुंकू नसेल त्या मुली रांगोळी आणि सजावटीसाठी मदतीला असायच्या . आदले दिवशीच संध्याकाळी महादेवाला गेले की येताना सोनाराच्या मळ्यात मिळाल्या तर दोन तोतापुरी कैऱ्या किंवा पाच वाजता भाजीवालीकडून चोच असलेल्या दोन कैऱ्या आणायच्या त्याला थोडसं मेण लावून त्यावर कुंकू लावायचे , काजळाचे नाक डोळे काडीने काढायचे आणि काचेच्या ग्लासमध्ये गहू घालून त्यावर त्या पोपट म्हणून दोन्ही बाजूला ठेवायच्या , मोठ्ठे कलिंगड आणून ते कलात्मकतेने कापून दोन्ही बाजूला ठेवायचे . दोन्ही बाजूला स्टीलचे डबे ठेवून त्यावर आईने तिच्या लग्नात विणलेले पांढरेशुभ्र वेलदोडा डिझाईनचे रुमाल टाकायचे त्यावर लाडू , करंजीच्या डिश ठेवायच्या . कपाटावर पेटीत कपड्यात बांधून ठेवलेली खेळणी समोर मांडण्यासाठी निघत . साधारण अशी तयारी घरोघर होत असे . पण हटके काहीतरी करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा . मग कोणी परातीत पाणी घालून ते संथ झाले की त्यावर बुक्का चाळायचा आणि त्यावर पांढरी शुभ्र रांगोळी काढायची , तर कोणी छोटासा झोपाळा करुन त्यावर गौर बसवायचे , तर कोणी आंब्याचे फाटे लाऊन आमराईत गौर बसवायचे आशा वेगवेगळ्या कल्पना करुन सजावट केली जायची .
खिरापतीसाठी कैरीची डाळ असे आईची डाळ पण फार खमंग असे . डाळ मोठसर वाटून त्याला थोडासा कैरीचा कीस लावायचा चवीप्रमाणे मीठ , साखर , कोथिंबीर घालून तिची खास भरलेल्या मिरचीची हिंग , जिरे घालून चरचरीत फोडणी द्यायची .
सगळे आवरलं की कोपऱ्यात स्टूल ठेवायचा त्यावर पण कशिद्याने विणलेला रुमाल टाकून ताट ठेवायचे त्यात स्वच्छ पितळी पंचपाळे , चांदीची अत्तारदाणी , गुलाबदाणी , पान सुपारी तर ट्रेमध्ये कैरीची डाळ घालून पाने आणि स्टीलच्या पाटीत ओटीसाठी हरभरे भरुन ठेवलेले असत . सकाळीच कोळ्याच्या भागाबाई , लाह्यव्वा किंवा परटाची शांता यांच्याकडून घरोघरी हळदीकुंकवाची आमंत्रणे जात असत . आईची चार वाजेपर्यंत सगळी मांडामांड व्हायची आणि स्वतःची आवर आवर करुन आई गौर मखरात आणून बसवायची समोर , पाणी भरलेले तांब्या भांडे ठेवायचे , मंद समई लावायची , मनोभावे पूजा , डाळ पन्हयाचा नैवेद्य करुन येणाऱ्या बायकांच्या स्वागताला ती पाच वाजता नटून थटून सज्ज असे .
सात्विकतेचा शृंगार ल्यायलेले ते दृश्य मनोहर भासे ! आम्ही मुली पण सागरवेणी , पाचपेडी वेणी किंवा काहीतरी केसांची फॅशन करायचो , मनात आले तर साडी , कधीकधी नऊवार साडी नाहीतर ड्रेस घालून तयार व्हायचो . छाया ताई , सोनाराच्या मळ्यातल्या बायका , डोंगऱ्याच्या गीता वाहिनी शेतातून येत असत मग दिवसाबरोबर परत पोहोचले पाहिजे म्हणत त्या लवकर यायच्या आणि थोडस लांब राहणाऱ्या उषा काकी , दिनकर काकू , रमा काकू , अरविंद काकी साडेपाच सहापर्यंत यायच्या आणि बायकांचे आवाज आले की आवरून तयार असलेल्या वाड्यातल्या प्रभा काकू , उषा वाहिनी , पिलू वाहिनी , शांता वाहिनी , पमा वाहिनी , वाड्याच्या आसपास असलेल्या ताई आत्या , नर्सबाई , सुमन वाहिनी , डोंगरे वाहिनी , वृषाली वाहिनी , देशपांडे वाहिनी , वाईकर वाहिनी , महाजन वाहिनी हजर होत आणि एकत्र सगळ्याजणी जमत असत . अंगण आगदी उत्साहाने फुलून येई . निमित्त फक्त हळदी कुंकवाचे असायचे खरं तर ते एक स्नेहसंमेलन असायचे . वाडा गच्च भरायचा आळीपाळीने बायका सोप्यात येऊन हळदीकुंकू घेऊन पुन्हा अंगणात सतरंजीवर येऊन बसत . सगळ्यांच्या आनंदाला भरतं यायचं , चेष्टा मस्करी , निखळ हास्याचे फवारे उडत . आधी बसून गौर पहायची , देखाव्याचे निरीक्षण करत डाळ खायची मग देखाव्याचे , डाळीच्या चवीचे कौतुक करायचे आणि मग मोठ्ठा कार्यक्रम असायचा तो म्हणजे उखाणे घेणे . घेरडीच्या बायका भारी हुशार आणि हजरजबाबी होत्या . त्यांचे उखाणे इतके विविधतेने नटलेले असत , काहीजणी शीघ्रकवी असल्याप्रमाणे तिथल्या तिथे तयार करून घेत तर काहींचे अलंकारिक असत , उखाणे घेण्याची जणू चढाओढ लागत असे . आम्ही मुली मग इकडून तिकडे करत मजा लुटत असायचो त्यात उन्नती , भारती दोन्ही सारिका सोनाराच्या मुली यांची भर पडलेली असे . एखादी माहेरवाशीण आलेली असे तर नवीन कोणाकडे गोड बातमी आहे ही बित्तंबात चर्चा ठरलेली असे .
संध्याकाळी साडेसात वाजता सगळ्या बायका येऊन गेल्या की वाड्यातील सर्व पुरुषांना गौर पहायला बोलावले जाई मग पंत काका , फक्कड काका , मोहन अण्णा , राजाभाऊ दादा , रमेश अण्णा , सुरेश बापू या मोठ्या मंडळी बरोबर सुधीर , सुनील , पंपू , सचिन , बबलू , छबलू ही मुलेही असत तसे तर दुपारपासून मुलांच्या येरझाऱ्या असायच्या . या सगळ्यांना कैरीची डाळ आणि हरभरे खायला दिले जायचे मग चहा किंवा सरबत होई . तोपर्यंत आई घरात सहा सात ताटे तयार करी प्रत्येक ताटात सगळं फराळाचे , कैरीची डाळ आणि भिजवलेले हरभरे त्याची उसळ करून ती पण घालून ते वाड्यात सर्व घरी , आसपास एकदोन ठिकाणी , धोंडीआप्पा , निलाबाई , भागाबाई आणि शांता यांना दिले जाई . ही देवाण घेवाण प्रत्येक घरून होत असे . त्यादरम्यान घरी रोजच खिरापत आणि भिजवलेले हरभरे येत असत मग तेल , मीठ घालून हरभरे परतून खाण्याचा आनंद आम्ही घेत असू .
माझं लग्न झाले मग त्यात खंड पडला . एकदोन वर्षांनी मनीष आठ महिन्यांचा झाला तेव्हा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे , महावीर जयंती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आशा मला लागून सुट्ट्या आल्या . आणि आम्ही अचानक घेरडीला जायचे ठरवले . त्याकाळी मोबाईल नव्हते आणि घरोघरी फोन पण नव्हते निरोपाची देवाण घेवाण पत्राद्वारे व्हायची . आम्ही अचानकपणे दुपारी घेरडीत टपकलो . काका बाहेरच भेटले ते मनिषला घेऊन भरभर पुढे गेले वाड्याच्या दरवाजात सगळी बच्चे कंपनी होती
" शरु आत्या आली "
असा गोंधळ ऐकताच आई लगबगीने उठली लगेच भाकरी तुकडा घेऊन दारात हजर ! आम्हाला पाहून आई काकांना इतका आनंद झाला मुख्य म्हणजे बाळाला पाहून आईचा आनंद गगनात मावेना . जोडून सुट्ट्या आल्या म्हणून आलात , आता आलाच आहात चार दिवस राहाल तर आपण करु हळदीकुंकू असे आईने ठरवले . आणि आगदी उत्साहात , जोषात तिची तयारी सुरु झाली आणि नेहमीप्रमाणे उत्साह होता तो दुप्पट झाला . आनंदात ते हळदीकुंकू पार पडले . नोकरीमुळे माझे फारसे राहणे पडत नसे तर आईने सांगुनच टाकले लागून आलेल्या सुट्टीत घेरडीला येत जावा मग आम्ही पण जायचो . आई काका घेरडीत असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी आम्ही जायचो आणि आई हळदीकुंकू करायची .
आता देवीच्या निमित्ताने घेरडीला जाणे होते पुढची पिढी पण सगळे उत्सव आगदी जोशात साजरे करताना दिसतात . व्हॉट्सअँप ग्रुप आहे त्यात माधुरी , सारिका , अंता काकांच्या सूना , डोंगऱ्याच्या सूना , बाळू काकांच्या सूना , आणि बऱ्याचणी संक्रांत , वेळ अमावास्या , नवरात्र आणि बरेच उत्सव दिसतात ते पहिले की मन प्रसन्न होते एकप्रकारची ऊर्जा मिळते .
सौ. सरिता कुलकर्णी
बार्शी
9421607248
No comments:
Post a Comment