कोरोनाच्या वातावरणात थोडा बदल झाला कंपनीने पुण्यात यावं लागेल म्हणून सांगितलं म्हणून आम्ही जानेवारीत पुण्यात रहायला गेलो दोन महिने राहिलो आणि कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली व मी , आशिष आणि आकांक्षा मार्चमध्ये पुन्हा बार्शीत दाखल झालो ! पुन्हा लाॕकडाऊन , जिल्हाबंदी सुरु झाली . मग उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे 15 जुनपर्यंत बार्शीत राहिलो आंब्याचा मनमुराद आनंद लुटला . त्यादरम्यान आशिषने व मी दोघांनी नविन कंपनी जाॕईन केली . लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि आकांक्षाच पुण्यात काम होतं म्हणून आमचे तिघांचेही पुण्याला जायचे ठरले . एकदा पुण्यात गेलं की थोडंस बाहेर गेलं जातं मग तिकडून मिरजेला जायचा धोका नको म्हणून आमचे बार्शीतून मिरज व मिरजेत आठ दिवस राहून पुण्याला जायचं असे ठरले .
त्याप्रमाणे रविवारी आम्ही बार्शीहून मिरजेत पोहोचलो केतकी पण मिरजेत आहे मग खूप दिवसांनी सगळे एकत्र रहाणार होतो बार्शीच्या आंब्याचा रस , लोणची , केक , आळूची भाजी असे मी शिकलेल्या पदार्थांचे घरात प्रयोग सुरु होते सगळ्यांनाच एकत्र रहातोय याचा आनंद झाला होता . पण भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तसे गुरुवारी आशिषचा घसा खवखवायला लागला . आमच्या दोन्ही कुटुंबात कोरोनाविषयी प्रचंड काळजी घेणारे मेंबर म्हणजे एक माझी आई व दुसरा आशिष ! आई रोज बँकेत जातात तर दीड वर्ष झालं तरी रोज त्या निघण्यापुर्वी पंधरा मिनिट आधी आशिषची त्यांच्यामागे भुणभूण असते .
" मास्क नीट घाल सॕनिटायझर वापर "
अशा सुचना देत देत तो गेटपर्यंत जातो. आईंनी एकदा त्याच्याकडे पाहिलं की
" तू कितीही रागव मी सांगतच रहाणार "
असे म्हणत हसत घरात येतो .
मग त्याचा घसा थोडासा खवखवू लागला तसे त्यांने स्वतःला आयसोलेट करुन घेतलं वाफ , गुळण्या औषध लगेच सुरु केल . सकाळी उठला की फार नाही पण सर्दी व घसा दोन्हीही थोडंस त्रास देऊ लागलं .आम्ही आमच्या फॕमिली डाॕक्टरकडे जाऊन आलो . त्यांनी औषधे दिली पाहूया म्हणाले . दुसरे दिवशी संध्याकाळी त्याला थोडीशी कणकण वाटली तसे आम्ही दुसऱ्या डाॕक्टकडे गेलो व टेस्ट केली तर टेस्ट पाॕजिटीव्ह !!
घरातला सगळा मूडच चेंज झाला आशिषला स्वतःला फारच कसतरी वाटू लागले . तो बेसीन सुद्धा वापरेना आपल्यामुळे घरातल्याना त्रास नको ही त्याची भावना . होम आयसोलेशन सांगितल्यामुळे शेजारचा फ्लॕट किंवा हाॕटेल याचा विचार सुरु झाला इकडे बार्शीला फोन झाला तसे लांब असल्यामुळे आई-पप्पा , आकांक्षा यांना पण काळजी वाटू लागले . होम आयसोलेशन आहे तर बाहेर रहाण्यापेक्षा बार्शीला आलं तर वरच्या घरात रहाता येईल असं त्यांचे म्हणणे येऊ लागले . पण येणार कसं आशिष तर ड्रायव्हींग करु शकणार नाही आणि ड्रायव्हर मॕनेज करता येणार नाही पप्पा तर म्हणू लागले मीच येतो .
इकडे आई-बाबांना पण आम्हांला बाहेर पाठवणे जिवावर आलं पण इलाज नव्हता . मग फ्लॅटपेक्षा हाॕटेलवर चांगली व्यवस्था होईल म्हणून बाबानी हाॕटेलवर आमची व्यवस्था केली व बार्शीला पण फोन करुन सांगितले
" कोणीच कुठेच हलू नका , काळजी पण करु नका आपण फोनवर संपर्कात राहू आता सतरा दिवस जागा पण सोडता येणार नाही . तब्ब्येतीची काळजी घ्यायची आणि वेळ घालवायचा !"
त्याप्रमाणे आम्ही हाॕटेलवर रहायला गेलो पथ्याप्रमाणे घरगुती डबा लावला . चौदा दिवसांचा अनुभव सुरुवाती पासूनच मला वेगळा जाणवत होता म्हणून मी तो जसा दिवस जाईल तसा लिहून काढायचे ठरवले . त्याप्रमाणे मी चौदा दिवस डायरी लिहीली . त्याची लींक मी पाठवेन .
आठदहा दिवसांनी आई-बाबांना पण वाटू लागलं क्वारंटाईन संपल्यानंतर चार दिवस घरी राहिलं पाहिजे मग बार्शीला फोन झाल्यावर आई-पप्पा पण म्हणाले थोडंस राहूनच या त्यात माझा 12 जुलैला वाढदिवस ! इंजिनियरींगला असतांना मी वाढदिवसाला मिरजेत होते मग सहा वर्षांनी पुन्हा यावार्षी मिरजेत वाढदिवस . आज माझ्या बरोबर आशिष आहे सगळे रिलॕक्स मूडामध्ये आहेत , तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मला मिळाल्या मजा आली धन्यवाद . आता इकडून पुण्याऐवजी आम्ही बार्शीलाच जाऊ असे वाटतेय पाहू .
ते चौदा दिवस !!
दिवस एक (26 जून )
आमच्या आई लाॕकडाऊन डायरी लिहितात
मग विचार केला.. आपण पण लिहू क्वारंटाईन डायरी...
आशिष ला कोरोना झालाय. रॅपिड टेस्ट पॉझिटव्ह आली आहे. RTPCR ची प्रतिक्षा सुरू आहे.
कोरोना ह्या आजाराने सगळे आडाखे नियम रूढी परंपरा पार उखडून टाकले आहेत.
असंख्य विचार आहेत मनात... एकीकडे आशिषला काही त्रास होऊ नये ह्याची काळजी... दुसरीकडे आई बाबांना काही लक्षणे येऊ नयेत ह्याची प्रार्थना...
वरकरणी शांत आणि धीटच राहावं लागेल कारण आशिष चे मन खात आहे हे जाणवत आहे.
आम्ही दोघं राजा राणी एका खोलीत बंद आहोत... राणी खाली गादी घालून मास्क मधे बंद.. राजा पलंगावर RTPCR रिपोर्टची चातकासारखी वाट पाहतोय...
सगळ्या सोयी सुविधा आहेत... चहा कॉफी नाश्ता जेवण! मिरजेत असल्याचा फायदा दुसरे काय...
बाबांचा फोन आला... डॉ भट ना दाखवून या. मग आम्ही दोघे गेलो डॉ कडे... त्यांनी आशिषला तपासले... आणि अत्यंत शांतपणे एक डझन निरनिराळ्या प्रकारची औषधे लिहून दिली. RTPCR रिपोर्ट वर फारसे काही अवलंबून नसल्याचे तिथेच स्पष्ट झाले. मला सध्या तरी काहीच त्रास नाही. प्रीकाॕशन म्हणून मला अर्धा डझन गोळ्या... गोळीबार सुरू झाला.
मला कळत आहे की आशिषला कुठे तरी अपेक्षा आहे की RTPCR निगेटिव्ह यावी. मला नाहीये अपेक्षा... एक वर्ष कोरोनाचा अभ्यास झालाय सर्वांचा. एक नक्कीच आहे की हलक्यात घेण्याचा हा आजार नाही. त्यामुळं मी माझ्या मनाची तयारी केली आहे आणि तशी काळजी पण घेत आहे.
कुठेतरी इच्छा आहे की मी साफ चुकीची ठरावे...चमत्कार व्हावा.
पण छे... ह्या कोरोनाच्या आईचा घो!!!
आशिषच्या फोनवर मेसेज आला. अपेक्षेप्रमाणे रिपोर्ट पॉझिटव्ह आला. आशिष पुरता हादरला!
नेहमीसारखा डोळे मोठे करून मला लांब रहा बर का.. मास्क घाल की... Sanitize कर ना हात.. असे पालुपद सुरू झाले. मी हे सगळं गेले दोन दिवस त्याचा घसा दुखत असल्यापासून करतीच आहे तरीपण...
नेहमीची वेळ असती तर मी त्याला उलट उत्तर दिली असती (स्वभावदोष?). पण आज वेगळं होत... त्याला भीती वाटली होती. मी खूप शांतपणे त्याच सगळं ऐकून घेतलं! त्याला हवं तस केलं...
त्याला थोडा वेळ लागणारच होता...
तसा तो मिळाल्यावर मग मला. म्हणाला
" कीर्त्या, खरंच कोरोना झाला की ग मला..."
आणि हसायला लागला... हुश्श झालं मला!! मग मी पण "भित्यापाठी ब्रह्मराक्षस..."
असं म्हणल्या वर मूड लाईट झाला
आता acceptance हा प्रॉब्लेम सुटला होता... आता मुख्य टप्पा आहे... काळजी घेणे आणि पटापट बरे होणे.
निलेश काका साठे रोज नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण आणून देणार आहे . जेवण मस्त आहे... अगदी सात्विक आणि रुचकर.
सगळ्यांनी मला सांगितलं आहे की गोळ्यांनी अशक्तपणा येतो आणि त्यामुळं खात राहील पाहिजे. आणि आशिष तर दोन जेवणं सोडली तर अधेमधे चहा सोडून काही म्हणजे काहीच घेत नाही ! आता ह्याला सतत खायला देणे म्हणजे सत्वपरीक्षाच आहे !
आई-बाबा , आई-पप्पा , आकांक्षा सगळे हवालदिल आहेत. त्यांना शक्य तितके अपडेट द्यायचं काम करती आहे...
एक महत्वाचा बदल म्हणजे आशिष थोडा अबोल झालाय... औषधांचा मारा सुरू असल्याने थकवा आहेच. शिवाय सतत आपल्याला आणि आपल्यामुळे काय होतंय की काय? अशी टांगती तलवार आहेच त्याच्या डोक्यावर!
खूप विचारांचा गोंधळ उडालाय त्याच्या डोक्यात. मी सगळ्यात जास्त काळजी घेतो.. मग मला कसा काय झालं कोविड? कोणकोणत्या संपर्कात आलोय मी? मी ढिला पडलो का? मला मिरजेला येऊन का झालं हे????
एक ना अनेक! परत ते गूगल आहेच छोट्या छोट्या गोष्टींना.. Google the necessary evil!!
सूप पिताना थोडासा खुलला तो... मग आम्ही एकत्र friends बघत जेवण केलं. खूप बरं वाटलं तेवढ्या वेळाने सुद्धा.
12 च्या सुमारास झोपलो दोघेही... अशा रीतीने quarantine पहिला दिवस समाप्त !!
दिवस दोन ( 27 जून )
सकाळी साडेसातला दिवस सुरू झाला माझा.. छान झोप झाली. Ashish अजुन झोपला आहे. मग म्हणलं राहूदे पडून राहावं... उगाच खुडबुड करून त्याला जाग येते. कुठे कोर्टात तारीख आहे गडबडीने आवरायला... निवांत लोळत पडले...
आज आई पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस ! सगळ्या ग्रुप वर दवंडी पिटवली!!!
8.15 ला आशिषला जाग आली... नित्यनेमाने गुळण्या केल्या ,ब्रश केला .
Acidity ची गोळी घेऊन दिवसाचा नारळ फुटला!
आता चहा आणि नाश्ता करायचा म्हणून त्याच्या मागे लागले... इडली चटणी नाश्ता आला वेळेत.
कशाबशा त्याने दोन इडल्या खाल्ल्या... गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून खातोय तो... कळतंय मला..
थोडा कफ आणि खोकला वाटला म्हणून महेशदादाला औषध आणायला सांगितलं! महेश दादा हा एक पु. लंचा नारायणच आहे ! पेशाने तो दुकानदार आहे... पण सल्ले पार डॉक्टर, वकील, सरकारी, पोलिस सगळे देऊ शकतो.. एका कोविड सेंटरला त्याने वाहून घेतलं असल्याने सगळी इत्यंभूत माहिती आहे आणि पूर्ण वाहवून घेण्याचा स्वभाव.
बाबांकडे अशी काय जादू आहे काही समजत नाही... माणसं जोडली की कायमचीच.. फेविकॉल का जोड ! आत्ता काय किंवा इतर वेळी काय... कुठे ही गेलो तरी ओळखीचा एक तरी माणूस सापडणारच ! अक्षी मला म्हणते तशी मिरजेत कायम पूर्ण नावच सांगायचं तू.. हेहे. पण आत्ता हे सगळं सुकर होतंय .
पुन्हा फोन मधे डोकं घालून वेळ काढला.. घरी wish करायला फोन झाला . जेवण आल्यावर आशिष भूकच नाही म्हणून बसला होता... फार मुश्किलीने त्याला थोड तर खा म्हणलं... तर पठ्ठ्याने पूर्ण जेवण आणि आईने दिलेली वाटली डाळ पण फस्त केली . औषधाने त्याला भूक लागते आहे... खाणे गरजेचं आहे . वाफ घ्यायचा आणि गुळण्या करायचा प्रचंड कंटाळा येतोय त्याला... पण ते ultimate solution आहे असं आमच्या घरातल्या खुद्द कोविड वॉरियर डॉ. केतकी ह्यांनी सांगितलं आहे.
त्यामुळं किती का चिडचिड करेंना हा... मी मागे लागून करून घेणार.
अतिशय कंटाळा आला आहे आता . एका पिंजऱ्यात बंदिस्त केलेला सिंह कसा असेल... अस्वस्थ येरझाऱ्या सुरू... वेळ झाली म्हणून जेवण आणि झोप .
संध्याकाळी आज मात्र स्वतःहून आशिष ने घरी फोन केला . काल परवा तूच बोल म्हणत होता मला . आज छान बोलला घरी . आकांक्षाशी पण बोलला..
जरा होमसिक आहे... जाणवत आहे मला . पण सध्या पर्याय नाही . जितका लवकर बरा होईल तितका लवकर कंटाळा मुक्ती !
आज म्हणाला मी pubg खेळतो... आनंदच झाला मला... नॉर्मल कडे वाटचाल... अजून काय !!
थोड मित्रांसोबत वेळ घालवला की फ्रेश होईल . बरं आहे तेच .
आत्ता वाटत आहे केतकीने कसं केलं असेल हे सगळ मॅनेज ? सरकारी दवाखाना.. अपुऱ्या सोयी... काळजी घ्यायला कोणीच नाही... प्रचंड अशक्तपणा , थकवा आणि अखंड एकटेपणा ! मानलं तिला... तावून सुलाखून डॉ झालीये पोरगी . आत्ता समजत आहे.
आता रोज सूप प्यायला सुरू केलंय . गरम पण आहे आणि पोट सुद्धा भरते !
आज मला खूप झोप येतीये . कफ सिरप घेतलय आणि दिवसभर झोपले सुद्धा नाही.
जेवण करून केव्हा एकदा ताणून देते असा वाटत आहे . जेवण आलं.. मसूर उसळ आणि पोळी होती . आशिष आज म्हणाला संध्याकाळी भात असला तर बरं पडेल... उद्या सांगेन त्यांना... संध्याकाळी भातच द्या म्हणून !
जेवण झालं.. 3-4 मिनिटे चालून ऑक्सिजन चेक करून झाला . सगळं नॉर्मल आहे .
आता शांतपणे आपापले हेडफोन्स घातले आणि झोपायची तयारी सुरू...
अशा रीतीने quarantine दुसरा दिवस समाप्त 😊
दिवस तीन ( 28 जून)
आज सकाळी 6 ला जाग आली . पण मग विचार केला करायचं काहीच नाही.. परत गुडूप झोपले.. थेट 8 ला जागी झाले..
आज ऑफिस आहे माझं
आशिष उठला... तेवढी छान झोप झाली नाही म्हणाला . मी फ्रेश आहे आज . नाश्ता आला... आशिषला कोरडे पोहे जात नव्हते.. मग म्हणलं जातील तेवढे खा आणि मग एक दोन बिस्कीट खा .
थोडसे पोहे आणि चहा प्यायला फक्त त्याने..
औषधं घेतली.. मी डेटॉलचा स्प्रे मारला रूम मध्ये... आशिष म्हणाला "वास येतोय का ग ह्या स्प्रेचा ?"
मी म्हणलं "हो येतोय की !"
चटकन लक्षात आलं... वास यायचं बंद झालं आहे !!!
आता त्याचं जर्मन शेफर्ड सारखं सर्व गोष्टी हुंगुन पाहणे सुरू झालं. काय करणार ?? पंचेंद्रिय सुरू असलीच पाहिजेत ही धारणा...
आजची महत्त्वाची प्रगती म्हणजे घसा दुखणे पूर्णपणे बंद आहे... डॉक्टरनी काही औषधे 2 दिवसांनी बंद करायला सांगितली आहेत .
फार बर वाटत आहे ह्यामुळे..
पण जबरदस्त थकवा आलाय त्याला... उठून पाण्याचा ग्लास घेतला तरी थकायला होतंय आणि काहीही झाले तरी मी त्याच्या हातात काहीच नाही देऊ शकत... डोकं दुखायला लागलं तर दाबून नाही देऊ शकत... शेजारी बसून गप्पा मारत चहा नाही पिऊ शकत... बांधून ठेवल्यासारखे झालंय !
सकाळचा चहा झाल्यावर गाढ झोप लागली त्याला .
थेट जेवायला उठला .
आज जेवायला पण भूक नाही म्हणत होता... पण औषधे इतकी आहेत की जेवलच पाहिजे . मारून मुटकून जेवायला सुरू केलं .
जेवण झाल्यावर थोडी भूक आहे थरथरत आहे म्हणाला.. एक दाण्याचा लाडू आणि अर्धा ग्लास ORS पिल्यावर कुठ शांत झाली भूक .
इतक्या औषधांमुळे भूक निश्चितच लागत आहे.. ह्याची जाणीव झाली मला...
माझे काम सुरू असल्याने आज वेळ पटकन पळत आहे . कपडे धुवून झाले . अंघोळ झाली .
एक गोष्ट जाणवत आहे... माणूस जिथे कुठे असेल त्या जागेला आपले घर बनवतो.
आता ह्या छोट्याश्या खोलीत एक कोपरा माझा आहे आणि एक आशिषचा . वाफेचे मशीन ठेवायची जागा ठरलेली आहे... पाणी उकळायची किटली ठेवायची एका छोट्या टेबल वर . ह्याचे बॉक्स शेजारी शेजारी ठेवून त्यावर औषधे लाऊन ठेवली . 3 hanger ला कपडे वाळत घालायचे . एका टेबल जवळ खाऊ , कपडे आणि पाणी वगैरे आहे .
खोलीभर डेटॉल आणि sanitizer चा गंध (की सुगंध?) पसरला आहे .
कंटाळा आला कंटाळा आला असे म्हणत दिनक्रम सुद्धा भरगच्च झालाय . नुसते पाणी उकळा , वाफ घ्या आणि गुळण्या करा... ह्यात अर्धा दिवस संपून जातोय .
कधी एकदा बरे होऊन बाहेरच्या मोकळ्या हवेत जातोय असे झालंय... पण आत्ता waiting period आहे त्यामुळे patience च मदत करेल .
महेश दादा रोज येऊन जातोय... थोड दार खिडक्या उघडा.. थोडे बिनधास्त रहा... बाहेर पडा... चाला... असे सांगतायत.
पण आशिषकडे आत्ता तेवढी ताकद नाहीये की तो बाहेर जाऊन चालून वगैरे येईल...
मी मात्र रोज चालायला सुरू केलं आहे . नुसत बसून फुगा होईल माझा .
आज थोडी acidity झाली आहे आशिषला . तस तर त्याचं पित्त खवळतच लगेच !!! आता एवढी औषधे... मग नाही झालं तरच नवल!
आज रात्री भात एके भात त्यामुळे :-)
आज काहीतरी नवीन म्हणून सहज स्विटकॉर्न सूप मागवलं . आणि मस्तच लागलं !! आवडीने खाल्ल .
आज आसावरी पुष्कराज सोबत व्हिडिओ कॉल झाला . खूप दिवसांनी खूप खूप गप्पा झाल्या... जशा आधी व्हायच्या !! बरं वाटलं खूपच . एकटेपणा वाईटच... पण सक्तीचा एकटेपणा जास्त जाणवतो... त्यामुळं हे गॉसिपच टॉनिक लागतच मधे मधे...
जेवण केलं... आशिषची पाठ दुखत आहे . मला वाटतंय की सतत झोपून किंवा बसून राहिल्याने असेल . आईंना कोरोना झालेला तेव्हा त्यांची सुद्धा पाठ दुखत होती. कदाचित आनुवंशिक असेल response शरीराचा...
उद्या सकाळी थोड स्ट्रेचिंग करायला लावेन म्हणजे आखडले असेल तर बरं वाटेल .
बाकी आवाज पण थोडा पूर्वपदावर येऊ लागलाय .
लवकर लवकर आणखी सुधारणा होऊदे म्हणजे झालं...
आता पुन्हा एकदा दोघेही आपापल्या अंथरुणावर आडवे..
अशा रीतीने quarantine तिसरा दिवस समाप्त
🙂
दिवस चार ( 29 जून )
आज सकाळी उठले आणि लगेचच काम सुरू करावं लागलं..
नाश्ता आला होता आणि इकडे कॉल सुरू! आशिष झोपलाच होता अजून... थोडी तारांबळ उडाली माझी आज... ऑफिसच काम आणि रूम मधल्या सर्व गोष्टी मॅनेज करताना...इतकी की मी आज अंघोळच नाहीये केली!!!
चहा पण उशिराच घेतला आज... आज आशिष एक्स्ट्रा फ्रेश आहे. आज स्वतःहून वाफ आणि गुळण्या लक्षात ठेवून केल्या... 3 मिनिटा ऐवजी 6 मिनिटे चालून ऑक्सिजन चेक केला!!
खिडकी दार सगळं बंद असतं रोज.. मला गरम होत असतं.. पण ह्याला थंडी वाजते... आज स्वतःहून उघड म्हणाला खिडकी.. छोटे छोटे बदल... पण फरक फार मोठा पडतो!
डॉक्टर नी शुक्रवारी रिपीट चेकअपला बोलावलं आहे... आम्ही अक्षरशः तास मोजतो आहे शुक्रवार यायचे!
आज मात्र दुपारच्या जेवणानंतर आशिष कुरकुर करायला लागला.. इतके दिवस त्रास होत असल्याने काही सुचत नव्हते त्याला
आता मात्र, कंटाळा आलाय, पडून राहून पाठ दुखती आहे वगैरे तक्रारी ऐकू येत आहेत.
आई बाबा केतकी पण बरे आहेत... 14 दिवस होईपर्यंत आमच्या कोणाचेच चित्त थाऱ्यावर येणार नाही. कोणाला शिंक जरी आली तरी बाकीच्यांची भुवई उंचावलीच म्हणून समजावे! टांगती तलवार आहे ही धास्ती... तरी आई-बाबा, केतकी ह्यांचे vaccine चे दोन्ही डोस झाले आहेत ही एक जमेची बाजू. आमच्या दोघांचा सुद्धा एक झालाय तसा...असो!
आजसुद्धा आशिषला वास येत नाहीये... ऑरेंज क्रीम बिस्कीट दर 2 तासांनी 3-4 वेळ हंगुन गट्ट करतो आहे आज..
सध्या त्याचं डोकं पूर्ण वेळ एकच प्रश्न सोडवण्यात लागलं आहे... त्याला लागण झाली कशी आणि कोणामुळे? मुख्य संशयित आहेत बार्शीचा दहीवाला, मिरजेची फरशीची बाई आणि बिल्डिंगची लिफ्ट! ठोस पुरावा मिळेपर्यंत शोधकार्य चालू ठेवणार आहे तो... हाहा!
आजचं सूप खारटच आलं... मूड ऑफ झाला दोघांचा .
आज दिवस खूप वेगाने सरला... कामात गुंतलेले असले की चांगले किंवा वाईट कसलेच विचार करायला वेळ नाही मिळत.. तस आज झालं मला... काही तास मी कोरोना, sanitizer आणि ताण ह्यापासून लांब होते
Overall छान दिवस गेला
जेवण झालं... झोप आली आहे बरीच..
त्यामुळे बॅक to comfy position!
Quarantine चा चौथा दिवस समाप्त!
दिवस पाच ( 30 जून )
आज उठल्या उठल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे अंघोळ... आज भरपूर काम आहे ऑफिसच... सगळं पटपट केलं आणि कामाला बसले...
काल रात्री डास चावत होते त्यामुळे आशिषची झोप झाली नव्हती... तो बराच उशिरा उठला..
आज नाश्त्याला आप्पे आहेत.. इतके मस्त आणि लुसलुशीत होते... मस्त मटामटा खाल्ले!
आशिषने पण नाश्ता केला... आशिष काल पासून हॉटेल मधला पुलाव किंवा बिर्याणी मागवूया म्हणतोय.. पण मला रिस्क वाटत आहे. आत्ताच बरा झालाय तर कशाला...
आज उठल्यापासून तो उचकलेलाच आहे... नुसती चिडचिड!
त्यात आज पुण्याहून आयुर्वेदिक औषधे आली. गुळण्या आणि काढा ह्याची भर! आता त्याला बर वाटत आहे.. त्यामुळं आता मोकळेपणाने फिरावं, खावं, प्यावं असं वाटतंय त्याला... साहजिक आहे... पण ते शक्य नाहीये ना..
मी अस सांगितलं आहे त्याला की आज 5-6 वाजता प्लेन डोसा मागवूया. त्यातल्या त्यात कमी तेलकट म्हणून मी तो मार्ग काढला...
पण कुठलं काय.. लॉकडाऊन मुळे रेस्टॉरंट बंद आहे. फक्त Chinese food मिळेल. मग बाहेरून मागवणे कॅन्सल!!
पुन्हा चिडचिड झाली...
डॉ. शिवानंदशी फोन वर बोलणे झाले. ते म्हणाले गुरुवारी 1 week पूर्ण होतो आहे ,पहिली लक्षणे दिसून.. त्यामुळं आम्ही मोजत होतो त्याच्या मागे 2 दिवस कॅलेंडर पळाले असे समजले!! त्यामुळे उद्या आम्ही निम्मा पल्ला गाठू शकतो!
केतकीच्या मते आई बाबांना आता काही धोका नाहीये... Thank god!
आता शुक्रवारी डॉना प्रत्यक्ष दाखवायचं आणि मग पुढच्या आठवड्याचा प्लॅन ठरवायचा.
आम्हा दोघांनाही आता खरंच कंटाळा आलाय.. तेच ते जेवण आणि तीच ती खोली...
रोज मागवला की आयता ग्लास मधला चहा हातात येतो आहे.. पण आता आठवण येती आहे ती स्वतः आधण टाकून भरपूर आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाची...
खोलीचा दरवाजा उघडून निःशंक पणे बाहेर फिरायचे वेध लागलेत. मला आधी वाटायचं की मला माझा फोन, बेड आणि wifi दिले तर मी कुठेही आणि कितीही काळ राहू शकेन.
पुन्हा एकदा कोरोना ने ते सर्व आडाखे चुकीचे ठरवले...
मी रोज थोडा वेळ गॅलरीमधे जाऊन उभी राहते.
तेवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क!
आज तर चक्क मी आशिषला म्हणाले की मला खालच्या मोकाट कुत्र्यांचा हेवा वाटतोय.. ती मोकळी, विना मास्कची,बिनधास्त फिरत आहेत. ना कसली भीती.... ना कसली बंधने...
असो.. थोडक्यात, इतका कंटाळा आलेला आहे!
आज रात्री 9 पर्यंत तर मीटिंग होती माझी. त्यामुळे दिवस तर बिझीच गेला
आशिष सगळ्याssss भाज्या खातो. अगदी शेपू आणि कारले सुद्धा आवडीने खातो. नखरे माझे बरेच आहेत ह्या विषयात.. त्याला कमी आवडणारी भाजी एकच! भेंडी...! ( ही माझी आवडती भाजी आहे btw)
आज रात्रीच्या डब्यात जरा भारी भाजी असावी अशी माझी इच्छा... तेवढंच जरा मूड lifting
डबा उघडला तर त्यात भेंडी!
मी म्हणलं बोंबलाsss!! तरी शांतपणे खाल्ली बाबा भाजी! आणि मला तर आवडलीच!
उद्या काहीतरी छान खायला पाहिजे म्हणतोय!
बघू. उद्या सकाळी मातोश्रींना कळवावे! ती काहीतरी बिन तेलाचा, खमंग आणि पचायला हलका असा छान पदार्थ शोधून, खायला देईलच करून.
अशा तऱ्हेने quarantine चा 5 वा भेंडीमय दिवस समाप्त!
दिवस सहा ( 1 जुलै )
आज लिहायची पण इच्छा नाही,इतका कंटाळा आलाय!
पण, माझी प्रथम वाचक(pencil speaks) विचारेलच!! म्हणून हे पांढऱ्यावर काळे..!
आता मला Philips जॉईन करून जवळपास एक महिना होऊन गेला... त्यामुळं नवीन नवीन असतानाचा निवांतपणा आता नाहीये. माझी माझी अशी कामे आहेत आणि first impression जमवायचे आहे. त्यामुळे जरा लक्ष देऊन काम करावे लागते.
थोडीशी अडचण होती आहे इथून काम करताना. इंटरनेट तशी बरीच साथ देते आहे... पण औषधं, चहा, नाश्ता, जेवण आणि हॉटेलचा स्टाफ हे सगळं मॅनेज करणे थोडंसं कठीण होतंय. तरी 2-3 दिवस झाल्याने schedule बसलय बऱ्यापैकी!
पुण्यातील आयुर्वेदिक डॉ. नीलिमा कुलकर्णी ह्यांची औषधे आम्ही सगळेच (देशपांडे - कुलकर्णी) घेतो. गुण चांगलाच आहे.
काल त्यांचा 14 दिवसांचा डोस आला. कालपासून सुरू झालाय आशिषला. ते घेतल्यापासून चांगलाच थकवा येतोय त्याला. आयुर्वेदिक उपचार पद्धती अशीच असते वाटतं.
आज दिवसभर नुसता झोपतो आहे आणि रात्री टक्क जागा असतो!
आज आईने धिरडे पाठवलेले. असली मज्जा आली खायला!! वा वा! अन्नदाता सुखी भव.
आज आशिषला कॉफी पिताना किंचीत वास आला.. इतका आनंद झाला पठ्ठ्याला!!
उद्या डॉ कडे follow-up ला जायचं आहे. थोडी औषधं कमी केली तर फार फार बर होईल...
बहुधा तरी राहायची जागा नाही बदलणार. पण किमान खाण्यापिण्यात थोडी सवलत मिळावी अशी आशा आहे. जिभेचे चोचले... दुसरं काय!
संध्याकाळी आशिषला फोन आला की त्याचं बार्शीत tracelink(त्याची कंपनी) कडून कुरिअर आलंय.
थोड्या वेळाने family ग्रुप वर आईंनी फोटो टाकला.. कंपनीने "Get well soon! From your tracelink family" असं ग्रीटिंग कार्ड आणि एक मोठा बॉक्स पाठवला आहे. त्या बॉक्स मधे च्यवनप्राश, 3-4 प्रकारचे मध, लेमन टी अशा healthy गोष्टी आहेत.. किती छान कल्पना!
ही कंपनी जॉईन करून त्याला अवघे 15 दिवस च झाले असताना... कोरोना मुळे अचानक दोन आठवडे सुट्टी घ्यावी लागते. तेवढी रजा अजून जमा देखील नाही झाली. त्या बाबतीत काळजी करू नका आणि लवकर बरे व्हा असे आधीच manager ने सांगितलेलं. त्याऊपपर आता हे गिफ्ट! हुरूप येतो अशाने काम करण्याचा.. त्या गोष्टींच्या किमतीपेक्षा त्या मागचा विचार आम्हाला सगळ्यांनाच भावला!
काही काळ का होईना आम्हा दोघांची मरगळ झटकून टाकली ह्या गिफ्ट ने!
आज आई आणि दोन्ही मावश्यांशी व्हिडिओ कॉल झाला. सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांना बघून बरे वाटले.
खर तर आम्हाला दोघांनाही एकमेकांना बघायचा आणि बोलायचा कंटाळा आलाय. आता आशिष बऱ्यापैकी नॉर्मल दिसतोय. वास सोडला तर अडचण काहीच नाही. पण अजून त्याला आतून तो बरा झालाय अस वाटत नाहीये.
उद्या डॉक्टरना दाखवल्या नंतर त्याचा confidence थोडा वाढेल की तो बरा झालाय.
त्यामुळं आता उद्याची वाट पाहत रात्री झोपणे!
अशा तऱ्हेने quarantine चा 6 वा दिवस समाप्त!
दिवस सात ( 2 जुलै)
आज शुक्रवार असल्याने काम कमीच आहे. आज डॉक्टर कडे जायला बाहेर पडायचे आहे..
तब्बल 8 दिवसांनी बाहेरची माणसं, हवा, वारे मिळणार आहे... मी तर excited आहे.
11.45 ला डॉक्टर कडे गेलो.. त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या ब्लड, युरीन आणि x-ray वगैरे ..
तपासून तब्येत छान आहे म्हणाले.
पण रिपोर्ट बघून ठरवू पुढचं असे सांगून 1 तासाने या म्हणाले.
जेवायची वेळ झालेली... पण आता आशिषला परीक्षेचा निकाल लागणार असल्या सारखे टेन्शन आले आहे त्या टेस्ट चे!.. जेवायला नकोच म्हणून बसला.
पण अशक्तपणा इतका आहे की न जेवता त्याला पुन्हा दवाखान्यात नेणे खूप चुकीचे ठरेल. खूप convince केल्यावर थोडंसं जेवला आज...
मग 2 वाजता आम्ही पुन्हा गेलो.
दवाखान्याच्या बाहेर गर्दी इतकी होती की एक क्षण वाटलं मोर्चा वगैरे आलाय की काय! आत शिरल्यावर(घुसल्यावर?) कळलं की ही रांग MR लोकांची आहे!!
डॉक्टरना रिपोर्ट आणि xray दाखवला. इन्फेक्शन काहीच नाही आता असं सांगितलं! Yesss!
पण मागच्या रिपोर्ट च्या तुलनेत WBC count थोडा कमी झालाय... इन्फेक्शन नंतर तो होतोच असं म्हणाले.
एक डझन गोळ्या पासून दिवसाला 3 गोळ्या अशी बढती झाली आमची!!
आता आम्ही मुख्य प्रश्नाला हात घातला "quarantine कब तक?"
त्यांनी शांत चेहऱ्याने आणखी
10 दिवस isolation मधे रहा असं सांगितलं! "घरी बाबा आहेत ना ,त्यामुळे रहा!" अशी अजून फोडणी दिली त्यावर!
आम्ही घासाघीस करायचा निष्फळ प्रयत्न केला..
पण ते म्हणाले पुढच्या रविवार पर्यंत रहा तिथेच!
पथ्य काही नाही आता, त्यामुळे खावा काहीही असं म्हणाले.. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार!
आणखी 10 दिवस आता त्याच रूम मधे राहायचं आहे!!! हे जाम बोअर होणार आहे हे लक्षात आलं!
देशपांडे आणि कुलकर्णी दोन्ही कडे ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपुर्ण केली!
आई- पप्पा आता बार्शीला या म्हणत आहेत! तिकडे आरामात isolate होता येईल... वेगळ्या खोल्या, बाथरूम वगैरे सगळी सोय आहेच.
पण आम्ही तिकडे गेलो तर आई काही ना काही वेगळं खायला करायला लागणार आणि पर्यायी त्यांची दमणूक होणारच! मी isolation मधे असल्याने त्यांना काहीच मदत नाही होणार. त्यामुळे मला ते चुकीचं वाटतंय. आशिष घरी आजी आजोबा असल्याने नको म्हणात आहे जायला.
माझी आई बरं झाल्यावर 1 आठवडा राहून, धष्टपुष्ट होऊन जावा असा काहीतरी अवघड पर्याय देत आहे...
आम्ही दोघांनी शेवटी असं ठरवलं की आज काहीच नाही ठरवायचं. पुढच्या आठवड्यात ठरवू!
आज स्वातंत्र्य मिळाले आहे खाण्याचे!!
मग आम्ही 6 वाजताच मेनू चा मन लाऊन अभ्यास सुरू केला...
शेवटी कमी तेलकट पनीर क्रिस्पी वर एकमत झाले!
खाऊन तृप्त झालो आणि मग नेहमीचा पोळी भाजीचा डबा आला, तो खाल्ला.
उद्या सुट्टी!! त्यामुळे निवांत झोपायचे आज...
अशा तऱ्हेने quarantine चा 7वा दिवस समाप्त
दिवस आठ (3 जुलै )
कीर्ती उठ, कीर्ती उठ! अशा हाकांनी आज जागी झाले...
8.30 वाजलेले !! बाप रे.. नाश्ता द्यायला आलेले काका दार वाजवत होते. आणि माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती...
झोपेतच नाश्ता घेतला. आज उत्तपा होता! भारीच...
मी आवरून पटपट हाणले ! आशिष ने कुरकुर करत अर्धा खाल्ला कसाबसा.
मळमळतय म्हणाला.. मला वाटलं असेल काहीतरी बारीसारीक. थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बापरे... नवीन गोळ्यांमधे acidity ची गोळी नाहीये!
फार काही खाल्ले नसल्याने त्याला गोळी दिली. मग जरा वेळाने बरं वाटलं लगेचच... हुश्श्य
आमचं पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लॅन सुरू आहेच. पण मागच्या आठवड्यात रिकामपणाच्या उद्योगात मी एका scheme वाल्यांना वीकेंड ला व्हिडिओ कॉल करू असे सांगितलेले!
आज दोघेही जॉईन झालो त्या कॉलला. तेवढाच टाइमपास. आता ते माग लागलेत साईट वर या आणि बघा वगैरे वगैरे... त्यांना कोण सांगणार की आम्हाला आमचे डॉक्टर कुठेच नाही सोडत म्हणून :-(
वेळ बाकी छान गेला .
आज आईने मेथीची पीठ पेरून भाजी आणि गोड सांजा पाठवला आहे!! Yayy!
आसावरी पुण्यात आहे आणि अक्षी पण!
आमचा भेटायचा प्लॅन होता ह्या आठवड्यात पुण्याला... Excited होते मी.
आता पुन्हा आसावरी येणार 3-4 महिन्यांनी.
मग भेट लांबणीवर पडलीच.
आम्ही पण इथून आता बार्शी लाच जाऊ... त्यामुळं अक्षी पण नाही भेटणार
पुढच्या सोमवारी ( 12 जुलैला) माझा वाढदिवस आहे. आणि आमचं quarantine 10-11 ला संपत आहे
त्यामुळं बार्शी का मिरज हा मोठा प्रश्न आहे!!
आई (बार्शी) म्हणल्या की घरात सगळीकडे फिरता येणार का हे डॉक्टरना विचारून रहायचं ठरवा!
माझ्या आईने डॉ. भट आणि डॉ. शिवानंद दोघांना फोन करून confirm केलं की आम्ही रविवारी घरी आलो तर चालेल का! दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला.
त्यामुळे अजून एक आठवडा तरी आम्ही मिरजेतच आहोत असं सध्या तरी ठरतंय.
आज माझी थोडी चिडचिड झाली असं मला जाणवत आहे. 8 दिवस एकच एक खोली आणि तेच तेच करून कंटाळा आलाय.
नुसत खायचा आणि झोपायचा पण कंटाळा आला आहे.
शेजारच्या खोलीत कोणीतरी माणसं राहायला आली आहेत. आज आम्ही जेवताना त्यांच्या जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला.
मला अक्षरशः त्यांच्यामध्ये जाऊन गप्पा माराव्यात असं वाटलं... इतकी विटली आहे मी ह्या रूमला!
आज meditation केलं मी शांत राहायला.
हे अनुभव लिहून ठेवायचं कारण हेच की जेव्हा मी 4 माणसात गप्पा मारायला बसेन तेव्हा मला फोन कडे दुर्लक्ष करण्याची सद्बुद्धी यावी!!
मी एकदा वाचलेलं की अत्यानंद, तीव्र दुःख आणि खूप भीती ह्या feelings येतात तेव्हा त्या मेंदू मधे कोरून घ्याव्यात. तेव्हा आपण जे काही केलं ती आपली ताकद बनते म्हणे.
म्हणून हा अनुभव जो सुरवातीला भीती आणि दुःख घेऊन आला, तोच अनुभव प्रचंड कृतज्ञता शिकवत आहे.
रोजचा डबा, औषधे आणि असीम मानसिक आधार देणारे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक ह्यामुळे एका संकटातून सुखरूप बाहेर आलो आहे. Thankful, grateful and blessed!!
अशा तऱ्हेने quarantine चा 8वा दिवस समाप्त
दिवस नऊ (4 जुलै)
"माणूस हा समाजशील प्राणी आहे ", असं शाळेत शिकवलं होतं.
पण ते खऱ्या अर्थाने शिकले मी ह्या 14 दिवसात.
सोयी, सुविधा, अन्न,वस्त्र, निवारा सगळं सगळं आहे. पण, चार लोकात बसून गप्पा मारणे हे काही शक्य होत नाहीये.. तसे तर मागचे पूर्ण वर्ष विशेष बाहेर फिरणे, मिसळणे, गप्पा गोष्टी हे फार कमी प्रमाणातच आहे... पण बार्शीमधे सुद्धा मी दिवसभर आशिष, आकांक्षा, आई आणि पप्पा ह्यांच्याशी आलटून पालटून गप्पा मारत असायचे. तेव्हा त्या routine चा सुद्धा कंटाळा आला होताच. पण आत्ता आहे ह्यापेक्षा ते लाखपटीने बरे!
व्हिडिओ कॉल सुरूच आहेत सगळ्यांशी... चॅट सुरू आहे. महेश दादा येऊन भेटून जातोय. आशिष आहेच समोर. (Thank god!!)
एकेकदा वाटतं अती होतंय माझं. एवढं काय बंदिस्त राहावं लागलं तर आभाळ कोसळलं की काय??
जरा चिडचिड व्हायला लागली आहे माझी. Actually दोघांची!
मोबाईल मधेच असतो आम्ही बराचसा वेळ. गप्पा मारायच्या मूड मधे नाहीये अजून तो... जास्त force केला तर irritate होतोय. त्यामुळे मी पण आवरतच घेती आहे. त्याच्या कलाकलाने सुरू आहे.
माझी तर लोकांचे फिरताना किंवा ट्रेकिंग करतानाचे स्टेटस पाहिले ना, चिडचिड होत आहे.
आम्ही ठरवलेलं की पुण्यातील परिस्थिती बघून थोड फिरायला जाऊ.. अगदी फार नाही तर पावसात रस्त्यावर फिरून तरी येऊ! असे अनेक प्लॅन होते जुलै महिन्यात... पण असुदे... Everything happens for a reason!
आता positive गोष्टींवर focus करायच आहे. कुढत आणि रडत बसून फक्त वेळच वाया जाणार आहे.
आता आम्ही पुढच्या रविवारी घरी जाणार आहे. त्यामुळे countdown begins!
(आता येऊद्या ना घरी!!!)
मी ठरवलं आहे की रविवारी haircut करायचा. पूर्ण वेगळा लूक यायला हवा. गंडला तरी चालेल. पण बदल हवा आहे!!
इथे वापरलेले कपडे फेकून द्यायचे अस म्हणत आहेत सगळे... आता मी मागच्याच महिन्यात जॉकीच्या पँट आणि टीशर्ट विकत घेतले आहेत. ते खरचं फेकून द्यावे लागतात की काय असं वाटतं आहे!!
आज आम्ही संध्याकाळी हॉटेल खालच्या पार्किंगमधे फेऱ्या मारून आलो. हालचाल गरजेची आहे...
मी रूम मध्ये आल्यावर मोबाईल आणि किल्लीवर डेटॉलचा sanitizer स्प्रे मारला. आशिष माझ्याकडे खूप आनंदाने बघायला लागला. त्याच्या डोळ्यात काहीतरी हरवलेलं सापडल्याची चमक दिसत होती. म्हणाला की "अग मला डेटॉलचा किंचीत वास येतोय.." भारीच!! फारसे काही अडत नसले तरी एक क्षमता आहेच की वास येणे. हे एक recovery चेच लक्षण! Yesss...
ह्याचे सेलिब्रेशन म्हणुन की काय आज डब्यात सोया chunks ची भाजी होती... नेहमीपेक्षा बरीच झणझीत होती. अर्थातच आशिषला खूप आवडली. शिवाय रविवार म्हणून जिरा राइस पण होता.
मज्जा आली जेवायला.
आता राहिले फक्त 6 दिवस!!
अशा तऱ्हेने quarantine चा ९वा दिवस समाप्त...
दिवस दहा (5 जुलै)
आज सोमवार!
मागचा शुक्रवार डॉक्टर डॉक्टर खेळण्यात गेला होता. त्यामुळे काम बरचसं अर्धवट राहिलेले. त्यामुळं आज on toes राहावं लागणार आहे.
सकाळी 9 ला काम सुरू केलं. आज leadership address ची एक मीटिंग होती, त्यात "Return to work" ची थोडीफार वाच्यता सुरू झाली आहे असं लक्षात आलं. पण "ह्या ह्या दिवशी या ऑफिसला!" असा हळदी कुंकू लावून निरोप येत नाही तोपर्यंत काही विचार करण्यात अर्थ नाही.
मी philips जॉईन केली ती लॉक्डाऊन सुरू असतानाच. लॅपटॉप सुद्धा घरपोच कुरिअर ने आलेला. त्यामुळे ऑफिस कसं दिसतं हे माहीतच नाही. पण घरापासून फार फार लांब आहे हे मात्र माहित आहे!! त्यामुळे आत्ता लगेच सुरू होऊ नये असं वाटतं आहे सध्या... असो!
आज घरून वांग्याची भाजी आली... डब्यात घेवडा. मजा आली जेवायला.
आशिष परवा दिवशी ऑफिस जॉईन करेल म्हणातोय. मग आज त्याचा लॅपटॉप पण आणायला सांगितला घरून. त्या बॅगमधे बाकरवडी आणि लाडू पण होते!! Surprise!!
आशिष आज खूपच चिडचिड करतोय. औषधांमुळे असेल किंवा बांधून ठेवल्याने... पण वैतागला मात्र आहे आज. त्याच त्याला पण जाणवत आहे पण आवरत नाहीये. दिवसभर गेम खेळतो आहे म्हणून मी दुसर काहीतरी कर म्हणते आहे त्याला.
भूक लागत नाहीये नुसत बसल्याने. खूप मागे लागून त्याला फेऱ्या मार वगैरे सांगती आहे. त्याने पण वैतागतो आहे.
फेऱ्या मारून पण थकवा येतोच आहे. पण हालचाल नाही झाली तर भूक लागत नाहीये... गोळ्या घ्यायच्या आहेत त्यामुळे जेवण चुकवून चालत नाही. सगळं गुंतागुंतीचे शास्त्र!
रोज 9 ला जेवतो आम्ही. अजिबात भूक लागली नाही म्हणाला आणि खाणार नाही असं declare केलं.
मला आज ऑफिसच्या कामाने थकवा आलेला. मला जेवताना बघून त्याची भूक चाळवेल असं वाटून मी जेवायला सुरुवात केली. त्याला हळूच म्हणलं "समोरच्या पॅसेज मधे फेऱ्या मारतोस का?"
काय माहित कसं काय.. पण तयार झाला आणि 10 min फिरून आला...
मग मी त्याला अजिबात जेवायचा आग्रह केला नाही. शेवटी 9.50 ला स्वतःहून डबा घेतला आणि व्यवस्थित संपवला. (भूक लागलेली असते)
आजारी माणूस म्हणजे एक लहान मूल असतं! हे खरंच आहे बाबा... भूक लागलेली कळत नाही. फक्त हट्टीपणा जमतो... रागवता येत नाही. वगैरे वगैरे...
उद्यापासून सकाळ संध्याकाळ चालायला सुरू केलं पाहिजे. त्याशिवाय पोटाची भट्टी सुरू होणार नाही
रविवारी घरी जायचंय!! आता राहिले फक्त 5 दिवस...
अशा तऱ्हेने quarantine चा 10 वा दिवस समाप्त!
दिवस आकरा (6 जुलै)
एक गाणं आहे संदीप खरेच "कंटाळयाचा देखील आता कंटाळा येतो!!!"
तसे काहीसे दिवस चालले आहेत.
आज मला 7.30 लाच जाग आली. काम होत थोड त्यामुळं आवरून 8.30 लाच कामाला सुरुवात केली. आशिष गाढ झोपेत होता. मग एकटीनेच चहा घेतला. फक्त चहासाठी उठवण्यात काही तथ्य नाही.
आज जरा जास्त काम आहे आणि किचकट काम आहे. Data हाताळायची सवय नाहीये त्यामुळे थोडा गोंधळ उडतो आहे. पण नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.
आज संध्याकाळचे 7.30 झाले काम उरकायला.
बाबा आणि महेश दादा भेंडवाडला (शेतात) गेले आहेत, त्यामुळे आज कोणीच दुसरं भेटलं नाही.
मी आजकाल सगळ्यांना व्हिडिओ कॉल करते. आशिषला कंटाळा येतो व्हिडिओ कॉल वर बोलायचा.
माणसं दिसली की बर वाटतंय मला.
आज उशीर झाला आईंना फोन करायला.. आशिषला कॉल करायला जबरदस्तीने बसवलं.
तर कॉल आकांक्षाने उचलला. आशिषची कळी खुललीच! एकतर खूप दिवसांनी आकांक्षा दिसत होती आणि बोलणं पण धड अस झाल नव्हत!!
मला पण बरं वाटलं बघून तिला... नवीन चेहरा आणि नवीन विषय! गप्पा, चेष्टा, मस्करी झाली.
मज्जा आली... मी थोडी थकलेले होते कॉलवर बोलायला...
पण आशिष मात्र उत्साहात बोलला आज बऱ्याच दिवसांनी.
जेवणाची आज गंमतच झाली...
मला भात आवडत नाही. म्हणजे मी खातच नाही. बिर्याणी,पुलाव वगैरे उच्चवर्णीय पदार्थ माझ्यासाठी "भात" ह्या प्रकारात मोडतात...(ह्याबद्दल अनेक भातप्रेमी मंडळींचा रोष मी ओढवून घेतला आहे)
त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच सांगितलेलं की माझ्या डब्यात फक्त पोळीच द्या. भात नकोच.
आता 2 दिवस आशिषला देखील रात्रीचा भात नको वाटत आहे. आज दुपारचा डबा आला की त्या काकांना हा निरोप द्यायचा अस ठरलं.
डबा आला तेव्हा नेमका माझा कॉल सुरू होता. त्यामुळे आशिषने डबा घेतला आणि त्यानेच निरोप दिला..
आज रात्री उत्साहात french fries मागवले, सूप घेतलं. मग डबा आला. मी आत घेतला आणि उघडून बघते तर काय!!! सगळ्या कप्प्यात खचाखच भरून नुसता भात!!!
आणि छोट्या दोन कप्प्यात वरण दिलेलं.
"फक्त भात नको" च्या ऐवजी "फक्त भातच द्या" असा "ध" चा "मा" झाला असावा!!!
खो खो हसलो दोघं ती फजिती बघून..
तो भात संपवेपर्यंत नाकी नऊ आले ते वेगळंच!!
उद्या पहिली लक्षणे दिसून 14 दिवस पूर्ण होत आहेत! त्यामुळे रूम मधले social distancing उद्या संपेल. हातातल्या sanitizer spray ला आणि पर्यायी मला थोडीशी विश्रांती मिळेल उद्यापासून.
आता राहिले फक्त 4 दिवस...
अशा तऱ्हेने quarantine चा 11 वा दिवस समाप्त!
दिवस बारा (7 जुलै)
आजचा दिवस माझा सॉलिड बिझी आहे
सकाळी 9 ला लॅपटॉप उघडला आहे तो रात्री 10 वाजता बंद केला आहे. आज आशिषने पण ऑफिस जॉईन केले. त्यामुळे दोघेही तसे बिझी बिझी!
आज आमच्या रूम मधला टीव्ही सुरू झाला.. गेले 11 दिवस रोज सकाळी महेश दादा आला की पहिला प्रश्न: "टीव्ही सुरू आहे?"
मी नित्यनेमाने "सुरू नाही. पण असुदे, आम्ही नाही पाहत! " असं उत्तर देते.
ते मात्र आमच्या उत्तराला न जुमानता हॉटेल स्टाफला गोळा करतात आणि दुरुस्त करून घ्या असं सांगून जातात. मग 1-2 लोक येऊन आपापल्या परीने काहीतरी करून बघतात. टीव्ही काही सुरू होत नाही. महेश दादाची पाठ फिरताच बाकी सगळे थंड!
आज मात्र रूमच बदलून द्या अशी मागणी केल्यावर येन केन प्रकारेण टीव्ही सुरू झालाय!!
आम्ही बघितला नाहीच ही गोष्ट वेगळीच!
आज मला प्रचंड काम आहे त्यामुळे चहा पाणी मागवणे, ग्लास कचरा रूम बाहेर नेऊन ठेवणे, काढा वगैरे वगैरे काम आज आशिष करतो आहे.
इतके दिवस त्याला त्याचा ग्लास, चमचा वगैरे सोडून कुठेच हात लावून दिला नव्हता. आज 14 दिवस पूर्ण झाले quarantine चे, आता तशी काही काळजी नाही. जरा मोकळेपणाने वावरू शकेल आज तो..
पण पार कामाला जुंपल्यासारखच झालं त्याला! :-(
मला मान वर करून बघायला सुद्धा उसंत नव्हती आज..
घरी फोनसुद्धा झाला नाही आज माझा. एक क्लिष्ट काम आलंय. त्यावरच दिवसभर डोकेफोड सुरू आहे. उद्याचा दिवस पण असाच जाणार वाटत.
आता घरी जायचं आहे लवकरच, त्यामुळे इथला stay enjoy करुया असं ठरवलं आहे आम्ही. आज पनीर क्रिस्पी मागवलं! मस्त लागलं...
शुक्रवारी किंवा शनिवारी पूर्ण जेवण इथलं करायचा प्लॅन आहे... बघू आता कसं execute होतंय.
आता राहिले फक्त 3 दिवस...
अशा तऱ्हेने quarantine चा 12वा दिवस समाप्त!
दिवस तेरा ( 8 जुलै )
आज Philips ने दिलेल्या अमर्यादित, अति किचकट, सकाळी 9 ते रात्री 11 चालणाऱ्या कामाचा निषेध म्हणून डायरी लेखन बंद राहील!
ता. क. आता राहिले फक्त 2 दिवस
Quarantine चा 13 वा दिवस भुर्रकन उडून समाप्त!
दिवस चौदा (9 july)
आजसुद्धा philips च्या नावाने खडे फोडून डायरी लेखन चुकवायची पूर्ण शक्यता आहे. कामाला अगदी पूर आला आहे..
पण आज डायरी लिहलीच पाहिजे असा दिवस आहे!
2 दिवस इतकी कामात बुडाले होते की कोणाशीच फोन,मेसेज काहीच होत नव्हते. आज आईने सकाळी सकाळी 8 ला फोन केला आणि म्हणाली की तुम्ही उद्याच(शनिवारी) घरी या!
आता मी थोडी संभ्रमात पडले की डॉक्टर तर रविवारी जावा म्हणाले आहेत...
ही हाय कोर्टची चर्चा ऐकून, सुप्रीम कोर्टाने सूत्रे हातात घेतली... बाबांनी एकच वाक्यात सांगितलं "एका दिवसाने काहीही फरक पडणार नाही! डॉ. ना फोन करा आणि जातो आहे उद्या घरी असं सांगा" विषय बंद!
आम्हाला काय .. घरी जायचेच आहे! आनंदी आनंद गडे...!
आम्ही लगेच प्लॅन केला, आज रात्री हॉटेल मध्ये जेवण करायचं!!
दुपारी महेशदादाला फोन केला की आजचं डॉ कडे जाऊन येऊ. आज सकाळपासूनच मिरजेच्या पावसाने रंग दाखवायला सुरू केले आहे... संततधार पाऊस आहे.
दुपारी डबा द्यायला काका आले, तेव्हा त्यांना सांगितलं की आता घरी जाणार आहोत. त्यामुळे, आज रात्रीपासून डबा नको... ते त्यावर चटकन म्हणाले " आधी सांगायचं नाहीस का? काहीतरी गोड दिलं असतं!!!"इतकं मस्त वाटलं ते ऐकून.
मग डबा बनवणाऱ्या काकुंशी फोन झाला.. त्यांना मनापासून thank you म्हणलं..
संध्याकाळी 6 ला डॉ ना फोन केला ,तर डॉ म्हणाले की काही त्रास नाही तर यायची काहीच गरज नाही आत्ता.... वाटल्यास सोमवारी एक चक्कर मारून जावा, recovery चेक करायला.
उद्या घरी जायला ग्रीन सिग्नल दिला!!! आणखी काय हवं??
लगेच, ही सुवार्ता घरी कळवली. आईचं प्लॅनिंग सुरू झालं की नाश्त्याला काय? भाजी कोणती करू? एक ना अनेक...
उद्या अमावस्या सकाळी 7 वाजता संपते, त्यामुळे नाश्ता करून 10 पर्यंत घरी पोचायचे असे ठरले.
कोरोनाला successfully चितपट केल्याबद्दल रात्री हॉटेलमध्ये जेवण मागवलं. पनीरची भाजी, स्प्रिंग रोल आणि रोटी अशा जेवणावर ताव मारला... खूप बरं वाटलं बाहेरच खाऊन!
गेले 14 दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते finally होतंय. आम्ही घरी जाणार आहे. Yayyy!
आता गेले 2 आठवडे असलेली बंधने नाहीत, ते
निःशंक मनाने घरी जाणार आहे उद्या!
हे 14 दिवस आम्ही जो काही अनुभव घेतला, तो मी रोज जसा वाटला तसा रोज शब्दबद्ध करत गेले.
तसे पाहिले तर दोनच आठवड्याचा हा काळ. पण आत्ता ह्या 14व्या दिवशी जर पहिल्या दिवसाचे लिखाण वाचले तर आम्हा सगळ्यांच्याच मनस्थितीमधे जमीन अस्मानाचा फरक आहे हे कळते. दिवस सरतील तशी सुधारत जाणारी तब्येत, कमी होणारी भीती आणि मुख्य म्हणजे बदलत जाणारी मानसिकता ह्याचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच!
आज हा quarantine मधला 14 वा आणि शेवटचा भाग...
आणि आता घरवापसी! 😊