Sunday, February 21, 2021

महिलाविशेष लिखीत ( 2012 - 2021 )

     

कॉम्रेड सरिता कुलकर्णी 

कन्व्हेनर वुमेन्स कौन्सील 

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र

एम्प्लॉईज युनीयन औरंगाबाद युनिट


 

माझे मनोगत

31/03/2021



युनिट पातळीवर एआयबीईएची सक्रीय कार्यकर्ती म्हणून काम करायला मी सुरुवात केली . बँकेत लागल्यापासून काॕ ए. बी. कुलकर्णी यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे संघटनेविषयी सुरुवातीपासूनच एक कप्पा राखीव होता तो कृतीत उतरला . केवळ काॕ. ए बी कुलकर्णींच्या प्रोत्साहनामुळे सक्रीयपणे काम करायला मला सहज शक्य झाले त्यांचे कायमच मोलाचे सहकार्य झाले अजूनही ते माझे खरे मार्गदर्शक आहेत . तर संघटनेतील काॕ. देविदास तुळजापूरकर , काॕ. धनंजय कुलकर्णी , काॕ. उत्तम होळीकर , काॕ. उमा पिंगे , काॕ. संजिवनी कुलकर्णी , काॕ. रोहिणी दुस्सल यांच्या साथीने आणि प्रोत्साहनाने काम करायला सुरुवात केली , प्रेरणा मिळत गेली . विशेषतः काॕ तुळजापूरकर व काॕ धनंजय कुलकर्णी हे प्रेरणाश्रोत राहिले . तसं लिखाण करायची मला लहानपणापासून आवड आहे पण ते सगळंच सर्वांपर्यंत  पोहोचलच असं झालं  नाही . तसं तर बरचसं ते कौटुंबिक विषयाभोवती मर्यादित राहिलं . पण संघटनेतील सक्रीय सहभागानंतर सततच्या मिटींग्ज व होणारे कार्यक्रम , आधिवेशने याला नेहमीच हजर राहण्याची संधी मिळत गेली . मग त्याठिकाणी काॕ. ललिता जोशीसारख्या महिलांना जवळून न्याहाळता आलं तसेच काॕ अमरजीत कौर , काॕ उल्का महाजन या व यासारख्या अनेक दिग्गजांचे विचार नेहमीच ऐकायला मिळत गेले . मला अंतर्मुख व्हायला होऊ लागलं आणि मला दिशा मिळत गेली , आत्मविश्वास वाढत गेला , मत मांडण्याचे धाडस आले आणि प्रसंगानुरुप त्याचं रुपांतर लिखाणात होऊ लागलं . मग त्यात्यावेळी ते मी लिहीत गेले संग्रह करत गेले व त्यावेळी उपलब्ध असलेल्या माध्यमातून पोहोचवत गेले . या सर्व दिग्गजांकडून पावती मिळू लागली . विशेष करुन काॕ. संजिवनी कुलकर्णीचा 
" लिहीत रहा " 
हा रेटा सुरु राहिला . 
मग लिखाणात महिलांविषयी जास्त लिहावसं वाटलं ते लिहीत गेले संग्रहीत केलं अजूनही करते . 
          2020 मध्ये कोरोनाचं संकट आलं त्यानुषंगाने अनेक बरेवाईट प्रसंग अनुभवाला आले त्याचबरोबर लाॕकडाऊनमुळे आख्खं कुटूंब एक वर्ष एकत्र राहिलं . नुकतीच नविन सून आलेली मुलगा , मुलगी अनेक वर्षानंतर घरी राहिली . घरात तरुणाईचा वावर होता त्यामुळे घरातील वातावरण प्रफुल्लीत होते . मग लिहिण्याच्या माझ्या  छंदाने डोके वर काढलं आणि मी ते लिहीत गेले . मागच्या वर्षभरात कौटुंबिक लिखाण भरपूर झालं . अधुनीक तंत्रज्ञान वापरत व्हाट्सअॕप , ब्लाॕग , ड्राईव्ह इत्यादी माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचवले गेले .
        2021 कोरोना संपत आला असं वाटू लागलं तरीही  योग्य ती काळजी घेऊन सुद्धा 20 मार्च 2021 ला आम्हा उभयतांना कोरोना झाला आणि पुन्हा चौदा दिवसांचा बंदीवास आला . सुरवातीचे पाचसहा दिवस औषधपाणी व विश्रांतीत गेला . मग सहजच संग्रहीत फाईल वाचत बसले ती चाळतांना वाटलं गेल्या आठ नऊ वर्षात महिलांच्या संदर्भात जे लिहीलंय तेही एकत्रित करुन वाचणारापर्यंत पोहोचवावं म्हणजे वेळेअभावी मागे पडत गेलेलं काम पूर्ण होईल आणि 
" मला कोरोना झालाय "
हे मला विसरी पडायला होईल .
यामध्ये 2012 पासून प्रसंगानुरुप लिहीलेले महिलाविषयक लिखाण त्यामुळे
 " महिलाविशेष लिखीत ( 2012-2021 ) " 
अशी ही लींक तयार केली . यावर्षात आणखी काही लिखाण झालं तर याच लिंकमध्ये एडीट करेन .
        माहितीसाठी 
        नोटाबंदी कालावधीत 
" नोटाबंदीचे पन्नास दिवस "
ही एक लिखीत संग्रहीत डायरी आहे पाहू ती केव्हा टाईप होईल तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन .
धन्यवाद !!!


 


                  2012

दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने मनाला खूप यातना झाल्या . असे प्रसंग घडू नयेत यासाठी काय उपाय करायला हवेत , कायदे कसे असायला हवेत या व आशा चर्चांना उधाण आलं . मग नंतर उपाय करण्यापेक्षा आधीच निर्भया प्रकरण न होऊ देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक प्रयत्नापैकी एक प्रयत्न . दिव्यमराठी 8/3/2013 रोजी प्रसिद्ध 



स्त्रीमानाने समाजाला दिलेली आर्त हाक :
फक्त कायद्यात नव्हे संस्कृतीतबदल हवा .


प्राचीन काळापासून पुरूषप्रधान संस्कृती चालत आलेली आहे. समाजाने स्त्रीयांना हीन वागणूक दिलेली आहे . एकीकडे देश महासत्तेकडे वाटचाल  करतोय तर स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे तेवढीच मुस्कटदाबी होते. त्याचा अतिरेक होऊन उद्रेक झाला व दिल्लीच्या दामिनीच्या रूपाने रूद्रावतार धारण केलाय . एक अंगार पेटलाय , सारा देश रस्त्यावर उतरलाय , तिची झुंज संपलीय आणि आपला लढा सुरू झालाय हा लढा नेटाने व सातत्याने पुढे रेटणं हीच तिला खरी श्रध्दांजली ठरणार आहे.
यासाठी फक्त कायदा सुधरुन चालणार नाही. संस्कृतीत बदल घडवून आणायला हवा कारण आज आपल्याला कायद्याने समानता दिलेली असली तरी  संस्कृतीने दिलेली नाही . कायदा राहिला पुस्तकात त्याला संरक्षण व पळवाटाच जास्त निघाल्या 150 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेतला तेव्हा कुठे आज या तीस-चाळीस वर्षात स्त्रीयांना सहज शिक्षण घेता येऊ लागलाय त्यासाठी प्रदीर्घ काळ जावा लागला . आजही स्त्रिया शिकल्या मोठया पदावर विराजमान झाल्या पण आचरणात त्या मागेच आहेत . नव्हे त्यांना जाणीवपुर्वक तसे केलेल आहे . निर्णयप्रक्रियेत त्यांना किती सहभागी करून घेतलं जात ? हा मोठा विचार करायला लावणारा प्रश्न होऊ शकतो .
जर स्त्रियांचा दर्जाच बदलायचा असेल तर त्यासाठी स्त्रीउध्दाराचे मोठे आंदोलन करणे गरजेचे आहे . त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण आजचा कायदा व त्याच्या पळवाटांचा आधार घेतच हुंडाबळी , अत्याचार , बलात्कार , स्त्रीभ्रुणहत्या बेमालूमपणे होत आहेत . पुरूषप्रधान संस्कृती या आर्थान म्हटल जातं की माणूस जन्माला आला की , नव्हे नव्हे जन्माला येण्यापूर्वीच मुलगा की मुलगी हा जातीभेद सुरु होतो व त्यातून तिचा जन्म नाकारला जातो . त्यातूनही  बाळ जन्माला आलं की त्याच्या स्त्री-पुरूष या जातीनुसार वागण्याची नियमावली कुटूंबीय ठरवतात व याच ठिकाणी स्त्रियांचे अबलापण व फाजील पुरुषी अहंकाराची बीजं पेरली जातात . आणि यातुनच दबलेल्या स्त्रीया व नराधमी प्रवृत्तीचे विकृत मनोवृत्तीचे रोडरोमीओ फोफावतात .
यामध्ये बदल करायचा असेल तर सुरूवात स्वत:पासून करावी लागेल समाजाची पुरूषी मानसीकता (फक्त पुरूषांची नव्हे) बदलणे गरजेचे आहे यासाठी माणूस या जातीचे स्त्री-पुरूष , विचारवंत , समाजसेवक , समाजप्रबोधक , साहित्यीक , कवीमने एकत्र येऊन संस्कृती बदलाचे जाणीवपुर्वक प्रयत्न करायला हवेत कुटुंब आणि प्राथमीक शिक्षण यामध्ये माणूसकीचे धडे गिरवून घ्यायला हवेत.
या बदलासाठी मिडीयाचा वापर मोलाचा ठरणार आहे . आजचा समाज टी.व्ही. सिनेमा यांचे खुपच अनुकरण करतो . त्यामाध्यमातून सुसंस्कृतीचे व समानता दर्शवणारे तशी मानसिकता तयार करणारे कार्यक्रम व्हायला हवेत. फजिल प्रदर्शने ताबडतोब बंद कारायला हवीत.
समाजामध्ये विकृत व सज्जन दोन गट केले तर संख्येन विकृतांची संख्या कमी आहे . मग या सगळ्या प्रकाराकडे समाजाने डोळेझाक का करावी ? आजूबाजूला काय घडतं याचा मागोवा का घेतला जाऊ नये ? माझ काय याच्याशी देणघेण ही प्रवृत्ती सोडून जागेवरच या रोडरोमीयोंना फटकारणं वेळ पडल्यास कायद्याच्या हवाली करणं ही सहज प्रक्रीया व्हायला हवी.
आज माहिती आणि तंत्रज्ञान इतंक विकसीत झालेल आहे. दिल्लीतील गोष्ट गल्लीत कळते तर मग एकच असा नंबर ठरवावा जसे 100 म्हटले की पोलिस आठवतात तसा तो नंबर कुठून ही फीरवला तरी तत्क्षणी तो हेल्पलाईनला लागला पाहिजे व त्यावरचे कॉल अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जावेत ती एक “आत्यावक्षक सेवा” म्हणून समाविष्ठ केली जावी . तो नंबर लहानांपासून वृध्दांपर्यंत व समाजातल्या तळागळापासून अतिश्रीमंतापर्यंत ताबडतोब प्रचलीत व्हायला पाहिजे. ती यंत्रणा तायर करतानाच इतकी सक्षम असायला हवी कि त्यात कोण्याच त्रुटी राहू नयेत. समजा तो नंबर 1000 दिला तर फक्त एक हजार हा शब्द उच्चारला तरी त्याचा धाक वाटायला पाहिजे .
आताच्या कायद्यात बदल करत कडक कायदा त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास माजलेली अराजकता कमी करण्यास नक्कीच मदत होईल. फोफावलेल्या विकृत मानसिकता छाटून टाकता येतील आणि जाणीवपूर्वक संस्कृतीत बदल केल्यास समुळ नष्ट होतील . पण गरज आहे ती बदलाची . मी माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे मी , माझ कुटुंब , माझ्या गल्लीतील जाणकार , माझ्या गावातील नेते आणि अशी गावेच्या गावे मिळून सारा देश ध्यासाने पेटून उठला तरआम्ही महिला आशावादी आहोत एक दिवस नक्की उगवेल तो आमचा असेल त्याला ना जातीची , ना धर्माची , ना प्रांताची, ना पक्षाची कोणतीच सीमा असेल .

           ------------------------------------
      ---------------------------------------------

                2013



निर्भया प्रकरणाने 2012 साल ढवळून निघाले व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार डोक्यात वादळ निर्माण करु लागले . आर्थिक , मानसिक , वाचिक असे त्याचे अनेक प्रकार पाडता येतील . शिवीगाळ हा वाचीक अत्याचार आहे . मग 2013 च्या महिलादिनानिमीत्त ही याचिका ! मासिकात प्रसिद्ध .


दिनांक 08/03/2013

स्त्रीच्या आई या पवित्र नात्याला शिवीच्या कचाट्यातून मुक्त करा


सध्याच्या वातावरणात दिल्लीच्या प्रकरणाने महीलांवरील अत्याच्याराला वाचा फोडली गेली आहे. सजग माणसाच्या मनातली तार छेडली गेली आहे. कायद्यात बदल, संस्कृतीत बदल, शिक्षणात बदल, प्रसारमाध्यमात बदल हे बदलाचे वारे वाहू लागले आहे. एवढे मात्र नक्की की ही बदलाची आग धगधगती राहीली तरच समाजपरिवर्तन घडून येऊ शकेल.

माणूस घडत असताना त्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्या जडणघडीवर आपसूकच परीणाम होत असतो. जस लहान मुल चालू बोलू लागतं तस त्याच्या कानावर जे पडेल त्या बऱ्यावाईट गोष्टी त्याच्या मनावर कोरल्या जातात. आणि प्रसंगानुरूप आपोआपच त्याच्या वागण्या बोलण्यातून बाहेर येतात.

आपण रस्त्याने चाललो तर माणूस सहज बोलताना , रागाने बोलताना, भांडण करताना शिवीगाळ करतो व त्याची ती शिवी आई व बहीण यांना घेतल्याशिवाय पूर्णच होत नाही हे कशाच द्योतक आहे. मी म्हणेन स्त्रीला अत्यंत हीन समजण्याचे ध्योतक आहे.

हे इतकं भिनलंय न , माणसाच्या इतकं अंगवळणी पडलंय की कोणाच्या लक्षातही येत नाही की ज्या आईला आपण प्रेमस्वरूप आई , वात्सल्यरूप आई म्हणतो . स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतो . आदिमाता , आदिशक्ती म्हणून जिची पूजा करतो, त्याच आईच्या नात्याला इतकं हीन लेखतो आहोत. ज्याप्रमाणे सती जाणं ही एक अनिष्ठ प्रथा होती त्यात तिच्या मनाविरूध्द बळी दिला जायचा त्याचप्रमाणे आईवरून शिवी ही सुध्दा अनिष्ट प्रथा आहे . यात तिच्या स्त्रीत्वाचा खून होतो. तिच्या सन्मानाला तडा जातो. शिव्या ऐकताना कानावर अत्याचार होतात लाज वाटते.

कुठतरी बदलायला हवं ! सामाजीक सुधारणा या राजकीय क्रांतीप्रमाणे कधीही एकदम होत नाहीत . सामाजीक सुधारणाची गती मंदच असते. परंपराप्रियता हा कोणत्याही समाजाचा महत्वाचा विषय असतो . त्यामुळे सातत्य व परिवर्तन याचे चक्र फिरत फिरत समाजात बदल होत असतात.

याचाच एक भाग म्हणून ८ मार्च या महिलादिनाला वेगळं स्वरूप द्यावं अस वाटतं. हे करण्यासाठी तमाम समाजबांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. थोडसं अंर्तमुख होऊन विचार करा. शिवी उच्चारण्यापूर्वी तुम्ही थोडसं तरी थांबलात तर नक्कीच तुमच्यातला माणूस जिवंत आहे आणि तुमचे तुम्हालाच पटेल की बापरे हे तर बरोबर आहे . आपण केवढे महापाप करतो आहोत. आणि मग प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला पाहीजे, जाणीवपूर्वक बदलायला पाहीजे.

कालातंराने या बदलाला कायद्याचंपण संरक्षण घ्यावं लागेल.  सुरूवातीला काही काळ नैतीक बदलाला द्यावा लागेल . नंतर मात्र काठोर कारवाई करावी लागेल.

“ वुमेन्स ॲट्रॉसीटी ॲक्ट कलम ….. नुसार ” अशा प्रकारची शिवी देणारा दोषी ठरवता येईल या कायद्यात कशी तरतूद करता येईल ? प्रचलीत करता येईल हे काम तमाम कायदेपंडीतांनी करावे.

   

                     -----------------------------

               ---------------------------------------


        

                  2014



आर्थिक साक्षरता हे सबलीकरणाचे महत्त्वाचे अंग आहे . महिला सबल होण्यासाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता असणे हा महत्त्वाचा भाग आहे महिलादिनानिमीत्त दिव्यमराठीत प्रसिद्ध .


आर्थिक नियोजानात महिलांचा सहभाग 
नेट क्रांतीच्या युगातील गरज


सध्या विविध पातळ्यावर महिला सबलीकरणाचे उपक्रम हाती घेतले आहेत. महिला पुर्णपणे सबला होण्यासाठी तिचा सर्वांगीण विकास यशस्वी होण्यासाठी प्रत्येक महिलेला आपल्या कुटूंबाच्या आर्थिक  उलाढाली ज्ञात असणं व आर्थिक  नियोजनात सक्रिय सहभागी असणं हा अत्यंत महत्वाचा भाग ठरतो. बँकेत काम करत असताना बचत गटाच्या माध्यमातून येणाऱ्या महिलांचा सहभाग सोडला तर मध्यमवर्गीय महिला ग्राहंकाचा बँकेतील एकूण वावर पाहता असे वाटतं की महिलांशी बँकिंगविषयी काही हीतगुज साधावं ही भावना बऱ्याच दिवसांपासून मनात डोकावत होती. म्हणून चारगोष्टी आपल्या मैत्रिणींशी बँकेविषयी.

      बऱ्याच जणींची बँक खाती असतीलही पण त्याच्या व्यवहाराविषयी किती जणी जागरूक आहेत हा मोठा विचार करयला लावणारा प्रश्न आहे . बऱ्याच  महिला नोकरी करतात , काही ना काही कमवत असतात . गृहिणी असल्यातरी पैसा हातात असतोच की पण बँकिंग व्यवहार जाणून घेण्याच्या किंवा त्यात डोक घालण्याच्या फंदात फारसं कोणी पडत नाही ही उदासीनता का ? 

आपण आपल्या कुटुंबाचे सर्व प्रकारचे व्यवस्थापन करत असतो . 

"Every Woman is the best manager "  

या उक्तीप्रमाणे प्रत्येक महिला कुटुंबात समतोल साधण्याचा प्रयत्न करते . कुटुंबाला येणारे सर्व प्रश्न तिला माहीत असतात . किंबहुना बऱ्याच जबाबदाऱ्या तिच्यावर असतात . पण आर्थिक नियोजनात तिचा सहभाग अभावानेच दिसतो . स्वत: मिळवत असो अथवा नसो भले रक्कम तिच्या नावावर असेल सहीची मालकही तिच असेल पण त्या व्यवहारचे पूर्ण ज्ञान तिला असेलच असे नाही . याला बऱ्याच अंशी ती स्वत:च जबाबदार असते . फारस लक्ष न देण किंवा तो भाग माझ्याकडे नाही असे सोयीस्कररीत्या सांगुन आवश्यक ते ही ज्ञान अवगत केले जात नाही.

मला याठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगाविशी वाटते , आपल्या कुटूंबाच उत्पन्न , आपला चालू खर्च व भविष्यातील खर्चाचं नियोजन हे प्रत्येक महिलेला माहित असायला हवं . याविषयी घरामध्ये चर्चा होणं अत्यंत महत्वाचे आहे . गुंतवणूक कशाप्रकारे केली आहे . ती खाती संयुक्त  आहेत का ? ठेवींना वारसदार नेमले आहेत का ?  याच बरोबर आपण कोण-कोणत्या गोष्टींसाठी कर्ज घेतले आहे . त्याचे मासिक हप्ते काय ?  या विषयी सविस्तर माहीत असायला हवी याचे फायदे:-

1) जर आपला जोडीदार आर्थिक विवंचनेच्या मानसिक दडपणाखाली एकटाच असेल तर तसं रहाणार नाही त्यात आपली मदतच होऊ शकते.

2)  जर अनावश्यक खर्च होत असतील तर वेळीच त्यावर अंकुश ठेवता येईल व तो पैसा गुंतवता यईल .

3) नियोजन करून गुंतवणूक केल्यास येणाऱ्या खर्चाची योग्यप्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने सोडवणूक केली जाईल.

4)  घरातील अकस्मात मृत्यूने निमोण होणाऱ्या परिस्थितीवर थोड्याफार प्रमाणात का होईना मात करता येईल.

5)  बँकेत NEFT, RTGS, IFCS CODE , Online Transaction, MICR No. Clering या सारखे व्यवहार काय आहेत. याची अद्ययावत माहिती मिळू शकेल. 


यासाठी प्रत्येकाने हा निश्चय करायला हवा. माझ पॅन कार्ड असेल . माझा ईमेल असेल. माझं बँक खात असेल . त्याच नाॕमिनेशन केलेलं असेल. सर्व व्यवहार मी स्वत: करेन फक्त सहीची मानकरी रहणार नाही . आपण स्वत: बँकेत जाऊन व्यवहार समजून घ्यायला हवेत . यासाठी आपल जुनं खातं बँकेत असेल तर ठीक नसल्यास नवीन खातं उघडाव . त्याला SMS Alert करून घ्यावा की ज्या योगे त्या खात्यावर जे व्यवहार होतील त्याचा तुमच्या मोबाईलवर SMS येईल .

त्या खात्याचे ATM कार्ड घ्याल व जेव्हा आपण परगावी जाऊ किंवा काही खरेदी करू तेव्हा ATM चा वापर करू . ज्यायोगे पैसे वागवण्याचा धोका कमी हातो व त्यासाठी आपल्याला Pin No लक्षात ठेवावा लागतो. सुरूवातीला 4 ते 5  वेळेस ATM मधून व्यवहार करून त्याची माहिती घेतलेली असावी  म्हणजे ऐन कामाच्यावेळी अडचण येणार नाही .

त्याच खात्याला नेट बँकिंग सुवीधा उपलब्ध करून घ्यावी . यासाठी बँकेत जाऊन फक्त फॉर्म भरून द्यावा लागेल . त्याची पण माहिती बँकेकडून मिळू शकते . ही सुविधा आपल्याकडे आली की आपण लाईट बील , फोन बील , रेल्वे रिझर्व्हेशन , मुलांना पैसे पाठवणे इ. गोष्टी सहज करू शकू . याबाबतीत थोडीशी मुलांची मदत घ्यावी लागेल . पण हे करत असताना चिकाटी सोडू नका . कशाला ही डोकेदुखी हा विचारसुद्धा मनाव येऊ  देऊ नका . तरच हे शक्य हाईल.

हे सर्व करत असताना ATM किंवा नेट बँकींगचा पीन किंवा पासवर्ड  कोठेही लिहून अथवा मोबाईलमध्ये सेव्ह करु नये . तो एक सुरक्षीततेचा भाग आहे. ज्याप्रमाणे लिहीता वाचता न येणे ही निरक्षरता आहे त्याचप्रमाणे आजच्या युगात काॕम्प्युटर चालवता न येणं ही सुद्धा निरक्षरता आहे . हे आपल्या मनाला पक्क समजावावे .

पंधरा वर्षापुर्वीच बँकींग आजच बँकींग व अजून पंधरा  वर्षानंतरचं बँकींग यात आमूलाग्र बदल आहेत . काळानुसार आपण ते अवगत करायला हवेत . तरच आपण प्रवाहात राहू अन्यथा प्रवाबाहेर फेकले जाऊ व काय करायच हे समजणार नाही.

आपणच बचत खात्यावर पैसे आपल्या सवडीनुसार टाकून ठेवावेत . आपल्या कुवतीनुसार रिकरींग खाते उघडावे. त्याला खाते उघडतानाच बचत खात्यावरून परस्पर पैसे घेण्याविषयी लेखी सुचना द्याव्यात म्हणजे बँकेत सारखे जावे लागणार नाही . रिकरींगची मुदत संपली की पैसे मुदत ठेवीत आपल्या गरजेनुसार गुंतवावेत . बचतीसाठी चिकाटी हवी . आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबातील सुसंवाद , विश्वास व एकमेकाप्रती आदर भावना असायला हवी . नसल्यास ती तयार करण्यातच आपल कौशल्य आहे .

ज्या प्रमाणे ठेवीची आपण काळजी घेतली पाहीजे. त्याचबरोबर कर्जाचीपण माहिती आपल्याला हवी. गृहकर्ज , वाहनकर्ज , शैक्षणीक कर्ज , व्यावसायासाठी कर्ज या पैकी एकतरी कर्ज आपण घेतलेलं असते . त्याचे हप्ते वेळेवर भरले जातात का ? इन्शुरन्स आहे का ? याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

तात्पर्य काय जे महिला सबलीकरणाचे वारे वाहते आहे. तो उद्देश जर सफल व्हायचा असेल तर प्रत्येक महिलेने निर्णय प्रक्रियेत व आर्थिक नियोजनात सक्रिय सहभागी असायला हवे .



       ---------------------------------------------
   ------------------------------------------------------

आज 27 जुन 2014 आईचं पहिलं वर्षश्राद्ध !
काकांच ( वडिलांच ) नववं . विलक्षण योगायोग काका ज्या तिथीला आणि तारखेला गेले बरोबर आठ वर्षांनी त्याच तिथीला व त्याच तारखेला आई गेली ! त्यानिमीत्त

         भावपूर्ण श्रध्दांजली




  कै. रामचंद्र कृष्णाजी         कै. सुलभा रामचंद्र 
        कुलकर्णी                         कुलकर्णी 
जन्म 24/04/1932            जन्म 02/01/1938
मृत्यु 09/07/2005        मृत्यू  09/07/2013


दिनांक 09/07/2014

जवळेकरांची लेक झाली घेरडीकरांची सून l
आणि तीच ठरली दोन्ही घरच्या भाग्याची खूण l
करारी बाणा, ध्येयपूर्तीवर डोळा  
हृदयात मात्र सतत लोण्याचा गोळा l
भक्कम अशा वटवृक्षाबरोबर बांधली जन्माची साथ l
वेली जाऊन वृक्षाला बिलगली पण तीच झाली वृक्षाची आधारस्थंभ l
 पैशाची बेरीज-वजाबाकी तीला कधी जमलीच नाही l
पण माणसांची गोळाबेरीज वृत्ती कधी सोडली नाही l
दोघांमध्ये सोन कोण, परीस कोण 
आम्हांला कधी उमगलच नाही l
बघता बघता घर भरलं चिमण्यांनी
पण त्याची फिकीर त्यांनी कधी बाळगलीच नाही l
सतत आकाशला गवसणी घालण्याची दृष्टी l
चिमण्यांना द्यायला कधी विसरलीच नाही l
गरजूंना मदतीचा हात, निराधरांना धैर्याची साथ 
व्रतवैकल्य, नेमधर्मांनी केली जीवनाची सुरूवात l
पण माणूसकीच्या नात्याला ढळतं देत गेले माप l
अन कर्मकांडाला दिला फुलस्टॉप l
आणि म्हणुनच की काय तिथीपेक्षा एकच तारीख बरी 
काय करायचे ते तूम्हीच ठरवा म्हणुन सांगून गेली देवाघरीl
एका टप्यावरून मागे वळुन पाहिलं तर दिसल 
विचाराच्यां शिखरावर मांडलं  होत ठाण l
त्याच सस्कांरात सहाजणी वाढत गेलो घडत गेलो शिकवणीचा वसा टिपन गेलो l
शिक्षणाचा न सस्कांराचा धडा घेऊन 
जिवनाची लढाई लढायला मग सज्ज झालो l
नियतीला ते नव्हते मान्य एक वजाबाकी केलीच तिने l
संसाराच्या दरी-शिखरात एकमेकांच्या हाताची गच्च साखळी l
जावयाच्या रूपाने भेटत गेली देवमाणसं
अन भरुन काढली मुलांची पोकळी l
संकट येत गेली नेकीन मार्ग निघत गेले l
अवघड वळणाच्यां घाटाशिवाय जिवन म्हणतात काय?
आणि म्हणुनच की काय . . . . . .
संसारच्या तिन्ही सांजेला मने कातर होत गेली l
एक मडक कच्च होतं जीव त्यात गुंतला l
पण खात्री पटली मनाची ,
होते घडवलेले भक्कम स्तभं l
सस्कांराच्या शिदोरीने झोळी भरली गच्च l
फांद्याच्यांही फांद्यांना आता फुटले होते अंकुर l
समरस झाली त्यातच मग दिले सारे झुगारुन l
सस्कांराचे न माणुसकीचे पुन्हा घेतले धडे गिरवून l
संसारच्या पाशातून मग स्वत:ला केल एकदम मुक्त l
तो कणखरपणा पाहून आम्ही सारे झालो थक्क 
भागवत वाचता वाचता भागवतमय होऊन गेली 
जिवनाचे मग कळाले सार . . . . . 
तिच्या बुध्दीला पोहोचेना मग कोणाचाच हात आणि 
एक दिवस अचानक मग जिवनज्योत झाली शांत . . . . .
ईश्वराचरणी ठेऊनी माथा l
मागतो आम्ही जन्मो जन्मी दे हेच मातापीता l




    ---------------------------------------------- 
   -------------------------------------------------




19 जुलै 2014 रोजी बँक राष्ट्रीयकरणाला 45 वर्ष पुर्ण होत आहेत . त्यानिमीत्त लिहिलेला लेख . 



राष्ट्रीयकृत बँकांचे संवर्धन ही समाजाची  नैतिक जबाबदारी !!



         भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर पाहिला तर हे लक्षात येते की , ज्यांना पारतंत्र्याची चीड होती , झळ बसली त्यांनी स्वत:चं आयुष्य पणाला लावलं , बलिदान दिलं आणि येणाऱ्या पिढीच्या पदरात स्वातंत्र्य टाकलं आणि आज या स्वातंत्र्याची एवढी ग्लानी आलीय की आसपास काय घडतंय याचं काहीही देणघेण नसल्याप्रमाणे जर आपण डोळ्यावर झापडं ओढून घेतली तर आपण आर्थिक पारतंत्र्यात केव्हा अन कसे गेलो याचा पत्ता सुध्दा लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक क्षेत्रात काय घडतंय याचा प्रत्येकांनी बारकाईने मागोवा घेण्याची वेळ आहे . वरकरणी भासवल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन कारणमिमांसा शोधली पाहिजे याचंच मर्म सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

आज राष्ट्रीयकृत बँकांच अस्तित्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जेवढ महत्वाच आहे त्याहीपेक्षा जास्त सामान्य जनतेसाठी आहे. आजही भारतातील 70%  जनता ही ग्रामीण भागात राहते की ज्याठिकाणी आठदहा तास लाईट नसते . चारचार दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागते पण याठिकाणी गॅसची सबसीडी असो , स्कॉलरशीप असो , किंवा सरकारने जाहिर केलेली गारपीटग्रस्तांना मदत असो ती सुखसोयीने नव्हे तर अत्याधुनीक सोयी आणि सुविधा तातडीने कशी पुरवली जईल यावर राष्ट्रीयकृत बँकांकडून भर दिला जातो . कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल जातं .

स्वातंत्र्योत्तर काळात आपला देश स्वातंत्र्य , समता , बंधुता या लोकशाहीच्या तत्वांनी पेटून उठला होता . विकासाला चालना मिळावी यासाठी विवीध प्रयत्न केले गेले . पायाभूत व मुलभूत उद्योगांना जाणीवपुर्वक चालना देणे हा त्याचाच एक भाग होता. आणि यामध्ये वित्तीय संस्थांचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरत गेला . या महत्वपूर्ण उद्योगावर जनतेची मालकी व नियंत्रण असलं पाहीजे म्हणून बँकीग उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. जनतेचा पैसा हा त्याताला गाभा होता . त्यानंतरच विस्तारीत स्वरूपात बँकांचं जाळं पसरण्यात आल. खेड्यापाड्यात आणि तळागाळातल्या जनतेपर्यंत बँकांमार्फत सरकारी योजना पोहचवण्यात यश आलेल आहे.

गेल्या 45 वर्षांपासून आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बँकानी कृषी , औद्योगीक , पायाभूत सुविधांच्या विकासात बहुमोल कार्य केलेले आहे देशाला विकासाच्या दिशेने नेण्यात बँकानी योगदान दिले आहे . देशातील बेरोजगार , सामान्य जनता , गरीब कष्टकरी , शेतकरी , शेतमजूर यांना कर्जरूपांने भांडवल उपलब्ध करत त्यांना स्वावलंबी बनवीले आहे . यातूनच कोट्यावधी रूपयांच्या ठेवी सर्वसामान्य जनतेकडून गोळा झाल्या आहेत त्याची जपणूक या राष्ट्रीयकृत बँकामार्फत होते . कमीतकमी खर्चात बँकीग सेवा सुविधा पुरवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न असतो . बँक खातं असण हा प्रत्येक नागरीकाचा मूलभूत अधिकार हे फक्त आणि फक्त राष्ट्रीयकृत बँकच करू शकते. कारण शुन्य रूपयाच्या खात्याची सेवा द्यायला सरकारी मालकी असणं हा एकच उपाय आहे.

पण आज या राष्ट्रीयकृत बँकांना मोठया संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या अस्त‍ित्वाला धोका पोहोचवण्याचा घाट घातला जात आहे. बँकांना नाडलं जात आहे . बुडीत कर्ज हा बँकिंगमधील अविभाज्य घटक आहे . मोठमोठ्या उद्योगातील कर्जदारांनी बँकाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायची त्याची परतफेड करायची नाही व ती कर्जे अनुत्पादक संपत्ती मध्ये ( एन पी ए ) न्यायाची व बुडीत कर्जाच्या तरतुदीद्वारे त्यातुन सुटका करुन घ्यायची आज सार्वजनीक क्षेत्रातील बँकामधून बुडीत व थकीत कर्जाच्या रकमा धोकादायक पध्दतीने वाढत आहेत. ज्याप्रमाणात बुडीत कर्ज वाढते त्याचप्रमाणात बँकेने कमावलेल्या नफ्यातून त्याची तरतूद केली जाते . परीणामी बँकेचा निव्व्ळ नफा घटतो आहे त्यावर ताण येतो आहे.

एनपीए ची तरतूद करणे , निकाली काढणे , सुट देणे , हक्क् सोडणे , एकरकमी तडजोड इ. मार्गाने ही बुडीत कर्जे लपविली जातत. थकित कर्जांची पुनर्रचना केली जातेय आजचा धोका उद्यावर ढकलला जातोय. कर्जादार बँका राजकीय व्यवस्था यांच्यात स्पष्ट  हितसंबंध आहेत. या बुडीत आणि थकीत कर्जाचं प्रमाण इतकं लक्षणीय वाढतेय की त्यासाठी पुरेशी तरतुद करण्यास बँका असमर्थ ठरतात. म्हणजे कर्ज तोट्याच्या जोखमीप्रती बँका अधिक असुरक्षीत व सहजी बळी पडणाऱ्या  ठरत आहेत कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ही परीस्थीती निर्माण होतेय . 2008 च्या तुलनेत 2013 ची आकडेवारी दुप्प्ट झाली आहे . याच्यावर वेळीच पाऊल उचलण्याची गरज आज निर्माण झाली आहे .

आता वेळ आली आहे की मोठमोठ्या उद्योजकांकडून सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लूट उघडकीस आणणे व वसुल करणे यासाठी उपाययोजना करणे तरच बँकांचे कंबरडे मोडणार नाही या धनदांडग्या कर्जदारांकडून बँकांची येणी वसुल करण्यासाठी मोठया थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करणे , जाणून बुजून कर्ज थकविणे हा फौजदारी गुन्हा ठरवणे , हितसंबंध व संगनमतांची चौकशी करणे , कर्जवसुलीसाठी कायद्यात सुधारण व कडक उपायायोजना करणे ही काळाची गरज आहे . हे चित्र सर्वसामान्य जनतेपर्यंत यायला पाहिजे पण हे करायचे सोयीस्कररीत्या टाळून बँकामध्ये सुधार आणण्याच्या नावाखाली जनताद्रोही धोरणांचा समावेश असलेली बीले पास करणे , बँकींग उद्योगात प्रतिगामी बदल घडवून आणण्यासाठी बँकींग नियमन कायदा 1989  व बँकीग उद्योगाशी निगडीत असलेल्या कायद्यात बदल घडवून आणला आहे . की ज्याआधारे परदेशातील बुडीत बँकाना भारतातील राष्ट्रीयकृत बँका विकत घेणे सुलभ होणार आहे. थकित कर्जदारांच्या रकमा शेअर्समध्ये कन्व्हर्ट करायच्या देशाची आर्थिक निती सामान्य जनतेला हितेषी न ठेवता जागतीक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या बलाढ्य परकीयांना थेट गुंतवणुकीला आमंत्रण म्हणजे आपल्या देशवासीयांना आर्थिक पारतंत्र्यात ढकलण्याची कृती होत आहे . आणी याच्यावर मात करण्याचा प्रयत्न कर्मचारी संघघटनांना करावा लागणार आहे. 

बँकीग क्षेत्रातील सर्वच संघटना या सर्व गोष्टींचा डोळसपणे अभ्यास करतात . एआयबीईए  ही बँकीग क्षेत्रातील सामाजीक बांधालकीचं भान ठेवणारी बलाढय संघटना आहे जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी असून खाजगी नफेखोरी किंवा लुटीसाठी नाही आणि बँक खातं असण हा प्रत्येक नागरीकाचा मुलभूत अधिकार आहे. या प्रमुख उद्दीष्टासह अत्यंत सक्षम समाजाभिमुख बँकिग क्षेत्रासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी येत्या काळात ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. यातूनच संप आंदोलने यासारख्या कृती होणार . यातून आपले पितळ उघडे होणार हे या धनदांडग्यांना सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते त्यामुळे मुळ प्रश्नाकडे बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे सर्व बाजू सामान्यापर्यंत पाहचू नयेत या उद्देशाने संपामुळे किती हाल झाले. आर्थिक व्यवाहर कोलमडले , मोर्चामुळे वाहतूक कशी खोळांबली , याचाच बाऊ केला जातो आणि सत्य समोर यायला अडथळे निर्माण केले जातात. 

पण प्रसारमाध्यमं ही सत्याचा आरसा जनतेला दाखवण्याचं जालीम माध्यम आहे त्यामुळे बँकाची केली जाणारी नडवणुक, सामान्य जनतेची होणारी दिशाभूल व धनदांडग्याचा लुटारुपणाचा पडदा फाडण्याचे काम ताबडतोबीने करायला हवे. राष्ट्रीय बँका ही राष्ट्रीय संपत्ती आहे . तीचं आपल्या स्वत:साठी संर्वधन करण ही समाजाची नैतिक जबबादारी आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी संघटनेच्या माध्यमातून या कृती होतील त्या त्यावेळी या लढयाला सर्वानी पाठींबा देणं गरजेच आहे आणि आर्थिक पारतत्र्यांत जाण्यापासून समाजाने बँकाना वाचवायला हव. हेच सुज्ञपणाच लक्षण आहे. .


  ----------------------------------------------------

       --------------------------------------------

                  2015


संघटनेच्या प्रेरणेमुळे कार्यकर्त्यांसोबत सामाजीक सहलीचा अनुभव घेता आला . त्याचं शब्दांकन करण्याचा हा प्रयत्न 


दिनांक 19/8/2015


हेमलकसा – लोकबिरादरी प्रकल्प सहल
युनियनने राबविलेला एक अविस्मरणीय उपक्रम



ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाईज युनियन औरंगाबाद युनिटने आनंदवन – हेमलकसा या ठिकाणी कार्यकर्ते व सभासदांसाठी एक सोशल टुर आयोजित करावी असा विषय झाला आणि कॉ. देविदास तुळजापूरकर व कॉ धनंजय कुलकर्णी यांच्या प्रेरणेने 15/08/2015 ते 18/08/2015 अशी ही अविस्मरणीय सहल नवे जुने मिळून पस्तीस जणांना प्रत्यक्षात अनुभवता आली .

सर्वप्रथम सकाळी सात वाजता लातूरहून गाडी निघाली 15 ऑगस्ट असल्यामुळे झेंडावंदन व्हायलाच हवे अस सर्वांनाच वाटत होत त्याप्रमाणे रस्त्यावरील एका खेड्यातील शाळेत 8 वाजता झेंडावंदन होणार होतं तेथे गाडी थांबली व सर्वजण शाळेत गेलो . त्या शाळेत महिलाराज होतं . अतिशय ऊत्साहात व सुबकपणे सर्व कार्यक्रमाची आखणी झालेली दिसत होती . तिसरी व चौथीच्या मुलांच्या रांगा उभ्या होत्या . त्याच्याशेजारी आमची रांग उभी राहिली . शाळेच्या आठवणीत रमत झेंडावंदन झाले . अशी दिवसाची छानशी सुरूवात करुन आम्ही पुढील प्रवासाला रवाना झालो . गप्पा , गाणी , भेंड्या आणि रस्त्यात थांबून वनभोजन याचा स्वाद घेत आम्ही रात्री साडेदहाला आनंदवनला पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने आमचा टूर सुरू झाला होता .

बाबा आमटे , साधनाताई व त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन सामील झालेले शेकडो कार्यकर्ते या सर्वांच्या प्रयत्नाने माळरानावर फुललेल्या आनंदवनात आम्ही दाखल झालो होतो . तेथे पोहोचल्यापासूनच तिथली शिस्त , व्यवस्था , निटनेटकेपणा , स्वावलंबन निदर्शनास येत होते . बँकेकडून एलएफसी घेऊन रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यात , लक्झरीने  , विमानाने प्रवास करून अनेक सहली व निसर्गसौंदर्याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असला तरी माणूसकीच वेगळच विश्व पहायला , अनुभवायला मिळणार होतं . हे काही एकदोन माणसांच किंवा दोनचार वर्षात साध्य झालेल कार्य नव्हते . यासाठी आमटे कुटुंबाची तिसरी पीढी सध्या काम करताना अन  चौथी तयार होताना दिसतेय .

समाजाने अन कुटुंबाने नाकारलेल्या उपेक्षीतांना त्यांचा  आत्मविश्वास मिळवून देत सन्मानाने जगण्याची ताकद , शक्ती देण्याच काम बाबांनी सुरू केल्यापासून अव्याहतपणे चालू आहे . आज ती धुरा डॉ विकास व डॉ भारती आमटे सांभाळत आहेत . कुष्ठरोगीश , क्षयरोगी , अंध , मुकबधीर , अपंग अशी अनेकप्रकारे समाजात उपेक्षीत राहिलेले लोकं येथे दाखल होतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते ,  जगण्याच भान मिळतं . आणि हे जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो तेव्हा असं वाटलं की परमेश्वरांने आपल्याला किती भरभरुन दिल आहे . तरी आपल्याला काय काय होतं . किती दु:ख , कष्ट होतात नैराश्य येतं याची लाज वाटू लागते अत्यंत चाकोरीध्द सुरक्षीत कवचात आपल्याला जगण्याची सवय झाली आहे ते थोडही तोडायची आपली तयारी नसते . शकुंतला बारंगे या हसतमुख महिलेला पाहिल तर निशब्द व्हायला होतं जगात यापेक्षा काही अवघड असू शकत नाही . ज्यांच्यापुढे अडचणींचे डोंगर असतील त्यांनी या शकुंतलेची आवश्य भेट घ्यावी.

आनंदवनमधे जे लोक दाखल होतात त्यांना प्रथम औषधोपचार केले जातात ( पुर्वी बाबांनी या लोकांना गोळा केले होते ) व नंतर त्यांच पुनर्वसन केले जाते . ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम दिले जाते . त्यातूनच अर्थार्जन होते . व सुंदर कलाकृती उदयास आलेल्या दिसतात . ग्रीटींग्ज , शोभेच्या वस्तु , काष्ठशिल्प , सुतकताई , सतरंजी पट्ट्या , खुर्च्या , शेती , असे एक ना दोन 26 कुटीरोद्योग व अनेक व्यवसाय चालतात . आमटे कुटूंब जणू देवाचं आर्ध राहिलेल काम करत आहेत . माणसांना पुर्णत्व दिलं जातंय . हे सर्व पाहिल्यावर आम्ही हेमलकशाला रवाना होणार होतो . आजचा एक मुक्काम इथे होणं गरजेच होतं पण वेळेअभावी ते शक्य होणार नव्हते . म्हणून माणुसकीची भली मोठी शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना झालो .

आयुष्यात आतापर्यंत केलेले प्रवास आणि आनंदवन ते हेमलकसा हा प्रवास यात खुप फरक आहे . पूर आलेल्या नद्या ओढे पार करत जंगलातून रस्ता होता नक्षलवाद्ंयाचे राज्य असलेला तो भाग आहे . पावसाळ्याचे दिवस आणि दोनच दिवसांपुर्वी पाऊस पडल्यामुळे पुलांवरून भरभरुन वाहणाऱ्या नद्या त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तर पुरात अडकण्याची भीती ! पण कॉ धनंजय कुलकर्णी यांचा धाडसी निर्णय आणि सर्वांची इच्छाशक्ती यामुळे यातून तरुन निघालो. आनंदवनहून निघताना निरोप आला की  सातच्या आत हेमलकशाला पोहोचणार असाल तर या नसल्यास येऊ नका ! यावरुनच तिथल्या शिस्तीचा आंदाज येत होता. आम्ही पुलावरच पाणी पार करत सव्वासहाला हेमलकशात दाखल झालो (गाडीत बसुन) . इथे कसे आहे याची सर्वांनाच उत्सुकता होती . घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिथलं नियोजन होतं . संध्याकाळी सात वाजता जेवणाची घंटा व जेवणे झाली . इथे विद्यार्थी , कार्यकर्ते , प्रवासी अन ते या सर्वांच अन्न एकाच ठिकाणी केले जातं . पावणेआठला  डॉक्युमेंटरी पहायला मिळाली एकूण प्रकल्पाची माहिती देण्याचा तो प्रयत्न आहे . व दुसऱ्या दिवसाचं नियोजनही याच ठिकाणी सांगितल गेलं . सकाळी सातला नाष्टा व त्यानंतर आमटे दापंत्याची भेट ठरली !

आमच्याबरोबर निम्म्याला निम्मे युवा कार्यकर्ते होते उत्सुकतेपोटी सर्वजण सकाळी सहा वाजताच आवरुन तयार झाल्याचे दिसत होते . पहिल्यांदा आम्हांला आमटे दांपत्य फिरायला बाहेर पडताना दिसले . त्यांची चाल पाहुनच त्यांचा देह किती कष्ट सोसून तयार झाला आहे हे जाणवत होते . सहज फेरफटका मारला तर उंच कुत्रे दिसले म्हणुन त्याच्याकडे हात केला तर ते अंगावर दोन पाय ठेऊन उभे राहिले तुम्ही प्रेमाने कुरवाळले पाहिजे ही त्याची हक्काची मागणी होती . संपुर्ण परिसरात तीन वर्ष वयापासून ते  बारावी पर्यंतची मुले सकाळचं सगळं आवरुन बागडतांना दिसत होती . त्यांच रुटीन ठरलेल होतं . त्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम चाले . तिथे विश्वासाने आईवडिलांनी आपल्या मुलांना सोडलेले दिसत होते . सब घोडे बारा टक्के याप्रमाणे वागणूक होती मुले इथे मुक्तपणे बागडतांना दिसत होती . त्यानंतर आम्हाला विलास मनोहरांची ओझरती भेट झाली . आणि रेणूका मनोहर हे अत्यंत प्रसन्न व्यक्तीमत्व आम्हाला भेटल . त्यांच्याशी खुप मनमोकळ्या गप्पा झाल्या . 

रेणूका म्हणजे डॉ. प्रकाश यांची बहीण त्या इतक्या भरभरुन बोलत होत्या . चाळीस वर्षापुर्वीचे अनुभव आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळाले . त्या अगदी सहजपणे आणि वारंवार सांगत होत्या की आल्या थोड्याशा अडचणी पण काही नाही एकदम छान होत गेलं सगळं . त्या जी अडचण एकदम छोटी म्हणुन सांगत होत्या तो अनुभव मला तरी मोठ्या डोंगराएवढी अडचण आहे असे वाटत होते . पण त्यांनी ते सहजतेने स्वीकारलेले व्रत होते आश्रमशाळेतील मुलांकडे लक्ष कसले त्यांना घडवण्याचा वसा त्यांनी घेतला आहे . लहान मुलांची नखे कापणे , केस कापणे त्यांना स्वच्छता कशी ठेवली पाहिजे हे रोज सांगत त्यांच्याकडून करुन घेणे , बारीक बारीक गोष्टी सातत्याने संस्कारातून शिस्त लावत शिकवत राहणे याचा त्यांनी वसा घेतला आहे . त्या अनंत मुलांची माता आहेत .

आम्ही सर्वजण डॉ. दांपत्याची वाट पाहत होतो . प्रथम त्यांनी सगळ्यांची ओळख करुन घेतली महाबँकेचे इतके लोक विविध ठिकाणाहून कसे काय आले याविषयी पण त्यांना उत्सुकता वाटली . कॉ. धनंजय यांनी संघटनेची भुमीका स्पष्ट केली बऱ्याच जणांनी आपले प्रश्न विचारले . आदिवासींना आपलसं करताना मीठ , रॉकेल या दैनंदीन आवश्यक गोष्टींची उपलब्धी कशी करून दिली त्या मिळवतांना त्यांच्या भावना  कशा होत्या हेही सांगितले . आदिवासी लोक किती सोशिक आहेत . तसेच त्यांच्याकडे मुलगा-मुलगी हा फरक केला जात नाही . आपण शिक्षणामुळे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा तो आपल्याकडे होत असलेला गैरवापर आहे असे त्यांचे मत आहे. एक तास गप्पांमधे कसा गेला समजले पण नाही . यानंतर डॉ. चा जगावेगळा राऊंड पहायला मिळाला कारण आतापर्यंत मी नातेवाईक अजारी असताना फक्त टेंन्शनमधील राऊंड पाहिलेला पण हा राऊंड म्हणजे विलक्षण होता . डॉ. चे प्राणीप्रेम अफलातून आहे . वाघ, अस्वल, मगर , साळीदंर , वेगवेगळ्या जातीचे साप , नाग , हरणे , निलगाय आणखी अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी सगळेजण त्यांच्या भेटीची अतुरतेने वाट पहात असतात . जणू त्यांनी प्रेमाने कुरवाळणे हा या सर्वांचा हक्कच आहे हे त्यांच्या कृतीतून जाणवत होते . कशाचीच कुठेच तुलना होऊ शकत नाव्हती .

त्यानंतर आमच्याबरोबर जगनभाऊ आले . हेमलकशाला आल्यापासून आदिवासींचे जिवन कसे होते . उंदीर ,  मुंग्या , पक्षी , कंदरमुळे हे खाद्य आणि लज्जारक्षणपुरता कपड्यांचा वापर याच्यात परिवर्तन घडवत आज त्यांना माणसात आणण्यासाठी त्यांची मुले शाळेत पाठवा म्हणून मागे लागण्याचे दिवस आज आमची मुले शाळेत घ्या या मन:स्थितीपर्यंत पोहोचायला त्यांच्या टीमला चाळीस वर्षे कशी घालवावी लागली किती कष्ट , प्रयत्न , यातना सोसाव्या लागल्या हे हसतमुखाने सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते . आश्रमशाळा होस्टेल या सर्व गोष्टी ते कौतुकाने दाखवत होते . रेणूताई , मंदाताई , फडणवीस आज्जी , विलास मनोहर , जगनभाऊ , प्रकाशभाऊ या सगळ्यांना प्रत्यक्ष भेटता आलं बोलता आलं सगळ्यांच्या बाबतीत एक समान गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळ्यांनी साठी ओलांडली आहे पण प्रचंड कष्ट केल्यामुळे , प्रत्येक गोष्ट होकारार्थी घेत गेल्यामुळे  पंचवीशीतील तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि तगडेपणा त्यांच्यात दिसून येतो . नकार , यातना , कष्ट , त्रास , दु:ख हे शब्द त्यांनी जाणिवपुर्वक त्यांच्या जिवनातून काढून टाकले आहेतष . डॉ. प्रकाश आमटेंनी ही गोष्ट आवर्जुन सांगीतली की कोणतीही कुरकुर न करता मंदाताईंची साथ आणि सगळ्या कर्यकर्त्यांची तितकीच साथ यामुळे आज इथपर्यंत येऊन पोहचलो . डॉ. प्रकाश आमटेंनी ही गोष्ट आवर्जुन सांगीतली की कोणतीही कुरकुर न करता मंदाताईंची साथ आणि सगळ्या कर्यकर्त्यांची तितकीच साथ यामुळे आज इथपर्यंत येऊन पोहचलो . त्यांनी हेही आवर्जून सांगितले की मंदाताई या वयाने दोन वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणजे हेही प्रवाहाच्या विरुद्ध उचलेले पाऊल होते कारण सामान्यपणे नवऱ्यापेक्षा लहान बायको करण्याचा प्रघात आहे , पण जे स्वीकारलंय ते आनंदाने पार पाडायचे व्रत आहे त्यांचे .

    आनंदवनाच्या पुढचं पाऊल म्हणजे बाबांनी सुरु केलेला हा हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्प आहे . तो हसतहसत डॉ प्रकाश आमटेंनी आपल्या शिरावर घेतला . तेवढ्याच आनंदाने त्यांची पुढची पीढी त्यात सामिल झालीय . आणि आता नातवंडं पण प्राण्याच्या प्रेमात पडताना दिसत आहे . आमटे घराण्यांनी हे व्रतच घेतल आहे धुरा अलगदपणे एकाच्या खांद्यावरुन दुसऱ्याच्या खांद्यावर जातेय . सुन डॉ. अनघाची गळ्यात पिशवी घालून प्लॅस्टीक गोळा करण्याची कृती ! काय म्हणयच याला . विशेष म्हणजे याचा कुठेही गाजावाजा नाही , प्रसिद्धी नाही , जाहिरात नाही तुम्ही आपणहून पहायला गेलात तर तुम्हाला महिती मिळते .  माणसातला देव पहायला मिळतात . अन्यथा नाही .

आज आपल्या देशात राजकारण-भ्रष्टाचार याच साटलोट दिसत . त्याठिकाणी घराणेशाही दिसते . बिनबोभाटपणे सत्ता आणि संपत्ती वारसा हक्कांने मिळविली जाते . पण अशा सामाजिक उपक्रमांविषयी तितकीशी अस्था दाखविली जात नाही . याचं कोणी अनुकरण करायला धजत नाही . याला काय म्हणावे ? आज हे आम्हाला पहायला मिळालं ते संघटना आणि जनरल सेक्रटरी कॉ धनंजय कुलकर्णी यांची तळमळ ! आता काय करायच हे ठरवण्याची जबाबदारी बाकी चौतिस जणांची उरते.

आज याठिकाणी काम करत असतांना डॉ प्रकाश आमटे चार पिढ्या मागचं जिवन प्रत्यक्षात जगले म्हणजे लाईट , पाणी , रस्ते नाहीत जात्यावर दळणे , चालत जाणे , पडेल ते काम करणे अणि हे करत असतांना आदिवासींनी मात्र दोन पिढ्या पुढचं शिक्षण देणे म्हणजे हे लोक एका पिढीत सहा पिढ्यांची जिवन जगले असं म्हणाव लागेल . त्यांना शतश: प्रणाम !

मला या दोनतीन दिवसांचा विचार केला तर एका गोष्टीच साधर्म्य जाणवल ते म्हणजे समाजातील उपेक्षीतांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अस्वस्थ होउन ध्येयाने पछाडून बाबांनी या उपक्रमाला सुरुवात केली आदिवासींना 

" बाबांनो लांब पळू नका हे घ्या हे तुमच्या कल्याणासठी आहे  " असे म्हणत लांब लांब पळणारांना अडवुन त्यांच कल्याण करुन देणं यात यांच्या चार पिढ्या गेल्या . आणि 1946 च्या पुर्वीपासुन अपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी अन्यायाची चीड येऊन कष्ट आणि संघर्षमय जिवन जगत बलाढ्य संघटना आपल्यासाठी निर्माण करून ठेवली . एक एक करत आपले सर्व प्रश्न मार्गी लावले , सेवा शर्ती सेट करून दिल्या . सुखकारक जिवन आपल्या वाट्याला आणुन ठेवलंय आणि म्हणूनच की काय संघटनेच्या उपक्रमांकडे पहातांना एक प्रकारचं शैथील्य आले आहे . आदिवासींप्रमाणे लांब लांब पळतो . संघटनेची वर्गणी भरली की आपलं काम संपत नाही . आपण सुज्ञपणे आपल्या पुर्वेतिहासात डोकावायला हव . गाफिल राहिलो तर हल्ला होणार ही खुणगाठ जरी आपण आपल्या मनात बांधली तरी खुप आहे . आपल देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे कारण देशकारण आणि अर्थकारण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत . आपण संघटना जो उपक्रम राबवेल त्यात सक्रीयपणे सहभागी व्हायला पाहिजे . तर आणि तरच आपले भविष्य उज्वल आहे . सध्या जी नेते मंडळी काम करते त्यांना पुढची फळी तयार व्हायला हवी आहे . काही उपक्रम राबवायचे असतील तर ते अंमलात येईपर्यंत त्यांची नको इतकी क्रयशक्ती वाया जाते . सध्या सिनियर्स आहेत तोपर्यंत धावून नवीन पिढींने काम करायला हवं . शिकुन घ्यायला हवं . या टुरला बरीच नवीन मंडळी आली होती . त्यातल्या प्रत्येकाने किमान पाच  जणापर्यंत जरी हे सर्व पोहोचवल तर कॉ धनंजय कुलकर्णी यांची या सहलीची धडपड यशस्वी झाली असे मी म्हणेन.

हेमलकशाहून परत निघतानाच हा सगळा अनुभव मी लिहुन ठेवण्याचा निश्चय केला होता कारण भविष्यात कधी जर आपल्याला काही समस्या किंवा नैराश्य आलं आहे असे जाणवलं तर हे वचालं तर नक्की त्यातून बाहेर पडू किंवा आपल्या बैंक कर्मचाऱ्यांना वयाच्या चाळीसीनंतर बीपी, शुगर , मणकेदुखी इ व्याधी ग्रस्त करतात त्यावेळी त्यांनी या प्रकल्पांविषयीची पुस्तके समिधा , प्रकाशवाटा , आनंदवन प्रयोगवन वाचण्यास सांगावे की जेणेकरुन बाबंनी आणि सर्व कुटुंबीयांनी त्यांच्या दुर्धर आजारावर आणि वेळोवेळी घडलेल्या प्राण घातक हल्यांवर कशी मात केली हे वाचून तरी आपण आपल्या कोशातून बाहेर पडू असा विश्वास वाटतो. पुनश्च एकवेळ संघटना , कॉ. देविदास तूळजापूरकर , कॉ. धनंजय कुलकर्णी ही ट्रीप मॅनेज करणारे काॕ. दिपक माने , कॉ. उदय मोरे आणि सर्व सहभागींचे आभार व अभिनंदन !  पुनश्च अशाच एखाद्या ट्रीपच्या प्रतिक्षेत ! धन्यवाद !




      ----------------------------------------------

     -----------------------------------------------      


                 2016


        संघटनेत उमेन कौन्सिलची अध्यक्ष आणि कन्व्हेनर या पदावर काम करतांना दरवर्षी महिलादिनाचं आयोजन केलं जायचं . त्यानुषंगाने माहिती गोळा करणे , चर्चा करणे हे अगदी व्हायचंच आणि विषय डोक्यात घोळत रहायचा . पुन्हा निर्भयाचा विचार मनात घोळतच होता . मग अब्राहम लिंकन यांनी मुलाच्या मास्तरास तळमळीने लिहिलेलं पत्र खूपदा वाचलेलं होतं त्याच धर्तीवर निर्भयाचं किशोरवयीन पिढीला आवाहन या पत्रातून व्यक्त करण्याचा प्रयत्न !



निर्भयाचे कुमारवयीन समाजास  पत्र


आज जरी तुम्ही शाळेत जाणारे , असलात बालक

तरी उद्या होतालच की तुम्ही , सुजाण पालक

होय रे बाळांनो , चुक पिढ्यान पिढ्याची झालीय


लहानपणापासून खास अशी विचारांची बाळगुटी , द्यायची राहूनच गेली


आख्खं आयुष्य गेलं , ही विचारांची बाळगुटी जमवायला


आता मात्र वारसाहक्कानं वेळेतच ती तुमच्या स्वाधीन करतेय


जरा उशीरच झालाय , माहितीय मला 

मला हेही माहितीय  की , घालमेल चाललीय तुमची 

काय घडतंय आजूबाजूला 


आणि तुम्हांला कावरंबावरं होतांना पण पहातेय मी 


तुमची ही संभ्रमीत अवस्था होण्यास , खरंतर रुढीच आहे जबाबदार

म्हणूनच वेळेत सावध करतेय तुम्हांला 


तुमचं बाळ जन्माला आलं न ,

की लगेचच त्याला ही बाळगुटी द्या

म्हणजे सुदृढ विचारांच , गुटगूटीत संस्काराच ,

ते मुल मोठं केल्याचा 

आभिमान वाटेल तुला


जमलं तर हेही कर

त्याला समजायला लागल्यापासूनच सांगत रहा


तू एक मनुष्य जातीच्या वेलीवर उमललेलं फूल आहेस म्हणून , 

स्त्री आणि पुरुष ,  ही तर निसर्गाची देण आहे म्हणावं 

निसर्गाचा समतोल राखाण्यासाठी ,  विज्ञानयुगातसुद्धा 

त्याची उत्पत्ती , निसर्गच करतो म्हणावं 


तू त्याला धक्कासुद्धा लावू नकोस

असं ठसवंच त्याच्या मनावर


खेळायची आणि हसायची जेवढी मोकळीक देशील

तेवढंच मनसोक्त रडू देत जा त्याला

मुलींसारख मुळूमुळू रडू नकोस , 

असं म्हणत विषमतेच्या बिजाची पेरणी करायची चूक नको करुस


फुकटच्या पुरुषी विषवल्ली फोफावायला , खतपाणी घालायची पण चूक करायचं कटाक्षांन टाळ


एकएक करत , मुलींभोवती बंधनाचा गोफ विणायची अजिबात चूक करु नकोस ,

होऊदे मुक्तपणे बाळं तुझी मोठी


तुझ्या बाळाला तू , स्त्रीकडे आदराने बघण्याच्या दृष्टीकोनाच्या गुटीचा घुटका देशील ना 

तेव्हा , मोकळा श्वास घेतल्याचा भास होईल तुला


सध्याच्या बरबटलेल्या मानसिकतेतून , ओरबाडणाऱ्याच्या तावडीतून , येणाऱ्या पिढीला मुक्त केल्याचा विश्वास वाटेल तुला 


त्याला सांग , तुला आई आहे , बहिण आहे , आजूबाजूच्या मुलीबाळींचा सन्मान राख म्हणावं .


तुझं बाळ कोणीही असूदे , मुलगा किंवा मुलगी

प्रेम , माया , शिक्षण , संस्कार 

वाटण्यासाठी दोघांसाठी एकच माप ठेव म्हणावं 


आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे होऊदे शिक्षणाचे लोकशाहीकरण

आणि होऊदे

सावित्रीच्या पाठी उभे रहाणारे जोतिबा घरोघरी तयार


अंधानुकरणाच्या खोट्या खोट्या दुनियेत फार रमू नकोस म्हणावं

आयुष्यातील महत्त्वाचा वेळ तिथे वायाच जातो म्हणून समजून सांग त्याला


आपल्या देशात मोठमोठे साहित्यीक , समाजसुधारक , क्रांतिकारक , विचारवंत होऊन गेलेत , त्यांची ओळख करुन द्यायला त्यांना वाचायला भाग पाड त्याला .

          --------------------------------------- 

       ---------------------------------------------



आॕक्टोबर 2016 मध्ये बार्शीचे सुपुत्र असलेले शाहिर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पुर्ततेनिमीत्त आयटक आॕफिसला कवीसंम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते अनेक कवींनी याठिकाणी उपस्थिती लावली होती . त्याठिकाणी मी लिहिलेली व वाचन केलेली कविता .

 


     मुक्तता आणि व्यथा


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक 

देईल का मग उत्तर त्याच तुमच्यापैकी कोणी एक II धृ II

 

रुप माझं मोलकरणीचं, कष्टकरी शेतकरणीच

गणित सारखं आखत आसते उत्तरी मेळाचं

दिवसं-दिवस , महिनोंमहींने सरलं सारं वर्ष

तरी का मग सुटत नाही गणित हे मेळाचं

बेरीज कमी अन वजाच जास्त पारड का नाही समतोलाच 

हसत हसत स्वागत करते येणाऱ्या  प्रत्येक दिवसाचं

मग आत्महत्या न दारु-जुगार हत्यार का या पुरुषांच II 1 II


मी बाई पडले पांढरपेशी , कशाला करु कोणाची चौकशी

उतणार नाही मातणार नाही घेतला तसा टाकणार नाही 

सणवार , व्रतवैकल्ये नेमान मी करतच राहीन

मी केलं ते तू पण कर म्हणत पुढच्या पिढीला रेटतच राहीन 

सवाल येतो काय कमी आहे तुला या भरल्या संसारी 

पण सन्मान माझा कुठे गेलाय ? मन आक्रांदतय उरी II 2 II


एकविसाव्या शतकात म्हणे स्त्री स्वतंत्र झाली

करीयरच्या नावाखाली तिला कवाडं मुक्त केली

का एकटीच अडकतीय ती नोकरी-रिवाजाच्या जोखाडात घट्ट

का मग बांधलाय गळ्यात तिच्या कासरा बंधनाच घट्ट

अखीव परिघातच राहून तिने हुंदडायच म्हणे मुक्त 

नभी उंच भरारी घेत तिने का पाळायचेत रीतीरिवाज सक्त II 3 II


जन्माआधीच मुलीच आस्तित्व नाकारणारी जात 

लेकीबाळीचं भक्ष्य करणारी लांडग्याची जात 

हुंडाबळी , शोषणकर्ती नराधमांची जात 

गल्लीपासून दिल्ली पर्यंत वय पण नं पाहणारी जात 

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जात 

कधी करणार आहोत आपण या मानसिमतेचा नि:पात II 4 II


8 मार्चच्या संघर्षदिनाला का आलाय उत्सवाचं रूप

उत्सव कसला म्हणताय त्याला आलंय बैल पोळ्याचं स्वरूप

एक दिवस करताय कौतुक घालून बेगडी झुल

चार दिवस सोहळ्याचे झाले स्थिर की पुन्हा सारे गूल 

सन्मान असावा माणसा सारखा नको मला ही नुसती झुल

राहील का मग माझ्यासाठी प्रत्येक दिन जणू उमलत फुल II 5 II


सावित्रीची लेक मी पडलेत मला प्रश्न अनेक 

देईल का मग उत्तर त्याच तुमच्यापैकी कोणी एक 

पण…………… पण…………….

सावित्रीचीच लेक मी उत्तर शोधीन नक्कीच नेक 

लढेन व्यवस्थेशी बदलून टाकीन करुन सर्वाना एक 



         ------------------------------------------                                ----------------------------------       



             2017



महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन अंतर्गत सोलापूर येथे 19 मार्च 2017 रोजी जागतिक  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमांमध्ये सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे , बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मेनेजर मृदल जोगळेकर यांचा सत्कार केला तर वंचित घटकासाठी काम करणाऱ्या सौ. अनु प्रसाद मोहीते हिला सन्मानित करण्यात आले . त्या दरम्यान या मुलीच्या  कार्याची माहिती मिळाली व तिचे भविष्यातील ठरलेले नियोजन समजले . हे ऐकत असताना ह्या कार्याची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून सर्व प्रसंग लिहून

" मिळून साऱ्याजणी " 

या मासिकात प्रसिद्धीस देण्यासाठी पाठविला होता तो फेब्रुवारी 2018 च्या अंकात छापून आला होता .



वंचितांची शाळा : एक पाऊल प्रगतीकडे

" खंरतर हा पुरस्कार नसुन ही एक जिम्मेदारी आहे की आम्ही जे काम करतो ते आणखी चांगल्या पध्दतीने व्हावं आणि अविरत व्हावं , समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करताना खऱ्या अर्थाने मन  दु:खी होतं आहे . कारण आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना एकीकडे अन्नाच्या घासासाठी कचराकुंडी हुडकणारे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे चिमुकले हात…..रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण…..भिकारी……वृध्द……माणसाला एका घासासाठी तरसावं लागतं यासारखी दुसरी शोकांतिका नाही . पण कधी कधी हे समाधान वाटतंय की या दुर्लक्षित , वंचित घटकांची आपण सेवा तरी करतोय . फार मोठ काही नका नसेना पण त्यांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न तरी करतोय . मित्रानों  हे काम कोणी एकटा करु शकत नाही यासाठी आपल्या सर्वांची मदत हवी आहे . समाजातील सर्वांनी ही आपली जिम्मेदारी आहे या दृष्टीकोनातून विचार केला तर समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही . पण आमच्यातली माणुसकी कुठेतरी संपत चालालेली दिसत आहे. तीच माणुसकी आपण जपायला हवी ".

   पंचवीस वर्ष वयाची बी ए एमएसडब्ल्यु झालेली सौ. अनु मोहीते तळमळीने व्यासपीठावर बोलत होती . निमित्त होते महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॕईज फेडरेशन महिला आघाडी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या  महिलादिनाच्या कार्यक्रमाचे ! या संघटनेच्या सोलापुरात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या महिलेला सन्मानित करायचे ठरले होते. त्यासाठी सोलापुर मधेच सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. नभा काकडे यांची मदत घेण्याचं ठरवलं . नभाला हा विषय बोलून दाखवताच तिने अनुच्या कार्याबद्दल माहिती दिली . ती ऐकून भारावून गेल्यासारख झालं आणि वाटलं ही करते ते कार्य समाजासमोर आलं पाहिजे. नभाने तिची माहिती दिली जणु सन्मान पत्रच !

      समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे हा अनुचा ध्यास ! वंचितांची शाळा " एक पाऊल प्रगतिकडे " हे तिच्या प्रकल्पाचे नाव आहे हा प्रकल्प वंचित मुलांसाठी असुन जी मुल रस्त्यावर भीक मागतात , राहायला घर नाही , जागा मिळेल तिथे त्यांचे आईवडील झोपडी बांधून रहातात . झोपड्या महापालिकेने काढा म्हणले की काढतात . फुटपाथवर राहतात . अशा मुलामुलींना शोधून एकत्र करुन शाळा चालवते . सुरूवातीला मुलांना हे विचित्र वाटायचं , ती दगड मारायची , मरामारी करायची नुसतं हसत रहायची . पण समाजाच्या मुख्य प्रवाहात या मुलांना आणायला या ध्येयाने पतीच्या सक्रीय साथीने अनु हे काम करत आहे . सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळा चालवते .

        याच प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यावर भीक मागणारे मनोरुग्ण यांनाही आधार देण्याचा हे दोघे प्रयत्न करतात . अनेक मनोरुग्णांना इस्पितळात नेणे , त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे , थंडी , ऊन , पाऊस यापासून सरंक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे ही पण कामे ही दोघे करतात . महापालिका व पोलिस खाते यांच्या सहकार्याने त्यांना सिध्देश्वर शाळेसमोरील पोलिस चौक हाच कॅम्पस शाळेसाठी मिळाला आहे तर दुसरी शाळा हैद्राबाद रोडवरील पण्याच्या टाकीजवळ आहे . उघड्यावर 

" गुरूकुल " या पध्दतीने या शाळा चालतात ती एमएसडब्ल्यु  झाली आहे याचा ती खरोखरच समाजकार्यासाठी उपयोग करते . आपल्या आसपास कुटुंबाचा भार वाहणाऱ्या  दिवसरात्र कष्ट करणाऱ्या  , रुढी परंपरांनी पिचलेल्या स्त्रीया आपण पाहतोच . पण याच स्त्रिया समाजाचाही भार वाहून , कष्ट करून रूढी परंपरांच्या बंधनाला भिरकावतात याचं एक उदाहरण म्हणजे अनु आहे . प्रसाद मोहिते याच्याशी तिने परवाच सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केलं आणि वाचलेला पैसा त्यांच्याच शाळेतील पाच मुलींच्या नावे एफडी करून ठेवले . सासरचे पहिले स्वागत आपल्या विधवा सासुच्या हातूनच झालं पाहिजे आणि आपली ओटी पण त्यांनीच भरली पाहिजे हा अनुने आग्रह धरला ! सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळचे इर्लेवाडी हे प्रसादाचे ग्रामीण भागातील गाव आहे . लोकांनी खूप विरोध केला , अशुभ होईल म्हणून भीती घातली परंतु अनुचे उत्तर होते की ज्या आईने शेतीकर्जामध्ये आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात मुलाला शिकवलं , सामाजिक संस्कार केले , मोठ केल ती प्रसादची आई माझ्यासाठी अशुभ असूच शकत नाही . उलट तिचेच आशिर्वाद माझ्यासाठी प्रथम महत्वाचे आहेत . अशी ही बंडखोर , प्रेमळ , कष्टाळु आणि समाजमन जाणणारी अनु हीचा आज आम्ही सत्कार करत आहोत . तिचा हा सत्कार समाजात तिच्यासारखे काम करणाऱ्या  तमाम महिलांच्या कार्याचा सन्मान आहे भविष्यामध्ये वंचित घटकांसाठी कायमस्वरुपी प्रकल्प उभारण्याचा मोहिते पतिपत्निचा मानस आहे . त्यास मनापासून शुभेच्छा ! 

  कार्यक्रमामध्ये आनुचा परिचय दिला आणि एकप्रकारची गंभीर शांतता पसरली होती . अंतर्मुख व्हायला होत होतं . पण अनु अगदी सहजपणे व्यासपीठावर आली व आपले अनुभव आणि अपेक्षा उकलत होती . हिच्या शाळेच्या आसपासच एक जागा आहे की ज्याठिकाणी लोक उतारे टाकतात . ती सांगत होती हिच्या शाळेतल्या मुलांना हे चांगलाच माहिती आहे आणि ते एवढ मोठ चांगल अन्न लोक उतारे म्हणून टाकतात आणि ही मुल तो उतारा घेऊन येतात आणि खातात . आनु म्हणली

" अशा आंधश्रध्दामधून जर मुलांची पोटं भरणार असतील तर त्या चाललेल्या बऱ्या ! आईवडिल मुलांना वाढवत असतांना आईवडिलांना बजेटचा कधीच प्रश्न पडत नाही पण त्याच आईवडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा बजेटचा प्रश्न कसा काय उद्भवू शकतो ? आणि वृध्दाश्रमात कसे काय चालु शकतात? माझ्या कुटुंबाच मासिक उत्पन्न रु सात असून त्यात आमच तिघांचं व्यवस्थित भागते पण लोकांना पैसे कसे काय पुरत नाहीत हे मला न उलगडलेलं कोड आहे .

     आपण रस्त्यावर भीक मागणारे लोक तसेच व्यसनाच्या आहारी गेलेले मनोरुग्ण पाहतो . पण आपण त्यांचा विचार करत नाही कारण आपण आपल्याच जीवनात इतके व्यस्त झालेले असतो की आपल्याला आसपास काय चालले आहे याच्याकडे पाहायला कुठून वेळ आणणार ? खरे तर हे लोक खूप दिवस अंघोळ करत नाहीत , स्वच्छतेची काळजी घेत नाहीत , नखे , केस न कापणे दात न घासणे भरपुर बिड्डया सिगरेट पिणे मग ही माणसं समाजातुन बाहेर फेकली जातात . त्यांच अंतर्मन जाणुन घेता आलं पाहिजे त्याचं दु:ख आपलसं करता आलं पाहिजे . तर कुठे या गोष्टी शक्य होतील . असे लोक दिसले तर त्यांना मदत जर करणे तुम्हाला जमणार नसेल तर करु नकात पण त्यांचा तिरस्कार तरी करु नकात . आम्ही अशाच लोकांसाठी काम करतो . मैत्रिणिनों हा शिवधनुष्य पेलणे हे एकट्याचे काम नाही जर आपला हातभार लागला तर नक्कीच हे शिवधनुष्य पेलण्यास मदत होणार आहे . आणि एकही माणूस उपाशी राहणार नाही . 

तिने केलेलं आव्हाहन हे ऐकत होत्या त्या बऱ्यापैकी कमवत असलेल्या भगिनी होत्या . बऱ्याचजणींनी त्या कार्यक्रमानंतर आपले मानस बोलुन दाखवले . कोणी वाढदिवसाची घोषणा तर कोणी स्मरणदिनाचे औचित्य साधण्याचा मानस बोलुन दाखवत होत्या आणि कार्यक्रमाचे सार्थक होत आसल्याचे जाणवत होते . थोडासा आशेचा किरण दिसू लागला होता…….



        ---------------------------------------------- 

         ---------------------------------------------- 


                 2020



कोरोना आणि ती

माझं मनोगत




2021 साल उजाडलं आणि जनजिवन बऱ्यापैकी सुरळीत सुरु झालं म्हणायला हरकत नाही . 2020 सालासारखा अनुभव यापुर्वी येणं तर लांबच पण ऐकिवात सुद्धा नसलेली परिस्थिती मीच नाही तर संपुर्ण जगाने अनुभवली . आपल्या आजुबाजूला असणारी , नेहमीच संपर्कात असणारी इतकी माणसं यादरम्यान बऱ्याच दिवसांनी तर  काहीजण बऱ्याच महिन्यांनी भेटली . कहीजण अजून भेटायचे आहेत कदाचित ती भेट होईपर्यंत एक वर्षसुद्धा झालेलं असू शकेल . 
 या कालावधीत 
" बरंच पाणी पुलाखालून गेलं "
हा परवलीतला शब्दप्रयोग पण त्याचा खोलवर अर्थ लावायचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने कोरोनाकाळातच लागला . पाणी वहाण्याचा जो वेग असतो त्या वेगाने किंवा वाऱ्याच्या वेगाने लोकांना अनुभव येत गेले म्हटलं तर आतिशयोक्ती होणार नाही . मग काहींच्या जिवनात संथ वहाणाऱ्या कृष्णामाईप्रमाणे संथ अनुभव आले तर काहींना उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे अंगावर येणारे अनुभव आले तर काहीजणांच्या आयुष्यात वावटळ आलं . अनिश्चित आणि अकल्पीत असं काहीसं त्याचं स्वरुप आहे त्यामुळे संमीश्र आणि विचलीत भावना आहेत . बँकेत आणि संघटनेत काम करत असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात मैत्रिणी आहेत त्या फक्त मैत्रिणी नसून कार्यकर्त्या आहेत . आमचा फोनवर संपर्क व्हायचा तेव्हा चर्चेआंती हेही जाणवलं की भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा अनुभवात वैविध्य आहे . बँकेत काम करत असतांना काऊंटरवर आलेल्या महिला किंवा रोजच्या व्यवहारात संपर्कात आलेल्या अनेकजणी आहेत जसं की  घरकामवाली , भाजीवाली , मजुरी करणारी , दुकानात काम करणारी , कोणत्याही खाजगी क्षेत्रात काम करणारी महिला . आरोग्य खाते , पोलीस खाते , बँका , शाळा , अंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी आणि कोणत्याही सरकारी खात्यात काम करणारी महिला . कोणताही स्वतःचा छोटासा किंवा मोठा व्यवसाय करणारी महिला विशेष करुन बचत गटातील महिला ! यांचे चांगले , वाईट , भयावह , दारुण , हिंसक , व्यसनीधीनता असे अनेक अनुभव अनेकींच्या वाट्याला आलेले ऐकायला मिळालं . यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे  वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आहेत त्यांच्याशी संवाद साधून भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला . आणि मैत्रीण असलेल्या प्रा. डाॕ. भारती रेवडकर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे त्याच संकलन करत आहे . मग माझ्या काॕम्रेड मैत्रीणी आणि बहिणी यांच्याकडून नांदेड , औरंगाबाद , लातूर , सोलापूर ,अमरावती , नाशिक , पुणे , मुंबई इत्यादी ठिकाणाहून अनेक अनुभव ऐकायला मिळाले . त्याला अनेक कंगोरे होते . काही मन हळवे करणारे तर काही अंतःकरण पिळवटून टाकणारे तसेच काहींनी त्याचा आनंदही लुटला तर काहींना फारसा फरक पडला नाही . एकच परिस्थिती पण प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी भासली . अशा विविध व्यक्तीमत्वांच आवलोकन करण्याचा  , शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .



1) घरकामवाली 


मंगल जवळजवळ पंचवीस वर्षापासून धुणं-भांड्याची कामं करते . सततच्या कष्टाने आणि पिणाऱ्या नवऱ्याचे तरुणपणीच निधन झाल्यामुळे तिला अकाली प्रौढत्व आलेलं . कसंबसं उसनवारी करत मुलीचं लग्न केलं तोवर मुलगा पण हाताशी आला चार पैसे कमवू लागला मग त्याचही लग्न तिने लवकरच केलं . केशकर्तन हा त्यांचा  पिढीजात धंदा पण भांडवलाअभावी मुलाला दुकान टाकणे शक्य झालं नाही म्हणून मग तो दुसऱ्याच्या दुकानात पगारावर काम करतो . मुलाचं मुलीचं थोडंस रांकेला लागलं असं वाटत होतं थोडीशी मोकळीक मिळाली असं मंगलला भासू लागलं तोवर जावई पण व्यसनी असल्याचं लक्षात आलं . तिच्या मनानं ते मान्य करेपर्यंत तर जावयाचं पीणं हाताबाहेर गेलं . संपर्कात आल्यामुळे मुलगा पण हळूहळू पिऊ लागला आणि त्याच वाटेवर चालू लागला त्यामुळे घर चालवण्याची हिची जबाबदारी काही संपली नाही उलट दोन नातवंडांची त्यात भरच पडाली  ! जावयाचं पीणं इतकं बेताल झालं की त्याचा शेवट वाईट झाला . दोन वर्षांपुर्वी तिचं स्वतःचं जे झालं तेच तिच्या मुलीच्या पदरी आलं जावई अकाली गेला आणि तरुण मुलगी व छोटीशी नात पुन्हा अनाथ झाल्या . या पंधरा वीस वर्षात या साऱ्या घटना मंगलच्या आयुष्यात उमज पडू न देता अतिशय वेगाने घडल्या ! मग नुकतीच  पन्नाशी ओलांडली असली तरी मंगल मानसिक व आर्थिक जबाबदाऱ्यांनी आहे त्यापेक्षा वयस्कर वाटू लागली  आताशा थकल्यासारखी भासू लागलीय .

      " आता मला लै कामं व्हुईना झालेती वैनी , बाकीची कामं सोडनार हाय मी . तुमचं आन , डाक्टरचं आशी दोनतीनच कामं करनार हाय बगा ".
 अधूनमधून असं सारखं तिचं चालू असतं पण घरच्या जबाबदाऱ्या पहाता तिला तसं करणं शक्य होत नव्हतं . त्यात कोरोनाचं वादळ आलं आणि एक दिवसाची संचारबंदी लागू झालेली तिने ऐकलं आणि कामाला घरी आल्यावर परत जातांना सांगू लागली , 
" वैनी , उद्या समदच बंद हाय जनू , मग न्हाय येनार लई कटाळा आलाय कामाचा बी ऱ्हाते बया घरी ".
आता काही ईलाजच नाही म्हटल्यावर मी गप्पच बसले पण संचारबंदीला जोडूनच लाॕकडाऊन झालं आणि लोकांचे फिरणं बंद झालं . कामाला कोणीच येत नव्हतं पण मनात फार धास्ती वाटत होती . कारण कपडे धूणं , केर फरशी कसही करता येईल पण आता मुलं घरी आली होती मग भांडी पण घासावी लागणार आणि ते काम माझ्यासाठी फार अवघड होतं आणि कामाला ये म्हणावं तर कोरोनाची धास्ती ! पाहू कसं होतं ते असं म्हणत मी वेळ नेली मारुन पण मालकीण म्हणून मी पुरती कोलमडून गेले होते . मग घरात सगळेजण वाटून कामं करु लागलो . आठ दहा दिवसात आमची हालत बेकार झाली होती कारण कामवालीची एखादी दांडी सुद्धा सहसा सहन होत नाही तिथं सलग काम करणं म्हणजे महाकठिणच . पंधरा दिवसांनी एप्रीलच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळी मंगल पैसे हवे म्हणून दारात हजर झाली आणि ती मला देवाप्रमाणे भासली मधूनच कोणी एप्रील फूल तर नाही करत ना असे मला वाटले . मी भानावर येत अंगणात गेले तर ती मला पाहून म्हणाली 
" वैनी उद्यापास्न मी मास्क बांधून येते , साबणानं हात धुते भांडी भाईरच घासून उनात वाळाय घालते चांगली तापल्यावर न्ह्या आत पण आता मी कामाला येते , कोणी आडवलं तर दावाया डाक्टरंनी मला पास दिलाय मग चालल ना तुमास्नी ".
मी आनंदाने तिला परवानगी दिली मला एकदम हायसं वाटलं होतं . कारण केर फरशीची कमल पण येत नव्हती घरात राहूदे पण बाहेरच्या बाहेर जेवढं होतं ते तरी करुदे मला तिची खूपच गरज होती . काळजी घेऊन करु , काय हरकत आहे नाहीतरी घरात सगळे बीझी आहेत हे काम अवघडच की ! मी लगेच परवानगी दिली व पडलेली भांडी घासायला देऊन थोडंस लांब कट्ट्यावर बसून तिच्याशी गप्पा मारु लागले . तर भांडी घासतच ती सांगू लागली 
" वैनी , तुमची दोनतीन घरं सोडली तर समद्या बायांनी मार्च महिन्याचं खाडा कापून तीन आठवड्याचंच पैसं दिलंत बगा . तेबी आता कामाला येऊ नगस आमी जवा सांगू तवाच ये म्हनून सांगितलय बगा  , आता मला कामंच न्हाईत काय करावं रेशन मिळतंय पर भागत न्हाई वर पैसा लागतोय बगा  ".
मग बराच वेळ तिच्याशी बोलत बसले आणि या गप्पा परवापर्यंत आमची भेट होईल तेव्हा सुरुच होत्या . तिचा या आठदहा महिन्यात झालेला प्रवास मात्र आंतर्मुख करायला लावणारा होता .
कामाचा कंटाळा आलेली मंगल आता काम कुठे मिळंल का ? या शोधात होती . ज्यांची कुवत आहे त्यांनीसुद्धा तीला खाड्याचे पैसे दिले नव्हते तर कोणी सढळ हाताने मदत केली होती . रेशनला तांदूळ जास्त मिळत होता तर ज्वारी महाग वाटत होती म्हणून ज्वारी-तांदूळ दोन्ही निम्मनिम्म करुन भाकरीसाठी दळून आणत होती . कित्येक दिवस डाळ-भात-भाकरी हेच त्यांच जेवण होतं .
सलून बंद असल्यामुळे मुलगा घरीच बसून होता . पैसा कमावणं लांबच पण वाडीवस्तीवर कुठं प्यायला मीळेल का यासाठी वणवण भटकायचा , पैशासाठी आईला , बायकोला भांडायचा . प्यायला मिळालं नाही की त्याला थरथर सुटायची मग घरात रोजंच भांडणं , हाणामारी , रडारडी व्हायची , लहानलहान पोरं पण रडायची . तिची सुन थोडफार हिच्याबरोबरच कामाला जात होती हिचीच कामं बंद झाली तर तिला कुठून काम मिळणार . दोनचार घरातून उसने पैसे नेऊन संपून गेले आता काय करायचं .बऱ्याचवेळा  टक्केवारीनं पण पैसे काढायची . तसं तिला हातातोंडाचा मेळ घालणं पण नेहमीच कठीण होत होतं मग व्याज भरुनभरुन ती बेजार व्हायची . मुलगा जरी नशेत धुंद असला तरी लहानलहान नातवंडांसाठी मंगलचं काळीज रक्तबंबाळ होत असायचं मग फिरुन बळ आणून ती कामाला जायची .....


याउलट कमलचं होतं . दोन मुलं आणि नवराबायको असं तिचं चौकोनी कुटूंब . नवरा एका खाजगी बँकेत सिक्युरीटीचं काम करतो , त्याला पगार कमी आहे मग मुलं शिक्षणात बरी आहेत पैसा पुरत नाही म्हणून थोडासा खर्चाला हातभार लागावा म्हणून कमल घराबाहेर पडली सुरुवातीला दोन वर्षे तिने दुकानात काम केलं . पण दुकानात दहा ते आठ असं दहा तास म्हणजे जरा जास्तवेळ बांधील रहावं लागतं म्हणून मग ते काम सोडलं आणि चार घरी स्वैयंपाकाचं आणि फरशीचं काम करायला सुरुवात केली . तिच्याकडे बांगड्या भरण्याची कला होती   म्हणून मग ती जोडधंदा म्हणून बांगड्याचा व्यवसाय  करायची त्यामुळे संसाराला थोडासा हातभार लागायचा  परिस्थिती जरा बरी झाली . त्यामानाने कमलचं वय लहान होतं चुणचुणीतपणा आणि काहीतरी करण्याची आस ,  ध्येय आणि धडपडी वृत्ती असल्यामुळे तिच्या डोळ्यांत नेहमी वेगळीच चमक दिसायची . लाॕकडाऊन झालं तसं तिचं कामाला येणं बंद झालं . मग मधूनमधून फोन करायची येऊ का विचारायची . कधीतरी उसने पैसे न्यायची . असंच जूनमध्ये एक दिवस घरी आली होती मग तिचं कसं चालू आहे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला .
तिने सांगितले काम नसल्यामुळे आधी महिनाभर जरा झोपच काढली मग आळशीपणा वाढू लागला सुस्ती आली म्हणून घराजवळ पोळीभाजी पुरवणारी एक संस्था होती तिथे पोळ्या करायला जात होती रोजगार मिळत होता . शिवाय मिळणारं रेशन , नवऱ्याचा पगार यात जेमतेम भागत होतं पण उदास वाटतं म्हणाली . कोरोनांमुळे लग्नंपण बंद होती आणि सणवार पण साजरे झाले नाहीत मग बांगड्याचा धंदा बंदच होता म्हणाली . मग हातात पैसा रहात नव्हता जेमतेम घर भागत होतं आणि आता घरीच बसून रहायचा पण कंटाळा आला म्हणून काम सुरु करावं असे तिला वाटू लागले . मंगल भांड्याला येते तर मी पण काळजी घेत माझ्या कामावर येते असा तिने तगादा लावला . पण हिला कामाला बोलावल तर हिचं काम घरात करावं लागणार होतं मग मी पण  थोडंस लांबवत लांबवत   सप्टेंबरपासून तिला बोलावलं तर त्याचाही तिला खूप आनंद झाला . एकूणच काय पैशासाठी म्हणा , गरज म्हणून म्हणा प्रत्येकजण आपल काम करायला मनापासून 
तयार होता हे खरं !!



 " पुणे तिथे काय उणे " म्हणत आलीकडे हाताला काम नसेल त्या बऱ्याचजणांनी पुणे गाठलंय , पूनम त्यातलीच एक ! तिचं मुळ गाव कोकणातलं पण भावाभावाच्या  वाटण्या झाल्यावर शेतीतील उत्पन्न त्यांना पुरेना त्यात दोन मुली एक मुलगा असं जरासं वाढलेलं कुटुंब आहे तर काहीतरी करुन खाऊ म्हणून दहा वर्षापासून पुण्यात रहातेय तसं बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं . दोघं नवराबायको मिळून कमवत होती मुलांना शाळेत घातलं होतं पूनम फारशी शिकलेली नव्हती मग लोकांकडे   घरकाम करायला तिने सुरुवात केली . कोकणातल्या खेड्यातून आली पण पुण्यासारख्या शहरात एका वर्षातच तिने तिथल्या काम करण्याची पद्धत आणि गरज याचं निरिक्षण करत कामं मिळवत गेली मग दिवसभर पुरतील एवढ्या घरी कामं करायचा तिने सपाटा लावला . बऱ्यापैकी बस्तान बसलं घर व्यवस्थित चालू लागलं . आठनऊ वर्षे कशी गेली समजले नाही आणि लाॕकडाऊन झालं ! तरी सुरवातीचे दोनतीन महिने आहे ती पदरमोड करत असलेल्या शिलकेतून तिने घर भागवलं . काही घरी  पैसे दिले पण चारपाच महिन्यांनी घर चालवणं कठिण होऊ लागलं . घरभाडं थकू लागलं तसा तिने पुन्हा सगळं गबाळ गुंडाळून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा तिला तो नाईलाजाने घ्यावा लागला......


नांदेडमध्ये काम करणाऱ्या रंजनाचा अनुभव काही वेगळंच शिकवून गेला . चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीचा घर आणि व्यवसायाचा मोठा व्याप होता . त्यामुळे त्यांनी आपल्याच कंपाऊंडमध्ये दहा वर्षापूर्वी रंजनाची कुटुंबासह  रहाण्याची सोय करुन दिली होती . रंजना व तिचा नवरा दोघेही त्यांच्याकडे राबत होतं . दुर्दैवाने मालकांचे वडील आजारी पडले एकदोन दिवसात ते कोरोना पाॕजिटीव्ह निघाले पर्यायाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आले . त्यात रंजनाला पण टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आलं तर याठिकाणी रंजनाची व्यवस्था पहाण्यास मालकांनी नकार दिला . हे सारे सोपस्कार  रंजनाला स्वखर्चाने करावे लागले व ते करत असतांना रंजनाचे संपुर्ण कुटुंब दोन दिवस होरपळून निघालं . आणि रिपोर्टमध्ये मालकांचे पुर्ण कुटुंब पाॕजिटीव्ह आणि रंजनाचं कुटूंब निगेटीव्ह आलं . त्यांच घर मोठं असल्याने आजोबा सोडता बाकी सगळ्यांना घरातच क्वारंटाईन रहायला सांगितले तर त्यांनी रंजनाने घरात कामास येण्यासाठी आग्रह केला पण आता रंजना ही जोखीम स्वीकारू इच्छित नव्हती तिने ठाम नकार दिला कारण आलेल्या आनुभवावरुन आपल्याला कोरोना झाला तर मालक पहाणार नाहीत ही तिची खात्री झाली होती . तर रंजना कामाला न आल्याचा मालकांनी मनात राग धरुन तिला पैसे तर दिले नाहीतच शिवाय तिला जागा सोडण्यास भाग पाडले . कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक एकमेकांना मदत करत असल्याचे दिसत होते तितकेच काहीजण निष्ठुरपणेही वागत होते यामध्ये रंजनासारखे मात्र होरपळून निघाले ...........


वंदनाचा अनुभव तर भयचकीत करणारा होता . आगदी सुरुवातीच्या काळातील ही घटना आहे . चार पोलीस एक फ्लॕट भाड्याने घेऊन रहात होते . एक वर्षापासून वंदना त्यांच्याकडे कामाला होती भाजी आणण्यापासून स्वयंपाक , झाडू-पोछा व भांडी अशी सगळी कामं ती करायची तिच्याकडे घराची एक किल्ली पण देऊन ठेवलेली होती . या कालावधीत पोलीसांना विविध विभाग दिले जायचे . त्यामुळे या चार जणांचे नऊ मित्रांना या विभागात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटी मिळाली . ते परगावचे होते त्यामुळे तेराजण आंघोळ जेवण व ड्युटीप्रमाणे आळीपाळीने फ्लॕटवर असायचे . यापैकी एकजण पाॕजिटीव्ह निघाला की लगेच गाडी येऊन फ्लॕटवर आसलेले सर्व पोलिस व काम करत असलेली वंदना यांना गाडीत घालून घेऊन गेली . दोन दिवस तिच्या घरच्यांना तिचा पत्ता लागला नाही . तु निगेटीव्ह निघाल्यावर तिला चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन रहायला सांगून गाडी निघून गेली . कुठेच काही समजत नव्हते त्यामुळे दोन दिवस घरच्यांच्या तोंडचं पाणी पळालं एवढं खरं !


हे आणि यासारखे विविध ठिकाणी विवीध प्रसंग घडले . दिल्ली-मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून तर घरकाम करुन घर चालवणाऱ्या लाखो महिला आहेत ज्यांचे संसार या कालावधीमध्ये अडचणीत आले . सरकारने तीन महिन्यांसाठी दरमहा देऊ केलेले रु.500/  बँक खात्याला आधारजोड नसल्यामुळे मिळू शकले नाहीत त्यासाठी अनेकजणी हळहळ करत गेलेल्या अनेक अनुभव बँकेत आले . तसेच अनेक घरी या कामवाल्यांचा वावर असल्यामुळे मोठमोठया सोसायट्यामध्ये त्यांच्या येण्यावर बंदी घातली गेली . पुढेपुढे तर त्यांनी फक्त एका सोसायटीतच काम करायचं त्यांच्यासाठी बंधनकारक केलं . सुरुवातीच्या कालावधीत तर काम नाही मग पगार नाही अशी त्यांची अवस्था झाली . काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांकडे काम केल्यामुळे त्यांना स्वतःला आजाराला सामोरं जावं लागलं तर यांच्या माध्यमातून कोरोना पसरतोय या नजरेने लोक पहायचे त्याला तोंड देणं ही वेगळीच कटकट होऊन बसली होती . पण प्रत्येक बाई गरिब आसो वा श्रीमंत , शहरात असो वा खेड्यात शिकलेली असो वा आशिक्षीत समोर उभ्या ठाकलेल्या प्रसंगाशी मोठ्या हिमतीने दोन हात करत होती . आला प्रसंग निभावून नेत होती !



2) भाजीवाली



" अन्न वस्त्र निवारा " 

या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्यामुळे भाजी हा अन्नामाधील अपरिहार्य घटक आहे . मग भाजी विकणारावर कधी टाळेबंदीची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते . आमचा आठवडा बाजार शनिवारी असतो . मार्केटमध्ये शिरलं की बरोबर मध्यावर मोठी लाईन मोठ्या मोठ्या भाजीवाल्यांची असते मार्केटींगसाठी त्यांची चढाओढ लागलेली असते . धारदार आवाजात मोठमोठ्यांन मुख्य म्हणजे हसतहसत विशिष्ट पद्धतीने त्यांची शेरेबाजी ऐकत भाजी खरेदी केली की भाज्यासारखं मन पण प्रसन्न व्हायचं . ज्या भाज्या या भागात पिकत नाहीत त्या मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे या मोठ्या भाजीवाल्यांची लाईन असते मग बहुतेक ठिकाणी मुख्य खुर्चीवर त्यांच्या कुटुंबातील पोक्ती बाई बसलेली असते . लिलावाच्या ठिकाणी नवरा आणि हाताशी आलेला मुलगा पण बरोबर गेलेला असतो . मग यार्डातून मंडईत भाजीच्या गोण्या आणून टाकायची हाॕटेलसारखी मोठी गिऱ्हाईकं करायची व लागेल ती मदत करायची ही कामे नवरा किंवा मुलगा करतो . मुलाचं लग्न झालं की या व्यवसायाची सवय नव्या सुनेला पण व्हावी म्हणून घरातलं सगळं आवरुन सगळ्याचे डबे घेऊन सून पण आकरानंतर मदतीला येऊन बसते . असं एकएक करत घरातले सगळेजण त्या धंद्याभोवती असतात . 

" उद्या रईवार हाय , तुमाला सुट्टी हाय पोटाला सुट्टी न्हाय कायबी घ्या धा ला पाव " .

असं म्हणत आत्मविश्वासाने चाललेला हा धंदा काही काळाकरता बंद होऊ शकतो ही गोष्टच न पटण्यासारखी होती . चापूनचोपून नेसलेल्या साडीचा पदर खोचून प्रसन्न चेहऱ्याने माधोमध खुर्ची टाकून ती रणरागिणी बसलेली असते . दोन्ही बाजूला चारचार फूटापर्यंत अँगलवर फळ्या टाकून पलंग तयार करुन त्यावर वीसपंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांच्या टोपल्या त्याच्यावर एकाला एक चिकटून ठेवायच्या एकीकडे फळभाज्या , एकीकडे पालेभाज्या , शेंगांचे प्रकार वेगळेच तर बाहेरून मागवलेल्या भाज्या वेगळ्याच , थोड्या लांब आंतरावर कांदे , बटाटे , टोमॅटो , काकडी , मिरच्या अशा तत्सम भाज्या ! आतिशय कल्पकतेने गिऱ्हाईक येण्यापुर्वीच भाज्यांची मांडामांड करुन एका बाजूला अनेक कप्पे असलेली पैशाची पेटी तर दुसऱ्या बाजूला गिऱ्हाईकाला द्यायच्या टोपल्या , पाण्याची बाटली तर अजून एक छोटीशी लाकडी पेटी त्यात पिग्मीची पुस्तकं , मोठ्या नोटांची पॕकेट , नगरपालीकेची पावती , किल्ल्या असं महत्त्वाचे साहित्य ठेवाण्यासाठी सोय असते . पाठीमागच्या बाजूला भाजी भरलेल्या गोण्या आणि समोर वजनकाटा ! हा सगळा जामानिमा करुन जय्यत तयारीनीशी गिऱ्हाईक सुरु व्हायच्या आधी सकाळी आठ वाजता बसलेल्या भाजीवाल्या , गर्दी सुरु झाली की अष्टभुजेप्रमाणे त्यांच काम सुरु होतं . एकाच वेळी पाचसात गिऱ्हाईकं लिलया सांभाळायची कला फक्त त्यांच्याकडेच असू शकते  . शिक्षण कमी पण हिशोब मात्र एकदम पक्का ! आपला हिशोब होईपर्यंत पाचसहा भाज्यांचे वेगवेगळ्या भावाने हिशेब करुन त्यात्या गिऱ्हाईकाकडे बोट करत

" ताई तुमचं एवडं झालं बगा न भाऊ तुमचं एवडं  "

असं सांगून पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळायच्या सुद्धा !  एकावेळी इतकी वेगवेगळी कामं तीही बीनचूक! त्यातच थोडी गर्दी ओसरली की कमी झालेल्या टोपल्या पुन्हा भाजीने भरायच्या , मधूनच भाज्यावर पाणी शिंपडायचं , चहाची किटली घेऊन फिरणाऱ्या चहावाल्याला हात करुन बोलवायचं आणि दोन घोट चहा घेऊन तरतरीत होऊन पुढच्या कामाला भिडायचं . गिऱ्हाईकांनी आकर्षित व्हाव म्हणून समोरुन जाणाराला हटकत आपुलकीने

 हाक मारायची आणि  आपल्या भाजीला

" कवळीलूस हाय , बगा कशी हिरवीगार हाय  , कडक माल हाय एकदम बरका "

अशी विशेषणं लावत वळून पहायला लावायचं पाव किलोऐवजी आर्धा किलो तर आर्धा किलोऐवजी एक किलो भाजी विकण्याचं त्यांच कसब निराळच !

       तर दुसरीकडे स्वतःच्या शेतात पिकणारा मोजकाच शेलका माल घेऊन खेड्याच्या बायका मंडईच्या एका बाजूला नगरपालिकेची पावती फाडून छोट्या भाजीवाल्या होऊन ओळीनं बसायच्या . कोणाकडे हदग्याची फूलं , स्पेशल आमटीसाठी देशी पांढऱ्या भेंडीच्या बीया , ओल्या चवळीच्या शेंगा , तव्यावर मिरची भाजून तांब्यांन रगडून करायच्या ठेच्यात घालायला चटकदार लागणारी बोराएवढी लाललाल टमाटी , देशी कोथिंबीर , देशी लसूण असा वेचक माल खात्रीने फक्त त्यांच्याकडेच मिळणार त्यामुळे त्यांचा रुबाब काही औरच !  सरळसरळ जमिनीवर समोर तोंड करुन दुहेरी पोतं अंथरुन बसायचं , दुपारच्यावेळी स्वतःपेक्षा भाजीला उन्हाचा चटका लागू नये अशा पद्धतीने छत्री लाऊन ठेवायची . माल विकला की  येणारे पैसे पोत्याचा एक पदर वर उचलून नोटा एकीकडे तर नाणी एका बाजूला आत सरकवायची त्यांची खास पद्धत क्षणभर त्या कॕशियरच भासायच्या मला ! 

" थोडंच ऱ्हायलंय फिरुन याल तर मिळायचं न्हाय "

अशी थोडीशी धमकीच असायची त्यांची .

         इकडे मंडईच्या तोंडालाच सिझनप्रमाणे केळी , आंबे , डाळींबं , सिताफळं अशा विविध प्रकारच्या फळांनी भरलेला गाड्यावर वयस्कर भाभी बसलेल्या असायच्या . त्यांच ठरलेलं गिऱ्हाईक मात्र डोळे झाकून त्यांच्याकडेच खरेदी करायचं .

    काहीजणी मात्र मंडईत बसून भाजी विकू शकत नाही म्हणून डोक्यावर टाॕवेलची चुंबळ करुन त्याच्यावर भाजीचं टोपलं घेऊन मधूनच दोन्ही हात खाली सोडून सकाळच्या वेळी चालत

" भाजीsssss " 

अशी दणदणीत आरोळी ठोकतच गल्ली , सोसायटी , काॕलनीत प्रवेश करायच्या . मग तिच्याकडे कायकाय आहे हे अगदी विशेषणासह लयबद्ध पद्धतीने समजायचं .

" कवळी मेती , पालक , शेपू , देशी गवार , दोडका " तोवर चालत चालत घरासमोर आली की थोडासा स्वर बदलत 

" काटाळ वांगी हाईत , भरल्या वांग्याला घ्या वैनी "

असं म्हणत बाहेर यायला भाग पाडायच्या . ओरडत घरोघरी फिरून भाजी विकून आपला उदरनिर्वाह करायच्या . त्यांच्या दणदणीत आवाजाने ज्याला भाजी घ्यायची ते बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबायचे . हसत हसतच 

" आले आले थांबा वाईस " 

असं पुढ्यातलं गिऱ्हाईक करत समोरच्या घराकडे लक्ष !

         गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या व्यवसायाला मरणच नाही अशी कल्पना असलेला भाजीवीक्री हा खात्रीचा  व्यवसाय आणि भाजीवाली हे व्यक्तिमत्त्व ! आठ तासापेक्षा जास्तवेळ ड्युटी करुनसुद्धा कोणत्याही खात्यांतर्गत न येणारा , कशाचीच हमी , सुरक्षा , भविष्य नसलेला हा व्यवासाय . अगदी पोटापूरतं मिळालं तरी बास म्हणत डोक्यावर टोपली घेऊन हिंडणारापासून भाजीचा मोठा स्टाॕल लावलेल्या आख्खा संसार या धंद्यावरच असलेल्या मोठ्या भाजीवालीपर्यंत प्रत्येकाला या कालावधीत वेगवेगळ्या समस्यानां तोंड द्याव लागलं .

     मार्चमध्ये लाॕकडाऊन सुरु झालं आणि उमज न पडणारी परिस्थिती निर्माण झाली . घराच्या आसपास जी भाजी मिळेल ती आणायची आणि भागवायचं हेच चित्र सर्वत्र होतं . आंतराअंतरावर , रस्त्यावर , गाड्यावर विवीध ठिकाणी पोलीसांचा दंडूका चुकवत भाजीवाले लोक भाजी विकताना दिसू लागले . तरतरीत दिसणाऱ्या भाजीवाल्या सुकलेल्या शेपूच्या पेंडीसारख्या भासू लागल्या त्यांच्या नजरेत भेदरलेपणा होता . एप्रिल-मे सारख्या कडक उन्हाळ्यात त्यांची अवस्था गारठल्यासारखी झाली होती . प्रत्येक आठवड्यात बदललेल्या आदेशाप्रमाणे नियोजन करावे लागायचं . सुरवातीच्या काळात अत्यंत गोंधळाची परिस्थिती होती . नेहमीकरता सगळं आवरुन सकाळी आठनऊ वाजता मंडई सुरु करायची ते  सगळा माल संपवूनच घरी परतायचं ही सवय आणि कोरोनामुळे सकाळी सात ते नऊ या वेळातच भाजी विकायला परवानगी मिळू लागली . सातला भाजी विकायला जागेवर बसायचं म्हणजे पहाटे चारपासूनच कामाला लागावं लागायचं . भाज्यांच्या लिलावात पण अनिश्चीतता असायची माल कुठून घ्यायचा तो कुठे ठेवायचा आणि कुठे विकायचा यामध्ये गोंधळ निर्माण व्हायचा . समजा हातगाड्यावर भाज्या घेऊन विकायचं ठरवलं तर काहीवेळा गिऱ्हाईक चोहोबाजूंनी गर्दी करायचे तशातच जर पोलीसांची गाडी आली तर जीव मुठीत घेऊन काठ्या लाठ्या चुकवण्यासाठी पळता भुई थोडी व्हायची . आधी अनियमीत दराने पैसे देऊन भाजी मिळवायची मग रिक्षा किंवा वहान मिळायचं नाही म्हणून मुलाच्या , नवऱ्याच्या गाडीवर पाठीमागे जास्तीतजास्त भाजीच्या गोण्या बसवायच्या यादृष्टीने साडीचा काष्टा घालून कमीतकमी जागेत गाडीवर दोन्हीकडे पाय टाकून गोण्या धरुन बसायचे . आणलेला माल हातगाडीवर कसाबसा माल लावायचा मग गिऱ्हाईक जास्त आलं , गर्दी झाली तर एकीकडे या गर्दीत  कोणी करोनाचं पेशंट असेल का ही धास्ती आणि पोलिसांची गाडी येते का ही दुसरी धास्ती समजा पोलीस आलेच तर गर्दी केली म्हणून आरडाओरडा , फटके कधीकधी माल उचलून नेणे , उधळून लावणे असेही प्रकार व्हायचे . जास्त गिऱ्हाईक आल नाही तर भाजी न संपण्याची भिती आणि नऊदहापर्यंत जर भाजी संपली नाही तर उरलेल्या भाजीचं करायचं काय दुसरे दिवशीपर्यंर सुकून जाणार म्हणजे नुकसानच ! मग पहाटेपासून एवढी ओढाताण करुन पदरात काय पडलं हा तर वेगळाच मुद्दा . 

        यातही सगळ्याच जागा बदललेल्या . नेहमीच्या ठिकाणी किंवा मंडईत शौचालयाची सोय असायची मग रोडवर किंवा गाडा घेऊन जायचं म्हणलं तर ही मोठी अडचण होऊन बसायची . त्यातही कोणी महिला गरोदर किंवा लहान बाळ असलेली असेल तर तिच्या वेगळ्याच समस्या असायच्या . मग या सगळ्यापेक्षा कामच न करण्याचा निर्णय घेतला तर काम नाही तर पैसा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . अनेकजणींनी थोडीफार धडपड केली पण त्रास अधिक नुकसान होतंय हे लक्षात आल्यावर घरीच थांबणे पसंत केले .

      डिसेंबरमध्ये मार्केट सुरु झालं . सुरु झाल्यावर पहिल्याच शनिवारी मी काळजी घेत बाजारात गेले . संपुर्ण मंडईत चक्कर मारली आपापल्या ठिकाणी भाजीवाल्यांना पाहिल्यावर मनाला समाधान वाटलं . या कोरोनाच्या कालावधीत भाजी घेताना जाणीवपुर्वक भाजीवाल्यांशी संवाद साधत होते . तर नव्याने बळ बांधत प्रत्येकजण उभं रहाण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येकाच्या जिवनात कमीजास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेतच .

     बऱ्याचशा मोठ्या भाजीवाल्यांनी मुलांसाठी रिक्षा , गाडी , टीव्ही किंवा इतर कारणांसाठी फायनान्सचं कर्ज घेतलं होतं . धंदा बंद , गोंधळ निर्माण करणाऱ्या आफवा मग बँकेत पैसे भरले नाहीत परिणामी हप्त्याचे चेक परत गेल्यामुळे सहा सहा महिने दंडाची रक्कम बँकेत आणि फायनान्सवाल्यांकडे असे डबल डबल चार्जेस लागले . त्याविषयी व्यवस्थित माहिती मिळत नव्हती . आणि आता एकदमच हप्त्याचे व दंडाचे पैसे भरायचे शिवाय धंद्याचा तितकासा जम अजून बसलाच नाही , गोंधळ निर्माण करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची वेळ आली . मग सगळा मेळ घालणं कठीण होऊन बसलं . यासाठी पहिला मार्ग म्हणजे छोटेमोठे दागीने गहाण ठेऊन कर्ज काढणे .

     छोट्या भाजीवाल्यांना मात्र शेतात माल पिकूनसुद्धा आधी वाहतूकीची अडचण मग कसबसं शहर गाठलं तरी माल विकायचा कुठे आणि कसा आणि विकला तरी काहीवेळेस बरा भाव मिळाला तर काहीवेळेस कवडीमोल भावात विक्री करावी लागली . मग या गोंधळात मालाचं शेतातच नासून जाणं डोळ्यांनी पहावं लागलं फायदा तर नाहीच पण केलेला खर्चही गेला . नाशवंत मालाचं खूपच नूकसान झालं . योग्य वेळेत मार्केटींग जर झालं नाही तर मालाचा कचराच व्हायचा .

" तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं "

असं काहीसं बऱ्याजणाचं झालं .

    फळवाल्या बागवानांची काही वेगळी परिस्थिती नव्हती माल खरेदी केला आणि विकला गेला नाही तर डबल नुकसान व्हायचं मग निवांत बसलेलं बरं असं म्हणत गुपचूप बसायचे . मग जेवढा मोठा धंदा तेवढी बुडणूक जास्त व्हायची . आम जनतेने भाज्यांना पर्याय म्हणून डाळी कडधान्याची निवड केली पण त्यामुळे त्यावेळचा भाजीवाल्यांचा धंदा बुडलाच !


      या धंद्यासाठी ज्यांनी पुणे मुंबई सारखी शहरं जवळ केली त्यांना एकतर शिल्लक असेल तर असलेल्या शीलकेतून घर भागवणे किंवा परत गाव गाठणे हे दोनच पर्याय होते . पण दिवस गेला की त्यादिवसाची कमाई बुडायची असं मात्र खुपजणींच झालं .


डोक्यावर टोपलं घेऊन भाजी विकणारांना फारसा फरक पडला नाही त्यांच्या ठरलेल्या घरी त्यांची भाजी विकली जायची , भाजीला गिऱ्हाईक पण तितकच होतं पण सुसुत्रता नसल्यामुळे शेतकरी , व्यापारी आणि गिऱ्हाईक  या सगळ्यांना आडाचणीचा सामना करावा लागला हे मात्र कटू सत्य आहे ! खाणारांना पर्याय होता पण विकणारांनी काय करायचं हा मोठा प्रश्न होता .


        ---------------------------------------------- 

        ---------------------------------------------- 


              2021


गेल्या दोन वर्षात सरकारने आधी बँक एकत्रीकरणाचा सपाटा लावला आणि 2021 मध्ये बँक खाजगीकरण हा विषय जोर धरु लागला . त्याचा कर्मचारी म्हणून आम्हांला  जेवढा धोका आहे तेवढाच किंबहुना जास्त धोका आम जनतेला आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2014 चा लेख थोडे बदल करुन पुन्हा मांडण्याचा केलेला प्रयत्न . प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले पण नाही झाला . Whatsapp व Blog च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न !



 राष्ट्रीयकृत बँकांचे संवर्धन ही समाजाची  नैतिक जबाबदारी !!


         भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर पाहिला तर हे लक्षात येते की , ज्यांना पारतंत्र्याची चीड होती , झळ बसली त्यांनी स्वत:चं आयुष्य पणाला लावलं , बलिदान दिलं आणि येणाऱ्या पिढीच्या पदरात स्वातंत्र्य टाकलं आणि आज या स्वातंत्र्याची एवढी ग्लानी आलीय की आसपास काय घडतंय याचं काहीही देणघेण नसल्याप्रमाणे जर आपण डोळ्यावर झापडं ओढून घेतली तर आपण एका नविन पारतंत्र्याला आमंत्रण देतोय म्हणजेच जर आपण गाफिल राहिलो तर आर्थिक पारतंत्र्यात केव्हा अन कसे गेलो याचा पत्ता सुध्दा लागणार नाही अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला निर्माण झाली आहे . आर्थिक क्षेत्रात काय घडतंय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतोय . खरं तर प्रत्येकाने सतर्कपणे , बारकाईने मागोवा घेण्याची वेळ आहे . वरकरणी भासवल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन कारणमिमांसा शोधली पाहिजे याचंच मर्म सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

आज राष्ट्रीयकृत बँकांचं अस्तित्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जेवढ महत्वाच आहे त्याहीपेक्षा जास्त सामान्य जनतेसाठी आहे. आजही भारतातील 70%  जनता ही ग्रामीण भागात राहते की ज्याठिकाणी आठदहा तास लाईट नसते . चारचार दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागते पण याठिकाणी गॅसची सबसीडी असो , स्कॉलरशीप असो , किंवा सरकारने जाहिर केलेली कोणतीही मदत असो ती अलिशान इमारतीत थंडगार एसीच्या हवेत सुखसोयीने नव्हे तर सर्वसामान्य जनतेपर्यंत अत्याधुनीक तंत्रज्ञान वापरुन तातडीने कशी पुरवली जाईल यावर राष्ट्रीयकृत बँकांकडून भर दिला जातो . कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल जातं .

स्वातंत्र्योत्तर काळात आपला देश स्वातंत्र्य , समता , बंधुता या लोकशाहीच्या तत्वांनी पेटून उठला होता . विकासाला चालना मिळावी यासाठी विवीध प्रयत्न केले गेले . पायाभूत व मुलभूत उद्योगांना जाणीवपुर्वक चालना देणे हा त्याचाच एक भाग होता. आणि यामध्ये वित्तीय संस्थांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत गेली . या महत्वपूर्ण उद्योगावर जनतेची मालकी व नियंत्रण असलं पाहीजे म्हणून 1969 मध्ये बँकीग उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला . जनतेचा पैसा हा त्याताला गाभा होता . त्यानंतरच विस्तारीत स्वरूपात बँकांचं जाळं खेडोपाडी जाणिवपुर्वक पसरण्यात आलं . खेड्यापाड्यात आणि मगच  तळागाळातल्या जनतेपर्यंत बँकांमार्फत सरकारी योजना पोहचवण्यात यश आलं .

गेल्या 51  वर्षांपासून आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बँकानी कृषी , औद्योगीक , पायाभूत सुविधांच्या विकासात बहुमोल कार्य केलेले आहे देशाला विकासाच्या दिशेने नेण्यात बँकानी योगदान दिले आहे . देशातील बेरोजगार , सामान्य जनता , गरीब कष्टकरी , शेतकरी , शेतमजूर , कुटीर उद्योग यांना कर्जरूपांने भांडवल उपलब्ध करत त्यांना स्वावलंबी बनवीले आहे . यातूनच कोट्यावधी रूपयांच्या ठेवी सर्वसामान्य जनतेकडून गोळा झाल्या आहेत त्याची जपणूक या राष्ट्रीयकृत बँकामार्फत होते आणि सामान्य जनता अश्वस्त राहू शकली . कमीतकमी खर्चात बँकीग सेवा सुविधा पुरवण्याचे काम फक्त आणि फक्त राष्ट्रीयकृत बँकाकाडूनच होते . तो जाणीवपुर्वक केलेला प्रयत्न असतो . बँक खातं असण हा प्रत्येक नागरीकाचा मूलभूत अधिकार हे फक्त आणि फक्त राष्ट्रीयकृत बँकच करू शकते . कारण शुन्य रूपयाच्या खात्याची सेवा द्यायला सरकारी मालकी असणं हा एकच उपाय आहे.

पण आज या राष्ट्रीयकृत बँकांना मोठया संकटांचा सामना करावा लागत आहे . सरकारकडून त्यांच्या अस्त‍ित्वालाच धोका पोहोचवण्याचा घाट घातला जात आहे . खाजगीकरणाचा डांगोरा पिटला जात आहे . बँकांना  नाडलं जात आहे . बुडीत कर्ज हा बँकिंगमधील अविभाज्य घटक आहे . मोठमोठ्या उद्योगातील कर्जदारांनी बँकाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायची त्याची परतफेड करायची नाही व ती कर्जे अनुत्पादक संपत्ती मध्ये ( एन पी ए ) न्यायाची व बुडीत कर्जाच्या तरतुदीद्वारे त्यातुन सुटका करुन घ्यायची आज सार्वजनीक क्षेत्रातील बँकामधून बुडीत व थकीत कर्जाच्या रकमा धोकादायक पध्दतीने वाढलेल्या आहेत . ज्याप्रमाणात बुडीत कर्ज वाढते त्याचप्रमाणात बँकेने कमावलेल्या नफ्यातून त्याची तरतूद केली जाते . परीणामी बँकेचा निव्व्ळ नफा घटतो आहे त्यावर ताण येतो आहे.

एनपीए ची तरतूद करणे , निकाली काढणे , सुट देणे  , हक्क् सोडणे , एकरकमी तडजोड इ. मार्गाने ही बुडीत कर्जे लपविली गेली थकित कर्जांची पुनर्रचना केली गेली . आजचा धोका उद्यावर ढकलत ढकलत बँकाना अक्षरशः वेठीस धरलं आहे . कर्जादार ,बँका आणि राजकीय व्यवस्था यांच्यात स्पष्ट  हितसंबंध आहेत . या बुडीत आणि थकीत कर्जाचं प्रमाण इतकं लक्षणीय वाढलेलं आहे की त्यासाठी पुरेशी तरतुद करण्यास बँका असमर्थ ठरतात . म्हणजे कर्ज तोट्याच्या जोखमीप्रती बँका अधिक असुरक्षीत व सहजी बळी पडणाऱ्या  ठरत आहेत कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ही परीस्थीती निर्माण झाली आहे . 2008 च्या तुलनेत 2013 ची आकडेवारी दुप्पट  झाली होती तर 2021 ची परिस्थिती आणखीनच भयावह आहे . 


खरंतर मोठमोठ्या उद्योजकांकडून सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लूट उघडकीस आणणे व वसुल करणे यासाठी उपाययोजना करणे ही सध्याची प्राथमिकता आहे . या धनदांडग्या कर्जदारांकडून बँकांची येणी वसुल करण्यासाठी मोठया थकबाकीदारांकडून जाणून बुजून कर्ज थकविणे हा फौजदारी गुन्हा ठरवणे , हितसंबंध व संगनमतांची चौकशी करणे , कर्जवसुलीसाठी कायद्यात सुधारणा व कडक उपायायोजना करणे ही काळाची गरज आहे . हे चित्र सर्वसामान्य जनतेपर्यंत यायला पाहिजे पण हे करायचे सोयीस्कररीत्या टाळून बँकामध्ये सुधार आणण्याच्या नावाखाली जनताद्रोही धोरणांचा समावेश असलेली बीले पास करणे , बँकींग उद्योगात प्रतिगामी बदल घडवून आणण्यासाठी बँकींग नियमन कायदा 1989  व बँकीग उद्योगाशी निगडीत असलेल्या कायद्यात बदल घडवून आणणे की ज्याआधारे परदेशातील बुडीत बँकाना , कार्पोरेट्सनां भारतातील राष्ट्रीयकृत बँका विकत घेणे सुलभ होणार आहे . थकित कर्जदारांच्या रकमा शेअर्समध्ये कन्व्हर्ट करायच्या देशाची आर्थिक निती सामान्य जनतेला हितेषी न ठेवता जागतीक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या बलाढ्य परकीयांना थेट गुंतवणुकीला आमंत्रण म्हणजे आपल्या देशवासीयांना आर्थिक पारतंत्र्यात ढकलण्याची कृती होत आहे . आणि याच्यावर मात करण्याचा प्रयत्न कर्मचारी संघटनांना करावा लागत आहे. 


बँकीग क्षेत्रातील सर्वच संघटना या सर्व गोष्टींचा डोळसपणे अभ्यास करतात . एआयबीईए  ही बँकीग क्षेत्रातील सामाजीक बांधालकीचं भान ठेवणारी बलाढय संघटना आहे जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी असून खाजगी नफेखोरी किंवा लुटीसाठी नाही आणि बँक खातं असण हा प्रत्येक नागरीकाचा मुलभूत अधिकार आहे . या प्रमुख उद्दीष्टासह अत्यंत सक्षम समाजाभिमुख बँकिग क्षेत्रासाठी सतत प्रयत्नशील आहे . त्यासाठी येत्या काळात आणखी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत . यातूनच संप आंदोलने यासारख्या कृती होणार . यातून आपले पितळ उघडे होणार हे या धनदांडग्यांना सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते त्यामुळे मुळ प्रश्नाकडे बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे सर्व बाजू सामान्यापर्यंत पोहचू नयेत या उद्देशाने संपामुळे किती हाल होतील आर्थिक व्यवहार कसे  कोलमडतील  याचाच बाऊ केला जातो आणि सत्य समोर यायला अडथळे निर्माण केले जातात. 


पण प्रसारमाध्यमं ही सत्याचा आरसा जनतेला दाखवण्याचं जालीम माध्यम आहे त्यामुळे बँकाची केली जाणारी नडवणुक , सामान्य जनतेची होणारी दिशाभूल व धनदांडग्याचा लुटारुपणाचा पडदा फाडण्याचे काम ताबडतोबीने करायला हवे. राष्ट्रीयकृत बँका ही राष्ट्रीय संपत्ती आहे . तीचं आपल्या स्वत:साठी संर्वधन करण ही समाजाची नैतिक जबबादारी आहे . सध्याच्या सरकारच्या बँक खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात येत्या 15 व 16 मार्चला बँकिंग क्षेत्रातील युनायटेड फोरम या शिखर संघटनेच्या निर्णयाप्रमाणे सर्व कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार आहेत . त्यामुळे ज्याज्यावेळी संघटनेच्या माध्यमातून या कृती होतील त्यात्यावेळी या लढयाला समाजानं पाठींबा देणं गरजेच आहे आणि आर्थिक पारतत्र्यांत जाण्यापासून समाजाने बँकाना पर्यायाने स्वतःला वाचवायला हव. हेच सुज्ञपणाच लक्षण आहे. 


        ___________________________

         ___________________________  




            2024


निर्भयाला भाऊबीज मिळेल का ???




      2012 मध्ये दिल्लीतील घटना घडली आणि आवघा समाज तळातून ढवळून निघाला होता . कलकत्ता प्रकरणात पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली . अमानुषपणा आणि बीभत्सपणाने परिसीमा गाठली . आणि त्यानंतर रोजच एकेक बातमी कानावर येऊ लागली . कोल्हापूर , लातूर आणि बदलापूरने तर कहरच केला . प्रत्येक आईवडील आपल्या आपत्याला ज्ञानार्जनासाठी निश्चिंतपणे पाठवतात ती जागाच इतकी असुरक्षित असावी ! प्रखरपणे उजेडात आलेल्या या मोजक्या घटना आहेत प्रत्यक्षात घडलेल्या , घडत असलेल्या रोजच्या घटनांची आकडेवारी काढली तर डोकं गरगरायला होते इतक्या घटना रोज अवतीभवती घडत आहेत . त्यापैकी मोजक्याच पृष्ठभागावर येतात आणि कित्येक प्रकरणे जीवाचा अकांत करुन त्याचा कोणालाही थांगपत्ता न लागता विरुन जातात . या घटना घडायला ना वेळ लागते ना काळ , ना ठिकाण लागते ना वय ! मनुष्य म्हणून जन्माला आलेली पाशवी वृत्तीची माणसे समाजात बुरखा पांघरुन वावरत आहेत . आणि संधी मिळताच सावज सापडल्याप्रमाणे ती घाला घालतात , शिकार करतात . हे कमी की काय म्हणून झालेल्या घटनेला बगल देत त्याला राजकीय , धार्मिक आणि जातीय रंग दिले जातात आणि ही प्रचंड क्लेशदायक बाब आहे . खरंतर हा फक्त आणि फक्त दुर्दैवाने कचाट्यात सापडलेली स्त्री आणि विकृत मनोवृत्ती असलेले पुरुष या दोन जातीमधला संघर्ष आहे . त्यामुळे पुरुषसत्ताक संस्कृती वगैरे म्हणणे गैर आहे . त्यामुळे स्त्री पुरुष असा संघर्ष , भेदभाव तर नाहीच म्हणू शकत पण समविचारी स्त्रीपुरुषच एकत्रितपणे यावर उपाय करु शकतात .

अशा घटनांमधून सुरक्षेचा पूर्णपणे अभाव दिसून येतो आणि मोकाट प्रवृत्ती रस्तोरस्ती बिनधास्तपणे वावरण्यास प्रोत्साहन मिळत जाते ही चिंतेची बाब आहे .

      कायदे आहेत पण त्याहीपेक्षा त्याला जास्त पळवाटा आहेत . कायदा धाब्यावर बसवला जातो त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटत आहे त्यांना कसली भीती , वचक , दहशत नाहीच ! हा कसला कायदा आणि ही कसली सुव्यवस्था आहे ? यासाठी हा विषय अत्यंत गंभीर समजून त्यावर होणारे राजकारण बाजूला ठेवून सरकार , लोकप्रतिनिधी , कायदेपंडित , समाजसुधारक यांनी एकत्रित येऊन सुज्ञपणे कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे . अशा प्रकारच्या घटना घडल्या की त्यावर चर्चा , मोर्चे , निषेध नोंदवले जातात . काळाच्या ओघात त्याची दाहकता कमी होत जाते . पेपरमध्ये मीडियावर हळूहळू त्यांच्यावरची चर्चा पण थांबते . मग संघर्ष सूरु होतो फक्त संबंधित कुटुंबाचा . त्यातही गुन्हेगार बिनदिक्कतपणे बाहेर दिसतात . तेवढ्यापुरता दंगा निषेध करून उपयोग होत नाही , एवढ्यावर थांबून हा विषय निकाली निघत नाही हा अनुभव आहे . फक्त स्त्रीपुरुष समानता या विषयावर बड्या बड्या बाता मारणे आणि त्यातून स्वतःचा काही फायदा होतो का पाहणे हीच मानसिकता जास्त दिसून येते . स्वार्थासाठी उथळपणे कोणतेही निर्णय न घेता , तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा आचार आणि विचाराची अंतर्बाह्य पुनर्रचना होणे गरजेचे आहे . सच्चेपणाने काही निर्णय घ्यायला हवेत . समित्या गठित करायला हव्यात . त्यावर चिंतन व्हायला हवे .

     यासाठी भारताच्या इतिहासात थोडंसं डोकावून पाहायला हवं आणि जाणीवपुर्वक त्याची पुनरावृत्ती व्हायला हवी .

स्वराज्याचा ध्यास शिवाजी महाराजांना होता अष्टपैलू व्यक्तिमत्व आसलेला जनतेचा राजा , स्त्रियांना आदराने वागणूक मिळायची कोणी आगळीक केलीच तर जिवानिशी जाण्याची दहशत होती ! 

      स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणारे फुले दाम्पत्य , समाजसुधारक आगरकर आणि स्त्रियांसाठी , पिचलेल्या दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला तीव्र उठाव , भलं मोठं आंदोलन . यासारखी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली आणि यांच्यासारख्या अनेक आदर्श व्यक्तींच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात आपण धन्यता मानतो हे चुकीचे आहे . त्यांचे विचार जाणीवपूर्वक आचरणात आणायला हवेत . 

      या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करुन पिचलेल्या स्त्रिजातीसाठी , स्त्रीउद्धारासाठी नव्याने विचार करण्याची गरज आहे , नव्याने शाहू फुले आंबेडकर निर्माण होण्याची गरज आहे असे वाटत आहे . 

     आजकाल स्त्रिया शिकल्या , मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या , राजकारणात वावरू लागल्या , नवनवीन तंत्रज्ञान शिकून आकाश कवेत घेऊ लागल्या या आणि अशा प्रकारच्या वाक्यांची लाज वाटू लागली आहे . वेळ पडली की झर्रकन तिच्या स्त्रित्वाची लक्तरं ओरबाडली जातात तिला आणि तिच्या स्त्रित्वाला रक्तबंबाळ केलं जातंय . त्यावर उपाय होणे ही काळाची गरज आहे त्यासाठी दहशत बसेल असे कायदे आणि त्याची ठराविक कालावधीत अंमलबजावणी जाणीवपूर्वक करायला हवी . स्त्रीपुरुष समानतेची पुनर्रचना होणे गरजेचे आहे . संस्कृतीत जाणीवपुर्वक बदल घडवणे गरजेचे आहे . नवीन पिढी त्याप्रकारे होणे गरजेचे आहे .

      तिला मुक्तपणे निर्भयपणे संचार करता आला पाहिजे . अशी मानसिक , राजकीय , सामाजिक परिस्थिती निर्माण होईल का ? तिला निर्भयतेची , स्वाभिमानाची , स्वावलंबनाची , निर्णय घेण्याची भाऊबीज मिळेल का ? 



कॉ. सरिता कुलकर्णी 

जॉईंट सेक्रेटरी 

बीओएमईयु औरंगाबाद युनिट

मो. 9421607248

saritakulkarni67@gmail.com