सिंगापूर व्हिएतनाम ट्रीप
एक अविस्मरणीय अनुभव
*खास बँक सहकाऱ्यांसाठी माझं मत*
आपल्याला बँकेने LFC ही सुविधा जी दिलेली आहे त्याचा पुरेपूर वापर हा देशभरातील विविधता पाहण्यासाठीच करावा . अलीकडे बँकेने LFC encashment जी देऊ केली आहे ती चूक आहे असे मला वाटते . तरीपण आपण स्वतः निग्रहाने ठरवून त्या पैशाचा वापर त्यात आणखी भर घालून प्रत्यक्षात प्रवासासाठी करावा . आपल्या बाकी अनेक गरजा असतातच पण त्याबरोबरच आपल्या देशातील विविधता पहावी , निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा , रिफ्रेश व्हावं , ज्ञान वाढवावे आणि आपल्या दैनंदिन जीवनातील आनंद दुपटीने वाढवावा . फक्त तेचतेच विकेंड प्लॅन न करता चार वर्षातून एक मोठ्या ट्रीपचा अनुभव घ्यायला हवा आयुष्यभर फिरलो तरी भारत पुर्ण पहिला असे होणार नाही . भारताचे निसर्गसौंदर्य अफलातून आहे , विविधता , परंपरा , सौंदर्य , भाषा यातील वैविध्य आपल्याला इथेच पाहायला मिळेल ते आपण न्याहाळलं पाहिजे , टिपलं पाहिजे असे माझ्या नवीन सहकाऱ्यांना माझे आग्रहाचे सांगणे आहे , असो .
माझी परदेशवारी
परवाच आगदी 12 दिवस दोन देश फिरुन आमची घसघशीत परदेशवारी आनंदात आणि उत्साहात पार पडली आणि माझं अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न होतं ते म्हणजे पुर्ण कुटुंबियांसोबत एक आंतरराष्ट्रीय ट्रिप करायची ते प्रत्यक्षात साकार झाले !!
बँकेत लागल्यापासून बँकेकडून मिळणाऱ्या एलएफसीचा आम्ही दोघांनीही भारतभर भ्रमंतीसाठी वापर केला ( दोघेही बँकेत असल्यामुळे आम्हाला डबल फायदा होत होता ). एक सुप्त इच्छा होती ती म्हणजे अख्ख्या कुटुंबासोबत एकतरी परदेशवारी करायची . गेल्याच वर्षी आकांक्षाचे लग्न झाले , सगळं निवांत झाल्यावर दिवाळीनंतर सहज मी हा विषय गप्पांमध्ये सगळ्यांसमोर बोलून दाखवला . फक्त बोलण्याचा अवकाश आशिष-आकांक्षाने ती गोष्ट अगदी नाचतच आनंदाने , उत्साहाने मनावर घेतली त्याला आमच्या कुटुंबात गेल्या पाच वर्षापासून मुरलेल्या कीर्तीने पण उचलून धरले आणि अंदाज घेत हळूहळू नवीन असलेला कार्तिक पण त्यांना सामील झाला आणि बघता बघता
" Foreign Trip "
हा आमच्या कुटुंबाच्या चर्चेचा विषय झाला . फेब्रुवारीत जाऊ म्हणत म्हणत प्रत्यक्षात ट्रीप मे महिन्यात घडून आली . यात मुख्य म्हणजे आत्रेय आणि आम्ही दोघे असे तिघांचे पासपोर्ट काढण्यापासून तयारी करायची होती . आणि नेमकं कुठे जायचं यावर पण एकमत होणे गरजेचे होते . सिंगापूर का दुबई का युरोप का ऑस्ट्रेलिया का मलेशिया असे वेगवेगळे देश विचार करत करत गाडी दोन देशावर येऊन स्थिरावली होती . निसर्गरम्य ठिकाण म्हणून व्हिएतनामवर एकमताने शिक्कामोर्तब झाले आणि भरपूर कीस पडल्यानंतर चर्चेअंती असे ठरले की जाता जाता 3/4 दिवस आपण फुल्ली डेव्हलप्ड एक अर्बन कंट्री म्हणजे सिंगापूर फिरु आणि फोकस मात्र व्हिएतनामवर करु .
स्टेप बाय स्टेप तयारी सुरु झाली प्रत्येक विकेंड त्यानुषंगाने अभ्यासाला जाऊ लागला . सर्वप्रथम मुलांनी सांगितले की आपण कोणत्याही कंपनीबरोबर न जाता आपला आपण प्लॅन करु आणि ती गोष्ट काही तेवढी सोपी नव्हती . तरीपण करु असे ठरले , बाळ लहान त्यातच ऑफिस दौरा यामुळे कीर्ती यात प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नव्हती पण थोडेफार डोकावणे आणि चर्चा करणे एवढे ती करत होती . आणि कीर्ती ऑफिस दौऱ्यामुळे त्यादरम्यान पुण्यात नव्हती , बाळ बार्शी पुणे असे केले बाळाची जबाबदारी आशिषवर आली त्यामुळे आशिषला पण ठरवून सुद्धा म्हणावं तितका वेळ द्यायला जमत नव्हते तरी पण सिंगापूर प्लॅन करायचा त्याने स्वतःकडे घेतला आणि पूर्णपणे अनभिज्ञ असलेला व्हिएतनाम दौरा आकांक्षा आणि कार्तिकने प्लॅन करायचा त्यांनी आनंदाने स्वतःकडे घेतला . आणि बघता बघता प्रामुख्याने किती दिवस जायचे , कोणकोणते स्पॉट कव्हर करायचे त्यानंतर विमानाची तिकिटे , अंतर्गत प्रवासाची विमान तिकिटे , रेल्वे तिकीट , टॅक्सी , क्रुझ , केबल कार (गोंडोला) , ट्रेन , ट्राम , बोटी आणि मुख्य म्हणजे हॉटेल्स याचा अभ्यास करत बरोबर वेळेच गणित साधून ते इतक्या आखीव रेखीवपणे त्यांनी केलं होतं हे प्रत्यक्षात ट्रीप करत असताना जाणवत होते . प्लॅन करत असताना उपलब्ध असणाऱ्या सोयी आणि आपल्याला आवश्यक असलेल्या सोयी आहेत का मग त्या चार ठिकाण पाहणं आणि जास्तीत जास्त सोयीस्कर पाहून एकावर शिक्कामोर्तब करणे ही काही खाऊची गोष्ट नाही हे तिकडून आल्या ननंतर मनोमन पटलं आणि मी आकांक्षा आणि कार्तिक या दोघांना त्याबद्दल शाबासकी पण दिली . कारण निसर्गाच्या बाबतीत व्हिएतनाम व्हास्ट आहे , काय पाहावे आणि काय सोडावे हे ठरवणे तसे मुश्किल पण अत्यंत अभ्यास करत , पैशांचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घेत , वेळेचा अपव्यय न होऊ देता बरोबर वेळेत सगळ्या गोष्टी होतील याची खबरदारी घेत चौकसपणे त्यांनी हे काम पुर्ण केले हे मात्र खरं ! मी मजेने म्हणत असे हे करत असताना या विषयात तुम्हा दोघांची पीएचडी झाली त्यामुळे ट्रॅव्हल्स वाले म्हणून साइड बिझनेस करायला काहीच हरकत नाही 😇. असो पण स्वावलंबी असणे , चौकसपणा असणे केव्हाही चांगलेच की !
पण हे मात्र तितकेच सत्य आहे की ही ट्रीप करत असतांना सर्वांना एवढा विश्वास आला की आता पुन्हा कधीही कुठेही जायचं झाल्यास प्लॅन स्वतः करु शकतो . आम्ही पण इतक्यावेळा भारतात फिरलो त्यात फक्त सिमला कुलूमनाली ट्रीप आम्ही केसरी बरोबर केली पण बाकी सगळ्या ट्रीप आम्ही स्वतः प्लॅन करुनच केलेल्या आहेत .
आता सगळा प्लॅन ठरला मग त्याप्रमाणे तयारी सुरु झाली सुरुवातीला आम्ही दोघांनी सोलापूरमध्ये जाऊन दोघांचे पासपोर्ट apply केले . 15 दिवसात आमचे पासपोर्ट हातात आले . या चौघांचे तर आधीच तयार होते मग आत्रेयचा पण तयार झाला . सातही जणांचा व्हिएतनाम व्हिसा काढून झाला आता सिंगापूर व्हिसा बाकी होता . कीर्ती परवा जाऊन आल्यामुळे तिचा तयार होता पण आमचा सहाजणाचा काढायचा होता . तो तीस दिवस आधी aplay करावा लागतो त्यामुळे तो ऐनवेळी करावा लागणार होता . चलन म्हणून व्हिएतनामी डोंग तर सिंगापूरसाठी सिंगापूर डॉलर exchange करुन घ्यावे लागणार होते . चौकशी केल्यास समजले होते एक सिंगापूर डॉलर साठी आपले पासष्ट रुपये तर आपल्या एक रुपयांमध्ये व्हिएतनामचे तीनशे डोंग मिळणार होते म्हणजे सिंगापूर आपल्यासाठी श्रीमंत देश होता तर व्हिएतनामसाठी आपण श्रीमंत फॉरीनर असणार होतो ! मग जाण्यापूर्वी एक आठवडा currancy exchange करुन घ्यायचे ठरले .
आता मुख्य विषय होता तो तब्ब्येत ! एवढी मोठी ट्रीप करतोय त्यात चारजण ऐन तारुण्यातील होते . मनाने तरुण असलेली आमची जोडी पण वयाने एकजण रिटायरमेंटकडे झुकलेली त्यात शुगर असलेली मी तर रिटायर झालेले आणि तीन वर्षांपूर्वी भल्या मोठ्ठ्या आजारपणाला झुंज देऊन तगडे झालेले हे ! एक छोटसं बाळ अशी विविध व्यक्तिमत्वे एकत्रीत प्रवास करणार होती . त्यानुषंगाने फिट राहावे म्हणून आम्ही दोघांनी पण तीन महिने आधीच डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याप्रमाणे औषधे , व्यायाम सुरु केलेलं होतं. त्यातच मी डॉ. भाग्येश कुलकर्णी यांचे DFF सुरु केलं होतं तर बाळासाठी आमच्या फॅमिली डॉक्टर असलेल्या आयुर्वेदिक डॉ. नीलिमा कुलकर्णी यांचे रामबाण उपाय सुरु केले होते . नंतर मुख्य टॉपिक होता तो म्हणजे ट्रीपच्या अनुषंगाने shopping करणे ! पहिले बॅग्स , शूज , सँडल , टोप्या , गॉगल अशी अत्यावश्यक खरेदी झाली मग आकांक्षा कीर्तीने आमच्या ड्रेसवर फोकस केला त्यांनी सांगून टाकले की आम्ही जे कपडे ठरवू ते तुम्ही दोघांनी घातले पाहिजे त्याप्रमाणे मला कसे ड्रेस घ्यायचे यांना कसे घ्यायचे अशी त्या दोघींची चर्चा झाली त्याप्रमाणे एप्रिलमध्ये आम्ही पुण्यात खरेदीसाठी गेलो . आणि प्रत्यक्ष खरेदीच्यावेळी आमच्याबरोबर आकांक्षा आणि कार्तिक होते आमच्या दोघांच्या कपड्याची खरेदी त्यांच्या म्हणण्यानुसार केली . एक वनपीस खास मीनाक्षी क्रिएशन कडून पण आला एकूणच आनंदी आनंद .
फोटोग्राफीची आशिषला आवड आहे तशीच आवड कार्तिकला पण आहे .आता तर त्याची गाठ आकांक्षाशी बांधली गेलीय त्यामुळे तो ती आवड मनापासून आणखी डेव्हलप करतोय त्यामुळे त्याने सेल्फी स्टिक with स्टँड खरेदी केलं . यामुळे आम्हाला खास ठिकाणी आपल्याला हवा तसा ग्रुप फोटो घेणे शक्य होणार होते .
तिकडे खाण्याचे थोडे वांदे होतात , 80% नॉनव्हेज असते बाकी ब्रेड , पिझ्झा , फळे , ज्यूस यावर भर द्यावा लागेल असे म्हणल्यामुळे आणि आम्ही मोठी सहा माणसे आणि एक बाळ असे सातजण आहोत तर थोडे तहानलाडू भूकलाडू करुन घ्यावे म्हणत त्याच्या नियोजनाचा भाग मी माझ्याकडे घेतला . त्याप्रमाणे ट्रिप स्पेशल माझ्या रवा-खवा-बेसन वड्या , शेंगदाणा पोळ्या , खव्याच्या पोळ्या आणि बार्शी स्पेशल खारेमुरे घेतले . तर मिरजेच्या विहीणबाईंनी मला आधीच फोन करून सांगितले
" तुम्हाला आवडतात त्या गोष्टी आपण मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात खास ऑर्डर देऊन करुन घेऊ त्या मी manage करुन देते तुम्ही त्यात लक्ष घालू नका "
त्याप्रमाणे चकल्या , खाऱ्या आणि गोड्या शंकरपाळ्या , पोह्याचा चिवडा करुन घेऊन त्यांनी दोन दिवस आधी पुण्यात पार्सल पाठवले . कीर्तीने थोडाफार चाणाचुणा , इन्स्टंट पोहे , उप्पीट , खिचडी , यांच्यासाठी वाघबकरी चहा , दूध पावडर याची पॅकेट्स पार्सल मागवली . मी बाळासाठी शिंगाड्याचे लाडू आणि भोपळ्याचे घारगे आगदी जायच्या दिवशी बनवले . आणि ही सगळी खरेदी , होणारी चर्चा , फोनवर सगळे नातेवाईक , मैत्रिणी यांच्याकडून होणारी विचारपूस आणि सर्वांकडून होणारी चेष्टा मस्करी ऐकून मला मग थोडाथोडा
" वऱ्हाड निघालं लंडनला "
असा फील येऊ लागला .
पण एकूणच मजा येत होती , आपली ट्रीप सुपर डूपर होणार याची खात्री वाटत होती . मुले जन्मापासून आपल्या बरोबर असतातच पण सून , जावई आणि छोटासा नातू या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यात मला जो परमानंद होत होता त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही . आणि या बहुमुल्य समाधानासाठीच मी हा घाट घातला होता .
*ट्रिपची सुरुवात*
बिग बॉसचे घर बंद केल्याप्रमाणे आम्ही वरच्या मजल्यापासून रूम्सची दारे बंद करायला सुरवात केली . सगळी घरे बंद करून गेट बंद करून शोभा आणि पुरंदरे यांना सांगून सगळी व्यवस्था लाऊन आम्ही स्टेशनवर निघालो . तसा बराच कालावधी बाहेर राहणार होतो त्याप्रमाणे खबरदारी घेऊन आम्ही निघालो . सुरुवातीला आम्ही दोघे बार्शीहून पुण्यात आलो . दुसरे दिवशी आकांक्षा कार्तिक पण आशिषकडे आले . बॅग्स भरणे , केव्हा कोणते कपडे घालायचे यावर महाचर्चा झाली आणि रात्री सगळ लिस्टप्रमाणे व्यवस्थित झालं आहे ना याची खातरजमा केली बॅग्स पॅक केल्या आणि झोपायला गेलो . आजकाल सर्रास लोक परदेशात नोकरीसाठी , फिरायला म्हणून जातात त्याचे फारसे अप्रूप राहिले नसेलही पण माझी पहिलीच परदेश वारी होती त्यामुळे माझ्या मनात हुरहूर होती . आनंद , आधीरपणा , औत्सुक्य , काळजी आशा अनेक विचारांचे थैमान चालू होते सर्वात महत्त्वाचा आणि काळजी वाटणारा विषय होता तो म्हणजे फक्त 22 महिने वयाचा आत्रेय !!
त्याला एवढा मोठा प्रवास पेलेल का ? सध्या त्याची तब्बेत ठीक आहे पण त्याला हवा , पाणी , सगळा बदल पचेल का ? इकडे उन्हाळा , पाऊस , तिकडे थंडी असे वातावरणातील पटापट होणारे बदल त्याला पेलतील का मोठी माणसे काहीही खातील त्याच्या खाण्याचे काय करावे , आपण घेतले त्यात त्याचे पोट भरेल का ? शिवाय मी पण पहिल्यांदा परदेशात जाणार होते ट्रिपचे सगळे नियोजन मुलांनी केले आहे , सगळे व्यवस्थित झाले असेल ना ? काही फसवेगिरी तर झाली नसेल ना ? आपण लांब चाललो आहोत तेही एकदोघे नाहीत एवढं मोठ्ठं लटांबळ घेऊन चाललो आहोत सगळं नीटनेटके झालं म्हणजे बरं ! तसं माझे बालपण घेरडी सारख्या खेड्यात गेलेलं आहे . ओढे नाले पार करणे , आगदी छकडा , बैलगाडी , जीबडे (जीप) , टमटम , एस टी बस , रेल्वे , विमान हा सगळा अनुभव घेतला आहे आणि आता आंतरराष्ट्रीय विमान प्रवास होणार होता त्यामुळे आनंद , उत्साह , काळजी अशा संमिश्र भावना मनात होत्या . आयुष्यात पहिल्यांदा असा काहीतरी घाट घातला आणि थोडेच दिवस आधी पहलगाम घटना घडली भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली . देशावर असे सावट असताना आपण ट्रीपला निघालो आहोत याची अपराधी भावना मनात निर्माण होत होती त्याची पण नाराजी होती पण युद्ध बंद झाले आणि समाधानाने आपण निघालो अशा अनेक उलटसुलट विचारांनी डोक्यात थैमान घातले होते त्यात कधी डोळा लागला समजले नाही .
सकाळी आशिष कीर्ती ऑफिस करुन लवकर परत येणार होते . बाकी आम्ही पाचजण निवांत होतो . रात्री 12 वाजता मुंबईहून विमान निघणार होते . थोडासा पाऊस सुरु झाला होता त्यामुळे ट्रॅफिकचा काही नेम नसतो म्हणत 4 वाजता पुण्यातून निघायचे ठरवले होते आणि बरोबर 4.15 वाजता
" गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
उंदीर मामा की जय "
असा जल्लोष करत आमच्या कॅब सोसायटीच्या बाहेर पडल्या !
नेमके अंदाज केल्याप्रमाणे लोणावळ्यात थोडेसे ट्रॅफिक लागले पण बरोबर 8.30 वाजता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे पोहोचलो . त्याठिकाणी सगळे सोपस्कार पार पडले आणि आता परत येईस्तोवर बाहेरचे खावे लागणार म्हणत घरुन घेतलेले मेथी पराठे , मेथांबा आणि एअरपोर्ट वरचा ( महागडा ) पिझ्झा यावर यथेच्छ ताव मारला आता तासभर वेळ आहे थोडे फिरु असे म्हणत असतानाच अर्धा तास आधीच विमान निघणार असे तिथे समजले . आमच्यासाठी हा अनुभव नवीन होता .
कारण आम्ही बसलो होतो तिथेच
सिंगापूर फ्लाईट फायनल कॉल अशी अनाउन्समेंट झाली आणि आम्ही लगेच गेलो सर्व प्रवासी आलेले होते . आम्ही बसलो की 15 मिनिटात विमानाने उड्डाण घेतले . आपल्या पहाटे पाचला तर सिंगापूरच्या सकाळच्या सात वाजता विमान सिंगापूरला चांगी एअरपोर्टवर लँड झाले 😍!
क्रमशः
*सिंगापूर*
प्रमुख उत्पन्न foreign ट्रेड असल्यामुळे श्रीमंत आणि विकसित देशामध्ये सिंगापूरची गणना होते .जलद गतीने नाविन्याचा आविष्कार घडवत सातत्याने परिवर्तन ही त्या देशाची खासियत आहे . जगभरातील विशेषतः भारतातील पर्यटक भ्रमंतीसाठी सिंगापूरला प्राधान्य देतात . त्यामुळे पर्यटन हेही सिंगापूरसाठी प्रमुख उत्पन्नापैकी एक स्रोत आहे .
अत्यंत सुबक , जाणीवपुर्वक आखीव रेखीव बनवलेले शहर , देश , बेट आणि मुख्य म्हणजे दर पाच वर्षांनी आमूलाग्र बदल घडतात तो देश म्हणजे सिंगापूर अशी माहिती ऐकल्यामुळे , वाचल्यामुळे आमच्या ट्रिपमध्ये आम्ही जाणीवपुर्वक सिंगापूरचा समावेश केलेला होता . आम्ही याठिकाणी तीन दिवस थांबणार होतो .
दिवस पहिला
आमच्या सिंगापूरच्या पर्यटनस्थळांमध्ये
" चांगी एअरपोर्ट सिंगापूर "
हे पहिलं ठिकाण होतं तसेही हॉटेलमध्ये आमचे चेकइन दुपारी दोन वाजता होते . त्यामुळे आम्ही लॅण्ड झाल्यावर आमचे लगेज घेतले , आता काहीही घ्यायचे असल्यास कार्ड किंवा सिंगापूर डॉलर खर्च करावे लागणार होते . एअरपोर्टवर एका मस्त हॉटेलमध्ये गेलो ऑर्डर देऊन पेमेंट करुन टोकन घ्यायचे होते . औत्सुक्यापोटी माझे सगळे लक्ष किती डॉलरमध्ये काय काय मिळते आणि त्यासाठी आपले किती रुपये खर्च होणार याकडे होते . तसे तर किती खर्च होणार हे मुलानी बजेट काढलेले होते पण एक उत्सुकता तर होतीच आणि तुलनात्मक अभ्यास करणे हा माझा स्वभाव आहे . आमच्याकडे रात्री विमानात मिळालेला बराच खाऊ शिल्लक होता फक्त चहा आणि थोडासा काही खाऊ घ्यायचे ठरले . चहाचे मोठ्ठे ग्लास असल्यामुळे तीन चहा आणि एक डिश स्नॅक्स घेतले त्याचे बिल झाले 9.40 डॉलर्स म्हणजे आपले 611 रुपये ! इथे असेच असणार हे गृहीत होते तरीपण मला मात्र अरे बापरे असे झाले . मुलांनी सांगितले हे तीनचार दिवस हिशोब न करता आवश्यक तो खर्च करणार आहोत आपण . मग आम्ही जवळचा थोडा खाऊ काढला आणि चहा-नाष्टा करुन नऊच्या दरम्यान पाचमजली भव्यदिव्य विमानतळ पाहण्यासाठी आम्ही सज्ज झालो . छोटस अंतर पार करण्यासाठी याठिकाणी sky train मध्ये बसून बोगद्यातून बाहेर पडत असताना पाणी पडणारा आर्टिफिशीयल धबधबा पाहणे हे मुख्य आकर्षण होते तो एक रोमहर्षक अनुभव होता . प्रत्येक मजल्यावरुन धबधबा पाहताना त्यातील वैविध्य जाणवत होते . नंतर आभासी धबधबा पाहून मला महाभारतातील मयसभेची आठवण आली तर 16 बाय 66 असे नारळाच्या आकाराचे चुंबकीय लोलक सोडलेले होते . कठपुथलीप्रमाणे त्यांचा डान्स त्यात विविध डिझाईन्स तयार होत होत्या , विविध रंगी फुलझाडे , तसेच फुलपाखरे , मधमाशा यांच्या प्रतिकृती अशा अचंबित करायला लावणारे मनमोहक देखावे दिसत होते . कार्तिक आणि आकांक्षाने एअरपोर्टवर एक रील करण्याचे ठरवले होते . त्याप्रमाणे ट्रॅव्हलेटरवर सर्वांनी स्टॅच्यु होऊन उभे रहायचे असे त्यांनी सांगितले पण आम्हा दोघांसाठी हाही अनुभव पहिलाच होता त्यामुळे ते आमच्याकडून करुन घेताना रिटेक करायला लावताना आम्ही लहान मुलांप्रमाणे कसे ऐकतो असे म्हणत रील करताना त्यांना मजा आली पण रील खूप छान झाले . आत्रेय त्याच्या त्याच्या पद्धतीने एन्जॉय करत होता . पळत सुटायला मोठी जागा मिळाली की तो खूष असे .
अनेक ठिकाणी फोटो घेत भले मोठे एअरपोर्ट पाहण्यात दुपारचा एक कधी वाजला हे आम्हाला समजले सुद्धा नाही . मग आम्ही हॉटेलवर आलो , चेकइन केले फ्रेश झालो जेवण केले , थोडासा आराम केला आणि आवरुन पाच वाजता तयार झालो .
आमच्या दोघांसाठी खास ट्रीपसाठी ड्रेस घेतले होते आज पहिल्यांदा मी वनपीस ट्राय करणार होते तोही अनुभव माझ्यासाठी नवीन होता . तशी कपड्यांच्या बाबतीत मी काळाबरोबर चालायला नकार देत नसते . लग्नानंतर बारा वर्षे मी साड्या नेसत होते एकदा ज्योती ( लहान बहीण ) बार्शीत आली आणि तिने मला तिचा ड्रेस घालून बँकेत जायला लावले . मला छान वाटले , सगळ्यांनी छान दिसते म्हणुन पावती दिली आणि तेव्हापासून मी ड्रेसवर शिफ्ट झाले , तिथून पुढे
" मीनाक्षी क्रिएशन " ( ज्योतीचे बुटिक) ज्याप्रमाणे अपडेट करेल त्याप्रमाणे आजपर्यंत मी अपडेट राहिले आहे . त्यामुळे यावेळी मुली सांगतील त्याप्रमाणे शॉपिंग केली आणि त्या सांगतील तसे त्यांच्या मनाप्रमाणे तयार होऊन मी बाहेर आले . आम्ही सगळे भेटलो तर कीर्ती आणि आकांक्षा एकदम चाट पडल्या . काय भारी दिसते म्हणून सगळ्यांनी पावती दिली मग मला पण माझ्या वयाचा विसर पडल , मी पण मनाने आणखी तरुण झाले आणि फुलपाखराप्रमाणे हलकी फुलकी होऊन विहार करु लागले . आमच्या तिघींचा रोज एक फोटो घ्यायचा मी नियम घालून दिला .
ट्रीपमध्ये कपड्यांच्या बाबतीत मुलांच्या मनाप्रमाणे वागण्याचे आम्ही ठरवले होते . मग आम्ही थोडस पायी फिरत जाण्याचे ठरवले . एकूणच स्वच्छ आणि भलेमोठे रस्ते , रस्त्यावर काटेकोर शिस्तीत जाणारी वाहने , हॉर्न नाही , गोंगाट नाही , प्रदूषण नाही तिथल्या सिटी बस पण मोठ्या , स्वच्छ आणि मदत करणाऱ्या भासल्या . पूर्णपणे नियोजनबद्ध , विकसित असा कमी लोकसंख्या असलेला देश म्हणजे सिंगापूर ! त्या देशाची समृद्धी त्या शहरातील एकूणच रस्ते , इमारती , लोकांची वागण्याची पद्धत , आदब यावरुन लक्षात येते . त्या देशाची पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे , पर्यटक हे त्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे त्यामुळे एकूणच पर्यटकांशी आदरयुक्त वागण्याची त्यांची पद्धत मनाला भावते . गंमत म्हणजे कीर्तीने नुकताच ऑफिसच्या कामानिमित्त सिंगापूर दौरा केला होता त्यामुळे काहीतरी माहिती सांगत ( गाईड असल्याप्रमाणे ) ती पण भाव खाऊन जायचा चान्स सोडत नव्हती .
Gardens by the bay
पाहण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आम्ही थोडस पायी चाललो लगेचच आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला बस मिळाली तिथे पोहोचले की जाणवले हा पण खूपच मोठा परिसर आहे . अनेक प्रकारची फुलझाडे , सुंदर बाग, याठिकाणी विविध स्टॅच्यु आहेत . भलेमोठे स्टॅच्यु पाहून आत्रेय घाबरुन गोंधळून जाई कडेवर चिकटून बसे तर धबधबा आणि पाणी पाहिलं की मोठ्या मुलासारखे चेकाळत नाचत असे . मग त्या जागेवरुन हलण्याचं तो नाव घेत नसे . रात्रीच्या
Light and sound शोमध्ये रंगीबेरंगी गार्डन इतके खुलून दिसत होती याठिकाणी
Cloudforest
आणि
Flower dome
ह्या दोन्हीचे पासेस काढलेले होते प्रत्येक ठिकाणी काही ना काही अचंबित करणारी दृश्ये दिसत होती मनभरुन ती नजरेने पिऊन घेत होते . तर तीच दृश्ये कॅमेरॅत टिपण्यासाठी आशिष आणि कार्तिक यांची धडपड असे . एखाद्या युनिक ठिकाणी सगळ्यांना उभे राहायला सांगत सेल्फी स्टिक , स्टँड ऍडजस्ट करुन ठरलेल्या जागी हात चोळत पळत येऊन उभे रहायचे आणि रिमोटने क्लिक करण्यासाठी कार्तिक जी धावाधाव करायचा ते फार भारी वाटायचं . पटकन परत फोटो कसा आला ते पाहण्यासाठी जाऊन त्यात मनासारखा फोटो आला नाही तर तो
" परत परत "
म्हणत सगळ्यांना आहे तसे थांबायला लावे आणि मनासारखा फोटो दिसला की टाळी वाजवून
" ये बात "
म्हणत उडी मारली की मी ओळखत असे हा फोटो चांगला आला . अशी मजा घेत आम्ही मनमुराद आनंद लुटत रात्रीचे नऊ वाजलेले समजले नाही पण पाहून मन तृप्त झाले . प्रवासाचा शीण ना जाणवत होता ना वाटत होता . विशेष म्हणजे आत्रेय अजून जागा होता आणि आमच्या बरोबरीने ट्रीपचा आनंद लुटत होता .
. मग त्याच ठिकाणी जेवण करुन आम्ही रात्री हॉटेलवर परत आलो . उद्या आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ पाहणार होतो त्याविषयी पण खूप ऐकले होते त्यावर चर्चा करत आमचा तो दिवस संपला .
क्रमशः
दिवस दुसरा
आज आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ पाहणार होतो त्यामुळे तोही उत्साह तेवढाच होता . सिंगापूर म्हणलं की लगेचच युनिव्हर्सल स्टुडिओचे नाव निघते . अनेकांकडून मी हेदेखील ऐकलं की सिंगापूरला जाऊन युनिव्हर्सल नाही केलं तर सिंगापूर ट्रीप पुर्ण झाली असे म्हणता येणार नाही . तसे एस एल वर्ल्ड सुरु झालेले तेव्हा मुंबई आणि रामोजी फिल्म सिटी नवीन असताना हैदराबाद अशा दोन्ही ठिकाणी मुलांना घेऊन आमची ट्रीप झाली होती . पण प्रत्येक ठिकाणीचे वेगळेपण असते , त्यात्या ठिकाणचे वैशिष्ट्य वेगळे असते त्यामुळे आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओसाठी आधीच बुकिंग केलेलं होतं . मुलांना प्रश्न आमच्या दोघांचा वाटत होता पण आकांक्षा खात्रीने सांगत होती आई-पप्पा maximum अँक्टिव्हिटी करतीलच . मी म्हणलं जेवढ्या अँक्टिव्हिटी जमतात त्या ट्राय करु , जेव्हा नको वाटेल तेव्हा आम्ही आत्रेयला घेऊन बाहेर फिरु तुम्ही करा एन्जॉय .
सकाळी लवकरच आवराआवरी केली , वेगवेगळे ड्रेस ट्राय करताना मला मजा येत होती आणि मला वेगळ्याच ड्रेसमध्ये पाहून मुले खूष होत होती . सिंगापूरमध्ये बरचसं इंडियन फूड मिळते असे ऐकले होते त्याप्रमाणे एक साऊथ इंडियन हॉटेल शोधले आणि तिकडे गेलो . आता मी कशाचे रेटस् पहायचे नाहीत असे ठरवले होते . सगळ्यात शेवटी हिशोब मिळेल असे मुलांनी सांगितले होते . गेल्याबरोबर फ्रेश हिरव्यागार केळीच्या पानावर तीन प्रकारच्या चटण्या , डोसा , इडली , सांबार , वडा हा मेनू मिळाला . ते पहिले की सगळे खुष झाले तसं तर अजून दुसराच दिवस होता असे काही तिकडचे खाऊन कंटाळलेले नव्हतो पण नाष्टा पाहून सगळे खुष झाले हे खरं . मुख्य म्हणजे आत्रेयला इडली खूप आवडते त्यामुळे कीर्तीने लगेच extra इडली मागवून त्याच्यासाठी डबा भरुन घेतला , आता त्याचा दिवसभराचा प्रश्न मिटला होता . ही प्लेट पाहताच मुलांना लगेचच
" डोसा , इडली , सांबार , चटणी-चटणी "
या गाण्यावर रील करण्याची हुक्की आली बघता बघता शूट आणि सुरेख रील तयार पण झाले !

आम्ही युनिव्हर्सलला पोहोचलो आणि सिंगापूरचा स्टुडिओ पहायला आलो याची पुनश्च खात्री पटली भव्यदिव्यपणा हा प्रत्येक गोष्टीत ठासून भरला आहे . डोळे दिपतील अशा गोष्टी तिथे दिसत होत्या .
- दिवसभर फिरावे लागणार म्हणून आत्रेयला बसायला आम्ही ट्राम ( स्ट्रोलर ) भाड्याने घेतले त्यावर आमच्या सॅक ठेवून आम्ही फिरत होतो . वेटींग पिरियड पहात पहात आम्ही आलटून पालटून अँक्टिव्हिटीची मजा घेत होतो
- Transformer
- Battlestar Gallactica- Human roller coaster
- Minion world & ride
- Lights Camera Action
अशा अनेक अँक्टिव्हिटी केल्या ,
ठिकठिकाणी फोटो काढणे सुरु होतेच . काही ठिकाणी आम्ही दोघे आत्रेयला घेऊन बसत होतो तर काही ठिकाणी
"परवा मी हे केलं होतं " म्हणत कीर्ती आणि सोबत कोणीतरी थांबत होते . दुपारची वेळ झाली होती आम्ही युनिव्हर्सलचे खास आकर्षण असणारा
Revenge of the Mummy
पहायला जाणार होतो ते ठिकाण परवाच कीर्तीने पाहिले होते मग ती म्हणू लागली
" आत्रेय पण झोपू लागला आहे , म्हणजे मी निवांत असणार , किमान एक तास लागणार आहे पहायला मग तुम्ही सगळे जा मी थांबते "
ठीक आहे म्हणत आम्ही निघालो ती बाहेर थांबली . सगळ्या अँक्टिव्हिटी पेक्षा ही थोडी वेगळी होती . याची थीम अशी होती की एका अपरिचित , आणि दुष्मानाच्या प्रदेशात जाऊन तिथे एक पुस्तक शोधायचं होतं की जे त्यांनी लपवलेले आहे सगळीकडे अंधार होता रोलर कोस्टर दिसत नव्हते . आम्हाला रोलर कोस्टर पर्यंत पोहोचायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला . तिथे पोहोचेपर्यंत त्यांनी गूढ असे वातावरण बनवले होते चित्रविचित्र आवाज येत होते . आम्ही थोडेसे भयचकित होऊन रोलर कोस्टर मध्ये जाऊन बसलो आणि त्याची एकदम वेगवान हालचाल सुरु झाली . पुढे त्यांनी असे दाखवले की आम्ही भिंतीला धडकलो आणि भिंतीतून खूप किडे बाहेर आले , तत्क्षणी आम्ही पाच सेकंद स्तब्ध झालो , आम्हाला वाटले आम्ही आता जोरात खाली पडणार पण नेमके त्याच वेळेस त्यांनी रोलर धाडकन मागे घेतले आणि आम्ही भानावर आलो . असा काहीसा हा विस्मयचकित करणारा तो अनुभव होता , काहीतरी थोडं गूढ , थोडस रहस्यमय , भयचकित करणारे , आपल्या वैऱ्याच्या प्रदेशात आपण गेलो की काय असे वाटणारे वातावरण होते . आतमध्ये खिडकी नाही त्यामुळे हवा येत नव्हती लाइट्स फक्त सापळ्यांवर फोकस केलेले . पाऊण तासानंतर थोडासा बाहेरचा उजेड दिसू लागला तसे प्रत्येकाला हायस वाटलं आता मात्र प्रत्येकजण हसत होता . जवळजवळ एक तासांनी आम्ही बाहेर आलो .
हसत हसत पण टरकल्यासारख्या मूडमध्ये आम्ही सगळे बाहेर आलो . तिकडे गेलो कशी मजा केली आणि आणि पुढची अँक्टिव्हिटी कोणती आहे ही जोशात चर्चा करत आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो . गप्पा मारत जवळजवळ 15/20 मिनिटे गेली . आता पुढच्या अँक्टिव्हिटीकडे निघणार म्हणून प्रत्येकानी ट्रामवरची आपापली सॅक उचलली आणि एकदम कार्तिक डोक्याला हात लावत ओरडला
" ट्रामवर माझी सॅक नाहीय , त्यात आमचे पासपोर्ट आहेत ."
आणि जे सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले विचारता सोय नव्हती . आकांक्षा आणि कार्तिक तर पांढरेफट्ट पडले . शोधाशोध सुरु झाली आशिष आणि कार्तिक जिथून आम्ही परत आलो त्याठिकाणी पाहून येऊ म्हणत तिकडे पळत सुटले कीर्ती आणि आकांक्षा दोघींना पण मी धीर देत होते, कीर्ती पण म्हणत होती
"बहुतेक कोणी उचलणार नाही सापडेल ".
आणि दहा मिनिटात कार्तिकची सॅक सुरक्षितपणे घेऊन ते दोघे परत आले आणि सगळ्यांनी हुश्श केलं . कीर्ती जिथे थांबली होती तिथे चुकून ती सॅक खाली पडली होती . मधल्या वेळात अर्धा तास होऊन गेला होता पण सॅक आहे त्या जागेवर तशीच राहिली होती . हे फक्त सिंगापूरमध्येच होऊ शकते , आणि आम्ही सिंगापूरला धन्यवाद म्हणालो पण ते दहा मिनिट दिवसा जे काजवे डोळ्यासमोर चमकले त्याची कल्पना कोणीच करु शकत नाही . बाकी काही गेलं असतं तरी फक्त नुकसान झालं असते पण यात पासपोर्ट होते पुढची ट्रीप आणि पुन्हा भारतात यायचे , भानगडी करत बसायला अजिबातच वेळ नव्हता , जर सॅक मिळाली नसती तर....
असे झाले .
नंतर मात्र पुण्यात घरी येईपर्यंत पासपोर्ट असलेल्या सॅक मी , आशिष आणि कार्तिक यांच्या बाखोटीतून दुसरीकडे दिसल्या नाहीत .
पुन्हा आम्ही थोडा ब्रेक घेतला सगळ्यांनी नॉर्मल व्हावे म्हणून आम्ही खायला गेलो सगळ्यांच खाण झालं आईसक्रीम खाल्ले आणि पुन्हा हसत आम्ही बाहेर पडलो .
तिथे फिरणारे विदुषक पाहून आत्रेय मात्र घाबरत होता तोंडाचा चंबू करत रडका चेहरा करत
" आत्ती घाबल्ला "
म्हणत चिकटून बसायचा पण लगेच " मला मोत्ता माणूस दाखव "
म्हणून हट्ट करी . रोबोट , वेगवेगळे सोंगाडे पाहत म्युझिकच्या तालावर नाचत तो पळत सुटे मग त्याच्यामागे धावावे लागे , तो त्याच्या पद्धतीने एन्जॉय करत होता .
घोड्यावरची सवारी
Banana ride
आम्ही सगळ्यांनी पिल्लूसाठी केली , त्याच्याबरोबर आम्ही पण छोटे झालो . पाच कधी वाजले समजले नाही .आम्ही शरीराने थकलो पण मनाने थकलो नव्हतो . आता उद्याचे स्पॉट आम्हाला खुणावत होते . येतानाच इंडियन हॉटेलमध्ये जेवण करुनच आलो सकाळी 8 वाजता सकाळी गेलो तिकडेच नाष्टा करण्यासाठी निघू म्हणत गुड नाईट केले .
क्रमशः
*तिसरा दिवस*
आज आमचा सिंगापूरमधला शेवटचा दिवस होता . आजचा दिवस आम्ही खास आत्रेय बरोबर एन्जॉय करायचा ठरवलेले होते ते म्हणजे
*" सिंगापूर झू ! "*
या झू चे वैशिष्ट्य म्हणजे
" ओपन कन्सेप्ट झू "
तो अनेक एकरांचा मोठ्ठा परिसर आहे आणि त्याठिकाणी अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी त्यांना पोषक असे नैसर्गिक वातावरण तयार करुन त्यात मोकळे सोडलेले आहेत . इथली आणखी एक खासियत होती ती म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला झू मध्ये पायी फिरता येणार होते तर जवळच नाईट झू आहे . रात्री 7 ते 9 अर्ध्या अर्ध्या तासाचे नाईट सफारी स्लॉट घेता येणार होते . त्या झू मध्ये स्पेशल गाडीत ( ट्राम ) बसून ती राईड असणार होती आणि मुक्त हिंडणारे प्राणी जवळून पाहता येणार होते आम्हाला त्याचेही आकर्षण होते . दोन्हीही ठिकाणी एकाही प्राण्यासाठी पिंजरा दिसणार नव्हता त्यामुळे ती प्रत्यक्षात जंगल सफारी असणार होती . यापुर्वी त्रिवेंद्रमचे प्रचंड मोठे झू आणि कान्हा पार्कमधील " हत्तीवर बसून वाघ पाहणे " या दोन्ही ठिकाणची अविस्मरणीय जंगल ट्रीप आमची झालेली होती आता हा वेगळाच अनुभव !
उद्या आम्ही व्हिएतनामसाठी निघणार होतो तर सकाळी बॅग्स पॅक करुन थोडंसं उशिरा बाहेर पडू ब्रंच करु (आपण आणलेला खाऊ थोडासा बरोबर घेऊ दुपारी तेवढाच चाणाचुणा तोंडात टाकता येईल )आणि तिथले प्रसिद्ध असलेल्या *" बुगीज मार्केट "* (म्हणजे पुण्यातील तुळशी बाग) येथे फेरफटका मारु आणि दुपारी लवकरच झू गाठू असे ठरले . बुगीज मार्केट हे सिंगापूर येथील बुगीज परिसरात असलेले सर्वात प्रसिद्ध आणि स्वस्त मार्केट आहे . फॅशनेबल , हॅण्डमेड वस्तू आणि गिफ्ट आयटम याठिकाणी मुबलक प्रमाणात मिळतात पर्स आणि बॅग्स , शूज आणि चप्पल , किचेन आणि मॅग्नेट्स , तेवढेच कपड्यांचे प्रकार आणि स्ट्रीट फूड सुद्धा भरपूर प्रमाणात भरपूर व्हरायटी मध्ये होते . आम्ही फेरफटका मारुन सगळे मार्केट पहायला दोन तास सहज निघून गेले . अनेक वस्तू आम्ही पाहत होतो , किंमती विचारत होतो पण स्वस्त मार्केट म्हणलं तरी मला तिथे प्रत्येक वस्तू तशी बरीच महाग वाटली . याठिकाणी आम्ही आगदी आठवण म्हणून मॅग्नेट अशी जुजबी खरेदी केली . इथे फारसे कार्ड चालत नव्हते डॉलर मध्ये पेमेंट करावे लागे . तिथेच थोडेफार खाऊन टॅक्सी करुन आम्ही आजचा मुख्य फोकस असलेल्या झू कडे निघलो .बुगीज मार्केट ते झू हे अंतरही तसे बरेच लांब असल्यामुळे तो एक तासाचा प्रवासही खूप लक्षात राहणारा होता . दुतर्फा खूप मोठमोठ्या आणि नियोजित पद्धतीने बांधलेल्या भव्य इमारती भोवताली आकर्षक झाडी , खूप मोठे रस्ते , शिस्तीत ड्रायव्हिंग , हॉर्न नाही हे एकूणच सिंगापूरचे खास वैशिष्ट्य वाटले . इथे आल्यापासूनचा माझा अनुभव होता टॅक्सीमध्ये बसले की प्रत्येक ड्रायव्हर पर्यटकांना सिंगापूरची भरपूर माहिती देत होते आणि ते प्रवासात आपल्याशी गप्पा मारत असत , आपली आगदी आदबीने चौकशी करत , तिथल्या पर्यटनाची माहिती पुरवत ,
"हे पाहीले का ते आवश्य पहा "
असे सुचवत , त्यांची अखंड माहिती पुरवण्याची कामगिरी सुरु असे . आपल्या देशाप्रती असलेली अभिमानाची झलक त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होती . पर्यटकांना देव मानणे या नैतिक जबाबदारीला त्यांनी बांधून घेतलेले दिसून आले . बरचसे ड्रायव्हर मात्र वयस्कर दिसत होते त्यांचे छान इंग्लिश बोलणे , टापटीप , नेटकेपणा लक्ष वेधून घेत होता .
बोलतबोलत थोड लवकरच आम्ही झू परिसरात पोहोचलो . एवढी गर्दी पण ती मॅनेज करणारी तिथली व्यवस्था पण तशीच . आमचे तिथले बुकिंग आधीच झाले होते त्यामुळे लगेचच आम्ही झू मध्ये प्रवेश केला आणि जे ऐकले होते ते प्रत्यक्षात दिसू लागले . सुरवातीलाच झाडावर अनेक माकडे उड्या मारताना दिसत होती , त्यांच्यासाठी झाडांवर झुले , फळे ठेवण्यासाठी दुरड्या , पिण्याच्या पाण्याचे खाली हौद अशी सोय केलेली होती , ते मुक्तपणे खेळत होते . ते पाहून आत्रेय खूप चेकाळला , पुढे पुढे विविध प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी , प्राणी होते . वन्य प्राणी ज्याठिकाणी होते तिकडे सोडण्यासाठी आतमध्ये तिथल्या खास ट्राम होत्या , त्याठिकाणी वाघ , सिंह , हत्ती , चित्ते मुक्त संचार करताना दिसत होते , तर गोरिला , रेड पांडा पण आम्हाला पहायला मिळाले . गायी , म्हशी , कुत्री या आपण नित्य पाहत असलेल्या प्राण्यांपासून आजकाल दुर्मिळ होत चाललेले अनेक प्राणी असे सर्व प्रकार दिसून येत होते . कासवाचे किती प्रकार होते , पेंग्विन , हरिण , कळवीट एकूणच प्रत्येक ठिकाणी विविध रंगीबेरंगी पक्षी पण मनमोहक दिसत होते . एका विभागात आगदी छोट्याशा फुलपाखरांपासून मोठी फुलपाखरे पण होती . आपल्याला माहिती असलेले पण वेगळ्या प्रजातीचे असेही प्राणी दिसत होते . पक्षी प्राणी पाहताना आत्रेयला खूप मजा येत होती , तो ओरडत आनंद व्यक्त करी , तर उंच जिराफ , भले मोठे हत्ती पाहिले की तो कावराबावरा होई
" आत्ती घाबल्ला "
असे म्हणत तो चिकटून बसत होता .आम्हाला सुद्धा त्या झू मध्ये अनेक प्राणी पाहताना मजा आली . दुर्मिळ प्राणी पाहताना आम्हाला पण उत्सुकता वाटे .एक साधारण कुत्र्यापेक्षा मोठा प्राणी होता त्याचे पुढच्या दोन पायापर्यंतचे शरीर शुभ्र पांढरे तर मागचे शरीर काळे होते . आतापर्यंत कधीच तो प्राणी माझ्या पाहण्यात आला नव्हता . पाणी पिण्यासाठी केलेल्या तलावावर मोठाले हस्तीदंत असलेल्या हत्तींचा कळप आलेला आम्हाला पहायला मिळाला .
सायंकाळी सहापर्यंत सगळा परिसर फिरुन आम्ही पुन्हा मेन गेटवर आलो . नाईट सफारीसाठी तिथे खूपच गर्दी झाली होती . आम्ही हॉटेलमध्ये काही मिळते का पाहत होतो तर खारी , चहा आणि ज्यूस याशिवाय आम्हाला चालेल असे दुसरे काहीच मिळत नव्हते . खाण्याबाबत जसे ऐकले होते ते अनुभवास येत होते . त्यामुळे चहा घेऊन आम्ही चुपचाप बसलो होतो .
तिकडे नाईट सफारीसाठी आमचा 7.30 वाजतचा स्लॉट होता . गाडीत बसून प्राण्यांच्या आगदी जवळून फिरतानाचा चित्तथरारक अनुभव घेता येणार होता . लांबच लांब रांग पार करत आम्ही ट्राम स्टेशनवर आलो , एकापाठोपाठ एक अशा सावकाश ट्राम येत होत्या , आम्ही बसलो . नाईट सफारीचा अनुभव घेताना खऱ्या अर्थाने जंगल सफारी झाल्याचा फील येणार होता . आम्ही निघालो आणि अपेक्षेप्रमाणे आगदी वन्य प्राणी बिबट्या , चित्ता जवळून न्याहाळता आला . ट्राममध्ये भरपूर गर्दी होती प्राणी दिसला की ट्राम स्लो व्हायची , एकदम शांतता व्हायची लोक श्वास रोखून पहायचे , गाडी थोडी पुढे निघाली की सगळे बोलायला लागत . पण तो एक रोमांचकारी अनुभव होता . दिवसभर भरपूर चालणे आणि चढउतार झाल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता पण एकदम excited मूडमध्ये आमची राईड संपली आणि आम्ही परत निघालो .
आता आमचा एक महत्वाचा पॉईंट पाहायचा अजून राहिला होता तो म्हणजे
*" मर्लायन (Merlion)"*
.
आम्ही झू वरुन डायरेक्ट मर्लायन ला गेलो. मरीना बे जवळ मर्लायन आहे , त्याविषयी पण बरीच माहिती ऐकली होती वाचली होतो आता प्रत्यक्ष पाहणार होतो . आम्ही पोहोचलो , उशीर झालेला होता तरीही हौशी पर्यटकांची तिथे भरपूर गर्दी दिसत होती . बरंच लांबून तो पुतळा दिसत होता . पार्कमध्ये 8.6 मीटर उंच आणि 70 टन वजन असलेला हा भव्य पुतळा उभा आहे . मरीना बे ला नदीकिनारी असलेली आकर्षक म्युझिक लायटिंग अत्यंत नियोजितपणे केल्याचे मोहक दृश्य दिसत होती . मर्लायन पुतळा हे सिंगापूरच्या उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते . या पुतळ्याचे डोके सिंहाचे असून शहराच्या नावाशी साधर्म्य असल्याचे मानले जाते , तर शरीर हे माश्याचे आहे आणि मासे हे सिंगापूर शहराचे वैभव आहे . पर्यटन मंडळाने खास पर्यटकांसाठी बनवलेला हा स्पॉट आहे . यामध्ये पुतळ्याच्या तोंडातून अखंड पाण्याचा स्रोत वाहत असतो ते वाहत्या संपत्तीचे प्रतीक समजले जाते . आणि मला ते खरेही वाटले कारण इथे गरिबीचा लवलेश दिसत नव्हता , लोकसंख्या कमी आणि उत्पन्न जास्त त्यामुळे तिथल्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावलेला जाणवत होता .
सिंगापूरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात . सिंगापूरच्या पर्यटकांमध्ये जास्त संख्या भारतीयांची दिसत होती . आणि आलेल्या प्रत्येक पर्यटकाच्या यादीत मर्लायन हा खास पॉईंट असतोच . विशेष म्हणजे याठिकाणी मोफत एन्ट्री आहे . विविध रंगी लाईट मध्ये ते दृश्य मनोहर दिसत होते . आम्ही बराच वेळ तिथे रेंगाळलो , वेगवेगळ्या अँगलमधून आम्ही तो पुतळा पाहिला , फोटोशूट झाले .
रात्री तिथेच स्ट्रीटवर पंजाबी डिश आम्हाला मिळाल्या आम्ही सर्वांनी मनसोक्त ताव मारला आणि उशिरा हॉटेलवर पोहोचलो .आज आमचे सिंगापूरचे वास्तव्य संपणार होते अत्यंत सुंदर , स्वच्छ आणि आधुनिक शहर , देश म्हणून ज्याची गणना होते त्यापैकी एक म्हणजे सिंगापूर , हे ऐकले त्याप्रमाणे खरेही आहे आणि ते सौंदर्य आम्हाला सर्वांना एकत्र पाहता आले याचा मला मनोमन आनंद होत होता . पर्यटन म्हणून सिंगापूरला नक्की जावे . आपल्या वेळ आणि बजेटप्रमाणे नियोजन केल्यास जास्तीत जास्त आनंद मिळतो . शक्यतो तीन महिने आधी सर्व तयारीला लागल्यास विशेषतः फ्लाईट बुकिंग केल्यास किफायतशीर पडते त्यानुषंगाने बाकी तयारी पण छान होते . आणि स्वतः मॅनेज केल्याचा आनंद मिळतो . आम्ही तिथली निवडक स्थळे पाहिली . उद्या आम्ही बाय बाय सिंगापूर करत व्हिएतनामला निघणार आहोत . आता तिकडचा निसर्ग आम्हाला खुणावत होता . तीन दिवसाचा मांडलेला पसारा बऱ्यापैकी आम्ही सकाळीच आवरलेला होता आता जाऊन राहिलेली आवराआवरी आणि पुढे निघणे ! मला पुढचे आकर्षण वाटत होते मी मनाला समजावत होते परदेशवारीचा हा माझा पहिलाच अनुभव आहे मग मला तेवढा आधीरपणा असणारच ! तर आवरा मग
चलो व्हिएतनाम !!!
*क्रमशः*
*व्हिएतनाम*
देखणे निसर्गसौंदर्य लाभलेला , समुद्रकिनारे , पर्वत , ऐतिहासिक स्मारके आणि संस्कृतीचा सुरेख संगम असलेला , कमी लोकसंख्या असणारा आणि जलद गतीने विकसीत होत असलेला , जाणीवपुर्वक निसर्गाचे संवर्धन करणारा पर्यटकांचे स्वागत करणारा निसर्गरम्य देश म्हणजे व्हिएतनाम ! हजारो वर्षे चीनने या देशावर अधिपत्य गाजवले . नंतर फ्रेंच वसाहती , जपानी आधिपत्य यांच्याशी सामना करत करत साधारणपणे भारताबरोबर म्हणजे 1945 साली व्हिएतनाम हा देश स्वतंत्र झाला आहे . तिथले लोक दिसायला बऱ्यापैकी चिनी लोकांसारखे दिसतात . व्हिएतनामी डोंग ( VND ) हे या देशाचे चलन असून त्या प्लास्टिकच्या नोटा आहेत . भारतीय एक रुपया म्हणजे त्यांचे 300 डोंग आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आपण श्रीमंत फॉरेनर आहोत . तिथे रोजच्या साध्या व्यवहारासाठी पण 10000 डोंग ची नोट आपल्यासाठी एकदम कमी रक्कम आहे . त्यामुळे सिंगापूर मधून व्हिएतनामला गेल्यामुळे इकडे सगळं स्वस्त आहे असे आम्हाला वाटत होते . शेती आणि पर्यटन हे या देशाचे प्रमुख उद्योग असून अलीकडच्या काळात उत्पादनावर भर आहे . ताज्या भाज्या , भात , काजू , मासे आणि इतर सागरी प्राणी आणि वनस्पतिजन्य पदार्थाचा जेवणात भरपूर वापर असतो . इथली कॉफी पण प्रसिद्ध आहे . इकडे 90 टक्के जेवण हे मांसाहारी असते आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे ते पदार्थ व्हेज आहेत का नॉनव्हेज हे दिसण्यावरुन अजिबात ओळखायला येत नाही . त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनी विचारुन घेणे योग्य ! विविध प्रकारचे ज्युसेस , फळे आणि स्मुदी मुबलक प्रमाणात मिळतात , तेही एकदम फ्रेश आणि चविष्ट . व्हेजिटेरियन लोकांना पोटभरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बानमी ( ब्रेड ) हेच त्यांचे प्रमुख अन्न आहे , तसेच जेवणात सॅलड पण मुबलक असे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या पानाची पछडी केल्यासारखी असते . जसे आपल्याकडे चटणी , लोणचे , मिरपूड , मीठ हे पदार्थ चव वाढवण्यासाठी असतात तसे अनेक प्रकारचे सॉस तिथे असतात त्यात फक्त व्हेज पाहून घ्यावा लागे . पण सॅलड मात्र भन्नाट लागते . आमचा भर ज्यूस , फळे , स्मुदी , आणि सॅलड वर होता . मग इथल्या वास्तव्यात पुन्हा सगळ्यांचा मोर्चा घरुन घेतलेल्या खाऊच्या पार्सलकडे बऱ्यापैकी वळत असे .
*दानंग*
सिंगापूरहून निघून दुपारी 1.30 वाजता आम्ही दानंग येथे पोहोचलो . आपल्याकडे ज्याप्रमाणे ओला उबर आहेत त्याप्रमाणे तिकडे ग्रॅब सुविधा आहे . विमानतळावर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी दिसत होती . आम्ही ग्रॅब बुक करुन आमच्या लॉजकडे निघालो .
बऱ्याचशा देशांमध्ये आपल्या उलट ड्रायव्हिंग असते हे ऐकून होते तो अनुभव आला , पण गाडीत बसलो आणि ते प्रकर्षाने जाणवले . ड्राईव्हर सीट डाव्या बाजूला आहे आणि वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतात ऐकायला सोपे वाटले पण प्रत्यक्षात तो अनुभव मला थोडासा भीतीदायक वाटला . आमची गाडी फास्ट निघाली आणि समोरुन फास्ट येणारे वाहन त्यांच्या त्यांच्या नियमात होते पण मला ते राँग साईडने आपल्या अंगावर येतेय अरे बापरे ! असे वाटले . येईपर्यंत ते खटकत होती त्याची काही सवय झाली नाही फक्त थोडी भीती कमी झाली .
होईआन आणि बा ना हिल्स ही दोन्ही पर्यटन स्थळे आम्ही दानंग येथे राहून करणार होतो . ड्रायव्हरने बरोबर आम्हाला उद्याचा प्लॅन विचारला . आम्हाला थोडं फ्रेश होऊन आज होईआनसाठी निघायचे होते . इकडे थोडंसं बार्गेनींग करावे लागते हे आम्हाला माहिती होते . रेट्सचा अंदाज घेत मुलांनी त्याच दोन ग्रॅब एका तासांत परत यायला सांगितल्या . आम्ही हॉटेलमध्ये चेकइन केले थोडासा आराम करुन आवरुन 3.30 वाजता होईआन कडे जाण्यासाठी बाहेर पडलो .
*होईआन*
दानंग पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर शहर आहे . दिव्यांची रोषणाई , हस्तकला , डोंगर , समुद्रकिनारे , सांस्कृतिक वारसा असे वैविध्य असलेले होईआन हे शहर आहे . कोकोनट बोट राईड आणि कागदी दिवे घेऊन बोटींग हे याठिकाणचे वैशिष्ट्य आहे . इथेही बऱ्यापैकी बार्गेनींग चालते त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगावी लागते . आम्ही ग्रॅब मधून उतरलो की अनेक एजंट बोटींगकडे पाठवण्यासाठी तिथे उभे होते त्यात बऱ्यापैकी महिलाच होत्या . व्हिएतनामचे प्रत्येक ठिकाणचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी डील करणाऱ्या महिला होत्या , हॉटेल , दुकाने , टॅक्सी , साइट सीन एवढेच काय तिथे दुकाने जी आहेत त्याबाहेर कस्टमर आपल्याकडे वळवणे हेही काम महिलाच करतात आणि actual service द्यायला पुरुष किंवा स्त्रिया दोघेही असतात . याठिकाणी अनेक महिला होत्या त्यापैकी एकी बरोबर आम्ही आमचे बोटींग ठरवले . ती आम्हाला किनाऱ्यावर बोटवाल्यांकडे घेऊन गेली त्यांचा हिशोब झाला आणि आम्ही कोकोनट राईडसाठी सज्ज झालो तो राईड जवळजवळ एक तासाचा आहे . दुरडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या गोल बोटीमध्ये आम्ही वॉटरप्रूफ जॅकेट घालून प्रत्येक बोटमध्ये दोघे दोघे बसलो दोन्ही बाजूंनी नारळाची घनदाट झाडे त्यातून नावाडी आगदी तालात , गाणं म्हणत नाव वल्हवत होता . आम्ही भारतीय आहोत हे त्यांनी ओळखले होते , त्याला हिंदी , इंग्लिश येत नव्हते पण आम्हाला खूष करण्यासाठी तो
" भारट माटा की जय "
असे मधूनच घोषणा देत होता आणि आमचा बोटीतून नागमोडी वळणे घेत प्रवास सुरु होता , त्यामुळे समोरचे फारसे दिसत नव्हते . सुरवातीला पाणी घाण आणि उथळ वाटले पण पुढे जाईल तसे पाणी स्वच्छ आणि खोल जाणवत होते . एखाद्या पोस्टरमध्ये निसर्गसौंदर्य ठासून भरलेले आवर्जून रंगवले जाते तशी रंगांची उधळण करत परमेश्वराने सुंदर निसर्गाची देणगी इथे बहाल केलेली आहे . आपल्या नजरेला थंडावा मिळतो , नयनरम्य दृश्य पाहून तृप्त व्हायला होते . नदीच्या काठावर टुमदार घरे आहेत पंधरा वीस मिनिटे गेल्यानंतर पुढे नदीचे पात्र खूप रुंद झाले आहे आणि याठिकाणी अनेक बोटी दिसत होत्या . इकडे गाणी आणि डान्स पण सुरु होता . तिथे वेगात गोलगोल फिरवणाऱ्या बोटी होत्या आमच्या बोटवाल्यांनी तिकडे नेले आणि ज्यांना हवे त्यांनी दोघे दोघे त्या बोटीत जायला सांगितले . ते दृश्य पाहिले आणि अचंबित व्हायला झाले , थोडी भीती पण वाटली पण हा अनुभव घेतलाच पाहिजे गडे ! असे मला वाटले तर ते पाहीलं की पहिल्यांदा यांनी आणि आशिषने जाणार नाही म्हणून घोषित केले तर आकांक्षा आणि किर्ती आम्हाला करायचं म्हणत नाचत उभ्या राहिल्या . त्या दोघी पटकन त्या बोटीत गेल्या . गाण्याच्या तालावर त्या नावाड्याने बोट गोलगोल फिरवण्याचा वेग वाढवला . या दोघी मस्त ओरडत चिअर अप करत होत्या . आमची बोट भोवतीने हलकेच फिरत होती ते पाहताना आत्रेय सुद्धा खूप exite झाला होता खूप मजा आली , पाणी खोल असल्यामुळे थोडी भीती पण वाटली पण मनातून वाटले असे पुन्हा कुठे अनुभवायला मिळणार आपणही बसावे अशीही इच्छा झाली . माझ्याप्रमाणेच कार्तिक पण बसावे या मतावर आला . हो नाही करत आम्ही उठलो या दोघी ओरडत आम्हाला चला या बसा काही होत नाही म्हणत उत्तेजन देत होत्या . हो नाही करत शेवटी द्विधा मनस्थितीत मी आणि कार्तिक धाडसाने निघालो उगाचच कार्तिक आहे आपल्याबरोबर म्हणून थोडं सुरक्षित वाटलं पण तसा तर तोही मनातून घाबरला होता . त्या नवड्याला आपली भाषा समजत नव्हती , इंग्लिश येत नव्हते हातवारे करत मी त्याला सावकाश बोट फिरवायला सांगून आम्ही बसलो . त्याने बोट गोलगोल फिरवत वेग वाढवला , थोड्या वेळात त्याला मी आता बास म्हणून ओरडत सांगू लागले त्याला ते कळत नव्हते , त्याला मला मजा येते असे वाटत होते . मी दोन्ही हातानी बोटीला पकडले होते त्यामुळे मला खूण पण करता येईना पण ओरडत असल्यामुळे त्याचा फिरवायचा वेग वाढत होता . शेवटी मी एक हात बाजूला करुन त्याला एक फटका मारुन हाताने थांबवण्याची खूण केली तेव्हा त्याने वेग कमी केला आणि मला हुश्श झाले पण मजा आली . आत्रेयच्या भाषेत मात्र
" आजी घाबल्ली ".
पुन्हा आपापल्या बोटीत बसून शूटिंग करत फोटो घेत आमची बोट वळवली पुन्हा यायला 15/20 मिनिटं लागली अशी ती एक तासाची आमची अविस्मरणीय कोकोनट राईड झाली पण सगळ्यांनी एन्जॉय केले यात वाद नव्हता. पैसा वसूल राईड झाली , असे बोटींग मी पहिल्यांदा केले होते . शिमला ट्रीपच्या वेळी ब्यास नदीत 14 किमी राफ्टिंग केले होते , जबलपूरला नर्मदेत पण बोटींग केले होते पण ही मजा काही न्यारीच आली . लहान मुलांप्रमाणे आनंदी होऊन आम्ही बाहेर आलो त्याच ग्रॅबने आम्ही आणखी एका बिचवर गेलो त्याठिकाणी लॅम्प फेस्टिवल खूप भारी होता . याठिकाणी आम्ही सर्वजण एकाच बोटीत बसणार होतो . बोटीभोवती पुर्ण आकाशदिव्यांची रोषणाई दिसत होती , बोटी छान सजवलेल्या दिसत होत्या . अशा अनेक बोटी त्या नदीत होत्या . शांतपणे ती बोट पुढे पुढे जात होती , आणखी एक गंमत याठिकाणी होती ती म्हणजे बोट मध्यावर गेल्यावर नावड्याने कागदी आकाश कंदील आमच्या हातात दिले , त्यात मेणबत्ती होती , एकाच वेळी सर्वांनी त्या लावल्या आणि नावड्याकडे एक काठी होती त्या काठीला खाली एक पणती सारखा साचा होता . एकेकाने ती काठी हातात पकडून त्या पणतीवर दिवा ठेऊन तो पाण्यात सोडायचा असा तो शेवट होता . प्रत्येक बोटीतील पर्यटक असे दिवे सोडत होते आणि ते लाटेबरोबर सर्वत्र पसरत होते . फार सुंदर आणि मनाला प्रफुल्लित करणारे ते दृश्य आणि तो क्षण होता . क्षणभर दिवाळी असल्याचा , भारतातील साऊथमधील त्रिपुरारी पौर्णिमा दाखवतात असा भास झाला पण ते दिवे प्रत्यक्षात आम्ही सोडत होतो ती मजा वेगळीच होती . वातावरण खूप आल्हाददायक होते त्यामुळे हे बोटींग संपल्यावर आम्ही थोडावेळ तिथेच रेंगाळलो . याठिकाणहून आम्हाला ड्रॅगन ब्रिजवर जायचे होते ग्रॅबवाला हजरच होता .
*ड्रॅगन ब्रीज*
तो ब्रीज आमच्या हॉटेलपासून जवळ होता म्हणजे आम्हाला दानंगला जायचे होते . याठिकाणी नदीवर ड्रॅगनच्या आकाराचा ब्रीज बांधलेला आहे , व्हिएतनामी संस्कृतीत तो एक शक्ती , प्रतिष्ठा आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो . रात्रीच्यावेळी तो रंगीत लाइट्सनी उजळून निघालेला असतो , फार सुंदर दृश्य असते ते इतर वेळी तो वाहतुकीसाठी खुला असतो आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता त्याच्या तोंडातून आग बाहेर पडते . नेमका रविवार असल्यामुळे आम्हाला तो शो मिळणार होता . आम्ही साडेआठ वाजताच तिकडे पोहोचलो होतो तर ब्रीज जवळ मोठे ग्राउंड होते , पर्यटकांनी तो परिसर फुलून आला होता . आणि स्थानिकांचे अनेक प्रकारच्या खाऊनी स्टॉल खचाखच भरले होते . त्यापैकी फणसाचे गरे आणि नारळपाणी एवढं आम्हाला घेण्यासारखे होते , आम्ही नारळ पाणी घेतलं . हे स्टॉल चालवणाऱ्या सगळ्या महिला होत्या , त्यांचा एरिया ठरलेला होता त्यात खुर्च्या टाकलेल्या होत्या , म्हणजे पर्यटकांना त्यांच्याकडे ऑर्डर देऊन त्या खुर्चीवर बसून तो शो पाहता येईल अशी सोय होती . अत्यंत हुशारीने त्यांचा हा उद्योग चालू होता . तिथे बसूनच मुलांनी रात्रीच्या जेवणाचे पार्सल लॉजवर मागवून ठेवले . नऊच्या आधी पाच मिनिटं सगळे पर्यटक पटापट हातात काहीतरी घेऊन खुर्चीत येऊन त्या पुलाकडे नजर रोखून बसले . बरोबर नऊ वाजता त्या पुतळ्यामधून मोठाले अग्नीचे लोळ बाहेर पडत होते . लांबपर्यंत त्याचा गरमपणा जाणवत होता . पंधरा मिनिटे तो शो चालला नंतर त्यातून पाण्याचे कारंजे बाहेर फेकले गेले . साडेनऊ वाजता तर तो शो संपला . काहीतरी अद्भुत पाहायला मिळाल्याचा तो अनुभव होता . आज जीजी ठिकाणे पहिली त्या प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य वेगळे होते मनाला आनंद होत होता आम्ही गप्पा मारत तिथून निघालो . लगेचच आम्ही ग्रॅबमध्ये येऊन बसलो . आमच्या अंदाजाप्रमाणे ग्रॅब वाल्याने उतरताना दुसऱ्या दिवसाची विचारणा केलीच . आम्हाला उद्या बा ना हिल्सला जायचे होते . ग्रॅबचा आजचा अनुभव चांगला आला होता त्यामुळे त्यांना उद्या सकाळी 7 वाजता यायला सांगितले आणि लॉजवर येऊन जेवणे करुन आवराआवरी करुन झोपलो .
*क्रमशः*
*बा ना हिल्स*
सकाळी सगळी पॅकिंग करुन आम्ही लॉजमधून सात वाजता बा ना हिल्सकडे जाण्यासाठी खाली आलो . ग्रॅबवाला हजर होताच आम्ही जवळजवळ एक तास प्रवास करुन बा ना हिल्सच्या गेटवर आलो . हिल्सकडे जाण्यासाठी केबल कारचा ( गोंडोला ) वापर केला जातो . आणि या केबल कारच्या स्टेशनवर सोडण्यासाठी त्यांच्या स्पेशल गाड्या आहेत त्यांनी आम्ही तिकडे पोहोचलो . बा ना हिल्स हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारणपणे 1487 मीटर उंचीवर असलेले डोंगराच्या शिखरावर वसलेले निसर्गरम्य हील स्टेशन आहे .
केबल कार !!
साधारणपणे 10 लोक बसतील अशी व्यवस्था असलेल्या गोंडोल्यात आम्ही सगळेच पहिल्यांदा बसणार होतो . त्यामुळे प्रत्येकजण exited होता .
ऊन , पाऊस , वारा या सर्व निसर्ग चक्रात अव्याहतपणे चालू राहण्यासाठी एकदम दणकट असे वेगवेगळ्या रंगाचे षटकोनी आकाराचे ते गोंडोले होते . ठराविक अंतरावर मोठाले सपोर्ट पोल , त्यावरुन खालपासून ते डोंगरमाथ्यापर्यत लोखंडी केबल आणि त्या केबलला ठराविक अंतराने लटकणारे असंख्य गोंडोले आकाशकंदीलच भासत होते ! भल्यामोठ्या हिरव्याकंच डोंगरावर ते दृश्य पाहिल्यावर त्यात आपण बसून अधांतरी डोंगरमाथ्यावर जाणार ही कल्पना थोडीशी भीती वाटणारी पण रोमहर्षक वाटत होती . मुलांनी स्काय डायविंग केलेले होते त्यामुळे त्यांना पण फारशी भीती वाटत नव्हती पण त्यांची exitement जास्त होती . मी पण घाबरले नव्हते पण हे मात्र चांगलेच घाबरले होते त्यांना पाळण्यात बसणे किंवा फास्ट बोटींग करायची तयारी नसते . केबल कारचा बेल्ट एकसारख्या लयीत फिरत राहतो त्यामुळे थोड्या अंतरावर वरुन खाली येणारे आणि इकडे खालून वर जाणारे गोंडोले चक्राकार फिरत राहतात . आमचा नंबर आला की आम्ही सगळेजण पटपट एका गोंडोल्यात चढलो . बसल्यावर नावाप्रमाणे मला ते वाहन गोंडस वाटले . बसायला दोन्ही बाजूला बाक , वरच्या बाजूला आजुबाजूचा परिसर न्याहाळता यावा यासाठी काचा त्याच्यावर थोडीशी हवा येण्यासाठी मोकळी जागा सोडलेली . ऑटोमॅटिक असल्याने बाकी कोणीच नाही , त्याचे दार बंद झाले , आमचे आख्ख कुटुंब त्यात बसले आणि आमचा प्रवास सुरु झाला ! जसजसे वर जात होतो तसेतसे पाळण्यात बसल्यासारखे पोटात खड्डे पडत होते . आत्रेय पण गोरामोरा झाला होता तो बिलगुन बसला पण थोड्या वेळात तो नॉर्मल झाला , यांना पण बऱ्यापैकी धास्ती वाटत होती पण थोड्यावेळात ते पण नॉर्मल झाले . आता खाली मात्र दरी खोलखोल जाते असे दिसत होते आणि आपण अधांतरी आहोत याची प्रकर्षाने जाणीव व्हायची . मधूनच गोंडोल्याभोवती धुक्याची चादर लपेटली जायची की लगेच सूर्यकिरण दिसायचे . सकाळची कोवळी किरणे होती त्यामुळे त्यांची लपाछपी पहायला मजा येत होती , मधूनच डोंगरावरुन कोसळणारा धबधबा अगदी जवळच दिसायचा . आम्हाला वरती पोहोचायला साधारणपणे 25 मिनिटे लागली . आम्ही त्यातून खाली उतरलो आणि प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर काय मजा आली असा भाव दिसत होता . वरती पाहण्यासारखे अनेक स्पॉट होते .
*गोल्डन ब्रीज*
बा ना हिल्सचे प्रमुख आकर्षण म्हणजे दोन हातावर पकडलेला अर्धवर्तुळाकार सोनेरी रंगाचा पूल ! तो आम्हाला बऱ्याच लांबून दिसायला लागला होता . जसजसे त्याच्या जवळ जाऊ लागलो तसेतसे त्याचे सौंदर्य खुलून दिसू लागले . जणू काही दोन हातावर आकाशात तो पूल अधांतरी धरुन ठेवला आहे असे ते सुप्रसिद्ध शिल्प आहे . रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले रेलिंग चढउतारावर फुलांचे मोहक ताटवे , बाजूला हिरव्याकंच पर्वतरांगा , धुके जणू स्वर्गच असे ते विहंगम दृश्य पृथ्वीतलावर पहायला मिळते आणि नजरेचे पारणे फिटते ! रमत गमत ज्याला जिथे फोटो काढावे वाटतील तिकडे धावत जात मुलांची फोटोग्राफी सुरु होती . आम्ही बराच वेळ त्या पुलावर घालवला .
*फ्रेंच व्हिलेज*
पुर्वी परकियांनी जिथे जिथे व्यापार केला तिथे तिथे त्यांच्या वसाहती केल्या . भारतात ब्रिटिशांनी राज्य केले , भारतात कोणत्याही हील स्टेशनवर , बंदरावर त्या खुणा आजही दिसतात . काही भव्यदिव्य इमारती अजूनही अस्तित्वात आहेत , काही पुरातन दिसतात तर काहींचे अवशेष !
व्हिएतनामला फ्रेंच वसाहत होती त्या काळात त्यांनी एवढ्या उंच डोंगरावर अत्यंत कल्पकतेने बांधकाम केलेल्या वास्तू त्यामध्ये चर्च , चौरस , कॅफे , सुंदर रस्ते , गार्डन मोठाल्या इमारती , दिसतात . अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने , कल्पकतेने , मनोरंजन होईल असे केलेले बांधकाम दिसून येते . ते पाहताना भरपूर चालावे लागते , भरपूर चढउतार करावा लागतो . डोंगराळ भाग असल्यामुळे बागबगीचाची रेलचेल दिसून येत होती . काही इमारती पर्यटकांसाठी बंद पण दिसतात पण त्या बाहेरुन फारच आकर्षक दिसतात . फिरताना एकदीड तास कसा गेला समजले नाही .
*पॅगोडा*
व्हिएतनाम मध्ये ठिकठिकाणी पॅगोडा पहायला मिळतात . तसे याठिकाणी पण भव्यदिव्य पॅगोडा आम्हाला पाहता आला . पॅगोडा म्हणजे बौद्ध धर्माची प्राचीन मंदिरे होय . ही फक्त मंदिरेच नाहीत तर वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो . आपल्या मंदिर , मशीद , चर्च ज्याप्रमाणे बाहेरुन ओळखता येते त्याप्रमाणे पॅगोडा देखील त्याच्या विशिष्ट प्रकारच्या बांधकाम रचनेमुळे ओळखायला येतो . आतमध्ये बुद्धाची मुर्ती त्याभोवती भरगच्च फुलांची सजावट , अनेक प्रकारच्या फळांची आकर्षक मांडणी केलेली होती . शांत , ध्यानस्थ बसण्यासाठी वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते .
*अल्पाइन कोस्टर*
बा ना हिल्सवर घेतलेला रोमहर्षक अनुभव म्हणजे अल्पाइन कोस्टर ! गोंडोल्याप्रमाणे पण वेगळाच असणारा हा एक अनुभव आम्ही घेतला . आम्ही गोंडोल्यातून येताना राईड करणारे पर्यटक पाहिले होते . ते दाखवून आशिष यांना म्हणाला होता
" पप्पा आपल्याला ही राईड करायची आहे बरका "
तर यांनी तिथेच
" मी उतरल्यावर निवांत बसतो तुम्ही या जाऊन मला नका आग्रह करु "
असे सांगून टाकले . मी त्याला नजरेनेच गप्प बसायला सांगितलं . बा ना हिल्सच्या पॅकेजमध्ये ही राईड नाही ज्यांना याचा अनुभव घ्यायचा त्यांना स्पेशल तिकीट घ्यावे लागते .
रेल्वे रुळासारखे ट्रॅक त्यावर बोटीच्या आकाराचे राईडर आहेत त्यावर दोन व्यक्ती बसू शकतात सीटबेल्ट लाऊन ते इन्स्ट्रक्शनस देतात त्याप्रमाणे ते चालवावे लागते . ब्रेक आपल्या हातात आहे आपल्याला वेग नियंत्रित करायचा असल्यास , थांबायचे असल्यास ब्रेकचा वापर करायचा , अन्यथा ते स्वयंचलित असल्यामुळे ठरावीक वेगाने चालत राहते . आपल्याला स्पीड वाढवता पण येतो . डोंगरावर नागमोडी वळणे घेत , तीव्र चढउतार घेत थ्रिलिंग राईड आहे ती . आम्ही तिथे गेलो यांची अजिबात तयारी नव्हती मी त्यांना म्हणलं
" अंदमानला 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना स्कुबा करता येत नव्हते त्यामुळे ती आपली हुकली . पुन्हा कुठे डोंगरात असली राईड आपल्याला करायला मिळणार ? ब्रेक आपल्या हातात आहे बघा येत असला तर ठीक नाहीतर ते दोघे दोघे जाणार आहेत मी एकटी जाईन " .
तू हट्टी आहेस म्हणत जीवावर येऊन ते तयार झाले . ब्रेक त्यांनी त्यांच्या हातात घेतले . आम्ही सुरवातीला थोड स्लो गेलो , नंतर थांबलो , पुन्हा नॉर्मल स्पीड केला , पुन्हा वाढवला असे करत 10 मिनिटांची मस्त थ्रिलिंग राईड करुन परत आलो . यावेळी फ्रेंच बिल्डिंग , डोंगर दऱ्या , खाली जाताना तीव्र उतार होता तसा येताना खडा चढ होता . पाहिल्यावर क्षणभर भीती वाटली पण सुरक्षित राईड होती ती . दोन ठिकाणी आपोआप थांबली आल्यानंतर कळले की त्याठिकाणी आपला फोटो काढला जातो . आल्यावर दाखवतात हवी असल्यास प्रिंट घ्यायची , मी आवर्जून आठवण म्हणून ती प्रिंट घेतली .
आशिषने आमचे जोवर दिसत होतो तेवढे पुर्ण 2/3 मिनिटांचे शूट पण केले होते . आम्ही येणार त्या गेटवर आकांक्षा , कीर्ती आणि कार्तिक धावत येऊन उभे राहिले होते . आशिष त्या गेटवर होता . सगळ्यांना थोडी काळजी वाटत होती पण आल्याबरोबर त्यांनी एकदम आनंदात हसत हसत सांगितले
" फार मस्त होती राईड मजा आली . आता आम्ही आत्रेयला घेऊन बसतो तुम्ही जा " .
अशी आमची ही अविस्मरणीय राईड बा ना हिल्सवर झाली !
जवळजवळ दिवसभर आमची भटकंती झाली दरम्यान एका स्पॉट वरुन दुसऱ्या स्पॉटला जायला पण केबल कारचा वापर करावा लागला कारण वेगवेगळ्या डोंगरावर वेगवेगळे स्पॉट होते . वरती मिळेल ते खाऊन आम्ही पोट भरले पाच वाजले होते . आता खाली यायचे होते पुन्हा केबल कार स्टेशन वर आलो . केबल कारमधून खाली आलो येतानाचा अनुभव वेगळाच होता पण आज दिवसभरात त्याची सवय झाल्यासारखे झाले होते . दिवसभर भरपूर फोटो आणि शूटिंग झाले होते . आता आम्हाला पुढचे वेध होते आम्हाला लॉजवर जाऊन फ्रेश होऊन एअरपोर्टला जायचे होते . दानंग मध्ये थांबून आम्ही आसपास फिरत होतो आता इकडचे बाडविस्तार उचलून हनोई येथे हलवायचे .
*क्रमशः*
हनोई
हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे . आम्हाला इथे राहून
" हा लाँग बे "
या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळी जायचे होते . इथे समुद्रात विविध प्रकारची बेटे आहेत . बेटावर रंगीबेरंगी खडक असून काही ठिकाणी गुहा , काही ठिकाणी टेकड्या तर काही बेटे घनदाट जंगलांनी वेढलेली आहेत .
आज दिवसभर आम्ही क्रूझवर असणार होतो , त्याचेही पास आधीच काढलेले होते .
" हनोई ते हनोई "
अशी त्यांची सोय होती त्यामुळे त्यांनी हनोई पासून समुद्रापर्यंत जाण्यासाठी टुरिस्ट बसची सोय केलेली होती . त्याप्रमाणे सकाळी लॉजपासून जवळ त्यांचा स्टॉप होता तिथे आम्ही गेलो . भली मोठी बस होती , पर्यटक घेत घेत बस शहरातून बाहेर पडली . गाईडने सर्वप्रथम प्रत्येकाला गळ्यात घालण्यासाठी identy card दिले त्यावर टुरिस्ट कंपनीचे नाव आणि बस नंबर होता . त्यावरुन गर्दीचा अंदाज आला होता पण गाईडनेही तेच सांगितले . समुद्रावर अनेक बसेस आणि क्रुझ असणार आहेत , आपल्याला वेगवेगळ्या बेटांवर जायचे आहे , प्रत्येक ठिकाणी किती वेळ थांबायचे याची वेळ ठरलेली आहे त्यावेळात आपण सर्वांनी क्रूझवर परत यायचे आहे , सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास आपली दिवसभराची सफारी मस्त होईल . खुणेसाठी गाईडच्या हातात पण कंपनीचे नाव असलेला उंच झेंडा होता .
आमची बस शहराबाहेर पडली आणि ती हा लाँग बे च्या दिशेने धावू लागली . मध्ये मध्ये गाईड माहिती देत होता समुद्रावर पोहोचण्याआधी अर्धा तास मोत्याच्या एका मोठ्ठ्या वर्कशॉप कम शॉप असलेल्या सेंटरवर बस थांबली . त्याठिकाणी आगदी बारीक मोत्यापासून छोट्या सुपारीएवढ्या विविध आकारातील तेजदर , चमकदार मोती आणि त्याचे विविध दागिने होते . मुख्य म्हणजे मोती तयार होण्यासाठी त्यावर नॅचरल प्रोसेस त्याठिकाणी केली जात होती . छोट्या किटकापासून त्याला मोती तयार होण्यासाठी आवश्यक ते पोषक वातावरण तयार करुन सर्व प्रक्रिया त्याठिकाणी केली जात होती त्या प्रक्रियेला लागणारा कालावधी हा एक वर्ष ते तीनचार वर्षापर्यंतचा होता . ती सर्व प्रोसेस आपल्याला प्रत्यक्षात पाहता येत होती . त्या मोत्यांची चमक काही वेगळीच होती आणि किंमत सुद्धा ! त्याच्या किंमती आपल्या लाखो रुपयात होत्या . आम्ही फक्त पाहण्याचा आनंद लुटला आणि पुढे निघालो .
आम्ही यापुर्वी अंदमानला समुद्रावर फेरीमध्ये बसण्याचा अनुभव घेतला होता , आज इथला ! प्रत्येक ठिकाणचे निसर्गसौंदर्य न्यारेच असते हे नक्की ! वर्णन ऐकले होते आता प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली .
आमची बस समुद्रावर पोहोचली गाईडने सूचना देतदेत फायनली आम्हाला क्रुझपर्यंत नेले . किनाऱ्यालगत अनेक मोठमोठ्या क्रुझ दिमाखात उभ्या होत्या . आपण एखाद्या पिक्चरमध्ये पाहतोय असे ते दृश्य दिसत होते . रंगीबेरंगी कपडे , टोप्या , गॉगल्स घातलेल्या पर्यटकांनी सारा परिसर फुलून गेला होता . अथांग पसरलेला समुद्र किनाऱ्यावर हिरवीकंच झाडी दूर अंतरावर आगदी छोटासा तुकडा असल्यासारख्या भासणाऱ्या टेकड्या किनाऱ्यावरचे खडकसुद्धा रंगीत असे नयनरम्य सौंदर्य दिसत होते . परमेश्वराने व्हिएतनामवर सढळ हाताने निसर्गाच्या देणगीची लयलूट केली आहे असे वाटले , देणाऱ्याने दिले असले तरी घेणारानी पण त्या दैवी देणगीचे संवर्धन जिवापाड केले आहे आणि ते लोक करतात , शिस्त आणि स्वच्छता तिथल्या लोकांनी आंगी बाणली आहे हेही प्रकर्षाने जाणवले . फक्त एखाद्या स्पॉटवर असे नाही तर तिथल्या लोकांची सर्वत्र वागणूक तशीच दिसून येते .
आज दिवसभर आपण क्रुझवर असणार या भावनेनेच उकळ्या फुटत होत्या . आम्ही क्रुझमधे चढलो एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यासारखा भास झाला . एका मोठ्या टेबलवर आम्ही बसलो वातावरण थंड होते गेल्याबरोबर आम्हाला ग्रीन टी मिळाला जवळच्या काचेतून भोवतालचा परिसर स्पष्टपणे पाहता येत होता . पंधरा मिनिटात क्रुझ निघाली , मधल्या बाजूला ब्रेकफास्ट लावलेला होताच आपल्याला चालणारे अन्न फक्त शोधून शोधून घ्यावे लागणार होते .
ब्रेकफास्ट झाल्यावर सगळे इकडे तिकडे फिरु लागले . भव्यदिव्य तीन मजली क्रुझ होती ती ! बाहेर गेलं की भोवताली अथांग पसरलेला निळाशार सागर , मधूनच एखादे हिरवेगार बेट , कुठेतरी खडक , समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा , त्यावर हेलकावे खात निघालेली क्रुझ , खट्याळ वारा असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण होते . वरच्या मजल्यावर संगीत , डान्स सुरु होता , फोटो शूटिंगसाठी विविध आकाराच्या खुर्च्या टेबलांची आकर्षक मांडणी लक्ष वेधून घेत होती , अनेक गेम्स होते . गेल्यापासून फोटोग्राफी सुरुच होती . काहीच न बोलता शांतपणे एकटच न्याहाळत बसावे असे वाटत होते आणि मी तशी थोडावेळ बसले सुद्धा !
आमची क्रुझ पहिल्या स्पॉटकडे निघाली , या समुद्रात एक गुहा आहे त्याठिकाणी निळेशार शांत पाणी आहे , तिथे स्लो बोटींग आणि कायकिंग केलं जाते त्यासाठी आम्हाला क्रुझने तिथे सोडले . यात आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर आत्रेय स्लो बोटींगसाठी तर ते दोघेदोघे कायकिंग साठी जायचे ठरले . त्याप्रमाणे वॉटरप्रूफ जॅकेट घालून आम्हाला तिघांना मोठ्या बोटमध्ये बसवून टाटा करुन ते चौघे कायकिंग करण्यासाठी गेले . लहान बेटे , रंगीबेरंगी खडक , त्याच्या नैसर्गिक कमानी , आसपास झाडी त्यावर माकडे , पक्षी असे दुर्मिळ चित्र तेथे पहायला मिळाले समुद्रातून मधेच कुठेतरी उतरुन असा निसर्ग पाहण्याची मजा इथेच मिळू शकते !
आमच्याबरोबर आत्रेयनी पण ती राईड खूप एन्जॉय केली . ते चौघे तर एकदम exited मूडमध्ये परत आले होते . पुन्हा क्रुझमध्ये बसून गप्पा रंगल्या होत्या सोबत ज्यूस , स्नॅक्स होतेच . तसाच प्रवासाचा आनंद घेत एका बिचवर क्रुझ नेली . निळेशार पाणी , सोनेरी पांढऱ्या रंगाची एकदम बारीक चमकदार रेती , हिरवीगार किनार असलेल्या बिचवर आम्ही उतरलो . याठिकाणी पाण्यात खेळायला मात्र आत्रेय खूप चेकाळला , त्याला पाण्यात खेळायला खूपच आवडते , रोज आंघोळ झाल्यावर सुद्धा त्याला टबमध्ये पाणी खेळत बसायचे असते . कितीही वेळ खेळले तरी त्याचे समाधान होत नसते . रोज टबमधून उचलले की रडून दंगा असतो . तसंच त्याला इथे खेळायचे होते . दोघांनी दोन्हीकडे पकडून पळत पळत त्याचे पाय बुडवले की तो
" दूबूक केलं "
असे ओरडायचा त्याला फार मजा यायची त्याच्याबरोबर आम्हाला पण त्याच्या बाललीला पाहण्यात आनंद व्हायचा . आम्ही सगळ्यांनी आळीपाळीने त्याला पळवले सगळे दामले पण तो दमला नाही त्याला पाण्यातून बाहेर यायचंच नव्हतं ! शेवटी रडवतच आणावे लागले . थोडावेळ बीचवर रेंगाळून वेळ संपली की आम्ही क्रुझवर परत आलो . क्रुझच्या पायरीवरच पाय स्वच्छ करण्यासाठी त्यांनी पाईपने पाणी सोडले होते ( शिस्त आणि स्वच्छता याचे प्रात्यक्षिक ) .
आम्ही येईपर्यंत कुझवर जेवण लावलेले होते . ज्यूस , फळे , सॅलड आणि मस्तपैकी नूडल्स सूप यावर सगळ्यांनी ताव मारला .
त्यानंतर आणखी एक ठिकाणी क्रुझ थांबली तिथेही उतरुन पुतळा , बीच , आणि वेगवेगळ्या आकाराचे खडक पहायला मजा आली . पुन्हा शेवटचा स्पॉट एका गुहेचा होता त्याठिकाणी त्यांनी सूचना केली
" ही एक रम्य गुहा असून अचंबित व्हायला होईल असे सौंदर्य आतमध्ये आहे . याठिकाणी 430 दगडी पायऱ्या असून तुम्हाला 50 मिनिटांचा वेळ दिला जाईल . एकदा तुम्ही जायला सुरुवात केली की पुर्ण गुहा पाहून दुसऱ्या बाजूने बाहेर पडाल त्या गेटवर क्रुझ येऊन थांबलेली असेल . ज्यांना चढउतार करणे शक्य असेल त्यांनी जावे ज्यांना जमणार नाही त्यांनी क्रुझमध्येच बसावे . आत्ताच काय ते ठरवा तुम्ही थोडस जाऊन परत आलात तर क्रुझ इथे असणार नाही . "
पुन्हा सगळ्यांचा नजरा आम्हा दोघांकडे वळल्या
" तुम्हाला शक्य असेल तर चला नाहीतर इथेच बसा ".
असा मुलांचा नूर येऊ लागला आशिष तर मला म्हणाला
"कशाला येता आई तुम्ही , बघ बाबा आराम करता काय "!
आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि एकदमच सांगितले
" काहीही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही येणार ".
आणि आम्ही त्यांच्यापुढे निघालो . म्हणल्याप्रमाणे आत भरपूर चढउतार होते पण अचंबित करणाऱ्या गोष्टी पहायला मिळाल्या . निसर्गाची किमया याठिकाणी पहायला मिळाली खडकामधून अनेक कलाकृती तयार झालेल्या पहायला मिळाल्या . व्हिएतनाममध्ये प्रत्येक पर्यटन क्षेत्रामध्ये काहीतरी नवीनच पहायला मिळत होते . खडकांच्या वेगवेगळ्या आकारांच्या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या कलाकृती तिकडे पाहायला मिळाल्या . सगळ्यांबरोबर चढताना थोडेसे पायाला गोळे येत होते पण पाहत उभे राहिले की दुखणे विसरायला व्हायचे तेवढ्या वेळात थोडी एनर्जी भरुन घ्यायची आणि पुढे निघायचं असं करत करत गुहेचा शेवट आला पुन्हा एक मोठा चढ चढून आम्ही बाहेर आलो . आपण गेलो बरे झाले नाहीतर एक खूप छान स्पॉट आपला हुकला , त्याचा अनुभव घ्यायचा राहिला असे झाले असते . तसे चालणे , चढउतार , खाली बसणे याचा आम्हाला त्रास काही होत नाही पण लिमिटेड वेळात परत यायला हवं , दमलो तर बसता येणार नाही , थांबता येणार नाही असे मुलांचे मत होते . ते काही चुकीचे नव्हते पण आम्हाला आमचा विश्वास होता आणि मनाची पण उभारी होती म्हणून सगळे निभावून गेले असे म्हणायचे .
आम्ही क्रुझवर आलो की व्हिएतनामची मस्त कॉफी आमच्यासाठी तयारच होती . दुपार केव्हाच टळून गेली होती त्यामुळे आता थोड्या वेळातच दिवस मावळतीकडे झुकणार होता . आणि आता क्रुझमध्ये बसूनच निसर्ग अनुभवायचा होता . सगळ्यांचीच लगबग वरती जाण्यासाठी होती . आम्ही पण सगळे एकदम वर गेलो . अहाहा , काय सुंदर दृश्यs दिसत होते ते ! लालसर होत चाललेला मावळतीचा सुर्य , एकाच लयीत दूरवरुन फेसळात येणाऱ्या लाटा त्यावर पडलेली सुर्यकिरणे , चमकणारे पाणी आणि आकाशात ढगांची चाललेली नक्षीदार कलाकारी , क्षणाक्षणाला बदलत जाणारा आकाशाचा रंग फार मोहक दृश्य दिसत होते ते ! बघत बघत सुर्य पाण्यात डुबला आणि आकाशात जी रक्तीमा फाकली , ती रंगांची उधळण मनाला मोहून टाकत होती , वाहता वार रुंजी घालत होता मंगेश पाडगावकरांच्या
" जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा ".
या ओळी आठवल्या . मनसोक्त फोटोग्राफी झाली .
हा शेवटचा स्पॉट होता आता क्रुझ किनाऱ्याकडे धावू लागली . पुन्हा टुरिस्ट बसमधून प्रवास करत आम्ही लॉजवर पोहोचलो . पण दिवसभराची दृश्ये , अनुभव अजूनही मनात घर करुन होते .
व्हिएतनाममध्ये शहरापेक्षा जास्तीत जास्त वेळ आम्ही निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे ठरवले होते त्यामुळे आम्ही रात्रीच्या ट्रेनने सापासाठी निघणार होतो .
क्रमशः
*Lao Cai Station*
*सापा*
हनोईहून आम्हाला सापा याठिकाणी जायचे होते . दिवसभर क्रुझवर एन्जॉय करुन आम्ही एकदम फ्रेश मूडमध्ये होतो . लॉजपासून पंधरा मिनिटावर स्टेशन होते मग आम्ही फ्रेश होऊन स्टेशन गाठले . सापाला जाण्यासाठी आपल्याला
" चापा एक्सप्रेस "
ने Lao Cai या स्टेशनपर्यंत ट्रेनने जावे लागते . तशी टुरिस्ट बसची पण सोय आहे पण ट्रेनने आपण रात्रभर आरामशीर प्रवास करुन सकाळी लवकर सापा येथे पोहोचू शकतो म्हणून आम्ही ट्रेनचे बुकिंग केलेले होते . ट्रेन हनोईहून निघणार होती त्यामुळे ती लागलेली होतीच . ती एक भन्नाट प्रायव्हेट टुरिस्ट ट्रेन आहे . आपल्या कंपार्टमेंटमध्ये वायफाय , टेबल लॅम्प, स्नॅक्स , फळे , कॉफी , गरम पाणी आणि लॉजसारख्या सर्व सुविधांनी युक्त अशी ही आकर्षक ट्रेन आहे . नंतर रात्री साधारण सातआठ तासांचा तो प्रवास आहे . एकदम आरामशीर आणि छान एन्जॉय करत प्रवास करुन सकाळी साडेसहा वाजता आम्ही Lao Cai या स्टेशनवर पोहोचलो . रात्रभर पाऊस होता त्यामुळे पहाटे धुके दिसत होते , ट्रेनमधूनसुद्धा वातावरण छान दिसत होते . तिथून साधारण तीस किलोमीटरवर सापा हे शहर होते . आता तिथल्या तिथे ग्रॅब बुक करणे बरेचसे अंगवळणी पडले होते . आम्ही उतरलो की स्टेशनवर अनेक महिला छत्र्या घेऊन डील करण्यासाठी उभ्या होत्याच त्यापैकी एकीबरोबर आम्ही मोठी ग्रॅब ठरवली आणि सगळ्यांचा एकाच ग्रॅबने प्रवास होणार होता त्यांची माणसे होतीच त्यांनी आम्हाला ग्रॅबपर्यंत आणून सोडले . सकाळची वेळ होती , पाऊस सुरुच होता , मे महिना असला तरी दुतर्फा भरपूर झाडी आणि पाणी दिसत होते , खूप वळणावळणाचा आणि घाटातील रस्ता होता त्यामुळे तीस किलोमीटरचा असला तरी वेळ जास्त लागत होता पण तो प्रवास एकदम भारी वाटला , वातावरण एकदम आल्हाददायक होते . आम्ही सापाकडे निघालो , जरा लवकरच लॉजवर पोहोचलो होतो , तिकडे ग्रीन टी आणि कॉफी तयारच होती . आमच्या लॉजमधून व्ह्यु तर इतका सुंदर दिसत होता . तो पाहूनच आसपासच्या ग्रीनरीचा अंदाज येत होता . आम्ही फ्रेश झालो नाष्टा झाला . आज आम्हाला जवळच दोन किलोमीटरवर टेकडीवर असलेल्या
" *कॅटकॅट* "
या छोट्याशा गावात जायचे होते . फ्रेंच अधिकाऱ्यांसाठी सुट्टीच्या काळात हील स्टेशन म्हणून विकसित केलेलं सापापासून जवळ असलेले हे छोटंसं गाव आहे . मला अजूनही हा प्रश्न पडतो की वेगवेगळ्या परकियांनी वेगवेगळ्या देशात जाऊन कुठे कुठे त्यात्या देशाचे वैभव शोधले आहे ? आजही सापामध्ये राहून पर्यटक ट्रेकिंग करत , भाड्याने गाड्या घेऊन किंवा वाहनाने या गावात जातात . आम्ही ग्रॅबने त्या गावच्या गेटवर आलो , सुंदर असे मोठ्ठे प्रवेशद्वार आहे , गव्हाच्या तणासारख्या गवताच्या काड्यापासून ते केलेले जाणवत होते . तिथून पुढे जाण्यासाठी लोकल वाहने आहेत जीप्सी किंवा टू व्हिलरने वरती जावे लागते . आम्ही जाताना जिप्सीने जाणे पसंत केले . टेकडीवर चढत असताना दुतर्फा भातशेती ( टेरेसवरची भातशेती ) , केळीच्या बागा , नारळाची झाडी , बांबूची झाडी दिसत होती , एक सुंदर असे चित्र असल्याप्रमाणे डोंगर दिसत होता . टप्प्याटप्प्याने उंचीवर जाणारे शेतीचे प्लॉट्स दिसत होते . शेती अधिक पर्यटन पॉईंट अशा प्रकारे त्याची रचना होती .
वरती पर्यटकांची गर्दी होती पायी फिरत पाहण्यासारखा मोठ्ठा परिसर होता .
कॅटकॅट या गावात आदिवासी वसाहत आहे , हे खेडे पारंपरिक पोशाख , जीवनशैली आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे . हस्तनिर्मित दागिने , कपडे त्याठिकाणी पाहायला मिळतात . पारंपरिक नृत्य आणि संगीत याचाही आविष्कार पहायला मिळतो . पारंपरिक घरे आणि वस्त्या पण पहायला मिळतात .
कॅटकॅटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी सुंदर धबधबा आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूमधून पाहायला मिळतो . धबधब्याचे पाणी खाली नदीच्या रुपात थोडेसे संथ होते त्यावर फ्रेंचांनी एक मोठा पूल बांधला आहे आणि त्यावर अनेक व्ह्यू मधून धबधबा दिसेल आशा पॉइंट्सना आकर्षक अशा विविध कमानी आहेत त्या फुलांनी सजवलेल्या आहेत आणि पर्यटक तिथे बसून फोटोग्राफी करतात .अनेक पर्यटक तिथली वेशभूषा करुन पण फोटोग्राफी करत असल्याचे दिसून आले . बांबूचे बन पण फार सुरेख होते . पर्यटकांसाठी तिथे उसाचा रस आणि शहाळी मुबलक होती . रेस्टॉरंट बांबू आणि मजबूत लाकडी फळ्यापासून बनवलेले आहेत . नदीवर सुद्धा व्ह्यू पाहण्यासाठी लाकडी ब्रीज आहेत आपण त्यावरुन चालताना तो हालल्यासारखे जाणवते , खालून धबधब्याचे पाणी वाहते . तो ब्रीज फारसा मजबूत वाटत नव्हता त्यामुळे मला तशी भीती वाटली ते पाहताना मी सगळ्यांना
" पटकन बाहेर या " असे ओरडून सांगितले पण लोकांची भरपूर जा ये होत होती . तिथे खुर्च्या टेबल पण कलात्मकतेने बनवलेले दिसले तर खाण्यासाठी फळे , सॅलड आणि वेगवेगळ्या स्मुदी मिळत होत्या . थोडावेळ त्या सुंदरशा नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या रेस्टॉरंट मध्ये बसून सगळ्या प्रकारच्या खाद्याचा आस्वाद घेतला . बराच वेळ भटकंती केल्यावर आम्हाला खाली यायचे होते . येताना आम्ही टू व्हिलरने यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे एका घराजवळ आम्ही थांबलो , मुख्य कर्ती बाई घरातून बाहेर आली . आता वरुन खालच्या गेटवर येण्यासाठी आम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला आणि त्यांनाही माहिती होते . त्यामुळे तिच्या आव्वाच्या सव्वा मागणीला बार्गेनिंग करत आम्ही खाली येण्याचा भाव ठरवला . त्यांच्या घरातील टू व्हिलर बाहेर निघाल्या आम्ही मागे बसून निघालो विशेष म्हणजे जसे पर्यटक असतील तशी घरातील माणसे निघाली . माझ्यासाठी गाडी घेऊन ती बाई स्वतः आली . त्यांच्या गाड्यावर बसून आम्ही खाली निघालो . तीव्र उतार आणि समोरचे काही दिसणार नाही अशा वळणाचा तो रस्ता त्यांचा तो सवयीचा आहे पण आपल्यासाठी नवीनच की ! व्यवहारात चतुर असणारी ती खेडवळ बाई आगदी सराईतपणे गाडीवर बसली मला तिने खुणेनेच मागे बसायला सांगितले आणि खड्या उतारावर त्या बाईच्या मागे मी आपली जीव मुठीत घेऊन बसले होते . ती तिथली बादशहा होती ! त्यांची हद्द त्या गावच्या गेटवर सोडण्याची आहे . तिथून पुन्हा ग्रॅबने सापा येथे यावे लागते . आम्ही लॉजवर आलो दुपारी थोडावेळ आराम करुन सायंकाळी सिटीत फिरु असे ठरले . ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी नियोजन करुन सकाळी लवकर जायला हरकत नाही .
आम्ही लॉजवर दुपारी परत आलो थोडा आराम करून सायंकाळी आम्ही सिटीमधून फिरत होतो . व्हिएतनामी टोप्या , पिशव्या आणि हस्तकलेचे बरेच कपडे आणि वस्तू दिसत होत्या . कॉफी ठिकठिकाणी मिळत होती . व्हिएतनामचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी रोडवर ठिकठिकाणी आगदी चहाच्या टपरी सारखे मसाज सेंटर आहेत . त्याठिकाणी नेलआर्ट पण केले जात होती तेही आगदी माफक दरात . बराच फेरफटका मारला लायटिंग मात्र प्रत्येक शहरात दिवाळी असल्यासारखी जाणवत होती . शेवटी एका मसाज सेंटरवर आम्ही थांबलो सगळ्यांनी तिथल्या मसाजचा अनुभव घेतला मुलींच्या आग्रहानुसार मीपण नेलआर्ट करुन घेतले . तसही आता जरासा निवांत वेळ होता . आम्ही जेवणे करुन परतलो आम्हाला उद्या
" फॅन्सी पॅन "
याठिकाणी जायचे होते .
*" फॅन्सी पॅन "*
फॅन्सी पॅनला इंडोचायनाचे छत असेही म्हणले जाते . व्हिएतनामचे सर्वात उंच ठिकाण म्हणजे फॅन्सी पॅन होय . समुद्रसपाटीपासून 3147 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे . सापामधून आपल्याला एका रेल्वे स्टेशनवर जावे लागते . त्याठिकाणी आपल्याला पिकनिक ट्रेन मिळते . पंधरा ते वीस मिनिटांचा हा प्रवास करताना आपल्याला डोंगरातून जावे लागते बोगदे लागतात आणि ही ट्रेन आपल्याला बऱ्यापैकी उंचीवर पण डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडते . तिथून पुढे आणखी उंचीवर जाण्यासाठी केबल कारने ( गोंडोला ) जावे लागते . ट्रेन स्टेशन ते गोंडोला स्टेशन इतके सुंदर आहे , वळणावळणाचा रस्ता पण दोन्ही बाजूला खूप फुलझाडे होती काहीकाही ठिकाणी कृत्रिम फुलांच्या अनेक कलाकृती पुतळे केलेले होते . छान बाहुलीचा फ्रॉक होता फक्त आपण जाऊन उभे रहायचे आणि फोटो घ्यायचा . वेगवेगळे बाल बुद्धाचे पुतळे होते अशा या फुलझाडीतून आम्ही गोंडोला स्टेशनपर्यंत गेलो . तिथे कालचाच अनुभव आज अजून एकदा घेणार होतो . काल थोडीफार भीतीची भावना होती आज मात्र आम्ही सुरुवातीपासूनच एकदम एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये होतो . आम्हाला ज्याठिकाणी गोंडोल्याने सोडले त्याठिकाणी खूप मोठे पॅगोडा मंदिर होते . ते श्रद्धा , शांती आणि सुंदर वास्तुकलेचे प्रतीक मानले जाते आतमध्ये बुद्धाच्या मोठ्या मोठ्या मुर्ती , फुलांची सजावट आणि फळांची आरास मांडलेली होती , धूप दरवळत होता . लोक ध्यानासाठी बसत होते . एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण आहे . व्हिएतनाममध्ये प्रत्येक ठिकाणी पॅगोडा दिसत होते काही पुरातन तर काही नवीन बांधलेले पण रचना सर्वांची एकसारखी होती . इथे टप्प्याटप्प्याने वेगवेगळी ठिकाणे बघत वर जाण्याचा अनुभव घ्यायला खूप मजा आली . आता इथून वरती जाण्यासाठी आम्ही पुन्हा एका दोन डब्याच्या ट्रेनमधून प्रवास करणार होतो . लांबून पाहिले तर ती ट्रेन डोंगरावर एकदम खडी चढत असल्यासारखी दिसत होती . आम्ही त्या ट्रेनने पुन्हा वर गेलो त्याठिकाणी फार लांबून खूप मोठा बुद्धाचा पुतळा दिसत होता . याठिकाणी मात्र ऊन आणि धुके यांची लपाछपी चाललेली दिसत होती . वातावरण एकदम थंडगार होत चालले होते . त्याप्रमाणे आम्ही गरम कपडे बरोबर नेलेले होते . अनेक पायऱ्या चढून त्या भव्य दिव्य आणि उंच अशा काळ्याशार बुद्धाच्या पुतळ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते . आसपास हिंडण्यासाठी खूप मोठा परिसर आहे ते पुर्ण दगडी बांधकाम दिसून येते . सतत वारा वाहत होता , याठिकाणी आम्ही भरपूर वेळ घालवला आता आम्ही डोंगर माथ्याकडे निघालो . भरपूर पायऱ्या चढून आम्ही 3143 मिटर उंचीवर असलेल्या ध्वजस्तंभाजवळ पोहोचलो . त्याठिकाणी अनेक देशांचे ध्वज दिसत होते . हवेत भरपूर गारठा जाणवत होता , खरंतर तिथे चहा मिळाला तर काय मजा येईल असे उगाच वाटून गेले . पुन्हा येताना मात्र मस्त एका ठिकाणी मोठी मोठी रताळी गरम गरम भाजून मिळाली त्या गारठ्यात ती खायला खूप मजा आली . तसे पायऱ्या चढून सगळे दमले होते . थोडाफार खाऊ आमच्या बॅगमध्ये होता , थोडेसे बसून आम्ही बरोबर आणलेला खाऊ गरमगरम रताळी खाऊन पाणी पिऊन नंतर भरपूर फोटोग्राफी केली आणि परतीचा प्रवास सुरु केला . परत येताना पुन्हा तसेच ट्रेन , गोंडोला , ट्रेन असे करत खाली आलो . आता आम्हाला पुन्हा चापा एक्सप्रेसने परत हनोई येथे जायचे होते . आणि हनोईहून पुन्हा पुढचा आणि व्हिएतनामाचा शेवटचा पॉईंट " निन्ह बिन " याठिकाणी जायचे होते . आम्ही आवराआवरी करुन स्टेशनला आलो , दोन दिवसापूर्वी ज्या ट्रेनने आलो तीच ट्रेन आमची वाट पाहत उभी होती . दिवसभर एवढे फिरलो तरी त्या ट्रेनच्या प्रवासाची सगळे आतुरतेने वाट पाहत होतो !
*क्रमशः*
*निन्ह बिन*
आमचे पुढचे आणि शेवटचे ठिकाण म्हणजे " निन्ह बिन " हे होतं . बोगद्यातून बोटींगचा विलक्षण अनुभव हे याठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे . याठिकाणी जाण्यासाठी आम्हाला पुन्हा चापा एक्सप्रेसने हनोई आणि हनोई ते निन्ह बिन असा प्रवास करावा लागणार होता . पुन्हा तीच पिकनिक ट्रेन , तोच सुखद अनुभव आणि सुखद प्रवास ! आम्ही सकाळी सहा वाजता हनोई स्टेशनवर पोहोचलो आणि लगेच साडेसहा वाजता आम्हाला दुसरी ट्रेन होती . त्या ट्रेनने साधारण दोन तास प्रवास होता . पण प्रवास बराचसा घाटवळणातून होता त्यामुळे निसर्ग सौंदर्य तर खचाखच भरलेले होते . पाऊस सुरुच होता सकाळच्या वेळीच आम्ही " निन्ह बिन " स्टेशनवर पोहोचलो . याठिकाणी एका रिसॉर्टवर आम्ही राहणार होतो . रिसॉर्ट्स स्टेशन पासून लांब लांब असल्यामुळे रोडवर फारशी गर्दी जाणवत नव्हती . पण ठिकठिकाणी नद्या आणि बोटींग दिसत होते . गावात नदी की नदीत गाव असे ते दृश्य दिसत होते . डोंगर झाडीतून मोठ्या रस्त्याने आम्ही एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रिसॉर्टवर पोहोचलो . नुकताच पाऊस पडलेला होता आणि ऊन पडले होते त्यामुळे डोंगरावर दवबिंदूची दाटी झाली होती . त्यामुळे डोंगर जणू चमकदार खड्यांचा हिरवागार शालू लपेटल्यासारखा भासत होता . फार सुंदर आणि टुमदार रिसॉर्ट होते ते ! मोठ्या मोठ्या कौलारु रुम्सची सोय होती . मध्यभागी मोठ्ठा स्विमिंग टँक त्याच्या भोवती भरपूर झाडी त्यानंतर खडकातून माशांसाठी मोठ्ठा नैसर्गिक टँक तो पुर्ण रिसॉर्टमध्ये फिरवलेला होता त्यामध्ये दीड दीड फुटाचे मोठाले रंगीबेरंगी असंख्य मासे मुक्तपणे संचार करत होते . एवढ्या मोठ्या परिसरातून कुठूनही आले तर मासे दिसत होते , पुन्हा त्याभोवती झाडी आणि झाडीत मध्ये मध्ये आगदी डोंगराला लागून टुमदार रुम्स होत्या . खिडकीतून आपण डोंगराला हात लावू शकत होतो इतक्या डोंगराजवळ आमच्या रुम्स होत्या . अनेक प्रकारची फळझाडे आणि रंगीबेरंगी फुलझाडे अगदी बहरलेली होती अगदी लकडलेल्या फणसाचे झाड सुद्धा होते ! पाहूनच फार फ्रेश वाटत होते . आम्ही इथे जरा निसर्गाच्या सान्निध्यात निवांत राहणार होतो . गेल्या गेल्या आम्हाला सगळे नॅचलर फूड मिळाले , फ्रेश फळे मिळाली आणि गारेगार वातावरणात व्हिजीटेबल आर्कचे गरमागरम नूडल्स सूप प्यायला मिळाले फार मजा आली . नाष्टा झाला की आत्रेयसह सर्वांनी स्विमिंगचा भरपूर आनंद लुटला . पुन्हा भरपूर पाऊस सुरु झाला , आता मात्र काळजी वाटू लागली कारण बाहेर निघता आले नाही तर आपण जे करण्यासाठी इथपर्यंत आलो ते आजच व्हायला हवं नाहीतर पंचाईतच व्हायची असे वाटू लागले पण थोड्याच वेळात पावसाचा जोर कमी झाला . आम्ही आवरुन बसलेलो होतोच . पटापट आम्ही बाहेर पडलो . व्हिएतनाम मधील सर्वात प्राचीन पॅगोडा या ठिकाणी आहे आम्ही तिकडे जाण्यासाठी दुपारीच निघालो . लांबूनच उंच टेकडीवर पॅगोडा असलेले दिसले आणि आतमध्ये जाण्यासाठी ब्रीज दिसला दोन्ही बाजूला छान शेवाळी रंगाची हिरवळ दिसत होती . आता आकाश एकदम निरभ्र झाले होते . म्हणलं चला आपल्यासाठी ही सोय झाली तेवढ्यात त्या हिरवळीतून एक छोटीशी नौका येताना दिसली आम्हाला खूप आश्चर्य वाटले आगदी लॉन्स असल्यासारखे भासणारे लॉन्स नसून ती नदी आहे हे समजले . गाडीतून उतरुन जवळ जाऊन पाहिले तर ती सगळी पाने होती . ती एकप्रकारची वनस्पती होती आणि पाण्यावर ती भरगच्च पसरलेली होती . आपल्याकडे कमळाची पाने नदीत दिसतात पण पाणी पण दिसते इथे पाणी आजिबात दिसत नव्हते , त्यातून येणारी
नौका पाहिल्यावरच कळले होते की ती नदी आहे . पण कमाल दृश्य होते ते नदीकाठी डोंगर होते तर एका बाजूच्या डोंगरावर पॅगोडा मंदिर होते . अक्षरशः पोस्टर असल्यासारखे ते सौंदर्य दिसत होते . आम्ही आतमध्ये गेलो तर बारीक नक्षीकाम केलेल्या दगडाच्या पुरातन विविध कमानी आणि विविध पुतळे त्याठिकाणी दिसून आले तर उंच डोंगरावर एकदम प्राचीन पॅगोडा होता . डोंगरात उंच गुहा आणि त्या ठिकाणी बुद्धाची मोठी मुर्ती होती . ट्रेकिंगसाठी लोक येथे येतात . याठिकाणी पॅगोडचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम होते . संपुर्ण परिसर अतिशय शांत , रम्य , प्रसन्न वाटत होता . ध्यानाला बसण्यासाठी पण लोक या स्थळाला विशेष महत्व देतात .
बराचवेळ फिरुन आम्ही बाहेर पडलो आता मुख्य आकर्षण ज्याचे होते त्या गुहेतील बोटींग करण्यासाठी जाणार होतो . सर्वांची उत्सुकता आगदी शिगेला पोहोचली होती . बरीच भ्रमंती केली असली तरी हा अनुभव सगळ्यांसाठी पहिल्यांदा होता , बोगद्यातून बोटींग कसे असेल याविषयी आतुरता होती . त्याचा प्रसिद्ध पॉईंट
*त्रांग अण*
हा होता आम्ही या स्पॉटला पोहोचलो . सुरवातीला आगदी लहान गाव असल्यासारखे वाटले होते पण प्रत्यक्ष त्या स्पॉटला पर्यटकांची खचाखच गर्दी होती . निसर्गाच्या सान्निध्यात राहून सगळं पहायचं होत त्यामुळे फक्त राहण्यासाठी सोय रिसॉर्टला होती आणि ते लांब लांब असल्यामुळे गर्दी जाणवत नव्हती . टुरिस्ट बसेसची पण खचाखच गर्दी होती पण शिस्तीत सगळी व्यवस्था होती . या बोटींगसाठी तिकीटाची पण भली मोठी रांग होती आम्ही बुकिंग आधीच केल्यामुळे थोडीफार औपचारिकता पार पडल्यानंतर आम्हाला आत सोडले . वॉटरप्रूफ जॅकेट घालून आम्ही पुढे गेलो . निळ्याशार पाण्याचे भले मोठे नदीचे पात्र होते आणि छोट्या छोट्या नौका सर्वत्र दिसत होत्या . दोघे दोघे पर्यटक आणि नावाडी नौकेत बसलेले असे चित्र दिसत होते ! आम्ही दोघे दोघे तीन नौकेत बसलो आणि नाव निघाली . आमचा हा दोन तासांचा राऊंड असणार होता . नदीकिनारी दोन्ही बाजूंनी भातशेती , केळीच्या बागा , नारळाची झाडे आणि त्याला लागून डोंगर होते . आमच्या बोटी साधरण एकमेकांच्या जवळच होत्या त्यामुळे आम्हाला इथे पण छान फोटोग्राफी करता आली . जेवढ्या नौका इकडून जात होत्या तेवढ्याच समोरुन परतत होत्या . याठिकाणी
" बघल ते नवलच बाई "
या उक्तीप्रमाणे अनुभव येत होता . इथे 75% नावाडी या महिला नावाडी होत्या , त्यांच्याकडे नाव वल्हवण्यासाठी दोन वल्ह होते आणि ते दोन बाजूला बांधलेले होते आणि नौकेत बसून नावाडी पायाने ते वल्ह सायकल चालवल्यासारखे वल्हवत होते आणि नाव पुढे पुढे जात होती आणि नावड्यांचे हात रिकामे होते . नदीमध्ये पाणी भरपूर खोल होते त्यामध्ये अशी नाव हाकणे काही खाऊची गोष्ट नाही हे जाणवत होते . त्याठिकाणी 20/20 लोकांचे ग्रुप बसतील अशा लांबट मोठ्या बोटी पण होत्या त्या मोटारवर चालत होत्या . जसजसे पुढे जाऊ तसे कुठे किनाऱ्यावर गावचा भाग दिसे कुठे घरे दिसत तर कुठे फक्त पाणीच पाणी दिसे ! एका तालात आमच्या बोटी चालल्या होत्या आणि नदीच्या मधोमध मोठ्ठा डोंगर दिसू लागला . सगळे एकदम अलर्ट झाले आता बोगदा दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना होती . आणि वळण घेतले की समोर बोगदा दिसला . जवळजवळ जात बोट बोगद्यात शिरली सगळ्या पर्यटकांचा कल्ला ऐकायला येत होता . सगळे आगदी आनंदोत्सव साजरा करत होते साधारण तीन किलोमीटरचा सर्वात मोठा बोगदा होता तो . ज्याप्रमाणे रेल्वे बोगद्यातून जाते आगदी त्याप्रकारे नदी वाहत होती . मागेपुढे पुर्ण अंधार होता प्रकाशकिरण आजिबात नव्हते होता तो फक्त लाईटचा प्रकाश होता . निसर्गाची आणि तिथल्या लोकांची पण काय कमाल असेल बाबा ! खाली सर्वत्र पाणी आणि एवढ्या लांब पल्ल्यात लाईटची सोय कशी केली असेल . बरं एकदा करुन काम संपले असे नाही ना , त्याचा मेंटेनन्स कसा करत असतील असे मला वाटले . पुढेपुढे आशा छोट्या मोठ्या पाच बोगद्यातून आमची बोट पुढे गेली . पुढे एकाठिकाणी नदीच्या मध्यावर भले मोठे ग्राउंड होते त्याठिकाणी एका भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्याचा भलामोठा प्रोजेक्टर नदीत लावलेला होता . पारंपरिक नृत्याविष्कार त्याठिकाणी पाहायला मिळाला . नाटक सिनेमा पाहताना वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर आणि नाट्यगृहे पहिली आहेत . पण एखादा सांस्कृतिक कार्यक्रम नदीत आणि तोही साधासुधा नव्हता , हे फक्त इथेच होऊ शकतं . नैसर्गिक सौंदर्य काय असते याचे भले मोठे उदाहरण म्हणजे व्हिएतनाम आहे असे म्हणावे लागेल . आजुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे नावाडी पुरुष किंवा महिला वयस्कर आणि रापलेले दिसत होते तो त्यांचा पारंपरिक व्यवसाय असणार आणि ज्या बोटी मोटारवर चालत होत्या त्याचे नावाडी मात्र तरुण दिसत होते , कालांतराने नौका वल्हवणे बंद होईल . जवळजवळ तासभर बोटींग करुन आमची नौकेचा परतीचा प्रवास सुरु झाला , पुन्हा येताना तोच आनंद घेत आम्ही परत आलो . दोन तासापेक्षा जास्त आम्ही याठिकाणी बोटींग केले मन तृप्त झाले . याठिकाणी एक वेगळाच अनुभव घेता आला ! यापूर्वी जबलपूरला भेडाघाटात युनिक बोटींगचा अनुभव घेतला होता .
आमचे बोटींग संपवून आम्ही त्याठिकाणाहून बाहेर आलो त्या परिसरात भरपूर रेस्टॉरंट दिसत होते . सायंकाळ झाली होती आम्ही फिरत होतो तेवढ्यात
" इंडियन फूड "
असा बोर्ड असलेले एक हॉटेल दिसले या सातआठ दिवसात व्हिएतनाम मध्ये आजच आम्हाला अशा प्रकारचे हॉटेल दिसले आम्ही इथेच जेवण करुन रिसॉर्टला जाण्याचा निर्णय घेतला . याठिकाणी सुरुवातीलाच पापड आणि पकोडे मिळाले सगळेच जेवण आपल्यासारखे मिळाले . आकांक्षा आणि किर्ती तर आगदी किचनपर्यंत डोकावून आल्या आगदी भाकरी आणि पोळी कोण करते महाराष्ट्रीयन शेफ आहे का याचं त्यांना औत्सुक्य होते . जेवण करुन सर्वांना खूप बरे वाटले आणि आम्ही पुन्हा रिसॉर्टला परत आलो . त्यामानाने लवकर आवरले होते . पुन्हा रिमझिम सुरु झाली आम्ही रात्रीचा तिथे हिंडण्याचा आनंद घेतला . कुत्री , मांजरे , कबुतर , कोंबडे , घोडा , विविध जनावरे असा सगळ्या पाळीव प्राण्यांचा त्याठिकाणी वावर होता त्यामुळे आत्रेय पण आगदी मनापासून खूष होता .
मुलांनी ठरवले होते याठिकाणी आपण पत्ते खेळत बसू आणि एकूणच ट्रीप कशी झाली , काय काय वाटले या गप्पा मारत एकत्र बसू त्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र बसलो होतो . गप्पा गोंधळात तास दीड तास कसा गेला समजले नाही . पण इथे आत्रेय थोडा किरकिर करत होता तर थोड्या वेळात त्याला ताप आलाच . वातावरण पुर्णच बदलले होते आणि त्यांनी सकाळी स्विमिंग टँकमधून पण लवकर बाहेर काढू दिले नव्हते . लगेच औषधे दिली झालं उद्या आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता त्यामानाने त्याने खूपच छान साथ दिली म्हणत आम्ही उठलो . उद्या सकाळी पण आरामात उठून तिथेच आसपास पाहायचे नाष्टा करायचा आणि इथुनच ग्रॅबने डायरेक्ट हनोई इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाणार होतो .
*चलो भारत*
सगळे झोपायला गेले तरी आत्रेयच्या तापामुळे सगळ्यांनाच थोडी काळजी वाटत होती . पण एक तासात कीर्तीचा msg आला त्याचा ताप उतरला आणि तो झोपला , जरा निवांत वाटले . या ट्रीपच्यावेळी आत्रेय 22 महिन्यांचा असल्यामुळे त्याचा प्रवास फुकट झाला , दोन वर्षापासून तिकीट बसते त्यामुळे मोठा झाला की तो मला म्हणणार आहे
" आजी माझी ट्रीप तुझ्याकडे बाकी आहे मला आठवत नाही "
उद्या आम्हाला घरातून निघून बारा दिवस होणार होते . ट्रीप ट्रीप असा गेले सहा महिने आमच्या घरात जो गाजावाजा चालला होता तो अतिशय आनंदात , सुरक्षितपणे , निर्विघ्नपणे मुख्य म्हणजे सर्वांना आरोग्यदायी प्रवास झाला .
दोन्ही देश फिरताना काही साधर्म्य आढळले . एक तर तिकडे पाणी भरपूर पण पिण्याचे पाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी विकत घ्यावे लागत होते तेही भरपूर पैसे देऊन . त्यामुळे आम्ही हॉटेलमधून बाहेर पडताना प्रत्येकाच्या बॅगमध्ये मोठी बाटली घेऊनच निघायचो . दुसरे म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रदूषण आजिबात नाही . रस्ते मोठाले , हॉर्न नाही , रस्त्यावर दुसऱ्याला आदर देण्याची भावना , स्वच्छता आणि टापटीप , नियमांचे उल्लंघन नाही , फक्त पर्यटनस्थळीच नाही तर रस्त्यावर कुठेही कचरा दिसत नाही , कुठेही भिकारी किंवा लहान मुले भीक मागताना दिसली नाहीत . दोन्ही देशाची लोकसंख्या ही बाब याठिकाणी मॅटर करते . सिंगापूर पाहताना मजा आली , महागडं असले तरी तेवढे मेन्टेन केलेलं शहर आहे ते .
व्हिएतनाम म्हणजे नैसर्गिक खजिन्याची खाण म्हणले तर वावगे ठरणार नाही . परमेश्वराकडून बहाल केलेली देणगी आहे ती . कौटुंबिक परदेशवारीचा एक अनुभव म्हणून मला खूप मजा आली . आगदी बाळ असले तरी आत्रेयला हातोहात घेणारे आम्ही सहाजण होतो त्यामुळे फारसा त्रास झाला नाही आणि त्यानेही सगळे एन्जॉय केले . त्यामानाने आशिष आणि कीर्तीची धावाधाव होत होती . रोज सकाळी लवकर आवरुन निघावे लागे , काहीही न विसरता बाळाची औषधे , खाणेपिणे , कपडे असे सगळे दिवसभरासाठी लागणारे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन सगळ्यांच्याबरोबर हजर रहावे लागे .
आम्ही प्रत्येकजण एकमेकांच्या नकळत रोज एकदोनदा त्याला ताप आहे का चेक करायचो . पण शेवटपर्यंत त्याने छान साथ दिली एकूणच ट्रीप भारी झाली . आता घरी परतण्याचे वेध लागले . तसे तर ट्रीप आमच्या आम्ही manage केली म्हणून थोडस टेन्शन होते पण मुलानी इतके व्यवस्थित प्लॅनिंग केले होते , मला खरं कौतुक आहे त्या गोष्टीचे आगदी दिवसभर एखाद्या स्पॉटला तुम्ही जाता आणि रात्री ट्रेनने जाता किंवा कुठेतरी उतरले की लगेच पुढच्या गोष्टी हव्या तशा होणे तेही कोसो दूर असलेल्या ठिकाणी ! पण छान वाटलं , त्यांचा आणि त्यांच्यापेक्षा माझा पण confidence वाढला !!
आता सहजच माझा तुलनात्मक अभ्यास सुरु झाला . दोन्ही देशांमध्ये प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त दिसत होती . वेगवेगळ्या देशांची संस्कृती वेगळी , वेशभूषा वेगळी , खाण्यापिण्याच्या सवयी भिन्न एवढेच काय दिसणे देखील भिन्न . भौगोलिक प्रदेशानुसार चेहरेपट्टीत साधर्म्य आढळते , आपल्याला पण ते लोक
" हे इंडियन "
म्हणून ओळखत असतीलच की असे वाटले .
भारतात तरी निसर्गसौंदर्य काय कमी आहे ? महाराष्ट्रात कोकणात गेले तर किती सौंदर्य पाहायला मिळते , आपण बाहेर पडणे गरजेचे आहे . पण प्रदूषण आणि नियमांचे पालन करण्याचा अभाव ! या दोन गोष्टी आपल्याकडे हाताबाहेर गेलेल्या आहेत . आपल्याकडे इतके भारनियमन असते तरी लाईटची ओरड असते त्यांच्याकडे रोजच दिवाळी असून मुबलकता आहे काय आहे ही भानगड ? लोकसंख्या हा महत्वाचा मुद्दा याठिकाणी खूप मॅटर करतो . सिंगापूरची गोष्ट जरी वेगळी म्हणलं तरी व्हिएतनामचा विचार केल्यास असे वाटले की येत्या पंचवीस वर्षात तो देश भरपूर प्रगती करेल . कारण प्रत्येकाने सगळ्याच बाबतीत स्वतःला शिस्त लावलेली आहे . आणि निसर्गाचे संवर्धन ही सामाजिक बांधिलकी त्यांनी बांधून घेतली आहे . भारतात नक्कीच याचा अभाव आहे या बाबी आगदी उच्च पातळीवर विचार करण्यासारख्या आहेत . कडक कायदे करायला हवेत आपल्याकडे रस्तोरस्ती थुंकणे , बाटल्या ,प्लास्टिकचा वारेमाप वापर आणि इतस्ततः फेकून देणे यामुळे निसर्गाचे वाटोळे होत आहे . नावापुरत्या पर्यावरण समित्या नेमून काही उपयोग नाही . एकीकडे देशाची वाटचाल प्रगतीपथावर आहे म्हणायचे आणि दुसरीकडे एकही गाव , मंदिर , स्टेशन असे नाही की त्याठिकाणी भिकारी नाहीत , लहान मुले शिक्षणाअभावी भीक मागताना दिसतात यावर पण विचार व्हायला हवा .
हे सगळं असलं तरी माझे माझ्या देशावर प्रेम आहे , मला माझ्या देशाची ओढ आहे . बदल म्हणून आपण नेहमीच पर्यटनाला प्राधान्य दिलं पाहिजे . भारत हा विविधतेने नटलेला देश आहे . त्याचबरोबर जगात सुद्धा जेवढे शक्य आहे तेवढे फिरले पाहिजे . पाहू आता दुसऱ्या कोणत्या पर्यटनाला जाण्याची संधी मिळते !
विचार करत करत झोप कधी लागली समजले नाही , सकाळी उठण्याची फारशी घाई नव्हती . आरामात सगळे उठलो , नाष्टा करुन सगळी आवराआवरी केली आम्हाला पाच वाजता विमान होते त्यामुळे दुपारी दोनपर्यंत एअरपोर्टला पोहोचायचे होते त्यालापण तीन तास लागणार होते त्याप्रमाणे आम्ही आकारा वाजता निघालो . एअरपोर्टवर सगळे सोपस्कार झाल्यावर दोन तास आम्हाला इकडे तिकडे फिरता आले पण आता आम्हाला परतीचे वेध लागले होते शेवटी पाच वाजता विमान मुंबईकडे झेपावले . जाताना जेवढी उत्सुकता , अपूर्वाई , नवल वाटत होती तेवढीच भारतात परत येण्याची ओढ ,आपुलकी वाटत होते . आम्हाला मुंबईत यायला रात्रीचे दहा वाजले आणि पुण्यात घरी पोहोचायला पहाटेचे तीन वाजले ! आणि आमची संपुर्ण ट्रीप यशस्वीरित्या पूर्ण झाली !
मी ट्रीपला जाण्यापूर्वी अनेकांनी मला msg करुन सांगितले होते
" अंदमानप्रमाणे याचेही प्रवासवर्णन लिहून पाठव "
मी लिहायचे ठरवले , पण व्हिएतनाममध्ये प्रवास करतानाच तिथल्या गावाची , स्पॉटची नावे लक्षात ठेवणे अवघड होत होते पुन्हा कसे आठवणार असे वाटले म्हणून त्याचदिवशी काही महत्वाची टिपणे करुन ठेवली , मुलांनी केलेला प्लॅन आणि तोतो भाग लिहिताना सगळ्यांशी चर्चा करत माझे लिखाण पुर्ण झाले पण ते करत असताना पुनश्च एकवेळ माझी परदेशवारी झाली . तुम्हाला प्रवासवर्णन कसे वाटले जरुर कळवावे , लेखनशैलीत काही त्रुटी आढळल्या असल्यास दिलखुलासपणे सांगाव्यात ते माझ्यासाठी फायद्याचे ठरेल .
असो मी सगळ्या भागांची एकत्रीत लिंक केली आहे त्यात्या ठिकाणचे फोटो त्यात अपडेट करुन लवकरच पाठवेन .
धन्यवाद !!
आता पुनश्च एका ट्रीपच्या प्रतीक्षेत !!!!
समाप्त
सौ. सरिता अनिल कुलकर्णी
मो. 9421607248
saritakulkarni67@gmail.com

